Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मदतीशिवाय एफआरपीही अशक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऊस उत्पादकांना एफआरपी देण्याइतकीसुद्धा परिस्थिती नसल्याची कबुली साखर कारखानदारांनी दिली. एफआरपी देण्यासाठी कमी पडणारी रक्कम सरकारने दिल्यानंतरच कारखाने सुरू होतील, असा निर्णय जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बैठकीत घेण्यात आला. १० नोव्हेंबरपर्यंत कारखाने बंदच राहतील असे स्पष्ट करताना त्याच दिवशी पुन्हा बैठक घेऊन कारखाने सुरू करण्याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी ऊसतोड बंद आंदोलन सुरू केल्यानंतर ३१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद आहेत. गेले चार दिवस ऊसतोड कामगार बसून असून, दराबाबत तोडगा कधी निघणार याच्या प्रतीक्षेत उत्पादक आहेत. कारखाने सुरू करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी शनिवारी कारखानदारांची हॉटेल पॅव्हेलियन येथे बैठक झाली. एफआरपीची रक्कम देऊन कारखाने सुरू करण्याबाबत चर्चा झाली. एफआरपीची रक्कम देण्याइतपतही कारखान्यांची परिस्थिती नसल्याचे बहुतांश कारखानदारांनी स्पष्ट केले. थकीत कर्जामुळे बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. प्रत्येक पोत्यामागे एफआरपीनुसार कर्ज देताना बँका पूर्वहंगामी कर्ज, अन्य कर्जाचे हप्ते दिल्यानंतर कारखान्यांच्या हातात १९०० ते २००० रुपये पडतात. त्यामुळे एफआरपीनुसार दर देताना कारखानानिहाय ४०० ते ६०० रुपये फरक पडणार आहे. हा फरक भरून काढण्यासाठी राज्य सरकारची मदत आवश्यक असल्याचे एकमत झाले.

बैठकीत जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून कारखानदारांच्या अडचणी मांडल्या. मुख्यमंत्री, सहकारमंत्र्याशी चर्चा करून कारखानदारांची बैठक आयोजित केली जाईल. कारखानदारांना मदत करण्याचा सरकारचा सकारत्मक दृष्टिकोन असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सरकारच्या मदतीनंतर एफआरपीनुसार दर देण्यावर कारखानदारांचे एकमत झाले. १० नोव्हेंबरपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच दिवशी पुन्हा कारखानदारांची बैठक घेण्याचा निर्णय झाला. बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, माजी आमदार पी. एन. पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब चौगुले, माधवराव घाटगे, पी.जी. मेढे यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साडेनऊ टक्के बेस धरून एफआरपी अधिक २०० रुपये दराची मागणी केली आहे, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वारणा येथे शेतकरी, कष्टकऱ्यांच्या परिषेदत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १० टक्के बेस धरून एफआरपी अधिक २०० रुपये दराची मागणी केली आहे. साखर कारखानदारांनी दर जाहीर न केल्याने शेतकरी संघटनांनी ऊसतोडी बंद केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

०००००

शेतकऱ्यांना एफआरपी देणे बंधनकारक आहे, पण साखरेचे बाजारातील दर, एफआरपी आणि बँकांकडून मिळणाऱ्या कर्जातून एफआरपी देण्यात अडचणी येत आहेत. एफआरपी देण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

प्रकाश आवाडे, अध्यक्ष, जवाहर साखर कारखाना

०००००

कायद्याने एकरकमी एफआरपी देणे साखर कारखानदारांवर बंधनकारक आहे. एफआरपी देण्यासाठी कारखान्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. गेली चार वर्षे एफआरपी देण्यासाठी सरकार मदत करत आहे. यावेळी एफआरपी देण्यासाठी सरकारकडून मदत मिळेल.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

०००००

जिल्ह्यातील कारखाने बंद का?

राज्यातील अनेक जिल्ह्यांत साखर कारखाने सुरू आहेत. ऊसदरासाठी फक्त कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहेत. त्यामुळे कारखाने बंद आहेत. अन्य जिल्ह्यांतील कारखाने सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने बंद का? असा प्रश्न कारखानदारांनी उपस्थित केला आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाल्यांना हटवा, अन्यथा ठिय्या

0
0

फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शनिवारी सायंकाळी दिवाळी खरेदीसाठी महाद्वार रोडवर प्रचंड गर्दी झाली असताना फेरीवाल्यांनी रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडले. त्यामुळे संपूर्ण रोड वाहतुकीसाठी बंद झाल्याने व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे धाव घेतली. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबतची माहिती जिल्हा पोलिसप्रमुखांना देण्याची सूचना व्यापाऱ्यांनी करत पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची ग्वाही दिली. त्यांच्या सूचनेनुसार व्यापारी रविवारी सकाळी पोलिसप्रमुखांची भेट घेणार आहेत. भेटीनंतर महापालिकेने फेरीवाल्यांना न हटवल्यास दुकाने बंद करून रस्त्यावर ठिय्या मारण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे व्यापारी व फेरीवाल्यांमधील संघर्ष उफाळून आला आहे.

दिवाळी सणात महाद्वार वाहतुकीसाठी बंद केला जात असल्याने फेरीवाले रस्त्यावर कॉट व टेबल टाकून व्यवसाय करतात. परिणामी येथील वाहतूक बंद झाल्याने ग्राहकांअभावी व्यापारात घट झाली आहे. तसेच एखादी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन व्यवस्था वेळेवर पोहोचू शकणार नाही, अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे फेरीवाल्यांना व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. तसेच महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार करून फेरीवाल्यांना मनाई करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी अतिक्रमण विभागाने पाहणी करून रस्त्याकडेच्या फेरीवाल्यांनाही सूचना केल्या होत्या. फेरीवाल्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने दिवाळी सणात महाद्वार खुला राहील, अशी स्थिती निर्माण झाली होती.

शनिवारी रस्त्यावरील फेरीवाल्यांनी दिवसभर फेरीवाल्यांचे नेतृत्व करणाऱ्या अनेक नेत्यांची भेट घेत रस्त्यावर व्यापार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. याची माहिती व्यापाऱ्यांना मिळताच ते संघटित होऊन लागले. फेरीवाल्यांनी माजी उपमहापौरासह माजी नगरसेवक आणि एका पक्षाच्या कार्यकर्त्याची भेट घेतल्यानंतर सायंकाळी फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल मांडले. त्यामुळे काही क्षणात महाद्वार रोड वाहतुकीसाठी बंद झाला. अतिक्रमण विभागाच्या पथकासमोरच फेरीवाल्यांनी ठाण मांडले. फेरीवाले रस्त्यावर एकवटल्यानंतर व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे धाव घेतली. महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. चौधरी, उपमहापौर महेश सावंत, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, विलास वास्कर, शारंगधर देशमुख, राहुल चव्हाण, राजसिंह शेळके, राहुल माने, ईश्वर परमार आदी पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली.

व्यापाऱ्यांची बाजू मांडताना नगरसेवक किरण नकाते म्हणाले, 'वाहतूक बंद करुन रस्त्यावर व्यापार करण्यास मनाई असताना फेरीवाल्यांनी रस्त्यात ठाण मांडले आहे. फेरीवाल्यांना मज्जाव करू याबाबत महापालिकेने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले असताना अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही,' असा प्रश्न उपस्थित केला. तर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला न ठेवल्यास दुकाने बंद ठेवण्याचा इशारा दिला.

'रस्ता वाहतुकीसाठी बंद करु नये, यासाठी पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी यापूर्वीच चर्चा केली आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घ्यावी. तत्पुर्वी त्यांच्याशी संपर्क साधून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाला कारवाईचे आदेश देऊ असे,' आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी अतिक्रमण विभाग व अग्निशमन विभागाला सूचना दिल्या.

यावेळी व्यापारी पंकज भांबुरे, मनोज बहिरशेट, विनित कटके, श्रीकांत सारडा, राहुल नष्टे, कुलदीप गायकवाड, राजेंद्र वणकुंद्रे, बाबा आमते, जयंत गोयानी आदी व्यापारी उपस्थित होते.

'त्या' फेरीवाल्यांना विरोध का नाही?

महाद्वार रोडकडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून दुकानदार भाडे घेत असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. मात्र ही चर्चा आयुक्तांपर्यंत पोहोचली असल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट झाले. बैठकीत जुन्या फेरीवाल्यांना विरोध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आयुक्तांनी त्यांना अटकव करत 'जुन्या व्यापाऱ्यांना आपला का विरोध नाही, याचे कारण माहीत आहे. त्यांचा प्रश्न आम्ही निकालात काढू,' असे म्हणताच बैठकीचा नूर पालटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचलित दरानुसार इस्टिमेट द्या

0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने सद्य:स्थितीत पुरवण्यात येत असलेल्या विद्युत सुविधा आणि कंपनीच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधांतील रकमेमध्ये तफावत आहे. दरातील तफावत दूर करण्यासाठी प्रचलित दरानुसार कंपनीने इस्टिमेट सादर करावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाने शनिवारी केली.

शहरात एनर्जी इफिशीएंट सर्व्हिस लि. कंपनीच्यावतीने एलईडी प्रोजक्ट राबवण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव महासभेत चर्चेला आला होता. सभेत कंपनीकडून प्रोजेक्टचे सादरीकरण करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. त्यानुसार शनिवारी स्थायी समिती सभागृहात महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व पदाधिकाऱ्यांसमोर कंपनीने प्रोजेक्टचे स्लाइड शोद्वारे सादरीकरण केले. कंपनीचे अभियंता अमित चोपडे यांनी सादरीकरणा दरम्यान पदाधिकारी व सदस्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले.

'सद्य:स्थितीत महापालिकेला एका युनिटसाठी विद्युत पुरवठा, देखभालीसाठी ५,५०० खर्च येत आहे. कंपनीने दिलेल्या दरानुसार हा खर्च ७,५०० पर्यंत जाणार आहे. महापालिकेच्या खर्चामध्ये बचत करण्यासाठी प्रचलीत दरानुसार इस्टिमेट देण्याची सूचना सदस्यांनी केली.' आयुक्त डॉ. चौधरी यांनीही कमीत-कमी दर करण्याची सूचना कंपनीला केली. तसेच जुने विद्युत साहित्य कोणत्या दराने खरेदी करणार, अशी विचारणा कंपनीला केली.

बैठकीस उपमहापौर महेश सावंत, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, गटनेता शारगंधर देशमुख, राजसिंह शेळके, ईश्वर परमार, राहुल माने, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे युवा पदाधिकारी जाहीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा युवा अधिकारी म्हणून संदीप पाटील (कागल, चंदगड, राधानगरी मतदारसंघ), मंजित माने (कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर मतदारसंघ ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर अधिकारीपदी चेतन शिंदे, पीयूष चव्हाण (कोल्हापूर उत्तर), विश्वजित साळुंखे (कोल्हापूर दक्षिण) यांची निवड झाली आहे. जिल्हा समन्वयकपदी योगेश चौगुले, दिनेश कुंभीरकर, तर जिल्हा चिटणीसपदी अविनाश कामते यांची निवड झाली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

उपजिल्हा युवा अधिकारी पदावर प्रतीक क्षीरसागर (चंदगड), सागर पाटील (कागल), प्रसाद पिलारे (राधानगरी) यांना निवडण्यात आले. प्रताप पाटील (चंदगड), अवधूत पाटील (गडहिंग्लज), युवराज पाटील (आजरा), रवींद्र पाटील (राधानगरी), अमोल खोत (भुदरगड), शशिकांत जाधव (कागल) यांची तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाली. तालुका समन्वयकपदी शरद गावडे (चंदगड), बाबूराव नाईक (गडहिंग्लज), धनाजी बुगडे (आजरा), राहुल जरग (राधानगरी), विक्रम पाटील (भुदरगड) यांची निवड झाली. कागल शहर युवा अधिकारी म्हणून नितीन खराडे (मुरगूड) यांना संधी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जीएस निवडीचा घोळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कॉलेज प्रतिनिधी (जीएस) निवड होऊन जवळपास सव्वा महिना उलटल्यानंतर निवड प्रक्रियेत घोळ झाल्याचे निदर्शनास आले. कॉलेज निवडणूक कमिटीने जीएस आदित्य लक्ष्मण महानवरची निवड रद्द केल्याचे सांगितल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

निवड रद्द केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मराठा महासंघाच्या विद्यार्थी सेनेचे ऋतुराज माने, प्रतीक काटकर व शाहीद मुजावर यांच्यासह महानवर याने प्राचार्यांची भेट घेऊन दिला. तसेच दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली. कॉलेज विद्यार्थी मंडळाच्या निवडीदरम्यान तृतीय वर्ष सिव्हिल अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावरील विद्यार्थ्यांनी वर्ग प्रतिनिधी होण्यास नकार दिला होता. त्यानंतर गुणानुक्रमे तिसऱ्या स्थानावरील विद्यार्थी महानवरची वर्ग प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली. तर २५ सप्टेंबर रोजी कॉलेजच्या जीएसपदी निवड झाली. दरम्यान शनिवारी निवडणूक कमिटीने त्याला जीएसपदी झालेली निवड रद्द झाल्याचे सांगितले. यासंदर्भात कॉलेज व्यवस्थापनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम कमागारांचा मनपासमोर शंखध्वनी

0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाकडून कामगार असल्याचा दाखल देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याच्या निषेधार्थ शनिवारी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीने महापालिकेसमोर शंखध्वनी केला. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सोमवारी (ता. १२) उपशहर अभियंत्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कल्याण महामंडळाकडून बांधकाम कामगारांना विविध स्वरुपाचे लाभ दिले जातात. महामंडळाकडे नोंदणी करण्यासाठी शहरातील कामगारांना महापालिकेचा कामगार असल्याचा दाखला अनिवार्य केला आहे. कामगारांना दाखला देण्याची सुविधा महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयामध्ये केली आहे. मात्र उपशहर अभियंत्यांकडून वेळेत दाखल मिळत नसल्याची तक्रार कामगारांकडून प्रशासनाकडे नेहमीच केली जाते. मात्र तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत शंखध्वनी केला. तसेच अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करण्याची मागणी केली.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटवले. त्यामुळे त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रास्ता रोको करण्यास विरोध करत प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आंदोलनकांबरोबर चर्चा केली. सरनोबत यांनी सर्व उपशहर अभियंत्यांसमवेत संघटनेची सोमवारी (ता. १२) बैठक घेऊन बैठकीचा अहवाल शनिवारी (ता. १७) होणाऱ्या महासभेत सादर करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलनकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी अध्यक्ष गुणवंत नागटिळे, उपाध्यक्ष संजय सुतार, संतोष गायकवाड, अभिजित केकरे, जोतीराम मोरे, के. पी. पाटील, मच्छिंद्र कांबळे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदुस्थानी संगीतावर फुलली नृत्यगंगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर फुललेला 'भरतनाट्यम्'चा नृत्याविष्कार, संगीत नाटकातील पदे, बंदिशी, तराणा, चतुरंग अशा विविध संस्कारित रचना आणि रसिक प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद अशा माहोलात 'नृत्यगंगा' कार्यक्रम रंगला. नृत्यांगना अपेक्षा मुंदरगी आणि सुमेधा राणे यांनी हिंदुस्थानी संगीत आणि दाक्षिणात्य नृत्यशैलीचा समन्वय घडविला. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाला.

तालबद्ध आणि लालित्यपूर्ण पदन्यास, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि संगीत नाटकातील पदांवर सुरेख नृत्ये यामुळे हा कार्यक्रम उपस्थितांसाठी वेगळा अनुभव ठरला. ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. सुचेता चापेकर यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित भरतनाट्यम् नृत्यशैलीची निर्मिती केली आहे. त्यांच्या शिष्या आणि भरतनाट्यममधील अलंकार पदवीप्राप्त नृत्यांगना अपेक्षा मुंदरगी आणि सुमेधा राणे यांनी 'नृत्यगंगा' कार्यक्रमाद्वारे भरतनाट्यमचे सादरीकरण केले.

'प्रस्तार' या नर्तनाच्या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर अष्टमंगल, अष्टपदी सादर करत त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. शास्त्रीय संगीतावर आधारित नृत्याविष्कारानंतर प्रेक्षकांना नाट्यगीताचा आस्वाद चाखायला मिळाला. 'सुवर्णतुल्य' नाटकातील 'येतील कधी यदुवीर' या नाट्यगीतावर नृत्यांगनांनी श्रीकृष्ण आणि नायिकेचे भांडण, तिची विरहव्यथा मांडली. नृत्यदेवता शिवाच्या रुपाचे व नृत्याचे वर्णन करणाऱ्या रचनेवरील 'शिवस्तुती' नृत्यप्रकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. दोन तासाहून अधिक काळ रंगलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळमध्ये वसुबारस दिन साजरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. गायीचे पावित्र्य आणि मांगल्य लक्षात घेऊन संस्कृतीची जपणूक, उत्तम पशू संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने वसूबारस कार्यक्रमाचे आयोजन केले आहे' असे प्रतिपादन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले.

'गोकुळ'च्यावतीने ताराबाई पार्कातील कार्यालयात वसुबारस दिनानिमित्त गाय वासरू पूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी 'रोजगार निर्मितीबरोबर दूध उत्पादकांना आर्थिक लाभ व त्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त करुन दिले' असे महाडिक म्हणाले. याप्रसंगी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक अरुण नरके, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशिल देसाई, उदय पाटील, जयश्री पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, जनरल मॅनेजर आर. सी. शहा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारखाने सुरु करण्याचे पालकमंत्र्याचे आवाहन

0
0

कारखाने सुरु करण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ऊसदरप्रश्नी जिल्ह्यातील बंद असलेले साखर कारखाने सुरू करावेत', असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखानदारांना केले. एफआरपीबाबत कारखान्यांना येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. रविवारी दुपारी साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळाने सरकारी विश्रामगृहावर पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी एफआरपी देण्याबाबत कारखान्यांना येणाऱ्या अडचणीबाबत अर्धा तास चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी एफआरपी देण्याबाबत मदतीचे आश्वासन दिल्यानंतरच कारखाने सुरू करू, अन्यथा बंदच ठेवू, असा पवित्रा कारखानदारांनी घेतला आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत कारखाने बंदच राहणार आहेत.

कारखानदारांनी एफआरपीबाबत आपली बाजू पालकमंत्र्यासमोर मांडली. बाजारपेठेतील साखरेच्या दरानुसार पूर्वहंगामी कर्ज, अन्य कर्जांचे हप्ते वजा करून बँका कारखान्यांना कर्ज देणार आहेत. बँकांकडून मिळणारी उचल आणि एफआरपीची रक्कम यामध्ये कारखानानिहाय ४०० ते ६०० रुपयांचा फरक पडत आहे. साखरेचे घसरलेले दर, एकरकमी एफआरपी आणि बँकांकडून मिळणारे कर्ज यामुळे एफआरपी देणे अशक्य आहे. त्यामुळे सरकारने एफआरपी देण्यासाठी मदत करावी, अशी मागणी कारखानदारांकडून करण्यात आली.

कारखानदारांच्या शिष्टमंडळात आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

.............

कोट

'कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे एकरकमी दर देणे बंधनकारक आहे. गेली चार वर्षे सरकार मदत करत आहे. यावर्षीही कारखानदारांना मदत केली जाईल. बंद ठेवलेले कारखाने सुरू करावेत. कारखानदारांना एफआरपी देण्याबाबतच्या अडचणींची माहिती मुख्यमंत्र्यांना सांगण्यात येईल.

चंद्रकांत पाटील,पालकमंत्री

..............

कोट

'वारणेतील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगाचा अभ्यास करुन एफआरपी अधिक दोनशे रुपये दराची घोषणा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी अज्ञानातून वक्तव्य केले आहे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट करावे.

राजू शेट्टी,खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवाचा न्यारा थाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्युत रोषणाईचा झगमगाट, आकाशकंदिलाचा लखलखाट, तेजोमय पणत्यांची विलोभनीय आरास अशा उत्साही वातावरणात दीपोत्सवाला प्रारंभ झाला. वसुबारसच्या दिनी दिवाळीच्या तेजोत्सवांनी सारे वातावरण उजळले. घरोघरी प्रकाशाचा उत्सव आणि मांगल्याचा सोहळा डोळे दिपवणारा ठरला. सोमवारी धनत्रयोदशी (ता.५) असून या दिवसाला 'यमदीपदान' म्हणून संबोधले जाते. सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. धनत्रयोदशीला धन्वतंरी पूजन केले जाते. व्यापारी, दुकानदार नवीन वही घालतात. वही पूजनासाठी दिवसभराची वेळ शुभ असल्याचे पंचागकर्त्यांचे म्हणणे आहे. बाजारपेठेत रविवारी खरेदीला बहर आला होता. बाजारपेठा, बँका, कार्यालये, शोरुम्स आकर्षक रोषणाईने उजळले. दिवसभरात सजावट साहित्य, गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. वसुबारसला पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. या परंपरेला अनुसरुन ठिकठिकाणी गाईचे पूजन झाले. गाईसह वासरांना सजविले होते. ग्रामीण भागात पूजन आणि औक्षणासाठी खास मंडपाची उभारणी केली होती. सायंकाळच्या सुमारास सुवासिनींनी गोमातेचे पूजन व औक्षण करत गोडपदार्थ खाऊ घातले. पशुधनाची पूजा आणि 'दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळू' म्हणत कृतज्ञता जपली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांच्या वीजदर प्रश्नी मुंबईत बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'उद्योगाला पुरविण्यात येणाऱ्या वीजेचा दर कमी करण्यासाठी हिवाळी अधिवेशनापूर्वी, आगामी ८ ते १० दिवसांत मुंबईत बैठक घेण्यात येईल. तेथे सकारात्मक निर्णय घेऊ. पंचतारांकितसह विविध औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांसह मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी उद्योजक संघटनांचे पदाधिकारी, उद्योग विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दर महा बैठक घेऊ,' असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिले. रेसिडन्सी क्लबमध्ये उद्योजकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. सर्वच उद्योजक संघटनांच्या अध्यक्षांनी सरकारची चुकीचे धोरणे आणि अधिकाऱ्यांची कामकाजातील दिरंगाई या विरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'उद्योजकांनी वीज दरवाढीचा व्यवसायाला फटका बसत असल्याचे सांगितले आहे. वीजेचे दर कमी करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतण्यासाठी प्रयत्न केले जाईल. यासाठी हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊ. त्यात चर्चा करून विजेचे दर कमी कसे होतील याला प्राधान्य दिले जाईल. विमानसेवा सुरळीत करण्यासाठी दिल्लीपर्यंत ठोस पाठपुरावा केला जात आहे. मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन कंपनी बोगस निघाल्याने विमानसेवा बंद झाली. आता नव्याने विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानपत्तन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला जात आहे.'

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, 'वीज दरवाढीमुळे उद्योजकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. सरकारबद्दलचे फिलगुडचे वातावरण कमी होत आहे. उद्योजक सरकारबद्दलचे मत बनवत असतात. किमान दीड ते दोन हजार जणांना ते मतदान कुणास करायचे हे सांगू शकतात. त्यामुळे पालकमंत्र्यांनी वीज दरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.'

आमदार अमल महाडिक, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, 'स्मॅक'चे अध्यक्ष राजू पाटील, 'मॅक'चे अध्यक्ष हरीषचंद्र धोत्रे, इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर,'गोशिमा'चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी उद्योजकांचे विविध प्रश्न, समस्या मांडल्या. म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, उद्योजक ललित गांधी आदींसह उद्योजक उपस्थित होते. राहुल चिक्कोडी यांनी सूत्रसंचालन केले.

विमानसेवा १० नोव्हेंबरपर्यंत सुर‌ळीत

'कोल्हापूरच्या विमानसेवेला १८ प्रकारचे अडथळे असल्याचे समोर आले आहेत. येथील धावपट्टीही योग्य नाही. या अडचणी सोडवून १० नोव्हेंबरपर्यंत विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहे' असे विमानतळ व्यवस्थापक पूजा मूल यांनी सांगितले. यावर उद्योजक मोहन मुल्हेरकर यांनी 'सेवा द्यायची नाही म्हणून नवे अडथळे शोधताय का? अशी विचारणा करत त्यांनी मूल यांना धारेवर धरले. 'विमानसेवा सुरू होण्याचे अनिश्चित असताना बुकिंग कसे घेतले?,' असा प्रश्न उद्योजकांनी विचारून मूल यांना निरूत्तर केले. वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शैलेंद्र राठोड हे वीज दरवाढीचे समर्थन करीत असल्याचे लक्षात येताना उपस्थित उद्योजक आक्रमक झाले. त्यांनाही विविध प्रश्न विचारून उद्योजकांनी निरूत्तर केले.

सीएसआरमधून मदत करा

'कोल्हापुरात उद्योग विस्तारीकरणासाठी जमीन कमी पडत असल्याचे औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. यावर विकासवाडीतील २५० एकर जमीन उद्योगासाठी आरक्षित आहे. ते आरक्षण उठवू नये, असे कडक पत्र उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दिल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. शहरात मुलींसाठी चार वसतिगृहे बांधण्यासाठी १६ कोटींची गरज आहे. यासाठी उद्योजकांनी सीएसआरमधून आर्थिक मदत करावी,' असे आवाहनही त्यांनी केले.

उद्योजकांनी मांडलेल्या तक्रारी

- १८ ते २२ टक्यांपर्यंतची वीज दरवाढ कमी करा

- औद्योगिक वसाहतीमधील सर्व रस्ते दुरुस्ती करा

- पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पोलिस ठाण्यासाठी इमारत बांधा

- उद्योग विस्तारासाठी जमीन द्या

- विमानसेवा सुरळीत करा

- दुहेरी करपद्धती बंद करा

- कुशल कौशल्य केंद्र कार्यरत करा

- ईएसआय हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्च मोठा, फलनिष्पती कमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियानाचा गाजावाजा झाला. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील १०७ गावांत 'जलयुक्त'संदर्भातील १८५९ कामे झाली. त्यावर जवळपास ४८ कोटी रुपये खर्च पडले असून, १४ हजार टीसीएम पाणीसाठा झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. अभियानावरील खर्चाचा आकडा वाढत असताना त्याची फलनिष्पत्ती काय? योजना राबविलेल्या काही गावांत आजही पाणीटंचाईची समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी आहेत.

२०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षात पूर्ण झालेल्या कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी झाली आहे. यंदा अभियानांतर्गत ७२ गावांची निवड केली आहे. १० कोटी ५६ लाख रुपयांच्या ६१२ विकासकामांचा आराखडा मंजूर केला आहे. त्यापैकी ५४५ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलस्रोत बळकटीकरण, सलग समतल चर, माती नाला बांध तयार करणे, शेततळी, सिमेंट बंधारा, सिमेंट बंधारा दुरुस्ती, गाळ काढणे, विहीर पुर्नभरण, गाळ काढणे, नाला खोलीकरण व रुंदीकरण अशी कामे प्रस्तावित आहेत.

या योजनेच्या सहकार्यातून काही गावांनी पाणी बचतीचे धडे गिरवले. पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याची वाट चोखाळल्याची उदाहरणे दिली जातात. दुसरीकडे या योजनेचा केवळ गवगवा झाला आहे. मुळातच जिल्ह्यातील विविध भागांत मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे नव्याने पाणीसाठा तयार केला. यामध्ये तथ्य वाटत नाही. योजना यशस्वी झाली असल्यास हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा तालुक्यांतील अनेक गावांत अद्यापही पाणीटंचाई का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. योजनेत समाविष्ट कामांचा दर्जा उत्कृष्ट नसल्याची टीका होत आहे.

०००००

यंदाच्या प्रस्तावित कामांवर दृष्टिक्षेप

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यावर्षी ६१२ कामांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये कृषी विभागाकडील ३१८, लघुसिंचनमधील १५, पाटबंधारे विभागाची ४६, वन विभागाची ८३, सामाजिक वनीकरणची १४, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील ११, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग व लोकसहभागाची मिळून ८३, पाटबंधारे दक्षिण विभागाकडील २ आणि ग्रामपंचायतकडील ३२ कामांचा समावेश आहे. १० कोटी ५६ लाख रुपयांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी सहा कोटी सात लाख रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता, तर पाच कोटी ८७ लाख रुपयांच्या ५४५ कामांना प्रशासकीय मान्यता आहे.

०००००

योजनेवर आतापर्यंतचा खर्च, पूर्ण कामे आणि पाणीसाठा आकडेवारी (एक टीसीएम म्हणजे दहा लाख लिटर पाणी)

२०१५-१६ वर्ष

६९ गावांचा समावेश, खर्च : ३० कोटी ३८ लाख रुपये

(जलयुक्तची १२१२ कामे पूर्ण, पाणीसाठा : ७१६ टीसीएम)

०००

२०१६-१७……… वर्ष

२० गावांचा समावेश, खर्च : १७ कोटी सात लाख रुपये

(जलयुक्तची ४६१ कामे पूर्ण, पाणीसाठा : ९१७० टीसीएम)

................

२०१७-१८

१८ गावांचा समावेश, खर्च : एक कोटी ३२ लाख रुपये

(जलयुक्तची १८६ कामे पूर्ण, पाणीसाठा : ४२८६ टीसीएम)

००००

जलयुक्त शिवारमुळे नागरिकांना पाणी वापराविषयी जागरूकता निर्माण झाली. अनेक गावांनी स्वयंस्फूर्तीने कामे केली आहेत. योजनेच्या पहिल्या तीन वर्षांच्या कालावधीत १०७ गावांमध्ये जवळपास १८५९ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सुरू आहेत. यावर्षी ७२ गावांमध्ये योजना राबविण्यात येणार आहे.

भाग्यश्री फरांदे, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय

०००

जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. योजनेंतर्गत पूर्ण कामाचा बनाव आहे. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली येथे बांधलेले शेततळे आठ महिन्यांतच वाहून गेले. सरकारी निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे. सरकारची योजना लोकांपर्यंत पोहोचली नाही.

सविता भाटळे, जि.प. सदस्य, राधानगरी

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्मिती विचारमंचतर्फे शनिवारी चर्चासत्र

0
0

कोल्हापूर : निर्मिती विचारमंच आणि राष्ट्राधार सोशल फाउंडेशनतर्फे 'भारतीय संविधान समजून घेताना' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता.१०) सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत राजर्षी शाहू स्मारक भवन येथे चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्रात २०० हून अधिक अभ्यासक, विचारवंत व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन व विचारवंत डॉ. राम पुनियानी यांचे बीजभाषण होणार आहे. आंबेडकरवादी विचारवंत डॉ. विठ्ठल शिंदे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलाप्रबोधिनी’ला ‘नॅक’चे बी मानांकन

0
0

कोल्हापूर : कलाप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन कॉलेजला 'नॅक'कडून 'बी' मानांकन मिळाले आहे. 'नॅक'कमिटीने ऑक्टोबर महिन्यात या कॉलेजचे मूल्यांकन केले होते. कमिटीच्या अध्यक्षा डॉ. विजया देशमुख (राजस्थान), सदस्या डॉ. श्रृती बंदोपाध्याय (पश्चिम बंगाल), प्रा. ए. मारिया सुसॉय (तामिळनाडू) यांनी पाहणी केली होती. या कालावधीत त्यांनी कॉलेजमधील भौतिक सुविधांची पाहणी, माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कॉलेजची नॅक प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये संस्थेचे माजी चेअरमन आर्किटेक्ट जयंत बेगमपुरे, चेअरमन विजय गजबर, प्राचार्या गिरीजा कुलकर्णी, समन्वयक केदार कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : आक्काताई खेबुडे

0
0

फोटो..

आक्काताई खेबुडे

कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील आक्काताई साताप्पा खेबुडे (वय ६०) यांचे निधन झाले. ग्रामपंचायतीचे लिपिक गणेश खेबुडे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षावसर्जन सोमवारी (ता.५) सकाळी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता सरकारी कार्यालयात ‘आधार’

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : आधार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज भरून घेणे, दुरूस्ती प्रक्रियेसाठी मनमानी पैसे वसुली अशी खाबुगिरी काही ठिकाणी सुरू आहे. त्याला चाप बसण्यासाठी आधार केंद्र कायमस्वरूपी जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सरकारी कार्यालये, महानगरपालिकेच्या शहर वार्ड आणि मुख्य कार्यालयात, नगरपालिका, ग्रामपंचायतीत स्थलांतर करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

सद्यस्थितीत राष्ट्रियीकृत बँका, पोस्टातील शाखांमध्ये आधार केंद्रे सुरू आहेत. याशिवाय आयटी विभागाकडून जिल्ह्यात १०५ खासगी व्यक्तींना आधार ओळखपत्रासाठी अर्ज भरून घेण्याचा परवाना देण्यात आला आहे. या खासगी व्यक्तींची केंद्रे शहरे आणि तालुक्याच्या ठिकाणी आहेत. तेथे कुणाचेही नियंत्रण नाही. नविन 'आधार'साठी मोफत ऑनलाईन अर्ज भरून घेणे बंधनकारक आहे. नाव, पत्यात दुरुस्तीसाठी ३५ रूपये आकारण्यास मुभा आहे. मात्र नविन ओळखपत्रासाठी विविध कारणे सांगत, अडवणूक करीत किमान १०० ते ३०० रुपये तर पत्ता, नाव बदलासाठी निर्धारित रक्कमेच्या दुप्पट, तिप्पटीने पैसे घेतले जातात.

लक्ष्मीपुरीतील एका खासगी केंद्रासमोर 'येथे आधार काढून मिळेल' असा मोठा फलक लावून अनेक महिन्यांपासून खुलेआम लूट केली जात आहे. अपवाद वगळता सर्वच खासगी केंद्रांत असेच प्रकार चालतात. हे थांबण्यासाठी प्रशासन विविध टप्यांवर प्रयत्न करीत आहे. पैसे घेतल्याची तक्रार आल्यानंतर संबंधित केंद्रचालकांवर कारवाई केली जाते. पण, सध्याची केंद्रे सरकारी यंत्रणेपासून लांब असल्याने पैसे घेतल्याची तक्रार देण्याचे प्रमाण कमी आहे.

नागरिकांमध्ये वेळ, पैसे खर्च करून तहसीलदार, जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे तक्रार देण्यासाठी कोण जाणार अशी मानसिकता तयार होते. म्हणून सर्व खासगी आधार केंद्रे सरकारी इमारतीत स्थलांतरची प्रक्रिया गतीने केली जात आहे. सरकारी कार्यालयातील केंद्रांत पैसे घेतल्यानंतर त्याचवेळी तक्रार होईल. त्याच्या चौकशीनंतर दोषींवर कारवाई करणे सोपे होणार आहे. 'आधार' देण्याच्या प्रक्रियेतील भ्रष्टाचार कमी होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

अशी असतील आधार केंद्रे

जिल्हाधिकारी कार्यालय ३

जिल्हा परिषद २

तहसील कार्यालय आणि पंचायत समितीत प्रत्येकी एक

महानगरपालिकेत ५

शहरातील चार विभागीय वार्ड कार्यालयात प्रत्येकी २

सर्व नगरपालिकांत २

नगरपालिकेच्या प्रत्येक वार्ड कार्यालयात १

ग्रामपंचायतीत १ आधार केंद्र

चार तालुक्यात केंद्रे

सध्या गडहिंग्लज, गगनबावडा, कागल आणि हातकणंगले या चार तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीत प्रायोगिक तत्वावर आधार केंद्र सुरू केले आहे. या केंद्रांत नियमानुसार पैसे आकारणे, नवे ओळखपत्र काढताना पैसे न मागणे असा सकारात्मक बदल दिसतो आहे. पैसे मागितले तरी केंद्राच्या आवारातील तहसीलदारांकडे व इतर अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्याकडे कल वाढला आहे. परिणामी 'आधार'साठीच्या लाचखोरीला आळा बसत आहे.

कोट

खासगी ठिकाणच्या आधार केंद्रांवर प्रशासनाला नियंत्रण ठेवणे अडचणीचे होते. परिणामी निकषापेक्षा अधिक पैसे घेतल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे सरकारी कार्यालयातच आधार केंद्र सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेतत. त्याची कार्यवाही सुरू आहे. सर्व सरकारी संस्थांतील अधिकाऱ्यांना सरकारी इमारतीत जागा उपलब्ध करून देण्यासंबंधीचे पत्र पाठवण्यात आले आहे.

- जयंत पाटील, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, आयटी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत खरेदीसाठी बाजारपेठ फुलली

0
0

फोटो - अनंतसिंग

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

बहुतांश यंत्रमाग कामगारांच्या हाती दिवाळीच्या बोनसची रक्कम पडल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा लावलेले स्टॉल व त्याभोवती नागरिकांची खरेदीसाठी झालेली गर्दी यामुळे दिवाळी सणाच्या उत्साहात आणखीन भर पडली आहे.

रविवारी सायंकाळनंतर मुख्य मार्गावर रस्त्याच्या मध्यभागीही दुकाने मांडल्याने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. दोन दिवसांपासून कामगारांच्या हाती बोनसची रक्कम पडू लागली आहे. त्यामुळे गर्दीत वाढ झाली आहे. मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध आकारातील आकाशकंदील, रांगोळ्या, पणत्या, लहान मुलांचे तयार कपडे यासह फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला दुकाने थाटल्यामुळे नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होत आहे. गांधी पुतळ्यापासून मलाबादे चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विविध कपड्यांचे स्टॉल्स मांडले आहेत. रविवारी गोवत्स द्वादशी वसुबारस शहर व परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी गाय व वासराची भक्तिभावाने पूजा करण्यात येऊन त्यांना ओवाळण्यात आले. सोमवारी धनत्रयोदशी, मंगळवारी नरकचतुर्दशी, बुधवारी लक्ष्मीपूजन, गुरुवारी दिवाळी पाडवा व शुक्रवारी भाऊबीज साजरी होत आहे. त्यामुळे रविवार सुट्टीचा दिवस साधत खरेदीला गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्टचे आठवड्यात काम सुरू

0
0

आठवड्यात लिफ्टचे काम सुरू

टीपी व शिवाजी मार्केटमधील लिफ्टचा दिव्यांगांना फायदा; ३३ लाखाची निविदा मंजूर

कोल्हापूर टाइम्स टीम

राजारामपुरी येथील नगररचना कार्यालय (टीपी) आणि छत्रपती शिवाजी मार्केट येथे लिफ्ट उभारण्याचे काम क्रिष्ट कंपनीला मंजूर झाले. ३३ लाख ३० हजाराच्या कामाची निविदेला मान्यता मिळाली असून, लवकरच वर्क ऑर्डर काढण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव स्थायी समितीमध्ये मंजूर झाला होता. दोन्ही ठिकाणी लिफ्ट उभारण्यात येणार असल्याने अनेक वर्षाचा प्रश्न निकालात निघणार आहे.

छत्रपती शिवाजी मार्केट येथे महापालिकेची पाणीपुरवठा, घरफाळा, शिक्षण, इस्टेट आदी कार्यालये आहेत. दुसऱ्या मजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत महापालिकेची प्रमुख कार्यालये असल्याने येथे अभ्यागतांची वर्दळ नेहमीच असते. यामध्ये ज्येष्ठ, महिला, अपंगांचा समावेश असतो. या सर्वच अभ्यागतांच्या सोईसाठी लिफ्ट बसवली. पण वारंवार लिफ्ट नादुरुस्त होत असल्याने दुरुस्तीवर महापालिकेचा मोठा खर्च होत होता. तसेच एकदा लिफ्टमध्ये बिघाड झाल्यानंतर दुरुस्ती करण्यास बराच अवधी लागत होता. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांची जिने चढताना चांगलीच दमछाक होत होती. लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी अनेकवेळा महासभा व स्थायी समितीमध्ये वादळी चर्चा झडल्या. मात्र लिफ्ट बसवण्याबाबत निर्णय होत नव्हता. तर याऊलट स्थिती राजारामपुरी येथील टीपी कार्यालयाची होती. येथे लिफ्ट नसल्यामुळे अभ्यागत जिने चढत कार्यालयात पोहोचावे लागत होते.

नागरिकांची अडचण लक्षात घेवून टीपीसह शिवाजी मार्केटमधील लिफ्ट बसवण्याची मागणी वारंवार करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र दोन आठवड्यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये लिफ्ट बसवण्याचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवली. कामासाठी चार कंपन्यांनी निविदा दाखल केली होती. यापैकी सर्वात कमी किमंतीची क्रिष्टा कंपनीच्या निविदेला मंजुरी मिळाली. शिवाजी मार्केट येथील लिफ्टसाठी १७ लाख, २५ हजार तर टीपी विभागात १६ लाख पाच हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिवाजी मार्केट येथील लिफ्ट महापालिकेच्या फंडातून तर टीपी विभागातील लिफ्ट अपंग कल्याण निधीतून उभारण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. वर्क ऑर्डरनंतर आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने, अनेक वर्षाचा प्रश्न निकालात निघणार आहे.

राजारामपुरी येथील १६ लाख पाच हजार खर्च करून लिफ्ट उभारण्यात येणार आहे. यासाठी अपंग कल्याण निधीचा वापर करण्यात येणार असल्याचे सूत्रानी सांगितले. पण लिफ्टचा वापर दिव्यांगांना होण्यासाठी प्रथम येथे रॅम्प उभारण्याची आवश्यकता आहे. रॅम्पपर्यंत व्हिलचेअर गेल्यानंतरच खऱ्या अर्थनाने लिफ्टचा वापर त्यांना करता येईल.

टीपी व शिवाजी मार्केटमध्ये लिफ्ट उभारण्याचा ठराव स्थायी समितीमध्ये झाला असून निविदा मंजूर झाली आहे. आयुक्तांच्या परवानगीनंतर दिवाळीनंतर कामाला सुरुवात होईल.

हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमितीकरणासाठी अंतिम मुदतवाढ

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी केलेल्या अनधिकृत बांधकामे व भूखंड नियमितीकरणासाठी सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुभा दिली होती. पण मिळकतधारकांनी याला अल्प प्रतिसाद दिल्याने पुन्हा नियमितीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका प्रशासनाने अंतिम मुदत दिली आहे. मुदतवाढीनंतरही नियमितीकरणासाठी वेळेत प्रस्ताव सादर न केल्यास अशा मिळकतधारकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

शहरात अनेक मिळकतधारकांनी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधकामे केली आहेत. तसेच अनेक भूखंडाचे लेआउट मंजूर झालेले नाहीत. राज्यातील बहुतांशी महापालिकेच्या क्षेत्रात अनधिकृत बांधकामांची संख्या आहे. महापालिका हद्दीमध्ये २०१५ पूर्वी बांधलेल्या अशा अनधिकृत मिळकती व भूखंडांच्या लेआउटला मंजुरी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगररचना विभागाने घेतला. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ 'क' नुसार बांधकामे नियमितीकरणासाठी मूदत दिली. ऑक्टोबर २०१७ रोजी काढलेल्या आदेशानुसार सप्टेंबर २०१८ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत मिळकतधारकांना दिली. त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाने जाहीर प्रकटन दिले. पण वर्षात मिळकतधारकांनी अत्यंत अल्प प्रतिसाद दिला. त्यामुळे पुन्हा अशा मिळकतधारकांना बांधकामे अधिकृत करण्याची महापालिकेने संधी दिली आहे. प्रशासनाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर सरकारच्या निर्णयामधील तरतुदीनुसार विकास कर, प्रशमन आकार, प्रीमियर व इतर लागू असणारे शुल्क आकारुन अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत दुपारी तीन पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दिली आहे. मुदतीमध्ये अशा मिळकतधारकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इफ्फी’मध्ये कोल्हापूरचा ‘हॅपी बर्थ डे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील एक तरुण इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करतो. पुण्यात आठ वर्षे नोकरी करतो. या कालावधीत तो सिनेमा आणि नाट्य संस्थांशी जोडला जातो. अशा टप्प्यावर मेधप्रणव पोवार या युवा कलाकाराच्या मनात कलाक्षेत्रात करिअर करण्याची बीजे रुजतात. आणि तो या क्षेत्रातील शास्त्रशुध्द शिक्षणासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश करतो. इन्स्टिट्यूटमध्ये दिग्दर्शनाचा कोर्स पूर्ण करताना 'हॅपी बर्थ डे 'ही शॉर्टफिल्म बनवतो. कोल्हापूरच्या कलाक्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे, त्याच्या शॉर्टफिल्मची गोवा येथे होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थात 'इफ्फी'साठी निवड झाली आहे.

येत्या २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या इफ्फी फेस्टिव्हलमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात ही शॉर्टफिल्म दाखविली जाणार आहे. मेधप्रणव हा नाट्य व सिनेदिग्दर्शक प्रा. बाबासाहेब पोवार यांचा मुलगा. शालेय जीवनात तो वडिलांसोबत नाटक आणि सिनेमाच्या सेटवर जायचा. यामुळे त्याला कलाक्षेत्राची आवड होती. पुढे इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याने जवळपास आठ वर्षे नोकरी केली. पुण्यामध्ये वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हल,निळू फुले कला अकादमी, अभिनेता प्रशांत दामले यांच्या थिएटर स्कूलमधील सहभाग, एकांकिकेचे सादरीकरण अशा माध्यमातून सक्रिय असताना कलाक्षेत्रातच करिअर करण्याची बीजे रुजली. शॉर्टफिल्म असो की सिनेमा, त्यामधून मनोरंजन आणि समाज प्रबोधन हा विचार मनात खोलवर रुजला होता.

शॉर्टफिल्म निर्मितीचा प्रवास उलगडता मेधप्रणव म्हणाला, 'फिल्म इन्स्टिट्यूट पुणे येथे दिग्दर्शनचा कोर्स पूर्ण करताना प्रत्येक विद्यार्थ्याला एक शॉर्टफिल्म तयार करावी लागते. यासाठी चार विद्यार्थ्यांची एक टीम तयार केली जाते. दिग्दर्शन, छायालेखन,संकलन आणि ध्वनी नियोजन अशी जबाबदारी प्रत्येकावर सोपविली जाते. 'हॅपी बर्थ डे'ची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका मी स्वीकारली. आवश्यक चित्रीकरण स्थळ शोधण्यापासून कलाकारांची निवड, निर्मिती, पार्श्वसंगीत या कलेशी निगडीत प्रत्येक कामावर बारकाईन लक्ष ठेवले. या साऱ्या प्रक्रियेतून सिने निर्मितीचा अभ्यास सुरू होता. ऑगस्ट २०१७ मध्ये 'हॅपी बर्थ डे'ची निर्मिती पूर्ण झाली. ही शॉर्टफिल्म कौटुंबिक नातेसंबंधावर आधारलेली आहे. विशेषत: वडील आणि मुलगा यांच्यातील नातेसंबंध अधोरेखित करतो.'

.............

कोट

'इफ्फी'सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी शॉर्टिफल्मची निवड होणे अभिमानास्पद आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून आपल्या कलाकृतींचे मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शन, प्रेक्षकांशी संवाद साधणे हा वेगळा अनुभव असणार आहे. मार्च २०१८ मध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात या शॉर्टफिमला गौरविले होते. त्यानंतर 'इफ्फी'तील सहभाग, हे सारे हुरुप वाढविणारे आहे.

मेधप्रणव पोवार

.....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images