Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दसरा चौकात शाही दसरा

0
0

कोल्हापूर

दसरा महोत्सव समितीतर्फे विजयादशमीनिमित्त गुरुवारी (ता.१८) परंपरेप्रमाणे 'शमीपूजन' समारंभ दसरा चौक येथे सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन होणार आहे. कोल्हापूरच्या दसरा सोहळ्याची खासियत असलेला हा समारंभ पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी होते. दसरा महोत्सव समितीतर्फे दसरा चौक येथे या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रागवैविध्याचे अफलातून सादरीकरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शास्त्रीय संगीतातील दिग्गजांच्या सुरावटीने बुधवारी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बाहेरचे ढगाळ वातावरण आणि जोडीला संगीत मैफिलीत रसिकांची मिळणारी टाळ्यांची दाद अशा वातावरणात मैफिलीचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. जयपूर अत्रौली घराण्यातील रागवैविध्यांच्या अफलातून सादरीकरणाने उपस्थितांना देहभान हरपायला लावले. निमित्त होते पं. आनंदराव लिमयेबुवा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित जयपूर घराणे स्वरचिंतन 'आनंद पर्व' या कार्यक्रमाचे. गडकरी हॉल सभागृहात मैफिलीचा पहिला दिवस पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पं. दिनकर पणशीकर, अरुण कुलकर्णी, सुलभा पिशवीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरूवात झाली. कलाकारांनी घेतलेल्या ताना, सरगमी याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. एकच राग विविध प्रकारे सादर करता येतो, याची प्रत्यक्ष अनुभूती कार्यक्रमात येत होती. यावेळी ज्येष्ठांच्या सहवासात जयपूर घराण्यातील विविध रागांवर सखोल चर्चा करण्यात आली.

पहिले सत्र कुन्दावती, खट तोडी, बिहारी, अडाणा बहार, तर्ज सोहनी, नट नारायण, आडम्बरी केदार, बिलावली, मंदार अशा रागसुरांनी वेगळा आनंद देणारे ठरले. सुखदा काणे, भारती वैशंपायन, अरुण कुलकर्णी, उल्हास कशाळकर, अलका देव मारुलकर, चैतन्य कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, विश्‍वास शिरगावकर, मृत्युंजय आगडी, शौनक अभिषेकी, मिलिंद मालसे आदींनी सहभाग घेतला. सुधीर पोटे यांनी पहिल्या सत्रातील सूत्रधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

दुसऱ्या सत्रात राग नायकी कानडा, मुलतानी धनाश्री, शिवमत भैरव, संपूर्ण मालकंस, बिहारी, शामका देशकार, खंबावतीच्या सादरीकरणाने कातरवेळ रंगली. यावेळी रागातील बंदिशीवर विवेचन करण्यात आले. यामध्ये उल्हास कशाळकर, दिनकर पणशीकर, अश्‍विनी भिडे देशपांडे, प्रतिमा टिळक, भालचंद्र टिळक यांनी सहभाग घेतला. चर्चेच्या सूत्रधार श्रुती सडोलीकर होत्या. दोन्ही सत्रानंतर 'आनंद पर्व' स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गोविंदराव टेंबे लिखित 'गायन महर्षी अल्लादियाखां' पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर, आनंद धर्माधिकारी, व्ही. बी. पाटील आदी उपस्थित होते.

आजचे कार्यक्रम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिक यांचा मुरगूडमध्ये मानवी साखळीद्वारे निषेध

0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कागल

प्रा. संजय मंडलिक यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांचा बहुजन समाजाच्या वतीने मुरगूडमध्ये मानवी साखळी तयार करून जाहीर निषेध नोंदविला.

पुरोगामी विचाराच्या सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा जपणाऱ्या प्रा. मंडलिक यांच्याविषयी अगदी खालच्या पातळीवर जाऊन खासदार महाडिक बरळले. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा समाचार घेताना महाडिकांच्या अवैध धंद्यांचा पाढाच अनेकांनी वाचला. बाहेरून येऊन कोल्हापूरच्या भूमिपुत्राचा अवमान कोल्हापूरची स्वाभिमानी जनता कदापि खपवून घेणार नाही. महाडिकांनी आपली खासदारकी फक्त पुरस्कार मिळवण्यासाठी वापरली आहे. आपल्याच पक्षातून विरोध होत असलेला पाहून महाडिक भ्रमिष्ठ झाले आहेत. आपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ते संसदरत्नला न शोभणारे वक्तव्य करीत असल्याने त्यांच्या त्या पुरस्काराबदल शंका व्यक्त होत आहे. निवडून गेल्यापासून मनोरंजनाच्या कार्यक्रमातून महाडिकांनी कोणती समाजसेवा केली? संजय मंडलिकांविषयी महाडिकांनी पुन्हा अशी बेताल वक्तव्य केल्यास त्यांना कागल तालुक्यात पाय टाकू देणार नाही, अशा तीव्र शब्दांत नगरसेवक मारुती कांबळे, अनिल सिद्धेश्वर, राजेंद्र कांबळे, संजय भारमल, माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले, आदींनी इशारा दिला.

यावेळी गणपतराव लोकरे, माजी नगरसेवक दिलीप कांबळे, दत्ता मंडलिक, नगरसेवक दीपक शिंदे, पी. डी. माने, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारुती कांबळे यांनी स्वागत केले. प्रवीण सूर्यवंशी यांनी आभार मानले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक एकात्मतेचा कौलवचा दसरा

0
0

सामाजिक एकात्मतेचा कौलवचा दसरा उत्सव

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी तालुक्यातील कौलव येथील दसरा उत्सव हा सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविणारा वैशिष्टपूर्ण मानला जातो. कौलव, बरगेवाडी आणि परिसरात दैवत मासलिंग देवालय परिसरात दसरा सण साजरा करण्याची प्रथा गेली अनेक वर्षे सुरू आहे. पालखी मिरवणूक, सासनकाठी नृत्य आणि बलुतेदार मंडळींना आगळा-वेगळा मान देण्याची प्रथा सामाजिक एकात्मतेचा अनुभव देण्याची प्रथा टिकून आहे.

कौलव परिसरात मासलिंग देवालय बरगेवाडी येथे आहे. या दैवतावर या परिसरातील सर्व लोकांची अपार श्रद्धा आहे. कौलव गावात चार ठिकाणी मासलिंग मंदिरे आहेत. शिवाय बरगेवाडी येथे भव्य मंदिर आहे. घटस्थापनेच्या दिवसापासून या उत्सवाची सुरवात होते. पुजारी आणि मानकरी पाटील मंडळींसमवेत सर्व मंदिरांत दररोज दोनवेळा आरती, पूजाअर्चा केली जाते. पाचव्या दिवशी गावातील देवतांना नवा पेहराव परिधान करून पूजा बांधली जाते. सातव्या दिवशी मानाच्या सासनकाठ्या वाजत गाजत बरगेवाडी येथे आणल्या जातात. सायंकाळी सासनकाठ्या वाद्यांसह नृत्य करण्याची प्रथा आहे. खंडेनवमी दिवशी गावातील बलुतेदार मंडळींसह मानाचे पाटील आणि मानकरी मिळून शेती औजारांची पूजा करतात. त्याच्या पूर्वसंध्येला जागर सोहळा थाटात पार पाडला जातो. देव उठवणे म्हणजे खंडेनवमीदिवशी गावातील आबालवृद्ध एकत्र येऊन बरगेवाडी येथील मासलिंग मंदिरात जाऊन दर्शन घेतात. गावच्या समृद्धीसाठी गाऱ्हाणे घातले जाते.

विजयादशमीदिवशी कौलव गावातून पालखीचे वाजत-गाजत बरगेवाडीकडे प्रस्थान होते. यावेळी सोने लुटण्याचा कार्यक्रम पारंपरिक वातावरणात साजरा केला जातो. पालखीमध्ये सोने म्हणजे आपट्याची पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. यासाठी भाविकांची झुंबड उडते. पालखीमध्ये सोने अर्पण केल्यानंतर कौलव गावातील अठरा देवांना सोने देण्याची प्रथा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मासलिंग देवाचा पालखी सोहळा कौलव गावात येतो. यावेळी ग्रामस्थ पुन्हा पालखीमध्ये सोने अर्पण करून परस्परांना सोने देऊन आलिंगन देतात. मनातील द्वेष, मत्सर बाजूला ठेवून एकत्र येण्याची प्रथा जपली जाते. कौलवने दोनशे वर्षांहून अधिक काळ ही परंपरा जपली आहे. पालखीसमोर फटाक्यांची आतषबाजी होते. गावचे मानकरी, बलुतेदार आणि ग्रामस्थ उत्सवात सहभागी होतात. कौलव, बरगेवाडीच्या एकतेचे दर्शन येथे घडते.

फोटो : बरगेवाडी कौलव येथील मसलिंग मंदिर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर विमानसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'उडान' योजनेंतर्गत केंद्र सरकारने कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू केली. परंतु ही सेवा सुरळीत चालत नसल्यामुळे प्रवाशांची व स्थानिक कोल्हापूरकरांची तीव्र नाराजी असल्याची बाब खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिली. मंगळवारी त्यांनी नवी दिल्ली येथे मंत्री प्रभू यांची भेट घेऊन ही माहिती दिली. त्यानंतर प्रभू यांनी ही विमानसेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांना सांगितले.

एअर डेक्कन या कंपनीने कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आतापर्यंत नियमित चालू ठेवलेली नाही. त्यांना जमत नसेल तर मंत्रालयाने पर्यायी कंपनीचा विचार करावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी यावेळी केली. त्याचबरोबर कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विमानसेवेसंदर्भात कोल्हापूर येथे एक आढावा बैठक केंद्रीय मंत्री प्रभू यांनी घ्यावी, अशी विनंती केल्यानंतर लवकरच कोल्हापूर येथे येऊन ही बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले.

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची कुठलीही कल्पना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला नसल्याची माहिती यावेळी त्यांनी मंत्र्यांना दिली. भूमिपूजन कार्यक्रमात जी गडबड प्रशासनाने केली याविषयीही तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्री प्रभू यांनी यापुढे देशात विमानतळ प्राधिकरणाचा कुठलाही कार्यक्रम असल्यास त्याची पूर्वकल्पना स्थानिक विमानतळ प्रशासनाने केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला देणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले. यापुढे जिथे कुठेही अशा प्रकारचे कार्यक्रम असतील तर, संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना देणे आणि निमंत्रित करणे बंधनकारक करण्याचे आदेशही प्रभू यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा भगिनी मंडळाची चार दशकांची समृद्ध वाटचाल

0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

वारणा परिसरातील महिलांना सबल आणि आत्मानिर्भय करण्यासाठी वारणानगरच्या श्री वारणा भगिनी मंडळाच्या रुपात महिलांच्या हक्काच्या व्यासपीठाची स्थापना १९७५ साली झाली. सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या भगिनी मंडळाच्या माध्यमातून हजारावर महिलांना थेट

रोजगार मिळत आहे. वारणा समूहाच्या मार्गदर्शक शोभाताई कोरे यांच्याकडे १९९३पासून भगिनी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. परिसरातील वंचित, दीनदुबळ्या महिलांना आधार देण्याचे काम करण्याबरोबरच त्यांच्यामधील सुप्त कौशल्यांना वाव व हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम त्यांच्यासह मंडळातील सहकारी संचालक महिलांनी केले आहे.

मंडळामार्फत चालविल्या जाणाऱ्या महिला गृहउद्योगात लिज्जत पापड हा नावलौकिक मिळालेला पदार्थ आहे. दररोज पहाटे पाच वाजता या विभागाचे काम सुरू होते. महिलांना पहाटे पीठ मळून, कुटून आणि वजन करून दिले जाते. दिवसभराच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून महिला पापड तयार करून देतात. दिवसाला दोनशे रुपयांचे उत्पन्न यातून महिलांना मिळते. या पापडाची देशभर विक्री केली जाते. यावर्षी पापड विक्रीचा ६ कोटी ४२ लाख ८३ हजार रुपयांचा उच्चांक मंडळाने केला. गरजू महिलांना रोजगार मिळावा व ग्राहकांना घरगुती दर्जेदार पदार्थ मिळावेत याहेतूने कार्यरत असणारा खाद्यपदार्थ विभाग ग्राहकांच्या आवडीनुसार पदार्थ तयार करून देतो. मंडळामार्फत चालवल्या जाणाऱ्या गारमेंट विभागात वीसच्यावर महिला स्कूल युनीफॉर्म व इतर ड्रेस मटेरियल तयार करण्याचे काम करतात.

महिलांच्या सबलीकरणासाठी विविध स्पर्धा, प्रशिक्षण, मेळावे, कार्यशाळांचे शिस्तबद्ध नियोजन भगिनी मंडळांमार्फत केले जाते. महिलांच्या आरोग्याची काळजी म्हणून दरवर्षी सभासद महिलांची वैद्यकीय तपासणी करण्याबरोबरच नियमितपणे योगासन उपक्रम घेतला जातो. भगिनी मंडळाचे वारणा महिला भजनी मंडळ परिसरात नावलौकिक मिळवलेले मंडळ आहे. मंडळाच्या उदीष्टांमध्ये महिलांची सर्वांगीण उन्नती आणि स्वावलंबित्व असे ब्रीदवाक्य कोरले गेल्यामुळे महिलांच्या व मुलामुलींच्या कौटुंबिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, बौद्धिक,आरोग्य विषयक जाणीव

जागृती करण्या बरोबरच आर्थिक उन्नती घडवून आणण्यासाठी सहाय्य केले जात आहे.महिलांच्यामध्ये समाजसेवेची आवड निर्माण करून त्यांच्या मधील नेतृत्वगुणांचा विकास करण्यावर मंडळाचा नेहमी भर असतो. पुस्तक बांधणी, यंत्र दुरुस्ती, शिवणकाम, विणकाम, पाकशास्त्र, चित्रकला, संगीत यांसह इतर कलांचे प्रशिक्षण देण्याचे काम मंडळामार्फत केले जात आहे. महिलांसाठी झिम्मा फुगडी, पारंपरिक खेळ, उखाणे, पाककृती स्पर्धा यांसह इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. संस्कृतीच्या जोपासानेतून नैतिक मूल्यांचे संवर्धन व्हावे, चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण होऊन त्यांच्यात देशप्रेम व राष्ट्रशक्ती रुजावी यासाठी दरवर्षी लहान मुलांसाठी संस्कारवर्गाचे आयोजन केले जाते. वारणा परिसरातील भगिनींना त्यांनी स्वत: बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी आनंदमेळा आयोजित केला जातो. महिलांसाठी वनभोजन, अभ्यास सहली, नवरात्रोत्सवावेळी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीला प्रमाण मानून स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी घालून दिलेल्या आदर्शांप्रमाणे वारणा भगिनी मंडळाची वाटचाल सुरू आहे.

वारणा भगिनी मंडळाच्या माध्यमातून विविध संस्थांमध्ये आणि परिसरात पाच हजारांवर महिला काम करीत आहे, ही अभिमानाची बाब आहे. तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या भगिनी मंडळाची स्थापना १९७५ झाली आहे. आज सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणारी संस्था म्हणून अभिमान वाटतो आहे. भगिनी मंडळामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबरोबरच, उद्याची पिढी संस्कारक्षम व चारित्र्यसंपन्न घडावी यासाठी संस्कारवर्गांचे आयोजन केले जाते. वारणा परिसरातील भगिनींना त्यांनी स्वत: बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी आनंदमेळा आयोजित केला जातो.

- शोभाताई कोरे, मार्गदर्शक, वारणा समूह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दसऱ्यासाठी वाहन बाजार सज्ज

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दसऱ्याच्या मुहूर्तावर शहर आणि जिल्ह्यातील वाहन बाजार सज्ज झाला आहे. बुकिंग झालेली वाहने आज गुरुवारीच उपलब्ध व्हावीत, यासाठी शोरूमधारकांची धावाधाव सुरू आहे. कंपन्यांशी संपर्क साधून पाठपुरावा केला जात आहे. कुटुंबांतील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत वाहने आणण्याची तयारी संबंधित ग्राहकांनी केली आहे.

वर्षातला सर्वात महत्वाचा मुहूर्त म्हणून अनेकजण दसऱ्याला प्राधान्य देतात. त्या दिवशी दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीसाठी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेण्यासाठी झुंबड उडते. खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर आपल्या पसंतीचे वाहन न मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून बुकिंग घेतले जात आहे. रोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत असतानाही गरज म्हणून वाहन खरेदीकडील कल कायम आहे. विमा, जीएसटीमुळे चारचाकी वाहनांची किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या बजेटमध्ये जे वाहन मिळते, ते खरेदी करण्याचे नियोजन अनेक ग्राहकांचे आहे.

शोरुम चालक आपल्याकडेच अधिकाधिक ग्राहकांनी वाहन खरेदी करावी, यासाठी लक्षवेधी साजवट केली आहे. खरेदीवर विविध आकर्षक ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. सुलभ कर्ज मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. शून्य टक्के व्याजाने कर्ज, एक्सेंज ऑफर, कमी कागदपत्रात वाहन खरेदी अशा जाहिराती केल्याचे दिसते. कुटुंबातील महिला, युवतींही दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी सर्वांना वापरता यावी, यासाठी स्कूटर खरेदीसाठीचे बुकिंग वाढले आहे. वाहतुकीची कोंडी असताना स्कूटर चालविणे सोपे असते. म्हणून त्याला अधिक पसंती असल्याचे दुचाकी शोरूम चालकांचे म्हणणे आहे.

सायकल खरेदी

साध्या, गिअर आणि फोल्डिंगच्या सायकली विक्रीसाठी मोठ्या संख्येने ठेवण्यात आल्या आहेत. किमान ५ हजार ते २० हजारांपर्यंत त्यांच्या किंमती आहेत. तरीही इंधन दरवाढीने हैराण झालेले मध्यमवर्गीय, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी आणि व्यायामासाठी श्रीमंतही या सायकली दसऱ्याच्या मुहूर्तावर घेऊन जाण्यासाठी आधीच बुकिंग केले आहेत.

कोट

दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकजण दुचाकी खरेदी करतात. त्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारपेठ सज्ज झाली आहे. दोन आठवड्यापासून बुकिंग सुरू आहे. मुहूर्तावर बुक केलेले वाहन वेळेत ग्राहकांच्या ताब्यात देण्यासाठी नियोजन केले आहे.

- राजेंद्र गुरव, व्यवस्थापक, मोहिते सुझुकी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोरपडेंच्या निसर्गचित्रांचे रविवारपासून प्रदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संगीत आणि चित्रकलेची त्यांना उपजत आवड. चित्रकलेच्या छंदातून माधुरी घोरपडे यांनी निसर्गाची विविध रूपे कॅनव्हासवर उतरविली. त्यांच्या जलरंग, तैलरंग व अॅक्रॅलिकमधील चित्रकृतींचे प्रदर्शन २१ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे. कोल्हापुरातील त्यांचे हे पहिलेच प्रदर्शन आहे.

प्रदर्शनान एकूण तीस चित्रांचा समावेश आहे. त्यामध्ये कोकणातील निसर्गस्थळे, वाराणशीमधील घाटावरील चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. सिंधुदुर्गात त्यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. तेथील निसर्गाचे विलोभनीय रूप कॅनव्हासवर उतरविले आहे. दरम्यान, चित्रकार मोहन वडणगेकर यांच्या हस्ते व सुरेश निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता.२१) सकाळी दहा वाजता चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीईओंचा झटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेत आयोजित विविध समित्यांच्या सभा व योजनांची माहिती सादर करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी कारणे दाखवा नोटीस काढल्या आहेत. यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एस. बसर्गेकर यांच्यासह पाच उपअभियंत्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी जलव्यवस्थापन समितीची सभा आयोजित केली होती. जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. दरम्यान जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीची पूर्वकल्पना कार्यकारी अभियंता बसर्गेकर यांनी मित्तल यांना दिली नाही. सभेच्या अनुषंगाने सीईओंना पाणीपुरवठा योजनेविषयी सविस्तर माहिती सादर करणे आवश्यक होते. तसेच योजनेची कागदपत्रे, प्रलंबित कामाबाबतची कागदपत्रे वेळेत उपलब्ध केली नाहीत. या कारणावरुन सीईओंनी बसर्गेकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना नोटीसा काढल्या आहेत. बसर्गेकर यांनी मंगळवारी सायंकाळी खुलासा सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ क्लस्टरचे स्टार्टअप रखडले

0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMT

कोल्हापूर : कोल्हापूरी गुळाचा गोडवा जगाला कळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी शाहूपुरीत गुळाची बाजारपेठ स्थापन केली. स्वातंत्र्यानंतर ही बाजारपेठ मार्केट यार्डातील प्रशस्त जागेत स्थलांतरीत झाली. अल्पावधीत ही देशातील गुळाची प्रमुख बाजारपेठ झाली. आज गूळ व्यवसायात वार्षिक अडीचशे कोटींची उलाढाल होते. मात्र, गुळाच्या उत्पादनाचा दर्जा वाढावा, यासाठी क्लस्टर योजनेची घोषणा झाली. योजनेला जागा देण्यासाठी पावले उचलण्यात आली. पण, सरकारी लालफितीचा कारभार आणि नेत्यांची अनास्था यामुळे गूळ क्लस्टर योजनेचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे ही योजना गुंडाळली जाईल अशी स्थिती आहे.

केंद्र सरकारने गूळ क्लस्टर योजना मंजूर केली. यांदरम्यान, २००९ मध्ये राजर्षी शाहू गूळ खरेदी-विक्री संघाची स्थापन झाली. संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय समिती गेली दहा वर्षे गूळ क्लस्टरसाठी प्रयत्न करत आहे. संशोधन, उत्पादन, मानांकन, गुळाचा दर्जा ठरवण्यासाठी क्लस्टर योजना फायदेशीर आहे. गूळ क्लस्टर अस्तित्त्वात यावे यासाठी समितीने जागेचा शोध सुरू केला. कागल तालुक्यातील बेले गावातील जागा निश्चित केली. ही जागा कोल्हापूर शहरापासून जागा लांब असून क्लस्टरसाठी समितीने या जमिनीला होकार दिला. दोन एकर जागा बिगरशेती (एनपीए) करण्यासाठी एक लाख रुपयांचा महसूलही जमा करण्यात आला. जागा निश्चित झाली असताना समितीने पुन्हा कागलच्या औद्योगिक वसाहतीत जागेची मागणी केली. त्यासाठी रितसर शुल्क जमा करून पाच एकर जागेची मागणी करून कंपनीची नोंद केली.

आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून समितीने एमआयडीसीकडे जागेसाठी पाठपुरावा केला. नंतर गूळ क्लस्टरसाठी शिवाजी विद्यापीठाबरोबर सामंजस्याचा करार केला. शास्त्रीय पद्धतीने गूळनिर्मिती करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी विभागाने परिश्रम घेऊन आराखडा तयार केला. डॉ. ए. एम. गुरव यांनी या प्रस्तावासाठी विशेष परिश्रम घेतले. नंतर हा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला गेला. मात्र एमआयडीसीमध्ये जागा नसल्याने गूळ क्लस्टर योजनेला खीळ बसली आहे. एमआयडीसीत जागा मिळाली असती तर गुळावर संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करता आली असती. गुळाचे उत्पादन, मार्केटिंगसाठी प्रयत्न झाले असते. पण राजकीय अनास्था, सरकारी अधिकाऱ्यांचे अज्ञान यामुळे क्लस्टर योजनेचे घोंगडे दहा वर्षे भिजत पडले आहे.

दरम्यान, साखर लॉबीकडून गूळ क्लस्टरला खीळ घातली जात असल्याचा उत्पादकांचा संशय आहे. गुळाचा समावेश निर्यात झोनमध्ये केलेला नाही. देशातील १३ राज्यांत गुळाचे उत्पादन घेतले जाते. जर गुळाचा समावेश निर्यात झोनमध्ये झाला असता तर उद्योगासाठी याचा फायदा झाला असता. गुळामध्ये हायड्रो पावडरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हायड्रो पावडरमधील रासायनिक घटकांचा आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने सध्या सेंद्रीय गुळाला मोठी मागणी आहे. सेंद्रीय गुळाचा प्रसार व प्रचार वाढवण्यासाठी उत्पादकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

क्लस्टर योजना कार्यान्वित झाली असती गुऱ्हाळघर चालकांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योजना आखता आली असती. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कोसळले तरी ऊस उत्पादकांच्या दबावामुळे एफआरपीपेक्षा कमी दर देण्यास साखर कारखानदार धजावत नाहीत. पण याउलट गूळ खरेदीचा ज्यावेळी मुहूर्त असतो तेव्हाच गुळाला उच्चांकी दर मिळतो. नंतर दर टिकून रहात नाही. त्यासाठी गुळाला हमीभाव मिळाला पाहिजे, उत्पादकांची प्रमुख मागणी आहे. निर्यात झोन जाहीर करण्याची आवश्यकता आहे. गूळ उत्पादकांनासाठी मालतारण योजना सुरू झाली असली तरी त्याचे नियम, त्यातील अटी किचकट असल्याने ही योजना कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

अलिकडे कोल्हापूरी गुळाच्या नावावर कर्नाटकचा गूळ खपवला जातो. त्यामुळे नेमकेपणासाठी गूळ क्लस्टर योजना आवश्यक आहे. गेली दहा वर्षे आम्ही यासाठी प्रयत्नशील आहोत. राजकर्ते आश्वासन देतात. अधिकाऱ्यांच्या अज्ञानाचा फटका योजनेला बसतो. त्यातून योजना सुरू करण्यास अडथळे येत आहेत. कोल्हापूरी गुळाचा दर्जा वाढवण्यासाठी क्लस्टर वेगाने कार्यान्वित होण्याची गरज आहे.

- राजाराम पाटील, अध्यक्ष शाहू गूळ उत्पादक संघ

गूळ उत्पादकांच्या मागण्या

- हमीभाव मिळावा

- निर्यात झोन जाहीर करा

- उत्पादकांना प्रशिक्षण द्या

- मालतारण कर्जासाठी अटी शिथिल

- अबकारी करातून सुटका करा

- रॉ शुगरपासून बनावट गूळपावडर निर्मिती थांबवा

गूळ उद्योगावर दृष्टिक्षेप

१२५०

नोंदणीकृत गुऱ्हाळघरे

३५०

गेल्या हंगामात सुरू गुऱ्हाळे

२२ लाख ५ हजार ७१५ रवे

बाजार समितीत गुळाची आवक

२२६ कोटी २६ लाख ९३ हजार १५० रुपये

वार्षिक उलाढाल

६००१ रुपये

सर्वाधीक दर (क्विंटल)

२९०० रुपये

सर्वात कमी दर (क्विंटल)

३३००

सरासरी दर (क्विंटल)

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाही दसऱ्याची शान ‘मेबॅक’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

देशात विविध ठिकाणी ऐतिहासिक शाही दसरा सोहळा साजरा होतो. यात कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याचीही एक विशेष ओळख आहे. शहराच्या मध्यवस्तीतील दसरा चौकात शाही दसऱ्याच्या सिमोल्लंघन सोहळ्यासाठी छत्रपती कुटुबीयांचे आगमन होते. 'जर्मन'मेकच्या दुर्मिळ 'मेबॅक'मधून ही सफर असते. हजारो शहरवासियांच्या उपस्थित होणाऱ्या सिमोल्लंघन सोहळ्यासासाठीच राखिव असलेली ही शाही कार या दिवशी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. गुरुवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी आज, 'मेबॅक' सज्ज झाली.

देशातील प्रसिद्ध म्हैसूर येथील दसऱ्याप्रमाणे कोल्हापूरचा दसरा शाही थाटासाठी प्रसिद्ध आहे. परंपरेनुसार दसऱ्याचा सिमोल्लंघन सोहळा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते होते. त्यांच्यासोबत श्रीमंत युवराज, खासदार संभाजीराजे, मालोजीराजे छत्रपती यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित असतात.

परंपरेनुसार सिमोल्लंघनासाठी न्यू पॅलेसमधून छत्रपती बाहेर पडतात. पूर्वी जंगबहाद्दूर हत्ती हा दसरा सोहळ्याच्या अग्रस्थानी असायचा. नंतर यात बदल करण्यात आला आणि जंगबहाद्दूर हत्तीची जागा 'मेबॅक'ने घेतली. तत्कालिन छत्रपती राजाराम महाराज यांनी खास ऑर्डर देऊन ही कार तयार करवून घेतली. आता सिमोल्लंघनासाठी छत्रपती घराण्यातील सदस्य या मेबॅक कारमधूनच दसरा चौकात दाखल होतात. 'मेबॅक'वर छत्रपतींचा शिक्का आहे. कारच्या बॉनेटच्या पुढील बाजूस करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती असून हेडलाइटवर भवानी आणि शिवराय असे संस्थानचे चिन्ह कंपनीकडून तयार करवून घेण्यात आले आहे. देखणी अशी ही कार तिच्या वैशिष्ट्यांनी दरवर्षी सर्वांचे आकर्षण बनते.

आता केवळ सिमोल्लंघन सोहळ्यासाठी मेबॅक रस्त्यावर आणली जात असली तरी तिची काळजी वर्षभर घेतली जाते. बाबा मनगुडे हे मेकॅनिक याबाबत नेहमी काळजी घेत असतात. सिमोल्लंघनानंतर गाडीचे टायर्स काढून ठेवले जातात. 'मेबॅक' कोल्हापुरात आणली गेली, तेव्हा कंपनीकडून टायरचे सहा जादा संच देण्यात आले. मात्र, तरीही टायर खराब होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते. परिणामी मेबॅक शहरात दाखल झाल्यापासून अद्याप तिची दुरुस्ती करावी लागलेली नाही. दसऱ्याच्या सोहळ्यासाठी मेबॅकचे खास पॉलिश केले जाते. दसरा वगळता यापूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती यांच्या विवाह समारंभात या कारचा वापर केला होता.

मेबॅकची वैशिष्ट्ये

'मेबॅक'च्या दर्शनी भागावर छत्रपती शिवरायांना तुळजाभवानी देवी तलवार देत असल्याचे चित्र आहे. १७ फूट ५ इंच लांब, ६ फूट ६ इंच रुंद असलेल्या 'मेबॅक'मध्ये सहा व्यक्ती आरामशीर बसू शकतात. टिंटेड ग्लास आणि उघडझाप करणारा कापडी छत्र मेबॅकच्या सौंदर्यात अधिक भर घालते. रेल्वेच्या हॉर्नसारखा खास वेगळा हॉर्न मेबॅकला बसविण्यात आला आहे. शाही दसऱ्यासाठी गाडीला पॉलिश करून ती सज्ज करण्यात आल्याचे 'मेबॅक'चे चालक पिंटू वाईंगडे यांनी सांगितले.

१९३६ पासून कार्यरत

वाहन उद्योगात जर्मन तंत्रज्ञानाला अन्यनसाधारण महत्त्व आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोटर बनवण्याचे तंत्रज्ञान जर्मनीमध्ये पूर्वीपासून विकसित झाले. त्यामुळेच छत्रपती राजाराम महाराजांनी ही खास गाडी तयार करण्याची ऑर्डर रोल्सराइस कंपनीला दिली होती. कोल्हापुरात १९३६मध्ये छत्रपती घराण्याच्या वाहनांच्या ताफ्यात मेबॅक दाखल झाली. सुरुवातीला याचा दररोज वापर होत होता. पण कालांतराने मेबॅक केवळ विजयीदशमीच्या सोहळ्यासाठी बाहेर आणली जाते. कारमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराज, शहाजीराजे, यशराजे हे पॅलेसपासून दसरा चौकापर्यंत येतात. हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबाची श्रीकृष्ण रुपात पूजा

0
0

श्रीकृष्ण रुपात जोतिबाची पूजा

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला जोतिबाची कमळपुष्पातील श्रीकृष्ण रूपात सालंकृत महापूजा बांधली. आदही मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, गुरुवारी पालखी सोहळा व सीमोल्लंघन होणार आहे.

नवरात्रोत्सवात जोतिबा देवाच्या वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात. नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेनिमित कमळपुष्पामध्ये श्रीकृष्ण रूपात महापूजा बांधण्यात आली. सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाद्यांच्या गजरात धुपारती सोहळा झाला. नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस हा धुपारती सोहळा निघतो. आठव्या माळेला भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली. तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी झाली. मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री १२ .३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.

फोटो ओळ

नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला जोतिबा देवाची बांधण्यात आलेली कमळ पुष्पपाकळीतील श्रीकृष्ण रूपातील खडी सांलकृत महापूजा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठुराया बनला गुराखी तर रुक्मिणी विजयलक्ष्मीच्या रूपात

0
0

पंढरपूर :

दसऱ्याच्या मुहूर्तावर विठुरायाला पारंपरिक पद्धतीने गुराख्याच्या पोशाखात सजविण्यात आले आहे तर रुक्मिणी मातेची नखशिखांत सोन्याने मढविलेल्या विजयलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे.

विठ्ठलाला आज सोन्याचे धोतर, खांद्यावर खास रेशमी घोंगडी, डोक्यावर सोन्याची पगडी आणि हातात चांदीची काठी असे अनोखे रूप देण्यात आले होते. रुक्मिणी मातेला आज दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडी आणि नखशिखांत सोन्याच्या दागिन्याने मढविण्यात आले होते.

66276444


गेले नऊ दिवस सुरु असलेल्या नवरात्र महोत्सवात रोज विठुराया आणि रुक्मिणी मातेला विविध पोशाखात नटविण्यात येत होते. आज दसऱ्याला अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविलेले देवाचे हे रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केली. आजच्या दिवशी विठुरायाच्या दर्शनाने पुढील संपूर्ण वर्ष भरभराटीचे आणि सुख शांतीचे जाते अशी भाविकांची भावना असते.

66276445


दरम्यान, आज सकाळी विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा झेंडूच्या फुलांनी सुवर्णमयी करण्यात आला होता. पुणे येथील भक्त राम जांभोळकर यांनी आजच्या मुहूर्तावर विठ्ठल मंदिरात सजविण्यासाठी खास ट्रकभर झेंडूची फुले आणली होती. विठ्ठल रुक्मिणी गाभारे आणि सोळाखांबीला आकर्षक रीतीने केलेल्या सजावटीमुळे आज सकाळीपासून विठ्ठल-रुक्मिणी गाभारे सुवर्णमयी बनले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात साजरा

0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाच्या धारांची तमा न बाळगता करवीरकरांनी ऐतिहासिक दसरा चौकात श्रीमंत शाहू छत्रपती व राजघराण्यातील सदस्यांनी शमी पूजन केल्यावर अपूर्व उत्साहात दसऱ्याचे सोने लुटले. हा सोहळा पाहण्यासाठी सरदार, इनामदार घराण्यातील प्रमुख मानकऱ्यांसह राजकीय नेते, सरकारी अधिकारी उपस्थित होते.

श्रीमंत शाहू महाराज, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत युवराज मालोजीराजे, शहाजी राजे, यश राजे यांना आपट्याची पाने देऊन करवीरकर जनतेने दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी करवीरकरांची पावले दसरा चौकाकडे वळू लागली. पण अचानक जोरदार पाऊस सुरु झाला. पावसातच करवीर निवासिनी अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, गुरु महाराज वाड्यातील सिदधेश्वर महाराज या मानाच्या तीन पालख्याचे दसरा चौकात आगमन झाले. पांढऱ्या व लाल रंगाच्या शामियानात सरदार, मनसबदारासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी झाला.

रिमझिम पावसात सायंकाळी सहाच्या सुमारास न्यू पॅलेस येथून शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या मोटारसायकलीच्या ताफ्यासह मेबॅक मोटारीतून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजे यशस्विनीराजे यांचे आगमन झाले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले. भालदारांनी ललकारी दिली. पोलीस बँडच्या तालावर करवीरसंस्थानचे गीत झाले. सरदार, मानकऱ्यांचे मुजरे घेत शाहूमहाराजांसह राजघराण्यातील सदस्य स्थानापन्न झाले. दसरामहोत्सव समितीच्यावतीने राजघराण्यातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजपुरोहित दादर्णे यांच्या पौरोहित्याखाली शमी पूजनाचा विधी झाला. त्यानंतर राजघराण्याने सोने लुटताच ठासणीच्या बंदुकीच्या फैरीने सोने लुटल्याची वर्दी दिली आणि करवीरकर मैदानात घुसले. सोने लुटण्यासाठी एकच गर्दी उडाली. लुटलेले सोने घेऊन राजघराण्यातील सदस्यांना देण्यासाठी नागरिक धावले. त्यानंतर मेबॅक मोटारीने महाराज परत राजवाड्यावर जातानादोन्ही बाजूला उभारलेल्या नागरिकांनी दिलेली आपट्याचीपाने राजघराण्यातील सदस्यांनी स्वीकारली.

या सोहळ्यास महापौर शोभा बोंद्रे, बिहारचे माजी राज्यपालडॉ. डी.वाय. पाटील, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदारधनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, म्हाडा पश्चिम विभागाचे अध्यक्ष समरजितसिंग घाटगे, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ अध्यक्ष योगेश जाधव, विशेष पोलिसमहानिरीक्षर विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार महानगर पालिका आयुक्त अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रातांधिकारी सचिन इथापे, उपमहापौर महेश सावंत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठया भावाने केला धाकट्या भावाचा खून

0
0

म.टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

दारुसाठी सतत पैसे मागत असल्याच्या रागातून थोरल्या भावाने धाकट्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास लंगोटे मळा परिसरात घडली. नितीन सुभाष मगदूम (वय ३२ रा. लंगोटे मळा) असे मृताचे नाव असून त्याचा भाऊ सचिन सुभाष मगदूम (वय ३६ रा. रेणुकानगर यड्राव, ता शिरोळ) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मृताची पत्नी सुमन नितीन मगदूम हिने फिर्याद दिली आहे.

मृत नितीन हा आपल्या कुटुंबियासमवेत लंगोटे मळा परिसरात तर सचिन व त्याचे कुटुंब शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे राहणेस आहे. नितीन याची पत्नी सुमन ही एका ब्युटी पार्लरमध्ये कामास आहे. नितीन व सुमन यांचा दहा वर्षापुर्वी प्रेमविवाह झाला आहे. दोन वर्षापासून या दाम्पत्यात वरचेवर भांडण होऊ लागल्याने काही दिवसांपूर्वी सुमन माहेरी निघून गेली. नितीन याला दारूचे व्यसन असून तो नेहमी नातेवाईकांसह भाऊ सचिन याचेकडेही दारूसाठी पैशाची मागणी करत होता. आठ दिवसापुर्वी नितीन हा सचिन याच्या घरी यड्राव येथे गेला असता दारू पिण्यासाठी पैसे मागितले असताना या दोघात वादावादी झाली होती. तर काल नितीन याने फोन करुन सुमनला घरी परत बोलावून घेतले होते. त्यावेळी नितीन हा घराच्या पत्र्यावर उभारुन आईकडे पैशांची मागणी करत पैसे न दिल्यास मरणाची धमकी देत होता. त्यावेळी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरविले. त्यावेळी नितीन व सुमन यांच्यात भांडण होऊन नितीनने सुमनला मारहाण केली. त्यानंतर त्यानंतर दसरा सणामुळे सचिन हा घरी आला असता सुमनने त्यास घडला प्रकार सांगितला. त्यामुळे सचिनने नितीनला बोलावून विचारणा करता दोघात वाद झाला. त्यावेळी सचिनने नितीन याला बघून घेण्याची धमकी दिली.

हा वाद शेजारील शिवदयाल पल्लोड यांनी मध्यस्थी करत मिटविला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास सचिन हा नितीन याला घेऊन गेला होता. त्यानंतर रात्री पुन्हा या दोघात वाद होऊन सचिन याने घरापासून जवळच असलेल्या अंकुर अग्रवाल यांच्या घराजवळ डोक्यात दगड घालून नितीन याचा खून केला. तीनवेळा डोक्यात दगड घालून ठेचल्याने नितीन याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. या घटनेमुळे खळबळ माजली होती. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधिक्षक धीरज पाटील आदींनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नितीन याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घटनेनंतर सचिन पसार झाला होता. पहाटेच्या सुमारास फिरावयास येणार्‍या नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेत मृतदेह नितीन मगदूम याचा असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर गतीने तपास करत सचिन याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा दहा रुपयांनी महागला

0
0

कोल्हापूर :

राजर्षी शाहू मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटल्याने मंडईत कांद्याचे दर प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढले आहेत. शेतकऱ्यांच्याकडे साठवणुकीचा कांदा संपत आला असून दुष्काळ व अतिवृष्टीमुळे नवीन कांदा बाजारात न आल्याने ऐन सणासुदीत कांद्याचे भाव भडकण्याची शक्यता आहे. बाजार समितीत दररोज ६० ट्रक कांदा विक्रीस येतो. पण गेल्या आठवड्यात कांद्याची आवक कमालीची घटली असून सध्या १५ ते २० ट्रक कांदा येत आहे. मागणी वाढल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. गेल्या आठवड्यात मध्यम आकाराच्या कांद्याची प्रतिकिलो १० ते १२ रुपयांनी विक्री झाली होती. आज हा दर २० रुपयांपर्यंत पोहोचला. मोठ्या कांद्याची १८ ते २० रुपये किलोने विक्री होत होती. आज त्याची २५ ते ३० रुपये प्रतिकिलोने विक्री सुरू आहे. आज शुक्रवारी, बाजार समितीत ३५५८ पोत्यांची आवक झाली. १० किलो कांद्याला किमान ८० तर कमाल २१० रुपये दर मिळाला. सरासरी १६० रुपये दराने कांद्याची खरेदी स्थानिक व्यापारी व विक्रेत्यांनी केली.

कांदा खरेदी केल्यावर शहरातील कपिलतीर्थ मार्केटसह अन्य मंडयांतील विक्रेत्यांना १०० रुपयांवर सहा रुपये अडत, पोत्याला तीन रुपये लेव्ही, एक पोत्याला २५ रुपये भाडे आणि हमाली सात रुपये द्यावे लागतात. त्यामुळे मार्केट यार्डातील १६ ते २० रुपये किलोचा कांद्याचा दर मंडईत २० ते ३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रतिकिलो १० रुपये चढ्या दराने कांदा खरेदी करावा लागणार आहे. कोल्हापुरातून कोकणासह गोवा, कर्नाटक, तमीळनाडू राज्यात कांदा पाठवला जातो. तिन्ही राज्यातून कांद्याची मागणी वाढली आहे. जर या राज्यांनी चढ्या दराने कांदा खरेदी केला तर स्थानिक विक्रेत्यांना चांगलाच फटका बसणार असून जादा दराने कांद्याची विक्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रगल्प वाचन स्पर्धेत मिरजकर, सरनोबत प्रथम

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित 'वाचन' या पुस्तकावर आधारित घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रगल्भ वाचन स्पर्धेत शालेय गटात एस. एम. लोहिया हायस्कूलचा विद्यार्थी शिवदत्त मिरजकर याने प्रथम तर विमला गोयंका विद्यालयाच्या हर्षल शिंदे याने द्वितीय क्रमांक पटकावला. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रियदर्शनी सरनोबत हिने प्रथम क्रमांक पटकावला.

जिल्ह्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती.

या परीक्षेत श्रुती पिसे (आदर्श प्रशाला) हिने तृतीय तर उत्तेजनार्थ सुसंस्कार हायस्कूल कदमवाडीच्या नेहा जाधव, सरस्वती हायस्कूल इचलकरंजीच्या प्रियंका कांबळे, महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूरच्या प्रथमेश चव्हाण क्रमांक पटकावले.

कनिष्ठ महाविद्यालयीन गटामध्ये प्रियदर्शनी सरनोबत (छत्रपती शहाजी महाविद्यालय,प्रथम क्रमांक), ओम पाटील (राजाराम महाविदयालय, द्वितीय क्रमांक), अभिषेक व्यवहारे (डी. आर. माने कॉलेज, कागल, तृतीय क्रमांक), तर उतेजणार्थ नम्रता रावत (न्यू कॉलेज), सौरभ पाटील (विवेकानंद कॉलेज), संग्राम पाटील (डी. आर. माने कॉलेज कागल) यांनी क्रमांक पटकावले.

विजेत्या विद्यार्थ्याना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार, एक हजार व उत्तेजनार्थ क्रमांकांना चारशे रुपयांची पुस्तकरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत तेराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‍वाचनकटटा बहुउदेशीय संस्था व भाग्यश्री प्रकाशनाच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वाचन प्रक्रियेची मांडणी करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लवटे यांच्या 'वाचन' या पुस्तकावर आधारित ही स्पर्धा घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाही दसरा उत्साहात साजरा

0
0

लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची उपस्थिती; पावसातही नागरिकांची गर्दी

कोल्हापूर टाइम्स टीम

नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी श्रीमत शाहू महाराज छत्रपती आणि राजपरिवाराच्या उपस्थितीत दसरा चौकात शाही दसरा उत्साहात पार पडला. शमीपूजनानंतर बंदुकांची सलामी झाली आणि सोने लुटण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्यानंतर श्रीमंत शाहू महाराज, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजे यांना आपट्याची पाने देऊन नागरिकांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास सरदार, मानकरी घराण्यांतील व्यक्ती, सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.

गुरुवारी (१८) सायंकाळी पाच वाजल्यापासून दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी नागरिकांची पावले दसरा चौकाकडे वळू लागली. यावेळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने काहींसा गोंधळ उडाला. पावसातच करवीर निवासिनी अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, गुरू महाराज वाड्यातील सिद्धेश्वर महाराज या मानाच्या तीन पालख्याचे दसरा चौकात आगमन झाले. पांढऱ्या व लाल रंगाच्या शामियानात सरदार घराण्यातील व्यक्ती, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी झाला. रिमझिम पावसातच सायंकाळी सहाच्या सुमारास न्यू पॅलेस येथून शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या मोटारसायकलीच्या ताफ्यासह मेबॅक मोटारीतून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार युवराज संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजे, यशस्विनीराजे यांचे दसरा चौकात आगमन झाले. टाळ्याच्या कडकडाटात राजघराण्यातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. भालदारांनी ललकारी दिल्यानंतर पोलिस बँडच्या तालावर करवीर संस्थानचे गीत सादर करण्यात आले.

राजपुरोहित दादर्णे यांनी शमी पूजनाचा विधी करून आरती केल्यानंतर मंत्रपुष्पाजंली झाली. राजघराण्यातील सदस्यांनी सोने लुटताच बंदुकीच्या फैरीने सलामी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी लकडकोडावरून सोने लुटले. मेबॅक मोटारीने राजवाड्याकडे परतताना श्रीमंत शाहू महाराजांसह राजपरिवाराला सोने देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.

या सोहळ्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर शोभा बोंद्रे, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंग घाटगे, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ अध्यक्ष योगेश जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रातांधिकारी सचिन इथापे,उपमहापौर महेश सावंत आदी उपस्थित होते.

पावसाने आनंदावर विरजन

दसरा सोहळा सुरू होण्यापूर्वी पावसाची जोरदार सर आली. तरीही सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. सुमारे दीड तास पावसाची रिपरिप सुरू होती. सोने लुटल्यानंतर सायंकाळी सात वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिक पांगले. त्यामुले दुकाने, खाद्यपदार्थाचे स्टॉल, लहान मुलांसाठी उभारण्यात आलेले पाळणे व अन्य खेळणी या व्यावसायिक व विक्रेत्यांच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला. पावसामुळे काहीकाळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात संचलन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने विजयादशमीनिमित्त शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, शनिवार पेठेत मोठ्या उत्साहात संचलन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील संचलनात सहभागी झाले होते.

रंकाळा तलावानजीक असलेल्या खराडे कॉलेजच्या मैदानात ध्वजवंदन झाले. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, माजी महापौर सई खराडे उपस्थित होत्या. त्यानंतर संघ स्वयंसेवकांच्या बँडच्या तालावर संचलन सुरू झाले. निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला शहर संघचालक डॉ. सूर्यकुमार वाघ यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, शनिवार पेठ, जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ या पेठांतून शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट, डोक्यावर काळी टोपी परिधान करून हातात लाठी घेतलेले अबालवृद्ध स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले होते. संचलनात प्र. द. गणपुले, प्रफुल्ल जोशी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, मुकुंद भावे, केदार जोशी, राहुल चिकोडे, विवेक मंद्रुपकर, राजू मोरे, अमोल पालोजी आदी स्वयंसेवक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी मार्केटमधील लिफ्ट सुरू करा

0
0

कोल्हापूर: महापालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केटमधील लिफ्ट गेल्या वर्षापासून बंद आहे. मार्केटमध्ये महापालिकेची अनेक कार्यालये असल्याने अभ्यागतांना त्रासाला सामोरे जावे लागत असून मार्केटमधील लिफ्ट त्वरीत सुरू करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने बुधवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, 'शिवाजी मार्केट इमारतीमध्ये इस्टेट विभाग, पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, विवाह नोंदणी व इतर कार्यालये आहेत. कार्यालयात कामानिमित्त दररोज हजारो नागिरक येत असतात. यापैकी अनेक कार्यालये तिसऱ्या व चवथ्या मजल्यावर आहेत. इमारतीमधील लिफ्ट बंद असल्याने अभ्यागताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागिरकांना सुविधा देण्यापेक्षा प्रशासन व नगरसेवक आपापसात वाद घालण्यातच मग्न दिसतात. परिणामी सामान्य नागरिकांच्या असुविधेकडे दुर्लक्ष केले जात आहे. किमान प्रशासनाने तरी याकडे लक्ष देवून लिफ्ट त्वरित सुरू करावी, अशी मागणी केली आहे.' यावेळी आंदोलकांनी प्रतिकात्म बोर्ड लावून निषेध केला. यावेळी संदीप देसाई, नारायण पोवार, नीलेश रेडकर, इलाही शेख, उत्तम पाटील, आदम शेख, गणेश बकरे, प्रल्हाद बत्तेवार, आनंदराव वणिरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images