Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूरच्या यकृतामुळे वाचले नाशिकच्या रुग्णाचे प्राण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर/नाशिक

उजळाईवाडी येथील दिवेकर कुटुंबीयांनी ब्रेन डेड घोषित केलेल्या संतराम दिवेकर (वय ५७) यांचे अवयवदान करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमधील ५१ वर्षीय रुग्णाला जीवनदान मिळाले. नाशिक येथील रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. बुधवारी दुपारी येथील अॅपल सरस्वती हॉस्पिटलमधून यकृत एअर अॅम्बुलन्सच्या मदतीने दोन तास ४५ मिनिटांत नाशिकला नेण्यात आले.

संतराम दिवेकर यांना १९ सप्टेंबरला उजळाईवाडी येथे अपघात झाला होता. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मेंदू मृत झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असताना बुधवारी (२६ सप्टेंबर) त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे अवयवदान करण्याची इच्छा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. दिवेकर कुटुंबीयांनी धाडसाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ब्रेन डेथ कमिटीच्या तपासणीनंतर प्रत्यारोपण समन्वयक समितीने अवयवदान शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कुटुंबीयांच्या सहमतीने घेतला. झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटीच्या वतीने तत्काळ ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली. कोल्हापूर ते ओझर विमानतळ एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. ओझर ते नाशिक पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडर करण्यात आले.

नाशिकमधील ५१ वर्षीय रुग्णावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने कोल्हापूरमधून दोन तास ४५ मिनिटांत यकृत आणण्यात आले. बुधवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी कोल्हापूरहून एअर अॅम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या मदतीने नाशिकमधील खासगी रुग्णालयात यकृत पोहोचविण्यात आले. त्यानंतर रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 'ग्रीन कॉरिडॉर'साठी नाशिकमध्ये प्रथमच एअर अॅम्ब्युलन्सचा वापर करण्यात आला. कोल्हापूरच्या एका रुग्णाने यकृतदान केल्यामुळे नाशिकच्या रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले.

प्रत्यारोपण सर्जन डॉ. विपीन विभूते यांनी ही शस्त्रक्रिया केली. एअर अॅम्ब्युलन्ससाठी एअर पोर्ट मॅनेजर एन. गुरव यांनी ग्रीन कॉरिडॉरासाठी विशेष परिश्रम घेतले. अवयनदानाचे महत्त्व यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मत डॉ. विभूते यांनी व्यक्त केले.

या मोहिमेत कोल्हापुरातील डॉक्टर सर्वश्री अशोक भूपाळी, प्रकाश शारबिद्रे, राजेश पाटील, राहुल दिवाण, अमृत नेर्लीकर, रणजित मोहिते, गिरीश हिरेगौडर, श्रेया हनमशेट्टी, सागर कुरुणकर, प्रतिभा भूपाळी, चार्मी खोत, शीतल देसाई तसेच नाशिक येथील प्रत्यारोपण सर्जन विपीन विभूते यांनी सहभाग घेतला. ग्रीन कॉरिडॉरसाठी पोलिस निरीक्षक विक्रांत चव्हाण, एस. आर. चाचे, एन. एम. टिपुगडे, सूरज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

००००

अवयवदानाचा निर्णय आमच्यासाठी कठीण होता. तरीही त्यामुळे दुसऱ्याला जीवनदान मिळणार होते. अवयवदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. अवयवाच्या माध्यमातून आमचे वडील जिवंत राहणार आहेत.

तुषार दिवेकर, संतराम दिवेकर यांचा मुलगा

फोटो-अर्जुन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्षभरात पेट्रोल १०, डिझेल १५ रुपयांनी महागले

$
0
0

इंधनाचा जीएसटीत समावेश करण्याची मागणी

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर;

सातत्याने वाढणारा पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९० रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेलचा दर ७७ रुपयांवर गेला. गेल्या वर्षभरात कोल्हापुरात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १० रुपयांची वाढ झाली असून, डिझेलच्या दरात १५ रुपयांची वाढ झाली. रोजच्या दरवाढीमुळे नागरिकांचा संयम सुटत असून सरकारने तातडीने इंधनाचा समावेश जीएसटीत करावा, या मागणीने जोर धरला आहे.

गेल्या वर्षभरात कोल्हापूरकरांना इंधन दरवाढीची मोठी झळ सोसावी लागली. ऑक्टोबर २०१७ मध्ये शहरात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८० रुपये २६ पैसे होते. मंगळवारी (ता. २५) शहरात पेट्रोलचा दर ९० रुपये २९ पैसे होता. डिझेलच्या दरात एका वर्षात तब्बल १५ रुपयांची वाढ झाली. ऑक्टोबर २०१७ मध्ये डिझेलचा दर ६२ रुपये १८ पैसे होता. मंगळवारी हा दर ७७ रुपये ६१ पैसे झाला. डिझेलच्या दरवाढीने वाहतूक व्यवस्थेचे कंबरडे मोडले असून, कोणत्याही क्षणी दरवाढीचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येऊ शकते.

सरकारने 'एक देश एक कर' अशी घोषणा करीत जीएसटी लागू केला. मात्र, यात इंधनाचा समावेश न केल्याने त्यावर भरमसाठ कर लावून नागरिकांच्या खिशातून पैसे काढल्याचा आरोप वाहतूकदार संघटनांनी केला आहे. याशिवाय इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कर लावले आहेत. दुष्काळ, कर्जमाफी, दारुविक्री बंदी, शैक्षणिक, कृषी यासह व्हॅटमुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात १० ते १५ रुपयांनी पेट्रेल, डिझेल महाग असल्याचे गणित वाहतूकदार संघटना मांडतात. जीएसटीमध्ये समावेश केल्यास इंधनावर २८ टक्क्यांपेक्षा अधिक कर लावता येणार नाहीत. सध्या इंधनावर सुमारे ६० टक्के करांची आकारणी केली जाते.

पेट्रोल, डिझेलचा उत्पादन खर्च आणि त्यावरील करांमध्ये मोठी तफावत आहे. पेट्रोलची प्रतिलिटर मूळ किंमत केवळ ३९ रुपये ३४ पैसे आहे, तर डिझेलची ४३ रुपये ३ पैसे आहे. यात केंद्र आणि राज्य सरकारचे उत्पादन शुल्क, व्हॅट यासह इतर अनुषंगिक करांचा बोजा लादला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात करांची आकारणी केल्याने इंधनासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.

...............

चौकट

वर्षभरातील इंधन दरवाढ

तारीख पेट्रोल डिझेल

३ ऑक्टोबर २०१७ ८०.२६ ६२.१८

२६ मार्च २०१८ ८०.९२ ६७.०६

२७ ऑगस्ट २०१८ ८५.६२ ७२.९३

२५ सप्टेंबर २०१८ ९०.२९ ७७.६१

..................

चौकट

इंधनावरील करांची रचना रुपयांमध्ये

कर पेट्रोल डिझेल

उत्पादन किंमत ३९.२७ ४२.९०

केंद्राचे उत्पादन शुल्क १९.४८ १५.३३

राज्याचा व्हॅट २३.९८ १४.५८

पंपचालकांचे कमिशन ३.६४ २.५३

इतर कर ३.९२ २.२७

एकूण ९०.२९ ७७.६१

....................

कोट

'सततच्या दरवाढीमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात. वाहनधारकांचा संयम सुटत आहे. २८ सप्टेंबरला जीएसटी काउन्सिलची बैठक होत आहे. काउन्सिलने या बैठकीत इंधन दरवाढीचा विचार करून तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा.

गजकुमार माणगावे, अध्यक्ष, पेट्रोल पंपचालक असोसिएशन

....................

कोट

'डिझेलची दरवाढ असह्य झाली आहे. मालवाहतुकीचे नियोजन कोलमडले असून, सरकारने डिझेलच्या तुलनेत वाहतुकीचे दर जाहीर करावेत. गेली दोन वर्षे वाहतूकदार तोटा सोसून व्यवसाय करीत आहेत. सरकारने किमान व्हॅट आणि स्थानिक दर कमी करावेत.

सुभाष जाधव, अध्यक्ष, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जाग्यावर’पावणे दोन लाखाची ‘पावती’

$
0
0

महापालिकेचा लोगो वापरावा...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेची परवानगी न घेता गणेशोत्सव कालावधीत उभारलेल्या स्वागत कमानींवर प्रशासनाने जाग्यावर जाऊन शुल्क आकारणी केली. विविध पक्ष, संघटना आणि तालीम संस्थांकडून तब्बल १ लाख ७४ हजार रुपयांची वसुली झाली आहे. महापालिका प्रशासनाने यंदा अनधिकृत कमानीवरील कारवाई अंतर्गत 'जाग्यावर पावती' मोहीम राबविली.

शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांवर उत्सव कालावधीत ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या. भाजप, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या स्वागत कमानींचा समावेश होता. या व्यतिरिक्त बालगोपाल तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, जादू ग्रुप, राजे संभाजी तरुण मंडळ, धान्य व्यापारी मंडळ, जनरल फिश मार्केटतर्फेही कमानी उभारल्या होत्या. बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, व्यावसायिकांनी परवानगी न घेता कमानीद्वारे जाहिरात केली होती.

महाद्वार रोड, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी, देवल क्लब परिसर, टेंबे रोड, लक्ष्मीपुरी धान्य बाजार, राजाराम रोड, राजारामपुरी, स्टेशन रोड, नंगीवली चौक, संभाजीनगर, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसह शहराच्या विविध भागांत मोठ्या संख्येने उभारलेल्या स्वागत कमानींना शुल्क आकारणीचा निर्णय प्रशासनाने घेतला. यासाठी दोन पथकांची स्थापना केली. या पथकांनी उत्सव कालावधीत शहर आणि परिसरात फिरती करुन संबंधित मंडळे, तालीम संस्थांकडून रक्कम वसूल केली. १०० चौरस फुटांसाठी ६५० रुपये तर १५० चौरस फुटांपेक्षा मोठ्या आकारातील स्वागत कमानींना १०५० रुपयांची आकारणी केली. भाजपने ७८००, खासदार महाडिकांकडून ९३८७ तर आमदार क्षीरसागर यांच्याकडून ५६८० रुपये रक्कम जमा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

००००

तर वसुलीची रक्कम वाढली असती

उत्सव कालावधीत शहर आणि परिसरात स्वागत कमानींचे पेव फुटले. बहुतांश तरुण मंडळांनी स्वागत कमानी उभारल्या होत्या. महापालिका प्रशासनाने यावर्षी या स्वागत कमानींना 'जाग्यावर पावती' करायचे ठरविले. महापालिकेने दोन पथकांवर ही कारवाई केली. राजकीय पक्षांनी कार्यालयात रक्कम जमा केली, तर तालीम संस्था, तरुण मंडळांची जाग्यावर पावती करण्यात आली. जादा पथकांची स्थापना झाल्यास वसुलीत वाढ झाली असते. 'एक खिडकी' योजनेंतर्गत फक्त तीन मंडळांनी परवानगी घेतली होती.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ सर्वेक्षणात कोल्हापूर पिछाडीवर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८'मध्ये कोल्हापूर जिल्हा पिछाडीवर पडला आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात केलेल्या सर्व्हेक्षणाचा निकाल बुधवारी जाहीर केला. यामध्ये सातारा, नाशिक शहराने बाजी मारली.

'स्वच्छ सर्व्हेक्षण...'अंतर्गत कमिटीने ऑगस्ट २०१८ मध्ये जिल्ह्यातील सोळा गावांची तपासणी केली होती. यामध्ये गावातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, अंगणवाडी व शाळांचा दर्जा तपासला होता. वैयक्तिक शौचालय बांधणीमध्ये जिल्हा अग्रेसर आहे. पण स्वच्छतेविषयक इतर उपक्रमांत जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक नसल्याचे निकालांती स्पष्ट झाले अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. तळंदगे, शिरढोणसह मोठ्या लोकसंख्येच्या गावांची तपासणी केली होती. महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबरला स्वच्छ सर्वेक्षणात बाजी मारलेल्या जिल्ह्यांचा नवी दिल्लीत गौरव होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोरदार पावसाने शहराला झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विजांच्या कडकडाटासह बुधवारी संध्याकाळी हजेरी लावलेल्या पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडाली. जवळपास तीन तास जोरदार सरी कोसळत राहिल्या. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शहर आणि परिसरात ठिकठिकाणी झाडे, वीजवाहिन्या तुटून पडल्या. फीडरवर झाड पडल्याने निम्मे शहर अंधारात बुडाले.

सर्किट हाऊस ते महासैनिक दरबार हॉलदरम्यानच्या रस्त्यावर वीजवाहिन्या पडल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या. कसबा बावडा येथे एका घरावर झाड पडल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. पावसाचा सर्वात जास्त फटका उत्सव कालावधीत उभारलेल्या मंडप व स्वागत कमानींना बसला. स्वागत कमानी जमीनदोस्त झाल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. जय भवानी गल्ली, भगवा चौक, लाइन बझार, खाऊ गल्ली येथे झाडे कोसळली. होर्डिंग्ज आणि स्वागत कमानी पडल्याने वाहतूक मार्गात अडथळे निर्माण झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी झाडे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. सखल भागात पाणी साचले. शिवाय काही भागातील घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. ऐन गर्दीच्यावेळी जोरदार पाऊस सुरू झाल्याने किरकोळ विक्रेत्यांची चांगलीच पंचाईत झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील काही बंगल्यांमध्ये पाणी शिरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथील पाणी मोटारीने बाहेर काढले. दरम्यान, रात्रीही काही काळ तुरळक पाऊस सुरूच होता.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूकंप गोकुळमध्ये, हादरे लोकसभेत

$
0
0

महादेवराव महाडिकांच्या आक्रमकतेने खासदारांची कोंडी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ मल्टिस्टेटच्या वादात माजी आमदार महादेवराव महाडिक अचानक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद केडीसीसी बँकेसह विधानसभा, लोकसभा निवडणुकीत उमटणार आहेत. यामुळे 'गोकुळ'च्या भूकंपाचे हादरे लोकसभेला बसण्याची चिन्हे स्पष्ट झाल्याने खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांची उमेदवारी निश्चित आहे. भाजप बरोबरचे स्नेहपूर्ण संबंध आणि मुश्रीफ यांच्याशी वाढलेल्या मतभेदामुळे त्यांचा पक्ष आज तरी नक्की नाही. त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार उत्सुक आहेत, पण त्यासाठी मुश्रीफ मनापासून सोबत असणे आवश्यक आहे. त्यातून दोघांतील दुरावा कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक बैठकाही झाल्या आहेत. दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार आहे, त्यामुळे आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. अशावेळी दोन्ही पक्षातील, नेत्यांमधील वाद वाढू नयेत यासाठी प्रयत्न सुरू असतानाच 'गोकुळ'च्या निमित्ताने ठिणगी पडली आहे.

मल्टिस्टेटचा ठराव होऊ नये यासाठी महाडिक यांच्या विरोधात आघाडी करण्यात आली आहे. यामध्ये मुश्रीफ व पाटील यांचा पुढाकार आहे. त्यांनी सोमवारी 'गोकुळ' च्या नेत्यांवर टोले मारले. त्याला तातडीने महाडिक यांनी प्रत्युत्तर देताना सनसनाटी आरोप केले. वैयक्तिक पातळीवर आरोप झाल्याने दोन्ही नेत्यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. पण या आरोपांमुळे हे नेते चांगलेच अस्वस्थ झाले. याचे पडसाद आगामी काही निवडणुकांत उमटण्याची चिन्हे आहेत.

दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार हे नक्की आहे. त्यामुळे आघाडीची उमेदवारी घेताना खासदार महाडिक यांना मुश्रीफ व पाटील यांची मदत लागणार आहे. चार वर्षापूर्वी घडलेल्या घटनेने आमदार पाटील यांची मदत मिळणे कठीण आहे. यामुळे महाडिक यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महादेवराव महाडिक यांनी दोन्ही नेत्यांवर थेट आरोप केल्याने त्याचा परिणाम खासदारांच्या उमेदवारीवर होण्याची शक्यता आहे. आरोप काकांनी केले असले तरी सोबत खासदारही असल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

...............

चौकट

जिल्हा बँक संचालक नाराज

महादेवराव महाडिक यांनी जिल्हा बँकेतील संचालकांवरही काही आरोप केले. यामुळे ते नाराज झाले आहेत. यातील अनेकांची लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाडिक यांना मदत होत असते. पण त्यांच्यावरच आरोप झाल्याने त्यांच्या नाराजीचे पडसादही आगामी राजकारणात उमटण्याची चिन्हे आहेत. यामुळे काकांच्या आक्रमकतेमुळे पुतण्याची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप सिध्द करा, नाही तर राजीनामे

$
0
0

जिल्हा बँक संचालकांचा महाडिकांना इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी दुबई आणि हैदराबाद सहलीत धिंगाणा घातल्याचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केलेला आरोप सिद्ध करून दाखवल्यास संचालकपदाचे राजीनामे देऊ, असे पत्रक जिल्हा बँकेच्या संचालकांनी प्रसिद्धीस दिले आहे. 'गोकुळ'च्या संघर्षात जिल्हा बँकेची बदनामी का? असा सवालही यामध्ये करण्यात आला आहे.

महाडिक यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार बैठकीत जिल्हा बँकेच्या संचालकांनी परदेशात धिंगाणा घातल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी श्रीमती निवेदिता माने, आर. के. पोवार, श्रीमती उदयानीदेवी साळुंखे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, अर्चना पाटील, विलास गाताडे, राजू आवळे, असीम फरास, भैया माने, रणजीत पाटील यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. दरम्यान, प्रा. संजय मंडलिक व सर्जेराव पाटील- पेरीडकर हे दोन संचालक परगावी असल्यामुळे त्यांनी फोनवरून याला पाठिंबा दिल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, महाडिक यांच्या वक्तव्यामुळे बँकेची नाहक बदनामी होत आहे. मॉरिशसला गेलेल्या सहलीचा खर्च ज्या त्या संचालकांनी व्यक्तिगत स्वतःच्या खिशातून केला आहे. या सहलीमध्ये बँकेचा एक रुपयासुद्धा खर्च झालेला नाही. आधुनिकीकरणाच्या या जगात बँकेला अद्ययावत सीबीएस प्रणाली खरेदी करावयाची आहे. त्यासाठी तीन निविदा आल्या आहेत. या कंपन्यांनी अशी सॉफ्टवेअर ज्या ठिकाणी बसवलेली आहेत त्यांचा प्रत्यक्ष अभ्यास व माहिती घेण्यासाठी महाडिक यांच्यासह सर्वच संचालक मंडळाला निमंत्रित केले होते. त्यानुसार संचालक मंडळांनी मुंबईसह बागलकोट व हैदराबाद येथे भेटी दिल्या. त्यामुळे या सहलीमध्येही प्रायोजक असण्याचा प्रश्नच येत नाही. या दोन्ही सहलींमध्ये संचालिका देखील होत्या. त्यामुळे आरोप करताना त्यांनी थोडा तरी संयम पाळायला हवा होता.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, बँकेच्या हार्डवेअर खरेदीबाबत केलेले आरोप बेजबाबदारपणाचे आणि निराधार आहेत. कारण बँकेची हार्डवेअर खरेदी ही दहा वर्षांपूर्वी प्रशासकीय कारकीर्द असताना केली आहे. त्यानंतर बँकेमध्ये हार्डवेअरची खरेदीच केलेली नाही. त्यामुळे हार्डवेअरवाल्याच्या खर्चातून दुबईला सहल केली म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेल्या साडेतीन वर्षात विद्यमान अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील नेत्रदीपक प्रगतीबदल ज्येष्ठ संचालक या नात्याने महाडिक यांनी वेळोवेळी बैठकांमध्ये अध्यक्ष मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाचे तोंड भरून कौतुकही केले आहे.

.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसुंधरा’ पुरस्कारांची घोषणा

$
0
0

मदने, डॉ. राऊत, डॉ. कदम, डॉ. कुलकर्णी, चेचर यांचा सन्मान

कोल्हापूर टाइम्स टीम

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना दरवर्षी वसुंधरा मित्र, सन्मान या पुरस्कारांनी गौरविण्यात येते. यंदा राजेंद्र मदने, पी. डी. राऊत, डॉ. एस. डी. कदम, डॉ. अनिल कुलकर्णी, बी. डी. चेचर, तुषार साळगावकर आदींसह मलबार नेचर क्लबला पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट कृष्णा गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत, 'सायबर'चे डॉ. एस. डी. कदम व डॉ. अनिल कुलकर्णी यांना 'वसुंधरा गौरव' पुरस्काराने सन्मानित केले जाईल. आंबोली येथील मलबार नेचर क्लब संस्था, राधानगरी येथील पर्यावरणवादी कार्यकर्ता तुषार साळगावकर आणि छायाचित्रकार बी. डी. चेचर यांना 'वसुंधरा मित्र' पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या राजेंद्र मदने यांना 'वसुंधरा सन्मान' पुरस्कार जाहीर झाला आहे.

व्हाइस प्रेसिडेंट कृष्णा गावडे म्हणाले, 'महोत्सवाचे यंदाचे नववे वर्षे आहे. 'प्रदूषण टाळा नदी वाचवा' या संकल्पनेवर एक ते चार ऑक्टोबर या कालावधीत वसुंधरा महोत्सव होत आहे. लेखक अनिल अवचट यांच्या हस्ते व किर्लोस्कर उद्योग समूहाचे संजीव निमकर, चंद्रहास रानडे, टी. विनोदकुमार यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. १ ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. मंगळवारी (ता. २) सायंकाळी पाच वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते 'वसुंधरा गौरव' व 'वसुंधरा मित्र'पुरस्कार प्रदान करण्यात येतील. महोत्सवाच्या समारोपदिनी गुरुवारी (ता. ४ ) पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते उदय गायकवाड यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सर्व कार्यक्रम दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे होणार आहेत.

महोत्सवासाठी २५ सप्टेंबरपासून रोज सकाळी ११ ते सायंकाळी सात या दरम्यान शाहू स्मारक भवन येथे तर निसर्ग मित्र संस्था साईक्स एक्स्टेंशन येथे दुपारी तीन ते सात या वेळेत नावनोंदणी करता येईल. पत्रकार परिषदेला राहुल पवार, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उदय गायकवाड, अनिल चौगुले, प्राचार्य अजय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे, भाऊ सूर्यवंशी, केदार मुनिश्वर उपस्थित होते.

युवासंवाद, हेरिटेज वॉक ते पोस्टर प्रदर्शन

महोत्सवामध्ये 'वस्त्रोद्योग व नदी प्रदूषण' व 'नदी प्रदूषण रोखण्यासाठी तंत्रज्ञान'या विषयावरील परिसंवाद, युवकांसाठी 'नदी प्रदूषणाची कारणे आणि उपाय' या विषयावर संवाद आयोजित केला आहे. 'प्रदूषण रोखा, नदी वाचवा'विषयावर पोस्टर स्पर्धा होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी 'रिव्हर अँड फन'व पर्यावरणपूरक सजावट हा नाविन्यपूर्ण उपक्रम आकर्षण असणार आहे. छायाचित्र प्रदर्शन, तज्ज्ञांची व्याख्याने होतील. दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे हेरिटेज वॉक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेत सत्तांतराच्या हालचाली

$
0
0

केडीसीसी लोगो

.......

पक्षीय बलाबल पाहता सत्तांतर अशक्य

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या मल्टिस्टेटवरुन जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उभे दोन गट पडले आहेत. पक्षापेक्षा गट मजबूत करण्याच्या अट्टाहासांमुळे एकमेकांच्या शक्तिस्थळांवर घाव घालण्याची व्यूहरचना सुरु झाली असून याच प्रयत्नातून जिल्ह्याचे आर्थिक केंद्र असलेल्या जिल्हा बँकेत सत्तांतराचे पडघम वाजू लागले आहेत. पक्षीय बलाबल पाहता चेअरमन हसन मुश्रीफ यांना सकृतदर्शनी कोणताही धोका नसला, तरी माजी मंत्री प्रकाश आ‌वाडे व माजी खासदार जयवंतराव आवळे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले. सत्ता स्थापनेदरम्यान पद वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नसला, तरी गोकुळवरुन निर्माण झालेल्या वादामुळे बँकेमध्ये सत्ताबदल करण्याचा डाव टाकला जाऊ लागला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी तसे जाहीर वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. गोकुळच्या मल्टिस्टेटचे फायदे-तोटे जाणून घेण्यापेक्षा जिल्ह्याच्या राजकारणावर केवळ आपली मांड पक्की करण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. भूतकाळातील उट्टे आणि भविष्यातील राजकारणाची बेगमी करताना मात्र जिल्ह्यातील दोन्ही आर्थिक सत्ता केंद्रांना यानिमित्ताने धक्के बसू लागले आहेत.

जिल्हा बँकेत सद्य:स्थितीमध्ये राष्ट्रवादीचे आठ, काँग्रेसचे सात तर भाजप व जनसुराज्यचे अनुक्रमे तीन व दोन संचालक आहेत. तर शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक एकमेव प्रतिनिधीत्व करत आहेत. बँकेतील राष्ट्रवादीच्या संचालकांची चांगली मोट दिसते, त्याप्रमाणे काँग्रेसच्या संचालकांची दिसत नाही. नरसिंगराव पाटील यांच्या निधनामुळे संख्याबळ कमी असताना काँग्रेसच्या आवाडे व आवळे या दोन्ही गटामध्ये नुकतीच दिलजमाई झाली आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावरुन पी. एन. पाटील, आवाडे यांच्यामध्ये फारसे सख्य नसल्याने आवडे त्यांच्यासाठी कितपत आग्रही राहतील याबाबत शंका घेतली जात आहे. अध्यक्षपद बदलायचे म्हटले, तरी मंडलिक यांची भूमिका मुश्रीफ यांच्याच बाजूने राहणार आहे. भाजपचे अशोक चराटी, अनिल पाटील, पी. जी. शिंदे प्रतिनिधीत्व करत असले, तरी शिंदे यांची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. काँग्रेस चार, भाजप तीन व जनसुराज्यचे दोन असे सर्व एकत्र आले, तरी संख्याबळ नऊ पेक्षा पुढे जात नाही. अशा परिस्थीत जनसुराज्यचे विनय कोरे यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने कोरे हे भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून कार्यरत असले, तरी मुश्रीफ यांच्यासोबतची मैत्री, जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यासाठी होणारा अर्थपुरवठा आणि महाडिक यांना असलेला विरोध पाहून ते सत्ताबदलामध्ये सहभागी होतील का? याबाबत राजकीय आडाखे स्पष्ट झाल्यानंतरच जिल्हा बँकेतील सत्तांतरावर शिक्कामोर्तब होणार आहे.

.......................

चौकट

विद्यमान संचालक

राष्ट्रवादी काँग्रेस : ८

काँग्रेस : ७ (एक जागा रिक्त)

भाजप : ३

जनसुराज्य : २

शिवसेना : १

एकूण जागा : २१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्तीच्या रजेबाबत आज निर्णय

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे बुधवारी कार्यालयीन कामासाठी पुण्याला गेले होते. त्यामुळे लोहार यांच्या कारवाईवरील प्रस्तावावर स्वाक्षरी होवू शकली नाही. शिवाय लोहार यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समिती सदस्यांनाही नियुक्तीची पत्रे गुरुवारीच उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. लोहार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नेमली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या व्यापाऱ्यांचा भारत बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किरकोळ व्यापारात परदेशी गुंतवणुकीला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या शुक्रवारच्या (ता. २८) देशव्यापी बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार व्यापारी सहभागी होणार आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. बंदमुळे सुमारे शंभर कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे.

देशातील व्यापारात परकीय गुंतवणुकीला केंद्र सरकारने मोकळीक दिल्याने वॉलमार्ट, फ्लिपकार्टसारख्या मोठ्या कंपन्या किरकोळ बाजारात उतरणार आहेत. यामुळे देशातील व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याचा धोका व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने परदेशी गुंतवणुकीचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी देशभरातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने शुक्रवारी भारत बंदची घोषणा केली आहे. सर्व व्यापारी संघटनांनी याला पाठिंबा दिला असून, राज्यातील ८ लाख, तर कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार व्यापारी बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवारी दिवसभर व्यापार आणि दुकाने बंद ठेवून सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाणार आहे. शहरातील व्यापारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात एकत्र जमणार आहेत. यानंतर मोटारसायकल रॅलीने व्यापारी राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.

तालुका पातळीवरील व्यापारी आसपासच्या गावांमधील व्यापाऱ्यांसह तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. सरकारने परदेशी गुंतवणुकीचा निर्णय मागे घ्यावा, ई-कॉमर्सचे धोरण जाहीर करावे, जीएसटीमधील दंडाची तरतूद रद्द करावी, प्राप्तीकराची सवलत वाढवावी, व्यापाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळावे, आदी मागण्या केल्या जाणार आहेत. शहरातील सर्व व्यापारी संघटना बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेअरमनपदी अश्विनी साळोखे

$
0
0

कोल्हापूर : साने गुरुजी शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी श्रीमती अश्विनी आप्पासो साळोखे व व्हाईस चेअरमनपदी सुधा सुरेश जरग यांची एकमताने निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नूतन पदाधिकाऱ्यांचा संचालक संजय मोरे व सुधा सुरेश जरग यांच्या हस्ते सत्कार झाला. मावळते चेअरमन विलास कवडे, प्रकाश राऊळ यांनी मनोगते व्यक्त केली. संस्था संचालक सुभाष गुळवणी, प्रकाश आमते, श्रीकृष्ण लोखंडे, विश्वास जुवेकर, श्रीमती विजया डावरे, जितेंद्र मोरे, सचिव रमेश चौगुले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिस्टेटसाठी सत्ताधाऱ्यांचा धडाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटच्या ठरावावरून विरोधक आक्रमक झाले असताना सत्ताधारी संचालकांनी मल्टिस्टेटच्या पाठिंब्यासाठी मेळावे व सभेद्वारे शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. गुरुवारी आमदार सत्यजित पाटील, संचालक राजेश पाटील, दीपक पाटील यांनी आपल्या गटाच्या सभा घेऊन मल्टिस्टेटच्या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी दूध उत्पादकांना आवाहन केले.

चंदगड येथे माजी आमदार कै. नरसिंग गुरुनाथ पाटील गटाची बैठक झाली. यावेळी संचालक राजेश पाटील म्हणाले, 'गोकुळ हा ब्रँड राज्यात विशेष लोकप्रिय असून मुंबईत सात लाख लिटरपेक्षा अधिक दुधाला मागणी आहे. गोकुळ रोज सव्वा आठ लाख लिटर म्हशीच्या दुधाची विक्री करते, पण प्रत्यक्षात चार लाख लिटर संकलन आहे. सध्या उपलब्ध कार्यक्षेत्रातून प्रयत्न करून म्हशीच्या दुधाचे संकलन होत नसल्याने कार्यक्षेत्रात वाढ करून संकलनात वाढ करावी लागेल. गोकुळ मल्टिस्टेट झाल्यास कार्यक्षेत्र विस्तारित होऊन दूध संकलन वाढेल. गोकुळ मल्‍टिस्‍टेट होण्‍यामध्‍ये दूध संस्‍था, उत्‍पादक सभासद, संघाचे कर्मचारी या सर्वांचेच हित आहे.'

तालुका संघाचे संचालक अभय देसाई, जानबा चौगुले, विठ्ठल पावले, माजी चेअरमन भिकू तुकाराम गावडे, माजी सभापती ज्‍योती पवार-पाटील, अनिल सुरतकर, जि.प. सदस्‍य अरुण सुतार, माजी जि.प.सदस्‍य बाळासाहेब घोडके, शेतकरी संघाचे संचालक विनोद पाटील. माजी सभापती बंडोपंत चिगरे, तालुका संघाचे माजी संचालक मारुती पटेकर अल्‍लीसो मुल्‍ला गवसे, रामचंद्र गुरव, तालुका संघाचे उपाध्यक्ष पोमानी पाटील. गडहिंग्लज बाजार समितीचे सभापती गोविंद सावंत आदी उपस्थित होते.

पाटणे फाटा येथे माजी आमदार भरमू सुबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात मल्टिस्टेटच्या ठरावा पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. यावेळी गोकुळचे संचालक दीपक पाटील यांनी संघ मल्टिस्टेट करण्यासंबंधीच्या ठरावाचे वाचन केले. यावेळी माजी आमदार भरमूआण्‍णा पाटील म्हणाले, 'मल्टीस्टेटला विरोध करणे म्हणजे सभासदांच्या हिताला विरोध आहे. मल्टिस्टेटमुळे संघाला २० लाख लिटर दुधाचा टप्‍पा गाठता येणार आहे. त्‍यामुळे संघाच्‍या सर्वच सभासद संस्‍थांना त्‍याचा लाभ होणार आहे.'

यावेळी दूधगंगा संस्थेचे अध्यक्ष प्रताप सूर्यवंशी, सभापती बबनराव देसाई, नाना दशके, माजी सभापती यशवंत सोनार, आर.जी. पाटील, एम. एन. पाटील, मारुती पटेकर, माजी सभापती ज्योती पाटील, उपसभापती विठाबाई मुरकुटे, पंचायत समिती सदस्या मनीषा शिवनकर, शांताराम पाटील, शामराव बेनके, बाबुराव जाधव, गजानन ढेरे, नरसू पाटील, वसंत चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निल शिवणगेकर यांनी आभार मानले.

सरुड (ता. शाहूवाडी) येथे झालेल्या मेळाव्यात आमदार सत्यजित पाटील यांनी मल्टिस्टेटच्या ठरावाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. आमदार पाटील म्हणाले, 'गोकुळ मल्टिस्टेट झाल्यास संघास फायदा होणार आहे. अमूलसारख्या बलाढ्य दूध संघाबरोबर स्पर्धा करण्यासाठी, परराज्यातील दूध मिळविण्यासाठी, राज्य सरकारच्या हस्तक्षेपापासून संघ दूर ठेवण्यासाठी मल्टिस्टेटच्या ठरवास वार्षिक सर्वसाधारण सभेत पाठिंबा देणे अत्यंत गरजेचे बनले आहे. मल्टिस्टेटच्या विषयावरून जिल्ह्यात पेटलेल्या राजकारणापासून दूध संघाला दोन हात लांब ठेवण्यासाठी सर्व सभासदांनी जागरूक राहून ठरावाच्या बाजूने राहण्याचे आवाहन केले.' यावेळी उपस्थित दूध उत्पादकांनी मल्टिस्टेटच्या ठरावाला पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर दुबार मतदारांवर गुन्हा दाखल करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत नवीन मतदार नोंदणी, नाव, पत्यातील दुरुस्ती, दुबार, मृत मतदार वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांनी एका ठिकाणचे नाव स्वत:हून कमी करून घ्यावे. दोन्हीकडे जाणीवपूर्वक नाव ठेवल्याचे निदर्शनास आल्यास प्रसंगी अशा दुबार मतदारांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील,' असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी दिला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी निर्दोष करण्याचे काम निवडणूक प्रशासन करीत आहेत. यावरील आक्षेप, तक्रारी, मते जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, 'जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३९ लाख २३ हजार आहेत. यापैकी २९ लाख ६५ हजार मतदार आहेत. १८ ते १९ वयोगटातील १ लाख ३२ हजार मतदार आहेत. प्रत्यक्षात नोंदणी केवळ दहा हजार जणांचीच झाली आहे. ती वाढविण्यासाठी कॉलेजांमध्ये जागृती करण्यासाठी विभागातील सर्व विद्यापीठांना पत्र दिले आहेत. राजकीय पक्षांनीही प्रतिनिधी नेमून मतदार नोंदणी, वगळण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे. कोणत्याही कारणाने नाव वगळताना संबंधीतांना नोटीस द्यावी, अशी सूचना दिली आहे. दोन ठिकाणी मतदार असणे हा गुन्हा आहे. म्हणून संबंधितांनी एका ठिकाणचे नाव कमी करण्यासाठी अर्ज करावेत.'

डॉ. म्हैसेकर म्हणाले, 'मतदार यादी रंगीत फोटोंसह अपडेट केली जात आहे. त्यावर अजुनही काम करण्याची गरज आहे. यादीत ४९० मतदारांचे फोटो नाहीत. त्या मतदारांच्या घरांपर्यंत जाऊन फोटो घेतले जातील. नवीन नावांचा सामावेश करणे व इतर प्रक्रियेसंबंधीचे अर्ज स्वीकारण्यासाठी प्रत्येक रविवारी मतदान केंद्रावर बीएलओ असतील. ही प्रक्रिया ऑनलाइनही करता येते. १ जानेवारी २०१९पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणारेही यादीत नाव सामावेशासाठी अर्ज करू शकतात.'

बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय करजगार यांनी शहरात अनेक ठिकाणी एकाच मतदाराचे नाव अनेक ठिकाणी असल्याचे निदर्शनास आणून दिले. काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन चव्हाण म्हणाले, 'कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील काही नावे वगळताना प्रशासनाने खात्री केलेली नाही. अर्ज केला नसतानाही यादीतून राजकीय हेतूने नावे वगळली आहेत का? अशी शंका येत आहे. त्यामुळे नोटीस दिल्याशिवाय नावे वगळू नये.'

काँग्रेसचे शारंदर देशमुख यांनी बीएलओ सर्व प्रभागात येत नसल्याची तक्रार केली. निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी मतदार यादीसंबंधी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादीचे अनिल साळुंखे, काँग्रेसचे अजित फराकटे आदी उपस्थित होते.

मतदान करता येणार नाही

'मतदान ओळखपत्र नसेल तर इतर १७ पुरावे दाखवल्यानंतर मतदान करता येते. मात्र, मतदार यादीत नावच नसेल तर मतदान करता येणार नाही. शहरात १४०० तर ग्रामीणमध्ये १२०० मतदारांमागे एक मतदान केंद्र असेल', असे डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र कर्जदारांना २५० कोटी मिळतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ठरलेल्या ४८ हजार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुप्रिम कोर्टात लढाई सुरू आहे. कोर्टातील लढाईला यश मिळण्याची शक्यता आहे. त्यातून अपात्र कर्जदारांना २५० कोटी रुपये मिळतील,' असा विश्वास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. बँकेच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. 'आगामी आर्थिक वर्षात सभासदांना १२ ते १४ टक्के डिव्हिडंड देण्याचा प्रयत्न राहील,' असेही त्यांनी जाहीर केले.

राजर्षी शाहू मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक सभागृहात बँकेची ८०वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, 'केंद्र सरकारने २००८ मध्ये कर्जमाफी केली. पण २०१२मध्ये नाबार्डने जिल्ह्यातील ११२ कोटी रुपयांची कर्जमाफी अपात्र ठरली. त्यात जिल्ह्यातील ४४ हजार ६५९ हजार शेतकरी भरडले गेले. सुमारे दीडशे शेतकऱ्यांच्या प्रकरणांत अनियमितता होती. त्याचा फटका शेतकरी, विकास सेवासंस्थांना बसला. प्रशासक काळातही शेतकऱ्यांचे न्याय मागण्याचे मार्ग खुंटले. आम्ही सत्तेवर आल्यावर अन्याय झालेले शेतकरी, संस्थांना एकत्र करुन सुप्रिम कोर्टात धाव घेतली. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा दोष नसल्याचे पटवून देण्यासाठी तज्ज्ञ वकील युक्तिवाद करीत आहेत. लवकरच सर्व शेतकऱ्यांना ११२ कोटी रुपयांची मुद्दल आणि गेल्या दहा वर्षांतील व्याज अशी एकूण २५० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल.'

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, 'नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या नोटा परत घेण्यासाठीही आमचा सुप्रिम कोर्टात लढा सुरू आहे. त्याला चांगले यश येईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कोसळल्याने कारखानदारी अडचणीत आली आहे. तरीही जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना बँकेने जादा कर्ज पुरविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिल देणे, देखभाल, तोडणी वाहतूक खर्च देणे शक्य आहे. त्यामुळे नवीन हंगाम सुरळीत होण्यास मदत होणार आहे.'

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी आभार मानले. ज्येष्ठ संचालक पी. एन. पाटील, निवेदिता माने, पी. जी. शिंदे, राजू आवळे, अशोक चराटी, विलासराव गाताडे, अनिल पाटील, प्रताप माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सर्जेराव पाटील-पेरिडकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, अर्चना पाटील, उदयानी साळुंखे, असिफ फरास, आर. के. पोवार आदी उपस्थित होते.

प्रश्नोत्तरात कुराडेंची खडाजंगी

सभेत प्रा. किसनराव कुराडे हे प्रश्न विचारत असताना त्यांना सभासदांनीच रोखले. यावर त्यांनी 'मला रोखण्याचा अधिकार फक्त सभाध्यक्षांचा आहे,' असे उपस्थित सभासदांना सुनावले. कुराडे यांच्या संस्थेने वनटाइम सेटलमेंट योजनेत बँकेचे सर्व देणे भागवले आहे. थकबाकीदार नसताना संस्थेला मतदानापासून का रोखले जाते?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पतसंस्थांना कॅश क्रेडिट देताना ११ महिन्यांचे बंधन घालू नका, अशी सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, दौलत साखर कारखान्याबद्दल सभासदांनी प्रश्न उपस्थित केल्यावर हे प्रकरण कोर्टात असून नंतर ऊस उत्पादकांना न्याय देण्यात येईल, असे सांगून सभेत सभासदांची बोळवण करण्यात आली. कुराडे यांच्यासह माजी आमदार के. पी. पाटील, भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार, आर. एस. पाटील, संभाजी पाटील, अशोक पोवार, दाजी पाटील, विजयसिंह पाटील, भीमराव चिमणे, विलास पाटील, माणिक पाटील चुयेकर आदी सभासदांनी प्रश्न उपस्थित केले.

'के. पीं.'ना मंत्री व्हायचे आहे

'अपात्र कर्जासह सहकारी बँकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार मुश्रीफ व पी. एन. पाटील हे दोघेही पुन्हा आमदार झाले पाहिजेत,' असे मनोगत माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केले. त्यावर मुश्रीफ यांनी, 'आम्ही दोघे आमदार झाल्यावर तुम्हीही आमदार होणार आहात. तसेच तुम्हाला मंत्रीही व्हायचे आहे,' असा टोला लगावल्यावर के. पी. यांनी त्यांना हसून दाद दिली.

सभेतील निर्णय

- बँकेचे अग्रेसिव्ह मार्केटिंग करणार

- राष्ट्रीयकृत बँकांकडील ८० टक्के ठेवी जिल्हा बँकेकडे वळवणे

- १२ ते १४ टक्के डिव्हिडंड देण्याचा प्रयत्न

- कामगारांना एक तारखेपासून ग्रेडेशन देण्याचा निर्णय

- व्यक्तिगत खातेदारासाठी सी.सी.मध्ये ४० लाख रुपये वाढीचा विचार

- बँकेत नवीन शाखाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार

- अतिवृष्टीतील तालुक्यांसाठी कर्जमाफी करावी

- ऊस पिकाला एकरी ६० हजार रुपये कर्ज द्यावे

- सचिवांना १० हजार रुपये बक्षिसी द्यावी

०००००

आर्थिक व्यवहारांवर दृष्टिक्षेप

१७७ कोटी

वसूल भांडवल

४०४८ कोटी

ठेवी

२९९१

कर्ज वाटप

५.३२

एनपीए

१८२

नफ्यातील शाखा

५७ कोटी

ढोबळ नफा

८ टक्के

प्रस्तावित लाभांश

९ टक्के

कर्मचाऱ्यांना बोनस

४.५० कोटी

प्रति कर्मचारी व्यवसाय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अरविंद पवारसह महिलेला पोलिस कोठडी

$
0
0

कुरळप आश्रमशाळा प्रकरण ... लोगो

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

कुरळप (ता.वाळवा, जि. सांगली) येथील मिनाई माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा संस्थापक डॉ. अरविंद आबा पवार (वय ६१) व त्याला सहकार्य करणारी स्वयंपाकीण महिला मनीषा बाळू कांबळे (वय ४०, रा. चिकुर्डे) या दोघांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कुरळप पोलिसांनी बुधवारी या दोघांना अटक करून गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले. पोलिस तपासात अत्याचार झालेल्या मुलींपैकी एक मुलगी मागासवर्गीय समाजातील असल्याचे स्पष्ट झाल्याने पवार याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, गुरूवारीही कुरळपमध्ये तणावाचे वातावरण होते. काही महिला पालक व संतप्त ग्रामस्थांनी मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांना मारहाण करून शाळेतील पवार याचे डिजिटल फलक फाडून टाकले. एका खिडकीची काचही फोडण्यात आली.

अरविंद पवार याने वसतिगृहात राहणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कुरळप पोलिसांनी बुधवारी त्याच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार करणे, संस्थेच्या कस्टडीतील मुलींच्यावर लैंगिक अत्याचार करणे, १६ वर्षांखालील बालकांच्यावर लैंगिक अत्याचार करणे तसेच बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा या कायद्यांनुसार वेगवेगळ्या कलमांखाली दोघांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. डॉ. अरविंद पवार याने गेल्या अनेक दिवसांपासून शाळेतील स्वयंपाकीण मनीषा कांबळे हिच्या सहकार्याने पाच मुलींच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. तर तीन मुलींचा विनयभंग केल्याचे उघड झाले आहे. गुरूवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कुरळप येथे भेट देवून पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. पवार याची वसतिगृहातील विश्रांतीची खोली पोलिसांनी सील केली आहे. कुरळपच्या ग्रामस्थांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन पोलिसांना दिले आहे. ग्रामस्थांनी काहीकाळ गाव बंद ठेवून त्याचा निषेध केला.

दरम्यान, गुरूवारी सकाळी संतप्त ग्रामस्थ आणि काही पालकांनी शाळेतील अरविंद पवार याचे काही डिजिटल फलक फाडून एका केबिनची काच फोडली. मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांना काही संतप्त पालकांनी मारहाण केली. यानंतर ग्रामस्थांनी गावात निषेध फेरी, प्रतिकात्मक तिरडी मोर्चा काढून पवार याच्या पुतळ्याचे दहन केले. विविध संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी म्हणून काहीकाळ ठिय्या आंदोलन केले.

शाळेतील शिक्षकांनी गुरूवारी निवासी मुलांना काहीकाळासाठी घरी पाठविले. तर काही पालकांनी मुले घेवून जाणे पसंत केले. विश्वास नांगरे पाटील कुरळप पोलिस ठाण्यात आल्यावर काही पालक महिला व स्थानिक महिलांनी त्यांच्यासमोर कैफियत मांडली. नांगरे पाटील म्हणाले, 'अत्यंत गंभीर स्वरुपाची ही घटना असून ज्या पालकांना तक्रारी दाखल करायच्या असतील त्यांनी पुढे यावे. संशयितावरील दोष सिद्ध करण्यासाठी पोलिस जास्तीत जास्त पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पवार याने वसतिगृहातील काही मुलांना घर कामासाठी वापरले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्याच्यावर बाल कामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिस तपास करत आहेत.'

................

चौकट

उपनिरीक्षक चव्हाण यांना बक्षीस

कुरळप येथील मिनाई आश्रम शाळेवर कारवाई करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना विश्वास नांगरे पाटील यांनी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. चव्हाण यांनी केलेला प्राथमिक तपास आणि अरविंद पवार याच्यावर झालेली कारवाई आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समिती स्थापली, कार्यकक्षा ठरेना

$
0
0

लोगो - जिल्हा परिषद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना झाली. पण समितीच्या चौकशीची कार्यकक्षा ठरलेली नाही. दुसरीकडे लोहार यांच्यासह संपूर्ण माध्यमिक विभागाची चौकशी होणार असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. दरम्यान चौकशी समिती सदस्यांची शुक्रवारी बैठक होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी, शिक्षणाधिकारी लोहार यांच्यावर आरोप केले होते. शिक्षक मान्यतेवरुन त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सदस्यांनी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या कामकाजावर टीकास्त्र सोडताना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशीसाठी आक्रमक भूमिका घेतली. सर्वसाधारण सभा होऊन दोन आठवडे उलटल्यानंतर पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, भगवान पाटील यांचा समावेश आहे.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांची समिती सचिव म्हणून नियुक्ती झाली. मंगळवारी समिती स्थापन केल्याची घोषणा झाली. त्याचवेळी लोहारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यासंदर्भातील लेखी आदेश काढण्यात येणार होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे दोन दिवस कार्यालयीन कामासाठी बाहेर असल्याने चौकशी समितीच्या सदस्यांना नियुक्तीची पत्रे मिळाली नाहीत. तसेच लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश निघाला नाही. शुक्रवारी यासंदर्भात कार्यवाही होण्याची शक्यता आहे. लोहारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबत आदेश लागू करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. शिवाय चौकशी समितीतील सदस्यांना पत्रे देताना समितीची कार्यकक्षा निश्चित होणार आहे. चौकशी समितीत समाविष्ठ सदस्यांची शुक्रवारी बैठक होणार असल्याचे वृत्त आहे.

कर्मचारीही धास्तावले

शिक्षणाधिकारी लोहार यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या कार्यकक्षेकडे लक्ष लागून राहिले आहे. लोहारांवर सभागृहात झालेल्या आरोपांच्या अनुषंगाने समिती चौकशी करणार की शिक्षकांकडून जाहीरपणे तक्रारी मागवून चौकशी होणार याची रुपरेषा ठरविली जाणार आहे. सदस्यांनी, लोहार यांच्या कामकाजासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. त्या तक्रारी मागवून चौकशी करावी अशी सदस्यांची मागणी आहे. दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याने अनेकजण धास्तावले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीरबाबा पुण्यतिथी

$
0
0

कोल्हापूर : राजस्थानी राजपूत समाजातर्फे आंबेवाडी येथे श्री १००८ पीरबाबा शांतीनाथजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. दत्त सांस्कृतिक कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने राजस्थानी कलाकारांनी भक्तीमय कार्यक्रमांचे सादरीकरण केले. आंबेवाडी येथे पीरबाबांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 'राजस्थानातील राजपूत समाजामध्ये पीरनाथ यांचा जन्म झाला होता. बालपणातच त्यांनी गुरुदीक्षा घेतली. त्यानंतर वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत नाथ पंथाचा प्रसार केला. या पंथाची सेवा करताना विविध समाजातील नागरिकांना मार्गदर्शन केले.'अशा शब्दांत त्यांच्या कार्याच्या आठवणी राजपूत समाजाने कार्यक्रमप्रसंगी जागविल्या. याप्रसंगी नगरसेवक ईश्वर परमार, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष भरत ओसवाल, उद्योजक जयेश ओसवाल, भगवंतसिंग सुंडावत यांचा सत्कार झाला. राजस्थानातील गायक कलाकार रामेश्वर माळी आणि त्यांच्या पथकाने भक्तीगीते सादर केली. कलाकारांनी राजस्थानी भजन, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. अर्जुनसिंग रजपूत, जब्बरसिंग रजपूत, सालमसिंह रजपूत, मगणजी पुरोहित, हिरालाल लोहार, नारायणसिंग रजपूत, दलपतसिंग रजपूत, मालमसिंग रजपूत, रमेश पुरोहित, गणपतसिंग रजपूत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्ष मीच चेअरमन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले चार वर्षे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार पारदर्शक केला आहे. सर्व संचालकांचा माझ्यावर विश्वास असल्याने पाच वर्ष चेअरमन मीच चेअरमन राहणार आहे,' असे सांगत बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना प्रत्युत्तर दिले. राजर्षी शाहू मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक सभागृहात बँकेच्या ८० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

'गोकुळ'च्या मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यावरून माजी आमदार महादेवराव महाडिक व राष्ट्रवादीचे नेते, बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी आमदार महाडिक यांनी मुश्रीफ हे बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास विसरले आहेत, अशी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी महाडिक यांचे निकटचे सहकारी, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या उपस्थितीतच राजीनामा देणार नसल्याचे सांगत पूर्णविराम दिला.

मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात गेल्या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडला. भाषणाच्या अखेरीस ते म्हणाले, 'गेले दोन ते तीन दिवस जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अल्पमतात जाणार अशी चर्चा सुरू आहे. पण गेली चार वर्षे मी व संचालक मंडळाने पारदर्शी कारभार केला आहे. संचालक मंडळाने बँकेचे कोणतेही वाहन वापरले नाही. भत्ता घेतलेला नाही. अधिकाऱ्यांना डावलून निर्णय घेतलेले नाहीत. हे संचालक मंडळ ज्यावेळी मला 'तुम्ही थांबू नका' म्हणेल त्यावेळी मी राजीनामा देईन.'

बँकेत दरवर्षी अध्यक्षपद बदलले जात नाही याकडे लक्ष वेधत मुश्रीफ म्हणाले, 'माझ्यावर सर्व संचालकांचा विश्वास आहे. मला बदलायचे झाले तर एकतर मी राजीनामा दिला पाहिजे किंवा दोन तृतीयांश संचालकांनी मला बदलण्याची मागणी करावी लागेल. पण, या टर्ममध्ये हे अशक्य आहे. बँकेच्या कठीण काळात राजकारण न आणता सर्व संस्थांनी पाठिंबा द्यावा,' असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान आज सर्वसाधारण सभेला संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक, विनय कोरे, प्रा. संजय मंडलिक अनुपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यामुळे अडले जॅकवेलचे काम

$
0
0

Appasaheb.mali@timesgoup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : सलग चार महिने कोसळणारा पाऊस आणि धरणातील पाणीसाठामुळे कोल्हापूर शहराला थेट पाइपलाइनने पाणी आणण्याच्या योजनेत काळम्मावाडी धरणालगत उभारण्यात येणाऱ्या जॅकवेलचे काम बंद पडले आहे. जॅकवेलचे काम सुरू व्हावे यासाठी महापालिका आणि जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून प्रयत्न सुरू असले तरी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही. धरणातील पाणीपातळी बारा मीटरने कमी झाल्यास जॅकवेल व इन्टकवेलचे काम सुरू होऊ शकते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी जादा विसर्ग करावा असा महापालिकेचा प्रस्ताव आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. थेट पाइपलाइन योजनेत धरणाच्या बाजूला १८ मीटर व्यासाचे दोन जॅकवेल प्रस्तावित आहेत. त्यासाठी ४६ मीटर खोदाई होणार आहे. यापैकी ४३ मीटर खोदाईचे काम पूर्ण झाले होते. खुदाई केलेल्या जागेत धरणातील पाणी पसरू नये म्हणून कॉपर डॅमही बांधण्यात आला आहे. मात्र सलग चार महिने धरणक्षेत्रात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कॉपर डॅम आणि जॅकवेलसाठी खोदाई केलेली जागा पाण्याखाली गेली आहे. परिणामी जॅकवलेचे काम बंद पडले आहे.

काळम्मावाडी धरण २५.३९२ टीमसी क्षमतेचे आहे. सध्या धरणात ९६ टक्के म्हणजेच २४.४४ टीएमसी पाणी आहे. धरणाची पाणीपातळी ६४५.६० मीटर इतकी आहे. जॅकवेल व धरणक्षेत्रातील इन्टकवेलच्या कामासाठी पाणीपातळी ६३४ मीटर असणे अपेक्षित आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने राधानगरीऐवजी काळम्मावाडी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा असा महापालिकेचा प्रस्ताव आहे. कोल्हापूर शहराला राधानगरी आणि काळम्मावाडी या दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा होतो. मात्र राधानगरी धरणातून पिण्याचे आणि सिंचना अशा दोन्ही प्रकारे पाण्याचा मोठा वापर होतो. 'जॅकवेल'च्या कामाला नजीकच्या काळात सुरूवात करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून पाण्याचा जादा विसर्ग आवश्यक आहे.

३८ किलोमीटरची पाइपलाइन पूर्ण

'काळम्मावाडी धरण ते कोल्हापूर अशी जवळपास ५३ किलोमीटर लांबीची पाइपलाइन प्रस्तावित आहे. यापैकी आतापर्यंत ३८ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे' अशी माहिती या प्रकल्पाचे सल्लागार असलेल्या युनिटी कंपनीचे प्रतिनिधी राजेंद्र हासबे यांनी सांगितले. 'सोळांकूर येथे चार किमी आणि धरणपासून सोळांकूरपर्यंतच्या मार्गावरील आठ किलो मीटर पाइपलाइनचे काम अजून अपूर्ण आहे. शिवाय धरणक्षेत्रात इन्टकवेल उभारणी प्रस्तावित आहे. इन्टकवेलचे तीन मीटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अजून सात मीटरचे काम शिल्लक आहे.

कामाला मुदतवाढीचा प्रस्ताव

जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे थेट पाइपलाइन योजनेचे काम आहे. कंपनीने योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१९पर्यंत मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला आहे. मुदतवाढीच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. ऑगस्ट २०१४मध्ये योजनेच्या कामाचे उद्घाटन झाले. कंपनीने २७ महिन्यांत काम पूर्ण करून फेब्रुवारी २०१७ मध्ये योजना महापालिकेकडे हस्तांतरित करायची होती. मुदतीत काम न केल्यामुळे कंपनीवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.

थेट पाइपलाइन योजनेत जॅकवेल उभारणीचे काम महत्वपूर्ण आहे. कामाला लवकर सुरूवात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दूधगंगा डावा कालवा विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंत्यांसोबत काळम्मावाडी धरणातून पाण्याचा जादा विसर्ग करावा यासाठी प्राथमिक चर्चा झाली आहे. महापालिकेच्या स्तरावरुन पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. शिवाय धरण परिसरातील १.३५ हेक्टर जमीन पाइपलाइन योजनेसाठी वार्षिक एक रुपये इतक्या नाममात्र भाड्याने मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. संबंधित विभागानेही तशी शिफारस केली आहे.

- भास्कर कुंभार, उप जल अभियंता महापालिका

(मूळ कॉपी)

'जॅकवेल'साठी"काळम्मावाडी'तून जादा विसर्गचा प्रस्ताव

अधिकारी पातळीवर प्राथमिक चर्चा, महापालिका करणार पाटबंधारेशी रितसर पत्रव्यवहार !

Appasaheb.mali@timesgoup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : सलग चार महिने कोसळणारा पाऊस आणि धरणातील पाणीसाठामुळे जॅकवेल उभारणीचे काम पूर्णत ठप्प आहे. जॅकवेलच्या कामाला नजीकच्या काळात सुरुवात करण्यासाठी महापालिका आणि जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रयत्नशील आहे. मात्र धरणातील पाणीसाठा कमी झाल्याशिवाय जॅकवेलचे काम पूर्ण होवू शकत नाही. काळम्मावाडी धरणातील पाणीसाठी कमी होण्यासाठी पाण्याचा जादा विसर्ग करावा असा महापालिकेचा प्रस्ताव आहे. धरणातील पाणी पातळी बारा मीटरनी कमी झाल्यास जॅकवेल व इनटेक वेलचे काम सुरू होवू शकते.

महापालिका अधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइनने पाणी पुरवठा करण्याची योजना आखली आहे. या योजनेंतर्गत धरणाच्या बाजूला १८ मीटर व्यासाचे दोन जॅकवेल प्रस्तावित आहेत. त्यासाठी ४६ मीटर खुदाई होणार आहे. ४३ मीटर खुदाईचे काम पूर्ण झाले होते. शिवाय धरणातील पाणी खुदाई केलेल्या जागेत पसरू नये म्हणून कॉपर डॅम बांधला. दरम्यान धरणक्षेत्रात सलग चार महिने पाऊस कोसळत राहिला. कॉपर डॅम आणि जॅकवेलसाठी खुदाई केलेली जागा पाण्याखाली आहे. गेली चार महिने जॅकवलेचे काम ठप्प आहे.

काळम्मावाडी धरण हे २५.३९२ टीमसी क्षमतेचे आहे. सध्या धरण ९६ टक्के (२४.४४ टीएमसी) भरले आहे. धरणातील पाणी पातळी ६४५.६० मीटर इतकी आहे. जॅकवेल व धरणक्षेत्रातील इनटेक वेलच्या कामासाठी धरणातील पाणी पातळी ६३४ मीटरपर्यंत कमी होणे गरजेचे आहे. यासाठी राधानगरीऐवजी काळम्मावाडीतील पाण्याचा विसर्ग वाढवावा असा महापालिकेचा प्रस्ताव आहे. कोल्हापूर शहराला राधानगरी आणि काळम्मावाडी धरणातून पाणी पुरवठा होतो. काळम्मावाडीपेक्षा राधानगरी धरणातून पिण्याचे पाणी व सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. 'जॅकवेल'च्या कामाला नजीकच्या काळात सुरुवात करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून पाण्याचा जादा विसर्ग आवश्यक आहे.

.........

थेट पाइपलाइन योजनेत जॅकवेल उभारणीचे काम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्या कामाला लवकर सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दूधगंगा डावा कालवा विभाग कार्यालयाचे कार्यकारी अभियंतासोबत काळम्मावाडी धरणातून पाण्याचा जादा विसर्ग करावा यासाठी प्राथमिक चर्चा झाली आहे. महापालिका स्तरावरुन पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. शिवाय धरण परिसरातील १.३५ हेक्टर जमीन पाइपलाइन योजनेसाठी वार्षक एक रुपये इतक्या नाममात्र भाड्याने मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे.दूधगंगा कालवे विभागानेही तशी शिफारस केली आहे.

भास्कर कुंभार, उप जल अभियंता महापालिका

................

३८ किमी पाइपलाइनचे काम पूर्ण

काळम्मावाडी धरण ते कोल्हापूर अशी जवळपास ५३ किलो मीटर लांबीची पाइपलाइन प्रस्तावित आहे. यापैकी आतापर्यंत ३८ किमी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे अशी माहिती या प्रकल्पाचे सल्लागार असलेल्या युनिटी कंपनीचे प्रतिनिधी राजेंद्र हासबे यांनी सांगितले. सोळांकूर येथे चार किमी आणि धरणपासून सोळांकूरपर्यंतच्या मार्गावरील आठ किलो मीटर पाइपलाइनचे काम अजून अपूर्ण आहे. शिवाय धरणक्षेत्रात इनटेक वेल उभारणी प्रस्तावित आहे. इनटेक वेलचे तीन मीटर बांधकाम पूर्ण झाले आहे. अजून सात मीटरचे काम शिल्लक आहे.

.........................

मुदतवाढीचा प्रस्ताव महापालिकेच्या दरबारी

जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे थेट पाइपलाइन योजनेचे काम आहे. कंपनीने, योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला आहे. मुदतवाढीच्या प्रस्तावावर अद्याप महापालिकेने निर्णय घेतला नाही. ऑगस्ट २०१४ मध्ये योजनेच्या कामाचे उद्घाटन झाले. कंपनीने २७ महिन्यात काम पूर्ण करुन फेब्रुवारी २०१७ मध्ये योजना महापालिकेकडे हस्तांतरित करावयाची होती. मुदतीत काम न केल्यामुळे कंपनीवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images