Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाच सदस्यीय समिती करणार लोहारांची चौकशी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यामिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या प्रशासकीय कामकाजाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी झाला. समितीमध्ये तीन जिल्हा परिषद सदस्य आणि दोन अधिकाऱ्यांचा सामावेश असेल. सत्तारुढ आघाडीतील ज्येष्ठ सदस्य अरूण इंगवले, प्रसाद खोबरे, विरोधी आघाडीतील काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य भगवान पाटील यांचा समितीमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. अध्यक्षा शौमिका महाडिक या सोमवारी समिती सदस्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करतील.

आठवड्यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत लोहार यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांच्यासह अनेकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागातील शिपाई ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी होईपर्यंत लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश अध्यक्ष महाडिक यांनी दिला होता. दरम्यान, केवळ अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत करून लोहार यांच्यासह विभागाची चौकशी करण्याचा डाव प्रशासनाचा होता. यावर अनेक सदस्यांनी आक्षेप घेत तो प्रयत्न हाणून पाडला. समितीत सदस्यांना घेण्यास भाग पाडले. शुक्रवारी दिवसभर समितीत सदस्य कोण असावेत यावर गोपनीय चर्चा झाली. शेवटी पाच जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. काही सदस्य समितीत वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी करत होते. मात्र, अखेरीस ज्येष्ठ सदस्य इंगवले, खोबरे आणि पाटील यांच्या नावावर एकमत झाले. अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. पी. शिवदास, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांचा समितीत समावेश असेल. समितीच्या स्थापनेवर अध्यक्षा महाडिक शिक्कामोर्तब करतील. अधिकृत समिती अस्तित्वात आल्यानंतर नव्याने आलेल्या तक्रारी स्वीकारण्यात येतील. शिवाय स्वतंत्र बैठक झाल्यानंतर चौकशीची कार्यकक्षा निश्चित केली जाईल.

लॉबिंगची चर्चा

जिल्हा परिषदेत दिवसभर चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन समितीमध्ये कोण सदस्य असावेत, हे निश्चित करण्यात आले. तीन सदस्यांच्या नावावर एकमत झाले. त्या तीन सदस्यांसह दोन अधिकाऱ्यांचा समितीत समावेश झाला. मात्र ऐनवेळी समिती फायनल करण्याचा निर्णय लांबणीवर पडला. यामागे गुपीत काय?, चौकशी वस्तूनिष्ठ होऊ नये यासाठी लॉबींग सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लायकरवर सावकारीचा गुन्हा

0
0

इचलकरंजी : कर्जापोटी घेतलेल्या रकमेची व्याजासह परतफेड करूनही पैशाची मागणी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नितीन दिलीप लायकर याच्याविरोधात सावकारी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सूरज संतोष सदलगे (वय १९, रा. पि. बा. पाटील मळा) याने फिर्याद दिली आहे. सूरज सदलगे वाहनचालक असून, त्याच्या आईने घरगुती अडचणीसाठी लायकरकडून सात हजार रुपये १५ टक्के व्याजाने काढले होते. त्यापोटी १२ हजार रुपये दिले आहेत. तरीही लायकर सूरजकडे आणखी पैशाची मागणी करत होता. त्यातूनच सूरजला लायकरने मारहाण करत जीवे मारण्याची धमकही दिली होती. याप्रकरणी लायकरयाला अटक करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीकाठच्या गावांमध्येग्रामसेवकांवर जबाबदारी

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सार्वजनिक गणेशोत्सवादिवशी पंचगंगा नदी प्रदूषण होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. निर्माल्य, गणपती दान करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी काठावरील गावातील ग्रामसेवकांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी काहिली ठेवण्यात येणार आहेत.

घरगुती गणेश विसर्जना दिवशी निर्माल्य, मूर्ती विसर्जनासाठी ४७२ खणींची आणि ७४६ काहिली ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागात सार्वजनिक गणपतीची संख्या कमी असते. त्यामुळे अनंत चतुर्दशी दिवशी ज्या ठिकाणी सावर्जनिक गणेश मूर्तीची संख्या अधिक आहेत, त्याच ठिकाणी काहिली ठेवण्यात येणार आहे. निर्माल्य संकलित करण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे. पंचगंगा नदीत मोठे मूर्ती विसर्जन होऊ नये, यासाठी लोकसहभागातून प्रशासन प्रयत्न करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. एन. डी. पाटील यांचा बुधवारी सत्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे बुधवारी (ता. २६) दुपारी १ वाजता ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती फेडरेशनचे बाबासाहेब पाटील, विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, 'प्रा. पाटील इरिगेशन संस्थेचे नेते आहेत. नव्वदाव्या वर्षात त्यांनी पदार्पण केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, कष्टकऱ्यांची झालेली अनेक आंदोलने यशस्वी झाली आहेत. सामान्यांना न्याय मिळाला. थोर शिक्षण तज्ज्ञ, शेतकऱ्यांचे कैवारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ ग्रामपंचायतींसाठी २६ रोजी मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २६) सकाळी ७ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान तर दुसऱ्या दिवशी गुरूवारी मतमोजणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली. भुदरगड, करवीर तालुक्यातील प्रत्येकी एक, शिरोळ दोन, गडहिंग्लज व कागल तालुक्यातील प्रत्येकी तीन, चंदगडमधील ५ ग्रामपंचायती समावेश आहे. उत्साळी (ता. चंदगड), हणमंतवाडी (ता. गडहिंग्लज) या दोन ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. चंदगड ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवाफसवी करू नका; नाहीतर...!

0
0

सातारा:

'शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. त्यांना भेटण्यात गैर काही नाही. पण त्यांनी फसवाफसवी करू नये. नाहीतर आम्हालाही कळतं काय करायचं ते,' असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी जिल्ह्यात काम करताना ते पक्षाला फारसं जुमानत नाहीत. राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याशीही त्यांचं पटत नाही. ते भाजपच्या वाटेवर असल्याची अफवाही मधल्या काळात उठली होती. त्यामुळंच आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाचं तिकीट देऊ नये, अशी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. या भेटीबद्दल पत्रकारांनी विचारले असता उदयनराजे यांनी स्पष्ट काहीही बोलण्यास नकार दिला.

'शरद पवार हे मोठे नेते आहेत. या वयातही ते आम्हा सर्वांना लाजवील इतकी धावपळ करतात. त्यांच्या भेटीगाठी होत असतात. पण त्यांनी फसवाफसवी करू नये. नाहीतर आम्हालाही कळतं,' असंही उदयनराजे यांनी सांगितलं. आगामी निवडणुकीबाबत निर्णय घेताना राष्ट्रवादीनं आपल्याला गृहित धरू नये, असा इशाराच उदयनराजेंनी दिल्याचं बोललं जातंय.

चुकून पवारांच्या गाडीत

पवारांशी झालेल्या भेटीनंतर उदयनराजे निघत असताना चुकून ते पवारांच्या गाडीत बसायला जात होते. मात्र, ही गाडी आपली नाही. पवार साहेबांची आहे, असं कार्यकर्त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर 'एवढं काय? कलर एकच आहे ना?' अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली. त्यावर कार्यकर्त्यांमध्ये खसखस पिकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीत डीजे लावल्यास कारवाई: नांगरे-पाटील

0
0

कोल्हापूर :

सार्वजनिक विसर्जन मिरवणूकीत उच्च ध्वनियंत्रणेला परवागनी देण्याची मागणी (साउंड सिस्टीम) लोकप्रतिनिधीकडून मागणी सुरु आहे. सातारा येथेही काही जणांनी मागणी केली आहे, मात्र त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन बेस, दोन टॉप आणि मिक्सरलाही परवानगी दिली जाणार नाही. ही सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केल्यास जागेवरच जप्त करुन मंडळावर तत्काळ गु्न्हे दाखल केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साउंड सिस्टीम लावण्याची भूमिका जाहीर केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर काय कारवाई करणार, या प्रश्नावर महानिरीक्षक नांगरे-पाटील म्हणाले, ‘ लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना मांडण्याचे काम करतात. मात्र पोलिसांना कायद्याचे पालन करावे लागतेच. कोल्हापूर परिक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाचे चांगले प्रबोधन केले आहे. सातारा येथेही मंडळाचे प्रबोधन झाले आहे. संवेदनशील असलेल्या मंडळाच्या अध्यक्षांची संवाद आणि समन्वय साधला आहे. सातारा येथेही मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या ठिकाणी मंडळांनी अतिउत्साहीपणा दाखवून सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. पर्यावरण संरक्षण आणि ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची ठाम भूमिका पोलिसांची राहणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसासाठीचा प्रयोग सोलापुरात रद्द

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील १०२४ गावांमधील पावसासाठीचा वादग्रस्त प्रयोग शनिवारी रद्द करण्यात आला. एका मोठ्या खड्ड्यात लाकूड आणि मीठ जाळून धूर करून त्याद्वारे पाऊस पाडण्यासाठी हा प्रयोग करण्यात येणार होता. मात्र, पर्यावरणावर परिणाम होणार असल्याने; तसेच एकूणच प्रयोगाबद्दल शंका असल्याने पर्यावरणवाद्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी हा प्रयोग रद्द केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात केवळ ४० टक्के पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांच्या चाऱ्या सोबत पिण्याच्या पाण्याचीही टंचाई अनेक भागांत भेडसावू लागली आहे. सध्या दुष्काळ जाहीर करायच्या नवीन नियमानुसार सोलापूर जिल्ह्यात 'ट्रिगर एक' लागू झाला आहे. या महिनाअखेरीस अशीच स्थिती राहिली तर दुष्काळ जाहीर करावा लागणार आहे.

यातूनच मार्ग काढण्यासाठी शास्त्रज्ञ श्रीहरी मराठे यांच्या प्रयोगावरून शनिवारी जिल्ह्यातील १०२४ गावांत प्रत्येक ठिकाणी खड्डा खणून त्यात दोनशे किलो लाकूड व ५० किलो मीठ जाळायचा प्रयोग केला जाणार होता. यात काही ठिकाणी टायरही जाळले जाणार असल्याची माहिती बाहेर आल्यावर पर्यावरणवाद्यांनी जिल्हा प्रशासनावर टीका केली होती. एका बाजूला प्रदूषण थांबवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असताना टायर आणि लाकडे जाळण्यावरून टीका सुरू होताच प्रशासनाने तातडीने आपल्या निर्णयावर 'यू-टर्न' घेत हा निर्णय रद्द केला. या प्रयोगासाठी जिल्ह्यातील गावोगावी मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र, अचानक प्रयोग रद्द केल्याचा निरोप आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली. सध्याच्या टंचाई परिस्थितीमुळे 'काहीही करा; पण पाऊस पडू द्या,' अशा मानसिकतेत शेतकरी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मल्टिस्टेट’मध्ये पक्षांचा तोटा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यावरून सत्ताधारी व विरोधकांत संघर्ष सुरू झाला आहे. सहकारातील या संघर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेतील अंतर्गत वादाला उकळी येत आहे. यामुळे त्याचा फटका या पक्षांना बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याचे पडसाद आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत.

गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा ठराव येत्या ३० सप्टेंबरला होणाऱ्या संघाच्या सभेत करण्यात येणार आहे. पण त्याला गेल्या काही दिवसांपासून विरोध सुरू झाला आहे. ठराव करणारे आणि त्याला विरोध करणारे नेते एकाच पक्षातील आहेत. एकीकडे लोकसभा व विधानसभेला हातात हात घालून काम करण्याची शपथ घेताना दुसरीकडे मात्र मल्टिस्टेट प्रकरणातून त्यांच्यातील संघर्ष चांगलाच वाढला आहे. यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

मल्टिस्टेटवरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. आमदार सतेज पाटील मल्टिस्टेटला विरोध करण्यासाठी आपली ताकद वापरत आहेत, तर हा ठराव मंजूर करण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील सक्रिय झाले आहेत. या दोघांतील संघर्षाला हा नवीन विषय मिळाला आहे. जिल्हाध्यक्षपदावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता; पण आता नवीन विषयावरून टोकाचा वाद होत असल्याने पक्षाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण भरमू सुबराव पाटील, कर्णसिंह गायकवाड यांच्यासह पक्षातीलच काही नेत्यांची भूमिका उलटसुलट आहे.

काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत. खासदार धनंजय महाडिक ठराव मंजूर करण्यासाठी उघडपणे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सारी सूत्रे त्यांनी आपल्याकडे घेतली आहेत; पण हा ठराव करू नये यासाठी आमदार हसन मुश्रीफ हे आमदार सतेज पाटील यांना ताकद देत आहेत. याशिवाय माजी आमदार के. पी. पाटीलही त्यांच्यासोबत आहेत. महाडिक व मुश्रीफ यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी गेले पाच-सहा महिने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीदेखील कोल्हापूर दौऱ्यात दोघांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात येत असतानाच मल्टिस्टेटचा मुद्दा पेटला आहे. त्यामुळे दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले आहेत.

दोन्ही काँग्रेसप्रमाणे शिवसेनेतही यानिमित्ताने दुहीचे वारे वाहत आहेत. कारण या ठरावाला सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर यांच्यासह अनेकांनी विरोध सुरू केला आहे. मात्र, माजी आमदार संजय घाटगे पुत्र अंबरीश घाटगे संघाचे संचालक असल्याने त्यांचा मल्टिस्टेटला विरोध नाही. आमदार सत्यजित पाटीलही ठराव मंजूर होण्यासाठी संचालकांना मदत करत आहेत. कारण त्यांच्या आई अनुराधा पाटील संचालक आहेत. यामुळे या ठरावावरून सेनेत दोन गट पडले आहेत.

०००००

राजकारणातील 'खो'साठी...

मल्टिस्टेटच्या ठरावाने सहकारावर जसे परिणाम होणार आहेत, तसे राजकीय पडसाददेखील उमटणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे पडसाद उमटतील. कारण संघाचे नेतृत्व माजी आमदार महादेवराव महाडिक करत असले तरी त्याचे फायदे घेणारे नेते अनेक आहेत. गोकुळचे संचालकपद हे त्यांचे बळ आहे. ते त्यांना मिळू नये म्हणून विरोधकांचा आटापिटा सुरू आहे. म्हणूनच तर हा विरोध केवळ ठरावापुरताच नाही तर आगामी राजकारणाचे गणित जमू नये यासाठी चाललेली धडपड आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागणपतीचे सोमवारी विसर्जन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी चौकातील एकवीस फुटी गणेशमूर्तीचे सोमवारी (ता.२४ ) रोजी दुपारी तीन वाजता विसर्जन करण्यात येणार आहे. दुपारी महाआरती झाल्यानंतर शिवाजी चौकातून मिरवणूक सुरू होईल. यावेळी शाहू गर्जना ढोल ताशा पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहे. पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा बसस्थानक मार्गे ही मिरवणूक इराणी खणीपर्यंत जाणार आहे. भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन माजी महापौर नंदकुमार वळंजू, गणेश उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रसाद वळंजू व सुहास भेंडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिस्टेट झाल्यावर हुकूमशाही वाढणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'माजी आमदार महादेवराव महाडिक ठराव वाचतात आणि अध्यक्ष विश्वास पाटील प्रोसिडिंगमध्ये आपण ठराव वाचला, असे छाती ठोकून खोटे सांगतात. सहकार कायद्याचे नियंत्रण असूनही गोकुळमध्ये हुकूमशाही कारभार गतवेळच्या सभेत सर्व सभासदांनी पाहिला होता. मल्टिस्टेट झाल्यावर हुकूमशाही आणखी वाढणार आहे,' असा आरोप माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. खासगीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी पक्षीय व राजकीय अभिनिवेश न आणता मल्टिस्टेटच्या ठरावाला विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पवार-पाटील म्हणाले, 'गोकुळमध्ये दूध वाढविण्यासाठी नव्हे तर सभासद वाढवून कब्जा मिळवण्यासाठी मल्टिस्टेटचा खटाटोप केला जात आहे. गॅट करारामुळे बाहेरील देशाबरोबर कोणत्याही राज्यातून मालाची खरेदी विक्री करण्याचे अधिकार मिळाले आहेत. अन्य राज्यांतूनही गोकुळला दूध खरेदी करता येते, पण दूध संकलन करण्यासाठी मल्टिस्टेट करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा व चुकीचा आहे.'

ते पुढे म्हणाले, 'मल्टिस्टेटमधील पोटनियम १० हा जिल्ह्यातील दूध संस्था, उत्पादकांवर घाला घालणारा ठरणार आहे. १० (अ) नुसार डेअरी सहकारी संस्था, डेअरी उद्योगामध्ये कार्यरत राहणारी संस्था सभासद होऊ शकतात. पण १० (१) अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह यामध्ये कोणाताही करार केलेली सक्षम असलेली व्यक्ती, कोणतेही कॉर्पोरेशन, सरकारी कंपनी, व्यक्ती संस्थांना सभासद करून घेण्याची तरतूद आहे. या तरतुदीचा आधार घेऊन सभासद वाढविले जाऊ शकतात.

पोटनियम ३२ मध्ये क्रियाशील सभासदांमधून २१ संचालकांची निवड करण्याची तरतूद आहे. संचालक मंडळ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करणार आहेत. सर्व क्रियाशील सभासदांमधून १६ संचालकांची निवड करण्याची तरतूद आहे. तर अन्य पाच संचालक व्यक्ती सभासद, कॉर्पोरेशन संस्था, कंपनी अॅक्टन्वये नोंदविलेली संस्था, व्यक्तींच्या संस्थेतून निवडण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात व्यक्ती सभासदांच्या ताब्यात गोकुळ जाण्याची भीती आहे. तसेच आमसभेत संचालक मंडळ निवडून आणण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असून, निवडून आलेल्या संचालकांची निवड घोषणा करावी लागणार आहे.'

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकापचे अधिवेशन मंगळवारी

0
0

कोल्हापूर : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा अधिवेशन मंगळवारी (ता. २५) पुईखडी येथील संकल्प सिद्धी कार्यालयात होणार आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार असून महत्वपूर्ण निर्णय अधिवेशनात घेण्यात येणार आहे. राज्य सहचिटणीस प्रवीण गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसासाठीचा प्रयोग सोलापुरात रद्द

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील १०२४ गावांमधील पावसासाठीचा वादग्रस्त प्रयोग शनिवारी रद्द करण्यात आला. एका मोठ्या खड्ड्यात लाकूड आणि मीठ जाळून धूर करून त्याद्वारे पाऊस पाडण्यासाठी हा प्रयोग करण्यात येणार होता. मात्र, पर्यावरणावर परिणाम होणार असल्याने; तसेच एकूणच प्रयोगाबद्दल शंका असल्याने पर्यावरणवाद्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी हा प्रयोग रद्द केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात केवळ ४० टक्के पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांच्या चाऱ्या सोबत पिण्याच्या पाण्याचीही टंचाई अनेक भागांत भेडसावू लागली आहे. सध्या दुष्काळ जाहीर करायच्या नवीन नियमानुसार सोलापूर जिल्ह्यात 'ट्रिगर एक' लागू झाला आहे. या महिनाअखेरीस अशीच स्थिती राहिली तर दुष्काळ जाहीर करावा लागणार आहे.

यातूनच मार्ग काढण्यासाठी शास्त्रज्ञ श्रीहरी मराठे यांच्या प्रयोगावरून शनिवारी जिल्ह्यातील १०२४ गावांत प्रत्येक ठिकाणी खड्डा खणून त्यात दोनशे किलो लाकूड व ५० किलो मीठ जाळायचा प्रयोग केला जाणार होता. यात काही ठिकाणी टायरही जाळले जाणार असल्याची माहिती बाहेर आल्यावर पर्यावरणवाद्यांनी जिल्हा प्रशासनावर टीका केली होती. एका बाजूला प्रदूषण थांबवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असताना टायर आणि लाकडे जाळण्यावरून टीका सुरू होताच प्रशासनाने तातडीने आपल्या निर्णयावर 'यू-टर्न' घेत हा निर्णय रद्द केला. या प्रयोगासाठी जिल्ह्यातील गावोगावी मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र, अचानक प्रयोग रद्द केल्याचा निरोप आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली. सध्याच्या टंचाई परिस्थितीमुळे 'काहीही करा; पण पाऊस पडू द्या,' अशा मानसिकतेत शेतकरी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारभाव.....

0
0

धान्य, कडधान्याचे दर स्थिर

गणेशोत्सव काळात गहू, गूळ, आट्याला मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवातील मोठ्या उलाढालीनंतर किराणा बाजारपेठेत शांतता असून धान्य, कडधान्याचे दर स्थिर आहेत. नवरात्रोत्सवावेळी पुन्हा बाजारपेठेत तेजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गौरी गणपतीला धान्य, कडधान्याची मोठी खरेदी झाली. गहू, आटा, रव्याला मोठी मागणी होती. गुळाचीही चांगली विक्री झाल्याचे अनेक दुकानदारांनी सांगितले. सध्या सार्वजनिक गणेशोत्सव टिपेला पोहोचला असून, पुढील आठवड्यात पितृ पंधरवड्याला प्रारंभ होणार आहे. पितृ पंधरवड्यात रवा, आटा, हरभरा डाळ, तांदळाला मोठी मागणी वाढणार आहे. तसेच बाजारात नवीन धान्ये येण्याची शक्यता असल्याने दर स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आठवड्यात ज्वारी, गहू, साखर, पोहे यांचे दर कायम राहिले. बाजारात नवीन शेंगदाण्याची आवक झाली नसल्याने शेंगदाण्याचे दरही स्थिर राहिले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

किराणा प्रतिकलो दर (रु.)

पोहे ५०

साखर ३६ ते ३८

शेंगदाणा ९० ते १००

मैदा ३०

आटा ३०

रवा ३२

गूळ ५० ते ५५

साबुदाणा ६४

००००

डाळीचे प्रतिकिलो दर (रु.)

तूरडाळ ६४ ते ७२

मूगडाळ ८०

उडीद डाळ ६० ते ६४

हरभरा डाळ ६० ते ६४

मसूर डाळ ६०

मसूर ७० ते १३०

चवळी ८० ते १००

हिरवा वाटाणा ८०

काळा वाटाणा ६४

पांढरा वाटाणा ४४

मटकी ७० ते १००

छोले ८० ते १००

पावटा १००

००००

बार्शी शाळू ३२ ते ४० (किलो रु.)

गहू २८ ते ३४

ज्वारी नं.१ २२ ते २४

ज्वारी नं.२ १८ ते २५

बाजरी २४

नाचणी ३६ ते ४०

००००

तेलाचे दर (किलो रु.)

शेंगतेल १२५

सरकी तेल ९०

खोबरेल २४०

सूर्यफूल ९५ ते १०५

०००

मसाले दर (किलोमध्ये रु.)

तीळ १४० ते १५०

जिरे २६० ते २८०

खसखस ७०० ते ८००

खोबरे २००

वेलदोडे १७०० ते २०००

००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौगुले दाम्पत्याचे नांदणी कनेक्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

सांगली येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमधील चौगुले डॉक्टर दाम्पत्याचे शिरोळ तालुक्यात कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले. नांदणी येथे हे दाम्पत्य सात वर्षे सेवेत होते. बेकायदा गर्भपातप्रकरणी सांगली पोलिसांनी गुरुवारी नांदणी व जांभळी येथे छापे टाकले. गर्भपात करून भ्रूण दफन केल्याची माहिती मिळाल्याने भ्रूण दफन केलेल्या ठिकाणी पथकाने खुदाई केली. येथे भ्रूणांचे अवशेष सापडल्याचे समजते.

सांगली येथे गेल्या आठवड्यात गर्भपात व भ्रूणहत्येचे प्रकरण उघडकीस आले होते. यात सांगली पोलिसांनी डॉ. रूपाली चौगुले, तिचा पती डॉ. विजयकुमार या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील काही डॉक्टर व त्यांच्या रुग्णालयातील कर्मचारी सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. यामुळे चौगुले दाम्पत्य यापूर्वी काम करीत असलेले नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि परिसरातील गावात कुठे ना कुठे बेकायदा गर्भपात प्रकरणाचे कनेक्शन मिळून येण्याची शक्यता होती. या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी सांगली पोलिसांच्या पथकाने जांभळी व नांदणी येथे गुरुवारी छापे टाकले.

नांदणी येथे भ्रूण दफन केलेल्या ठिकाणी पथकाने खोदकाम करून भ्रूणांच्या अवशेषांचा शोध घेतला. नांदणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन संशयित आरोपी डॉ. रूपाली चौगुले व डॉ. विजयकुमार चौगुले या दाम्पत्याची माहिती घेतली. हे दाम्पत्य येथे सन २००८ पासून पुढे कमीत कमी सात वर्षे कार्यरत होते. संशयितांचे नांदणी तसेच परिसरातील अन्य कोणाशी संबंध होते, याची माहितीही पथकाने घेतली. सांगली पोलिसांनी छाप्यावेळी अत्यंत गोपनियता ठेवली होती. यामुळे स्थानिक शिरोळ पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. पथकास जांभळी येथे एक आणि नांदणीत दोन असे तीन संशयित हाती लागल्याचे समजते. पोलिसांनी गोपनियता ठेवल्याने संशयितांची नावे समजू शकली नाहीत.

दरम्यान, नांदणी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पोलिसांनी डॉ. चौगुले दाम्पत्याविषयी चौकशी केल्याचे सांगितले. परंतु त्यांनी नांदणीत भ्रूण दफन केलेल्या ठिकाणी खोदकाम केल्याची माहिती नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुले झाली कवडीमोल

0
0

प्रतिकिलो दोन ते दहा रुपये दर; कचऱ्यात फेकली फुले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलांचे दर १०० रुपयांवरून दोन ते दहा रुपयांपर्यंत घसरल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फुलाची विक्री न करता फुले बाजारात टाकून जाणे पसंत केले. कवडीमोल दर आणि विक्री न झाल्याने काही शेतकऱ्यांनी फुले कचरा कोंडाळ्यात फेकून दिली.

गणेशोत्सवामुळे गेल्या आठवड्यात फुलाला चांगला दर होता. झेंडूचा दर प्रतिकिलो ६० ते १०० रुपये, गलाट्याचा दर ६० ते ८० रुपये होता. निशिगंधाचा ३०० ते ४०० रुपये इतका होता. जास्वंदीचे फुल प्रतिनग चार रुपयांना तर मोगऱ्याचा गजरा प्रतिनग ५० रुपयांला विकला गेला. जरबेरा, गुलाब, डेलिया फुलांची प्रतिनग किंमत १० रुपये होती. फुलांचे दर भडकले असले तरी भाविक व ग्राहकांनी मोठ्या संख्येने फुले खरेदी केली. पण घरगुती गौरी गणपती विसर्जनानंतर फुलांची मागणी कमी झाल्याने फुलाचे दरही खाली येऊ लागले.

कोल्हापुरातील फुले मुंबई व पुण्यात मोठ्या प्रमाणात पाठवली जातात. गेले दोन दिवस मुंबईत जोरदार पाऊस झाला. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने फुले भिजली आहेत. ती मुंबई व पुण्यापर्यंत जाईपर्यंत कुजण्याची भीती असल्याने विक्रेत्यांनी स्थानिक बाजारपेठेत विक्रीचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी मंगळवार पेठ येथील शिंगोशी मार्केट येथे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुले विक्रीस आणली.

शहरात ५०० ते १००० किलो फुलांची गरज असते. पण अंदाजे पाच हजार किलो फुलांची आवक झाल्याने दर कोसळले. झेंडू फुलांचा दर प्रतिकिलो ८० ते १०० रुपयावरुन पाच ते सात रुपयापर्यंत गलाटा फुलांचा दर ८० ते १०० रुपयांवरुन दोन ते पाच रुपयावर आला. निशिगंध फुलांचा दर ४०० रुपयावरुन १० ते २० रुपयापर्यंत कोसळला. गुलाब, जरबेरा ही फुले गेल्या आठवड्यात आठ ते दहा रुपयाला विकली गेली. आज या फुलांचा दर प्रतिनग दोन ते तीन रुपये इतका घसरला. बाजारात मिळालेला दर कमी असूनही अनेक शेतकऱ्यांनी फुले विकून गेले. तर काही शेतकऱ्यांची फुले विक्री न झाल्याने कोंडाळ्यात टाकून दिली.

हार व बुके तयार करणाऱ्यांनी फुलांची खरेदी केली असली तरी फुले जास्त दिवस टिकत नसल्याने गरजेपुरती फुले खरेदी केली. तसेच गणेश उत्सव अंतिम टप्प्यात पोचल्याने हार व फुलांनाही मागणी कमी झाली आहे. मंगळवारपासून पितृ पंधरवडा असल्याने फुलांची मागणीही कमी होणार आहे.

अशोक जरग, हार विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूलमंत्र्याच्या बॉडीगार्डकडून महापौरांना धक्काबुक्की

0
0

कोल्हापूर:

कोल्हापुरात मानाच्या गणपतीचं पूजन झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीवेळी महापौर शोभा बेंद्रे यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलीस आणि बॉडीगार्डनी धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेवर स्वत: महापौरांनी संताप व्यक्त केला असून या प्रकारामुळे विसर्जन मिरवणुकीवेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आज सकाळी कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीचं चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यावेळी महापौर शोभा बेंद्रेही उपस्थित होत्या. त्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरू झाली असता बेंद्रे यांना पाटील यांच्या बॉडीगार्ड आणि पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने सर्वच जण अवाक् झाले. बेंद्रे यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्यानं या घटनेचा निषेध करते, असं बेंद्रे म्हणाल्या. या पुढे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायचं की नाही हे ठरवावं लागेल, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, या मानाच्या गणपतीची वाजत गाजत आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. स्वत: चंद्रकांत पाटील यांनी ढोल वाजवला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजऱ्यात नो डिजे

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

अनंतचतुर्दशीच्या निमित्ताने तालुक्यातील सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन शासनाच्या 'नो डिजे'चा आदेश पाळून अत्यंत शांततेत करण्यात आले. पारंपरिक वाद्ये आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या संगतीने मध्यरात्रीच्या सुमारास सर्व मूर्ती विसर्जित झाल्या.

येथील सर्व मंडळांनी प्रशासनाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला. ध्वनी तीव्रता कमी असणारी धनगरी ढोल, ताशा, बेंजो, ऑर्केस्ट्रा याचा वापर करण्यात आला. त्यामुळे ध्वनी प्रदूषणामधून सुटका झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. आजरा शहरातील शतकी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती मिरवणूक पारंपरिक पालखीतून काढण्यात आली आणि सायंकाळी सहाच्या सुमारास विसर्जन पार पडले. त्यानंतर येथील शिवसरणाप्रणित, वाणी गल्ली, सुभाष चौक, भाजी मंडई, गांधीनगर, वीज मंडळ आणि एसटी महामंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन हिरण्यकेशी नदीघाटावर करण्यात आले. यानिमित्ताने विसर्जन मिरवणुकीतील रंगारंग कार्यक्रमांचा आस्वाद उपस्थित भाविकांनी घेतला. पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीरमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

आठवडाभर गणरायाच्या पूजाअर्चा व भक्तीत दंग असलेल्या गणेशभक्तांनी वाजतगाजत, ढोल ताशांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात करवीर तालुक्यात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.

तालुक्यातील अनेक गावातील सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन घरगुती गणेश विसर्जनदिवशी झाले होते. तर अनेक गावात अनंत चतुर्दशी सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्याकरीता सार्वजनिक गणेश मंडळाकडून सकाळपासूनच मिरवणुकीची तयारी सुरू केली होती. ट्रॅक्टरच्या सजावटीच्या कामात सर्व कार्यकर्ते आपापल्यापरीने सहभाग घेत होते. ग्रामीण भागात सायंकाळी चार - पाचनंतर सार्वजनिक मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. यावर्षी सर्वांनीच डीजेला फाटा दिल्यामुळे लेझीम, झांजपथक , धनगरी ढोल ताशे , नाशिक ढोल आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका पार पडल्या. मिरवणुकीत अनेक मंडळांकडून सामाजिक विषयाला धरून अनेक विधायक उपक्रमांचा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न केला. करवीर तालुक्यात 'एक गाव एक गणपती' असणाऱ्या गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सारा गाव लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी एकवटलेला पहायला मिळत होता. रात्री उशीरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनाळीत स्वाइन फ्लूचा रुग्ण

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

सोनाळी (ता. कागल) येथील शंकर भाऊ चौगले (वय ४८) यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी याच गावात स्क्रब टायफसचा रुग्ण सापडला होता. त्यापाठोपाठ गावातील व्यक्तीला स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याने खळबळ माजली आहे. आरोग्य विभागाने तपासणीस सुरुवात केली आहे.

शंकर चौगले यांना ताप व सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी गावातील खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले. मात्र सर्दी, खोकला, ताप आटोक्यात येत नव्हता. न्यूमोनिया झाल्याची शंका आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणीमध्ये त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना सरस्वती अॅपल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. दरम्यान, गावात स्क्रब टायफसचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी घरोघरी जावून या रोगाबाबात काळजी घेण्याचे आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्यात एकाच गावात दोन रुग्ण सापडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील डॉक्टरांनाही संशयित रुग्ण आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुक्यातील इतर ठिकाणीही बरा न होणारा खोकला, सर्दी, ताप असे रुग्ण आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. स्क्रब टायफस व स्वाइन फ्ल्यू या दोन जिवघेण्या रोगांचे रुग्ण आढळून आल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील आदर्श मंडळाने परिसरात औषध फवारणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images