Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गोकुळ मल्टिस्टेला विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यातील सभासदांच्या बुधवारी झालेल्या गोकुळ संपर्क सभेत आमदार सतेज पाटील गटाच्या समर्थक सभासदांनी मल्टिस्टेटला जोरदार विरोध केला. सभेत विरोधी सभासदांनी कामकाजावर अनेक आक्षेप नोंदविले. गावापासून संघापर्यंतच्या वाहतुकीवेळी दुधाची चोरी होत असल्याचे प्रकार काही सभासदांनी निदर्शनास आणून दिले. प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी उत्तरे दिली. ताराबाई पार्क कार्यालय परिसरात सभा झाली.

संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविकात संपर्क सभेचा हेतू स्पष्ट केला. अध्यक्ष पाटील म्हणाले, 'गोकुळची कामगिरी देशात उल्लेखनीय सुरू आहे. वर्षभरात संघाची २१ हजार कोटींची उलाढाल झाली. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीपेक्षा अधिक म्हणजे ८२ टक्के उत्पन्नाचा वाटा संघ उत्पादकांना देतो. उर्वरित वाट्यातून संघाच्या व्यवस्थापनाचा खर्च केला जातो. सरकारच्या आदेशानुसार गायीच्या दुधास पाच रुपये अनुदान दिले जात आहे. ते सरकारकडून मिळेल याबाबत संभ्रम आहे. तरीही उत्पादकांच्या हितासाठी संघ गायीच्या दुधास सर्वाधिक दर देतो. '

शेकापचे बाबासाहेब देवकर म्हणाले, 'पशुखाद्यासाठी लागणारा कच्चा माल परराज्य, जिल्ह्यातून किती आणला जातो, त्याची सविस्तर माहिती अहवालात नाही. ती मिळावी. ग्राहकांना ५६ रुपये प्रतिलिटर दराने दुधाची विक्री होते. याउलट उत्पादकांना सरासरी ३२ ते ३७ रुपये दर मिळतो. म्हणून गोकुळची ध्येयधोरणे उत्पादकांच्या फायद्यासाठी नाहीत.'

सभासद प्रवीण पाटील म्हणाले, 'दुधाचे संकलन वाढल्यानंतर प्रक्रियेवरील खर्च कमी होणे आवश्यक आहेत. मात्र, तसे झालेले नाही. यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा गोकुळचा नफा कमी झाला. संघाने व्यवस्थापन, प्रक्रियेवरील खर्च कमी करून उत्पादकांना चांगला भाव द्यावा.' सभासद शिवाजी हंडे म्हणाले, 'वाहतुकीवेळी दुधाची चोरी होते. त्याचा संस्थेस तोटा सहन करावा लागत आहे.' पांडुरंग पाटील यांनी बल्क कुलर बसविलेल्या संस्थेच्या उत्पादकांना एक रुपये अधिकचा भाव द्यावा, अशी मागणी केली.

घाणेकर यांनी संघाच्या कामकाजाबद्दल उपस्थित प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले, 'संघाचे कामकाज उत्कृष्टपणे सुरू आहे. गाय दूध दर फरकासंबंधी अजूनही निर्णय झाला नाही. आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर यासंबंधीची अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाईल.' यावेळी सर्वाधिक दूधपुरवठा करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला. सभेस सर्व संचालक, अधिकारी, सभासद उपस्थित होते.

००००

'गोकुळ'चे दूध आवडते

आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत हिचा सत्कार अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना तिने गोकुळचे दूध मला फार आवडते, असे सांगितले. त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

०००

गेल्यावेळसारखं करू नका

गेल्यावर्षी गोकुळची सभा दहा मिनिटांत गुंडाळली. हा संदर्भ घेत एकनाथ पाटील यांनी, गेल्या वर्षासारखी सभा होऊ नये, त्याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी अध्यक्ष पाटील यांच्याकडे केली.

०००

सभेची जागा बदला

गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयाशेजारी २१ सप्टेंबरला सर्वसाधारण सभा होणार आहे. ही जागा जिल्ह्यातील सभासदांसाठी अपुरी पडणार आहे. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्व सभासदांची बैठक व्यवस्था होण्यासाठी सभेचे ठिकाण बदलावे, अशी मागणी बाबासाहेब देवकर, राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार, संचालक किशोर पाटील, बाबासाहेब चौगले, किरणसिंह पाटील, एकनाथ पाटील, विजय पाटील, युवराज गवळी, आदींनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झाड अंगावर पडून मैल मजुराचा मृत्यू

0
0

सिंगल फोटो...

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील करूंगळे फाट्यानजीक वाळलेले धोकादायक झाड तोडताना झाडाची फांदी अंगावर पडल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी ईस्माईल महंमद कळेकर (वय ५९) यांचा जागीच मुत्यू झाला. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

याबाबत माहिती अशी : ईस्माईल कळेकर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मैलमजूर म्हणून गेली ३५ वर्षे काम करीत होते. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार बुधवारी कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील सुकलेली धोकादायक झाडे तोडण्याचे काम सुरू होते. यामध्ये कळेकर यांच्यासह केशव मोरे, साधू पाटील, आनंदा सपकाळ करूंगळे फाट्यालगत सुकलेले धोकादायक झाड तोडत होते. यावेळी झाडाच्या फांद्या तोडून झाल्यानतंर उर्वरित झाडाचा बुंधा कटरच्या साहाय्याने तोडण्याचे काम सुरू होते. याचवेळी झाड कोसळण्याची चाहूल झाल्यावर सर्वजण सुरक्षेसाठी बाजूला पळत असताना कळेकर यांच्या अंगावर झाडाची फांदी पडली. यात त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने ते जागीच ठार झाले. त्यांना तातडीने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण तत्पूर्वीच ते मृत झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थाळाला भेट देवून पाहणी केली. मृतदेहाचे शवविच्छेदन करून रात्री उशीरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, चार भाऊ असा परिवार आहे. माजी नगरसेवक शौकत केळकर यांचे ते वडील बंधू होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांकडून अंजनाबाईंच्या आरोग्यसेवेचे कौतुक

0
0

पंतप्रधानांकडून अंजनाबाईंच्या आरोग्यसेवेचे कौतुक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

'हर घर पोषण आहार, त्योहार' कार्यक्रमाअंतर्गत देशभरातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि आरोग्यसेविका यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यसेविका अंजना परमार यांच्या कामाचे कौतुक केले.

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यसेविकांशी संवाद साधताना मोदी यांनी मराठीतून 'आपण कसे आहात आणि गणपती उत्सवाची तयारी कशी सुरू आहे' अशी विचारणा केली. नंदुरबार येथील प्रसिद्ध चौधरींचा चहा घेण्यासाठी आपण नंदुरबार यायचो, याचा उल्लेख करीत त्यांनी नंदुरबारमधील आठवणींना उजाळा दिला. यावेळी आरोग्य सेविका अंजना परमार यांनी जिल्ह्याच्या पहाडी भागात पावसाळ्याच्या काळात आरोग्यसेवा पुरविताना अडचणी निर्माण हेातात, असे सांगितले. जून ते ऑक्टोबर या काळात सरदार सरोवर परिसरातील ३३ गावांसह ६५ पाड्यांवर राहणाऱ्या सोळा हजार लोकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न केला जात असल्याचे परमार म्हणाल्या. दररोज दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.

असा आहे तरंगता दवाखाना

सरदार सरोवरच्या परिसरातील ३३ गावे व ६५ पाड्यांसाठी आरोग्य विभागातर्फे तीन बोटींवरील तरंगते दवाखाने उपलब्ध करून दिले जातात. एका बोटीकडे १० गावांची जबाबदारी असते. या सरोवरालगतच्या गावांमध्ये जाऊन नागरिकांना आरोग्यसेवा पुरवितात. गेल्या पाच महिन्यांत तरंगत्या दवाखान्यांच्या माध्यमातून ६१० लहान मुले, १३ हजार ३८३ बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन खरेदी-विक्रीस चेंबर ऑफ कॉमर्सचा विरोध

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वॉलमार्ट-फ्लिपकार्ट या ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांविरोधात कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या दिल्लीतील संघटनेने २८ सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने पाठिंबा देण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत घेतला. बंदचे नियोजन करण्यासाठी २० सप्टेंबरला बैठकीचे आयोजन केले आहे.

वॉलमार्ट-फ्लिपकार्ट या ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनीमुळे देशातील किरकोळ व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे. दैनंदिन वापराच्या वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, किराणा माल याच्या किरकोळ विक्रीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. मोठ्या कंपन्यांमुळे लहान व्यापारी, विक्रेते, दुकानातील कामगारांवर परिणाम होणार आहे. अनेक कामगारांचा रोजगार जाण्याचा धोका आहे. यामुळे ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना व्यापारी, विक्रेत्यांकडून विरोध केला जात आहे. दिल्ली येथील कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संस्थेने २८ सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला कोल्हापूर जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने मंगळवारच्या बैठकीत पाठिंबा दिला. बंदचे नियोजन करण्यासाठी २० सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. बैठकीसाठी कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी, संघटन मंत्री धैर्यशील पाटील, चेंबरचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवाजीराव पोवार, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोघे जखमी

0
0

कोल्हापूर

फुलेवाडी रिंगरोड येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आवाजाने नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमळवाड येथे वृद्धाची आत्महत्या

0
0

जयसिंगपूर : उमळवाड (ता. शिरोळ) येथे वृद्धाने आजारास कंटाळून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोजारसाब गौसपिर जहाँगीरदार (वय ७०) असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, उमळवाड येथील माळभागात जहाँगीरदार कुटुंबिय राहते. गुरुवारी पहाटे मोजारसाब यांनी आजाराने त्रस्त असल्याने नैराश्येतून घरातील छताच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची वर्दी त्यांचा मुलगा जावेद जहाँगीरदार यांनी जयसिंगपूर पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. याबाबत हवालदार विजय मुंदाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांबवडेत एकाची आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे गणपतराव शंकर पाटील (वय ४५, रा. हारुगडेवाडी, ता. शाहूवाडी) या इसमाने विष पिवून आत्महत्या केली. बांबवडे पोलिस दुरक्षेत्रात घटनेची नोंद झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, बांबवडे येथे गुरुवारी आठवडा बजारादिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास सरुड फाट्यानजीक रस्ते वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना रस्त्याकडेला अज्ञात इसमाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला होता. मृतदेह शेजारी पडलेली विषाची बाटली व मृतदेहाच्या तोंडावाटे बाहेर पडलेल्या फेसावरून या अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृतदेह बांबवडे आरोग्य केंद्रात पाठवून दिला. त्यानंतर या अनोळखी मृत इसमाची ओळख पाठविण्यात तासाभरातच पोलिसांना यश आले. हारुगडेवाडी (ता. शाहूवाडी) येथील रहिवासी गणपतराव पाटील यांचा हा मृतदेह असल्याचे पोलिसांना समजले. त्यांच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले असून दोन मुलींचे लग्न झाले आहे. मुलगा महावितरण कंपनीत लाइनमन आहे. गावातील घरही पडले असल्यामुळे ते मिळेल तिथे काम करून दिवसाची गुजराण करीत होते अशी माहिती तपासात पोलिसांना मिळाली. याच वैफल्यग्रस्त स्थितीत पाटील यांनी बांबवडेत आत्महत्या केल्याचे आढळून आले. पोलिसांनी उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरपणला पर्यावरणपूरक गणेशोत्सव

0
0

तिरपणला यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव

नवयुग तालीम मंडळाला गेल्यावर्षीचा गणराया अवार्ड

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

गावात कोणताही छोटा-मोठा कार्यक्रम किंवा उत्सव असला की त्याठिकाणी दणदणाट असतोच. उच्च ध्वनीयंत्रणा लावताना आवाजाची मर्यादा राखली जात नाही. त्यामुळे आजारी वृद्ध माणसे, रुग्णांना त्रास होतो. लहान मुले व मोठ्यानाही कानाचे दोष निर्माण होतात. तसेच कार्यक्रमांतील प्लास्टिक वस्तूंमुळे पर्यावरणाची हानी होते. या बाबींचा विचार करून तिरपण (ता. पन्हाळा) येथील सर्व तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, तरुणांनी यंदा उच्च ध्वनीयंत्रणामुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. विसर्जन मिरवणुकीतही पारंपारिक वाद्यांचा वापर केला जाणार आहे.

तिरपण गावात नवयुग तालीम तरुण मंडळ, हनुमान तालीम तरुण मंडळ, न्यू गोल्डन तरुण मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ, अण्णा भाऊ साठे तरुण मंडळ यांच्यामार्फत प्रत्येकवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण उच्च ध्वनीयंत्रणेचे दु:ष्परिणाम व पर्यावरणाची होणारी हानी यामुळे या सर्वांनी यावर्षीचा गणेशोत्सव उच्च ध्वनीयंत्रणामुक्त व पर्यावरणपूरक साजरा करण्याचे ठरवले आहे. यामध्ये अष्टविनायक तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ व अण्णा भाऊ साठे तरुण मंडळामार्फत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. न्यू गोल्डन तरुण मंडळाने दररोज व्याख्यान, कथाकथन, प्रवचन व कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. विसर्जन मिरवणुकीला कराड-कोरेगाव येथील प्रसिद्ध सौरभ बंजोपार्टी आणण्यात येणार आहे.

१९७४ मध्ये स्थापन झालेले नवयुग तालीम तरुण मंडळात स्थापनेपासूनच प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. २०१७च्या गणेशोत्सवामध्ये वृक्षारोपण, समाजातील गरजुंना मदत, अनेक स्पर्धांचे आयोजन केले. पन्हाळा-शाहुवाडीचे पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील, तत्कालिन उपनिरिक्षक शशिकांत गिरी यांनी मंडळाला भेट दिली होती. मंडळाच्या या विधायक कार्याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाचा यंदाचा गणराया अॅवार्ड मंडळाला मिळाला आहे. तिरपणला यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होत असल्याबद्दल पन्हाळ्याचे पीएसआय रवींद्र साळोखे यांनी मंडळाचे विशेष अभिनंदन केले. ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच शारदा पाटील, उपसरपंच बाळासाहेब बोळावे, पोलिस पाटील वर्षा कांबळे आदींनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा युवा महोत्सव २९ सप्टेंबरपासून

0
0

जिल्हा युवा महोत्सव २९ सप्टेंबरपासून

५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मध्यवर्ती महोत्सव

म. टा. वृत्तसेवा, आजरा

शिवाजी विद्यापीठाच्या २०१८-१९चा ३८ व्या द्विस्तरीय युवा महोत्सव सप्टेंबरच्या अखेरीस होणार आहे. यावर्षीचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव २९ सप्टेंबर आणि १ व ३ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात होणार आहे. तर विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव ५ ते ७ ऑक्टोबर यांदरम्यान सांगलीच्या विलींग्डन कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाने संलग्नित कॉलेजांना याची माहिती दिली आहे. त्यादृष्टीने महाविद्यालयांमध्ये अभिनय, नृत्य, गीत-संगीत आदी विविध कला-प्रकारांची तयारी सुरू झाली आहे.

यावर्षी कोल्हापूर जिल्हा युवा महोत्सव महावीर कॉलेजमध्ये, साताऱ्यात कोरेगावचे डी. पी. भोसले कॉलेज तर सांगली जिल्ह्याचा महोत्सव आटपाडीत श्रीमंत बाबासाहेब देशमुख कॉलेजमध्ये होणार आहे. युवा महोत्सवामध्ये जिल्हा स्तरावर सांघिक व वैयक्तिक स्वरुपाच्या १३ कलाप्रकारांत स्पर्धा होईल. यामध्ये एकांकिका, लघुनाटिका, मुकनाट्य, पथनाट्य, लोकनृत्य किंवा लोककला, लोकसंगीत वाद्यवृंद, समूहगीत, वादविवाद व प्रश्नमंजुषा या सांघिक तर सुगमगायन आणि मराठी, हिंदी व इंग्रजी वक्तृत्व या वैयक्तिक स्पर्धा समाविष्ट आहेत. जिल्हा स्तरावर प्रथमच नकला स्पर्धा होतील.

विभागीय प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रत्येक जिल्ह्याच्या यजमान महाविद्यालयांवर २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होतील. जिल्हास्तरावरील पहिल्या ३ यशस्वी संघांच्या, तसेच याशिवाय १४ इतर कला प्रकारातील स्पर्धा थेट मध्यवर्ती महोत्सवामध्ये होतील. राष्ट्रीय कव्वाली, इंद्रधनुष्य आणि पश्चिम विभागीय युवा महोत्सवासाठी विद्यापीठीय संघ निवड ८ व ९ ऑक्टोबरला तर कव्वाली सराव शिबीर १० ते २१ ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठात होईल. जिल्हा व मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी तीन प्रतीत प्रवेशिका १५ सप्टेंबर पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलला गणरायाचे उत्साहात आगमन

0
0

कागलला गणरायाचे उत्साहात आगमन

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल शहरात घरोघरी श्री गणरायाचे आज भक्तीपूर्ण वातावरणात, मोठ्या उत्साहात आगमन झाले. 'मंगलमूर्ती मोरया ऽऽऽ,' 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात बाप्पांचे आगमन झाले. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत आपल्या मूर्ती आणल्या. अनेकांनी शाडूची मूर्ती नेऊन पर्यावरणपूरक उत्सवाला हातभार लावला.

कागलमधील शाहू सभागृहात तसेच सभागृहाबाहेर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे विक्रेत्यांनी विविध रुपातील आणि आकारातील मूर्ती विक्रीसाठी सज्ज ठेवल्या होत्या. शाहू कॉलनी, जयसिंगराव पार्क, अनंत रोटो, बेघर वसाहत, हणबर गल्ली, शिवाजी चौक आदी विविध ठिकाणी गणेशमूर्तीं विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्यामुळे उपनगरातील नागरिकांची सोय झाली.

पूजेचे व सजावटीच्या साहित्याने बाजारपेठेतील दुकाने व स्टॉल सजले होते. या दुकानांत व स्टॉलवरही ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत होती. फुले, फळांसह पूजा व सजावटीच्या साहित्याचे दर यंदा वाढल्याचे दिसले. गणेशमूर्ती नेण्यासाठी सहकुटुंब नागरिक दिसत होते. महिलांचा व युवतींचा सहभाग लक्षणीय होता. स्वत:च्या मोटारसायकल व चारचाकी वाहनांतून मूर्ती नेण्यात आल्या. काहींनी सजवलेल्या ढकलगाडी, रिक्षा, खाजगी वाहनांबरोबर ट्रॅक्टर, हौदा रिक्षांचाही वापर मूर्ती नेण्यासाठी केला. सार्वजनिक मंडळांचीही मूर्ती आणण्यासाठी धांदल सुरू होती. मूर्ती नेण्यासाठी शाहू सभागृह सकाळी गर्दीने फुलून गेले होते.

फोटो : कागल : येथील शाहू सभागृहातून घरगूती गणेशमूर्ती नेताना नागरिक.

छाया : नरेंद्र बोते, कागल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोजिमाशीचे १०० कोटी उलाढालीचे उद्दिष्ट

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर जिल्हा मध्यामिक शिक्षक व कर्मचारी संघाने आर्थिक वर्षात ७५ कोटी रुपयांची उलाढाल केली असून आगामी आर्थिक वर्षात १०० कोटी रुपये उलाढालीचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी घोषणा अध्यक्ष महादेव चौगुले यांनी केली. कोजिमाशि व कर्मचारी संघाच्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आयर्विन मल्टिपर्पझ हॉल येथे आयोजित सभेत जिल्ह्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष चौगुले यांनी २५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून २१ कोटी रुपये कर्जाचे वाटप केले आहे, अशी माहिती दिली. तसेच भविष्यात सोनेतारण कर्जाची सुविधा देण्यात येणार असून भोगावती येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष चौगुले, संचालक किरण पास्ते, सर्जेराव जरग यांनी उत्तरे दिली. उपाध्यक्ष मंगल मोरे यांनी आभार मानले. यावेळी संचालक सर्जेराव जरग, तानाजी पाटील, प्रकाश वरेकर, सुप्रिया शिंदे, आर. एस. पाटील, एस. बी. पाटील, एल. डी. पाटील, आर. बी. पाटील, सदाशिव चौगले, मनोहर पाटील, सुनीता पाटील, अरुण कांबळे, महादेव पवार, एस. एम. नाळे, रंगराव मर्दाने उपस्थित होते. तसेच सुकाणू समितीचे सदस्य वसंतराव देशमुख, जयंत आसागांवकर, बापूसाहेब शिंदे, व्ही. जी. पोवार, के. के. पाटील, उदय पाटील, नाना गोखले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरीत गणरायाचे जल्लोषी स्वागत

0
0

राधानगरी तालुक्यात

गणरायाचे जल्लोषी स्वागत

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी तालुक्यात गणरायाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात घरोघरी मूर्ती आणण्यात आल्या. तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती पारंपरिक वाद्याच्या गजरात आणण्यात आल्या. जल्लोषमय वातावरणात तरुणाईने नृत्याच्या ठेक्यात गणरायाचे स्वागत केले.

तालुक्यातील प्रमुख गावे असलेल्या राधानगरी, राशिवडे, तारळे, कसबा वाळवे, ठिकपुर्ली, कौलव, घोटवडे, सरवडे, सोळंकुर, शिरगाव आदी गावांत कुंभार गल्लीत गुरुवारी सकाळपासून गणेशमूर्ती घेण्यासाठी लगबग सुरू होती. मूर्ती आणण्यासाठी लहान मुले आणि मुली, तरुण आकर्षक वेशभूषा करून गणरायाच्या स्वागताला सज्ज झाले होते. गल्ल्यांनी एकत्र घरगुती मूर्ती आणल्याचे चित्र पहायला मिळाले. ढोल-ताशा, लेझीम, टिपरी नृत्य आदींसह मिरवणुका पाहण्यास मिळाल्या. कौलव येथील पंदे गल्लीत लहान मुलींनी गणेशमूर्ती घरी आणल्या. घरोघरी भक्तिमय वातावरणात गणेश पूजा, प्रतिष्ठापना करण्यात आली. गावोगावी सार्वजनिक तरुण मंडळांच्या मूर्ती वाजतगाजत आणण्यात आल्या. युवकांनी ढोल, ताशा, लेझीम वाद्यांसह नृत्याचा ठेका धरला. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू राहिल्या. मंडळांच्या मूर्ती पुजनाचा मान राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला. तालुक्यात उच्च ध्वनीयंत्रणामुक्त मिरवणुका पहायला मिळाल्या. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आल्याचे दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर, जयसिंगपूर येथे सेंद्रीय मॉल उभारणार

0
0

कोल्हापूर, जयसिंगपूर येथे सेंद्रीय मॉल उभारणार

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

'सध्याच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रीय शेती उपयुक्त ठरत असल्याने सेंद्रीय शेतीला मोठ्या प्रमाणात महत्त्व आले आहे. शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे ओढा वाढण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर व जयसिंगपूर येथे सेंद्रीय मॉल उभारणार आहे' अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. वाठार (ता. हातकणंगले) येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील कृषी विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री खोत बोलत होते.

मंत्री खोत म्हणाले, 'रासायनिक खतांचा अतिवापर होत असल्याने शेतजमिनी नापीक होत आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेतीची चळवळ गतिमान होण्यासाठी सेंद्रिय शेतीचे गट वाढवले पाहिजेत. प्रत्येक कृषी सहाय्यकाने एक सेंद्रीय शेती गट तयार करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच सेंद्रीय शेतीसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. जयसिंगपूर व कोल्हापूर येथे सेंद्रिय मॉल उभा करून तो महिला बचत गटांना चालविण्यास देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारच्या शेतीविषयक योजना, निर्णयांची माहिती मिळण्यासाठी व्हिलेज, नॉलेज, कॉलेज हे अभियान प्रभावीपणे राबवाव्यात.'

गेल्यावर्षीच्या दीडपट म्हणजे तीस कोटी रुपयांचा निधी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी देण्याची घोषणाही मंत्री खोत यांनी यावेळी केली. जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या. बैठकीस बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने, जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानदेव वाकुरे, उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री पोवार, तालुका कृषी विभागातील अधिकारी, किरण पाटील (रुकडी) उपस्थित होते.

फोटो

वाठार (ता. हातकणंगले) येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे कृषी विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विजयसिंह माने, जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने, ज्ञानदेव वाकुरे आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हळदीत दोन कोटी लिटर पाणीसाठा

0
0

हळदीत दोन कोटी लिटर पाणीसाठा

घाटगे फाउंडेशनचा लघू पाटबंधाऱ्यातील प्रयोग यशस्वी

म. टा. वृत्तसेवा, कागल

'राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पाणी आडवा, पाणी जिरवा ही संकल्पना घेऊन दहा महिन्यांपूर्वी विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनमार्फत हळदीत लघू पाटबंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले होते. या बंधाऱ्यात आता दोन कोटी लिटर पाणी साठा झाला आहे. हा यशस्वी प्रयोग आहे' असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले.

हळदी येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व शासनाच्या कृषी विभागामार्फत बांधण्यात आलेल्या लघू तलाव बंधाऱ्यामधील पाणीपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.

नवोदिता घाटगे म्हणाल्या, 'पाणी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मग ते पिण्याचे असो किंवा शेतीचे. यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावोगावी पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न समरजीतसिंह घाटगे करीत आहेत. हळदी बंधारा त्यातीलच एक यशस्वी प्रयोग आहे. तालुक्यामध्ये काही गावात तर महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. यासाठी या गावांत पिण्याचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.'

घाटगे म्हणाल्या, 'फाउंडेशनमार्फत महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. अशा उद्योगांतून आपली प्रगती साधता येते. महिलांनी रोजगाराकडे वळावे. त्यासाठी आमच्या संपर्कात राहा.'

उमेश देसाई म्हणाले, 'यावर्षी पाऊस चांगला झालेने चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या काही वर्षात धरण ६५ टक्के भरत होते. अशावेळी नदीत ४ दिवस पाणी रहायचे. बाकी दिवस पाणीटंचाई जाणवत होती. यावर्षी धरण १०० टक्के भरले आहे. राजे समरजितसिंह घाटगे यांनी हळदी, बेनीक्रे, म्हाद्याळ, हमिदवाडा, आलाबाद या ठिकाणी सुरू केलेले हे अभियान तालुक्याला नवी दिशा देणारी ठरत आहे.'

या वेळी निताराणी सूर्यवंशी, सुहासिनी खराडे, सारिका चौगुले, विद्या करडे, रचना गिरी, निशिगंधा काशीद, अमरसिंह घोरपडे, उमेश देसाई, दत्तामामा खराडे, सुनीलराज सूर्यवंशी, अनंत फर्नांडिस, प्रशांत घोरपडे, भिकाजी तिप्पे आदी उपस्थित होते. अनिता व्हरांबळे यांनी स्वागत केले. मंजुषादेवी पाटील यांनी आभार मानले. संयोजन सुरेश व्हराबळे यांनी केले

बंधारा ओव्हरफ्लो

हळदी येथील पाणीटंचाई लक्षात घेऊन हा लघुतलाव बांधण्यात आला आहे. लघुतलाव बांधण्यासाठी ९ लाख रुपये खर्च झाले आहेत. बंधाऱ्याची लांबी ७० मीटर तर उंची ७ मीटर आहे. तलावाची खोली ७ मीटर असून पाणीसाठा ४ मीटर झाला आहे. प्रथमच तलावातील क्षमतेच्या पलीकडे जाऊन पाणी ओव्हरफ्लो झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांना मदत

0
0

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांना मदतीचा हात हवा

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

'थोर विचारवंतांच्या कार्याला जागून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या घटकांना मदतीचा हात दिल्यास अशा घटकांचे मनोधैर्य उंचावत रहाते' असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील यांनी केले. मलकापूर परिसर नाभिक संघटनेच्यावतीने संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त येळाणे (ता. शाहूवाडी) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण प्रभावळकर, येळाणे सरपंच मधुकर पाटील प्रमुख उपस्थित होते.

सुरुवातीला संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. शाहूवाडीतील केंद्रीय आश्रम या विनाअनुदानित शाळेला संघटनेच्यावतीने देणगी देण्यात आली. कोपार्डे व लोळाणे प्राथमिक शाळेला खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. संघटनेचे जिल्हा संघटक संदीप माने, अध्यक्ष संदीप यादव, उपाध्यक्ष प्रकाश माने, महेंद्र शिंदे, प्रल्हाद पळसे, लोळाणेचे सरपंच शंकर पाटील, नानासाहेब शिंदे, भगवान माने, ग्रा. पं. सदस्य महादेव जाधव, विजय माने, गणेश माने, अशोक यादव, मारूती यादव, भिमराव पालांडे, सुशांत मोहिते, संजय साळोखे, मानसिंग काळे, शामराव मोहिते, बबन यादव, राजेंद्र यादव, संजय जाधव उपस्थित होते. प्रशांत मोहीते यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग माने यांनी सूत्रसंचलन केले.

फोटो ओळ

येळाणे (ता. शाहूवाडी) येथे संत सेना पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सर्जेराव पाटील. व्यासपीठावर नगराध्यक्ष अमोल केसरकर, प्रवीण प्रभावळकर आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोखले कॉलेजमध्ये ग्रंथ प्रदर्शन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. शिक्षणमहर्षी प्राचार्य एम. आर. देसाई ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन भरविले आहे.

ग्रंथपाल दत्तात्रय किलकिले यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची माहिती दिली. प्रदर्शनात वेगवेगळे ज्ञानकोश, शब्दकोश, चरित्रकोश, भौगोलिक माहिती ग्रंथ, निर्देशिका, इंग्रजी साहित्य संपदा व विविध विषयावरील पुस्तकांचा समावेश आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, कौन्सिल सदस्य दौलत देसाई, प्रशासन अधिकारी प्रा. डॉ. मंजिरी मोरे यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रा. आर. बी. सुतार यांनी केले. प्रा. प्रमोद झावरे यांनी आभार मानले. याप्रसंगी काउन्सिल सदस्य प्रा. पी. के.पाटील, प्राचार्य ए. बी. गडकरी, उपप्राचार्य एस.एच.पिसाळ, श्रीमती माधुरी देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीर तालुक्यात गणरायाचे जल्लोषी स्वागत

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'एक, दोन, तीन, चार... गणपतीचा जयजयकार..', 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..'च्या गजरात भक्तीपूर्ण आणि उत्साही वातावरणात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींचे डॉल्बीला फाटा देत ढोलताशे, लेझीम, झांजपथकांच्या निनादात वाजतगाजत करवीर तालुक्यात गणरायाचे स्वागत करण्यात आले.

सावर्डे दुमाला येथे 'एक गाव एक गणपती'चे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. वडणगे, सांगरुळ, वाकरे, कसबा बीड, शिरोली दुमाला, हसुर दुमाला, हिरवडे दुमाला, बाचणी, पाडळी खुर्द, वाशी आदी मोठ्या गावांत सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या दिमाखात, भव्य गणेशमूर्तींचे वाद्यांच्या आगमन करण्यात आले. बाचणी, शिरोली दुमाला येथे काही मंडळांकडून वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात मूर्ती आणण्यात आल्या.

घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच परिसरातील कसबा बीड, सडोली दुमाला, म्हालसवडे, गर्जन, हसूर दुमाला आदी गावांतील कुंभारवाड्यामध्ये लोकांची वर्दळ दिसत होती. गणरायाला घरी आणण्यासाठी घरातील मंडळी उत्साहाने सहभागी झाली होती. नंतर दुपारी बारानंतर गावागावांत प्रतिष्ठापित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे आगमन ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून झाले. विविध रुपांतील आणि रंगसंगतीमधील या आकर्षक गणेशमूर्ती कोल्हापुरातील कुंभारगल्ली बरोबरच बापट कँप, कसबा बीड, सडोली दुमाला हिरवडे खालसा, म्हालसवडे, गर्जन येथील मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्तींना गणेशोत्सव मंडळांनी प्राधान्य दिल्याचे प्रकर्षाने जाणवले. सारा परिसर बाप्पांच्या भक्तिरसात न्हाऊन गेला आहे.

वाढला ज्येष्ठांचा सहभाग

सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीचे गावात आगमन झाले की घरोघरी मूर्तीचे पूजन, मिरवणुकीने स्वागत केले जाते. उच्च ध्वनीयंत्रणेच्या दणदणाटामुळे मिरवणुकीपासून चार हात लांब असलेले ज्येष्ठ नागरिक, महिला यावर्षी पारंपरिक वाद्यांमुळे गणेशाच्या आगमन मिरवणुकांत मोठ्या हिरिरीने सहभागी झालेले पहायला मिळाले.

फोटो : करवीर तालुक्यातील बाचणी येथे वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या वाद्यात गणेशमूर्ती आणताना ग्रामस्थ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडीत ट्रॅव्हल्सच्या मनमानीला चाप

0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

खासगी ट्रॅव्हल्स बस मालकांनी केलेल्या मनमानी दरवाढीविरोधात शिवसेना, मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक आणि ट्रॅव्हल्सधारक यांच्यात समझोता घडवून आणण्यात प्रशासनाला यश आले. या समझोत्यानुसार मलकापूर-परेल (मुंबई) ६०० रुपये तर मलकापूर-विरार (मुंबई) ७०० रुपये असा प्रवासी दर अनंत चतुर्दशीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय झाला.

शाहूवाडी तालुक्यातून सुमारे वीस खासगी ट्रॅव्हल्स मुंबईकडे ये-जा करतात. खासगी ट्रॅव्हल्सचालक यासाठी प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारी प्रवासीवर्गात वाढत होत्या. या तक्रारींना अनुसरून शिवसेना व मनसे पक्ष संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. शाहूवाडी तहसील कार्यालयात नायब तहासिलदार राजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांच्या उपस्थितीत आंदोलक व खासगी ट्रॅव्हल्स बसमालक यांची बैठक झाली. दोन्ही बाजुंच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी अनंत चर्तुदसीपर्यंत प्रवासी दर ६०० ते ७०० रुपये राहील असा तोडगा काढला. यापुढे खाजगी बस मालकांनी संघटना स्थापन करून एकच दर ठेवण्याचे कबूल केले.

मनसेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव, सेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुका प्रमुख दत्ता पोवार, मनसेचे तालुका प्रमुख कृष्णात दिंडे, सचिव सतीश तांदळे, विजय निकम, महादेव मुल्ला, खाजगी बस मालक उत्तम चव्हाण, प्रकाश पाटील, संकेत घारे, संजय घोडसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडीत उच्च ध्वनियंत्रणेला मंडळांकडून बगल

0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

पारंपारिक वाद्यांच्या साथीने 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात गुलालाची उधळण करीत गावागावात गणरायाचे उत्साहात आगमन झाले. अनेक ठिकाणी तरुणांच्या या उत्साहात बालचमुंचा सहभाग लक्षवेधी ठरत होता. अधुनमधून फटाक्यांची आतषबाजीही होत राहिली.

आज सकाळपासूनच गणेशमूर्ती नेण्यासाठी मलकापूर, सरुड, बांबवडे, सोनवडे येथील कुंभारवाडे भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उच्च ध्वनीयंत्रणेला फाटा देत पारंपरिक लेझीम, झांज पथक, ढोल-ताशे व बेंजोच्या निनादात गणरायांचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले. यासाठी मुंबईस्थित चाकरमनी गणेशोत्सवासाठी आपापल्या गावामध्ये दाखल झाला आहे. मलकापूर, आंबा, बांबवडे, सरुड, भेडसगाव, शित्तूर-वारुण परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या पंधरा दिवसांपासून उत्सवाच्या तयारीत रात्री जागवल्या होत्या. यातील काही मंडळांच्या मूर्ती आदल्या दिवशी आणण्यात आल्या. पावसाने विश्रांती घेतल्याने गणेश आगमनाच्या भक्तीमय वातावरणात आणखीनच भर पडल्याचे जाणवले.

फोटो

शाहूवाडी : पारंपरिक लेझीम पथकाच्या साथीने गणरायांच्या आगमन मिरवणुकीत सहभागी आकर्षक फेटे परिधान केलेले कार्यकर्ते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूरमध्ये बाप्पाचे आगमन थाटामाटात

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!' असा जयघोष ढोल-ताशांचा घुमणारा आवाज गुलाल, फुलांची उधळण अशा उत्साहात शिरोळ तालुक्यात घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमनामुळे भक्तगण भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाले.

जयसिंगपूर येथील गांधी चौकातून भक्तांनी रिक्षा, मालवाहू टेम्पो, कार आणि मोटरसायकलींवरून गणेशमूर्ती घरी नेली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात मूर्ती मंडळांमध्ये नेल्या. भक्तांच्या गर्दीने शहरांतील रस्ते फुलून गेले होते. घराघरांत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आरती, गणपती स्त्रोत, मंत्र असे मंगलदायी वातावरण दिवसभर अनेक ठिकाणी होते. तरुणाई बाप्पासोबत सेल्फी काढताना दिसत होती.

जयसिंगपूर, संभाजीपूर येथे ठिकठिकाणी गणपती आगमनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, गुलाल, फुलांची उधळण करत मूर्ती मंडपात नेण्यात आल्या. सार्वजनिक गणेश मंडळांतील बाप्पा थाटामाटात स्थानापन्न झाले. बाप्पाच्या आगमनाने जयसिंगपूर भक्तिमय झाले. शहरातील गांधी चौकात गणेशमूर्तीचे तसेच सजावटीचे व पूजा साहित्याचे स्टॉल विक्रेत्यांनी उभारले होते. सकाळपासूनच गणेशभक्तांनी विघ्नहर्त्या गणरायाची मुर्ती नेण्यासाठी गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images