Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इचलकरंजीत शिवसेनेकडून प्रशासन धारेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,इचलकरंजी

शहरातील बंद पथदिवे, खड्डेमय रस्ते दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावा करूनही पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेने मोर्चा काढून प्रश्नांचा भडीमार करत प्रशासनाला धारेवर धरले. सोमवारी आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी व बंद पडलेले पथदिवे दुरुस्तीसंदर्भात शिवसेनेच्यावतीने पाठपुरावा सुरू आहे, पण प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. खड्डेमय रस्ते आणि अंधारातूनच शहरात श्रींचे आगमन होणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने नगरपालिकेवर मोर्चा काढला. मुख्याधिकारी दीपक पाटील यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव गौड, शहरप्रमुख सयाजी चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभापती निवडीसाठी सोळाला सभा

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे (कोजिमाशि) सभापती प्रा. एच. आर. पाटील व उपसभापती आनंदराव काटकर यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन सभापती व उपसभापती निवडीसाठी १६ सप्टेंबरला सभा होणार आहे. शहर प्रबंधक प्रदीप बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची सभा होईल. शिक्षक नेते दादा लाड यांच्या सत्ताधारी आघाडीतर्फे अनिल चव्हाण यांचे नाव सभापतिपदासाठी चर्चेत आहे. दरम्यान यासाठी निवडणूक होणार की निवड बिनविरोध होणार याकडे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत पाटील राधनागरीतून लढणार

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com
@gurubalmaliMT

कोल्हापूर : 'पक्ष देईल तो आदेश पाळणार' अशी भूमिका घेत विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आमदार प्रकाश आबिटकरांनी त्यांना दिलेले आव्हान आणि आतापासून काही प्रमाणात सुरू असलेली तयारी पाहता ते राधानगरी मतदारसंघातून सलामी देण्याची दाट शक्यता आहे. के. पी. पाटील हे राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याने तिरंगी लढतीची चिन्हे आहेत.

पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेल्या पालकमंत्र्यांना अलिकडे विधानसभेचे वेध लागले आहेत. राज्यात दोन नंबरचे मंत्रिपद त्यांच्याकडे असले तरी अद्याप त्यांच्याकडे हक्काचा विधानसभा मतदारसंघ नाही. मतदारसंघ तयार करण्यासाठी त्यांची नियोजनपूर्वक तयारी सुरू आहे. कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि चंदगड अशा तीन मतदारसंघात त्यांची चाचपणी सुरू आहे. यात 'कोल्हापूर उत्तर'ला पहिली पसंती असली तरी दुसरा पर्याय म्हणून ते 'राधानगरी'ला पसंती देऊ शकतात. दरम्यान, 'हिंम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी राधानगरीतून लढावे' असे आव्हान शिवसेनेचे आमदार आबिटकरांनी यापूर्वीच त्यांना दिले आहे. पालकमंत्री हे आव्हान स्वीकारतील अशी दाट शक्यता आहे. त्यासाठी या भागात त्यांनी संपर्क तर वाढवला आहेच. शिवाय निधी देत कामांचा धडाका त्यांनी लावला आहे. तर राहुल देसाई यांच्या प्रवेशाने काँग्रेसचा एक प्रमुख गट भाजपमध्ये आला आहे. अशोक चराटी यांच्यामुळे आजरा भागात पक्षाला बळ मिळणार आहे. याशिवाय 'गोकुळ'चे संचालक अरूण डोंगळे, के. जी. नांदेकर, विजय मोरे गटाची ताकद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या ए. वाय. पाटील यांच्या हातात कमळ देताना पुर्नवसनाचा शब्द देत पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीतील गटबाजी आणि काँग्रेसच्या बिकट अवस्थेचा फायदा घेत मतदारसंघात कमळ फुलवण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न आहे.

आमदार आबिटकर यांनी चार वर्षात मतदारसंघात आपला प्रभाव निर्माण केला आहे. युती होवो अथवा न होवो, सेनेची उमेदवारी त्यांच्याच गळ्यात पडणार आहे. कामांबरोबरच संपर्कही चांगला ठेवल्याने त्यांची उमेदवारी प्रबळ राहील. येथे मंडलिक गट उघड तर काँग्रेसचा गट छुप्या रितीने त्यांच्याबरोबर असेल. राष्ट्रवादीतील गटबाजीचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधानसभेला के. पी पाटील तर पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील असा समझोता राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवारांनी काढला. पण तो मान्य नसल्याचे ए. वाय. यांच्या पुढील हालचालींवरून जाणवते. काहीही होवो, आपण रिंगणात आहे हे लक्ष्य निश्चित करून त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद असूनही गटबाजीचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आमदार असताना केलेली कामे, पक्षाचा प्रभाव आणि बिद्री कारखान्याची सत्ता ही राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे.

या मतदारसंघात काँग्रेस कमकुवत आहे. देसाई गट बाहेर पडल्याने काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली आहे. डोंगळे, दिनकराव जाधव, सुधाकर साळोखे आणि अभिजित तायशेटे यांच्यावरच पक्षाची मदार आहे. स्वाभिमानी संघटनेची ताकद मर्यादित असल्याने ती विजयापर्यंत पोहोचणारी नाही. त्यामुळे प्रा. जालिंदर पाटील यांची उमेदवारी कुणाला फायदेशीर ठरणार एवढीच उत्सुकता राहणार आहे.

साखर कारखान्यांची ताकद

राधानगरी मतदारसंघावर आजरा, बिद्री व भोगावती या तीन साखर कारखान्यांचा प्रभाव आहे. हे कारखाने सध्या भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे त्यांची मदत तिन्ही पक्षांना होणार आहे. सत्ता आणि संपत्तीचाही येथे वापर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजप आघाडीवर असेल. याचा फटका इतर दोन्ही पक्षांना बसणार आहे. चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून रिंगणात उतरल्यास आमदार हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. कारण कागल, राधानगरी आणि चंदगड या तीन तालुक्यांत पक्ष टिकवण्यात त्यांचा हातभार मोठा आहे.

या गटाची भूमिका महत्वाची

ए. वाय. पाटील, बजरंग देसाई, अरुण डोंगळे, के. जी. नांदेकर, विजय मोरे, दिनकराव जाधव, सुधाकर साळोखे आणि अभिजित तायशेटे, अशोक चराटी, मुकुंदराव देसाई, जीवन पाटील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णकन्येचे जल्लोषी स्वागत

$
0
0

राही सरनोबतचे अभिनंदन करण्यासाठी क्रीडाप्रेमींची गर्दी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कडाडणारी हलगी, फटाक्यांची आतषबाजी अशा जल्लोषपूर्ण वातावरणात कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू सुवर्णकन्या राही सरनोबतचे मोठ्या उत्साहात कावळा नाका येथे स्वागत करण्यात आले. यावेळी राहीने छत्रपती महाराणी ताराराणीच्या पुतळ्यास अभिवादन केले. महापौर शोभा बोंद्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले.

इंडोनेशियातील जकार्ता येथील पालेनबांग येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत राहीने सुवर्णपदक जिंकले होते. स्पर्धेत तिने २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताला चौथे सुवर्ण पदक मिळवून दिले. या यशानंतर तिचे पहिल्यांदाच कोल्हापुरात आगमन झाले. प्रदीर्घ काळ दुखापतीमुळे तिला नेमबाजीपासून दूर राहावे लागले होते. सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर मायभूमीत परतताना खास कोल्हापुरी पद्धतीने तिचे स्वागत करण्यात आले. तिचे आगमन होताच कोल्हापुरी फेटा बांधून क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले.

यावेळी मधुरिमाराजे छत्रपती, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, सुरेखा शहा, प्रज्ञा उत्तुरे, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे माणिक मंडलिक, संभाजी मांगोरे-पाटील, नंदकुमार बामणे, क्रीडाधिकारी सुधाकर जमादार, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.

.........

क्रीडाप्रेमींची दुपारपासून गर्दी

राहीचे मंगळवारी आगमन होणार असल्याने जिल्ह्यासह शहरातील असंख्य क्रीडाप्रेमींनी कावळा नाका येथील चौकात दुपारपासून गर्दी केली होती. यावेळी हलगी वादकांनी अप्रतिम हलगी वादनाने उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच क्रीडारसिकांनी राहीचे आगमन कॅमेराबद्ध करत लगोलग सेल्फी छायाचित्रे सोशल मिडीयावर अपलोड करून राहीच्या आगमनाची बातमी दिली.

..............

फोटो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑलंपिकमधील सुवर्णपदक हेच ध्येय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या चार वर्षाच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करताना अतिशय आनंद झाला. पूर्वी अपयशाचे चटके बसत असताना कोल्हापूरकरांनी नेहमीच पाठबळ दिले. त्यामुळे सुवर्णपदकाला गवसणी घालू शकले. कोल्हापूरकरांच्या पाठबळावरच नेमबाजीत ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय आहे' अशी भावना नेमबाजपटू राही सरनोबतने व्यक्त केली. टाकाळा परिसरातील निवासस्थानी आयोजित स्वागतप्रसंगी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

राही म्हणाली, 'अनेक वर्षे खेळापासून लांब राहणे हे एका खेळाडूसाठी वेदनादायी असते. दुखापतीनंतर पुनरागमन करणे, यश मिळवणे जड गेले. पण कुटुंबाच्या, चाहत्यांच्या पाठबळामुळे आशियाई स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करता आली. आशियाई क्रीडा स्पर्धा आव्हानात्मक होती. जागतिक स्तरावर खेळताना अनेक कसलेल्या खेळाडूंचा सामना करावा लागतो. चांगली कामगिरी करण्यासाठी सराव अत्यंत महत्वाचा ठरतो. ही स्पर्धा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कस पाहणारी असते. स्पर्धेपूर्वी दोन महिने कसून सरावावर भर दिला. त्यावेळी केलेली मेहनत महत्वाची ठरली. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकाने मोठा आत्मविश्वास मिळवून दिला आहे.'

यावेळी राहीची आजी वसुंधरा सरनोबत यांनी तिचे औक्षण करून स्वागत केले. राहीने आजीला आनंदाने आलिंगन देऊन घरी प्रवेश केला. आई प्रभा सरनोबत, वडील जीवन सरनोबत, भाऊ आदित्य व अजिंक्य, काका राजेंद्र सरनोबत, काकी कुंदा यांच्यासह दिलीप कदम, सुषमा कदम, वनिता उत्तुरे, राजेंद्र इंगळे, एस. यू. साठे, एस. व्ही. चौधरी, एस. डी. चव्हाण, तानाजी सूर्यवंशी उपस्थित होते.

नेमबाजीत ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचे सर्वोच्च ध्येय असल्याने पात्रता स्पर्धेचे आव्हान पार करावे लागणार आहे. पाच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पार करण्यासाठी दीर्घकाळ तयारी करावी लागते. सध्या उणिवांवर काम करत पात्रता स्पर्धा पार पार करण्यावर भर देणार आहे.

- राही सरनोबत

'राही इज द बेस्ट'

टाकाळा येथील राहीच्या निवासस्थानी ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमधील मुली स्वागताचे फलक घेऊन उपस्थित होत्या. यावेळी मुलींनी दिलेल्या 'इस्ट ऑर वेस्ट, राही इज द बेस्ट', 'कोल्हापूरची माती, कोल्हापूरचा मान, राही आहे ताराराणीचा अभिमान' अशा घोषणांनी टाकाळा परिसर दुमदुमून गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबूजमाल पंजाची प्रतिष्ठापना

$
0
0

बाबूजमाल पंजाची प्रतिष्ठापना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिंदू-मुस्लिम समाजाच्या ऐक्याचे प्रतिक असलेल्या मोहरम सणास प्रारंभ झाला असून मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाबूजमाल तालमीच्या नाल्या हैदर पंजाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. १९ सप्टेंबर रोजी कत्तलरात्र तर २० नोव्हेंबरला ताबूत विसर्जन हे मोहरम सणाचे मुख्य दिवस आहेत. बाबूजमाल तालमीत मंगळवारी रात्री ११ वाजता मंडळाचे कार्यकर्ते व भाविकांनी नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना केली. जाधव कसबेकर घराण्याकडे पूजाअर्चेचा मान आहे. बुधवारपासून (ता. १२) नाल्या हैदर पंजा भाविकांसाठी खुला करण्यात येणार आहे. शहरातील घुडनपीर, नंगीवली, बाराईमाम, अवचितपीर, वाळव्याची स्वारी, आप्पा शेवाळे, सरदार तालमीतील चाँदसाहेब या मानाच्या पंजाची प्रतिष्ठापना गुरुवारी आणि शनिवारी होणार आहे. बाबूजमाल, सरदार तालीम, खंडोबा तालीम, बालगोपाल तालीम येथे एकाच ठिकाणी गणपती, पंजाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. राजारामपुरी तिसरी गल्लीत एकता मित्र मंडळाच्यावतीने मोहरम गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. सनदी बंधूच्या झिम झिम साहेब पंजा व गणेश मूर्तीची एकत्रित प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिनी सिनेटोनवरुन सभा गाजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने शालिनी सिनेटोनची जागा ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. तरीही बुधवारी (ता. १२) होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत सिनेटोनच्या जागेवर बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये, असा सदस्य ठराव मांडला जाणार आहे. या ठरावावरून महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपात्र नगरसेवकांबाबत मंगळवारी कोणताही निर्णय झालेला नसल्याने त्यांच्या उपस्थितीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

'ए' वॉर्डमधील रि. स. नं. ११०४पैकी भूखंड क्रमांक पाच व सहाची जागा शालिनी सिनेटोनसाठी आरक्षित केली आहे. शालिनी सिनेटोनची जागा चित्रीकरणासाठी देण्यात आली आहे. या जागेपैकी काही जागेवर बांधकाम करण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे शालिनी सिनेटोनचे प्रकरण शहरात चांगलेच गाजले होते. बांधकामाच्या परवानगीसाठी आर्थिक घडामोडी झाल्याची चर्चा शहरात जोरदार रंगली होती. बांधकाम परवानगीचा ठराव राज्य सरकारकडे पाठवल्याची शहरात चर्चा होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनांमुळे या प्रकरणावर पडदा पडला होता. पण, बुधवारी होणाऱ्या महासभेत नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी या जागेवर बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये असा ठराव मांडणार आहेत. त्यामुळे पुन्हा सिनेटोनच्या जागेबाबत चर्चेला तोंड फुटले आहे. परिणामी या ठरावांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. ठरावाला पूर्ण महासभेने पाठिंबा देऊन मंजुरी दिल्यास या जागेवर बांधकाम करण्यास प्रतिबंध लागणार आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलेल्या नगरसेवकांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. प्रशासन सभेपूर्वी अपात्र नगरसेवकांना महासभेस उपस्थित राहू नये, असे आवाहन केले आहे. परिणामी महासभेत अपात्र नगरसेवक उपस्थित राहणार का? याकडेही लक्ष लागले आहे.

चौकट

सभा तहकूब होणार?

कोर्टाच्या निर्णयानंतर स्थायी समितीचे चार सदस्य अपात्र ठरले. त्यामुळे 'स्थायी'च्या दोन बैठकांना अपात्र सदस्य गैरहजर राहिले. याच निर्णयाचा आधार घेत नगरसेवकांना महासभेला उपस्थित न राहण्याच्या सूचना प्रशासनाने यापूर्वीच दिल्या आहेत. महासभेत एखादा विषय मतदानापर्यंत गेल्यास आणि गणेश चतुर्थीमुळे सत्ताधारी गटाच्या सदस्यांची संख्या कमी राहिल्यास अडचणीत भर पडणार आहे. परिणामी सभा तहकूब होण्याची शक्यता आहे.

पुन्हा प्रस्तावाचे नाटक कशाला?

'ऐतिहासिक वारसा असलेल्या शालिनी सिनेटोनमध्ये केवळ चित्रिकरणासाठी परवानगी दिली आहे. ऐतिहासिक वारसा असल्याचे पत्र २००५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच यापूर्वीच्या सभेत हा ठराव फेटाळला आहे. तरीही पुन्हा प्रस्तावाचे नाटक कशासाठी करत आहेत,' अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा यांनी दिली आहे. या जागेवर बांधकाम करण्यास मज्जाव करावा असे पत्र त्यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना मंगळवारी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र नगरसेवकांची प्रतीक्षा वाढली

$
0
0

मंत्रिमंडळ बैठकीत 'नगरविकास'चा अभिप्राय सादर पण चर्चा नाही

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलेल्या नगरसेवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ वटहूकुम काढण्याच्या तयारीत आहे. यासाठी मंगळवारच्या बैठकीत अजेंड्यावर विषय होता. पण तांत्रिक कारणामुळे या विषयावर पुढील बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र नगरविकास खात्याने जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत एक वर्षाने वाढवावी असा अभिप्राय दिला आहे. यामुळे १५ नगरसेवकांचे पद वाचणार असले तरी चौघांच्या पदावर गडांतर येण्याची दाट शक्यता आहे.

विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवले आहे. कोर्टाच्या निर्णयाचा फटका महापालिकेच्या १९ नगरसेवकांना बसणार आहे. याचबरोबर राज्यातील अनेक जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द होणार आहे. परिणामी या सदस्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पूर्वलक्षी प्रभावाने वटहूकूम काढण्याच्या तयारीत आहे.

चार सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नगरविकास, विधी व न्याय, ग्रामविकास आणि समाजकल्याण विभागाकडून अभिप्राय मागवले होते. चारही विभागाकडून मंगळवारच्या (ता.११) बैठकीत अभिप्राय सादर होणार होता. त्यामुळे बैठकीच्या अजेंड्यामध्ये आयत्यावेळचा विषय म्हणून समावेश केला होता. चारही विभागाने अभिप्राय सादर केले, पण तांत्रिक कारणामुळे या विषयावर चर्चा होऊ शकली नाही. पण पुढील मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. परिणामी अपात्र नगरसेवकांना पुढील मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

................

चौकट

जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. त्यानंतर पडताळणी करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले. पुन्हा यामध्ये बदल करुन स्वतंत्र जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्यात आली. पण विदर्भ, मराठवाडा विभागात चार- चार जिल्ह्यासाठी एकच समिती असल्याने वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिकच जटील बनला आहे.

...................

चौकट

चार नगरसेवक अपात्र होणार ?

स्थानिक स्वराज्य संस्थांतील अपात्र सदस्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार वटहूकूम काढण्याच्या तयारीत आहे. यासाठी विविध चार विभागांचा अभिप्राय प्राप्त झाला आहे. नगरविकास विभागाकडून एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा अभिप्राय दिला आहे. परिणामी महापालिकेच्या १५ नगरसेवकांना दिलासा मिळण्याबरोबरच चार नगरसेवक अपात्र राहण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसचे डॉ. संदीप नेजदार, दीपा मगदूम, राष्ट्रवादीचे सचिन पाटील व भाजपचे संतोष गायकवाड यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

....

कोट

'नगरविकास विभागाच्या अभिप्रायानंतरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवक अपात्रतेचा विषय अजेंड्यावर आला आहे. मात्र नगरविकास विभाग नगरसेवक अपात्रतेचा आदेश काढू शकत नाही.

प्रा. जयंत पाटील, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉटेलची इमारत ताब्यात घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पांतर्गत महापालिकेने टेंबलाईवाडी येथील जागा आयआरबी कंपनीला भाडे कराराने दिली होती. राज्य सरकारने टोल वसुलीला स्थगिती दिल्यानंतर जागेबाबत महापालिका व आयआरबीमध्ये वाद सुरू आहे. सद्य:स्थितीत न्यायप्रविष्ठ प्रकरण असताना दोन दिवसांपूर्वी संबंधित जागा ताब्यात घ्यावी, असे पत्र आयआरबीने महापालिका प्रशासनाला पाठवले आहे.

शहरांतर्गत रस्ते उभारणीसाठी महापालिका, रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांच्यात त्रिसदस्यीय करार झाला. करारान्वये शहरात ४९ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात येणार होते. यासाठी येणारा खर्च ३० वर्षे टोल वसुलीतून करण्यात येणार होता. तसेच कंपनीला टेंबलाईवाडी येथील ३० हजार चौरस मीटर जागा एक रुपया वार्षिक भाडे कराराने दिली होती. या जागेवर कंपनीने हॉटेलची बांधणीही केली आहे.

दरम्यान, नित्कृष्ट दर्जाच्या रस्ते प्रकल्प व टोलवसुलीवरून शहरात कंपनीविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. प्रदीर्घकाळ सुरू झालेल्या आंदोलनानंतर टोल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. टोलवसुली बंद झाल्यानंतर आयआरबीने नुकसानभरपाईसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. तसेच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सद्य:स्थितीस हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

महापालिकेने रस्ते विकास महामंडळाच्या सहभागाने रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन केले. मूल्यांकनावरून आयआरबी व महापालिका यांच्यात वाद सुरू असताना कंपनीने हॉटेलची जागा इमारतीसह ताब्यात घ्यावी, असे पत्र महापालिका प्रशासनाला पाठवले आहे.

०००

टेंबलाईवाडी येथील हॉटेलची जागा बांधकामासह ताब्यात घेण्याबाबत आयआरबीचे पत्र मिळाले आहे. कंपनीसोबत झालेला करार आणि कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस श्वान स्टेला सुवर्णपदकाची मानकरी

$
0
0

पोलिस श्वान 'स्टेला'

सुवर्णपदकाची मानकरी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोलापूर येथे झालेल्या कोल्हापूर परिक्षेत्र पोलिस कर्तव्य मेळाव्यात झालेल्या श्वान स्पर्धेत कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हेशोधक पथकातील श्वान 'स्टेला'ने सुवर्णपदक पटकावले. सोलापूर ग्रामीण विभागाने मेळाव्याचे आयोजन केले होते.

मेळाव्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, या विभागातील प्रत्येकी तीन असे १५ श्वानांनी भाग घेतला होता. कोल्हापूरच्या 'स्टेला' या श्वानाने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. निवृत्त उपनिरीक्षक थोरात, महेश कुमाार यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्टेला श्वानाला पोलिस हवालदार अमित चव्हाण, प्रदीप सुर्वे, राजेंद्र ढाके यांचे प्रशिक्षण लाभले आहे. गुन्हेशोधक पथकाच्या यशाबद्दल पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, गृह पोलिस उप अधीक्षक सतीश माने, उप निरीक्षक दिलीप पाटील यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'तो' अहवाल सत्यशोधन समितीचा नाही

$
0
0

गृह विभागासह आयजी नांगरे-पाटील यांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी दहा सदस्यीय समितीने अहवाल सादर केल्याची माहिती चुकीची असल्याचे स्पष्टीकरण गृह विभागासह विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे. राज्य सरकारने न्यायाधीश जयंत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दंगलीप्रकरणी सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. पुण्यातील दहा सदस्यीय समितीचा सत्यशोधन समितीशी संबंध नसल्याचे नांगरे-पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' शी बोलताना स्पष्ट केले.

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी दहा सदस्यीय सत्यशोधन समितीने त्यांचा अहवाल आयजी विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे सादर केल्याच्या बातम्या मंगळवारी प्रसार माध्यमांमध्ये आल्या. अहवालात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आक्षेप नोंदवल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. प्रत्यक्षात मात्र, नांगरे-पाटील यांनी कोणतीही सत्यशोधन समिती स्थापन केलेली नाही, त्यामुळे या संबंधीचा अहवाल राज्य सरकारकडे येण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण गृह विभागाकडून करण्यात आले. यापूर्वीच राज्य सरकारने दंगलीप्रकरणी हायकोर्टातील न्यायाधीश जयंत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अद्याप राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही.

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी नऊ जानेवारीला कृष्णा हॉल, पोलिस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे जिल्ह्यातील सर्व दलित संघटनाच्या प्रमुख नेत्यांची बैठक कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. त्या बैठकीत पोलिसांना सहकार्य होण्यासाठी व समाजात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने उपस्थित नेत्यांपैकी प्रमुख दहा नेत्यांची समन्वय समिती नेमण्यात आली होती. 'विशेष पोलिस महानिरीक्षक अथवा पोलिस अधीक्षकांनी कोणतीही सत्यशोधन समिती स्थापन केलेली नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ग्रामस्थांची समिती स्थापन केली आहे. मात्र, त्याचा सत्यशोधन समितीशी कोणताही संबंध नाही', अशी माहिती आयजी नांगरे-पाटील यांनी दिली.

चौकट

समन्वय समितीचा अहवाल जुनाच

विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी नेमलेल्या स्थानिक समितीने २० जानेवारी २०१८ मध्येच अहवाल सादर केला होता. त्या अहवालात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. समन्वय समितीला केवळ स्थानिक पातळीवर उपाययोजनांसाठी अहवाल तयार करण्याचे अधिकार दिले होते. अहवाल यापूर्वीच आला होता. दरम्यान, 'याबाबतच्या बातम्या माध्यमांमध्ये कोणी आणल्या याचा शोध घेतला जाईल', असे आयजी नांगरे-पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीकेनंतर ‘मल्टिस्टेट’ नियमाचे मराठीत भाषांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक अहवालात 'मल्टिस्टेट' संदर्भातील पोटनियमांची माहिती इंग्रजीत छापल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी टीका केल्यानंतर जाग आलेल्या गोकुळ प्रशासनाने दुरुस्ती करत इंग्रजी पोटनियमांचे भाषांतर करून ते सर्व दूध संस्थांना पाठवण्यास सुरुवात केली आहे.

'गोकुळच्या अहवालात इंग्रजीत छापलेली मल्टिस्टेटबाबतची नियोजित पोटनियम दुरुस्ती अध्यक्षांनी सर्वसाधारण सभेत वाचून दाखवावी,' अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली होती. या टीकेनंतर 'गोकुळ'ने १६ पानांची पोटनियम दुरुस्ती मराठीमध्ये छापून सर्व दूधसंस्थांना पाठविण्या सुरू केली आहे. इंग्रजीत पोटनियम वाचायला अध्यक्ष घाबरले का? पोटनियम दुरुस्तीचा मराठीतून नव्याने छापलेल्या ७५ हजार पानांचा छपाईचा खर्च आणि सभासदांना पाठवायचा खर्च कोण करणार आहे? याचे उत्तर सत्तारुढ गटाने द्यावे, अशी मागणी गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगले, किरणसिंह पाटील, कुंभीचे संचालक किशोर पाटील, राऊ पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात असे म्हटले आहे की, गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा घाट सत्तारुढ गटाने घातला आहे. संघाने दूध संस्थांना पाठविलेल्या अहवालात मल्टिस्टेटबाबतची पोटनियम दुरुस्ती इंग्रजीत छापली होती. दूधसंस्थांना गोकुळचा अहवाल मिळताच शेतकरी दूध उत्पादकांना इंग्रजीतील ही पोटनियम दुरुस्ती समजली नाही. आमदार सतेज पाटील यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर गोकुळने मराठी भाषेतील पोटनियमांची प्रत पाठवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाधिकारी लोहार सक्तीच्या रजेवर

$
0
0

विभागातील शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी होणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी होणार आहे. जिल्हा परिषदेचे पाच सदस्य आणि एका अधिकाऱ्याच्या संयुक्त समितीव्दारे चौकशी करण्याचा आणि तोपर्यंत लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाला. लोहार यांच्यासह माध्यमिक शिक्षण विभागातील शिपायापासून सर्व अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्याचे ठरले.

'लोहार यांनी एका शिक्षकाकडे तीन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. पैसे दिले नाहीत तर त्या शिक्षकाला नोकरीवरुन काढून टाकतो असा दम भरला. त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे संबंधित शिक्षकाने आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे,' असा गंभीर आरोप सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केला. लोहार यांच्या गैरकारभारामुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत असून त्यांना एकतर्फी कार्यमुक्त करा, अन्यथा सदस्यपदाचा राजीनामा घ्यावा असा इशारा त्यांनी दिला. सदस्य राहुल आवाडे, अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे यांनी लोहार यांच्या कामकाजावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'लोहार हे पदाधिकारी व सदस्यांना जुमानत नाहीत. महिला व बालकल्याण सभापती वंदना मगदूम यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. माध्यमिक विभागातील अधिकारी उर्मटपणाने वागत आहेत. विभागातील सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे.'

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी लोहार यांना तीन महिन्याची नोटीस देवू व वर्तणुकीत सुधारणा झाली नाही तर पुढील कार्यवाही करु, असे सांगितले. त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. सदस्यांनी, लोहार यांच्यावर कारवाई न केल्यास बुधवारी शिक्षण विभागाला कूलूप ठोकू व त्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव करू असा इशारा सभेत दिला. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी लोहार यांना मंगळवारपासूनच चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश मित्तल यांना दिल्या.

.........

चहापेक्षा किटली गरम

माध्यमिक शिक्षण विभागात खेळखंडोबा सुरू आहे. विभागातील सर्वच यंत्रणा भ्रष्ट बनली आहे. शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच गैरकारभारात गुंतले आहेत. चहापेक्षा किटली गरम असा प्रकार या विभागात आहे. चौकशीअंती विभागातील सगळ्या कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करा, अशी सूचना सदस्यांनी केली. शिक्षणाधिकारी लोहार मंगळवारच्या सभेला अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आणल्यावर हायकोर्टातील कामासाठी ते मुंबईला गेल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.

...................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध घोटाळ्यावरून प्रशासन धारेवर

$
0
0

जिल्हा परिषद ... लोगो

.........................

तीन आठवड्यात कारवाई अहवाल जाहीर करण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जादा दराने औषध खरेदी करुन जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही ? औषध घोटाळ्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करुन निलंबित करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग सुरू आहे. दोषी अधिकाऱ्यांना अभय देण्यासाठी सत्तर हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचा सौदा झाला आहे, असा आरोप अशा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाला.

औषध घोटाळ्याच्या चौकशी अहवालाच्या दिरंगाईवरुन आरोग्य अधिकारी योगेश साळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या. पक्षप्रतोद विजय भोजे म्हणाले 'भ्रष्ट अधिकारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांची नावे जाहीर करा, अन्यथा प्रत्येक विभागात पैसे खाणाऱ्या प्रवृत्ती वाढतील. औषध घोटाळ्यातील दोषींचा पर्दाफाश झाला पाहिजे, यामध्ये सदस्य, पदाधिकारी, अधिकारी कुणीही असो त्यांची नावे जाहीर करावीत.' शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी येत्या स्थायी समिती सभेपूर्वी चौकशी व कारवाई अहवाल तयार करुन सदस्यांना माहिती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

सभेत पाचगाव ग्रामपंचायतीला रस्ते व ड्रेनेज लाइनसाठी ४४ लाख रुपये कर्ज मंजूर करण्यावरुन सदस्यांनी आक्षेप नोंदविल्याने त्या प्रस्तावावर निर्णय झाला नाही. पंचायत राज समितीने विविध विभागात अफरातफरी प्रकरणी एक कोटी सहा लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्याचे आदेश दिले आहेत, त्याची वसुली कधी करणार असा सवाल सदस्य सतीश पाटील यांनी केला. सदस्य प्रवीण यादव यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे लक्षतीर्थ वसाहतमधील महात्मा फुले हायस्कूलमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याचे सांगितले. चर्चेत सदस्य मनोज फराकटे, प्रा. अनिता चौगुले, पांडूरंग भादिंगरे, वंदना अरुण जाधव, कल्पना चौगुले, स्वरुपाराणी जाधव, पदमावती पाटील, बजरंग पाटील, हंबीरराव पाटील यांनी भाग घेतला.

.............................................

चंदगड भवनला जागा मंजूर

चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांसाठी कागलकर हाऊस परिसरात चंदगड भवन बांधण्यासाठी १५०० चौरस फूट जागेला सभेने मान्यता दिली. मात्र चंदगड भवनवरुन सदस्यात मतमतांतरे उमटली. चंदगड भवनला विरोध नाही पण एका तालुक्यासाठी भवन नको. भविष्यात प्रत्येकजण मागणी करतील, असा मुद्दा काहींनी मांडला. त्यावर सदस्य कल्लाप्पाणा भोगण, प्रसाद खोबरे यांनी चंदगड भवनची गरज नमूद केली. अध्यक्षा महाडिक यांनी चंदगडमधील सदस्य स्वनिधीतून भवन बांधणार आहेत असे स्पष्ट केले.

.............................

वैयक्तिक लाभार्थी योजनेवरुन खडाजंगी

वैयक्तिक लाभार्थी योजनेतंर्गत ज्या त्या मतदारसंघातील लाभार्थ्यांची शिफारस त्या मतदारसंघाच्या सदस्यांच्या शिफारसीने व्हाव्यात असा मुद्दा प्रसाद खोबरे यांनी मांडला. त्याला लाभार्थी योजनेच्या शिफारसीत कुणीही राजकारण आणू नये, असा टोला राहुल आवाडे यांनी लगाविला. या दरम्यान चंदूर गावातील समस्येवरुन आवाडे व इंगवले यांच्यात खटके उडाले. त्या गावच्या प्रतिनिधींनी निवेदन दिल्यामुळे सदस्य या नात्याने प्रश्न मांडल्याचे इंगवले यांनी सांगितले. त्यावर आवाडे यांनी, 'चांगल्या कामाला पाठिंबा आहे पण हा माझ्या मतदारसंघातील विषय आहे, मी सभागृहात आहे. आचारसंहिता प्रत्येकाला असावी.'असे प्रत्युत्तर दिले.

..............

सभेतील महत्वाचे मंजूर ठराव

जिल्ह्यात ओला दुष्काळा जाहीर करुन सरकारने आर्थिक मदत करावी

कागलकर हाऊस परिसरात चंदगड भवनसाठी १५०० चौरस फूट जागा देण्यास मंजुरी

विविध व्यवसायासाठी आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला शुल्क वाढीचा प्रस्ताव मान्य

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत फायर हायड्रंट सिस्टीम व फायर अलार्म यंत्रण बसविणे

जिल्ह्यातील मोडकळील आलेल्या शाळांच्या वर्ग खोल्यांचे निर्लेखन व दुरुस्ती प्रस्ताव मान्य

कबनूर जलस्वराज्य प्रकल्पाचे तांत्रिक परीक्षण होणार

...................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडीत १६ मंडळांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १३ गावांतील १६ गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषणमुक्त तसेच उच्च ध्वनियंत्रणामुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची लेखी हमी पोलिस प्रशासनाला दिल्याची माहिती शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

एक दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून गेल्या पंधरवड्यापासून मंडळांचे प्रबोधन केले जात आहे. यामध्ये विशेषतः उच्च ध्वनियंत्रणामुक्त गणेशोत्सवावर भर दिला आहे. प्रसंगी कारवाईला तोंड द्यावे लागू नये म्हणून तरुणांना मार्गदर्शन करतानाच विविध उपक्रमांद्वारे गणेश मंडळांचे कौतुक करण्यासाठी प्रशासन पुढे सरसावले आहे. यामध्ये पोलीस प्रशासनाला काहीअंशी यश मिळत असल्याचे रानमाळे यांनी सांगितले.

न्यू स्वराज्य खुटाळवाडी, न्यू ज्योतिर्लिंग गोंडोली, वीर जवान आबासाहेब मंडळ व जाणाताराजा ठमकेवडी, सिद्धिविनायक शिराळे-वारूण, ओम श्री सत्य अविनाश वालुर, कला क्रीडा मंडळ वारूळ, शिवशक्ती माणगांव, जय बजरंग सवते, संतोष कला क्रीडा मंडळ थेरगांव, अंबिका अंबाईवाडा, हिंदू एकता शिवारे, दत्तगुरू मंडळ शिराळे, एकता मंडळ काटकरवाडी, श्री जोतिर्लिंग कांडवण या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विहित नमुन्यातील लेखी अर्जाद्वारे पोलिस प्रशासनाला हमी दिली आहे. दोन दिवसात आणखी गणेशोत्सव मंडळे अशी हमी देणार असल्याची माहितीही रानमाळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवसे यांची निवड

$
0
0

चंदगड : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) च्या विभागीय सहसचिवपदी चंदगड (ता. चंदगड) येथील सोमनाथ गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. इचलकरंजी येथील सत्यनारायण मंगल कार्यालयात झालेल्या कोल्हापूर विभागीय संघटनेच्या वार्षिक सभेत नव्या कार्यकारिणीची घोषणा अध्यक्ष मानसिंग जगताप यांनी केली. त्यांना याकामी चंदगड तालुकाध्यक्ष वसंत सोनार, पुंडलिक पाटील, महादेव गुरव, रामचंद्र निचम, आप्पा गावडे, रामू लोहार व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी घसरली

$
0
0

लक्षतीर्थ वसाहतीत

केएमटीला अपघात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने लक्षतीर्थ वसाहत येथील पाणंद रोडवर केएमटी बस रस्त्याजवळील खड्यात अडकली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवासी घाबरुन गेले. या बसमध्ये ५५ प्रवासी होते. मात्र कोणीही जखमी झालेले नाही. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लक्षतीर्थ वसाहत बस थांब्यावरून भवानी मंडपकडे केएमटी बस धावली. लक्षतीर्थ येथील पाणंद येथे एका वळणावर चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याशेजारी खड्यात अडकली. घाबरुन गेलेले प्रवासी तातडीने बसमधून उतरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीर नगर वाचन मंदिराची सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर नगर वाचन मंदिराच्या नूतन वास्तूसाठी देणगी देण्याचे आवाहन संस्थेचे कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिराची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या विश्वनाथ पार्वती सभागृहात झाली.

सभेत कार्यवाह कुलकर्णी यांनी संस्थेच्या नूतन वास्तूच्या अंतर्गत भागातील रचनेबाबतची माहिती दिली. नूतन वास्तूसाठी वाचक, सभासदांनी देणगी द्यावी असे आवाहन केले. संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, कार्याध्यक्ष अभिजित भोसले, सहकार्यवाह अश्विनी वळिवडेकर, कोषाध्यक्ष आशुतोष देशपांडे,संचालक डॉ. रमेश जाधव, अनिल वेल्हाळ, उदय सांगवडेकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रंथपाल मनीषा शेणई यांनी अहवालवाचन केले. समृद्धी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी गुरुदत्त म्हाडगुत, अॅड. केदार मुनिश्वर, प्रशांत वेल्हाळ, अतुल शिंदे, डॉ. संजीवनी तोफखाने, मनीषा वाडीकर, अंतर्गत हिशोब तपासनीस दीपक गाडवे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच तालुक्यांत जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : ग्रामिण भागात जैववैद्यकीय कचऱ्यावर योग्यरितीने प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे अशा ठिकाणचा कचरा संकलित करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला दिले आहेत. मंडळाच्या निर्देशानुसार महापालिका शहरालगतच्या पाच तालुक्यांतून जैव वैद्यकीय कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करणार आहे. करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड व गगनबावडा या तालुक्यांचा यात समावेश आहे. या तालुक्यांतील वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न निकालात निघण्यासह महापालिकेला त्यातून उत्पन्नही मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन व हाताळण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील रुग्णालये, सुश्रूषा केंद्र, दवाखाना, पशूवैद्यकीय संस्था, ब्लड बँका येथून नियमित जैववैद्यकीय कचरा संकलित केला जातो. शहरात रोज सुमारे ९०० किलो वैद्यकीय कचरा जमा करून त्यावर शास्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. शहरात महापालिका उपाययोजना करत असली, तरी ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय कचऱ्याबाबत कोणतीही उपाययोजना नाही. तशी यंत्रणाही कार्यन्वित नाही.

ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल्सची संख्या कमी आहे. मात्र येथे निर्माण होणारा वैद्यकीय कचरा कोठे टाकला जातो, याबाबतची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळेच ग्रामीण भागात सुविधा देण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिल्या आहेत. त्यानुसार महापालिका करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड व गगनबावडा या तालुक्यांतील वैद्यकीय कचऱ्याचा उठाव करणार आहे. कचरा उठाव करण्यापासून ते त्याची वाहतूक, त्यावरील प्रक्रिया या सर्व बाबी महापालिका पूर्ण करणार आहे. त्यासाठी ठराविक शुल्कही आकारणार आहे. ज्या आस्थापनांमधून असा जैववैद्यकीय कचरा संकलित करू दिला जाणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिले आहेत. प्रदूषण मंडळाच्या निर्देशांमुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न निकालात निघण्याची शक्यता आहे.

महापालिकेचा स्वत:चा प्रकल्प

कसबा बावडा येथील प्लांटमध्ये जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नेचन नीड कंपनीला ठेका दिला होता. मात्र कंपनी वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावत नसल्याच्या तक्रारी होत्या. कंपनीने महापालिकेचे ६० हजारांच्या भुईभाड्यासह ५३ लाखांची रॉयल्टी जमा केलेली नाही. त्यामुळे महापालिकेने जून महिन्यात प्रकल्प सील करुन स्वत: चालविण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असले, तरी पाच तालुक्यांतून संकलित वैद्यकीय कचऱ्यावर याच प्लान्टमध्ये प्रक्रिया करण्यात येणार आहे.

प्रतिमहा शुल्क (रुपयांत)

प्रकार शुल्क

दवाखाना ४००

दातांचा दवाखाना ६६०

लॅबोरेटरी ११५८

ब्लड बँक ४८३१

हॉस्पिटल ७.३० (प्रतिबेड)

तालुक्याच्या ठिकाणांवरील जैववैद्यकीय कचरा संकलित करण्यास प्रदूषण मंडळाने मान्यता दिला आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने वैद्यकीय कचरा संकलित करून त्यावर शुल्क आकारून प्रक्रिया करण्यात येणार आहे.

- डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदूक परवाने वारसांच्या नावे करण्यासाठी लढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

सरकार दिवसेंदिवस बंदूक परवानाधारकांवर जाचक अटी लादून परवाने बंद करण्याच्या मन:स्थितीत आहे. पण शेती आणि आत्मसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने गरजेचे आहेत. जुने परवाने वारसांच्या नावे करण्यासाठी सर्व परवानाधारकांनी संघटित होऊन सरकारविरोधात लढा उभारावा, असे आवाहन भोगावती कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय पाटील यांनी केले. कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे बंदूक परवानाधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

कसबा तारळे येथे कोल्हापूर जिल्ह्यातील बंदूक परवानाधारकांचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी कसबा तारळेचे सरपंच अशोक कांबळे होते. भोगावतीचे माजी संचालक दत्तात्रय पाटील म्हणाले, 'सरकार स्वसंरक्षण, शेती संरक्षणासाठी दिलेले परवाने रद्द करण्याचा घाट घालत आहे. परवाने नूतनीकरणासाठी जाचक अटी लावल्या जात आहेत. इतर मालमत्ता वारसांच्या नावावर होत असताना बंदूक परवाने वारसांच्या नावावर का केले जात नाहीत? हा प्रश्न आहे. याविरोधात संघटित लढा देणार आहे.'

संघटित वारसांनी तालुका आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करून परवाना वारसांच्या नावे करावा, परवान्यांच्या नूतनीकरण एक महिन्याच्या आत करावे, जाचक अटी रद्द कराव्या, शस्त्र नूतनीकरणसाठी आर्थिक पिळवणूक थांबवावी, आदी ठराव करण्यात आले. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदारांना देण्याचे ठरवण्यात आले. रामचंद्र पाटील, अमृत पाटील, युवराज धनवडे यांनी मनोगत व्यक्त केली. भोगावतीचे माजी शेती अधिकारी व्ही. डी पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील, धनाजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बंदूक परवानाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images