Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोनगेजवळ झाड कोसळले, वाहतूक ठप्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

निपाणी-राधानगरी मार्गावर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सोनगे (ता. कागल) गावच्या बस स्टँडनजीक असणारे चिंचेचे मोठे झाड रस्त्यावरच उन्मळून पडल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली. गेले तीन महिने पडत असलेल्या सततच्या पावसाने शेकडो वर्षे जुन्या असलेले चिंचेचे मोठे झाड अचानक गावच्या सुरू असणाऱ्या विद्युत वाहिनीवर पडल्याने जोराचा आवाज आला. गावातील स्टँडमध्ये बसलेल्या नागरिकांनी ताबडतोब वीज वितरण कार्यालयात व संबंधित खात्याशी संपर्क करून झालेली घटना कळवली. रात्री सातपर्यंत पडलेले झाड संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांनी बाजूला केले. रस्त्यात झाड पडल्याने प्रवाशांना दोन तास ताटकळत बसावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे चौकशी केली असता मानधनासाठी बजेट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तीन सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस या खाऊवाटपाखेरीज कोणतेही काम करणार नाहीत व कोणताही अहवाल देणार नाहीत, असा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत. जानेवारी २०१८ पासून अनेक महिलांचे मानधन कमी अधिक प्रमाणात थकीत आहे. जिल्ह्यातील २६ महिला कर्मचाऱ्यांना कित्येक महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. तर राज्यातील १२०० कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघाने आंदोलनाचा निर्णय घेतल्याची माहिती कर्मचारी संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंडाअभावी रखडले प्रकल्प

$
0
0

भूखंडापोटी आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र, कत्तलखाना, कचरा प्रकल्प कागदावरच

Gurubal.Mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर

कार्यालयासाठी भूखंड मिळत नसल्याने कोल्हापुरात अनेक प्रकल्पांबरोबरच काही विभागीय केंद्रे सुरू होण्यात अडचणी येत आहेत. यामुळे प्रकल्प सुरू होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाकडून 'जागा द्या जागा' अशी विनवणी सुरू आहे. यासाठी प्रत्येकाचा डोळा शेंडापार्कातील जमिनीवर असून ते मिळत नसल्याने विकासालाच खो बसत आहे. खंडपीठापासून ते आरोग्य विद्यापीठापर्यंत सर्वच केंद्रे जागेच्या प्रतीक्षेत रखडली आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे कोल्हापूरकरांचा लढा सुरू आहे. याला सरकारी पातळीवर हिरवा कंदील मिळाला, पण इमारत बांधायची कुठे या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने हा प्रस्ताव रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह अनेकजण यासाठी पाठपुरावा करत आहेत, मात्र त्यामध्ये यश येत नसल्याने खंडपीठाचा मुद्दा पुढे सरकण्यात अडथळा येत आहे.

खंडपीठाप्रमाणे आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्रही भूखंडासाठी रखडले आहे. वीस वर्षांपूर्वी नाशिक येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठाची स्थापना झाली. राज्यभरातील वैद्यकीय कॉलेजना प्रत्येक गोष्टीसाठी नाशिकला येणे गैरसोयीचे होते, म्हणून त्याचवेळी पाच विभागीय केंद्रांची घोषणा झाली. त्यामध्ये कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर व औरंगाबाद यांचा समावेश होता. कोल्हापूर वगळता इतर सर्व केंद्रे सुरू झाली. पण अजूनही केवळ इमारतीची सोय होत नसल्याने कोल्हापूरचे केंद्र अद्याप कागदावरच आहे. या भागात पन्नासपेक्षा अधिक कॉलेज असूनही विभागीय केंद्र सुरू न झाल्याने त्याचा फटका या कॉलेजना बसत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी या कॉलेजच्या प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना नाशिकला जावे लागत आहे.

दरम्यान, प्रवासी संख्या आणि उपलब्ध जागा यांचा ताळमेळ बसत नसल्याने मध्यवर्ती बसस्थानकातील समस्या वाढत आहेत. यामुळे हे स्थानक शेंडापार्कात हलवण्याचा प्रस्ताव आहे. पोलिस आयुक्तालय कोल्हापुरात होण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण या दोन्हीसाठी सध्या तरी भूखंड उपलब्ध नाहीत. भारत राखीव बटालियन मंजूर असून तमदलगे व रेंदाळ येथे गायरान असूनही ग्रामस्थांनी विरोध केल्याने ते होण्यात अडथळा येत आहे. महापालिकेचा कचरा प्रकल्प आणि कत्तलखाना देखील केवळ भूखंडाअभावी सुरू झाला नाही. निधी असूनही हे प्रकल्प रखडल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आरटीओ कार्यालयाची ताराबाई पार्कात इमारत आहे. पण वाहनांची वाढलेली संख्या, वाढलेले काम यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. यातून अनेकदा वाहने न पाहताच परवाना दिला जातो. टेस्टींग ट्रॅकसाठी या कार्यालयाने मोरेवाडी येथे प्रथम पंधरा व नंतर पाच एकराचा भूखंड मागितला. पण सरकारने केवळ पंधरा गुंठेच जागा दिल्याने हा प्रस्ताव देखील धूळखात पडला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अनेक प्रकल्प मंजूर असूनही केवळ जमीन नसल्याने ते सुरू होण्यात अडचणी येत आहेत.

.............

कोट

'आरोग्य विद्यापीठाचे केंद्र कोल्हापुरात झाल्यास चार जिल्ह्यातील वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल व नर्सिंग कॉलेजच्या प्रशासकीय कामासाठी फायदा होणार आहे. यामुळे शेंडापार्कातील जागा अथवा सीपीआरमधील जागा देण्याची गरज आहे.

डॉ. राजकुमार पाटील, प्राचार्य हॉमिओपॅथी कॉलेज

चौकट

या प्रकल्पांना प्रतीक्षा भूखंडाची

कोल्हापूर खंडपीठ

पोलिस आयुक्तालय

भारत राखीव बटालियन

आरोग्य विद्यापीठ विभागीय केंद्र

मध्यवर्ती बसस्थानक

आरटीओ टेस्टींग ट्रॅक

महापालिका कचरा प्रकल्प

अत्याधुनिक कत्तलखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभासद १६ हजार, सभागृह ३०० क्षमतेचे

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे सभासद १६ हजार, पण सर्वसाधारण सभेसाठी ३०० आसन क्षमतेचे सभागृह. संघाच्या व्यवस्थापनाच्या गलथानपणामुळे मंगळवारी आयोजित ७८ व्या सर्वसाधारण सभेत शेकडो सभासदांनी प्रत्यक्ष कामकाजात सहभाग घेतला नाही. संघावर निष्ठा ठेवत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूरपर्यंत धाव घेतलेल्या सभासदांना कमी आसन क्षमतेच्या सभागृहामुळे सभेला मुकावे लागले. संघाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनविण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, अशा भावना सभासदांनी व्यक्त केल्या.

वार्षिक सभेत वर्षभराच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला जातो, तसेच सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर थेट चर्चा यानिमित्ताने होत असल्याने सर्वसाधारण सभा हा प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. शेतकरी संघाचे बहुतांश सभासद शेतकरी आणि सामान्य कुटुंबांतील आहेत. आठ दशकांच्या कालावधीत संघाच्या वाटचालीत चढउतार आले, पण सामान्य सभासदांची आजही संघावर निष्ठा असल्याची प्रचिती मंगळवारी आली. गेले काही दिवस जिल्हाभर पावसाची संततधार सुरू असतानाही ७८ व्या सर्वसाधारण सभेला सभासदांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. दुचाकी वाहने, एसटी बसमधून सभासद सभेला हजेरी लावण्यासाठी आले होते. सभेची वेळ दुपारी एकची होती, यामुळे प्रत्येकजण लगबगीने दसरा चौकात दाखल होत होता.

'तत्पूर्वीच सत्तारूढ गटाच्या समर्थकांनी शाहू स्मारक भवन काबीज केले होते, यामुळे सभेसाठी येऊनही प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होता आले नाही याबद्दल अध्यक्ष युवराज पाटील व उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत,' असे सभासदांनी सांगितले. दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाल्यानंतर शेकडो सभासद शाहू स्मारक भवनच्या बाहेर व दसरा चौक पटांगणावर थांबले होते. सभासदांना प्रत्यक्ष सभेत सहभागी होता आले नाही. सभागृहात काय सुरू आहे हे त्यांना समजत नव्हते. जागेअभावी सभासदांची गैरसोय झाल्याचे लक्षात आल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांनी, सर्वसाधारण सभेत सभासदांची माफी मागितली. पुढील वर्षी मोठ्या सभागृहात सर्वसाधारण सभा घेऊ असे सांगत अध्यक्षांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांच्याकडे चौकशी केली असता, गेली काही वर्षे सर्वसाधारण सभेला गर्दी कमी होत असल्याने यंदा शाहू स्मारक भवनमध्ये सभा घेतल्याचे सांगितले.

०००

खाऊची पाकिटे गायब

सर्वसाधारण सभेला हजर राहिलेल्या सभासदांना चहापाणी व खाऊची पाकिटे दिली जातात. सोमवारी अनेक सभासदांना खाऊची पाकिटे मिळाली नाहीत. तयार पाकिटे कुठे गायब झाली अशी विचारणा सभासदांनी केल्या. पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकाना यासंदर्भात लक्ष घालण्याची सूचना केली.

००००

'पोटनियम'विरोधात कायदेशीर लढाई

निवडणुकीबाबतच्या पोटनियम दुरुस्तीला मंजुरी मिळाली असली तर त्यामुळे सामान्य सभासदांवर अन्याय होणार आहे. त्याविरोधात कायदेशीर लढाई करू, असे माजी कार्यकारी संचालक सुरेश देसाई यांनी सांगितले. सहकारमूर्ती तात्यासाहेब मोहिते व बाबा नेसरीकर यांच्या विचारधारेनुसार संघाची वाटचाल व्हावी यासाठी पाठपुरावा कायम राहील असेही देसाई यांनी सांगितले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षेविषयी आज मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आजरेकर फाउंडेशन व मुस्लिम बोर्डिंग ग्रंथालयतर्फे बुधवारी (ता. २९) खासदार संजय काकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.जॉर्ज क्रूझ, जीएसटी विभागाचे उपायुक्त सलीम बागवान मार्गदर्शन करणार आहेत. शाहू स्मारक भवन येथे दुपारी चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. शिबिराच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेतील संधी, करिअरची दिशा यासंबंधी मार्गदर्शन होणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनचे आशपाक आजरेकर, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर व प्रशासक कादर मलबारी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनाचा इशारा

$
0
0

कोल्हापूर

महावितरण कंपनीकडून राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीसाठी फेरयाचिका दाखल केली आहे. या फेरयाचिकेमध्ये जवळपास १५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने दिला आहे. महावितरण कंपनी ही सरकारच्या अखत्यारित असून वीज दरवाढीला पाठिंबा दिल्यास आंदोलन केला जाईल, असा अशारा बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने दिला आहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष किसन कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी, कार्याध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी यासंबंधी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेतील गटबाजी स्पष्ट

$
0
0

शिवसेना बातमीत चौकट

.................

दरम्यान, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यास आमदार राजेश क्षीरसागर व त्यांच्या गटातील पदाधिकारी अनुपस्थित होते. गेल्या आठवड्यात संपर्क नेते दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत शहर शिवसेनेचा मेळावा आमदार क्षीरसागर यांनी घेतला होता. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गैरहजर होते. या दोन मेळाव्यांवरुन शिवसेनेतील गटबाजी स्पष्ट दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाज मर्यादा पाळा, अन्यथा कारवाई

$
0
0

(फोटो आहे)

आवाज मर्यादा पाळा अन्यथा कारवाई

ध्वनीयंत्रणा चालकांच्या बैठकीत पोलिसांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या तीन वर्षांपासून शाहूवाडी उपविभागात एकाही मंडळाने गणेश उत्सवात आवाज मर्यादेचे उल्लंघन केले नाही. यंदाही मंडळांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे. आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्या मंडळांसह ध्वनीयंत्रणांच्या मालकांवरही कारवाई केली जाईल,' असा इशारा शाहूवाडी उपविभागाचे उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी दिला. उपअधीक्षक कार्यालयात मंगळवारी (ता. २८) घेतलेल्या ध्वनीयंत्रणा मालकांच्या बैठकीत ते बोलत होते.

शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली जात आहे. शाहूवाडी उपविभागाचे उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसह ध्वनीयंत्रणा चालक, मालकांचे प्रबोधन सुरू केले आहे. यासाठी मंगळवारी ध्वनीयंत्रणा चालकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बोलताना उपअधीक्षक पाटील म्हणाले, 'उत्सवांमध्ये आवाज मर्यादेचे पालन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याचे उल्लंघन झाल्यास संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. शाहूवाडी उपविभागात गेल्या तीन वर्षात एकाही मंडळाने आवाज मर्यादेचे उल्लंघन केले नाही. यंदाही आवाजाची मर्यादा पाळावी. गणेश मंडळांसह ध्वनीयंत्रणा चालक, मालकांचे प्रबोधन केले जात आहे. याकडे दुर्लक्ष करून कोणी आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई होणारच.'

बैठकीत ध्वनीयंत्रणा चालकांनी आवाज मर्यादा पाळण्याचे आश्वासन दिले. पारंपरिक वाद्यांसह आवाज मर्यादेत मिरवणूक काढणाऱ्या मंडळांची पोलिसांनी विनाकारण अडवणूक करू नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यावेळी शाहूवाडी उपविभागातील ४० ध्वनीयंत्रणा चालक, मालक उपस्थित होते. त्याचबरोबर शाहूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोहर रानमाळे, राधानगरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक इंदुलकर, कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक संजीव झाडे, कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरटा अटकेत

$
0
0

(फोटो आहे)

चोरटा जेरबंद

कोल्हापूर

रंकाळा खण येथे मोपेडच्या डिकीतून एक लाखाची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. धीरज मिरासो शिंगाडे (वय २०, रा. इचलकरंजी) असे चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून ८५ हजार रुपयांसह चोरीच्या रकमेतून खरेदी केलेला मोबाइल पोलिसांनी जप्त केला. हा चोरीचा प्रकार शनिवारी (ता. २५) संध्याकाळी पाचच्या सुमारास घडला होता. इंद्रजित दत्तात्रय पसारे (६२, रा. देवकर पाणंद) हे रंकाळा खणीत पोहण्यासाठी गेल्यानंतर धीरज शिंगाडे याने पसारे यांच्या मोपेडच्या डिकीतील रक्कम लंपास केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वारावर गुन्हा

$
0
0

गडहिंग्लज : निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अनिल तानाजी आढावकर (रा. वडरगे, ता. गडहिंग्लज) याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अरुण बाबूराव शिंदे पत्नीसह सकाळी पावणे सहा वाजता वडरगे रोडवर फिरायला गेले होते. मिल्को आइस्क्रीम फॅक्टरीजवळ आले असताना आढावकर मोटारसायकल (एमएच ०९ डी ४६२८) घेऊन पाठीमागून आला. त्याने शिंदे यांना धडक दिली. त्यात त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. याबाबत शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदी व्यावसायिकांची आर्थिक कोंडी

$
0
0

प्रवीण कांबळे, हातकणंगले

हुपरी (ता. हातकणंगले) येथील चांदी व्यवसायाला कोणत्याही प्रकारची कर्जे देण्यास राष्ट्रीयीकृत बँकेच्या नकारघंटेने चांदी व्यावसायिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. सरकारच्या घोषणेने सर्वसामान्यांना विनातारण, किरकोळ कागदपत्रांच्या सहाय्याने दिल्या जाणाऱ्या मुद्रा योजनेसह अन्य सरकारी योजनांचा हुपरी शहरात पूर्णपणे फज्जा उडाला आहे. फक्त 'व्हाइट कॉलर' नेत्यांना व त्यांच्या बगलबच्च्यांना या बँकांतून सहज कर्जे उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य चांदी व्यावसायिक अक्षरशः हतबल झाले असून, त्यांना चांदी व्यवसाय बंद करून पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामाला जावे लागत आहे.

दरम्यान, गावभागातील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपद्व्यापाने शहरातील सर्वसामान्य चांदी व्यावसायिकांवर संक्रांत आल्याचे बोलले जात असून या कर्मचाऱ्यांनी काही व्यावसायिकांना पात्रता नसताना कोट्यवधी रुपयांची कर्जे देऊन लाखो रुपये कमिशन घेतल्याचे बोलले जात आहे.

हुपरीतील अनेक राष्ट्रीयीकृत बँका चांदी व्यवसायासाठी कर्जे दिली जात होती, परंतु गेल्या काही वर्षांत 'एका' बँकेतील शिपायाने अन्य कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे तारण न घेता कोट्यवधी रुपयांची कर्जे वाटली. त्यातील एकही पैसा संबंधित व्यावसायिकांनी बँकेत न भरल्याने बँकेची सुमारे २२ कोटींची थकबाकी वाढली. त्यामुळे शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी चांदी व्यावयासियांना कर्जे देण्यास साफ नकार दिला आहे. त्याबरोबरच अन्य उद्योगांना मात्र तत्काळ कर्जे उपलब्ध करून दिली जात आहेत. बँकांच्या या धोरणाने सर्वसामान्य व्यावसायिकांना चांगलाच धक्का बसला आहे. मुळात हुपरीतील निम्म्या भागाचा अद्याप सिटी सर्व्हे झाला नसल्याने कोणत्याही बँकेत घर-जागा तारण होत नाही तसेच सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नवनवीन मुद्रा योजनेंसह अन्य योजनांतून सद्य:स्थितीत कोणत्याही बँकेत कर्जे दिली जात नाहीत. यामुळे अनेकांनी चांदी व्यवसाय बंद करून पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत नोकरीस जाणे पसंत केले आहे.

सरकारने सर्वसामान्यांना उद्योगांना सहज कर्जे उपलब्ध होण्यासाठी राबविलेल्या अनेक योजनांना शहरातील राष्ट्रीयीकृत बँका केराची टोपली दाखवत असून, एका बँकेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारनाम्याने सर्वच चांदी व्यावसायिकांना परिणाम भोगावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

००००

कोट...

हुपरी परिसरात चांदी उद्योजकांना सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी जाणीवपूर्वक कर्जपुरवठा थांबवला आहे. काहीजणांना पात्रता नसताना एका बँकेने भरघोस कर्जे दिल्याने ती थकीत गेली. यामध्ये 'त्या' बँकेची चूक असून कर्जे कोणत्या आधारे दिली याची चौकशी व्हावी. अन्य चांदी व्यावसायिकांवर अन्याय न करता शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी कायदेशीर कादपत्रांची पूर्तता करूनच कर्जपुरवठा केल्यास व्यवसायाला गती येईल.

दिनकरराव ससे, ज्येष्ठ संचालक, चांदी कारखानदा असो., हुपरी

००००

चांदी व्यावसायिकांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जपुरवठा होण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती, पण सर्वच बँकांकडून चांदी उद्योगाला कर्जपुरवठा करण्यास नकार देण्यात आला. एका बँकेने काहीजणांना दिलेल्या थकीत कर्जासाठी शहरातील चांगल्या व्यावसायिकांना डावलणे चुकीचे आहे. यामुळे चांदी व्यवसायावर विपरीत परिणाम जाणवत असून चांगल्या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

चंद्रशेखर नाईक अध्यक्ष,चांदी कारखानदार असोसिएशन,हुपरी.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धाब्यावर तोडफोड,आठजणांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,इचलकरंजी

कोल्हापूर-जयसिंगपूर रोडवरील विजय धाबा येथे साहित्याची तोडफोड करून वेटरला मारहाण प्रकरणातील आठजणांना स्थानिक गुन्हे शाखेने इचलकरंजीत अटक केली. योगेश विठ्ठल मुरुमकर (वय २१), पवन शंकर नाईक (वय १९), श्रीकांत ऊर्फ शुभम विलास गळंगे (वय १९), आकाश ऊर्फ नारायण युवराज घोरपडे (वय २१), अंकुश आप्पाजी केसरकर, गणेश बाबासाहेब गायकवाड (वय २१, सर्व रा. गणेशनगर), विशाल दशरथ सूर्यवंशी (वय २१, रा. लालनगर), अनिल अंतुसा गिणानी (वय २०, रा. मंगळवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत, तर नीलेश बाळासाहेब पाटील (रा. गणेशनगर) फरार आहे.

कोल्हापूर-जयसिंगपूर रोडवरील विजय धाबा येथे सोमवारी रात्री इचलकरंजीतील सात ते आठजण जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे बिलावरून वाद होऊन सर्वांनी तेथील वेटरला मारहाण करीत साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. याप्रकरणी जखमी वेटर रमेश हिंदुराव कांबळे (वय ५०, रा. चिपरी, ता. शिरोळ) यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

या प्रकरणातील संशयितांचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला रेकॉर्डवरील योगेश मुरुमकर व नीलेश पाटील यांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. तसेच सर्व संशयित येथील गणेशनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचून सर्वांना अटक केली. या सर्वांनी नीलेश पाटीलसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या सर्वांना ताब्यात घेऊन जयसिंगपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत १ सप्टेंबरपासून विद्यार्थी शिष्यवृत्ती मदत केंद्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

एकाच छताखाली शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून मोफत ऑनलाइन फॉर्म भरून देण्यासह पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी १ सप्टेंबर २०१८ पासून विद्यार्थी शिष्यवृत्ती मदत केंद्र सुरू करण्यात येत असल्याची घोषणा आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.

केंद्र व राज्य सरकारमार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृती योजनांची इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शहर व परिसरातील विविध महाविद्यालये, हायस्कूल, शाळांमधील १३८ प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. याप्रसंगी कोल्हापूर विभागीय सहसंचालक अजय साळी प्रमुख उपस्थित होते.

मराठा क्रांती संघटनेच्या आंदोलनामुळे राज्यातील मराठा समाजासह इतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेसह सर्वच शिष्यवृत्ती योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार हाळवणकर यांनी सर्व विभागीय संचालक, प्रशासन अधिकारी, गट विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व प्राचार्य यांची संयुक्त बैठक येथील दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स कॉलेजमध्ये आयोजित केली होती. यावेळी मुख्याध्यापक, प्राचार्यांना विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती नसल्याचे लक्षात आले. त्या सर्व योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली.

यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी, माध्यमिक विभाग सहसंचालक सुभाष चौगुले, समाजकल्याण विभागाचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, शिक्षण समिती प्रशासन अधिकारी राजाराम काळगे, गटविस्तार अधिकारी नम्रता गुरसाळे, प्राचार्य सी. आर. पाटील, भाजप शहराध्यक्ष शहाजी भोसले, दीपक पाटील, आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : कृष्णा नाणंग

$
0
0

कृष्णा नाणंग

गारगोटी : नाधवडे (ता. भुदरगड) येथील कृष्णा रामा नाणंग (वय ८५) यांचे निधन झाले. मुंबई हायकोर्टातील क्लार्क सुशांत नाणंग यांचे ते आजोबा व प्राथमिक शिक्षक संजय नाणंग यांचे चुलते होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी सहकारी संघाच्या सर्वसाधारण सभेत पोटनियम दुरुस्ती मंजुरीवरून काही काळ गोंधळ झाला. संघाच्या निवडणुकीस उभे राहण्यासाठी व्यक्ती व संस्था सभासद गटातून २५ हजार रुपयांचे शेअर्स असावेत, या प्रस्तावाला सत्तारुढ गटातील चार संचालकांसह सभासदांनी विरोध केल्याने शेअर्सची रक्कम १५ हजार करण्यात आली. मंजूर, नामंजूरच्या गदारोळातच पोटनियम दुरुस्तीचा प्रस्तावाला सत्तारुढ संचालकांनी मान्यता घेतली. सभेत माजी संचालक व काही सभासदांना प्रश्न विचारताना अटकाव करण्याचा प्रकार घडला. तसेच त्यांच्या भाषणादरम्यान अडथळे आणून सत्ताधाऱ्यांनी अर्धा तासात सभा गुंडाळली.

सभेत संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर व माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते यांच्यात खडाजंगी उडाली. अध्यक्ष युवराज पाटील म्हणाले, 'सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज केले. संघावर आता जिल्हा बँकेसह कुणाचेही कर्ज नाही. आर्थिक वर्षात संघाचा नफा एक कोटी ४० लाखांवर पोहोचला. यंदा सभासदांना १३ टक्के लाभांश वाटपाची घोषणा केली. डिझेल आणि खतविक्रीत वाढ झाली आहे. आगामी वर्षातही संघाच्या व्यवसायात घसघशीत वाढ होईल. येत्या वर्षात संघाचा नफा दोन कोटी ५० लाख रुपयांचा टप्पा पार करेल. पुढील वर्षी १४ टक्के लाभांश देऊ.'

व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. विषयपत्रिकेवरील बारा विषय मंजूर केले. दरम्यान संघाची निवडणूक लढविणाऱ्यांना व्यक्ती व संस्था गटातून २५ हजार रुपयांचे शेअर्स असावेत तसेच प्रतिवर्षी व्यक्ती गटातून २५००० हजार व संस्था सभासद गटातून एक लाख रुपयांची खरेदी बंधनकारक करण्याच्या पोटनियम दुरुस्तीला माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते, माजी संचालक विजय पोळ यांनी थेट विरोध केला. मोहिते म्हणाले, 'शेतकरी संघ सामान्य सभासदांच्या मालकीचा आहे. सामान्य सभासदाला २५ हजार रुपयांचे शेअर्स बंधनकारक करणे म्हणजे त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रकार आहे. शिवाय २५ हजार रुपयांची खरेदीची अट अन्यायी आहे.'

अध्यक्ष पाटील यांनी 'संघाचे भागभांडवल वाढावे, संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावा यासाठी पोटनियम दुरुस्तीचा निर्णय घेतला. त्यावरून काही संचालकांशी मतभेद झाले, पोटनियम दुरुस्तीला विरोध दर्शविलेले संचालक शिवाजीराव कदम व इतरांशी चर्चा केली. चर्चेत शेअर्सची रक्कम १५ हजारांवर एकमत झाले आहे,' असे उत्तर दिले. त्यानंतरही मंजूर, नामंजूरच्या गोंधळातच पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव हात उंचावून मान्य झाला. सभेला संचालक विनोद पाटील, शोभना शिंदे, शिवाजीराव कदम, व्यंकाप्पा भोसले, सुमित्रा शिंदे, अण्णासाहेब चौगुले, यशवंतराव पाटील टाकवडेकर, शशिकांत पाटील, अमरसिंह माने, विनोद पाटील, व्यंकाप्पा भोसले, आदी उपस्थित होते.

००००

कागलकरांनो, सभासदांचे ऐकून घ्या

मोहिते व पोळ यांनी पोटनियम दुरुस्तीला विरोध सुरू करताच सत्ताधारी समर्थकांनी उभे राहून मंजूर, मंजूर अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर मोहिते यांनी, 'कागलकरांनो थांबा, सभासदांना बोलू द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या' असे उत्तर दिले. त्यावर कागलचे भैय्या माने यांनी, 'पोटनियम दुरुस्ती हा संघाच्या भल्यासाठी आहे. संघाच्या उत्पन्नात भर पडणार असून त्याला कुणी विरोध करु नये' अशी भूमिका मांडली.

००००

काड्या टाकू नका

उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी 'अध्यक्ष युवराज पाटील यांनी धाडसी निर्णय घेतल्याने संघ कर्जमुक्त बनला. माझा कुठल्याही दोन कुटुंबांमध्ये भांडणे लावण्याचा उद्देश नाही. मात्र, २०१० च्या निवडणुकीत अजितसिंह मोहिते यांनी चुलते वसंतराव मोहिते अध्यक्ष होण्याऐवजी आनंदराव पाटील-चुयेकर अध्यक्ष व्हावेत अशी भूमिका घेतली होती,' असे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याला अजितसिंह मोहिते यांनी जोरदार आक्षेप घेत 'काड्या टाकू नका,' असा टोला लगावला. तर पोळ यांनी काडीपेटी घेऊन आलात का? अशी टिप्पणी केली.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊसतोड कामगारांचा१ ऑक्टोबरला मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऊसतोडणी, वाहतूकदार कामगारांना टनाला प्रतिटन ३७८ रुपये मिळावेत, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १ ऑक्टोबरला येथील साखर सहसंचालक कार्यालयावर महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होईपर्यंत ऊसतोडणी मजूर संपावर जातील. त्यासाठी सप्टेंबरमध्ये कारखानानिहाय आणि विभागीय पातळीवर कामगारांचे मेळावे आयोजित केले जातील, अशी माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब चौगुले, सचिव सुभाष जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 'ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ करावी, ऊसतोडणी कामगार ठेकदारांच्या कमिशनमध्ये २० टक्क्यांनी वाढ करावी, ऊसतोडणीस, वाहतूक कामगार, ठेकेदार यांचा सामावेश माथाडी बोर्डात करावा, त्यांना ओळखपत्र द्यावे, अपघात विमा लागू करावा, विम्याचा प्रीमियम सरकार, साखर कारखानदार, मजुरांनी प्रत्येकी २० टक्क्यांच्या प्रमाणानुसार भरावा, भविष्यनिर्वाह निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, याकडे सरकार सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. मजुरीसंबंधी संघटनेशी झालेला करार या हंगामात संपणार आहे. नवा करार करताना अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्यांचा विचार केला पाहिजे. त्यासाठी सरकार, राज्य साखर संघ, संघटना प्रतिनिधींच्या त्रिसदस्यीय समितीची स्थापना करणे आवश्यक आहे. मागण्यांसंबंधी ठोस निर्णय न झाल्यास ऊसतोडणी कामगार यावर्षी हातात कोयता घेणार नाहीत.'

पत्रकार परिषदेस दिनकर आदमापुरे, विलास दिंडे, सदाशिव तायशेटे, आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण निर्मूलन यंत्रणाच कुचकामी

$
0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

शहरात दिवसागणिक वाढत चाललेली अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपालिकेची अतिक्रमण निर्मूलन यंत्रणाच कुचकामी ठरत आहे. स्वच्छ आणि सुंदर इचलकरंजी करायची असेल तर त्यासाठी सक्षम अधिकारी या विभागात असण्याची नितांत गरज आहे. नगरपालिकेच्या या चांगल्या मोहिमेला लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेपाऐवजी सहकार्याचे बळ देणे आवश्यक आहे.

इचलकरंजीत अनेक वर्षांपासून मुख्य मार्गासह भागाभागांत अतिक्रमणांचे जाळे पसरले आहे. त्याकडे नगरपालिकेने वेळीच लक्ष दिले असते तर आज गंभीर समस्या निर्माण झाली नसती. शिवाय फेरीवाला झोन अस्तित्वात नसल्याने अतिक्रमणांवर नियंत्रण आणताना अडथळे निर्माण होत आहेत. अतिक्रमणे काढण्याचा प्रयत्न झाल्यास लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नित्याचा आहे. किरकोळ विक्रेते, हातगाडे, खाद्यपदार्थांचे गाडे, पान टपऱ्या उभ्या करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असतो. त्यामुळे नगरपालिकेचेही अधिकारी हतबल होतात. शहरात हजारो किरकोळ विक्रेते उभे असताना नोंद मात्र शेकड्यात आहे. त्यामुळे अधिकृत विक्रेत्यांची संख्या फेरीवाला संघटनेकडेही उपलब्ध नाही.

छत्रपती शाहू पुतळा ते महात्मा गांधी पुतळा हा शहरातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर सततच्या वर्दळीमुळे नेहमी गजबज असते. मात्र, कोणत्याही सणाला याच मार्गाच्या दुतर्फा स्टॉल उभारण्यास नगरपालिका परवानगी देत असते. त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होते. कॉ. मलाबादे चौक परिसरात रक्षाबंधनासाठी उभारलेले स्टॉल अद्यापही काढलेले नाहीत. शिवाय पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना वाहनांचा त्रास होऊ नये यासाठी रस्त्याच्याकडेला फुटपाथ निर्माण केले आहेत; पण त्यावरही विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच फिरावे लागते. त्याचबरोबर मुख्य रस्त्यासह भागात बांधकामावेळी साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. त्याचाही अडथळा होतो. या संदर्भात तक्रारी करूनही नगरपालिकेकडून केवळ जुजबी कारवाई केली जाते.

लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने कॉ. मलाबादे चौक ते महात्मा गांधी पुतळा या रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध साहित्यांचे स्टॉल उभारण्यात येतील. परवानगी देताना वाहतुकीला या स्टॉलचा कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारी अतिक्रमणे दूर करताना लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे अडथळे निर्माण होतात. असे अडथळे आणणाऱ्या लोकप्रतिनिधींबाबत मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल दिल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकते. मात्र, त्या अधिकाराचा वापर कधीच केला जात नाही. त्यामुळेच अतिक्रमणांत सातत्याने वाढ होत चालली असून ती दूर करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाला एका सक्षम अधिकाऱ्याचीच गरज आहे. (समाप्त)

००००

मनमानी कारभार अन् चिरीमिरी

अतिक्रमणांत वाढ होत चालली असली तरी त्याकडे काणाडोळा करत नगरपालिकेकडून अशा अतिक्रमणधारकांकडून दैनंदिन कराची पावती मात्र न चुकता केली जाते. त्यामुळे विक्रेतेही नगरपालिकेला कर देत असल्याचे सांगत अतिक्रमण काढताना विरोध दर्शवितात. नगरपालिकेच्या बाजार विभागाचा मनमानी कारभार अन् रोजची चिरीमिरी यामुळे अतिक्रमणाला खतपाणी मिळत आहे. वर्षानुवर्षे या विभागात तळ ठोकून असलेल्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलनाऐवजी त्यांच्या वाढीकडेच अधिक लक्ष पुरविले आहे.

०००

कोट...

अतिक्रमण निर्मूलन विभागाकडील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. तसेच फेरीवाला झोन अद्याप जाहीर न केल्याने मुख्य मार्गावर अतिक्रमणे दिसत आहेत. नगरपालिका वेळोवेळी कारवाई करून ती हटविण्याचा प्रयत्न करत असते.

- डॉ. पवन म्हेत्रे, अति. मुख्याधिकारी, इचलकरंजी नगरपालिका

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी आत्महत्याप्रकरणी सावकार कोर्टात शरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी सावकारांनी कर्जवसुलीसाठी लावलेल्या तगाद्यामुळे तेल व्यापाऱ्याने आत्महत्या केली होती. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असलेला सांगलीतील खासगी सावकार भाऊसो बाळासाहेब माळी (रा. सांगली) हा सोमवारी(ता. २७) जिल्हा कोर्टात शरण आला. माळी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून, त्याचा ताबा मिळावा यासाठी राजारामपुरी पोलिस कोर्टात अर्ज दाखल करणार आहेत.

टाकाळा येथील तेल व्यापारी उमेश रामेश्वर बजाज (वय ४७) यांनी व्यवसायासाठी जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत दरमहा ५ टक्के आणि ७ टक्के व्याजाने सांगली येथील भाऊसाहेब माळी याच्याकडून ३३ लाख रुपये कर्ज घेतले होते, तर महेश शिंदे याच्याकडून ९ लाख रुपये कर्ज घेतले होते. या रकमेच्या व्याजापोटी बजाज यांनी माळी याला २९ लाख ७५ हजार रुपये दिले, तर शिंदे याला ७ लाख ६५ हजार रुपये परत केले. गेल्या सहा महिन्यांपासून कर्जाचा हप्ता आणि व्याज थकल्याने दोन्ही सावकारांनी वसुलीसाठी तगादा लावला होता. 'कर्जाची रक्कम दे, नाहीतर तुझे घर, कार आणि दुकान नावावर करून दे,' अशी मागणी सावकारांकडून सुरू होती. या तगाद्याला कंटाळून उमेश बजाज यांनी ३ ऑगस्ट रोजी टाकाळा येथील घराच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माळी आणि शिंदे यांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संशयित सावकार भाऊसाहेब माळी हा सोमवारी जिल्हा कोर्टात शरण आला. पोलिसांकडून जिवाला धोका असल्याने पोलिसांच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती त्याने कोर्टात केली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली असून, ताबा मिळवण्यासाठी राजारामपुरी पोलिसांकडून कोर्टात अर्ज सादर केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती तेलींविरुद्ध अविश्वास ठराव

$
0
0

म. टा . वृत्तसेवा, गडहिंग्लज

येथील पंचायत समिती सभापती प्रा. जयश्री तेली यांच्याविरुद्ध काही पंचायत समिती सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. उपसभापती बनश्री चौगुले, सदस्य विजय पाटील, इराप्पा हासुरे, विद्याधर गुरबे, रुपाली कांबळे, श्रीया कोणकेरी व इंदू नाईक यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे हा ठराव सादर केला आहे. सभापती तेली यांचा सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक नाही. त्यामुळे प्रशासन अधिकारी बेफिकीरी वृत्ती वाढली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीत तरुणाची आत्महत्या

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हुपरी (ता. हातकणंगले) येथील अंबाईनगरमधील एका तरुणाने घरातील तुळईला गळफास लावून आत्महत्या केली. अनिल शामराव सातवेकर (वय ३५)असे त्याचे नाव असून, या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : अनिल सातवेकर कुटुंबीयांसह गजानन कापसे यांच्या घरी भाड्याने राहात होता. पत्नी रक्षाबंधनासाठी राजापूर (ता. शिरोळ) येथे माहेरी गेली असता मंगळवारी घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळांवर धाव घेऊन पंचनामा केला. अनिलच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images