Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सहा अनधिकृत होर्डिंगधारकांवर गुन्हा

$
0
0

महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या परवानगीशिवाय जाहिरात प्रसिद्ध केलेली होर्डिंग, डिजीटल फलक, कटआउटस् मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढून टाकली. गांधी मैदान व राजारामपुरी विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली. शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या सहा होर्डिंगधारकांवर शाहूपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये महापालिकेने गुन्हा दाखल केला.

शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे मुंबई हायकोर्टाने महापालिकेला निर्देश दिले होते. मात्र महापालिकेने अशा होर्डिंग, डिजीटल फलक व बॅनरकडे दुर्लक्ष केल्याने शहराच्या विद्रुपीकरणात भर पडून अनेक ठिकाणी बकाल रुप प्राप्त झाले होते. गेल्या दोन आठवड्यापासून मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आठवड्यापूर्वी केलेल्या कारवाईत चार होर्डिंगधारकांवर गुन्हा नोंद केला होता. मंगळवारच्या कारवाईत सहा होर्डिंगधारकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी विभागीय कार्यालय क्रमांक एकच्या गांधी मैदान विभागाच्यावतीने आपटेनगर पाण्याची टाकी ते फुलेवाडी रिंगरोड, कणेरकरनगर ते रिंगरोड, क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील १७ विद्युत खांबांवरील बॅनर्स, चार जाहिराती फलक, दोन डिजीटल बोर्ड व १३ कटआउंटस असे ३६ अनधिकृत जाहिराती फलक जप्त केले. तसेच कार्यालयाच्यावतीने दोन होर्डिंगधारकांविरोधात महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत तसेच शहराचे विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यांतर्गत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर राजारामपुरी विभागीय कार्यालयाच्यावतीने राजारामपुरी चौथी गल्ली, असेम्ब्ली रोड, उमा टॉकिज, जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसरातील होर्डिंग काढून टाकण्यात आली. या परिसरातील चार होर्डिंगधारकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात ६४३ कुपोषित बालके

$
0
0

बालविकास प्रकल्पांतर्गत सर्व्हेक्षणात माहिती उघड

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्वाधिक दरडोई उत्पन्न आणि सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात बागायती शेती आणि पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या बाल विकास प्रकल्पांतर्गत झालेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यामध्ये ६४३ बालके कुपोषित आढळली आहेत. महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत प्रशासनाकडून ही आकडेवारी सामोरी आली.

हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, कागल, भुदरगड, या तालुक्यात कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान ,जिल्हा परिषद प्रशासनाने, ग्राम बाल विकास केंद्रातंर्गत कुपोषित बालकांची स्थिती सुधारण्यासाठी सकस आहार पुरविला जातो. गर्भवतींचे आहाराकडे दुर्लक्ष, मुलांमधील संतुलित आहाराचा अभाव यामुळे सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळले आहे. प्रशासनामार्फत प्रत्येक तालुक्यात जून महिन्यात सर्व्हेक्षण केले होते, असे सांगण्यात आले.

यामध्ये हातकणंगलेमध्ये ११२, शिरोळ १११, कागल ५३, शाहूवाडी ५२, पन्हाळा ५०, भुदरगड ४९, गडहिंग्लज ३९, चंदगड ३८, करवीर ३३, गगनबावडा ३१, राधानगरी ३१ अशी संख्या आढळली आहे. यापैकी ५२१ बालके जिल्हा परिषदेच्या बालविकास केंद्रात दाखल झाली. त्यांच्यापैकी २५३ मुले कुपोषणाच्या स्थितीतून बाहेर पडल्याचे प्रशासनातर्फे महिला व बालकल्याण विभागाच्या सभेत अधिकाऱ्यांनी सांगितले. कुपोषणाच्या प्रश्नावरुन जिल्हा परिषद सदस्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनी अधिकाऱ्यांना जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासंदर्भात प्रभावी उपाय योजना कराव्यात. तसेच अहवाल द्यावा, अशा सूचना केल्या आहेत. एकीकडे बालकांच्या आरोग्यासाठी लाखो रुपयांच्या योजना अंमलात आणल्या जातात असा दावा केला जातो. दुसरीकडे सधन जिल्ह्यात कुपोषित बालके आढळतात, यामुळे योजनांची अंमलबजावणी आणि खर्च होणारा निधी याविषयी प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.

.............

कोट

'लहान मुले कुपोषित राहू नयेत यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सहा ठिकाणी ग्राम बालविकास केंद्रांची स्थापना केली आहे. सर्व्हेक्षणात आढळलेल्या मुलांना विकास केंद्रांमार्फत सकस आहार पुरविला जातो. साठ दिवसांचा कार्यक्रम निश्चित करुन मुलांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रशासनाच्या प्रयत्नामुळे २५३ मुले कुपोषणातून बाहेर पडली आहेत.

सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण

....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटकबुकीवर कारवाई

$
0
0

शाहूवाडी : सरुड (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीतील पंचशीलनगर येथील सांस्कृतिक सभागृहाच्या आडोशाला कल्याण मटका जुगार घेणाऱ्या विश्वास निवृत्ती काळे या मटकबुकीस मंगळवारी दुपारी शाहूवाडी पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले. यावेळी जागेवर मिळून आलेला कल्याण मटक्याच्या चिठ्ठीचे पावतीबुकासह रोख २२१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्वतःच्या फायद्यासाठी जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या विश्वास निवृत्ती काळे (रा. सरुड, ता. शाहूवाडी) या मटकाबुकीवर दहा दिवसांपूर्वीही शाहूवाडी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई कारवाई केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्च जादा, निधी कमी

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नव्या डिझाइननुसार अंगणवाडी इमारतीचा खर्च आठ लाख रुपयांहून अधिक आणि सरकारकडून सहा लाख रुपयांच्या निधीची उपलब्धता यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील मिळून ६३ अंगणवाड्यांचे बांधकाम रखडले. प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मान्यता मिळूनही ठेकेदारांनी वाढीव खर्चाचे कारण पुढे करत बांधकाम करण्यास तयार नाहीत. याच कारणास्वत गेल्यावर्षी पाच कोटी रुपयांचा निधी परत गेला, तर यंदा पाच कोटी रुपये मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही.

दुसरीकडे तालुक्यातील विविध ठिकाणच्या अंगणवाड्यांच्या जुन्या इमारतींना गळतीची समस्या आहे. यामुळे संबंधित अंगणवाड्यांना अन्यत्र आश्रय घ्यावा लागला. अंगणवाडी बांधकामासाठी २०१४ मधील जिल्हा दर सूचीनुसार अंदाजपत्रक तयार केले जाते. त्यानुसार अंगणवाडीच्या इमारतीसाठी सहा लाख रुपयांची तरतूद आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाल्याने सहा लाख रुपयांमध्ये बांधकाम पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करत ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.

जिल्हा नियोजन समिती व विविध योजनेंतर्गत अंगणवाड्यांसाठी निधी उपलब्ध होतो. गेल्या आर्थिक वर्षी तर १४७ कामे रद्द झाली होती. यंदा अंगणवाडी इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठी पाच कोटी २९ लाख रुपये निधी उपलब्ध झाला होता. त्यामध्ये ३६७ दुरुस्तीचे प्रस्ताव होते, तर ६३ नव्या इमारतींचा समावेश आहे. प्रशासनाने नव्या इमारतींचा प्रस्ताव मंजूर केला. पण बांधकामाला मुहूर्त लागेना. अंगणवाड्यांच्या जुन्या इमारतींना काही ठिकाणी गळती लागली आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनी जिल्ह्यातील विविध भागातील अंगणवाड्यांची पाहणी करणार आहेत. अंगणवाड्यांची सद्य:स्थिती, उपलब्ध सुविधा जाणून घेणार आहेत. सभापती व सदस्यांनी प्रशासनाकडून जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या स्थितीविषयी चर्चा केली आहे.

००००

पालकमंत्र्यांकडे नऊ कोटींचा प्रस्ताव सादर

जिल्हा परिषद प्रशासनाने अंगणवाड्यांच्या नवीन इमारत बांधकामासाठी व जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी मिळून ९ कोटी १४ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे हा प्रस्ताव दिला असून निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सभापती वंदना मगदूम यांनी सांगितले. नऊ कोटी रुपयांच्या प्रस्तावात २२८ नव्या इमारती आणि ४३२ जुन्या इमारतींची दुरुस्ती प्रस्तावित आहेत.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्यप्रभा चिटणीस यांना जीवनगौरव पुरस्कार

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

वैशाली राजशेखर मातोश्री वृद्धाश्रमाच्या संस्थापक, मातोश्री वृद्धाश्रामाच्या उपाध्यक्षा सूर्यप्रभा चिटणीस यांचा वयोश्रेष्ठ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती अशोक जाधव यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष करीम मुजावर होते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मातोश्री वृद्धाश्रमाची स्थापना करण्यात चिटणीस यांचे बहुमोल योगदान होते. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून ज्ञानार्जनाचे कामांनंतर त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. या कार्याची दखल घेत त्यांचा वयोश्रेष्ठ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला. आयफेटोचे राष्ट्रीय नेते प्रभाकर आरडे यांनी दिलेल्या देणगीतून वृद्धाश्रमांतील इतर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शिलाताई निटवे यांच्या हस्ते करण्यात आला. वृद्धाश्रमाला नेहमीच सढळ हाताने मदत करणाऱ्या रोटरी गार्गी क्लबच्या अध्यक्षा सुजाता लोहिया व उपाध्यक्षा विणा सिन्हा यांचा सूर्यप्रभा चिटणीस यांच्या हस्ते सत्कार केला.

समारंभास अंजली जाधव, दिलीप भोईटे, वसंतराव चव्हाण, आनंदराव पाटील, शांताराम सुतार, प्रभावती पाटील, प्रभावती कांबळे, प्रभावती चव्हाण, वनिता भोसले, जयसिंग चव्हाण, दि. ब. गुरव आदी उपस्थित होते. विजया चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. व. प. चव्हाण यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बचत गटांना अर्थसहाय्य

$
0
0

केडीसीसीकडून १०० कोटींची तरतूद करण्याचे आश्वासन

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या कर्जपुरवठ्यासाठी सध्या २८ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही मर्यादा वाढवून १०० कोटी रुपयांपर्यंत केली जाईल, अशी घोषणा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. बँकेच्यावतीने गावठी कोंबडी पालनाविषयी आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. साईक्स एक्स्टेंशन येथील महालक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात आयोजित केलेल्या कार्यशाळेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'जिल्ह्यातील बचत गटांकडून झालेले काम संपूर्ण राज्यात आणि देशात अग्रेसर आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होणाऱ्या महिला साक्षात दुर्गादेवीच आहेत. जिल्ह्यात कासारवाडी येथील विवेक हॅचरीज यांच्या सहयोगातून गावठी कोंबडी पालन योजना सुरू आहे. बचत गटांनी कर्ज योजनेचा लाभ घेऊन गावठी कोंबडी पालन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बँकेच्या संचालिका निवेदिता माने, सर्जेराव पाटील, नाबार्डचे विभागीय प्रबंधक नंदकुमार नाईक,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांची भाषणे झाली. शेळेवाडी येथील विजयालक्ष्मी बचत गटाच्या गीता पाटील व शिये येथील माऊली बचत गटाच्या शकुंतला माने यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उभारलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती दिली. शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक आर बी. आरबाळे यांनी खडकी कोंबडी कर्ज योजनेची सविस्तर माहिती दिली. महिला विभागाच्या विकास अधिकारी सौ स्नेहल करंडे यांनी स्वागत केले. स्मिता अमरे यांनी सूत्रसंचालन केले तर गिरीजा जोशी- पुजारी यांनी आभार मानले.

सोन्याचे अंडे देणारी गावठी कोंबडी

कासारवाडीच्या विवेक हॅचरीजचे अशोक लुगडे म्हणाले, 'खडकी किंवा गावठी कोंबडीच्या प्रचंड तुटवड्यामुळे बाजारात कोंबडीच्या मटणाला चांगलीच मागणी आहे. ब्रॉयलरपेक्षा खडकी कोंबडीच्या मटणाचा तिप्पट दर आहे. २१ दिवसाच्या अंडी उबवणीनंतर २२ व्या दिवशी बाहेर आलेले पिलाची २२ रुपयांना विक्री केली जाते. तीन महिने पिलाचे संगोपन केल्यास पिलापासून तयार झालेली कोंबडी सव्वा किलो वजनाची होते. कोंबडीची किंमत सरासरी पाचशे रुपये इतकी असते. सहा महिन्याच्या कोंबडींचे वजन साडेतीन किलो होते. त्याची किंमत एक हजार रुपयांच्या घरात जाते. कोंबडी न विकता तिचे पालन केल्यास साडेचार महिन्यांपासून अंडी देण्यास सुरुवात होते. अडीच वर्षापर्यंत गावठी कोंबडी अंडी देते. गावठी कोंबड्यांच्या प्रति अंड्याचा दर नऊ रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यमशीलतेसाठी ‘कापॉरेट कल्लोळ’ मार्गदर्शक

$
0
0

कोल्हापूर : 'औद्योगिक मानसशास्त्रामध्ये मनुष्यबळ विकास आणि कामाची क्षमता वाढते. त्यामुळे निकोप उद्यमशीलतेसाठी 'कापॉरेट कल्लोळ' हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल,' असा सूर विविध वक्त्यांनी व्यक्त केला.

लेखिका नीलांबरी जोशी लिखित 'कापॉरेट कल्लोळ' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच झाला. ग्रंथ कॉर्नर, वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था आणि मनोविकास प्रकाशनच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक प्रा. विनय पाटील अध्यक्षस्थानी होते.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. गुरुदास हर्षे यांनी कुटुंबातला सकारात्मक संवाद वाढीस लागला तर कौटुंबिक वातावरण निकोप राहते, असे नमूद केले. लेखिका जोशी यांनी व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी परस्परांना समजून येणारा संवाद होत असेल तर अशा ठिकाणी उत्कृष्ट कार्यसंस्कृती निर्माण होते, असे सांगितले.

प्रकाशक आशीष पाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अरुण नाईक यांनी लेखिका जोशी यांची मुलाखत घेतली. सुभाष पाटील व युवराज कदम यांनी स्वागत केले. दरम्यान ग्रंथ कॉर्नरतर्फे शाहू स्मारक भवनात पुस्तक प्रदर्शन भरविले आहे. प्रदर्शन दहा सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्ल्स गुंतवणूकदार आक्रमक

$
0
0

(फोटो डेस्कला आहे....अर्जुन)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही पर्ल्समध्ये गुंतवलेली रक्कम परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार आक्रमक बनले आहेत. पर्ल्सची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, असा आग्रह अखिल भारतीय पर्ल्स गुंतवणूकदारांनी धरला आहे. या मागणीचे निवेदन देण्यासाठी ५ ऑक्टोबरला कोल्हापुरात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय बुधवारी मेळाव्यात घेण्यात आला.

देशातील सहा कोटी गुंतवणूकदारांची रक्कम तातडीने परत करा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने देऊनही गुंतवणूकदारांना रक्कम मिळाली नाही. याबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी अखिल भारतीय पर्ल्स गुंतवणूकदारांचा मेळावा शाहू स्मारक येथे आयोजित केला होता. यावेळी बोलताना संघटनेचे पदाधिकारी शंकर पुजारी म्हणाले, 'गेल्या दहा वर्षांपासून देशातील सहा कोटी गुंतवणूकदारांची अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पर्ल्समध्ये अडकली आहे. पर्ल्सची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांची रक्कम परत करावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने २०१६ मध्ये दिला. यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली. मुदत उलटूनही गुंतवणूकदारांना रक्कम मिळाली नाही. याबाबत संघटनेने केंद्र सरकारसह राज्य सरकारकडेही पाठपुरावा केला. मात्र, पर्ल्सच्या मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्याची सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. राज्य सरकारने याबाबत भूमिका जाहीर करावी, यासाठी ५ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कावळा नाका येथील शासकीय विश्रामगृहातील कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील गुंतवणूकदार उपस्थित राहणार आहेत.'

मेळाव्यात बोलताना अनेक गुंतवणूकदारांनी सरकारसह सेबीवर जोरदार टीका केली. सहा कोटी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस येऊनही सरकार आणि सेबी पर्ल्स कंपनीला सॉफ्ट कॉर्नर का देते? असा सवाल गुंतवणूकदारांनी उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचीही मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. यावेळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील गुंतवणूकदारांसह विजय बचाटे, वर्षा गडचे, सुमन पुजारी, महेश लोहार, आदी उपस्थित होते.

००००

प. महाराष्ट्रातील सर्वाधिक गुंतवणूक

पर्ल्समध्ये पश्चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदार सर्वाधिक आहेत. सुमारे ५० कोटी रुपयांची गुंतवणूक पश्चिम महाराष्ट्रातील आहे. यातही कोल्हापूर आणि सांगली जिल्हा आघाडीवर आहे. आयुष्याच्या उतारवयाची तरतूद म्हणून गुंतवलेले लाखो रुपये गरजेच्या वेळी मिळत नसल्याने गुंतवणूकदारांत प्रचंड अस्वस्थता आहे. गुंतवलेले पैसे मिळावेत यासाठी आंदोलने करण्यात तेवढीच रक्कम खर्च करण्याची वेळ या गुंतवणूकदारांवर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महामुनी यांच्या नारळ शिडीस केंद्राकडून पेटेंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जयसिंगपूर

येथील प्रयोगशील उद्योजक सुनील महामुनी यांनी विकसित केलेल्या नारळ काढणी शिडीस केंद्र सरकारचे पेटेंट मंजूर झाले आहे. ही शिडी नारळ तसेच सुपारीच्या बागेमध्ये वापरली जाते. महामुनी गेली १५ वर्षे या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी विकसित केलेली नारळ काढणीची शिडी शेकडो शेतकरी, शेतमजूर वापरतात. या शिडीला सेफ्टी बेल्टची योजना केल्याने नारळाच्या झाडावर चढल्यानंतर सुरक्षितपणे नारळ काढणी, फवारणी व स्वच्छता करता येते.

महामुनी यांनी तयार केलेल्या शिडीमुळे वाकड्या झाडांवर चढूनही सुरक्षितपणे नारळ, सुपारी काढता येते. नारळ काढणी, फवारणी व स्वच्छता करता येते. केरळ विद्यापीठाने केलेल्या पारंपरिकपेक्षा ही शिडी वेगळी आहे. महामुनी यांनी या शिडीस पेटेंट मिळावे, यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यास मंजुरी मिळाली.

०००

कोट...

आम्ही तयार केलेल्या शिडीस केंद्र सरकारचे पेटेंट मिळाले. त्यासाठी विविध पातळ्यांवर चाचणी घेण्यात आली. नजीकच्या काळात आम्ही गुजरात, ओरिसा, केरळ, त्रिपुरा या राज्यांतील शेतकऱ्यांसाठी ही शिडी उपलब्ध करणार आहोत.

सुनील महामुनी, उद्योजक

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राची हमीभावाची योजना फसवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शेतकऱ्यांची वाढती कर्जबाजारी, आत्महत्या, शेतकरी-मजुरांची उपेक्षा, युवकांची कुचंबणा याला रासायनिक-औद्योगिक कृषी उत्पादन पद्धती कारणीभूत आहे. कर्जमाफी, प्रधानमंत्री पीक विमा, सिंचन योजना, हमीभावाची केलेली घोषणा ही निवडणूक प्रचारातील पोकळ आश्वासने होती. डिसेंबर २०१७ पासून सुरू केलेल्या वसुंधरा बचाव अभियानात या बाबी स्पष्ट झाल्या असून, अभियानाचा अहवाल दोन ऑक्टोबरनंतर सरकारला सादर केला जाणार आहे,' अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार बैठकीत दिली.

प्रा. देसरडा म्हणाले, 'किसान बचाव, मानव बचाव, वसुंधरा बचाव अभियानांतर्गत शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी स्त्रिया, विद्यार्थी, युवकांशी संवाद साधला आहे. यातून रासायनिक-औद्योगिक कृषी उत्पादन पद्धतीबरोबर उत्पन्नातील विषमता यामुळे शेती व्यवसायावर मोठे संकट आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात देशातील ३६ हजार शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १२ हजार आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्य सरकारने केलेली कर्जमाफी, पंतप्रधान पीक योजना, हमीभावात केलेली दरवाढ, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केवळ कागदोपत्री राहिल्या असून त्या केवळ निवडणूक प्रचारातील आश्वासने ठरली आहेत.'

ते पुढे म्हणाले, 'शेतीमाल उत्पादनवाढीचा हायब्रिड बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके हा 'हाराकि' मार्गामुळे तथाकथित हरितक्रांतीने शेती उत्पादनाचा पाया कमकुवत झाला असून शेतकरी देशोधडीला लागला आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले असले, तरी त्यांचे उत्पन्न वाढलेले नाही. रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरांमुळे जमिनी क्षारयुक्त व सत्त्वहीन बनल्या आहेत. रासायनिक खते व कीटकनाशके वापरून घेतलेल्या शेतीमालाच्या उत्पादनातून अनेकप्रकारचे रोग नागरिकांमध्ये दिसून येऊ लागले आहेत. शेती आणि नागरिकांना दुर्धर आजारांपासून वाचवण्यासाठी सेंद्रिय शेती हाच शाश्वत पर्याय आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक हंगामासाठी सेंद्रिय शेतीला अनुदान द्यावे, साखर कारखानदारी धोक्यात आल्याने अशा शेतकऱ्यांना ऊस पिकाव्यतिरिक्त अन्य पिकांकडे आकर्षित करावे. देशातील ५२ टक्के मनुष्यबळ शेतीत काम करत असताना उत्पन्नातील वाटा केवळ दहा टक्के आहे, तर पगारदार व सेवाक्षेत्राचा वाटा ६० टक्के झाला आहे. उत्पन्नातील असमानता दूर करण्यासाठी राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तत्काळ तहकूब करण्याची आवश्यकता आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकरी ईद उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर व परिसरात पारंपरिक पध्दतीने व धार्मिक वातावरणात बकरी ईद (ईद उल अजहा) उत्साहात साजरा झाला. मुस्लिम बोर्डिंग येथे आयोजित कार्यक्रमात देशाची एकात्मता व सुखशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. शहरातील विविध भागातील मस्जिदीमध्ये नमाज पठणही झाले. बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाजावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छा व्यक्त केल्या. ठिकठिकाणी शिर खुर्म्याचे वाटप झाले.

दसरा चौक परिसरातील मुस्लिम बोर्डिंग येथे बकरी ईद निमित्त आयोजित कार्यक्रमात मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी देशाची एकता, सुखशांतीसाठी प्रार्थना केली. मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व नमाज पठण केले. दुसऱ्या जमातीसाठी हाफीज आकिब म्हालदार यांनी तर तिसरी जमातसाठी मौलाना शहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, आदिल फरास, साजिद खान, पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, हमजेखान शिंदी, वाहिद मोमीन, जहाँगीर हुसेन अत्तार, अल्ताफ झांजी, फारुक पटवेगार, मलिक बागवान, रफिक मुल्ला, रफीक शेख आदी उपस्थित होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर, महापालिकेतील सभागृह नेते दिलीप पोवार, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, जयकुमार शिंदे, नजीर देसाई, महमंदशरीफ शेख, बापूसो मुल्ला, सोहेल शेख आदींनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. तसेच खाटिक मस्जिद, नंगीवली ईदगाह, बडी मस्जिद, गवंडी मस्जिद, बाराईमाम, अकबर मोहल्ला, बाबुजमाल कदमवाडी, लाइनबझार, सरनाईक वसाहतसह शहर आणि परिसरातील विविध मस्जिदमध्ये नमाज पठण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑनलाइन-ऑफलाइन’मध्ये रखडला पगार

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : वेतन प्रक्रिया सुरळीत बनावी, शिक्षकांच्या हाती पगार वेळेत उपलब्ध करण्यासाठी शालार्थ प्रणालीचा अवलंब झाला. शालार्थ प्रणालीमुळे वेतनाची ऑफलाइन पद्धत बंद होऊन ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली. खासगी कंपनीसोबत शालार्थ प्रणालीचा करार झाला, पण वर्षभरात करारात अडचणी निर्माण झाल्या. कधी ऑफलाइन, तर कधी ऑनलाइन अशा घोळात जिल्ह्यातील सुमारे ८५०० शिक्षकांना पगारासाठी २५ तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. पगाराची परिणामी गृहकर्ज, विम्याच्या हप्त्यांचा भरणा करताना अंदाजपत्रक बिघडत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. जुलै महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांना पूर्वी ऑफलाइनने वेतन वितरित केले जायचे. पंचायत समितीस्तरावर वेतन पत्रक तयार करून जिल्हा परिषद आणि कोषागार कार्यालय अशी प्रक्रिया पूर्ण व्हायची. साधारणपणे सात तारखेच्या अगोदर शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा व्हायचे. दरम्यान, राज्य सरकारने गेल्यावर्षी शालार्थ प्रणालीचा अवलंब करत ऑनलाइन वेतनाचा निर्णय घेतला. ऑनलाइन वेतनासाठी खासगी कंपनीसोबत करार केला. ऑनलाइन वेतन प्रणालीमध्ये नवीन टप्पेही तयार झाले. मुख्याध्यापकांनी शालेय पातळीवरील वेतन पत्रक तयार करून केंद्रप्रमुखांना सादर करायचे. केंद्र प्रमुखांकडून ते गट शिक्षणाधिकाऱ्याकडे सादर व्हायचे. संपूर्ण तालुक्यातील शाळांचे वेतन पत्रक सादर झाल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेकडे जमा व्हायचे. तालुकास्तरावर एखाद्या शाळेकडून वेतन पत्रकाला विलंब झाल्यास अथवा जिल्हा परिषद स्तरावर एखाद्या तालुक्याकडून वेतन पत्रकाला उशिरा झाला तर संपूर्ण वेतन प्रक्रियेवर परिणाम होऊ लागला. सर्व शाळांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोषागार कार्यालय आणि त्यानंतर खात्यावर जमा या प्रक्रियेमुळे पगाराची तारीख लांबत गेली.

दरम्यान, गेल्यावर्षी सरकार आणि खासगी कंपनीमध्ये जो करार झाला होता, त्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. परिणामी ऑनलाइन प्रक्रिया बंद पडली. शालार्थ प्रणाली अंतर्गत ऑनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने वेतनात पुन्हा ऑफलाइन पध्दतीचा अवलंब सुरू झाला. ऑफलाइन पद्धतीत वेतन मंजुरीचे टप्पे कायम राहिले. काही ठिकाणी मुख्याध्यापकांकडून हलगर्जीपणा, कुठे गटशिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष तर कधी एकत्र वेतन पत्रक तयार करण्यासाठी होणारा विलंब अशा कारणामुळे शिक्षकांचे पगार २५ तारखेर्यंत लांबले आहेत. अनेक शिक्षकांनी गृहकर्ज, वाहन कर्ज काढले आहे. वित्तीय संस्थेकडून रक्कम उचलली आहे. याशिवाय विम्याचे हप्ते भरताना अंदाजपत्रक कोलमडत असल्याचे शिक्षक सांगत आहेत. काहीवर उसनवारीची वेळ आल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

००००

सीईओ घेणार संयुक्त बैठक

गेले काही महिने सातत्याने पगाराला विलंब होत असल्याने त्रस्त बनलेल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेपर्यंत धाव घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासमोर वेतन विलंबाच्या समस्या मांडल्या. सीईओ मित्तल यांनी याप्रश्नी आठवडाभरात शिक्षक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन वेतनाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली आहे.

०००

पगार लांबल्याने शिक्षकांसमोर अडचणी उद्भवत आहेत. पगाराला विलंब हा प्रकार एका महिन्यापुरता मर्यादित राहिला नाही. गेले काही महिने सलगपणे पगाराला विलंब होत आहे. शिक्षक पगाराला विलंब लावणाऱ्या घटकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहीच्या घरी विजयोत्सव

$
0
0

देशाची मान उंचावल्याचा कुटुंबियांना सार्थ अभिमान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंडोनेशियातील जकार्ता येथील पालेनबांग येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत कोल्हापूरची नेमबाजपटू राही सरनोबतने सुवर्णपदक जिंकले. राहीने २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताला चौथे सुवर्ण पदक मिळवून दिले. तिच्या यशाची बातमी कळताच टाकाळा येथील तिच्या घरी पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. सरनोबत कुटुंबियांचे अभिनंदन करण्यासाठी दुपारपासून विविध क्षेत्रातील मान्यवर व क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती.

दुखापतीमुळे राही नेमबाजीपासून दीर्घकाळ लांब राहिली होती. या स्पर्धेतून तिच्या यशस्वी पुनरागमनाची खात्री असल्याने तिच्या कामगिरीकडे कुटुंबियांसह क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होते. सुरुवातीपासून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत तिने स्पर्धेतील अस्तित्व कायम ठेवले. दुपारी तिची लढत थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूबरोबर होणार असल्याने कुटुंबीयांनी टीव्हीसमोर सामन्याचा आनंद लुटला. काहीकाळ राहीला प्रतिस्पर्धी खेळाडूने मागे टाकल्याने उपस्थितांच्या काळजाचा ठेका चुकला. सामना अटीतटीचा होत असल्याने सर्वांच्या नजरा टीव्हीवर खीळल्या होत्या. राहीने पुन्हा जोरकस खेळ करत सामना जिंकल्यावर कुटुंबीयांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवले.

स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताच्या खात्यात पदक आले नव्हते. राहीने सुवर्णपदक जिंकत पदक तालिकेत देशाला सहाव्या स्थानावर नेल्याचा आनंद कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सामन्यानंतर पदक स्वीकारताना देशाचे राष्ट्रगीत सुरु होते. तिला राष्ट्रगीत गुणगुणताना पाहून सरनोबत कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पोरीने देशाची मान उंचावल्याचा अभिमान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुढील महिन्यात कोरिया येथे होणाऱ्या वर्ल्ड चँपियनशिप नेमबाजी स्पर्धेत राही अशीच दैदिप्यमान वाटचाल कायम ठेवेल, अशी अपेक्षा सरनोबत कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी आई प्रभा सरनोबत, भाऊ आदित्य व अजिंक्य, काका राजेंद्र सरनोबत, काकी कुंदा सरनोबत, दिलीप कदम, सुषमा कदम, वनिता उत्तुरे, राजेंद्र इंगळे उपस्थित होते.

...........

चौकट

सुवर्णपदक मिळवणारच...!

स्पर्धेसाठी निघताना राहीचे कुटुंबियांशी फारसे बोलणे झाले नव्हते. प्रदीर्घ काळ स्पर्धेपासून दूर राहिल्याने राहीला पुनरागमन करण्यासाठी आशियाई स्पर्धा अत्यंत महत्वाची होती. स्पर्धेला जाताना राहीने आत्मविश्वासाने मोठ्या भावाला गोल्ड मेडल घेऊनच परत येणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. या यशानंतर तिने आपला शब्द खरा केला.

कोट

'दोन अडीच वर्षांच्या विश्रांतीनंतर राहीने आशियाई स्पर्धेत पुनरागमन केल्याने अतिशय आनंद वाटत आहे. मधला काळ तिच्यासाठी अत्यंत संघर्षपूर्ण होता. आम्हाला ती नव्याने सुरुवात करेल याची पुरेपूर खात्री होती. आमच्या लेकीने देशाची मान उंचावल्याचा सार्थ अभिमान वाटतो.

जीवन सरनोबत, वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसंघर्ष यात्रेत सहभागी व्हा

$
0
0

'जनसंघर्ष यात्रेत

सहभागी व्हा'

आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉँग्रेस पक्षातर्फे काढल्या जाणाऱ्या जनसंपर्क रॅलीची सुरुवात ३१ ऑगस्टला कोल्हापुरातून होणार आहे. या रॅलीला कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जनसंघर्ष रॅलीचे समन्वयक आमदार सतेज पाटील यांनी केले. अजिंक्यतारा येथील कार्यालयात याबाबत बैठक पार पडली.

यावेळी बैठकीत बोलताना आमदार पाटील म्हणाले, 'भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. याबाबत जनजागृती करण्यासाठी कॉँग्रेसच्या वतीने राज्यभर जनसंघर्ष रॅलीचे आयोजन केले आहे. याची सुरुवात ३१ ऑगस्टला कोल्हापुरातून होणार आहे. सकाळी दहाच्या सुमारास ताराराणी चौकात रॅलीचे स्वागत होईल. यानंतर केशवराव भोसले नाट्यगृहात मेळावा होणार आहे. सायंकाळी कळंबा येथे दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या सर्व कार्यक्रमांना कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.' यावेळी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार गुरुदास कामत व गोकुळ दूध संघाचे माजी संचालक निवासराव पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. बैठकीस महापौर शोभा बोंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, महापालिका शिक्षण मंडळ सभापती अशोक जाधव, माजी महापौर सागर चव्हाण, माजी महापौर स्वाती यवलुजे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकरी ईद उत्साहात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर शहर व परिसरात पारंपरिक पध्दतीने व धार्मिक वातावरणात बकरी ईद (ईद उल अजहा) उत्साहात साजरा झाला. मुस्लिम बोर्डिंग येथे आयोजित कार्यक्रमात देशाची एकात्मता व सुखशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. शहरातील विविध भागातील मस्जिदीमध्ये नमाज पठणही झाले. बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाजावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छा व्यक्त केल्या. ठिकठिकाणी शिर खुर्म्याचे वाटप झाले.

दसरा चौक परिसरातील मुस्लिम बोर्डिंग येथे बकरी ईद निमित्त आयोजित कार्यक्रमात मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी देशाची एकता, सुखशांतीसाठी प्रार्थना केली. मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व नमाज पठण केले. दुसऱ्या जमातीसाठी हाफीज आकिब म्हालदार यांनी तर तिसरी जमातसाठी मौलाना शहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, आदिल फरास, साजिद खान, पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, हमजेखान शिंदी, वाहिद मोमीन, जहाँगीर हुसेन अत्तार, अल्ताफ झांजी, फारुक पटवेगार, मलिक बागवान, रफिक मुल्ला, रफीक शेख आदी उपस्थित होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर, महापालिकेतील सभागृह नेते दिलीप पोवार, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, जयकुमार शिंदे, नजीर देसाई, महमंदशरीफ शेख, बापूसो मुल्ला, सोहेल शेख आदींनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. तसेच खाटिक मस्जिद, नंगीवली ईदगाह, बडी मस्जिद, गवंडी मस्जिद, बाराईमाम, अकबर मोहल्ला, बाबुजमाल कदमवाडी, लाइनबझार, सरनाईक वसाहतसह शहर आणि परिसरातील विविध मस्जिदमध्ये नमाज पठण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाची दिवसभर उघडझाप

$
0
0

जिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखाली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या चार दिवसांच्या तुलनेत बुधवारी (ता. २२) शहरात पावसाची उघडझाप सुरू होती. काही काळ ऊन-पावसाचाही खेळ रंगल्याने श्रावणाची अनुभूती आली. जिल्ह्यातील शाहूवाडी, आजरा, चंदगड, भुदरगड, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यांमध्ये मात्र पावसाचा जोर कायम होता. मंगळवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली.

जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत सरासरी ३० मि.मी. पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक ६८ मि.मी. पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली. यापाठोपाठ राधानगरी ४७, तर शाहूवाडी तालुक्यात ४६ मि.मी. पाऊस पडला. गेले दोन महिने सतत पाऊस सुरू असल्याने बहुतांश धरणे भरली आहेत. राधानगरी, दूधगंगा, वारणा यासह छोट्या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने ४३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले असून, त्यातून ७३१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दूधगंगा आणि वारणेतूनही प्रत्येकी ४००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली असून, राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३३ फूट इतकी आहे. पंचगंगेच्या पाण्यामुळे शहरातील जयंती नाल्याची पाणी पातळी वाढली. दरम्यान, पावसाने गेल्या २४ तासात जिल्ह्यात कुठेही आर्थिक किंवा जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती निवारण कक्षाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-सांगलीचे डर्टट्रॅक सुरूच

$
0
0

लोगो : बिकट वाट

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या आणि धोकादायक खड्ड्यांमुळे अपघातात सर्वाधिक बळी गेले आहेत. महामार्गावर वाहन चालविताना डर्ट ट्रॅकचाच अनुभव येत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता अजून किती दिवस वाहनधारकांना खडतर प्रवास करावा लागणार असा प्रश्न उद्भवत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच जिल्ह्यात महामार्गाच्या कामाचे घोडे अडले आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अर्धवट काम आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्याचा प्रश्न तब्बल सहा वर्षांनंतरही कायम आहे. या मार्गाचा नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला असला तरी सांगली-कोल्हापूर महामार्ग आजही मुंबईतील सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ताब्यात आहे. रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची की सुप्रीमची या वादात महामार्गावरील समस्यांची मालिका कायम आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाची निविदा सन २०११ साली काढण्यात आली. मुंबईच्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हे काम देण्यात आले. तब्बल वर्षभरानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. चौपदरी रस्त्यासाठी आवश्यक जमिनी व भूसंपादनाचा अडथळा अद्यापही काही ठिकाणी कायम आहे. विविध समस्यांच्या फेऱ्यात सुप्रीमने रस्त्याचे काम सुरू केले असले तरी अपघातांची मालिका आणि रस्त्याचे अपुरे काम अशा परिस्थितीत सहा वर्षांनंतरही काम अपूर्ण आहे. वेळेत कामाची पूर्तता न केल्याने सन २०१६ मध्ये सुप्रीमला राज्य सरकारने ब्लॅकलिस्ट केले. त्यावेळी कंपनीकडून ९५ टक्के काम पूर्णत्वास गेल्याचा दावा करण्यात आल्यानंतर या मार्गावर टोल वसुलीच्या हालचाली सुरू झाल्या. कामाच्या प्रारंभापासून हातकणंगले येथे रखडलेल्या उड्डाणपुलासह तमदलगे खिंड ते अंकली बायपास रस्ता व तमदलगे ते जयसिंगपूर या दुपदरी रस्त्याचे कामही अपूर्णच आहे. या मार्गावर अपघातांची मालिका कायम असून, चौपदरीकरणांतर्गत दुपदरी रस्ते पूर्ण झाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते. रस्त्यावरील खड्डे चुकविताना अनेक अपघात घडत आहेत. यामुळे वाहनधारक या मार्गावर जीव मुठीत घेऊनच प्रवास करीत आहेत.

मालेजवळ गतिरोधकाजवळच खड्डे

दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत असताना खड्ड्यांमुळे हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. माले येथे झालेल्या अपघातानंतर रस्त्यावर काही ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. आता या गतिरोधकाजवळच मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनाची गती कमी करताना दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या मार्गावरील खड्डे बुजविताना मुरुमाचा वापर करण्यात आल्याने पावसामुळे रस्ता निसरडा बनला आहे. दुचाकी वाहनधारकांचा त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने घसरण्याचा धोका वाढला आहे.

हेर्लेजवळ रस्त्यांची उंची कमी-जास्त

राज्य सरकारच्या घोषणेनंतर रस्त्याचे काम कंत्राटदाराने थांबविल्यामुळे या रस्त्याची देखभालच बंद झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे खड्डेच खड्डे झाले आहेत. कोल्हापूरकडे जाताना हेर्ले गावाच्या अलीकडे पुलाजवळ वळण रस्ता वरखाली असल्याने वाहनचालकांची त्रेधातिपीट उडते, तर माले गावाजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडल्याने चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यातूनच वाहन खड्ड्यातून गेल्याने वाहनधारकासह वाहनांना मोठा दणका बसतो.

रुकडी फाट्यावर खड्डे

रुकडी फाट्याच्या पुढे पेट्रोल पंपाजवळ मोठे खड्डे असून मध्येच मोठा स्पीडब्रेकरसारखा खड्डा असल्याने अपघात हा नित्याचाच बनला आहे. शिवाय इचलकरंजी फाटा येथेही वळणावर खड्डेच खड्डे आहेत. हातकणंगलेजवळ रामलिंग फाटा आणि त्याआधी दोन्हीकडील रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात घडत असल्याने हे ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. या खड्ड्यांच्या मालिकेमुळे शिरोली फाटा ते दानोळी फाटा मार्गावर दोन्ही रस्त्यांवर प्रवास करताना वाहनचालकांना डर्ट ट्रॅकचा थरार अनुभवास येतो. वाहन चालविताना खड्डे चुकवतच कसरत करत वाहन चालवावे लागते. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचे त्रास जाणवू लागले असून वाहनांचा देखभालीचा खर्चही भरमसाट झाला आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्र निर्मितीसाठी उत्कृष्ट शिक्षक हवेत

$
0
0

कोल्हापूर : 'विद्यार्थी दशेत झालेल्या संस्कारांतून राष्ट्राची निर्मिती होते. सुसंस्कृत विद्यार्थी घडण्यासाठी उत्कृष्ट शिक्षकांची आवश्यकता असून अशा शिक्षकांच्या प्रयत्नांतून राष्ट्र निर्मिती होते,' असे प्रतिपादन महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

महावीर एज्युकेशन सोसायटी व ललित गांधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित टिचर ट्रेनिंग इन्स्टिट्युटच्या ११ व्या पदविका प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठ मान्यताप्राप्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम गेल्या १४ वर्षापासून शिकवला जातो. 'संस्थेने पदविका अभ्यासक्रमाद्वारे शंभर टक्के निकाल व शंभर टक्के नोकरीची परंपरा कायम राखल्याबद्दल गांधी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंद केले. पदविका प्रदान सोहळ्यास महावीर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री व्हनागडे, ब्लॉसम स्कूलच्या मुख्याध्यापिका नीलम जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सविता माळी यांनी स्वागत केले. स्मिता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी दूध संघांसमोर खासगी कंपन्याचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे दूध प्रक्रिया उद्योग वाढत आहे. मात्र, या उद्योगात खासगी कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आल्या आहेत, त्यामुळे खासगी कंपन्यांशी स्पर्धा करण्याचे आव्हान सहकारी दूध संघांसमोर आहे,' असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी केले. इशरे पुणे, कोल्हापूर व सांगली चॅप्टरतर्फे आयोजित रेपकॉन २०१८ परिषदेत ते बोलत होते. हॉटेल सयाजी येथे ही परिषद पार पडली.

परिषदेत सुरुवातीला इशरे पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सूरज रानडे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. त्यानंतर इशरे कोल्हापूर व सांगली सब चॅप्टरचे अध्यक्ष शिवाजी घोडके यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. प्रमुख पाहुणे घाणेकर यांनी दूध उद्योगातील आव्हानांची माहिती दिली. ते म्हणाले, 'दुधाची गुणवत्ता कायम टिकवण्यासाठी कुलिंग व्यवस्था गरजेची आहे. यामुळे बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. युरोपमधील कुलिंगचे तंत्रज्ञान आता भारतात सर्वत्र वापरले जात आहे. दुग्ध उद्योगातील खासगी कंपन्यांनी शिरकाव केल्याने सहकारी दूध संघांना मात्र गाफील राहणे महागात पडेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धेत टिकून राहावे लागेल.'

इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके प्रमुख उपस्थित होते. यावेळी बी. बी. काळे, हर्षल सुरंगे, वीरेंद्र घेवारी यांनीही मार्गदर्शन केले. भरत कदम, राजेंद्र इंगवले, सुरेश पाटील, निशिकांत भिंगार्डे, किसन लालवाणी, रवींद्र यादव, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

$
0
0

पन्हाळा : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर कोतोली फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलसावार जागीच ठार झाला. विनोद श्रीरंग चौगले (वय ३८, रा. माजगाव, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. अज्ञात वाहनचालकाने धडक दिल्यानंतर तेथून पळ काढला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. विनोदच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images