Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्लास्टिक बंदीचा बोजवारा

$
0
0

महापालिकेसह अन्य विभागांचे कारवाईकडे दुर्लक्ष, खुलेआम विक्रीसह वापर

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केल्याचा दावा केला असला तरी अजूनही प्लास्टिकची विक्री आणि वापर खुलेआम वापर सुरू आहे. काही ठिकाणी प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी पिशव्या आणि वस्तूंचा वापर होत असला तरी महानगरपालिका, जिल्हा परिषद, प्रादेशिक प्रदूषण विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दुर्लक्षामुळे प्लास्टिक बंदीचा बोजवारा उडाला आहे.

राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्लास्टिक बंदीची घोषणा केली. मात्र व्यापारी व विक्रेत्यांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर बंदी असलेल्या प्लास्टिकच्या साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उत्पादक व विक्रेत्यांना सरकारने तीन महिन्यांची मुदत दिली. जून महिन्यात तीन महिन्यांची मुदत संपल्यावर प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली. सुरुवातीला काही दिवस कडक अंमलबजावणी झाली. मात्र प्लास्टिकला पर्याय द्यावा, अशी मागणी करत व्यापारी, उद्योजक, दुकानदारांनी प्लास्टिक बंदीला विरोध सुरू केला. सरकारने ५० मायक्रॉनवरील प्लास्टिक बॅग्जना काही अटींवर परवानगी दिली. पण परवानगीचा चुकीचा अर्थ लावत व्यापारी, विक्रेत्यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची खुलेआम विक्री सुरू केली आहे.

शहरातील महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील किराणा दुकानदार कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक बॅग्जमधून धान्य, मसाल्यांची विक्री करत आहेत. कपिलतीर्थ मार्केट, ऋणमुक्तेश्वर, पाच बंगला, शिवाजी मार्केट या भाजी मंडईंमध्येही प्लास्टिक बॅग्जचा मुक्त वापर केला जात आहे. फळ आणि फूल विक्रेत्यांकडून प्लास्टिकविक्री बंद केल्याचे सांगितले जात असले तरी चोरटी विक्री सुरू आहे. काही ठिकाणी हार व फुले कागदात घालून दिली जात असली तरी बुकेसाठी कमी मायक्रॉनच्या फॅन्सी प्लास्टिक पेपरचा वापर सुरूच आहे. महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मटण व फीश मार्केटमध्येही प्लास्टिक पिशव्या दिल्या जात आहेत. सुरुवातीला प्लास्टिक पिशवीऐवजी डबे आणावेत असा आग्रह विक्रेते धरत होते. मात्र, त्याचा परिणाम विक्रीवर होत असल्याने मटण, चिकन, मासे, अंड्यांसाठी चोरट्या पद्धतीने प्लास्टिक पिशवी दिली जात आहे.

बेकरी व खाद्यपदार्थांच्या दुकानातून प्लास्टिक बंदी काही प्रमाणात पाळली जात आहे. ब्रेड, टोस्ट आणि अन्य पदार्थ कागदी वेस्टनातून दिले जात आहेत. मिठाईच्या दुकानात काही पदार्थांना कागदी तर अन्य पदार्थांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांसाठी प्लास्टिक कॅन आणि सिल्व्हर बॅग्ज दिल्या जात आहेत. अनेक ठिकाणी जेवणावळी व कार्यक्रमात बंदी असलेल्या प्लास्टिक द्रोण, कप, वाट्या, चमच्यांचा वापर केला जात आहेत.

सर्वच पातळ्यांवर प्लास्टिकबंदीचा फज्जा उडालेला असताना महापालिकेसह सर्वच यंत्रणा डोळेझाक करत आहे. कचरा उठाव अन्य कामांची जबाबदारी असल्याने प्लास्टिक बंदीकडे आरोग्य निरीक्षकांनी दुर्लक्ष केले आहे. ग्रामीण भागात तर प्लास्टिकचा वापर सर्रास होत आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सर्व विभागांकडून होण्याची गरज असताना फक्त महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडूनच अंमलबजावणी केली जात असल्याचेही दिसते.

प्लास्टिक बंदी असलेल्या वस्तू

प्लास्टिक पिशव्या (हँडल असलेल्या, नसलेल्या), पास्टिक ताट, कप्स, प्लेटस्, काटे, वाटी, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये पँकेजिंगसाठी वापरण्यात येणारी भांडे व वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवर पॉलिप्रॉपीलेन बॅग्ज, प्लास्टिक पाऊच.

बंदी असलेली ठिकाणे

सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुल, क्लब्ज, चित्रपट व नाट्यगृहे, औद्योगिक घटक, समारंभाचे हॉल, वाणिज्य संस्था, कार्यालये, धार्मिक स्थळे, हॉटेल, धाबे, दुकानदार, मॉल्स, विक्रेते, कॅटरर्स, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, व्यापारी, फेरीवाले, वितरक, वाहतूकदार, सेल्समन, मंडई, उत्पादक, स्टॉल्स, पर्यटन स्थळे, वने, सरंक्षित वने, इको सेन्सिटिव्ह झोन, सागरी किनाारे, सर्व सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके, रेल्वे स्थानक.

कचऱ्याची जाळून विल्हेवाट

ग्रामीण भागात प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसल्याने दुकानदार, विक्रेते नियमित प्लास्टिक कचरा पेटवून देतात. त्यामुळे हवेचे मोठे प्रदूषण होत आहे. याकडे ग्रामपंचायत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. काही डॉक्टर मंडळीही मेडिकल कचरा जाळून टाकत आहेत. प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने लावणाऱ्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याची गरज आहे.

कडक अंमलबजावणीबरोबर हवा पर्याय

पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक व थर्माकोलला राज्यात बंदी आणली असून पर्यावरणप्रेमीकडून स्वागत होत आहे. पण बंदीची अंमलबजावणी होत नसल्याने चित्र दिसून येते. शहरातील महानगरपालिकेचा आरोग्य विभागाकडून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीची जबाबदारी दिली असताना या विभागाकडे शहरातील कचरा उठावाचे काम असल्याने आरोग्य निरीक्षकांना प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यास वेळ मिळत नसल्याने प्लास्टिक बंदीची घोषणा फोल होण्याची भीती आहे. महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कडक करण्यासाठी जादा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावेत. महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक अंमलबजावणी करताना आडकाठी घालत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्लास्टिकचा वाढता धोका लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी कडक अंमलबजावणीसाठी प्रशासनाला पाठिंबा देण्याची गरज आहे. प्लास्टिकऐवजी कागदी कपांचा वापर सार्वत्रिक झाला आहे. थर्माकोल वस्तू तर हद्दपार झाल्या आहेत. पण चोरीछुपे कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक बॅग्जचा वापर वाढला आहे. तसेच प्लास्टिक विल्हेवाटीची जबाबदारी उत्पादकांवर असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीचे अधिकार सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असतानाही वरिष्ठ अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. सर्व सरकारी विभागानी प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरिकांनीही प्लास्टिकला पर्याय असलेल्या वस्तूंचा वापर वाढवला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉ. पानसरे स्मारकप्रश्नी उद्या बैठक

$
0
0

दोन महिन्यात कामाला होणार सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या कामाला दोन महिन्यात सुरुवात होईल. स्मारकासाठी वाढीव जागेचा प्रश्न निकालात काढण्यासाठी नगररचना, इस्टेट व इतर विभागप्रमुखांची बैठक गुरुवारी (ता. १६) घेणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाला दिली.

सागरमाळ येथील वि. स. खांडेकर विद्यामंदिर परिसरात सुरू असलेल्या कॉ. गोविंद पानसरे स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी जागा व निधीचा प्रश्न त्वरीत सोडवावा, या मागणीसाठी मंगळवारी भाकपच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. चौधरींची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कॉ. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर २० फेब्रवारी २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. पानसरेंच्या निधनानंतर झालेल्या सर्वपक्षीय शोकसभेमध्ये स्मारक उभारण्याचा एकमताने निर्णय झाला. शोकसभेनंतर झालेल्या महासभेने स्मारक उभारणीचा ठराव केला. महासभेत झालेल्या ठरावानंतर पाच लाख रूपये निधीची तरतूद करुन आमदार हसन मुश्रीफ व कॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते स्मारकाची पायाभरणी केली. वास्तुविशारद राजेंद्र सावंत यांनी तयार केलेल्या आराखड्यानंतर कामाला सुरुवात झाली. स्मारकामध्ये प्रतिकृती, चित्रशिल्प, वाचनालय व अभ्यासिका यांचा समावेश असावा असे ठरल्यानंतर आराखड्यामध्ये बदल झाला.

आराखड्यामध्ये बदल झाल्यानंतर वाढीव जागेची आवश्यकता भासू लागली. वाढीव जागेची मागणी प्रशासनाकडून पूर्ण होत नसल्याने स्मारकाचे काम रखडत गेले. जागेबरोबरच स्मारकाच्या उभारणीमध्ये अडचणीचा ठरत असलेला महावितरणचा ट्रान्सफॉर्मर काढण्यासाठी महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, पण त्याचीही अद्याप पूर्तता झालेली नसल्याचे शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

शिष्टमंडळाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, 'स्मारकाच्या बदलेल्या आराखड्यामध्ये फूटपाथचा समावेश होत असल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला. जागेचा प्रश्न तातडीने निकालात काढण्यासाठी नगररचना व इस्टेट विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन एकाचवेळी सर्वप्रकारच्या मान्यता देण्यात येतील. महासभेने स्मारकासाठी दिलेला निधी तातडीने देण्याबरोबरच वाढीव निधीसाठी पुढील अर्थसंकल्पामध्ये महासभेची मंजुरी घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या निधीतून दोन महिन्यात स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल.'

शिष्टमंडळात नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, रमेश वडणगेकर, सुमन पाटील, सुनील जाधव, स्नेहल कांबळे, सुनिता अमृतसागर, बी. एल. बरगे, रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमन मित्तल उद्या पदभार स्वीकारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे गुरुवारी (ता. १६) पदभार स्वीकारणार आहेत. त्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलावली आहे. यापूर्वीचे सीईओ कुणाल खेमनार यांची जुलै महिन्यात चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. त्यामुळे रिक्त पदावर मित्तल यांची नियुक्ती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगर समाजाचा २४ रोजी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता समस्त धनगर समाज संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे ', अशी माहिती धनगर समाजाचे नेते विलासराव वाघमोडे, अशोक कोळेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 'धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाज अनेक वर्षे सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथे विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या धनगर समाजाला आरक्षणाचा फायदा मिळत आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणाच्या या लाभापासून वंचित आहे. आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करण्यासाठी धनगर समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. २४ रोजीच्या मोर्चात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून धनगर समाजातील लोक सहभागी होणार आहेत. मोर्चात धनगर बांधव पारंपारिक ढोल वादन, धनगरी ओव्या, गीत गायन, गजनृत्य, लोककला सादर करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूचे यंदाही संकट

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

कोल्हापूर : गेल्या सात महिन्यांपासून कोल्हापूरकरांना डेंगीने हैराण आहे. मोठ्या संख्येने डेंगीसदृश रुग्ण आढळले आहेत. डेंगीमुळे स्वच्छतेसाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना सुरू असताना स्वाइन फ्लू सदृश लक्षणे काही रुग्णांमध्ये आढळल्याने त्याचा फैलाव होण्याची शक्यता आहे. अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या स्वाइन फ्लूपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे आहे.

गेल्यावर्षी स्वाइन फ्लूच्या साथीने कोल्हापूरकरांना हैराण केले होते. यामध्ये तब्बल ६३ जणांचा बळी गेला होता. देशात २००९ पासून स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. स्वाइन फ्लूचे एच- १, एन- १ या विषाणूंची एका व्यक्तीपासून दुसऱ्याला लागू होते. संसर्ग फैलावत असल्याने या रोगाचा धोका जास्त आहे. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर पहिल्या ते चौथ्या दिवसांपर्यंत त्याची लक्षणे दिसून येतात. स्वाइन फ्लू संसर्गजन्य आजार असल्याने एच १- एन १ विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हा आजार फैलावतो. तसेच बाधित व्यक्तीच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणाऱ्या कफच्या माध्यमातून ती व्यक्ती, ज्या ठिकाणी स्पर्श करेल, त्या ठिकाणी संसर्ग होतो. स्वाइन फ्लूत प्रामुख्याने थंडी वाजून ताप येणे, थकवा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी ही लक्षणे आढळून येतात. काही लक्षणे सात दिवसांपर्यंत टिकतात. इतर आजारांतही स्वाइन फ्लू सदृश्य लक्षणे आढळतात. त्यामुळे चाचणी करून घेण्यास प्राधान्य द्यावे. बारा वर्षांआतील मुले, वयोवृद्ध, गरोदर माता यांना अधिक धोका असल्याने त्यांनी विशेषतः काळजी घेणे गरजेचे आहे. याशिवाय, ज्यांना फुफ्फुसाचे विकार, दमा, तीव्र हृदयविकार, मूत्रपिंड व यकृताचे विकार आहेत, अशांना अधिक धोका संभवतो.

दक्षता कशी घ्यावी?

स्वाइन फ्लूची लक्षणे आढळताच प्रतिबंधात्मक औषधे घेण्यास प्राधान्य द्यावे. तत्काळ औषधोपचार मिळाल्यास त्याला अटकाव घालणे शक्य आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार आणि प्रचार थांबवण्यासाठी तोंड आणि नाक पूर्णतः झाकून बाहेर पडावे. साबणाने हात वारंवार धुवावेत. दरवाज्याच्या कड्या, रिमोट यांसारख्या वस्तू नीट पुसून घ्याव्यात. शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. हातरुमालाचा वापर करावा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ आवर्जून खावेत. आहारात फळे व भाज्या याचा वापर वाढवावा. तसेच भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. नियमित व्यायाम करावा. आहारात 'ब'१२ जीवनसत्व असणारे पदार्थ वाढवावेत. तसेच ताप व खोकला अंगावर न काढता त्वरित फमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा.

स्वाइन फ्लूची लक्षणे आढळताच नागरिकांनी घाबरून जाऊ नये. योग्य उपचार तसेच प्रतिबंधात्मक काळजी घेतल्यास त्यावर मात करता येते. त्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे, वेळेत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूला न घाबरता त्याच्याशी लढण्याची तयारी ठेवणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. विकास बनसोडे

- राज्यात एच १, एन १ संक्रमणाने अधिक मृत्यू

-स्वाइन फ्लूमुळे गेल्या दोन वर्षात देशात ११०० हून अधिक मृत्यू

- राज्यात गेल्या दीड वर्षात ४८८ हून अधिक जणांना लागण

- राज्यात २०१६ पासून २२१८६ जण स्वाइन फ्लूसदृश रुग्ण

- दगावणाऱ्यात २५ ते ५० वयोगटातील संख्या अधिक

- देशात स्वाइन फ्लूत महाराष्ट्र, गुजरात आघाडीवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाई डिफेन्समध्ये घरफोडी

$
0
0

रोख रकमेसह लाखाचा ऐवज लंपास

कोल्हापूर टाइम्स टीम

अंबाई डिफेन्स कॉलनी येथील गार्डन हॉटेलजवळ चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून आणि खिडकीचे गज वाकवून चोरी केली. चोरट्यांनी घरातील रोख १० हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार सोमवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आला. याबाबत सिकंदर अल्लाबक्ष बागवान यांनी (वय ६८, रा. प्लॉट नं. ३७१, अंबाई डिफेन्स कॉलनी) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर बागवान हे शनिवारी (ता. ११) कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. सोमवारी सकाळी ते परत आले. घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटल्याचे दिसताच त्यांनी आत जाऊन पाहणी केली. कपाटातील रोख १० हजार रुपये, चांदीच्या वाट्या, चमचे, सोन्याचे झुबे, कानातील रिंगा, टॉप्स, पोत, रॅडो कंपनीचे घड्याळ असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हॉलमधील खिडकीचे गजही चोरट्यांनी वाकवले होते. बागवान यांनी राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ गावे भीतीच्या छायेखाली

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर, आपटी गावात गेल्या महिन्यात भूस्खलन झाले. त्यानंतर भूस्खलनाचा धोका असलेल्या १७ गावांतील पाच हजार, २३१ जणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यांच्या स्थलातरासाठी सुरक्षित ठिकाण नसल्याने तेथेच जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. तीन वर्षांपूर्वी त्या गावांचा तयार केलेला पुनर्वसनाचा प्रस्तावही लालफितीत आहे. या गावांच्या पुनर्वसनासाठी सरकारी पातळीवरुनही दुर्लक्ष झाले आहे. परिणामी केवळ सतर्क राहण्याच्या सूचना देण्याव्यतिरिक्त प्रशासनाकडून हालचाली होत नाहीत. हक्काचे सुरक्षित ठिकाण नसल्याने या कुटुंबांना भीतीच्या छायेतच पावसाळा काढावा लागत आहे.

पुणे जिल्ह्यातील माळीण गाव २०१४ मध्ये भूस्खलनात गाडले गेले. त्यामध्ये १९ जणांचा बळी गेला. त्यानंतर महसूल यंत्रणेने डोंगराच्या पायथ्याशी असलेली संभाव्य भूस्खलनग्रस्त गावे शोधून काढली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावे धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्या गावात १,१११ कुटुंबांचा समावेश असून, पाच हजार २३१ इतकी लोकसंख्या आहे. पावसाळ्यात या कुटुंबांचे जगणे भीतीच्या छायेखालीच असते. कोणत्याही क्षणी डोंगरावरून येणारे दगड घरावर पडण्याची शक्यता असते. जमीन खचते, माती घसरू लागते. प्रशासकीय पातळीवर तेथील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले जाते. मात्र नेमके स्थलांतर कुठे करायचे, हे सांगितले जात नाही. त्यामुळे जीव मुठीत धरुन तेथेच राहण्याशिवाय या कुटुंबाकडे पर्याय राहत नाही. त्यांच्या पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधींकडूनही ठोस पाठपुरावा होत नाही.

\Bसर्वाधिक संख्या भुदरगडमध्ये

\Bसंभाव्य भूस्खलनाची तालुकानिहाय गावे, कंसात तेथील ग्रामस्थांची संख्या : गडहिंग्लज : चिचेंवाडी (४५०), भुदरगड : खोतवाडी (१२५), पडखंब पैकी रावणवाडी (१४८), वासनोली पैकी धनगरवाडा : (१५०), वासनोली पैकी जागेवाडी (१००), कारीवाडी पैकी हाणफोडेवाडी (६२), टिक्केवाडी (१५०), ममदापूर (१००२).

राधानगरी : कुऱ्हाडवाडी (३३३), ऐनी पैकी धरमलेवाडी (१०२), ऐनी पैकी भैरी धनगरवाडा (१२५), कासारवाडा पैकी धनगरवाडा (११४), धामणवाडी पैकी हणबरवाडी (११६), धामणवाडी पैकी अवचितवाडी (२३६), पंडेवाडी (२४०), पाटपन्हाळा (१४२७), सोळांकूर पैकी रामनगर (३५१).

\Bएका वाडीचे पुनर्वसन

\Bशाहूवाडी तालुक्यातील उखळू पैकी खोतवाडी भूस्सखलनाच्या यादीत होते. या वाडीतील २१ कुटुंबांचे पुनर्वसन महसूल प्रशासनाने केले आहे. पुनर्वसन केले तरी काही कुटुंबे अजूनही पूर्वीच्या घरातच राहतात. मूळ वस्ती सोडण्याची मानसिकता नसल्याने पुनर्वसन करताना अडचणीत येतात, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. याउलट सेवा, सुविधा चांगल्या असलेल्या ठिकाणी पुनर्वसन केले जात नाही. त्यामुळे मूळ वस्ती सोडावीशी वाटत नाही, असे संबंधित कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

.. .. ..

जिल्ह्यातील संभाव्य भूस्खलनग्रस्त गावांतील ग्रामस्थांना प्रशासनातर्फे सतर्कतेचे आवाहन केले आहे. शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी खोतवाडीचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. अनेकदा पुनर्वसन केलेल्या ठिकाणी जाण्याची संबंधित ग्रामस्थांची मानसिकता दिसत नाही. ते मूळगावीच राहतात. तरीही उर्वरित सर्व धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम कंपनीकडून २ कोटी ३५ लाखांची फसवणूक

$
0
0

गांधीनगर पोलिस ठाण्यात मुंबईच्या १४ जणांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई येथील भारत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीने कोल्हापुरातील इमारतीत दहा गाळे विकत देण्याचे आमिष दाखवून गांधीनगर येथील एका व्यक्तीची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत अशोक विरुमल रुपानी (वय ४५, रा. आनंदपुरा दरबारजवळ, गांधीनगर) यांनी जिल्हा कोर्टात तक्रार दिली होती. यानुसार कंपनीच्या प्रमुखांसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

श्रीचंद राजाराम कुकरेजा (वय ५८), आशा श्रीचंद कुकरेजा (५४), सूर्यकांत उर्फ सूरज श्रीचंद कुकरेजा (३३), अवनेशा उर्फ रेणू सूर्यकांत उर्फ सूरज कुकरेजा (३३), जयप्रकाश श्रीचंद कुकरेजा (३०, सर्व रा. सागर दर्शन टॉवर, नेरुळ, नवी मुंबई), जयकिशन गुमानसिंग बुलचंदानी (६०), सुजितकुमार दीनानाथ राय (३६, दोघेही रा. वाशी, नवी मुंबई), हरिराम उर्फ हरूमल राजाराम कुकरेजा (६७, रा. साईबाबा सोसायटी, ठाणे), अशोक राजाराम कुकरेजा (५८, नेरुळ, नवी मुंबई), दीपक राजाराम कुकरेजा (५६, नेरुळ, नवी मुंबई), महेश राजाराम कुकरेजा (५०, सांडपाडा, नवी मुंबई), रितेशराज रमेश प्रसाद (३०), शोक अब्दुल रहित आणि ओम प्रकाश बजाज अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

भारत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स इंड्रस्टी या कंपनीने २००१ ते २००३ या काळात कोल्हापूर महापालिकेच्या इमारतीचे बांधकाम करण्याचा ठेका घेतला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जेम्स स्टोन या इमारतीतील काही गाळे, ऑफिस जागा भाड्याने देणे, मुदत खरेदी आणि विक्री सुरू होती. त्यापैकी ४७ ते ५६ क्रमांकाचे १० गाळे फिर्यादी अशोक रुपानी यांना विकत देण्याचे आमिष बांधकाम कंपनीच्या संचालकांनी दाखवले. १६ नोव्हेंबर २०१४ मध्ये रुपानी यांनी दहा गाळे दोन कोटी रुपयांना विकत घेण्याचा करार कंपनीसोबत केला. संचकार रक्कम म्हणून दहा लाख रुपयांचा चेकही दिला. यानंतर वेळोवेळी चेकद्वारे कंपनीच्या खात्यावर २ कोटी ३४ लाख ४७ हजार रुपये भरले. पैसे मिळाल्यानंतर कंपनीने गाळे खरेदी करून देण्यास टाळाटाळ केल्याने रुपानी यांनी कोर्टात धाव घेऊन तक्रार दाखल केली. जिल्हा न्यायालयातील आठवे प्रथमवर्ग न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार गांधीनगर पोलिसांनी भारत बिल्डर्स अँड डेव्हल्पर्स या कंपनीच्या प्रमुखांसह १४ जणांवर गुन्हा दाखल केला.

गांधीनगर पोलिसांनी गाळे खरेदी-विक्री व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतली असून, चौकशी सुरू आहे. गुन्हे दाखल झालेले सर्व संशयित मुंबईतील आहेत, त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवले जाईल. नोटीस पाठवूनही चौकशीला उपस्थित न राहिल्यास संबंधितांवर अटकेची कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनापरवाना बंदुकींसह काडतुसे जप्त

$
0
0

(फोटो आहे)

राधानगरी तालुक्यातील आपटाळ येथील चौघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दहशत माजवणे व वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी विनापरवाना बंदुकींसह काडतुसे बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आपटाळ (ता. राधानगरी) येथील चौघांना अटक केली. संशयितांकडून ४५ हजार रुपये किमतीच्या चार ठासणीच्या बंदुका व काडतुसे जप्त केली आहेत. कृष्णात गणपती पाटील (वय ४९), शिवाजी बाळू जोशी (३८), नाना पांडुरंग पाटील (४२) आणि संजय तुकाराम पाटील (३८, चौघेही रा. आपटाळ) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. मंगळवारी (ता. १४) ही कारवाई झाली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील आपटाळ येथे काही लोकांकडे गावठी बंदुका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गावात दहशत माजवण्यासह वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी बंदुकींचा वापर केला जात होता. पोलिसांनी मंगळवारी सकाळी आपटाळ येथे संशयितांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली असता, कृष्णात पाटील , शिवाजी जोशी, नाना पाटील आणि संजय पाटील यांच्याकडे विनापरवाना बेकायदेशीर सिंगल बोअरच्या ठासनीच्या बंदुका सापडल्या. पोलिसांनी ४५ हजार रुपये किमतीच्या चार बंदुका जप्त केल्या असून, बंदुकींसाठी वापरली जाणारी दारू, छरे, काडतुसे जप्त केली आहेत. अवैध शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार चौघांवर राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील शिवाजी जोशी हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे.

'शहरासह जिल्ह्यात अनेकांकडे विनापरवाना शस्त्रे आहेत. शस्त्रांमुळे गुन्हे वाढण्याचा धोका असल्याने अवैध शस्त्रांचा शोध घेऊन ती जप्त करण्याची मोहीम पोलिसांकडून राबवली जाणार आहे. यासाठी सर्व पोलिस पाटील, पोलिस मित्र, खबरे यांची मदत घेतली जात आहे. संशयितांच्या घरांवर छापे टाकून अवैध शस्त्रे जप्त केली जातील, त्याचबरोबर संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जातील', अशी माहिती पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिस हवालदार नरसिंग कांबळे व पोलिस नाईक प्रल्हाद देसाई यांनी शस्त्रांची माहिती काढली होती. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित, राजेंद्र सानप, युवराज आठरे, जितेंद्र भोसले, विठ्ठल मणिकेरी, रवींद्र कांबळे, चालक सुकुमार हासूरकर आदींना ही कारवाई केली.

............

चौकट

ग्रामीण भागात मोठा साठा

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे आहेत. ज्यांच्याकडे जुनी शस्त्रे आहेत, त्यांनी परवाने घेतलेले नाहीत. सणासुदीला अशी शस्त्रे बाहेर काढली जातात. शिकारींसाठी याचा वापर केला जातो. शस्त्र परवाना सहज मिळत नसल्याने अनेकांनी अवैध शस्त्रे विकत घेतली आहेत. अवैध शस्त्र खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रीय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अण्णा भाऊंचे योगदान महत्त्वपूर्ण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मराठी भाषिकांनी मोठा लढा दिला. या आंदोलनात १०५ मराठा भाषिकांनी बलिदान करत हौतात्म पत्करले. या आंदोलनात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिलेले योगदान नोंद सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासारखे आहे, असे प्रतिपादन डॉ. शरद गायकवाड यांनी केले.

राजर्षी शाहू स्मारक भवन येथे रविवारी क्रांतीगुरू सोशल फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते भगवान कवाळे होते.

डॉ. गायकवाड म्हणाले, 'अण्णाभाऊंनी मराठा साहित्याचा केंद्रबिंदू बदलला. अण्णा भाऊंच्या शाहिरी पोवाड्यातून आंदोलनात रान पेटवण्यात आले. मराठा भाषिक पेटून उठला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासात अण्णाभाऊंचे योगदान मोठे होते.'

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शोभा मधाळे (मुंबई), सुरेश बडेकर (कराड), महेश चौगुले (उचगाव), विजय भोडवे (निढळ), दादासाहेब तांदळे (जिऊर), सरदार कांबळे (आमशी), अशोक भोसले (रुकडी), रणजित सदामते (जरगनगर), आक्काताई कंगणे (हुपरी), लता घाडगे (शिंगणापूर) यांना क्रांतीगुरू पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच मातंग समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मातंग समाजाला अ,ब,क,ड नुसार स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी अध्यक्षीय भाषणात कवाळे यांनी केली. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाळराव साठे, दिलीप वायदंडे, सर्जेराव पाटील, अरुण निंबाळकर बाजीराव नाईक, बळवंतराव माने, सदाशिव तांदळे आदी उपस्थित होते. अनिल तांदळे, राजू घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्मळे नेट परीक्षा उत्तीर्ण

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर: येथील मानसी सुप्रभा सुहास निर्मळे यांनी राज्यशास्त्र विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत जुलै महिन्यात परीक्षा झाली होती. मानसी निर्मळे यांनी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून जेएनयू नवी दिल्ली राज्यशास्त्र विषयात एमए पूर्ण केले. त्या, रयत शिक्षण संस्थेतील प्रा. सुहास निर्मळे यांच्या कन्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ यांना शोधपत्रकारिता पुरस्कार

$
0
0

फोटो आहे..

कोल्हापूर टाइम्स टीम

पत्रकार जगन फडणीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा यंदाचा शोध पत्रकारिता पुरस्कार मुंबई येथील पत्रकार संदीप भुजबळ यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता.१६) सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी दिली.

पुरस्काराचे यंदाचे ११ वे वर्ष आहे. ट्रस्टतर्फे दरवर्षी मराठी पत्रकारितेतील एका तरुण पत्रकाराला त्याच्या वर्षभरातील महत्त्वाच्या शोधपत्रकारितेबद्दल जगन फडणीस स्मृति शोधपत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्हे असे पुरस्काराचे स्वरुप आहे. भुजबळ हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून सध्या ते मुंबईत वृत्त वाहिनीत पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी, 'बोंड अळीचा प्रादुर्भाव'यासंदर्भात व्यापक वृत्तांकन केले. ही शोध पत्रकारिता केल्याबद्दल त्यांना पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. याप्रसंगी अकोलकर यांचे 'लोकशाही आणि बदलती प्रसारमाध्यमे'यांचे व्याख्यान होणार आहे. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त प्रा. डॉ. विलास पोवार, निशिकांत चाचे, नामदेव कांबळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटलजींचा सोलापूरशी ऋणानुबंध

$
0
0

सूर्यकांत आसबे, सोलापूर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आल्यापासूनच सोलापूरकरांची घालमेल सुरू होती. दिवसभर अटलजींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थनासुद्धा झाल्या. परंतु, सायंकाळी अटलजींच्या निधनाची बातमी समजली आणि सोलापूरकर गहिवरून गेले. कारण अटलजींचे सोलापूरशी नातेही तितके घट्ट होते. जनसंघाचे अध्यक्ष असताना सोलापूर शहरात तर पंतप्रधान असताना पंढरपुरात धनगर समाजाच्या मेळाव्याला ते आले होते. त्यांनी अनेकांना आपल्या अमोघ वक्तृत्वाची मोहिनी घातली होती. सोलापुरात त्यांची गजानन हंपी, हणमंत राचेटी, शरयू बडवे, ज्ञानेश्वर गुंड, गोवर्धनदास भुतडा, मथुरादास डागा, बाबुराव बसवंती यांच्याशी अटलजींची घनिष्ठ मैत्री होती. जनसंघाचे अध्यक्ष असताना जवळपास १० ते १२ वेळा ते सोलापुरात आले होते.

हरिभाई देवकरन प्रशालेच्या मैदानावर दोनवेळा भाजपचे अधिवेशन झाले, त्यालाही अटलजींनी संबोधित केले होते. सोलापूर जनसंघाच्यावतीने अटलजींची एकसष्ठी साजरी करून त्यांना होम मैदानावर झालेल्या कार्यक्रमात एक लाखांची थैली देण्यात आली होती. या वेळी सोलापूर महानगरपालिकेचे काँग्रेसचे तत्कालीन महापौर बाबुराव चाकोते यांनी होम मैदानावर व्यासपीठावर जाऊन अटलबिहारी वाजपेयी यांचा सत्कार केला होता. त्यावेळी चाकोते यांच्यावर चौफेर टीका झाली होती. मात्र, चाकोते टीकेला जुमानले नाहीत. शिवाय जनसंघाच्या तत्कालीन अध्यक्ष शरयूताई बडवे यांच्यासह महिलांनी त्यांचे औक्षणही केले होते. पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची आणीबाणीकडे कशी वाटचाल सुरू आहे हे वाजपेयींनी दोन वर्षे अगोदरच जाहीर सभेत सांगून टाकले होते. या सभेला सांगोल्याचे तत्कालीन उपनगराध्यक्ष डॉ. डबीर हे कार्यक्रमाला दुचाकीवर आले होते. त्यांनी अटलजींचा सत्कार करून कोल्हापुरला जाताना सांगोला येथील सभेला संबोधित करावे, म्हणून केलेली विनंती अटलजींनी मान्य केली होती आणि दुसऱ्या दिवशी ते जाणार होते. मात्र डॉ. डबीर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच ते हळहळले. सामान्य कार्यकर्त्याच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी ते सांगोला येथे गेले होते.

१९७३ साली खासदार असताना ते सोलापुरात आले होते. याशिवाय जनसंघाच्या प्रचारानिमित्त ते सोलापुरात आल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासासाठी एसटीचा आधार घेत होते. सोलापुरातील त्यांचे घनिष्ठ सहकारी बाबुराव बसवंती यांच्या शेतात मुक्काम करत होते. त्या ठिकाणी पिटले, भाकरी, शेंगा चटणी या अस्सल गावरान जेवणाचा ते मनसोक्त आनंद लुटायचे. कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करून ते कुटुंबात रंगून जायचे. भाजपचे तत्कालीन नगरसेवक जगदीश तुळजापूरकर यांनी आपल्या लग्नाचे निमंत्रण वाजपेयी यांना धाडले होते. त्यासाठी अटलजी आवर्जून १९ एप्रिल १९८८ साली सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याला उपस्थित राहून तुळजापूरकर यांना आशीर्वाद दिले होते. सोलापुरातील बसवंती मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभाला अटलजी १७ मे १९७४ रोजी सोलापुरात आले होते. एकूणच अटलजींचा सोलापूरकरांशी चांगलाच ऋणानुबंध होता. त्यांच्या निधनाने सोलापुरातील जनसंघ, भाजप कार्यकर्ते हळहळ व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरीशी होते प्रेमाचे नाते

$
0
0

पंतप्रधान असताना धनगर मेळाव्याला हजेरी

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

अजातशत्रू, प्रामाणिक व कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयीच्या आठवणींची दाटी साऱ्यांच्या मनात झाली आहे. वाजपेयी आणि पंढरपूरचेही प्रेमाचे नाते होते. जनसंघापासून ते येथे येत असत. पंतप्रधान असताना २००४मध्ये त्यांनी धनगर समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने पंढरपूरला भेट दिली होती.

वाजपेयी यांनी जनसंघाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर देशभर दौरे केले होते. १९७४ मध्ये त्यांनी सोलापूरसह पंढरपूरचा दौरा केला. त्यानंतर १९८८मध्ये त्यांनी पंढरपूरला पुन्हा भेट दिली. आपले सरकार आल्यावर विठ्ठलाच्या या पंढरीनगरीच्या समस्या सोडवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले होते. १९९६मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा वाजपेयींनी पंढरपूरच्या रेल्वे रुंदीकरणासह अनेक योजनांसाठी निधी दिला होता. त्यांच्याच कॅबिनेटमधील पर्यटनमंत्री जगमोहन यांनी २००३मध्ये पंढरीचा दौरा केला व पालखी मार्गावरील संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखीतळाचा विकास तसेच पंढरीत तीन कोटी रुपये खर्च करून दर्शन हॉल उभारण्यास मंजुरी दिली होती.

वाजपेयींचा पंढरपूरचा सर्वांत मोठा दौरा २००४मध्ये झाला होता. ते येथे धनगर समाजाच्या मेळाव्याला आले होते. त्यावेळी चंद्रभागा मैदानात झालेल्या सभेला धनगर बांधव दोन ते अडीच लाख एवढ्या विक्रमी संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळ निवारणासाठी २०० कोटींचा निधी जाहीर केला होता. याच सभेत वाजपेयींनी गळ्यात ढोल घालून वाजवला होता. तत्पूर्वी, त्यांनी श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले व पूजा केली. तसेच वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींची ही भेट घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

ज्येष्ठ विचारवंत प्रा. फकरुद्दीन हजरत बेन्नूर यांचे शुक्रवारी रात्री नऊ वाजता सोलापुरातील राहत्या घरी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी बेन्नूरनगर येथून अंत्ययात्रा निघणार असून, मोदी कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

बेन्नूर हे गेल्या सहा महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना घरी आणले होते. शुक्रवारी रात्री ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. प्रा. बेन्नूर हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात एक बहीण आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

बेन्नूर यांनी सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दीर्घ काळ काम केले. निवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. मुस्लिम समाजातील अभ्यासू आणि बुद्धिवंत समाजसुधारकांमध्ये बेन्नूर यांचे नाव आदराने घेतले जाते. समाजात वाढलेला जमातवाद, वाईट रूढी-परंपरा आणि हिंदुत्ववाद इत्य़ादी विषयांवर त्यांनी १९६८ पासून सातत्याने लिखाण केले. त्यांनी सोलापूरमधील कामगार चळवळ तसेच डाव्या चळवळीतही दीर्घ काळ काम केले. १९८९मध्ये मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना करून मराठी साहित्य चळवळीला प्रोत्साहन दिले. १९९२ साली त्यांनी महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी संघटना स्थापन करून मुस्लिमांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. १९७०पासून त्यांनी सुधारणावादी चळवळीसाठी कामाला सुरुवात केली. मुस्लिम महिलांचे प्रश्न, हिंदु-मुस्लिम प्रश्न आणि राजकारण, जमातवाद, हिंदु-मुस्लिम सौहार्दाची समस्या आदी विषयांवर त्यांनी विविध वृत्तपत्रे, पाक्षिके, मासिके आणि साप्ताहिकांत लेखन केले आहे. भारतीय मुसलमान, इस्लाम व भारतातील धार्मिक हिंसाचार या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांची मराठी, हिंदी आणि उर्दूत मिळून दहा पुस्तके प्रकाशित आहेत. बेन्नूर यांनी असगरअली इंजिनियर आणि डॉ. मोईन शाकीर यांच्यासोबत काम केले.

सोमवारी मानपत्र देण्यात येणार होते

प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांच्या साहित्य आणि सामाजिक योगदानाविषयी सोमवारी सोलापुरात त्यांचा गौरव करण्यात येणार होता. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये त्यांना मानपत्र देण्यात येणार होते. तसेच, त्यांच्या ‘हिंद स्वराज – एक अन्वयार्थ’, ‘मुस्लिम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद’, ‘भारत के मुस्लिम विचारक’ या तीन पुस्तकांचे प्रकाशनही होणार होते. मात्र, त्या आधीच बेन्नूर यांचे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या तीन पुस्तकांशिवाय बेन्नूर यांनी हिंदुत्व, मुस्लिम आणि वास्तव, आधुनिक भारतातील मुस्लिम विचारवंत, गुलमोहर (कवितासंग्रह), भारतीय मुसलमानांची समाजरचना आणि मानसिकता, सुफी संप्रदाय : वाङ्मय, विचार आणि कार्य, भारत के मुस्लिम विचारक (हिंदी), हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ, भारत के मुसलमानो की माशिअत और जेहनियत (उर्दू), राष्ट्रवाद, साम्राज्यवाद आणि इस्लाम, मुस्लिम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेप, भारतीय मुस्लिम : अपेक्षा आणि वास्तव या पुस्तकांचे लेखन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कॉसमॉस’प्रकरणी पथक कोल्हापुरात

$
0
0

लक्ष्मापुरी शाखेतून कोट्यवधी काढल्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉसमॉस बँकेवर ९४ कोटींच्या ऑनलाइन दरोड्यातील काही कोटी रुपयांची रक्कम हॅकर्सनी बँकेच्या कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील शाखा आणि एटीएममधून काढल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे. पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग यांच्या नेतृत्वाखाली नेमलेले एसआयटी पथक शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याची चौकशी सुरु केली आहे, मात्र शुक्रवारी बँकेला सुट्टी असल्याने शनिवारी तपास कामाची सुरुवात होणार आहे. दरम्यान, ग्राहकांच्या खात्यातून पैसे गेलेले नाहीत, अशी नोटीस बँक प्रशासनाने कॉसमॉस बॅँकेच्या एटीएमवर लावली आहे.

कॉसमॉस बॅँकेचे सर्व्हर हॅक करून हायटेक चोरट्यांनी ९४ कोटी रुपये काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बँक प्रशासनाने पुणे येथील चतृ:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडून या चोरीचा तपास सुरु आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक केली आहे. याप्रकरणी एक पोलिस निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांचे पथक शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने दिवसभर कॉसमॉस बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेतील व्यवहाराची चौकशी केली. ११ आणि १३ ऑगस्ट रोजी हॅकर्सनी बँकेवर केलेल्या सायबर हल्ल्यातून दोन तासाच्या कालावधीत २८ देशांतून ९४ कोटी रुपये काढले. पैकी या हायटेक चोरीत लक्ष्मीपुरी शाखेतूनही पैसे काढल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. काढलेली रक्कम हॉगकॉंग बँकेच्या खात्यात ट्रान्सफर केली आहे. पथकाने बँकेची खाती, ठेव, ऑनलाइन व्यवहाराची माहिती घेतली आहे. बँकेचे काही अधिकारी आणि काही खातेदारांकडे चौकशी केली . शुक्रवारी बँक बंद असल्याने शनिवारी या चोरीचा निश्चित आकडा स्पष्ट होणार आहे. हा तपास गोपनीय सुरु असल्यामुळे पथकातील अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

अफवांवर विश्वास ठेवू नका

'ग्राहक आणि बँकेचे नाते विश्वासाचे आहे. आपली बँक जुनी असून ग्राहकांचे व्यवहार सुरक्षित आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच गैरसमजही करुन घेऊ नयेत. खातेदारांची रक्कम सुरक्षित आहे. घाबरुन जाऊ नका, व्यवहार सुरळीत ठेवा,' असा आशय असलेले पत्रक बँकेच्या लक्ष्मीपुरी येथील एटीएमवर चिकटविले आहे.

कोल्हापूरच्या सायबर सेलची मदत

पथकाकडून गोपनीय तपास सुरु आहे. स्थानिक माहिती मिळविण्यासाठी शनिवारी पथक कोल्हापूरच्या सायबर सेलची मदत घेणार आहे. बँकेच्या अन्य शाखाही सायबर हल्ल्यात बळी पडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुण्याच्या सायबर सेल पथकाने बँकांच्या राज्यभरातील शाखांची यादी घेतली आहे. हॅकर्सने हल्ला केलेल्या बँकेच्या शाखांकडून प्राथमिक माहिती मागविली आहे. या माहितीत बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेतून पैसे काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरच्या सायबर सेल अधिकाऱ्यांनी या पथकाला माहिती देण्यासाठी डेटा गोळा केला आहे. शनिवारी सकाळपासून या प्रकरणाचा तपास गतीने सुरु केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची उघडीप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात बऱ्याच दिवसानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. अधूनमधून हलक्या सरी आणि कडककडीत ऊन असा ऊनपावसाचा खेळ शुक्रवारी अनुभवायला मिळाला. दरम्यान, धरणक्षेत्रात चांगलाच पाऊस झाल्याने पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी दिवसभर १४ इंचाने वाढली. ती ३० फूट दोन इंचापर्यंत गेली होती. अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली आहेत. गगनबावड्यात ५४ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी दिवसभर पावसाने चांगलीच उघडीप दिली. अधूनमधून किरकोळ सरी आल्या. दिवसभर बराच काळ कडकडीत ऊन पडल्याने नागरिकांनी फिरण्याचा आनंद घेतला. धरणक्षेत्रातील संततधार व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने दिवसभरात पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी १४ इंचाने वाढली. चांदोली धरणातून १० हजार ५९७ क्युसेक, काळम्मावाडी धरणातून ६५०० तर राधानगरी धरणातून ५८८४ क्युसेक विसर्ग सुरु आहे. कोयनेतून सर्वांत जास्त ४३ हजार ६१२ क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील ३६ बंधारे पाण्याखाली आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावतीवरील तारळे, शिरगांव, हळदी, राशिवडे, खडक कोगे व सरकारी कोगे हे सहा बंधारे तर वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, शिरगाव व खोची हे पाच बंधारे पाण्याखाली आहेत. दूधगंगा नदीवरील सुळंबी, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी, दत्तवाड, कसबा वाळवे व तुरूंबे हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील बीड तर कुंभी नदीवरील कळे हा एक बंधारा पाण्याखाली आहे. वेदगंगा नदीवरील निळपण व वाघापूर हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. ताम्रपर्णी नदीवरील कुतनवाडी हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. कासारी नदीवरील यवलूज, ठाणे आळते, पुनाळ तिरपण हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेंबे रोडवर झाड पडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टेंबे रोडवरील राजारामियन क्लबजवळ झाड पडल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली. अग्निशमन दल आणि स्थानिक जादू ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. राजारामियन क्लबजवळील झाड उच्चदाबाच्या तारेवर पडून वीजपुरवठा खंडित झाला. तसेच परिसरात वीज मंडळाच्या डीपीवर झाड उडाल्याने मोठा आवाज झाला. झाड पडल्यानंतर परिसरात वाहतूक नसल्याने जीवितहानी टळली. परिसरातील जादू ग्रुपचे संदीप पाटील यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. टिंबर मार्केट येथील अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी आले. जवान व जादू ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी झाड बाजूला केले. त्यामध्ये जादू ग्रुपचे संदीप पाटील, अमोल सुर्वे, सनी हातकर, प्रसाद चौगुले, अक्षय भोसले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संदीप भुजबळ यांना फडणीस स्मृती शोध पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पत्रकारिता ही सत्यावर आधारित असली पाहिजे. सध्य स्थितीत खरे बोलणे आणि लिहिणे हे धोकादायक बनले आहे. अशा स्थितीत पत्रकार जगन फडणीस यांच्यासारखी नागरिकांशी निगडीत आणि प्रस्थापितांना आव्हान देणारी पत्रकारिता नवं प्रेरणा देणारी आहे' असे प्रतिपादन पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी केले. पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ट्रस्टतर्फे दिला जाणारा पत्रकार जगन फडणीस स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार मुंबई येथील पत्रकार संदीप भुजबळ यांना त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा समारंभ झाला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे. भुजबळ यांनी आई-वडिलांसोबत हा पुरस्कार स्वीकारला.

पत्रकार अकोलकर यांनी 'लोकशाही आणि बदलती प्रसारमाध्यमे' या विषयी ऊहापोह केला. 'जनता पक्ष फुटला आणि देशाचे चित्र बदलत गेले. जनता पक्ष एकसंध राहिला असता तर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली नसती.'असे नमूद करत अकोलकर यांनी आणीबाणीचा कालावधी, त्यानंतर देशात घडलेले सत्तांतराचे दाखले दिले. तर 'कोल्हापुरातील हा पुरस्कार माझा सन्मान वाढविणारा असल्याची भावना पत्रकार संदीप भुजबळ यांनी व्यक्ती केली. प्रा. डॉ. ओमप्रकाश कलमे यांनी ट्रस्टला पाच हजार रुपयांची देणगी दिली. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. विलास पवार यांनी स्वागत केले. पत्रकार संभाजी गंडमाळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त निशिकांत चाचे, प्राचार्य महादेव नरके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेसिडन्सी क्लब कार्यक्रम

$
0
0

रेसिडेन्सी क्लबच्या नवीन खोल्यांचे

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन

कोल्हापूर : येथील रेसिडेन्सी क्लबच्या नवीन खोल्यांचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमामध्ये अत्याधुनिक १४ खोल्यांबरोबरच रुफ टॉप बेंक्विट हॉलचेही उदघाटनही करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व उपजिल्हाधिकारी नंदकुमार काटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सचिव अमर गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. रोहिणी सुभेदार, उपसचिव नील पंडित-बावडेकर, खजानिस शीतल भोसले, विक्रांतसिंह कदम, मानसिंग जाधव, रवी संघवी, केदार हसबनीस, डॉ. दिलीप अंबर्डेकर, बसवराज खोबरे, नरेश चंदवाणी, सचिन झंवर, अभिजित मगदूम आदी उपस्थित होते. दरम्यान, उद्योगपती रामप्रताप झंवर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने क्लबचे सदस्य उपस्थित होते.

फोटो : कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लबच्या नवीन खोल्यांचे उदघाटन करताना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार. शेजारी सचिव अमर गांधी, रोहिणी सुभेदार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व क्लबचे पदाधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images