Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हत्यार बाळगणाऱ्याला अटक

$
0
0

फोटो - आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संभाजीनगर परिसरात जांबिया हत्यार घेऊन दहशत निर्माण करणारा संशयित आरोपी सुहास वसंतराव तडवळे (वय ४६, रा. घर क्रमांक १००४, ए वॉर्ड, कोंडेकर गल्ली, फिरंगाई तालीम जवळ, कोल्हापूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.

जुना राजवाडा पोलिसांकडून शनिवारी संभाजीनगर परिसरात पेट्रोलिंग सुरु होते. त्या वेळी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर परिसरातील हॉटेल समाधान परमीट रुमच्या समोर जांबिया हत्यार घेऊन मोठ्याने ओरडत असलेला दिसला. या प्रकारामुळे रस्त्यावरील नागरिकही घाबरले. काहीजण पळूनही जाऊ लागले. त्यावेळी पेट्रोलिंगसाठी या परिसरात पोलिस आले होते. त्यांना पाहताच संशयित तडवळे हा हत्यार टाकून पळू लागला. त्या वेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग महिला उपनिरीक्षक भांबिष्टे, पोलिस नाईक सचिन ढोबळे यांनी करून त्याला पकडले. त्याच्याकडून हत्यार ताब्यात घेतले. जुना राजवाडा पोलिस निरीक्षक मानसिंह खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हुल्लडबाजांवर कारवाई

$
0
0

शाहूवाडी : तालुक्यातील बर्की, मानोली, केर्ली या पर्यटनांच्या ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या चार पर्यटकांसह परिसरात बेशिस्तपणे वाहन चालवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ६७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून १३ हजार ४०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी दिली. रविवारी ६७ मोटारसायकलस्वारांवर दंडात्मक कारवाई केली, तर हुल्लडबाजी करणाऱ्या अन्य चार पर्यटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ११ बंधारे पाण्याखाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री साडेआठनंतर पुन्हा जोरात पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे जिल्ह्यातील ११ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर रविवारी सकाळी सात वाजता २२ फूट ५ इंच पाणीपातळी राहिली. यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

दरम्यान, रविवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. दुपारी ऊनही पडले. यामुळे पिकांतील आंतरमशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र दिसत होते. मात्र, सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. दमदार सरी कोसळल्याने शहरातील सर्वच रस्त्यावर पाणीच पाणी झाले.

गेल्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र तळकोकण, राधानगरी, चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. यामुळे नदी, नाले, ओढ्यातील पाणी वाहू लागले आहे. आठवड्यानंतर शनिवारी रात्रभर पुन्हा पावसाचा जोर राहिला. रविवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात २९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ७७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.

पावसामुळे सर्वच नद्यांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ तर भोगावती नदीवरील खडक कोगे, सरकारी कोगे, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव असे बंधारे पाण्याखाली आहेत. पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाकडील नोंदीप्रमाणे सुर्वे बंधाऱ्यावर २१ फूट, रुई ४९ फूट, इचलकरंजी ४७ फूट, तेरवाड ४२ फूट ६ इंच, शिरोळ ३२ फूट ६ इंच, नृसिंहवाडी २८ फूट इतकी आहे. राधानगरी धरणात ८.०१ टीएमसी, तर कोयना धरणात ९०.४७ टीएमसी पाणीसाठा आहे.

०००

तालुकानिहाय पाऊस

हातकणंगले ५, शिरोळ ०.४२, पन्हाळा १६. ८६, शाहूवाडी ३४.६६, राधानगरी ३८.६७, करवीर १४, कागल २६, गडहिंग्लज १२.४२, भुदरगड ३६.६०, आजरा २१.७५, चंदगड १२.८३ मि.मी.

००००

राधनगरी तालुक्यात दमदार हजेरी

राधानगरी : राधानगरी तालुक्यात शनिवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. गेले महिनाभर पावसाने तालुक्यात पावसाने थैमान घातले होते. पण गेले आठवडाभर पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्गात चिंता पसरली होती. शनिवारी पहाटेपासून पुन्हा पावसाने दमदार आगमन केले आहे. राधानगरी जलाशय परिसरात पाऊस दमदार आहे, तर तालुक्यात अन्य ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दमदार पावसामुळे राधानगरी जलाशय प्रशासनाने जलाशयातून पाण्याचा विसर्ग १२०० क्युसेक्सवरून १६०० क्युसेक्स विसर्ग वाढवला आहे. विसर्गामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हा पाऊस खरीप हंगामातील भात, नाचणी पिकांना पोषक असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव टेम्पोच्या धडकेत चार वर्षाची बालिका ठार

$
0
0

भरधाव टेम्पोच्या धडकेत

चार वर्षाची बालिका ठार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथे आजीसोबत रस्ता ओलांडत असताना चार वर्षाच्या मुलीचा टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. आराध्या संदीप सुतळे असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पुलाची शिरोली हळहळली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी टेम्पोचालक रमेश सिद्धरुळू बन्नूर (वय ३०, रा. होळीहसूर, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) याला ताब्यात घेतले आहे.

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे मोहन कदम राहतात. कौटुंबीक वाद असल्याने त्यांची बहिण आणि चार वर्षीची भाची आराध्या हे त्यांच्याजवळच राहता. कदम यांच्या आईचा केळी विक्रीचा व्यवसाय आहे. त्या नेहमी भाची आराध्या हिला सोबत घेऊन केळी विक्रीसाठी जातात. नेममीप्रमाणे रविवारी दुपारी आराध्या आजीसोबत निघाली होती. पुलाची शिरोली येथे रस्ता ओलांडून आराध्या आणि तिची आजी जात होते. यावेळी दोघींनीही रस्ता ओलांडण्यास काही अंतर राहिले असतानाच शिरोली एमआयडीसीकडून भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोखाली आराध्या सापडली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. घटनास्थळी अतिशय विदारक चित्र होते. अचानक झालेल्या अपघातानंतर महामार्गावर बराच काळ एका बाजुची वाहतूक थांबली. गंभीर जखमी आराध्याला तत्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक रमेश बन्नूर याला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजार युवकांवरील गुन्हे मागे घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा आरक्षण मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात दहा हजार युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. अनेक युवकांवर २२६ व ३०७ कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून, युवकांवरील क्रांतिदिनापूर्वी सर्व गुन्हे मागे घ्यावेत,' अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार बैठकीत केली. कोल्हापुरात अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्य दौऱ्यात ठिकठिकाणी करून देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले, 'घटनेतील तरतुदीनुसार आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही. मात्र, घटनेत बदल केल्यास आरक्षण सहज शक्य आहे. यापूर्वी घटनेत १२३ वेळा दुरुस्ती केली असून, केवळ सामाजिक मागासलेपणाच्या मुद्द्यावरच मराठा समाजाला आरक्षण देता येणे शक्य आहे. पण सरकार याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजाने आंदोलनास सुरुवात केली. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आषाढी वारीत आंदोलकांकडून साप सोडणार असल्याचे सांगत आपल्याला ब्लॅक कॅट कमांडोचे संरक्षण आहे. मात्र, वारकऱ्यांना कोणताही धोका नको म्हणून शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनात पेड कार्यकर्ते असल्याचे वक्तव्य केल्याने आंदोलनाचा भडका उडाला. आरक्षणाच्या मुद्द्यावर यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्री पाटील यांच्यासह मंत्री विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती. तरीही कोणताच निर्णय होत नसल्याने आंदोलकांमध्ये एक जहाल गट निर्माण झाला. पण अशाही स्थितीत कोल्हापुरात अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. छत्रपती शाहू महाराजांमुळे येथे बहुजनांची एकत्रित बांधणी केल्यामुळे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाचा संदेश संपूर्ण राज्यात आपण देणार आहे.'

पत्रकार बैठकीस राज्य कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील, जिल्हाध्यक्ष शिवाजी खोत, प्रवीण पाटील, शहराध्यक्ष केतन पाटील, कार्याध्यक्ष कृष्णा पाटील, संदीप भोसले, संपत चव्हाण, आदी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

०००

चाकणमधील युवकांचा थांगपत्ताच नाही

मराठा आरक्षण मागणीसाठी चाकणमध्ये आंदोलन सुरू असताना आंदोलनाला हिंसक वळण लागले. चाकण येथील आंदोलनावेळी अनेक युवकांची धरपकड केली. ताब्यात घेतलेल्या युवकांना कोठे ठेवले आहे, याचा अद्याप थांगपत्ताच लागलेला नाही. याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी संपर्क साधला आहे. पण तरीही या युवकांची माहिती मिळत नाही. क्रांतिदिनी होणाऱ्या आंदोलनावेळी हिंसा होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी सुरू केलेले कोंम्बिग ऑपरेशन बंद करावे अशी मागणी गायकवाड यांनी केली.

०००००

मराठा नेत्यांची बदनामी

राज्यात मराठा समाजाचे आतापर्यंत ११ मुख्यमंत्री झाले, त्यांनी का आरक्षण दिले नाही? अशा मजकुराचे संदेश सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांची बदनामी केली जात आहे. मात्र, या मराठा मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्य क्रमांक एक बनले. शैक्षणिक संस्था, बँका, पतसंस्था, दूध संघांच्या निर्मितीसाठी धोरणात्मक निर्णय घेतले. अशा निर्णयामुळेच रोजगारनिर्मिती झाली. मराठा समाजातील नेत्यांनी शैक्षणिक संस्था काढल्या नसत्या तर, बहुजन समाज उच्चशिक्षणापासून वंचित राहिला असता, अशी वस्तुस्थिती असताना आरक्षणावरून मराठा नेतृत्वाची बदनामी सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर पोलिसांनीच मृतदेह ताब्यात घ्यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर विनायक गुदगी याचे पार्थिव कणेरीवाडीकडे नेण्यावरुन पोलिस आणि सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांत वाद झाला. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पार्थिक दसरा चौकात आंदोलन स्थळी नेऊन दोन मिनिटे आदरांजली वाहणार असल्याचे सांगितले. त्याला पोलिसांनी हरकत घेतली. त्यानंतर सीपीआरमध्ये तणावाचे वातावरण होते.

सीपीआरमध्ये उपस्थित असलेल्या पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, संजय मोरे, वसंत बाबर यांनी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दसरा चौकात काही वेळापूर्वी आदरांजली वाहिली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका थेट कणेरीवाडीला नेऊ असे सांगितले. अप्पर अधिक्षक काकडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत पार्थिव थेट गावी नेऊ असे सांगताच कार्यकर्त्यांचा संयम सुटला. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी, 'दसरा चौकात पार्थिव नेण्यास आडकाठी आणणार असाल तर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घ्यावा. आम्ही आंदोलनातून राजीनामा देऊन घरी जातो. कोल्हापुरात आंदोलन शांततेने सुरू आहे. सरकारला समाजाविषयी काळजी नाही. एकही मंत्री इतक्या दिवसात आंदोलनस्थळी फिरकला नाही. सरकारला आंदोलनावरुन वाद निर्माण करायचा आहे' असा आरोप केला. हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, दिलीप देसाई यांनीही पोलिसांच्या भूमिकेला आक्षेप घेतला. वाद चिघळत असताना ऋतुराज पाटील तेथे आले. त्यांनी हस्तक्षेप करत 'कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. पार्थिव दोन मिनिटे दसरा चौकात न्यायला पोलिसांनी परवानगी द्यावी' अशी विनंती केली. इतर कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर पोलिसांनी दसरा चौकात आंदोलनस्थळी आदरांजली वाहण्यास परवानगी दिली. पोलिस बंदोबस्तात पार्थिव दसरा चौकात आणण्यात आले.

सुन्न वातावरण अन् अस्वस्थ कार्यकर्त

तत्पूर्वी विनायक गुदगीने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे वृत्त दुपारी दीड, पावणेदोनच्या सुमारास दसरा चौक थडकले. आंदोलन शांततेने सुरू असताना तरुणाच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून कार्यकर्ते सुन्न झाले. सकल मराठा समाजाचे इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्व, स्वप्निल पार्टे, वसंत मुळीक, गणी आजरेकर, सचिन तोडकर, फत्तेसिंह सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. तत्पूर्वी विनायकचे वडील व भाऊ, काही नातेवाईकांनी रिक्षातून विनायकला घेऊन सीपीआरमध्ये आले होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत व इतरांची मदतीसाठी धावपळ सुरू होती. डॉक्टरांनी विनायकचा मृत्यू झाल्याचे सांगताच वातावरण सुन्न झाले. आत्महत्येच्या वृत्तानंतर कार्यकर्त्यांचे लोंढे सीपीआर परिसरात दाखल होऊ लागले. संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारला शिव्यांची लाखोली वाहत रास्ता रोकोचा इशारा दिला. दरम्यान, पोलिस फौजफाटा वाढविण्यात आला. पोलिस उपअधिक्षक सूरज गुरव यांच्यासह शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी सीपीआरमध्ये दाखल झाले. दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत सीपीआरमधील वातावरण अस्वस्थ करणारे होते.

स्ट्रायकिंग फोर्सला आक्षेप

पोलिसांनी सीपीआर परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनल्याने जादा कुमक मागविली. स्ट्रायकिंग फोर्सही तैनात केला. दुपारी सव्वातीन वाजता कार्यकर्ते सीपीआरमधील शवविच्छेदनगृहासमोर जमले होते. तेथे पोलिस फौजफाटा, स्ट्रायकिंग फोर्सही दाखल झाले. जादा बंदोबस्त पाहून सकल दिलीप देसाई यांनी त्याला आक्षेप घेतला. शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिस दडपशाही का करत आहेत? आंदोलकांना मारहाण करायचे ठरविले आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी देसाई यांची समजूत काढली आणि स्ट्रायकिंग फोर्सला त्या ठिकाणावरुन माघारी पाठविले.

सरकारचे अपयश

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सीपीआर येथे विनायकचे वडील व लहान भावाची भेट घेऊन सांत्वन केले. ते म्हणाले,'सरकार आरक्षणप्रश्नी गंभीर नाही. हे सरकार रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन सरकारने प्रामाणिकपणाने हा प्रश्न सोडविला पाहिजे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणप्रश्नी काँग्रेसच्या नेत्यांनी दोन दिवसांत दिल्लीत बैठक बोलावली आहे' असे सांगितले. त्यांच्यासोबत ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, सभापती राजेंद्र सूर्यवंशी, काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक आदिल फरास, मधुकर पाटील होते.

आरक्षणप्रश्नी सरकारकडून न्याय हवा

कोल्हापूर दौऱ्यावर असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, हिंदुराव हुजरे-पाटील हे सीपीआरमध्ये दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. गायकवाड म्हणाले, 'कोल्हापुरात शांततेने आंदोलन सुरू असताना तरुणाची आत्महत्येच्या प्रकार सुन्न करणारा आहे. तरुणांनी शांततेच्या मार्गांनी आंदोलन करावे. हिंसा आणि आत्महत्या हा मार्ग नाही. शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वती नाही, बेरोजगारी वाढल्यामुळे तरुणांत नैराश्य पसरले आहे. सरकारने लोकभावनांची दखल घेऊन मराठा आरक्षणप्रश्नी न्याय द्यावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात जीबीएस व्हायरसचा शिरकाव

$
0
0

विशेष वृत्त

Satish.ghatage@timesgroup.com

Twitt:satishgMT

कोल्हापूर

डेंगीने हातपाय पसरले असताना कोल्हापुरात गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने डोके वर काढले आहे. अज्ञात व्हायरस शरीरात घुसून थेट रक्तवाहिनी, स्नायूवर हल्ला करत असल्याने हातापायातील ताकद जाऊन अंग लुळे पडण्याची लक्षणे असणारे अनेक रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्याभरात १०० हून अधिक रुग्णांना या आजाराचा फटका बसला आहे. योग्य औषधोपचाराने हा रोग काबूत येत असला तरी खर्चिक उपचारामुळे रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीस येत आहेत.

जीबीएस आजार जुना असला तरी पावसाळ्यात जास्त बळावत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महिन्याभरात शहरात दहा वर्षाच्या मुलांपासून वयोवृद्धांना या आजाराची लागण झाली आहे. हवेवाटे अज्ञात व्हायरस शरीरात घुसतो आणि दीड दिवस ते दोन आठवड्याच्या कालावधीत व्हायरस शरीरात पसरुन अंतर्गत अवयवांवर हल्ला चढवतो. यामुळे स्नायू व रक्तवाहिन्यांची ताकद कमी झाल्याने रुग्ण हालचाल व चालण्याची क्षमता गमावून बसतो. त्यानंतर मानेच्या स्नायू व श्वसन नालिकेवर हल्ला केल्याने रुग्णाची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते.

गेल्या महिन्याभरात अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये जीबीएसचे रुग्ण दाखल झाले आहेत. या रोगाचे निदान वेगाने होण्याची गरज असते. मेंदूचे स्कॅनिंग झाल्यावर संबंधित व्यक्तीला लकवा नसल्याचे निदान होते. त्यानंतर रक्त तपासणी, नसांचे स्कॅनिंग, कमरेतील पाण्याचे रिपोर्ट घेऊन जीबीएसचे निदान झाल्यानंतर ताबडतोब उपचार सुरु केले जातात.

जीबीएस रुग्ण बरा होऊ शकतो. पण, त्याचे उपचार अतिशय खर्चिक आहेत. रुग्णाला इमिओग्लोब्युलेंटची इंजेक्शन द्यावी लागतात. रुग्णाच्या श्वास नलिकेवर व्हायरसचा हल्ला झाल्यास श्वसनाला त्रास होत असल्याने रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात येते.

इंजेक्शनऐवजी प्लाझ्मा सेरेसिसद्वारे उपचार केले जातात. या उपचार पद्धतीत रुग्णावर डायलेसिससचे चार ते पाच वेळा उपचार करुन रक्तात मिसळलेला व्हायरस काढून टाकला जातो. औषधोपचाराने रुग्ण बरा होतो, असे डॉक्टरांनी सांगितले. शहरातील अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये जीबीएसचे रुग्ण आहेत.

लक्षणे

रुग्णाचे अंग दुखू लागते.

चालताना तोल ढळतो.

चेहरा सुजतो.

चावताना व गिळताना त्रास होतो.

हात व पाय लुळे पडतात.

००००

हा रोग जुना असून पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला होतो. एक लाख लोकांमध्ये तीन ते चार व्यक्तींना याची बाधा होते. योग्य व वेळेत उपचार झाल्यावर रोगी पूर्णपणे बरा होतो.

डॉ. राहूल दिवाण, न्यूरॉलॉजिस्ट

००००

जीबीएसचे लवकर निदान होण्याची गरज असते. इमिओग्लोबिन इंजेकशन व प्लाझ्मा सेरिसेसद्वारे उपचार केले जातात. रुग्ण यातून बरा होऊ शकतो. गेल्या महिनाभरात या रोगाच्या रुग्णांच्यात वाढ होत आहे.

डॉ. तन्मय व्होरा, एमडी, मेडिसिन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिला चोरट्याकडून दीड लाखाचा माल हस्तगत

$
0
0

पावणे दोन लाखांचा

मुद्देमाल हस्तगत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मिरजकर तिकटी येथील बंद कार्यालयाची कडी कोयंडा तोडून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन महिला संशयितांना शहर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने अटक केली. अश्विनी नाईक, बायडी सागर रसाळ अशी या संशयित महिलांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एक लाख ६८ हजार रुपयांचा माल हस्तगत केला.

शहरातील वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पथकाला तपासाचे आदेश दिले. पथकाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजेंद्रनगर येथील अश्विनी नाईक हिच्या घरावर छापा टाकून चौकशी केली असता बायडी रसाळ व अश्विनीने आठ दिवसांपूर्वी मिरजकर तिकटी येथील बंद कार्यालय फोडून चोरी केल्याची कबुली दिली. दोघींच्या घरात लपवलेले चोरीचे दागिने हस्तगत केले. दोघी संशयित पोलिस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी गुन्ह्याचा तपास लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापुरात उन,पावसाचा खेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह, जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ऊन, पावसाचा खेळ सुरू राहिला. अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. दुपारच्या वेळी काहीवेळ ऊनही पडले होते. सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १०.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस शिरोळ तालुक्यात झाला.

आठ दिवसाच्या विश्रातीनंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली. उसंत देवून पाऊस पडत असल्याने पिकांची वाढ चांगली होणार आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सूर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ तर भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडक कोगे, वारणा नदीवरील चिंचोली बंधारा पाण्याखाली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाऊसिंगजी रोडवरील कॉम्प्लेक्सचा नव्याने आराखडा

$
0
0

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सादरीकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर कमर्शिअल कॉम्प्लेक्स प्रस्तावित आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचा नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सोमवारी त्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. पुणे येथील प्लॅनमॅक्स कंपनीने हा आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०१७-१८ अंतर्गत ५०५४ इतर जिल्हा मार्ग व ३०५४ ग्रामीण मार्ग रस्त्याचा विकास व मजबुतीकरण कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ग्रामपंचायत शिरोळचे नगरपंचायतमध्ये रुपांतरण झाल्यामुळे ०.२५ टक्के वर्गणीची रक्कम परत करण्याच ठराव तसेच पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ बोरगाव येथे जिल्हा ग्राम विकास निधीमधून दुकानगाळे बांधण्याचे ठरले. जिल्हा परिषद स्वनिधीतून ग्रामीण भागातील विविध व्यावसायिकांना पारंपरिक व्यवसायाभिमुख साहित्य पुरविण्याचा निर्णय झाला.

हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे नवीन उपकेंद्राच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आला. यासाठी ६४ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. तसेच कागल तालुक्यातील सुळकूड येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम करण्यासाठी कर्ज मंजुरीचा प्रस्ताव मंजूर केला. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, सदस्य राजवर्धन निंबाळकर, जयवंत शिंपी, अरुण इंगवले यांनी चर्चेत सहभाग घेतला.

.............

'तळदंगे' प्रश्नी

दोन दिवसांत निर्णय

तळंदगे ग्रामपंचायतीने थकीत एक कोटी साठ लाखांच्या घरफाळाप्रश्नी महापारेषण कंपनीच्या कार्यालयाला ठाळे ठोकले. यासंदर्भात कंपनीने गटविकास अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाल्यावर त्यांनी ग्रामपंचायतीची मागणी रास्त असल्याचे निकाल दिला. त्या विरोधात कंपनीने स्थायी समितीकडे दाद मागितली होती. स्थायी समितीत अध्यक्षांच्यासमोर याप्रश्नी पुन्हा सुनावणी झाली. ग्रामपंचायतीत आवाडे गटाची सत्ता आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने नगरसेवक राहुल आवाडे यांनी बाजू मांडली. ग्रामपंचायत थकीत घरफाळा वसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. कंपनीशी पत्रव्यवहार केला. पण त्यांनी दखल न घेतल्याने ग्रामपंचायतीने ठाळेठोक कारवाई केली. कंपनीच्या वकिलांनी गटविकास अधिकाऱ्यांना सुनावणी घेण्याचा अधिकार पोहचत नसल्याचे सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अध्यक्षांनी याप्रश्नी दोन दिवसात निर्णय देऊ असे जाहीर केले.

........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांगरे-पाटील यांचे आवाहन धुडकावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाला नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सरकार सकारात्मक असल्याचे दिसते. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यासंबंधी चर्चा करून निर्णय घ्यावा,' असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी येथील मराठा नेत्यांना केले. मात्र ते नेत्यांनी धुडकावून लावले. मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असे नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा ठोक मोर्चाच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. बंददिवशी कोल्हापूर शहर, जिल्ह्यात शांतता कायम रहावी, यासाठी नांगरे-पाटील यांनी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाला भेट दिली. प्रमुख नेत्यांसोबत मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक घेतली.

यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, '९ ऑगस्ट रोजीचा बंद शांततेत पाळावा. आंदोलन कुठे थांबवायचे याचा योग्य वेळी विचार होणे आवश्यक आहे. मेगा भरती आणि आरक्षणासंबंधी मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करावे, असे वाटते. याबाबत नेत्यांनी विचारविनिमय करुन निर्णय घ्यावा.'

त्यावर दिलीप देसाई म्हणाले, 'मराठा आरक्षणाच्या मागणीवर मुख्यमंत्री, पालकमंत्री फसवतात, अशी समाजाची भावना आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.'

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी जाहीर मागणी आहे. यासाठी सरकारसोबत चर्चा करायला जाण्याचा प्रश्नच नाही. विविध ठिकाणी सरकारपुरस्कृत मराठा परिषद, बैठका होत आहेत. त्यांच्याशी आमचा संबंध नाही. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.'

बंद शांततेत पाळा

चाकणमध्ये मराठा आंदोलनावेळी बाहेरच्या लोकांकडून तसेच अवैध व्यावसायिकांकडून बसेसची मोडतोड आणि पोलिसांवर हल्ला करण्यासारखे प्रकार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. असा प्रकार ९ ऑगस्टच्या बंदवेळी कोल्हापुरात होऊ नये, यासाठी नेत्यांनी सतर्क रहावे, बंद शांततेत पाळावा, असे आवाहनही नांगरे-पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनाला गालबोट नको

$
0
0

फोटो आहे.

नांगरे - पाटील यांचे आवाहन, विशेष बैठकीचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदच्या दिवशी कोल्हापूर, शहरात शांतता ठेवावी. खेड्यातून आलेले युवक, बाहेरचे लोक, अवैध व्यावसायिकांकडून मराठा आंदोलनास गालबोट लागणार नाही, याची विशेष काळजी मराठा समाजातील नेत्यांनी घ्यावी. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल', अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे - पाटील यांनी सोमवारी दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येथील दसरा चौकात सकल मराठा ठोक मोर्चातर्फे १३ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी भेट देऊन महानिरीक्षक नांगरे - पाटील यांनी मराठा नेत्यांसोबत मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांगरे - पाटील म्हणाले, ' ९ ऑगस्ट रोजीच्या बंद दिवशी कोणीही पोलिसांवर हल्ला करणार नाही, एसटीसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, यासाठी आंदोलनातील नेत्यांनी आचारसंहिता तयार करावी. सोशल मिडियातील चितावणीखोर मेसेजला तरूण बळी पडणार नाहीत, यावर लक्ष ठेवावे. शांततेचे आवाहन करण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती यांनाही येण्याची विनंती करू.'

पोलिस प्रमुख देशमुख म्हणाले, 'राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरला सामाजिक समतेचा संदेश दिला. शहराला वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे. अशा शहरात बंददरम्यान गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी. इतर जिल्ह्यात हिंसेच्या घटना घडत आहेत. कोल्हापुरात का नाही, असा चुकीचा समज करून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कुणीही वागू नये. '

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, 'आंदोलन सरकारवर दबाव आणण्यासाठी आहे. राज्यात विविध ठिकाणी हिंसा घडली, मात्र कोल्हापुरात शांततेने आंदोलन केले जात आहे. शांततेनेच आंदोलन करून आरक्षण मिळवणार आहोत.'

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले, 'मराठा आंदोलनासंबंधी मुख्यमंत्री चुकीचे वक्तव्य करून माफी मागतात. ते सातत्याने समाजाची दिशाभूल करीत आहेत. नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याची घोषणा केली. मात्र त्यावेळी आचारसंहिता सुरू होणार आहे. त्यावेळी आचारसंहितेचे कारण पुढे जाण्याची शक्यता आहे.'

दिलीप देसाई म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांचे ऐकून पोलिसांनी आंदोलकांवर दबाव आणू नये. आंदोलन शांततेत सुरू आहे. पोलिसांना आम्ही सहकार्य करीत आहोत. मुख्यमंत्री, पालकमंत्री खोटे बोलतात, अशी समाजाची भावना झाली आहे. यामुळे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.'

जयेश कदम यांनी,नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्री राजीनामा देऊन निवडणुका जाहीर करणार का, असा सवाल उपस्थित केला.

याप्रसंगी माजी आमदार सुरेश साळुखे, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, सचिन तोडकर, राजू लिंग्रस, फत्तेसिंह सावंत, प्रा. जयंत पाटील यांनी विविध सूचना मांडल्या. यावेळी पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह आंदोलनातील प्रमुख नेते उपस्थित होते.

..............

चौकट

संयुक्त राजारामपुरीतर्फे मंगळवारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता रॅलीने जाऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संयुक्त राजारामपुरीतर्फे प्रसिध्दी पत्रकातून दिली. दरम्यान, प्रहार अपंग क्रांती आंदोलन, नवदुर्ग तरूण मंडळ, कोल्हापूर जिल्हा फुटबॉल असोसिएशन, बहुजन सेवा, कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्था, जिल्हा दळप, कांडप गिरणी मालक संघ, जिल्हा सहकारी संस्था गटचिटणीस संघटनेने पाठिंबा दिला. ९ ऑगस्टचा बंद शांततेत करण्याचे आवाहन छावा संघटनेचे अध्यक्ष राजू सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौरी लंकेश हत्येचा छडा लागतो, पानसरे हत्येचा का नाही?

$
0
0

गौरी लंकेश हत्येचा छडा लागतो, पानसरे हत्येचा का नाही?

भाकपची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा छडा कर्नाटक पोलिस लावतात, मग कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाहीत, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने नूतन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांना केला. आम्ही सर्वजण संविधानावर श्रद्धा ठेवणारे आहोत, पण चार वर्षे हत्येचा तपास लागत नसल्याने आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका, असा इशाराही यावेळी देण्यात आला. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांकडे पानसरे हत्येसंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी केली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक देशमुख यांना निवेदन दिले. जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले, 'पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक आरोपी समीर गायकवाड व हिंदू जनजागरण समितीचे डॉ. विरेंद्र तावडे यांना अटक केली आहे. दोन आरोपींना अटक होऊनही गेले ४१ महिने हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तर दुसरीकडे कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश हत्येचा छडा लावून आठ संशयितांना अटक केली आहे.' काही संशयित महाराष्ट्रातील असून एक संशयित पुण्यातील आहे याकडे कांबळे यांनी लक्ष वेधले.

कॉ अनिल चव्हाण यांनी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक पोलिस लावतात मग पानसरे हत्येतील मारेकरी महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाहीत, असा सवाल केला. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेवर कारवाई करण्यात येत नाही. त्यांचे समर्थक थेट पोलिसांना धमक्या देत आहेत. हत्येचे तपास अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यावर हिंदुत्ववादी नेत्यांना नमस्कार करत असल्याने तपास अधिकाऱ्यांबद्दल संशय निर्माण होत आहे.

शिष्टमंडळाशी बोलताना पोलिस अधीक्षक देशमुख म्हणाले, 'हत्येचा तपासाचा अहवाल हायकोर्टाला दिला जातो. पानसरे हत्या नियोजनपूर्वक केली असल्याने या गुन्ह्याचा तपास करणे आव्हानत्मक आहे. एसआयटी त्यासाठी खूप मेहनत करत आहे. आम्ही तपासाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत.' शिष्टमंडळात गिरीश फोंडे, स्नेहल कांबळे, अमोल देवडकर, सुनिता अमृतसागर, योगेश फोंडे, सुनील जाधव, स्वाती क्षीरसागर, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, पूजा सिंग आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुदगेची आत्महत्या आरक्षणाला जोडू नये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कणेरीवाडी येथील तरुण विनायक गुदगीची आत्महत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या आपत्तीमध्ये सरकार व मी सहभागी आहोत. अशा प्रकारच्या होत असलेल्या आत्महत्यांना मराठा आरक्षणाला जोडल्या जाऊ नये, असे पत्रक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, ' विनायक हा गेले कित्येक महिने नैराश्येत होता आणि त्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असा जबाब नोंदविला असताना कोल्हापुरातील काही आंदोलक मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याच्या विरोधात बोलत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरअखेर मराठा समाजाला सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन आरक्षण दिले जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व आंदोलकांनी त्यावर विश्वास ठेवावा. जर का नोव्हेंबरअखेर आरक्षण मिळाले नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करु. मी स्वत: या आंदोलनात अग्रभागी असेन. त्यामुळे सध्याचे आंदोलन हे शांततेने व संयमाने हाताळावे. सध्या कोल्हापुरात तेरा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान, मुद्दाम काही लोक हे आंदोलन चिघळून असमंजसपणाची भूमिका घेत आहेत, हे योग्य नाही. कायमस्वरुपी टिकावू आरक्षण देणे ही सरकारची बांधिलकी आहे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारीची तीन वाहनांना धडक

$
0
0

महावीर कॉलेजच्या परिसरात विचित्र अपघात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ब्रेकऐवजी अॅक्सिलेटवर पाय पडल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची धडक चार वाहनांना बसून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. कसबा बावड्याकडे जाणाऱ्या महावीर कॉलेजच्या परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा थरार घडला. या अपघातानंतर कार थेट फुटपाथवर गेल्याने मोठी दुर्घटना टळली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी , महावीर कॉलेज चौकात चौधरी यांचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आशुतोष पोवार यांच्या कारचे चाक पंक्चर झाल्याने चौधरी यांच्या दुकानासमोर कार पार्क करुन ते घरी निघून गेले. चौधरी यांनी पंक्चर काढून झाल्यानंतर दुकानाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या महावीर कॉलेजच्या समोरील फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या कडेला कार पार्किंग करण्यासाठी नेत असताना त्यांचा पाय ब्रेकऐवजी अॅक्सिलेटवर पडल्याने कार गती वाढली. त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची दोन दुचाकींना धडक बसली. तसेच एक रिक्षा व कारलाही धडक दिल्याने त्यांची कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या फुटपाथवर चढली. त्यांनतर फुटपाथसमोर पार्क केलेल्या कारला धडक देऊन चौधरी चालवत असलेली कार थांबली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या अपघाताने परिसरात नागरिकांची व वाहनचालकांची धांदल उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तूरचा विराज कुराडे राज्यात अव्वल

$
0
0

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, जिल्ह्यातील २०० हून अधिक मुले गुणवत्ता यादीत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिध्द केली. पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळा उत्तूर (मुले) या विद्यालयातील विद्यार्थी विराज अमृत कुराडेने २८६ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचा दावा शाळेने केला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील २०० हून अधिक मुलांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात महापालिकेच्या शाळेतील ३१ मुले शहरी विभागात गुणवत्ता यादीत झळकली.

या निमित्ताने महापालिका शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता पुन्हा एकदा सिध्द झाली. दरम्यान, साने गुरुजी वसाहत परिसरातील तेजस मुक्त विद्यालयातील विद्यार्थी सार्थक बाबूराव खोतने २८२ गुण मिळवले आहेत. राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा झाली होती. २१ जून रोजी या परीक्षेचा तात्पुरता निकाल जाहीर केला होता. २१ जून ते दहा जुलै या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइन मागविले होते. ऑनलाइन आलेल्या अर्जावरुन संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करुन परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला.

महापालिका शाळेतील ३१ पैकी २१ विद्यार्थी हे जरगनगर विद्यामंदिरचे आहेत. या विद्यामंदिरचा विद्यार्थी साईराज पाटील हा २७२ गुण घेऊन शहरी विभागात पाचवा तर ओम बिक्कड आठव्या क्रमांकांने उत्तीर्ण झाला. टेंबलाईवाडी विद्यामंदिरातील पाच विद्यार्थी तर यशवंतराव चव्हाण विद्यालय, भाऊसो जगदाळे विद्यालय, आणि फुलेवाडी विद्यालयातील प्रत्येकी एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकला. भाऊसो जगदाळे विद्यालयाचा ओम देसाई शहरी विभागातून ११ वा तर जरगनगर विद्यामंदिरातील राजवर्धन फडतारे १३ वा आला. अहिल्याबाई सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी अर्जुन सिध्देश्वर पाटील हा राज्यात पाचवा आला.

............

यंदा उत्तूर पॅटर्न

जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळा उत्तूर (मुले) या विद्यालयातील सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. यामध्ये विराज कुराडे २८६ गुण मिळवून अव्वल तर चिन्मय युवराज गंगापुरेने २७६ गुण मिळवून राज्यात सहावा आला. वैष्णव गणपती सांगले २६८, पार्थ दत्तात्रय चव्हाण २६६, पार्थ सुभाष निंबाळकर २६४, अभिनंदन कृष्णा शिंदे २५४, तर चिंतामणी भैरू चव्हाणने २४२ गुण मिळवले . विराज कुराडेचे आई वडील शेतीकाम करतात. वर्गशिक्षक प्रशांत पाटील म्हणाले, 'नियमित अभ्यास, सराव प्रश्नपत्रिकांच्या सोडवणुकीवर भर आणि तज्ज्ञ शिक्षकांचे खास मार्गदर्शन ही शाळेला मिळालेल्या यशाची त्रिसूत्री आहे.' दरम्यान कन्या विद्यामंदिर उत्तूरमधील आदिती बाळू राशिवडे २५८, समृध्दी संजय अस्वले २४६ गुण मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

..........

धामणेतील बारा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

आजरा तालुक्यातील धामणे प्राथमिक विद्यालयातील बारा विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. यामध्ये श्वेता तानाजी कांबळे २६४, श्वेता श्रीकृष्ण मगदूम २६२, दामोदर ईश्वर इरके २६०, सृष्टी सुभाष गुरव २५८, अथर्व साताप्पा लोहार २५६, शुभम धुरे २५६, तनुजा कृष्णा धामणकर २५६, क्रांती बाळू आढावकर २५६, किरण विनायक हाळवणकर २५४, रतिका राजेंद्र मगदूम २५२, उन्मेश धनाजी इळके २५० यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्म मान्यतेसाठी लिंगायतांचा पुन्हा एल्गार

$
0
0

१६ पासून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लिंगायत धर्म मान्यतेसाठी लिंगायत संघर्ष समितीने पुन्हा एल्गार पुकारला आहे. विविध प्रलंबित मागण्यांच्या मान्यतेसाठी संघर्ष समिती मैदानात उतरली आहे. समितमार्फत, सोळा ऑगस्टपासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

'लिंगायत धर्म मान्यता, लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा, लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना ओबीसी आरक्षण मिळावे आणि जनगणनेच्या फॉर्ममध्ये लिंगायत अशी नोंद करण्यासाठी स्वतंत्र कॉलम करावा' या मागण्यांसाठी लिंगायत समाज गेली कित्येक वर्षे संघर्ष करत आहे. समाजातर्फे कर्नाटक आणि महाराष्ट्रात महामोर्चे काढले. राज्यात यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक, नांदेड येथे मिळून आठ मोर्चे काढले. तरीही सरकारने समाजाच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती आणि लिंगायत धर्म संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापुरातही लिंगायत संघर्ष समितीची बैठक होऊन आंदोलनाची दिशा निश्चित केली. संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सरला पाटील, राजशेखर तंबाखे, काका कोयटे, राजेंद्र मुंढे, शिवानंद कुथले, चंद्रकांत कोठावळे, बाबूराव तारळी, चंद्रशेखर बटकडली, संजय चितारी, विलास आंबोळे, संजय गुदगे, गुणवंत लक्ष्मीसागर, नीळकंठ मुगळखोड, मिलिंद साखरपे, शिवरुद्र आडके आदींच्या उपस्थितीत चित्रदुर्ग मठ येथे झालेल्या बैठकीत आंदोलनाची रुपरेषा ठरली.

................

कोट

'लिंगायत धर्म मान्यतेसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. तत्कालिन काँग्रेस सरकारने समाजाच्या मागण्या अंशत: मान्य केल्या होत्या. केंद्रीय मंत्रीमंडळाकडे शिफारशी करण्याचा ठराव केला होता. मात्र सध्याच्या भाजप सरकारने काहीही केले नाही.

सरला पाटील, कार्याध्यक्ष, लिंगायत संघर्ष समिती

......................

' भाजपच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात सत्ता आल्यास पंधरा दिवसात लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य करतो, अशी ग्वाही दिली होती. राज्यात सत्ता येऊन चार वर्षाचा कालावधी उलटला, पण सरकारने समाजाच्या मागण्यासंदर्भात काहीच हालचाली केल्या नाहीत. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे.

राजशेखर तंबाखे

.......................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका सीसीटीव्हीच्या टप्प्यात

$
0
0

विविध विभागात ६९ ठिकाणी बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या एक महिन्यापासून महापालिकेत सुरू असलेले सीसीटीव्ही कॅमेर बसवण्याचे काम सोमवारी (ता.६) पूर्ण झाले. महापालिकेच्या विविध विभागात ६९ ठिकाणी कॅमेर बसवण्यात आले असून दोन दिवसांत संपूर्ण यंत्रणेची तपासणी केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यन्वित होणार आहेत. सीसीटीव्हीचे मॉनिटरिंग आयुक्त कार्यालयातून होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या कारभारावर आयुक्तांची नजर राहणार आहे.

महापालिकेच्या मुख्य इमारतीमधून शहराचा कारभार पाहिला जातो. यासाठी विविध विभागात सुमारे १,५०० कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अनेक कर्मचारी कामचुकार असल्याची चर्चा नेहमीच महापालिकेमध्ये झडत असते. कामचुकार कर्मचाऱ्यांबरोबरच पायाभूत सुविधा व अन्य कारणांसाठी विविध आंदोलने होत असतात. आंदोलनाच्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे किंवा दबाव टाकण्याचा घडना घडत असतात. तसेच अनेक नगरसेविकांचे पती अथवा मुलगा अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असतात. काहीवेळा कर्मचाऱ्यांना मारहाणीचेही प्रकार घडले आहेत. अशा सर्व गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला होता. सर्व यंत्रणेचे मॉनिटरिंग आयुक्त कार्यालयातून होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर आयुक्तांचा एकप्रकारे वॉच राहणार आहे. तसेच लोकप्रतिनिधी किंवा आंदोलकांच्याकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणाऱ्या दमदाटीविरोधात कायदेशीर प्रक्रियेसाठी याचा वापर होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कारभारासह सर्वच प्रकारच्या गैर प्रकारांना आळा बसणार आहे. दरम्यान, सोमवारी मुख्य इमारतीमधील कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी महापालिकेच्या प्रवेशद्वार व परिसरात कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. संपूर्ण कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर दोन दिवसांत तपासणी करण्यात येणार असून त्यानंतरही ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यन्वित होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरढोणला निकृष्ट पुलाविरोधात रास्ता रोको

$
0
0

निकृष्ट पुलाविरोधात तिरडी मोर्चा

शिरढोण मध्ये ठेकेदार, अधिकार्‍यांचा निषेध

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कुरुंदवाड-शिरढोण यांदरम्यानच्या पुलाच्या दुरूस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने परिसरातील नागरिकांनी ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवित तिरडी मोर्चा काढला. पुलाची तत्काळ दुरूस्ती करावी अशी मागणीही करण्यात आली.

कुरूंदवाड-शिरढोण यांदरम्यान पंचगंगा नदीवर असणार्‍या पुलाच्या दुरूस्तीसाठी सरकारने कन्यागत महापर्वकाल निधीतून अडीच कोटी रूपये मंजूर केले होते. पावसाळ्यापुर्वी हे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र पंचगंगा नदीच्या पुरात पुलाचा भराव तसेच पुलाच्या बाजूचे कट्टे वाहून गेले. पुलाच्या दोन्ही बाजूस असणारे लोखंडी संरक्षक पाईप वाकल्या आहेत. त्यामुळे अडीच कोटी रुपये खर्चुन पुलाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप शिरढोण परिसरातील नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी नागरिक एकत्र जमले. त्यांनी पुलाचा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला. याचबरोबर तिरडी मोर्चा काढण्यात आला. पुलाच्या निकृष्ठ दर्जाच्या कामास जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात भीमकायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरूंदवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्‍वास बालीघाटे, बंडू उमडाळे, दिनेश कांबळे, आयुब पट्टेकरी, इम्रान झारी, भारत घोरपडे, बाबूराव कोळी, संजय सुतार यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी नायब तहसीलदार जे. वाय. दिवे, बांधकाम विभागाचे शिंदे, कुरुंदवाडचे पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलकांनी त्यांना मागणीचे निवेदन दिले.

फोटो

कुरुंदवाड-शिरढोण पुल दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांनी तिरडी मोर्चा काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

$
0
0

शासकीय योजनांचा

लाभ घेण्याचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येणार आहे. अनुसुचित जाती व जमाती या संवर्गातील शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवून जीवनमान उंचावण्यासाठी या योजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती जयश्री तेली, उपसभापती बनश्री चौगुले, गटविकास अधिकारी सीमा जगताप यांनी केले.

योजनेमध्ये सन २०१८-१९ या वर्षात नवीन सिंचन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी पन्नास हजार, इनवेल वोअरिंगसाठी वीस हजार रुपये, पंपसंचासाठी वीस हजार रुपये, वीज जोडणी आकारासाठी दहा हजार रुपये, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तिकरणासाठी दहा हजार रुपये, सूक्ष्मसिंचन संच खरेदीसाठी शासनाच्या कृषी विभागाकडील विहित अनुदान मर्यादेव्यतिरिक्त ठिबक सिंचनासाठी पन्नास हजार रुपये, तर तुषार सिंचनासाठी पंचवीस हजार अशा नमूद केलेल्या सात घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी दिनेश शेटे, धर्मराज महाले यांचाशी संपर्क साधावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images