Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पट्टणकोडोलीत मोर्चा, भादोलेत बंद

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

'मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय,' 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील मराठा समाजाच्यावतीने तिरडी मोर्चा व गाव बंद करून सरकारचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून प्रतिकात्मक पुतळ्यांसह गावातील मुख्य रस्त्यावरून सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत तिरडी मोर्चा काढण्यात आला. गावातील चौकाचौकात युवकांनी शंखध्वनी केला. त्यानंतर हा मोर्चा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आला. यावेळी श्रद्धा भवान या युवतीने मनोगत व्यक्त केले. आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला असताना कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. ९ ऑगस्ट पर्यंत आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास मराठा समाज पेटून उठेल, असे सांगितले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी राजू जाधव, रुई मंडल अधिकारी ए. डी. पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, भादोले (ता. हातकणंगले)येथे सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. भादोले-आष्टा मार्ग रोखून मराठा आरक्षण मागणी प्रलंबित ठेवल्याने सरकारचा निषेध केला.

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे तिरडी मोर्चा काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जमलेले मराठा बांधव.

भादोले (ता. हातकणंगले) येथे कडकडीत बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजीत प्लास्टिक जप्त

$
0
0

इचलकरंजीत २७०० किलो

प्लास्टिक पिशव्या जप्त

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा बेकायदेशीरपणे साठा असलेल्या औद्योगिक वसाहत कल्याण केंद्रालगत गोदामावर नगरपालिकेच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. कारवाईत २७०० किलो प्लास्टिक पिशव्या ताब्यात घेतल्या असून नटवरलाल नारायणदास भंडारी या व्यापाऱ्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.कल्याण केंद्रलगत एका गोदामात भंडारी यांनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्याचा साठा केला असल्याची माहिती नगरपालिकेच्या पथकाला मिळाली. उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने या गोदामावर छापा टाकला. कारवाईत २७०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. कारवाईत मुख्य स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, स्वछता निरीक्षक कल्पना राऊत, संजय भोईटे, संजय हत्तरगे, रफिक पेंढारी, सूर्यकांत चव्हाण, संदिप नराळे आदींनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकाच पडताळणार शहराचे पर्यावरण

$
0
0

महापालिका लोगो

नाशिकच्या कंपनीकडून काम काढून घेतले

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

शहराचा पर्यावरण अहवाल तयार करण्याचे काम महापालिकेने नाशिक येथील खासगी कंपनीला दिले होते. मुदतीत न झालेला अहवाल, त्रुटी आणि दुरुस्ती करताना महापालिकेची झालेली दमछाक यामुळे या कंपनीकडून अहवाल तयार करण्याचे काम काढून घेतले आहे. त्यामुळे आता तीन महिन्यात शहरातील पर्यावरणाची पडताळणी करुन महापालिकेचा पर्यावरण विभाग अहवाल तयार करणार आहे.

राज्य सरकारच्या नियमानुसार दरवर्षी ३१ जुलैपर्यंत पर्यावरण अहवाल तयार करुन सादर करणे बंधनकारक आहे. यानुसार शहराचा २०१६-१७ व २०१७-१८ अशा दोन वर्षाच्या अहवाल तयार करण्याचे काम महापालिकेने नाशिक येथील खासगी कंपनीला दिले. पण कंपनीने २०१६-१७ चा अहवाल तयार करतानाच दिरंगाई केली. कंपनीने महापालिकेला अहवाल सादर केला असला, तरी त्यामधील त्रुटी दूर करुन दुरुस्ती करताना महापालिकेची दमछाक झाली. कंपनीने अहवाल तयार करताना केलेल्या दिरंगाईमुळे २०१७-१८ चा अहवाल तयार करण्याचे काम काढून घेण्याचा निर्णय घेतला.

अहवालामध्ये पर्यावरणाची सद्य:स्थितीची नोंद, शहरातील पर्यावरणामध्ये वर्षभरात झालेले बदल, वृक्ष, पाणीसाठे, हवा, पिण्याचे पाण्याचे प्रदूषण पातळी व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबतच्या माहितीचा समावेश आहे. अभ्यास करुन तज्ज्ञांनी नोंदवलेली निरीक्षणे याबाबत मते नोंदवली असतात. तसेच यावर महापालिकेने कोणत्या उपाययोजना केला याचाही लेखाजोखा याचा समावेश असतो. पण अहवाल तयार करण्यास झालेल्या दिरंगाईमुळे महापालिकेसमोर अडचणी निर्माण झाल्या. यामुळेच महापालिकेने कंपनीकडून कामच काढून घेण्याचा निर्णय घेतला .

कंपनीने तयार केलेला २०१६-१७ चा पर्यावरणाचा अहवाल सर्वसाधारण सभेपुढे सादर करुन त्यानंतर राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. हा अहवाल तयार करण्यास एक वर्षाचा विलंब लागला असल्याने २०१७-१८ अहवाल स्वत: महापालिकेनेच करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार शहराच्या पर्यावरणाचा अहवाल तीन महिन्यात तयार होणार आहे.

चौकट

अहवाल तीन महिन्यात तयार होणार ?

शहराचा पर्यावरण अहवाल तयार करण्याचे काम खासगी कंपनीला दिले होते. पण हा अहवालच मुदतीत तयार झाला नाही. महापालिकेच्या पर्यावरण विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांच्याकडील अतिरिक्त कामाचा बोजा पाहता तीन महिन्यात शहराचा पर्यावरण अहवाल तीन महिन्यात तयार होईल का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

कोट

शहराचा पर्यावरण अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. एक महिन्यात अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो सर्वसाधारण सभेत मांडला जाईल.

सुनील व्याघ्रांबर, पर्यावरण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगडमध्ये मोटारसायकल रॅली

$
0
0

चंदगडमध्ये मोटारसायकल रॅली

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यांसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी चंदगड तालुक्यातील समस्त सकल मराठा युवकांनी तालुक्यात मोटारसायकल रॅली काढली. तहसील कार्यालयासमोर विनया गावडे, शुंभागी गावडे, आसावरी नेसरकर, तन्वी पाटील यांनी मनोगते व्यक्त करुन तहसिलदारांना निवेदन दिले.

सकाळी ९ वाजता कोवाड येथून रॅलीला सुरुवात झाली. रॅली किणी, कडलगे, ढोलगरवाडी, कार्वे, पाटणे फाटा, हलकर्णी फाटा, दाटे, नागनवाडी, चंदगड येथे आली. चंदगडमधून गुरुवार पेठ, रवळनाथ मंदिर ते कोर्ट रस्त्यांने रॅली तहसील कार्यालयासमोर आली. यावेळी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे, आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा घोषणा देत सरकारचा धिक्कार केला. केली. अॅड. संतोष मळवीकर, दयानंद सलाम, सरपंच राजेंद्र पाटील, गोपाळ गावडे, प्रा. दीपक पाटील, प्रा. आर. टी. पाटील, संग्राम कुपेकर, राजेंद्र गड्यान्नावर, प्रभाकर खांडेकर, विष्णू गावडे, पिनू पाटील, रवी बांदिवडेकर, प्रताप डसके, संदीप नांदवडेकर, अभिजित पाटील, श्रीनाथ माडूळकर, अनिल गावडे, विनोद पाटील, संदीप पाटील, भैरु भोगण, प्रा. एन. एस. पाटील आदींसह बहूसंख्य युवक या रॅलीत सहभागी झाले होते.

दरम्यान, कार्वे येथील शहिद जवान राजेंद्र तुपारे, बेळेभाट येथील शहीद जवान अंनत धुरी व ढोलगरवाडी येथील शहीद जवानांच्या प्रतिमेला अभिवादन करुन रॅली चंदगडमध्ये आली.

फोटो ओळी

सकल मराठा समाजाच्यावतीने चंदगड तालुक्यातून मोटारसायकल रॅली काढून मागण्यांचे निवेदन तहसिलदार शिवाजी शिंदे यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमहिंस घाटगे यांना अभिवादन

$
0
0

सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास

विक्रमसिंह घाटगे जयंतीनिमित्त चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण

म. टा. वृत्तसेवा, कागल

'सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो' असे प्रतिपादन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव टी. एल. मोळे यांनी केले. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे होत्या.

टी. एल. मोळे म्हणाले, 'विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबाहेर जाऊन शिक्षण घेण्याची गरज आहे. गुणात्मक वाढीबरोबरच कौशल्याधिष्ठित शिक्षणाकडे लक्ष देऊन भविष्याचा भक्कम करावा. पालकांनी व शिक्षकांनी मुलांना टीव्ही यांचा योग्य वापर कसा करावा याचे ज्ञान द्यावे. विक्रमसिंह घाटगे यांनी शिक्षण संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा पुरेपूर वापर करून विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य उज्वल करावे.'

सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या, 'विक्रमसिंह घाटगे यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्तकलांना नेहमीच प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी गुणात्मक वाढीबरोबरच कौशल्याला अग्रक्रम दिला. वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम वक्ते निर्माण होतील. यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्दीने सराव करावा. शाळेच्या नावलौकिक वाढविणे हेच खरे विक्रमसिंह घाटगेंना अभिवादन ठरेल.'

बक्षीस वितरणप्रसंगी चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, संचालक बाबूराव पाटील, बॉबी ऊर्फ यशवंत माने, सचिन मगदूम, भूपाल पाटील, भिकाजी रेळेकर, युवराज पसारे, कर्नल दिलीपसिंह मंडलिक, आण्णासाहेब कुंभार उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. डी. खोत यांनी प्रास्ताविक केले. एम. जे. कांबळे, एस. एस. पोवार यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. सासमिले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम लवकरच

$
0
0

कोल्हापूर :

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीत दिली.

प्रभू यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत कोकण रेल्वे प्रशासनाची बैठक झाली. या रेल्वेमार्गाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के खर्च केंद्र सरकार करणार आहे, तर उर्वरित ५० टक्के खर्च महाराष्ट्र राज्य सरकार करणार आहे. कोल्हापूर ते वैभववाडी या महत्वाकांक्षी मार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरसह कोकणचा विकास होऊन पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरणची बैठक उधळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राधिकरणातील गावच्या शंका, प्रश्न आहेत. पण पालकमंत्री, खासदार, आमदारांच्या अनुपस्थितीत बैठक घेऊन प्राधिकरण लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राधिकरण नकोच आहे, असे ठणकावून सांगत बुधवारी ४२ गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी जिल्हा परिषदेत आयोजिलेली प्राधिकरणाची बैठक उधळली. 'हटाव, हटाव प्राधिकरण हटाव', 'प्राधिकरण चले जाव', ' प्राधिकरण समितीचा निषेध असो', अशा घोषणा देत सभात्याग केला. त्यानंतरही काही सरपंच, पदाधिकारी व ग्रामसेवकांसोबत बैठक सुरू असल्याचे समजताच बैठकीत घुसून प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई व अन्य अधिकाऱ्यांना इशारा देत बैठकीतून निघून जाण्यास भाग पाडले.

दरम्यान, प्राधिकरण विरोधात ४२ गावांची सर्वपक्षीय कृती समिती स्थापण्यात आली. करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सुर्यवंशी समितीचे अध्यक्ष नेमण्यात आले. प्राधिकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी १५ ऑगस्टला होणाऱ्या सर्व ग्रामसभांत प्राधिकरण विरोधाचे ठराव करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

प्राधिकरणाची माहिती देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक आयोजित केली होती. महाडिक बैठकीच्या मध्यावर निघून गेल्या. प्राधिकरणचे पाटील यांनी उद्देश, भविष्यातील नियोजनाची माहिती दिल्यानंतर सरपंच, उपसरपंचांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. बांधकाम परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीला की प्राधिकरणाला या विषयावरुन गोंधळ सुरू झाला. पाटील यांनी सरकारचे बांधकाम परवानगीबाबत लिखित आदेश असताना पुन्हा तोंडी कशाला विचारता असे सांगितल्यानंतर सर्वच संतापले. आमचे ऐकण्यासाठी बैठक बोलवली आहे. पालकमंत्री, खासदार, आमदार कुणीच नाहीत. अधिकारी केवळ कायदा सांगत आहेत. त्यातून मार्ग काढण्याचे अधिकार त्यांना नाहीत. या बैठकीला अर्थच नाही. वेळ मारुन नेण्याचे काम सुरू आहे. प्राधिकरण लादण्याचा हा डाव आहे. पालकमंत्री व अन्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक बोलवावी, तोपर्यंत ही बैठक तहकूब करा, असे सांगत सर्वजण व्यासपीठासमोर जमले. त्यामुळे गोंधळ उडाला.

एस. आर. पाटील, अमर पाटील, शशिकांत खवरे, बाजीराव पाटील, सचिन चौगुले, संग्राम पाटील, संध्या पाटील, प्रकाश रोटे, भोगम, रणजित कदम यांनी हटाव, हटाव प्राधिकरण हटाव, प्राधिकरण चले जाव, शिवराज पाटील चले जाव, प्राधिकरण समितीचा निषेध असो, अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. समितीत गावांची फसवणूक करणारी लोक आहेत, असा आरोपही करण्यात आला. करवीरचे सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण पालकमंत्री बैठक घेतील, त्यावेळी येऊ, असे सांगत सभात्याग केला. सभागृहाबाहेर आल्यानंतर ग्रामसेवक तसेच काही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक सुरू होती. ते समजल्यानंतर पुन्हा सर्वजण घोषणा देत सभागृहात घुसले. त्यांना बैठकीतून निघून जाण्याचा इशारा देण्यात आला. पण व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, शिवराज पाटील व अन्य अधिकारी असल्याने ग्रामसेवक बाहेर जात नव्हते. शेवटी सरपंच व उपसरपंचांनी अधिकाऱ्यांना 'तुम्हाला राडाच घडवून आणायचा आहे का? कोल्हापुरी हिसका दाखवला पाहिजे का?' असे विचारल्यानंतर सर्व अधिकारी बैठकीतून निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन्यप्राणी हल्ला नुकसानभरपाईत वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी तसेच पशुधन मृत, अपंग किंवा जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या सरकारी अर्थसाह्य रकमेत वाढ करण्यात आल्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला . या निर्णयामुळे वन्यजीवाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना आठ लाखांऐवजी आता दहा लाख रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. तर गाय, म्हैस, बैल या पशुधन मृत्यूप्रसंगी संबंधित मालकाला वनविभागाकडून कमाल ४०,००० रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. यापूर्वी पशुधन नुकसान भरपाईपोटी कमाल २५,००० रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. वन्य प्राण्यांपासून शेतपिकांच्या नुकसान भरपाई रक्कमेत मात्र सरकारने कोणतीही वाढ सुचविलेली नाही.

प्रारंभी वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईबाबत ऑगस्ट २००४ मध्ये सरकारी निर्णय घेण्यात आला. पुढे राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने वेळोवेळी केलेल्या शिफारशी तसेच वन्यजीव संरक्षण व व्यापक जनहित आदी अनुषंगिक बाबींचा विचार करून परिस्थितीनुसार संबंधितांना नुकसान भरपाई व अर्थसहाय्य देण्यासंबंधी राज्य सरकारने वेळोवेळी बदल केले. याचप्रमाणे संबंधित नुकसान भरपाईपोटी सध्या संबंधितांना देण्यात येणारी अर्थसहाय्य रक्कम वाढत्या महागाईदराच्या तुलनेत कमी असल्याची बाब निदर्शनास आल्यामुळे त्यामध्ये भरीव वाढ करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन होते. यासाठी पावसाळी अधिवेशनात ९ जुलै रोजी विधानसभेतील पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन्यप्राण्यांकडून मनुष्यहानी व पशुधनहानी प्रसंगी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य रक्कमेत वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर नुकतेच सुधारित परिपत्रक जाहीर करण्यात आले.

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्ती मृत झाल्यास १० लाख रुपये, व्यक्तीस कायम अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये, व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास १.२५ लाख रुपये मिळणार आहेत. तर व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचाराचा खर्च (खासगी रुग्णालयात उपचार करणे गरजेचे असल्यास २०,००० रुपये प्रति व्यक्ती खर्चमर्यादा) देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय पशुधनाच्या बाबतीत गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास चालू बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा कमाल ४०,००० रुपये यापैकी कमी असणारी रक्कम, मेंढी, बकरी किंवा तत्सम पशुधन दगावल्यास चालू बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा कमाल १०,००० रुपये यापैकी कमी असणारी रक्कम देण्यात येणार आहे. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास चालू बाजारभावाच्या ५० टक्के किंवा कमाल १२,००० रुपये यापैकी कमी असणारी रक्कम, गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी किंवा तत्सम पशुधन जखमी झाल्यास औषधोपचारासाठी खर्च म्हणून संबंधितांना प्रति जनावर कमाल ४००० रुपये अर्थसहाय्य देण्याचे या सरकारी निर्णयामध्ये निश्चित करण्यात आले आहे.

...................

चौकट

तीन लाखांची मदत तत्काळ

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्ती मृत झाल्यास देण्यात येणाऱ्या सरकारी अर्थसहाय्य रक्कमेत संबंधित वारसांना तातडीची मदत म्हणून ३ लाख रुपयांचा धनादेश तत्काळ दिला जाणार आहे. तर उर्वरित ७ लाख रुपये हे संबंधितांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत ठेव स्वरूपात रक्कम गुंतविण्यात येणार आहेत. वन्यप्राण्यांपासून पिकांच्या व फळझाडांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल देण्यात येणाऱ्या सरकारी अर्थसहाय्य रक्कमेबाबत या निर्णयामध्ये कोणतीही वाढ सुचविण्यात आली नसल्याने संबंधितांना पूर्वीप्रमाणेच नुकसान भरपाई मिळणार आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजीत सशस्त्र हल्ला; एक जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून दोघांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला. अभिमन्यू मुरलीधर पारीख (वय २७, रा. इंदिरा हाउसिंग सोसायटी) असे जखमीचे नव आहे. ही घटना मंगळवारी रात्री स्वामी अपार्टमेंट परिसरात घडली. घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली असून असिफ मुजावर (रा. म्हसोबा गल्ली, जवाहरनगर) याला अटक करण्यात आली आहे, तर सनी भोसले (रा. राजीव गांधीनगर) फरार आहे.

अभिनंदन पारीख, असिफ मुजावर व सनी भोसले हे तिघे मित्र आहेत. त्यांच्यात चेष्टा मस्करीतून वाद निर्माण झाला होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास फोन आल्याने अभिनंदन घरातून बाहेर पडला होता. स्वामी अपार्टमेंट परिसरातील मैदानात असिफ व सनी तेथे उपस्थित होते. चेष्टा मस्करीतून पुन्हा जुना वाद उफाळून आल्याने या दोघांनी अभिनंदनच्या डोक्यात, कपाळावर धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलविले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी मुजावरला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अभिनंदनचे वडील मुरलीधर पारीख यांनी फिर्याद दिली आहे.

००००

मोपेडच्या डिक्कीतील

दहा हजार लांबविले

इचलकरंजी : जुनी नगरपालिका परिसरातील पतसंस्थेच्या इमारतीसमोर लावलेल्या मोपेडच्या डिक्कीतील १० हजारांची रोकड हातोहात लांबविण्यात आली. ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

शहरातील मध्यवर्ती चौकातील जुनी नगरपालिका इमारतीच्या पिछाडीस विजय नागरी सहकारी पतसंस्था आहे. संस्थेत कामानिमित्त आलेल्या एका युवकाने आपली मोपेड संस्थेच्या इमारतीसमोर लावली होती. मोपेडच्या डिक्कीतील १० हजारांची रोकड बनावट चावीने लंपास केली. काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम लवकरच

$
0
0

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कोल्हापूर आणि कोकण रेल्वे जोडणाऱ्या कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी ट्विटद्वारे दिली.

कोल्हापूर-वैभववाडी मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतमालाला विजदुर्ग बंदरापर्यंत लवकर पोहोचवणे शक्य होणार आहे. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली येथे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याला कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर-वैभववाडी मार्ग फक्त कोकण रल्वेसाठीच नव्हे तर, संपूर्ण विभागासाठी आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल. अंतर्गत भागातील मालाची ने-आण बंदरांपर्यंत करण्यासाठी तो उपयुक्त आहे, यावर प्रभू यांनी बैठकीत भर दिला. कोकण रेल्वेची सेवा सुधारण्याच्या दृष्टीने दहा नवी स्थानके उभारण्यात येत आहेत. त्यातील पहिले स्थानक येत्या जानेवारीपर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी प्रभू यांना दिली.

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाने आधीच मंजुरी दिली आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के निधी रेल्वे मंत्रालय आणि उर्वरित महाराष्ट्र सरकार देणार आहे.

नाणारसाठी उपयुक्त

हा प्रकल्प केवळ शेतमालाच्या वा औद्योगिक उत्पादनांच्या दृष्टीने नव्हे, तर नाणार येथील प्रस्तावित महाकाय तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे, असे प्रभू यांनी सांगितले. त्यामुळे नाणार प्रकल्प पुढे नेण्याबाबत केंद्र सरकार ठाम असल्याचेच दिसून येते. शिवसेनेच्या विरोधाकडे भाजप पुन्हा दुर्लक्षच करणार असल्याचे आणि तेही कधी काळी शिवसेनेचे खासदार असलेल्या सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून केले जात असल्याचे दिसून आले.

दृष्टिक्षेपात प्रकल्प

प्रकल्पाची लांबी ....१०७.६५ किलोमीटर

प्रकल्पाचा खर्च ... ३२४४ कोटी रुपये

यंदा केलेली तरतूद ....२० कोटी रुपये

आवश्यक जमीन -....६३८.६ हेक्टर (अंदाजे)

कालावधी ....५५ महिने (अंदाजे)

प्रस्तावित मार्ग - कोल्हापूर-मार्केट यार्ड- बापट कॅम्प-कसबा बावडा-शिये-भुये-केर्ले-आसुर्ले-पोर्ले-कळे- सैतवडे-भूतलवाडी-उपळे (जि. सिंधुदुर्ग) - वैभववाडी रोड

एकूण स्थानके - १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पंपिंग स्टेशन डिसेंबरपर्यंत कार्यन्वित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बापट कँप व लाइन बाजार येथील दोन नाल्यांवर डिसेंबर २०१८ पर्यंत पंपिंग स्टेशन कार्यन्वित करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. बुधवारी पुणे येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे चेअरमन सुधीर श्रीवास्तव होते. महापालिकेच्यावतीने राखीव ठेवण्यात येणारा पर्यावरण संवर्धन निधी प्रत्येक वर्षी खर्च करण्याच्या सूचना श्रीवास्तव यांनी यावेळी केल्या.

प्रदूषण मंडळाचे चेअरमन श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर, सोलापूर व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांची बैठक झाली. सांगली महापालिकेची निवडणूक सुरू असल्याने आजच्या बैठकीस सांगली महापालिकेचे आयुक्त गैरहजर होते. श्रीवास्तव यांनी कोल्हापूर महापालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन, पंचगंगा प्रदूषण आणि एसटीपी प्लांटच्या सद्य:स्थिती आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत आयुक्त डॉ. चौधरी यांच्यासोबत चर्चा केली. दरवर्षी तरतूद होणारा पर्यावरण संवर्धन निधी खर्च होतो का, असा प्रश्न श्रीवास्तव यांनी उपस्थित केला.

आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले,' भांडवली अंदाजपत्रकाच्या २५ टक्के निधी पर्यावरण संवर्धन निधीची तरतूद केली जाते. गेल्या वर्षी यापैकी ८० टक्के निधी खर्च झाला. प्रायोगिक तत्वावर दुधाळी एसटीपी प्लांटद्वारे १७ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास एक महिन्याचा कालावाधी लागणार आहे. तसेच बापट कँप व लाइन बाजार येथील नाल्यावर शंभर व १५० हॉर्सपॉवरचे दोन पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. दोन पंपिंग स्टेशनमधून प्रत्येकी चार व पाच एमएलडी सांडपाण्याचा उपसा करुन बावडा एसटीपी प्लांटमध्ये प्रक्रिया करण्यासाठी घेतले जाणार आहे. पंपिंग स्टेशनचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी श्रीवास्तव यांनी दरवर्षी पर्यावरण संवर्धन निधी शंभर टक्के खर्च करण्याची सूचना आयुक्त डॉ. चौधरी यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन बांधकाम व्यवसायिकांना दंड

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डेंगीचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायावर भर देणाऱ्या महापालिकेने बुधवारी बेसमेंटमधील पाणी उपसा न केल्याबद्दल तीन बांधकाम व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. राजारामपुरीतील बांधकाम व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार असा १५ हजारांचा दंड केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही कारवाई केली.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने राजारामपुरी पाचवी गल्ली येथील मानसिंग रेसिडन्सी व शिल्पकल्याण प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स आणि सातवी गल्ली येथील अथर्व आयक्रॉन यांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड केला आहे. जुलै महिन्यात महापालिकेने तीन मिळकतधारकांना १२,५०० रुपयांचा दंड करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

जून महिन्यापासून शहरात डेंगीसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर शहराच्या विविध भागात डेंगीचे १३० रुग्ण आढळले होते. महापालिकेने सर्वेक्षण मोहीम सुरू करुनही रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली होती. औषध फवारणी, तापाचे रुग्ण तपासणी, कोरडा दिवस पाळणे, हँड बिल वाटप आदी मार्गाने नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. प्रतिबंध हाच डेंगीला रोखण्याचा मुख्य मार्ग असल्याने सर्वेक्षणाच्या माध्यमातून 'घर टू घर' प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेदरम्यान अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी साचून राहिल्याचे निदर्शनास आले. अशा मिळकतधारकांना पाणी उपसा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ९७ मिळकतधारकांना नोटिसा दिल्या होत्या. यापैकी जुलै महिन्यात दंडात्मक कारवाई केल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा महापालिकेने दंडात्मक कारवाई केली. यापुढेही ज्या मिळकतधारकांना नोटिसा दिल्या आहेत, त्यांनी जर वेळेत उपाययोजना केल्यास पुन्हा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बुधवारच्या कारवाईत आरोग्य विभाग, नागरी कुटुंब कल्याण कर्मचारी, सर्व आरोग्य निरिक्षक, विभागीय आरोग्य निरिक्षक मुख्य आरोग्य निरिक्षक व आरोग्याधिकारी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाला मि‌ळणार गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लीड

............

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिल्लीत दिली. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्याच्या महत्वकांक्षी योजनेला गती मिळाली. उद्योग, कृषी, व्यापार, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांच्या विकासाचा हा मार्ग कोल्हापूरसह कोकणासाठी उपयुक्त ठरणार आहे. उद्योगांच्या वाढीसह कोकण आणि कोल्हापुरातील पर्यटनही बहरणार आहे. १०३ किलोमीटर अंतर असलेल्या या मार्गासाठी १३७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील अर्धी रक्कम राज्य सरकार देणार आहे. सुरेश प्रभू यांनी रेल्वे खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोकण-कोल्हापूर जोडण्याच्या मागणीला गती मिळाली. अनेक वर्षांच्या मागणीनंतर साकारणारा हा रेल्वे मार्ग निर्धारित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी मात्र लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागेल.

..................

कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ

कोल्हापुरातून साखर, गूळ, दूध, अन्नधान्य, भाज्या, इथेनॉल, नवसागर, उद्योगांसाठी लागणारी साधने कोकणात पाठवली जातात. याशिवाय कोकणातून आंबा, काजूगर, मासळी, चिरा, कच्चे लोखंड, वाळू कोल्हापुरात आणले जाते. रोज तीनशे ते चारशे अवजड ट्रक आणि टेम्पोची वाहतूक कोकण ते कोल्हापूरदरम्यान सुरू असते. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. रस्तेमार्गांवरून सध्या सुरू असलेली वाहतूक खर्चिक आणि वेळखाऊ आहे. या तुलनेत रेल्वे वाहतूक कमी खर्चिक आणि वेळेची बचत करणारी आहे. साखर, गूळ, दूग्धजन्य पदार्थांची समुद्रमार्गे वाहतूक आणि निर्यात करणेही यामुळे शक्य होणार आहे. कोल्हापूर ते वैभववाडी दरम्यान असलेल्या रेल्वे स्थानकांचाही विकास होणार आहे, त्यामुळे या रेल्वे स्थानकांच्या आसपास व्यापारपेठा वाढू शकतात. कोल्हापुरातील कृषी उत्पादनांसाठी हा रेल्वेमार्ग विकासाचे नवे दरवाजे उघडेल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

उद्योग रुळावर

कोल्हापुरातील उद्योगांसाठी लागणारे कच्चे लोखंड, कोळसा, वाळू हे कोकणातून आणावे लागते, तर कोल्हापुरातून सिमेंट, स्टिल, उद्योगांसाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री कोकणात पाठवली जाते. समुद्रमार्गे येणाऱ्या वस्तू जयगड बंदरातून कोल्हापुरात येतात. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गामुळे कोकण आणि कोल्हापुरातील उद्योगांना उर्जा मिळणार आहे. कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतींमधील यंत्रसामग्री रेल्वेने कोकणात पोहोचू शकते. कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे सोयीची ठरत असल्याने उद्योजकांच्या खर्चात बचत होणार आहे. याशिवाय नवीन रेल्वे मार्गावरही नव्याने लहान-मोठ्या औद्योगिक वसाहती तयार होऊ शकतात. यामुळे रोजगार निर्मिती होण्यासह दुर्गम परिसराचा विकास होणार आहे. गगनबावडा हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असेल, त्यामुळे गगनबावडा परिसराचा विकास होण्याची संधी निर्माण झाली आहे. टेक्स्टाईल, ऑटोमोबाइल, साखर उद्योगासह भाजीपाला, दुधाची निर्यात वाढणार आहे.

पर्यटन बहरणार

कोल्हापूर हे कोकणचे प्रवेशद्वार मानले जाते, त्यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतातून येणारे पर्यटक कोल्हापूरमार्गेच कोकणात जातात. सध्या कोकणात जाण्यासाठी आंबा, करूळ, भुईबावडा, फोंडा, आंबोली या घाटांचा वापर केला जातो. याला कोल्हापूर ते वैभववाडी हा रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, घनदाट जंगल, कोसळणारे धबधबे, खोल दऱ्या, ढग आणि धुक्याची दुलई यांनी नटलेला निसर्ग पाहण्याची संधी या मार्गावर मिळणार आहे. याशिवाय १०३ किलोमीटरच्या मार्गात २६ बोगदे आणि छोटे-मोठे १३० पूल आहेत. पर्यटकांसाठी या मार्गावरील प्रवास स्वप्नवत ठरणार असल्याने कोल्हापूर-कोकणातील पर्यटन वाढीलाही मोठा फायदा होणार आहे. कोकण रेल्वेप्रमाणे कोल्हापूर-वैभववाडी हा मार्गही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो.

प्रलंबित मागण्यांनाही मिळावी चालना

कोल्हापूर-कोकण रेल्वेने जोडण्याची मागणी गेल्या २० वर्षांपासून सुरू होती. अखेर या मागणीला मंजुरी मिळून त्याच्या कामालाही सुरुवात होत आहे. मात्र, कोल्हापूर-पुणे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण या मागण्याही अद्याप प्रलंबित आहेत. दोन वर्षांपूर्वीच कोल्हापूर-पुणे मार्गाच्या विद्युतीकरणाची घोषणा झाली. यासाठी ६१५ कोटी रुपयांची तरतूदही केली. मात्र, याला अपेक्षित गती मिळाली नाही. याशिवाय कोल्हापूर-मिरज मार्गावर एक उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्गही मंजूर आहे. कराड-चिपळूण मार्गाचेही काम वेळेत पूर्ण झाल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे विस्तारणार आहे. ही प्रलंबित कामे वेळेत मार्गी लागल्यास रेल्वे प्रवास गतिमान आणि सोयीस्कर होऊ शकतो. कोल्हापूर-वैभववाडी मार्गासह कोल्हापूर-पुणे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागणार आहे.

कोल्हापूर व वैभववाडीसह १० स्टेशन

उड्डाणपूल ५

भुयारी मार्ग ४

छोटे पूल ८५

मोठे पूल ४५

बोगदे २६

सर्वांत मोठ्या लांबीचा बोगदा १७५० मीटर

.................

कोट

'वीस वर्षांपासून सुरू असलेल्या कोल्हापूरकरांच्या मागणीला अखेर मूर्त रूप मिळाले. वर्षापूर्वीच मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमीपूजन झाले होते. महिन्याभरात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खुद्द मंत्र्यांनीच दिल्याने स्वप्नवत मार्गाचे काम सुरू होत आहे. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येत असल्याने याचा विशेष आनंद आहे.

धनंजय महाडिक, खासदार

...........

कोट

' कोल्हापूर-कोकण जोडण्यासाठी २००९ पासून माझ्याकडून पाठपुरावा सुरू होता. अखेर या कामाला सुरुवात होत आहे. कोल्हापूरसह मराठवाडा, विदर्भ कोकणाला जोडणारा हा मार्ग असेल. यातून कोकणसह कोल्हापूरच्या विकासाची संधी उपलब्ध झाली आहे. या मार्गामुळे कोकण रेल्वेवरील ताण कमी होईल.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी २ ऑगस्टसाठी

$
0
0

चर्चासत्र : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे चर्चासत्र, विषय : तंत्रज्ञानाच्या वापराने उत्पादन गुणवत्तावाढ, स्थळ : रेसिडेन्सी क्लब, वेळ : सायंकाळी ५.३० वा.

भजन : श्री बालमुकुंद बालावधूत महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त भजन, स्थळ : बालमुकुंद महाराज मठी, शाहूपुरी ५ वी गल्ली, वेळ : दुपारी ४ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुस्लिम तरुणांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'आजचे युग स्पर्धेचे असून त्यामध्ये टिकायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच मुस्लिम समाजातील तरुण-तरुणींनी शैक्षणिक प्रवाहात येऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपली कारकीर्द घडवावी,' असे आवाहन मुंबईचे निवृत्त एसीपी इसाक बागवान यांनी केले.

इचलकरंजी शहर बागवान जमियत, बागवान जमियत बैतुलमाल कमिटी व बागवान जमियत यूथ फाउंडेशनच्या वतीने समाजातील गुणवंत व्यक्तींना पुरस्कार प्रदान, वरिष्ठ व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार प्रदान, दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अमन सहकारी बँकेचे संस्थापक बादशहा बागवान होते. येथील बागवान जमियत सांस्कृतिक हॉलमध्ये कार्यक्रम झाला.

इचलकरंजी शहर बागवान जमियतचे सल्लागार कैश बागवान यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते निवृत्त एसीपी बागवान, जीएसटी महाराष्ट्र डेप्युटी कमिशनर सलीम बागवान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फिरोज बागवान, पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, अजिज बागवान, आरटीओ नाजनीन बागवान, आरटीओ अनिस बागवान, यूपीएसी प्रोफेसर सादीक बागवान, पोलिस उपनिरीक्षक आफरीन बागवान, सीए इरफान बागवान, सीए अंजुम बागवान यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजातील ज्येष्ठ बादशहा बागवान, कैश बागवान, डॉ. मो. कलीम बागवान, अॅड. अबिद बागवान, कारी बागवान व नजीर बागवान यांना समाजरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला.

बागवान जमियत अध्यक्ष जावेद बागवान यांनी प्रास्ताविक केले. बागवान जमियतचा अहवाल व इसाक बागवान लिखित 'मी अँड द मुंबई अंडरवर्ल्ड' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. इम्तियाज म्हैशाळे यांनी सूत्रसंचालन केले. जावेद बागवान यांनी आभार मानले. सामुदायिक दुआ पठण कारी अशपाक बागवान यांनी केले. यावेळी बागवान जमियततर्फे सामुदायिक विवाह सोहळाही झाला.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेक न्यूज कार्यशाळा

$
0
0

सत्यता पडताळून, विचार करुनच पोस्ट व्हायरल, शेअर करा : पाचलग

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'समाजकंटक आपला हेतू साध्य करण्यासाठी सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापर करतात. फेक न्यूज अफवा पसरविण्याचे सूत्र बनले आहे. समाजमाध्यमांवरील माहिती, छायाचित्र आणि व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी विचार, निरीक्षण, सत्यता आणि त्याचा परिणामांचा गांभीर्याने विचार केल्यासस फेक न्यूज रोखता येऊ शकेल', असे प्रतिपादन सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग यांनी दिला. जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हास्तरीय सायबर सेल आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 'फेक न्यूज परिणाम आणि दक्षता' या विषयावर प्रसार माध्यमांसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

पाचलग म्हणाले, ' देशांत इंटरनेट वापराचे प्रमाण २७ टक्के असून २२ कोटी लोक फेसबुक आणि १७ कोटी जण व्हॉट्अपचा वापर करतात. समाजकंटक या सोशल मीडियाचा गैरफायदा घेतात. त्याला काही सर्वसामान्य नागरिकच बळी पडतात. कोणत्याही गोष्टीची सत्यता पडताळून घेतली जात नसल्याने संभ्रमावस्था वाढते. सोशल मीडियाचा वापर करताना 'थिंक व्टॉईस' हा मंत्र उपयोगी ठरु शकतो. मेसेज फॉरवर्ड करताना क्षणभर थांबून, विचार करुनच शेअर केला पाहिजे. फेकन्यूजच्या वाढत चाललेल्या थैमानाला आळा घाल्यासाठी प्रत्येकानेच विचारपूर्वक पोस्ट व्हायरल केली पाहिजे. खरी आणि खोटी फेक न्यूज ओळखता आली पाहिजे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्टची खात्री करुन घेण्यासाठी डॉक्टर, वकील, सी.ए. आदींचा ग्रुप तयार करावा. समाजमाध्यमांवरील येणाऱ्या पोस्टची त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांकडून सत्यता पडताळल्यास फेकन्यूजला रोखणे शक्य होईल. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, पोलिस उपअधिक्षक सतीश माने आदी उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी, एस. आर. माने यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचे चर्चेचे निमंत्रण फेटाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निमंत्रण श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी फेटाळून लावले. त्यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रतापासिंह जाधव यांनीही मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीस येणार नसल्याचे कळवले आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजाच्यावतीने राज्यभर आंदोलनाचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजातील प्रमुख नेते आणि विचारवंतांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: शाहू महाराज यांना फोन केला. त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून डॉ. एन. डी. पाटील यांच्याशी संपर्क साधला. मुंबईला बैठकीला येण्यासाठी विमानाची सोय करतो, असेही सांगितले. मात्र प्रकृती अस्वास्थ्य आणि इतक्या जलदपणाने बैठकीला येणार नसल्याचे त्यांच्याकडून कळविण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बैठकीच्या निमंत्रणानंतर श्रीमंत शाहू महाराज, डॉ. पवार दुपारी अडीचच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत चर्चेसाठी दसरा चौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. मुस्लिम बोर्डिंग येथे त्यांची सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत दीड तास चर्चा झाली. यावेळी सरकार आरक्षणप्रश्नी दिशाभूल करत असल्याचा आरोप समाजाच्या प्रतिनिधींनी केला. यानंतर शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित बैठकीत सहभागी होणार नसल्याची घोषणा केली.

'चर्चा कसली करताय, आरक्षण द्या'

'मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात शांततेने ५८ मोर्चे निघाले. समाजाने आरक्षणासाठी निवेदने सादर केली, मागासवर्गीय आयोगाकडे पुरावे सादर केले. आता चर्चा कसली करताय? आरक्षणाचा निर्णय घ्या,' अशा शब्दांत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला फटकारले. चार वर्षांत सरकारकडून समाजाची फसवणूक झाली. सरकार विश्वास ठेवण्यास पात्र नाही, अशा तीव्र भावना व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बोलाविलेल्या बैठकीचे निमंत्रण नाकारले. सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न चार वर्षांत गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे सरकार विश्वास ठेवायला पात्र आहे, असे वाटत नाही, असा संतापही शाहू छत्रपती यांनी मुस्लिम बौर्डिंगमधील बैठकीत व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन पासिंग ट्रॅकबाबत परिहवनमंत्री सकारात्मक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'हातकणंगले व शिरोळ तालुक्यांसाठी वाहन पासिंग ट्रॅक सुरू करण्याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यासाठी तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इंटीग्रेटेड टेक्स्टाइल पार्कच्या जागेचा प्रस्ताव दिला जाणार आहे. त्यावर आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आवश्यक ती मदत करावी अशा सूचना रावते यांनी संबंधितांना दिल्या आहेत', अशी माहिती माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली.

हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांसाठी केएटीपी येथे वाहन पासिंग ट्रॅक करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन गेल्या आठवड्यात रिक्षा चालक-मालक, मालवाहतूक टेम्पो कृती समितीच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे. यासंदर्भात माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री रावते यांची मुंबईत मंगळवारी भेट घेतली.

यावेळी, प्रादेशिक परिवहन विभागाने इचलकरंजी शहरतील पंचवटी चित्रमंदिर परिसरात असलेल्या जागेत आधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणेने सज्ज अशा कॉम्पॅक्ट रुममध्ये वाहन पासिंगचे काम करण्याचे निश्चित केले आहे. परंतु ही जागा उपलब्ध होऊन संपूर्ण यंत्रणा अस्तित्वात येऊन हे केंद्र सुरू होण्यासाठी किमान सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत या हजारो छोट्या वाहनधारकांना पासिंगसाठी कोल्हापूर येथील मोरेवाडी येथे जावे लागेल. हे टाळण्यासाठी आम्ही तात्पुरती सोय म्हणून आपल्याकडे जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे केएटीपी येथे २०२ एकरमध्ये असलेल्या इंडस्ट्रीयल इस्टेटमधील जागा देण्यास संस्था तयार असून तेथे वाहन पासिंग ट्रॅकसाठी असलेल्या नियमांचे पालन होऊ शकेल. याठिकाणी २५० मीटरचा ट्रॅक सरळ रेषेत विनाअडथळा होऊ शकतो. त्याचप्रमाणे या जागेवर सीसीटिव्हीची उपलब्धता करून देणेची तयारी केएटीपी संस्थेने दाखविली असल्याचे सांगितले.

त्यावर परिवहन मंत्री रावते यांनी यासंदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाच्या आयुक्तांशी चर्चा करून जागा संदर्भातील प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. शिष्टमंडळात नंदा साळुंखे, प्रकाश लोखंडे, अशोक कोलप, दशरथ मोहिते, रामचंद्र जाधव, अण्णा पांडव, अल्ताफ शेख, आदींचा समावेश होता.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणाचा आवाज बुलंद

$
0
0

फोटो - अमित गद्रे

मराठा आरक्षणाचा आवाज बुलंद

शिवसेना, मनसेसह मुस्लिम समाजाचा पाठिंबा

कोल्हापूर टाइम्स टीम

'मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे'अशा घोषणांनी दसरा चौक परिसर बुधवारी दुमदुमला. मराठा समाजाने आरक्षणासाठी पुकारलेल्या ठिया आंदोलनाला विविध संघटना, संस्था आणि पक्षांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. शिवसेना, भाजी विक्रेते संघटनेसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह मुस्लिम समाजानेही मराठा आरक्षणाला समर्थन दिले. विविध संघटना आणि समाजाच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

बुधवारी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध भागातून नागरिक दाखल झाले. 'मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, एक मराठा लाख मराठा'या आशयाच्या भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. आरक्षण मान्य होईपर्यंत लढा चालू राहील असा निर्धार यावेळी करण्यात आला. दरम्यान सकाळपासून आंदोलनस्थळी गर्दी वाढल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. पोलिसांनी, व्यासपीठासमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. शिवसेनेचे कार्यकर्ते सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आंदोलनस्थळी आले. त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे 'मराठा आरक्षणासाठी तरुण संघटित होत आहेत. हे आंदोलन पक्ष, गटतट विरहीत आहे. सरकारने समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन आरक्षणाचा निर्णय अंमलात आणावा. समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असून सरकारला त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.'

धरणे आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवाजी जाधव, उपजिल्हाप्रमुख, सुजित चव्हाण, रवी चौगुले, दुर्गेश लिंग्रस, माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे, कमलाकर जगदाळे, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, राजू पाटील, संदीप पाटील तानाजी आंग्रे, कृष्णात पोवार, प्रशांत पोवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी पवार, सुजाता सोहोनी, दीपा शिंदे आदींचा सहभाग होता. गांधीनगर भाजीविक्रेते संघटनेने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात अमोल पाटील, अक्षय घाडगे, अण्णा तिळवे, वंदना संताजीचे, राणी गायकवाड, अर्जुन मिसाळ, सावित्री पाटील, कल्पना पाटील आदींचा समावेश होता.

मुस्लिम समाजाचे धरणे

कोल्हापूर जिल्हा समस्त मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत धरणे आंदोलनही केले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण मराठा समाजाच्या हक्काचे,'अशा घोषणा देत मुस्लीम समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी रास्त असून सरकारने विनाविलंब आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी कादर मलबारी, आदिल फरास, बंकट थोडगे, मोहसीन देसाई, महंमदशरीफ शेख, फारुख कुरेशी यांनी भाषणात केली. आंदोलनात मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, नगरसेवक नियाज खान, बाळासाहेब मोमीन, ईर्शाद बंडवाल, मुस्ताक अत्तार, आबिद आत्तार, जहाँगीर अत्तार, फिरोज खान, फिरोज सौदागर, ईस्माइल शेख, फारुख अत्तार, यासिन सनदी, आलताफ झांजी आदींचा सहभाग होता. जयसिंगपूर येथील मुश्ताक अत्तार, आबिद अत्तार, अर्शदहुसेन बाबासाहेब अत्तार, फिरोज नुरुद्दीन अत्तार, इर्शाद अत्तार यांनीही पाठिंबा दर्शविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैभव सोसायटी अध्यक्षांसह ७ जणांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागामालकाला धमकी, दमदाटी करुन बेकायदेशीररित्या जबरदस्तीने घुसून प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाहू नाका येथील वैभव को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षांसह एकूण सातजणांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वैभव हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष युवराज माळी, सचिव कुमार निंबाळकर, संचालक नरेश दूत, संचालक सुभाष माने, संस्था कर्मचारी भगवान सोनुले, दिनेश कोरगांवकर, अॅड. डी. एन. जाधव ( सर्व रा. वैभव हाऊसिंग सोसायटी, शाहू नाका, शिवाजी विद्यापीठ रोड )अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्लॉटमालक अमोल आनंदराव अतिग्रे (वय ४९, रा. वास्तुश्री गार्डन्स, ताराबाई पार्क ) यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव सोसायटीत अमोल अतिग्रे यांचा प्लॉट आहे. ८ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११ वाजता सोसायटीतील त्यांचा प्लॉट क्रमांक ६८ अ सह अन्य प्लॉटधारकांच्या प्लॉटचा ताबा घेण्यासाठी सोसायटीच्या अध्यक्षांसह सातजण आले. त्यावेळी अतिग्रे यांनी तुम्हाला प्लॉटचा ताबा घेण्याचा काहीही अधिकार नसल्याचे सांगत विरोध केला. या विरोधाला न जुमानता सोसायटी अध्यक्ष युवराज माळी यांच्यासह अन्य सहाजण अतिग्रे यांना दमदाटी करीत अंगावर धावून गेले. त्यावेळी अतिग्रे यांचा मित्र चंद्रशेखर खाडे, संस्था सभासद सतीश स्वामी यांनी त्यांना रोखले. या प्रकारानंतर संशयित आरोपींनी 'तुला बघून घेतो' असेही धमकावले. त्यानंतर सर्व आरोपींनी परस्पर बोगस, बनावट, खोटी कब्जेपट्टी तयार केली. त्याची नोटीस अतिग्रे यांना पाठवून मालकी वहिवाटीचा ताबा घेतला असे दाखविले. या सर्व प्रकरणी कायदेशीर मिळकतीवर गदा आणल्याची फिर्याद अतिग्रे यांनी २१ जुलै रोजी राजारामपुरी पोलिसांत दिली. राजारामपुरी पोलिसांनी त्यांचा जबाब उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images