Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गणवेश वाटप

$
0
0

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कोल्हापूर शहरातर्फे तात्यासाहेब मोहिते विद्यालय व बालवाडीत गणवेश वितरित करण्यात आले. शिक्षण समिती सभापती अशोक जाधव यांच्या हस्ते आणि शिक्षक समितीचे नगरपालिका महापालिका राज्य प्रमुख सुधाकर सावंत, राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई, उत्तम कुंभार, नयना बडकस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. सभापती जाधव यांनी समितीच्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे कौतुक केले. समितीचे शहराध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय कडगावे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष धादवड यांनी आभार मानले. याप्रसंगी वसंत आडके, अभिजित जाधव, प्रकाश पाटील, शिवराज नलवडे, विष्णू परीट आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजाराम महाराजांवरील चित्रप्रदर्शनास प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील श्री शिवाजी मराठा फाउंडेशनच्यावतीने छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या चित्रमय प्रदर्शनास शनिवारी (ता. २८) छत्रपती शाहू स्मारक कलाभवन येथे सुरुवात झाली. चित्रप्रदर्शन मंगळवारपर्यंत (ता. ३१) सकाळी १० ते ७ या कालावधीत खुले राहणार आहे.

या चित्रमय प्रदर्शनात राजाराम महाराजांच्या कारकीर्दीची माहिती देणारी दुर्मिळ छायाचित्रे आणि कागदपत्रांची मांडणी करण्यात आली आहे. यात राजाराम महाराजांच्या बालपणातील छायाचित्रे तसेच १९२२ मध्ये काढण्यात आलेला राज्यारोहण प्रसंगीचा जाहीरनामा, त्यांनी उभारलेल्या विविध वास्तूंची छायाचित्रे, तसेच त्यांच्या काळातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे मांडण्यात आली आहेत. तसेच राजाराम महाराज यांच्या निधनाच्या तत्कालिन वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्या आणि ९० छायाचित्रांच्या माध्यमातून ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यात आला आहे.

उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, श्री शिवाजी मराठा फाउंडेशनचे राम यादव, रविराज कदम, नागराज सोळंकी, अश्विनी जाधव, अमित आडसुळे, सुचित जाधव, किरण चाबुकस्वार, प्रशांत वरगे, भगवान चिले, पवन निपाणीकर, प्रदीप थोरवत, अतुल माने, संदीप जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतूक आठ दिवसांनंतर सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंधन दरवाढ कमी करण्यासह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने सुरू केलेले देशव्यापी चक्काजाम आंदोलन शुक्रवारी रात्री मागे घेण्यात आले. या निर्णयानंतर शनिवारी जिल्ह्यातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची चाके पुन्हा फिरू लागली. साखर, गूळ, कापड, खाद्यतेल, अन्नधान्य, कोळसा यासह भाजीपाल्याची वाहतूक सुरू झाली. राजर्षी शाहू मार्केट यार्डात शनिवारी कांदे, बटाटे आणि भाजीपाल्याचे सुमारे २०० ट्रक आले.

वाहतूकदारांनी शुक्रवारपासून (ता. २०) देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार ट्रक आणि सुमारे १० हजार टेम्पो अशी २६ हजार वाहने जाग्यावर थांबली होती. याशिवाय बाहेरच्या राज्यातून आलेले ट्रकही पुणे-बेंगळुरू महामार्गावर मार्केट यार्ड परिसरात थांबले होते. आंदोलनामुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींना मोठा फटका बसला. कच्च्या मालाची आयात थांबल्याने ५० टक्के उद्योग थंडावले होते. याशिवाय इचलकरंजीच्या कापड उद्योगावरही मोठा परिणाम जाणवला. कापूस, सूतगाठी आणि कापडाची वाहतूक ठप्प झाल्याने कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. माथाडी युनियननेही आंदोलनाला पाठिंबा दिल्याने मार्केट यार्ड, धान्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर शुक्रवारी (ता. २८) रात्री आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर होताच जिल्ह्यातील वाहने रस्त्यावर धावू लागली. विशेषत: साखरेचे १०० ट्रक, खाद्यतेल, सिमेंट, स्टील, कापड याची वाहतूक करणारी वाहने सुरू झाली. शनिवारी सकाळी शाहू मार्केट यार्डमध्ये कांदे, बटाट्याचे २० ट्रक आले, तर भाजीपाला आणि फळांच्या १८० टेम्पोंची आवक झाली. गेल्या चार दिवसांत भाजीपाला आणि फळांचा एकही ट्रक मार्केट यार्डात आला नसल्याने सौदे झाले नव्हते. चार दिवसांनंतर पहिल्यांदाच शनिवारी सकाळी मार्केट यार्डात सौदे सुरू झाले. लक्ष्मीपुरीच्या धान्य बाजारात शनिवारी धान्याचे १५ ट्रक आले. कोकणात जाणारीही धान्याची वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने व्यापाऱ्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार पुन्हा सुरू झाले, अशी माहिती लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली.

उद्योगांना मिळाली गती

वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींना बसला. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत. गोकुळ शिरगाव, शिरोली, उद्यमनगर यासह इचलकरंजी, हातकणंगले येथील उद्योगांना कच्च्या मालाची टंचाई जाणवली. काही उद्योग बंद ठेवण्याचीही वेळ आली. उद्योजकांना सुमारे ८०० कोटी रुपयांचा फटका बसला. आंदोलन मागे घेताच कच्च्या मालाची आवक सुरू झाल्याने औद्योगिक वसाहतींमधील यंत्रांची चाके पुन्हा फिरू लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करावी. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे घटनादुरूस्ती करून आरक्षण द्यावे,' अशी सूचना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली. लोकसभेत भाजपचे बहुमत असल्याने विधेयक मंजूर होईल. विरोधकांचे मन वळवून विधेयक राज्यसभेतही मंजूर करुन घेण्यासाठी पुढाकार घेईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दसरा चौकात गेले चार दिवस आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. पवारांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, अशी ग्वाही देतानाच त्यांनी आंदोलनाला गालबोट लागू नये, याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला.

ते म्हणाले, 'मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे काढले. आरक्षणप्रश्नी समाजाच्या भावना किती तीव्र आहेत, हे दाखवून दिले. त्यावेळी निर्णय ताबडतोब निर्णय घेऊ, असे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारने चार वर्षे निर्णयच घेतला नाही. उलट आंदोलकांविषयी चुकीची वक्तव्ये नेत्यांनी केली. आषाढी वारीत साप टाकण्याचा डाव होता, असा आरोप खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मराठी माणूस वारीत कधी साप सोडण्याचे पाप करणार नाही, हे माहीत असताना संपूर्ण मराठा समाजाला बदनाम करण्याचे काम त्यांनी केले. दुसरीकडे आंदोलकांत 'पेड' लोक आहेत, असे जाहीर वक्तव्य कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी केले. ही वक्तव्येच आंदोलन विकोपाला जाण्यासाठी कारणीभूत ठरली.'

घटनेत बदल करून मराठा आरक्षण शक्य आहे, असे स्पष्ट करुन ते म्हणाले, 'त्यासाठीचे विधेयक भाजपने लोकसभेत मांडून मंजूर करावे. ते राज्यसभेत मंजूर करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी घेऊ. या विधेयकाचा फायदा मराठा समाजासह राजस्थान, हरियाणा, गुजरातमधील आरक्षण मागणाऱ्या वर्गांना, शोषित, वंचितांना होऊ शकेल.'

संयम ठेवावा

राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी कोणताच निर्णय न घेतल्याने तरुण पिढी अस्वस्थ आहे. पण, आंदोलनामुळे कुणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. मराठा समाज दुसऱ्याच्या ताटातील काही मागत नाही. न्याय्य हक्काने आरक्षण मागत आहे. ११६ वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजासह उपेक्षित जातीजमातींना ५० टक्के आरक्षण दिले त्याप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. शाहूंनी जी विचारांची दिशा दाखवली आहे ती अनुसरुन संयमाने आंदोलन करावे. आंदोलनात फूट पाडण्यासाठी येणाऱ्यांना खड्यासारखे दूर करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांनी निवडणूक लढवावी

$
0
0

शरद पवार यांचे पाटील यांना आव्हान; अपघाताने मंत्री झाल्याची टीका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजकारणामध्ये अपघाताने एखाद्याला संधी मिळते. त्याच पद्धतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी मिळाली. या संधीच्या सदुपयोग न करता ते वादग्रस्त विधाने करून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. व्यक्तीश: टीका करण्यापेक्षा जनतेतून निवडणूक लढवून जनमत अजमावे,' असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालकमंत्री पाटील यांना दिले.

पवार शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांच्यावर टीका केली, 'पालकमंत्री पाटील यांनी आंदोलनात पेड लोक असल्याचे सांगत त्यांचे रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यांनी रेकॉर्डिंगमधील नेत्यांची नावे जाहीर करावीत. त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. जातीय द्वेष निर्माण करत असल्याचा आरोप पालकमंत्री माझ्यावर करत आहेत. हे चुकीचे आहे. आजवर मी १४ निवडणुका लढवल्या असून थेट जनतेतून सात निवडणुका जिंकल्या आहेत. ज्यांना अपघाताने संधी मिळाली, त्यांनी थेट जनतेतून निवडणूक लढवून मगच माझ्यावर टीका करावी.'

खासदार महाडिकांना डावलून बंद खोलीत चर्चा

पवार यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हातील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी खासगी हॉटेलवर सकाळपासून गर्दी केली होती. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगत असतानाच सांगली महापालिका व कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद बदलाच्या हालचालीबाबत पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बंद खोलीत सुमारे पाऊण तास चर्चा केली. चर्चेतमध्ये खासदार महाडिक यांचा समावेश नसल्याने बाहेरील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. तर काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती. चर्चा सुरू असताना जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची अनुपस्थिती दिसत होती.

जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील

गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले पाटील कोणत्याही क्षणी पक्षा सोडण्याची चर्चा नेहमीच होत असताना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. पवार यांनी पक्षातील मतभेद मिटवण्यात यश आल्याचे संकेत दिले. तसेच जिल्हाध्यक्षपदावर पाटील यांच्या नियुक्तीचे संकेत देत त्याला माजी खासदार निवेदिता माने, आमदार के. पी. पाटील यांची समंती असल्याचे त्यांनी सांगितले.

पवारांच्या भेटीला आवाडे पिता-पुत्र

पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात नेहमीच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याची उपस्थिती असते. शनिवारचा दौरा खासगी असला, तरी विशेषत: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांची भेट घेतली. पण शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार बैठक झाल्यानंतर माजी खासदार कल्लाप्पा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साखर व उसाच्या दराबाबत चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारतरत्न’ची प्रतिष्ठा वाढेल

$
0
0

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आपण रयतेचे सेवक आहोत, या भावनेने लोकाभिमुख राज्यकारभार करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते सीमित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संबंध देशभरात महात्मा जोतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार आणि कार्याविषयी आस्था आहे. सामाजिक क्रांतीच्या या प्रणेत्यांचा भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित केल्यास या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल. शाहू महाराजांना भारतरत्न द्यावा या मागणीकडे संसदेला दुर्लक्ष करता येणार नाही, ' असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री व खासदार शरद पवार यांनी केले.

येथील लोकराजा फोरम मल्टिपर्पज सोसायटीतर्फे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित 'राजर्षी' या चित्रमय पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ते बोलत होते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते.

संसदेत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी राजर्षी शाहू यांना तर सुप्रिया सुळे यांनी महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्याची मागणी केली. त्याबद्दल खासदार महाडिक व सुळे यांचे अभिनंदनही पवार यांनी केले. तसेच शाहूंचे कार्य घराघरात पोहचण्यासाठी चित्रमय राजर्षी ही पुस्तक संकल्पना उपयुक्त असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

पवार म्हणाले, 'आज शेतकरी अल्पभूधारक बनला आहे. किफायतशीर शेती परवडत नाही. गोखले इन्स्टिट्यूटने मराठवाडा आणि विदर्भात केलेल्या सर्व्हेक्षणात केवळ शेती परवडत नाही, म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सामोरे आले. यामध्ये ४२ टक्के शेतकरी हे कुणबी आणि मराठा समाजातील आहेत. शेती मर्यादित असल्याने ती परवडणारी नाही हे शाहू महाराजांनी त्याकाळी ओळखले होते. शेतकरी कुटुंबांतील मुलांनी उद्योग व्यवसायकडे वळले पाहिजे, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करावेत, अशी भावना ठेवून शेतीपूरक उद्योगाला चालना दिली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक शेतकरी उद्योजक बनले. शिवाय शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनेला प्राधान्य देणारी आज्ञापत्रे तत्कालिन प्रशासन यंत्रणेला लागू केली. अधिकाऱ्यांनी शाहूंच्या त्या आज्ञापत्राचा अभ्यास करुन काम केल्यास शेतकऱ्यांच्या अनेक समस्या संपतील.'

श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, 'राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती घडविली. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नाही तेव्हा क्रांतीची बीजे रुजतात. आज देशात परिवर्तनाची दिशा नजरेस पडत आहे. सद्यस्थितीत शाहू विचारच मार्गदर्शक आहेत. मात्र सध्याचे राज्यकर्ते त्याची कितपत प्रभावी अंमलबजावणी करतात हा खरा प्रश्न आहे. शरद पवार हे अनेक वर्षांपासून शाहू विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत.'

याप्रसंगी आमदार हेमंत टकले, महापौर शोभा बोंद्रे, लेखक उमेश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. फोरमचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संदीप बोरगावकर यांनी आभार मानले. चित्रकार विजय चोकाककर यांनी रेखाटलेले शाहू महाराजांचे चित्र पवार यांना भेट दिले. व्यासपीठावर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, श्रीमती निवेदिता माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार प्रकाश आवाडे, के. पी. पाटील, उपमहापौर महेश सावंत, प्रा. संजय मंडलिक, रामराजे कुपेकर, राजू लाटकर आदी उपस्थित होते.

............

फोरमच्यावतीने मान्यवरांचा सत्कार

शाहू विचारांनी कार्यरत संस्था व व्यक्तींचा सत्कार झाला. यामध्ये शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधक केंद्रातर्फे डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. देविकाराणी पाटील, सचिन घोरपडे यांनी सत्कार स्वीकारला. भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे अध्यक्ष अशोक साळोखे, कार्याध्यक्ष प्राचार्य टी. एस. पाटील, श्री हनुमान नाट्य संस्था काळम्मावाडीतर्फे सुनील माने व सहकारी, डाव्या चळवळीतील मेघा पानसरे, सीमा पाटील, तनुजा शिपूरकर व राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर पुस्तक लिहिणारी विद्यार्थिनी गायत्री शिंदे यांचा सत्कार झाला. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंगचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, बांधकाम व्यावसायिक संदीप पाटील यांचाही सत्कार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीत तेल ओतले: शरद पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शंभर दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेल्या राज्यातील भाजप सरकारने चार वर्षे झाली तरी काहीच केले नाही, उलट आंदोलनाबाबत उलटसुलट विधाने करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगीत तेल ओतले, यामुळेच आंदोलन चिघळले,' अशी टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केली. राज्य सरकारकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, पण कोणत्याच प्रश्नावर गांभीर्य दिसत नसल्याचे सांगतानाच हे सरकार राज्याच्या भल्यासाठी सत्तेवर आले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी शनिवारी कोल्हापुरात आले. सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आंदोलन, लोकसभा निवडणुका याबाबत त्यांनी मते व्यक्त केली.

मराठा आरक्षणाबाबत बोलताना पवार म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने घेतला, त्याची अमंलबजावणी केली. पण त्याविरोधात काहींनी कोर्टात धाव घेतल्याने तो निर्णय कोर्टाने रद्द केला. नंतर निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे पुढील कार्यवाही करण्यात मर्यादा आल्या. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू, शंभर दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देवू, असे आश्वासन भाजपने दिले होते. नवीन सरकार तातडीने काहीतरी करेल असे वाटत होते, पण चार वर्षे काहीही केले नाही. राज्यभर इतके मोठे मोर्चे निघाले, तरीही सरकारने काहीच केले नाही, यामुळे तरूण पिढीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आगीत तेल ओतले

शांततेत आणि संयमी आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी काहीही विधाने करत आगीत तेल ओतले असा आरोप करत पवार म्हणाले, 'असंवेदनशील विधानामुळेच आंदोलन चिघळत आहेत. यामुळेच राज्याचे नुकसान होत आहे. वारीत साप सोडतील, त्यामुळे वेगळं काही तरी घडेल, आंदोलनात समाजकंटक घुसलेत, अशा प्रकारची विधाने केली गेली. यामुळे संताप वाढला, अनेकांनी टोकाची भूमिका घेतली. म्हणून राज्याच्या हितासाठी महसूलमंत्री पाटील यांनी समाजकंटक कोण? हे जाहीर करावे,' असे आवाहनही पवारांनी केले.

मराठा आरक्षण भाजपला शक्य

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणे शक्य आहे का? असे विचारले असता पवार म्हणाले, 'या प्रश्नात कायदेशीर अडचणी असल्या तरी पर्याय आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्राला विनंती केली तर संसदेत घटना दुरुस्ती करता येते. भाजपचे बहुमत असल्याने ते शक्य आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. विरोधी पक्षाकडून सहकार्याची अपेक्षा असेल तर ती जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. या प्रश्नात राजकारण न आणता तो सोडवण्याची विनंती विरोधी पक्षातील नेत्यांना करू,' असेही ते म्हणाले.

आंदोलन करताना राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत सामान्य नागरिकांना मोजावी लागू नये, याची खबरदारी आंदोलकांनी घेतली पाहिजे. राज्यात मुख्यमंत्री बदल हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. बदल झाला तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आमच्या सोयीचे होईल. ब्राम्हण व मराठा मुख्यमंत्री हा वाद पुरोगामी महाराष्ट्रात निरर्थक आहे. यापुर्वी बाळासाहेब खेर, मनोहर जोशी हे ब्राह्मण मुख्यमंत्री झाले. त्यामुळे या पदात जातीय विश्लेषण योग्य वाटत नाही, असेही ते म्हणाले.

राज्या-राज्यांत आघाडी व्हावी

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात राज्याराज्यात आघाडी व्हायला हवी आणि निवडणुकीनंतर नेतृत्वाचा व पंतप्रधानपदाचा विचार व्हावा अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. देशभर आघाडी करण्यासाठी ज्यांची ज्या राज्यात ताकद आहे, एकच विचार आहे, त्यांनी एकत्र यावे. त्याची सुरुवात म्हणून महाराष्ट्रासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीसाठी तीन बैठका झाल्या. जागा वाटपासाठी अशोक गेहलोत, अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल व जयंत पाटील यांची समिती देखील नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. तेच जागा वाटपाची चर्चा करतील, त्यातून काही मतभेद झाले तर वरिष्ठ पातळीवर ते सोडवले जातील असे सांगून पावसाळी अधिवेशन संपताच त्याची चर्चा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याच धर्तीवर उत्त्तर प्रदेशात सपा व बसपा, कर्नाटकात काँग्रेस जेडीयू आघाडी शक्य आहे. महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेससोबत शेकाप, माकप,भाकप देखील एकत्र येवून पर्याय देऊ शकतात. हे करताना जिथे आपली ताकद नाही, तेथे जागा मागण्यात अर्थ नाही असेही ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास उपस्थित होते.

राफेल करार संशयास्पद

मनमोहनसिंग पंतप्रधान व ए. के. अॅटोनी संरक्षणमंत्री असताना राफेल करार झाला. पण नंतर या कराराची रक्कम तीनपट होऊन ती १५५० कोटी करण्यात आली. याबाबत राहुल गांधीनी प्रश्न विचारल्यानंतर करारात गुप्तता पाळल्याचे सांगितले. त्यामुळेच काही लपवालपवी असल्याची शंका येते.

पवार म्हणाले...

मराठा आरक्षणप्रश्नी आमदारांनी राजीनामा देण्यापेक्षा विधीमंडळात आवाज उठवावा

कर्जमाफीत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिकपणाची नाही

आरक्षण हे सरसकटच द्यावे, अर्थिक निकषाचा पर्याय पुढे आणू नये

राफेल करारात गुप्तता पाळण्यात लपवालपवीची भूमिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजर्षींना ‘भारतरत्न’ मिळावाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशात सामाजिक सुधारणांचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराज यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, या मागणीने जोर धरला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत मागणी केल्यानंतर देशातील अनेक खासदारांनी याला पाठिंबा दर्शविला. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनीही शाहू महाराजांना भारतरत्न देण्याचा आग्रह धरला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही शाहू-फुले यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणी केल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी केलेले काम संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी होते. आजही त्यांच्या कामाचा आदर्श समोर ठेवून अनेक राज्यांचा कारभार चालतो. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांतील त्यांचे काम दीपस्तंभाप्रमाणे आहे. मागासवर्गीयांना आरक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा देशातील पहिला निर्णय त्यांनी करवीर संस्थानात घेतला. प्रजाहितदक्ष आणि नावीन्याची चाहूल घेऊन राज्य कारभार करणाऱ्या राजर्षींनी स्वातंत्र्यपूर्व काळात सर्व संस्थानांसाठी मार्गदर्शक काम केले. त्यांनी केलेल्या मदतीवरच बहुजनातील अनेकांना शिक्षण मिळाले. भविष्याचा वेध घेणाऱ्या या राजाचा पुतळा लोकसभेच्या प्रांगणात उभा आहे. आता भारतरत्न सन्मानाने त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची मागणी केली जात आहे. खासदार महाडिक यांनी संसदेत मागणी केल्यानंतर अनेक संस्था आणि व्यक्तींना याचा पुनरुच्चार केला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीसुद्धा शनिवारी कोल्हापुरात बोलताना राजर्षींसह महात्मा फुलेंनाही भारतरत्न मिळावा, अशी आग्रही मागणी केली.

देशातील पहिले आरक्षण

राजर्षी शाहू महाराजांनी २६ जून १९०२ रोजी करवीर संस्थानात मागासवर्गीयांसाठी नोकरीत ५० टक्के आरक्षणाची तरतूद केली. त्यांनी गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिले. गुणवत्ताधारक मागासवर्गीयांसाठी पदोन्नतीचीही व्यवस्था केली. वेळोवेळी याचे कायदे करून काटेकोर अंमलबजावणीही केली. जातीय दरी कमी करण्यासाठी त्यांनी दलित आणि सवर्णांच्या मुलांसाठी एकत्रित शाळा सुरू केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही त्यांनी मदत केली. आंबेडकरांच्या माध्यमातून राजर्षींचे विचार देशाच्या घटनेत उतरले.

सक्तीचे व मोफत शिक्षण

२५ जुलै १९१७ रोजी शाहू महाराजांनी करवीर संस्थानचे शैक्षणिक धोरण तयार केले. शिक्षणासाठी देवस्थान फंडातून २० हजार आणि दरबार खजिन्यातून ८० हजार अशी एक लाख रुपयांची तरतूद केली. २६ डिसेंबर १९२१ रोजी त्यांनी करवीर संस्थानात सक्तीचे व मोफत शिक्षण कायदा तयार केला. जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, त्यांच्यासाठी रोज आर्थिक दंडाची व्यवस्थाही केली होती. याशिवाय त्यांनी विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी २८ वसतिगृहे सुरू केली.

शेतीसह व्यापार सुधारणा

शाहू महाराजांनी १८९५ मध्ये शाहूपुरी ही गुळाची व्यापारपेठ सुरू केली. शाहूवाडी, आंबा परिसरात चहा आणि कॉफीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी प्रथमच आपल्या संस्थानात कृषी जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. १९०२ मध्ये पाटबंधारे विषयक धोरण जाहीर केले. १९१२-१३ मध्ये त्यांनी किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. दुष्काळी परिस्थितीत गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी स्वस्त अन्नधान्याची दुकाने सुरू केली. उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २७ सप्टेंबर १९०६ रोजी शाहू छत्रपती स्पिनिंग आणि विव्हिंग मिलची स्थापना केली.

कुस्तीला दिली प्रतिष्ठा

शाहू महाराजांनी मोतीबाग तालीम सुरू केली.· विजेत्यांसह पराभूत मल्लांनाही बक्षीस देण्याची सुरुवात त्यांनीच केली. मागासवर्गीय समाजातील अनेक पैलवान शाहू महाराजांच्या आखाड्यात खेळत. युरोपात गेल्यानंतर त्यांनी खेळाची उत्तम मैदाने पाहिली. कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांनी खासबागेची जागा निवडून तेथे कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कुस्तीला राजाश्रय आणि लोकाश्रयही मिळाला.

महिलांसाठी सुधारणांचा आग्रह

करवीर संस्थानात जुलै १९१७ मध्ये विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. १२ जुलै १९१९ मध्ये कोल्हापुरात विवाहसंबंधी कायदा पास केला. या कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या स्त्रीला विवाहासाठी पिता किंवा पालकांची संमती राहणार नाही. जातीनिर्बंध न पाळता स्त्री कोणत्याही जाती-धर्मातील व्यक्तीशी विवाह करू शकते. विवाह करण्यासाठी स्त्रीचे वय १४ वर्षे व पुरुषाचे १८ वर्षे किमान असले पाहिजे असा कायदा केला.

·सामाजिक सुधारणांचा आग्रह

राजर्षींनी ११ जानेवारी १९११ मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १५ सप्टेंबर १९१८ मध्ये कष्टकऱ्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी कुळकर्णी वतन संपुष्टात आणले. सामाजिक दरी कमी करण्यासाठी सार्वजनिक पाणवठे आणि मंदिरे मागासवर्गीयांसाठी खुली केली. तलाठी पदावर मागासवर्गीयांना प्राधान्य देण्यासाठी २६ ऑगस्ट १९१९ मध्ये निर्णय घेतला. १९२० मध्ये त्यांनी शहरातील पोलिस गेटवर १६ दलितांची नेमणूक केली.

०००००

कोट...

राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी निश्चितच आनंददायी आणि स्वागतार्ह आहे. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान असून, केंद्र व राज्य सरकारने शाहूंनी अमलात आणलेल्या मोफत शिक्षण, सामाजिक सुधारणा, आरक्षण या विषयांवर काम करण्याची गरज आहे.

श्रीमंत शाहू छत्रपती

राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे. त्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरू. तसेच भारतरत्नच्या मागणीसाठी राज्य सरकारकडून योग्य कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

शाहू महाराजांनी सामाजिक एकतेसाठी मोठे योगदान दिले. कोणत्याही पुरस्कारात सीमित होण्यासारखे त्यांचे कार्य नाही. भारतरत्न दिल्याने पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल. त्यांच्या कार्यातून उतराई होण्यासाठी भारतरत्न सन्मान देणे गरजेचे आहे.

धनंजय महाडिक, खासदार

राजर्षी शाहूंना भारतरत्न देणे म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करणे असेच आहे. खरेतर हा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते. या निमित्ताने पुन्हा एकदा शाहू महाराजांचे कार्य देशभर पोहोचेल.

प्रा.डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

खऱ्या अर्थाने शाहू महाराज भारतातील रत्न आहेत. यापूर्वीच त्यांना हा सन्मान मिळणे गरजेचे होते. केंद्र सरकारने तातडीने शाहू महाराजांसह महात्मा फुलेंनाही भारतरत्न सन्मान जाहीर करावा.

प्रा. डॉ. रमेश जाधव

संसदेच्या प्रांगणात शाहू महाराजांचा पुतळा उभा राहणे यावरून त्यांच्या विचारांचे महत्त्व लक्षात येते. भारतरत्न दिल्यास त्यांचे कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल, त्याचबरोबर भारतरत्न या सन्मानाची व्याप्ती वाढेल.

इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधानसभेला के.पी.,जिल्हाध्यक्षपदी ए. वाय.

$
0
0

पवारांनी केला मेहुण्या-पाहुण्यांत समेट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघावरून माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यामध्ये राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी समेट घडविला. या समेटानुसार विधानसभेची उमेदवारी के. पी. पाटील यांना तर ए. वाय. पाटील यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

गेल्या काही वर्षात राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून माजी आमदार के. पी पाटील आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. उमेदवारीसाठी आग्रही असलेले ए. वाय. यांना वरिष्ठ नेत्यांकडून शब्द मिळत नसल्याने अधून-मधून ते भाजपवासी होण्याचे वृत्त चर्चेत येते. जानेवारी महिन्यापासून पवार यांनी तीनवेळा जिल्हा दौरा केला असला, तरी यामध्ये मेहुण्या-पाहुण्यामध्ये समेट घडवून आणण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. आज मात्र यावर त्यांनी समेट घडवून आणला. पवार यांनी बंद खोलीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी माजी खासदार निवेदिता मानेही उपस्थित होत्या. पवार यांनी ए. वाय. यांना सबुरीची सल्ला देताना जिल्हाध्यक्षपद कायम राहील, असे सांगत राधानगरी-भुदरगड विधानसभेसाठी के. पी. असतील, असे स्पष्ट केल्याचे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांने सांगितले. पवारांच्या या समेटामुळे के. पी. याचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी हा समेट ए. वाय. यांच्या कितपत पचनी पडतो, याबाबत आता राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागली आहे.

माजी आमदार भोईटे यांच्या प्रकृतीची चौकशी

माजी आमदार नामदेवराव भोईटे काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले आहेत. याबाबतची माहिती मिळताच पक्षाध्यक्ष पवार यांनी त्यांची तेथे जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगप्रकरणीदोघांवर गुन्हा

$
0
0

कोल्हापूर : येथील सुभाषनगरमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या एका विवाहितेस अव्वाच्च शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी रविवारी राजारामपुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. संजय दत्तात्रय गवळी (वय ३५), सचिन दत्तात्रय गवळी (३०, दोघे रा. साई मंदिरजवळ, सुभाषनगर) असे संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, किरकोळ कारणावरून रविवारी दुपारी साडेतीन वाजता त्या विवाहितेस अर्वाच्य शिवीगाळ केली. त्याला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला. विवाहितेच्या फिर्यादीनंतर दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनाला भेटीचे नाटक कशाला?

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

हातकणंगले येथे तहसीलदार कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या खासदार राजू शेट्टी यांना संतप्त आंदोलकांनी 'चले जाव'च्या घोषणाबाजीने व शंखध्वनी करून अक्षरश: हाकलून लावले. आम्हाला तुमची सहानुभूती नको, समाजाच्या कार्यक्रमास जाताना मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनास भेट देण्याचे नाटक कशाला करता? असे चांगलेच सुनावले. संतप्त आंदोलकांच्या तीव्र भावना समजून शेट्टी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळावरून काढता पाय घेतला.

दरम्यान, हातकणंगले येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाकडे लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्यांच्याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे सोमवारी खासदार व आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहेत. रविवारी स्वतः खासदार शेट्टीच अचानक आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या संतप्त भावनांचा उद्रेक झाला.

रविवारी सकाळी एका कार्यक्रमाला जाण्यासाठी खासदार शेट्टी हातकणंगले येथे आले होते. जाता जाता मराठा समाजातील आंदोलकांना भेटून पाठिंबा देण्यासाठी खासदार शेट्टी आले असता त्यांना पाहून आंदोलकांनी शंखध्वनी करून जय भवानी-जय शिवाजी, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे यासह 'राजू शेट्टी चले जाव' च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला तसेच मराठ्यांना तुमची सहानभूती नको आहे, जाता जाता भेट देण्याचे नाटक कशाला करता, आमच्या आरक्षणाचा प्रश्‍न मांडण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहात, तुम्हाला निवडून दिले ही आमची चूक झाली काय? आरक्षणास पाठिंबाच द्यायचा असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या, अन्यथा यापुढे भागात फिरकू नका, असे सुनावत आंदोलकांनी त्यांना अक्षरश: पिटाळून लावले.

यावेळी शेट्टींसोबत आलेल्या वैभव कांबळे, अनिल पाटील, प्रवीण जनगोंड, आदींसह उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. संतप्त कार्यकर्त्यांचा रोष पाहून त्यांनी तत्काळ आंदोलनस्थळावरून काढता पाय घेतला. यामुळे तहसीलदार कार्यालयासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

०००००

चौकट...

मराठा समाजासाठी काय केले?

खासदार शेट्टी आंदोलनस्थळी आल्यानंतर आंदोलकांचा पारा चांगलाच चढल्याचे दिसून आले. आंदोलकांनी शेट्टींना उद्देशून, आता पाठिंबा देत आहात, गेल्या दहा वर्षांत मराठा समाजासाठी काय केले हे जाहीर करा तसेच आरक्षणासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत त्यामुळे मराठा समाजाने तुम्हाला मते देऊन मोठी चूक केल्याचे सांगून चांगलेच फैलावर घेतले. यामुळे खासदार शेट्टींना काहीही बोलणे सुचले नाही.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाख नागरिक घेणार अभिवचन शपथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशात धर्मांध शक्ती वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे सर्वच थरात दहशतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर समतावादी विचारांच्या लोकांनी एकत्र येत धर्मांधतेला विरोध करण्याची गरज आहे. जातीयवादी सरकारला खाली खेचण्यासाठी २८ नोव्हेंबरला कोल्हापुरातील गांधी मैदानावर १ लाख लोकांच्या उपस्थितीत अभिवचन शपथ घेण्यात येणार आहे' अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी दिली. समतावादी संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीत शाहू स्मारक भवन येथे रविवारी ते बोलत होते.

भारत पाटणकर म्हणाले, 'सध्या जाती घट्ट करण्यासाठी काही शक्ती जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. जाती एकमेकांच्या विरोधात उभा राहण्यासाठी त्यांच्यात दुरावा निर्माण केला जात आहे. धर्माच्या नावाखाली राजकारण केले जात असून त्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे. गेले कित्येक दशके गुण्यागोविंदाने राहणाऱ्या जाती एकमेकांविरोधात उभ्या राहत आहेत. सध्याचे समाजाचे चित्र विदारक असून समतेच्या वाटेवर चालणाऱ्या लोकांनी एकत्र येत समाजात दुही माजणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. यासाठी सर्व जाती, धर्मातील लोकांनी एकत्र येत आम्ही भारतीय असल्याची जाणीव मजबूत करणे गरजेचे आहे.'

दरम्यान, महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त २८ नोव्हेंबरला होणाऱ्या राज्यव्यापी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शाहू स्मारक भवन येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर, खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, संपतबापू पाटील, भालचंद्र कांगो उपस्थित राहणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीला सहनिमंत्रक अनिल म्हमाणे, सामाजिक कार्यकर्त्या गेल ऑम्वेट, प्रा. पी. एन. पाटील, संपत देसाई, मोहनराव यादव, कमलाकर सारंग, आनंदराव पाटील, डी. के. बोडके, मारुती पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बचत गटांसाठी विक्री केंद्रे

$
0
0

जिल्हाधिकारी सुभेदार यांची माहिती

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी विक्री केंद्रे सुरु करण्याचे नियोजन आहे. सात तालुका विक्री केंद्रांची उभारणी पूर्ण झाली आहे. तिथे विक्री केंद्रे सुरू होतील', असे आश्वासन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत नाबार्डच्या ई शक्ती कार्यक्रम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनी व्यवसाय, उद्योगाचे जाळे निर्माण केले आहे. त्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जात आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा, विभागीय, राज्यस्तरावर प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.'

बँक ऑफ इंडियाचे विजय परळीकर, पुणे नाबार्डचे उपमहाप्रबंधक श्रीनिवासूलू यांचे यावेळी भाषण झाले. नाबार्डच्या ई शक्तीच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १६ महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना धनादेश, कर्ज मंजुरीच्या आदेशाचे वितरण करण्यात आले. बाळासाहेब झिंगाडे यांनी ई शक्ती उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे आदींची उपस्थिती होती. नाबार्डचे सहायक महाप्रबंधक नंदू नाईक यांनी प्रास्ताविक केले. मृणाल हुदली यांनी सूत्रसंचालन केले. लेखाधिकारी विनायक कुलकर्णी यांनी आभार मानले.

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा चळवळीला बदनाम करू नका: चव्हाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'पुरावे असतील तर उघड करा, बेताल वक्तव्ये करून मराठा चळवळीला बदनामी करू नका, पंढरपूरच्या वारीत कोण साप सोडणार होते, हे कळू द्या. आत्मविश्वास गमावलेले मुख्यमंत्री पंढरपूरला जावू शकत नाहीत. सांगलीत प्रचाराला येऊ शकत नाही. तेच स्वतःला असुरक्षित समजत असतील, राज्यात कायद्याचे राज्य उरले आहे का,' असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी एक ऑगस्ट रोजी मतदान होत असून, अखेरच्या टप्प्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दिग्गज नेत्यांची फळी प्रचारात उतरविली आहे. आज, सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले, 'थोर वारसा लाभलेल्या या सांगलीत कॉंग्रेसची आणि त्यानंतर राष्ट्रवादीची पाळेमुळे रुजलेली आहेत. केलेली कामे जनतेसमोर ठेवून, भविष्यातील सुंदर सांगलीच्या दृष्टीने काय करणार याचा जाहीरनामा घेऊन आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहे. जातीयवादी आणि सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून अपयशी ठरलेल्या दोन्ही सरकारे सत्तेवरुन पायउतार झाली पाहिजेत, यासाठी सांगली महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसने आघाडी केलेली आहे. राज्याच्या पातळीवरही आघाडीबाबत सकारात्मकता आहे. इतर समविचारी पक्षांनाही बरोबर घेतले जाणार आहे. २०१४च्या निवडणुकीत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा सवाल करणाऱ्यांनीच आता चार वर्षानंतर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आणि आमची सांगली, याचे उत्तर दिले पाहिजे. सांगलीत आघाडीला उत्तम प्रतिसाद आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमताच्याही पुढे नेणारे आमचे सदस्य निवडून येतील.'

वेळ मारून नेण्याचा सरकारचा उद्देश

सत्ताधारी भाजपचे मुख्यमंत्री सांगलीत येऊ शकत नाहीत. आता ते नेहमीचा ट्विटर, फेसबुक आणि व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून प्रचार फंडा वापरतील. प्रत्यक्ष जनतेशी ते संवाद साधू शकत नाही, हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला शोभनीय नाही. मुख्यमंत्रीच स्वतःला असुरक्षित समजत असतील सर्वसामान्यांनी कोणाकडून संरक्षणाची अपेक्षा करायची. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे का? सध्या केवळ मराठा समाजच नाहीतर सर्वच समाजातील सुशिक्षित बेरोजगार अस्वस्थ आहे. त्यामुळेच आजची परिस्थिती तणावाची आहे. आरक्षणाच्या बाबतीत निव्वळ वेळकाढूपणा सुरू आहे. इतका काळ मागासवर्गीय आयोग आठवला नाही. राणे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी नाही. आयोगाच्या अहवालाचे नाव घेऊन पुन्हा वेळ मारून नेण्याचा उद्देश सरकारचा आहे. हा लोकांच्या भावनांशी खेळण्यातला प्रकार आहे. सरकार पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांना चोपून काढत आहे. सरकारने आंदोलनाच्या कालावधीत दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. अस्तित्वात असलेल्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर, मुस्लिमांना आरक्षण दिले पाहिजे. आरक्षण देण्याच्या नावाखाली अपप्रचार होणार नाही, याची काळजी घ्यावी. लोकांना आता चर्चेचे गुऱ्हाळ नको आहे, असेही चव्हाण म्हणाले.

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला तोंड फोडणाऱ्या शिवसेनेतील निष्ठावानांनी राजीनामा दिला तर कोणत्याही क्षणी सरकार कोसळणार आहे. मुख्यमंत्र्यांची जात नव्हे तर तो महाराष्ट्राच्या हिताचा आहे की नाही, इतकेच पाहिले जाते. आतापर्यंत विविध जातीधर्मातील व्यक्तींनी मुख्यमंत्रिपद सक्षमपणे सांभाळले आहे. त्यामुळे कोणी शंका घेण्याचे कारण नाही. परंतु, सामाजिक विषमता पेरू पहात असेल, तर मात्र ते आम्ही खपवून घेणार नाही.

अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

महपालिकेतील जनतेचे आघाडीला समर्थन आहे. जातीयवादी पक्षाला या ठिकाणची जनता थारा देणार नाही. महापालिकेत ७८ पैकी आघाडीचे ६० पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील. विकासाच्या नव्या कल्पना घेऊन जाताना सांगली सक्षम करण्याचे आम्ही ठरविले आहे. नाराजींतून निवडणुकीत उतरलेल्या अपक्षांकडे जनता दुर्लक्ष करीत आहे. सताधारी दादागिरीचा, बळाचा, सत्तेचा वापर करण्याची शक्यता आहे. परंतु, अशांना लोक थारा देणार नाहीत. शेवटच्या दोन दिवसांतील प्रचारांचे प्रकार आत्मसात करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामध्ये गैर असलेल्या गोष्टींना आळा घालण्याची लेखी मागणी आम्ही निवडणूक प्रशासनाकडे केलेली आहे.

जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मवीरांचे ऐतवडे उपेक्षितच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात शाळा सुरू करून बहुजन समाजाला शिक्षित करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला जून २०१९ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. कर्मवीर अण्णांचे जन्मगाव कुंभोज सर्वपरिचित आहे. मात्र, सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक हे अण्णांचे मूळ गाव असूनही प्रसिद्धीत आले नाही. ग्रामस्थांनी ऐतवडे बुद्रुकमध्ये अण्णांचे भव्यदिव्य स्मारक उभारावे अशी मागणी केली आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म आजोळी कुंभोज (ता. हातकणंगले) येथे झाला. त्यामुळे राज्यभर तेच त्यांचे गाव असा समज आहे. प्रत्यक्षात अण्णांचे ऐतवडे बुद्रुक गाव प्रसिद्धीपासून दूरच आहे. तुलनेने हे गाव विकासापासूनही वंचित आहे. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागातही शाळा सुरू करून बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. स्वातंत्र्यपूर्वकाळात बहुजन समाजासाठी इतके मोठे कार्य करणाऱ्या अण्णांचे मूळ गाव अद्यापही विकासापासून वंचित आहे.

कर्मवीर अण्णांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेला पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेचे औचित्य साधून सरकारने अण्णांच्या मूळ गावी ऐतवडे बुद्रुक येथे त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभारावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या सभेत तसा असा ठराव केला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने राज्यातील सर्व आमदारांना, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाशी पत्रव्यवहार करून अण्णांचे स्मारक व्हावे अशी मागणी करण्यात येणार आहे.

सध्या ऐतवडे बुद्रुकमध्ये प्रवेश केल्यावर मुख्य चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अर्धपुतळा आहे. तत्कालीन सरपंच बाबासाहेब पाटील यांनी १९७० साली लोकवर्गणीतून तो उभारला. त्यानंतर पतंगराव कदम सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी दिलेल्या नऊ लाख रुपये निधीतून या पुतळ्याचे सुशोभीकरण केले. अण्णांच्या स्मारकासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गावात स्मारक उभारताना त्या स्मारकात अण्णांचा पूर्णाकृती पुतळा, त्यांचा जीवनपट उलघडेल अशी शिल्पसृष्टी, सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, अत्याधुनिक व्यायामशाळा, प्रशस्त सभागृह आणि सुंदर बगीचा असावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

ऐतवडे बुद्रुकनजीक कुरळप, लाडेगाव आणि करंजवडे या गावांच्या मध्यावर रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. या व्यतिरिक्त अण्णांचे गाव म्हणून रयत शिक्षण संस्थेची दुसरी कोणतीही ओळख तिथे अस्तित्वात नाही. त्यांच्या गावी भव्यदिव्य स्मारक उभारून अण्णांचा गाव म्हणून ऐतवडे बुद्रुकला राज्यात ओळखले जावे अशी व्यवस्था करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे.

०००००

कर्मवीर अण्णांचे गाव म्हणून ऐतवडे बुद्रुक राज्याच्या कानाकोपऱ्यात लोकांना माहीत व्हावे असे त्यांचे भव्य दिव्य स्मारक सरकारने उभारावे अशी ग्रामपंचायतीतर्फे मागणी केली आहे. राज्यातील सर्व आमदार, मंत्रिमंडळाला याबाबत लेखी निवेदन पाठविण्याचे काम सुरू आहे. अनेक मंत्री आणि आमदारांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून स्मारकाबाबत विनंती केली आहे. गावात प्रवेश करताना मुख्य रस्त्यालगत असलेल्या सरकारी मोकळ्या जागेवर स्मारक उभारणे शक्य आहे. कोणत्याची पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी यात राजकारण न आणता अण्णांच्या स्मारकाचे काम करावे.

सौरभ पाटील, उपसरपंच, ऐतवडे बुद्रुक

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रास्ता रोको, मोटारसायकल रॅलीने आरक्षणाची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षण मागणीसाठी गावागावात आज रविवारी काही ठिकाणी बंद पाळून तर शहरात मोटारसायकल, रिक्षा रॅली काढण्यात आली. संयुक्त जुना बुधवार पेठेत शिवाजी पुलावर रास्ता रोको आंदोलन केल्याने काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली. दसरा चौकात सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला ३० हून अधिक सामाजिक संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला.

रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवाजी पूल येथे संयुक्त जुना बुधवार पेठेतील कार्यकर्ते एकत्र आले. 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे' अशा घोषणा देत त्यांनी शिवाजी पुलावर रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. अचानक झालेल्या आंदोलनामुळे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आंदोलनस्थळी आले. त्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याची मागणी केली. पण कार्यकर्ते जागेवरून हलले नाहीत. अखेर अर्धा तासानंतर नागरिकांना होणार त्रास लक्षात घेऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, सुशिल भांदिगिरे, उदय भोसले, अनिल निकम, पृथ्वीराज मोरे, दीपक देसाई, पिंटू स्वामी, शेखर राणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दसरा चौकातील ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दिवसभर विविध संघटनांची रिघ लागली. करवीर तालुक्यातील वडणगे, वरणगे पाडळी ग्रामस्थांनी चालत दसरा चौकात येऊन ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. मराठा रणरागिणी संघटनेच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात प्रतिमा पाटील, माजी महापौर सई खराडे, संगीता खाडे, दीपा पाटील, अॅड. चारुलता चव्हाण, सीमा पाटील यांच्यासह महिला सहभागी झाल्या. सरकारच्या निषेधार्थ महिलांनी काळ्या साड्या परिधान केल्या होत्या.

महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रिक्षा रॅली काढली. निवृत्ती चौकातून रॅलीला सुरुवात झाली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, हत्तीमहल रोड, आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नरमार्गे दसरा चौकात रॅलीची सांगता झाली. रॅलीत सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, मोहन बागडी, वसंत पाटील यांच्यासह रिक्षाचालक सहभागी झाले.

फुलेवाडीतील युवकांनी नगरसेवक राहुल माने यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा दिला. भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते सहभागी होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीच्या घोषणांनी दसरा चौक दुमदुमला.

यांचा आंदोलनाला पाठिंबा

कोल्हापूर लिंगायत तेली समाज, जिल्हा परीट समाज, जिल्हा कोष्टी समाज, जिल्हा बैतुलमाल कमिटी, एस फोर विकास आघाडी, फार्मा मराठा, महाराष्ट्र हायस्कूल माजी विद्यार्थी दहावी १९९५ बॅच, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट स्पोर्टस्, पेरेंट्स असोसिएशन, प्रॅक्टिस क्लब, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समिती, पाडळी ग्रामस्थ, जिल्हा सुतार लोहार समाज, भारतीय सिंधू संस्था गांधीनगर, जांबाज प्रणित एएफ ग्रुप सदरबाजार, जयभवानी सहकारी दूध संस्था पाडळी बुद्रुक, शिवसाई सहकारी पतसंस्था वरणगे पाडळी, छत्रपती शाहू सहकारी पतसंस्था वरणगे पाडळी, सिटिझन फोरम, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ, चर्मकार समाज, मराठा बँक माजी कर्मचारी संघटना, जिल्हा रेणुका भक्त संघटना.

राज्य राखीव दल परतले

आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अचानक रविवारी दुपारी राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी दसरा चौकात आली. पण व्यासपीठावरुन आंदोलनाचे संयोजक दिलीप देसाई व जयकुमार शिंदे यांनी कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नसल्याचे सांगत राज्य राखीव पोलिस दलाने माघारी जावे, अशी विनंती केली. ही तुकडी दसरा चौकात आली असा चुकीचा संदेश सोशल मीडियावरून जाऊ शकतो, असे पोलिस अधिकाऱ्यांना पटवून दिल्यानंतर तुकडी माघारी परतली.

खासदार शेट्टी, बार असोसिएशनचा आज सहभाग

सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी खासदार राजू शेट्टी येणार आहेत. जिल्हा बार असोसिएश्नच्यावतीने सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले जाईल. त्यामध्ये जिल्ह्यातील वकील सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गवार, दोडका महागला

$
0
0

दोडका, गवार महागली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाने दिलेली उघडीप आणि मालवाहतुकदारांचा संप मिटल्याने मंडईत भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. भाजांचे दर स्थिर असले तरी दोडका, गवारीचे दर प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढले. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून प्रतिकिलो २० रुपये असा दर होता.

मालवाहतुकदारांच्या संपामुळे गेले आठवडाभर मंडईत भाजीपाल्याची आवक कमी होती. मार्केट यार्डात वाहने रोखल्याने भाजीमंडईत कांदा, बटाट्याचा पुरवठा कमी असल्याने थोडी दरवाढ झाली होती. पण शुक्रवारी (ता. २७ जुलै) रात्री वाहतुकदारांनी संप मागे घेतल्याने रविवारी मंडई भाजीपाल्याने गच्च भरली होती. कांदा २५ ते ३० रुपये किलो, तर बटाट्याचा दर ४० रुपयांवर पोहोचला होता. आज बाजारात बटाट्याचा दर २५ ते ३० रुपयांपर्यंत आला होता. दोडका व गवारीचा दर ८० रुपयांपर्यंत पोहोचला. गेले आठवडाभर टोमॅटो गायब असल्याची स्थिती होती. रविवारी मंडई टोमॅटोची मोठी आवक झाल्याने २० रुपये प्रतिकिलो दर झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. बाजारातून पोकळा गायब झाला असला तरी मेथी, शेपूची आवक झाली. मात्र प्रति पेंडी १० रुपये असा दर होता. कांदापातीचा दर १० ते १५ रुपये प्रति पेंडी होता. घेवडा, वाटाणा, वांगी, वरणा, भेंडीची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने दर स्थिर राहिले. कोबी गड्डा १० ते ३० रुपये तर फ्लॉवर गड्डा १५ ते ४० रुपये इतका होता.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

वांगी ६० ते ८०

टोमॅटो २०

भेंडी ५० ते ६०

ढबू मिरची ६० ते ७०

गवार ८० ते १००

दोडका ६० ते ८०

कारली ६०

वरणा ४० ते ६०

ओली मिरची ४० ते ६०

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

घेवडा ४० ते ६०

फ्लॉवर १५ ते ४० (नग)

कोबी १० ते ३० (नग)

पालेभाजी दर (पेंडी, रुपयांत)

मेथी १०

शेपू १० ते १५

करडई १० ते १५

कांदा पात १० ते १५

फळांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

सफरंचद १५० ते १८०

डाळिंब २० ते ६०

पपई ३५ ते ४० (नग)

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी ३० ते ७० (डझन)

अननस १५ ते ३० (नग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरीच्या वारीसाठी गाताडेची मोदींना सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून तमाम भारतवासीयांना 'पंढरीची वारी एकदा अनुभवावी' असे आवाहन केले. वारीची महती सांगण्यासाठी मंगळवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाचे कार्यकर्ते संतोष गाताडे यांनी मोदींना सूचना केली होती.

'मन की बात' मध्ये देशातील विविध समस्या, उपाय व अन्य विषयांवर सूचना पाठविण्यासाठी आवाहन केले जाते. गाताडे यांनी 'नमो अॅप'वर सोमवारी (ता.२३) आषाढी एकादशीदिवशी वारीची महती मोदींनी देशवासीयांना सांगावी अशी सूचना केली होती. रविवारी 'मन की बात'चे प्रदर्शन आकाशवाणी व दूरदर्शनवर झाले. त्यामध्ये पंढरीच्या वारीचे महत्त्व सांगण्याची सूचना केल्याबद्दल मोदींनी गाताडे यांचे 'धन्यवाद संतोषजी' अशी सुरुवात करून वारीची माहिती दिली. मोदींनी नऊ मिनिटे पंढरपूरचे माहात्म्य, संतांची समतेची परंपरा याविषयी माहिती सांगून 'पंढरीची वारी एकदा अनुभवावी' असे आवाहन केले. 'मन की बात' हा कार्यक्रम थेट ऐकता आला नाही, अशी खंत गाताडे यांनी व्यक्त केली. मित्रांनी यू ट्यूटचा व्हिडीओ पाठविल्यानंतर आपल्याला माहिती कळाली. त्यामुळे खूप आनंद वाटल्याचे त्यांनी सांगितले. गाताडे हे मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लब परिसरात राहतात. त्यांनी कॉमर्स कॉलेजमध्ये बी. कॉम.ची पदवी घेतली असून, त्यांचे कपिलतीर्थ मार्केटमध्ये किराणा मालाचे दुकान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते कार्यरत असून, कसबा गेटजवळील महावीर सेवाधामद्वारे ते सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. ते गोंदवले ते म्हसवड अशी पंढरीची वारी करतात. शिवाजी विद्यापीठ ग्रुपमधील त्यांचे ४० सहकारी वारीत सहभागी झाले होते. वारीचा अनुभव अवर्णनीय व मनशांती देणारा, समतेची शिकवण देणारा असल्याने आपण मोदींना सूचना केली होती, असे गाताडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी दिल्ली हादरवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांची शपथ घेऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी खासदारकी पणाला लावण्याची घोषणा केली. 'मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर दिल्ली हादरवली नाही तर माझे नाव सांगणार नाही', असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. दसरा चौकात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला संभाजीराजे यांनी रविवारी पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी संभाजीराजे बोलत होते.

खासदार संभाजीराजे म्हणाले, 'मराठा समाजातील कार्यकर्ते गुन्हेगार नसून लढवय्ये आहेत. आरक्षणाची मागणी न्यायाची असल्याने आंदोलन काळात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले राज्य सरकारने गुन्हे मागे घ्यावेत. आरक्षणप्रश्नी सरकारने आयोजित केलेल्या एकदिवशी अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीत उपस्थित राहण्यासाठी मराठा समाजातील अभ्यासक, तज्ज्ञ, आंदोलनातील प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारने आमंत्रित करावे.'

खासदार संभाजीराजे म्हणाले, '२००९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकारण सोडून समाजकारण करण्याचे ठरवले. राज्यात आणि देशात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांनी भेट दिली, त्या ठिकाणांना भेट दिली. यावेळी मराठा समाजाची आर्थिक स्थिती लक्षात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले तर राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये मराठा समाजासह मागास जातींना आरक्षण दिले. जर शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले असेल राज्य सरकारनेही मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी २०१३ मध्ये मुंबईत मोर्चा काढला. मराठा समाज आरक्षण मागणीसाठी शांततेत, शिस्तबद्धपणे काढलेल्या ५६ मोर्चांचे देशाने व जगाने कौतुक केले. २०१७ मध्ये मुंबईतील मराठा मोर्चानंतर सरकारबरोबर झालेल्या चर्चेत सत्ताधारी, विरोधकांबरोबर मराठा क्रांती मोर्चातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते. पण सरकारच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी मला पाठवण्यात आले. यावेळी मी मराठा समाजाचे नेतृत्व करायला गेलो नव्हतो तर सरकारचा निरोप देण्याचे काम केले.'

'राज्यसभेत खासदार म्हणून काम करताना मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले. कोपर्डी घटनेचा प्रश्न सर्वप्रथम मी उपस्थित केला' असा दावा संभाजीराजे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांचा विचार देशातील सर्व पक्षांच्या खासदारांपुढे मांडत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सर्वपक्षीय खासदारांना एकत्र आणून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र केले. मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे, उदयनराजे यांनी नेतृत्व करावे, अशी मागणी पुढे येत आहे. पण यापुढे आरक्षणप्रश्नी नेतृत्व मराठा समाजातील जनता करेल', असे संभाजीराजे म्हणाले.

राजे तुम्ही तोंडघशी पडताय...

'२०१७ मध्ये मुंबईतील मराठा क्रांती मोर्चानंतर सरकारचा निर्णय सांगण्यासाठी मोर्चाला सामोरे जाण्यास एकही नेता तयार झाला नाही. मला मोर्चाला सामोरे जाण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी मी प्रचंड घाबरलो होते. सरकारचा निर्णय मी तेथे सांगितला. पण त्यानंतर मराठा क्रांती मोर्चातील राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी 'राजे तुम्ही तोंडघशी पडला आहात', असे सांगितले. हा अनुभव लक्षात घेऊन सरकारच्या यापुढील कोणत्याही बैठकीला मी एकटा जाणार नाही' असे संभाजीराजे यांनी सांगितले. सरकारशी चर्चा करताना मराठा संघटनाच्या सर्व प्रतिनिधींच्या मागे राहिन. समाजानेच नेतृत्व करावे, अशी माझी धारणा आहे' असे संभाजीराजे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथांचे मंगळवारी प्रकाशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्याची महती सांगणाऱ्या कागदपत्रे कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाने जतन केली आहेत. संस्थानातील विविध कार्यक्रम आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या कोल्हापूर संस्थानच्या भेटीच्या प्रसंगी राजाराम महाराजांनी केलेल्या भाषणांचे संकलन करुन 'छत्रपती राजाराम महाराजांचे विचार' या ग्रंथांची निर्मिती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ३१) सह्याद्री अतिथी गृह येथे ग्रंथाचा प्रकाशन वितरण सोहळा आहे. राजाराम महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी प्रकाशन सोहळा होत आहे. कोल्हापूर पुरालेखागारामार्फत 'छत्रपती राजाराम महाराजांचे निवडक आदेश भाग एक व दोन' या खंडाचे प्रकाशन केले आहे. आता राजाराम महाराजांनी केलेल्या निवडक ४६ भाषणांचे संकलन करुन नवा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, 'म्हाडा'पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित राहतील अशी माहिती कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाचे सहायक संचालक केशव जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images