Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मंगळवारी अंबाबाईला साकडे घालणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सुबद्धी द्यावी, यासाठी करवीरनिवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी कोल्हापूर बंदची घोषणाही त्यांनी केली. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरमध्ये झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरेश पाटील म्हणाले, 'सरकारने गेल्या वर्षभरात मराठा समाजाला सोयी-सवलती देण्यासाठी सात अध्यादेश काढले. पण त्याची प्रभावी अंमलबजावणी केली नाही. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के फीमध्ये सवलत मिळेल असा आदेश काढला. पण, त्याचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना झाला नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला राज्य सरकारने ४०० कोटी रुपयांचा निधी दिला. महामंडळाकडे १० हजा ५०० लोकांनी आर्थिक मदतीची मागणी केली. त्यातील १५५ जणांना मदत मिळाली. त्यामध्ये मराठा समाजातील फक्त १२ नागरिकांना मदत मिळाली. हा सरकारी आदेश काढताना मराठा समाजाला कर्जच मिळू नये इतक्या जाचक अटी घातल्या आहेत', असा आरोप पाटील यांनी केला.

'मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली असली तरी या आयोगाला काम करता येऊ नये यासाठी कार्यालयासाठी मोठी जागा न देणे, पुरेसा स्टाफ न देणे असे प्रकार सरकारने केले आहेत. मराठा समाजाला गृहित धरण्याचे सरकारचे धोरण असल्याने, समाजाला आरक्षण मिळत नसल्याने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे' असे पाटील म्हणाले.

माजी आमदार सुरेश साळोखे म्हणाले, 'समाजाने यापूर्वी शांततेत व सनदशीर मार्गाने आंदोलने केली. आता राज्य सरकारने आमचा अंत पाहू नये. मन आणि मनगट घट्ट असल्याने समाज आता आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी. आरक्षण देता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा.'

महापौर शोभा बोंद्रे व माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष परेश भोसले, शहराध्यक्ष राहुल इंगवले, युवाध्यक्ष मोहन मालवणकर, बाबा महाडिक, श्रीकांत भोसले, भारत पाटील, मोहन साळोखे, आबा जगदाळे, राजू सावंत, अशोक नाईक, अमोल कल्याणकर, भारत तोडकर, संजय पाटील, संजय कुदळे, शिवसेना रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात दोन मटका अड्ड्यांवर छापे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजाराम रोडवर उमा टॉकीज चौक परिसरातील ओढ्यावरील गणपती मंदिर परिसर आणि राजारामपुरी शाळा क्रमांक नऊ परिसरात शुक्रवारी पोलिसांनी मटका अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यात ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या दोन ठिकाणी मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार दोन स्वतंत्र पथकांनी कारवाई केली. ओढ्यावरील गणपती मंदिर परिसरात टाकलेल्या छाप्यात साईकुणाल सुनील जाधव (वय २४, रा. पुष्पराज अपार्टमेंट, उमा टॉकीज परिसर) याला अटक केली. अड्ड्याचा मालक राजू बन्ने (रा. शिवाजी पेठ) याच्या सांगण्यावरून जाधव मटका घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून रोख रक्कम, मटक्याच्या चिठ्ठ्या असा अडीच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. दुसरा छापा राजारामपुरी शाळा नंबर नऊ परिसरात टाकण्यात आला. येथे यापूर्वीही मटका सुरू असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली होती. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार परिसरात छापा टाकण्यात आला. येथे अजित महादेव चौगुले (वय २०, रा. दत्त मंदिर रोड, राजेंद्रनगर) याला अटक केली. तो नितीन कांबळे (रा. राजेंद्रनगर) याच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. येथे दीड हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेलिस्कोप आणि स्क्रिनवर पाहिले कोल्हापुरात चंद्रग्रहण

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण कोल्हापुरातून खगोलप्रेमींनी टेलिस्कोप आणि स्क्रीनवर पाहिले. नागाळा पार्कातील विवेकानंद कॉलेजमध्ये विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्क्रीनवर चंद्राच्या विविध छटा पाहण्यात आल्या. रात्री १० वाजून ४६ मिनिटे ३६ सेकंदांनी चंद्रग्रहणाची सुरुवात झाली.

रात्री काही वेळ ढगाळ वातावरण असल्याने चंद्रग्रहण टेलिस्कोपमधून दिसले नाही. मात्र, ढगाळ वातावरणातही चंद्रग्रहण पाहण्यासाठी कॉलेजमध्ये असलेल्या विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्क्रीनवर विविध छटा विद्यार्थ्यांनी पाहिल्या. यावेळी कॉलेजचे पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी चंद्रग्रहणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विवेक वाहिनीतर्फे टेलिस्कोपमधून चंद्रग्रहण उपस्थितांना दाखविण्यात आले. किरण गवळी, वैभव राऊत, यश आंबोळे यांनी चंद्रग्रहणाबाबतची अंधश्रद्धा, गैरसमजाची माहिती सांगितली. डॉ. अनमोल कोठाडिया, रमेश वडणगेकर, म्हेत्रे, अभिषेक मिठारी, कृष्णात कोरे, राजवैभव कांबळे यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक दुरुस्तीसाठी रेल्वेच्या वेळेत बदल

0
0

कोल्हापूर : सातारा ते पुणे या रेल्वेमार्गावर ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे पुणे ते सातारा मार्गावरून पुढे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. एक ते ३१ ऑगस्ट दरम्यान काम सुरू राहणार असल्याने संपूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल राहणार आहे. कोल्हापूर-पुणे पॅसेंजर ही रेल्वे आळंदी ते पुणे दरम्यान किमान दीड तास थांबणार आहे. हबीबगंज-धारवाड साप्ताहिक रेल्वे शनिवारी पुणे ते आळंदी दरम्यान एक तास थांबणार आहे. धारवाड-हबीबगंज रेल्वे रविवारी सातारा ते शिंदावणे दरम्यान दीड तास थांबणार आहे. पनवेल-नांदेड एक्सप्रेस रविवारी पुणे ते पाटसदरम्यान दीड तास थांबेल. अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस सोमवारी, तसेच श्रीगंगानगर-तिरुचिरापल्ली एक्सप्रेस बुधवारी पुणे ते वाल्हा दरम्यान १५ मिनिटांसाठी थांबणार असल्याची माहिती रेल्वेचे पुणे मंडल अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आंदोलन: 'सत्ताधाऱ्यांनी आगीत तेल ओतलं'

0
0

कोल्हापूर:

शंभर दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेल्या राज्यातील भाजप सरकारने चार वर्षे झाली तरी काहीच केले नाही. उलट आंदोलनाबाबत उलटसुलट विधाने करत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी आगीत तेल ओतले. यामुळेच आंदोलन चिघळले, अशी टीका करतानाच राज्य घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्या, असा सल्ला माजी केंद्रिय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजपला दिला. यावेळी आर्थिक निकषावर आरक्षण देण्यास त्यांनी विरोध केला.

शरद पवार दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी शनिवारी कोल्हापुरात आले होते. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यसरकारवर जोरदार हल्ला चढवला.मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने घेतला. त्याची अमंलबजावणी केली. पण त्या विरोधात काहींनी कोर्टात धाव घेतल्याने तो निर्णय कोर्टाने रद्द केला. नंतर निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे पुढील कार्यवाही करण्यात मर्यादा आल्या. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू, शंभर दिवसात मराठा समाजाला आरक्षण देवू, असे आश्वासन असं आश्वासन देत भाजप सत्तेत आला. नवीन सरकार तातडीने काहीतरी करेल असे वाटत होते, पण चार वर्षे झाली तरी काहीही केले नाही. राज्यभर इतके मोर्चे निघाले, तरीही सरकारने काहीच केले नाही. यामुळे तरूण पिढीत अस्वस्थता निर्माण झाली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

आगीत तेल ओतले

शांततेत आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी बेफाम विधाने करत आगीत तेल ओतले, असा आरोप करतानाच अशा प्रकारच्या विधानामुळेच आंदोलन चिघळत आहे. यामुळेच राज्याचे नुकसान होत आहे. वारीत साप सोडतील, त्यामुळे वेगळं काही तरी घडेल, आंदोलनात समाजकंटक घुसलेत, अशा प्रकारची विधाने केली गेली. यामुळे संताप वाढला, अनेकांनी टोकाची भूमिका घेतली. त्यामुळेच हे समाजकंटक कोण आहेत? त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या हितासाठी जाहीर करावीत, असं आवाहनही पवारांनी केले.

मराठा आरक्षण भाजपला शक्य

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणे शक्य आहे का? असे विचारले असता पवारांनी होकारात्मक उत्तर दिले. या प्रश्नात कायदेशीर अडचणी असले तरी पर्याय आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्राला विनंती केली तर संसदेत घटनादुरुस्ती करता येते. भाजपचे बहूमत असल्याने ते शक्य आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. विरोधी पक्षाकडून सहकार्याची अपेक्षा असेल तर ती जबाबदारी घ्यायला आपण तयार आहे. या प्रश्नात राजकारण न आणता तो सोडवण्याची विनंती आपण विरोधी पक्षातील नेत्यांना करू, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेबाबत विचारले असता पवार यांनी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत बदल झाला तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आमच्या सोयीचे होईल, असा टोला मारला. ब्राम्हण व मराठा मुख्यमंत्री हा वाद पुरोगामी महाराष्ट्रात निरर्थक असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात यापूर्वी देखील बाळासाहेब खेर, मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले. ते कोणत्या जातीचे होते? ब्राम्हणच होते ना?, असं सांगतानाच कारण नसताना असं जातीय विश्लेषण करणं योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्याराज्यात आघाडी व्हावी

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात राज्याराज्यात आघाडी व्हायला हवी आणि निवडणुकीनंतर नेतृत्वाचा विचार व्हावा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. देशभर आघाडी करण्यासाठी ज्यांची ज्या राज्यात ताकद आहे, एकच विचार आहे, त्यांनी एकत्र यावे. त्याची सुरुवात म्हणून महाराष्ट्रासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीसाठी तीन बैठका झाल्या. जागा वाटपासाठी अशोक गेहलोत, अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल व जयंत पाटील यांची समिती देखील नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. याच धर्तीवर उत्त्तर प्रदेशात सपा व बसपा, कर्नाटकात काँग्रेस-जेडीयू आघाडी शक्य आहे. महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेससोबत शेकाप, माकप, भाकप देखील एकत्र येऊन पर्याय देवू शकतात. हे करताना जिथे आपली ताकद नाही, तेथे जागा मागण्यात अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, आर.के. पोवार, राजेश लाटकर, अदिल फरास उपस्थित होते.

राफेल करार संशयास्पद

ए.के. अँथोनी संरक्षणमंत्री असताना राफेल करार झाला. पण नंतर या कराराची रक्कम दुप्पट होवून ती पंधराशे पन्नास कोटी करण्यात आली. याबाबत राहुल गांधीनी प्रश्न विचारल्यानंतर करारात गुप्तता पाळल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच काही लपवालपवी असल्याची शंका येते, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

पवार काय म्हणाले...

>> मराठा आरक्षणप्रश्नी आमदारांनी राजीनामा देण्यापेक्षा विधीमंडळात आवाज उठवावा

>> कर्जमाफीत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिकपणाची दिसत नाही

>> आरक्षण हे सरसकटच द्यावे, अर्थिक निकषाचा पर्याय पुढे आणू नये

>> राफेल करारात गुप्तता पाळण्यात लपवालपवीची भूमिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसमधून बाहेर फेकला गेलो आणि बचावलो

0
0

सातारा:

पोलादपूर बस अपघातातून प्रकाश सावंत-देसाई हे केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले असून त्यांनी अपघाताबाबत सांगितलेली 'आपबीती' काळजाचा थरकाप उडवणारी आहे. प्रकाश हे कोकण कृषी विद्यापीठात अधीक्षक म्हणून सेवेत आहेत.

'शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस जोडून सुट्टी आल्याने रोजच्या धकाधकीतून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून आम्ही महाबळेश्वरला पिकनिकचा बेत आखला होता. या सहलीदरम्यान राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत असलेल्या गहू संशोधन केंद्रासही आम्ही भेट देणार होतो. दापोलीहून महाबळेश्वरला जाण्यासाठी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी आमची बस निघाली. ही बस खासगी होती. दोन चालकांसह आम्ही एकूण ३४ जण या सहलीत सहभागी झालो होतो. सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी आमची बस आंबेनळी घाटात पोहोचली. घाटात रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगारे तयार करून ठेवले होते. एका ढिगार्‍यावरून बसचे चाक सरकले आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खोल दरीत कलंडली', असे प्रकाश यांनी सांगितले.

काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस दरीत कोसळत असताना मी बसमधून बाहेर फेकला गेलो. एका झाडाला मी घट्ट पकडून ठेवले आणि सुदैवाने थोडक्यात बचावलो. मी जिथे पडलो तिथून बस खूप खाली कोसळली होती. मला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. दरीत कोसळलेली बस रस्त्यावरून ठिपक्याएवढी दिसत होती. आमच्यासोबत आणखी सहकारी दुसऱ्या गाडीने मागून येत होते. मी कसाबसा खोल दरी चढून वर आलो. रस्त्यावर आल्यानंतरही मोबाइलला रेंज नव्हती. थोडा पुढे आल्यानंतर मी अजित नामक मित्राला फोन करुन घटनेची दिली. त्याने नंतर पोलिसांना कळवले. पोलिसांनी मला फोन केला. नंतर मदतकार्य सुरु झाले, असेही सावंत यांनी नमूद केले. आपबीती सांगताना प्रकाश यांचे डोळे पाणावलेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि व्हॉट्सअॅप ग्रुप कायमचा शांत झाला!

0
0

सातारा :

महाबळेश्वरच्या वाटेवर असताना बसमधील सगळेच धमाल, मस्ती करीत होते. त्याची छायाचित्रे काढून ती व्हॉट्सअॅप ग्रुपवरही टाकली जात होती. या मंडळींच्या ग्रुपवर शेवटचा मेसेज टाकण्यात आला तो सकाळी साडेनऊ वाजता. त्यानंतर मेसेज पडलाच नाही. हा ग्रुप शांत झाला तो कायमचाच...

महाबळेश्वरच्या सहलीला कृषी विद्यापीठाच्या मंडळींसोबत प्रवीण रणदिवे हे जाणार होते. मात्र प्रकृती बरी नसल्याचे कारण देऊन त्यांनी जाणे रद्द केले. मात्र सहलीच्या मंडळींच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ते होते व त्यावर सातत्याने टाकले जाणारी छायाचित्रे, मेसेज ते बघत होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास ग्रुपवर मेसेज पडला व त्यानंतर बराच वेळ काहीच मेसेज, छायाचित्र टाकले गेले नाही. आपले सहकारी न्याहारीसाठी थांबले असणार, असा रणदिवे यांचा कयास होता. मात्र नंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास टीव्हीवरून त्यांना या भीषण अपघाताची माहिती कळली व ते हादरून गेले. आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर साडेनऊनंतर कुठलाही मेसेज, छायाचित्र का टाकले गेले नाही, याची कल्पना त्यांना तेव्हा आली.

बायकोचे ऐकले म्हणूनच वाचलो...

प्रवीण यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. प्रवीण हे देखील आपल्या ऑफिसच्या मित्रांसोबत महाबळेश्वरला पिकनिकला जाणार होते. मात्र, त्यांच्या पत्नीने त्यांना पिकनिकला न जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी तब्येत बरी नसल्याचे कारण देत पिकनिकला जाणे टाळले, असेही रणदिवे यांनी सांगितले.

रोशनचं सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

हर्णे या दापोलीपासून अवघ्या १५ किलोमीटरवर असलेल्या बंदराच्या गावातलेही तीन जण या अपघातात सापडले. रोशन तबीब, किशोर चोगले व जयेंद्र चोगले असे हर्णैचे तीन तरूण दापोली कृषी विद्यापीठात नोकरीला होते आणि तेही या सहलीत सहभागी झाले होते. अवघं २८ वर्षे वय असलेल्या रोशनचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. रोशनची बहीण रेश्मा ही देखील दापोली कृषी विद्यापीठात नोकरी करते. मात्र, ती या सहलीला गेली नव्हती अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. किशोर चोगले यांचे वडील पी. एन. चोगले हे हर्णेमधल्या पाज फिशिंग सोसायाटीचे माजी अध्यक्ष आहेत. या भीषण अपघाताच्या बातमीनंतर हर्णै-दापोली परिसरावर शोककळा पसरली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बक्षीसाच्या अमिषाने शिक्षिकेची पाच लाखांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोने, टीव्ही, लॅपटॉप आणि तीस हजार ब्रिटिश पाऊंड असे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून एका शिक्षिकेची पाच लाख, २९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. रुपा दत्तात्रय पिसाळ (रा. २१०१, इ वॉर्ड, लक्ष्मीपुरी, युनिक अॅटोमोबाइल शेजारी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. एका व्यक्तीने शिक्षिका पिसाळ यांच्या मोबाइलवर बक्षीस लागल्याचा एसएमएस केला. त्यानंतर पिसाळ यांनी संबधित व्यक्तीशी संपर्क साधला. त्याने विविध योजनाच्या माध्यमातून ज्वेलरी, सॅमसंगचा मोबाइल, लॅपटॉप आणि तीन हजार ब्रिटिश पाऊंड लागल्याची माहिती व्हॉटसअॅपवर पाठविली. १९ ते २७ जुलै या कालावधीत दहा ते बारा वेळा या बक्षीसाची माहिती दिली. पिसाळ यांनी या जाहिरातीच्या आधारे पहिल्या टप्प्यात काही रक्कम पाठविली. दोन दिवसांनी अद्याप बक्षीस मिळाले नसल्याची तक्रार केली. त्यावेळी फसवणूक करणाऱ्याने पार्सल मुंबई विमानतळावर अडकले आहे. त्यासाठी अबकारी कर भरावा लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी लागणारे पैसे बँक खात्यावर जमा करण्याचे सांगितले. ही रक्कमही पिसाळ यांनी खात्यावर भरली. त्यावेळी बक्षीसासाठी भरलेला हा पहिला हप्ता असून दुसरा आणि तिसरा हप्ता भरावा लागणार असल्याचे सांगितले. दोनच दिवसांत बक्षीस घरी पोहोचण्याचे आश्वासनही दिले. या भामट्याच्या आमिषाला बळी पडून पिसाळ यांच्याकडून पाच लाख २९ हजार उकळले. याप्रकरणी शाहुपूरी पोलिस आणि सायबर सेलकडून तपास सुरू आहे. पिसाळ यांच्या मोबाइलवर आलेला व्हॉटसअॅपची जाहिरात, भामट्याने केलेल्या कॉल डिटेल्सची तपासणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलनास वाढता पाठिंबा

0
0

खासदार, आमदारासह विविध संस्था, संघटनांचा सहभाग

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सुरू असलेल्या दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाला शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट दिली. दिवसभरात आमदार, खासदार आणि विविध संस्था संघटनांनी भेट देत पाठिंबा व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

खासदार पवार यांनी शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास यांनी आंदोलन स्थळीभेट दिली. त्यांच्यासमवेत खासदार महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आरक्षण आंदोलनासंदर्भात भूमिका मांडली. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबधी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीला शाहू दप्तरातील ४८ महत्त्वाचे पुरावे दिले आहेत. मराठा समाजाने शिस्तबद्ध ५८ मोर्चे शांततेत काढले. आरक्षण आंदोलन फोडण्यासाठी राज्य सरकारकडून सुरुवातीपासून प्रयत्न केले जात आहेत. गतवर्षी मुंबईतील मराठा समाजाच्या मोर्चानंतर राज्य सरकारने आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. पण गेले वर्षभर सरकारकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परळीतील बैठकीनंतर मराठा समाजाने पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तीन मराठा समाजातील तरुणांनी हौतात्म पत्करले असतानाही सरकार लक्ष देत नसल्याने पुन्हा आंदोलन सुरु केले आहे.'

'वडिलकीच्या नात्याने पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठा आरक्षणासंदर्भात प्रयत्न करावेत,' अशी मागणी सचिन तोडकर यांनी केली.

'सरकार आंदोलकांवर दबाव आणत आहे,' असा आरोप दिलीप देसाई यांनी केला. कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्यानंतर पवारांनी आंदोलनाला पाठिंबा देत राज्यसभेत आरक्षणासंदर्भात घटना दुरुस्तीसाठी पुढाकार घेऊ असे सांगत आंदोलनाला गालबोट लागेल असे कृत्य करु नका, असा सल्ला दिला.

दरम्यान दिवसभरात माजी आमदार सुरेश साळोखे, संजय घाटगे यांच्यासह जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक रवींद्र आपटे, रामराजे कुपेकर, शिरोली पुलाची गावचे सरपंच शशिकांत खवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, देवानंद कांबळे, सांगवडे गावचे माजी सरपंच अशोक तिरपणकर, हातकणंगले तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवानराव जधव, शिवसेना उपप्रमुख प्रकाश सरनाईक, यांनी पाठिंबा दिला. तसेच चिखली, सोनतळी, रजपूतवाडी, ग्रामस्थ, दैवज्ञ शिक्षण समाज, लिंगायत समाज, राजस्थानी समाज, जैन श्वेताबंर, कोल्हापूर मंडप लाईटिंग डेकोरेटर्स असोसिएशन, आश्रम अपंग व सामाजिक बहुद्देशीय संस्था सादळे, कोल्हापूर जिल्हा सामाजिक सेवा व सांस्कृतिक मंगल कार्यालय संघ, कोल्हापूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, राजर्षी शाहू लघू उद्योजक असोसिएशन, जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटना, जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघ, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, शिवप्रतिष्ठान हिंदस्थान, खाटिक समाज, शिवराज्य मंच कागल या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.

००००

संभाजीराजेंचा आज पाठिंबा

'सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला रविवारी (ता. २९) खासदार संभाजीराजे छत्रपती भेट देणार आहेत,' अशी माहिती दिलीप देसाई यांनी दिली. ठिय्या आंदोलनाला यापुर्वी जिल्हा बार असोसिएशन, मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला असून तेही पुढील आठवड्यात ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापूरकरांचा खेळात दबदबा’

0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरला खेळाचा मोठा वारसा लाभला आहे. विविध खेळातील दर्जेदार खेळाडू कोल्हापुराने दिले आहेत. आयर्नमॅनसारख्या कौशल्यपणाला लावणाऱ्या खेळात सहभागी होत कोल्हापूरकरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला आहे,' असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. छत्रपती शाहू स्मारक भवन येथे मंगळवारी आयर्नमॅन स्पर्धेतील खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी डॉ. प्रदीप पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धेची माहिती दिली. उदय पाटील यांनी स्पर्धेदरम्यानचा चित्तथरारक अनुभव सांगितला. यावेळी उत्तम फराकटे यांनी वृषाली चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी आदित्य शिंदे, रौनक पाटील, अशिष तंबाखे, डॉ. संदेश बागडी, चेतन चव्हाण, उदय पाटील, डॉ. विजय कुलकर्णी, विनोद चंदवाणी, डॉ. प्रदीप पाटील, स्वप्निल माने, महेश मेटे आणि विशाल कोथळे यांच्यासह त्याचे प्रशिक्षक अश्विन भोसले, निळकंठ आखाडे यांच्यासह कोल्हापूरचा पहिला आयर्नमॅन आकाश कोरगावकर आणि पाच वेळा आयर्नमॅन झालेल्या पंकज रावळू याचा सत्कार केला. यावेळी जयेश कदम, आर. एम. मोहिते, अमर धामणे, अमित हळवणकर, सुशील चंदवाणी, विलास रेडेकर, एस. आर. पाटील, शाम कोरगावकर, संजय चव्हाण, शाम कागले, राजेंद्र भुसारी, के. पी. खोत, धीरज समर्थ यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन निनाद काळे यांनी तर आभार नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जडणघडणीच्या काळात स्वप्ने पेरा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जडणघडणीच्या काळात मुलांमध्ये पालकांनी स्वप्नांची पेरणी करायची असते. मुलांमधील कौशल्ये ओळखून त्याला प्रोत्साहन दिल्यास, भावनिक आधार दिल्यास करिअरमध्येच नव्हे तर जीवनात कोणत्याही अडचणी येत नाहीत,' असे प्रतिपादन निवृत्त अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले. अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कारप्रसंगी ते शनिवारी शाहू स्मारक भवन येथे बोलत होते. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक अध्यक्षस्थानी होते.

देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टातून स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे. करिअरमध्ये यशस्वी झाल्यानंतर मात्र मागे वळून समाजाकडे पाहायला हवे. यश मिळाल्यानंतर आत्मकेंद्रित न होता आपले जगणे समाजासाठी असायला हवे. युवकांनी रोजच्या जगण्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करावी. पालकांनी पाल्याला त्याच्यातील क्षमतांची जाणीव करून द्यावी. आजकाल पालकत्व हा गंभीर विषय बनला असून तो सोडवण्यासाठी पालक आणि पाल्याच्या नात्यात संवाद व्हायला हवा.'

यावेळी उपशिक्षणाधिकारीपदी निवड झालेबद्दल शिवराज जाधव, राज्य उत्पादक शल्क निरीक्षक संतोष पाटील, पोलिस उपनिरीक्षक मीनल शिंदे, अजिंक्य मोरे तसेच बी एस्सीतील यशाबद्दल कोमल मस्कर, बारावीत उत्तम गुण मिळवलेबद्दल अनिकेत केसरकर, सौरभ भोपळे, दहावीतील यशस्वी विद्यार्थी साक्षी मस्कर,अमृता किल्लेदार, स्नेहा शिर्के तसेच अॅथलेटिक्समधील बजरंग चव्हाण, बाळासाहेब भोगम, पॅरालिम्पिकमधील रणवीर जाधव, शिष्यवृत्ती श्रेयस कापसे, टॅलेटं सर्च रीधिमा पाटील, बालशाहीर तृप्ती सावंत आदींचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक एकनाथ जगदाळे यांनी केले. यावेळी क्रीडाईचे महेश यादव, उद्योजक चंद्रकांत जाधव, शंकर पाटील, जयेश कदम, डॉ. भारत कोटकर, मोहनराव जाधव, प्रशांत मुचंडी, उत्तम जाधव, माणिक पाटील, शंकराव शेळके, डॉ. शिवाजीराव हिलगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिरीष जाधव, माणिक पाटील यांनी तर आभार शैलेजा भोसले यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठवडगावमध्ये ठिय्या

0
0

हातकणंगले : पेठवडगाव येथे मराठा आरक्षणासाठी नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनास समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळाला. मराठा समाजाचे कार्यकर्ते सागर भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष अजय थोरात, प्रविता सालपे, राजन शेटे, संदीप पाटील, गुरुप्रसाद यादव, जवाहर सलगर, आदींसह सणगर, तेली, बिरदेव खाटिक, कैकाडी, बागडी समाज, वडगाव सराफ असोसिएशनने पाठिबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांच्या संपात शिक्षकही सहभागी होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी व निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने प्रलंबित मागण्यांसाठी सात ते नऊ ऑगस्ट या कालावधीत तीन दिवसांचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पूर्ण ताकतीने सहभागी होणार आहे. सर्व शिक्षकांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, सरचिटणीस प्रमोद औंधकर, सुधाकर सावंत आदींनी केले आहे.

जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, '२००५ नंतरच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सातवा वेतन आयोग लागू करावा, बाल संगोपन रजा दोन वर्षाची करावी, मागील थकीत चौदा महिन्याच्या महागाई भत्त्याचा फरक द्यावा, निवृत्तीचे वय साठ वर्षे करावे, आदी मागण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा येथे राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यामध्ये संपात पूर्ण ताकतीने सहभागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.' यावेळी राजेंद्र पाटील, जोतीराम पाटील, वर्षा केनवडे, दिपाली भोईटे, उमेश देसाई, संजय पाटील, संजय कडगवे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाडेंकडून वस्त्रोद्योगाची लक्तरे वेशीवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शहर व परिसरातील वस्त्रोद्योग अडचणीत आहे सत्य असले तरी आमदार सुरेश हाळवणकर सातत्याने पाठपुरावा करून या उद्योगाला पुनरुज्जीवन प्राप्त करून देण्यासाठी धडपडत आहेत. मात्र वस्त्रोद्योगातील जाणकार माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शहरातील यंत्रमाग व्यवसायाबाबत जाणीवपूर्वक संभ्रमावस्था निर्माण करुन समस्या सोडविण्याऐवजी लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष शहाजी भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

साध्या यंत्रमागासह शटललेस लूमसुध्दा भंगारात विकले जात असून त्याला सर्वस्वी केंद्र व राज्य सरकारचे धोरण आणि अक्षम्य दुर्लक्ष जबाबदार असल्याची टीका आवाडे यांनी केली आहे. या आरोपाचे खंडण करताना भोसले यांनी भंगार व्यावसायिकांशी पत्रकारांची भेट घडवून आणली.

भोसले म्हणाले, 'वस्त्रोद्योग संकटातून मार्गक्रमण करत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आमदार हाळवणकर सातत्याने शासनदरबारी प्रयत्नशील आहेत. असे असताना आवाडे यांनी यंत्रमाग भंगारात चालल्याची केलेली पाहणी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात तफावत आहे. वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण होत आहे. त्यामुळे सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वीचे जुने मुदतबाह्य यंत्रमाग भंगारात घातले जात आहेत. दरमहा ५० ते ६० असे जुने यंत्रमाग भंगारात येत असल्याचे भंगार व्यवसायीक सांगत असताना आवाडे हे दिवसाला ५० यंत्रमाग भंगारात येत असल्याचे सांगत आहेत. वस्त्रोद्योग अडचणीत आहे हे मान्य असले तरी त्यातील समस्या सोडवण्यास मदत करण्याएैवजी आवाडे वस्त्रोद्योगाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगाची पत खालावण्यास सर्वस्वी तेच जबादार आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदी अॅड. देसाई

0
0

कोल्हापूर: कोल्हापूर सिटी क्रिमीनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. डी. डी. देसाई यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी अॅड. केदार साळोखे यांची आणि सेक्रेटरीपदी अॅड. सनराज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी सकाळी दहा वाजता मतदानाची सुरुवात झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठ ऑगस्टलापानसे यांचे व्याख्यान

0
0

कोल्हापूर: शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचे 'आजचे शिक्षण-उद्याचे जीवन' या विषयावर आठ ऑगस्ट रोजी व्याख्यान आयोजित केले आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. दुपारी २.३० वाजता मुख्याध्यापक व शिक्षक कृती सत्र होणार असल्याची माहिती संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांनी केले आहे. संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे कार्यक्रम होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्धापनदिन उत्साहात

0
0

कोल्हापूर: बागल चौक गणेशोत्सव तरुण मंडळाचा ६१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात दौलत देसाई यांनी मंडळाला शुभेच्छा देताना सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. तसेच मंडळाला अंबाबाईची मूर्ती भेट दिली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष सचिन चौगुले, आशिष पाटील, खजानिस सुशांत चव्हाण, सचिव अमित खेत्रे, दत्रा पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याचा क्राइम रेट कमी करू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यातील क्राइम रेट कमी करण्यासह कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल,' अशी ग्वाही कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव दिलीपराव देशमुख यांनी दिली. एसपी संजय मोहिते यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या उपसंचालकपदी पदोन्नतीवर बदली झाली. देशमुख गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक होते. ते चार ऑगस्टला कार्यभार स्वीकारणार आहेत.

'सातारा जिल्ह्याचे एसपी म्हणून काम पाहिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय परिस्थितीचा चांगला अभ्यास आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गुन्हेगारी क्षेत्रातील बारकावे माहिती आहेत असे देशमुख यांनी सांगितले. त्यांनी ठाणे ग्रामीणमध्येही सहायक पोलिस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. देशमुख यांचे एम. बी. बी. एस. चे शिक्षण पूर्ण केले असून २००९ बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी २०१० मध्ये ठाणे ग्रामीण, भंडारा येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. पुणे येथे एसआरपीएफचे कमांडट, सातारा आणि गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. कोल्हापुरात त्यांच्यासमोर ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी आणि सूत्रधार शोधण्याचे आव्हान असेल. खासगी सावकारी, व्हाइट कॉलर गुन्हेगारी, गुन्हेगारी टोळ्यांतील वाढता संघर्ष, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे रोखण्याचे आव्हानही आहे.

पर्यायी शिवाजी पुलाची

मोहितेंनी घेतली जबाबदारी

पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले काम पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी घेतली. त्यांनी आंदोलकांसह सर्वांनाच ग्वाही देत काम मार्गी लावले. गेल्या १४ महिन्याच्या कार्यकालात त्यांनी खंडणीखोरांविरोधात विशेष मोहीम राबवली. खासगी सावकारांसह पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार, मोक्काची कारवाई केली. गणेश उत्सवात डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्या २२ मंडळांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करून पुढील कार्यवाही केली. जानेवारी महिन्यात घडलेल्या जातीय दंगलीतील समाजकंटकांवर कठोर कारवाई केली. नागरिकांना तत्काळ पासपोर्ट मिळण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. तक्रार आल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्याची पद्धत राबविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या दारात गुंडांचा धिंगाणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या दारात दोन गुंडांनी मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला. यावेळी त्यांनी पोलिसांनाही शिवीगाळ केली. हा प्रकार शनिवारी (ता. २८) संध्याकाळी सहाच्या सुमारास घडला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन सीपीआरमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नाही.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश काळे, शिवाजी बनसोडे, बारक्या आणि त्याचा साथीदार असे चौघे शनिवारी सकाळ मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मद्यप्राशन करीत होते. यावेळी त्या चौघांत वाद झाला. त्यातील एकाने शिवाजी बनसोडे याच्या डोक्यात बीअरची बाटली फोडली. रक्तबंबाळ अवस्थेत तो शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर येऊन कोसळला. यावेळी तेथे आलेल्या गणेश काळेने पोलिस ठाण्याच्या आवारात स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करून घेतले. चौघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागल्याने पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ झाला. शाहूपुरी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी मात्र, त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. 'आम्हाला काही झाल्यास आम्ही गळा कापून घेणार,' अशी धमकी दिली. यावेळी फोटो घेणाऱ्या एका छायाचित्रकारासही त्यांनी धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. सीपीआरमध्येही दोन्ही संशयितांनी गोंधळ घातला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराबाई पार्क, भवानी मंडप परिसरात चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताराबाई पार्कातील धनश्री पॅराडाइज अपार्टमेंटमधील तीन फ्लॅट आणि भवानी मंडप परिसरातील दुकान फोडून चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला. ताराबाई पार्कातील एका फ्लॅटमधून चोरट्यांनी दोन लाख ४२ हजार रुपये आणि पाच तोळे दागिने असा एकूण सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. त्याबाबतची फिर्यांद गौतम सूर्यप्रकाश पंडित (वय ५९, मूळ रा. साईबाबा नगर, बोरिवली वेस्ट, सध्या रा. धनश्री पॅराडाईज अपार्टमेंट, ताराबाई पार्क) यांनी शाहुपूरी पोलिसांत दिली. ताराबाई पार्कातील अपार्टमेंटधील फ्लॅट क्रमांक ३०४ मधील पंडित परिवारासह देवदर्शनासाठी परगावी गेले होते. त्याचा बंद असलेला फ्लॅटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून प्रवेश केला. लोखंडी कपाट उचकटून त्यातील रोख रक्कम दोन लाख ४२ हजार रुपये, दोन तोळ्यांची सोन्याची चेन, तीन तोळ्याचे ब्रेसलेट असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी याच अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅटही फोडले. मात्र या ठिकाणी चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या जवळ असलेल्या भवानी मंडप परिसरातील एक दुकान चोरट्यांनी फोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images