Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विहीर बुजवली, प्रतीक्षा डिझाईनची

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पुलाला असणाऱ्या पर्यायी पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी खोदाई करताना आढळलेली विहीर शुक्रवारी दगड व सिमेंट क्राँक्रिटने बुजवली. गेले दोन दिवस विहीर बुजवण्याचे काम सुरू होते. पुलाच्या पिलरसाठी पाया तयार झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळाकडून येणाऱ्या पिलरच्या डिझाइनची राष्ट्रीय महामार्ग विभाग प्रतीक्षा करत आहे. डिझाइन मिळाल्यानंतर ताबडतोड पिलर बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे. तब्बल पंधरा दिवस डिझाइनला विलंब झाला असून शनिवारी (ता.३०) डिझाइन मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. डिझाइन मिळाल्यानंतर पाया व पिलरसाठी सळईची बांधणी करण्यात येणार आहे.

००००००००००००

पिलरसाठी पायासाठी कठीण खडक शोधताना खोदाईच्यावेळी विहीर आढळली होती. पाया न लागल्याने नवी मुंबईतील संकल्प चित्र मंडळाचे कार्यकारी अभियंता बोंगे व अधिकाऱ्यांनी १६ जूनला पर्यायी पुलाच्या ठिकाणी भेट दिली होती. भेटीनंतर अधिकाऱ्यांना सूचना देऊन कठीण खडक लागेपर्यंत खोदाई करण्याची सूचना ठेकेदाराला दिली होती. ठेकेदारांने अत्याधुनिक मशिनरीद्वारे ७० फूट खोदाई करून पाया लागला नाही. त्यानंतर विहीर परिसरातील खडक व मातीची तपासणी गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निककडून घेण्यात आली. त्यानंतर संकल्प चित्र मंडळाने विहीर काँक्रिटने भरण्याची सूचना केली. गेली दोन दिवस २० डंपरद्वारे क्राँकीटने विहीर बुजवण्याचे काम सुरु होते. शुक्रवारी दुपारी चारच्या विहीर बुजवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. शनिवारी पिलर उभारणीसाठी परिसराची स्वच्छता करण्यात येणार असून सपाटीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

एकीकडे विहीर बुजवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संकल्प चित्र मंडळाकडून पुलाचे सुधारित डिझाईन प्राप्त झालेले नाही. १६ जून रोजी घटनास्थळची पाहणी केल्यानंतर १८ जून रोजी पुलाचे डिझाईन देण्यात येणार होते. पण कठीण खडक न लागल्याने आणि परिसरातील दगड व मातीच्या नमुन्यानंतर पुलाच्या डिझाईनचे काम नव्याने करण्यात येत आहे. तब्बल पंधरा दिवस डिझाईनला विलंब झाला असून शनिवारी (३०) डिझाईन मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. डिझाईन मिळाल्यानंतर पाया व पिलरसाठी सळईची बांधणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुले पळवल्याच्या संशयातून कारचालकास मारहाण

0
0

मंगळवार पेठेतील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लहान मुलांना पळवून नेत असल्याच्या संशयातून शुक्रवारी दुपारी मंगळवार पेठेत एका व्यक्तीस नागरिकांनी बेदम मारहाण केली. संबधित कारचालक व त्याचा सहकारी या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांना पाचारण केले. मात्र, नंतर ही मुले त्यांची असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून दिले. देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली परिसरात शुकवारी (ता. २९) दुपारी हा प्रकार घडला. मात्र, दारू पिऊन कार चालवल्याबद्दल संबंधित व्यक्तीवर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई केली.

जुना राजवाडा पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली परिसरात ४० ते ४५ वयोगटातील एक व्यक्ती कार घेऊन आला. तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या कारमध्ये तीन ते पाच वर्ष वयोगटातील तीन मुले होती. या मुलांच्या तोंडाला चॉकलेट लागली होती. तो व्यक्ती रस्त्याकडेला कार पार्क करून जवळच्याच एका दारुच्या दुकानात गेला. यावेळी कारमधील मुलं रडू लागल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष गेले. दारुच्या दुकानात गेलेली व्यक्ती लहान मुलांचे अपहरण करणारी असावी, असा संशय आल्याने नागरिकांनी त्याची चौकशी सुरू केली. तसेच मुलांना चॉकलेट देऊन त्यांचे अपहरण केल्याची अफवा पसरल्याने तरुण आक्रमक बनले. चौकात बसलेल्या तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर काहींनी ही बाब जुना राजवाडा पोलिसांना कळविली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर संबधित व्यक्तीची सुटका केली व ती गाडी घेऊन पोलिस पोलिस ठाण्यात आले. यावेळी संदीप बेकरीपासून कोळेकर तिकटीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता तो निगडेवाडी (ता. करवीर) येथील असून, कारमधील मुलं त्याचीच असल्याचे स्पष्ट झाले. शाळेतून मुलांना घेऊन जाण्यासाठी तो आला होता. जाताना त्याने मुलांना चॉकलेट दिली होती. मद्यप्राशन करून वाहन चालविल्याबद्दल संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समितीच्या बडदास्तसाठी २० लाख

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी राज्यपातळीवरील २५ आमदारांचा सहभाग असलेली पंचायत राज समिती ५ ते ७ सप्टेंबरअखेर येणार आहे. या समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. शिवाय कर्तव्यात कसूर केलेल्या व दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागेवरच निलंबित करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे समितीमधील एकाही सदस्याची गैरसोय होऊन नये, त्यांची किमती बडदास्त ठेवण्यासाठी २० लाखांची अधिकृत तरतूद केली आहे. परिणामी आतापासून समिती सदस्यांच्या आवडीनिवडीसह इतर आवश्यक गोष्टी जाणून घेतल्या जात आहेत.

दर तीन वर्षांनी समिती येते. समितीमध्ये आमदारांसह वरिष्ठ अधिकारी, लेखाधिकारी येतात. पूर्वी त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी अधिकारी वर्गणी काढत होते. वर्गणीची रक्कम वसुलीचा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांसमोर राहत होता. त्यामुळे पाच वर्षांपूर्वीपासून समिती आल्यानंतर अनुषंगिक खर्चासाठी २० लाखांची तरतूद बजेटमध्येच केली जात आहे. यंदा सप्टेंबरमध्ये समिती येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकासह राज्यातील २५ आमदार आहेत. गेल्या वेळी समिती आलिशान हॉटेलमध्ये राहिली होती. त्यांचे खाणे, पिणे उंची होते. हा अनुभव घेऊन यावेळी इच्छा व्यक्त केल्यास शहरातील आलिशान हॉटेलमध्ये ५ ते ७ सप्टेंबर त्यांची बडदास्त करण्यासाठी या काळात रूम्स राखीव ठेवण्यासाठी संपर्क सुरू आहे.

प्रत्येक सदस्यासोबत त्यांचे स्वीय सहायक, अधिकारी असणार आहेत. एखादा सदस्य कुटुंबासह आल्यास त्यांचीची सोय करावी लागणार आहे. सदस्यांना अधिकार जास्त असल्याने त्यांच्या प्रत्येक मागणीचा शब्द झेलण्याची तयारी सुरू आहे. यामुळे २० लाखांचा चुराडा होणार आहे. महागडा प्रोटोकॉल, पर्यटन, खरेदी, किमती खाणे, पिणे झाल्यास तरतूद रक्कमही कमी पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास काय करायचे, असाही मुद्दा चर्चेला येत आहे. सदस्य आमदार असल्याने त्यांना व अधिकारी, स्वीय सहायकास शासकीय विश्रामगृह राहण्यासाठी मिळू शकते. भोजनासाठी भत्ता मिळतो. फिरण्यासाठी सरकारी वाहन असते. तरीही २० लाख इतकी मोठी रक्कम समितीच्या खर्चासाठी ठेवण्याच्या प्रश्नाचे उत्तर बडदास्त असेच आहे. बडदास्तची तयारी आणि तपासणीचे विभागहानिहाय खर्चाचा तपशील, लेखा परीक्षणातील त्रुटी पूर्ण करण्यात प्रशासन गेल्या १५ दिवसांपासून व्यस्त आहे.

०००००

कोटींची चर्चा

विविध योजनांमधील खर्च केलेल्या निधीत निघालेल्या त्रुटी, नियमांचा भंग, त्याचा पूर्ततेचा अहवाल समितीकडे पाठविला आहे. गंभीर त्रुटी, त्या पूर्ण करणे अशक्य आहे. अशा प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यास मंत्रालयात सुनावणीसाठी सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये दोषी आढळल्यास कडक कारवाई होण्याची शक्यता असते. सेवानिवृत्त झाले तरी याला समोरे जावे लागते. हे सर्व टाळून 'गुड' शेऱ्यासाठी कोटीची चर्चा सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे. कोटीची मागणी पूर्ण करण्यासाठीचे पैसे उभारण्यासाठी तालुका, गावपातळीवरील पंचायत राज कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट दिल्याच्या तक्रारी आहेत.

००००

कोट

पंचायत राज समिती ५ ते ७ सप्टेंबरअखेर जिल्हा दौऱ्यावर येत आहे. समितीमधील सदस्यांसाठी वाहन, निवास व्यवस्था व इतर अनुषंगिक गोष्टींवर बजेटमध्येच खर्चासाठी २० लाखांची तरतूद केली आहे. समिती दौऱ्यावर येणार असल्याने आवश्यक ती सर्व प्रशासकीय तयारी केली जात आहे.

संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगसाठी आज ठरणार कॉलेजप्राधान्यक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंजिनीअरिंग व पॉलिटेक्निक प्रवेशप्रकियेतील ऑनलाइन नोंदणीनंतर विद्यार्थ्यांनी कॉलेजनिवडीसाठी पर्याय अर्जामध्ये दिलेल्या पसंतीवर आधारित कॉलेज प्राधान्य क्रमाचीयादी आज शनिवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातील प्रवेशसाठी अॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर स्थापन करण्यात आले असून यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन, टेक्नॉलॉजी विभाग शिवाजी विद्यापीठ व गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे आयसीआरई कॉलेज यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचलनालयद्वारे केंद्रीय पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील प्रवेशप्रक्रिया ७ जूनपासून सुरू झाली होती. यामध्ये २१ जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. तर पहिल्या फेरीसाठी कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत २८ जून रोजी संपली होती.

२४ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. या यादीनुसार विद्यार्थ्यांना आता कॉलेज पसंतीक्रम निश्चित करावा लागणार आहे. दरम्यान ३० जून ते ४ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना एआरसी सेंटरशी संपर्क साधून प्रवेश निश्चितीबाबतचा स्लाइड, फ्लोट व फ्रीज यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. कॉलेज ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर विदयार्थ्यांच्या पसंतीनुसार जर कॉलेज मिळाले असेल तर फ्रीज पर्यायाद्वारे प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. तसेच जर अन्य कॉलेजपर्याय उपब्लधतेनुसार स्लाइड किंवा फ्लोट पर्याय निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना ४ जुलैअखेर मुदत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की ५ जुलैपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे.

आयटीआयसाठी अर्जदुरुस्ती

अंतिम मुदत आज

आयटीआयसाठी यंदा ३१ शाखांचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे. कोल्हापुरात आयटीआयमधील सर्व शाखांमध्ये १ हजार ३१९ जागा उपलब्ध आहेत. आजपर्यंत दोन हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ७२० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरणे व त्यात दुरूस्ती करणे यासाठी गेल्या १५ दिवसांपासून प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेसाठी आज शनिवारी (ता. ३०) रोजी अंतिम मुदत आहे. अर्जातील दुरुस्ती व कागदपत्रांच्या तपासणीनंतर अर्ज निश्चित करण्यासाठी २ जुलैपर्यंतचा कालावधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

कौशल्याधारीत व कला अभ्यासक्रम हाऊसफुल्ल

शिवाजी विद्यापीठातील कौशल्य व विकासावर आधारीत अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे. विद्यापीठात एकूण ७१ स्कीलबेस्ड अभ्यासक्रम आहेत त्यापैकी ३० अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. आठवी ते दहावी उत्तीर्ण विदयार्थ्यांना कमी कालावधीचे अभ्यासक्रम करून अर्थाजन करता येतील अशी या अभ्यासक्रमांची रचना असल्यामुळे याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. आजीवन अध्यापन व विस्तार विभागातील सूत्रसंचालन, इव्हेंट मॅनेजमेंट, ग्रंथालय व्यवस्थापन या अभ्यासक्रमातून स्वतंत्र करिअर घडवण्यासाठी विद्यार्थी वेगळी वाट निवडत आहेत. कमला कॉलेज येथे सुरू असलेल्या एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी मुलींचा कल वाढला आहे. यामध्ये प्रक्रिया उद्योग, इस्ंटट फूड प्रोसेसिंग, योग थेरपी या कोर्सद्वारे नोकरी व व्यवसायाच्या संधी मिळत असल्याने हे कोर्स हाऊसफुल्ल ठरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजाराम’च्या अध्यक्षपदी हरीश चौगले बिनविरोध

0
0

कसबा बावडा : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी कसबा बावडा येथील हरीश नारायण चौगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चौगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चौगले यांचे नाव संचालक माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी सुचविले, त्यास संचालक कुंडलिक चरापले यांनी अनुमोदन दिले. चौगले यांच्या निवडीमुळे बावडाबरोबरच करवीर तालुक्याला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना संचालकांनी व्यक्त केली.

नूतन अध्यक्ष चौगले म्हणाले, 'महादेवराव महाडिक यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून कारखान्याच्या उत्कर्ष व प्रगतीसाठी प्रयत्नशील राहीन.' यावेळी नूतन अध्यक्ष चौगले यांचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष वसंत बेनाडे, कार्यकारी संचालक अनंत निकम, मुख्य मानद सल्लागार पी. जी. मेढे, सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटबाज नेत्यांच्या घरावर मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप सरकारच्या सुडाच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. काँग्रेससाठी राज्यात चांगले वातावरण आहे. सर्वच जिल्ह्यात काँग्रेस प्रभावशाली आहे. मात्र नेत्यांमधील गटबाजीमुळे काँग्रेसला यश मिळालेले नाही. परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांना लाजेने खाली मान घालावी लागत आहे. यामुळे पुढील काळात जे नेते एकत्र येणार नाहीत त्यांच्या घरावर कार्यकर्त्यांनी मोर्चे काढावेत,' असा सल्ला काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी शुक्रवारी दिला.

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेस कमिटीत मेळावा झाला. शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण अध्यक्षस्थानी होते.

डॉ. वाघमारे म्हणाले, भाजप, शिवसेना नको असलेल्या मतदारांना राज्यात राष्ट्रवादीसह इतर घटक, प्रादेशिक पक्ष पर्याय आहेत. यामुळे काहीही न करता सत्तेवर येऊ, अशा भ्रमात काँग्रेसच्या नेत्यांनी राहू नये. जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसचे ८ ते ९ आमदार होते. आता एकही नाही. त्याला पक्षातील अंतर्गंत गटबाजी कारणीभूत आहे. नेते पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, कलाप्पाणा आवाडे सक्रिय आहेत.'

येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा जिल्ह्यात काँग्रेसचे ७ ते ८ आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, 'नेते एकत्र आल्यास कार्यकर्त्यांतही आपोआप एकोपा निर्माण होईल. त्यासाठी गटबाजी संपवून नेत्यांनी एकत्र यावे. खोटी आश्वासने देत भाजप सरकार सत्तेवर आले. प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करणार यासारख्या अनेक घोषणा पुढे ४०० वर्षे भाजप सत्तेवर राहिले तरी पूर्ण करू शकत नाही. राज्यातील एकही घटक समाधानी नाही. आतंरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या सर्व्हेनुसार देशात रोज ५५१ जणांची नोकरी जाते आहे. बेरोजगारीत भर पडत आहे.'

घरगुती कारणांमुळे या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील गैरहजर राहिले. त्याचा गैरअर्थ कोणीही काढू नये, असा खुलासा नगरसेवक तौफीक मुल्लानी यांनी यावेळी केला.

यावेळी चव्हाण, दुर्वास कदम, बाजीराव सातपुते, संध्या घाटणे यांची भाषणे झाली. वाघमारे यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना पत्रे देण्यात आली. मेळाव्यास एस. के. माळी, पार्थ मुंडे आदी उपस्थित होते.

\Bभाजपकडून पैसे \B

निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. पाचशे, २ हजारांच्या नव्या नोटांची छपाई केली. छपाई केलेल्या नव्या नोटा पळवून भाजपने निवडणुकीत पैसे वाटले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही भाजप पैशांचा प्रचंड वापर करेल. त्यामुळे सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी एकोप्याने समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविल्यास सहज सत्ता मिळेल, असा विश्वासही डॉ. वाघमारे यांनी व्यक्त केला.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

0
0

आजरा : आजरा शहरातील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. वत्सला लोखंडे (वय ५७, रा. रवळनाथ कॉलनी) असे त्यांचे नाव आहे. दुपारी दीडच्या सुमारास लोखंडे यांना राहत्या घराच्या परसात सर्पदंश झाला. त्यांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी व सर्पदंशावरील लस उपलब्ध नव्हती, त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाकडे व त्यानंतर कोल्हापूरला सीपीआरमध्ये नेण्यात आले. पण या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जि.प. चा अध्यक्ष बदलणार नाही’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांचा कालावधी अडीच वर्षाचा आहे, त्यामुळे अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षे बदलणार नाही, असे स्पष्ट करत अध्यक्षबदलाच्या चर्चेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पडदा टाकला. यामुळे अध्यक्ष होण्याचा अरूण इंगवले यांचा मार्ग तुर्त तरी थांबला आहे.

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत गेले दोन महिने उलटसुलट चर्चा सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्या असलेल्या महिला बालकल्याण समितीच्या सभापतीनी राजीनामादेखील दिला आहे. यामुळे इतर पदाधिकरी बदलणार का याची उत्सुकता निर्माण झाली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी महाडिक राजीनामा देतील असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी महाडिकांना अभय देत राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे.

याबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, 'मुळात लोकशाही प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीने दरवर्षी पदाधिकारी बदलणे योग्य नाही. कोल्हापूर महापालिकेत दोन तीन महिन्याचा महापौर केला हे चुकीचे आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद अडीच वर्षासाठी आहे. हे पद सध्या भाजपकडे आहे. त्यामध्ये आम्ही कोणताही बदल करणार नाही. पण आमच्याबरोबरच जे घटक पक्ष आहेत त्यांना त्यांचे पदाधिकारी बदलण्यासाठी मुभा दिली आहे.

पालकमंत्र्यांनी अध्यक्षपदाच्या चर्चेवर पडदा टाकल्याने इंगवले यांच्या मार्गात अडथळा आला आहे. पक्षात येताना त्यांना तसा शब्द दिला होता. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणे धोक्याचे वाटत असल्यानेच बदलाला फाटा देण्यात आला आहे. यामुळे इंगवले यांना गोकुळ वर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकाचा कारभारच हँग

0
0

डॉ. राजू वाघमारे यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष, बेरोजगारांना नोकरी, कृषीमालाला दुप्पट भाव, धनगर समाजाला शंभर दिवसांत आरक्षण आदी आश्वासने दिली. चार वर्षांत कोणत्याच आश्वासनाची पूर्तता झालेली नसून सरकारच्या विकासाचा फुगा फूटन गायब झाला आहे. घोषणाबाजीसाठी ऑनलाइन आणि कामात ऑफलाइन असलेल्या सरकारचा संपूर्ण कारभारच हँग झाला आहे,' अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी पत्रकार बैठकीत केली.

डॉ. वाघमारे म्हणाले, 'कापूस, तूर, सोयाबीन आदी कृषीमालाला भाव मिळत नसताना खोटी आकडेवारी फेकत प्रगतीचे मनोरे उभा केले जात आहेत. ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली असताना प्रत्यक्षात ३० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. उरलेले शेतकरी गेले कोठे? सरकारच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागल्याने वर्षभरात १५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजप-सेनेचा शहरी मतदारांवर भर असल्याने शेतकरी, वंचित, आदिवासी, दलित यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेती औजारांवर कर आकारला संवेदनहीन सरकार अपंग बनले आहे, असा आरोप त्यांनी केला.

'भीमा-कोरेगाव, जळगाव व औरंगाबाद येथे झालेल्या घटनामुळे राज्याला पुरोगामी शब्द लागू होता का? भीमा-कोरेगावची घटना सरकार पुरस्कृत असून दंगलीमध्ये दलितांनी कलाकारांची भूमिका वटवली असली, तरी चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन भाजप-सेनेने केले होते. दंगलीमागचे सूत्रधार संभाजी भिडे असताना कोणत्याही पोलिस चौकशीशिवाय मुख्यमंत्री फडणवीस त्यांना निर्दोष जाहीर करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे मांडण्यासारखे नसल्याने जातीयवाद पसरवून पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्नात असून त्याप्रकारच्या घटना घडण्यास सुरुवात झाली असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस नगरसेवक तौफिक मुल्लाणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमातीचे जिल्हाध्यक्ष बाजीराव सातपुते, शहराध्यक्ष दुर्वास कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएसकेंच्या जामिनावर सोमवारी सुनावणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. सोमवारी (२ जुलै) अंतिम सुनावणी होणार आहे. या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. गुंतवणूकदारांची १९ कोटींची फसवणूक झाली असून, सुमारे ३०० गुंतवणूकदारांचे पोलिसांनी जबाब घेतले आहेत. या तिघांना अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलाने जिल्हा न्यायालात अर्ज दाखल केला आहे. 'या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी शिरीष कुलकर्णी हा पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. २ जुलैला त्याची पोलिस कोठडी संपते, तोपर्यंत या तिघांच्याही जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात यावी,' अशी विनंती संशयितांचे वकील दिलीप मुंडरगी यांनी केली. त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी २ जुलैला सुनावणी ठेवल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना टॅब देणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासह हायटेक शिक्षण घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना शिवसेना टॅब वाटप करणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. आमदार क्षीरसागर यांनी स्थानिक विकास निधीतून शहरातील पाच शाळांना संगणक व प्रिंटरचे वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजू १५ रुग्णांना मंजूर करण्यात आलेल्या ९ लाख २५ हजारांच्या निधी धनादेशाचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'स्थानिक विकास निधीतून शाळांना संगणक वितरित केले आहेत. यापूर्वी शहरातील सुमारे ४० शाळांना १२४ संगणक संचांचे वाटप केले आहे. एकविसाव्या शतकात संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यासाठी शिवसेना विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचा भार पडत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर टॅबचे वाटप केले जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईत टॅब वाटप केले. त्याच धर्तीवर हा उपक्रम कोल्हापुरात राबविला जाणार आहे. जुलै महिन्यात युवासेनेतर्फे श्रीसिद्धिविनायक ट्रस्टद्वारे शहरातील अकरावी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटपही केले जाणार आहे. '

यावेळी आयर्विन ख्रिश्चन इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, तवन्नापा पाटणे हायस्कूल, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर आदर्श विद्यालय, दत्ताबाळ विद्यामंदिर या शाळांना संगणक संचाचे वितरण आमदार क्षीरसागर, डॉ. आडके यांच्या हस्ते झाले. गरजू १५ रुग्णांना मंजूर झालेल्या निधी धनादेशाचे वितरणही झाले.

इतिहास संशोधक डॉ. अमर आडके यांचे 'शिवचरित्र' विषयावर व्याख्यान झाले. माजी उपमहापौर उदय पोवार, माजी स्थायी समिती सभापती सुनील मोदी, जनता बाजारचे स्वीकृत सदस्य जयवंत हारुगले, महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, पानपट्टी सेनेचे अरुण सावंत, दीपक गौड, पद्माकर कापसे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष किशोर घाटगे, विशाल देवकुळे, सुनील जाधव, रमेश खाडे, दीपक चव्हाण, युवासेना शहरप्रमुख अविनाश कामते, चेतन शिंदे, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, योगेश चौगुले, गुरु लाड, ओंकार परमणे आदी उपस्थित होते. अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनवटचा जामीन अर्ज फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील शिक्षण संस्थेच्या इमारतीतून सव्वानऊ कोटी रुपयांची लूट केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ ज्ञानदेव घनवट (वय ५३, रा. वडगाव शेरी, पुणे) याचा जामीन अर्ज जिल्हा कोर्टाने शुक्रवारी (ता. २९) फेटाळला. याच गुन्ह्यातील पोलिस हवालदार दीपक पाटील आणि पोलिस कॉन्स्टेबल कुलदीप कांबळे या दोघांच्या जामीन अर्जावर सोमवारी (ता. २) सुनावणी होणार आहे, अशी माहिती सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी दिली. संशयितांना अटक होऊनही त्यांनी गुन्ह्यात हडप केलेली रक्कम परत केलेली नाही. त्यांना जामीन मिळाल्यास रक्कम वसूल करण्यात अडचण येईल. संशयितांकडून गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा धोका असल्याने जामीन मंजूर होऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील शुक्ल यांनी केला. यानुसार न्यायाधीशांनी घनवट याचा जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातार्डेजवळ वाळूचा ट्रक उलटला

0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

पन्हाळा तालुक्यातील सातार्डे ते पडळ गावच्या दरम्यान असलेल्या ओढ्यावरून वारणा शहापूरकडे जाणारा वाळूचा ट्रक २५ फूट खाली कोसळला. या अपघातात चालक व क्लिनर दोघेही गंभीर जखमी असून चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. १०८ रुग्णवाहिकेतून दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोकणातून पांढरी वाळू भरून आलेला ट्रक (एम एच- ४२-टी ५१०७) कोपार्डेतील जनावरांच्या बाजाराजवळ असलेल्या सातार्डे फाटा मार्गाने वारणा शहापूरला निघाला होता. ट्रक सातार्डे-पडळदरम्यान आला असता एच.पी. गॅसजवळ असणाऱ्या ओढ्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीला बाजू देताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तो सरळ २५ फूट खोल ओढ्यात कोसळला. यामध्ये ट्रकचालकाच्या डोक्याला मोठा मार लागला असून, क्लिनरच्या हातापायाला मार लागल्याने दोघेही बेशुद्धावस्थेत पडले होते. यावेळी घटनास्थळी असणारे संभाजी पाटील (कळे तर्फे कळंबे), विष्णू चौगले (पडळ), मधुकर रामाणे (सातार्डे) आदींनी ट्रकची पुढील बाजूची काच फोडून चालक व क्लिनर दोघांनाही ट्रकबाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासरच्या छळास कंटाळूनविवाहितेने पेटवून घेतले

0
0

जयसिंगपूर : सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. तेरवाड (ता. शिरोळ) येथे ही घटना घडली. जुबेदा रियाज ढालाईत (वय २८) असे तिचे नाव आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलिसांनी पती रियाज आप्पासाहेब ढालाईत, सासू मुमताज ढालाईत, सासरा आप्पासाहेब ढालाईत, दीर रमजान ढालाईत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. माहेरहून रिक्षा किंवा रिक्षासाठी २५ हजार रुपये आणावेत यासाठी सासरच्या मंडळींकडून शिवीगाळ तसेच मारहाण होत होती. या त्रासास कंटाळून जुबेदाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माले अपघातातील जखमीचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-सांगली मार्गावर माले फाटा येथे मंगळवारी (ता. २६) सकाळी झालेल्या स्कूल बस-कंटेनर अपघातातील गंभीर जखमी स्कूल बस अटेंडंट ऋषिकेश कांबळे (वय २३, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. २९) पहाटे मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या सहमतीने त्याचे मरणोत्तर अवयवदान केले जाणार होते. मात्र, अपघातात काही अवयव निकामी झाल्याने ही प्रक्रिया होऊ शकली नाही.

अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला होता. या अपघातात कंटेनरचा चालक, क्लिनर आणि बसचा चालक या तिघांचा मृत्यू झाला, तर बसमधील दोन अटेंडंटह २६ विद्यार्थी जखमी झाले होते. गंभीर जखमींपैकी अटेंडट ऋषिकेश कांबळे याच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, प्रकृती खालावल्याने शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. ऋषिकेशच्या मृत्यूमुळे अपघातातील मृतांची संख्या चार झाली. ऋषिकेशचे मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र, अपघातात त्याचे काही अवयव निकामी झाल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया होऊ शकली नाही. अवयवदान करण्यासाठी ग्रीन कॅरिडॉरचीही व्यवस्था डॉक्टरांनी केली होती. मुंबई व बेंगळुरू येथील वैद्यकीय पथकदेखील कोल्हापुरात दाखल झाले होते. सीपीआरमध्ये हृदयशस्त्रक्रिया विभाग सुरू झाल्यानंतर पहिली शस्त्रक्रिया ऋषिकेशची झाली होती. तेव्हा तो दोन वर्षांचा होता.

दरम्यान, जखमींपैकी १७ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पाच विद्यार्थी उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. ऋषिकेश गेल्या सहा वर्षांपासून संजय घोडावत स्कूलमध्ये अटेंडंट म्हणून नोकरी करीत होता. वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी सुप्रिया साळोखे

0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सुप्रिया सुधाकर साळोखे यांची नियुक्ती करण्यात आली. साळोखे या राधानगरी पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. गेले काही वर्षे अध्यक्षपद भुषवित असलेल्या अंजना रेडेकर यांना प्रदेश कार्यकार्यरिणीवर संधी देण्यात आल्याने साळोखे यांची नियुक्ती केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील पदाधिकारी बदलाला वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून प्रदेश कमिटीने साळाखे यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. गेली काही वर्षे राजकारणात असलेल्या साळोखे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगले काम केले आहे. निवडीनंतर जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारावर गुन्हा

0
0

कोल्हापूर: राजारामपुरीतील खासगी सावकार बंटीशेठ पिंजाणी (रा. ४ थी गल्ली, राजारामपुरी) याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची सुरुवात राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून झाल्याने राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. जयवंत वसंत नेर्लेकर (६१, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये व्यावसायिक गरजेसाठी पिंजाणी याच्याकडून दरमहा सहा टक्के व्याजदराने दोन लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी १ लाख, ५३ हजार रुपयांची परतफेड केल्यानंतर २ लाख, ७२ हजार रुपये देण्यासाठी पिंजाणी याच्याकडून तगादा सुरू होता. नेर्लेकर यांच्या फिर्यादीनुसार १२ जूनला पिंजाणी याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची सुरुवात राजारामपुरीतून झाल्याने गुरुवारी रात्री हा गुन्हा राजारामपुरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन धान्यवाटपात कागल अव्वल

0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : रास्तभाव धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक रेशनिंग (एईपीडीएस) प्रणाली राबवून आदर्श ठरलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात जूनमध्ये सर्वाधिक ९८.४५ टक्के धान्य वितरण करून कागल तालुक्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला. तहसीलदार, तालुका पुरवठा अधिकार पदाची पदे रिक्त असूनही तालुक्यातील ९६ रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून ४१ हजार शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन पद्धतीने धान्यांचे वितरण केले आहे.

रास्तभाव धान्य दुकानांमधून काळ्या बाजारात जाणाऱ्या धान्याला अटकाव करण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना दरमहा धान्य मिळण्यासाठी बायोमेट्रिक रेशिंग पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी ठरलेल्या या उपक्रमाने राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. थंब मशिनला आधार लिंक करून सुरू केलेल्या धान्य वितरणामुळे पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्याबरोबरच भ्रष्ट मार्गाने जाणाऱ्या धान्याला अटकाव झाला आहे. प्रत्येक शिधापत्रिका बायोमेट्रिक प्रणालीशी जोडली गेल्याने राज्यात तब्बल एक कोटी शिधापत्रिका बोगस निघाल्याचा दावा केला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यांनी आघाडी घेतली असताना कागल तालुका यामध्ये राज्यात अव्वल ठरला आहे. तालुक्यातील बहुतांश शिधापत्रिका बायोमेट्रिक प्रणालीशी जोडल्या गेल्याने जून महिन्यात तब्बल ९८.४५ टक्के धान्यांचे वितरण रास्तभाव दुकानदारांनी केले आहे. त्यापाठोपाठ आजरा तालुक्यात ९७.९२ टक्के शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप करण्यात आले आहे. कोल्हापूर शहर मात्र सर्वांत पिछाडीवर असले तरी ८३.१८ टक्के धान्यांचे वितरण झाले आहे. कागलचे तहसीलदार किशोर घाटगे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले, तर तालुका पुरवठा अधिकारी प्रदीप शिंदे यांची महिन्यापूर्वी बदली झाले आहे. दोन्ही जबाबदार अधिकारी नसतानाही तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांनी कौतुकास्पद कामगिरी करत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

००००

जूनमधील धान्यवितरण (टक्क्यामध्ये)

कागल (९८.४५), आजरा (९७.९२), भुदरगड (९५.७), राधानगरी (९३.६१), गडहिंग्लज (९१.५९), पन्हाळा (९१.४), शिरोळ (९१.२), इचलकरंजी (९०.३४), करवीर (८८.९३), शाहूवाडी (८७.४१), गगनबावडा (८७.३३), चंदगड (८६.८५), हातकणंगले (८६.२३), कोल्हापूर शहर (८३.१८)

०००००

दृष्टिक्षेप जिल्हा

५,५४,०८७

एकूण कार्डधारक

५,०४,४४२

धान्य वितरण झालेले कार्डधारक

४,१३५

धान्य वितरित न झालेले कार्डधारक

०००००

वितरकांचे कमिशन वाढणार?

राज्यातील रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो एक रुपया ५० पैसे कमिशन मिळते, तर तमिळनाडूमध्ये दुकानदारांना दरमहा पगार दिला जातो. गोव्यामध्ये कमिशनमध्ये नुकतीच वाढ करण्यात आली आहे. बायोमेट्रिक प्रणालीमध्ये राज्यात तब्बल एक कोटी बोगस कार्डधारक समोर आणल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांची बचत झाली असल्याने दुकानदारांनी कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. आज होणाऱ्या सत्कार कार्यक्रमात कमिशनमध्ये प्रतिकिलो ५० पैशांची वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा कोटी घरफाळा जमा

0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागाकडे गेल्या तीन महिन्यांत १५ कोटी २७ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर महापालिकेने नागरिकांना घरफाळा बिले पोस्टाने पाठविली. शिवाय घरफाळा बिलावर सहा टक्के सवलत जाहीर केली. मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. ३० जूनअखेर महापालिकेने तब्बल १५ कोटी २७ लाख रुपयांचा घरफाळा जमा झाल्याची माहिती विभागाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्ण भिशी योजनेतून फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुवर्ण भिशी योजनेतून दागिने अथवा भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलांनी शाहूपुरी पोलिसांकडे शनिवारी तक्रार अर्ज दिला. चार महिने उलटूनही रक्कम आणि दागिने मिळत नसल्याने महिला संबंधित सराफाविरोधात फिर्याद देण्याच्या तयारीत आहेत. शहरातील एका दैनिकाबाबतही महिलांची तक्रार आहे.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका सराफ व्यावसायिकाने दीड वर्षापूर्वी आपल्या दुकानात सुवर्ण भिशी योजना सुरू केली. एका वर्तमानपत्राच्या उपक्रमाशी जोडलेल्या महिलांना हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. भिशीचे ११ हप्ते महिलांनी भरल्यानंतर बारावा हप्ता सराफ भरणार. यातून त्यांना दागिने किंवा रक्कम दिली जाणार, अशी सुवर्ण भिशी योजना होती. ११ महिन्यांच्या गुंतवणुकीवर एक हप्ता सराफाकडून मिळणार असल्याने अनेकांनी मोठ्या रकमेची भिशी सुरू केली होती. काही गुंतवणूकदारांची रक्कम लाखोत आहे. महिलांनी काटकसर करून ११ हप्ते भरले. मुदत उलटून चार महिने पूर्ण झाले, तरीही सराफाकडून दागिना किंवा गुंतवलेली रक्कम मिळालेली नाही. याबाबच विचारणा केली असता, सराफ पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे.

अलीकडेच या सराफाचे दुकान बंद झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दागिन्यांच्या आशेपोटी गुंतवलेली रक्कम बुडण्याचा धोका निर्माण झाल्याने महिलांनी शनिवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. ५० ते ६० महिलांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. दोनशेहून अधिक महिलांची फसवणूक झाली असून, पोलिसांनी तातडीने संबंधित सराफावर कारवाई करावी, अशी मागणी अर्जातून केली आहे. याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन निरीक्षक मोरे यांनी दिले.

दरम्यान, या सराफाकडे सुवर्ण भिशी सुरू करण्याचा सल्ला शहरातील एका वर्तमानपत्राने दिल्याचा आरोप करीत त्या वर्तमानपत्राविरोधातही तक्रार देण्याची तयारी फसवणूक झालेल्या महिलांकडून सुरू आहे. आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगून सराफाने मुदतवाढ मागितली असून, पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी फिर्याद देणे टाळले. पैसे न मिळाल्यास फिर्याद दाखल करणार असल्याचे महिलांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images