Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

0
0

संशयितावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँकेत झालेल्या ओळखीचे प्रेम संबंधात रुपांतर झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. स्वप्नील भीमराव करवते (वय ३०, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) असे संशयिताचे नाव आहे. गेल्या दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार झाल्याचा उल्लेख पीडित तरुणीने फिर्यादीत केला आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाळा पार्क परिसरातील एका तरुणीची स्वप्नील करवते या तरुणाशी ओळख झाली. दोघेही बँकेच्या कामानिमित्त वारंवार बँकेत येत होते. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. करवते याने त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नागाळा पार्क येथील घरासह पन्हाळा, गणपतीपुळे येथे नेऊन लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान पीडित तरुणीचा एकदा गर्भपातही केला. तिने लग्नाचा तगादा लावताच स्वप्नील करवते याने तिला टाळण्यास सुरुवात केली. याबाबत पीडितेने शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. अमृतकर यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात संशयित करवते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वर्षापूर्वी नृसिंहवाडीत जाऊन लग्न केल्याचीही माहिती तिने जबाबातून दिली आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवनाथ गोरे प्रोफाइल

0
0

नवनाथ सोपान गोरे

रा. निगडी बु. पो. उटगी, ता. जत, जि. सांगली

फेसाटीला मिळालेले पुरस्कार

मनोरमा साहित्य पुरस्कार

सृजनप्रतिभा पुरस्कार

बाबा पद्यनजी साहित्य पुरस्कार

स्व. सुदाम सावरकर स्मृती वाङ्मय पुरस्कार

करवीर साहित्य परिषद

रुक्मिणी जाधवबाई नवउन्मेष पुरस्कार

डॉ. आंबेडकर साहित्य अकादमी पुरस्कार

अक्षरज्योत पुरस्कार

दमसा साहित्य पुरस्कार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पेठेत सराफ दुकानात चोरी

0
0

महिन्यानंतर फिर्याद दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी शिवाजी पेठेतील महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात ४० हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. मे महिन्यात १८ आणि २० तारखेला दोनवेळा घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज पाहताना उघडकीस आला. याबाबत सराफ सुब्राय काशीनाथ कुर्डेकर (वय ३५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांनी शुक्रवारी (ता. २२) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्राय कुर्डेकर यांचे शिवाजीपेठेत महालक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान आहे. २० मे रोजी एक महिला दुकानात आली. तिने सोन्याचे दागिने खरेदी करणार असल्याचे सांगून टॉप्स, मनीमंगळसूत्र पाहण्यासाठी मागितले. कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून १० हजार रुपयांचा टॉप्स जोड, १० हजार रुपयांच्या मनी मंगळसूत्रातील वाट्या असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल लपवला. कुर्डेकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

किशोर दिलीप परमार (रा. सम्राटनगर) यांच्या बीडीके ज्वेलर्स या दुकानात १८ मे रोजी एक महिला आली होती. मंगळसुत्रातील वाट्या खरेदीचा बहाणा करून दीड ग्रॅम वचनाच्या वाट्या व टॉप्स असा १९,५०० रुपयांचा मुद्देमाल त्यांना लंपास केला. परमार यांनीही गुरुवारी जुना राजवाडा पोलिसात चोरीची फिर्याद दिली. या दोन्ही चोऱ्या एकाच महिलेने केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्या महिलेचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय विद्यार्थी मोर्चाच्यावतीने निदर्शने

0
0

विद्यार्थी मोर्चाची निदर्शने

कोल्हापूर : न्यायालयीन भरती प्रक्रियेची चौकशी करावी, या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी निदर्शने करण्यात आली. भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या ८० ते ९० हजार उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी दिली आहे पण तीन लाख अर्जदारांना अपात्र करण्यात आले आहे. अपात्रेचे कारण स्पष्ट केले नसल्याने भरती प्रक्रियेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सूयश कांबळे, प्रमोद कांबळे, निखिल कांबळे, स्वप्निल गुरव, सुयश कांबळे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिबळ स्पर्धेत मोहिते आघाडीवर

0
0

बुद्धिबळ स्पर्धेत

मोहिते आघाडीवर

कोल्हापूर : भगवान महावीर चषक बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या रणवीर मोहिते याने सातव्या फेरीअखेर सातपैकी साडेसहा गुण मिळवत आघाडी मिळवली. अग्रमानांकित तमिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर रामनाथन बालसुब्रमण्यम, तृतीय मानांकित यशस्करा, कोल्हापूरचा अदित्य सावळकर हे संयुक्तपणे सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. शनिवारी (ता.२३) शेवटचा दिवस असून, आठव्या फेरीनंतर विजेता निश्चित होणार आहे. नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सभागृहात स्पर्धा खेळवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध समजून तणनाशक प्यायलेल्या मुलाचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्यायल्याने आरडेवाडी (ता. करवीर) येथील जयदीप कृष्णात पाचाकटे (वय १४) याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास खोकल्याचा त्रास होऊ लागल्यामुळे जयदीपने घरात ठेवलेले खोकल्याचे औषध समजून नजरचुकीने तणनाशक प्राशन केले. काही वेळानंतर त्याला त्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने घरच्यांना सांगितले. यावेळी जयदीपने घेतलेले औषध खोकल्याचे नव्हे तर तणनाशक असल्याचे घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तत्काळ कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

औषधोपचार करूनही जयदीपच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांपासून तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तेथेही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. जयदीप श्री स्वयंभू हायस्कूल, बोलोली येथे आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीककर्ज न दिल्यास खाती बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खरीप हंगामात पीककर्ज वाटपात हेतूपुरस्सर टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच पीककर्ज देण्यात अनास्था दाखविणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांमधील सरकारी खाती बंद केली जातील,' असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिला. जिल्हा अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश अबिटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक मोहन सागवेकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई उपस्थित होते.

खरीप हंगामातील पीककर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँकांचे काम समाधानकारक नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी आपल्या धोरणात तत्काळ सुधारणा करा, असे आदेश दिले. जिल्हाधिकारी सुभेदार यांनी जिल्ह्यासाठी १३८९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, आजअखेर जिल्ह्यातील ६० हजार ५७३ शेतकऱ्यांना ६३९ कोटी ७१ लाख रुपये पीककर्ज वाटप केले असल्याची माहिती दिली. १५ जूनअखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीककर्जाचे ८० टक्के काम केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे काम केवळ आठ टक्के ही बाब अतिशय गंभीर आहे. राष्ट्रीयीकृत बँकांसाठी ४४९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ३८ कोटींचे पीककर्ज वितरण केले आहे, ही बाब चिंताजनक आणि गंभीर असल्याचे मतही जिल्हाधिकारी सुभेदार यांनी व्यक्त केले. तसेच पीककर्ज वितरणात खासगी बँकांचे काम १२ टक्के आणि ग्रामीण बँकांचे काम पाच टक्के झाले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

सुभेदार म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत लाभ मिळालेल्या २७ हजार ९७२ थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून, या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देणे गरजेचे आहे. बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन जोपासून सर्वच शेतकऱ्यांना कर्ज देण्याची भूमिका घ्यावी. तसेच कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांमध्ये तसेच गावचावडीवर लावावी, जेणेकरून पात्र शेतकरी पीक कर्जासाठी बँकेकडे अर्ज करतील. बचत गटांच्या महिलांची बँक खाते उघडण्यास विलंब होता कामा नये.'

०००००००

जिल्हा अग्रणी बँक पतपुरवठा आराखडा...

एकूण आराखडा ६८१० कोटी २० लाख रुपये

कृषी क्षेत्र उद्दिष्ट ३४८० कोटी

वितरण ३०५६ कोटी ७१ लाख

गतवर्षीचे पीक कर्ज उद्दिष्ट २१६४ कोटी

वितरण १९०४ कोटी ११ लाख

गतवर्षी उद्योग क्षेत्रासाठी उद्दिष्ट २१४१ कोटी

वितरण २२११ कोटी ६९ लाख रुपये

प्रधानमंत्री जनधन खाती संख्या ११ लाख ४१ हजार ४४७

रूपे कार्ड प्रदान खात्याची संख्या १० लाख ३८ हजार ७१७

०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशाअभावी रखडले शाहू चरित्रग्रंथांचे प्रकाशन

0
0

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : रयतेच्या कल्याणासाठी संस्थानचा खजिना रिता करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहचवण्यात निधीचा अडथळा येत आहे. या ग्रंथाचे रशियन, गुजराती आणि सिंधी भाषेतील अनुवाद तयार आहेत. मात्र ते तीन वर्षांपासून प्रकाशनाच्या प्रतिक्षेत आहेत. सरकार, सहकारी संस्था आणि शाहूप्रेमींनी मदतीचा हात पुढे केला तर हे ग्रंथ प्रकाशित व्हायला मदत होईल अन्यथा ते धूळखात पडण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूरसारख्या छोट्या संस्थानातही ठरवले तरी काहीही करू शकतो ही जिद्द मनाशी बाळगून शाहू महाराजांनी प्रचंड काम केले. उद्योग, शिक्षण, कृषी, सामाजिक, अर्थ, कला आणि सांस्कृतिक यांसह एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात शाहू महाराजांनी काम केले नाही. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कोल्हापूरचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहचवणाऱ्या महाराजांनी जनतेच्या कल्याणासाठी संस्थानची तिजोरी रिकामी केली. धरण, तलाव बांधताना सरकारी खजिना वापरला. कोल्हापूरला सुजलाम् सुफलाम् करण्यात याच धरणांचा मोठा वाटा आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर सर्वव्यापी काम करणाऱ्या या राजाचे चरित्र जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहचणे गरजेचे होते. हे अवघड आव्हान प्रा. जयसिंगराव पवार यांनी स्वीकारले.

पंधरा प्रादेशिक आणि दहा विदेशी भाषांत शाहू गौरव ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्धार प्रा. पवार यांनी केला. प्रा. पवार यांनी मराठीत बाराशे पानांचा शाहू गौरवग्रंथ मराठीत लिहिला. त्याचा अनुवाद इंग्रजी आणि हिंदी याबरोबरच कोकणी, कानडी, तेलगू आणि उर्दू या करून घेण्यात आला. इंग्रजी आवृत्तीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. इतर भाषेतील ग्रंथही लोकांपर्यंत पोहचले. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्य सरकारने मदतीचा हात दिला. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने यावर मर्यादा आल्या.

महाराजांचे सर्व क्षेत्रातील अफाट काम जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचणे आवश्यक आहे. यासाठीच विविध भाषेत त्यांचे चरित्र प्रकाशित करण्याचा निर्धार प्रा. पवारांनी केला. कामही सुरू केले. आता मात्र त्यांच्या प्रयत्नाला मर्यादा येत आहेत. ऊठसूट शाहू महाराजांचे नाव घेणारे नेते आणि सरकारही मदतीचा हात देण्याऐवजी हात दाखवत आहे. यामुळे तीन भाषांत तयार असलेले चरित्र प्रकाशनाच्या प्रतिक्षेत आहे. प्रा. पवार यांनी याबाबत अनेकदा सरकारमधील काही मंत्र्यांसह इतर नेते, काही संस्थांना याबाबत विनंती केली. पण, आश्वासनापलिकडे त्यांच्या हाती काही लागले नाही. सरकार शाहू महाराजांचे नाव घेत असले तरी मदत करताना हात आखडते घेत आहे.

कोट

तीन वर्षांपूर्वीच शाहू चरित्रग्रंथाचे अनुवाद तयार झाले आहेत. मात्र पैसे नसल्याने गौरव ग्रंथांचे प्रकाशन थांबले आहे. आता फ्रेंच,चिनी, बंगाली, मल्याळम आणि इटालियन भाषेत अनुवाद करण्याचे काम सुरू आहे. सरकार मदत करत नसल्याने प्रकाशन थांबले आहे. पण आज ना उद्या सरकारचे डोळे उघडतील, या आशेवर

अनुवादाचे काम सुरू ठेवणार आहे.

प्रा. डॉ. जयसिंगराव पवार

विविध भाषेतील प्रकाशित शाहूग्रंथ

कानडी चंद्रकांत पोकळे

कोकणी प्रा. अकल्पिता देसाई, प्रा. प्रमदा देसाई

उर्दू जनाब सय्यद अहमद

तेलगू डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली

इंग्रजी अरूण साधू

हिंदी डॉ पद्मा पाटील

जर्मन सुधीर पेडणेकर

.................

अनुवाद पूर्ण, प्रतिक्षा प्रकाशनाची

गुजराती किशोरभाई गौड

सिंधी हसानंद शमनानी

रशियन मेघा पानसरे, तत्यना बीकवा

...........

अनुवाद सुरू असलेले गौरवग्रंथ

फ्रेंच डॉ. सानेश्वरी तळपदे

चिनी ओ दाई ली

बंगाली गुरूप्रसाद कार्लेकर

मल्याळम एन. एस. साजिद

इटालियन डॉ. अॅलेस्सांड्रा कोन्सोलॅरो

..................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांचा जि. प. समोर ठिय्या

0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हांतर्गंत बदलीमधील अनियमितता दूर करून विस्तापित शिक्षकांना न्याय मिळावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात अनेक वक्त्यांनी सरकारच्या बदली धोरणावर जोरदार टीका केली. शाळा बंद करण्यासाठीच अन्यायी शिक्षक बदलीचे धोरण राबविले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, मागण्यांचे निवेदन शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना देण्यात आले.

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, पती, पत्नी एकत्रिकरणाच्या बदलीत दोघांना सोयीची शाळा मिळाव्यात, स्तनदा माता, गरोदर शिक्षिकेना सोयीची शाळा द्यावी, चुकीची माहिती भरून सोयीची शाळा मिळविलेल्यांवर कारवाई करावी, बदली अनियमिततेसंबंधी तालुका स्तरावरील चौकशी अहवाल मिळावेत, शिक्षकांनी विषयनिहाय केलेल्या मॅपिंगची प्रत मिळावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी समन्वय समितीचे मार्गदर्शक प्रसाद पाटील, राजाराम वरूटे, सुरेश कोळी, रविकुमार पाटील, मोहन भोसले आदी शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्र एकच, मारेकरी वेगळे

0
0

लोगो : पानसरे हत्येनंतर

कर्नाटक एसआयटीच्या तपासातील माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी एकच शस्त्र वापरले. मात्र, मारेकरी वेगवेगळे होते असा निष्कर्ष कर्नाटक एसआयटीने काढला आहे. मारेकऱ्यांच्या कार्यशैलीचाही उलगडा होत असल्याने तिन्ही हत्यांमधील महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुन्ह्यातील शस्त्राचा शोध लागणे गरजेचे असल्याने तपास यंत्रणांनी शस्त्र शोधण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

कर्नाटकातील ज्येष्ठ पक्षकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने पाच संशयितांना अटक केली आहे. यातील परशुराम वाघमारे या संशयिताने लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुलीही दिली. लंकेश यांच्यासह डॉ. कलबुर्गी आणि आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येमध्ये एकच पिस्तूल वापरल्याचा निष्कर्ष फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून आला होता. या तिन्ही हत्यांमध्ये समान विचारधारेच्या लोकांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांसह मृतांच्या नातेवाइकांनीही व्यक्त केला आहे. यामुळे तिन्ही हत्यांमधील संशयितांचा गट एकच असल्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे. या गटातील पाच संशयित कर्नाटक एसआयटीच्या हाती लागले आहेत. त्यांचा पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडेंशी असलेल्या संबंधांचा शोध सुरू आहे. महाराष्ट्र एसआयटीकडून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाघमारेचा ताबा सध्या कर्नाटक एसआयटीकडे असून, गौरी लंकेश हत्येची चौकशी संपल्यानंतरच त्याचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला मिळू शकतो. दरम्यानच्या काळात पानसरे हत्येतील संशयित आणि लंकेश हत्येतील संशयितांमधील समान दुवे शोधले जात आहेत.

संशयित वाघमारेने कर्नाटकातील खानापूरच्या जंगलात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती एसआयटीला दिली आहे. या कामात त्याला मदत करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू आहे. कर्नाटक एसआयटीने गुरुवारी खानापूरच्या जंगलात त्याला नेऊन ठिकाणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आजवर आलेल्या फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार तिन्ही गुन्ह्यात एकच शस्त्र वापरल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. वाघमारेकडून मिळत असलेल्या माहितीमुळे यावर शिक्कामोर्तब होत आहे. कॉम्रेड पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार लंकेश यांच्या हत्येत एकच शस्त्र वापरल्याची खात्रीशीर माहिती कर्नाटक एसआयटीच्या हाती लागली आहे. मात्र, तिन्ही गुन्ह्यात मारेकरी वेगवेगळे असू शकतात, असा दावा एसआयटीने केला आहे. या माहितीमुळे तिन्ही गुन्ह्यांतील तपासाला निर्णायक वळण मिळणार आहे. अंनिसचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मात्र वेगळे पिस्तूल वापरल्याची माहिती कर्नाटक एसआयटीने दिली आहे. दाभोलकर हत्येबाबत सध्या तरी कर्नाटक एसआयटीच्या हाती विशेष माहिती नाही.

महाराष्ट्र एसआयटीवरील दबाव वाढला

पत्रकार गौरी लंकेश यांची सप्टेंबर २०१७ मध्ये हत्या झाली. गेल्या नऊ महिन्यात कर्नाटक एसआयटीने या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली. यात मुख्य सूत्रधार अमोल काळे, मारेकरी परशुराम वाघमारे यांच्यासह पाच जणांचा समावेश आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येला सव्वातीन वर्षे उलटत आहेत. मात्र, या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांना जिल्हा कोर्टाने जामीन मंजूर केला. पोलिसांना गुन्ह्यातील शस्त्र आणि वाहनदेखील मिळाले नाही. कर्नाटक एसआयटीने लंकेश हत्या तपासात गती घेऊन हा तपास निर्णायक टप्प्यावर आणल्याने महाराष्ट्र एसआयटीला मारेकरी आणि सूत्रधार का सापडत नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुराज काँग्रेसचेच...

0
0

आमदार सतेज पाटील यांची स्पष्टोक्ती

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील मोठे नेते असून त्यांचा आदर करतो. भाजपकडून उत्तर विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील इच्छुक असल्याचे जाहीर करुन त्यांनी जिल्ह्यात संभ्रम निर्माण केला. डॉ. डी. वाय. पाटील यांच्यापासून घराण्यात काँग्रेसची परंपरा असून, गेल्या २५ वर्षांपासून एनएसयूआयच्या माध्यमातून पक्ष कार्याला सुरुवात केली. त्यामुळे ऋतुराज पाटील भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण आमदार सतेज पाटील देत विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. आमदार पाटील यांच्या वाढदिनानिमित्त संकलित झालेल्या वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी होते. शुक्रवारी शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला.

भाजप बूथ कार्यक्रमात 'उत्तर'मधून ऋतुराजसह अनेकजण इच्छुक असल्याचे सांगत पालकमंत्री पाटील यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी ऋतुराजबाबत आमदार पाटील हेच स्पष्टीकरण देतील, असे व्यक्तव्य केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू होती. यामुळे जिल्ह्यात विविध चर्चांना ऊत आलेला असताना आमदार पाटील यांनी स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिला. आमदार पाटील म्हणाले, 'पालकमंत्री पाटील यांनी भाजपकडून ऋतुराज 'उत्तर'मधून इच्छुक असल्याचे सांगून संभ्रम निर्माण केला. राजकारणात असा संभ्रम निर्माण करणे, चुकीचे असून आपल्या घराण्याला काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे काँग्रेस सोडून ऋतुराज यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कार्यकर्त्यांनीही संभ्रम दूर करुन विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे.'

'हार किंवा पुष्पगुच्छांऐवजी वह्यांच्या स्वरुपात वाढदिनाच्या शुभेच्छा स्वीकारण्याचा संकल्प केला. या उपक्रमाला जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. उपक्रमाचे अनेकांनी अनुकरण केले. उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षांत जिल्हा परिषद व महापालिका शाळेतील १३ लाख, ५५ हजार विद्यार्थ्यांना ५९ लाख ८४ हजार वह्यांचे वाटप केले. अशा लोकहिताच्या कार्यक्रमांतून 'दक्षिण'मधील दहा हजार लोकांना संजय गांधी निराधार योजनेला लाभ मिळवून दिला. मात्र गेल्या चार वर्षात सरकारी योजनांची दुरवस्था झाली असून, अशा योजनांचे अनुदानच बंद केले आहे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, सर्वसामान्य घटकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. नीरव मोदीसारखे उद्योजक कर्ज बुडवून पलायन करत असल्याने सर्वसामान्यांचा चार वर्षात बँकांवरील विश्वास कमी होऊन बँकांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थाच धोक्यात आली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.'

यावेळी खासदार शेट्टी व महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते अपंग, गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. कार्यक्रमास महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती वनिता देठे, गगनबावडा पंचायत समितीचे सभापती मंगल कांबळे, उपसभापती पांडुरंग भोसले, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, भगवान पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य महादेव नरके यांनी केले.

'आवाज द्या, फौज उभा करु'

खासदार शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जीवाचे रान करत रस्त्यावर उतरत आहेत. अशा लढवय्या नेतृत्वाच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे. खासदार शेट्टी यांनी संघर्षासाठी आवाज द्यावा आपल्यासह कार्यकर्त्यांची फौज उभा करु अशी घोषणा आमदार पाटील करताच सभागृहात टाळ्या शिट्यांचा आवाजात समर्थन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा महासंघातर्फे उद्या शाहू विचारदर्शन प्रदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहूंचे विचार दर्शन व चित्रमय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. रविवारी (ता.२४) राजर्षी शाहू स्मारक भवन येथील कलादालनात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या संशोधनातून प्रदर्शनाची मांडणी करण्यात येणार आहे.

प्रदर्शनात शाहूंची दुर्मिळ छायाचित्रे, त्यांच्या स्वाक्षरीचे अस्सल ठराव, त्यांनी बांधलेल्या वास्तूंची चित्रे मांडण्यात येणार आहेत. रविवारी दुपारी १२ वाजता उद्योजक समीर काळे यांच्या हस्ते व माजी महापौर आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. २७ जूनअखेर सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. रविवारी कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांचे 'राजर्षी शाहूंची प्रशासन व्यवस्था' या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी डॉ. पद्मा पाटील यांच्या 'मानवी अधिकारांचा पुरस्कर्ता : राजा शाहू महाराज' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.

सोमवारी राजर्षी शाहू गौरव सोहळा

जागर फाउंडेशनच्या वतीने सोमवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू गौरव सोहळा राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केला आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशोक गायकवाड, अशोक बामणे, फिरोजखान उस्ताद, डॉ. शिवाजीराव हिलगे, महेश पवार, शिवगोंडा वंदुरे-पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष बी. जी. मांगले यांनी दिली.

'अश्वघोष'च्या वतीने राजर्षी महोत्सव

अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बुधवारी (ता.२७) व गुरुवारी (ता. २८) राजर्षी महोत्सवाचे आयोजन केले आहे. फाउंडेशनच्या वतीने डॉ. भावना ढाबरे, सुजाता कांबळे, अॅड इंद्रजित कांबळे, अनिल म्हमाने यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. गायक कबीर नाईकनवरे, शाहीर उदय भोसले यांचे 'निळं वादळ' कार्यक्रम होणार आहे.

'परिवर्तन'चे शाहू पुरस्कार जाहीर

परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने शाहू पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महापालिका शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्यप्रमुख ए. एम. गुरव, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, उषाराजे हायस्कूलच्या शिक्षिका वर्षा मस्के, जिजाऊ ब्रिगेडच्या सरिता सासने, सामाजिक कार्यकर्ते अनिल पटवणे, साजिद बंडवल, दलितमित्र बळवंतराव माने यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.

०००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवदाम्पत्यांचा सत्कार

0
0

कोल्हापूर: 'लग्नकार्यामध्ये होणारा अवाढव्य व अनावश्यक खर्च टाळून भावी संसार सुखी व समाधानी होण्याच्यादृष्टीने ती रक्कम संसारोपयोगी व विधायक गोष्टींमध्ये गुंतवावी,' असे मत धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी व्यक्त केले. धर्मादाय आयुक्त व सामुदायिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या नवदांपत्याना धनादेश वितरणप्रसंगी बोलत होते. नंदकुमार मराठे यांनी आभार मानले. याप्रसंगी सामुदायिक विवाह समितीचे सदस्य विजयसिंह डोंगळे यांच्यासह, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी, नवदांपत्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेनस्ट्रोकनंतरही 'ती' बनली आई

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विवाहानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर तिची आई बनण्याची इच्छा पूर्ण होणार होती. 'ती' आई होण्याची आतुरतेने वाट पाहत असतानाच दिवस गेल्यानंतर दुसऱ्याच दिवसी ब्रेनस्ट्रोक झाला अन् सुकन्या जाधव (नाव बदललेले आहे) यांच्यासह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण अशाही स्थितीत पत्की हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर यशस्वी उपचार केल्याने त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला.

मुंबईतील ३७ वर्षीय सुकन्याला नऊ वर्षांनंतर दिवस गेले. नऊ वर्षे 'ती' या दिवसाची आनंदाने वाट पाहत होती, पण दिवस गेल्याच्या दुसऱ्याच दिवसी ब्रेनस्ट्रोक झाला. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू झाले, पण यश आले नाही. यावेळी डॉक्टरांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिला. नऊ वर्षांनंतर दिवस गेल्याने सुकन्या व त्यांच्या कुटुंबीयांनी मूल वाढविण्याचा निर्णय घेतला. सुकन्याची जिद्द आणि डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नांनंतर एका गोंडस बाळाचा जन्म झाला.

याबाबत बोलताना सुकन्या म्हणाल्या, 'बाळ न वाढविण्याचा सल्ला डॉक्टरांनी मला दिला होता. त्यावेळी जगणेही नकोस झाले होते. मात्र, डॉ. पत्की यांच्याशी संपर्क साधल्यानंतर एक आशेचा किरण दिसला. या आशेने मी व माझ्या बाळाने अर्धी लढाई जिंकली. डॉ. पत्की यांच्या उपचारांना माझ्यासह बाळानेही साथ दिली. जर डॉ. पत्की यांनी विश्वास दिला नसता तर कदाचित माझे मातृत्व पोरके झाले असते.'

डॉ. सतीश पत्की म्हणाले, 'मेंदूत रक्तस्राव अधिक प्रमाणात झाल्याने सुकन्याला ब्रेनस्ट्रोक आला होता. पण तिला बाळ वाढवायचे होते. रक्त पातळ करण्यासाठी दररोज शंभर एमजीजी दोन इंजेक्शन दिली जात होती. एकही दिवस इंजेक्शनशिवाय राहणे तिच्या जिवावर बेतू शकले असते. सोनोग्राफी करून बाळाची वाढ योग्य पद्धतीने होते का, याची तपासणी केली जात होती. यातून या महिलेची सुखरूप प्रसूती झाली असून, गोंडस बाळाला जन्म दिला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांवर पोलिसांचा हातोडा

0
0

बेशिस्त पार्किंगवरही बडगा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी बेशिस्त पार्किंगसह दुकानदार, फेरीवाले आणि विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली. शहरात विविध ठिकाणी शंभरहून अधिक दुकानदारांचे अतिक्रमण हटवले. यावेळी वाहतुकीला अडथळा ठरणारे फलक आणि फुटपाथवरील विक्रेत्यांचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले. पोलिसांसह महापालिका प्रशासनाने संयुक्तरित्या सुरू केलेली कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.

शहरातील रस्त्याकडेला पार्क केलेली वाहने आणि विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी सीपीआर चौक ते शिवाजी चौक, दसरा चौक ते दाभोळकर कॉर्नर चौक, फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज चौक, कावळा नाका परिसरात पोलिसांनी कारवाई केली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या दोन क्रेन, टोईंग व्हॅन यासह महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. फेरीवाले, बेशिस्त पार्किंग आणि दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे भाऊसिंगजी रोडवरील वाहतूक अनेकदा ठप्प होते. पोलिसांनी भाऊसिंगजी रोडवरील अतिक्रमणांपासूनच या मोहिमेला सुरुवात केली.

वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, अशा सूचना पोलिसांनी फेरीवाल्यांना दिल्या आहेत. यानंतरही फेरीवाले वर्दळीच्या ठिकाणी अर्ध्या रस्त्यात थांबून विक्री करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दुकानदारांच्या अतिक्रमणांबाबत मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. शंभरहून अधिक दुकानदारांच्या लोखंडी पायऱ्या, दुकानांसमोर रस्त्यातच ठेवलेल्या वस्तू, फलक पोलिसांनी जप्त केले. दुकानाबाहेर वाहन पार्किंग करण्यासही पोलिसांनी मज्जाव केला आहे. दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर परिसरातील पाच वाहने पोलिसांनी ओढून वाहतूक नियंत्रण शाखेत नेली. बेशिस्त पार्किंगवर कारवाई सुरू झाल्याचे समजताच अनेकांनी स्वत:हून वाहने हटवली. पाच वाहनांच्या जप्तीनंतर दिवसभरात शहारतील सुमारे ५० हून अधिक वाहने नागरिकांनी स्वत:हून काढून घेतली, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

\Bफूटपाथवरील विक्रेत्यांवरही होणार कारवाई

\Bशहरात अनेक ठिकाणी फूटपाथवर फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. फूटपाथ मंडईमुळे रस्त्याकडेलाच वाहने थांबतात. वर्दळीच्या ठिकाणीच वाहने थांबत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे पादचाऱ्यांना फूटपाथचा उपयोग होत नाही. फूटपाथवरील अतिक्रमणांवरही कारवाई सुरू होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी शहरातील चारही पोलिस ठाण्यांसह वाहतूक नियंत्रण शाखेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमली पदार्थांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टाकाळा परिसरातील एका उद्यानात भरदिवसा गांजासह अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यात पुण्यातील दोन तरुणींचा समावेश आहे. नशेतील तरुणांकडून पोलिसांनी गांजाच्या पाकिटांसह सुमारे एक हजाराचे अमली पदार्थ जप्त केले. अटकेतील तरुण-तरुणींनी नशेत टाकाळा परिसरातील उद्यानात धिंगाणा घातला. दिग्विजय उमेश पाटील (वय २२, रा. ताराबाई पार्क), पद्मराज धनंजय आवटी (२१, रा. माळी कॉलनी), शुभम संगाप्पा गाडवी (२१, रा. माळी कॉलनी, टाकाळा) यांच्यासह दोन तरुणींना पोलिसांनी अटक केली.

राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी टाकाळा परिसरातील एका उद्यानात महाविद्यालयीन तरुण-तरुणी गांजाचे सेवन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण यांच्या पथकाने साडेचारच्या सुमारास टाकाळा परिसरातील उद्यानात जाऊन नशेतील तीन तरुण आणि दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गांजाच्या दोन पुड्या आणि महागडे अमली पदार्थही पोलिसांना मिळाले. हे तरुण सिगारेटमध्ये गांजा घालून ओढत होते. यातील दिग्विजय पाटील हा बीबीएचे शिक्षण घेतो. पद्मराज आवटी आणि शुभम गाडवी बीकॉमला आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही तरुणी पुण्यातील असून, शिक्षणासाठी त्या कोल्हापुरात राहत असल्याची माहिती या तरुणांनी पोलिसांना दिली. शुक्रवारी दुपारी या पाच जणांनी राजारामपुरीतील बारमध्ये मद्यप्राशन केले. यानंतर ते उद्यानात गेले. तेथे ते उघड्यावरच अमली पदार्थांचे सेवन करीत धिंगाणा घालत होते. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे, अमली पदार्थांचे सेवन कलम ८(क) २७ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तरुणांकडून १५ ग्रॅम गांजा, ४ सिगारेट पाकिटे, लायटर, चरससदृश पूड आणि अमली द्रवपदार्थ असा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कॉन्स्टेबल वनिता घार्गे, शोभा कुंभार, दीपाली कांबळे, सुनील जवाहिरे, नीलेश कांबळे, युवराज पाटील, रामचंद्र पांडे, आदींनी ही कारवाई केली.

महाविद्यालयीन तरुणांना अमली पदार्थांची चटक

महाविद्यालयीन तरुण अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केले होते. राजारामपुरी पोलिसांच्या कारवाईने हा गंभीर प्रकार समोर आला. गांजासह चरस आणि अमली द्रवपदार्थही कोल्हापुरात मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुणीही याच्या विळख्यात सापडल्या आहेत. पोलिसांनी याच्या मुळाशी जाऊन अमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट उघडकीस आणण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिन्यांचे चोरी करणारे दाम्पत्य अटकेत

0
0

(फोटो आहेत)

दागिने चोरणारे

दाम्पत्य अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफ दुकानात दागिने चोरणाऱ्या दाम्पत्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. संजय साबळे आणि सुनीता साबळे (दोघेही रा. अभिनंद कॉलनी, सांगली) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांनी चार गुन्ह्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचे सोने आणि कार असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

साबळे दाम्पत्याने १४ जून रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत बालिंगा येथील ओम ज्वेलर्समध्ये जाऊन दागिने खरेदीचा बहाणा केला. यावेळी त्यांनी मंगळसूत्राची चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी शोध घेतला असता, चोरटे सांगलीतील असल्याचे लक्षात आले. संजय साबळे आणि सुनीता साबळे या दोघांनाही सांगलीतून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चार ठिकाणी खरेदीच्या बहाण्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीतील दीड लाखाचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली कार असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निरीक्षक तानाजी सावंत यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शियेजवळ लाखाचे मद्य जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कारचा दरवाजा, बॉनेट आणि सीटखाली लपवून आणलेले गोवा बनावटीचे एक लाख रुपयांचे मद्य व कार असा तीन लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला. करवीर तालुक्यातील शिये फाटा येथे शुक्रवारी (ता. २२) रात्री सापळा रचून ही कारवाई केली. पथकाने चंद्रकांत सीताराम शिंदे (वय २९, रा. भोगटेनगर, कारीवडे, ता. सावंतवाडी) आणि संतोष नामदेव जाधव (३२, रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा, जि. सांगली) यांना अटक केली.

गोवा बनावटीचे मद्य एका वाहनातून कोल्हापुरातून पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या दिशेने जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार शुक्रवारी रात्री शिये येथे वेषांतर करून राज्य उत्पादन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. यावेळी मारुती सुझुकी इको ही संशयित कार पथकाने थांबवली. कारची झडती घेतली असता सीटखाली, दरवाजांच्या पोकळीत आणि बॉनेटमध्ये मद्याचे बॉक्स लपवल्याचे लक्षात आले. कारमधील चंद्रकांत शिंदे आणि संतोष जाधव या दोघांना पथकाने अटक केली. गोवा बनावटीच्या ७५० मिलीच्या २१६ बाटल्या जप्त केल्या. या मुद्देमालाची किंमत एक लाख, सहा हजार ३२० रुपये आहे. कारसह तीन लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले, 'महाराष्ट्र सरकारचा महसूल बुडवून गोवा बनावटीचे मद्य कोल्हापुरात आणले जाते. मद्य तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात नऊ भरारी पथके व तपासणी पथके तैनात केली आहेत. कोकणातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गांवर भरारी पथके कार्यरत आहेत. कडक कारवाई करून मद्य तस्करी रोखली जाईल.' विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या आदेशानुसार निरीक्षक एस. एस. बरगे, दुय्यम निरीक्षक के. बी. नडे, जे. एन. पाटील, जवान संदीप जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, जय शिनगारे, दिलीप दांगट, महिला जवान आर. एच. पिसे, वैभव मोरे आदींनी ही कारवाई केली.

तस्करीसाठी शक्कल

गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी केली जाते. पथकांची नजर चुकवण्यासाठी यापू्र्वी भाजी, फळे, धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वापर केला जात होता. अलिकडे कार, मिनी टेम्पो अशा छोट्या वाहनांचे दरवाजे, सीटच्या खाली आणि बॉनेटमध्येही मद्याचे बॉक्स लपवले जात आहेत. यासाठी वाहनांमध्ये स्वतंत्र रचना केली जाते. पथकाने शुक्रवारी पकडलेल्या कारमध्ये लाखाचे मद्य लपवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरीच्या दारातून कॉन्स्टेबलचीच दुचाकी लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुचाकी चोरट्यांनी थेट शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या दारातून कॉन्स्टेबलचीच दुचाकी चोरून पोलिसांना आव्हान दिले आहे. कॉन्स्टेबल विजय इंगळे यांनी पोलिस ठाण्याबाहेर शहाळे विक्रेत्याच्या स्टॉलसमोर दुचाकी पार्क केली होती. बुधवारी (ता. २०) रात्री आठ ते दहाच्या दरम्यान चोरट्याने दुचाकी लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी आसपास शोध घेतला. मात्र दुचाकी सापडली नाही. पोलिसांनी सेफ सिटीतील स्टेशन रोडवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, त्याचवेळी कॅमेरा बंद होता. पोलिस ठाण्याच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्यातही चोरटा दिसत नाही. या पोलिस ठाण्यात आठवड्यात किमान चार ते पाच दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल होतात. मात्र सोयीस्करपणे पोलिस याकडे दुर्लक्ष करतात. पोलिस ठाण्याच्या दारातून थेट कॉन्स्टेबलचीच दुचाकी चोरी झाल्याने हा प्रकार प्रसार माध्यमांपासून लपवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांच्या वाहनांवरही चोरट्यांची नजर पडल्याने आता तरी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोने अपहाराची कबुली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा शाखेत तारण कर्ज सोन्याचा अपहार केल्याची कबुली बँकेच्या शाखाधिकाऱ्यासह कॅशिअर आणि सराफाने दिली. गेल्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी बँकेतील २७ कर्जदारांचे सुमारे एक किलो सोने काढून त्या ठिकाणी बेंटेक्सचे सोने ठेवले. बनावट सोन्याची खरेदी कसबा बावड्यातील महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अटकेतील तिघांकडून ३२ लाखांच्या सोन्याची वसुली केली जाणार आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा शाखेत कर्जासाठी तारण ठेवलेल्या सोन्याचा अपहार झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. शाखाधिकारी शंकर पाटील, कॅशिअर परशुराम नाईक आणि सराफ सन्मुख ढेरे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, चौकशीदरम्यान या तिघांनी कट करून सोने आपहार केल्याची कबुली दिली. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. बँकेच्या लॉकरमधील २७ कर्जदारांचे तारण ठेवलेले सुमारे एक किलो सोने काढून त्या ठिकाणी बेंटेक्सचे सोने ठेवले. यासाठी कर्जदारांच्या सह्यादेखील बनावट केल्या. सराफ ढेरे याने कसबा बावड्यातील चौगले गल्ली येथील महालक्ष्मी ज्वेलर्समधून बेंटेक्सच्या दागिन्यांची खरेदी केली. तिघांनी बनावट दागिने लॉकरमध्ये ठेवले. खरे सोने तिघांमध्ये वाटून घेतल्याची माहिती संशयितांनी दिली आहे.

तोंड फुटले

अटकेतील तिघांनी सुरुवातीला तपासात असहकार्य केले होते. अपहाराची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात होती. या गुन्ह्याचे ठोस पुरावेदेखील उपलब्ध नसल्याने त्यांना बोलते करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. अखेर अपहाराच्या रकमेचा बोजा मालमत्तेवर चढवणार असल्याचे पोलिसांनी सांगताच तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिस कोठडी संपल्याने या तिघांनाही जिल्हा कोर्टात हजर केले होते. कोर्टाने २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत वाढ केली. अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत आणि उपनिरीक्षक सचिन पंडित यांच्याकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images