Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मान्सूनची दमदार हजेरी

0
0

फोटो आहेत...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह जिल्ह्यात मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला. रविवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यानंतर भुदरगड, चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी तुंबले. रविवार असल्याने आठवडा बाजार आणि पर्यटकांची तारांबळ उडाली. फेरीवाले मिळेल तिथे आश्रय घेताना दिसत होते. पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट, छत्री घेण्यासाठी बाजारपेठेतील सर्वच दुकानांत मोठी गर्दी राहिली. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली.

शनिवारी दिवसभर ढगांनी आकाश भरून आले होते. कोणत्याही क्षणी दमदार पावसाला सुरुवात होईल, असे वातावरण तयार झाले होते. मात्र, दिवसभर पावसाने चकवा दिला. रात्री उशिरा जोरदार सलामी दिली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली. आठवडा बाजार असल्याने लक्ष्मीपुरी आणि कसबा बावडा येथील भाजीपाला, बाजारपेठेतील विक्रेत्यांची धावाधाव झाली. घरी वेळेत पोहोचणे आवश्यक असल्याने काही पादचाऱ्यांनी रिक्षाने जाणे पसंत केले. यामुळे सर्वच स्टॉपवरील रिक्षांना चांगली मागणी राहिली.

यंदाच्या पावसाळ्यात पहिलाच संततधार पाऊस असल्याने अडगळीत ठेवलेले छत्री, रेनकोट बाहेर काढण्याची धांदल घराघरांत राहिली. वापरण्यायोग्य साहित्य नसल्यास पावसाळ्याचे साहित्य विक्री दुकानात रेनकोट, छत्री खरेदीसाठी गर्दी दिसत होती. जीएसटीमुळे महाग झाल्याने आपल्या बजेमध्ये असलेले साहित्य खरेदी केले जात होते. शहरातील रामानंदनगर, जरगनगर, रेणुका मंदिर परिसर, शास्त्रीनगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, कुंभारवाडा परिसरात चिखलाचे साम्राज्य राहिले. नाल्यामधील पाणीही वाढल्याचे दिसत होते. सखल भागात तुंबलेले पाणी काढण्यासाठी परिसरातील काही तरुण, कार्यकर्ते प्रयत्न करीत राहिले.

हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा वगळता उर्वरित तालुक्यांत दमदार पावसामुळे जमिनीत ओल झाली आहे. शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच कृषिसेवा केंद्रांत बियाणे, खते खरेदीसाठी झुंबड उडाली. सर्वच बियाणे, खतांचे दरही जीएसटीने वाढल्याने पैसे कमी पडलेल्यांना उसनवार, उधारीसाठी विनंती करावी लागली. एकाचवेळी पेरणीचे काम सुरू झाल्याने शिवार फुलून गेले होते. मागणी वाढल्याने मजुरांची टंचाई राहिली. बैलजोड्या मिळत नसल्याने मिनी ट्रॅक्टरचा वापर पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

००००

धरणक्षेत्रात जोर

सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. कोदे पाटबंधारे प्रकल्प परिसरात तब्बल ११३ मिलिमीटर, तर घटप्रभा पाटबंधारे परिसरात १०४ मिलिमीटर पाऊस झाला. चिकोत्रा, चित्री पाणलोटमध्येही अतिवृष्टी झाली. सर्वच १८ पाटबंधारे प्रकल्पांत जोरदार पाऊस झाला. परिणामी प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

००००

एकूण ३२९ मिलिमीटर पाऊस

सकाळी आठपर्यंत चोवीस तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस असा : हातकणंगले : ३.२५, शिरोळ : १, पन्हाळा : ५. १४, शाहूवाडी : ३२.८३, राधानगरी : ३१.६७, गगनबावडा : ६४. ५०, करवीर : १२.२७, गडहिंग्लज : २२.३८, भुदरगड : ५६.२०, आजरा : २८, चंदगड : ४३.

००००

पर्यटकांची तारांबळ

शैक्षणिक सुट्टीतील शेवटचा रविवार असल्याने अंबाबाई मंदिरात दर्शनासाठीही भाविकांची मांदियाळी होती. परराज्य, जिल्ह्यांतील भाविकांमुळे मंदिर परिसरातील पार्किंगही फुल्ल राहिले. पर्यटकांची तारांबळ उडाली. चारचाकीतून आलेल्या सर्व भाविकांकडे छत्री नसल्याने मंदिरापर्यंत त्यांना पावसातून भिजत जावे लागले. पावसामुळे अनेक जण कार्यक्रम, खरेदीसाठी दुचाकीऐवजी चारचाकी रस्त्यावर आणल्याने मुख्य रस्त्यावर काहीवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. दुपारनंतर पाऊस कमी झाल्याने हवेतील गारवा कमी झाला.

००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आराम बस उलटून १५ प्रवासी जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबवडे (ता. पन्हाळा) येथे खासगी आराम बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. सातारा न्यू इंग्लिश स्कूलचे १९७७ च्या बॅचमधील विद्यार्थी शनिवारी जोतिबा पन्हाळा सहलीसाठी आले होते. सहल आटोपून परत पुण्याकडे जात असताना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात घडला.

जखमींची नावे अशी : केतन गोविंद महाजनी (वय ५४), रवींद्र गणपतदास शेठ (५५), राधिका मोहन तक (५५), विनोद बळवंत गोडबोले (५२), मुकुंद विनायक मोघे (५४), नलिनी विलास पोवार (५४, सर्व रा. सातारा ), प्रशांत मनोहर कुलकर्णी (५४), रिता राजेंद्र चिटणीस (५५), विजय वसंत कुलकर्णी, सुप्रिया फडणीस (५५), उमेश कुलकर्णी (५५, सर्व रा. पुणे), अनुश्री चैतन्य चिरमुले (५५), शिवानंद मधुकर देशपांडे (५६), विवेक नेवाळकर (५५), दिनेश पेंढारकर (३४, सर्व रा. मुंबई), नितीन बुधकर (५६, रा. नाशिक), अंजली देशमुख (५४, रा. बेंगळुरू).

सातारा न्यू इंग्लिश स्कूलच्या १९७७ च्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केला होता. शनिवारी (ता.९) सकाळी सर्वजण खासगी आराम बसने जोतिबा येथे आले. देवदर्शन करून शनिवारी दुपारी पन्हाळा येथे फेरफटका मारून रात्री तिथेच मुक्काम केला. रविवारी दुपारी जेवण आटोपून पुण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरात न येता वारणा कोडोलीमार्गे राष्ट्रीय महामार्गावर जाण्याचा निर्णय चालकाने घेतला. पन्हाळ्यातून बोरपाडळे घाटाकडे जात असताना आंबवडे येथे चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली. अपघातानंतर चालक पळून गेला. दरम्यान, वाहनचालक व परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना बसमधून बाहेर काढले. अपघाताची माहिती पन्हाळा व कोडोली पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर बांबवडे, पन्हाळा, वारणा, बोरपाडळे येथील १०८ रुग्णवाहिकेने जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल केले.

दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच सीपीआरमध्ये निवासी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पन्हाळ्याचे प्रभारी तहसीलदार अनंत गुरव सीपीआरमध्ये आले. अपघाताचे वृत्त कळताच जखमींच्या कोल्हापुरातील नातेवाइकांनी धाव घेतल्याने गर्दी झाली होती.

००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओढ्यात बुडून वृद्धाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पन्हाळा येथील चव्हाणवाडीत ओढ्यात बुडून गणपती भाऊ खाडे (वय ७३) यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खाडे हे ओढ्यावर म्हशी धुण्यासाठी गेले. ते घरी परतले नसल्याने नातेवाइकांनी ओढ्याकडे धाव घेतली असता खाडे पाण्यात बुडालेले दिसले. बेशुद्धअवस्थेतील खाडेंना ताबडतोब सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतूकदारांचा आज मोर्चा

0
0

कोल्हापूर : इंधन, टोल टॅक्स आणि थर्डपार्टी विमा इन्शुरन्समध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनतर्फे सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कावळा नाका येथून सकाळी अकरा वाजता मोर्चाची सुरुवात होईल. यामध्ये सर्व मालवाहतूकदार संघटना, ट्रान्स्पोर्टधारक, ट्रकधारक, टेम्पो, डंपर, टॅकरधारक, अर्थमूव्हर्स सहभागी होणार आहेत. सरकारने केलेली इंधनाची भरमसाठ दरवाढ मागे घ्यावी, मालवाहतुकीचे दर किलोमीटरप्रमाणे ठरवून द्यावेत, यांसह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येईल. मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांचनवाडीत युवकाला डेंगीची लागण

0
0

म. टा. वृत्तसेवा , कुडित्रे

कांचनवाडी (ता. करवीर) येथे पंधरा दिवसांपूर्वी डेंगीचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर पुन्हा गावात विक्रम महादेव पाटील या युवकाला डेंगीची लागण झाल्यामुळे गावात नागरिकांत घबराट पसरली असून आरोग्य विभागाने व ग्रामपंचायतीने तत्काळ यावर उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.

विक्रम पाटील यास डेंगीची लागण झाल्याचे समजताच उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्णात आनंदराव सुतार यांना १५ दिवसांपूर्वी लागण झाली होती. उपचारानंतर ते बरे होतात न होतात तोच विक्रम महादेव पाटील हा डेंगीची लागण झालेला दुसरा रुग्ण आढळल्याने गावातील स्वच्छतेबाबत ग्रामस्थांतून नाराजी सूर उमटत आहेत. पंधरवड्यात कांचनवाडी गावात डेंगीचे दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासना बद्दल ग्रामस्थांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळा महागला

0
0

पावसाळी वस्तूंनी बाजारपेठ बहरली

खरेदीसाठी गदीर् वाढू लागली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मान्सून सुरू झाल्याने पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. रेनी सिझन सुरु झाल्याचे चित्र अवतरले असून लहान मुले, तरुण वर्ग ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आपआपल्या आवडीनिवडीनुसार वस्तूंची खरेदी करत आहेत. कायम स्टाईलला जपणारी तरुणाई देखील काही नाविन्यपूर्ण करत नजरेत राहावे यासाठी प्रयत्न करत आहे. यंदा बाजारात नवनवीन कल्पकता दाखवत आकर्षक वस्तू उपलब्ध झाल्या आहेत.

विविध रंगाढंगातील आकर्षक कलरफुल छत्र्यांनी बाजारपेठ बहरली आहे. दुकानात प्रवेश केल्यावर टांगलेल्या छत्र्या लक्ष वेधून घेतात. यात तीन व दोन घडीच्या छत्र्या उपलब्ध आहेत. तरुणींसाठी लहान आकाराच्या पर्समध्ये मावतील अशा छत्र्या आहेत. यात गुलाबी रंगाला सर्वाधिक मागणी आहे. जुन्या काळातील लांब दांडा असणाऱ्या छत्र्यांना देखील पसंदी दिली जात आहे. १५० ते १००० रुपयांपर्यंत सर्व प्रकारच्या छत्र्या बाजारात सहज उपलब्ध आहेत. छत्र्यांमध्ये तीन घड्य़ा असलेल्या छत्र्यांना पसंती मिळत आहे. तसेच बॅगचे संरक्षण करण्यासाठी बॅगपॅक मिळत असून त्याची किंमत ८० रुपयापासून सुरु होते आहे.

छत्र्यांसोबत रेनकोटस्, बॅग्स, जॅकेट, आणि फुटवेअरच्या नावीन्यपूर्ण वस्तूंनाही पावसाळी शॉपिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. सध्या तर सर्वाधिक आकर्षण असलेला न्युआन लाईट्सचा चमकणारा कोट लोकप्रिय होत आहे. वॉटर प्रिंट, ट्रान्स्परंट, चेन, मिड टॉप, लाँग टॉप, रेनकोटमधील प्रकार पाहायला मिळतात. त्यातील रंगसंगती आकर्षक लक्ष वेधणारी आहे. तरुणांसाठी पँट-शर्ट, पॅराशूट, नायलॉन आणि ट्रान्स्परंट आदी प्रकार दाखल झाले आहेत. तरुणींसाठी अम्ब्रेला, लाँग कोट, टॉप विथ स्कर्ट असे रेनकोटचे प्रकार आहेत.

यंदा पावसाळ्यातील वस्तूंवर महागाईचे सावट आहे.वस्तूंवर ५ ते १२ टक्क्यांपर्यंत जीएसटी लागू झाल्याने सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. छत्र्यांना मात्र १२ टक्के जीएसटी लागू झाल्याने त्यांची दरवाढ अपरिहार्य झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत छत्र्यांच्या किमतीत दुप्पटीने वाढ झाली आहे.

...................

कोट:::

'यंदा बाजारपेठेत चांगली उलाढाल होईल असा अंदाज आहे. अनेक नाविन्यपूर्ण स्टाईल्स बाजारात उपलब्ध केले आहेत. तरुणाईत नामवंत ब्रँडच्या वस्तूंना सर्वाधिक मागणी आहे.

आशिष तुर्कीया, विक्रेता

................

फोटो- अमित गद्रे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरची पंचगंगा नदी चोरीला, शंभर तक्रारी

0
0

कोल्हापूर:

गेल्या २० वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली कोल्हापुरातील पंचगंगा नदी आज चक्क चोरीला गेली आहे. विश्वास बसत नाही ना? पण ते खरे आहे. शंभरहून अधिक लोकांनी आज हातकणंगले पोलीस ठाण्यात धाव घेऊन नदी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे.

आज सकाळी शंभरहून अधिक लोक मासे पकडण्याचे जाळे आणि हलगी घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाले. या सर्वांनी पंचगंगा नदी चोरीला गेल्याच्या वैयक्तिक लेखी तक्रारी पोलिसांना दिल्या आहेत.' आम्ही सकाळी नदीवर गेलो. पण नदीच अस्तित्वात नाही. नदी चोरीला गेली असून नदी चोरणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करा,' असं या तक्रारीत तक्रारदारांनी म्हटलं आहे. नदी चोरीला गेल्याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

दरम्यान, गेल्या वीस वर्षांपासून नदीमध्ये प्रदूषण झालं आहे. या नदीत जलपर्णी वाढल्या असून प्रदूषणामुळे नदीचं पाणी दूषित झालं आहे. मोठा पाऊस झाला की दुसऱ्या दिवशी पंपिग स्टेशन बंद पडते. मैलायुक्त सांडपाणी नदीत मिसळते. जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजारसह छोटे-मोठे नाले नदीत मिसळतात. जयंती नाल्याचे पाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाते. हा अपवाद वगळता पंचगंगा नदीने प्रदूषणाचे टोक गाठले आहे. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतरही थातूरमातूर कारवाईनंतर नदीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता नदी अत्यंत दूषित झाल्याने स्थानिकांनी पोलीस ठाण्यात येऊन नदी चोरीला गेल्याची तक्रार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन दरवाढ तातडीने रोखा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेट्रोल-डिझेलची दरवाढ तातडीने रोखा तसेच थर्ड पार्टी विमा हप्त्यात केलेली वाढ कमी करून कोल्हापूर-मुंबई मार्गावर ट्रक टर्मिनलची उभारणी करण्याची मागणी सोमवारी मालवाहतूकादारांनी केली. या मागण्यांसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढण्यात आला. प्रचंड घोषणाबाजी करत मालवाहतूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय व मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.

सकाळी ११ वाजता ताराराणी चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. एसटी स्टँड, दाभोळकर कॉर्नर, गोकुळ हॉटेल, बसंत-बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. लॉरी असोसिएशनचे मालवाहतूकदार लक्षवेधी फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. 'पेट्रोल-डिझेल दर कमी करा', 'थर्ड पार्टी विमा हप्ता कमी करा,' आदी घोषणा देत मोर्चाचा मार्ग दणाणून सोडण्यात आला. मोर्चातील बैलगाडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अडवण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुभेदार यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विजय भोसले यांचा समावेश होता.

निवेदनात म्हटले आहे, 'क्रुड तेलाचे भाव कमी झालेले असताना सरकारने अतिरिक्त कर लावून पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. केंद्र सरकारने अतिरिक्त कर लावलेला असताना राज्य सरकारने दुष्काळ कर लावून मालवाहतूकदारांवर जास्तीचा बोजा टाकला आहे. त्याचबरोबर इंधनावर शिक्षण व कृषी कराची आकारणी केली जात असल्याने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल लिटरला सहा ते नऊ तर डिझेल तीन ते पाच रुपये जादा द्यावे लागत आहेत. यातून मालवाहतूकदारांची सुटका करण्यासाठी इंधनाचा समावेश जीएसटीमध्ये करावा, यामुळे इंधन दर स्वस्त होऊन वाहनधारकांना दिलासा मिळेल. थर्ड पार्टी हप्त्यात २६ टक्के वाढ केल्यामुळे जुन्या वाहनधारकांना वाहनांच्या किमतीएवढा विमा हप्ता भरावा लागत आहे. टोल टॅक्समध्ये १८ टक्के वाढ केली आहे. रस्ते बांधणीनंतर सर्व रक्कम वसूल झालेली असताना टोल बंद करण्याऐवजी त्यात वाढ केल्यामुळे वाहनधारकांना वाहतूक व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे. कोल्हापूर ते मुंबई सहापदरी रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्याने वाहतूकदारांना विश्रांतीसाठी जागाच मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक ७० किमी अंतरावर ट्रक टर्मिनल उभारावे.

मोर्चात शिवाजी चौगुले, जगदीश सोमेय्या, विलास पाटील, पंडित कोरगांवकर, विजय पोवार, शशांक जाधव, गोविंद पाटील, उमेश महाडिक, प्रकाश भोसले, बबन महाजन यांच्यासह जिल्ह्यातील बॉक्साईट, वाळू, ऊस वाहतूकदार सहभागी झाले होते.

................

मालवाहतूकदारांच्या मागण्या

सरकारी अंतरानुसार किलो मीटरप्रमाणे वाहतूक भाडे द्यावे

पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करावी

वाढीव थर्ड पार्टी विमा कमी करा

वाढीव टोल टॅक्स कमी करा

कोल्हापूर-मुंबई मार्गावर ट्रक टर्मिनलची निर्माण करा

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महामंडळ नियुक्तींची उत्कंठा

0
0

चुयेकरांना देवस्थान समिती; सुनील मोदी, संजय पवारांनाही संधी?

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी माणिक पाटील चुयेकर यांची नियुक्ती होण्याची चिन्हे आहेत. विद्यमान अध्यक्ष महेश जाधव यांना अंबाबाई मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद देण्यात येणार असून याबाबतची घोषणा येत्या पंधरा दिवसांत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुनील मोदी, संजय पवार, विजय जाधव, अॅड. संपतराव पवार, आर. डी. पाटील यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या अनेकांची विविध महामंडळावर नियुक्ती करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने आता महामंडळाच्या नियुक्तीला राज्यात वेग आला आहे. सोमवारी उर्वरित विकास महामंडळ, विदर्भ विकास महामंळाबरोबरच कृष्णा खोरे महामंडळाच्या अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. ते येताच राज्यातील अनेक महामंडळावर भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी जवळजवळ १२०० सदस्यांची यादी तयार आहे. भाजपला सत्तर तर सेनेला ३० टक्के जागा देण्यात येणार आहेत. त्यासाठी दीड वर्षांपूर्वीच नावे मागवली होती. गेले महिनाभर याबाबत प्रक्रिया सुरू होती. ती आता अंतिम टप्यात आली आहे. मुख्यमंत्री परदेशातून येताच महामंडळ नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

कोल्हापुरातील पाच ते सहा कार्यकर्त्यांना विविध महामंडळावर संधी मिळणार आहे. त्यामध्ये माणिक पाटील चुयेकर यांचा समावेश आहे. चुयेकरांनी पदवीधर निवडणुकीतून माघार घेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला होता. तेव्हाच त्यांना महामंडळाचा शब्द देण्यात आला होता. त्यानुसार त्यांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद देण्यात येणार आहे. यामध्ये तीन हजारावर मंदिरांचा समावेश आहे. अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे. देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष जाधव हे शहरातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना या नव्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद देण्यात येणार आहे. याशिवाय उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष तसेच काही सदस्यांची देखील लवकरच नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

विजय जाधव यांना पर्यटन विकास महामंडळाचे सदस्यत्व मिळणार आहे. अॅड. संपतराव पवार, अशोक देसाई व माजी नगरसेवक आर.डी. पाटील, अशोक देसाई यांचीदेखील विविध मंडळावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या कोट्यातून जिल्हाप्रमुख संजय पवार यांना औद्योगिक विकास अथवा प्रदुषण नियंत्रण महामंडळ व माजी नगरसेवक सुनील मोदी यांची एस. टी. महामंडळाचे सदस्य म्हणून संधी मिळणार असल्याचे समजते.

अनिल यादव गोकुळचे संचालक

युती न झाल्यास शिरोळमधून अनिल यादव यांना भाजपची उमेदवारी देण्यात येणार आहे. पक्षात येताना त्यांना मोठे महामंडळ देण्याचा शब्द देण्यात आला होता. पण महामंडळासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याने आता यादव यांना गोकुळ चे संचालकपद मिळणार आहे. सध्या येथे दोन जागा रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या डोळ्यासमोरच देवघेव

0
0

फाइल फोटो

....................

पान ५ मेन

......................

पोलिसांच्या साक्षीनेच होते लाचखोरी

करवीर तहसील कार्यालयात खुलेआम देवघेव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नजरेसमोरच सतत पोलिसांचा वावर असतानाही त्यांच्या साक्षीनेच करवीर तहसील व तलाठी कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरू आहे. खैबर नायवडीला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने या कार्यालयातील लाचखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे. पोलिसांच्या नजरेसमोरच होत असलेल्या या देवाणघेवाणामुळे पोलिसांची भीतीच नसल्याचे स्पष्ट होत आहे.

करवीर तहसीलदार व तलाठी कार्यालयात नेहमीच गर्दी असते. जिल्ह्यातील इतर तहसील कार्यालयांपेक्षा या कार्यालयातच नियुक्ती व्हावी यासाठी अनेक अधिकारी व कर्मचारी नेहमीच प्रयत्न करत असतात. शहराबरोबरच तालुक्यातील जमिनीच्या व्यवहाराबरोबरच इतर अनेक कामे येथे असतात. काम जास्त असले तरी कमाई देखील जादा असल्यानेच येथे काम करण्यास अनेकजण पहिली पसंती देतात. या कमाईमुळे दोन वर्षात या कार्यालयात तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. तिघे रंगेहाथ सापडले असले तरी येथे रोजच देवघेव सुरूच असते. ते देखील पोलिसांच्या साक्षीनेच. पोलिस ठाण्याच्या आवारातच तहसील कार्यालय आहे. या कार्यालयाच्या दारातच सतत पोलिस असतात. तरीही या कार्यालयात लाचखोरीचा प्रकार खुलेआम सुरू असतो.

शुक्रवारी या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक खैबर नायकवडी यास तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आलेल्या प्रत्येकाला खैबर खिंडीत गाठून त्याला लुटण्याचे कसब या नायकवडीला चांगलेच माहित होते. त्यामुळे गेले वीस वर्षे त्याच्याकडे मोक्याचेच टेबल असे. माजी मंत्र्यांचा पी.ए. असल्याने त्याचा रूबाब मोठा होता. यामुळे बदली होवूनही तो आपल्याला हव्या त्याच ठिकाणी रहायचा. त्याला अटक केल्याने आता त्याच्या कारनाम्याची नव्याने चर्चा रंगत आहे.

यापूर्वी याच कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. ही लाच कार्यालयाबरोबरच चहाच्या गाड्यावर घेतली जाते. तेथेही अनेकदा पोलिस असतात. पोलिसांच्या नजरेसमोरच लाच घेण्याचे धाडस या कार्यालयातील कर्मचारी करतात. काहींनी त्यासाठी एजंट नेमले आहेत. बडतर्फ केलेला एक कर्मचारी येथे एजंट म्हणून वावरतो. याशिवाय संजय, समीर, अशोक अशा विविध नावांची माणसे सतत या कार्यालयात घुटमळत असतात. अधिकारी त्यांना फारच प्रेमाने वागवतात. कारण त्यांच्याकडूनच कमाईचे अनेक मार्ग आणि गिऱ्हाईक देखील मिळतात.

तलाठी आणि तहसील कार्यालयात असलेल्या रेकॉर्ड रूमबरोबरच संजय गांधी निराधार योजना, दस्त नोंदणी, रेशन कार्ड विभागातील कर्मचाऱ्यांची रोजची कमाई जोरात असते. येथे प्रत्येक कामाचे दर ठरलेले असतात. दस्त नोंदणी, नवीन खरेदी, बँकेचा बोजा कमी करणे अशा कामासाठी मनात येईल तो आकडा सांगितला जातो. काम होणे महत्वाचे असल्याने म्हणेल ती रक्कम दिली जाते. त्यामुळे येथे मोठी कमाई होत असल्यानेच प्रत्येकजण करवीर तहसील कार्यालयात येण्यासाठी धडपडत असतो. नायकवडी याच्यावर कारवाई झाल्याने या कार्यालयात नेमके काय चालते हेच उघडकीस आले आहे.

चौकट

तहसीलदारांची चौकशी

करवीरचे तहसीलदार तुकाराम दिघे यांना नुकतीच उपजिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाली. त्यांची सध्या एका प्रकरणात चौकशी सुरू आहे. कुळ कायदा जमीनीबाबत दिलेला आदेश फिरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात देखील मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट सोने तारणप्रकरणी फौजदारी जिल्हा बँकेचा निर्णय

0
0

जिल्हा बँक लोगो

...................

बनावट सोने तारणप्रकरणी फौजदारी

शाखा व्यवस्थापक, सराफ, रोखपाल यांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेतील बनावट सोने तारणप्रकरणाचा चौकशी अहवाल सोमवारी प्राप्त झाला. या अहवालामध्ये शाखा व्यवस्थापक संभाजी पाटील, सराफ सन्मुख ढेरे व रोखपाल नाईक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून मंगळवारी सर्व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेत बनावट सोने तारण प्रकरण उघडकीस आले होते. शिये येथील वंदना मोरे यांनी तारणे ठेवलेले सोने परत घेतले असता, संपूर्ण सोने बनावट असल्याचे निदर्शनास आले. मोरे यांनी याबाबत जिल्हा बँकेशी संपर्क साधल्यानंतर बँकेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, मुदत संपलेल्या शाखेतील १४ कर्जदारांना नोटीस बजावल्या होत्या. पण या कर्जदारांनी बँकेकडे पाठ फिरवल्याने सोने तारण प्रकरणातील गांभीर्य वाढले होते. त्यानुसार शाखेतील सर्वच सोन्याच्या दागिन्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी व रविवारी कर्जदारांच्या साक्षीनेच सोन्याची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान काही कर्जदारांच्या तपासणीमध्ये सोने नसल्याचे समोर आले. तर २३ पिशवीमधील १२५ तोळे सोने बनावट असल्याचे समोर आले आहे. बाजारभावाप्रमाणे सोन्याची ४० ते ४५ लाख रुपये किंमत होत आहे. चौकशी अधिकारी आलासे यांनी सोमवारी चौकशी अहवाल जिल्हा बँकेकडे सादर केला. याबाबत चेअरमन हसन मुश्रीफ यांनी बोलण्यास असमर्थता दाखवली असली, तरी दोषींवर मंगळवारी फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीतून फायदा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तुलनात्मक अभ्यास, जोखीम आणि दीर्घ मुदतीची गुंतवणूकीचा अभ्यास केल्यास शेअर बाजारात फायदा मिळू शकतो. त्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सल्ला गुंतवणूक विश्लेषक संजीव झारबडे यांनी दिला. कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन आणि सिक्युरिटीज् अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 'आउटलूक ऑन इक्विटी मार्केटस्' विषयावर आयोजित व्याख्यानात झारबडे म्हणाले, 'कोणत्याही क्षेत्रात फायदा मिळविताना अभ्यास आणि नियोजन महत्त्वाचे आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत कोणीही सल्ला देते. मात्र परतावा चांगला मिळण्यासाठी योग्य सल्ला महत्त्वाचा आहे. शेअर्समधील पाच हजार कंपन्याचा अभ्यास करणे कठीण काम आहे. मात्र शेअर बाजारातील विश्लेषण सहज करता येऊ शकते. त्यासाठी बाजारात सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, मात्र संबधित शेअर बाजार कंपनीत गुंतवणूक करायची आहे. त्या कंपनीचा अभ्यास महत्त्वाचा आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अजित गुंदेशा यांनी असोसिएशनतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. प्रवीण ओसवाल, रवींद्र सबनीस आदी उपस्थित होते. संचालक अशोक पोतनीस यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. असोसिएशनचे सेक्रेटरी राजीव शहा यांनी सूत्रसंचालन केले. सहसेक्रेटरी विपीन दावडा यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकाला सहा महिने शिक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी बीभीषण अजीनाथ काळे (वय ४०, रा. आनंद पार्क, दानोळी रोड, पुणे) याला कोर्टाने सहा महिने साधी कैद व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी सोमवारी (ता. ११) हा निर्णय सुनावला. सरकार पक्षातर्फे यहायक सरकारी वकील आर. आर. देशपांडे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. अपघाताचा गुन्हा शाहुपूरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ शॉपीमध्ये ७१ लाखांचा अपहार

0
0

गोकुळ शॉपीमध्ये ७१ लाखांचा अपहार

शॉपी व्यवस्थापक अमित पवार यांच्यावर रक्कम निश्चित

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) च्या जुन्या पुणे-बेंगळरु रोडवरील शॉपीमध्ये ७१ लाख २८ हजार ७८ रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशी अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. सुमारे सहा महिन्यांच्या चौकशीनंतर चौकशी अधिकारी तथा विशेष लेखापरीक्षक जी. व्ही. निकाळजे यांनी अहवाल विशेष कार्यकारी अधिकारी लेखापरीक्षा मंडळ (पदूम) यांच्याकडे सादर केला असून शॉपी व्यवस्थापक अमित अशोकराव पवार यांच्यावर अपहारातील रक्कम निश्चित केली आहे. चौकशी अहवालानंतर गोकुळचे प्रशासन कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गोकुळच्या हॉटेल ओपल शेजारील शॉपीमधून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री होते. २०१२ पासून शॉपी व्यवस्थापक म्हणून गोकुळच्या माजी संचालिका रंजना अशोकराव पवार (राशिवडे) यांचे चिरंजीव अमित पवार कार्यरत आहेत. पवार यांनी एप्रिल २०१६ ते जुलै २०१७ मध्ये गोकुळकडून प्राप्त झालेल्या मालाची विक्री केल्यानंतर रक्कम संबंधित विभागाकडे जमा न करता अन्यत्र वळवली. याबाबत सुमारे ६३ लाख १८ हजार रुपयांचा अपहार झाल्याची शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही करण्यात आली होती. तक्रारीनंतर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला, पण तक्रारदार माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी विभागीय सहनिबंधक, उपनिबंधक यांच्याकडे तक्रारीचा पाठपुरावा केला.

आमदाप पवार-पाटील यांच्या तक्रारीनुसार विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी चौकशी अधिकारी म्हणून निकाळजे यांची नियुक्ती केली. निकाळजे यांनी नोव्हेंबरपासून चौकशी सुरू केली होती. चौकशीस विलंब होत असल्याने पुन्हा पवार-पाटील यांनी उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर नऊ मे रोजी निकाळजे यांनी ५९ पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये ६३ लाख ४५ हजार ५९२ रुपयांची दुग्धजन्य पदार्थांची विक्री करुन रक्कम गोकुळकडे जमा न केल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच पवार यांनी गोकुळकडून आलेल्या पदार्थांची नोंदच आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंद केलेली नाही. १८ लाख १८ हजार रुपयांचे धानदेश न वटल्यामुळे या रकमेची जबाबदारी पवार यांच्यावर निश्चित केली आहे. पवार यांनी आपल्या १६ मित्र व नातेवाईकांच्या नावे धानदेश परस्पर दिल्याचेही चौकशी अहवालामध्ये नमूद केले आहे. तसे खुलासेही चौकशी अधिकाऱ्यांना सादर केले आहेत.

१६ महिन्यात पवार यांनी मालाची विक्री करुन संघाकडे भरणा केला नाही. ही बाब अतंर्गत लेखापरीक्षणामध्ये का समोर आली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या अपहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी करण्याची मागणी आमदार पवार-पाटील यांच्याकडून करण्यात येणार आहे.

चौकट

अपहाराची जबाबदारी नाकारली

पवार यांनी शॉपीमध्ये केलेल्या अपहाराची गेल्या सहा महिन्यांपासून चौकशी सुरू होती. चौकशी अधिकाऱ्यांनी पवार यांच्यासह ज्यांच्या नावे धनादेश दिले आहेत, अशा सर्वांकडून नोटीस देवून खुलासा मागवला आहे. यामध्ये पवार यांनी अपहाराची जबाबदारी नाकारत अनेक ठिकाणी फेरफार झाल्याचा लेखी खुलासा चौकशी अधिकाऱ्यांकडे केला आहे. यामुळे अपहाराची व्याप्ती वाढण्याची शक्यता तक्रारदारांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी ४१ अर्जांची विक्री

0
0

वाढीव मतदारांवरून गोंधळ

पक्की मतदार यादी जाहीर होण्यास विलंब, पहिल्याच दिवशी ४१ अर्जांची विक्री

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत वाढीव मतदारांवरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सीमाभागातील ४४ वकिलांनी सभासदत्व स्वीकारल्याने ऐनवेळी वाढलेल्या सभासदांना मतदार यादीत स्थान देऊ नये, अशी भूमिका ज्येष्ठ वकिलांच्या एका गटाने घेतली आहे. यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत पक्की मतदार यादी जाहीर होऊ शकली नाही. दरम्यान, अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी ४१ अर्जांची विक्री झाली.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान होणार आहे. सोमवारी संध्याकाळी मतदारांची पक्की यादी जाहीर होणार होती. या यादीत सीमाभागातील बेळगाव, निपाणी आणि चिकोडी येथील ४४ वकिलांची नावे असल्याने यावर ज्येष्ठ वकिलांच्या एका गटाने आक्षेप घेतला. सीमाभागातील वकिलांना बार कोड नाही, त्यामुळे त्यांना मतदार यादीत स्थान मिळू नये, असा आग्रह ज्येष्ठ वकिलांनी धरला आहे. मतदार यादीवर आक्षेप घेतल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत पक्की मतदार यादी जाहीर होऊ शकली नाही. सुमारे २५०० मतदारांची अंतिम यादी मंगळवारी सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे.

मतदार यादीतील वाढीव मतांबाबत बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, 'कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत वकिलांना बार असोसिएशनने बार कोड दिला आहे. या कोडची हायकोर्टाकडे नोंदणी आहे. नियमानुसार जे वकील कोल्हापुरात काम करतात आणि ज्यांच्याकडे बार कोड आहे अशाच सभासदांना मतदारांचा अधिकार आहे. सीमाभागातील ४४ मतदारांवर काही वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे. ऐनवेळी सभासद झालेले आणि बार कोड नसलेल्या सभासदांची नावे वगळून नव्याने यादी जाहीर केली जाईल.' वाढीव मतदारांबाबत विरोधी गटाचे प्रमुख अॅड. प्रकाश मोरे म्हणाले, 'जे मतदार कोल्हापुरात काम करतात आणि ज्यांनी असोसिएशनचे सभासदत्व स्वीकारले आहे, त्यांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे. बार काउन्सिलच्या निवडणुकीसाठी सीमाभागातील मतदारांनी मतदान केले. आता बार असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांना डावलणे योग्य नाही. अन्यथा सीमाभगातील वकिलांवर अन्याय होईल.'

यंदा तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ४१ उमेदवारांनी अर्जाची खरेदी केली. मंगळवारी अर्ज विक्रीचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे आणखी ४० ते ५० इच्छुक अर्ज खरेदी होण्याची शक्यता आहे.

..............

चौकट

तिरंगी लढतीने चुरस

यंदा अॅड. प्रशांत शिंदे आणि राजेंद्र चव्हाण गटाकडून अॅड. प्रशांत देसाई हे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. अॅड. विवेक घाटगे आणि अॅड. प्रशांत मोरे यांच्या गटाकडून अॅड. प्रशांत चिटणीस इच्छुक आहेत, तर अॅड. संपतराव पवार यांच्या गटाकडून अॅड. प्रकाश आंबेकर-देशमुख अध्यक्ष पदासाठी इच्छूक आहेत. तिन्ही पॅनेलकडून सभासद संख्या वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रचाराला केवळ एका दिवसाचा अवधी मिळणार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी गेल्या महिन्याभरापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. तिन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार सुरू आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा सुमारे अडीचशे मतदान वाढले आहे, त्यामुळे वाढीव मतदान कुणाच्या पत्थ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

चौकट

उमेदवारीवरून इच्छुकांमध्ये धक्काबुक्की

इच्छुकांची संख्या वाढल्याने सर्वच गटात जोरदार चढाओढ सुरू आहे. उमेदवारीच्या मुद्यावरून सोमवारी दुपारी एका पॅनेलचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार गुद्यावर आले. कोर्टातच दोघांमध्ये शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुरू झाली. प्रस्थापित गटांना बाजूला करून नवीन पर्याय उभा करण्याचे आश्वासन देणाऱ्या या गटात प्रमुख पदांच्या उमेदवारांतच जुंपल्याने याची कोर्टात खुमासदार चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शस्त्रक्रिया झालेल्या चिमुकल्यानी घेतले अंबाबाई दर्शन

0
0

फोटो

...............

नवजीवन मिळालेल्या चिमुकल्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक परिस्थितीमुळे ह्रदयरोगाशी संबंधित कठीण शस्त्रक्रिया करणे अशक्य असणाऱ्या मुलांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. शस्त्रक्रियेमुळे नवजीवन मिळालेली चिमुकली व त्यांच्या पालकांनी पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत अंबाबाईचे दर्शन घेतले.

पालकमंत्री पाटील यांनी देवीचे दर्शन घेवून शस्त्रक्रिया झालेल्या सर्व बालकांना व त्यांच्या कुटुंबांना सुखी, समाधानी व आनंदी जीवनासह दीर्घायुष्य लाभू दे, असे साकडे घातले. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्रदयरोगाशी संबंधित लहान मुलांचे टू डी ईको व ह्रदयरोग तपासणीचे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये २८८ बालकांचे टू डी ईको करण्यात आले होते. यामधील ५८ पैकी २६ बालकांवर मुंबई व कोल्हापूर येथे मोफत उपचार करण्यात आले. उपचार कालावधीत रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व नातेवाईकांची निवास, भोजन व प्रवासाच्या खर्चासह संपूर्ण व्यवस्था केली होती. याप्रसंगी 'पणन'चे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, संदीप देसाई, आरोग्य समन्वयक अनिकेत मोरबाळे, धनाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. खांदेपालटातस्वाभिमीनीचाही सावध पवित्रा

0
0

जि.प. लोगो

................

खांदेपालटात स्वाभिमीनीचाही सावध पवित्रा

महिला व बालकल्याण सभापतींच्या राजीनाम्यावर निर्णय नाहीच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सव्वा वर्षानंतर खांदेपालट करण्यासाठी जिल्हा परिषदेमधील इच्छुक जोरदार प्रयत्न करीत आहे. सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे असलेल्या महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांचा राजीनामा घेण्यासंबंधी जिल्हा परिषदेत बैठक झाली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सावकार मादनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. शिंदे यांनी राजीमाना दिल्यानंतर निवडणूक लागल्यास बहुमत सिध्द करण्याची जबाबदारी कोण घेणार असा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे बैठकीत शिंदे यांच्या राजीनाम्यावर निर्णय झाला नाही.

ठरलेल्या फॉम्युल्यानुसार शुभांगी शिंदे यांचा राजीमाना घेतला जाईल. आमच्याकडील पद आवाडे गटास दिले जाईल, असे खासदार शेट्टी यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, अध्यक्षांसह उपाध्यक्ष, शिक्षण, बांधकाम, समाज कल्याण सभापतीपद बदलणार नसल्याचे चित्र आहे. तरीही आवाडे गटातून महिला व बाल कल्याण सभापतीपदावर इच्छुक वंदना मगदूम यांचे पती राजू जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे काटे, मादनाईक, उपाध्यक्षपदावर इच्छुक प्रविण यादव, राजेश पाटील यांची जिल्हा परिषदेमध्ये बैठक झाली.

बैठकीत शुभांगी यांचे पती रामचंद्र शिंदे यांनी आम्ही राजीनामा दिल्यानंतर दुसरे कोणते पद मिळणार अशी विचारणा केली. राजीनामा दिल्यास स्थायी किंवा जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी निवड झाली पाहिजे, अशी अट शिंदे यांनी घातली. या अटीमुळे आवाडे गटासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. काठावर बहुमत असल्याने महिला व बालकल्याण या एकाच पदासाठी निवडणूक लागल्यास बहुमतासाठी भाजपसह इतर मित्र पक्ष मदत करणार का यावरही चर्चा झाली. यामुळे अंतिम निर्णय झाला नाही. मंगळवारी पुन्हा खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. खासदार शेट्टी यांनी त्या बैठकीत आदेश दिल्यानंतर मगदूम यांचा राजीनामा होणार आहे.

---------------------

चौकट

शिवसेनेत धूसफूस

शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे कट्टर समर्थक सर्जेराव पाटील यांच्याकडे उपाध्यक्षपद आहे. अध्यक्षपद बदलत नाहीत तर मी का राजीमाना द्यायचा असा मुद्दा ते पुढे करीत आहेत. राजीनामा देण्याची त्यांची तयारी नाही. दुसरीकडे या पदावर इच्छुक असलेले शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचे समर्थक प्रविण यादव यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यांनी सोमवारी आमदार डॉ. मिणचेकर यांची भेट घेऊन उपाध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंबंधी चर्चा केली. त्यांच्या आग्रहामुळे डॉ. मिणचेकर यांनी आमदार नरके यांच्याशी चर्चा केली.

--------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा नियोजन मंडळ बैठक २० जून रोजी

0
0

जिल्हा नियोजन समितीची

सभा २० जून रोजी

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी (ता.१५) होणारी सभा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. ही सभा बुधवारी २० जून रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाचे आदेश धाब्यावर

0
0

फोटो आहे.

पंचगंगेकाठच्या गावांतील पाणी थेट नदीत; लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी प्रदूषणास नदी काठावरील गावे, औद्योगिक वसाहती, साखर कारखानदारीही जबाबदार आहे. त्यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत असते. त्यामुळे प्रदूषणाचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. प्रदूषणप्रश्नी कायमस्वरुपी उपाय योजनासाठी सरकारकडून भरीव निधी नाही. नमामी पंचगंगेसारख्या प्रत्येकवेळी नवीन नावाने उपक्रम राबवत मलमपट्टीच केली जात आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे आदेश हायकोर्टाने देऊनही लोकप्रतिनिधी, प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी प्रदूषित पाण्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याबरोबरच जलचर प्राणी धोक्यात आले आहेत. म्हणूनच हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील गावांनी आंदोलनाचे रान उठवले आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणास ५२ टक्के कोल्हापूर महानगरपालिका, २३ टक्के इचलकरंजी नगरपालिका उर्वरित प्रदूषणास काठावरील गावे, औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी कारणीभूत आहे. सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारून प्रदूषण रोखण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना अपयश आले आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे जुजबी उपाययोजना केल्या जात आहे. परिणामी दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढत राहिले आहे. सांडपाणी थेट नदीत जात आहे. मैलामिश्रीत, रसायनयुक्त पाणीही मिसळत असल्याने जलचर प्राण्यांचा मृत्यू होत आहे.

प्रत्येक वर्षाप्रमाणे यावेळी मे महिन्यात पाणी कमी झाल्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढली. माध्यमांनी हा विषय चव्हाट्यावर आणला. त्यानंतर आम्हीही काही तरी करीत आहोत, हे दाखवण्यासाठी आंदोलने सुरू झाली आहेत. राजकीय स्टंटबाजीची चढाओढ लागली आहे. पंचगंगा शुद्धीकरणासाठी गोंडस नावाखाली उपक्रमाचा नारळ फोडून प्रसिद्धी मिळवणे आणि प्रत्यक्षात उपाय योजना पातळीवर कृती शून्य होत असल्याचाही आरोप होत आहे. काही संघटना, राजकीय पक्षांना मे महिन्यातच पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नाची आठवण होते. इतरवेळी ते सोयीस्करपणे दूर्लक्ष करीत असतात हे आता लपून राहिलेले नाही.

हायकोर्टाने प्रदूषण रोखण्यासाठी नीरी संस्थेने सूचविलेल्या उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. त्या सूचनाच्या अंमलबजावणीसाठी वर्षभरापासून जिल्हा प्रशासनाने बैठकही घेतलेली नाही. त्याचा अहवाल हायकोर्टात गेला नसल्याचे नुकतेच उघड झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन कागदे रंगविताना दिसत आहे. काही गावात सांडपाणी प्रकल्पाचे काम केले जात आहे. त्याची गती संथ आहे. जिल्हा परिषदेने उपाययोजना करण्यासाठी सुमारे १३२ कोटींचा आराखडा राज्य, केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्याला सरकारने केराची टोपली दाखवली आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नसल्याने प्रदूषण जैसे थे आहे.

थेट सांडपाणी

प्रदूषणास सर्वाधिक जबाबदार गावे

करवीर : गांधीनगर, उचगाव, बालिंगा, हळदी, हणमंतवाडी, कांडगाव, कोपार्डे, कोथळी, कुडित्रे, नागदेवाडी, परिते, शिंगणापूर, वळीवडे, वाकरे, आंबेवाडी, चिंचवाड, प्रयाग चिखली, वडणगे, शिरोळ : शिरढोण, शिरदवाड, नांदणी. हातकणंगले : पुलाची शिरोली, कबनूर, चंदूर, रुई, हातकणंगले, तिळवणी.

औद्योगिक वसाहती

पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीसह कोल्हापूर शहर, इचलकरंजी परिसरातील लहान मोठ्या औद्योगिक कारखान्यांने, साखर कारखान्यांचे सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. रसायनमिश्रीत पाणी असल्याने विषारी घटक पाण्यात येत आहेत. सर्वच औद्योगिक वसाहतीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळावेळी त्यासाठी सूचना दिल्या आहेत. तरीही त्यांनी प्रकल्प पूर्ण केलेले नाहीत. राजकीय आश्रय असल्याने प्रदूषण करणाऱ्या साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनावर कारवाईचे धाडस प्रशासन करीत नसल्याचे चित्र आहे.

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी कायम व तात्पुरत्या उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी हायकोर्टाच्या आदेशाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. समितीने वर्षभर काय केले त्याचा अहवाल न्यायालयात देण्यात आलेला नाही. यामुळे पुढील आठवड्यात विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघण्यासाठी स्वतंत्र प्रधिकरणाची स्थापना करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही करणार आहे.

अॅड. धैर्यशील सुतार, याचिकाकर्ते वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळची गायीच्या दूध दरात कपात

0
0

पान ६ मेन

फाइल फोटो

.......................

गोकुळची गायीच्या दूध खरेदी दरात कपात

सीमाभागातील उत्पादकांनी मांडली कैफियत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गायीच्या दुधापासून पावडर निर्मितीवर लाखो रुपयांचा दैनंदिन तोटा सहन करावा लागत असल्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) सोमवारपासून कार्यक्षेत्राबाहेरील गायीच्या दूध खरेदी दर एक रुपया प्रतिलिटरने कमी केला आहे. 'गोकुळ'कडे सांगली, सोलापूर, कोकणसह सीमाभागातून दररोज सुमारे एक लाख ३० हजार लिटर दुधाचा पुरवठा होतो. ७०:३० फॉर्म्युलानुसार दूध पाठवण्याची सक्ती व दर कमी केल्याने सोमवारी सीमाभागातील उत्पादकांनी गोकुळ संघाकडे धाव घेत आपली कैफियत मांडली.

दैनंदिन २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवलेल्या गोकुळला गायीचे अतिरिक्त दूध उत्पादन चांगलीच डोकेदुखी ठरु लागले आहे. गोकुळ दैनंदिन ११ लाख लिटर दुधाचे संकलन करत असून त्यामध्ये सहा लाख ५० हजार लिटर गायीच्या दुधाचा समावेश आहे. यापैकी कार्यक्षेत्राबाहेरुन दररोज सुमारे एक लाख ३० लाख लिटर दूध येत आहे. या अतिरिक्त दुधाची पावडर करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असून त्यामुळे दैनंदिन तोटा वाढत आहे. इतर संघापेक्षा गोकुळचा दूध दर चांगला असल्याने ७०:३० पेक्षा जादा दूध येत असल्याने या तोट्यामध्ये अधिकच भरत पडत आहे.

तोटा भरुन काढण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी कार्यक्षेत्राबाहेरील गायीचा प्रतिलिटर दर २४ रुपयांवरुन २१ रुपये केला. तरीही इतर संघापेक्षा हा दर जादा असल्याने संकलनामध्ये कोणतीही कपात झाली नाही. म्हैस आणि गायीच्या दूध पुरवठ्यामध्ये व्यस्त प्रमाण झाल्याने संघाने प्राथमिक संस्थांना दूध संकलन बंद करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. पण संघाने ठेवलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी उत्पादकांना कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादकांप्रमाणे सर्व सुविधा दिल्याने दूध संकलन बंद करण्या ऐवजी दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार गोकुळेने कार्यक्षेत्राबाहेरील ८.५ फॅट आणि ३.५ एसएनएफच्या गायीचा दूध खरेदी दर २० रुपये करण्याचा निर्णय घेतला. निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणीही करण्यात आली.

दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळताच सीमा भागातील दूध उत्पादकांनी गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयाकडे धाव घेतली. संकलन अधिकरी एस. व्ही. तुरंबेकर यांच्याकडे आपली कैफीयत मांडत संकलन बंद न करण्याची मागणी केली. तुरंबेकर यांनीही संकलन बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करत खरेदी दर कमी केला असल्याची माहिती उत्पादकांनी दिली.

....................

चौकट

११ लाख लिटर

दैनंदिन दूध संकलन

६ लाख ५० हजार

गायीचे दूध

४ लाख ५० हजार

म्हैस दूध

....................

कार्यक्षेत्रातील दूध दर

गाय - २५ रुपये प्रतिलिटर

म्हैस - ३६.३० रुपये प्रतिलिटर

.............

कार्यक्षेत्राबाहेरी दूध दर

गाय - २० रुपये प्रतिलिटर

म्हैस - ३६.३० रुपये प्रतिलिटर

...........

कार्यक्षेत्राबाहेरील दैनंदिन दूध संकलन

संस्था : ११००

गाय : एक लाख ३० हजार लिटर

म्हैस : एक लाख ३० हजार लिटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images