Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लाचखोर तलाठी मुल्ला, भोजे निलंबित

$
0
0

लाचखोर तलाठी मुल्ला, भोजे निलंबित

राधानगरीचे प्रांताधिकारी लाटकर यांनी केली कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल तालुक्यातील सुळकूड येथील जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी अडीच लाखांची लाच घेणारे तलाठी शमशाद मुल्ला आणि मनोज भोजे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. राधानगरीचे प्रांताधिकारी अरविंद लाटकर यांनी मंगळवारी निलंबनाचे आदेश काढले. या गुन्ह्यातील कागलचा तहसीलदार किशोर घाडगे याच्यावरील कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. याबाबत दोन दिवसात कारवाई होण्याची शक्यता आहे.

खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी कसबा सांगाव येथील तक्रारदाराने कागल तहसीलदारांकडे अर्ज दिला होता. या कामासाठी तलाठी शमशाद मुल्ला हिने तहसीलदार किशोर घाडगे याच्यासाठी दोन लाख आणि स्वत:साठी एक लाख अशी तीन लाखांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. कागल तहसीलदार कार्यालयात गुरुवारी (ता. १७) लाच स्वीकारताना तलाठी भोजे, मुल्ला यांच्यासह तहसीलदार घाडगे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर तलाठी मुल्लास हंगामी जामीन मंजूर झाला आहे, तर उर्वरित दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. लाचलुचपत विभागाने त्यांच्या अटकेचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. यानुसार राधानगरीचे प्रांताधिकारी लाटकर यांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान दोन्ही तलाठ्यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्रांताधिकारी लाटकर यांनी मुल्ला आणि भोजे या दोघांच्या निलंबनाचे आदेश काढले.

तहसीलदार किशोर घाडगे याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे मोबाइल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. याशिवाय तलाठी मुल्ला आणि भोजे या दोघांनी घाडगे याच्या नावाचा उल्लेख करून त्याच्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारली. याबाबत चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. दरम्यान, यातील मुल्ला हिची प्रकृती खालावल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर घाडगे आणि भोजे न्यायालयीन कोठडीतून आहेत. त्यांच्या जामिनावर शुक्रवारी (ता. २५) सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बार असोसिएशनची निवडणूक १६ जूनला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १० जूनला कच्ची मतदार यादी जाहीर होणार आहे. १५ जूनला मतदान होणार आहे. यंदा निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने सर्वच गटांना उमेदवार निश्चितीसाठी कसरत करावी लागणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणी मंडळाचा कार्यकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात संपत आहे. नवीन वर्षासाठी कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. सुभाष आर. पिसाळ यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ४ जूनपासून सभासदांची वर्गणी भरण्यास सुरुवात होत आहे. ज्या सभासदांची प्रॅक्टीस पाच वर्षांपर्यंत झाली आहे, त्यांच्यासाठी ३०० रुपये, तर ५ वर्षांहून अधिक प्रॅक्टीस असणाऱ्या सभासदांसाठी ५०० रुपये वर्गणी आहे. कार्यकारिणीसाठी अर्ज दाखल करणारे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांसाठी विनापरतीची १००० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे, तर सदस्यांसाठी ५०० रुपये भरावे लागतील. कच्ची मतदार यादी १० जूनला जाहीर होईल. यावरील हरकतीनंतर ११ जूनला पक्की मतदार यादी जाहीर होणार आहे. ११ व १२ जून या दोन दिवसात उमेदवारी अर्ज देणे आणि स्वीकारण्याचे काम सुरू राहील. १२ जूनला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. १३ जूनला अर्ज माघार घेण्याची मुदत असून, त्याच दिवशी संध्याकाळी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. १५ जूनला कसबा बावडा येथील न्याय संकुलाच्या इमारतीत मतदान होईल. त्याच दिवशी रात्री निकाल जाहीर होणार आहे.

यंदाच्या निवडणुकीसाठी सर्वच गटातून इच्छुकांची भाऊगर्दी आहे. विद्यमान अध्यक्ष अॅड. प्रशांत शिंदे यांच्याकडे ज्येष्ठ वकिलांसह तरुणांचाही मोठा गट आहे. गेल्या वर्षी इच्छुक असूनही माघार घ्यावी लागलेल्या उमेदवारांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता आहे. अॅड. प्रकाश मोरे आणि विवेक घाटगे यांचा गट विस्तारला आहे. नुकत्याच झालेल्या बार काउन्सिलच्या निवडणुकीत अॅड. विवेक घाटगे यांनी एक हजारहून अधिक मते मिळवली आहेत. त्यांच्या गटात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. उत्साह वाढल्याने उमेदवारांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे उमेदवार निश्चितीसाठी दोन्ही गटातील नेत्यांची दमछाक होणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाचीही निवडणूक चुरशीच होणार असल्याचे संकेत सुरुवातीपासूनच मि‌ळत आहेत.

निवडणूक कार्यक्रम

वर्गणी भरणे: ४ ते ६ जून

कच्ची मतदार यादी : १० जून

पक्की मतदार यादी प्रसिद्ध : ११ जून

उमेदवारी अर्ज भरणे: ११ ते १२ जून

अर्ज छाननी : १२ जून

अर्ज माघार घेणे : १३ जून

उमेदवारांची अंतिम यादी : १३ जून

मतदान : १५ जून

मतमोजणी व निकाल : १५ जून रात्री १० पर्यंत

मतदार संख्या - सुमारे २०००

संचालक संख्या - १५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोरणात्मक निर्णयाची गरज

$
0
0

आवाज

एफआरपीसाठी धोरणात्मक

निर्णयाची गरज

देशातंर्गत साखरेचे उत्पादन जास्त झाल्याने साखर उद्योग आणि पर्यायाने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्यास यातून मार्ग निघेल. पण सरकार शेतकरी आणि साखर उद्योगाकडे गांभीर्याने पहात नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी झालेले असले, तरी उत्पादीत झालेल्या साखरेपैकी दहा टक्के साखर विक्री झाल्यास देशातंर्गत बाजारपेठेतील दर वाढतील. तसेच कृषी मूल्य आयोगाकडून एफआरपी निश्चित करताना बाजारपेठेत साखरेचे दर निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

.............................

दहा टक्के साखर निर्यात करा

ऊस उत्पादकांना कशा पद्धतीने जाहीर झालेली एफआरपी देता येईल यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. देशात एकूण उत्पादन झालेल्या साखरेपैकी दहा टक्के म्हणजेच ३० लाख टन साखर कमी दरात निर्यात झाल्यास साखरेचा साठा कमी होईल. देशाच्या गरजेएवढा साखर साखर साठा शिल्लक राहिल्यास साखरेचे दर वाढण्यास मदत होईल. पण जी साखर कमी किंमतीमध्ये निर्यात होणार आहे, त्याचा प्रतिक्विंटल ५०० रुपये दुरावा निर्माण होणार आहे. हा दुरावा केंद्र व कारखान्यांनी प्रत्येकी ५० टक्के स्वीकारल्यास उत्पादकांना देणी देणे शक्य होईल.

खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

................

साखरेचा बफर स्टॉक करावा

मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. यासाठी देशातील साखर तातडीने निर्यात करण्याची आवश्यकता आहे. तसेच उत्पादन खर्चावर आधारीत बाजारपेठेतील साखरेचे दर ठरवण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. बाजारपेठेतील एकदा धोरण निश्चित झाल्यास त्याखाली साखर विक्री झाल्यास विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच साखरेचा बफर स्टॉक केला पाहिजे. कारखान्यांना निर्यातीचे धोरण ठरवून दिल्यास या धोरणाची अंमलबजावणी न केल्यास अशा कारखान्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

माजी मंत्री डॉ. विनय कोरे, चेअरमन, वारणा कारखाना

..............

धोरणअभावाचा फटका शेतकऱ्यांना

साखर उद्योगाबाबत धोरण आखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी केली जात आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सरकारला धोरणच ठरवता आले नाही, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हंगामापूर्वी साखरेचे उत्पादन किती होईल याबाबतचे सरकारकडे कोणतेच नियोजन नसल्याने बाजारपेठेत साखर दरांबाबत अस्थिरता निर्माण झाली आहे. अशीच स्थिती राहिल्यास पुढील हंगामात यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.

आमदार सतेज पाटील, चेअरमन, डी. वाय. पाटील कारखाना

..............

बाजारमूल्य धोरण आखण्याची गरज

शेतकऱ्यांना उत्पादनखर्चावर आधारीत दर देण्यासाठी एफआरपीचा निर्णय योग्य असला, तरी साखरेचे बाजारपेठेतील दर ३,२०० प्रतिक्विंटलपेक्षा कमी येणार नाहीत याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. त्यासाठी बाजारमूल्य धोरण केंद्राने तयार करण्याची आवश्यकता आहे. कच्च्या मालाचा दर अगोदर देणारा साखर उद्योग एकमेव आहे. कृषीमूल्य आयोगाने एफआरपी निश्चित गृहीत धरलेला साखर दर साखर कारखान्यांना द्यावा. तर यातून मार्ग निघेल अन्यथा उत्पादक आणखी अडचणीत येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने साखरेला किमान दर द्यावा.

आमदार चंद्रदीप नरके, चेअरमन, कुंभी-कासारी कारखाना

...............

एफआरपी अनुदानात वाढ करावी

हंगामापूर्वी असलेली साखर व हंगामात उत्पादित होणारी साखर याचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचारच केला नाही. एफआरपी ठरवताना आणि सद्य:स्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये असणारा दर यामध्ये प्रचंड तफावत राहिली आहे. डिसेंबर महिन्यापासून अशी स्थिती असताना यावर केंद्र सरकारने विचार केला नाही. कृषीमूल्य आयोगाने निश्चित केलेला दर देण्यासाठी बाजारात किमान तीन हजार रुपये क्विंटल दर असण्याची आवश्यकता आहे. तसेच केंद्र सरकारने बफर स्टॉक करावा व एफआरपी देण्यासाठी अनुदानामध्ये वाढ करावी.

राजेंद्र पाटील-यड्रावकर, चेअरमन ,शरद कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : मारूती सावंत

$
0
0

फोटो आहे

मारूती सावंत

कोल्हापूर

सानेगुरूजी वसाहत परिसरातील शिवगंगा कॉलनीतील मारूती बाबूराव सावंत (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई,नातवंडे असा परिवार आहे.

००

सुभाष पोतदार

कोल्हापूर

बोंद्रेनगर परिसरातील जिल्हा परिषद कॉलनी येथील सुभाष सदाशिव पोतदार-तिसंगीकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी (ता. २४) सकाळी दहा वाजता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंड अजय पाथरवट हद्दपार

$
0
0

(फोटो आहे)

गुंड अजय पाथरवट

जिल्ह्यातून हद्दपार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी परिसरात चोरी, जबरी चोरी, विनयभंग, दमदाटी, मरहाण अशा गंभीर गुन्ह्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी अजय अनिल पाथरवट (वय १९, रा. सायबर चौक, कोल्हापूर) याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी मंगळवारी (ता. २२) हद्दपारीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड अजय पाथरवट याने राजारामपुरी परिसरात दहशत निर्माण केली होती. किरकोळ कारणांवरून तरुणांना मारहाण करणे, घरात घुसून दमदाटी करणे, चोरी, जबरी चोरी, विनयभंग, सरकारी नोकरावर हल्ला करणे, वाहनांची तोडफोड करणे असे ९ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव राजारामपुरी पोलिसांनी तयार करून करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याकडे सादर केला होता. इथापे यांनी प्रस्तावाची चौकशी करून पाथरवट याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. सोमवारपासून हद्दपारीचा आदेश लागू केला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, पोलिस नाईक युवराज पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी हा प्रस्ताव तयार केला होता. पोलिसांच्या रेकॉर्डवरील अन्य चार ते पाच तरुणांवर हद्दपारीची कारवाई होणार असून, त्यांच्याविरोधातील प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती निकम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वसमावेशक कायद्यासाठी आयोग प्रयत्नशील - सी. एस. थूल

$
0
0

पान ३ अॅंकर

फोटो आहे

....................

सर्वसमावेशक कायद्यासाठी आयोग प्रयत्नशील

आंतरजातीय विवाहाबाबत सी. एस. थूल यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन, संरक्षण देण्यासंदर्भात नवीन कायदा तयार करण्यात येत आहे. अस्तित्वात येणारा कायदा अशा विवाहांना संरक्षण, जोडप्यांचे पुनर्वसन व स्वयंरोजगारासाठी मदत करणारा सर्वसमावेशक कायदा असेल,' अशी माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एस. थूल यांनी बैठकीत दिली. यासाठी नागरिकांच्या सूचना व समस्या जाणून घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहास प्रोत्साहन व त्यामधील अडचणी दूर करण्यासाठी सूचना मागवून त्यावर आधारीत स्वतंत्र कायदा करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. समिती नागरिकांपर्यंत जाऊन वस्तुस्थिती समजून घेत आहे. यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात थूल यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

यावेळी बोलताना थूल म्हणाले, 'राज्य सरकारने विविध सूचना, तक्रारी, खासदारांनी केलेला पत्रव्यवहार यांचा साकल्याने विचार करुन आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहासंदर्भात कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सात सदस्यांची समिती नियुक्त केली असून अशा विवाहांना संरक्षण देणे, जोडप्यांना हानी पोहोचविणाऱ्यांना कठोर शिक्षा करणे, जोडप्यांना स्वयंरोजगारांसाठी प्रोत्साहित करणे, समुपदेशन आदी उपाययोजना सुचवून सर्वसमावेशक कायदा होण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे.'

ते पुढे म्हणाले,'नवीन कायद्यामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण, पुनर्वसन आणि विवाह केलेल्या भावी पिढीचे समायोजन याबाबत समिती ठोस भूमिका घेईल. कायदा राज्यासाठी असल्याने असे विवाह करताना कोणत्याही जिल्ह्यात विवाहनोंदणी करता येईल. स्पेशल मॅरेज अॅक्ट १९५४ नुसार विवाह नोंदणीसाठी असणारा ३० दिवसांचा नोटीस कालखंड कमी करुन तो पाच किंवा सात दिवसांचा असावा, सुरुवातीच्या काळात जोडप्यांना निवारा उपलब्ध व्हावा, महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांचे समुपदेशन आदींबाबत ही समिती कायद्यामध्ये सूचना करेल. राजर्षी शाहू महाराजांनी १२ जुलै १९१९ रोजी आंतरजातीय विवाहासंदर्भात कायदा केला होता. पुढील वर्षी या कायद्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.' यावेळी कार्यकर्त्यांनी विविध अनुभव, समस्या, तक्रारी आणि सूचना मांडल्या.

बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बाळासाहेब कामत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, व्यंकप्पा भोसले, डॉ. मेघा पानसरे, रमेश वडणगेकर, कृष्णात कोरे, सीमा पाटील, सुजाता म्हेत्रे, राजेश वरक, राणी पाटील, गीता हासूरकर, बाजीराव नाईक, सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनएसयुआयतर्फे साखर वाटप

$
0
0

कोल्हापूर: कर्नाटक विधानसभेतील निकालाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल स्टुडन्ट यूनियन ऑफ इंडिया (एनएसएयूआय) ने साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. दाभोळकर कॉर्नर चौकात नागरिकांना साखर वाटप करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे म्हणाले, कर्नाटकांत संख्याबळ नसतानाही भाजपला सरकार स्थापनेसाठी दिलेली संधी लोकशाही विरोधी होती. त्यामुळे बी. एस. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. या घटनेने लोकशाहीचा विजय झाला आहे. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची आघाडीचा विजय झाला आहे. आनंदोत्सवात किशोर आयरे, दस्तगीर शेख, वैभव देसाई, दस्तगीर शेख, पंकज मगर, शुभम तोरस्कर, मकरंद कवठेकर, विनायक पाटोळे, सौरभ घाटगे, योगेश साळोखे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातील जखमीचा मृत्यू

$
0
0

दुचाकी घसरून शेतकरी जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गवताचा भारा दुचाकीवर पाठीमागे बांधून जाताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात भिकाजी शामराव जाधव (वय ४५, रा. यवलूज, ता. पन्हाळा) हे जखमी झाले. यवलूज येथे गुरुवारी (ता. १७) हा अपघात झाला होता. जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने बुधवारी (ता. २३) त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

तरुणीचा आत्महत्त्येचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथे राहणाऱ्या १७ वर्षाच्या तरुणीने पंचगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबीयांनी तिला पाण्यातून बाहेर काढल्याचे ती बचावली. लाईन बझार येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

दुचाकी घसरून दोघे जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-बेंगळुरू महामार्गावर गडहिंग्लज हद्दीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. संभाजी शंकर मोहिते (वय ६०) आणि कृष्णात विष्णू जगताप (५८, रा. कोडोली, ता. कराड, जि. सातारा) अशी जखमींची नावे आहेत. बुधवारी (ता. २३) सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले आहे. सीपीआर पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

अपघातातील जखमीचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रत्नागिरी जिल्ह्यातील मावगुंड ते चाफे मार्गावर कार उलटून झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उदय मधुकर गोनवरे (वय ३८, रा. भाटलेवाड, जि. रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. १७ मे रोजी हा अपघात झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. बुधवारी (ता. २३) सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फाउंड्री वाळूचा पुनर्वापर होणार

$
0
0

आयआयएफचा पुढाकार; कोईमतूरचे शिष्टमंडळ येणार कोल्हापुरात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फाउंड्री उद्योगात वापरल्या जाणाऱ्या वाळूचा पुनर्वापर करून बांधकामासाठी वापरण्याचा विचार सुरू झाला आहे. कोईमतूरमध्ये या प्रकाराच्या वाळूचा पुनर्वापर होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील फाउंड्रीमधील वाळूचा पुनर्वापर करण्यासाठी कोईमतूर मधील बांधकाम व्यावसायिक, फाउंड्री उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन कोल्हापूर विभागाने कोल्हापुरात आमंत्रण दिले आहे. या वाळूचा पुनर्वापर झाल्यास सध्या बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूसाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. कमी दरात ही वाळू उपलब्ध होऊ शकेल.

सध्या शहरात साडेतीन ब्रास वाळूच्या ट्रकची किंमत २६ हजार रुपये आहे. बांधकाम व्यावसायिकांसह घरदुरुस्ती, नवीन बांधकामासाठी रहिवाशांना वाळू दराचा मोठा फटका बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयआयएफ संघटनेने पुढाकार घेऊन फाउंड्री उद्योगात वेस्ट राहिलेल्या वाळूचा पुनर्वापर करण्याचा विचार सुरू झाला आहे. शिरोली, गोकुळशिरगांव, सांगली आणि मिरज भागात फाउंड्री उद्योग आहेत. कोल्हापूर विभागात ३७५ फाउंड्री उद्योग आहेत. दर महिन्याला ६० हजार टन कास्टिंग केले जाते. त्यासाठी कच्चा माल म्हणून वाळूचा उपयोग केला जात आहे. समुद्रातील वाळू उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी झाल्याने फाउंड्री उद्योगाने बॉक्साइट खाण, क्रशिंग मधील वाळूचा उपयोग केला जात आहे. या सर्व फाउंड्री उद्योगातून दर महिन्याला सुमारे १० हजार टन वाळू वेस्टेज होते. या वाळूचा पुनर्वापर बांधकामासाठी करण्याचा विचार सुरू झाला आहे. कोल्हापूर, कोईमतूर आणि गुजरातमधील अहमदाबाद, राजकोट या ठिकाणी मोठे फाउंड्री उद्योग आहे. पैकी कोईमतूर मधील फाउंड्री उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांनी या वाळूवर पुन्हा प्रक्रिया करून घर बांधकाम, कपांऊडसाठी पुनर्वापर केला आहे. त्याचा धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात या वाळूचा वापर झाल्यास बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूला काही प्रमाणात पर्याय मिळू शकेल. त्यासाठी या वाळूची चाचणी करण्यात येणार आहे. कोईमतूरमध्ये या वाळूच्या सहाय्याने बांधकाम केलेल्या इमारती, कपाउंड, रस्ते यांचे सादरीकरण केले जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांची क्रेडाई या संघटनेला बैठकीसाठी निमंत्रित केले जाणार आहे.

००

कोईमतूर येथे फाउंड्री मधील वाळूचा पुनर्वापर करून कपाउंड, इमारत, रस्ता, विटा तयार केल्या आहेत. त्याच धर्तीवर जिल्ह्यातही हा प्रयोग शक्य आहे. त्यासाठी कोईमतूरमधील काही बांधकाम व्यावसायिक, क्रेडाई संघटना आणि आयआयएफ या तिघांची संयुक्तपणे बैठक घेतली जाणार आहे.

सुरेश चौगुले, अध्यक्ष, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन कोल्हापूर विभाग

००

सध्या फाउंड्री ‌वाळूचा पुनर्वापर बांधकाम व्यावसायिक टाइल्स बसविताना करीत आहेत. फाउंड्री मधील वाळूचा पुनर्वापर बांधकामासाठी करण्यास काही हरकत नाही. मात्र त्यासाठी वापरण्यासाठी योग्य असा चाचणी अहवाल महत्वाचा आहे. अन्य राज्यात या वाळूचा वापर करून झालेल्या बांधकामांची पाहणी करावी लागेल.

महेश यादव, अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूविकास कर्मचारी राज्य भवनासमोर बेमुदत उपोषण करणार

$
0
0

भूविकास कर्मचारी करणार

राजभवनसमोर उपोषण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भूविकास बँक कर्मचाऱ्यांच्या गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाची दखल जिल्हा प्रशासन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली नसल्याच्या निषेधार्थ आंदोलक कर्मचाऱ्यांनी पाच जूनपासून मुंबईत राजभवनासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासन व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनाही पाठवण्यात आले आहे.

राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'राज्यातील भूविकास बँका अवसायनात काढल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी बँकांची मालमत्ता विक्री करावी असा अध्यादेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने काढला होता. पण याबाबत जिल्हा प्रशासन योग्य ती कार्यवाही करत नाही. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन मिळत नसताना आणि थकीत देणी असताना औषधोपचारावर दैनंदिन खर्च करणेही मुश्कील बनले आहे. बँक कर्मचाऱ्यांपैकी ३० कर्मचारी मयत झाले असल्याने, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाच जूनपर्यंत मागण्यांचा विचार न झाल्यास कुटुंबासह उपोषणाला बसणार आहे. निवेदनावर श्रीकांत कदम, रावसो पाटील, भारत पाटील, नंदकुमार पाटील, सुधीर पाटील, गुरुनाथ पंडित, पांडूरंग पाटील, डी. वाय. पाटील, एच. डी. जमादार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाकसेवकांच्या संपामुळे टपाल सेवा विस्कळित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण डाकसेवकांच्या सुरू असलेल्या संपामुळे शहरात काही प्रमाणात आणि ग्रामीण भागात पोस्ट सेवा विस्कळित झाली. रेल्वे मेल शॉर्टिगकडून (आरएमएस) जिल्ह्यातील १२ तालुक्यात पर्यंत टपाल पोहोचले. शाखा डाकपाल आणि डाकसेवकांचे कामे थांबल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. पोस्टाच्या जिल्ह्यातील ४२५ विभागीय पोस्ट कार्यालयात लाखांहून अधिक टपाल पडून राहिले.

डॉ. कमलेशचंद्र कमिटीच्या सर्वसकारात्मक शिफरशी त्वरित लागू कराव्यात, या मागणीसाठी डाकसेवकांचा देशव्यापी संप सुरू आहे. या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील ८०० डाकसेवक सहभागी झाले आहेत. ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन (एआयजीडीएसयू) आणि नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक युनियन (एनयूजीडीएस) या दोन संघटनांच्या नेतृत्वाखाली संप सुरू आहे. शाखा डाकपालांकडून पोस्ट खात्याची बचत खाती, रिकरिंगसह अन्य खात्यावरील देवघेवीचा व्यवहार केला जातो. डाकपाल संपात सहभागी झाल्याने पोस्टाचे आर्थिक व्यवहार कोलमडले. डाकसेवकांकडून दररोज ग्रामीण भागातील टपालांचे वितरण केले जाते. संपामुळे ही सेवा पूर्णपणे कोलमडली. आरएमएसकडून आलेली पत्रे, रजिस्टर्स, स्पीड पोस्ट, चेकबुक, आरटीओ स्मार्ट कार्ड, पासपोर्टसह अन्य टपाल विभागीय कार्यालयांकडे पाठविण्यात आले. मात्र टपाल वाटपासाठी कर्मचारी नसल्याने टपाल सेवा कोलमडली. प्रत्येक गावांत दररोज सरासरी १५० टपालांचे वितरण केले जाते. जिल्ह्यातील १२ तालुक्यांत लाखाहून अधिक टपाल पडून राहिली. या टपालांच्या कामाचे आउटसोर्सिंगही करता येत नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. दरम्यान डाकसेवकांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे कामगार आयुक्तालयाने दोन्ही संघटनांच्या प्रमुखांची बैठक सकाळी ११ वाजता बोलाविली आहे. त्यातून तोडगा निघाल्यास संप मागे घेतला जाणार आहे. अन्यथा जिल्ह्यातील टपाल सेवेचा प्रश्न आणखीन गंभीर बनणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भामट्यांचे पोलिसांना आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंगापिंडाने मजबूत, कडक इस्त्रीची कपडे, पायात बूट आणि रुबाबात वाट अडवणारा हा पोलिसच असणार असे प्रथमदर्शनी वाटते. तोही आपण पोलिस असल्याचे सांगून चोरी झाल्याचे किंवा तपासणीचे कारण सांगून अंगावरील दागिने काढून खिशात ठेवण्याचा सल्ला देतो. तत्परतेने मदतीलाही धावतो. मात्र, काही वेळातच आपल्या किमती ऐवजासह त्याने पलायन केल्याचे लक्षात येते. गेल्या ३ महिन्यांत अशा १० घटना घडल्याने भामट्या पोलिसांचे खऱ्या पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

अंगावर खाकी कपडे आणि डोक्यावर पोलिसांची बनावट टोपी घालून मनोरंजन करणारा बहुरुपी अनेकदा आपल्याला कोड्यात टाकतो. पण साध्या वेशात येऊन पोलिस असल्याचे कोणी सांगत असेल तर आपण सावधगिरी बाळगायला हवी. त्याला तुमच्या सुरक्षेची काळजी नाही, तर तुमच्याकडील किमती ऐवजावर लक्ष आहे. तो तुम्हाला बोलण्यात गुंतवून गळ्यातील चेन, माळ किंवा बोटातील अंगठ्या काढून रुमालात बांधण्याचा सल्ला देतो. यावेळी मदतीसाठीही पुढे धावतो. रुमालाची गाठ मारून तो रुमाल आपल्याकडे देऊन निघून जातो. काही अंतरावर गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. तोपर्यंत भामटे पसार होतात. पोलिस असल्याचे भासवून गंडा घालणाऱ्या भामट्यांची संख्या शहरात वाढली आहे. गेल्या ३ महिन्यांत अशा १० घटनांमधून लाखो रुपयांच्या किमती ऐवजाची लूट झाली आहे.

नाळे कॉलनीत राहणारे महादेव आनंदराव हंबरे (वय ६८) हे सोमवारी (ता. २१) दुपारी कामानिमित्त संभाजीनगर चौकात गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा घरी जाताना साई मंदिराजवळ त्यांना समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. 'आम्ही सीआयडीचे पोलिस आहे. समोर तपासणी सुरू आहे. अंगावर दागिने घालून फिरू नका. तुमच्या अंगठ्या आणि गळ्यातील चैन काढून रुमालात बांधून खिशात ठेवा,' असा सल्ला यातील एकाने दिला. हंबरे यांनी भीतीपोटी खिशातून रुमाल काढून गळ्यातील सोन्याची चेन आणि बोटांमधील दोन अंगठ्या काढून रुमालात ठेवल्या. यावेळी एका तरुणाने पुढे जाऊन गाठ मारून देण्याच्या बहाण्याने रुमाल हातात घेतला. हातचालाखीने यातील चेन आणि अंगठ्या काढून रुमाल त्यांच्या खिशात ठेवला. घरात गेल्यानंतर हंबरे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

असे प्रकार रुईकर कॉलनी, क्रशर चौक, साने गुरुजी वसाहत, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडले आहेत. भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांची फस‌णूक केली. फसवणुकीचे बहुतांश प्रकार आडमार्गाला आणि दुपारच्या वेळेत घडले आहेत. विशेष म्हणजे हे भामटे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पोलिसांना चकवा देऊन पोलिसांच्या नावावरच ते फस‌वणूक करीत आहेत. या घटनांमुळे खऱ्या पोलिसांसमोर भामट्या पोलिसांचे आव्हान निर्माण झाले आहे.

अशी घ्या दक्षता

विनाकारण दागिने घालून फिरू नका

ज्येष्ठ नागरिकांनी एकट्याने फिरणे टाळावे

पोलिस असल्याचे सांगितल्यास ओळखपत्र विचारा

दागिने, किमती ऐवज दुसऱ्यांच्या हाती देऊ नका

वाटेत अडवल्यास जवळच घर असल्याचे सांगून त्याला टाळा

संशयितांच्या दुचाकीचा नंबर लक्षात ठेवा

फस‌वणूक झाल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्या

पोलिस असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा शोध सुरू आहे. असे गुन्हे करणाऱ्या दोन संशयितांना यापूर्वी पकडले होते. हे भामटेही लवकरच पोलिसांच्या हाती लागतील.

डॉ. प्रशांत अमृतकर, शहर उपअधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या व्याख्यान

$
0
0

कोल्हापूर: कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपने सत्ता हस्तगत करण्यासाठी राज्यघटनेची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. धर्मनिरपेक्ष पक्षांच्या एकीमुळे आणि न्यायालयाच्या भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही. या सर्व प्रश्नांचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यात सहभागी असलेले बेळगाव येथील डॉ. आनंद देणसे यांच्या व्याख्यानाचे शुक्रवारी (ता. २५) आयोजन करण्यात आले आहे. श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने सायंकाळी सहा वाजता छत्रपती शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉलमध्ये व्याख्यान होणार असल्याची माहिती विलास रणसुभे यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी आनंदराव परुळेकर, एस. बी. पाटील, दिलीप पवार, सुभाष वाणी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, उचगावमधील घटना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. विद्या शिवाजी ठोंबरे (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. यानंतर पतीने स्वत:च्या हातावर आणि गळ्यावर विळीने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पती शिवाजी प्रभाकर ठोंबरे (४०, रा. जानकीनगर, उचगाव) गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी ठोंबरे हा उचगावमधील जानकीनगर येथे राहतो. तो रिक्षाचालक आहे. पहिल्या पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये त्याने सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील विद्या या तरुणीशी लग्न केले. गेल्या पाच महिन्यात शिवाजी वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. पतीच्या त्रासाला कंटाळून विद्याने याची माहिती माहेरी सांगितली होती. विद्याला माहेरी घेऊन जाण्यासाठी मंगळवारी दुपारी तिचा भाऊ प्रकाश दत्ता धायगुडे (वय २४, रा. कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) हा उचगावमध्ये आला. यावेळी रात्री पुन्हा शिवाजीने चारित्र्याच्या संशयावरून आणि ती माहेरी जाणार असल्याच्या रागातून पत्नीशी वाद घातला. पहाटे तीनच्या सुमारास पत्नी झोपेत असताना शिवाजीने तिच्या छातीवर बसून गळा दाबून खून केला. विद्या निपचित पडल्यानंतर शिवाजीने विळीने स्वत:च्या डाव्या हातावर आणि गळ्यावर वार करून घेतला. यात तो गंभीर जखमी झाला.

आरडाओरडा सुरू होताच बाहेरच्या खोलीत झोपलेला विद्याचा भाऊ प्रकाश जागा झाला. खिडकीतून पाहिले असता, शिवाजी हा विद्याचा गळा दाबत असल्याचे दिसल्यानंतर त्याने आरडाओरडा केला. बेडरुमचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा आतून बंद होता. शेजारच्या नागरिकांनी या घटनेची माहिती गांधीनगर पोलिसांना कळवली. तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी दरवाजा तोडला. यावेळी विद्या आणि शिवाजी दोघेही निपचित पडले होते. पोलिसांनी दोघांनाही तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. विद्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले, तर जखमी शिवाजी याच्यावर उपचार सुरू आहेत. विद्याचा भाऊ प्रकाश याच्या फिर्यादीनुसार गांधीनगर पोलिसांनी शिवाजी ठोंबरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

..............

चौकट

पहिल्या पत्नीचाही केला खून

शिवाजी ठोंबरे याचे मूळ घर उचगावमधील सावंत गल्लीत आहे. मात्र आई-वडिलांशी पटत नसल्याने तो जानकीनगर येथे राहतो. त्याने २ जुलै २०१४ मध्ये पहिली पत्नी सुलभा हिच्या डोक्यात लोखंडी पार मारून जखमी केले होते. यानंतर १० सप्टेंबर २०१४ मध्ये त्याने उचगाव येथील घरात झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात भरलेला गॅस सिलिंडर घालून तिचा खून केला होता. या गुन्ह्यात सबळ पुराव्यांअभावी १५ नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याची सुटका झाली. यानंतर महिन्याभरात त्याने दुसरे लग्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावात उद्या मॅटवरील कुस्ती स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचगाव येथील श्री. भैरवनाथ कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ, नृसिह तालीम, हनुमान तालीम, महादेव तालीमच्यावतीने मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती स्पर्धा शुक्रवारी (ता. २५) पाचगाव ग्रामपंचायत शेजारील महादेव मंदिर परिसरात होणार आहे. स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कलाकार पै. अतुल पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.संभाजी वरुटे, पै. कौतुक डाफळे, चंद्रकांत चव्हाण, विक्रम कुऱ्हाडे, भारत केसरीपुरस्कारप्राप्त माउली जमदाडे, रवी दादा शिंदे यांना सन्मानित करण्यात येईल.

स्पर्धा २२ ते ७२ आणि ७३ ते ८६ वजन गटांत होणार आहेत. ओपनमधील त्र्याहत्तर ते शहाऐंशी या वजन गटातील प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये व चांदीची गदा, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये, तृतीय क्रमांकास सात हजार रुपये व चषक व इतर गटासाठी एक लाख रुपये किमतीची बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी क्रीडा रसिकांना श्रावणी गाडगीळ, सुवर्णा सुतार, गायत्री ताटे, शिवकन्या मोरे, ऋतुजा देशमुख, ज्ञानेश्वरी पाटील या महिला पैलवानांच्या कुस्तीचा आनंद लुटता येणार आहे.

स्पर्धेत जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी होण्याचे आवाहन नारायण गाडगीळ, बजरंग पाटील, मदन निकम यांनी संयोजन समितीच्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिंतन परिषदशनिवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र विकास आघाडी, धर्मनिरपेक्ष जनजागृती अभियान, निर्मिती विचारमंच, युवा आंबेडकरवादी क्रांतीदल, सम्यक प्रतिष्ठान आणि सन्मान महिला फाउंडेशनच्यावतीने राज्यव्यापी एकदिवसीय चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता.३०) सकाळी अकरा ते रात्री आठ या कालावधीत राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ही परिषद होईल. शाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी अॅड. आर. बी. शरमाळे असतील.

यावेळी डॉ. गेल ऑम्वेट, डॉ. भारत पाटणकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

चिंतन परिषदेतील दुपारच्या सत्रात आंबेडकरवादी कवी डॉ. विठ्ठल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. यामध्ये भूमिका मांडणी साहील शेख, अमित मेधावी करणार आहेत, तर निमंत्रित कवी म्हणून डॉ. शिवाजीराव पाटील, पाटलोबा पाटील, राजवैभव कांबळे, उमेश सुतार, किरण भिंगारदेवे, प्रा. सचिन कांबळे, सीमा पाटील, निशांत शिंदे, मच्छिंद्र कांबळे, निर्मला पाटील, प्रा. प्रतिभा पैलवान, प्रा. विकास विधाते, गायत्री भोसले, वसंत भागवत आदी कवी सहभागी होणार आहेत.

सायंकाळी परिसंवाद व समारोप होणार आहे. 'धर्मनिरपेक्ष विचार भारताचे भविष्य सुंदर बनवू शकतात' या विषयवार चर्चा होणार आहे. यामध्ये बसवंत्ताप्पा उबाळे, अॅड.जयदेव गायकवाड, विश्वजित कांबळे, प्रा. चिंतामणी कांबळे, शंकर पुजारी, डॉ. प्रभाकर निसर्गंध, प्रा. दादासाहेब ढेरे, कृष्णा पाटील, प्रा. डॉ. अमर कांबळे, डॉ. प्रशांत गायकवाड सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय उपचारासाठी मदतीची गरज

$
0
0

समाजाच्या हातभारामुळे कुटुंब सावरु शकते

मनोरुग्ण पत्नीच्या उपचारासाठी पतीची धावपळ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यातील वडणगे येथील पती पत्नी आणि चार मुले असे सहा जणांचे कुटंब. दिवसभर कष्ट करुन उदरनिर्वाह चालविणाऱ्या त्या कुटंबांवर चार वर्षापूर्वी आघात झाला. यातून पत्नी मनोरुग्ण बनली. पत्नीवर उपचार, चारही मुलांचे शिक्षण आणि कुटुंबांचा गाडा ओढण्याची जबाबदारी घरातील कर्त्या माणसावर पडली. कोल्हापुरातील एका संस्थेत खासगी नोकरी करत संसार चक्र चालवित असताना दोन महिन्यापूर्वी पत्नीचा मानसिक विकार बळावला. गेली दीड महिने सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. तेथील औषधोपचाराचा खर्च आणि पुढे रत्नागिरीत होणाऱ्या उपचाराचा प्रश्न कुटुंबापुढे आ वासून उभा राहिला आहे. समाजाचा आर्थिक हातभार लाभल्यास एक कुटुंब सावरू शकते. हे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील असून उदरनिर्वाहासाठी सध्या वडगणेत स्थायिक आहेत.

कौटुंबिक विवंचनेत सापडले हे कुटुंब सध्या धावपळ करत आहे ती संबधित महिलेची प्रकृती सुधारावी यासाठी. पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी पतीची धावपळ सुरू आहे. यंदा दहावीची परीक्षा दिलेली मुलगी कुटुंबाला हातभार लागावा यासाठी सुट्टीच्या कालावधीत एका खासगी संस्थेत काम करत आहे. दुसरी मुलगी नववी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेश केली आहे. दोन्ही मुले लहान आहेत, एक मुलगा आठवीमध्ये शिकत आहे तर दुसरा सहावीत आहे. सहा जणांचे कुटुंब, गेल्या चार वर्षांपासून दवाखान्याच्या खर्चामुळे मेटाकुटीस आले आहे.

या कुटुंबाचा प्रमुख कोल्हापुरात एका संस्थेत रोजंदारीवर काम करतो. रोज १०० रुपये पगार. सीपीआरमध्ये मानसोपचार विभागात पत्नीची देखभाल आणि दुपारी चारनंतर त्या संस्थेत नोकरी अशी त्यांची कसरत सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी पत्नीचा मानसिक विकार बळावला. उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पत्नीला मानसिक विकारातून बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. रत्नागिरी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार केल्यास मानसिक आजारांतून बऱ्या होऊ शकतात, असा सल्ला दिल्याने त्यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांनी याबाबत रत्नागिरी येथील डॉक्टरांशी चर्चाही केली आहे. मात्र, रत्नागिरीतील उपचारासाठी पैशाची गरज भासणार आहे. शिवाय सीपीआरमधील आतापर्यंतच्या उपचाराचे बिल भागवायचे आहे अशा दुहेरी कात्रीत ते सापडले आहेत. सीपीआरमध्ये बहुतांश उपचार मोफत होतात. मात्र औषधे आणि अन्य चार्जस मिळून त्यांना काही पैसे उभारावे लागणार आहेत. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे तीन हजार रुपये भरणे त्यांना आवाक्याबाहेरचे बनले आहे. समाजातील दानशूर व्यक्तांनी, संस्थांनी याकामी मदतीचा हात दिला तर मानसिक विकारांनी ग्रस्त त्या महिलेना वैद्यकीय सुविधा मिळू शकता. सीपीआरमधील बिलाचा भरणा आणि रत्नागिरीतील हॉस्पिटलमध्ये उपचारही होऊ शकतात. ज्यांना संबधित कुटुंबाला मदत करावयाची आहे, त्यांनी ८६६९५२६१४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट इथेनॉल निर्मिती धोरणाचा ऊस उत्पादकांना फायदा

$
0
0

थेट इथेनॉल निर्मितीचा

ऊस उत्पादकांना फायदा

शामराव देसाई यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ऊस, मका, ज्वारी आदी शेतीमालापासून थेट इथेनॉल निर्मिती करण्यास १६ मे रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ऊस उत्पादकांसह इतर कृषी उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांना फायदा होणार आहे. उसापासून थेट इथेनॉल निर्मिती करण्यासाठी जैवइंधन शेतकरी संघटनेने २००६ पासून लढा उभा केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतला असल्याने संघटनेच्या लढ्याला यश आले असल्याचा दावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पत्रकार बैठकीत केला. तसेच इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही केले.

देसाई म्हणाले, 'साखर उद्योग केवळ उसापासून तयार होणाऱ्या साखरेवर अवलंबून असतो. उसापासून तयार होणाऱ्या इतर उपपदार्थ निर्मितीकडे नेहमीच दुर्लक्ष होते. उसापासून केवळ साखर निर्मितीवर लक्ष केंद्रीत केल्याने जर बाजारपेठेत साखरेचे दर घसरल्यास त्याचा फटका थेट उत्पादकांना बसतो. यासाठीच उसापासून थेट इथेनॉल निर्मितीसाठी संघटनेने जोर धरला होता. राज्य ते केंद्रस्तरापर्यंत संबंधित विभागाने सातत्याने पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. तसेच दरवर्षी हंगामापूर्वी होणाऱ्या ऊसदराच्या बैठकीमध्ये इथेनॉल निर्मितीसाठी आग्रही भूमिका मांडली होती.'

ते पुढे म्हणाले,' केंद्रात एनडीए सरकारचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी थेट उसापासून इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर सत्तेवर असलेल्या युपीए सरकारने विशेषत: माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी तो निर्णय रद्द केला होता. यानंतरही संघटनेच्या माध्यमातून थेट इथेनॉल निर्मितीसाठी पाठपुरावा सुरू होता. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवान, राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची भेट घेवून निर्णय घेण्याची विनंती केली होती. मंत्री गडकरी यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता १६ मे रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीचे कारखाने सुरू होतील. यामुळे दरवर्षी निर्माण होणारा अतिरिक्त साखरेचा प्रश्न निकालात निघेल. उसापासून साखर अन् इथेनॉलची निर्मिती झाल्यास त्याचा फायदा उत्पादकांना होणार आहे.' पत्रकार बैठकीस राज्य महिला अध्यक्षा सुजाता देसाई, प्रदेशाध्यक्ष नारायण पोवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुष्याच्या लढाईला शिक्षणाची साथ

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com
tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

सामाजिक दबाव, मानसिक ताणतणावर, स्वत:च्या लिंगभावविषयी अस्वस्थता, सामाजिक कलंक अशा अनेक समस्यांशी तृतीयपंथीचा दररोजचा संघर्ष सुरू असतो. समाजही तुच्छतेची वागणूक देत असल्याने वर्षानुवर्षे तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात व सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठी येथील तृतीयपंथींनी शिक्षणाची वाट धरली आहे.

शिक्षणाच्या जोरावर समाजाचा आपणही एक अविभाज्य घटक असल्याचे दाखवून देत आयुष्यातील संघर्ष कमी करण्यासाठी हे सर्व तृतीयपंथी २५ मे रोजी कला शाखेच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेला सामारे जात आहेत. भविष्यात हे तृतीयपंथी पदवी घेऊन सन्माने बाहेर पडतील त्यावेळी समाजाने त्यांचा सकारात्मक दृष्टीने स्वीकार केला पाहिजे. असे झाले तरच तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील.

स्त्री किंवा पुरुष अशा दोन्ही लिंगांमध्ये समावेश नसल्याने त्यांच्याकडे समाजाच्या पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा. समाजात स्थानच मिळत नसल्याने असह्य जीवन वाट्याला आलेले तृतीयपंथी मिळेल, त्या साधनातून आपल्या पोटाची खळगी भरत असतात. तृतीयपंथीमध्ये शिक्षणाचा प्रचंड अभाव असल्याने अंधश्रद्धेच्या जोखडात अडकून पडलेले दिसतात. रेल्वे, एसटी स्टँड, मंदिर किंवा अन्य रहदारीच्या ठिकाणी पैस मागत फिरत असल्याचे चित्र हमखास पहायला मिळते. पण अशा तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.

समाजच स्वीकारत नसल्याने कोल्हापूर येथील आठ तृतीयपंथींनी शिक्षणातून आपली संघर्ष संपवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. मुक्त विद्यापीठाचे महावीर कॉलेजयेथील सेंटरमध्ये कला शाखेच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत प्रवेश घेतला. कॉलेजनेही सर्व तृतीयपंथींना विद्यापीठामार्फत मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली. पण केवळ शिक्षण घेतले तर पोट कसे भरणार या विवेंचनेतून चार तृतीयपंथींना अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागले. आपल्या चार सहकाऱ्यांनी शिक्षण सोडले, तरी दुर्गा पिसाळ, मयुरी आळवेकर, विनिता डोईफोडे व अंकिता आळवेकर यांनी हार न मानता येईल त्या संकटांना सामोरे जात नियमित वर्गांना उपस्थिती लावली. वर्षभराच्या अभ्यासक्रमामध्ये मिळालेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावरच २५ मे रोजी होणाऱ्या अंतिम परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. यासाठी ते नियमित आभ्यासही करत आहेत. शिक्षण पूर्ण करुन आयुष्याची लढाई जिंकण्याचा त्यांना निर्धार केला आहे.

तृतीयपंथीची मतदार नोंदणी

घटनेने सर्वांना समान हक्क दिला असला, तरी मतदानासारख्या हक्कापासून देश स्वातंत्र झाल्यापासून तृतीयपंथी वंचित होते. राष्ट्रीयस्तरावर आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपले हक्क मिळवून घेतले आहेत. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई केली आहे. आपल्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यांमुळेच त्यांनी नुकतीच मतदार यादीमध्ये नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची नोंद मतदार यादीत झाली आहे.

दैनंदिन जीवनात दररोज वेगवेगळ्या संघर्षाला सामोरे जावे लागते. संघार्षातून बाहेर पडायचे असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याचा निर्धार केला आहे. प्रथम वर्षाच्या शिक्षणासाठी महावीर कॉलेज व मुक्त विद्यापाठाच्या सर्वच घटकांनी मदतीचा हात दिला. मिळालेल्या शिक्षणातून इतर तृतीयपंथासाठी कार्य करत राहणार आहे. यासाठी सरकारी सेवेत जाण्याचा प्रयत्न असेल.

दुर्गा पिसाळ, तृतीयपंथी

तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यातूनच प्रवेश परीक्षेद्वारे तृतीयपंथींना प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला आहे. त्यांना मोफत शिक्षण दिले जात असून संपूर्ण खर्च मुक्त विद्यापीठ करत आहे.

प्रा. अरुण पाटील, महावीर कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती निवारणासाठी जिल्हा परिषद सज्ज

$
0
0

जि.प. लोगो

.......................

पूरस्थितीत स्थलांतराचे आव्हान

जिल्हा परिषदेच्या आपत्कालीन आराखड्याच्या अंमलबजावणीत अडचणीची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेने अतिरिक्त पावसाची शक्यता गृहीत धरुन आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. अतिवृष्टीने जिल्ह्याला अनेकवेळा पुराचा फटका बसून अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशा स्थितीत परिषदेच्या आपत्कालीन कक्षाकडे स्वयंचलित बोट नसल्याने नदी काठावरील गावे व पूरबाधित क्षेत्रातातील नागरिकांचे कसे स्थलांतर करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेकडे असलेल्या ४४ नौका या मनुष्यचलित असल्याने याच नौकांमधून धोकादायक परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करावे लागणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा आपत्कालीन आराखडा कागदावर मजबूत वाटत असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहेत.

हवामान विभागाने यावर्षी मान्सूनचे निर्धारीत वेळेपूर्वी आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच गेल्यावर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो झाली होती. सद्य:स्थितीत सर्व धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठी असल्याने यावर्षी धरणे लगेच भरण्याची शक्यता आहे. धरणे लवकर भरली आणि पावसाचा कालावधी वाढल्यास पुराची शक्यता गृहीत धरुन आपत्कलीन आराखडा तयार केला आहे. आराखडा तयार करताना ग्रामीण भागातील, रस्ते, शाळांच्या खोल्या, नदीकाठावरील गावांचा सर्वे, आरोग्य सुविधा व औषधसाठा यांचा यामध्ये समावेश केला आहे. आराखड्यामध्ये अजूनही दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.

मात्र तयार केलेल्या आराखड्यामध्ये पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी अत्यंत तोकडी यंत्रणा तैनात केली आहे. पूरस्थितीमध्ये नदीकाठावरील गावांबरोबर संपर्क अथवा स्थलांतर करण्यासाठी ४४ लाकडी नौका तयार ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व नौका मनुष्यचलित आहेत. जिल्हा परिषदेकडे एकही स्वयंचलित बोट नसल्याने यावर मर्यादा येणार आहेत.

पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची डागडुगी करण्यास मात्र सुरुवात केली आहे. बाजूपट्ट्या भरण्याबरोबरच रस्त्याच्या बाजूने नवीन चर अथवा जुन्या चऱ्यांची दुरुस्ती सुरु आहे. तसेच रस्त्यावर येणाऱ्या मोऱ्यांचीही दुरुस्ती सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या खोल्यांचा सर्व्हे पूर्ण झाला असून धोकादायक खोल्यांची दुरुस्ती शाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार आहे.

पावसाच्या कालावधित साथीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील १,२१७ गावे आणि १,०३० ग्रामपंचायतींना नियमित आरोग्य सेवा देण्यासाठी ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाच प्राथमिक आरोग्य पथके व आठ तालुका दवाखाने, ४१३ उपकेंद्रे अशी ५१६ आरोग्य संस्थामार्फत २४ तास आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. यासाठी पुरेसा औषधसाठाही करुन ठेवण्यात आला आहे.

..........

चौकट

अतिपावसामुळे वाहतूक खंडित होणारे रस्ते

२८

इतर जिल्हा मार्ग

३०

ग्रामीण मार्ग

५८

............

पूरस्थितीत नौकांचा वापर होणारी गावे

बीड, गाडेगोंडवाडी, हसूर (करवीर) डोणेवाडी, कौलगे, हिटणी (गडहिंग्लज), नृसिंहवाडी, कवठेसार, कुटवाड, आकिवाट, घालवाड, हसूर, कवठेगुलंद, गणेशवाडी, जुने दानवाड, राजापूर, राजापूरवाडी, धरणगुत्ती, कनवाड, खिद्रापूर, शिरढोण, आलास, बस्तवाड (शिरोळ), कसबा ठाणे, नणुंद्रे, बोरगांव पैकी देसाईवाडी, देवठाणे, कोलोली, परखंदले-गोठे (पन्हाळा), वेतवडे, टेकवडे (गगनबावडा), चिखली, बेलवळे बुद्रुक (कागल), घुणकी, निलेवाडी, चंदूर, खोची, चावरे (हातकणंगले), येळवडे, आवळी बुद्रुक (राधानगरी), कापशी, थेरगांव (शाहूवाडी)

.................

तीन गावांचा संपर्क तुटतो

जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावती, कुंभी, ताम्रपणी आदी नद्यांना पूर आल्यानंतर जिल्ह्यातील तीन गावांचा संपूर्ण संपर्क तुटतो. त्यामध्ये टेकवडे (ता. गगनबावडा), बर्की (ता. शाहूवाडी), पिळणी (ता. चंदगड) या गावांचा समावेश असून या गावातील ग्रामस्थांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते.

.................

जिल्हा परिषदेकडील प्रमुख औषधांचा साठा

पॅरासिटेमॉल - दोन लाख

सिप्रो - सहा हजार

सेप्ट्रन एसएस - ३० हजार

ओआरएस - ९१ हजार ९६

फ्रुजोलिडिंन - पाच लाख ५३ हजार

रिंगर लॅक्टेट - २३ हजार

आयव्ही - दहा हजार

रँटिडिंन - दोन लाख

...............

३१ मेपर्यंत होणारी कामे

धोकादायक स्थळांची दिशादर्शक फलकांतून माहिती

गटर व नाले सफाई

पुलांची तपासणी

आपत्कालीन पथकांची निर्मिती

धोकादायक शाळा खोल्यांचा सर्व्हे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images