Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

२५ रोजी सांगता

$
0
0

कोल्हापूर : भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, मुस्लिमांना सच्चर कमीशन लागू करावे, यासह अन्य मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यभर परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. २५ मे रोजी या यात्रेची सांगता कोल्हापुरात होणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक मनोहर चौगुले यांनी पत्रकार बैठकीत दिली. नागपूर येथून सुरू झालेली ही यात्रा २५ मे रोजी कोल्हापुरात जिल्ह्यात येणार आहे. गारगोटी व पन्हाळा येथे सभा झाल्यानंतर दसरा चौकात त्याची सांगता होणार आहे. यावेळी वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड, प्रसाद पाटील, बबन रानगे, दिगंबर लोहार, हाजी अस्लम, विलासराव वाघमोडे, सुशीलकुमार कोल्हटकर, राजाराम विभुते, शामराव गुरव हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी माया जमदाडे, सुहास कांबळे, आबु मुल्ला आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील

$
0
0

फोटो सिंगल

....................

काँग्रेसला यश मिळवून देण्याचे

पी.एन. यांच्यासमोर आव्हान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

१९९९ मध्ये जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार पी.एन. पाटील यांच्यावर आल्यानंतर तब्बल १९ वर्षे या पदावर राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पद त्यांच्याकडेच राहणार असल्याने पक्षाला यश मिळवून देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात काँग्रेससमोर आव्हान उभे राहिले. जिल्ह्यातील मातब्बर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाली होती. त्यानंतर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा पी. एन. यांच्याकडे आली. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देताना पक्ष संघटनवर लक्ष दिले. जिल्हा, तालुका आणि गावपातळीरील कार्यकर्त्यांना आधार दिला. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी काहीवेळेला जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात लढाई केली. विविध संस्था, साखर कारखाने, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँका आणि गोकुळ अशा महत्वाच्या सत्ताकेंद्रात काँग्रेस पक्षाला सत्ताधारी बनविले.देशात सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे. जिल्ह्यात आज काँग्रेससमोर राष्ट्रवादीसह शिवसेना आणि भाजपचेही आव्हान आहे. येत्या वर्षभरात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. जिल्ह्यात भाजपचा विस्तार वाढत आहे. सेनेचे सहा आमदार आहेत. काँग्रेसचे अनेक नेते सध्या पक्षात नाहीत. प्रकाश आवाडे पक्षावर नाराज आहेत. आमदार सतेज पाटील व पी.एन. यांच्यातील गटबाजी वाढत आहे. अशावेळी सर्व नेत्यांना पुन्हा एकत्र आणून पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. विधानसभेच्या अधिकाधिक जागा मिळवण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे.

...................

कोट

'जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाची वाढ आणि कार्यकर्त्याच्या संघटनेला प्राधान्यक्रम दिले. जिल्ह्यातील महत्वाच्या सत्तास्थानावर पक्षाची सत्ता आणली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी मानाची पदे दिली. विधानसभेच्या किमान सात जागा निवडून याव्यात यासाठी प्रयत्न राहतील.

पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाद एकाशी, मारले दुसऱ्यालाच

$
0
0

(फोटो आहे)

वाद एकाशी, गोळी दुसऱ्याला

हल्लेखोरावर शस्त्रतस्करीचा गुन्हा, जरगनगर परिसरात दहशत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जरगनगर येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेला वर्चस्ववादाची किनार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. हल्लेखोर प्रतीक सरनाईक आणि गौरव वडेर यांच्यातील वादानंतर मध्यस्थी करणाऱ्या प्रतीक पोवारच्या डोक्यात सरनाईकने गोळी घातली. या घटनेतील हल्लेखोर सरनाईक हा इचलकरंजीतील शस्त्र तस्कराशी संबंधित आहे. या परिसरातील अन्य काही तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने पोलिसांकडून गांभीर्याने तपास सुरू आहे.

पाचगाव येथील साईनाथ कॉलनीत राहणारा प्रतीक सुहास सरनाईक (वय ३०) हा एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने नोकरी सोडली. त्याच्यावर इचलकरंजीत शस्त्र तस्करीचा एक गुन्हा दाखल आहे. याशिवाय इचलकरंजीतील शस्त्रतस्कर विकास खंडेलवाल याच्याशीही तो संबंधित आहे. सरनाईक हा मद्यपी आणि शीघ्रकोपी स्वभावाचा असल्याने परिसरात अनेकांशी त्याचा वाद होता. तरुण मंडळातील कार्यक्रमांवरून त्याचे प्रतीक पोवार याच्याशी खटके उडाले होते. रविवारी रात्री जरगनगरातील पाचगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत कट्ट्यावर बसल्यानंतर सरनाईक आणि गौरव वडेर यांच्यात वाद झाला. पोवारने मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग मनात धरून सरनाईकने पोवारच्या डोक्यात गोळी घातली. यानंतर वडेरलाही मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलाचा कट्टा अडकल्याने गोळी सुटली नाही. वाद झाला एकाशी आणि बळी दुसऱ्याचाच गेल्याची चर्चा परिसरात सुरू होती. मृत पोवारच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. तो माळी काम करीत होता.

या घटनेनंतर गौरव वडेर याने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हल्लेखोर सरनाईक याच्यासह परिसरातील काही तरुणांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याने वर्चस्ववादातून गोळीबार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर आणि सागर कांबळे हे दोघे एकाच दुचाकीवर बसून निघून गेल्याने हा पूर्वनियोजित कट असल्याचीही शक्यता बळावली आहे.

चौकट

मोठा अनर्थ टळला

हल्लेखोर सरनाईक हा मद्यपी आणि शीघ्रकोपी स्वभावाचा आहे. परिसरातील अनेक तरुणांशी किरकोळ कारणावरून त्याचे खटके उडत. रविवारी रात्री त्याचा गौरव वडेर याच्याशी वाद झाला. यावेळी प्रतीक पोवार याने मध्यस्थी केली. याचा राग मनात धरून सरनाईकने पोवारच्या डोक्यात गोळी घातली. यानंतर तो गौरवसह इतरांनाही मारण्याच्या प्रयत्नात होता. दुसरी गोळी चालवण्यासाठी पिस्तुल लोड करताना अडकल्याने गोळी सुटली नाही. पिस्तुलाचा कट्टा अडकला नसता, तर कदाचित हल्लेखोरांने इतर मित्रांवरही गोळ्या चालवल्या असत्या, असे फिर्यादी वडेर याने सांगितले.

चौकट

परिसरात प्रचंड दहशत

जरगनगर ते पाचगाव या मार्गावर रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. आर.के. नगरमार्गे महामार्गाकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने यावर नेहमीच वाहनांची ये-जा सुरू असते. रात्री अकराच्या सुमारास भरवस्तीत गोळीबार झाला. घटनास्थळ‌ाला लागून घरे आहेत, तरीही नागरिक बाहेर आले नाहीत. या परिसरात अनेक पोलिस राहतात. त्यांनाही वेळेत याची माहिती मिळाली नाही. सुमारे दीड ते दोन तासांनी पोलिस घटनास्थळी पोहोचले. चार तास मृतदेह रस्त्यातच पडला होता. गोळीबाराच्या घटनेने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, पोलिसांना माहिती देण्यासही नागरिक समोर आले नाहीत.

चौकट

बार मालकाला धमकावले

गोळीबारानंतर हल्लेखोर प्रतीक सरनाईक याने पहाटे तीनच्या सुमारास जरगनगर येथील एका बार मालकाला उठवून त्याच्याकडे दारू मागितली. यावेळी त्याच्यासोबत अन्य दोघे तरुण होते. सोमवारी सकाळी सरनाईक मंगळवार पेठेतील नातेवाईकाच्या घराजवळ होता, अशीही माहिती पोलसांना मिळाली होती. त्यानंतर गांधीनगर पोलिसांनी उचगाव येथे त्याला अटक केली.

कोट

'मित्रांमध्ये झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून गोळीची पुंगळी मिळाली असून,या गुन्ह्यामागील अन्य कारणांचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे.

संजय मोहिते - पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी बस उलटून १३ जखमी

$
0
0

फोटो

...........

स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी उलटली

१३ प्रवासी जखमी, कांडगावजवळ अपघात

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

करवीर तालुक्यातील कांडगाव येथील कांडगाव हायस्कूलच्या समोर शेरीच्या ओढ्यात मालवण आगाराची एसटी पलटी उलटून झालेल्या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले. बार्शी-मालवण बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने सोमवारी (ता. २१) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.

घटनास्थळासह सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मालवण आगाराची एसटी (एम.एच. १४ बी.टी. २६७७) बार्शी येथून सकाळी साडेसहाच्या सुमारास मालवणला जाण्यासाठी सुटली. दुपारी सव्वादोनच्या सुमारास कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातून एसटी बाहेर पडली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास कांडगाव हायस्कूलच्या समोर एसटी आली असता अचानक एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे चालकाचा एसटीवरील ताबा सुटून एसटी रस्त्याच्या डाव्या बाजूकडील ओढ्यात पलटी झाली. या एसटीतून एकूण ४२ प्रवासी होते. यातील २१ प्रवासी सुखरूप असून, १३ प्रवासी जखमी झाले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. उर्वरित प्रवाशांना पाठीमागून आलेल्या पुणे-मालवण एसटीतून पुढे पाठवले.

अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यास व रुग्णालयात पाठवण्यास मदत केली. त्यानंतर संभाजीनगर डेपो मॅनेजर प्रतिभा इंगवले रॉड्रिक्स, करवीरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी तसेच वाहतूक नियंत्रक पथक, मार्ग तपासणी पथक अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी पाठवून वाहतूक सुरळीत केली.

अरुण संभाजी शिंदे (वय ५२, रा. कोंडवे, जि. सातारा), बाळू तातोबा पोवार (६५, रा. दरवेश पाडळी, जि. कोल्हापूर), विमल श्रीमंत लोकरे (५४, रा. बार्शी, जि. सोलापूर), शांता दिलीप जगदणे (४६, रा. अंबरनाथ, मुंबई), मनस्वी महेंद्र लोकरे (४, रा. बार्शी), गोजाबाई बाळू पोवार (५५, रा. दरवेश पाडळी, जि. कोल्हापूर), सुप्रिया अशोक मुसळे (वय ४८, रा. सुकळवाड, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग), अशोक लहू मुसळे (५५, रा. सुकळवाड, जि. सिंधुदुर्ग), रमेश सीताराम नारकर (६८, रा. फोंडा, जि. सिंधुदुर्ग), अमित आनंद सावंत (३९, रा. त्रिंबक मालवण, जि. सिंधुदुर्ग), सविता संतोष कोकणे (२५, रा. डिगज, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), प्राची संतोष कोकणे (१ वर्ष, रा. राधानगरी, जि. कोल्हापूर), दिलीप राजाराम वेलणकर (५६, रा. राजापूर) अशी जखमीची नावे आहेत.

...............

चौकट

ओढ्याला कठडाच नाही

कांडगाव हायस्कूलच्या समोर कोल्हापूर-राधानगरी मार्गावर कोल्हापूरकडून येताना मोठा उतार आहे. या उताराच्या ठिकाणी शेरीचा ओढा आहे. या ओढ्यातच एसटी पलटी झाली. ओढ्याला संरक्षक कठडाच नाही. संरक्षक कठडा असता तर कदाचित अपघात टळला असता, त्यामुळ‌े संरक्षक कठडा तयार करण्याची मागणी केली जात आहे.

चौकट

सुट्टीमुळे क्रेन मिळण्यास विलंब

अपघात घडल्यानंतर क्रेन मागवण्याकरिता फोनाफोनी सुरू झाली. संबंधित अधिकारी, कर्मचारी क्रेनसाठी संपर्क साधत होते. पण सोमवारी कामगारांना सुट्टी असल्याने अनेक क्रेन मालकांनी येण्यास नकार दिला. अखेर तीन तासानंतर एक क्रेन घटनास्थळी दाखल झाली. एसटी काढताना तासभर ट्रॅफिक जाम झाले होते. अखेर ओढ्यातून बाहेर एसटी बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदर बजारमध्ये तरुणावर तलवार हल्ला

$
0
0

शहरात तीन ठिकाणी

तलवार हल्ला

किरकोळ कारणावरुन झालेल्या हल्ल्यात तीन युवक गंभीर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात सोमवारी तीन ठिकाणी किरकोळ कारणावरुन तलवार हल्ल्याच्या घटना घडल्या. सदर बाजार येथील घटनेत ओंकार बाबासो सोनेकर (वय १७ रा. उचगाव), जवाहरनगर येथील घटनेत अमीर फिरोज टाळकुट्टी (वय १८ रा. जवाहरनगर) तर सुभाष नगर रोडवर झालेल्या तलवार हल्ल्यात केर्ली येथील सागर संभाजी मोहिते (वय १८) गंभीर जखमी झाला. तीनही घटना रात्री आठच्या सुमारास घडल्या. तीनही जखमींना सीपीआरमध्ये उपचारांसाठी दाखल केले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सीपीआर पोलिस चौकीत सुरू होती.

उचगाव येथील ओंकार सोमवारी रात्री सदर बाजार येथील आपल्या मित्रांना भेटण्यासाठी आला होता. मित्रांसह तो कोरगावकर हायस्कूल परिसरात बोलत असताना अचानकपणे तिघांनी ओंकारवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे. ओंकार जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. जखमी ओंकारला मित्रांनी तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. अक्षय कांबळे, गब्बर सूर्यवंशी आणि अनिकेत कांबळे या तिघांनी हल्ला केल्याची माहिती जखमी ओंकारने पोलिसांना दिली. डोक्यातील जखम गंभीर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, तलवार हल्ल्याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस सदर बजार येथे कोरगावकर हायस्कूलसमोर पोहोचले. मोठ्या संख्येने तरुणांची गर्दी जमल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली.

तर जवाहरनगर येथील वीर कक्कया शाळेजवळ अज्ञातानी केलेल्या तलवार हल्ल्यात अमीर फिरोज टाळकुट्टी हा गंभीर जखमी झाला. अमीरच्या डोक्यात वर्मी घाव लागल्याने तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. पण रात्री उशीरापर्यंत हल्लेखोरांची ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

लक्ष्मीपुरी सुभाष रोड येथील तलवार हल्ल्यात केर्ली येथील सागर मोहिते गंभीर जखमी झाला. सागर सुभाष रोडवरील एका अॅल्युमिनियम दुकानात कामगार म्हणून काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शेजारील दुकानातील युवकांबरोबर वाद सुरू आहे. या वादाचे रात्री हाणामारीत रुपातंर झाले. दुकान बंद करुन जात असताना दोघांनी सागरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो जमिनीवर कोसळला असता, त्याच्या डोक्यात तरवारीचा वार करुन हल्लेखोर पसार झाले. जखमी सागरला त्वरीत सीपीआरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दोन्ही घटनांची नोंद सीपीआर चौकीत झाली असून रात्री उशीरापर्यंत पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरांच्या जामिनावर आज सुनावणी

$
0
0

लाचखोरांच्या जामिनावर

आज सुनावणी

कोल्हापूर

जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर नाव नोंदणीसाठी अडीच लाख रुपयांची लाच घेणारे तहसीलदार किशोर घाडगे आणि तलाठी मनोज भोजे यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता. २२) सुनावणी होणार आहे. दरम्यान, तलाठी शमशहाद मुल्ला हिच्यावर अद्याप उपचार सुरू असल्याने कोर्टाने हंगामी जामीन दिला. सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश एल. डी. बिले यांनी संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करून मंगळवारी जामीन अर्जावरील सुनावणी होईल, असे सांगितले. सरकार पक्षामार्फत अॅड. विवेक शुक्ल यांनी कामकाज पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच्या बदल्यात दहा फोडू

$
0
0

काँग्रेस-राष्ट्रवादीचा इशारा; नगरसेवक सहलीवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आम्ही घोडेबाजाराच्या विरोधात आहोत. विरोधकांमधील अनेकजण संपर्कात आहेत. पण आम्ही त्यांना त्यांच्या आघाडीशी प्रामाणिक रहा, असा सल्ला दिला आहे. यानंतरही विरोधकांनी जर आमचा एक नगरसेवक फोडला तर त्या बदल्यात दहा नगरसेवक फोडू', असा इशारा काँग्रेस आघाडीच्यावतीने प्रा. जयंत पाटील यांनी दिला. महापौरपदासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. पण त्यातील प्रत्येकाशी चर्चा करूनच उमेदवारीबाबत निर्णय घेतले आहेत. त्यामुळे कुणी नाराज राहिलेले नसल्याने साऱ्या नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात आले आहे, असेही सांगितले.

काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची नावे दुपारी दोन वाजता जाहीर करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजेश लाटकर,

काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. आघाडीच्या सर्व हालचालींची सूत्रे प्रा. जयंत पाटील हलवत असल्याचे दिसून आले. इच्छुकांच्या मुलाखती व आघाडीची बैठक झाल्यानंतर रविवारीच काही नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात आले होते. सोमवारीही उर्वरित सर्वांना सहलीवर पाठवण्यात आले आहे. साऱ्यांना व्हीप बजावण्यात आला आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप आघाडीकडून काँग्रेसमधील असंतुष्टांना जाळ्यात ओढण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेस आघाडीनेही त्यानुसार रणनीती आखली. भाजपमधील अनेक असंतुष्टांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. कोट्यवधींचे आकडे सांगितले जाऊ लागल्याने घोडेबाजार रंगण्याची चिन्हे दिसत होती. पण गेल्या आठवड्यात दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांच्या पातळीवर घोडेबाजार करायचा नाही, याबाबत समझोता झाल्याची चर्चा होती. भाजपच्या गटनेत्यांनी त्यादृष्टीने उघडपणे सांगितले. त्यामुळे यापुढे काही हालचाली होतील, असे वाटत नव्हते. पण शिवसेनेने अचानक निवडणुकीत प्रवेश केल्याने वळण वेगळे घेतले. या पार्श्वभूमीवर प्रा. जयंत पाटील यांनी आघाडीची भूमिका मांडली, 'आम्ही काहीही करणार नाही. मुळात आमची आघाडी घोडेबाजाराच्या विरोधात आहे. त्यामुळे विरोधकांचे काही नगरसेवक संपर्कात असूनही आम्ही त्यांना तिथेच थांबण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांच्याकडून आमचा एक नगरसेवकही फोडला तर त्याबदल्यात त्यांचे दहा नगरसेवक फोडू.'

उमेदवारी देताना नगरसेवकांमध्ये नाराजी पसरण्याचा प्रकार बंद करण्यासाठी नवीन पद्धत अवलंबल्याचे सांगताना प्रा. पाटील म्हणाले, 'ऐनवेळी बंद पाकिटातून नाव येण्याच्या प्रकाराने शेवटच्या क्षणी नगरसेवकांमध्ये नाराजी पसरते व त्यातून असंतोष पसरतो. हा प्रकार टाळण्यासाठी यंदा इच्छुकांशी थेट चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे कुणी नाराज झालेले नाही. उपमहापौरपदासाठीही दोन नगरसेवकांशी चर्चा करुन निर्णय घेतला आहे.'

....

पिरजादे, चव्हाणांची कोंडी

स्थायीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात मतदान केलेल्या अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांना महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीसोबत रहावे लागेल. पक्षाच्या गटनेत्याने सभागृहात निवडीवेळी दिलेला तोंडी आदेश हाच व्हीप असू शकतो. त्यावेळी पक्षाच्या नगरसेवकांना तो नाकारता येत नाही. माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या अपात्रतेबाबत मतदान झाल्यानंतर पक्षाने व्हीप बजावल्यानंतर माळवी यांना स्वत:विरोधात मतदान करावे लागल्याचे उदाहरण आहे. यामुळे सभागृहात जर त्यांनी पक्षाच्या बाजूने मतदान केले नाही तर सध्या स्थायी सभापती निवडणुकीबाबत विभागीय आयुक्तांकडे सुरू असलेल्या प्रकरणात सबळ पुरावा होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू प्रतिष्ठानच्यावतीने बुधवारी स्नेह मेळावा

$
0
0

शाहू प्रतिष्ठानचा मेळावा

कोल्हापूर

राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्यावतीने बुधवारी (ता.२३) सायंकाळी पाच वाजता शाहू जयंती उत्सवाचे नियोजन करण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला ८५ तालीम मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीला कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पैलवान बाबा महाडिक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहराशेजारच्या गावांत पाणीटंचाई

$
0
0

म. टा वृत्तसेवा, कसबा बावडा,

शहराभोवतीच्या १३ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गांधीनगर प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला कागलजवळ गळती लागल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईला त्रासून उचगाव येथे महिलांनी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला. रास्ता रोकोनंतर एका मंडळाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला.

गांधीनगर प्राधिकरण योजनेअंतर्गत शहरशेजारच्या १३ गावांना पाणीपुरवठा केला जातो. याअंतर्गत कागलजवळून दूधगंगा नदीतून उपसा केला जातो. आठ दिवसांपूर्वी कागलजवळ या जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे पाणीउपसा बंद करण्यात आला आहे. गळती लागलेल्या ठिकाणी काळवाट जमीन आहे. यापूर्वी तेथे नवीन पाइप टाकल्या होत्या. जमीन खचल्याने तेथे जोडकाम निसटले. परिणामी मोठी गळती लागली. पावसामुळे तेथे गळतीचे काम करणे अवघड झाले होते. मंगळवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या आठ दिवसांपासून पाण्यासाठी वनवन करणाऱ्या नागरिकांनी अचानक उचगाव कमानीजवळ रास्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक बंद झाली. उचगाव येथील छत्रपती शिवाजी नगर, मणेरमळ्यात माजी ग्रां. प. सदस्य दत्तात्रय तोरस्कर यांनी बारा हजार लिटर क्षमता असलेला पाण्याचा टँकरची सोय केली आहे. त्याचबरोबर हिंदुस्थान मित्र मंडळाने उचगावच्या काही भागात टँकरने मोफत पाणी पुरवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मस्के ‘आदर्श शिक्षक’

$
0
0

कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठातील उषाराजे हायस्कूलच्या सहायक शिक्षिका वर्षा मस्के यांना आविष्कार सोशल व एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. संतोष प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संजय पवार, प्रा. डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राजक्त पाटील, एम. व्ही. जाधव, डॉ. सूर्यकांत मस्के, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगल कार्यालयातून दागिन्यांची पर्स लंपास

$
0
0

मंगल कार्यालयातून

दागिन्यांच्या पर्सची चोरी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लिशां हॉटेल चौक परिसरातील महालक्ष्मी मंगल कार्यालयाच्या चेंजिंग रूममधून चोरट्याने महिलेची दागिन्यांची पर्स लंपास केली. पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज होता. याबाबत रंजना गणपती पाटील (वय ५०, रा. म्हाकवे, ता. कागल) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाकवे येथील रंजना पाटील मंगळवारी महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी कानातील टॉप, नेकलेस, कर्णफुले, मोबाइल, रोख ९०० रुपये असा सुमारे लाखाचा ऐवज पर्समध्ये ठेवला होता. ही पर्स त्यांनी लेडिज चेंजिंग रुममधील कॉटवर ठेवली होती. रूमचा दरवाजा बंद करून त्या हॉलमध्ये थांबल्या होत्या. सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पाटील यांची पर्स लांबवली. दीडच्या सुमारास त्यांना पर्सचोरीचा प्रकार लक्षात आला. यानंतर शोध घेऊनही पर्स न सापडल्याने त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पर्सचोरीची फिर्याद दिली. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टूर कंपनीविरोधात शाहूपुरीत तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दाभोळकर कॉर्नर चौकातील एका टूर कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आकर्षक टूर पॅकेज देण्याचे आमिष दाखवून कंपनीने शेकडो लोकांकडून एक ते सव्वातीन लाखांपर्यंत रकमा भरून घेतल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र सहलीचे नियोजन न करता कार्यालय बंद केल्याने पैसे भरलेल्या नागरिकांचे धाबे दणाणले आहे. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रारींचे तीन अर्ज दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोळकर चौकातील एका तीनमजली इमारतीत टूर कंपनीचे कार्यालय आहे. देश-विदेशात सहल घडविण्याचे काम या कंपनीमार्फत केले जाते. सहलीसाठी भरलेल्या पैशांवर कॅशबॅक ऑफरसह पुन्हा गोवा टूरचेही आमिष दाखवले जात होते. १ ते ३ लाख २० हजारांपर्यंत अनेक पॅकेज कंपनीने नागरिकांना दिली आहेत. गेल्या चार दिवसांपासून कंपनीचे कार्यालय अचानक बंद असल्याने पैसे भरलेल्या नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत कंपनीविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. पोलिसांकडून कंपनीचे मालक आणि कर्मचाऱ्याचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडार समाज

$
0
0

'कचराप्रश्नी पालिकेला

डंपरसह घेराव घालू'

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'कोल्हापूर महापालिकेने शहराच्या आरक्षित जागेत कचरा टाकावा, तो आमच्या गावात का टाकला जातो? प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील वडार संघटनेचे पन्नास हजार नागरिक हजारो डंपरसह महापालिकेला घेराव घालतील,' असा इशारा हातकणंगलेचे माजी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव पोवार यांनी दिला.

टोप (ता. हातकणंगले) येथे वडार समाजाच्या टोप खाण कचराप्रश्नी आयोजित बैठकीत ते बोलत होते. टोप खणीत कचरा टाकण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही व कृती समिती करत आहोत, पण संपूर्ण वडार समाज टोप खण बचाव कृती समितीबरोबर असल्याचेही पोवार यांनी सांगितले

पोवार म्हणाले, 'कोल्हापूर शहरातील आरक्षित केलेल्या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने कचरा टाकण्यास शहरात विरोध होत आहे. मग तोच कचरा महापालिका टोप खणीत टाकण्याचा प्रयत्न का करते? येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचे काय याचा कोण विचार करणार, आमच्या मुलाबाळांचे आयुष्य उद्ध्वस्त करता काय? आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. आजारी पडून झुरून मरण्यापेक्षा कोल्हापूर महापालिकेविरोधात लढताना मरण आले तरी बेहत्तर, पण खणीत कचरा टाकू देणार नाही.'

प्रभाकर नलवडे म्हणाले, 'न्यायालयाने दिलेल्या आदेशाला तत्काळ स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. खणीतील पाण्यामुळे टोप परिसरातील पाण्याचा प्रश्न शंभर टक्के सुटण्यास मदत होईल, पण या ठिकाणी कचरा टाकल्यास संसर्गजन्य आजार पसरतील. यामुळे स्थानिक लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. प्रशासनाने याची दखल घेऊन टोप खणीत महापालिकेचा कचरा टाकू देऊ नये.'

बैठकीला माजी उपसरपंच बापू पोवार, नीतेश नलवडे, रंगराव भोसले, संभाजी पोवार, अविनाश कलगुटगी, अर्जुन पोवार, सतीश नलवडे, बापू पोवार, आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह वडार समाजाचे नागरिक हजर होते.

०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाची फसवणूक

$
0
0

पोलिस असल्याची बतावणी

करून वृद्धाला लुटले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आम्ही सीआयडी पोलिस आहे. पुढे तपासणी सुरू आहे. अंगावर दागिने घालून फिरू नका. तुमच्या जवळचे दागिने काढून रुमालात ठेवा,' असे सांगून दोन भामट्यांची वृद्धाकडील दोन अंगठ्या आणि सोन्याची चेन असा सुमारे पाऊण लाखाचा ऐवज लंपास केला. हा प्रकार सोमवारी (ता. २१) दुपारी आयटीआय कॉलेज ते नाळे कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर साई मंदिराजवळ घडला. याबाबत महादेव आनंदराव हंबरे (वय ६८, रा. नाळे कॉलनी, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महादेव हंबरे हे सोमवारी दुपारी कामानिमित्त संभाजीनगर चौकात गेले होते. दुपारी पावणेबाराच्या सुमारास ते घराकडे परत निघाले असता, आयटीआय कॉलेज ते नाळे कॉलनी या मार्गावर साई मंदिराजवळ समोरून दोन तरुण त्यांच्याजवळ आले. यातील एकाने हंबरे यांना अडवले. 'आम्ही सीआयडीचे पोलिस आहे. पुढे तपासणी सुरू आहे. तुम्ही असे अंगावर दागिने घालून फिरू नका. तुमच्या जवळच्या रुमालात सगळे दागिने काढून ठेवा,' असे सांगितले. हंबरे यांनी त्या दोघांवर विश्वास ठेवून खिशातून रुमाल काढला. यावेळी एकाने त्यांच्या हातातील रुमाल घेऊन यात दागिने ठेवा असे सांगितले. हंबरे यांनी बोटातील १४ ग्रॅम आणि पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, गळ्यातील २२ ग्रॅम वजनाची चेन काढून रुमलात ठेवली. यानंतर त्या तरुणाने रुमालाची गाठ मारून हंबरे यांच्याकडे देऊन ते निघून गेले.

घरात पोहोचल्यानंतर हंबरे यांनी रुमालाची गाठ सोडून पाहिले असता, त्यात काहीच नव्हते. त्यांनी पुन्हा साई मंदिराजवळ येऊन पाहिले, मात्र भामटे निघून गेले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची फिर्याद दाखल केली. ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहायाने भामट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

.......

चौकट

भामट्यांमुळे खरे पोलिस संशयाच्या भोवऱ्यात

गेल्या चार महिन्यांपासून शहरात पोलिस असल्याची बतावणी करून फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा पद्धतीचे गुन्हे करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी गेल्यावर्षी जेरबंद केले होते. मात्र, पुन्हा नव्याने असे प्रकार सुरू झाल्याने नवी टोळी सक्रीय झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी भामटे नागरिकांना गंडा घालत असल्याने खरे पोलिस कोण आणि भामटे कोण? याविषयी नागरिकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्राला मारल्याच्या रागातून खून

$
0
0

जरगनगर खूनप्रकरण... लोगो

..........

मित्राला मारल्याच्या रागातून खून

दोन आठवड्यापूर्वी झाला होता मारहाणीचा प्रकार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन आठवड्यापूर्वी प्रतीक पोवार याच्यासह तिघांनी अक्षय जाधव या मित्राला मारहाण केल्याच्या रागातून पोवारचा खून केल्याची कबुली हल्लेखोर प्रतीक सुहास सरनाईक याने पोलिसांकडे दिली. गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलचे कनेक्शन इचलकरंजीतील पिस्तुल तस्कराशी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, हल्लेखोर सरनाईक याला कोर्टात हजर केले असता, त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

जरगनगर येथील लेआऊट क्रमांक चार जवळ रविवारी (ता. २०) रात्री उशिरा चिंटू उर्फ प्रतीक प्रकाश पोवार (वय ३०, रा. शांतादुर्गा कॉलनी, पाचगाव) याचा डोक्यात गोळी झाडून खून झाला होता. पोलिसांनी सोमवारी रात्री हल्लेखोर प्रतीक सरनाईक याला उचगाव परिसरात अटक करून त्याच्याकडील पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 'दोन आठवड्यापूर्वी प्रतीक पोवार याच्यासह गौरव वडेर आणि रणजित गवळी या तिघांनी अक्षय जाधव या मित्राला मारहाण केली होती. याच रागातून पोवार आणि वडेर या दोघांना मारण्यासाठी निमित्त शोधत होतो. रविवारी रात्री संधी मिळ‌ताच पोवारच्या डोक्यात गोळी घातली. गुन्हा घडला तेंव्हा सगळेच दारुच्या नशेत होतो,' अशी माहिती सरनाईक याने पोलिसांकडे दिली.

हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळालेला सरनाईक जरगनरात त्याच्या आत्याच्या घरी जाऊन झोपला. सोमवारी सकाळी तो सागर कांबळे याला सोबत घेऊन मंगळवार पेठेतील काकांच्या घरी गेला. यानंतर एका मित्राला भेटून त्याने काही पैसे घेतले. दुपारी तो हुतात्मा पार्कातील बागेत झोपला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातील बास्केटबॉल ग्राऊंडवर तो दोन तास थांबला. येथूनच त्याने क्रिकेट खेळणाऱ्या एका तरुणाच्या मोबाइलवरून मित्राला फोन केला. रात्री सागरला सोडून तो पुण्याला जाण्यासाठी बाहेर पडला. याच दरम्यान,उचगाव येथे तो पोलिसांच्या हाती लागला.

सरनाईक याला सोमवारी जिल्हा कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत (ता. २८) म्हणजे सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यादरम्यान त्याची अधिक चौकशी होणार असून, गुन्ह्यातील दुचाकी जप्त केली जाणार आहे. याशिवाय त्याच्याकडील पिस्तुलाचीही सखोल चौकशी होणार आहे.

.................

चौकट

वीस हजारात दोन पिस्तुलांची खरेदी

सरनाईक याने तीन वर्षांपूर्वी वीस हजारात दोन पिस्तुलांची खरेदी केली होती. यातील एक पिस्तुल दुरुस्तीसाठी त्याने इचलकरंजीत एका व्यक्तीकडे दिले होते. याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सरनाईकवर ऑगस्ट २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला. सहा महिन्यांपूर्वीच करवीर पोलिसांना सरनाईककडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, झडतीदरम्यान त्याच्याकडे पिस्तूल मिळाले नाही. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कोणाकडून खरेदी केले याचा तपास सुरू असून, इचलकरंजीतील पिस्तुल तस्करापर्यंत त्याचे धागेदोरे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

........

चौकट

मदत करणारे रडारवर

हल्ल्यानंतर पसार झालेला प्रतीक सरनाईक आत्याच्या घरात झोपला. यानंतर त्याने एका ठिकाणी कपडे आणि दुचाकीही बदलली. मित्राकडून पैसे घेऊन तो पुण्याला निघाला होता. गुन्ह्यानंतर त्याला मदत करणाऱ्या सर्वांना सहआरोपी केले जाणार आहे. गुन्ह्यातील त्याची कपडे आणि दुचाकीही जप्त करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

................

चौकट

सागर घाबरून सोबत गेला

हल्ल्यानंतर सरनाईक याने सागर कांबळे याच्यावर पिस्तूल रोखून दुचाकीवर बसण्यासाठी दमदाटी केली. घाबरलेला सागर विरोध न करता त्याच्यासोबत दुचाकीवरून निघून गेला. सोबत जाण्याने कटाचा संशय व्यक्त केला जात होता. हल्लेखोराकडे पिस्तूल असल्याने सागरने काहीच विचारणा केली नाही. सोमवारी संध्याकाळपर्यंत सागर हल्लेखोराच्या सोबत होता. करवीर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, गुन्ह्यात त्याच्या सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला सहआरोपी बनवले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर विमानतळावर मोठी विमाने

$
0
0

कोल्हापुरात लवकरच

मोठ्या विमानांचे लँडिंग

धावपट्टी विस्तारीकरणाची निविदा प्रसिद्ध, खासदार महाडिक यांची माहिती

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरण आणि इतर कामांसाठीची निविदा प्रसिद्ध झाल्याने येत्या दीड वर्षात कामे मार्गी लागतील. त्यामुळे मोठी विमाने उतरण्याची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

खासदार महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर विमानतळावरून नियमित नागरी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर-मुंबई नियमित विमानसेवा सुरू झाली आहे. पुढील टप्पा म्हणजे, विमानतळाचे विस्तारीकरण जलदगतीने व्हावे यासाठी नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांना भेटून धावपट्टी विस्तारीकरण आणि अनुषंगिक बाबींचे काम सुरू व्हावे, अशी आग्रही मागणी केली. दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानुसार राज्य सरकारने २७४ कोटी रुपयांच्या एकूण आराखड्यापैकी ३० टक्के रक्कम देण्याचे मान्य केले आणि तसे पत्र एअरपोर्ट अथॉरिटीकडे सादर केले.

विमानतळ विस्तारीकरण आणि त्याच्याशी निगडित बाबींच्या कामांची पूर्तता करण्यासाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ८० कोटी १४ लाखांची ही निविदा असून, त्याअंतर्गत धावपट्टी विस्तारीकरण, टॅक्सी वे, धावपट्टीची सुधारणा, विमानाच्या पार्किंगसाठी आयसोलेशन बे, रनवे एक्सटेंशन सरफेस एरिया, ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट एरिया तसेच या सर्वाशी निगडित सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल कामे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

अठरा महिन्यांमध्ये ही सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत. या कामांमुळे सध्याची १३७० मीटर लांबीच्या धावपट्टीमध्ये ९३० मीटरची भर पडून, ती एकूण २३०० मीटर होणार आहे. त्याची रुंदी ४५ मीटर असणार आहे. मोठी धावपट्टी, टॅक्सी वे आणि आयसोलेशन बे या सुविधांमुळे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरच्या विमानतळावर १८० सीटर बोईंग विमानही उतरू शकणार आहे. याबरोबरीनेच येत्या दीड महिन्यात टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर, गाड्या पार्किंग करण्याची व्यवस्था आणि इतर सुविधांबाबत स्वतंत्र निविदा प्रसिद्ध होणार आहे.

विमानतळावर तात्पुरते तिकीट कक्ष तत्काळ सुरू करण्यास प्रभू यांनी परवानगी दिली आहे. उडाण फेज टू अंतर्गत इंडिगो एअरलाइन्सने कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-तिरुपती मार्गावर हवाई सेवा सुरू करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. तसेच अलायन्स एअरने कोल्हापूर-बेंगळुरू सेवा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआर हॉस्पिटल

$
0
0

सीपीआरला समस्यांच्या 'प्रसूत'वेदना

प्रसूतिगृहातील तोकड्या सुविधांमुळे रुग्णांचे हाल; दातृत्वाची गरज

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

कोल्हापूर : सर्वसामान्यांच्या आरोग्याचे 'काळजीवाहू' म्हणून सीपीआर रुग्णालयाची ओळख आहे. येथे जिल्ह्याबाहेरून तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. १०८ क्रमांकाची सुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातून उपचारासाठी सीपीआरला प्राधान्य दिले जाते. तेथील अत्यंत महत्त्वाचा असलेला प्रसूतिगृह विभाग मात्र विविध समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. या विभागाला समाजातून मदतीचा हात मिळाल्यास प्रसूतिगृहाच्या वेदना कमी करता येतील. त्यासाठी समाज आणि सरकार यांनी हातात हात घालून काम करणे आवश्यक आहे.

बेड्स आणि जागेचा अभाव

प्रसूती विभागातील बेडची क्षमता केवळ ८० असून, प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची संख्या क्षमतेपेक्षा दुप्पट आहे. रोजच्या वाढत्या संख्येमुळे महिलांना गाद्या अंथरूण जमिनीवर सोय करावी लागते. ग्रामीण भागातील प्राथमिक केंद्राकडून पाठवलेल्या महिलांची संख्या यात सर्वाधिक असते. रोज होणाऱ्या प्रसूतीसोबत सीझर प्रसूती १० ते १२ होतात. नैसर्गिकरीत्या प्रसूती झालेल्यांना एक ते दोन दिवसांत डिस्चार्ज मिळतो, पण सीझर झालेल्या महिलेला किमान सात दिवस रुग्णालयात ठेवावे लागते. यानुसार प्रसूतीसाठीची रोजची वाढती संख्या पाहता या विभागाला अजून २५ बेड्सची आणि प्रशस्त हॉलची गरज आहे.

सॅनिटरी पॅडचा तुटवडा

सीपीआरमधील वाढती प्रसूतीसंख्या पाहता सॅनिटरी पॅडचा तुटवडा जाणवतो आहे. यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे. यानिमित्ताने ग्रामीण भागातील महिलांमध्ये पॅडच्या वापराबाबत जनजागृतीही देखील करण्यात येत आहे.

रुग्णांच्या नातेवाइकांची अरेरावी, अस्वच्छता

रुग्णांना भेटायला येणारे नातेवाईक भेटीसाठीचे नियम न पाळता सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अरेरावी करतात. प्रसूतिगृहात भेटायला येणाऱ्या नातेवाइकांनी आणलेले खाद्यपदार्थ उघड्यावर फेकले जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण असते. चपलांचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. तसेच पायऱ्यांवरील कोपऱ्यात लोकांनी पान-तंबाखू खाऊन मारलेल्या 'पिचकाऱ्या' नजरेस पडतात. या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी डस्टबिनची मोठी कमतरता असून त्यासाठी मदतीचा हात देता येईल.

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची गरज

प्रसूती विभागात चांगल्या सुविधा देण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची जास्त गरज आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असल्याने सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोयी निर्माण होत आहेत. याकामी सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

नागरिकांनी स्वत:हून नियम पाळवावेत

रुग्ण, नातेवाईक आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यास प्रसूती विभागातील समस्यांवर उपाय शोधता येईल. प्रसूतिगृहात सूचनांचे फलक लावलेले असून, त्यातील नियमांचे पालन रुग्ण नातेवाईक आणि प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

०००

कोट...

प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाल्यास गाद्या अंथरून जमिनीवर झोपावे लागते. जागेची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून अधिक प्रयत्न व्हायला हवेत.

महिला रुग्ण

प्रसूतिगृहातील महिलांसाठी आम्ही ८०० सॅनिटरी पॅड, १६ डस्टबिन आणि एक बपेड दिला आहे. तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने बेड्स पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

रोहित कोलवालकर, सामाजिक कार्यकर्ते

चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ होत असल्याने सुविधा पुरविताना यंत्रणा कमी पडते. अतिरिक्त रुग्ण झाल्यास इतर रुग्णांना सेवा देण्यात अडथळे निर्माण होतात. अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.

डॉ. ज्योत्स्ना देशमुख, प्रभारी प्रसूती विभागप्रमुख

००००

फोटो टाकले आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेनस्नॅचिंग

$
0
0

पत्ता विचारण्याच्या

बहाण्याने चेन स्नॅचिंग

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागाळा पार्कातील वारणा कॉलनीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबविले. ही घटना रविवारी (ता. २०) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत सुचेता यशवंत गाडगीळ (वय ७०, रा. यशोदा अपार्टमेंट, नागळा पार्क) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचेता गाडगीळ रविवारी रात्री जेणानंतर यशोदा अपार्टमेंटजवळ मुख्य रस्त्यावर फेरफटका मारत होत्या. यावेळी त्या नेहा पत्की यांच्या बंगल्याच्या गेटजवळ पोहोचल्या असता, पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन तरुण आले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांनी दुचाकी थांबवली. यावेळी पाठीमागे बसलेल्या तरुणाने गाडगीळ यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून लांबवले. या प्रकारानंतर गाडगीळ यांनी आरडाओरडा केला. मात्र, चोरटे भरधाव वेगाने पसार झाले. याबाबत त्यांनी सोमवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारपासून कार्यशाळा

$
0
0

कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या वतीने बारावी विज्ञान व पदविका अंतिम वर्षाच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासाठी २५ ते ३० मे २०१८ दरम्यान मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत संगणक बांधणी, संगणक संबधित समस्या व निवारण, इंग्लिश, मराठी ब्लॉग लिखाण, अँड्रॉइड अॅप कसे विकसित करावे व इतर संगणक संबधित सत्रांचे आयोजन केले आहे. कार्यशाळा मोफत असून, नावनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी http://coek.dypgroup.edu.in या संकेतस्थळावर किंवा ९३७१०४११८८, ९८२२९५५०३२ क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजितसिंह जाधव व विभागप्रमुख डॉ. जी. ए.पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सन्मान पुरस्कार वितरण शनिवारी

$
0
0

कोल्हापूर : महिला सबलीकरणासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी सन्मान महिला फाउंडेशनचे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 'धम्मसंगीती महिला सन्मान' पुरस्काराने ज्येष्ठ सामाजिक लेखिका आणि विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट, विचारवंत स्मिता पानसरे, धम्म चळवळीच्या अभ्यासिका आणि विचारवंत प्रा. करुणा मिणचेकर, सामाजिक लेखिका शोभा चाळके यांना सन्मानित करण्यात येणार आहे. भदन्त आर. आनंद आणि एस. संबोधी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण शनिवारी (ता. २६) सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवन येथे होणार असल्याची माहिती सन्मान महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सुरेखा भोसले यांनी पत्रकार बैठकीत दिली. पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये व परिवर्तनवादी विचारांची पुस्तके असे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images