Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कराडजवळ अपघातात दोन जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील इंदोली (ता. कराड) गावच्या हद्दीत इंदोली फाटा येथे महामार्ग ओलांडणाऱ्या मोटरसायकलस्वारास स्विफ्ट मोटारीने धडक दिल्यामुळे मोटारसायकलरवील दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

रोशन सुनील घोरपडे व मंगेश युवराज घोरपडे दोघे (रा. मत्यापूर, ता. जि. सातारा) अशी जखमींची नावे आहेत. अपघातप्रकरणी मोटारचालक महेंद्र विष्णू चंडाळे (वय ३७ रा. सांगली ता. मिरज) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

रोशन आणि सुनील मत्यापूरहून इंदोलीच्या दिशेने येत होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास इंदोली फाट्यावर त्यांच्या मोटारसायकलीला (क्र. एमएच-११, एक्स-४५१२) मोटारीची धडक बसली. मोटार कराडकडून पुण्याच्या दिशेने जात होती. जखमींना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाफील राहायच नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापौरपदाच्या निवडणुकीत संघर्ष अटळ आहे, यामुळे अजिबात गाफील राहणार नाही. आताची निवडणूक ही ऐतिहासिक असून स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत जे घडले, ते पुन्हा घडू नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे.'अशा शब्दांत आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांना समज दिली.

महापौरपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांची रविवारी दुपारी ताराबाई पार्क येथील सर विश्वैश्वरय्या हॉल येथे बैठक झाली. दरम्यान 'स्थायी'निवडणुकीत भाजपला समर्थन देणारे नगरसेवक अफजल पिरजादे, अजिंक्य चव्हाण हे दोघे रविवारच्या बैठकीला गैरहजर होते. याशिवाय नगरसेवक मुरलीधर जाधव, अनुराधा खेडकर अनुपस्थित होते. दरम्यान जाधव व खेडकर यांनी अन्य कार्यक्रमामुळे बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे नेत्यांना कळविल्याचे सांगण्यात आले.

महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करताना आमदार पाटील म्हणाले, 'महापौरपदासाठी इच्छुक सातही महिला सदस्यांची चर्चा झाली आहे. सगळ्यांच्या मनातील शंका, कुशंका दूर झाल्या आहेत. सदस्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु नाही. महापौरपदाच्या निवडणुकीत संघर्ष आहे. त्यामुळे गाफील रहायचे नाही.'

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'स्थायी समितीतील निवडणुकीतून बोध घेत महापौर निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे. दोन्ही काँग्रेस आघाडीकडे बहुमत असून प्रत्येकाला पदाच्या मांडवाखालून जायचे आहे. अजून अडीच वर्षांचा कालावधी शिल्लक असल्याने प्रत्येकाला पद मिळेल. '

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी प्रास्ताविक केले. माजी महापौर आर. के. पोवार यांनी आभार मानले. याप्रसंगी गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, सभागृह नेता दिलीप पोवार, शिक्षण समिती सभापती वनिता देठे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, नगरसेविका अश्विनी रामाणे, हसीना फरास, स्वाती यवलुजे, संदीप नेजदार, प्रवीण केसरकर, अशोक जाधव, भूपाल शेटे, लाला भोसले, प्रताप जाधव, तौफिक मुल्लाणी आदी, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, आदिल फरास, मधुकर रामाणे आदी उपस्थित होते.

..................

काँग्रेस कायम झोपलेलीच..

कर्नाटक विधानसभेतील सत्तांतराचा संदर्भ घेऊन बोलताना आमदार मुश्रीफ यांनी 'काँग्रेस पक्ष वेळीच जागा झाला तर काय घडू शकते हे कर्नाटकात सिद्ध झाले. मात्र काँग्रेस कायम झोपलेली असते.'या शब्दांत चिमटा काढला. तेव्हा आमदार पाटील यांनी मुश्रीफांना याठिकाणी प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी असल्याची जाणीव करुन दिली. तेव्हा मुश्रीफांनी हे आपण 'ऑफ दि रेकॉर्ड' बोलल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

नेत्यांच्या जीवाची काहिली

महापौर आणि उपमहापौरपद हे प्रत्येकी एक आहे. मात्र इच्छुकांची संख्या जादा. इच्छुक जास्त असले तरी पद एकालाच मिळणार आहे. सगळ्यांना पदे द्यायला आम्ही काही ब्रह्मदेव नाही. एकाचवेळी सगळ्यांना पदे देऊन समाधानी करू शकत नाही. इच्छुकांतून एकाची निवड करताना 'नेत्यांच्या जीवाची काहिली' होते अशी भावना आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांचे पंतप्रधानपद स्वप्नच

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी हे भाजपशी लढा देऊ शकत नाहीत हे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिवसेनेने वेळीच निर्णय न घेतल्यास त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढतील. राष्ट्रवादी आणि भाजपाची छुपी आघाडी आहे. शरद पवार यांच्या पंतप्रधान होतील, अशी फक्त स्वप्नेच त्यांच्या समर्थकांनी पाहावीत. दिल्लीने अशा खूप बिल्ली पहिल्या आहेत,' असा टोला भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे लगावला.

पंढरपूर येथे धनगर समाजाच्या सत्तासंपादन महामेळाव्यासाठी आले असता आंबेडकर माध्यमांशी बोलत होते.

'येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला करण्याची ताकद काँग्रेसमध्ये फक्त माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यात आहे. राहुल गांधींना अजून बरेच राजकीय शिक्षण घ्यावे लागणार आहे,' अशी टीकाही आंबेडकर यांनी केली. सध्याच्या राजकीय घडामोडींपासून धडा घेऊन काँग्रेस अजूनही न बदलल्यास तिसरी आघाडी स्थापन करणे गरजेचे ठरेल असे संकेतदेखील प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

'कर्नाटकमधील घडामोडी पाहता सत्तास्थापनेसाठी भाजप कोणत्याही पातळीला जाऊ शकते. आता बनणारे काँग्रेस-जनता दलाचे सरकार अस्थिर राहील आणि येत्या तीन महिन्यांत काहीही घडू शकते,' अशी शक्यता आंबेडकर यांनी व्यक्त केली. 'कर्नाटक निवडणुकीत ईव्हीएम मशिनच्या मर्यादा उघड झाल्या असून, पुढची लढाई मतपत्रिकेवरील मतदानासाठी होईल,'असेही ते म्हणाले. 'राज्य घटना बदलणे हा भाजपचा अजेंडा असून, त्यासाठी २०१९ ही त्यांची शेवटची संधी असल्याने ते कोणत्याही पातळीला उतरू शकतील,' असा आरोपही त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकर

नेते, भारिप बहुजन महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांच्या शोधासाठी आठ पथके

0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पळून गेल्या दोन संशयितांचा शोध पोलिसांच्या आठ पथकाकडून सुरू आहे. संशयिताचा शोधासाठी पोलिसांची पथके कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या परिसर पिंजून काढत आहेत. दरम्यान पकडण्यात आलेल्या ओंकार महेश सूर्यवंशी (वय १९, रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली), विराज गणेश कारंडे (१९, रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले), दोन संशयितांना कोर्टाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी (१८) शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून ओंकार सूर्यवंशी, विराज कारंडे , सूरज दबडे, गणेश माळी हे पळून गेले होते. पोलिसांनी चौघा संशयितांचा शोध घेतला असता शनिवारी (१९) वडगाव पोलिसांच्या पथकाने ओंकार सूर्यवंशी व विराज कारंडे या दोघांना किणी टोल नाक्याजवळ अटक केली. दोन संशयितांना २८ तासानंतर पकडण्यात यश आले. सूरज दबडे व गणेश माळी यांचा शोध घेण्यासाठी शाहूवाडी पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली, शाहूवाडी, कळे, पन्हाळा, गगनबावडा या पोलिस ठाण्यातील स्वतंत्र पोलिस पथके शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची तीन पथके तर वडगाव पोलिस ठाण्याची दोन पथके शोध घेत आहेत.

चौघे संशयितापैकी सूरज दबडे व गणेश माळी कोठडीचे लोखंडी ग्रील उचकटून पळाले आहेत. त्यानंतर अर्ध्या तासानंतर ओंकार सूर्यवंशी व विराज कारंडे पळून गेले, असे सीसीटीव्ही चित्रणात स्पष्ट झाले आहे. सूरज व गणेश आणि ओंकार व विराज यांचा पळून गेल्यावर त्यांचा संपर्क झाला नसल्याचे तपासात पुढे आले आहे. पळून गेल्यानंतर सूरज व गणेश माळी हे कोणत्या दिशेने व कुठे गेले याची माहिती ओंकार व विराजला माहीत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निविदेत अडकला तीर्थक्षेत्र विकास

0
0

अंबाबाई, जोतिबा विकास आराखड्याला मिळेना मुहूर्त

Satish.ghatage@timesgroup.com

Twitt:satishgMT

कोल्हापूर: अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि जोतिबा क्षेत्र विकास आराखड्याचे काम शासन निर्णय आणि निविदा प्रक्रियेमुळे रखडले आहे. मार्च व एप्रिल महिन्यात या दोन्ही विकास कामाची सुरुवात करण्याची घोषणा केली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नवरात्र उत्सवात मुहूर्त शोधला जाईल, अशी चर्चा सुरू आहे.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा २५५ कोटी रुपयांचा असून तो तीन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. मार्च २०१६ मध्ये पहिल्या टप्प्यातील ७२ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण गेली दोन वर्षे तीर्थक्षेत्र विकासाचे काम रखडले आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन नियुक्त उच्चाधिकारी समितीची अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता मिळाली. पहिल्या टप्प्यातील ६८ कोटी सात लाख रुपयांचे काम जीएसटीमुळे ८८ कोटी ४० लाख रुपयापर्यंत पोचले आहे. या कामासाठी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, पण या कामाचा शासन निर्णय अद्याप सरकारने काढला नसल्याने अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास कामाच्या मुहूर्तास वेळ लागत आहे.

जोतिबा क्षेत्र विकास आराखड्यासाठी २५ कोटी निधीच्या कामाला मंजुरी मिळाली. जिल्हा नियोजन मंडळाकडे या कामासाठी पाच कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. दर्शन मंडप, स्वच्छतागृहे, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प ही कामे पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. पण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंदाजपत्रक व आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्यात आला आहे. पण नवीन डीएसआर रेट प्रमाणे कामात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. या अडचणी दूर झाल्यावर तांत्रिक मंजुरीची आवश्यक आहेत. त्यामुळे जोतिबा विकास कामाचे कामही रखडले आहे. दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम बरेच काळ रखडल्याने या कामांना मुहूर्त कधी मिळणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

००००

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा विकास कामाचा अद्याप शासन निर्णय झालेला नाही. शासन निर्णयासाठी या कामाचा प्रस्ताव सचिवालयात स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावावर सही होऊन कामास सुरुवात होईल.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महानगरपालिका

००००

जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात काही तांत्रिक त्रुटी काढण्यात आल्या आहेत. त्रुटीचे निराकरण करुन तांत्रिक समितीकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

विजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

००००

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा

भक्त निवास: १७ कोटी २२ लाख

वॉक वे: २ कोटी १२ लाख

दिशादर्शक फलक: ४ लाख ७३ हजार

शौचालय व पाणी सुविधा: १ कोटी ५० लाख

मंदिराजवळ फलक: ७ लाख ५० हजार

डिझास्टर मॅनेजमेंट: १ कोटी २८ लाख

मल्टी लेव्हल पार्किंग: १८ कोटी ३८ लाख

सार्वजनिक वाहतूक: १ कोटी ५ लाख

मंदिर परिसर सुधारणा: २ कोटी ३३ लाख

आरोग्य सुविधा: ४२ लाख

दर्शन मंडप: ७ कोटी

०००००

जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा

दर्शन मंडप: ७ कोटी

सेंट्रल प्लाझा: ६ कोटी ६७ लाख

स्वच्छतागृहे: ३ कोटी ५६ लाख

सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प: २ कोटी

कचरा व्यवस्थापन व रेनवॉटर हार्वेस्टिंग: १ कोटी २७ लाख

भूमिगत विद्युत पुरवठा: १ कोटी ९४ लाख

भक्त निवास: २ कोटी ५६ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंडुकेशाहीमुळेच वारणा योजनेचा तिढा

0
0

दुकॉलमी फोटो

..................

फोटो - पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे सोबत प्रकाश मोरे, राहुल आवाडे, सुनिल पाटील, विलास गाताडे आदी

......................

दंडुकेशाहीमुळेच वारणा योजनेचा तिढा

प्रकाश आवाडे यांचा आमदार हाळवणकर यांच्यावर आरोप

म. टा. प्रतिनिधी, इचलकरंजी

'वारणा पाणी योजनेच्या वादात समन्वयाचा तोडगा काढण्याऐवजी संघर्ष आणि दंडुकेशाहीची भूमिका घेतल्यानेच तिढा निर्माण झाला आहे. वाद मिटवण्यापेक्षा आमदार सुरेश हाळवणकर हे त्याला राजकीय वळण देत वेगळेच चित्र रंगवत आहेत. पाणी आणण्यासाठी ते आग्रही असले तरी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेच युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इचलकरंजीला वारणेचे पाणी मिळालेच पाहिजे यावर मी आजही कायम आहे. मात्र ती पूर्ण होईपर्यंत शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्याय म्हणून कृष्णा योजना दुरुस्ती आणि शहरात २०० शुध्द पेयजल प्रकल्प उभारणे गरजेचे आहे', असे मत माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

आवाडे म्हणाले, 'जिव्हाळ्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मंजूर झालेली वारणा योजना आज वादात सापडली आहे. चर्चेतून मार्ग काढण्याऐवजी या प्रश्नाला वेगळेच वळण दिले जात असल्याने इचलकरंजी पाणी हवे की राजकारण हा प्रश्न पडला आहे. आज शहराला कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांतून पाणी मिळत आहे. पंचगंगा प्रदुषित झाल्याने शुध्द व मुबलक पाण्यासाठी वारणा योजनेचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी कुंभोज येथे जागाही खरेदी केली होती. पण त्यावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी खो घातला. पण आज तेच या योजनेसाठी धडपडत आहेत. वारणेला विरोध दर्शवून आमदार हाळवणकर यांनी काळम्मावाडीचे प्रस्ताव आणला. त्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेवर एक पैशाचाही बोजा पडणार नाही अशी भूमिका आमदारांनी घेतल्याने सर्वांनी त्याला एकमुखी पाठींबा दर्शविला. केवळ राजकीय हेतूने प्रेरित आमदार हाळवणकर यांनी हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचा घाट घातला. यातून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने काम प्रलंबित राहिल्याने आलेला निधी परत गेला. तर काळम्मावाडी योजनेचा खर्च वाढल्याने ज्या योजनेला विरोध दर्शविला त्याच वारणा योजनेचा प्रस्ताव आमदार हाळवणकर यांनी पुढे आणला. त्यामध्येही कुंभोजऐवजी दानोळी हे ठिकाण निवडले.'

ते पुढे म्हणाले, ' ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी समन्वयाची भूमिका आवश्यक असताना संघर्ष आणि दंडुकेशाही भूमिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. शहरी आणि ग्रामीण असा वाद पेटू नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे दोन आमदार या तालुक्यात असल्याने काहीजण जाणूनबुजून त्याला वेगळे वळण देत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून उभारलेल्या व्यासपीठाचा स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वापर केला जात आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असून ही भूमिका बदलण्याची गरज आहे. ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यांची भूमिका समजून घेण्याऐवजी त्यांना विरोध करणे योग्य नाही. वारणा योजना पूर्ण झालीच पाहिजे ही आमची भूमिका आजही कायम आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोभा बोंद्रे महापौर?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काही दिवसांपासून पडद्याआड सुरु असलेल्या 'अर्थ'पूर्ण घडामोडींमुळे प्रचंड चर्चेच्या बनलेल्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी काँग्रेस आघाडी व भाजप आघाडीबरोबरच शिवसेनेनेही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक नाट्यमय वळणावर पोहचली आहे. काँग्रेसच्यावतीने शोभा बोंद्रे, ताराराणी आघाडीच्यावतीने रुपाराणी निकम तर शिवसेनेच्यावतीने प्रतिज्ञा निल्ले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नेत्यांच्या आदेशाप्रमाणे वाटचाल राहील, असे सांगत शिवसेनेने भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे.

दरम्यान, 'घोडेबाजार केला जाणार नाही पण मतपरिर्वतन होऊन जे येणार असतील त्यांचे स्वागत केले जाईल,' असे भाजप आघाडीने स्पष्ट केले. तर 'विरोधकांनी आमचा एक फोडल्यास त्यांचे दहा फोडले जातील,' असा इशारा काँग्रेस आघाडीने दिला आहे. उमेदवारी दाखल केल्यानंतर काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात आले. भाजप आघाडीच्या नगरसेवकांना एखादा दिवस सहलीवर पाठवले जाईल, अशी शक्यता आहे. २५ मे रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली निवडी होणार आहेत.

उपमहापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे महेश सावंत, भाजपचे कमलाकर भोपळे, शिवसेनेचे अभिजीत चव्हाण यांनी उमदेवारी सादर केली. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज भरताना काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, प्रा. जयंत पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे गटनेते व प्रमुख नगरसेवक उपस्थित होते. भाजप आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज भरताना भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई, भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, ताराराणीचे गटनेते सत्यजीत कदम, माजी महापौर सुनील कदम यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

काँग्रेसकडून महापौरपदासाठी शोभा बोंद्रे, उमा बनछोडे, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर, जयश्री चव्हाण, इंदूमती माने, प्रतिक्षा पाटील यांनी मुलाखती दिल्या होत्या. दुपारी दोन वाजता आमदार सतेज पाटील यांच्याकडून शोभा बोंद्रे यांचे नाव निश्चित करुन गटनेत्यांकडे पाठवण्यात आले. ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी स्मिता माने, सुनंदा मोहिते, रुपाराणी निकम यांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यानंतर सोमवारी दुपारी ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरुप महाडिक व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चा करुन निकम यांचे नाव निश्चित केले.

......

महापौरपदासाठी काँग्रेससोबत

स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात मतदान केलेल्या अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण या नगरसेवकांची भूमिका काय असेल, याची चर्चा जोरात सुरु होती. उमेदवारी भरतेवेळी पिरजादे यांनी महापौर निवडणुकीत काँग्रेससोबत आहोत. पण उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार नाही, असे सांगितले. चव्हाण यांचीही हीच भूमिका असल्याचे सांगण्यात आले.

......

भाजप आघाडीची कोंडी?

गेल्या काही दिवसांपासून प्रतिज्ञा निल्ले सोडल्यास शिवसेनेचे नगरसेवक शहराबाहेर होते. मात्र सोमवारी अचानक गटनेते नियाज खान यांच्या उपस्थितीत नगरसेवक अभिजीत चव्हाण व निल्ले या तिघांनी महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज भरले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या आदेशामुळे अर्ज भरले आहेत. निवडणुकीपर्यंत ते जे काही आदेश देतील, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे, असे सांगत खान यांनी शिवसेनेची भूमिका गोपनीय ठेवली. यातून शिवसेनेचे नगरसेवक सोबत घेऊन काँग्रेस आघाडीतील काही नगरसेवकांना सोबत घेण्याचा भाजप आघाडीचा मनसुबा उधळला असल्याची चर्चा होती. निवडणुकीपर्यंतच्या चार दिवसांत शिवसेनेचे नगरसेवक हेच हालचालींच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूरज्या-गोंद्या अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पळालेल्या चार आरोपींपैकी दोघांना पेठ वडगाव पोलिसांनी रविवारी (ता. २०) मध्यरात्री अंबपजवळ (ता. हातकणंगले) पकडले. टोळीचा सूत्रधार सूरज सर्जेराव दबडे (वय २२, रा. वाठारपैकी, साखरवाडी, ता. हातकणंगले) आणि गोविंद वसंत माळी (१९, रा. कासेगाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्ह्यातील अन्य दोघांना शनिवारी (ता. १९) किणी टोल नाक्याजवळ पकडले आहे. 'मोक्का'ची कारवाई टाळण्यासाठी कोठडीतून धूम ठोकल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

लूटमारीच्या गुन्ह्यात अटक केलेले सूरज दबडे, गोविंद माळी, ओंकार सूर्यवंशी आणि विराज कारंडे हे चौघे शुक्रवारी (ता. १८) पहाटे शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीचे ग्रील तोडून पळाले होते. पोलिसांची झोप उडवलेल्या या आरोपींचा दहा पथकांकडून शोध सुरू होता. शनिवारी सकाळी पुणे-बेंगळुरू महामार्गावर ओंकार आणि विराज हे दोघे पेठ वडगाव पोलिसांच्या हाती लागले. मात्र, टोळीचे सूत्रधार सूरज्या-गोंद्याचा सुगावा लागला नव्हता. रविवारी रात्री उशिरा हे दोघे साखरवाडी येथे येणार असल्याची माहिती पेठ वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक यशवंत गवारी यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी पथकासह मध्यरात्री एकच्या सुमारास दोघांना अंबप ते साखरवाडी मार्गावर जेरबंद केले. 'मोक्कां'तर्गत कारवाईत अनेक वर्षे जेलमध्ये राहावे लागेल, या भीतीपोटी कारवाई टाळण्यासाठी कोठडीतून पळून गेल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली.

शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पळाल्यानंतर आरोपी शाहूवाडी, कोडोली आणि वाठार परिसरात फिरत होते. करवंदे आणि आंबे खाऊन त्यांनी तीन दिवस काढले. उपासमार झाल्यामुळेच ते दबडेच्या घराकडे निघाले होते. पळून गेल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरल्याचीही माहिती समोर आली आहे.

सहायक फौजदार बालाजी घोळवे, नंदू घुगरे, विकास माने, दादा माने, संदीप गायकवाड, विकास घस्ते, विजय गुरव, संतोष वायदंडे, बाबासाहेब दुकाने, आदींच्या पथकाने सूरज्या-गोंद्याला पकडले. अधीक्षक संजय मोहिते यांनी या पथकाला बक्षीस जाहीर केले. शाहूवाडीचे निरीक्षक अनिल गाडे, ठाणे अंमलदार आणि ड्युटीवरील पोलिसांची चौकशी सुरू आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अधीक्षक मोहिते यांनी दिली.

'मोक्का' टाळण्यासाठी पलायन

'मोक्कां'तर्गत कारवाईसाठी प्रस्ताव दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती टोळीला मिळाली होती. 'मोक्का'मुळे अनेक वर्षे तुरुंगात राहावे लागणार या भीतीपोटी त्यांनी कोठडीतून पळून जाण्याचे नियोजन केले. शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात येण्यापूर्वी कडेगाव पोलिसांच्या कोठडीत असतानाच त्यांनी पळून जाण्याचा कट रचला. योग्य संधीची ते वाट पाहत होते. शाहूवाडी पोलिस ठाण्यात संधी मिळताच धूम ठोकल्याची माहिती त्यांनी चौकशीत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लक्षतीर्थ वसाहतीत घरात घुसून तोडफोड

0
0

लक्षतीर्थ वसाहतीत

घरात घुसून तोडफोड

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर्ववैमनस्यातून तसेच विरोधक तरुणांबरोबर फिरत असल्याच्या रागातून चौघा तरुणांनी लक्षतीर्थ वसाहत येथे घरात घसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड करून शिवीगाळ केली. यावेळी आदित्य केरबा शिवडकर (वय १८) यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी अंकुश उगवे (वय २२), अंकुश मोरे (वय २२), महेश लोखंडे (वय १८) आणि मंगेश पडळकर (वय २३, रा. सर्व लक्षतीर्थ वसाहत) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

.................

४७ हजारांची रोकड लंपास

कोल्हापूर

मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर-स्वारगेट एसटीमध्ये चढताना प्रवाशाच्या खिशातील ४७ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. रविवारी (ता. २१) रात्री हा प्रकार घडला. दीपक कृष्णा घोरपडे (वय ४५, रा. सरपिराजी रोड, कागल) हे त्यांची आई इंदुताई यांना घेऊन बसमध्ये चढताना अज्ञाताने खिशातील रोकड लंपास झाली. घोरपडे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडेबाजार नाही पण

0
0

घोडेबाजार करणार नाही पण...

'निवडणूक नाट्यमय वळणावर' भाजप आघाडीचे सूचक वक्तव्य

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदाच्या पहिल्या निवडणुकीपासून चमत्काराची भाषा करणाऱ्या भाजप आघाडीने या निवडणुकीतही अजून आशा सोडलेली नाही. 'आघाडीकडून घोडेबाजार केला जाणार नाही, पण मतपरिवर्तन होऊन जर कुणी स्वखुषीने येत असतील तर त्यांचे स्वागतच करू,' अशी भूमिका भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केली. तसेच ही निवडणूक नाट्यमय वळणावर व संघर्षाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे, असे सूचक वक्तव्यही केले. त्यामुळे आगामी चार दिवसांत भाजप आघाडी नक्कीच काही ना काही प्रयत्न करणार असे स्पष्ट होत आहे.

काँग्रेस आघाडीकडून नाराजांवर लक्ष ठेवले जात असल्याचे समजल्यानंतर भाजप आघाडीने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच व्हीप जारी केला होता. तसेच असंतुष्टांकडून काही धोका होऊ नये यासाठी काही निर्णयही घेण्यात आले. भाजप आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी प्रथम भाजपचा नगरसेवक असेल असे सांगण्यात येत होते. पण रविवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीत नेते व गटनेत्यांनी महापौरपदाची निवडणूक ताराराणी आघाडीचा उमेदवार लढवेल, असे सांगितले. यामुळे चर्चेने वेगळेच वळण घेतले. त्यानुसार रविवारी नेत्यांनी मुलाखती घेतल्यानंतर इच्छुकांमधील रुपाराणी निकम, स्मिता माने, सुनंदा मोहिते यांचे अर्ज भरुन ठेवण्यात आले होते. दुपारी उमेदवारीसाठी त्यामधील रुपाराणी निकम यांचे नाव निश्चित केले. त्यानुसार अर्ज सादर करण्यासाठी तीनच्या सुमारास भाजप, ताराराणी आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवक जमण्यास सुरुवात झाली. भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, स्थायी सभापती आशिष ढवळे, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई, माजी महापौर सुनील कदम यांच्या उपस्थितीत ३ वाजून ४० मिनिटांनी महापौरपदासाठी निकम व उपमहापौरपदासाठी कमलाकर भोपळे यांचे अर्ज सादर केले.

'भाजप व ताराराणी आघाडी मित्र पक्ष आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपचा उमेदवार असेल असे सांगणे म्हणजे दोन्ही पक्षांच्या आघाडीचा उमेदवार असा होतो. पालकमंत्री सातत्याने चमत्कार घडेल, असे सांगत असतात. स्थायी सभापती निवडणुकीवेळी मतपरिवर्तन होऊन स्वत:हून नगरसेवक आमच्याकडे आले. महापौरपदाच्या निवडणुकीसाठीही आम्ही घोडेबाजार करणार नाही. पण स्थायीच्या निवडणुकीसारखे कुणा नगरसेवकांचे मतपरिवर्तन होऊन आमच्याकडे आले तर नक्कीच त्यांचे स्वागत करु. राजकारणामध्ये संधीचा फायदा घेतला जातो. यावेळी तशी संधी मिळाल्यास नक्कीच फायदा करुन घेतला जाईल.'

विजय सूर्यवंशी, भाजप गटनेता

जाधव, इंगवले अनुपस्थित

भाजप आघाडीकडून महापौरपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या जयश्री जाधव तसेच तेजस्विनी इंगवले अर्ज भरताना उपस्थित नव्हते. त्यांच्याबाबत तसेच अन्य नगरसेवकांमध्ये काही नाराजी आहे का? असे विचारल्यानंतर सूर्यवंशी म्हणाले, 'रविवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीत नगरसेवकांनी मते मांडली. मते मांडण्याचा अधिकार आहे. पण त्यानंतर नेते जे निर्णय घेतात, त्याप्रमाणे वाटचाल केली जाते. त्याप्रमाणे चंद्रकांत जाधव यांनीही मते मांडली. ३३ नगरसेवक एकसंघ आहेत. त्यातील कुणीही नाराज नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलाचे काम सुरु

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुमारे अडीच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पर्यायी पुलाच्या बांधकामाला सोमवारी सुरुवात झाली. कृती समितीने पुलाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र जिल्हा प्रशासन व कोल्हापूर शहर व जिल्हा कृती समितीच्या बैठकीत समितीने सामंजस्याची भूमिका घेतल्याने तणाव निवळला. प्रशासनाच्या आवाहनानंतर कृती समितीने मंगळवारचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. तथापि, कामात प्रगती न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

पुलाच्या कामाला सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरुवात झाली. बांधकामाच्या ठिकाणी जेसीबीने हौद पाडण्यात येत होता. त्यावेळी कृती समितीचे सदस्य ठेकेदाराच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे काम बंद पडले. ही माहिती समजताच पोलिस अधीक्षक संजय मोहिते घटनास्थळी आले. त्यांनी पुलाचे काम बंद पाडता येणार नाही, अशी समज समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता तोडगा काढण्यासाठी आंदोलकांसमवेत पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली.

पोलिस अधीक्षक मोहिते व अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी बांधकामाला विरोध नाही. गैरसमजातून पुलावरील ठेकेदारासमवेत वाद झाल्याच्या खुलासा केला. ठेकेदार वर्क ऑर्डर स्वीकारणार नाही, असे म्हणत असताना परत काम कसे सुरु झाले, म्हणून शंका आल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पाठपुराव्यासाठी आंदोलन सुरुच राहील, असेही पोवार यांनी स्पष्ट केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राजू लिंग्रस यांनी ठेकेदाराने कामाला नकार दिला तर सार्वजनिक बांधकाम विभागाने काम हाती घ्यावे किंवा आपत्कालीन परिस्थितीत लष्कराकडून पूल करवून घेता येतो, याकडे लक्ष वेधले.

आंबेवाडीचे सरपंच सिकंदर मुजावर म्हणाले की, पुलाचा सर्वांत मोठा धोका ग्रामीण भागाला आहे. पूल धोकादायक असल्याने आंदोलनाला ग्रामीण भागातील जनतेचा पाठींबा राहील.

कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक मोहिते म्हणाले, 'पुलाचे काम सुरु झाले आहे. आंदोलनामुळे मूळ प्रश्नाला फाटे फुटतात. पुलाचे बांधकाम सुरु झाले पाहिजे, ही आंदोलकांची भूमिका आहे. आम्ही त्यादृष्टीने पावले उचलत आहोत. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा काढून मार्ग काढत आहोत. कृती समितीने आंदोलन मागे घ्यावे.'

अतिरिक्त जिल्हाधिकारी काटकर यांनी प्रशासनाने कामासाठी पुढाकार घेतला आहे. या परिस्थितीत काम बंद करु नये, असे आवाहन केले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना समितीने दहा दिवस आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

यावेळी बाबा पार्टे, अशोक पोवार, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, दिलीप पोवार, उद्योगपती चंद्रकांत जाधव, सतीशचंद्र कांबळे, किशोर घाटगे, तानाजी पाटील, दिलीप माने, वडणगे सरपंच सचिन चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, एस. आर. पाटील, प्रयाग चिखलीच्या सरपंच उमा पाटील, रजपूतवाडी सरपंच रामसिंग रजपूत, निगवे सरपंच मारुती किडगावकर, पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटील आदी उपस्थित होते.

००००

आंदोलन मागे घेण्यावरुन वाद

बैठकीत आंदोलन मागे घेण्यासंदर्भात समितीने विचार करुन निर्णय घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक मोहिते यांनी केले. त्यासाठी त्यांनी दहा मिनिटे वेळ दिला. यावेळी आंदोलन मागे घेण्यावरुन दोन गट पडले. प्रशासन आश्वासन देते. पण, पुलाचे काम करत नाही, असे सांगून आंदोलन मागे घेऊ नये, अशी एका भूमिका एका गटाने घेतली. त्यात जोरदार वादावादी झाली. अखेर सामंजस्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चतुर्थ आरोग्य कर्मचारी संघटनेची निदर्शने

0
0

चतुर्थश्रेणी आरोग्य

कर्मचारी संघटनेची निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी आरोग्य कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली. संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य उपसंचालकांनी कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा घेतली आहे, यामध्ये अनुकंपा व वारसा हक्काने भरली जाणारी पदे त्वरीत भरावीत, चतुर्थ कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हा संघटक जयवंत जाधव, अनिल परिट, गणेश धुमाळे, मारुती कांबळे, रमेश कांबळे, अमर कांबळे आदी पदाधिकारी सहभागी झाले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणांबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी जाहीर सुनावणी घेण्यात आली. यावेळी शिक्षण आणि आणि नोकऱ्यांत आरक्षणाची मागणी करण्यात आली. या सुनावणीवेळी लाखापेक्षा जास्त निवेदने मिळाली आहेत. १७२ विविध संघटना आणि वैयक्तिक पातळीवर ही निवेदने देण्यात आली आहेत. ग्रामपंचायत, पालिका आणि नगरपषिदेतील ठरावांचाही यामध्ये समावेश असल्याचे आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते.

गायकवाड म्हणाले, 'मराठा समाज प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे. शेतीचे वारसा हक्काने तुकडीकरण झाल्याने या समाजाची अल्पभूधारक अशी ओळख झाली आहे. शेतीतील उत्पादन घटत असल्याने समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कही भरणे कठीण झाले आहे. तसेच सरकारी नोकरीतील मराठा समाजाचे प्रमाण अपुरे आहे. मराठा-कुणबी एकच असल्याचे पुरावे विविध संघटनांनी सादर केले आहेत. या माध्यमातून प्रामुख्यांनी शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाची मागणी केली आहे.'

बुधवारी (ता. २३) ओरोस (सिंधुदुर्ग) येथे सुनावणी होणार आहे. त्यानंतर २८ मे नाशिक, पाच जूनला जळगाव आणि सर्वांत शेवटी पुणे जिल्ह्यात जाहीर सुनावणी होईल. सादर केलेली निवेदने, साक्षी, पुराव्यांची शास्त्रीय पद्धतीने पूर्ण तपासणी करण्यात येईल. तसेच सर्वेक्षण अहवालांची तपासणी व छाननी करुन राज्य सरकारला अहवाल सादर केला जाईल. घटनात्मक तरतुदी, सुप्रीम कोर्टाने केलेले निवाडे आणि विविध समित्यांच्या अहवालांचा अभ्यास आयोगाकडून सुरू आहे. याचबरोबर सरकारी नोकरीतील आरक्षण प्रमाणांची माहिती घेतली जात आहे. मराठा समाजाचे शैक्षणिक प्रमाण तपासले जात आहे. सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर समाजाशास्त्रज्ञांचा अभिप्राय घेऊन सरकारला अहवाल सादर करण्यात येईल. आजच्या सुनावणीत ज्यांना निवेदन देता आले नाही त्यांना पुणे किंवा मुंबईतील राज्य आयोगाच्या कार्यालयात निवेदने सादर करता येणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. भूषण कर्डिले, रोहिदास जाधव, प्रा. दत्तात्रय बाळ सराफ, सुधीर ठाकरे, डॉ. प्रमोद येवले, सुवर्णा राऊळ, प्रा. राजाभाऊ करपे, चंद्रशेखर देशपांडे, सदस्य सचिव डी. डी. देशमुख उपस्थित होते.

०००००००००००००००००

सुनावणीमध्ये सादर झालेल्या निवेदनात मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही संघटनांनी विरोध केलेला नाही. ओबीसी संघटनांनी ओबीसी समाजाच्या २७ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

एम. जी. गायकवाड, अध्यक्ष, राज्य मागासवर्ग आयोग

०००००००००००००००००००००

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सुनावणी पूर्ण

ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातही सुनावणी पूर्ण

२३ रोजी ओरस (सिंधुदुर्ग)

अहवाल प्राप्तीनंतर तज्ज्ञ समाजशास्त्रज्ञानचे मत घेणार

सुनावणीनंतरही निवेदने स्वीकारणार

सर्वात शेवटी पुणे जिल्ह्यात सुनावणी

अहवाल सादर करण्यास दिरंगाई करणार नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठराव, निवेदने देण्यासाठी झुंबड

0
0

फोटो आहे

...............

आरक्षण समर्थनार्थ ऐतिहासिक पुरावे

आयोगासमोर ठराव, निवेदने देण्यासाठी मराठा समाजबांधवांची प्रचंड गर्दी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या आरक्षणासंर्दभातील सोमवारी घेतलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी दरम्यान ठराव, निवेदने देण्यासाठी एकच झुबंड उडाली . आरक्षण देण्यासाठी समर्थन देणारे ऐतिहासिक दस्ताऐवज, जुनी कागदपत्रे, ठराव, निवेदने गठ्ठेच्या गठ्ठे घेवून कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले होते. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या जनसुनावणी दरम्यान वादाचे प्रसंग उद्भवल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. निवेदन सादर करण्यास जाताना संपूर्ण नोंदी घेऊनच महाराणी ताराबाई सभागृहात सोडले जात होते. कोल्हापूर ग्रामीण व सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाचे नागरिक वाहनातून निवेदन सादर करण्यासाठी आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता जनसुनावणीला सुरुवात झाली. यावेळी आयोगाचे सदस्य प्रा. चंद्रशेखर देशपांडे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, सुधीर ठाकरे, डॉ. प्रमोद येवले, रोहिदास जाधव, डॉ. सुवर्णा रावळ, प्रा. राजाभाऊ करपे, डॉ. भूषण कर्डिले, सदस्य सचिव डी. डी. देशमुख यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांसह कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तत्पूर्वी मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी केली होती. संघटना व संस्थांच्या माध्यमातून तयार निवेदने दिली जात होती. वैयक्तिक स्वरुपात देण्यात येणाऱ्यांना निवेदनाच्या छायांकित प्रती कार्यकर्त्यांकडून वाटप केल्या जात होत्या. सुनावणीला सुरुवात होताच अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने आयोगाला निवेदन सादर करत चर्चा केली. या निवेदनात म्हटले आहे, 'मराठवाड्यातील मराठा समाजाचे आर्थिक मागासलेपण सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही असे सर्वेक्षण करुन मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात समावेश करुन आरक्षण द्यावे. राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले होते.' शाहू महाराजांचे मराठा समाज मागासलेला समाज असल्याचा स्पष्ट उल्लेख असलेले पत्र पुरावा म्हणून सादर करण्यात आले.

यानंतर सकल मराठा समाज, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, क्षत्रिय मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, स्वाभिमान संघटना, प्रजासत्ताक सामाजिक संस्थासह ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदेच्यावतीने ठराव दाखल केले. त्याचबरोबर वैयक्तीक स्वरुपात निवेदने देताना काहींनी शेतीचे झालेले विभाजन जुन्या सात-बारा उताऱ्यासह दाखवून दिले. सकाळी १२ पर्यंत शहर आणि परिसरातील नागरिकांची निवेदन देण्यासाठी गर्दी झाली होती. दुपारनंतर मात्र ग्रामीण भागासह सांगलीवरुन मराठा समाजाचे कार्यकर्ते दाखल झाले. खास वाहनांतून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहनांची मोठी गर्दी दिसत होती. सांगली येथून भगव्या टोप्या परिधान करुन आलेल्या कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. निवेदन देण्यास येणाऱ्या नागरिकांची संपूर्ण तपासणी करुन नोंद घेतली जात असल्याने नोंदणी टेबल भोवती समाजातील नागरिकांची गर्दी झाली होती. दुपारी साडेचार वाजता शेवटचे निवेदन देण्यात आले. जनसुनावणी दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे, प्रा. रवींद्र पाटील, भगवान काटे, प्रा. मधुकर पाटील, अजित नलवडे, महादेव पाटील, अवधूत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

............................

ओबीसी आरक्षणाला धक्का नको

मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, या मागणीचे निवेदन ओबीसी सेवा संघाचे राज्य सचिव दिगंबर लोहार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले. यावेळी अध्यक्ष शिवाजीराव माळकर, शोभा खेडेकर, अनिल सुतार, पी. ए. कुंभार, शिवाजी आंबेकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे सुतार-लोहार उन्नती संस्थेच्यावतीने अध्यक्ष दत्तात्रय सुतार यांनी आयोगाला निवेदन दिले.

..............

कोट

'राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये आरक्षण देवून समाजाला न्याय मिळवून दिला. आरक्षणाची जन्मभूमी असलेल्या कोल्हापुरात सोमवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये गुणात्मक व संख्यात्मक निवेदन सादर झाली आहेत. दहा वर्षापूर्वी कोल्हापूरात आलेल्या राज्य आयोगाकडे एकही निवेदन सादर झालेले नव्हते. पण यावेळी समाजाने आपल्यातील जागृती दाखवून दिली.

वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

.........

कोट

'शाहू महाराजांनी १९०२ मध्ये काढलेल्या आरक्षणाच्या वटहुकूमासह १९०७ चे पत्रही सादर केले आहे. पत्र हा भक्कम पुरावा असून अनेक ऐतिहासिक कागदपत्रांच्या माध्यमातून मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण पुराव्यासह सादर केले आहे.

इंद्रजीत सावंत, इतिहास अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रातांचे भूविकास कर्मचाऱ्यांना पत्र

0
0

प्रांतांचे भूविकास कर्मचाऱ्यांना पत्र

धोरणात्मक निर्णयासाठी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भूविकास बँकेच्या इमारतीवरील शेरी इनामाबाबत मार्गदर्शन व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत सरकारला अहवाल सादर केला असल्याचे पत्र सोमवारी करवीरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी धरणे आंदोलनास बसलेल्या कर्मचाऱ्यांना दिले. सरकारकडून अभिप्राय दिल्यानंतर याबाबतची निर्णय घेणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणात्मक निर्णयाशिवाय आंदोलनातून तोडगा निघणार नसल्याने कर्मचारी अजून किती दिवस आंदोलन करणार हा प्रश्न आहे.

भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे थकीत देणी इमारत विक्री करुन देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला. त्यानंतर मालमत्ता विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर मालमत्तेवर 'ब' सत्ता प्रकार असल्याचे निदर्शनास आले. 'ब' सत्ताप्रकारात इमारत येत असल्याने विक्री करता येत नसल्याने नगरभूमापन कार्यालयाकडे अहवाल मागवला. अहवलामध्ये भूविकासची मालमत्ता 'ब' सत्ताप्रकारात नसून शेरी इनाममध्ये येत असल्याचे स्पष्ट झाले. 'ब' सत्ताप्रकार किंवा शेरी इनाम हटवण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांना नसल्याने भूविकास बँकेचे कर्मचाऱ्यांचे आंदोलन धोरणात्मक निर्णयात अडकले आहे.

सोमवारी याबाबतचे पत्रच उपविभागीय अधिकारी इथापे यांना दिले. इमारतीवरील शेरी इनाम हटवणे आवश्यक असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पुणे यांना दिला असून आयुक्तांनी धोरणात्मक निर्णयासाठी अहवाल सादर केला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्याशिवाय भूविकास बँकेच्या आंदोलनातून तोडगा निघणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भूविकास बँक कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी सलाइन लावलेल्या अवस्थेतील झोपलेला कर्मचारी असे अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलनात एस. एस. कदम, एन. एच. वायदंडे, आर. पी. चौगुले, बी. व्ही. पाटील, एन. आर. पाटील, डी. एस. घोडेस्वार, बाबूराव डांगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे

0
0

आपत्ती व्यवस्थापनासाठी

यंत्रणांनी सज्ज रहावे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यात यंदा वेळेत मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व सरकारी विभागांनी सज्ज रहावे', अशी सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पोलिस अधिक्षक संजय मोहिते, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, '१५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य पूरबाधित ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणी गावातच आपत्ती काळात मदत निर्माण व्हावी यासाठी तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार करावे.' उपलब्ध असणारी आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा व यंत्रसामग्री यांची पावसाळ्यापूर्वी तपासणी करुन तहसीलदारांनी त्याबाबतचे तात्काळ अहवाल द्यावेत, असे आदेश त्यांनी दिले. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी, 'शहरातील पूरग्रस्तांच्या स्थलांतरासाठीची ठिकाणे, नाले सफाई, औषधांची उपलब्धता,धोकादायक इमारती याबाबत कार्यवाही केली जाईल असे सांगितले. जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, 'जिल्ह्यात ४६० धोकादायक शाळा-खोल्या असून ज्या खोल्यांची निर्लेखन प्रक्रिया अपूर्ण आहे ती तात्काळ पूर्ण करण्याबाबत यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी योजनेचे फॉर्म कार्यालयात ठेवण्याची ग्राहक मंचची मागणी

0
0

सरकारी योजनेचे फॉर्म

कार्यालयात ठेवण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी योजनांचे अर्ज व इतर दाखल्याचे अर्ज सरकारी कार्यलयात उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे. निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना पंचायतीच्यावतीने निवेदन देण्यात आले.

सरकारी योजनांचे अर्ज व अन्य कामांसाठी लागणारे दाखले सरकारी कार्यालयात मिळत नसल्याने कार्यालयाबाहेर दुकानातून खरेदी करावे लागतात. अर्जांची विक्री करताना नागरिकांना लुबाडले जाते. या सर्वांचा त्रास ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना होतो. अर्जाची किंमत एक ते दोन रुपये असताना आठ ते दहा रुपये आकारले जातात. नागरिकांना होणारा भुर्दंड टाळण्यासाठी सरकारी कार्यालयात अर्ज ठेवावेत. अर्ज विक्रीतून सरकारला महसूल मिळू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदेचे प्रशांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुल कामाचे स्टार्टअप

0
0

पर्यायी पूल

लागला 'मार्गी'

काम बंद पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तब्बल अडीच वर्षे रखडलेल्या पंचगंगा नदीच्या पर्यायी पुलाच्या बांधकामास सोमवारी सकाळी सुरुवात झाली. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या संभाव्य बंदीक्षेत्रात ठेकेदाराने जेसीबीने पाण्याचा हौद जमीनदोस्त करत परिसर स्वच्छता केली. तर आधी काम करण्यास नकार देणाऱ्या ठेकेदाराने कोणत्या अधिकारात आणि परवानगीने काम सुरु केले आहे, अशी विचारणा करत कोल्हापूर शहर व जिल्हा पर्यायी पूल कृती समितीने ठेकेदाराच्या अंगावर जात काम बंद पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यानंतर संतप्त झालेल्या पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी 'पुलाचे काम बंद पाडायचे नाही,' असा दम देत पुलाचे काम 'मार्गी' लावले.

दरम्यान भिंत बांधून शिवाजी पूल बंद करण्याचे आंदोलन मंगळवारी करणारच, असा पुनरुच्चार कृती समितीने केला आहे, तर पूल बंद करु नये, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. बांधकाम व्यावसायिकांची क्रेडाई, कॉलिंग कोल्हापूर, अर्थमुव्हर्स, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, गोशिमा यांनी पुलाच्या बांधकामास मदत करण्याची भूमिका घेतली आहे.

पर्यायी पुलाचे बांधकाम सोमवारपासून सुरू होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी रविवारी (ता. २०) रात्री जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांच्यासह त्यांचे कनिष्ठ अभियंता व कर्मचारी शिवाजी पूल परिसरात आले. केंद्रीय पुरातत्व विभागाने बंदी घातलेल्या संभाव्य भागाची पाहणी करत लाइनअपचे काम सुरू केले. तसेच परिसरातील झाडे झुडपे काढण्यास सुरुवात केली. पुलाच्या बांधकामास विरोध होऊ नये, यासाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरिक्षक अशोक धुमाळ यांनी वाहतुकीचे नियोजन केले.

पाण्याच्या हौदाजवळच्या चहा व खाद्य पदार्थांच्या गाड्या हटवण्यात आल्या. पुलाच्या बांधकामाची वर्क ऑर्डर घेणाऱ्या आसमास कंपनीचे प्रतिनिधी एन. डी. लाड यांनी परिसरात जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करण्यास सुरुवात केली. पुलाच्या कामास पाठिंबा देण्यासाठी क्रेडाईचे महेश यादव, अर्थ मुव्हर्स असोसिएशनचे रवी पाटील-सडोलीकर, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूरचे राजू लिंग्रस, कोल्हापूर कॉलिंगचे पारस ओसवाल, गोशिमाचे संचालक चंद्रकांत जाधव, कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव उपस्थित होते. पुलाचे काम सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पूल बांधणीबाबत लागणारे तांत्रिक सहाय्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.

एकीकडे पाण्याच्या हौदाजवळ माती उकरत असताना कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुलाजवळ आले. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार व बाबा पार्टे यांनी ठेकेदार एन. डी. लाड यांना जाब विचारला. ' दोन दिवसांपूर्वी पुलाचे बांधकाम करणार नाही असे पत्र दिले असताना तुम्ही अचानक कसे काय काम सुरू केले?'असा प्रश्न विचारत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पण निरीक्षक तानाजी सावंत यांनी दोघांना रोखले. 'आम्ही गेले तीन वर्षे शिवाजी पुलाचे आंदोलन करत आहोत. पुलाचे काम नियमानेच झाले पाहिजे,' असा दम देत काम बंद पाडले. राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे व त्यांच्यासमवेत असलेल्या कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेत कार्यालयाकडे जाणे पसंत केले. या घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक संजय मोहिते घटनास्थळी आले.

अधीक्षक मोहिते यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. 'पर्यायी पूल बांधावा यासाठी आम्ही जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. पुलाचे काम सुरू होण्यासाठी सर्वांचा पाठिंबा आवश्यक आहे. पुलाचे काम सुरू करायचे आहे की नाही हे स्पष्ट करा. मी अधिकाऱ्यांशी बोलतोय, ठेकेदाराचे मन वळवून त्याला काम करण्यास सुरुवात करण्यास सांगितले आहे. तुम्ही येऊन ठेकेदाराला काम बंद पाडा म्हणून सांगता. मी जुळवून आणतो तुम्ही परत पाठीमागे ओढता. यापुढे अधिकारी, ठेकेदार यांना काम बंद करा, म्हणून सांगायचे नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही फिरकायचे नाही. जे काही सांगायचे आहे ते मला सांगायचे,' असा दम मोहिते भरला. त्यानंतर ठेकेदाराने पुन्हा कामास सुरुवात केली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात काम सुरू होते.

परवानगी मिळू नये यासाठी काहीचे प्रयत्न

पर्यायी पुलाला परवानगी देण्यात येऊ नये, म्हणून शहरातील काही जणांनी केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. अशा सांगणाऱ्या मंडळींना विरोध करा. पूल बांधणाऱ्यांना विरोध करू नका, असे पोलिस अधिक्षक मोहिते यांनी स्पष्ट केले.

ठेकेदाराने पुलाचे काम करणार नाही, असे सांगितले आहे. परत त्याने काम करण्यास सुरुवात केली आहे. ठेकेदाराने काम सुरू करत आहे असे पत्र कृती समितीला द्यावे, असे आम्ही सांगत होतो. काम बंद पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. नियमाप्रमाणे काम करावे,असा आमचा आग्रह आहे.

आर. के. पोवार, निमंत्रक कृती समिती.

००००

कृती समितीने केलेल्या आंदोलनामुळे पर्यायी पुलाचे बांधकामास वेग आला आहे. प्रशासनाला बांधकाम व्यावसायिक संघटना व अन्य संस्था मदत करण्यास आम्ही तयार आहेत. त्यासाठी आम्ही शिवाजी पुलावर येऊन पाठिंबा दिला आहे. पुलाचे बांधकाम सुरू व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. नेते, अधिकारी, सामाजिक संस्था, आंदोलक एकत्र आल्यास पुलाचे काम पूण होईल.

पारस ओसवाल, कोल्हापूर कॉलिंग

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंगलातील अस्सल ‘वनअमृत’ थेट ग्राहकांपर्यंत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : जंगलातील अस्सल रानमेवा, फळे आणि मसाल्यावर प्रक्रिया करुन थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यातील महिला बचत गटांच्या माध्यमातून जंगलातील पदार्थांवर प्रक्रिया करुन वन विभागाने पॅकबंद 'वनअमृत' प्रॉडक्ट बाजारात आणली आहेत. या उत्पादनांना मॉलसह अन्यत्र बाजारपेठ मिळावी, यासाठी वनविभागाकडून नियोजन केले जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गसंपदेचा मोठा वारसा आहे. राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा, भुदरगड या परिसरातील जंगले आणि डोंगराळ भागात मोठी लोकवस्ती आहे. जंगलातील रानमेवा, मसाले आणि फळे विकून या परिसरातील मंडळी गुजराण करत असतात. तांदूळ, नाचणी, रानमेवा, फळांवर प्रक्रिया करुन त्या पदार्थांची विक्री करण्यासाठी महिला बचत गटाची साखळी ग्रामिण व डोंगराळ भागात चांगलीच रुजू लागली. त्यामुळे महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागले आहेत. या बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी वन विभागानेही पुढाकार घेतला आहे.

कोल्हापूर वन विभागाने महिला बचत गटाच्या माध्यमातून 'वनअमृत' या ब्रँडखाली उत्पादन सुरु केले आहे. वन विभागाने शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यातील १७ गावांतील महिला बचत गटांच्या माध्यमातून या ब्रँडखाली १४ उत्पादने बाजारात आणली आहेत. त्यात कैरीचे लोणचे, करवंद लोणची, तमालपत्र, शिकेकाई, पापड, बटाटा, फणस आणि केळी वेफर्स, हातसडीचा तांदूळ, घनसाळ, मध याचे उत्पादन केले जात आहे. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये 'वनअमृत'च्या ब्रँडखाली लोणच्यांची विक्री होत आहे. शिकेकाई, तमालपत्र, हिरडा, बेहडा यांसारखे मसाले व औषधी वनस्पती पॅकबंद पिशव्यातून विक्री केली जात आहे. शिकेकाईची पूड व शिकेकाई शॅम्पू याचे उत्पादन करण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत. भविष्यात काजूवर प्रक्रिया करण्यासंदर्भातही वन विभागाचा विचार सुरु आहे.

प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर कापडी व कागदी पिशव्यांना मोठी मागणी आहे. वनखात्याने कापडी व कागदी पिशव्या तयार करण्यासाठी महिला बचत गटाला प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच पाकिटे, फाइल्सही महिला बचत गटाकडून करवून घेतली जात आहेत. महिला बचत गटाकडून तयार केलेल्या पदार्थांची विक्री करण्यासंदर्भात खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. वन विभाग व महिला बचत गटाकडून तयार केलेल्या उत्पादनांना मॉलसह चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरु आहेत.

०००००

डोंगराळ आणि जंगलाजवळील महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्यादृष्टीने वन विभाग मार्गदर्शन करत आहे. वनअमृत या ब्रँडखाली तयार होणारी उत्पादने मॉल व बाजारपेठेत उपलब्ध व्हावीत, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

प्रभू नाथ शुक्ला, उप वनसंरक्षक, कोल्हापूर विभाग

००००००

'वनअमृत'ची उत्पादने

कैरी आणि करवंदांची लोणची, तमालपत्र, शिकेकाई, पापड, बटाटा, फणस, केळी वेफर्स, हातसडीचा तांदूळ, घनसाळ, मध.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ पासून संगणक कार्यशाळेचे आयोजन

0
0

कसबा बावडा: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्यावतीने १२ वी विज्ञान व पदविका अंतिम वर्षाच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासाठी तारीख २५ ते ३० मे, २०१८ दरम्यान मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये होणार आहे. या कार्यशाळेत संगणक बांधणी, संगणक संबधित समस्या व निवारण, इंग्लिश, मराठी ब्लॉग लिखाण, अँड्रॉइड अँप कसे विकसीत करावे व इतर संगणक संबधित सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा पुर्णपणे मोफत असून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी http://coek.dypgroup.edu.in या संकेत स्थळावर किंवा ९३७१०४११८८, ९८२२९५५०३२ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजितसिंह जाधव व विभागप्रमुख डॉ. जी. ए.पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images