Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘निर्भय वॉक’मध्ये सहभागी व्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास वेगाने व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारवर दबाव वाढविण्यासाठी निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,' असे आवाहन अभिनेते डॉ. शरद भुथाडिया यांनी केले. राजारामपुरी परिसरात रविवारी सकाळी निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्भय मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. आईचा पुतळा, शाहूनगर रोड, जगदाळे कॉलनी, प्रतिभानगर, राजारामपुरी पोलिस चौकीमार्गे आईचा पुतळा असा निर्भय वॉक करण्यात आला. दाभोलकर, पानसरे, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे खुनी मोकाट फिरत असताना केंद्र व राज्य सरकारकडून मारेकऱ्यांना पकडण्यात अपयश आले आहे. तपासातील निष्क्रियेबद्दल सरकारला जाब विचारण्यासाठी दर महिन्याच्या २० तारखेला निर्भय वॉकचे आयोजन करण्यात येते. निर्भय वॉकमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

समारोपप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम म्हणाले, 'दाभोलकर, पानसरे यांचे खुनी पकडण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळे मारेकरी मोकाट फिरत आहे.' सरकारवर दबाव वाढविण्यासाठी निर्भय वॉकमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. शरद भुताडिया यांनी केले. यावेळी यश अंबोळे यांनी चळवळीतील गीते सादर केली. निर्भय वॉकमध्ये कॉ. बी. एल. बरगे, व्यंकप्पा भोसले, मेघा पानसरे, हसन देसाई, दिलीप पोवार, संभाजी जगदाळे, प्रा. टी. एस. पाटील, अश्विनी ओतारी, शंकर काटोळे, कपिल मुळे, प्रशांत काकरे, स्वाती कोरे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. पुढील निर्भय वॉक २० जूनला रेसकोर्स नाका टिंबर मार्केट कमानीपासून सुरू होणार आहे.

००००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्राईम पट्टा

$
0
0

अपघातात महिला पादचारी ठार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे बंगळुरु महामार्गावर गोकुळ शिरगाव सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ टेंपोच्या धडकेत राजश्री सुरेश उगले (वय ५०, रा. सुतार मळा, इचलकरंजी) ही पादचारी महिला ठार झाली. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. राजश्री यांची मुलगी गोकुळ शिरगाव येथे राहते. रस्ता ओलांडत असताना त्यांना ट्रकची धडक बसली. त्या जागेवरच ठार झाल्या. गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली.

हसूर दुमालात शेतकऱ्याची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हसुर दुमाला (ता. करवीर) येथे जनावरांच्या शेडमध्ये वाशाला गळफास लावून दिलीप शामराव चांदेकर (वय ५२) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. रविवारी सकाळी नऊ वाजता आत्महत्येची घटना निदर्शनास आली. करवीर पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली.

अपघातातील जखमीचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यवर्ती बस स्थानक परिसरात टोईंग क्रेनच्या धडकेत ईराप्पा इब्राहिम कुरणे (वय ४५, रा. सांगली) या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री नऊ वाजतण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीत अपघाती मृत्यू अशी नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुतार लोहार समाजासाठी महामंडळाची स्थापना करावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री विश्वकर्मा सुतार, लोहार कारागीर विकास महामंडळाची स्थापना करावी, त्या मंडळामार्फत सुतार लोहार समाजाला विनाजामीन व विनाव्याज कर्जपुरवठा करावा, अशी मागणी समाजातर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली. सुतार लोहार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. यामध्ये सुतार, लोहार समाजाने निर्माण केलेल्या वस्तू महामंडळाने विकत घ्याव्यात, तसेच समाजाचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी विविध योजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे, सुतार लोहार समाजाचा सुतारकाम व लोहारकाम हा पारंपरिक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसायासाठी लागणारी साधने तयार करण्यासाठी आरा यंत्राची आवश्यकता आहे. २४ इंच आरा यंत्रे १९८२ पासून बंद आहेत. ती पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी. गावातील गायरान भूखंड व शहरामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये समाजातील व्यावसायिकांसाठी भूखंड मिळावेत अशी मागणी केली. शिष्टमंडळात शांताराम सुतार, दिलीप सुतार राशिवडेकर, विनोद सुतार, संजय महागांवकर, विजय लोहार, कृष्णात लोहार, गणेश सुतार, प्रविण लोहार आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौरंगी लढत

$
0
0

गारगोटी : गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सत्ताधारी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली जोतिर्लिंग शहर विकास आघाडी विरोधात माजी आमदार के. पी. पाटील-राहुल देसाई यांच्या केदारलिंग आघाडी रिंगणात उतरली असून उमेदवारांनी व्यक्तिगत गाठीभेटी, संपर्कावर भर दिला आहे. सरपंचपदासाठी चार जण रिंगणात उतरले आहेत. सरपंचपदासाठी आबिटकर गटातून राजेंद्र घोडके, माजी आमदार के. पी. पाटील-राहुल देसाई आघाडीतून संदेश भोपळे, राजेंद्र यादव, अशोक बुरुड निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनविभागाला निवेदन

$
0
0

राधानगरी: तालुक्यात टस्कर हत्ती व गव्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी. नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख उत्तम पाटील व भिकाजी हळदकर यानी वनक्षेत्रपाल अजित साजणे यांना दिले. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात केली अहे. यावेळी सखाराम पाटील, शहरप्रमुख महादेव पाटील, मारुती टिपुगडे, भिकाजी तोडकर, युवराज पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत विद्यापीठासाठी १५ सदस्यीय समिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने संत तुकाराम महाराज संत विद्यापीठ निर्मितीसाठी पुढचे पाऊल उचलले असून, डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यांच्या मार्गदर्शक समितीस तत्वत: मान्यता दिली आहे. ही समिती संतपीठाचा बृहत आराखडा, अभ्यासक्रम, अस्थापनेची रचना, वर्गपद्धती व इतर अनुषंगिक कामांबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या प्रस्तावित संत तुकाराम महाराज संतपीठाच्या चर्चेचे गुऱ्हाळ गेल्या दहा वर्षांपासून सुरू होते. मात्र, आजवरच्या मंदिर समिती वा सरकारांनी ठोस पाऊल उचलले नव्हते. मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अतुल भोसले यांनी मात्र वारकरी सांप्रदायाच्या सर्व मागण्यांचा गांभीर्याने पाठपुरावा सुरू केला असून, टोकन दर्शन व्यवस्थेच्या निर्णयानंतर संतविद्यापीठाच्या कामालाही आता गती येणार आहे.

डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत संत साहित्यिक सदानंद मोरे, अरुण ढेरे, विवेक घळसासी, गणेश सुर्वे, शंकर अभ्यंकर, यशवंत पाठक, डॉ. सुभाष लोहे, डॉ. अरविंद देशमुख, शांताराम बुटे, विद्याधर ताठे, डॉ. मोहरीर, ज्ञानेश्वर महाराज देशमुख आणि चैतन्य महाराज देगलूरकर यांचा समावेश आहे.

'वारकरी सांप्रदायाच्या मागणीनुसार श्री विठ्ठल रुक्‍मिणीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना संत वाङ्मय व भागवत धर्माची शिकवण देण्यासाठी हे संतपीठ उभारणे आवश्‍यक आहे. मानवतावाद व सामाजिक समता या विषयी उपदेश केलेल्या सर्व संतांच्या शिकवणीतील भावार्थ, सिद्धांत व तत्वज्ञान या संबंधीचे ज्ञान देण्यासाठी, ते आचरणात आणण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी तसेच त्याचा प्रचार करण्यासाठी संतपीठाची उभारणी करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवत हा प्रकल्प मार्गी लावायच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे,' अशी प्रतिक्रिया डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे प्रश्न मांडू

$
0
0

कोल्हापूर : महानगरपालिका शाळांतील शिक्षकांचे प्रश्न मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत मांडू असे, आश्वासन आखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे आयोजित त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. शेठ रूईया विद्यालयात अधिवेशन झाले. महापौर स्वाती यवलुजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी मनोहर सरगर, उपाध्यक्षपदी दिलीप माने, सरचिटणीसपदी संतोष बांबळे, कोषाध्यक्षपदी संदीप सुतार यांची निवड झाली. यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी बापट, उत्तम सुतार, एस. के. यादव, नामदेव बरगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलाच्या बांधकामाला आजपासून सुरुवात

$
0
0

पर्यायी पुलाचे

बांधकाम आजपासून

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाच्या बांधकामाला सोमवारपासून (ता.२१) सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. जिल्हा पोलिस मुख्यालात रविवारी रात्री झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला. कंत्राटदार मे. आसमास कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस प्रशासन आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सोमवारी सकाळपासून प्रत्यक्ष काम सुरु करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. त्यावर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर कामाची प्रगती पाहून मंगळवारच्या आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली.

पुरातत्व विभागाच्या परवानगीअभावी गेली अडीच वर्षे पर्यायी पुलाचे बांधकाम रखडले आहे. पर्यायी पुलासाठी कोल्हापुरात आंदोलन सुरु आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या चार महिन्याच्या कालावधीत पर्यायी पुलाचे बांधकाम करता येणार नसल्याचे कारण सांगत मे.आसमास कंपनीने गेल्या आठवड्यात बांधकामाची वर्क ऑर्डर नाकारली. कंपनीने काम करण्यास नकार दिल्यामुळे पर्यायी पुलाच्या बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. दुसरीकडे पर्यायी पुलाच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करावी यासाठी कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीने मंगळवारी (ता.२२) शिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद पाडण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाचा ग्रामीण भागातून पाठिंबा मिळावा म्हणून कृती समितीने रविवारी प्रयाग चिखली, वडगणे, वरणगे, पाडळी, निगवे गावाचा दौरा केला होता.

पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस प्रशासनाने रविवारी पुन्हा एकदा हालचाली केल्या. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी थेट कंत्राटदारांशी संपर्क साधला. त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली. आसमास कंपनी काम करण्यास तयार झाल्यामुळे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दिनकर मोहिते, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, कृती समितीचे पदाधिकारी आर.के.पोवार, बाबा पार्टे, अशोक पोवार, रमेश मोरे आणि आसमास कंपनीचे प्रतिनिधी एन.डी.लाड यांची संयुक्त बैठक झाली.

बैठकीत पोलिस अधीक्षक मोहिते यांनी कंत्राटदार पुलाचे काम करण्यास तयार आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे स्पष्ट केले. त्यावर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी, पुरातत्व विभागाच्या परवान्यासंदर्भात विचारणा केली. तेव्हा प्रशासनाकडून प्रत्येक टप्प्यावर समाधानकारक काम सुरु आहे. महत्वाचे म्हणजे पर्यायी पुलाचे प्रत्यक्ष काम सोमवारपासून प्रारंभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यावश्यक बाब म्हणून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची मान्यता घेऊन पर्यायी पुलाचे काम सुरु करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. विधी व न्याय विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांशी पत्रव्यवहार केल्याचे बैठकीत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी पुलाच्या पश्चिमेकडील बाजूची डागडुजी, फिनिशिंग व इतर कामे होतील अशी शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा शिवसेनेतर्फे पर्यायी पुलाप्रश्नी प्रशासनाने मार्ग काढावा यासाठी सोमवारी निवेदन देण्यात येणार आहे.

..........

कोट

'प्रशासनाने सोमवारपासून पर्यायी पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्याची ग्वाही दिली. कृती समिती सोमवारी दिवसभर पुलाच्या कामाची प्रगती पाहील. सायंकाळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल, त्यामध्ये मंगळवारच्या आंदोलनाबाबत निर्णय होईल.

अशोक पोवार, कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वारणाप्रश्नी श्वेतपत्रिका काढावी

$
0
0

इचलकरंजी: इचलकरंजीच काय कोणत्याही गावाला पाणी देण्यास विरोध नाही. इचलकरंजी शहराच्या पाणी योजनेसाठी काही पर्याय सुचवले आहेत, त्याचा विचार केला पाहिजे. पाण्याची गरज, वापर याची सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी भूमिका ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी आज येथे व्यक्त केली.

डॉ. एन. डी. पाटील हे आज येथे एका कार्यक्रमासाठी आले असता इचलकरंजी नागरी मंचच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. इचलकरंजीला वारणा पाणी योजनेची गरज आहे, असे त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितले. या प्रकरणी योग्य तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावर प्रा. पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

डॉ. पाटील म्हणाले, 'इचलकरंजीला पाणी देण्याला विरोध नाही. मला भेटण्यासाठी इचलकरंजीची मंडळी आली होती. तेव्हा वारणा पाइपलाइनची श्वेतपत्रिका काढण्यास सांगितले होते, पण ती अजून काढलेली दिसत नाही. कोल्हापुरच्या बैठकीत त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, यावर कार्यवाही का होत नाही? इचलकरंजीच्या प्रदूषित काळ्याओढ्याच्या प्रदूषण बाबत काय केले हेही महत्त्वाचे आहे.'

'कृष्णा नदीतून मजरेवाडी येथून पाणी उचलत असताना पुन्हा ही नवीन योजना कशासाठी? माझ्या गावाच्या पाणी योजनेच्या पाइप ५० वर्षे सुस्थितीत असताना येथेच कशा त्या लवकर खराब होतात याचा शोध घेतला पाहिजे. वारणा योजनेसाठीच्या पाइपलाइनसाठी वापरण्यात येणाऱ्या पाइपच्या व्यासांचा आणि मोटरींच्या क्षमतांचा विचार करताना अखंड वारणा नदीच उचालता की काय? अशी लोकभावना झाली आहे. त्याबाबतचे गैरसमज दूर करावे लागतील. तसेच इचलकरंजीच्या पंचगंगा प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना कराव्या लागतील, असे माझ्याशी ग्रामस्थांनी केलेल्या चर्चेतून दिसत आहे. ही भूमिका मुंबईत होणाऱ्या बैठकीत मांडली जाणार आहे. नदी काठावरील गावांना पिण्याचे व शेतीचे पाणी कमी पडणार नाही, याची खबरदारी घेऊन तोडगा काढावा,' असे त्यांनी सुचवले यावेळी चर्चेत इचलकरंजी नागरिक मंचचे राजू कोण्णूर, शीतल मगदूम, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगेत विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या हर्षवर्धन राहुल भोसले (वय १४ रा. पंचगंगा तालमीजवळ, शुक्रवार पेठ) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह हाती लागला.

हर्षवर्धन व त्याचे मित्र पंचगंगा नदीवर सायकलवरून पोहण्यासाठी गेले होते. सायकल फिरवून झाल्यावर त्याचे मित्र पंचगंगेत पोहायला उतरले. हर्षवर्धनला पोहायला येत नसल्याने त्याच्या मित्रांनी त्याला नदीत उतरू नको, असे सांगितले. त्यानंतर हर्षवर्धन सायकल फिरवायला गेला. त्याचे मित्र नदीत पोहायला उतरले. ते पलिकडच्या काठावर जात असताना त्यांची नजर चुकवून तो पाण्यात उतरला. काही वेळातच तो बुडाला. पोहून झाल्यानंतर त्याचे मित्र बाहेर आले. त्यांना काठावर हषर्वधनचे चप्पल व कपडे दिसली. त्यांनी त्याचा परिसरात शोध घेतला, त्यावेळी तो बुडाल्याचा संशय आला. मित्रांनी त्यांच्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी नदीवर धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. बोटीच्या सहाय्याने शोध घेतला. रात्री आठ वाजता जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी मृतदेह बाहेर काढला.

पंचनामा करून मृतदेह सीपीआरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हर्षवर्धन महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता. नुकतीच तो आठवीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील लहान भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागासवर्ग आयोग आज कोल्हापुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेपण तपासणीसाठी जिल्हानिहाय दौरा सुरू आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाचे मागासलेपण समजवून घेण्यासाठी सोमवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोगाच्यावतीने जनसुनावणी होणार आहे. जनसुनावणीमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने भक्कम पुरावे सादर करण्यात येणार आहेत.

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह राज्यात सकल मराठा समाजाच्यावतीने लाखोंच्या संख्येत मोर्चे काढले. मोर्चाची दखल घेत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून विभागवार जनसुनावणी घेतली जात आहे. आयोगाकडून सुरू असलेल्या जनसुनावणीमध्ये मराठा समाजासह इतर समाज घटकांचे सरकारी नोकरी व शिक्षणातील प्रमाण सरकारच्या विविध विभागाकडून तपशील मागवणे. न्यायालयीन निवाडे, देश व राज्य मागासवर्ग आयोगांचे अहवाल, विविध विषयावरील लेख, ग्रंथ, याचा अभ्यास करणे. संशोधन संस्थेच्या मदतीने प्रत्येक विभागात मराठा समाजाचे नमुना सर्वेक्षण करुन अहवाल घेणे. जनसुनावणीद्वारे नागरिकांची माहिती गोळा करणे आदी स्वरुपाचे कामकाज सुरू आहे.

विभागवार झालेल्या जनसुनावणीमध्ये कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शेतीविषयक, महिलांचे मागासलेपण, मुलां-मुलींच्या विवाहाची समस्या, बेरोजगारी आदीबाबतची माहिती तपशीलवार माहिती ठिकठिकाणी मांडणात आली आहे. त्याच पद्धतीने तीनही जिल्ह्यातील मराठा समाजाला माहिती सादर करण्याची संधी मिळणार आहे. समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारी आकडेवारी, पुरावे, जुन्या नोंदी, राज्यातील इतर जिल्ह्यात व विभागात मराठा-कुणबी सोयीर संबंध लिखित स्वरुपात मांडण्यासाठी येथील सकल मराठा समाजाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत.

आयोगासमोर व्यक्तिगत अथवा कुटुंबाचे निवेदन सादर करताना स्वत:चा पूर्ण परिचय, व्यवसाय, कुटुंबातील शेतीची अवस्था, मिळणाऱ्या पायाभूत सुविधा जंत्री तयार करण्यात आली आहे. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव करुन मराठा समाजाचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण, स्थालंतरित होणारी कुटुंबे, सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण, शिक्षणातील गळतीचे प्रमाण, इतर समाजाच्या राहणीमानाची तुलना करणारी आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे. वस्तुस्थितीदर्शक माहिती आयोगासमोर देण्यासाठी शिक्षक-प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, वकील, कर्मचारी व असंघटीत क्षेत्रातील कामागारांसह व्यवसयिक गटांची मदत घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली पोलिस दलातील गुंडाविरोधी पथकाने पिस्तुल विक्रीसाठी ग्राहकाच्या शोधात सांगलीत आलेल्या दोघांना अटक करून पाच पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसे रविवारी जप्त केली. सौरभ विजय कुलकर्णी (वय २१, हॉटेल व्यवसाय, रा. गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा) आणि सौरभ सुनील जाधव (वय २२, भिगवण, इंदापूर , जि. पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, ते सांगलीतील शंभरफुटी रस्त्यावर पथकाच्या तावडीत सापडल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

'पिस्तुल विक्रीसाठी काहीजण सांगलीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके आणि त्यांच्या पथकाने त्या दोघांना पकडले आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्वपूर्ण आहे. जो पिस्तुलासारखे घातक शस्त्र जवळ बाळगतो, तो कोणाच्यातरी जीवावर उठण्याच्या तयारीत असतो. त्यामुळे वेळीच ही कारवाई करून भविष्यातील गंभीर गुन्हे रोखण्याचे काम पोलिसांनी केले आहे. निवडणुकीच्या काळात दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्याचा काहींचा मनसुबा असू शकतो. परंतु, पोलिस सतर्क आहेत. या दोघांनी कुठून पिस्तुले मिळवली, त्यांचा सांगलीत कोण खरेदीदार होता, याचा सखोल तपास करण्यात येईल,' असे शर्मा म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईची मागणी

$
0
0

कोल्हापूर: शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांचे संचालकपद अपात्र ठरवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी सुनावणीमध्ये तक्रारदारांनी सहकार कायदा '७८' नुसार कारवाई करण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. या अर्जाचे अवलोकन करुन तक्रारदारांना नवीन तारीख देणार असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. पाटील यांच्यावतीने मूळ तक्रार अर्जावर पुढील सुनावणी दरम्यान म्हणने मांडण्याची विनंती केली. तक्रारदारांच्यावतीने अॅड. उत्कर्ष साळोखे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदकेसरी दीनानाथ सिंह अखेर तालीम संघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिदंकेसरी श्रीपती खंचनाळे आणि दीनानाथ सिंह या तिघांनी तालीम संघापासून राखलेला दुरावा अखेर संपुष्टात आला. काही वर्षांपूर्वी खंचनाळे यांनी तालीम संघात प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ आता सिंह यांनीही तालीम संघाचे कौतुक करत 'रामाप्रमाणे माझाही वनवास संपला' असे सांगत तालीम संघात प्रवेश केला.

रविवारी झालेल्या सत्कार समारंभात त्यांनी यापुढे तालीम संघाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहण्याचा निर्धार केला. सिंह कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघापासून गेल्या १४ वर्षांपासून दूर होते.

कुस्तीक्षेत्रात आदराने नाव घेतले जाणारे गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे, दिनानाथ सिंह यांचे बाळ पाटणकर, दादू चौगुले आणि अन्य पदाधिकाऱ्यांशी फारसे कधी पटले नाही. यात मोतीबाग तालीम आणि न्यू मोतीबाग तालीम असा संघर्षही होता. काही वर्षांपूर्वी हिंदकेसरी स्पर्धा कोल्हापुरात झाली होती. त्यावेळी श्रीपती खंचनाळे यांनी तालीम संघात प्रवेश करत कामाचे कौतुक केले होते. मात्र, आंदळकर आणि दीनानाथ सिंग हे दोघेही अद्याप बाजूलाच होते. तालीम संघात आणि त्यांच्या झालेल्या वादामुळे गेल्या काही वर्षांपासून ते संघापासून दूर होते. तालीम संघातील प्रवेशाबाबत सिंह यांना विचारले असता, ते म्हणाले, 'रामाप्रमाणे माझा १४ वर्षांचा वनवास संपला आहे. बाळ गायकवाड आणि तालीम संघाने मोठ्या मनाने मला काम करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.' यावेळी तालीम संघाचे अॅड. महादेव आडगुळे, बाळ गायकवाड, दादू चौगुले,अमृत भोसले मनोगत व्यक्त करत सिंह यांचे स्वागत केले. यावेळी संभाजी वरुटे, पी. जी. पाटील, प्रकाश खोत, नामदेव पाटील, विश्वास हारुगले, यशवंतराव मुडळे, बाळासाहेब शेटे, रामा माने आदी उपस्थित होते. अशोक पोवार यांनी आभार मानले.

काही समज गैरसमजातून मी तालीम संघापासून बाहेर होतो. आता सर्व गैरसमज आणि मनातील मळभ दूर झाले असून कोल्हापुरातील कुस्तीच्या विकासासाठी पुन्हा नव्याने जोमाने कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीर्घ काळ तालीम संघापासून दूर असलो तरी माझे मन त्यात अडकून होते. तालीम संघाच्या सर्वानीच माझे स्वागत केल्याने कुस्ती क्षेत्राच्या कल्याणासाठी काम करायला आता नव्याने बळ मिळेल.

हिंद केसरी दीनानाथ सिंह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनीच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'वेळोवेळी मागणी करूनही शेतीसाठी भीमा नदीच्या पात्रात उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, येत्या २३ मे पर्यंत पाणी न सोडल्यास सोलापूर-मंगळवेढा मार्गावर बेगमपुरा येथे रास्ता रोको करू,' असा इशारा जिल्हा परिषदेच्या सदस्य शैला गोडसे यांनी दिला आहे.

गेल्या एक महिन्यापासून भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, सोलापूर परिसरातील हातातोंडाला आलेली उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने उजनीतून भीमा नदीच्या पात्रात शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी करण्या येत आहे. मात्र, प्रशासनाकडून विविध नियम, अटी पुढे करत पाणी सोडण्यास चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठचे शेतकरी पाण्यासाठी आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

'पूर्वी भीमा नदी बारमाही वाहत होती. त्यानंतर सुरुवातीच्या काळात उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन हे बारमाही पद्धतीने असतानासुद्धा भीमा नदीला पाणी उपलब्ध असल्याने भीमा नदीकाठचा भाग सुजलाम, सुफलाम होता. त्यानंतर नदीकाठच्या परिसरात साखर कारखाने, इतर उद्योगधंदे उभारण्यात आले. उजनी धरणाचे पाणी हे फक्त खरीप आणि रब्बी पिकांना देण्याचे नियोजन करण्यात आले. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पाणी इतरत्र वळवून नदीकाठच्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव प्रशासन व राज्य सरकारकडून सुरू आहे. बुधवारपर्यंत पाणी न आल्यास गुरुवार, २४ मे रोजी अधीक्षक अभियंत्यांना घेराव, त्यानंतरही कारवाई न झाल्यास उजनीवर जाऊन धरणाचे दरवाजे शेतकरी स्वतः उघडतील, असा इशारा शैला गोडसे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपुरवठा आज बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीज वितरण कंपनी तसेच पाणीपुरवठा विभागाने काढलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे सोमवारी (ता. २१) ए, बी, व ई वॉर्डमधील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

वीज वितरण कंपनीकडून पुईखडी येथील सबस्टेशनची देखभाल करण्यासाठी सोमवारी वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. वीजपुरवठा बंद असल्याने पाणी उपसा होणार नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने कणेरकरनगर व चंबुखडी पाण्याची टाकी येथील ११०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या दुरुस्तीमुळे ए, बी वॉर्डमधील फुलेवाडी रिंगरोड परिसर, कणेरकरनगर, नाना पाटीलनगर, साळोखेनगर, तपोवन, देवकर पाणंद, संभाजीनगर, शहाजी वसाहत, रायगड कॉलनी, आर. के. नगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ आयसोलेशन,राजेंद्रनगर परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. ई वॉर्डमधीलही न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, सदर बाजार, मार्केट यार्ड, राजारामपुरी, माळी कॉलनी, प्रतिभानगर, दौलतनगर, शास्त्रीनगर, सम्राटनगर परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. या भागात मंगळवारीही अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात डाळींचा तडका

$
0
0

कोल्हापुरात डाळींचा तडका

दररोज दोन कोटींची उलाढाल; ३० ते ४० ट्रक डाळींची आवक

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा अशी खासियत खवय्यांनी जपली आहे. यामुळेच कोल्हापुरात सर्वाधिक मांसाहार करणाऱ्या नगरिकांची संख्या जास्त असल्याचे मानले जाते. पण तरीही इतर किराणमालाच्या वस्तूंमधून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून, या उलाढालीला सर्वाधिक तडका डाळींचा बसत आहे. जिल्ह्यात तूरडाळ, हरभराडाळ, मसूरडाळ व मूगडाळींची दररोज ३० ते ४० ट्रक आवक होत असून, फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत दररोज दोन कोटींची, तर इतरवेळी दीड कोटीची उलाढाल होते.

जिल्ह्यात प्रामुख्याने ऊस, सोयाबीन, भाजीपाला या नगदी पिकांसह भाताचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जाते. इतर पिकांचे उत्पादन जमेतेम राहते. येथील वातावरणाला पोषक अशी पिके घेतली जात असल्याने इतर किराणमालाची प्रामुख्याने बाहेरूनच आवक करावी लागते. विशेषत: यामध्ये डाळवर्गीय कडधान्यांची आवक मोठ्याप्रमाणात केली जाते. कोल्हापुरात आठवड्यातून दोनवेळा मांसाहार करण्याचा प्रघात असला, तरी दररोजच्या आहारात हरभराडाळ, तूरडाळ, मसूरडाळ व मूगडाळीचा हमखास समावेश केला जातो. यामुळे डाळ विक्रीच्या व्यापारातून दररोज कोट्यवधीची उलाढाल सुरू आहे.

कोल्हापुरात येणारी सर्व डाळ मराठवाडा विभागातून येते. यामध्येही लातूर जिल्ह्यातील प्रमाण सर्वांत जास्त आहे. कोल्हापूरच्या गुळाप्रमाणे लातूर येथील डाळीची प्रत उत्कृष्ट असल्याने व्यापारी या जिल्ह्यातून आलेल्या डाळींना अधिक पसंती देतात. लातूर येथील डाळीचे उत्पादकही कोल्हापूरला डाळ पाठविण्यात अधिक आग्रही असतात. उत्पादक व व्यापारी यांच्यात निर्माण झालेले संबंध आणि मागणीमुळे जिल्ह्यात दररोज ३० ते ४० ट्रकमधून ३० टन डाळीची आवक होते. लक्ष्मीपुरी मार्केटमधून संपूर्ण जिल्ह्यात डाळींचे होलसेलमध्ये वितरण होऊन सरासरी दोन कोटी रुपयांची उलाढाल होते.

होलसेल बाजारात डाळींची विक्री मोठ्याप्रमाणात होत असतानाच रेशन दुकानांच्या माध्यमातून तूरडाळीच्या वितरणास सुरुवात झाली आहे. यावर्षी तूरडाळीच्या बंपर उत्पादनानंतर राज्य सरकारने खरेदी केलेली डाळ रेशन दुकानांच्या माध्यमातून विक्रीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे डाळीच्या उलाढालीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 'एकीकडे उलाढाल वाढत असताना डाळींच्या दरात मात्र घसरण झाली असून, वीस वर्षांपूर्वी झालेल्या दरातील घसरणीनंतर यावर्षी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे डाळ व्यापाऱ्यांनी सांगितले.'

०००

कमी वाहतूक खर्चामुळे लातूरला पसंती

यापूर्वी कोल्हापुरात कानपूर (उत्तरप्रदेश), मध्यप्रदेश व गुजरातमधून डाळींची आवक होत होती. या राज्यांतून डाळींची वाहतूक करताना अधिकचे भाडे द्यावे लागत होते. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातील दरावर होत होता. त्यामुळे लातूर येथून डाळ आयात करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर याच्या प्रमाणात सातत्याने वाढच होत गेली. दुष्काळाच्या काळात उत्पादन कमी झाल्याने तूरडाळीचा दर २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. महागाईच्या काळातही उत्पादकांना चांगला नफा वेळेवर मिळाल्याने अधिक प्रमाणात कोल्हापुरात डाळीची आवक करत आहेत.

०००

डाळीचा प्रकार आवक (टन) दर (क्विंटल)

हरभरा डाळ दहा ४,३००

तूरडाळ दहा ५,८००

मसूर डाळ पाच ४,३००

मूगडाळ पाच ६,५००

००००

दोन वर्षांच्या दुष्काळानंतर सर्वच प्रकारच्या डाळींचे उत्पादन वाढल्याने दर कमी झाले आहेत. तरीही जिल्ह्यात दररोज ३० ते ४० ट्रक डाळीची आवक होत असून, यातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे.

शिवाजी मोटे, मेसर्स हिंदुराव मोटे

०००

दोन वर्षांपूर्वी तूरडाळीच्या दरात अचानक वाढ झाली होती. त्याचा परिणाम महिन्याच्या बजेटवर झाला होता. त्यामुळे सहा महिने पुरेल एवढी डाळीची खरेदी करतो. यावर्षी डाळींचे दर कमी असल्याने एकदम खरेदीचा फायदा झाला.

अपर्णा काशीद, गृहिणी

०००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैलवान राजाराम जोशीलकर यांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेंडा पार्क येथील पाण्याच्या टाकीजवळील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून पैलवान राजाराम कुम्माण्णा जोशीलकर (वय ५२, सध्या रा. लक्ष्मीदत्त अर्पाटमेंट, पाटाकडील तालीम मंडळजवळ, मूळगाव, कोवाड, ता. चंदगड) यांनी आत्महत्या केली. जोशीलकर यांनी पहिल्या शाहू केसरीचा मान पटकावला होता. ते महावितरणमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते.

जोशीलकर हे सीपीआर रुग्णालय परिसरातील महावितरणच्या कार्यालयात लिपिक म्हणून काम करत होते. गेले सहा महिने त्यांची मन:स्थिती गेले सहा महिने ठीक नव्हती. तसेच ते आजारी असल्याने उपचार घेत होते. रविवारी सकाळी ते अकरा वाजण्याच्या सुमारास भाजी आणण्यासाठी मोटारसायकल घेऊन बाहेर गेले. दुपारी ते घरी परतले नसल्याने त्यांच्या नातेवाइकांनी शोध सुरू केला. जोशीलकर यांचा आर. के. नगर येथे प्लॉट असल्याने त्या ठिकाणी गेले असल्याची शक्यता घेऊन नातेवाइकांनी त्या परिसरात शोध घेतला. शेंडा पार्क पाण्याच्या टाकीजवळ जोशीलकर यांची मोटार सायकल दिसली. नातेवाइकांनी परिसरात शोध घेतला असता पाण्याच्या टाकीजवळ करंजीच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावल्याचे लक्षात आले. आत्महत्येच्या घटनेने नातेवाइकांना धक्का बसला. त्यांच्या भावाने घटनास्थळीच हंबरडा फोडला. राजारामपुरी पोलिस घटनास्थळी आल्यावर मृतदेह सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदनास पाठवण्यात आला.

जोशीलकर यांनी अनेक कुस्ती मैदाने गाजवली आहेत. ते पहिले शाहू केसरीचे मानकरी होते. विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत त्यांनी बक्षिसे मिळवली होती. वीज मंडळाच्या क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर विभागाला पदके मिळवून दिली होती. ते महाराष्ट्र केसरी विष्णूपंत जोशीलकर यांचे पुतणे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे महापौरपद सहा महिन्यांसाठी

$
0
0

महापालिका लोगो

................

काँग्रेसचे महापौरपद सहा महिन्यांसाठी

सहलीवरील नगरसेवकांना मोबाइल बंदी, सदस्यांना व्हीप लागू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतील फुटीचे राजकारण आणि घोडेबाजाराच्या शक्यतेमुळे सर्वसाधारण महिला गटातून निवड होणाऱ्या महापौरला आगामी अडीच वर्ष संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र महापालिकेतील सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी महापौरपद हे सहा महिन्यासाठी असेल हे रविवारी स्पष्ट केले. दरम्यान, स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतील फाटाफुटीपासून बोध घेत सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अतिशय खबरदारीने हालचाली सुरु केल्या आहेत.

काँग्रेस आघाडीच्या सदस्यांना रविवारी उशिरा सहलीवर पाठविले शिवाय त्यांना पक्षाचा व्हीपही लागू केला आहे. 'स्थायी'च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन सदस्य मोबाइल संपर्कामुळे फुटले हे ओळखून महापौरपदाची निवडणुकीपर्यंत दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांना मोबाइल बंदी घातली आहे. सहलीवरील ज्या सदस्यांना कुटुबांतील सदस्यांशी, नातेवाईक व मित्रांशी संभाषण करायचे आहे त्यांनी पक्षाच्या गटनेत्यामार्फत, त्यांच्याकडील मोबाइलवरुन संवाद साधायचा असे फर्मानच आघाडीच्या नेत्यांनी रविवारी दुपारी नगरसेवकांना बजावले. बैठकीत बोलताना आमदार मुश्रीफ व पाटील यांनी महापौरपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात नगरसेवकांना जणू आचारसंहिता लागू केली.

मुश्रीफ म्हणाले, 'स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मोबाइलने घात केला. मोबाइल संपर्कामुळे राष्ट्रवादीचे दोन सदस्य फुटले. याउलट कर्नाटकात बहुमत सिध्द करण्याअगोदर काँग्रेसने त्या पक्षाच्या आमदारांचा विरोधकांशी मोबाइलव्दारेही संपर्क होणार नाही याची दक्षता घेतली. म्हणून काँग्रेसला करामत करुन दाखविणे शक्य झाले. महापौरपदाच्या निवडणुकीतही कसलाही फटका बसू नये म्हणून चार दिवस नगरसेवकांनी मोबाइल बंद ठेवायचे आहेत. सहलीच्या कालावधीत त्यांचे मोबाइल बंद राहतील. ज्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधायचा आहे त्यांनी गटनेत्यांच्या मोबाइलव्दारे संवाद साधायचा असल्याचे बजावले आहे.'

.............

आज उमेदवार ठरणार

महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी २१ रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत आहे. महापौरपदासाठी काँग्रेसकडून नगरसेविका शोभा बोंद्रे, इंदूमती माने, उमा बनछोडे, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर, जयश्री चव्हाण आणि प्रतिक्षा पाटील इच्छुक आहेत. तर भाजप ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव, सविता भालकर, स्मिता माने, रुपाराणी निकम, तेजस्विनी इंगवले, भाग्यश्री शेटके हे उमेदवारांच्या यादीत आहेत. दोन्ही आघाडीकडून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. महापौरपदासाठी २५ मे रोजी निवडणूक होत आहे.

पुन्हा चर्चा नको

येत्या अडीच वर्षासाठी महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी आहे. साहजिकच महापौरपदासाठी इच्छुक महिलांची संख्या वाढली आहे. बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी सहा महिन्यासाठी महापौरपद असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, 'आता होणारी महापौरपदाची निवड ही सहा महिन्यांसाठी असणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलानुसार पहिल्या वर्षासाठी महापौरपद काँग्रेसकडे तर दुसऱ्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला होते. तिसऱ्या वर्षात पहिले सहा महिने स्वाती यवलुजे महापौर राहिल्या. नव्या महापौरपदाची मुदतही सहा महिन्यांसाठी राहील. सहा महिन्यानंतर किती कालावधीसाठी महापौरपद अशी पुन्हा चर्चा नको.'

...................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी सलोनीसाठी मदतीचे हात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

पोटात लोखंडी गज घुसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आठ वर्षांच्या सलोनी चंद्रकात भगत (रा. परळी, ता. सातारा) या बालिकेच्या उपचारांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी सलोनीच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी उचलत भगत कुटुंबाला आधार दिला.

परळी भागातील कातवडी येथील सलोनी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून कौलारू घर दुरुस्तीला मदत करत होती. दुरुस्ती करताना सलोनीच्या पायाखालील लाकडी पट्टी तुटली आणि सलोनी खाली कोसळली. बैल बांधण्यासाठी असलेला तिच्या पोटात रॉड घुसल्याने ती गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर सातारा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी (१९ मे) रात्री सलोनीवर किचकट शस्त्रक्रिया करून तिच्या पोटात घुसलेला लोखंडी गज काढण्यात आला असून, चिमुरडी आता सलोनी सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, वैद्यकीय खर्च पाहता भगत कुटुंबीयांना आधार देण्यासाठी परळी भागासह जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. परिसरातील अनेकांनी सलोनीला यथाशक्ती मदत केली आहे.

भगत कुटुंबाला मदत करण्यासाठी 'चंद्रकांत भगत, बॅक ऑफ महाराष्ट्रच्या (परळी शाखा) खाते नं. ६०२४१८६६००२ IFSC Code No. MAHB0000520' वर मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images