Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

घरोघरी जाऊन होणार मतदारांची पडताळणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून, १५ ते २० जून या कालावधीत घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी होणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) घरोघरी भेट देऊन मतदार यादीतील तफावती तपासणार आहेत. तसेच ज्या मतदारांचा मतदार यादीत ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, त्यांचा रंगीत फोटो स्वीकारला जाणार आहे. जिल्ह्यातील पाच लाख मतदारांचे रंगीत फोटो गोळा केले जाणार आहेत.

एक जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची माहिती घेऊन त्यांची मतदार यादीत नोंदणी केली जाणार आहे. तसेच एक जानेवारी २०१९ रोजी ज्या मतदारांचे वय १८ होणार आहे, त्यांची स्वतंत्र यादी बीएलओ करणार आहेत. मतदार यादीतील मृत, दुबार व स्थलांतरित मतदारांचा शोध घेऊन निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रियाही केली जाणार आहे. जिल्ह्यात ५१८८ दिव्यांग व्यक्ती असून, त्यापैकी ४६०० दिव्यांगांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. तसेच मतदार यादीतील खासदार, आमदार, कला, पत्रकार, खेळाडू, न्यायपालिका या क्षेत्रांतील सन्माननीय व्यक्तींची नावे मतदार यादीत असल्याची खात्री करून घेतली जाणार आहे. मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर खातरजमा करावी.

असा आहे पुनरीक्षण कार्यक्रम

पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे कालावधी

घरोघरी भेट देऊन बीएलओंकडून मतदारांची पडताळणी : १५ मे ते २० मे २०१८

मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण : २१ जून ते ३१ जुलै

प्रारूप मतदारयादी तयार करणे : १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१८

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : १ सप्टेंबर २०१८

दावे व हरकती : १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८

पुरवणी यादीची छपाई : ३ जानेवारी २०१९ पूर्वी

अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ४ जानेवारी २०१९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातून हिंदू एकता दिंडी

$
0
0

कोल्हापूर : सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी हिंदू जनजागृती समितीतर्फे शहरातून हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात आले. मिरजकर तिकटीपासून दिंडीला सुरुवात झाली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे फिरून दिंडीची सांगता शिवाजी चौक येथे झाली. या दरम्यान रणरागिणी पथकाने ढोल वादन, शौर्य जागरण करणाऱ्या मर्दानी खेळ सादर केले. सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, मनोज खाडे, स्वाती खाडे, अशोक चंदानी, दिलीप मानगांवकर, गोविंदराव देशपांडे, किरण कुलकर्णी, राजू हुंबे, मयूर तांबे यांच्यासह शिवसेना, वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, हिंदू महासभा, हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठा, इस्कॉन, पतित पावन संघटना, कोल्हापूर जिल्हा पुरोहित संघ, करवीर निवासिनी पुरोहित संघ, कुंभार समाज, राजू मर्दानी आखाडा, वन्दे मातरम युथ आर्गनायझेशन, संस्थान संस्था, हिंदू जनजागृती आदी संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारमध्ये मारामारी

$
0
0

कोल्हापूर: मिरजकर तिकटी येथील एका बारमध्ये बिल देण्याच्या कारणावरुन मारामारी झाली. यावेळी बिअरच्या बाटल्या फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास एका बारमध्ये चार व्यक्ती आल्या होत्या. त्यांनी बिअरची ऑर्डर दिली होती. त्यानंतर बिल देण्याच्या कारणावरुन मालक व चौघांत वाद झाला. दोघांनी बिअरच्या बाटल्या फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चौघेही तिथून निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीसाठी २० मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जमाफीसाठी नवीन निकष लावण्यात आले आहेत. यानुसार २००१ पासून २००९ पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांना २० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा दिली आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी थकीत कर्जदारांनी बँक निरीक्षक व डीओ यांना फॉर्म दाखवून जिल्हा बँकेच्यावतीने अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत वेळोवेळी निकषांमध्ये बदल केले आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदतही वाढवली आहे. कर्जमाफी योजनेमध्ये प्रथम २००९ ते २०१६ पर्यंतच्या थकीत व वेळेत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश केला होता. राज्यातील शेतकऱ्यांनी २००१ पासून जून २०१७ पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करत ऑन लाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. सुरुवातीस पाच मेपर्यंत अर्ज दाखल करण्याची सुविधा दिली होती. त्यानंतर यामध्ये आणखी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवला असल्याने आता ही मुदत २० मेपर्यंत निश्चित केली आहे.

त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्हा बँकेच्यावतीने सुविधा देण्यात आली आहे. थकीत कर्जदारांनी सेवा संस्थाच्या सचिवांकडून अर्ज भरून घेतल्यानंतर बँक निरीक्षक अथवा डीओ यांना दाखवूनच ऑनलाइन फॉर्म भरावेत, यासाठी जिल्हा बँकेत सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. राज्य सरकारने २००१ पासूनच्या थकीत कर्जदारांना लाभ देण्याचा निर्णय घेतलेला असला, तरी २००७ मध्ये अपात्र ठरलेल्या कर्जदारांना फॉर्म भरण्याचे स्पष्ट आदेश नसल्यामुळे अपात्र कर्जदारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अशा ४४ हजार खातेदारांचा समावेश आहे. त्यामुळे या कर्जदारांचे फॉर्म भरुन घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ११ हजार उमेदवारांची पूर्व परीक्षा

$
0
0

११ हजार उमेदवारांनी

दिली पूर्व परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षेला कोल्हापूर जिल्ह्यातील ११, ४६० उमेदवारांनी परीक्षा दिली. आयोमार्फत राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब अंतर्गत ही परीक्षा झाली असून शहरात ४१ केंद्रावर परीक्षा झाली. सामान्य प्रशासन विभागातील सहायक कक्ष अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, विक्री निरीक्षक या पदासाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली.परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना उमेदवारांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे ठशे घेतले.

एमपीएससीतर्फे विविध पदाच्या ४४९ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये सहायक कक्ष अधिकारीपदाच्या २८, विक्रीकर निरीक्षकच्या ३४ आणि पोलिस उपनिरीक्षकाच्या ३८७ जागांसाठी परीक्षा झाली. कोल्हापूर सकाळी ११ ते बारा या अशी परीक्षेची वेळ होती. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर ९.३० वाजता हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. कोल्हापूर शहरातील ४१ केंद्रावर बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा केंद्रात प्रवेश देताना उमेदवारांना दोन ओळखपत्र बंधनकारक केले होते. कोल्हापूर जिल्ह्यातून १२९६३ उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी ११४६० उमेदवारांनी परीक्षा दिली. १५०३ उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजोपाध्येनगरात चोरीचा प्रयत्न

$
0
0

राजोपाध्येनगरात चाहूल

लागताच चोरट्याचे पलायन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजोपाध्येनगर येथे शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घराचा कडी कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न झाला. घरमालक रात्री घरी परतल्याने चोरटे पळून गेले. पोलिसांना घराच्या परिसरात सापडलेला हायड्रोलिक कटर जप्त केला. बापूसाहेब विश्वंभर पेडणेकर (वय ६९, रा. राजोपाध्येनगर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पेडणेकर पत्नी, मुलगा, सून नातवंडासह राजोपाध्येनगर परिसरात राहतात. त्यांच्या सुनेच्या माहेरी कार्यक्रम असल्याने पेडणेकर कुटुंबीय शुक्रवारी ११ मे रोजी सकाळी सहा वाजता रायगड जिल्ह्यातील रोहा येथे कारने गेले होते. कार्यक्रम आटपून शनिवारी मध्यरात्री (१२)साडेबाराच्या सुमारास ते कोल्हापुरात आले. घराजवळ त्यांना मोकळ्या जागेत एक मोटारसायकल दिसली. ती बाजूला करून घराच्या मागील बाजूस त्यांनी कार पार्क केली. पेडणेकर कुटुंबीय घरी आले असता त्यांना घराचा कोयंडा तुटलेला दिसला. तसेच घरासमोर लावण्यात आलेल्या मोटार सायकलमधील पेट्रोल सांडलेले दिसले. पेडणेकर कुटुंबियांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस आल्यावर पेडणेकर कुटुबांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी बेडरुममधूल लोखंडी तिजोरी उघडून त्यातील साहित्य खोलीत विस्कटलेले दिसले. पण घरातील कोणतीच वस्तू चोरलेली नसल्याचे आढळले. पोलिसांनी घराच्या आसपास तपास केला असता एक हायड्रोलिक कटर सापडला आहे. पोलिस मोटार सायकलचा क्रमांक व हायड्रोलिक कटरद्वारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमासाहेबांचा पराक्रम अभ्यासक्रमात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील प्रमुख सेनानी क्रांतीवीर चिमासाहेबांचे कार्य जनतेपर्यंत पोहचावे यासाठी त्यांच्या पराक्रमाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी तातडीने चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सीपीआर चौकातील क्रांतीवीर चिमासाहेब स्मृती उद्यानाच्या सुशोभिकरण आणि चिमासाहेब महाराजांच्या सुशोभित पुतळ्यास अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव प्रमुख उपस्थित होते.

उद्यानाचे सुशोभिकरण कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे. कोल्हापूर रस्तेसौंदर्यीकरण प्रकल्प, क्रांतीवीर छत्रपती चिमासाहेब महाराज सांस्कृतिक मंडळ, सिटीझन फोरम, अकबर मोहल्ला सामाजिक सांस्कृतिक मंडळ यांच्यावतीने आयोजित क्रांती उद्यानाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, 'चिमासाहेबांचा पराक्रम भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्णपान आहे. त्यामुळे त्यांचा दुर्लक्षित इतिहास जनतेपुढे गेला पाहिजे, यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असेल. शहरातील अनेक ठिकाणांचा इतिहास रोमांचकारी आहे. ही ठिकाणे आठ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना माहिती व्हावीत यासाठी डिसेंबर महिन्यात सहलींचे आयोजन करू. शहरातील सर्व चौक, उद्याने, कॉलनीतील उद्याने सुशोभित व्हावीत या साठी प्रयत्न केले जात आहेत. राजकारण बाजूला ठेऊन सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थांनी एकत्रित पुढाकार घेण्याची गरज आहे.'

प्रसाद जाधव यांनी प्रास्ताविकात चिमासाहेबांचा पराक्रमाचे चिरंतन स्मारक होण्यासाठी जुना राजवाडा परिसर राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी केली. वैभवराज राजे भोसले यांनी स्वागत केले.

यावेळी सूर्यराज राजेभोसले, नगरसेवक विजय खाडे, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, माजी अध्यक्ष अॅड संपतराव पवार, माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवार पेठेत कडक बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

युवतीच्या छेडछाडप्रकरणी सोमवार पेठेत दोन गट आमने-सामने आल्याने मोठी वादावादी झाली. पोलिसांनी या परिसरात कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, पोलिसांच्या दोन व्हॅन परिसरात सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

सोमवार पेठेत युवतीच्या छेडछाड प्रकरणामुळे दोन गटांत वाद धुमसत आहे. यासंदर्भात युवतीने गेल्या आठवड्यात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदविली आहे. याबबात रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक गट जाब विचारण्यासाठी देशभूषण हायस्कूलजवळ आला. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्याने वादावादी झाली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती कळताच लक्ष्मीपुरी पोलिस घटनास्थळी आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवले. परिसरात कोणताही तणाव होऊ यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला. किरकोळ कारणावरून औरंगाबाद येथे दंगल घडली होती. औरंगाबादच्या पार्श्वभूमीवर देशभूषण हायस्कूल चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याची चर्चा सोमवार पेठेत सुरू होती.

यासंदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता परिसरात कोणताही जातीय वा धर्मीय तणाव झाला नाही. युवतीच्या छेडछाडीतून दोन गटांत गेले काही दिवस परिसरात तणाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही गटांना पोलिसांनी कडक समज दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुजारी तातडीने नियुक्त करा

$
0
0

डॉ. सुभाष देसाई यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नवरात्रीत करवीर निवासिनी अंबाबाई देवीला भाविकांकडून अर्पण झालेल्या साड्या गरीब व सफाई विभागातील महिला कर्मचाऱ्यांना वितरीत कराव्यात. तसेच तेलाचे डबे अनाथाश्रम व वृद्धाश्रमांना मोफत वाटप झाले पाहिजे. सरकारने तातडीने सरकारी पुजारी नियुक्ती करून कोर्टाचा अवमान टाळावा,' असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. 'पुजारी आणि समितीतील वादामुळे न्यायप्रविष्ठ बनलेली दानपेटीतील ५५ कोटी रुपयांची रक्कम अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी खर्ची केल्यास अनेक विकास कामे मार्गी लागतील.'असेही ते म्हणाले.

जिजाऊ ब्रिगेडतर्फे महिला रोजगार मार्गदर्शन व प्रेरणा पुरस्कार प्रदान कार्यक्रम असा संयुक्त समारंभात रविवारी ते बोलत होते. यावेळी डॉ. देसाई, शाहीर आत्माराम पाटील पुरस्कारप्राप्त बालशाहीर तृप्ती दिलीप सावंत यांचा मानचिन्ह, शाल, श्रीफळ व कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार झाला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटातील महिलांना प्रेरणा पुरस्कारांनी सन्मानित केले. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे कार्यक्रम झाला. डॉ. विलास पोवार अध्यक्षस्थानी होते.

डॉ. देसाई म्हणाले, 'मंदिरातील पुजारी हटाओ आंदोलनात जिजाऊ ब्रिगेडसह अन्य संस्था, संघटनांनी आंदोलनाची व्याप्ती वाढवली. त्यामुळे चळवळीची धार वाढली. खऱ्या अर्थाने फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा हा विजय आहे. मी आंदोलनातील एक कार्यकर्ता आहे. मंदिरातील परंपरागत पुजारी हटत नाहीत तोपर्यंत देवीचे दर्शन घेणार नाही. सरकारने प्रतिकूल परिस्थितीत कायदा केला. सरकारने, अंबाबाई मंदिरात पगारी पुजाऱ्यांची नियुक्ती तत्काळ करावी, अन्यथा तो कोर्टाचा अवमान ठरेल. मंदिरासाठी स्थापन होणारे नवीन विश्वस्त मंडळ हे नागरिकांच्या मागणीनुसार चालणारे असावे. मुख्यमंत्री आणि मंत्र्याच्या आदेशानुसार विश्वस्त मंडळाचा कामकाज होऊ नये.'

जिजाऊ ब्रिगेडच्या सुनंदा चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. वैशाली जाधव यांनी स्वागत तर मीना नलवडे यांनी आभार मानले. याप्रसंगी नगरसेविका शोभा बोंद्रे, पंडित पोवार, दिलीप कदम, डॉ. राजीव चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ. जयश्री चव्हाण, सुवर्णलता गोविलकर, अॅड. अजित चव्हाण, विकास जाधव आदी उपस्थित होते.

............

महिला बचत गटांचा सन्मान

गेली दहा ते पंधरा वर्षे यशस्वीरित्या महिला बचत गट चालविणाऱ्या गट प्रमुखांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विद्या चौगले, उमा वागरे, मनीषा नलवडे, दीपाली माने, अंजली चौगले, सरिता जाधव, गीता जाधव, शंकुतला पवार आदींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्योग विकास शिबिराच्या समन्वयिका मृणाल जयंत सावंत-पाटील यांनी महिला व उद्योग व्यापाराची कौशल्ये या अनुषंगाने मार्गदर्शन केले. व्यापार व्यवसायासाठी नवनवीन नवनव्या कल्पनांचा अवलंब करा. कौशल्ये आत्मसात करुन उद्योग व्यवसाय वाढवावा.' असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन वाशी नाका परिसरात घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन वाशी नाका परिसरात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवार (ता. १२) ते सोमवार (ता. १४) या दरम्यान चोरीचा प्रकार घडला. याबाबत मारुती पांडुरंग जाधव (वय ६०, रा. अमर विकास सहकारी गृहनिर्माण विकास संस्था, नवीन वाशी नाका) यांनी करवीर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती जाधव हे नवीन वाशी नाका परिसरातील घरात कुटुंबासह राहतात. त्यांचे धामोड (ता. राधानगरी) हे मूळ गाव असून शनिवारी सकाळी कुटुंबासह ते गावाकडील नवीन घराच्या वास्तुशांतीसाठी गेले होते. सोमवारी सकाळी परत आले असता घराचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांना बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. चोरीच्या संशयावरून त्यांनी कपाटातील वस्तूंची पाहणी केली. यावेळी सोन्याच्या दोन चेन, कानातील सोन्याचे वेल, रिंगा असा ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले. याशिवाय चोरट्यांनी बँकांचे पासबुक आणि एटीएम कार्डही लांबवले. जाधव यांनी तातडीने या घटनेची माहिती करवीर पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. करवीर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुटीमुळे शहरासह उपनगरांमधील लोक बाहेरगावी गेल्याने अनेक घरे बंद आहेत. या बंद घरांमध्ये चोऱ्या होण्याचा धोका असल्याने पोलिसांनी रात्रीच्या वेळेत गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिस्थितीवर मात करत स्वावलंबी बना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अचानक आलेल्या परिस्थितीमुळे शारीरिक, मानसिक वेदना होऊ शकतात. मात्र खचून न जाता आलेल्या परिस्थितीवर मात करून स्वावलंबी बना,' असा सल्ला चेतना विकास मंदिराचे पवन खेबुडकर यांनी दिला. पिराचीवाडी येथील सावली केअर सेंटरमध्ये आयोजित शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर होते.

खेबुडकर म्हणाले, 'परावलंबित्व आलेल्या व्यक्तींच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी निवासी स्वावलंबन शिबिर प्रेरणादायी आहे. समाज आणि कुटुंबाने बेदखल केलेल्या रूग्णांची या ठिकाणी मायेने सेवा केली जात आहे. चेतना मंदिरातही विद्यार्थ्यांना स्वावलंबानाचे धडे दिले जात आहेत.' हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्डचे पी. डी. देशपांडे म्हणाले की, प्रत्येकाला जगण्याची इच्छा असते. मात्र अनेकदा परिस्थितीमुळे माणूस खचतो. मात्र सावली केअर सेंटरच्या स्वावलंबी शिबिरात अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

शिपूरकर म्हणाले, 'अंथरूणाला खिळलेले रूग्ण पुन्हा निरोगी जीवन जगू शकतात. समाजात अनेक अपप्रवृत्ती असतात. कुटुंबातील कलह, शारीरिक, मानसिक व्याधीमुळे माणूस निराश होतो. संस्थेच्या स्वावलंबी प्रकल्पातून जगण्याला निश्चितच बळ मिळेल. '

प्रकल्प संचालक किशोर देशपांडे यांनी दैनंदिन वैयक्तिक गोष्टीसाठी कायमचे अपंगत्व आलेली व्यक्ती स्वयंपूर्ण केली जाणार आहे. पॅरॉप्लेजिक, मल्टीपल स्क्लिरोसिस, मस्क्युलर डिस्ट्रॉपी, हेमिप्लेजिक, सेरेब्रल प्लासी, स्पायनल मिलीटस या सहा प्रकारची निवड स्वावलंबी शिबिरात केली आहे. सावली केअर सेंटर गेली १४ वर्षे परावलंबित्व आलेल्या रूग्णांच्या सुश्रुषेचे काम अविरतपणे करीत असल्याचे सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते गुलाबफूल देऊन सावली केअर सेंटरमधील रुग्णांचे स्वागत करण्यात आले. सेंटरचे उपाध्यक्ष शिवपाल बनसोडे, मनीष देसाई, ओंकार कुलकर्णी, दीपक देवलापूरकर, स्वरूपा कोरगांवकर, महावीर कागले, डॉ. मनीषा राजेभोसले आदी उपस्थित होते. सोनाली नवांगुळ यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मनिरपेक्ष तत्वांचे अनुकरण आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजकीय लोकांच्या द्वेषाच्या राजकारणामुळे धार्मिक दंगलींना उत्तेजन देत युवकांना एकमेकांविरोध लढवले जात आहे. यातून युवा पिढीचे नुकसान होत असून युवकांनी स्वत:ला व देशाला वाचविण्यासाठी भगतसिंग व भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष तत्वांचे अनुकरण करावे असे, प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. शहीद भगतसिंग यूथ स्टुडंटसच्यावतीने पन्हाळा येथील तीन दिवसीय निवासी फेस्टिवलमध्ये बोलत होते.

ऑल इंडिया यूथ फेडरेशन व स्टुडंट फेडरेशनने आयोजित केलेल्या फेस्टिवलला नगराध्यक्ष रुपाली धडेल व पल्लवी कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जेएनयुचे येथील डॉ. एस. एन. मालाकर म्हणाले, 'देशाला युवकांच्या बलिदानाची आवश्यकता आहे. भगतसिंह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी त्याग करायला पाहिजे. यासाठी युवकांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतल्याशिवाय देशात समता येवू शकणार नाही.' डॉ. मिलिंद आव्हाड म्हणाले, 'देशात फॅसिस्ट शक्तींचा उदय होत असून लोकशाही मानणाऱ्या दलित, महिला, अल्पसंख्याक, आदिवासी यांनी एकत्र येवून चळवळ उभारण्याची गरज आहे. लोकसमूह पुरोगामी व वैज्ञानिक विचाराचा असतो. त्याला संस्कृती, धर्म व राजकारणाच्या नावाखाली प्रतिगामी बनवले जात असल्याची खंत व्यक्त केली.'

डॉ. हरिश वानखेडे म्हणाले, 'राजकीय विचारधारा या सामाजिक न्यायाला डावलू शकत नाहीत. भारतीय स्वातंत्र्य चळवळींमध्ये डॉ. आंबेडकरांनी सामाजिक न्यायाचा आग्रह धरुन संघर्ष केला. याचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत उमटले आहे. पण राज्यघटनाच अंमलात आणली जात नसल्यामुळे सामाजिक न्याय व लोकशाहीपासून वंचित राहत आहेत. त्यासाठी पुढील काळात सामाजिक न्यायाची लढाई महत्त्वाची ठरणार आहे.' अनमोल कोठाडिया म्हणाले, 'चित्रपट हे समाज परिवर्तनाचे माध्यम बनू शकते. पण पॉप्युलर सिनेमा व मसाला सिनेमाच्या अतिरंजक जगातून अलिप्त राहून वास्तव सिनेमा तसेच प्रायोगिक व कलात्मक सिनेमाद्वारे समाजातील गंभीर विषयावर चित्रपट निर्मिती करुन समस्येवर प्रहार करण्याची आवश्यकता आहे.'

फेस्टिवलमध्ये कला, सांस्कृतिक कार्यक्रमांनी युवकांनी मंत्रमुग्ध केले. फेस्टिवलला आसिफ मोकाशी, मंदा गायकवाड, तहसिलदार रामचंद्र चौबे यांचे सहकार्य लाभले. प्रशांत आंबी, गिरीष फोंडे, अमोल पांढरे, संतोष आंबेकर, शिवप्रसाद शेवाळे, उमर जमादार, अजय शिंदे, दिलदार मुजावर, आरती रेडेकर, धीरज कठारे, कृष्णा पानसे आदीनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना सापडेनात गांजाविक्रेते

$
0
0

पोलिसांना सापडेनात गांजाविक्रेते

ओढणाऱ्या ३९ जणांवर कारवाई; विक्रेते मोकाटच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांजासह अंमली पादार्थांची राजरोस विक्री सुरू असल्याने तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत आहे. गेल्या अडीच महिन्यात पोलिसांनी गांजा ओढणाऱ्या ३९ जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यांच्याकडील गांजाही पोलिसांनी जप्त केला. या कारवाईनंतर गांजा विक्रेत्यांपर्यंत पोलिस पोहोचतील असे वाटत होते, मात्र अडीच महिन्यात एकही गांजा विक्रेता पोलिसांच्या हाती लागला नाही. गांजा विक्रीच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश येत नसल्याने विक्रेते मोकाट आहेत.

शहरासह जिल्ह्यात रोज लाखो रुपयांच्या गांजाची विक्री होते. इतर अंमली पदार्थांच्या तुलनेत गांजाची सहज उपलब्धता असल्याने तरुणाईला गांजाच्या नशेची चटक लागली आहे. शहरात आठ ते दहा विक्रेते रोज गांजाची विक्री करतात. पोलिसांकडून झालेल्या दुर्लक्षामुळे गांजा विक्रेत्यांनी थेट सार्वजनिक ठिकाणीही खुलेआम विक्री सुरू केली. 'महाराष्ट्र टाइम्स'ने गांजा विक्रीची वस्तुस्थिती मांडल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात गांजा ओढणाऱ्या २८ जणांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर गेल्या अडीच महिन्यांत ३९ जणांवर कारवाई केली. गांजा ओढणारे पोलिसांच्या हाती लागले, मात्र गांजा विकणारे का सापडत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

गांजाची नशा करणाऱ्या तरुणांच्या चौकशीतून विक्रेत्यांची नावे पोलिसांना मिळणे अवघड नाही. गांजा विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याची मानसिकता असेल तर, पोलिसांसाठी हे केवळ चार दिवसांचे काम आहे. थेट विक्रेत्यांना ताब्यात घेऊन जिल्ह्यात गांजा पुरवणाऱ्या तस्करांपर्यंत पोहोचता येते. तस्करांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यास गांजा विक्री रोखणे शक्य होणार आहे. विक्रेत्यांना पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात केवळ गांजा ओढणाऱ्यांनाच पोलिसांनी लक्ष करून विक्रेत्यांना मोकाट सोडल्याची स्थिती सध्या तरी दिसत आहे. अडीच महिन्यांत एकही विक्रेता सापडत नसल्याने ही शंका बळावली आहे. पोलिसांनी केवळ दिखाऊ कारवाई केल्यास गांजा विक्रीचे रॅकेट कधीच थांबणार नाही. परिणामी गांजातस्कर आणि विक्रेत्यांचे फावणार आहे. गांजा विक्रेत्यांना अभय देण्यापेक्षा त्यांच्यावर कायद्याची दहशत निर्माण करून पोलिसांनी तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून वेळीच रोखण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा कोल्हापूरचा 'उडता पंजाब' होण्यास वेळ लागणार नाही हे नक्की.

०००

तरुणाईला गांजाचा विळखा

शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने शहरातील छापेमारी करून गांजा ओढणाऱ्या ३९ संशयितांना पकडले. यातील बहुतांश २० ते ३० या वयोगटातील तरुण आहेत. आकर्षण आणि तात्पुरती मौज करण्याच्या हेतून याची सुरुवात होते. मात्र, हे थांब‌णे हाताबाहेर जाते. नशेच्या आहारी गेलेले अनेक तरुण यातून बाहेर पडण्यासाठी व्यसनमुक्ती उपचार केंद्रांचा आधार घेत आहेत. तरुणाईला या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी थेट गांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

००००

३९ जणांवर कारवाई

गेल्या आठवड्यात २८ तरुण ताब्यात

नशा करणारे बहुतांश तरुण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारपासून अॅडव्हेंचर कॅम्प

$
0
0

कोल्हापूर: दि कोल्हापूर अॅडव्हेंचर अँड माउंटेनिअरिंग फाउंडेशनमार्फत कॅसल रॉक अॅडव्हेंचर कॅम्पचे आयोजन केले आहे. १८ ते २१ मे दरम्यान हा कॅम्प होणार आहे. कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमांवर काली नदीच्या किनारी आणि घनदाट जंगलातील कॅम्पचा अनोखा अनुभव यातून मिळणार आहे. कोल्हापूरपासून २०० किलोमीटर अंतरावरील हा परिसर दांडेलीचे जंगल म्हणूनही ओळखला जातो. टायगर रिसॉर्ट म्हणून याची ख्याती असल्याने वाघ, बिबटे, हत्ती, अस्वल या प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास या परिसरात आहे. दोनशेहून जास्त प्रकारचे पक्षी, शेकरू, हरीण, आदी प्राणीही या जंगलात पाहायला मिळतात. दुर्मिळ फुलपाखरांचे हमखास दर्शन घडते, याशिवाय विविध प्रकारच्या वनस्पतींचीही माहिती मिळते. या कॅम्पमध्ये ट्रेकिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, रायफल शुटिंग, नाईट ट्रेक यांचा समावेश आहे. कॅम्पमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी विनोद कांबोज आणि ऋषिकेश केसकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॅपटॉपची चोरी

$
0
0

लॅपटॉपची चोरी

कोल्हापूर

जयराम ट्रान्सपोर्टच्या टेम्पोतून लॅपटॉपची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. २४ एप्रिल रोजी हा प्रकार घडला असून, शोध घेऊनही लॅपटॉप सापडत नसल्याने ट्रान्सपोर्ट कंपनीचे मॅनेजर प्रशांत बाळासो सावंत (वय ३८, रा. शिवाजी गल्ली, कळंबा) यांनी ही फिर्याद दिली आहे. २४ एप्रिलच्या रात्री साडेअकराच्या सुमारास ट्रान्सपोर्ट कंपनीचा टेम्पो (एम. एच. १० झेड ६६८) पुण्यातून कोल्हापुरातील कार्यालयासमोर आला. मॅनेजर सावंत यांनी टेम्पोचालक आणि हमालासह सर्व वस्तूंची पडताळणी केली. दुसऱ्या दिवशी वस्तूंचे वितरण करताना २४ हजार रुपये किंमतीचा एक लॅपटॉप कमी असल्याचे लक्षात आले. शोध घेऊनही लॅपटॉप न सापडल्याने अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंगल पट्टा - १५

$
0
0

पोलिस डायरी .. . लोगो

......................

अज्ञात वाहनाच्या

धडकेत तरुण ठार

कोल्हापूर

सांगली-कोल्हापूर मार्गावर हातकणंगलेजवळ सायकलवरून जाणाऱ्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. संभाजी नारायण पाटील (वय ३१, रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळी बेशुद्ध अवस्‍थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

...............

शेतकऱ्याची आत्महत्या

कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिनकर कृष्णा पवार (वय ७०, रा. वाघवे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळी त्यांनी घरामागील परड्यात उंबराच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्यांना नातेवाईकांनी तातडीने बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पवार हे गेल्या दोन महिन्यांपासू आजारी होते. त्यांच्यावर सोसायटीचे ३५ हजार रुपयांचे कर्ज असल्याने ते अस्वस्थ होते.

......................

फोटो

सिलिंग फॅन काढताना

पडल्याने मृत्यू

कोल्हापूर

घरातील सिलिंग फॅन काढताना स्टूल घसरल्याने डोक्यावर पडून प्रकाश लक्ष्मण सोळंकी (वय ४८, रा. रेणुका कॉलनी, पाचगाव) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. १५) संध्याकाळी हा प्रकार घडला. सोळंकी यांना तातडीने बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सोळंकी हे महानगरपालिकेत नोकरीस होते. घरातील सिलिंग फॅन दुरुस्तीसाठी ते स्टूलवर उभे राहून फॅन काढत होते. अचानक स्टूल घसरल्याने ते फरशीवर कोसळले. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

...................

लोखंडी रॉडने मारहाण

कोल्हापूर

लहान मुलांच्या वादानंतर पालकांमध्ये झालेल्या मारामारीत लोखंडी रॉड डोक्यात लागल्याने एकजण जखमी झाला. अनिल श्रीपती मस्कर (वय ३८, रा. शिंगणापूर, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. शिंगणापूर येथे मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. मस्कर यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. दोन ते तीन जणांनी मारहाण केल्याचे मस्कर यांनी पोलिसांना सांगितले.

........

जखमीचा मृत्यू

कोल्हापूर

कसबा बावडा येथे कारच्या धडकेत जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मंगळवारी (ता. १५) उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. दत्तात्रय मारुती पाटील (वय ५८, रा. हनुमाननगर, शिये) असे मृताचे नाव आहे.

........................

अन्नातून विषबाधा

कोल्हापूर

पाल पडलेली आमटी खल्ल्याने महिलेस विषबाधा झाली. अर्चना उत्तम बिडकर (वय ४०, रा. नागाव, ता. हातकणंगले) असे अत्यवस्थ महिलेचे नाव असून, त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळी हा प्रकार घडला. आमटीत पाल पडल्याची माहिती त्यांना नव्हती. जेवणानंतर उलट्यांचा त्रास सुरू होताच, आमटीचे भांडे तपासले असता, त्यात पाल पडल्याचे लक्षात आले.

.................

जेसीबीच्या धडकेत महिला जखमी

कोल्हापूर

सरनोबतवाडीकडून उचगावकडे चालत निघालेल्या महिलेस जेसीबीने धडक दिल्याने महिला जखमी झाली. रंजना अशोक लोहार (वय ५०, रा. उचगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. जेसीबीने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने त्या जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईप्रसादच्या मृत्यूने मित्रांना धक्का

$
0
0

सख्ख्या भावंडांच्या मृत्यूने मित्रांना धक्का

मुंबईतील अपघाताने कलानिकेतनसह गारगोटीतील इंजिनीअरिंग कॉलेजवर शोककळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबईत बोरीवली-कांदीवली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात चौघा भावांचा मृत्यू झाला. यातील साईप्रसाद आणि दत्तप्रसाद चव्हाण हे दोघे सख्खे भाऊ कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण घेत होते. चव्हाण बंधूंच्या अपघाती मृत्यूने कोल्हापुरातील कलानिकेतन कॉलेजसह गारगोटीतील आयसीआरए कॉलेजमध्ये शोककळा पसरली आहे.

मुंबई पाहण्यासाठी गेल्यानंतर रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात सागर संपत चव्हाण (वय २३), मनोज दीपक चव्हाण (१७), साईप्रसाद मनोहर चव्हाण (१७) आणि दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (२०) या चौघांचा मृत्यू झाला. यातील साईप्रसाद आणि दत्तप्रसाद हे दोघे सख्खे भाऊ कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण घेत होते. यातील दत्तप्रसाद हा गारगोटी येथील आयसीआर कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनीरिंगचे शिक्षण घेत होता, तर साईप्रसाद हा कोल्हापुरातील कलानिकेतन कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होता. या दोघांचाही कॉलेजमध्ये मोठा मित्रपरिवार असल्याने त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच मित्रांना धक्का बसला. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाट येथील असून, सुट्या सुरू असल्याने मुंबईतील चुलतभाऊ सागरच्या घरी गेले होते. सोमवारी पहाटे ते दादरला पोहोचले. यानंतर ते दादरहून बोरीवलीला गेले. पोईसर-कांदीवलीदरम्यान सिग्नलजवळ ते रेल्वेतून खाली उतरले. यावेळी रेल्वे रूळ ओलांडताना लोकलने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

साईप्रसाद हा भाड्याने खोली घेऊन मित्रांसोबत राहत होता, तर दत्तप्रसाद हा गारगोटीत मित्रांसोबत राहत होता. एकाचवेळी दोघा सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच मित्रांना आणि शिक्षकांना धक्का बसला. या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉकटाइम- सुरेश चौगुले, अध्यक्ष, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन, कोल्हापूर विभाग

$
0
0

दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेनच्या कोल्हापूर विभागाच्या अध्यक्षपदी सुरेश चौगुले यांची नुकतीच निवड झाली. 'जर्नी टू स्मार्ट फाउंड्री' असे या वर्षाचे ब्रीदवाक्य असून कोल्हापूर फाऊंड्री उद्योगाचा लूक बदलला जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अध्यक्ष निवडीनंतर सचिन यादव यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद...

००

फाउंड्री उद्योगाचा लूक बदलेल

नवीन संकल्प काय आहेत ?

फाउंड्री उद्योगाचा लूक बदलला जाणार आहे. या वर्षी संस्थेचे 'जर्नी टू स्मार्ट फाउंड्री' असे ब्रीदवाक्य आहे. उत्पादकता, गुणवत्ता अधिक वाढविली जाणार आहे. ग्रीन फाउंड्रीचा संकल्प आहे. सध्या फाउंड्री उद्योग म्हटले की, धूळ आणि कोंदट वातावरण असे समजले जाते. मात्र हे चित्र बहुतांशी फाउंड्री उद्योगात दूर झाले आहे. नवीन पिढी या उद्योगाकडे वळण्यासाठी नवे तंत्रज्ञान आणि फाऊंड्रीमधील भौतिक सुविधा हायटेक केल्या जाणार आहेत. पर्यावरणपूरक हा उद्योग केला जाणार आहे. फाउंड्रीमेनच्या सदस्यांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे. नव्या तंत्रज्ञानाची माहितीसाठी देशभरातील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. त्यासह स्टोन क्रशरकडून वापरल्या जाणाऱ्या वाळूचा पुनर्वापर केला जाणार आहे. भविष्यात बांधकामासाठी वाळूचा वापर कसा करता येईल, त्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

००

उद्योग क्षेत्राच्या काय मागण्या आहेत?

अन्य राज्यात स्वस्त दरात वीज आणि उद्योगांना जमीन दिली जाते. त्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दिली जात नाही. ही स्वस्त दिल्यास उत्पादनाची किंमत कमी होऊ शकेल. त्यासह खासगी वीज विकत घेण्याची परवानगी देऊन त्यावरील अतिरिक्त कर माफ करावा. पूर्वी व्हॅटमधून मिळत असलेली भांडवली मूल्यावरील सबसिडी अपेक्षित आहे. कामगारांचे कायदेही सुलभ करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने वस्त्रोद्योग, चर्मोद्योग क्लस्टरप्रमाणेच फाउंड्री उद्योगाचा क्लस्टर म्हणून विचार करावा. मोठ्या उद्योगात रोजगारनिर्मिती होत आहे. त्यानुसार फाउंड्री उद्योगालाही सवलती देण्याची गरज आहे. फाउंड्री उद्योगाचा परकीय चलनात मोठा वाटा आहे. चीनसोबत स्पर्धा करण्यासाठी निर्यातीला अधिक सवलती आणि सबसिडी देण्याची गरज आहे. वीस वर्षानंतर वाहने स्क्रॅप करण्याच्या धोरणाची सरकारने अंमलबजावणी केल्यास कास्टिंग वाढू शकेल.

०००

कुशल मनुष्यबळासाठी काय उपाययोजना आहेत ?

फाउंड्री उद्योगाला प्रशिक्षित कामगार मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कास्टिंग आणि मशिनिंगसाठी परराज्यातील कामगार मिळतात. मात्र स्थानिक प्रशिक्षित कामगार मिळत नाहीत. त्यासाठी गर्व्हमेंट पॉलिटेक्निक आणि आयआएफतर्फे पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. फाउंड्री उद्योगात कार्यरत असलेल्या सुपरवायझरसाठी 'ग्रॅंड आयआयएफ' ही योजना आहे. या अभ्यासक्रमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार गुणवत्ता ठेवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. उत्पादनाचा टक्का वाढण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मिळते. त्याचा मोठा फायदा उद्योगाला होत आहे. त्यासह आयआयएफने या अभ्यासक्रमाचे धडे घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली आहे. सुमारे बारा विद्यार्थी उद्योगात अग्रेसरपणे कार्यरत आहेत.

००

निर्यातीचे काय धोरण आहे ?

कोल्हापूर, सांगली, मिरजसह कोल्हापूर विभागात एकूण ३७५ फाउंड्री आहे. या उद्योगातून महिन्याला ६० हजार टन कास्टिंग केले जाते. या उद्योगास सुमारे ७० हजार कामगार कार्यरत आहेत. कोल्हापूर, गुजरातमधील अहमदाबाद, राजकोट या ठिकाणी फाउंड्री उद्योग आहे. पैकी कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात पिग आयर्न आणि स्टील स्क्रॅपमधून मोठ्या प्रमाणात कास्टिंग होत आहे. या कास्टिंगला अमेरिका, जर्मनी, ब्राझीलसह आदी ठिकाणी निर्यात केले जाते. ही निर्यात सुमारे एक लाख टन आहे. त्याचा टक्का आणखीन वाढविला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलाच्या बांधकामाची हालचाल नाही

$
0
0

आंबेवाडीच्या बाजूने होणार

पर्यायी पुलाच्या कामास सुरूवात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यायी पुलाचे काम तात्काळ सुरु करावे आणि ते सहा महिन्यात पूर्ण व्हावे, अशी अट ठेकेदारास घातली असताना मंगळवारी पर्यायी पुलाच्या बांधकाम ठिकाणी कोणीच फिरकले नसल्याचे चित्र पहायला मिळाले. दरम्यान, पुलाच्या बांधकामास वर्क ऑर्डर देऊन चालना दिल्याबद्दल शहर व जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांचे अभिनंदन केले.

शिवाजी पुलाला असलेल्या पर्यायी पुलाचे बांधकाम त्वरीत सुरु करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने गोवा पणजी येथील आसमास कन्स्ट्रक्श्नला वर्क ऑर्डर दिली आहे. तीन कोटी पाच लाख ३४ हजार ४५५ रुपये निधी पुलासाठी खर्च होणार असून ठेकेदाराला सहा महिन्यात काम करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच ठेकेदाराला आंबेवाडीच्या बाजूने काम सुरु करण्याचे तत्काळ आदेश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर कोल्हापूरकडील बाजूच्या कामास सुरुवात करण्याची सूचना केली आहे.

पुलाचे काम तत्काळ सुरु करण्याचे आदेश दिल्याने मंगळवारी प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याचे संकेत मिळाले होते. पण प्रत्यक्षात पर्यायी पुलाच्या ठिकाणी मंगळवारी कोणीच फिरकले नाही. ठेकेदाराला वर्क ऑर्डर मिळाली असली तरी कामाचे नियोजन व आराखडा करण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा अवधी लागू शकतो, असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पावसाळा तोंडावर आल्याने तीन आठवड्यात पुलाच्या बांधकाम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पोलिस अधीक्षक मोहिते यांचा कृती समितीने भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी निमंत्रक आर.के. पोवार, वसंतराव मुळीक, अशोकराव भंडारी, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर यांनी भाषणे केली. यावेळी पोलिस अधीक्षक मोहिते म्हणाले, 'कोल्हापूरकरांच्या भावना सरकारला पोचवल्याने कामाला गती आली आहे. या प्रक्रियेत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा सहभाग महत्वाचा होता. ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिल्याने लवकरच काम सुरु होईल. तसेच कोल्हापूरच्या बाजूने बांधकाम सुरु होण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.' यावेळी अॅड पंडीतराव सडोलीकर, अशोक पोवार, रमेश मोरे, दिलीप माने, अॅड चारुलता चव्हाण, माई वाडेकर, संभाजीराज जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल, यात्री निवास कारवाईच्या बाहेर

$
0
0

महापालिकेचा लोगो वापरावा...

................

हॉटेल, यात्री निवास कारवाईच्या बाहेर

आजअखेर २७५ अनधिकृत कनेक्शन खंडीत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शनच्या विरोधात मोहीम सुरु केली. पाणी पुरवठा विभागाच्या पाच पथकांनी विविध भागात आजअखेर २७५ अनधिकृत नळ कनेक्शन बंद केले. मात्र शहरातील विविध भागातील हॉटेल, यात्री निवास, मंगल कार्यालये, हॉस्पिटलमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन असल्याच्या तक्रारी असताना या घटकांवर मात्र अद्याप कारवाई झालेली नाही.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या घटकांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. रोज जवळपास ५० एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचे सामोरे आले आहे. यामुळे महापालिकेचे महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शिवाय दैनंदिन पाणी पुरवठ्यावरही परिणाम होत आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाच पथके स्थापून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हे करुन अनधिकृत नळ कनेक्शनचा शोध घेत आहेत. शहरातील विविध प्रभागासह झोपडपट्टी परिसरात मोहीम राबवली.

मात्र या कारवाईच्या कक्षेत अद्याप हॉटेल, मंगल कार्यालये, यात्री निवास, हॉस्पिटल सापडली नाहीत. शहरात अनेक ठिकाणी या घटकांकडून अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्याच्या तक्रारी आहेत. अधिकृत एक कनेक्शन आणि अनधिकृतपणे अनेक कनेक्शन जोडून राजरोसपणे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. त्यांच्या विरोधात पाणी पुरवठा मोहीम कधी राबविणार अशी विचारणा आता नगरसेवकच करत आहेत.

..........

आजअखेर ३४ कनेक्शन बंद

पाणी पुरवठा विभागाची अनधिकृत नळ कनेक्शनच्या विरोधातील मोहीम मंगळवारी चालू राहिली. यादवनगर, उद्यमनगर, कसबा बावडा, मातंग वसाहत, दत्त मंदिर, शिवाजी पेठ, फिरंगाई गल्ली,न्यू कॉलेज परिसर, हैदरगल्ली, कोंडेकर गल्ली, वेताळ माळ परिसर, साळोखे पार्क, राजेंद्रनगर, जवाहरनगर, जगद्गुरु शंकराचार्य मठाजवळील परिसर, पंचगंगा तालीम परिसर, भुई गल्ली, भुईगल्ली, पंचगंगा रोड, खोलखंडोबा परिसरात कारवाई झाली. दिवसभरात ३४ नळ कनेक्शन खंडीत केली. जल अभियंता सुरेश कुलकर्णी, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या नियंत्रणाखाली पथक प्रमुख मोहन जाधव, के. टी. पाटील, संजय पाटील, भिकू कांबळे, रणजित संकपाळ, अमर बागल, पी.एस. पाटील, उदय पाटील यांनी कारवाई केली.

......................

गुन्हे दाखल करण्याबाबत कायदेशीर सल्ला

अनधिकृत नळ कनेक्शन प्रकरणी संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे प्रस्तावित आहे. महापालिका प्रशासनाने या संदर्भात कायदेशीर सल्ला मागितला आहे. बेकायदेशीरित्या नळ कनेक्शन जोडून पाणी चोरीच्या मुद्यावरुन गुन्हा दाखल होऊ शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. कायदेशीर मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images