Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आज ध्वजवंदन

$
0
0

महाराष्ट्र दिनानिमित्त

आज ध्वजवंदन

कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य सोहळा मंगळवारी (ता.१) सकाळी आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, सर्व खातेप्रमुख आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोक्का कारवाई

$
0
0

मोक्का अंतर्गत कारवाईतील

पाच आरोपींच्या घराची झडती

सेनापती कापशीसह अर्जुनवाडा,कासारीत पोलिसांचा तपास

म. टा. वृत्तसेवा, कागल

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत असलेल्या मुरगूड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सेनापती कापशी, कासारी, अर्जुनवाडा आदी गावांतील पाच आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली. तर परिसरात जाऊन आरोपींच्या वर्तनाची गोपनीय माहिती दोन दिवसांपूर्वी पोलिस दिवसभर घेत होते. इचलकरंजीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक नरळे यांच्यासह मुरगूड सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश हांडे व त्यांच्या पथकाने कसून तपास सुरु केला आहे.

सेनापती कापशी येथील अमोल उर्फ आर्याभाई संभाजी मोहीते, नेताजी संभाजी मोहीते, कासारी येथील सागर हिंदूराव नाईक, तसेच अर्जुनवाडा येथील अवधूत संजय लुगडे आणि प्रदीप उर्फ बिल्डर काकासो सातवेकर या पाचजणांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई सुरु केली आहे. सध्या हे पाचही आरोपी जेलमध्ये विविध शिक्षा भोगत आहेत. पण जेलमधून बाहेर आल्यावर या पाचही आरोपींच्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा सुरु होतात. या पाचही जणांच्यावर जिल्ह्यासह राज्यात विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारची कारवाई करुनही त्यांची गुन्हेगारी कमी होत नसल्याने पोलिसांनी या पाचजणांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी इचलकरंजी उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगूड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश हांडे, उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलिस नाईक अल्ताफ सयद, सावंत,शिंदे, पोवार आदींच्या पथकाने सेनापती कापशी,अर्जुनवाडा,कासारी या गावांत जाऊन या आरोपींच्या घरांची झडती घेवून कसून तपास सुरु केला आहे. त्याचबरोबर संबधित गावांतील विविध ठिकाणी जावून या आरोपींची गोपनीय माहीती गोळा केली जात आहे. या पाचही आरोपींच्यावर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून भूविकास बँक कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह धरणे आंदोलन

$
0
0

आजपासून

धरणे आंदोलन

कोल्हापूर: थकीत देणी द्यावीत या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँकेचे (भूविकास) कर्मचारी कुटुंबासह एक मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक कर्मचारी संघटनेने दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, 'भूविकास बँकेची जागा विक्री करून माजी कर्मचाऱ्यांची देणी देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबत अनेकवेळा मोर्चे, आंदोलने करूनही न्याय मिळत नसल्याने महाराष्ट्र दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. पत्रकांवर श्रीकांत कदम, रावसाहेब चौगुले, भारत पाटील, नंदकुमार पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अदिनाथ तीर्थकर मूर्तीवर रविवारी महामस्तकाभिषेक

$
0
0

महामस्तकाभिषेक रविवारी

कोल्हापूर : शुक्रवार पेठ जैन मठ येथील २८ फूट उंचीच्या अदिनाथ तीर्थकर मूर्तीवर रविवारी (ता. ६) महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे, अशी माहिती महामस्तकाभिषेक समितीचे पद्माकर कापसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी उपस्थित होते.

शुक्रवार पेठेतील प्राचीन दिगंबर जैन मठात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी कर्नाटकातील मूडबिद्री येथील चारुकिर्ती महास्वामी उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीन वाजता ज्वालामालिनी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच अॅड के. ए. कापसे आणि प्रा. कांचन कापसे यांना आदर्श दाम्पत्य पुरस्कार देण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता अदिनाथ मूर्तीवर महामस्तकाभिषेक होणार आहे. पत्रकार परिषदेला धनंजय मगदूम, अशोक रोटे, प्रशांत उपाध्ये, भरत उपाध्ये, राजू उपाध्ये, शकुंतला पाटील, आशा आडके, ज्योती शेट्टी, शीलावती कागले उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा स्मार्ट पोलिस ठाण्यांना मिळणार प्रमाणपत्र

$
0
0

दहा पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज प्रमाणपत्र वितरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील पोलिस ठाणी आयएसओ प्रमाणित आणि स्मार्ट करण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील ३० पोलिस ठाणी आणि सहा उपविभागीय कार्यालयांपैकी १० पोलिस ठाणी आणि चार उपविभागीय कार्यालये स्मार्ट झाली आहेत. प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम मंगळवारी (ता. १) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अलंकार हॉलमध्ये होणार आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व पोलिस ठाणी आएसओ मानांकित आणि स्मार्ट करण्याचा निर्धार विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी स्मार्ट केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ३० पोलिस ठाणी आणि सहा उपविभागीय कार्यालये स्मार्ट करण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यातील सोर कन्स्लटिंग सर्व्हिसेस कंपनीकडून सुरू आहे. जिल्ह्यातील सहा उपविभागांसह १० पोलिस ठाण्यांचे काम पूर्ण झाले असून, मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

स्मार्ट पोलिस ठाण्यांमध्ये दस्तऐवजांचे वर्गीकरण, मूलभूत सुविधा, गतिमान कामकाज यासह पोलिस आणि नागरिकांमधील सुसंवाद अपेक्षित आहे. यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. पोलिस ठाण्यांची रंगरंगोटी, फर्निचर, पार्किंग सुविधा यांची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात शाहूवाडी, करवीर, जयसिंगपूर आणि गडहिंग्लज ही उपविभागीय कार्यालये आयएसओ आणि स्मार्ट केली आहेत. याशिवाय कोडोली, कळे, गगनबावडा, पन्हाळा, गांधीनगर, मुरगूड, कागल, शिरोळ, नेसरी आणि राजारामपुरी ही दहा पोलिस ठाणी स्मार्ट केली आहेत. स्मार्ट पोलिस ठाण्यांची घोषणा केल्यानंतर कामात सातत्य ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहे. नागरिकांना नियमित दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांचे दर महिन्याला पुनर्मूल्यांकन होणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना गतिमान सेवा मिळेल, त्याचबरोबर पोलिस आणि नागरिकांमधील संबंध सुधारतील, अशी माहिती काकडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा योजनेचा प्रश्न पेटणार

$
0
0

पान ६ मेन

........................

पाण्यासाठी वारणाकाठची वज्रमूठ

अमृत योजने योजना शुभारंभाच्या पार्श्‍वभूमीवर वारणेचा पाणीप्रश्‍न पेटणार

अजय जाधव,जयसिंगपूर

इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून थेट नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू होण्याची शक्यता असल्याने आता नदीकाठची गावेही या योजनेविरोधात एकवटली आहेत. आपल्या हक्काचे पाणी वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी वज्रमूठ आवळली आहे. आंदोलनाची व्याप्ती तसेच तीव्रता वाढविण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात बैठका सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही अमृत योजना उधळून लावण्यासाठी ग्रामस्थांनी मोर्चेबांधणी केली आहे. मात्र आंदोलनाची दिशा गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. नदीकाठचे ग्रामस्थ व प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने वारणेचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यात पाण्याअभावी वारणा नदीकाठच्या गावातील पिके करपून जातात. इचलकरंजी शहरास पाणी दिले तर आणखी भीषण स्थिती निर्माण होईल. नदीकाठच्या ७० गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल या शक्यतेमुळे आपल्या हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आंदोलन उभारण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना पूर्णत्वास जावू न देण्याचा निर्धार वारणा बचाव कृती समितीने केला आहे. आंदोलन तीव्र करण्याबरोबरच त्याची व्यापकता वाढविण्यासाठी वारणा काठचे ग्रामस्थ एकवटले आहेत. नदीकाठावरील गावात बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे.

मागील आठवड्यात वारणाकाठच्या ग्रामस्थांची हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव येथे बैठक झाली. या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातही बैठका झाल्या. कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजी शहरास वारणेचे पाणी द्यायचे नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत. इचलकरंजी शहरालगत पंचगंगा नदी आहे. ही नदी प्रदूषण मुक्त करून पाणी वापरावे. याचबरोबरच सध्या अस्तित्वात असणारी कृष्णा नळ पाणी पुरवठा योजना अधिक सक्षम करावी, असे वारणाकाठच्या ग्रामस्थांचे मत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमृत योजनेचा शुभारंभ करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तर ही योजना उधळून लावण्याचा निश्‍चय वारणाकाठच्या ग्रामस्थांनी केला आहे. वारणा बचाव कृती समितीने आंदोलनाची पुढील दिशा मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे. ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील संघर्षामुळे आता वारणेचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.

...........................

कोट

'चांदोली धरणाचा एकूण पाणी साठा ३७.४८ टीएमसी इतका अपेक्षित होता, मात्र धरण ३४.३९ टीएमसीचे बांधले आहे. धरण क्षमता ही गरजेपेक्षा ३.०९ टीएमसी ने कमी आहे. या धरणातील बहुतांशी उद्दिष्टे पूर्ण झालेली नाहीत. वारणा लाभक्षेत्रात २८३ गावे आहेत पैकी केवळ ८२ गावांनाच वारणेचे पाणी मिळाले आहे, उर्वरीत २०१ गावांना अद्याप पाणी मिळालेले नाही. शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे २०० संस्थांचे काम नजिकच्या काळात पूर्ण होणार आहे. ती पूर्ण झाल्यास पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे इचलकरंजीला पाणी देण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही.

-महादेव धनवडे, अध्यक्ष वारणा बचाव कृती समिती

..............

कोट

'वारणा नदीवरुन इचलकरंजीला दररोज सुमारे एक कोटी लिटर पाणी नेण्याच्या अमृत योजनेस सरकारने मान्यता देऊन निविदा काढली. शहरास पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांच्या पाणी योजना असताना आता तिसऱ्या योजनेचा घाट घालण्यात आला आहे. वारणाकाठच्या शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा हा डाव उधळून लावण्यासाठी संपूर्ण वारणाकाठ एकवटला आहे.

-मानाजीराव भोसले, सचिव वारणा बचाव कृती समिती

......................

चौकट-

प्रदुषणमुक्तीसाठी प्रयत्न करा

इचलकरंजी शहरातील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांच्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी दुषित होते. या दुषित पाण्याचा फटका शिरोळ तालुक्यातील पंचगंगेकाठच्या गावांना बसतो. आता पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली इचलकरंजीकरांचा प्रोसेस व कापड उद्योगासाठी पाणी नेण्याचा डाव असून हे पाणी पुन्हा प्रदूषित होऊन पंचगंगा नदीमार्गे कृष्णा नदी पात्रात मिसळणार आहे. यामुळे पंचगंगा नदी प्रदुषणमुक्तीसाठी इचलकरंजीकरांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हापूस आंब्याची आवक वाढली

$
0
0

फोटो आहे

हापूस आंब्याची आवक वाढली

दर मात्र अद्यापही वधारलेलेच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही महिन्यांपासून हापूस आंब्याची आवक जेमतेम असल्याने ग्राहकांना आवक वाढण्याची प्रतीक्षा लागली होती. सोमवारपासून मात्र हापूस आंब्याची आवक वाढू लागली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसह लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट व राजारामपुरी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली आहे. देवगड, रत्नागिरी हापूस आंब्यासह मद्रास येथून हापूस आंब्याची आवक वाढली आहे. बाजारपेठेत आवक वाढलेली असली, तर दर अद्यापही वधारलेलेच आहेत.

बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हापूस आंब्याची आवक सुरू झाली. त्यानंतर हापूस आंब्याची आवक वाढेल असे, सांगितले जात होते. पण आंबा उत्पादक क्षेत्रात विशेषत: कोकण किनापट्टीला चक्रीवादळ व गारपिठीचा तडाखा बसल्याने आंबा उत्पादनावर परिणाम झाला. दुसऱ्या बहरातील आंब्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने आंब्याची आवक वाढली नाही. सद्य:स्थितीमध्ये बाजारपेठेत आंब्याची आवक वाढू लागली असून बाजारात आलेला आंबा तिसऱ्या बहारातील असल्याने यानंतर ही आवक कायम राहणार आहे.

सुरुवातीस देवगड हापूस ५०० ते एक हजार रुपये डझन तर रत्नागिरी हापूस आंब्याचा दर ४०० ते ८०० रुपयांपर्यंत होता. आवक वाढल्याने देवगड हापूसचा दर ५०० ते ७०० रुपये झाला असून रत्नागिरी हापूस आंबा ३०० ते ६०० रुपये डझन विक्री सुरू होती. याचबरोबर मद्रास येथून मोठ्याप्रमाणात आवक वाढल्याने बाजारपेठेत सर्वत्र आंबा दिसू लागला आहे. मद्रास हापूस आंबा सरासरी २०० ते ५०० रुपये डझनने विक्री चालू आहे. पुढील काही दिवसांत मोठ्याप्रमाणात आंबा आवक सुरू राहणार असल्याने दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींनो, स्वप्ने बघा, उत्तुंग भरारी घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'स्त्री जन्म हा रडण्यासाठी नाही तर कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी आहे. कर्तृत्वाच्या झळाळीने जीवनाचे सौंदर्य वाढू द्या. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नेहमी स्वप्ने बघा आणि स्वप्ने साकारण्यासाठी मेहनत करा. बुद्धीमत्ता आणि कर्तबगारीच्या बळावर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात 'टॉप'चे स्थान पटकाविले. स्वप्ने साकारण्याची, जग जिंकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.' अशा शब्दांत पुरस्कारप्राप्त महिलांनी गृहिणी महोत्सवात महिला वर्गाला यशस्वी जीवनाचा मंत्र दिला.

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे आयोजित गृहिणी महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. याप्रसंगी हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झांगियानी यांच्याहस्ते समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला व युवतींना 'गृहिणी गौरव पुरस्कार'देऊन सन्मानित केले. सातारा येथील वेदांतिकाराजे शिवेंद्रराजे भोसले, मुंबईच्या डॉ. वर्षा भगत, पुण्यातील कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कार्यकर्त्या सरुबाई वाघमारे, कोल्हापूरच्या शिरीन शिंदे-चिंचोले आणि गडहिंग्लजच्या फुटबॉलपटू अंजू तुरुंबेकर यांचा पुरस्कारांनी गौरव झाला. डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी.पाटील, आमदार सतेज पाटील, महापौर स्वाती यवलुजे, प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील आणि तेजस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहूपुरी जिमखाना येथे समारंभ झाला. मिसेस गृहिणी स्पर्धेतील जान्हवी विशाल लंगडे (प्रथम), शुभांगी राजेंद्र साखरे (व्दीतीय) आणि तेजस्विनी धीरज पत्की (तृतीय) यांचाही गौरव झाला.

पुरस्काराला उत्तर देताना वेदांतिकाराजे भोसले यांनी, 'कोल्हापुरातील सत्कार माझ्यादृष्टीने माहेरचा कौतुक सोहळा आहे. माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली.

फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर, शिरीन शिंदे, डॉ. वर्षा भगत यांनी 'गृहिणी महोत्सवातून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होत आहे. महिलांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या महोत्सवाने त्यांच्या जीवनाच्या कक्षा उंचावल्या आहेत,' अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविकात प्रतिमा पाटील यांनी महोत्सवाच्या माध्यमातून महिला सबलीकरण, सक्षमीकरणाचे कार्य सुरु आहे. सोशल वेल्फेअर केवळ गृहिणीच नव्हे तर कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रासाठी कार्यरत असल्याचे सांगितले.

............

प्रीतीचा 'मोहब्बते' संवाद

अभिनेत्री प्रीती झांगियांनी 'कसं काय कोल्हापूरकर'या शब्दांत उपस्थितांशी संवाद साधला. 'मोहब्बते' सिनेमातील संवाद ऐकविले. गृहिणी महोत्सव, पुरस्कारप्राप्त महिलांच्या कार्याचे कौतुक केले. सिनेक्षेत्र असो की अन्य, प्रत्येक ठिकाणी मेहनतीला पर्याय नाही. सिनेक्षेत्रातील ग्लॅमर प्रत्येकाला खुणावते, पण स्वप्ने साकारण्यासाठी अथक परिश्रमाची गरज आहे,' असल्याचे तिने नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झीप कॉइनमधून ३० लाखांची फसवणूक

$
0
0

फसवणुकीसाठी सुरू केली बनावट कंपनी

पश्चिम महाराष्ट्रातील ५०० हून अधिक गुंतवणूकदारांना २५ कोटींचा गंडा घातल्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

झीप कॉइन्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना ३० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला. संशयितांनी पश्चिम महाराष्ट्रातील ५०० हून अधिक गुंतवणूकदारांची २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत राजेंद्र भीमराव नेर्लेकर (रा. हुपरी, ता. हातकणंगले), संजय तमन्ना कुंभार (रा. शिरढोण, ता. शिरोळ), अनिल भीमराव नेर्लेकर, बालाजी राजेंद्र नेर्लेकर, पद्मा राजेंद्र नेर्लेकर (सर्व रा. हुपरी, ता. हातकणंगले) आणि बालाजी गणेश (रा. पुणे) या सहाजणांवर गुन्हा दाखल झाला असून, मुख्य सूत्रधार राजेंद्र नेर्लेकर याच्यासह संजय कुंभार आणि अनिल नेर्लेकर या तिघांना अटक केली. दरम्यान, कंपनीच्या लक्ष्मीपुरीतील कार्यालयात छापा टाकून झडती घेतली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र नेर्लेकर याने पुण्यातील बालाजी गणेश याच्या मदतीने शहरातील लक्ष्मीपुरीत बिग ड्रीम्स ग्रुप या नावाने व्यवसाय सुरू केला. २०१७ मध्ये त्याने क्रिप्टो करन्सीद्वारे गुंतवणूकदारांना व्याज रुपाने परतावा मिळवून देण्याचा व्यवसाय सुरू केला. मार्केटिंगचा व्यवसाय करणारे बाळासाहेब लक्ष्मण झालटे (रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) यांच्याशी ओळख झाल्यानंतर नेर्लेकर याने त्यांना झीप कॉइनबद्दल माहिती दिली. यात गुंतवणूक केल्यास दर महिन्याला १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. यानुसार झालटे आणि त्यांच्या इतर आठ ते दहा नातेवाईकांनी झीप कॉइनमध्ये २९ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

नोव्हेंबर २०१७ मध्ये झालटे यांनी गुंतवणूक केल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने परतावा मिळाला, मात्र यानंतर परतावा मिळणे बंद झाले. याबाबत गुंतवणूकदारांनी विचारणा सुरू केल्यानंतर नेर्लेकरसह त्याच्या साथीदारांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. एप्रिल महिन्यात झीप कॉइनची वेबसाइट बंद झाल्यानंतर झालटे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन माहिती दिली. अधीक्षक माहिते यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी (ता. २९) रात्री संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. नंतर सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, यातील तिघांना अटक केली. झीप कॉइन्सच्या नावे पश्चिम महाराष्ट्रात सुमारे २०० हून अधिक गुंतवणूकदारांची २५ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी वर्तवला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे.

....३

०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा प्रतिनिधी परिषद सोमवारी

$
0
0

मराठा प्रतिनिधी

परिषद सोमवारी

फोटो आहे

30 april 006

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना राज्यसरकारने चालना द्यावी आणि मराठा समाजाचा दबाव निर्माण होण्यासंदर्भात चर्चा होण्यासाठी सोमवारी (ता. ७) राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दुपारी साडेचार वाजता मराठा प्रतिनिधी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत परिषदेचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.

युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थ पुरवठा, विद्यार्थ्यांना शाहूंच्या नावे सारथी संस्थेची निर्मिती, जिल्हास्तरीय मराठा वसतिगृह, कुणबीचा दुरुस्ती निर्णय इत्यादी निर्णय राज्य सरकारने घेतले असले तरी त्याला चालना देण्यात आलेली नाही. मराठा समाजाला कर्ज देण्यात बँकांची उदासिनता आणि महसूल विभागाच्या नकारात्मक भूमिकेमुळे मराठा समाज संभ्रमात आहे. या प्रश्नांबाबत परिषदेत चर्चा होणार आहे. तसेच कुणबीच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे कुणबी दाखले काढण्यासाठी या परिषदेत मार्गदर्शन व्हावे, अशी सूचना बैठकीत मांडण्यात आली. बैठकीला संग्रामसिंह निंबाळकर, संभाजी पाटील, एकनाथ जगदाळे, प्रताप साळोखे, चंद्रमोहन पाटील, शंकरराव शेळके, शरद साळुंखे आदि उपस्थित हेते. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले तर अवधूत पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी बस भाडे...

$
0
0

खासगी वाहतुकीचे दर वाढलेलेच

आरटीओच्या दोन भरारी पथकाची स्थापना; कारवाई नाहीच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे प्रवाशी संख्या वाढल्याने खासगी बस वाहतूकदारांनी त्याचा फायदा उठवित तिकीट दर अव्वाच्या सव्वा केले आहेत. मंगळवारी सलग चार दिवसाची सुट्टी संपणार असल्याने यादिवशी बस भाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खासगी बस वाहतूकदारांकडून अनियंत्रित तिकीट आकारणी सुरू असताना परिवहन विभाग आणि भरारी पथक मात्र सुट्टीवर आहे. खासगी बस भाडे सुसाट आणि कारवाई संथगतीने अशी स्थिती सोमवारी पाहावयास मिळत होती.

दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) २५ हून अधिक खासगी बस वाहतूकदारांना जादा तिकीट आकारणी केल्यास सक्त कारवाईच्या सूचना केल्या आहेत. तसेच सरकारी आदेशाची प्रतही त्यांच्या हाती सोपविले आहेत. गेल्या दोन दिवसांत प्रवाशांकडून जादा भाडे आकारणी संदर्भात तक्रार झाली नसल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र आरटीओ विभागाकडून खासगी बस वाहतुकीवर वॉच ठेवण्यात आले आहे. शनिवार ते मंगळवार सलग सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्याने खासगी बस वाहतूकदारांनी तिकीट दरात वाढ झाली आहे. खासगी बस वाहतूकदारांच्या मनमानी तिकीट आकारणीला चाप लावण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. परिवहनमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर खासगी बसचे तिकीट दर आवाक्यात राहतील, अशी शक्यता होती. मात्र लांब पल्ल्याच्या बस तिकीट दर अव्वाच्या सव्वा राहिले.

खासगी बस वाहतूकदारामार्फत कोल्हापुरातून राज्यातील मोठ्या शहरापर्यंत प्रवासी वाहतूक होते. कोल्हापुरातून नियमितपणे सुटणाऱ्या खासगी बसची संख्या ३०० च्या आसपास आहे. कोल्हापूर ते मुंबई, नाशिक, हैदराबाद, बेंगळुरु, सोलापूर, पुणे, औरंगाबाद अशा महत्त्वाच्या शहरात प्रवासी वाहतूक केली जाते. एसी नॉन एसी, स्लीपर यानुसार तिकीट दराची आकारणी होते. परिवहनमंत्र्याच्या आदेशानंतर आरटीओ कार्यालयाने दोन भरारी पथकाची स्थापना केली. जादा तिकीट आकारणी करणाऱ्या बसेसची तपासणी करण्याचे ठरले. त्यानुसार भरारी पथकाने रविवारी रात्री खासगी बस वाहतूकदारांना सरकारी आदेश, जादा तिकीट आकारणी केल्यास होणारी कारवाईची माहिती दिली आहे.

...................

पुन्हा वाहतूक कोंडी

मध्यवर्ती बस स्थानक परिसरात खासगी बसेस प्रवाशी उठाव करण्यासाठी एकाच ठिकाणी उशिरापर्यंत थांबून राहतात. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खासगी बस वाहतूकदारांनी एकाच ठिकाणी उशिरा बस थांबवू नये, या प्रशासनाच्या आदेशाला काही जणांनी हरताळ फासल्याचे चित्र आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांनी निम्मा रस्ता अडविला आहे. महालक्ष्मी चेंबर्स समोरील आयलँडच्या अवतीभवती रिक्षा थांबत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

......................

दीडपटीने किंवा त्याहीपेक्षा ज्यादा आकारणी करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करण्यासाठी दोन भरारी पथकांची स्थापना केली आहे. आरटीओ कार्यालयामार्फत रविवारी २५ हून अधिक खासगी बस वाहतूकदारांना सरकारच्या नव्या निर्णयाची माहिती दिली. जादा भाडे आकारल्यास वाहन परवाना रद्द करण्यात येईल यासंबंधी सूचना केल्या आहेत. प्रवाशांची अडवणूक होत असेल, जादा तिकीट आकारणी केल्यास त्यांनी तक्रार करावी. तत्काळ कारवाई केली जाईल.

डॉ. एस. टी. अल्वारिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरात चोरी करणारी टोळी अटकेत

$
0
0

गांधीनगरात चोरी करणारा चोरटा अटकेत

एकाच रात्रीत झालेल्या २७ चोऱ्यांची उकल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगर परिसरातील लोहिया मार्केटमध्ये वॉचमनला बेदम मारहाण करून एकाच रात्रीत २७ दुकाने फोडणाऱ्या टोळीतील सराईत चोरटा कृष्णा विजय घाडगे (वय २८, रा. वाल्मिकनगर, बुधवार रोड, मिरज, जि. सांगली) याला अटक केली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सोमवारी (ता. ३०) सकाळी सापळा रचून त्याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून २१ हजार रुपये हस्तगत केले असून, टोळीतील त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी, २०१८ मध्ये गांधीनगरातील लोहिया मार्केटमध्ये धाडसी चोरी झाली होती. वॉचमनला बांधून मारहाण करून चोरट्यांनी एकाच रात्रीत २७ दुकाने फोडून ७ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यातील संशयित चोरटा कृष्णा घाडगे सोमवारी कोल्हापुरात येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. यानुसार सापळा रचून कृष्णा घाडगे याला पोलिसांनी अटक केली. त्याने चोरीची कबुली दिली असून, मुकेश गणपती गोसावी, उमेश गणपती गोसावी, दिपू (नाव पूर्ण नाही) हे साथीदार होते असे सांगितले. पोलिसांकडून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. संशयितांवर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पश्चिम महाराष्ट्रात २५ कोटींची फसवणूक

$
0
0

'बिग ड्रीम्स'ची धूळफेक

पश्चिम महाराष्ट्रात २५ कोटींची फसवणूक, जादा व्याजदराला भुलले गुंतवणूकदार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुंतवणूकदारांना अल्प मुदतीत जादा लाभांश देण्याचे आमिष दाखवून 'बिग ड्रीम्स' या कंपनीने गुंतवणूकदारांची ३० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याची व्याप्ती २५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. टूर्स अँड हॉलिडेज याचे नियोजन करणारी बिग ड्रीम्स नावाची कंपनी सुरू करून गुंतवणूकदारांची स्वप्ने उद्ध्वस्त करण्याचा उद्योग या कंपनीने केला आहे. फस‌वणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.

कमी काळात जास्तीतजास्त लाभांश मिळवण्यासाठी आंधळेपणाने गुंतवणूक करणाऱ्यांना अनेकदा फटका बसला आहे. तरीही फसवणूक करणारे आणि फसणारे यांची संख्या कमी होत नाही हे विशेष. आभासी ऑनलाईन करन्सीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास त्यावर अल्पदरात मोठा लाभांश देण्याचे आमिष दाखवले जाते. हुपरीतील संजय कुंभार याने साथीदारांसह बिग ड्रीम्स या नावाने कंपनी सुरू केली. याचे कार्यालय लक्ष्मीपुरीत लक्ष्मी टॉवर्सच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. गेल्या वर्षापासून त्याने पुण्यातील बालाजी गणगे याच्या मदतीने क्रिप्टो करन्सीतून लाभ मिळवून देणारी 'झीप कॉईन' ही बेबसाईट सुरू केली. क्रिप्टो करन्सीतून दर महिन्याला १५ टक्के लाभांश देण्याचे आमिष त्याने अनेकांना दाखवले. गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी संशयितांकडून शहरातील अलिशान हॉटेल्समध्ये सेमिनारचे आयोजन केले जात असे.

क्रिप्टो करन्सीतून मोठा परतावा मिळत असल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेतली जात असे. ऑक्टोबर २०१७ ते एप्रिल २०१८ या सात महिन्यात कुंभारसह त्याच्या साथीदारांनी पश्चिम महाराष्ट्रातील ५०० हून अधिक गुंतवणूकदारांना सुमारे २५ कोटींचा गंडा घातला. सुरुवातीचे काही महिने गुंतवणूकदारांना परतावा दिला, त्यामुळे मोठ्या संख्येने गुंतवणूकदार झीप कॉइनकडे आकर्षित झाले. शिवाजी पार्कातील बाळासाहेब झालटे यांनी त्यांच्या नातेवाईकांसह आठ ते दहा जणांनी तब्बल ३० लाख रुपयांची गुंतवणूक झीप कॉइनमध्ये केली होती. तीन महिन्यातच झीप कॉइनची वेबसाईट बंद होऊन फस‌वणुकीचा भांडाफोड झाला. या घटनेने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांनी झीप कॉईनमध्ये गुंतवणूक केली असून, त्यांना रक्कम परत मिळाली नसेल, तर जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी केले आहे.

गुंतवणूकदार बाळासाहेब लक्ष्मण झालटे (रा. शिवम अपार्टमेंट, शिवाजी पार्क) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय तमन्ना कुंभार (वय ४० रा. शिरढोण ता. शिरोळ), राजेंद्र भीमराव नेर्लेकर (वय ४५ रा. हुपरी ता. हातकणंगले), अनिल भीमराव नेर्लेकर (वय ४५ रा. हुपरी) यांच्यासह सहाजणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील तिघांना अटक केली आहे. त्यांना कोर्टाने दोन मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

.............

चौकट

काय आहे क्रिप्टो करन्सी ...

क्रिप्टो करन्सी हा गुंतवणुकीचा प्रकार २००८ मध्ये युरोपीय देशांमध्ये सुरू झाला. २००९ पासून याची भारतात सुरुवात झाली. सध्या देशात अशा सुमारे अडीच हजार वेबसाईट आहेत. गुंतवणूकदारांच्या नावे गुंतवणूक करून त्याचे वॉलेट तयार केले जाते. यावर ब्लॉकचेन तयार करून गुंतवणूकदारांना परतावा दिला जातो. गुंतवणूकदारांकडून जसे व्यवहार वाढतील तसा त्यांना परतावा मिळतो. या गुंतवणुकीत जसा फायदा होऊ शकतो, तसा तोटा किंवा सगळी रक्कमही बुडू शकते.

चौकट

अलिशान कार्यालय

संशयित संजय कुंभार याने लक्ष्मीपुरीत लक्ष्मी टॉवर्समध्ये साथीदारांसह अलिशान कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयात १० तरुणी आणि चार पुरुष कर्मचारी कार्यरत आहेत. चकाचक ऑफिसमध्ये बोलवून गुंतवणूकदारांचा पाहुणचार केला जात असे, त्यामुळे अनेक गुंतवणूकदार भुलले आहेत. पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी कार्यालयावर छापा टाकताच कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली.

.....................

चौकट

सत्तर लाखांची अलिशान गाडी

कौलारु घरात राहून सत्तर लाखांची अलिशान गाडी घेऊन फिरणाऱ्या राजेंद्र नेर्लेकरने लाघवी व गोड बोलण्याने महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्रप्रदेशासह अनेक राज्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. हुपरी येथील यळगूड रोडवरील महावितरण कार्यालयानजीक एका छोट्याशा घरात नेर्लेकर आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. नेर्लेकरने साखळी पद्धतीच्या पैसे दुप्पट करणे, शेळी व मेंढी पालन,कुक्कुटपालन,ई-सिल्व्हर यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून अनेक राज्यात एजंटांमार्फत मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण करत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. दोन वर्षांपूर्वी नेर्लेकरने पेठ वडगाव शहरातील एकाची लाखो रुपयांची फसवणूक केली. ते पैसे मागण्यासाठी गेलेल्या पाचजणांवर नेर्लेकरने गांधीनगर पोलिस ठाण्यात मारहाण व खंडणीचा गुन्हा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार दिन - कामगार कल्याणकडून दीड कोटीची शिष्यवृत्ती

$
0
0

कामगारांच्या मुलांचे 'कल्याण'

वर्षात मंडळाकडून एक कोटी ५३ लाखांची शिष्यवृत्ती

कामगार दिन विशेष

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : राज्यातील अनेक महामंडळांचा वापर केवळ कार्यकर्त्यांची सोयीसाठी केला जातो. पण अशा महामंडळाकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात, त्याची अनेकवेळा योग्यरितीने माहिती पोहोचवली जात नाही. यामुळे अशी अनेक महामंडळे टिकेचे धनी बनली असताना याला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अपवाद ठरले आहे. मंडळाकडे लेबर वेलफेअर फंडातून जमा झालेल्या निधीतून कोल्हापूर विभागाने कामगारांच्या मुलांना एका वर्षात तब्बल एक कोटी ५३ लाखांचा आर्थिक लाभ दिला आहे. राज्याच्या सात विभागात कोल्हापूर विभागाने अग्रस्थान पटकावत विभागातील कामगारांच्या मुलांचे आर्थिक लाभ देऊन कल्याण केले आहे.

संघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी महाराष्ट्र कामगार अधिनियम १९५३ नुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. मंडळाकडून कामगारांसाठी आर्थिक लाभाच्या योजना जाहीर होता. शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक शिष्यवृत्तीसह परदेश शिक्षण, अपंग मुलांना सहाय्य आणि गंभीर आजारांसाठी दरवर्षी अनुदान दिले जाते. कोणत्याही आस्थापनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या आस्थापनातील कामगारांना आर्थिक योजनांचा लाभ दिला जातो. यासाठी कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी अनिवार्य असून नोंदणीकृत कामगारांची वर्षातून दोनवेळा प्रत्येकी १२ असे २४ रुपये वर्ग केले जातात. अशी रक्कम वर्ग केल्यानंतर कामगारांनी अर्ज केल्यानंतर आर्थिक लाभासाठी पात्र ठरवण्यात येते. यानुसार नववी ते पदवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या पाल्यांना वर्षात एक कोटी ३४ लाख रुपयांची शिष्यवृत्ती वाटप केली आहे. आर्थिक लाभापोटी पाच हजार ७०० कामगारांना एक कोटी ५३ लाखांचा निधी वितरीत केला आहे.

राज्यात मंडळाचे सात विभाग असून आर्थिक लाभ देण्यात कोल्हापूर विभागाने अग्रस्थान पटकावले आहे. अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याने इतर विभागातील खर्च न झालेला निधी कोल्हापूर विभागातील लाभार्थ्यांवर खर्च केला आहे. येथील कामगार कार्यालय प्रत्येक आस्थापनाच्या कामगार अधिकाऱ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून कामगार नोंदणीसाठी प्रयत्न करत असल्याने येथील कामगारांना अधिकचा लाभ मिळला आहे.

अधिकाधिक रकमेसाठी प्रयत्न

प्रत्येक आस्थापनाकूडन कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केली जाते. नोंदणीकृत कामगार १२ रुपये आस्थापना ३६ रुपये आणि सरकारकडून २४ रुपये जून व डिसेंबर असे वर्षातून दोनवेळा लेबर वेलफेअर फंडात जमा केले जातात. फंडामध्ये अधिकाधिक रक्कम जमा करण्यासाठी येथील कार्यालयाने विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे आर्थिक लाभाच्या योजनासाठी कोल्हापूर विभागाला अधिक निधी मिळाला आहे. तसेच इतर विभागाचाही निधी घेऊन येथील पात्र लाभार्थ्यांना वितरीत केला आहे.

आर्थिक वर्षातील वितरीत अनुदान

शिष्यवृत्ती : एक कोटी ३४ लाख

गंभीर आजार सहायता योजना : दहा लाख ३५ हजार

अपंग मुले : ४५ हजार

परदेश शिक्षण : एक लाख

अनेक आस्थापनांना कामगार अधिकाऱ्यांची धास्ती वाटत होती. आस्थापनातील कामगार अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही भीती दूर करून कामगारांच्या नोंदी करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे नोंदणी केलेल्या कामगार व त्यांच्या पाल्यांना कामगार कल्याण मंडळाच्या आर्थिक लाभाच्या योजनांचा फायदा झाला.

अरुण लाड, कामगार कल्याण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडीत रंकाळा

$
0
0

वाहतुकीच्या कोंडीत रंकाळा

जाऊळाचा गणपती मंदिर, रंकाळा टॉवर परिसरात बोजवारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या रंकाळा तलावाच्या सभोवती वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. वाढती वाहने आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे रंकाळ्याज‌वळ जाऊळाचा गणपती मंदिर परिसर आणि रंकाळा टॉवर परिसरात रोज संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिसही गायब होतात, त्यामुळे या परिसरात अपघातांचा धोका वाढला आहे.

कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना रंकाळा तलाव नेहमीच भुरळ घालतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत संध्याकाळी रंकाळा चौपाटीवरील पेरफटका, पदपथ उद्यानातील मौज आणि नौकाविहार यामुळे रंकाळ्यावर मोठी गर्दी असते. याशिवाय राधानगरी, गगनबावड्यासह कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनाही रंकाळामार्गेच पुढे जावे लागते. त्यामुळे चार घटका रंकाळ्यावर थांबणारे पर्यटक रस्त्याकडेलाच वाहनांचे पार्किंग करतात. रंकाळा टॉवरपासून ते खराडे कॉलेजसमोर खाद्यपदार्थांच्या गाड्या असतात. यापुढे दुचाकींचे पार्किंग असते. संध्यामठपर्यंत चारचाकी वाहनांचे पार्किंग असते. राधानगरीकडून येणारी बहुतांश वाहने रंकाळा टॉवरपासून रंकाळा स्टँड आणि गंगावेशीकडे जातात. याशिवाय रंकाळा स्टँडकडून राधानगरी आणि गगनबावड्याकडे जाणारी वाहनेही रंकाळा टॉवरपर्यंत एकाच मार्गावरून पुढे येतात, त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होते.

जाऊळाचा गणपती चौकात रस्ता अरुंद आहे. यातच दुकानदार, फेरीवाले यांचे अतक्रिमण आणि बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतूक शिस्त बिघडते. या चौकातील ट्रॅफिक सिग्नल बंद आहे. गेल्या वर्षभरात अनेकदा या ठिकाणी किरकोळ अपघात झाले. आठ महिन्यांपूर्वी एसटी बसचा ब्रेकफेल झाल्याने मोठी दुर्घटना घडली असती, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. विशेष म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी येथील वाहतूक पोलिसही गायब होतात. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनाच कसरत करावी लागते. यातून अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे रात्री दहापर्यंत या परिसरात वाहतूक पोलिस तैनात असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पर्यायी मार्गाचा अभाव

गगनबावड्याकडून येणाऱ्या अवजड वाहनांना फुलेवाडी येथील रिंगरोडमार्गे सानेगुरुजी वसाहत, कळंबा, संभाजीनगरमार्गे शहरात प्रवेश मिळावा. सध्या रिंगरोडचे काम अर्धवट आहे, त्यामुळे बहुतांश वाहने थेट रंकाळा टॉवर, जुना वाशीनाका मार्गे पुढे जातात. शालिनी पॅलेस ते रंकाळा पदपथ उद्यानमार्गेही काही वाहनांची वाहतूक सुरू असते, मात्र रहिवासी क्षेत्र आणि पदपथ उद्यानातील गर्दीमुळे हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहे. रिंगरोडचे काम तातडीने पूर्ण झाल्यास रंकाळा परिसरातील वाहतूक कोंडी टाळता येईल.

पार्किंगला जागाच नाही

रंकाळ्यावर येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्क करण्यासाठी स्वतंत्र जागाच उपलब्ध नाही. रंकाळा चौपाटीवर अवघ्या ५० ते ६० दुचाकींसाठी जागा आहे. उर्वरित दुचाकी अंबाई टँक ते खणीपर्यंत रस्त्याकडेला उभ्या असतात. त्याचबरोबर रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका परिसरातही रस्त्याकडेलाच पार्किंग आहे. चारचाकी वाहने लावायची कुठे? असा प्रश्न येणाऱ्या नागरिकांना पडतो, त्यामुळे पार्किंगअभावी पर्यटकांना रंकाळ्यावरून काढता पाय घ्यावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भगवान बुद्धांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भगवान गौतम बुद्ध यांची जयंती शहरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. बुद्ध गार्डन येथील बुद्ध मूर्तीस अभिवादन करण्यासाठी उपासकांनी मोठी गर्दी केली होती. मसाई पठार येथील बौद्ध लेणी या ठिकाणीही अभिवादनाचा कार्यक्रम झाला.

शिवाजी पेठेतील परिवर्तन फाउंडेशनच्यावतीने बुद्ध गार्डन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव अॅड पंडीतराव सोडोलीकर यांच्या हस्ते मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, अक्षय साळवी, बाळासो साळवी, शरद कांबळे, राज कुरणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

भटके विमुक्त जमाती विचारमंचच्यावतीने आयोजित कार्यक्रमात आर. बी. कोसंबी म्हणाले की, भटक्या विमुक्त जमाती धम्माच्या विचाराचा मार्ग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणत आहे, ही महत्त्वाची घटना आहे. प्रकाश हुलस्वार यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. व्यंकाप्पा भोसले यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. सुनील भोसले यांनी आभार मानले. प्रा. हरिष भालेराव, सुभाष कुचकोरवी, दक्षराज भोसले, क्षितिजा भोसले, स्मिती भोसले, रेखा भोसले आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रा. शहाजी कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी सतीश माळगे, विश्वास तरटे, कुंडलिक कांबळे, प्रदीप ढाले, शिवाजी कांबळे, शेखर पाटील, संजय देसाई आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

बुध्द जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात बुध्द मूर्तीस महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते फुले वाहण्यात आली. यावेळी नगरसचिव दिवाकर कारंडे व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाख पर्यटकांचा राष्ट्रध्वजासोबत सेल्फी

$
0
0

०००००००००

पाच लाख पर्यटकांचा

राष्ट्रध्वजासोबत सेल्फी

वर्षभरात देखभाल दुरुस्तीचा खर्च ६० हजार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस उद्यानात उभारलेला राज्यातील सर्वाधिक आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच ध्वजस्तंभाची मंगळवारी (ता. १) वर्षपूर्ती झाली. गेल्या वर्षभरात पोलिस उद्यानातील ३०३ फूट उंच ध्वजस्तंभावरील राष्ट्रध्वजासोबत सुमारे पाच लाख पर्यटकांनी सेल्फी घेतला. पर्यटकांसाठी राष्ट्रध्वज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मात्र, आठवड्यातील शनिवार, रविवार आणि सणासुदीच्या काळातच राष्ट्रध्वज फडकवला जात असल्याने वर्षभरात केवळ १०० दिवसच राष्ट्रध्वज फडकला.

कोल्हापुरातील पर्यटनाला चालना मिळावी आणि नागरिकांमधील देशाभिमान वाढावा यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात सर्वाधिक उंचीचा ध्वजस्तंभ उभा करण्याची कल्पना मांडली होती. कोल्हापूर पोलिस आणि केएसबीपीने पोलिस उद्यानात ही कल्पना सत्यात उतरवली. तीन महिने काम करून ३०३ फूट उंच ध्वजस्तंभावर १ मे, २०१७ मध्ये ६० बाय ४० फूट असा भव्य राष्ट्रध्वज फडकवला. गेल्या वर्षभरात पोलिस उद्यानात पाच लाखांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. राष्ट्रध्वज पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची संख्या यात लक्षणीय आहे.

\Bप्रदर्शनाची प्रतीक्षा

\Bवाहतूक नियमांची माहिती वाहनधारकांना मिळावी यासाठी पोलिस उद्यानात वाहतूक नियमांची माहिती देणारे प्रदर्शन, तसेच पोलिस दलाचा इतिहास सांगणारे प्रदर्शन भरवणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. वर्षपूर्तीनंतरही प्रदर्शनाचे काम सुरू झालेले नाही. प्रदर्शन सुरू झाल्यास पर्यटकांच्या ज्ञानातही भर पडणार आहे, त्यामुळे अनोखे आणि मार्गदर्शक प्रदर्शन सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

१०० दिवस फडकला राष्ट्रध्वज

राज्यातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज पूर्ण वर्षभर २४ तास फडकत राहील, अशी माहिती केएसबीपीचे प्रमुख सुजय पित्रे यांनी दिली होती. प्रत्यक्षात मात्र सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर वर्षातील ३६५ दिवसांपैकी १०० दिवस राष्ट्रध्वज फडकला. प्रत्येक आठवड्याचा शनिवार, रविवार, नवरात्रोत्सव आणि फुल महोत्सवात ध्वज सलग फडकला.

देखभाल दुरुस्तीसाठी ६० हजारांचा खर्च

राज्यातील सर्वाधिक उंचीवरील राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी केएसबीपीला गेल्या वर्षभरात ६० हजार रुपये खर्च करावे लागले. वर्षभरात सहा राष्ट्रध्वज वापरले. ध्वजाची दोरी, विद्युत रोषणाई, विजबिल, क्रेन यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा खर्च झाला. सुरुवातीला पाच राष्ट्रध्वज घेतले होते. अलिकडेच मुंबईतून सहावा राष्ट्रध्वज खरेदी केला आहे. ६० बाय ९० फूट आकाराचे हे ध्वज आहेत.

पर्यटन वाढीसाठी सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज कोल्हापुरात उभा केला. एका वर्षात सुमारे ५ लाखांहून अधिक पर्यटकांनी राष्ट्रध्वजासोबत सेल्फी घेतले. येणाऱ्या वर्षात ही संख्या आणखी वाढू शकते. पर्यटन वाढीचा हेतू साध्य होत असल्याने जास्तीतजास्त दिवस तो फडकत राहावा यासाठी प्रयत्न करू.

सुजय पित्रे, प्रमुख, केएसबीपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्टीला जाताना दक्षता घ्या

$
0
0

सुट्टीला जाताना दक्षता घ्या

चोरटे सक्रीय होण्याचा धोका; घरातील किमती ऐवज सांभाळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुट्ट्या सुरू होताच अनेकांना पर्यटन किंवी तीर्थाटनाचे वेध लागतात. अनेक जण कुटुंबासह गावाकडे जातात. अशावेळी चोरट्यांसाठी बंद घरे पर्वणीच ठरतात. गेल्या वर्षात मे महिन्यात ७९ चोऱ्या झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. यंदा पुन्हा मोठ्या संखेने घरफोड्या, चोऱ्या होऊ नयेत, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सुट्ट्या आणि घरफोड्या हे जुनेच समीकरण आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या सुट्टीत शहरासह उपनगरातील अनेक घरे आठ-पंधरा दिवसांसाठी बंद असतात. अपार्टमेंटमधील वर्दळ कमी होते. चोरटे याच संधीची वाट पाहत असतात. सलग आठवडाभर बंद असलेल्या घरांना चोरटे हमखास लक्ष करतात. काही क्षणात आयुष्यभराची कमाई लंपास होऊन सुटीच्या आनंदावर विरजन पडते. घरफोडी आणि चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून दक्षता घेतल्यास किमती ऐवज सुरक्षित राहू शकतो. यासाठी पोलिसांकडूनही जनजागृती सुरू आहे. सुटीत शहराबाहेर जाणाऱ्या नागरिकांनी घरात किमती ऐवज आणि मोठी रोकड ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याशिवाय अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्याही सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी अकार्यक्षम आणि अप्रशिक्षित सुरक्षारक्षक आहेत. याबाबत अपार्टमेंटमधील रहिवाशांनी खात्री करून सक्षम सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी. काही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावली जाते, मात्र ती कार्यान्वित नसते. चोरट्यांच्या नजरेस पडेल, असा डीव्हीआर लावू नये. अन्यथा चोरटे डीव्हीआरही पळवतात. त्यामुळे घरातील किमती मुद्देमालासह घराच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी उपाययोजना सूचवल्या आहेत.

किमती ऐवज लॉकरमध्ये ठेवा

सुट्टीला जाण्यापूर्वी घरातील किमती ऐवज बँकेतील लॉकरमध्ये ठेवणे नेहमीच उपयुक्त ठरते. दागिने सोबत बाळगू नयेत. लॉकर उपलब्ध नसेल तर, विश्वासू शेजाऱ्याकडे किंवा नातेवाइकांकडे ठेवावेत. काही घरांमध्ये देव्हाऱ्यात सोन्या-चांदीच्या मूर्ती आणि भांडी असतात. सुट्टीला जाताना अशा किमती वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. घरातील कपाट, तिजोरीची चावी नजरेस पडेल अशी ठेवू नये. आपला शेजारी हाच सर्वात महत्त्वाचा पहारेकरी आहे. सुट्टीच्या काळात त्यांना घराकडे लक्ष देण्याची विनंती करावी. जास्त दिवस घर बंद राहणार असेल, तर जवळच्या पोलिस ठाण्यात कल्पना दिल्यास गस्त घालणाऱ्या पोलिसांना संबंधित घरांवर लक्ष ठेवता येईल. फिरायला गेल्यानंतरही सोबत मोठी रोख रक्कम बाळगण्यापेक्षा एटीएम, क्रेडीट कार्डचा वापर करावा.

ही दक्षता घ्याच

शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.

कॅमेऱ्यांचे डीव्हीआर लपवून ठेवावेत

अपार्टमेंटसाठी खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी

घरातील किमती वस्तू, रोकड बँकेत लॉकरमध्ये ठेवा

दागिने सोबत घेऊन फिरण्यासाठी जाऊ नये

समारंभासाठी बाहेर पडताना विनाकारण दागिन्यांचे प्रदर्शन करणे टाळावे

सुटीसाठी जात असल्याची कल्पना शेजाऱ्यांना आणि पोलिसांना द्यावी

घराच्या खिडक्या व आतील दरवाजांसह बाथरुम, स्वच्छतागृहाचा दरवाजा, खिडक्या बंद कराव्यात

घरातील एखाद्या खोलीत लाइट सुरू असावा

बँका, पतसंस्था, एटीएम सेंटरसाठी अलार्मची व्यवस्था असावी

संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना कळवावी

चोरी झाल्यानंतर कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका

शेजारच्या बंद घरांवर लक्ष ठेवून शेजारधर्म पाळावा

गेल्या वर्षाच्या सुटीत ७९ चोऱ्या

मे २०१७ मध्ये जिल्ह्यात ७९ चोऱ्या झाल्या होत्या. यात ४० घरफोड्या, ९ जबरी चोऱ्या व उर्वरित इतर प्रकारच्या चोरीच्या घटनांचा समावेश आहे. यातील बहुतांश चोरीच्या घटना रात्रीच्या वेळी घडल्या आहेत. फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत परिसरात एकाच रात्रीत आठ ते दहा ठिकाणी घरफोड्या झाल्याने शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली होती. यंदा पुन्हा अशाच पद्धतीने चोऱ्या होऊ नयेत, यासाठी पोलिसांसह नागरिकांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे.

सुट्टीत घरफोडीच्या घटना वाढतात. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा घरफोड्या आणि चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुट्टीत कोणती दक्षता घ्यावी याची माहिती नागरिकांना दिली जात आहे, त्याचबरोबर पोलिसांची गस्तही वाढवली आहे.

संजय मोहिते,पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक साहित्य वाटप

$
0
0

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमधील बारावीच्या विद्यार्थ्यांनी बालसंकुलातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विद्यार्थी प्रतिक बोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मिथिलेश साळोखे, आर्यन धामणेकर, गौरव कदम, रोहित डोणकर, ओम गुहागर, ऋुतुराज वाईंगडे, उर्जित वैध, श्रवण कदम, जयेश कदम, संकेत रुकडीकर, केदार राऊत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बोरगाव येथील अरिहंत समूहाचे संस्थापक चेअरमन रावसाहेब पाटील यांची दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाली. बेळगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रावसाहेब पाटील यांनी सहा वर्षात केलेल्या कार्यामुळे त्यांची अध्यक्ष म्हणून फेरनिवड केली आहे. तीन वर्षासाठी ही निवड झाली आहे. जैन सभेच्या माध्यमातून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अशा तीन राज्यात काम करण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images