Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहू मार्केट यार्ड परिसरातील मेनन अँड मेनन कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्याने जातिवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. संजय बोरसे असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, श्रावण रंगराव कांबळे (वय ५८) यांनी फिर्याद दाखल केली आहे. १० डिसेंबर २०१७ रोजी शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला होता.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बोरसे हे मेनन अँड मेनन कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर काम करतात. याच कंपनीत श्रावण कांबळेही काम करीत होते. कंपनी प्रशासनाने डिसेंबर २०१७ मध्ये कांबळे यांना निलंबित केले. याबाबत १० डिसेंबर २०१७ रोजी निलंबनाचे कारण विचारण्यासाठी कांबळे हे बोरसे यांच्या केबिनमध्ये गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादावादीनंतर बोरसे यांनी जातिवाचक शिवीगाळ करून अपमानित केले, अशी तक्रार कांबळे यांनी केली आहे. याबाबत कांबळे यांनी शुक्रवारी बोरसे यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार बोरसे यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती सुधारणा अधिनियम २०१५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


९० वर्षीय वृद्धेवर बलात्कार; आरोपीला जन्मठेप

0
0

कोल्हापूर: अंथरुणाला खिळलेल्या एका नव्वद वर्षीय वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला तीन वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

विष्णू नलावडे (वय ५०) असं या नराधमाचं नाव असून तो भुदरगड तालुक्यातील नांगरवाडी येथे राहतो. ४ मार्च, २०१५ मध्ये दुपारी पीडित वृद्धेच्या घरात इतर कोणी नसल्याचे पाहून आरोपी विष्णू नलावडे याने साडेअकरा ते साडेतीन या वेळेत वृद्धेवर बलात्कार केला. अंथरुणास खिळून असलेल्या वृद्धेच्या असहायतेचा गैरफायदा घेवून, तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपीस स्थानिकांनी पकडले होते. स्थानिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर गारगोटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बी. टी. बारवकर यांनी नलावडेविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्यावतीने नऊ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या. वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी केलेला युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून नलावडे याला दोषी ठरवण्यात आले होते.

आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश आदिती कदम यांनी या प्रकरणावर निकाल देताना आरोपी नलावडे याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. 'हा गुन्हा म्हणजे समाजासाठी मोठा धक्का आहे. अशा गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद आहे. मात्र तपासातील त्रुटींमुळे आरोपीला त्याचा फायदा मिळाला,' असं निरीक्षण नोंदवितानाच आरोपीला शिक्षेत कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे सांगतानाच कोर्टाने त्याचा पॅरोलचा अर्जही फेटाळून लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावताच आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली. या घटनेने सांगली कोर्टात खळबळ उडाली. आरोपीने भिरकावलेली चप्पल खिडकीजवळ पडली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव विजय मधुकर गुरव (वय २२) असे असून तो शाहूवाडी येथील राहणारा आहे. त्याच्यावर खुनासह पंधरापेक्षा अधिक गुन्हे आहेत. पोलीस असल्याचे सांगून कुपवाडमधील बरजरंगनगरमध्ये तो राहत होता.

कारागृहात असताना ओळख झालेला सराईत गुन्हेगार रतन दत्ता माने (वय २०, वडर गल्ली, सांगली) हाही गुरवबरोबर रहात होता. १९ फ्रेब्रुवारी २०१४ रोजी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला होता. शनिवारी या खटल्याचा निकाल देताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी दोघांनाही दोषी ठरविले. गुरवला बारा वर्षांची आणि माने याला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आपल्याला बारा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावताच आरोपी गुरवने चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

बजरंग नगरमध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी घरी वाद झाल्याने १९ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री घराबाहेर पडली. तिला उपळावी येथील नातेवाईकांकडे जायचे होते. ती भारत सूत गिरणीजवळ आली. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या विजय गुरव आणि रतन माने या दोघांनी विचारपूस केली. आम्ही विश्रामबागचे पोलीस आहोत. तुला एसटी स्टँडवर सोडतो, असे सांगून तिला गाडीवर घेतले. सांगली स्टँडवर आणून पुन्हा बजरंगनगर येथे ते राहत असलेल्या खोलीवर नेले. मध्यरात्रीच्या सुमारास गुरवने मुलीवर बलात्कार केला. तिला तीन दिवस ताब्यात ठेवून आरोपी तिच्यावर अत्याचार करीत राहिला. आपण बजरंग नगरमध्येच आहोत हे लक्षात येताच पीडित मुलीने त्या दोघांची नजर चुकवून घर गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी कुपवाड एमआयडीसी पोलिसांत धाव घेऊन त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका, पाटबंधारे विभागात वसुली वॉर

0
0

महापालिका-पाटबंधारेत 'वसुली वॉर'

वारणा भवनचा पाणीपुरवठा तोडला, सहा कनेक्शन खंडित

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत रकमेवरून पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्यात 'वसुली वॉर' रंगले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात जलसंपदा विभागाने महापालिकेकडील पिण्याच्या पाण्याच्या २१ कोटी ९४ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा तोडला. पाटबंधारे विभागाच्या त्या कारवाईला प्रत्युत्तर देताना महापालिकेने शनिवारी पाटबंधारे विभागाकडील ९७ लाख ५५ हजार रुपयांच्या थकीत पाणीपट्टीसाठी पाणीपुरवठा तोडला. पाटबंधारे विभागाकडील एकूण सहा नळ कनेक्शन तोडले.

दरम्यान, महापालिकेच्या या कारवाईवरून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नापसंती दर्शविली. महापालिकेकडील २१ कोटी रुपयांच्या थकबाकीतून पाटबंधारेकडील पाणीपट्टी कमी करून घ्यावी, यासंदर्भात चर्चा सुरू असताना कारवाईची घाई कशासाठी, असा प्रश्न पाटबंधारेकडून विचारला जात आहे. दरम्यान, महापालिकेने पाटबंधारे विभागाला १२ जानेवारी रोजी थकीत पाणीपट्टीप्रश्नी नोटीस काढली होती. पंधरा दिवसांच्या आत थकबाकी भरणा करण्याविषयी कळविले होते. दरम्यानच्या कालावधीत पाटबंधारे विभागाने सात मार्चला २१ कोटी रुपयांच्या पाणीपट्टी थकबाकीवरून पाणीपुरवठा तोडला होता. तसेच शिंगणापूर व बालिंगा उपसा केंद्रे सील केली होती. तेव्हापासून महापालिका व पाटबंधारे विभागात थकीत पाणीपट्टीवरून कुरघोडीचा सूर आहे.

महापालिकेने पाटबंधारे विभागाला नोटीस देऊनही त्यांच्याकडून ९७ लाख ५५ हजार रुपयांचा भरणा मुदतीत झाला नाही. महापालिका प्रशासनाने शनिवारी दुपारनंतर पाटबंधारे विभागावर कारवाईचा निर्णय घेतला. पाटबंधारे विभागाकडील पंचगंगा भवनकडे ३५ लाख ६१ हरजार ३९७, तर वारणा भवन इमारतीकडील ६१ लाख ९३ हजार ९७७ अशी एकूण ९७ लाख ५५ हजार ३७४ रुपये थकबाकी आहे. या दोन्ही इमारतींकडील सहा नळ कनेक्शन तोडत पाणीपुरवठा बंद केला. वसुली अधिकारी मोहन जाधव, मीटर रीडर पंडित भादूलकर, रमेश मगदूम, एन. डी. चौगुले, रणजित संकपाळ, उदय पाटील, ताजुद्दिन सिद्धनाळे यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

दरम्यान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंता सुरेश कुलकर्णी कारवाईबाबत पूर्णत: अनभिज्ञ होते. त्यांना पाटबंधारेकडील थकीत रक्कम, कारवाईची प्रक्रियेची कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाचे भीकमांगो आंदोलन

0
0

भीक मागून शिक्षकांनी केला सरकारचा निषेध

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी भीक मागून आंदोलन करत सरकारचा निषेध केला. कोल्हापूर जिल्हा विनाअनुदानित वर्ग, तुकडी शिक्षक कृती समितीच्या वतीने आंदोलन करत विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील अतिरिक्त अथवा नैसर्गिक वाढीच्या सन २०१२/२०१३ या वर्षातील पाच हजार ९७३ तुकड्यांना सरकारने मान्यता दिली होती. मात्र चार वर्षे उलटूनही या तुकड्यांचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही. या तुकड्यांचे तत्काळ मूल्यांकन करावे, शिक्षकांचे थकीत वेतन देण्यात यावे, शाळांना अनुदान प्राप्त करून द्यावे, यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक विनाअनुदानित तुकडी व वर्ग कृती समितीचे अध्यक्ष जिनेश पुरवंत, उपाध्यक्ष सीमा पाटील, अनिल टेकाळे अमित कांदळकर, नामदेव यमेटकर यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुढीपाडवा खरेदीला सज्ज

0
0

गुढी पाडव्यासाठी बाजारपेठा सज्ज

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त शहरातील सर्वच बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. गुढी पाडव्यानिमित्त एकाच छताखाली इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट सजले आहे. नववर्षाचा मुहूर्त साधत ग्राहकांनी विविध वस्तू खरेदीसाठी बुकिंग केले आहे. काहींचे नव्या घराचे स्वप्न पाडव्याच्या मुहूर्तावर साकार होणार असून, नवीन वस्तू खरेदीची धांदल प्रत्येक कुटुंबात सुरू आहे. गुढीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी सायंकाळी शहरातील बाजारपेठा हाउसफुल्ल झाल्या होत्या.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत सोनेखरेदीला पसंती दिली जाते. सणानिमित्त अनेकांनी सोने-चांदी खरेदी आणि गृहप्रवेशासाठी गुढी पाडव्याचा मुहूर्त साधण्याचा बेत केला आहे. या दिवशी सोने-चांदीचे दागिने खरेदी केली जाणार असल्याने सराफ व्यवसायाला झळाली येणार आहे. काहींनी पसंतीनुसार दागिने बनविण्यासाठी ऑर्डर दिली आहे. बाजारपेठेत नवीन वस्तू खरेदीसाठी उधाण येणार आहे. एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिन, एसी, मोबाइल, ओव्हन, कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी विक्रेत्यांनी आकर्षक ऑफर दिल्या आहेत. दुचाकी, चारचाकी खरेदीवरही आकर्षक सूट, ऑफर्स दिल्या आहे. चिव्याची काठी, साखरेच्या माळा, फळे, फुले, चाफ्यांची माळ, कलश, मिनी गुढीसह खरेदीसाठी बाजारपेठांत मोठी गर्दी झाली. सायंकाळी शहरातील पानलाइन, शिंगोशी मार्केट, बिंदू चौकात नागरिकांची पूजेसाठी फुले, साहित्याचे पॅकेज, नारळासह खास गुढीसाठी भरजरी आणि जरीकाठच्या साड्या खरेदीसाठी गर्दी झाली. फुलांची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यासाठी अर्पाटमेंटमध्ये राहणाऱ्यांनी मिनी गुढी खरेदीला पसंती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य दुकानदारांचा विधान भवनावर सोमवारी मोर्चा

0
0

कोल्हापूर : सर्व रास्त भाव धान्य दुकान परवानाधारकांना सरकारी सेवेत समाविष्ट करून वेतन देण्यासह एकूण चार मागण्यांसाठी सोमवारी (ता. १९) विधानभवनावर महामोर्चा आयोजित केला आहे. ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकिपर्स फेडरेशन (पुणे) आणि स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान या दिवशी रास्त भाव धान्य दुकानदार, हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारक मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू नये, अशी मागणी फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर, राजू पसारे, मोहन पाटील यांनी अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटीच्या चालकास मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बस आडवी मारल्याच्या रागातून तीन तरुणांनी खानविलकर पेट्रोल पंपासमोर केएमटी बस अडवून चालकाला बेदम मारहाण केली. दीपक बाळासाहेब कांबळे (वय ३०, रा. शिंगणापूर, ता. करवीर) असे जखमी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी तिघा तरुणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला.

बसचालक कांबळे शाहू मैदानपासून शुगर मिलकडे चालले होते. भाऊसिंगजी रोडवर शिवाजी पुतळा ते सीपीआर चौक दरम्यान बस मोपेडच्या आडवी मारल्याच्या रागातून तीन तरुणांनी बसचा पाठलाग केला. नागाळा पार्कातील खानविलकर पेट्रोल पंपासमोर बस अडवून चालक कांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाण करून तीन तरुण मोपेडवरून पसार झाले. त्यानंतर चालक कांबळे यांनी बस रस्त्यात उभी करून शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर बस बाजूला घेतली. मारहाण करणाऱ्या तिघा अज्ञात तरुणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदवी प्रमाणपत्रांची नव्यांनी छपाई

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

tweet@Appasaheb_MT

कोल्हापूर :

शिवाजी विद्यापीठातील अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादाचा फटका विद्यापीठाला बसला आहे. पदवी प्रमाणपत्रावरील कुलसचिवांची सही रद्द करण्याचा प्रकार अंगलट येण्याची शक्यता लक्षात येताच प्रशासनाने कुलसचिवांची सही पूर्ववत ठेवण्याचा निर्णय घेतला. यासंबंधी तातडीने बैठक घेऊन कायदेशीर बाबींचा पडताळा करण्यात आला. त्यानंतर सोमवारी होणाऱ्या पदवीदान समारंभावेळी प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुमारे २५ हजार प्रमाणपत्रांची नव्याने छपाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

प्रशासनातील काहीजणांच्या अट्टहासामुळे विद्यापीठावर दुसऱ्यांदा प्रमाणपत्रे छापण्याची नामुष्की ओढवली. विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त समारंभ १९ मार्चला आहे. यंदा ५०,४४४ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. पदवीदान समारंभादिनी २४ हजार २४५ स्नातक प्रत्यक्ष पदवी स्वीकारणार आहेत. तर २६ हजार १९९ स्नातकांना घरपोच पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत.

पदवी प्रमाणत्रावर कुलगुरु व कुलसचिवांच्या स्वाक्षरी असतात. समारंभाचा तसा प्रघात आहे. यंदाच्या प्रमाणपत्रावर मात्र कुलसचिवांची स्वाक्षरी नव्हती. शिवाय पदवीदान समारंभाला यापूर्वीच्या तात्पुरत्या स्वरुपातील अॅकेडमिक कौन्सिलची मान्यता घेऊन 'अॅक्शन टेकन'प्रक्रियेव्दारे समारंभ होत आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार स्थापन झालेल्या नव्या अॅकेडमिक कौन्सिलची मान्यता घेण्यात आलेली नाही. केवळ व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली. कुलसचिवांच्या स्वाक्षरीविना वितरित करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राविषयी साशंकता निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने शुक्रवार, ता. १६मार्चच्या अंकात दिले होते.

लॅमिनेशनविना प्रमाणपत्रे

'मटा'तील वृत्तानंतर विद्यापीठ प्रशासन हडबडले. कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्रकुलगुरु डी. डी. शिर्के, परीक्षा मूल्यमापन संचालक महेश काकडे, कुलसचिव विलास नांदवडेकर यांच्यासह अधिकाऱ्यांची खलबते झाली. कायदेशीर सल्लाही विचारात घेतल्याचे वृत्त आहे. कुलसचिवांच्या स्वाक्षरीविना प्रमाणपत्रे वितरित केल्यास अडचणी उद्भवू शकतात, हे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ नव्याने पदवी प्रमाणपत्रे छापण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठातील प्रेसमधील अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या. त्यानुसार शनिवारी दुपारपासून नव्याने प्रमाणपत्रे छपाई सुरु झाली. नवीन प्रमाणपत्रे लॅमिनेशनविना असणार आहेत. दरम्यान पदवीदान समारंभात पदव्यांचे वाचन कुलसचिवांनी करायचा प्रघात आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत परीक्षा संचालक पदव्यांचे वाचन करत आहेत. हे नियमाला अनुसरून आहे का? अशी विचारणाही शैक्षणिक जगतात होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यसाठा जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोवा बनावटीचे मद्य विक्रीसाठी घेऊन आलेल्या संशयिताला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून पकडले. पथकाने पाच लाख ८८ हजार रुपयांचे मद्य जप्त केले. अधीक्षक गणेश पाटील यांच्या आदेशानुसार पथकाने शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी हांदेवाडी (ता. आजरा) येथे ही कारवाई केली. महाराष्ट्र सरकारचा महसूल चुकवून गोवा व कर्नाटकातील मद्य कोल्हापूर जिल्ह्यात आणून विकणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांना मिळाली होती. हांदेवाडी येथे गोवा बनावटीचा देशी-विदेशी मद्यसाठा असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने छापा टाकून कारवाई केली. कारवाईत पाच लाख ८८ हजार रुपयांचे मद्याचे १२४ बॉक्स जप्त केले. निरीक्षक अरुण कोळी, दुय्यम निरीक्षक ए. जी. पाटील, कॉन्स्टेबल दिलीप दांगट, विशाल भोई, अर्जुन जाधव, अभिजित थोरात, सुनील कलाल, अमर पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासात चार तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे ते कोल्हापूर एसटी प्रवासादरम्यान बॅगेत ठेवलेले चार तोळ्यांचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले. शुक्रवारी (ता. १६) दुपारी साडेतीन ते रात्री साडेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला. स्नेहल जीवन पाटील (वय २७, रा. लोहगाव, पुणे) यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. स्नेहल पाटील गुढी पाडवा सणासाठी पुण्याहून माहेरी कोल्हापुरात येत होत्या. पुणे-गारगोटी शिवशाही बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी चार तोळ्यांचे मंगळसूत्र प्लास्टिकच्या डब्यात घालून बॅगेत ठेवले होते. कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकात उतरल्यानंतर त्यांना मंगळसूत्र ठेवलेला डबा आढळला नाही. मंगळसूत्र चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यादेश नसल्याने प्लास्टिक बंदी कागदावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने प्लास्टिक व थर्माकोल बंदीची केली असली तरी बंदीबाबतचा अध्यादेश महापालिकेला अद्याप मिळाला नाही. त्यामुळे आज (रविवार) गुढी पाडव्यापासून होणारी प्लास्टिकबंदी कागदावरच राहणार आहे.

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक व थर्माकोलबंदीची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत केली आहे. रविवारपासून कॅरीबॅग्जसह प्लास्टिक व थर्माकोलपासून तयार केलेले ताट, कॅप्स, प्लेट्स, ग्लास, ताटे, वाटी, चमचे, स्ट्रॉ, कटलरी, स्प्रेड शीटस्, प्लास्टिक पाऊच, पॅकेजिंगवर बंदी घालण्यात आली आहे.

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केली असली तरी महानगरपालिकेला अध्यादेश मिळालेला नाही. सध्या महापालिकेकडून ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक बॅग्जवर बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून अध्यादेश आल्यावर त्याची अंमलबजावणी आयुक्तांच्या आदेशाने करण्यात येईल, असे मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छामरणाच्या पत्राने तपासाला गती

0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर: सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खूनप्रकरणी अपेक्षित गतीने तपास होत नसल्याने अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीसह इच्छामरणासाठी परवानगी मागितली आहे. राष्ट्रपती, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यपालांना हे पत्र पाठवले आहे. दोन महिन्यांपूर्वी पाठवलेल्या या पत्रामुळेच पोलिसांच्या तपासाला गती आली. मात्र, गुन्ह्यातील सबळ पुरावे जमा करण्यात पोलिसांकडून चालढकल सुरू असल्याने बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. योग्य पद्धतीने तपास न झाल्यास बाप-लेक इच्छामरणावर ठाम आहेत.

वारंवार पाठपुरावा करूनही तपास यंत्रणा हालत नसल्याने अखेर अश्विनीचे पती राजू गोरे यांनी राष्ट्रपतींसह सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यपालांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. 'पोलिसांची तपासातील टाळाटाळ आणि राज्य सरकारकडून योग्य दखल घेतली जात नसल्याने या गुन्ह्यात आम्हाला न्याय मिळेल याची खात्री वाटत नाही. राज्याच्या पोलिस महासंचालकांसह मुख्यमंत्र्यांनीही भेट घेणे टाळले. न्याय मिळवून देण्याऐवजी आमच्या जिवाला धोका असल्याची भीती घातली जाते. माझी नऊ वर्षांची मुलगी रोज आई कधी येणार? असे विचारते. न्याय मिळवण्याच्या फरफटीत तिचे बालपण आणि आमचे कौटुंबिक स्वास्थ्य हरवले आहे. आणखी अन्याय सोसण्यापेक्षा आम्हा दोघांना इच्छामरणाची परवानगी द्यावी.' मरणोत्तर अवयवदानाची इच्छाही त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

राजू गोरे यांनी पाठवलेल्या इच्छामरणाच्या पत्रामुळे तपासाला गती आली असली तरी, अद्यापही पोलिस खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी संशयितांना मदत करण्यात गुंतल्याचा बिद्रे-गोरे कुटुंबीयांचा आरोप आहे. ३१ जानेवारी, २०१७ मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करण्याऐवजी गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याची मुभाच आरोपीला दिली, असे मत बिद्रे-गोरे कुटुंबीयांचे आहे.

संशयितांवर गुन्हा दाखल होऊन ११ महिने उलटल्यानंतर वारंवार तपास अधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र, निवेदने पाठवूनही तपासाला गती मिळाली नाही. अखेर प्रसारमाध्यमांनी हा गंभीर गुन्हा लोकांसमोर मांडल्यानंतर पोलिसांना जाग आली. त्यांनी ७ डिसेंबर, २०१७ मध्ये कुरुंदकरला अटक केली. दरम्यानच्या ११ महिन्यात कुरुंदकरला पुरावे नष्ट करण्याची संधी मिळाली. अटकेनंतरही पोलिसांनी त्याला बोलते केले नाही. किंबहुना पोलिसांनी संशयिताच्या सोयीनेच तपास केल्याचा बिद्रे-गोरे कुटुंबीयांचा आरोप आहे. एसीपी संगीता अल्फान्सो यांच्या प्रयत्नामुळे चार आरोपींना अटक झाली. महेश फळणीकर या संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. पण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यातील पुरावे दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय बिद्रे-गोरे कुटुंबीयांना आहे. प्रसारमाध्यमे आणि अधिवेशनातील चर्चेमुळे काही प्रमाणात पोलिसांनी तपास केल्याचे दाखवले, परंतु हा तपास कोर्टात आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यास पुरेसा नसल्याचे मत बिद्रे-गोरे कुटुंबीयांचे आहे.

अन्यथा इच्छामरणाला परवानगी द्या

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक आहे. सत्तेतील पक्षाच्या माजी मंत्र्याचा भाचाही या गुन्ह्यात सहभागी आहे, त्यामुळे तपास यंत्रणेवर आणि फिर्यादींवर प्रचंड दबाव आहे. फिर्यादींनी तपासाचा पाठपुरावा करू नये, यासाठी त्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष धमकावले जाते. न्याय मिळत नसेल तर इच्छामरणावर ठाम असल्याचे राजू गोरे यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'प्रकाश आंबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटला'

0
0

सांगली : कोरेगाव-भीमाप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजींना अटक करण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा देताच भिडे गुरुजी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरेगाव-भीमाप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन असून त्यांच्या विधानामुळेच महाराष्ट्र पेटल्याचा दावा करताना आंबेडकर आणि एल्गार परिषदेकडून दंगलीच्या नुकसानभरपाईची वसुली करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच येत्या २८ मार्च रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने आज संभाजी भिडे गुरुजी यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच गेल्या चार-पाच वर्षात आपण पुण्याजवळच्या वढू गावाकडे फिरकोलच नसल्याचं स्पष्ट केलं. प्रकाश आंबेडकर हे विद्वेषाचं राजकारण करत आहेत. आपण सत्याची बाजू लावून धरत आहोत असं त्यांना वाटतंय. कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या वेळी त्यांनी जी विधानं केली त्यामुळेच महाराष्ट्र पेटला. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी आणि कोरेगाव-भीमाप्रकरणी त्यांना चुकीची माहिती देणाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणीही भिडे गुरुजींनी केली.

'१ जानेवारीच्या प्रकरणाशी माझा संबंध नाही. तरीही माझं नाव या प्रकरणाशी जोडण्यात आलं. भूत म्हणून जमीन बडविण्याचा हा प्रकार आहे,' असं त्यांनी सांगितलं. कोरेगाव-भीमा दंगलीला नेमकं कोण कारणीभूत आहे? याचा शोध घ्यायला हवा, असं सांगतानाच या प्रकरणात राज्यसरकार बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्याबद्दल चुकीची माहिती पसरविली जात असल्याने त्याच्या निषेधार्थ येत्या २८ मार्च रोजी राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मेवाणी, खलिद उमरला अटक करा

एल्गार परिषदेनंतरच दंगल पेटली. या हिंसाचारामागे एल्गार परिषद असून गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, विद्यार्थी नेता उमर खालिद आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील या दंगलीला कारणीभूत आहेत. त्यामुळे या सर्वांना तात्काळ अटक करण्याची मागणी भिडे गुरुजींनी केली. दंगलीला जबाबदार असणारे आंबेडकर, मेवाणी, उमर खालिद आणि कोळसे-पाटील यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली.

दलितांच्या मतांसाठीच सर्वकाही...

सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. त्यामुळे दलितांची मते घेण्यासाठीच सर्वच राजकीय पक्ष दंगलीचा वापर करत आहेत. यामागे निव्वळ मतांचा स्वार्थ असल्याचं सांगतानाच समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटेंना अटक करणं अयोग्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात तक्रार

0
0

सांगली :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात जातीय दंगलींबाबत केलेले वक्तव्य दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप करत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी सांगलीतील पोलीस ठाण्यात राज यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. राज यांच्या भाषणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या आधी येत्या काही महिन्यांत राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात हिंदू-मुस्लिम दंगली घडवल्या जातील, असा दावा करून राज ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली आहे. राज यांच्या या सनसनाटी आरोपानंतर राजकीय वातावरण तापलं असताना भाजपमधूनही राज यांच्यावर पलटवार होऊ लागला आहे. एकीकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी राज यांच्या भाषणाची खिल्ली उडवली असताना भाजपच्या आणखी एक पदाधिकारी नीता केळकर यांनीही राज यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यांनी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात राज यांच्या भाषणाविरोधात तक्रार केली आहे.

राज यांचे भाषण जातीय तेढ वाढवणारे असून त्यांच्याकडे अशी काही खात्रीशीर माहिती असेल तर ती न लपवता त्यांनी पोलीस आणि सरकारकडे द्यायला हवी, असे नीता केळकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी ही तक्रार स्वीकारताना कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करू, असे नीता केळकर यांना सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दादागिरी खपवून घेणार नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा नियोजन मंडळाकडून लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेला निधी येतो. त्याचे नियोजन करण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला असताना त्यात ढवळाढवळ करणारे पालकमंत्री कोण? या निधीत लोकप्रतिनिधींच्या कामांचा समावेश केला नाही तर प्रस्ताव नामंजूर करण्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्र्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी सर्वसाधारण सभेत दिला. तर सभेनंतर दलितवस्ती सुधारणा योजनेसाठी नगरसेवकांना डावलणाऱ्या सरकारच्या अध्यादेशाची काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांच्यावतीने महापालिकेच्या चौकात शंखध्वनी करत होळी करण्यात आली.

जिल्हास्तरावरील सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत (डीपीडीसी) दोन कोटी ९४ लाख व नागरी दलितेतर सुधारणा योजनांमधील एक कोटी २५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्याचे प्रस्ताव सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर होते. या प्रस्तावानुसार लोकप्रतिनिधींच्या कामांची टक्केवारी जास्त झाली असून काही नगरसेवकांनाच केवळ दोन लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

याबाबत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी डीपीडीसीकडून मिळणाऱ्या निधींचे नियोजन करण्याचे अधिकार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला आहेत. पण नगरसेवकांना विचारात न घेता लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांचा समावेश करुन नगरसेवकांच्या हक्कावर गदा आणली जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'या नवीन प्रस्तावामुळे नगरसेवकांना केवळ दोन लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. आम्हाला ही दोन लाख रुपयांची भीक नको. निधी द्यायचा असेल तर संपूर्ण नियोजन करण्याचे अधिकार महासभेला द्यावेत. अन्यथा सर्वच निधी पालकमंत्र्यांना परत द्या. त्यांनाच सारे नियोजन करु द्या. आम्ही त्यांच्या दारात बसून निधीसाठी 'भीक मांगो' आंदोलन करु.'

नागरी दलितेतर सुधार योजनेच्या निधीतील कामे करण्यासाठी केवळ आमदार, खासदारांच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल, असा अध्यादेश सरकारने नुकताच काढला आहे. त्याबाबतही सभेमध्ये देशमुख, भूपाल शेटे, जयश्री चव्हाण यांनी आवाज उठवला. या अध्यादेशातून सरकारने नगरसेवकांना प्रक्रियेतून बाजूला करण्याचे काम केले आहे. यातून भागातील निकडीची विकास कामे होणार नाहीत, अशी भीती देशमुख यांनी व्यक्त केली. तर शेटे यांनी या अध्यादेशामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर प्रहार करण्याचे षड‌्यंत्र असून त्याचा निषेध केला. त्यानंतर महापालिकेच्या चौकात महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, शारंगधर देशमुख, सभागृह नेते प्रविण केसरकर, शिक्षण सभापती वनिता देठे, नगरसेवक अर्जुन माने, निलोफर आजरेकर, शोभा कवाळे, वृषाली कदम, प्रतापसिंह जाधव, सुभाष बुचडे, रिना कांबळे यांच्या उपस्थितीत शंखध्वनी करत अध्यादेशाची होळी करण्यात आली.

इतिहास विभागाचे मत घ्यावे

राजर्षी शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार त्यांच्या नर्सरी बागेतील समाधीशेजारी राजगुरु रघुपती पंडित उर्फ पंडित महाराज यांची समाधी बांधण्याचा ठराव सभेमध्ये मंजूर करण्यात आला. तर नगरसेवक भूपाल शेटे यांनी काहीजण पंडित महाराजांची समाधी शेजारीच व्हावी, असा विपर्यास केला जात असल्याचे मांडले. तसेच महाराजांच्या पत्राचा शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागाकडून अभ्यास केला जावा, असेही सुचवले. सभेपूर्वी राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनीच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नगरसेवकांना शाहू महाराजांचा आदेश, गुलाब फूल देऊन शाहू महाराजांच्या इच्छेनुसार पंडित महाराज यांची समाधी व्हावी, असे निवेदन दिले. यावेळी उदयसिंह राजेयादव, राकेश तुपारे, प्रमोद सावंत, नारायण शिंदे, संचिता कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाशझेप आता कमी खर्चात शक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अवकाश संशोधनाला सध्या नवतंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे अवकाशझेप घेण्यासाठीच्या संधींच्या कक्षा रूंदावल्या असून, कमी निर्मितीमूल्यांमध्ये दर्जेदार स्त्रोत करण्याचा शास्त्रज्ञांचा आत्मविश्वासही दुणावला आहे,' असे मत अवकाश शास्त्रज्ञ व 'इस्त्रो'चे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. स्नातकांशी संवाद साधताना किरणकुमार यांनी अवकाश संशोधनात खुणावणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरावी, असे आवाहनही त्यांनी केले.

किरणकुमार म्हणाले, 'सिद्धतेच्या कसोटीवर उतरत असलेल्या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर भविष्यात अवकाशासह इतर ग्रहांवरील सफरपूर्तीवर होणार आहे. मात्र त्यासाठी संशोधनाकडे वळणाऱ्या युवकांची देशाला गरज आहे. सध्या अवकाश संशोधनात चांद्रयान २ व आदित्य एल १ या मिशनवर काम सुरू आहे. संमिश्र साधनांचा वापर करून कमी खर्चात दर्जेदार याननिर्मिती करण्याचे स्वप्न आहे. 'इस्त्रो'नेही तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत असताना यातून अवकाशसंशोधनाची मालिका सुरू केली आहे. नाविन्यपूर्ण संशोधन हा प्रत्येक शास्त्रज्ञाचा ध्यास असला पाहिजे हा इस्त्रोचा पहिला मंत्र आहे. हा मंत्र जपण्यासाठी तंत्रज्ञानासारखा दुसरा मित्र नाही.'

ते म्हणाले, 'तंत्रज्ञान हे केवळ माणसाच्या व्यक्तिगत प्रगतीपुरतेच सीमित नाही तर त्यातून समाजस्वास्थ्य राखण्यासाठीही संशोधकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सध्या माणसाने निसर्गाला दिलेल्या आव्हानाचे फटके बसत आहेत. हवामानातील अवकाळी बदल हा मानवी जीवनाला धोकादायक आहे. त्यातून आजारांचे प्रमाण वाढत आहे. नवे आजार उद्भवत आहेत. तंत्रज्ञान इथेही उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी हवामानातील बदलांवर पूर्वनियंत्रण ठेवून आजार फैलावणाऱ्या विषाणूंवर मात करण्याचे सामर्थ्य तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित करण्याची वेळ आली आहे. इस्त्रोचे मार्स ऑरबिटर मिशन हे नाविन्यासाठी घेतलेल्या कष्टाचे फळ होते. भविष्यातही अवकाशसंशोधनासाठी तंत्रज्ञानावर भर देत देशाला अवकाश संशोधनातील महामेरू बनवायचे आहे.'



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकचा वापर रस्त्याच्या कामासाठी करावा

0
0

कोल्हापूर : 'निरुपयोगी प्लास्टिक बारीक करुन त्याचा वापर रस्त्याच्या कामासाठी वापर करावा. मार्केट यार्डजवळील शॉर्टिंग शेडमध्ये आठ टन निरुपयोगी प्लास्टिक साठले आहे. त्याचा रस्त्याच्या कामासाठी पुनर्वापर करावा,' अशी मागणी एकटी संस्थेतर्फे आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे करण्यात आली.

एकटी संस्था गेल्या दहा महिन्यापासून दोन प्रभागातील कचऱ्यापासून खत निर्मिती करते. या प्रकल्पात काम करणाऱ्या मैलखड्डा येथील कचरावेचकासाठी शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करावी. प्रभाग क्रमांक ३२ मध्ये एकटी संस्थेने सलग दोन महिने कचरा व्यवस्थापन केले. परंतु, येथे शुल्क देण्यास नकार मिळाल्यामुळे काम थांबवावे लागले. त्या प्रभागात संस्थेचे ७० हजार रुपये खर्च झाले आहेत. महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात नागरिकांत जनजागृती करावी, अशी मागण्या करण्यात आली. शिष्टमंडळात अनुराधा भोसले, जैनुद्दिन पन्हाळकर, राहुल संकपाळ, वनिता कांबळे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकींच्या धडकेत दोघे गंभीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेंडा पार्क ते आर. के. नगर चौक मार्गावर कुष्ठधामसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. सुधाकर अशोक भंडारी (वय २७, रा. सुभाषनगर, साई मंदिराजवळ) आणि रेहान जाफर देसाई (२३, रा. पाचगाव) अशी जखमींची नावे आहेत. गस्तीसाठी गेलेल्या निर्भया पथकाने जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

याबाबत अधिक माहिती अशी : सुधाकर भंडारी मोपेडवरून आरकेनगर चौकातून सुभाषनगरकडे निघाला होता, तर रेहान देसाई हा सुभाषनगरकडून पाचगावकडे निघाला होता. कुष्ठधामजवळ त्यांच्या दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. धडकेत दोघेही रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, गस्तीसाठी गेलेल्या निर्भया पथकाने जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच भंडारी आणि देसाई यांही नातेवाइकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कॉमन मॅन'ची रिक्षाचे कर्ज माफ करण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आरटीओच्या कचखाऊ धोरणामुळे शहरात अवैध वाहतूक वाढल्याने रिक्षा व्यावसायिकांचे उत्पन्न घटले आहे. रिक्षा व्यावसायिक कर्जबाजारी झाल्याने रिक्षासाठी घेतलेले कर्ज माफ करावे,' अशी मागणी कॉमन मॅन तीन आसनी रिक्षाचालक संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले.

कोल्हापूर शहरात एक हजार परवानाधारक रिक्षा असून, मोठ्या संख्येने विनाॉपरवाना रिक्षा व्यवसाय केला जात आहे. विनापरवाना रिक्षा व्यावसायिक कोणतेही कर भरत नाहीत. आरटीओ, पोलिसांचे नियम न पाळता व्यवसाय करत आहेत. अॅपे रिक्षा, सहाआसनी रिक्षा, टाटा मॅजिक या वाहनांमुळे परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांवर गदा आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यास आरटीओ अपयशी ठरल्याने रिक्षा व्यवसाय अडचणीत असून, तो कर्जबाजारी झाला आहे. रिक्षा व्यवसायासाठी रिक्षासाठी घेतलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात बाबा इंदूलकर, अविनाश दिंडे, जाफर मुजावर, संजय भोळे, चंद्रकांत ओतारी आदि रिक्षा चालकांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images