Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इस्लामपूर: राजू शेट्टींच्या कार्यालयाची तोडफोड

0
0

इस्लामपूर :

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ शनिवारी दुपारी इस्लापूरमध्ये रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाची तोडफोड केली. प्रचंड घोषणाबाजी करत राजू शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन केले.

खोत यांच्यावरील दगडफेकीची माहिती मिळताच रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते येथील शिवाजी पुतळ्याजवळ जमा झाले. त्यांनी स्वाभिमानीच्या कार्यालयात घुसून तेथील संघटनेचा फ्लेक्स काढून टाकला. खिडकीच्या आणि केबिनच्या काचा फोडल्या. कार्यालयाची तोडफोड करून तसेच शेट्टींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी खोत समर्थकांनी राजू शेट्टींविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनतेच्या प्रेमामुळेच ऊर्जा मिळते: उदयनराजे

0
0

सातारा :

रात्री-अपरात्री कधीही मित्रत्वाच्या नात्याने हाक मारा, मी तयार असेन. जनतेच्या प्रेमामुळेच आपल्याला ऊर्जा आणि ताकद मिळते, अशा शब्दात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचा ५१ वा वाढदिवस शनिवारी साताऱ्यात खूप उत्साहाने साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते. पवारांच्या उपस्थितीमुळे उदयनराजे भावुक झाले होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. उदयनराजेंनी आपल्या मनोगतात चौफेर फटकेबाजी केली. अनेक गंमतीही सांगितल्या. ते म्हणाले, 'मागे एका सभेत मी म्हणालो की, ३६५ दिवस २४ तास कधीही मला हाक मारा, मी तुमच्या सेवेशी हजर आहे. त्यानंतर एकदा रात्री पावणेदोनला मला काही युवकांचा फोन आला. मी म्हणालो, काय झालंय. तर त्या युवकांनी सांगितलं की, असंच पिक्चरला आलो होतो. तुम्ही म्हणाला कधीही फोन करा म्हणून रात्री तुम्हाला कॉल केला!' अशी गंमत सांगितली तरी ते म्हणाले की कधीही हाक मारा मी तुमच्यासाठी कधीही धावून येईन.

'उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत मात्र, राज्याच्या राजकारणातील मुक्त विद्यापीठ आहेत. प्रेमाला प्रेम देणारे पण अन्यायाविरुद्ध कोणतीही पर्वा न करता आवाज उठवणारे अशी त्यांची ख्याती आहे,' अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौतुक केलं.

उदयनराजेंविषयी संपूर्ण देशातील खासदारांना कायमच उत्सुकता असते. ते दिल्लीत कमी बोलत असले तरी जेव्हा बोलतात तेव्हा साताऱ्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल एकत्रित येऊन काय करावं लागेल, याचीच चर्चा करत असतात, असं शरद पवार म्हणाले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्टाची शिक्षण परिषद रविवारी

0
0


कोल्हापूर : फुले-आंबेडकर शाहू टीचर्स असोसिएशन तथा फास्टा संघटनेच्या वतीने रविवारी (ता.२५) शिक्षण परिषदेचे आयोजन केले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शाहू स्मारक भवन येथे ही परिषद होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते व प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे प्रमुख डॉ. मर्झबान जाल प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच गौतमीपुत्र कांबळे, डॉ. टी. एस. पाटील, डॉ. पी. एस. कांबळे, प्रा. सुभाष दगडे, आदी तज्ज्ञांचे बीजभाषण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे पाय आणखी खोलात

0
0

राष्ट्रवादीचे पाय आणखी खोलात

नगरसेवक मुरलीधर जाधव पक्ष सोडण्याच्या तयारीत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपायची चिन्हे दिसेनात. स्थायीच्या राजकारणावरुन पक्षांतर्गत धुसफूस आणि संशयाचे वातावरण असताना नगरसेवक व माजी स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा इशारा देत नेत्यांना आणखी एक धक्का दिला. 'प्रा. जयंत पाटील यांच्यासारख्या निष्ठावान व प्रामाणिक नेत्याला पक्षात मानसन्मान मिळत नसेल तर अशा पक्षात राहणे योग्य वाटत नाही. पक्ष नेतृत्वाने वेळीच पक्षांतर्गत धुसफूस आणि संशयाचे वातावरण दूर करुन आघाडी मजबूत करावी अन्यथा कोणत्याहीक्षणी पक्ष सोडू, नगरसेवकपद गेले तरी बेहत्तर, असा निर्वाणीचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

नगरसेवक जाधव प्रा. पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण व नगरसेवक अफजल पिरजादे यांनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा व पक्षाच्या उमेदवार मेघा पाटील यांचा नामुष्कीजनक पराभव झाला. राष्ट्रवादीतील त्या दोघा नगरसेवकांना राष्ट्रवादीचे महापालिकेतील नेते प्रा. जयंत पाटील यांची फूस असल्याचा आरोप झाला. त्याचा पाटील यांनी इन्कार केला आहे.

मुरलीधर जाधव म्हणाले, 'स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने पराभवास सामोरे जावे लागले. नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांचा यात काहीही संबंध नसताना त्यांची फूस असल्याचा संशय निर्माण झाला आहे. पक्षानेही त्यांच्यावर अविश्वास दाखविला आहे. मात्र या फोडाफोडीत त्यांचा काडीमात्र संबंध नाही. त्यांच्यावर होणारे आरोप, पक्षांकडून दाखविला जाणारा अविश्वास जिव्हारी लागला आहे.त्यांच्यासारख्या निष्ठावान व प्रामाणिक नेत्याला पक्षात मानसन्मान मिळत नसेल तर अशा पक्षात राहणे योग्य वाटत नाही. प्रा.पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत जीवाचे रान करुन नेत्यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण केली, पक्षाला विजय मिळवून दिला. महापालिकेवर पक्षाची सत्ता स्थापण्यासाठी प्रा. पाटील यांची धडपड, त्यांचे नियोजन व पक्षाबद्दलची निष्ठा या गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. प्रा. पाटील हे माझे मागर्दर्शक असून ते मला देवासमान आहेत.'

............

नाराजी नेत्यांना कळविली

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मेघा पाटील यांच्या उमेदवारीवरुन पक्षातील नगरसेवकांत नाराजी होती. हे प्रा. पाटील यांनी आमदार मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणले होते. नगरसेवक पिरजादे व चव्हाण यांची नेत्यांसोबत भेट घडवून आणली होती, असा नवा खुलासा करत नगरसेवक जाधव यांनी केला. माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर यांनाही या व्यथा कळविल्या आहेत.

..............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीला गळती...सत्तेला धोका?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतील पराभवाची जखम ताजी असताना राष्ट्रवादी काँग्रेसवर शनिवारी पुन्हा आघात झाला. राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी पक्षांतर्गत राजकारणाचा मुद्दा रेटत पक्षाला राम राम ठोकण्याचा पवित्रा घेतल्याने महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला गळती लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक यापूर्वीच भाजप-ताराराणी आघाडीच्या गळाला लागले आहेत. पक्षातील आणखी पाच नगरसेवक भाजप आघाडीच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. नाराजांच्या संख्येत भर पडून इतरांनीही नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्यासारखा मार्ग अवलंबला तर महापालिकेतील काँग्रेस आघाडीच्या सत्तेला स्पष्ट धोका संभवत आहे. नाराज नगरसेवकांच्या माध्यमातून पक्ष नेतृत्वावरच निशाणा साधला जात आहे.

स्थायीतील घडामोडींमागे राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांचा हात असल्याचा संशय निर्माण झाला आहे. मात्र, प्रा. पाटील यांनी याप्रकरणी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा आमदार हसन मुश्रीफ यांच्याकड केला. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने यांनी स्थायीतील सूत्रधारावर कधी कारवाई होणार, असा सवाल जिल्हा नेतृत्वाला अर्थात आमदार मुश्रीफांना केला आहे. पक्षातील अनेक नगरसेवक पद न मिळाल्याने नाराज आहेत. दोघा नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा, जाधव यांचा पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा, यामुळे राष्ट्रवादीसमोरील संकटात भर पडत आहे.

दुसरीकडे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नाराज घटकांवर लक्ष ठेवून आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने नेतेमंडळींनी महापालिकेत कमळ फुलविण्यासाठी हात सैल सोडले आहेत. एकेक नाराज नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी 'सर' करण्यासाठी त्यांना महापालिकेतील काही जणांची साथ लाभत असल्याचे चित्र आहे. भाजपला महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आठ नगरसेवकांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचे दोघे सध्या सोबतीला आहेत. पाचजण संपर्कात आहेत, यामुळे भविष्यात सत्ताधारी आघाडीला धोका पोहोचू शकतो.

तिघेही जयंत पाटीलसमर्थक

स्थायीतील घडामोडीनंतर पक्षांतर्गत संशयाचे वातावरण आणि धुसफूस यामुळे राष्ट्रवादीतील वातावरण दूषित झाले आहे. प्रा. पाटील महापालिकेत राष्ट्रवादीचे कारभारी म्हणून वावरतात. ते आमदार मुश्रीफ यांच्या जवळचे समजले जातात. मात्र, स्थायी प्रकरणात त्यांच्या भोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी पक्षांतर्गत दबाव वाढत आहे. दुसरीकडे प्रा. पाटील यांनी संशयाचे वातावरण दूर होत नाही, तोपर्यंत महापालिका कामकाजात सहभाग घेणार नाही असे म्हटले आहे. पिरजादे, चव्हाण आणि जाधव हे तिघेही प्रा. पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीतील आणखी चार नगरसेवक प्रा. पाटील यांचे पाठीराखे समजले जातात. जाधव यांचा पक्षाला इशारा म्हणजे प्रा. पाटील यांची ताकद दाखविण्याचा प्रयत्न आहे. यामुळे पक्षनेतृत्वाला कारवाई करताना विचार करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावडा रस्त्यांवर कारने तिघांना ठोकरले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा रस्त्यावर शनिवारी रात्री कारने धडक दिल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले. संतप्त जमावाने कारचालकाला बेदम चोप देऊन कारचे नुकसान केले. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर पाचशेहून अधिक युवक घटनास्थळी उपस्थित होते. जखमींना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहिती अशी : शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भगवा चौकातून भरघाव वेगाने कार कसबा बावड्यातील मुख्य रस्त्यावरुन शियेकडे जात होती. कारने चव्हाण गल्लीच्या कॉर्नरवर एका मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील तरुण हवेत उडाले व कारच्या टपावर आदळून रस्त्यावर पडले. उपस्थित नागरिकांनी कारचालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने कार वेगाने पळवण्यास सुरुवात केली. पिंजार गल्लीच्या कॉर्नरवर कारने एका युवकाला धडक दिली. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दोन अपघातांमुळे चालकाचा कारवर ताबा सुटल्याने कार ट्रकवर जाऊन आदळली. पळून जाणाऱ्या चालकाला पकडून संतप्त जमावाने चालकाला बेदम चोप दिला. त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. चालकाचा पाठलाग करणाऱ्या जमावाने कारवर राग काढत कारचे नुकसान केले. अपघाताचेनंतर कसबा बावड्यातील तरुण मोठ्या संख्येने मुख्य रस्त्यावर आले. त्यांनी कारचा चक्काचूर करुन टाकला. अपघाताचे वृत्त कळताच शाहूपुरी पोलिस घटनास्थळी आले. तिघा जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा मार्चला गोलमेज परिषद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारप्रमाणे सध्याचे भाजप-शिवसेनेच्या सरकारकडूनही मराठा आरक्षणसंबंधी चालढकल सुरू आहे. या सरकारने समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल. कोल्हापुरात १२ मार्च गोलमेज परिषद घेऊन आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा निश्चित केले जाईल,' असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे प्रमुख व रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिला. सरकारने येत्या शैक्षणिक वर्षासाठी मराठा समाजातील मुला-मुलींची इंजिनीअरिंग, मेडिकलसह सर्व प्रकारचे शिक्षण शुल्क माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली.

येथील शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या मेळाव्यात बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री व मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'राज्यभरातील ५० मराठा संघटना आज आरक्षणप्रश्नी गप्प आहेत. पालकमंत्री पाटील यांनी मराठा संघटनेच्या प्रमुखांना जवळ घेतले, पण समाजाच्या पदरात काहीच पडले नाही, एका अर्थी समाजाची फसगत झाली,' अशा शब्दांत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. मराठा संघटना महाराष्ट्रतर्फे मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी बाळ घाटगे होते. मेळाव्यात मराठा आरक्षण लढाईचे नेतृत्व सुरेश पाटील यांच्याकडे सोपविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

सुरेश पाटील म्हणाले, 'मराठा समाजातील मुला-मुलींना नोकरी व शिक्षणात आरक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी पाच हजार कोटींची तरतूद करून केवळ मराठा समाजासाठी अंमलबजावणी करावी आणि अरबी समुद्रात भव्य शिव स्मारकाची उभारणी करावी, या तीन प्रमुख मागण्या आहेत. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाज जागा झाला. राज्यभरात ५७ मूक मोर्चे काढून समाजाने ताकद दाखवली. मात्र, पूर्वीच्या सरकारप्रमाणेच सध्याचे राज्यकर्तेही चालढकल करत आहेत. यामुळे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्यभर आंदोलन उभारू. १२ मार्चला शाहू स्मारक भवन येथे भव्य स्वरूपात गोलमेज परिषद घेऊन आंदोलनाची दिशा निश्चित करू.'

यावेळी छावा संघटनेचे राजू सावंत, संतोष कांदेकर, प्रा. मधुकर पाटील यांची भाषणे झाली. व्यासपीठावर चंद्रकांत पाटील, श्रीकांत भोसले, अॅड. सुरेश कुराडे, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते.

...........

अधिवेशन होऊ देणार नाही

मराठा संघटना महाराष्ट्रचे बाळ घाटगे म्हणाले, 'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन पसरेल. या अधिवेशनात आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर पुढील पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही. मंत्री व आमदारांना त्यांच्या निवासस्थानी घेराव घालू. त्यांना घराबाहेर पडू देणार नाही.'

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयित तरुणाला चोप

0
0



कसबा बावडा: येथील शुगर मिल चौकातील मधुमती कॉलनीमध्ये रात्री साडेआठच्या दरम्यान एक संशयित तरुणास जमावाने बेदम मारहाण केली. मधुमती कॉलनी येथील सूर्यवंशी यांच्या बंगल्यात प्रवेश करत असताना बिहारी तरुणास काहींनी हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली. संबंधित तरुण सायंकाळपासून या परिसरात संशयास्पदरित्या फिरत होता. जमावाने त्याला मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इमारतीला आग लागून १० लाखांचे नुकसान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरीतील जैन मंदिराशेजारी असलेल्या अरविंद श्रीपतराव पिसे यांच्या तीन मजली इमारतीला रविवारी (ता. २५) सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. या भीषण आगीत प्रापंचिक साहित्यासह इमारतीत राहायला असलेल्या दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची शेकडो चित्रे आणि पेंटिंगचे साहित्यही जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या सहा बंबांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवली, मात्र या आगीत सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. रविवारचा बाजार सुरू होतानाच आग लागल्याने नागरिकांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी वर्तवला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपुरीतील पानलाइनमध्ये जैन मंदिराशेजारी अरविंद पिसे यांची ४० वर्षांपूर्वीची दुजमली इमारत आहे. या इमारतीतील पहिला मजला हा उमेश शेटे यांना भाड्याने दिला आहे. या ठिकाणी शेटे यांचे दि बॉम्बे टोबॅके सेंटर आहे. पाठीमागे पिसे दाम्पत्य राहते. दुसऱ्या मजल्यावरील चार खोल्यांमध्ये दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी भाड्याने राहतात. सोमवारी सकाळी सूरज शेलार, पंकज गावंडे, सिद्धेश साळसकर, गणेश राऊळ, कृष्णा म्हेतर, भूषण म्हापणकर आदी विद्यार्थ्यांची आवराआवर सुरू होती. सकाळी साडेसातच्या सुमारास साळसकर या विद्यार्थ्याला इमारतीच्या पाठीमागील खोलीतून येणारे धुराचे लोट दिसले. त्याने आरडाओरडा करून इतर मित्रांना इमारतीबाहेर पडण्यास सांगितले. विद्युत प्रवाह बंद करून सर्वजण खाली आहे. काही वेळातच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग भडकली. आठवडी बाजार असल्याने अनेक विक्रेते दुकान मांडण्याच्या तयारीत असतानाच हा प्रकार घडल्याने विक्रेत्यांमध्येही गोंधळ निर्माण झाला. दुसऱ्या मजल्यावरील चारही खोल्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या.

लाखोंची चित्रे जळाली

दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी काढलेली सहाशेहून अधिक चित्रे याच इमारतीत ठेवली होती. याशिवाय लॅपटॉप, सुमारे ५० हजार रुपयांची रोकड, पुस्तके, कपडे, पेटिंगचे साहित्य आगीत जळाले. डोळ्यांदेखत मौल्यवान चित्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने विद्यार्थ्यांना धक्का बसला. अचानक आगीचा प्रकार लक्षात आल्याने त्यांना खोलीतील एकही वस्तू सोबत घेता आली नाही. लाखोंची चित्रे आणि मेहनत जळून खाक झाल्याने विद्यार्थ्यांना नाराजी लपवता आली नाही.

वीस वर्षात दुसऱ्यांदा आग

पिसे यांच्या याच इमारतीत वीस वर्षांपूर्वी आग लागली होती. त्या आगीत इमारतीचे किरकोळ नुकसान झाले होते. रविवारी लागलेल्या आगीत मात्र मोठे नुकसान झाले आहे. इमारत जुनी असली तरीही मजबूत आहे. लाकडाचा वापर अधिक असल्याने आग वाढली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही, मात्र शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी वर्तवला आहे. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२० कोटींच्या कामांना ब्रेक

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी तत्त्वावरील सर्व कर्मचा-यांनी गेल्या दहा दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे प्रस्तावित, प्रगतिपथावर, मंजुरीच्या टप्यातील जिल्ह्यातील १२० कोटींची नवीन रस्ते, पूल, रस्त्यांची देखभाल दुरुस्तींच्या कामांना ब्रेक लागला आहे. आंदोलन राज्यस्तरावर सुरू असल्याने प्रलंबित मागण्यांप्रश्नी सरकारशी चर्चा करून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलनाची धार वाढणार असल्याचे दिसत आहे. परिणामी येथील ग्राम सडक योजना कार्यालयातील कामकाज ठप्प राहून त्याचा विकासकामांवर परिणाम होणार आहे.

येथील जिल्हा परिषदेसमोरील कागलकर हाउसमध्ये प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत कार्यालये आहेत. त्या कार्यालयांतून केंद्रस्तरावरून प्रधानमंत्री आणि राज्यस्तरावरून मुख्यमंत्री विभागातून रस्ते, पूल बांधकाम, दुरुस्तीच्या कामांना निधी मिळतो. या कार्यालयात कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक, स्थापत्य अभियंता सहायक अशी पदावर कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त कर्मचारी काम करतात. त्यांची २०१२ पासून देय वेतनवाढ मिळावी, अपघाती विमा संरक्षण मिळावे, वैद्यकीय रजा आणि प्रवास भत्ता नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळावे, अशी मागणी आहे. या मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी सरकारकडे अर्ज, विनंत्या केल्या. मात्र, सरकारने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा कार्यालयातील १३ आणि राज्यातील ७३४ कर्मचा-यांनी १५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनात कार्यालयातील महत्त्वाच्या पदांवरील सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. रस्ते, पूल, जलसंधारणाची कामे जैसे थे आहेत. ब्रेक लागलेल्या कामांत सर्वाधिक रस्त्यांची कामे आहेत. अनेक रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. खडी, मुरूम टाकले आहे. मात्र, पुढील काम आंदोनामुळे थांबले आहे. त्याचा त्रास संबंधित भागातील वाहनधारकांना होत आहे. राज्यस्तरीय आंदोलन असल्याने जिल्हापातळीवरील अधिकाऱ्यांकडे काम कधी सुरू होणार यासंबंधीचे ठोस उत्तर नाही.

०००००

कोट...

विविध मागण्यांसाठी ग्राम सडक कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामे बंद आहेत.

एस. एन. शेळके, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

-------

वेतनवाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी १५ फेब्रुवारीपासून कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १२० कोटींच्या रस्त्यांसह, पुलांची कामे ठप्प आहेत. सरकारने सकारात्मक तोडगा न काढल्यास आंदोलन तीव्र करणार आहे.

गणेश गायकवाड, कंत्राटी कनिष्ठ अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

-------------------

२९७ कि.मी.चे रस्ते

कामांना ब्रेक लागलेले महत्त्वाचे रस्ते असे : करवीर : दोनवडे ते सांगरूळ, शिये-रामनगर, तामगाव ते मुडशिंगी वसाहत, निगवे खालसा ते म्हसोबा माळवाडी, कळंबा ते कात्यायनी पार्क, वडगाव ते वाकरे मळा, कंलदगाव, कोगिल खुर्द, कणेरी, कोगील रस्ता, मुडशिंगी ते कागले वसाहत, सरनोबतवाडी ते पाटील कृषी कॉलनी रस्ता, गोकुळ शिरगाव ते माळवाडी रस्ता. यासह कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी, चंदगड, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यातील लाखो रुपयांच्या रस्त्यांची कामे आहेत. याशिवाय आठ पुलांची कामे थांबली आहेत. २९७ किलोमीटरच्या ८१ रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागला आहे.

---------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरातही तापमान वाढले

0
0

कोल्हापूर:

गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरचे तापमान वाढले आहे. ३३.६ अंशापर्यंत तापमानाची नोंद गेली असून त्यामुळे सकाळी दहापासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे. दुपारी तर झळांनी भाजून काढले जात आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडयात ही काहीली होत असताना एप्रिल मे महिन्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज बांधला जात आहे. उन्हाचा तडाखा कमी करण्यासाठी थंड पेयांचा आस्वाद घेण्याबरोबर फळे खरेदीकडेही कल वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीआर बॉइज टोळीवर मोकाअंतर्गत आरोपपत्र दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संघटित गुन्हेगारीच्या जोरावर हातकणंगले तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या आरपी बॉइज या टोळीवर पोलिसांनी पुण्यातील मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल केले. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीवसुली करणे असे गंभीर गुन्हे या टोळीतील गुंडांवर दाखल आहेत. टोळीतील तिघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. टोळीप्रमुख प्रवीण दत्तात्रय रावळ (वय ३१), अजित आप्पासो नाईक (२२) आणि श्रीधर विद्याधर गस्ती (२६, तिघेही रा. गणेशनगर, शहापूर, इचलकरंजी) या गुंडांवर कारवाई झाली आहे.

हातकणंगले, इचलकरंजी परिसरात गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी मोकाची कारवाई सुरू केली आहे. प्रवीण रावळ या टोळीप्रमुखासह आजित नाईक, श्रीधर गस्ती या तिघांवर मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिसांनी आयजी विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव पुढे राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक बिपिन बिहारी यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच तिन्ही गुडांवर पुणे येथील विशेष मोका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. उपविभागीय उपअधीक्षक सूरज गुरव यांनी तपास केला होता. अशा पद्धतीची कारवाई अन्य टोळ्यांवरही होणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध घोटाळ्याची चौकशी दोषींच्या मार्गदर्शनाखाली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद औषध खरेदी घोटाळ्याची चौकशी दोषीच्या मार्गदर्शनाखालीच झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे चौकशीवेळी क्लिनचीट दिलेल्या मुद्यांची सविस्तर चौकशी करून नेमका किती रकमेच्या औषध खरेदीत अनियमितता झाली आहे,यामध्ये कोणाचा सहभाग आहे, त्याचा सविस्तर अहवाल तातडीने देण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कुणाल खेमनार यांनी वित्त विभागाला दिला. यामुळे शनिवार, रविवार सुटीचा दिवस असतानाही वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. सोमवारी दिवसभर बसून अहवाल अंतिम केला जात होते.

औषध घोटाळ्यातील दोषींना वाचवणारा चौकशी समितीने दिलेला अहवाल, क्लिनचीटचा प्रकार यासंबंधी महाराष्ट्र टाइम्सने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर डॉ. खेमनार यांनी त्वरित दखल घेत सविस्तर चौकशी अहवाल मागितला. दरम्यान, याप्रकरणी दोषी असल्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांना येत्या दोन दिवसात नोटीस दिली जाईल, असे सीईओ डॉ. खेमनार यांनी महाराष्ट टाइम्सशी बोलताना सांगितले. कागलकर हाऊसमधील औषध भांडारात जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना पुरवठा करावयाच्या औषध खरेदीत घोटाळा झाल्याच्या तक्रारी झाल्या.

सरकारच्या आदेशानुसार औषध खरेदीमध्ये अनियमितता होऊ नये, त्रुटी राहू नये यावर नियंत्रण ठेवण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांची आहे. त्यामुळे औषध खरेदीमधील नियम, अटींचा भंग, अनियमिततेस जिल्हा आरोग्य अधिकारी दोषी आहेत. असे असल्यामुळे त्रयस्त अधिकाऱ्यांतर्फे औषध खरेदी प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक होते. मात्र तसे न करता आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यू. जी. कुंभार यांची निवड केली.

विशेष म्हणजे त्यांची निवड डॉ. पाटील यांनीच केली. त्यामुळे चौकशी डॉ. पाटील यांच्या दबावाखाली झाल्याच्या आरोपात तथ्य असल्याचे पुढे आले. औषध निर्माण अधिकाऱ्यांवर सर्व आरोप ठेवून इतर लोकांना वाचवणारा अहवाल आल्याचा संशय बळावला. नेमका कुणी कितीचा घोटाळा केला, याबद्दल स्वंयस्पष्टता अहवालात नव्हती. या सर्वांवर प्रकाशझोत टाकणारे वृत्त मटाने प्रसिद्ध केले. त्यानंतर दडपलेला अहवाल घेऊन धावपळ सुरू झाली. सीईओ डॉ. खेमनार यांनी सविस्तर अहवाल दिला. या अहवालात काय दडलय याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

कमी रकमेची आर.सी. लपवली

दर करारातील (आरसी) सर्वात कमी किंमतीचे औषध खरेदी करावा, असा नियम आहे. परंतु, आरसीतील काही औषधे कमी दराची होती. तरही मलई दिलेल्या कंपनीची चौपट दराने औषध खरेदी केल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. अशा डल्लामारू टिपनीवर मुख्य लेखा अधिकाऱ्यांची सही घेताना कमी किंमतीची आर.सी. जोडली नसल्याचेही सविस्तर चौकशीतून सोमवारी पुढे आले. यामुळे अशा टिपनीवर सही केलेले अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅसिडचा कॅन फुटल्याने चौघे जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा बसस्थानक ते शिंगणापूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या ॲपे रिक्षात महिलेजवळ असलेला ॲसिडचा कॅन फुटल्याने रिक्षातील चौघे जखमी झाले. जखमींमध्ये दोन विद्यार्थ्यांसह दोन महिलांचा समावेश आहे. सोमवारी (ता. २६) सायंकाळी सहाच्या सुमारास रंकाळा टॉवर परिसरात हा प्रकार घडला. आपत्कालीन विभागाच्या व्हॅनमधून त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. सरस्वती मोहन गजगेश्वर (वय ५०, रा. गणेशनगर, शिंगणापूर), गीता चंद्रकांत मुळे (४६, रा. पाण्याची टाकी परिसर, शिंगणापूर), सानिका सागर बिडकर (१०) आणि स्वप्नील सागर बिडकर (१२, रा. दोघेही शिंगणापूर) अशी जखमींची नावे आहेत.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्जेराव शामराव शिपुगडे (४७, रा. हणमंतवाडी) हे रिक्षा व्यावसायिक आहेत. रंकाळा बसस्थानक ते शिंगणापूर या मार्गावर ते प्रवासी वाहतूक करतात. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारात ते रिक्षा घेऊन शिंगणापूरकडे निघाले होते. यावेळी रिक्षात आठ प्रवासी होते. रंकाळा टॉवर परिसरात पोहोचल्यानंतर त्वचेवर जळजळ होत असल्याने प्रवाशांनी गोंधळ सुरू केला. चालकांनी रिक्षा थांबवून पाहिले असता, रिक्षातून उग्र वास आणि धूर येत असल्याचे दिसले. सरस्वती गजगेश्वर या महिलेच्या साहित्यातील अॅसिडचा कॅन फुटल्याचे लक्षात आले. अॅसिड अंगावर पडल्याने सरस्वती यांच्यासह रिक्षातील गीता मुळे, सानिका बिडकर आणि स्वप्नील बिडकर हे जखमी झाले होते. रिक्षाचालक शिपुगडे यांनी तातडीने रिक्षा सीपीआरमध्ये घेऊन जखमींना उपचारासाठी दाखल केले.

सरस्वती गजगेश्वर यांनी घरासमोर वाढलेल्या तणावर मारण्यासाठी अॅसिड आणले होते. ॲसिडचा कॅन पिशवीत ठेवून त्यावर कांदे, बटाटे व इतर भाजीपाला ठेवला होता. रिक्षात बसल्यावर त्यांनी पिशवी मांडीवर घेतली होती. दाब पडल्याने ॲसिडचा कॅन फुटून चौघे प्रवाशी जखमी झाले. या घटनेने रिक्षातील प्रवाशांचा गोंधळ उडाला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी सीपीआरमध्ये जाऊन जखमींचे जबाब घेतले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेणी घाटात गव्यांच्या कळपाचे दर्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

तुरुकवाडी- मलकापूर मार्गावरील अमेणीच्या निर्जन व विस्तीर्ण डोंगरी माळावर जंगली गव्यांच्या कळपाचे स्थानिक नागरिकांना सातत्याने दर्शन होत आहे. सकाळच्या शाळेला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे या घाटातून प्रवास करणाऱ्या कलाशिक्षक अशोक जाधव-चिंचोलीकर यांना सकाळी या गव्यांच्या झुंडीचे जवळून दर्शन झाले.

रस्त्यावर अचानक समोर जनावरांची एवढी मोठी फौज आडवी पाहून काहीक्षण थबकलेल्या जाधव यांना पहिल्यांदा स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हशींचा हा कळप असेल असे वाटले. परंतु या जनावरांच्या मागे कोणीही पशुपालक नाही हे पाहून जाधव यांनी सावधपणे समोरच्या झुंडीचे निरीक्षण केल्यानंतर सुमारे १८ ते २० च्या संख्येत असलेला हा कळप जंगली गव्यांचा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बलदंड आणि भारदस्त देह, शिंगांची एकसारखी विशिष्ट रचना, कपाळी नैसर्गिक पांढरा टिळा हे गव्यांचे ओळखीचे चित्र प्रत्यक्षात समोर पाहून उरात धडकी भरल्याचे जाधव यांनी सांगितले.

यावेळी जाधव हे प्रसंगावधान साधून सोबतची दुचाकी बंद करून काहीवेळ जागीच स्तब्ध उभा राहिले. शत्रूची चाहूल लागल्याप्रमाणे कान टवकारून उभा राहिलेला हा गव्यांचा कळप पुढे मोकळ्या माळरानातून आपल्या मार्गाने निघून गेला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) गावलागतच्या डोंगर परिसरातील म्हसोबा मंदिरा जवळच्या बारमाही पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी हा जंगली गव्यांचा कळप दररोज रात्री येथे येत असल्याचे समजले. शिवाय रात्रभर येथेच मुक्काम ठोकलेला हा कळप दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच्या सुमाराला पुन्हा आल्या मार्गाने कोतोली-अमेणीच्या जंगलात निघून जातो, अशी माहितीही पुढे आली. कराड आणि रत्नागिरी शहरांना जवळचा आणि महत्वाचा मार्ग म्हणून या मार्गावरून कोकणाकडे व मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची असणारी लक्षणीय संख्या पाहता या मार्गावर गव्यांचे वावरणे अधोरेखित होत असल्याने या अवघड घाट मार्गावरून पहाटे व रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

..........................

फोटो ओळ :

अमेणी- कोतोली (ता. शाहूवाडी) जंगलाकडे कूच करणाऱ्या जंगली गव्यांच्या कळपाचे कलाशिक्षक अशोक जाधव यांनी अमेणी

घाटातून टिपलेले छायाचित्र.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजी नगरपरिषद: २५ कोटी शिलकी अंदाजपत्रक

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी नगरपरिषदेचे सन २०१८-१९ सालाचे कोणतीही नवीन करवाढ नसलेले २५ कोटी ९२ लाख २८ हजार २८७ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. नगराध्यक्षांच्या नियंत्रणाशिवाय प्रशासनाने प्रथमच अर्थसंकल्प सादर केला. काही त्रुटींमध्ये बदल करुन आवश्यक तरतुदींचा अंतर्भाव करुन तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात यावा, अशा सूचना सदस्यांनी केल्या.

सन २०१७-१८ चे दुरुस्त आणि सन २०१८-१९ चे वार्षिक ४५२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी सर्वसाधारण सभा बोलाविली होती. अर्थसंकल्पाच्या विषयावर चर्चा करताना नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी, आस्थापना खर्च ५७.८० टक्क्यावर आणल्याचा दावा केला. मात्र त्यामध्ये काही विषयांवर जाणीवपूर्वक खर्च दाखविण्यात आला असून तो कमी होऊन वस्तुनिष्ठ आस्थापना खर्चाचा अंतर्भाव होणे गरजेचे आहे. पाणीपट्टीची तूट, शिक्षण मंडळ खर्चाचा हिस्सा आदींसाठी भरीव तरतूद केल्यास आस्थापना खर्च ६९.६८ टक्क्यावर येतो. त्यामुळे विकासकामे हाती घेता येणार नसल्याचे नमूद केले. तसेच १४८ कोटी रुपये महसूल जमा दाखविण्यात आला आहे. त्यामध्ये चालू वर्षीची घरफाळ वसुली २० कोटी रुपये गृहीत धरली आहे. पण प्रत्यक्षात ती १६ ते १८ कोटी रुपये होईल. तर पाणीपट्टी व विशेष पाणीपट्टीपोटी १२.८० कोटी अपेक्षित धरले असून त्यामध्ये ८ कोटी रुपये जमा होऊ शकतील. त्यामुळे जो फुगवटा दाखविण्यात आला आहेत तो कमी करण्याची आवश्यकता आहे.

शहरातील तब्बल २० ते २२ हजार मिळकतधारकांकडे नळ कनेक्शन नाहीत. ही संख्या एकूण मालमत्ताधारकांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यासाठी प्रशासनाने नळ कनेक्शन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शिवाय नाट्यगृहावर दरवर्षी खर्च ५० लाख रुपये होतात. तर उत्पन्नापोटी अवघे १० लाख रुपयेच जमा होतात. त्याचप्रमाणे पालिकेच्या विविध सांस्कृतिक भवनाद्वारे मिळणारे उत्पन्नही तुटपुंजे आहे. त्याचा अभ्यास करुन सांस्कृतिक भवन खाजगी तत्वावर देण्याची गरज व्यक्त केली.

अजितमामा जाधव यांनी, नगरपरिषदेचे अंदाजपत्रक वस्तुनिष्ठ असल्याचे सांगून शहरात १०० कोटी रुपयांच्या रस्त्यांचा प्रस्ताव व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प याचा या अर्थसंकल्पात तरतूद आहे का? असा सवाल केला. त्यावर मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी या दोन्ही कामांचा अंदाजपत्रकात समावेश नसल्याचे सांगत १०० कोटीचा प्रस्ताव हा नगरोत्थानमध्ये असून २७.४० कोटी खर्चाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी १४ व्या वित्त आयोगात तरतूद असल्याचे सांगितले. शशांक बावचकर यांनी, उत्पन्न वाढीसाठी नगरपालिका मालकीच्या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पूर्णत्वास जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच वॉटर ऑडीट करण्याची गरज व्यक्त करुन उत्पन्न वाढींच्या बाबींचा त्यामध्ये समावेश करावा आणि चोपडे यांनी सुचविलेल्या सूचनांचा विचार करुन अंदाजपत्रकात आवश्यक ते बदल करावेत असे सांगितले.

खर्चाची तरतूद करणार

वेळेत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना केंद्र सरकारने पंतप्रधान विमा योजनेतून सुरक्षा कवच देण्याचा निर्णय आमदार सुरेश हाळवणकर यांनी जाहीर केला आहे. मात्र त्यापोटी प्रत्येक मिळकतधारकांसाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम अंदाजपत्रकात नमूद केली नसल्याचे बावचकर यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर मुख्याधिकारी रसाळ यांनी तरतूद करण्याची ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्किट बेंचसाठी करा जागेचे आरक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू करण्यासाठी शेंडा पार्क येथील जागा आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याबाबत खंडपीठ कृती समितीने सोमवारी (ता. २६) जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेतली. यावेळी शेंडा पार्कितील जागा आरक्षित करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याशिवाय कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू व्हावे, यासाठी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पाठवल्या जाणाऱ्या पत्राबाबत खंडपीठ कृती समितीने विधी व न्याय विभागाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.

कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू व्हावे, यासाठी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने १४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेंडा पार्कातील ७५ एकर जागा सर्किट बेंचसाठी आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना दिली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असेही त्यांनी सांगितले होते. यानुसार खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेतली. कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, या निवेदनाद्वारे शेंडा पार्कातील जागा आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. 'मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्किट बेंचसाठी ७५ एकर जागा आरक्षित करण्याचे आश्वासन दिले आहे. पालकमंत्री तथा महसूल मंत्री चद्रकांत पाटील यांनीदेखील शेंडा पार्कातील जागा सर्किट बेंचसाठी आरक्षित करण्याची जबाबदारी घेतली आहे. यानुसार गट नंबर ५८९ आणि ७०९ मधील ७५ एकर जागा सर्किट बेंचसाठी आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करावी,' अशी मागणी निवेदनातून केली आहे.

दरम्यान, केवळ कोल्हापुरात सर्किट बेंचचे कामकाज सुरू होण्यास हरकत नाही, असे पत्र हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पाठवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यानी विधी व न्याय विभागाकडे सोपवली होती. हे पत्र पाठवण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले होते. बैठक होऊन १३ दिवस उलटले आहेत, मात्र अद्याप ते पत्र पाठवल्याची अधिकृत माहिती विधी व न्याय विभागाकडून आलेली नाही. याबाबत खंडपीठ कृती समितीने विधी व न्याय विभागाला पत्र पाठवले आहे. दोन दिवसात याबाबत अधिकृत माहिती मिळेल,' असे खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रशांत शिंदे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष नारायण भांदिगरे, सचिव किरण पाटील, नागरी कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, आदी उपस्थित होते.

दोन महिन्यांपूर्वीच फेटाळली होती मागणी

शेंडापार्क येथील ७५ एकर जागा सर्किट बेंचसाठी आरक्षित करावी, अशी मागणी खंडपीठ कृती समितीने चार महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी सुभेदार यांनी खंडपीठ कृती समितीला पत्र पाठवून ही मागणी फेटाळली होती. २६ सरकारी कार्यालयांनी शेंडा पार्कातील जागेची मागणी केली आहे, त्यामुळे जागेची उपलब्धता नसल्याचे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर या जागेबाबत जिल्हा कोर्टात एक खटला प्रलंबित असल्याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. आता थेट मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनीच जागा आरक्षित करण्याचे निर्देश दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीही जागा आरक्षणाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरदहस्तामुळेच अवैध गुटखा बिनदिक्कत

0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

गुटखा उत्पादनात पश्चिम महाराष्ट्रात इचलकरंजी मोठे केंद्र बनले आहे. कर्नाटक राज्यात गुटखा विक्रीला परवानगी असल्याने सीमाभागात गुटखा विक्री बिनदिक्कतपणे सुरु आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांच्या पाठबळावर खुलेआम बेकायदेशीरपणे गुटखा उत्पादन सुरु आहे. याठिकाणी उत्पादित गुटखा नजीकच्या कर्नाटकासह कोकण व उत्तर महाराष्ट्रात विक्री केला जातो. आंतरराज्य गुटखा तस्करी रोखण्यात पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने हा अवैधधंदा बेधडकपणे सुरु आहे.

येथील जुना चंदूर रोड परिसरातील गुटखा निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर टाकण्यात आलेल्या धाडीने हा अवैधधंदा खुलेआम सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्न व औषध प्रशासन व एलसीबी पथकाने यापूर्वी दोनवेळा छापा टाकून हा कारखाना सील केला होता. तरीही या कारखान्यात पुन्हा गुटख्याचे उत्पादन कोणाच्या आशिर्वादाने सुरु होते याची पाळेमुळे उखडण्याची गरज आहे.

राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटख्यावर बंदी घातली होती. त्यानंतरही युवापिढी तंबाखूजन्य उत्पादनात गुटख्याचा वापर करीत आहेत. मात्र बंदी येण्यापूर्वीच गुटखा निर्मात्यांनी पान मसाला बनवणे सुरु केले. आणि तरुणपिढी पान मसाल्यासह तंबाखू खाऊ लागली. बंदीपूर्वीपेक्षाही बंदीनंतर गुटख्याची निर्मिती व विक्री पूर्वीपेक्षा वाढली आहे. कर्नाटकात गुटखा उत्पादन बंद असले तरी पानमसाला व तंबाखू असे दोन वेगवेगळे पाऊच (पुड्या) बनविले जातात. इचलकरंजी सीमाभाग लगतच असल्याने कर्नाटकातून अशा वेगवेगळ्या पुड्या आणून त्या विकल्या जातात. शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचे उत्पादन होत असताना स्थानिक पोलिस प्रशासनाला त्याची कुणकुण का लागत नव्हती असा सवाल आता उपस्थित होत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री बंदी असताना केवळ पोलिसांच्या हप्तेबाजीतून पान टपरीतून गुटखा विनासायास मिळतो.

अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे गुटखा उत्पादकांची चंगळ सुरु आहे. राजू लक्ष्मण पाच्छापुरे हे नांव पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातही 'गुटखा तस्कर' म्हणून परिचित झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह अन्न व औषध प्रशासन विभागातील बड्या धेंड्यांना त्याने लाचलुचपतच्या जाळ्यात अडकविले आहे. त्यामुळे त्याच्या वाटेला जाण्यास कोणीच धजत नाही. त्याचाच फायदा उठवत पाच्छापुरे याने आपल्या व्यवसायाचे जाळे मागील पाच वर्षात अधिक घट्ट विणले आहे. या व्यवसायाच्या भागीदारीत 'खाकी'तील काही मंडळींचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच खाकीची तिरकी नजर गुटख्याच्या कारखान्यावर कधी पडत नाही. या कारखान्यावर दोन वेळा धाड पडूनही कायदेशीर पळवाटा आणि गुंडांच्या हिंमतीवर सील केलेला कारखाना सुरु करण्याचे धाडस पाच्छापुरे याने दाखविले आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे याचा पर्दाफाश होण्याची नितांत गरज आहे.

अवैध व्यवसायात अलिकडच्या काळात बस्तान बसविणाऱ्या एका युवकाने शिरोळ तालुक्यातील ग्रीन झोन परिसरात गुटखा निर्मिती सुरु केली आहे. महिन्याकाठी लाखो रुपयांचा हप्ता वेळच्यावेळी पोहचविला जात असल्याने कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही. हातकणंगले तालुक्यातसुध्दा आजही बनावट गुटख्याचे उत्पादन सुरुच आहे. स्थानिक पोलिस यंत्रणेला हाताशी धरुन वरिष्ठांच्या आशिर्वादाने हा कारभार चालतो. तयार गुटखा ठिकठिकाणी पोहचविण्यासाठी वाहने ठराविक वेळेत बाहेर पडतात. त्यावेळी मर्जीतला माणूस चेकपोस्ट वर उपस्थित रहात असल्याने कोणताही अडथळा येत नाही. वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस, अन्न व औषध प्रशासन अशी ही साखळी या गुटखा निर्मिती व्यवसायात एकत्र असल्याने क्वचितच कारवाईचा फार्स केला जातो. त्यानंतर 'रात गई बात गई' या उक्तीप्रमाणे पुन्हा गुटखा निर्मिती व विक्री सुरुच राहते. शहरातील विविध पानटपरीवर गुटखा अव्वाच्या सव्वा दराने विकला जातो. याची खबर स्थानिक पोलिसांना असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

भितीमुळे कारवाईस टाळाटाळ

बनावट गुटखा तस्कर राजू पाच्छापुरे याने आजवर अनेक पोलिस अधिकाऱ्यांसह अन्न व औषध प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकविले आहे. पोलिस निरीक्षक, औषध प्रशासन अधिकारी, हवालदार, तलाठी अशा अनेकांना कायदा मोडणाऱ्या पाच्छापुरे यानेच कायद्याचा धाक दाखविला आहे. अवैध गुटखा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्याचे तत्कालीन निरिक्षक सर्जेराव गायकवाड व हवालदार विष्णू शिंदे यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. त्यामुळे कायद्याला न जुमानत शिवाजीनगरच्या हद्दीत पाच्छापुरे गुटखा निर्मितीचा कारखाना बिनदिक्कतपणे चालवितो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच व्यवसाय सील

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरी परिसरातील अंबा डिलक्स लॉज, टी. सी. बेंद्रे, नागाळा पार्क परिसरातील फाइन फिटनेस जीम, ताराबाई पार्क येथील महाराणी लॉन व एस. टी. स्टँड परिसरातील जुने थकबाकीदार असलेले व्यावसायिक देशी बार असे पाच व्यवसाय महापालिकेच्या परवाना विभागाने सोमवार सील केले. परवाना अधिक्षक सचिन जाधव, गणेश गौरकर, सुभाष पवार, अनिल आदीवाल व विजय वाघेला यांच्याकडून कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू राहणार असून जुने थकबाकी असलेले व्यावसायिक, नुतनीकरण न केलेले व्यावसायिक व विनापरवाना व्यावसायिकांनी त्वरित परवाना विभागाकडे संपर्क साधून परवाना नुतनीकरण, थकबाकी व नवीन परवाने काढावेत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची कानउघडणी करणारच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सरकार एकीकडे खासगी कंपन्यांना शाळा स्थापन करण्याची परवानगी देत आहे आणि दुसरीकडे सर्वसामान्य मुलांसाठी शिक्षणाचे दार खुले ठेवणाऱ्या शाळा पटसंख्येच्या कारणास्तव बंद करत आहे. सरकार म्हणून हा बेजबाबदारपणाचा निर्णय असून नागरिकांना देण्यात येणाऱ्या शिक्षणहक्काची जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे. सरकारच्या या शाळाबंद धोरणप्रश्नी जनआंदोलनातून घातली जात असलेली हाक ऐकू न येणाऱ्या बहिऱ्या सरकारची कानउघडणी करण्यासाठी हा विरोधाचा लढा तीव्र केला जाईल,' अशा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

दरम्यान २३ मार्च रोजी समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता गांधी मैदान येथून मोर्चाला सुरुवात होणार असून यामध्ये लाखो कोल्हापूरकर सहभागी होणार आहेत. तसेच सहा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता बिंदू चौक ते दसरा चौक या मार्गावर महिलांचा लाँगमार्च करण्यात येणार आहे. १३ मार्च रोजी कोल्हापुरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी प्रतिज्ञा घेणार आहेत. या विषयाची जागृती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शाळा बंद करू नयेत, असा संदेश पाठवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे, असे यावेळी बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारने राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोल्हापुरातील ३४ शाळांचा समावेश होता. त्यापैकी ११ शाळा बंद होण्यापासून वाचल्या असून २३ शाळांवर सरकारच्या निर्णयामुळे टाळे लागण्याची टांगती तलवार आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात शिक्षण वाचवा नागरी कृतीसमितीच्यावतीने गेल्या महिन्यापासून जनआंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली २३ मार्च रोजी मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. यावेळी डी. बी. पाटील, दादासाहेब लाड, एस. डी. लाड यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, '१९ वर्षांपर्यंतचे मोफत व सक्तीचे शिक्षण मिळणे हा हक्क आहे. पटसंख्या नाही म्हणून शाळा बंद करण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत याचा शोध घेणे आणि त्यांना त्या सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र आपल्या कर्तव्यापासून पळ काढत सरकार शाळाच बंद करून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घालत आहे. ज्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्याठिकाणी शिक्षणाची कोणती पर्यायी सुविधा दिली जाणार आहे याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. कार्पोरेट कंपन्यांना ना नफा ना तोटा धर्तीवर शाळा सुरू करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारने विचार केला पाहिजे की अशा भांडवलदार कंपन्या फायद्यासाठीच शाळा सुरू करतील. त्याचा फटका सर्वसामान्य मुलांना बसणार आहे.'

पत्रकार बैठकीस भरत रसाळे, वसंतराव मुळीक, व्यंकप्पा भोसले, टी. एस. पाटील. संभाजी जगदाळे, अशोक पवार, पंडितराव सडोलीकर, गिरीश फोंडे, लालासाहेब यादव आदी उपस्थित होते.

आम्ही गिनीपिग नाही

सरकारी शाळा बंद करून खाजगी कंपन्यांना ना नफा ना तोटा पद्धतीने शाळा सुरू करण्याची परवानगी देण्याच्या समर्थनार्थ सरकारने हा एक प्रयोग असल्याचे सांगितले आहे. सरकारच्या या वक्तव्यावर टीका करताना एन. डी. पाटील म्हणाले, की सर्वसामान्य जनता आणि त्यातही खेड्यापाड्यातील विद्यार्थी म्हणजे काही सरकारच्या प्रयोगासाठी ठेवलेले गिनीपिग नाहीत. एकांगी विचारातून करण्याच्या प्रयोगासाठी लोकांचा उंदीर म्हणून वापर करणे बंद करा, असा इशाराही त्यांनी दिला.

शताब्दीऐवजी श्राद्ध

शाहू महाराजांच्या कायद्याला २०१७ साली शंभर वर्षे पूर्ण झाली असता या शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्याऐवजी त्याचे श्राद्ध घालण्याचे काम हे सरकार करत आहे. पटसंख्येअभावी तेथील नजीकची शाळा बंद झाल्यास त्यांना दर ५ ते १० कि.मी. अंतरावर शाळेत जावे लागणार आहे. त्यामुळे ती मुले शाळेच्या प्रवाहापासून दूर राहण्याची शक्यता आहे. यामध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर आहे. डोंगराळ भागात लांब अंतरावर शाळेत जाताना त्यांना सुरक्षितता मिळणार का? सरकार स्वयंअर्थसहाय्यीत शाळा कायद्यामध्ये दुरुस्ती करत कंपनी अॅक्टनुसार शाळा चालविण्याचे अधिकार कार्पोरेट कंपन्याना देत आहे. या कंपनीकरणामध्ये शाळा हा व्यवसाय म्हणून केला जाणार त्यांना योग्य वाटलेल्या ठिकाणीच शाळा चालविणार, कोणतीही कंपनी नफा मिळविण्यासाठीच उद्योग धंदा करते. त्यामुळे हजारो रुपयांची फी आकारणार या शक्यता नाकारता येत नाही. याला आळा घालण्यासाठी सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर जनआंदोलनाद्वारे हा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे यावेळी बोलताना डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images