Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पहिल्याच दिवशी अडीच कोटींच्या बॉंडची विक्री

$
0
0

म़ टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आयपीडीआय बाँडच्या विक्रीस रविवारी अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याहस्ते प्रारंभ झाला. बाँड विक्री प्रारंभ बँकेत झाला. पहिल्याच दिवशी अडीच कोटी रुपयांच्या बाँडची विक्री झाली.

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, 'रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने बाँडची विक्री सुरू केली आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक वर्षात ५० कोटींच्या बाँड विक्रीचे उद्दिष्ट आहे. बाँडमध्ये गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, संस्थांना चांगले व्याज मिळेल. एक कोटी बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास दहा वर्षांत दोन कोटी ३० लाख मिळणार आहेत.

उद्धाटन कार्यक्रमास संचालक निवेदिता माने, पी. जी. शिंदे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, विलास गाताडे, भैय्या माने, उदयानीदेवी साळुंखे, आर. के. पोवार आदी उपस्थित होते.

कामकाजाचा जाहीर आढावा

उदघाटन कार्यक्रम झाल्यानंतर अध्यक्ष मुश्रीफ यांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. बँक फायद्यात येण्यासाठी कर्जाची वसुली वेळेत करण्याची सूचना त्यांनी दिली़ यावेळी निरीक्षक, सचिव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांसाठी मार्केटिंग व्यवस्था निर्माण करा

$
0
0

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांच्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट वाढवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाते. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. वाढ झालेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ न मिळाल्यास त्याचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. शेतकऱ्यांना उत्पादनदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मार्केटिंग व्यवस्था निर्माण करा, अशा सूचना केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी, मत्स्य व्यवसाय विभागाची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

केंद्रीय मंत्री राज म्हणाल्या, 'शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवल्या पाहिजेत. त्यांच्यामध्ये एकात्मिक शेतीचा दृष्टिकोन विकसित करुन त्यातून शेतीला पूरक व्यवसायाशी जोडून शेतकऱ्यांना उद्योजक बनविणे आवश्यक आहे. जिल्ह्याने मृदा सर्वेक्षणामध्ये उद्दिष्टापेक्षा केलेले जास्त काम उल्लेखनीय आहे. यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळून त्यांच्या उत्पादन वाढीसाठी फायदा होईल. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न व उत्पादन दुप्पट करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गतिमान व्हावे. सर्व सरकारी योजनांची माहिती देऊन शेतीला व्यवसायाशी जोडण्याचे प्रयत्न करावेत. त्यासाठी एकात्मिक शेतीचा दृष्टिकोन शेतकऱ्यांमध्ये विकसित करुन शेती, पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, शेततळ्यामध्ये मत्स्य उत्पादन आदींच्या माध्यमातून उद्योगशील बनवावे. कोल्हापुरात गूळ, ऊस, भात व काजूचे उच्च प्रतीच उत्पादन असून देशभरात हे उत्पादन पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काजू हा जगात सर्वांत उत्तम प्रतीचा काजू आहे. पण काजू उत्पादक हे असंघटित असल्याने त्यांना चांगला दर मिळत नाही, असे सांगनू काजू फळापासून प्रक्रिया करुन एनर्जी ड्रिंक बनविण्याच्या युनिटचा प्रस्ताव केंद्र पातळीवर मान्यतेसाठी आहे. त्यास लवकरात लवकर मान्यता द्यावी. बांबू नर्सरीचा प्रस्तावही केंद्र शासनाकडे असून त्यासही लवकर मंजूरी द्यावी, अशी मागणी केली.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एम .एस. शिंदे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी महावीर लाटकर यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडेबाजारावरुन राजकारण तापले

$
0
0

आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी; फुटीर नगरसेवकांनी नेत्यावर डागली तोफ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फोडाफोडीच्या राजकारणानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि भाजप, ताराराणी आघाडीमध्ये आरोप, प्रत्यारोप सुरु झाल्याने महापालिकेतील राजकारण तापले आहे. घोडेबाजाराच्या आरोपावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले.

भाजपकडून कोट्यवधी रुपयांचा घोडेबाजार

महापालिकेतील सत्तेसाठी भाजपने कोट्यवधी रुपयांचा घोडेबाजार केला. व्हीप बजावूनही पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाईल. काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत माजी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी ११०० कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासकामांना उपलब्ध केला. भाजपच्या नेत्यांनी फोडाफोडीच्या राजकारणापेक्षा ११०० कोटीपैकी ५० टक्के निधी आणण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर व काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी दिले. लाटकर म्हणाले, 'पिरजादे आणि चव्हाण यांना पक्षाने महत्त्वाची पदे, स्थायी समितीत स्थान दिले. यामुळे त्यांची पक्षाकडून अन्याय झाल्याची ओरड निरर्थक आहे. दोघांनाही सहा, सहा महिने स्थायी सभापतिपदी संधी देण्याची ग्वाही नेत्यांनी दिली होती. पैशासाठी त्यांनी गैरकृत्य केले आहे. भाजपचे आमदार महापालिकेत येतात याचा अर्थ घोडेबाजार झाला हे स्पष्ट आहे. देशमुख म्हणाले, नगरसेवक होण्याची पात्रता नसणाऱ्यांना पक्षामुळे सत्ता मिळाली होती. अजिंक्य चव्हाण यांना तर शिक्षण मंडळाच्या बैठका घ्या, अशी सूचना करावी लागत होती. पैशासाठी विकल्या जाणाऱ्या नगरसेवकांना नेते मंडळी व पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

नेत्यांच्या मर्जीतील नगरसेवकांना पदे

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सामान्य नगरसेवकांना स्थान नाही. ठराविक नगरसेवकांची मक्तेदारी आणि नेत्यांच्या मर्जीतील नगरसेवकांना पदे दिली जातात. मेघा पाटील या सभापतिपदासाठी सक्षम उमेदवार नव्हत्या. त्यांना सभापती म्हणजे केवळ शोभेच्या बाहुलीचे पद ठरले असते. भाजपकडून योग्य उमेदवार मिळाल्याने शहर विकासाला चालना मिळेल या अपेक्षेने पाठिंबा दिला. बंडखोरीसाठी कसलाही व्यवहार झाला नाही, असे नगरसेवक अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांनी सांगितले. भाजपाने शहर विकासाची भूमिका घेऊन कामकाज केले तर भविष्यात भाजपसोबत जाऊ. सभेत इतर नगरसेवकांनी सांगून भाजपाला मतदान केले असेही दोघांनी स्पष्ट केले.

पिरजादे म्हणाले,'आम्हाला पक्षाकडून व्हीप लागू झाला नव्हता. ए. वाय. पाटील हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या पत्नी बँकेत संचालक आहेत. ते स्वत: बिद्री कारखान्यात संचालक आहेत. एकाच घरात किती पदे द्यायची? राष्ट्रवादीत अन्य कार्यकर्ते नाहीत का? स्वत:चे हित साधणाऱ्या नेते मंडळीच्या विरोधातील हे बंड आहे.

अजिंक्य चव्हाण म्हणाले, 'सभापतिपदासाठी माझ्यासह, पिरजादे, उपमहापौर सुनील पाटील, संदीप कवाळे इच्छुक होते. साऱ्यांना विश्वासात घेऊन सभापतिपदाचा निर्णय आवश्यक होता. मात्र मर्जीतील नगरसेवकांसाठी पदाची खांडोळी केली. एकाने अर्थसंकल्प सादर करायचा, दुसऱ्याने काय करायचा. १४ महिन्याच्या आत चौघांना कशी संधी देणार.

आर्थिक देवाणघेवाण नाही

स्थायीच्या निवडणुकीत कसल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण झाली नाही. सत्ताधारी आघाडीतील नाराजी आणि भाजप शहराचा विकास साधेल ही खात्री पटल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला, हा सकारात्मक राजकारणाचा विजय आहे, असे आमदार अमल महाडिक यांनी स्पष्ट केले. भाजप हा सकारात्मक राजकारण करणारा पक्ष असून ज्यांना कुणी नाही त्यांना सोबत घेऊ असे सांगत त्या दोघा नगरसेवकांना भविष्यात भाजपात सामावून घेण्याचे संकेतही त्यांनी दिले. सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम सुरू आहे. गेल्या तीन वर्षात जिल्हा आणि शहरासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या. कोल्हापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला नाही, पण शहर स्मार्ट बनविण्याच्या योजना आखू. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.

गटनेते सत्यजित कदम व विजय सूर्यवंशी म्हणाले, 'महापालिकेत गेल्या अडीच वर्षात सत्ताधारी काँग्रेस पक्षांनी विकासाची कुठलीच कामे केली नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाने नगरसेवक त्रस्त आहेत. शहर विकासासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. हा कोल्हापूरच्या विकासाचा विजय आहे.स्थायीमध्ये सत्ता आल्याने शहराशी निगडीत प्रकल्पांना चालना मिळेल. सत्ताधारी काँग्रेस आघाडीत काही जणांचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

स्थायी समिती सभापतिपदी भाजपाचे आशिष ढवळे यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून अभिनंदन केले. शहर विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ढवळे यांनी सांगितले. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. तर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तास्थानी आहे. यामुळे विकास कामे, नावीन्यपूर्ण योजनेत अडथळे निर्माण होत होते. शहर विकासाला खीळ बसली होती. भाजपाचा सभापती झाल्यामुळे शहर विकासाला गती येईल असेही ढवळे म्हणाले.

राष्ट्रवादीची वाद्ये भाजपाच्या मिरवणुकीत

राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील या विजयी होणार या अपेक्षेने कार्यकर्त्यांनी मिरवणुकीची जय्यत तयारी केली. गुलालाची पोती, फटाके आणि वाद्ये आणली होती. मात्र उमेदवारी न मिळालेल्या नाराज नगरसेवक चव्हाण व पिरजादे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत भाजपला मतदान केले. यामुळे राष्ट्रवादीची तयारी व्यर्थ गेली. भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीने आणलेल्या वाद्यांचा वापर करत जल्लोषी मिरवणूक काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'दीड कोटी रुपयांसाठी स्वत:ला विकले'

$
0
0

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा इशारा, घरावर मोर्चा, तोंडाला काळे फासणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांनी पैशासाठी पक्षांशी गद्दारी केली. निवडून दिलेल्या लोकांचा विश्वासघात केला. दीड कोटी रुपयांसाठी स्वत:ला विकले. या गद्दार नगरसेवकांना गनिमी काव्याने धडा शिकवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आला. त्यांच्या तोंडाला काळे फासण्यासह चोळी आणि बांगड्यांचा आहेर देऊन निषेध केला जाईल, असा इशाराही दिला. माजी महापौर आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्या दोघांवर जोरदार टीका करत त्यांचे नगरसेवक पद करावे व पैशाच्या देवघेवीची एलसीबीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली. दोघांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचाचही निर्णय घेतला. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फुटीर नगरसेवक चव्हाण व पिरजादे यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.

राष्ट्रवादीच्या त्या दोघा नगरसेवकांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सायंकाळी सहा वाजता माजी महापौर पोवार यांच्या निवासस्थानी जमले. कार्यकर्ते, चव्हाण व पिरजादे यांच्या निवासस्थानाकडे निघण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना अडविले. मोर्चाला परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पोवार यांच्या निवासस्थानी निषेध सभा झाली. निषेध सभेनंतर महाराणा प्रताप चौक येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केले. चव्हाण व पिरजादे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला नाही तर त्यांना महापालिकेत प्रवेश करू देणार नाही, असेही कार्यकर्त्यांनी ठणकाविले.

दोघा नगरसेवकांनी पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोप माजी महापौर पोवार यांनी केला. शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी पक्षाशी दगाबाजी करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल, असे सांगितले. यावेळी नगरसेवक मुरलीधर जाधव, माजी नगरसेवक अनिल कदम, निरंजन कदम, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, शीतल तिवडे, जहाँगीर अत्तार यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

पाहुणा म्हणायची लाज वाटते

महापालिका निवडणुकीत अजिंक्य चव्हाण यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले. त्यांनी पक्षाचा विश्वासघात केल्यामुळे पाहुणा म्हणायची लाज वाटते. दीड कोटी रुपयांसाठी त्यांनी मत विकले. हे पैसे किती दिवस पुरणार त्यांच्या घरावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात मी सामील होणार असल्याचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेचा ३२ कोटींचा अर्थसंकल्प

$
0
0

म़ टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेचा यंदाचा अर्थसंकल्प ३२ कोटींचा असणार आहे़ बजेटमध्ये कोणत्या विभागास झुकते माप द्यायचे, याविषयाच्या नियोजनासाठी सर्व विभागप्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. याशिवाय जि.प. च्या वेबसाइटवरून समाजातील विविध स्तरावरून सूचना, नविन कल्पना, संकल्पना मागून घेतल्या जात आहेत़ पत्रकारांशी थेट संपर्क साधून नावीन्यपूर्ण योजनांचा सामावेश करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख,उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, मुख्य लेखाधिकारी संजय राजमाने, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ पत्रकारांकडून नविन योजनांच्या संकल्पना जाणून घेतल्या़

ग्रामपंचायतर्फे वैयक्तिक लाभाच्या योजना, किशोरवयीन मुली, गरोदर महिला, माता, नवजात बालक, कृषी, आरोग्य, शिक्षण विभागाच्या योजनासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. समाज कल्याण विभागातर्फे महिलांसाठी दळप यंत्र, कांडप मशीन, शेवया मशीन, पत्रावळी मशीन तर महिला बाल कल्याण विभागातर्फे कायदे विषयक मार्गदर्शन, संगणक प्रशिक्षण, अंगणवाड्यांना साहित्य पुरवणे, महिलांसाठी पिठाची गिरण, पिको फॉल मशीन निधी राखीव ठेवण्यात येणार आहे़ शाळा डिजिटलायझेशन करणे, शाळा बांधकाम, शिष्यवृत्ती, आदर्श शाळा पुरस्कार उपक्रमही अर्थसंकल्पात नियोजित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावात घरफोडी, दीडलाखाचे दागिने चोरीस

$
0
0

कोल्हापूर : जरगनगर - पाचगाव रोडवरील शिवस्वरुप नगरात चोरट्यांनी घरफोडी करुन ९० हजार रुपयांचे दागिने लंपास केले. वृषाली रविदर्शन कुलकर्णी (वय ४६, रा. शिवस्वरूप नगर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कुलकर्णी यांचे पती पुणे येथे गेले होते. दोन दिवस सुट्टी असल्याने वृषाली कुलकर्णी या शहरातील सासू सासऱ्यांच्याकडे रहायला गेल्या होत्या. शनिवारी (१०) मुक्काम करुन रविवारी (११) सकाळी त्या साडेअकराच्या सुमारास जरगनगरातील घरी आल्या. यावेळी घराच्या दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसले. त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरुममधील लोखंडी तिजोरी फोडलेली दिसली. चोरट्यांनी लॉकरचा दरवाजा वाकवून चेपवून काढल्याचे दिसून आले. लॉकरमधील १६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सहा गॅम वजनाची सोन्याची अंगठी, आणि आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळा, पाणीबिल भरा ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवळपास शहरातील बहुतांश नागरिक घरफाळा व पाणीपट्टी भरतात. त्यासाठी त्यांना नागरी सुविधा केंद्रांमध्ये वा पाणी बिल भरणा केंद्रात जावे लागते. त्यांचा वेळ वाचवण्यासाठी महापालिकेने ही दोन्ही बिले ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर इस्टेट विभागाकडे भरले जाणारे भाडे व हॉस्पिटल नोंदणी व त्यासाठी आवश्यक असणारे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्राची सुविधा ऑनलाइनद्वारे दिली आहे. याशिवाय प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी केएमटीने संगणकीकृत पास वितरीत केले आहेत.

महापालिकेचे उत्पन्नाच्या महत्वाच्या स्त्रोतांमध्ये घरफाळा व पाणीपट्टी यांचा समावेश आहे. बहुतांश सर्व नागरिकांना घरफाळा भरावा लागतो व पाणीपट्टीही भरावी लागते. घरफाळा वर्षातून एकदा भरायचा असला तरी जास्तीत जास्त नागरिकांकडून मार्चमध्येच तो भरला जातो. त्यामुळे विविध नागरी सुविधा केंद्रांवर भली मोठी रांग लागलेली पहायला मिळते. त्यासाठी वेळ जातो. पाणी बिल भरण्यासाठीही दर महिन्याला भरणा केंद्र गाठावे लागते. त्यासाठीही रांगेत उभे रहावे लागते. हे टाळण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे केंव्हाही घरफाळा व पाणीबिल घरातून, मोबाइलवरुनही भरता येऊ शकेल.

या बहुतांश नागरिकांच्या सेवेबरोबरच हॉस्पिटल नोंदणीची प्रक्रियाही ऑनलाइन केली आहे. बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टखालील नोंदणी करण्यासाठी अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. हा अर्ज ऑनलाइन भरता येतो. तसेच त्यासाठी लागणाऱ्या अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्रासाठीही ऑनलाइन अर्ज करता येतो. त्यामुळे या दोन्ही प्रक्रियेसाठी महापालिकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही. महापालिकेने शहरात विविध मार्केटमध्ये भाड्याने गाळे दिले आहेत. त्यांनाही महापालिकेत न येता ऑनलाइनद्वारे भाडे भरण्याची सुविधा दिली आहे.केएमटीच्यावतीनेही संगणकीकृत पास उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच ई तिकिटींग सेवाही सुरु केली आहे.

ऑनलाइन सुविधेचा कसा वापर करायचा?

महापालिकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन सेवा या नावाच्या बॉक्समधून या सुविधांचा लाभ घेता येतो. ऑनलाइन सेवा या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी आपले नाव, पत्ता, शहर, मोबाइल नंबर व इ मेल आयडी व पासवर्ड टाकावा लागतो. त्यानंतर या प्रकारे इ मेल आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करता येते. तिथून आपला घरफाळ्याचा मिळकत नंबर, पाणी जोडणी नंबर, इस्टेटचा मिळकत नंबर टाकून आपले बिल पाहू शकतो. त्यानंतर ते तिथूनच भरता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधीचे सरकार टँकर माफियांचे : मुख्यमंत्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपीटग्रस्तांना सरकार मदत करेल. सिंचनाच्या नावावर गेल्या पंधरा वर्षांत कोणाच्या तिजोऱ्यांचे सिंचन झाले, हे सर्वांना माहीत आहे. आधीचे सरकार टँकर माफियांचे असल्यामुळे त्यांना राज्य टँकरमुक्त करता आले नाही. आमचे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत असल्याने आम्ही अल्पावधीतच सांगली जिल्हा टँकरमुक्त केला. सत्तेतून पायउतार झाल्यावर यांना स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची आठवण झाली आहे,'अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर येथे केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा विकास यंत्रणा आणि सांगली जिल्हा परिषद यांच्यावतीने आयोजित सांगली जिल्हा कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रा उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजय पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील आदी उपस्थित होते. या वेळी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने संतोषीमाता, शक्ती (वाळूज) अनुसया (केदारवाडी) या स्वयंसहाय्यता गटांना सन्मानित करण्यात आले. प्रगतिशील 'शेतकरी यशोगाथा' पुस्तिकेचे प्रकाशन झाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील ९६ हजार शेतकऱ्यांना २३५ कोटी जमा झाले आहेत. विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपीटग्रस्तांनाही सरकार मदत करेल. राज्यातील ९९ टक्के शेतकऱ्यांना एफआरपी देणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. सध्या शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर मिळण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, साखरेचे दर पडले. साखरेच्या आयातीवर शंभर टक्के आयात शुल्क लावले. निर्यातीला अनुदान दिले. ज्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी मिळणे शक्य झाले. याआधीच्या सरकारने यातले काहीही केले नव्हते. कारण साखर आयात करणारी लॉबी व त्यांचे नेते सरकारच्या जवळचे होते. त्यामुळे आयातशुल्क लागत नव्हते. एफआरपी खाली गेली तर शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नव्हती. नरेंद्र मोदींनी उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा धरून हमीभाव देण्याची घोषणा केली आहे. त्यातून देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन होणार आहे. '

'सरकारने मोठ्या प्रमाणात शेततळी तयार केली. जलयुक्त शिवार योजना दुष्काळी भागाला वरदान ठरली आहे. मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात करून जास्त परकीय चलन मिळवून देणारा जिल्हा म्हणून सांगलीचे विशेष कौतुक आहे. सरकार सातत्याने कृषी क्षेत्र शाश्वत आणि सुखी व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. सतत संकटांचा सामना आणि चांगले उत्पन्न मिळूनही दर नसल्याने शेतकरी अडचणीत येतात. सदाभाऊ खोत यांच्या मागण्या लवकर मार्गी लावू. कृषी महाविद्यालयाला आणि क्षारपडसाठी लवकर निधी दिला जाईल,'असेही फडणवीस म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूध संस्थांच्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ केली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक दूध उत्पादक संस्थांचया कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ करावी, असा ठराव जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केला. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील होते.

जनरल सेक्रेटी विश्वास पाटील यांनी अहवाल वाचन केले. प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीच काटकसरीच्या कारभाला स्थान दिले आहे. आर्थिक वर्षामध्ये ५६ लाख २७ हजार १२५ रुपयांची उलाढाल झाली आहे. दोन लाख ९२ हजार ७५ रुपयांचा नफा झाला आहे. दरवर्षी नफ्याचे प्रमाण वाढत असल्याने, कर्मचारी वेतनवाढीस मात्र आहे. यासह व्यवस्थापन खर्चात वाढ, स्वगुंतवणुकीतून नवीन योजना लागू करणे, नवीन सभासदांची नोंदणी आदी विषयावर सभेत चर्चा झाली. यावेली ग्रामपंचायत निवडणुकीमद्ये विजयी झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सभेच्या सुरुवातीस जिल्हा दूध संघाप्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करण्याचा ठराव मांडण्यात आला, त्याला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरके नगर-भारती विद्यापीठ रस्त्यासाठी नागरिकांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील आर. के. नगर ते भारती विद्यापीठपर्यंतचा रस्ता करावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी श्री अष्टविनायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने सोमवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

आर. के. नगर ते भारती विद्यापीठमार्गे रस्ता पुणे- बेंगळुरू हायवेला जातो. या रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र हा रस्ता अरूंद आहे. परिणामी अपघात होत आहेत़ वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याचा कंदलगाव, मोरेवाडी, पाचगाव ग्रामस्थांना सर्वाधिक त्रास होत आहे. आरटीओकडून वाहनांची चाचणीही त्याच रस्यावर केली जाते़ पासिंग, चाचणीसाठी वाहने आल्याने गर्दी होत आहे. याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या विद्युत खांबावर दिवे नाहीत़ असलेले बंद आहेत. रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत चोरटे चोऱ्या करत आहेत़ रस्ता रूंद करावा, चांगला करावा, अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी केली. ग्रामपंचायत सदस्यही पाठपुरावा करत आहेत. मात्र प्रशासनाने लक्ष दिले नाही. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक यांनाही निवेदन दिले. मात्र मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.

त्यामुळे सकाळी दहा वाजता ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. अर्धा तास केलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी केली. काही वाहनधारकांनी पर्यायी मार्गाने जाणे पसंत केले. अर्धा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ आंदोलनात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बराले, उपाध्यक्ष कृष्णा देसाई, सुनिल शिंदे, संजू कुलकर्णी, मारूती मिरजकर, दत्ता चौगुले, शेखर गाडगीळ, संजू घोरपडे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठशे प्राध्यापकांचे भवितव्य अधांतरी

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कोल्हापूर : नेटसेट परीक्षा उत्तीर्ण झालेले तसेच पीएच.डी. पदवी हातात असलेले जवळपास आठशेहून अधिक तरूण प्राध्यापक तासिका तत्वावर काम करत आहेत. ग्रामीण भागातून शहरातील कॉलेजमध्ये प्राध्यापकी करण्यासाठी येणारे हे तरण एकावेळच्या मेसच्या डब्यात दोन्हीवेळा जेवून पोट भागवत आहेत.

आठवड्यातील तीन दिवस मित्रांच्या खोलीवर रहायचे तर दोन दिवस शहरातील पाहुण्यांच्या घरी आसरा घ्यायचा अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम सुरू आहे. एवढे करूनही सहा महिन्यांनी संस्थेने दिला तर पगार घ्यायचा अशी त्यांची हतबलता आहे. उच्चशिक्षण घेऊनही या तरूण प्राध्यापकांचे भवितव्य अधांतरी बनले आहे. सीएचबी तत्वावर काम करणाऱ्या तरूण प्राध्यापकांनी कथन केलेल्या अनुभवांमधून हे चित्र अधोरेखित झाले आहे.

कायमस्वरूपी प्राध्यापक भरती बंद असल्यामुळे महाविद्यालय प्रशासन सीएचबी तत्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करते. एका कायमस्वरूपी प्राध्यापकाच्या जागेवर तीन सीएचबी प्राध्यापक नियुक्त केले जातात. नेटसेट परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच पीएच.डी. पदवी असणे प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असल्यामुळे या दोन्ही किंवा यापैकी एक पात्रता असलेल्या तरूणांकडून तासिकातत्वावरील काम स्वीकारले जाते. ग्रामीण भागातील तरूणांची यामध्ये मोठी संख्या आहे. तसेच मुलींचीही संख्या लक्षणीय आहे. गावाकडून येणारी ही मुलं तासिकातत्वावर काम मिळते म्हणून शहरात येतात. एका वेळच्या मेसच्या डब्यातील जेवण सकाळी व रात्री पुरवून जेवतात. आठवड्यातील तीन दिवस मित्रांच्या खोलीचा आधार घेतात तर बाकीचे दिवस नातेवाईंकांना विनंती करून केवळ रात्री झोपण्यापुरते त्यांच्या घरी जातात. प्राध्यापक म्हणून कॉलेजवर जायचे तर चांगला पेहराव हवा असतो. त्याचीही जोडणी पदरमोड करूनच करावी लागते असे अनुभव सीएचबीधारक तरूण प्राध्यापकांनी सांगितले.

कामाला पुढे... पगाराला मागे

अनेक कॉलेजमध्ये अशैक्षणिक कामांसाठी तासिकातत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांवर जबाबदारी दिली जाते. तर अनेकदा काही कॉलेजमधील कायमस्वरूपी नियुक्ती असलेले प्राध्यापक आपले तास घेण्यासाठी सीएचबीधारक प्राध्यापकांनाच सांगतात. परीक्षेच्या सुपरव्हीजनसाठीही सीएचबीधारकांवरच कामाचा ताण वाढतो. नॅक परीक्षणासाठी अहवाल तयार करण्यापासून ते ज्यादाची कामेही सीएचबीधारक प्राध्यापक काहीही न बोलता करतात. त्यामुळे कामाला पुढे व पगाराला मागे अशी त्यांची अवस्था झाली आहे.

शिक्षण सहसंचालकांचा दृष्टिकोन सदोष

यासंदर्भात प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, 'सीएचबी प्राध्यापकाबाबत धोरण जितके सदोष तितकाच शिक्षण सहसंचालकांचा दृष्टिकोन सदोष आहे. शिक्षण सहसंचालक म्हणतात की सीएचबी प्राध्यापकांचे वेतन दरमहा नियमित द्यावे असा सरकारच्या नियमावलीत कुठेही उल्लेख नाही. दरमहा वेतन घेणाऱ्या शिक्षण सहसंचालकांची नेमणूक कशासाठी केली आहे? उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. कोणताही संवेदनशील माणूस प्राध्यापकांचे वेतन दरमहा दिले पाहिजे याच्याशी असहमत होणार नाही. सीएचबी प्राध्यापकांची नेमणूक करण्यापूर्वी त्यासाठी सहसंचालकांच्या कडून परवानगी घेतली जाते. तेव्हा अशा प्राध्यापकांचे वेतन दिले पाहिजे हे ओघाने आलेच. 'पेमेंट ऑफ वेजीस अॅक्ट' असे म्हणतो की कामगारांचे वेतन पुढच्या महिन्यात सात तारखेच्या आत दिले पाहिजे. हा कायदा या प्राध्यापकांना लागू आहे की नाही हा मुद्दा बाजूला ठेवला तर त्याच्यामागील भावना व जबाबदारी लक्षात घेऊन कृती केली गेली पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन तलाक कायदा मुस्लिम कुटुंबे उध्वस्त करणारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'स्त्रीला निराधार करणारा, पुरुषांना गुन्हेगार ठरवणारा आणि मुलांना अनाथ करणारा तिहेरी तलाक कायदा मुस्लिम कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा आहे. अशा प्रकरणात पत्नी पतीविरोधात गुन्हा दाखल करू शकते. पतीला तीन वर्षाचा कारावास होऊ शकतो. या तीन वर्षात पतीकडून पत्नीला पोटगी मिळू शकत नाही. अर्थार्जनाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मुलांची हेळसांड होते. घटस्फोट न झाल्यामुळे त्यांच्यात पतीपत्नीचे नाते असते. शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा संसार करण्याची अनेकांची मानसिकता नसते. तिहेरी तलाकपद्धतीचा परिणाम मुस्लिम कुटुंबे उद्ध्वस्त होण्यावर होत आहे. भविष्यात हा कायदा रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही' अशा शब्दात हिंदी है हम...हिंदोस्ता हमारा संस्थेचे कार्याध्यक्ष हुमायून मुरसल यांनी तिहेरी तलाक कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला.

तिहेरी तलाक पद्धतीविरोधात हिंदी है हम...हिंदोस्ता हमारा संस्थेतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या मेळाव्यात तिहेरी तलाक कायद्यातील त्रुटी, महिलांची असुरक्षितता व समाजाचे बिघडणारे स्वास्थ्य या अनुषंगाने मुरसल यांनी सविस्तर मांडणी केली.

मुरसल म्हणाले, 'इस्लाम धर्मामध्ये आत्मनिर्भरतेला महत्त्व आहे. तिहेरी तलाकच्या बाबतीत माणूस म्हणून विचार केलेला नाही. तीनवेळा तलाक हा शब्द उच्चारल्याने नातं संपू शकत नाही. उलट यामुळे कुटुंबाची घडी विस्कटते. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. महिलांच्या दृष्टीने तिहेरी तलाक हा प्रकार अन्यायकारक आहे. मुस्लिम पुरुषांनी यासाठी पुढाकार घेऊन आम्ही तिहेरी तलाक पद्धत बंद करू, अशी सामूहिक शपथ घेतली तर ही पिळवणूक बंद होऊ शकते. तिहेरी तलाकला कोणताही कायदेशीर आधार नाही. तिहेरी तलाकचा प्रश्न मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व जमाते उलेमा ए हिंद राष्ट्रीय पातळीवर हाताळत आहेत. त्यांचा आदेश आल्याशिवाय आम्ही काही करणार नाही, अशी भूमिका काही लोकांनी घेतली आहे. पण महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुचकामी असलेल्या या तिहेरी तलाकविरोधात महिलांना संघर्ष करण्याचा अधिकार आहे

मुरसल पुढे म्हणाले, 'तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेने मंजूर केल्यास या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे. तिहेरी तलाकला अधिकृत मान्यता देणारा काझी किंवा धार्मिक कोर्ट चालवणारा अधिकारी, फतवा देणाऱ्या व्यक्तीला शिक्षेची तरतूद करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भारतात तिहेरी तलाक अस्तित्वात नाही. या आजही या प्रथेला पाठिंबा देणाऱ्यांना कायद्याचा वचक बसला पाहिजे.'

मौलाना शाकीर कासमी म्हणाले, 'तिहेरी तलाकच्या निमित्ताने या विषयाचे राजकारण सुरू आहे. मुस्लिम समाजाला जाळ्यात ओढण्याचा प्रकार सुरू आहे. संधीसाधू राजकारण्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.' हसीना मुजावर यांनी प्रास्ताविक केले. तजन्नुम मोळे यांनी स्वागत केले. मेहबूब बोजगर यांनी मान्यवर वक्त्यांचा परिचय करून दिला. रेहाना मुरसल यांनी निवेदन केले. शहनाज नदाफ यांनी आभार मानले.

'मॉडेल तलाकनाका जाहीर करावा'

तिहेरी तलाक विरोधात कठोर भूमिका घेतली तरच ही प्रथा बंद होईल, असे सांगताता मुरसल यांनी काही पर्याय यावेळी नमूद केले. शादीनाम्यातच पती किंवा पत्नीकडून कोणतीही व्यक्ती तिहेरी तलाक देणार नाही याची हमी देणारी तरतूद असावी. त्यासाठी मॉडेल तलाकनामा जाहीर केला जावा. स्त्री व पुरुष यांच्यात समानतेची भावना असावी. त्यासाठी समुपदेशन केंद्राची गरज असून रेनेसॉ फॅमिली समुपदेशन सेंटर सुरू करत असल्याचे मुरसल यांनी यावेळी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीकडून कारवाईची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांना नगरसेवकपदावरुन अपात्र ठरवण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रक्रिया सुरु केली आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेचे चित्रीकरण, उमेदवाराविरोधात मतदान करतानाची छायाचित्रे, निवडणुकीतील वृत्तांताची प्रशासकीय कागदपत्रे जमा करण्यात येणार आहेत. या भक्कम पुराव्याच्या कागदपत्रांसह या दोन नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे देण्यात येणार आहे.

हे फुटीचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गांभीर्याने घेतले आहे. त्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्याचे समजते. तसेच यासाठी जे कारणीभूत असल्याचा संशय आहे, त्यांना मुश्रीफ यांनी टोकाचे सुनावले असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा मेघा पाटील या स्थायी समिती सभापतीपदाच्या काँग्रेस आघाडीच्या उमेदवार होत्या. त्यासाठी पिरजादे हे सूचक होते. त्यासाठीच्या स्वाक्षरी पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर केली आहे. तसेच पिरजादे व चव्हाण हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. विभागीय आयुक्तांकडे पक्षाची नोंदणी केली जात असताना पंधरा नगरसेवकांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत दोघांनीही निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार मेघा पाटील यांच्या विरोधात उघडपणे मतदान केले. त्याची छायाचित्रे तसेच चित्रीकरणही झाले आहे.

त्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांनाही अपात्र ठरवण्यासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे. निवडणुकीवेळी झालेल्या प्रक्रियेचा वृत्तांत लिखित स्वरुपात असतो. त्यामध्ये कोणत्या उमेदवारासाठी कुणी मतदान केले याची प्रथमपासून शेवटपर्यंत माहिती असते. हा सारा वृत्तांत महापालिका प्रशासनाकडून बुधवारी घेण्यात येणार आहे. तसेच निवडीवेळी प्रशासनाकडून चित्रीकरणही करण्यात येते. त्याची सीडी, विविध छायाचित्रे असतात. हे सारे पुरावे पक्षाकडून मिळवण्यात येत असून त्याआधारे या दोन नगरसेवकांचे पद रद्द करावे अशा मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक असताना थेट विरोधात मतदान करुन पक्षविरोधी कारवाई केल्याचे सिद्ध झाले तर ते सहा वर्षे निवडणुकीसाठी अपात्र ठरु शकतात. यामुळे महापालिकेची पुढील निवडणूक लढवण्याची संधी ते गमावू शकतात.

आतापर्यंत सत्ताधाऱ्यांमधील तिघांनी केले विरोधी काम

स्थायी समितीमध्ये गेल्या निवडणुकीवेळी सत्तारुढ आघाडीतील नगरसेविका रिना कांबळे यांनीही गैरहजर राहून पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली होती. त्याबाबत काँग्रेसने विभागीय आयुक्तांकडे कारवाईबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. त्याबाबतची सुनावणी सुरू आहे. त्यासाठी नगरसेविका कांबळे फेऱ्या मारत आहेत. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीतील या दोन नगरसेवकांनी केलेल्या बंडखोरीमुळे आतापर्यंत सत्ताधारी काँग्रेस आघाडीतील तीन नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केल्याचे समोर आले. यामुळे आघाडीच्या नेत्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत महाडिक गटाला उभारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी सभापती निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या सत्तेला खिंडार पाडल्याने माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी महापालिकेतील राजकारणात कमबॅक केल्याचे मानले जात आहे. महाडिक गेल्या बारा वर्षांपासून महापालिकेतील सत्तेपासून दूर आहेत. या सभागृहाच्या निवडणुकीवेळी भाजपच्या सहकार्याने महाडिक गटाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हापासून चालवलेल्या प्रयत्नांना स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीच्यानिमित्ताने यश आल्याचे मानले जात आहे. यामुळे आगामी अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजप व महाडिकांकडून पुन्हा मुसंडी मारली जाण्याचेच हे संकेत आहेत.

महानगरपालिकेच्या राजकारणात आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार विनय कोरे यांनी प्रवेश केला व तेथील महाडिकांच्या एकछत्री सत्तेला सुरुंग लावला. २००५ सालच्या निवडणुकीनंतर आतापर्यंत महापालिकेच्या राजकारणात मुश्रीफ, कोरे व आमदार सतेज पाटील यांचा दबदबा निर्माण झाला. २००५ व २०१० सालच्या निवडणुकीनंतर महाडिकांच्या ताराराणी आघाडीचे राजकारण बाजूला पडून राष्ट्रवादी, जनुसराज्य, काँग्रेस पक्षाचे राजकारण सुरु झाले. त्यानंतर २०१५ साली निवडणुकीत महाडिकांनी भाजपचे चंद्रकांत पाटील यांना सोबत घेऊन पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली असली तरी त्यावेळीच नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. सभागृहात बहुतांश नगरसेवक नवीन असल्याने आत्ताच फुटून गेल्यास अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर ठेवण्यापेक्षा शांत राहणे पसंत केले होते. पण दोन वर्षे होऊन गेल्यानंतर निधी नाही व पदेही नाहीत या प्रकाराने वैतागलेल्या नगरसेवकांचा संयमाचा बांध फुटत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

जानेवारी महिन्यात झालेल्या महापौर निवडणुकीमध्ये संधी न मिळाल्याने काँग्रेसचे इच्छुक नाराज झाले होते. निधी, विकास कामे यांच्याबाबतची नाराजी उघडपणे व्यक्त करण्यात येत होती. तेच हेरून विरोधी आघाडीने स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पहिला झटका दिला.

असंतोषाला चुचकारले

स्थायीसाठी इच्छूक असलेल्या अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांना इच्छा पुर्ण होणार नसल्याचे पटवून देत त्यांना आपल्याबाजूने वळवण्यात महाडिक गटाच्या व भाजपच्या कारभाऱ्यांना यश आले. आमदार अमल महाडिक यांच्याकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे स्थायी सभापतिपदावर कब्जा मिळवत महापालिकेतील अर्धी सत्ता मिळवली आहे. सत्ताधाऱ्यांना हा मोठा झटका मानला जात आहे. गोकुळ संघातील कारभाराच्यानिमित्ताने महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. आमदार पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न महाडिक यांनी सत्ताधारी भाजपच्या मदतीने निरुत्तर करण्याचा प्रयत्न चालवला आहे. स्थायीच्या निवडणुकीतून मुश्रीफ यांच्या उमेदवाराचा पराभव करुन महाडिकांनी महापालिकेत पाऊल टाकले आहे. त्यामुळे या माध्यमातून महापालिकेतील आगामी राजकारणाचा पट रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुग्राफ कामगारांची आमदारांकडे धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोली एमआयडीसी येथील मनुग्राफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या युनिट १ मध्ये गेली २५ वर्षापेक्षा जास्त सेवा बजाविलेल्या सुमारे २७५ कामगारांना माहे डिसेंबर २०१७ मध्ये कामगार कपातीच्या नोटीस मनुग्राफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने दिल्या आहेत. या नोटीसमध्ये मार्च २०१८ मध्ये या सर्व कामगारांना कामावरून कमी करण्यात येईल असा उल्लेख मनुग्राफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने केला होता. कामगार कपातीच्या नोटीस मिळाल्यानंतर मनुग्राफ इंडिया लिमिटेड कंपनी कामगार संघटनेने आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन कामागारांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती देत यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने लक्ष देत कामगार मंत्री ना.संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी संपर्क साधून कामगारांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती आणि कामगारांच्या व्यथा त्यांच्या पर्यंत निवेदनामार्फत पोहचविल्या.यावेळी मनुग्राफ कामगार संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर पाटील, विठ्ठल पाटील, सेक्रेटरी सुधाकर पुजारी, जॉईन्ट सेक्रेटरी संजय चव्हाण, कमलाकर आणेकर, दिलीप चव्हाण, सुहास सासणे, प्रफुल्ल पाटील, पी.एन. पाटील, नागनाथ गावडे, धनाजी दिंडे आदी कामगार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फसवणुकीविरोधात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फॅन्ड्री फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचा सदस्य असल्याचा बहाणा करून देणगी रक्कम उकळण्याचा प्रकार गांधीनगरात उघडकीस आला आहे. याबाबत हरिश रमेश शिंदे (वय ३१, रा. रायगड कॉलनी, कोल्हापूर) याच्याविरोधात अश्विनी भरत गोपुगडे (३८, रा. समर्थनगरी, पाचगाव) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हरिश शिंदे याने गरिब मुलांच्या शिक्षणासाठी काही व्यक्तींकडून देणगीची रक्कम स्वीकारल्याचा आरोप गोपुगडे यांनी फिर्यादीत केला आहे. गांधीनगरमधील पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडला होता. फॅन्ड्री संस्थेचा अधिकृत सदस्य नसतानाही नागरिकांची दिशाभूल करून देणगीची रक्कम स्वीकारली असल्याने शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गांधीनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याची चेन लुटणाऱ्या चौघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी व्यापारी पेठेत मारहाण करुन अडीच तोळ्यांची सोन्याची चेन लुटणाऱ्या चौघांना शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. ओंकार प्रदीप पाटील (वय १९, रा. गंजीमाळ, संभाजीनगर), अमोल दिलीप खर्जे (२१, रा. भारतनगर, शेंडा पार्क), अविनाश गंगाधर सुतार (१९, रा. कनाननगर), महेबूब इलाई खलिफा (२३, कनाननगर) अशी संशयितांची नावे आहेत. शाहूपुरी व्यापारी पेठेत अनिल विलास चौगुले (४०, रा. गगनगिरी हाउसिंग सोसायटी, भोसलेवाडी) यांना बेदम मारहाण करून चौघा संशयितांनी अडीच तोळ्यांची सोन्याची चेन लंपास केली. रविवारी (ता.११) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

शाहूपुरी पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. अनिल चौगुले यांनी रविवारी प्रार्थना हॉटेलसमोरील लावलेली मोटारसायकल घेऊन परीट या सहकाऱ्यासमवेत जात होते. यावेळी चार संशयित त्यांच्याजवळ आले. त्यांनी चौगुले यांना धक्काबुक्की केली. एका संशयिताने चौगुले यांचा हात पकडून दुसऱ्या हाताने चौगुले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारुन पळवून नेली. पोलिसांनी अवघ्या ४८ तासात चोरट्यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोघी जखमी

$
0
0

अपघातात विद्यार्थिनीसह महिला जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताराराणी चौकापासून जवळच बाबर हॉस्पिटलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थिनीसह शाळेच्या महिला कर्मचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात विद्यार्थिनीसह महिला जखमी झाली. मंगळवारी (ता. १३) संध्याकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी महिलेवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. कविता कुमार पाटील (वय ३०, रा. अतिग्रे, ता. हातकणंगले) असे जखमी महिलेचे नाव आहे. विद्यार्थिनीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

कविता पाटील या अतिग्रे येथील एका शाळेत कर्मचारी आहेत. मंगळवारी दुपारी शाळेची बस मुलांना सोडण्यासाठी कोल्हापुरात आली होती. बाबर हॉस्पिटल जवळच्या स्टॉपवर आल्यानंतर काही विद्यार्थी बसमधून उतरले. यावेळी बसमधील एका विद्यार्थिनीला घेऊन कविता पाटील या रस्ता ओलांडत होत्या. तावडे हॉटेलकडून आलेल्या एका कारने त्या दोघींना धडक दिली. या घटनेत कविता पाटील यांच्यासह विद्यार्थिनी जखमी झाली. पाठीमागून आलेल्या शाळेच्या दुसऱ्या बसमधील कर्मचारी गीता थोरवत यांना अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बस थांबवून जखमींना मदत केली. जखमी विद्यार्थिनीच्या पालकांनी तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले, तर थोरवत यांनी जखमी कविता यांना सीपीआरमध्ये दाखल केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दिवस पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सोनाग्राफी तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्यापैकी तीन प्रकरणे संशयास्पद आढळून आल्याने त्याच्या तपासासाठी डॉ. अरुण पाटील याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने मंगळवारी एक दिवसाची वाढ केली.

अर्भक विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी जवाहरनगर येथील डॉ. अरुण पाटील याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ती मुदत आज संपल्याने त्यांच्यासह उज्ज्वला पाटील व अर्भक घेणार्या चहांदे दाम्पत्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी डॉ. पाटील याच्या संदर्भाने अन्य ठिकाणी सोनाग्राफीसाठी पाठविलेल्या प्रकरणात तीन प्रकरणे संशयास्पद असल्याने त्याचा तपास करणे व माहिती घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या दोन अर्भकांशिवाय अन्य अर्भकांची विक्री झाली आहे का याचाही तपास होणे आवश्यक असल्याने त्यांना पोलिस कोठडी मिळावी असा युक्तीवाद मांडला. तो ग्राह्य मानून न्यायालयाने पाटील यांच्यासह चौघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सून आणि नातवांवर कोयत्याने हल्ला

$
0
0

कोल्हापूर :

अंघोळीसाठी पाणी तापवण्याच्या क्षुल्लक वादातून सासऱ्याने सून आणि दोन नातवांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या हल्ल्यात आरोपीही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर येथील पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ गावात आज सकाळी ७ वाजता ही घटना घडली. घरात पाणी तापवण्याच्या कारणावरुन आरोपी पांडुरंग सातपुते आणि त्याची सून शुभांगी रमेश सातपुते यांच्यात भांडण झाले. वाद अधिकच वाढल्याने संतप्त झालेल्या पांडुरंगने सुनेसह नातवांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शुभांगी सातपुते, मयुरेश सातपुते आणि मनीषा सातपुते अशी या जखमींची नावे आहेत. वडिलाने पत्नी आणि मुलांवर कोयत्याने हल्ला केल्याचं कळताच रमेश सातपुते यांनी पांडुरंग यांना बेदम मारहाण केली. त्यात पांडुरंग गंभीर जखमी झाले. या हाणामारीत रमेश यांची मुलगी तनिष्का सुद्धा जखमी झाली आहे. या सर्व जखमींना प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>