Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मावा चित्रपट महोत्सव मंगळवारपासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

स्त्री पुरुष लिंगभेद, पुरुषत्वाबाबतच्या चुकीच्या कल्पना, समलिंगी व्यक्ती व त्यांचे जीवन, तृतीयपंथीयांचे जीवन अशा विविध पैलूंवर जाणीवजागृती करणारा 'समभाव चित्रपट महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. सहा फेब्रुवारीपासून महोत्सवाला प्रारंभ होणार असून त्यामध्ये १३ माहितीपट व चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

कलामहर्षि बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी, महिला दक्षता समिती, मावा आणि न्यू एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला महोत्सव आठ फेब्रुवारीपर्यंत आहे. या महोत्सवाला कोणतेही शुल्क नाही,पण नोंदणी आवश्यक आहे. पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा महोत्सव असेल.

स्त्री पुरुष समानतेसाठी 'मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अॅब्यूज' ही संस्था २५ वषार्पासून काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी दिल्ली, बंगळुरु,त्रिचूर, कोलकत्ता, जळगाव अशा ठिकाणी दोन दिवसांचा समभाव चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. याबाबतची माहिती देताना फिल्म सोसायटीचे चंद्रकांत जोशी म्हणाले की, लिंगभेद, पौरुषत्वाबद्दलच्या चुकीच्या कल्पना, लैंगिक विविधता याबाबतची जाणीव जागृती करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. कॉलेजचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, तरुण सिनेनिर्माते यांचा सहभाग अपेक्षित आहे. ज्या विषयावर आपण समाजात मोकळेपणाने चर्चा करत नाही, अशा विषयांवर चित्रपट पाहिल्यानंतर चर्चा केली जाणार आहे. यात 'मावा'चे संचालक हरीश सदानी, रोशन कोकणे, पुण्यातून अमोल काळे, सुरज पोवार सहभागी होणार आहेत. तसेच स्थानिक तज्ज्ञ व कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.

चित्रपटांबाबतची माहिती देताना दिलीप बापट यांनी सांगितले की, यामध्ये १३ चित्रपट व माहितीपट आहेत. त्यामध्ये मर्दिस्तान, बॉइज कॅन बी बॉइज, सुंदर, दारवठा, खेलबदल, मज्मा, ब्रोकन इमेज अशा चित्रपटांचा समावेश असेल. सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महिला दक्षता समितीच्या तनुजा शिपूरकर व अनुराधा मेहता यांनी स्त्री पुरुष म्हणून जगण्याची पारंपारिक चौकट मोडून जगणाऱ्या माणसांना सन्मानाने व सुरक्षित जगता यावे यासाठी हा महोत्सव जागृती करेल, असा विश्वास व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊस तोडणी, वाहतूक कामगार पीएफ कक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यासंदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ मधील तरतुदीनुसार ऊस तोडणी व वाहतूक कामगार भविष्य निर्वाह निधी (पीएफ) लाभासाठी पात्र असून, साखर कारखाना व्यवस्थापनाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त सौरभ प्रसाद यांनी सांगितले. विभागातील साखर कारखान्यांचे पदाधिकारी व व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीत ते बोलत होते. पीएफ कार्यालयात आयुक्त प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

ऊसतोडणी व वाहतूक कामगार कारखान्यामार्फत अथवा ठेकेदारांमार्फत नियुक्त केले असले, तरी सर्व कर्मचारी साखर कारखान्याच्या अखत्यारीत येत आहेत. त्यामुळे पीएफ कायद्यानुसार हे सर्व कर्मचारी पीएफ लाभासाठी पात्र ठरत आहेत. यावेळी कारखाना व्यवस्थापनाकडून विविध अडचणींबाबत शंका उपस्थित केल्या. आयुक्त प्रसाद यांनी कर्मचाऱ्यांना पीएफचे फायदे देण्यासाठी एक महिन्यात कार्यवाही करण्याचे आवाहन केले. बैठकीस पाच जिल्ह्यातील ३५ कारखान्यांचे ५४ अधिकारी व प्रतिनिधींसह कार्यालयाचे सहायक आयुक्त एम. डी. पाटगावकर, एन. बी. मुल्या, एस. एस. बर्णवाल, गोपाल जोशी, एस. टी. पोळ, शैलेश ढोके, नितीन डेकाटे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पोसह साडेसहा लाखांचे मद्य जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणाऱ्या तिघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी अटक केली. दोन लाखांचे देशी-विदेशी मद्य आणि टेम्पो असा सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. सागर शामराव कुलकर्णी, आप्पासाहेब विष्णू शिंदे आणि पॅड्री परशू डिसोझा (सर्व रा. गोवा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. गोवा बनावटीचे मद्य छुप्या पद्धतीने कोल्हापुरात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार पथकाने शनिवारी दुपारी कागल तपासणी नाका परिसरात संशयित वाहनांची तपासणी सुरू केली होती. यावेळी पांढऱ्या रंगाच्या टेम्पोची तपासणी केली असता, यात सुमारे दोन लाखांचा मद्यसाठा आढळला. पथकाने टेम्पोतील तिघांना अटक केली. मात्र, चालक पळून गेला. पथकाने साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांची ’दुकानदारी बंद करुनच थांबणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आपली लढाई दूध उत्पादकांच्या हितासाठी होती आणि ती सुरूच आहे. त्यांची दुकानदारी बंद करून सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हातात कारभार दिल्याशिवाय आंदोलन थांबविणार नाही,' असा इशारा माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता आमदार सतेज पाटील यांनी दिला. तसेच आमच्या आंदोलनाची आमदार सुरेश हाळवणकर यांनी चिंता करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. हिंमत असेल तर उत्पादकांच्या हितासाठी गोकुळवर प्रशासक नेमण्याचे आव्हानच आमदार हाळवणकर यांना दिले. कर्जमाफीबाबत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले, असता ते पत्रकारांशी बोलत होते.

भीमा कृषी प्रदर्शनाच्या समारोप समारंभात आमदार हाळवणकर यांनी गोकुळविरोधातील आंदोलन थांबले, अशी टीका आमदार पाटील यांच्यावर केली होती. याचा समाचार घेताना आमदार पाटील म्हणाले, 'त्यांची गोकुळमधील दुकानदारी बंद करून गोकुळचे खरे मालक असलेल्या दूध उत्पादकांच्या ताब्यात देऊनच ही लढाई थांबणार आहे. आम्ही मैदान सोडणारे नाही. एखादा विषय हातात घेतल्यानंतर त्या विषयाची तड लागल्याशिवाय आम्ही थांबत नाही, अशी आमची ओळख आहे. सर्वसामान्य दूध उत्पादकांची पिळवणूक थांबण्यासाठीच गोकुळवर मोर्चा काढून विषयाला वाचा फोडली. याबाबत सहकार कोर्टात अपील केले असून, १५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामध्ये दिरंगाई झाल्यास मुंबई हायकोर्टात जाणार आहोत. सरकारचा पारदर्शी कारभार असेल, तर गोकुळवर प्रशासक नेमावा.'

मंत्रिपद वाटताहेत...

'प्रदर्शनाच्या समारोपादरम्यान खासदार धनंजय महाडिक यांना भाजपमध्ये या, मंत्री करतो,' या आमदार हाळवणकर यांनी केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवताना आमदार पाटील म्हणाले, 'ज्यांना स्वत:ला मंत्रिपद मिळवता आले, नाही ते दुसऱ्याला वाटत फिरत आहेत. यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंत्रिपदे वाटत सुटले होते, आता नवे नेतृत्व तयार झाले आहे. भविष्यात महेश जाधवही मंत्रिपदे वाटत सुटतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरेचा दोन रुपयांनी उतरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गळीत हंगामास सुरुवात होऊन जेमतेम १५ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर घाऊक बाजारातील साखरेच्या दरात घसरण होऊ लागली. जानेवारी अखरे तर क्विंटल साखरेचा दर २,८०० रुपये असतानाही किरकोळ बाजारात मात्र साखरेच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. पण फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात साखरेचा दर किलोमागे दोन रुपयांनी कमी होऊन ३६ रुपये झाला. कमी झालेल्या दरांमुळे थोडातरी ग्राहकांना दिलासा मिळाला.

नोव्हेंबर महिन्यापूर्वी क्विंटल साखरेचे दर सरासरी ४ हजार रुपयांच्या पुढे होते. यामुळे किरकोळ बाजारात ४४ ते ४५ रुपये किलोने साखर विक्री होत होती. त्यानंतर साखरेच्या दरात सातत्याने घसरण होत गेली तरी, किरकोळ बाजारात दर कमी झाले नव्हते. साखरेचा दर ३ हजार २०० ते ३ हजार ३०० रुपयांपर्यंत कमी झाल्यानंतर किरकोळ बाजारात ३८ रुपये किलो साखर झाली. घाऊक व किरकोळ बाजारातील या तफावतीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत होती.

जानेवारी महिन्यात साखरेचे दर २ हजार ८०० रुपये झाले तरी, किरकोळ बाजारात हेच दर कायम होते. जीएसटी, हमाली, वाहतूक खर्च आदी कारणांमुळे ३८ रुपये दर कायम होता. पण फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात साखरेचा दर दोन रुपयांनी कमी झाला आहे. घाऊक विक्रेत्यांना ३ हजार ३०० रुपयांनी साखर खरेदी करावी लागत असल्याने किरकोळ बाजारात सध्या ३६ रुपयांनी साखर विक्री होत आहे.

कमी झालेल्या साखर दरांमुळे ग्राहकांना काहीप्रमाणात समाधान मिळाले आहे. इतर किराणामालाचे दर मात्र या आठवड्यात स्थिर राहिले आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कडधान्य तर शेवटच्या आठवड्यात तांदूळ दरात वाढ झाली होती. या आठवड्यात मात्र दरात फारसे बदल झालेले नाहीत.

किराणा दर (किलो)

पोहे - ४० रु.

साखर - ३८ रु.

शेंगदाणा - ८० रु.

मैदा - २६ रु.

रवा - २८ रु.

आटा - २६ रु.

गूळ - ४० रु.

शाबू - ७५ रु.

तीळ - १४० रु.

तूरडाळ - ७५ रु.

मूगडाळ - ७५ रु.

उडीदडाळ - १०० रु.

हरभराडाळ - ७० रु.

मसूरडाळ - ६२ रु.

मूग - ८० रु.

मसूर - ८० रु.

चवळी - ८० ते १०० रु.

हिरवा वाटाणा - ४० ते ६० रु.

काळा वाटाणा - ७२ ते ८०

मटकी - ६० रु.

छोले - १४० रु.

पावटा - १२० रु.

बार्शी शाळू - ३२ ते ३४ रु.

ज्वार १ नं. - ३० ते ३२ रु.

ज्वारी २ नं. - २७ ते २९ रु.

ज्वारी ३ नं. २२ ते २४ रु.

बाजरी - १७ ते २४ रु.

तेलाचे दर (किलो)

शेंगतेल - १०० रु.

सरकीतेल - ७६ ते ७८ रु.

खोबरेलतेल - २२० रु.

डालडा - ९० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला महाराज म्हणू नका; ते फक्त एकच!: उदयनराजे

$
0
0

सातारा: 'महाराज फक्त एकच होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी आपण सगळे छाटछूट आहोत. त्यामुळं यापुढं कुणीही मला महाराज म्हणून नका,' असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

साताऱ्यात छत्रपती शिवाजीराजे भोसले संग्रहालयाच्या सुरू असलेल्या बांधकामाची उदयनराजे यांनी नुकतीच पाहणी केली. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या संग्रहालयाचं बांधकाम निधीअभावी बंद पडलं होतं. यावर तोडगा काढण्यासाठी उदयनराजेंनी पुरातत्व खाते, सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं व त्यांना काही सूचना केल्या. अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी आपल्या खास स्टाइलनं संवाद साधला.

सर्वसामान्यांसह अनेक अधिकारीही उदयनराजेंना 'महाराज' म्हणून संबोधतात. त्याबद्दल उदयनराजेंनी यावेळी नाराजी व्यक्त केली. 'मला कुणीही महाराज म्हणून नये,' असं ते म्हणाले. अरबी समुद्रात शिवस्मारक होणं केवळ अशक्य आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलीकडंच एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्याबद्दलही उदयनराजे यांनी रोकठोक मत मांडलं. 'राज ठाकरे कोणत्या संदर्भात म्हणाले ते मला माहीत नाही. पण, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होऊ शकतो, तर शिवस्मारक का होऊ शकत नाही? आपण सगळे शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे जगत आहोत. शिवाजी महाराज हे एक वेगळ्या उंचीचं व्यक्तिमत्त्व होतं. जगात अनेक राजे होऊन गेले, पण जाती-धर्मापलीकडं जाऊन शिवाजी महाराजांनी जे केलं, ते कुणाला जमलं नाही. छोट्याशा आयुष्यात तीनशे-साडेतीनशे किल्ले बांधण्याची अशक्यप्राय गोष्ट त्यांनी करून दाखवली. हा एकच राजा असा आहे, ज्याला लोकांनी देव्हाऱ्यात स्थान दिलंय. त्यांच्यासाठी आपण एक स्मारक उभं करू शकत नाही. हा केवळ बुद्धीनं नव्हे तर हृदयापासून विचार करण्याचा मुद्दा आहे,' असं ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१११ वर्षाच्या आज्जीबाईंचा वाढदिवस साजरा

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

जागतिक आरोग्य मानांकनानुसार भारतीयांचे सरासरी वय ६७ वर्षे असल्याचे सांगितले जाते. मात्र सांगोला तालुक्यातील शिरभावी गावामध्ये १११ वर्षे वयाच्या आज्जीबाईंचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. यावेळी त्यांच्या सहा पिढ्या एकत्र आल्या होत्या.

सांगोला तालुक्यातील शिरभावी गावामध्ये खेंडकर यांच्या सहा भावांचे एकत्रित कुटुंब रहातं. आज्जीबाईंच्या वाढदिवसाची गावात सर्वत्र डिजिटल बोर्ड लागले होते. त्यांचा पणतू पितांबर याने आपल्या पणजीचा वाढदिवस खरंच अनोख्या पद्धतीने साजरा केला. आपल्या पणजीला अजून उदंड आयुष्य लाभावे यासाठी गावातील सर्व वृद्धांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी थेट मिरज येथून डॉक्टरांचे पथक गावात आले होते.

खेंडकर कुटुंबातील सरूबाई यांचा आज १११ वा तर त्यांचा मुलगा सहदेव यांचा ९१वा वाढदिवस साजरा झाला. सरूबाई १११ वर्षाच्या झाल्या असल्या तरी अजूनही त्यांची बुद्धी शाबूत आहे शिवाय अजूनही त्या चालतात बोलतात. आज त्यांची सहावी पिढी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळू लागली आहे. पण अजूनही त्या आपल्या नातू आणि पणतू सोबत जुन्या काळातील आठवणी रंगवत बसतात. वयोमानानुसार पाठीला बाक आला असला तरी त्या सगळीकडे फिरत असतात. आजही त्यांचे दात चांगले आहेत. जेवणात चिकन आणि कणसं देखील त्या नातवांच्याबरोबर खातात. याचचं आश्चर्य त्यांच्या चौथ्या पिढीतील सुनांना वाटतं. पूर्वीच्या आयुष्यात केलेले कष्ट, योग्य प्रमाणातील आहार आणि शुद्ध हवामान हेच त्यांच्या दिर्घायुष्याचं गमक आहे.

आज त्यांच्या वाढदिवशी एकत्र आलेल्या सहा पिढ्यांनी सरूबाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील वयोवृद्धांना हृदय तपासणी, नेत्र तपासणीचे शिबीर भरवले. या शिबिरात अनेक वयोवृद्धांनी तपासणी केली. सरूबाई यांच्या दिर्घायुष्याची प्रेरणा इतरांना मिळावी हीच भूमिका खेंडेकर कुटुंबाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी लर्निंग अॅक्ट व्हावा : देशमुख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठी माध्यमातील शाळांच्या अस्तित्वापासून ते सार्वत्रिक वापरापर्यंत मराठी भाषेकडे दुय्यमपणे पाहिले जात आहे. मराठीची ही गळचेपी थांबवायची असेल तर केवळ इंग्रजीच नव्हे तर प्रत्येक भाषिक माध्यमातील शाळांमध्ये मराठी लर्निंग अॅक्ट लागू केला पाहिजे. महाराष्ट्रात शालेय स्तरावर मराठी भाषेला अनिवार्य दर्जा मिळाला तरच तिचा सन्मान वाढेल,' असा विश्वास कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी, लेखक व नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.

लक्ष्मीकांत देशमुख यांची बडोदा येथील नियोजित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोल्हापूरच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. मानपत्र, ग्रंथ व कोल्हापुरी गूळ असे या सत्काराचे स्वरूप होते. रविवारी सायंकाळी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व लेखक दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते देशमुख यांना गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे होते. यावेळी कोल्हापूरकरांच्या सत्काराविषयी मनोगत व्यक्त करताना देशमुख यांनी मराठी भाषेविषयीची तळमळ व्यक्त केली. यावेळी महापौर स्वाती यवलुजे, देशमुख यांच्या पत्नी अंजली, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी मराठी भाषेविषयी आदर वाढला पाहिजे, असे सांगून देशमुख म्हणाले, मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा एकमेकांविरोधात उभ्या करून मराठी टिकवण्यासाठी भांडणे योग्य नाही. त्यासाठी इंग्रजी माध्यम असो किंवा कोणतेही बहुभाषिक माध्यम असो, या माध्यमांच्या महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा कायदा केला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक इतर भाषिक माध्यमांच्या शाळेत मराठी विषय पहिल्या इयत्तेपासूनच अनिवार्य केला तर अन्य भाषिक माध्यमांचे आक्रमण मराठीवर होत असल्याची ओरड निश्चितच थांबेल.'

लेखक आणि समाज यांच्यातील नात्याविषयी बोलताना देशमुख म्हणाले, 'केवळ सौंदर्य आणि शाब्दिक मनोरे रचून लेखन करणाऱ्या साहित्यिकांना लेखक प्रेमचंद यांनी 'भौतिक भांडवलदार' असे संबोधले आहे. मी या प्रकारच्या लेखकपंक्तीत असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या प्रवासात मी प्रेमचंद यांच्या विचारातील जातकुळीचे लेखन केले. समाजातील पीडितांचा आवाज बनणारा लेखक हा समाजमनाच्या अधिक जवळ असतो. ज्या व्यवस्थेने व्यथा, दु:ख सामान्य माणसाला दिले ती व्यवस्था बदलण्यासाठी माझे लेखन कसे उपयोगी ठरेल असा विचार लेखकाने केला पाहिजे असे मला वाटते. समाजातील खरा-खोटा चेहरा दाखविण्याचा आरसा म्हणून लेखकाची भूमिका महत्त्वाची आहे.'

दाभोळकर म्हणाले, 'सृजनशील लेखकाला लेखन करण्यासाठी जे अवकाश लागते, ते देशमुख यांना कोल्हापुरात मिळाले. त्यांच्यातील प्रशासक व लेखक कोल्हापूरकरांच्या प्रतिसादामुळे बहरला. कोल्हापूर आणि देशमुख हे नातं म्हणूनच आपुलकीचे आहे. सायलंट ऑब्झर्व्हर आणि रास्त भाव धान्य दुकानांतील भ्रष्टाचाराला आळा हे महत्त्वाचे निर्णय देशमुख यांनी कोल्हापूरच्या कारकिर्दीत घेतले. सरलता आणि प्रासादिकता या स्तरावर लेखन करणाऱ्या देशमुखांचे साहित्य अस्वस्थ करणारे आहे. प्रदीर्घ चिंतनावर आणि पचविलेल्या अनुभवावर आधारित असलेले त्यांचे साहित्य मनाशी थेट भिडणारे आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची प्रतिभा त्यांच्याकडे आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारे संमेलन भविष्यात पथदर्शी ठरेल.'

गिरीश फोंडे यांनी प्रास्ताविक केले. अनुराधा भोसले यांनी परिचय दिला. प्रा. जी. पी. माळी यांनी मानपत्राचे वाचन केले. यशवंत भालकर यांनी आभार मानले. यावेळी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, व्यंकाप्पा भोसले, रजनी हिरळीकर, अशोक चौसाळकर, चंद्रकांत जोशी, पंडित कंदले, नामदेव गावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मनातील स्थान हाच सत्कार

प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून कोणत्याही जिल्ह्यात काम करणे हे कर्तव्य आहे. मात्र, कोल्हापुरात काम करताना वेगळाच आपलेपणा मिळाला. चांगल्या कामाला दाद देण्याचा कोल्हापूरकरांचा स्वभाव मला भावला. शाहूनगरीमध्ये जिल्हाधिकारी म्हणून केलेले काम आणि आता सयाजीराव गायकवाड यांच्या नगरीत बडोद्यात संमेलनाध्यपदाचा मिळालेला सन्मान हा एक अनुबंध आहे. या दोन संस्थानकालीन नगरींनी मला खूप काही दिले आहे. भावश्रीमंत करणारा हा क्षण आणि कोल्हापूरकरांनी त्यांच्या मनात मला किती खोलवर स्थान दिले आहे याची प्रचिती देणारा हा सत्कार आहे. अशा शब्दांतत देशमुख यांनी ऋण व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाज क्रांतिकारी संघातर्फे धनगर समाजाने रविवारी मोर्चा काढला. सत्तेवर आल्यानंतर १५ दिवसांत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. साडेतीन वर्षे झाले तरी भाजप सरकाने आश्वासन पूर्ण केले नाही. सरकारला मोर्चातून आश्वासनाची आठवण करून दिली. मोर्चात विविध महापुरुषांचे डिजिटल फलक, मागण्यांच्या आशयाचे फलक, धनगरी ढोल, झांज, कैताळ वाद्य वाजवून लक्ष वेधले. दसरा चौक येथे झालेल्या सभेत समाजाने आरक्षणाची जोरदार मागणी केली.

गांधी मैदानातून दुपारी अडीच वाजता आमदार राजेश क्षीरसागर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चास सुरुवात झाली. धनगरी ढोल, पिवळे ध्वज, टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांचा मोर्चा महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, बिंदू चौक मार्गे दसरा चौकात आला. 'याद राखा आम्ही धनगर महाराष्ट्रात १७ टक्के आहोत', 'सरकार आम्हाला आरक्षण केव्हा देणार', 'भ्रष्ट, निष्ठूर राजकारणी नेत्यांच्या जगात भरडलेल्या धनगर समाजाचा कोणी विचार करेल का', 'काठी अन् घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी मोर्चात येऊ द्या की रं', 'दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे (२०१४)', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. मोर्चा दसरा चौकात आल्यानंतर सभेत रुपांतर झाले.

धनगर समाजाने काय घोडे मारले

धनगर समाज क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष विलासराव वाघमोडे यांनी पालकमंत्र्यांसमोर समाजाच्या व्यथा मांडल्या. धनगर समाज हा वाड्यावस्त्यावर विखुरला आहे. समाजावर अंधश्रद्धेचा पगडा आहे. आरक्षण न मिळाल्याने समाजातील तरुणांची प्रगती खुंटली आहे. ना शेती, ना उद्योगधंदे, ना नोकरी यामुळे विकासापासून हा समाज वंचित राहिला. काँग्रेस पक्षाने समाजाला लाथाडले, केवळ मतासाठी समाजाचा वापर केला. श्रीमंत समजल्या जाणाऱ्या समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा दिला. पण धनगर समाजाची उपेक्षा केली. समाजाच्या भाजप सरकार व पालकमंत्र्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पालकमंत्री पाटील यांनी आरक्षणाचा निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा.'

शिवसेना आवाज उठवणार

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'धनगर समाजाच्या मागण्या रास्त आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत समाजाच्या मागण्या पोहचवू. खासदार गजानन किर्तीकर यांनाही मागण्यांचे निवेदन पाठवून त्या माध्यमातून सेनेचे खासदार लोकसभेत हा प्रश्न मांडतील. अधिवेशनातही सेनेचे आमदार हा प्रश्न धसास लावतील.'

व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते

महापौर स्वाती यवलुजे, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक आशिष ढवळे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, काँग्रेस ओबीसी सेलचे उमेश पोर्लेकर, गजानन लिंगम, महेश लोखंडे, तानाजी मर्दाने, धनगर समाज क्रांतीकारी संघाचे कृष्णात शेळके, बाळासाहेब मोटे, बाबूराव बोडके, रामभाऊ डांगे, सुरेश शेंडगे, सुलोचना नायकवडी, अरुण गावडे, धोंडीराम सिद, उन्मेष वाघमोडे, अभिजित बत्ते, उन्मेष वाघमोडे, विकास घागरे, देवाप्पा चोपडे, सोमाजी वाघमोडे आदी उपस्थित होते. जिल्हा युवक अध्यक्ष दीपक शेळके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

ओव्यांतून मागण्या

सभेच्या प्रारंभी कुरळप येथील बिरदेव ओवीकार मंडळाने धनगरी ओव्या सादर केल्या. ओव्यातून धनगर आरक्षण, सोलापूर विद्यापीठ नामकरण या प्रश्नाबाबत सरकारकडून टोलवाटोलवी सुरु असल्याची मांडणी केली. 'मायबाप सरकार आरक्षण कधी मिळणार वाट बघतोय भोळा भाबडा धनगर' अशी ओवी सादर करत समाजाच्या व्यथा मांडल्या.

तर ढोल वाजवा आंदोलन

सभेला सुरुवात होण्यापूर्वी विलासराव वाघमोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मार्च महिन्यापर्यंत आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याच्या घरासमोर ढोल वाजवा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर आदी महापुरूषांचे डिजीटल फलक लावलेले लहान टेंम्पो मोर्चाच्या शेवटी होते. फलकावरील महापुरूषांच्या भव्य प्रतिमा आणि त्याखाली लिहिलेल्या त्यांच्या कर्तृत्वावरील ओळी साऱ्यांचे लक्ष वेधल्या.

प्रमुख मागण्या ः धनगर समाजाची अनुसूचित जमाती प्रवर्गात नोंद करून त्वरित अंमलबजावणी करावी, शेळी, मेंढी पालन पोषणास उद्योगाचा दर्जा द्यावा, राष्ट्रीयकृत बॅकांकडून कर्ज मिळावे, डंग धनगर पिढयानपिढ्या कसणाऱ्या जमिनी, त्यांच्या नावावर करावे, क्रिमीलेअरची अट रद्द करावी, धनगर वाडयांवर मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी सावकारांची दहशत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजकीय नेत्यांच्या उठबस आणि पोलिसांशी सलोख्याच्या संबधामुळे खासगी सावकारांचा वरवंटा सामान्य माणसांसह व्यावसायिकांवर फिरू लागला आहे. बांधकाम व्यावसायिकाला रिव्हॉल्व्हर रोखून धमकी देणारा सूरज साखरे हा दीड वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणातील संशयित असूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा कृत्यांना बळ मिळत आहे.

बांधकाम व्यावसायिक धीरज साखळकर आणि त्यांच्या पत्नीने दोन सावकारांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. सूरज साखरेने थेट साखळकरच्या शनिवार पेठ येथील सासऱ्याच्या घरी जाऊन रिव्हॉल्व्हर रोखले. एका राजकीय पक्षाच्या कार्यालयासाठी फ्लॅट नावावर करुन देण्याची त्याने धमकी दिली. ही घटना घडून काही महिन्यांनी गुन्हा दाखल झाला आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याने विम्याचे ३५ कोटी रुपये मिळवण्यासाठी स्वत:च्या खुनाचा बनाव रचला होता. अमोल व त्याचा भाऊ विनायक याने गडहिंग्जच्या रमेश कृष्णाप्पा नाईक या मजुराचा खून करून आजऱ्याजवळ गाडीचा अपघात झाल्याचा बनाव केला होता. त्यानंतर प्रकरण उघडकीस आले आणि पवारच्या मुसक्या आवळल्या. खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून खून केल्याची कबुली अमोल पवार याने दिली होती. यावेळी पोलिसांनी पवार याला कर्ज देणाऱ्या १५ खासगी सावकारांची नावे जाहीर करुन त्यांच्यावर बडगा उगारण्याची घोषणा केली होती. या १५ सावकारांत साखरेचा समावेश होता. पण पोलिसांनी एकाही खासगी सावकारांवर कारवाई केली नाही. पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी खासगी सावकारांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर साखरे याचे रिव्हॉल्व्हर रोखून राजकीय पक्षाच्या कार्यालयासाठी फ्लॅट मागण्याचे धाडस झाले नसते. साखरे याची पत्नी एका राजकीय पक्षाच्या शहर आघाडीची पदाधिकारी आहे. देवकर पाणंद व मोरे कॉलनी परिसरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी साखरेने तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षाच्या वरदहस्त मिळाल्याने साखरेने खासगी सावकारकीचा व्यवसाय वाढवला आहे.

मागील आठवड्यात इचलकरंजीतील नगरपालिका कर्मचाऱ्याने सावकारांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली होती. दोन वर्षांपूर्वी एका पोलिस कर्मचाऱ्याने व्हिडोओ गेम चालकाच्या सावकारकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी व्हिडोओ गेमवर कडक कारवाई केली होती.

राजकीय वरदहस्त

खासगी सावकारीला बळ मिळावे यासाठी सावकारांनी राजकीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवले आहेत. एका सावकाराचा भाऊ महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता आहे. तर एका खासगी सावकारांची पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे. काहींनी थेट राजकीय पक्षांशीही लागेबांधे ठेवले आहेत. शहरातील या खासगी सावकारांनी छोटे विक्रेते, दुकानदार, व्यावसायिक, उद्योजकांना व्याजाने पैसे दिले आहेत. नोटबंदी व जीएसटीमध्ये व्यवसाय ठप्प झाले असताना दुसरीकडे खासगी सावकारांचा ससेमिरा सुरू असल्याने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. तक्रार केल्यानंतरच खासगी सावकारांवर कारवाई होते. पण एकाद्याने खासगी सावकाराच्या विरोधात तक्रार केल्यास पोलिस ठाण्यातच ते मिटवण्यावरच भर दिला जात आहे. त्यामुळे तक्रारदार थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत आहेत. अमोल पवारने केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात जर पोलिसांनी १५ सावकारांच्यावर बडगा उगारला असता तर खासगी सावकारीवर चांगलाच चाप बसला असता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिये येथे घरफोडी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

करवीर तालुक्यातील शिये गावातील हनुमाननगर येथे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दीड लाख किंमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. अशोक शामराव ताटे यांनी फिर्याद दिली आहे.

ताटे हे कारखानदार असून शुक्रवारी (ता. २ फेब्रुवारी) रात्री आठ वाजता घराला कुलूप घालून ते रेळे या गावी पालखी सोहळ्यासाठी सहकुटुंब गेले होते. पालखी सोहळा आटपून शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घरी आले. यावेळी घराच्या दाराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले. घराचा दरवाजा उघडून त्यांनी प्रवेश केला असता, चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी कपाटातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि दोन तोळे वजनाच्या बांगड्या चोरुन नेल्या. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप

$
0
0

कोल्हापूर: पोटच्या मुलीवर सतत दोन महिने बलात्कार करणाऱ्या बापाला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. यू. कदम यांनी जन्मठेपची शिक्षा सुनावली. दत्तात्रय दादू कांबळे (६८) असे त्याचे नाव आहे.

पीडित मुलीला पतीने सोडल्याने ही मुलगी माहेरी राहात होती. या मुलीच्या आई काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याने ती आणि तिचे वडील असे दोघेच राहत होते. दत्तात्रय कांबळे हा मजुरीचे काम करीत होता. १५ फेब्रुवारी २०१५ या दिवशी दत्तात्रय कांबळे याने मुलीस मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दोन महिने तो मुलीवर अत्याचार करत होता.

रोजच्या त्रासाला कंटाळून तिने भागातील नगरसेविका रेखा आवळे यांना या प्रकाराची माहिती दिली. हा प्रकार ऐकून आजूबाजूच्या महिला जमा झाल्या. यावेळी नागरिकांनी कांबळे याला जाब विचारत बेदम मारहाण करत शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. आपले वडील दोन महिने जबरदस्तीने अत्याचार करत असल्याची तिने फिर्याद दिली.

दत्तात्रय कांबळे याच्यावर पोलिसांनी भारतीय दंडसंहिता विधान कलम ३७६ (अ) नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. कांबळे याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठालण्यात आली.

त्यानंतर तपास अधिकारी आर. पी. भूतकर यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सर्व पुरावे व सरकारी वकील मंजुषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्ग माहिती केंद्र बंदच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या परिसरातील जैवविविधता हा कोल्हापूरचा सद्यस्थितीतील सर्वात मोठा ठेवा आहे. येथील निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि नागरीकांचे प्रबोधन करण्यासह जैवविविधतेची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेंतर्गत रंकाळा तलाव परिसरात ३५ लाख रुपये खर्च करून निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आले. मात्र गेल्या आठ वर्षांपासून हे केंद्र पडून आहे. नेहमीची झुडुपे आणि गवताने हा परिसर वेढला आहे. परिसरात लाइटची व्यवस्था नसल्याने इमारतीचा गैरवापर सुरु झाला आहे.

पर्यटकांसाठी रंकाळा तलाव हे मोठे पर्यटन स्थळ आहे. तसेच हा परिसर जैवविविधतेने परिपूर्ण असल्याने पर्यावरण अभ्यासकांसाठीही पर्वणीच आहे. तलाव परिसरातील विविध प्रकारचे मासे, स्थानिक पक्षी, स्थलांतरीत पक्षी, कासव तसेच अन्य जलचर यामुळे येथे अन्नसाखळी तयार झाली आहे. अशा तलावाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारची राष्ट्रीय तलाव संवर्धन योजना आहे. या अंतर्गत महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे निसर्ग माहिती केंद्राची आवश्यकता होती. त्यानुसार केंद्राचा प्रस्ताव तयार करुन देण्यात आला. यासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. २००९ साली या केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण झाले.

जिथे पक्षी, विविध जलचर, उभयचर यांचा वावर आहे, अशा दलदलीच्या परिसराजवळ केंद्र बांधण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना, पर्यटकांना पर्यावरणाची माहिती देण्यात यावी, असा सरकारचा मुख्य उद्देश होता. त्याकरिता शहरातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी केंद्राच्या इमारतीची मागणी करावी. त्यानुसार नाममात्र शुल्कामध्ये त्यांना केंद्र उपलब्ध करुन दिले जाईल, असे धोरण महापालिकेने ठरवले होते. त्यासाठी संस्थांना आवाहनही करण्यात आले. पण अशा संस्था पुढे आल्या नाहीत. जवळपास आठ वर्षे या इमारतीचा वापर होत नाही. व्हाइट आर्मी संस्थेला एक रुम देण्यात आली आहे. पण इतर रुम बंद अवस्थेत आहेत.

स्वयंसेवी संस्थाही उदासिन

या केंद्रामध्ये पर्यावरणात काम करणाऱ्या संस्थांनी यावे, तिथे विविध उपक्रम राबवले जावेत, त्यातून पर्यावरणाची माहिती देण्यात यावी, तलावाच्या संवर्धनाच्या कामालाही मदत होईल अशी अपेक्षा आहे. पण कुणी संस्था पुढे आलेल्या नाहीत. त्यामुळे या इमारतीकडे दुर्लक्ष होत आहे. केंद्र सुरु नसल्याने सतत वाढणारे गवत, लाइटचा अभाव यामुळे या इमारतीच्या आवारात गैरप्रकार सुरु झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षारपड जमिनींचा होतोय कायापालट

$
0
0

अजय जाधव,जयसिंगपूर

ज्या शेतजमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता ती जमीनच क्षारपड बनली. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्याची वेळ बळीराजावर आली. यामुळे सरकारी मदतीची वाट न पाहता शेतकरी एकवटले. गाव पातळीवर चर्चा झाली. दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पाठबळ दिले, अन् सुमारे १५०० एकर क्षारपड शेतजमिनीत भूमिगत जल निचरा पध्दतीचा अवलंब करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. शिरोळ तालुक्यात शेडशाळ परिसरात स्वखर्चातून हाती घेण्यात आलेल्या देशातील या पहिल्या प्रकल्पाचे आज २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. क्षारपड जमिनीत शिवार पुन्हा फुलावे यासाठी शेकडो हात काम करीत आहेत.

शिरोळ तालुक्यात सुमारे २० हजार एकर शेतजमीन क्षारपड बनली आहे. वडिलोपार्जीत शेतजमीन नापिक बनली हे शल्य शेतकऱ्यांच्या संवेदनशील मनाला डाचत होते. क्षारपड जमिनीत पुन्हा पिके डोलताना प्रत्येकाला पहायची होती. मात्र या जमिनीची सुधारणा करायची कशी, त्यासाठी पैसे आणायचे कोठून असा प्रश्न होता. सरकारी मदतीची अपेक्षाही फोल ठरली. शेडशाळ येथे शेतकऱ्यांनी गावपातळीवर चर्चा केली. कर्ज काढून क्षारपड जमिनीत भूमिगत जल निचरा पध्दतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जमीन क्षारपड असल्याने राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देत नव्हते.

याचवेळी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना पाठबळ दिले. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी त्यांनी स्व. सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्याची ग्वाही तर दिलीच पण याचबरोबर जल निचरा प्रकल्प राबविण्यासाठी मार्गदर्शनही केले. गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेतल्यामळे सहाजिकच शेतकऱ्यांचे मनोबल वाढले. शेडशाळ, आलास, गणेशवाडी परिसरातील ९०० शेतकरी एकवटले अन् सुमारे १५०० एकर क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी पाऊल उचलले. नवतंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या सकारात्मक विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. प्रकल्प राबविणे सुलभ व्हावे यासाठी अन्नदाता बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था शेडशाळ या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुदर्शन तकडे यासह अन्य पदाधिकारी सरसावले. शेतकर्यांची संमतीपत्रे घेण्यात आली.

अभियंता किर्तीवर्धन मरजे यांनी क्षारपड जमिनींचे सर्व्हेक्षण करून अंदाजपत्रक तयार केले. भूमिगत जल निचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी एकरी एक लाख रूपये खर्च निश्चित करण्यात आला. यानंतर जयसिंगपूर उदगाव बँकेने सात वर्षाच्या मुदतीने कमी व्याजदराने अर्थपुरवठा केला. अन् सुमारे १२ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. माजी आमदार सा.रे.पाटील यांच्या जयंतीदिनी ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ झाला. शेतकऱ्यांच्या बैठका वारंवार सुरूच होत्या. एकाचवेळी १५०० एकर क्षेत्रात निचरा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही कमी होणार होता. यासाठी गणपतराव पाटील तसेच पाईप उत्पादन क्षेत्रात कार्यरत असणारे चंद्रशेखर दांडेकर यांचे मार्गदर्शन सुरूच होते. या प्रकल्पात सहभाग नसणाऱ्यांचे नकारात्मक विचार तसेच अनेक अडथळ्यांवर मात करीत जिद्द, चिकाटी अन् परिश्रमाच्या जोरावर या प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

असा आहे प्रकल्प

शेडशाळ, आलास, गणेशवाडी येथील गेल्या २५ ते ३० वर्षाहून अधिक काळ क्षारपड असणाऱ्या सुमारे १५०० एकर शेतजमिनीत हा भूमिगत जल निचरा प्रकल्प स्वखर्चातून राबविण्यात येत आहे. शेतजमिनीत साडेतीन ते साडेचार फूट खाली व १५ मिटर अंतरावर सच्छीद्र पाईप टाकण्यात येणार आहे. या सछिद्र पाईमधून एकत्र झालेले शेतातील पाणी मुख्य नलिकेव्दारे नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या शेतातून पाणी वाहून नेणाऱ्या तीन मुख्य जल वाहिन्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. शेतापासून नदीपर्यंत साडेतीन किलोमीटर लांबीच्या तीन जलवाहिन्या टाकण्याचे काम जेसीबीव्दारे युध्दपातळीवर सुरू आहे. शेकडो शेतकरी तसेच मजूर यासाठी काम करीत आहेत. हे काम पूर्ण होताच शेतजमिनीत सछिद्र पाईप टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

'शेती हेच बळीराजाचे उत्पन्नाचे साधन आहे. शिरोळ तालुक्यात हजारो एकर जमीन क्षारपड बनली आहे. गेल्या २५ वर्षांपासून क्षारपड असणाऱ्या या जमिनीत तणही उगवत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ आली आहे. यामुळे जयसिंगपूर उदगाव बँकेकडून शेतकऱ्यांना अर्थपुरवठा केला. निचरा प्रकल्पामुळे शेतजमिनीत पुन्हा पिके घेता येतील. शेतकऱ्यानी एकरी ५० टन ऊस उत्पादन घेतले तरी वार्षिक ३० कोटींची उलाढाल सुरू होईल.

गणपतराव पाटील, अध्यक्ष, दत्त कारखाना

'शेतजमीन क्षारपड बनल्याने राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज मिळत नव्हते. यामुळे जमीन सुधारायची कशी असा प्रश्न होता. गणपतराव पाटील यांनी प्रोत्साहन दिले, अर्थपुरवठाही केला. यामुळेच जलनिचरा प्रकल्पाच्या कामास सुरूवात झाली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जमिनीतील क्षार कमी होवून पिके पुन्हा घेता येतील.

सुदर्शन तकडे, उपाध्यक्ष, अन्नदाता संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकार, कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ठरलेल्या एफआरपीमध्ये घट केल्याच्या निषेधार्थ रघुनाथ पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी लक्ष्मीपुरी येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकले. गनिमी कावा करत कार्यकर्त्यांनी एका कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत बाहेर काढल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. घटनास्थळी पोलिस कुमक दाखल होताच आंदोलकांनी पळ काढला. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

साखर दरात सातत्याने घसरण होत असल्याने एफआरपी देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेत जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांची बैठक झाली. बैठकीमध्ये शॉर्टमार्जीन तयार झाल्याने उत्पादकांना एफआरपीचा पहिला हप्ता २,५०० देण्याचा निर्णय घेतला. उत्पादकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या या निर्णयामुळे शेतकरी संघटनामध्ये असंतोष निर्माण झाला होता. सोमवारी त्याचे तीव्र पडसाद उमटले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत अचानक प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मारली. १० ते १५ कार्यकर्ते प्रचंड घोषणाबाजी करत कार्यालयात घुसले. अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले, पण कर्मचाऱ्यांनी विरोध करताच जोरदार शाब्दीक चकमक उडाली. लिपिक आर. सी. उपाध्ये यांना धक्काबुक्की झाल्यानंतर उपसंचालक दिग्विजय राठोड, कार्यालयीन अधीक्षक आर. बी. बारडे यांच्यासह महिला कर्मचारी कार्यालयाबाहेर आले. त्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी करतच साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकले. लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस येत असल्याची माहिती मिळताच आंदोलकांनी पळ काढला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता पाटील, पोलिस काँन्स्टेबल रणजीत कांबळे, राहुल महाजन आदी साखर सहसंचालक कार्यालयात दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन कुलूप तोडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश केला.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अॅड. शिंदे यांच्यासह हणमंतराव पाटील, महादेव काटे, शंकर मोहिते, अजित पाटील, पी. आर. पाटील, बाळासाहेब मिरजे, बी. एस. पाटील यांच्यासह आणखी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नव्हते.

कार्यालयाला मिळणार कायमचा बंदोबस्त

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर साखर कारखान्यांचा समावेश आहे. दोन्ही तालुक्यात शेतकरी संघटनांची चांगली बांधणी असल्याने ऊसदर किंवा इतर कारणांनी नेहमीच आंदोलने होत असतात. आक्रमक आंदोलकांमुळे अनेकवेळा कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. वारंवारच्या या आंदोलनामुळे येथे कायमस्वरुपी बंदोबस्त ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तर पालकमंत्र्यांच्या घरावर विराट मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एफआरपी अधिक दोन टप्प्यात २०० रुपये दर देण्याचा निर्णय झाला. पण कारखानदारांनी घटलेल्या साखर दराचे कारण पुढे करत पहिली उचल २,५०० देण्याचा निर्णय घेतला. कारखानदारांच्या निर्णयाला पालकमंत्री पाटील यांनी विरोध केलेला नाही. कारखानदारांचा निर्णय अजिबाबत मान्य नसून संघटना रस्त्यावरील लढाई करण्यास सक्षम आहे. ऊस उत्पादकांच्या हक्कासाठी प्रसंगी पालकमंत्री पाटील यांच्या घरावर विराट मोर्चा काढण्याचा निणर्य सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. शुक्रवारी (ता. ९) खासदार राजू शेट्टी कोल्हापुरात आल्यानंतर मोर्चाची तारीख आणि वेळ ठरवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, बैठकीनंतर संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचे उपसंचालक दिग्विजय राठोड यांना निवेदन दिले. साखरदरात घसरण झाल्यानंतर कारखानदारांनी जिल्हा बँकेत बैठक घेवून पहिली उचल २,५०० व ऊर्वरीत रक्कम नंतर देण्याचा निर्णय घेतला. कारखानदारांच्या निर्णयाविरोधात संघटनेने आक्रमक होत यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सोमवारी प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक झाली. बैठकीत संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

बैठकीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल मदनाईक, रमेश भोजकर, विठ्ठल मोरे, वसंत पाटील, सांगर कोंडेकर, राजाराम देसाई, विठ्ठल शिंदे, विक्रम पाटील,वैभव कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीनंतर शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व साखर उपसंचालक दिग्वीजय राठोड यांना निवेदन देण्यात आले. 'उऊसदराबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खासदार राजू शेट्टी संपर्क करत आहेत, पण ते वेळ देत नाहीत. तर पालकमंत्री पाटील या विषयावर काहीच बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे भविष्यातील कारखानदार व संघटनेतील संघर्ष टाळण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

एकतर्फी निर्णयाला विरोध

एफआरपी ठरवताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील, साखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होऊन निर्णय घेतला. पण कारखानदारांनी कोणत्याही घटकांशी चर्चा न करता एफआरपी कमी करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. या निर्णयाला तीव्र विरोध करावा,असे बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी सुचवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ दिवसात २३ दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरांच्या टोळ्या सक्रीय आहेत. गेल्या १५ दिवसांत चोरट्यांनी २३ दुचाकी लंपास केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणांसह घराच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. बनावट चावीच्या मदतीने काही क्षणात दुचाकी लांबवल्या जातात. विशेष म्हणजे चोरीस गेलेल्या दुचाकी आणि चोरटेही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, त्यामुळे दुचाकी चोरांची दहशत निर्माण झाली आहे.

जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ या काळात जिल्ह्यातून ४१२ दुचाकी आणि १४ चारचाकी वाहनांची चोरी झाली होती. वर्षात ४२६ वाहनांची चोरी झाल्यानंतर यातील केवळ ११६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. वाहन चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. जानेवारी २०१८ मधील शेवटच्या दोन आठवड्यात शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे २३ गुन्हे नोंद झाले आहेत. यातील सर्वाधिक आठ गुन्हे कोल्हापूर शहरात घडले आहेत, तर सहा गुन्हे इचलकरंजी शहरात घडले आहेत. गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी चोरट्यांनी लांबवल्या आहेत. याशिवाय काही ठिकाणी चोरट्यांनी घरामोर पार्क केलेल्या दुचाकीही पळवल्या. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. बहुतांश दुचाकी बनावट चावीच्या सहायाने लंपास केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे.

दुचाकीची चोरी झाल्यानंतर पोलिसांकडून याची नोंद करून घेतली जाते, मात्र चोरट्यांचा शोध घेण्यात तत्परता दाखवली जात नाही. चोरीची नोंद पोलिसांच्या डायरीतच राहते आणि चोरटे पुन्हा चोऱ्या करीत मोकाट फिरतात. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे दुचाकी चोरणाऱ्या टोळ्यांची संख्या वाढली आहे. चोरलेल्या दुचाकींची नंबरप्लेट बदलून त्यांची कमी किमतीत विक्री केली जाते. बऱ्याचदा चोरीच्या दुचाकी बाहेरच्या जिल्ह्यात विकल्या जातात. चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यास चोरीच्या घटनांना आळा बसू शकेल. अनेकदा चोरीच्या दुचाकींचे पार्ट्स काढून ते विकले जातात, अशी कबुली काही दुचाकी चोरट्यांनीच यापूर्वी पोलिसांना दिली होती.

दोन दिवसांत दहा दुचाकींची चोरी

२२ आणि २३ जानेवारी या दोन दिवसात चोरट्यांनी १० दुचाकी लंपास केल्या आहेत. यात इचलकरंजीतील दोन, शिरोली एमआयडीसीतील दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय जयसिंगपूर, शहापूर, लक्ष्मीपुरी, कुरुंदवाड, शाहूवाडी आणि गोकुळ शिरगाव या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून प्रत्येकी एका दुचाकीची चोरी झाली आहे. सलग दोन दिवसात झालेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलिसही चक्रावले आहेत.

चोरीच्या घटना

पोलिस ठाणे दुचाकी चोरीच्या नोंदी

इचलकरंजी ४

शाहूपुरी ३

गोकुळ शिरगाव ३

राजारामपुरी २

शिरोली एमआयडीसी २

लक्ष्मीपुरी २

कुरुंदवाड १

शहापूर १

जयसिंगपूर १

शाहूवाडी १

गांधीनगर १

शिवाजीनगर १

जुना राजवाडा १

जानेवारी महिन्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना रोखण्यासाठी रेकॉर्डवरील वाहन चोरांची चौकशी सुरू आहे. लवकरच दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येतील. यात काही बाहेरच्या जिल्ह्यातील संशयितांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबरी चोरीतील चौघे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्लॉट खरेदीतील रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांवर हल्ला करून १७ लाखांची लूट करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी साडेआठ लाखांची रक्कम हस्तगत केली असून, गुन्ह्यात वापरलेली दुचारी आणि शस्त्रेही जप्त केली आहेत. विशेष म्हणजे ज्या महिलेने प्लॉट विकत घेतला होता तिच्या घरगड्यानेच चोरट्यांना रकमेची टीप दिल्याचे तपासात उघडकीस आले.

टीप देणारा जितेंद्र उर्फ पिंटू किसनसिंग रजपूत (वय ३३, मूळ रा. कराड, सध्या रा. उचगाव), चंद्रकांत उर्फ बबन कुंडलिक सावरे (३३, म्हसोबा मंदिराशेजारी, शिंगणापूर, ता. करवीर), वैभव उर्फ भाई बाबासो कांबळे (२३, रा. आंबेडकरनगर, पाडळी, ता. करवीर) आणि योगेश उर्फ गोपी राजेश गागडे (२२, रा. गणेशनगर, शिंगणापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. आणखी एक संशयित पसार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महाडिक वसाहत येथे राहणाऱ्या आशा जाधव यांनी सूर्यकांत नलवडे यांचा साडेतीन गुंठ्याचा प्लॉट विकत घेतला. जाधव यांनी यातील एक कोटींची रक्कम बँकेतून ऑनलाइन दिली होती. उर्वरित १७ लाख १९ हजारांची रक्कम एजंट चारुदत्त अण्णा कोगे आणि दिनकर बंडोपंत जाधव यांच्याकरवी प्लॉटच्या मूळ मालकाला दिली जाणार होती. आशा जाधव यांच्या घरातून रक्कम घेऊन बाहेर पडल्यानंतर राजेश मोटर्ससमोर दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी कोगे आणि जाधव यांची दुचाकी अडवली. मिरची पूड टाकून कोयत्याने मारहाण करीत त्यांनी रक्कम लुटली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने संशयितांचा शोध सुरू केला होता. प्लॉट खरेदी-विक्रीची माहिती असणाऱ्या संबंधितानेच हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय होता. या अनुषंगाने तपास सुरू केला. जबरी चोरीची घटना घडल्यापासून आशा जाधव यांच्याकडे काम करणारा जितेंद्र उर्फ पिंटू रजपूत हा गायब होता. रजपूत याच्या मोबाइलवरील कॉल डिटेल्स तपासताच पोलिसांची शंका खरी ठरली.

रजपूत याने रकमेची माहिती दिल्यानंतर चंद्रकांत सावरे, वैभव कांबळे, योगेश गागडे या सर्वांनी आणखी एका साथीदारासह लुटीचा कट रचला. शुक्रवारी (ता. २) दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी दोन दुचाकींवरून कोगे आणि जाधव यांचा पाठलाग केला. राजेश मोटर्सच्या समोर मिरची पूड टाकून कोगे यांच्याकडील रक्कम असलेली पिशवी हिसडा मारून पळवली. जबरी चोरीनंतर सर्व संशयित शिंगणापूर येथे गेले. कपडे बदलून ते दुचाकींवरून कर्नाटकात बेळगावला गेले होते. पोलिसांनी जितेंद्र रजपूत याच्या मोबाइल लोकेशनवरून चोरट्यांचा माग काढला. रविवारी (ता. ४) सरनोबतवाडीच्या हद्दीतील राजाराम तलाव परिसरातून या चौघांना ताब्यात घेण्यात आले. अटकेतील चौघांनी जबरी चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील साडेआठ लाख रुपये, दुचाकी, दोन तलवारी आणि एक कोयता जप्त केला आहे.

एलसीबीने पकडले संशयित

जबरी चोरीचे गांभीर्य ओळखून शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी तपासासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली होती. शाहूपुरी पोलिसांचेही पथक चोरट्यांचा शोध घेत होते. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी एलसीबीकडे गुन्ह्याचा समांतर तपास दिला. एलसीबीने संशयितांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यानंतर काही तासांतच संशयित पोलिसांच्या हाती लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर: १०वीतील विद्यार्थ्याची शाळेतच निर्घृण हत्या

$
0
0

पंढरपूर: माळशिरस तालुक्यातील पिरळे येथील समता माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याची शाळेतच हत्या झाल्याने पालकवर्गात खळबळ उडाली आहे. महेश किसन कारंडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिरळे येथील अपंग असलेले किसन महादेव कारंडे यांचा द्वितीय पुत्र महेश हा विनाअनुदानीत असलेल्या समता विद्यालयामध्ये १० वी मध्ये शिकत होता. महेश आज सराव परीक्षेसाठी शाळेत गेला होता. त्यावेळी त्याला अज्ञातांनी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमाराला शाळेच्या स्टोअर-रूममध्ये बोलावून घेऊन ऊसतोडणीच्या कोयत्याने वार करून हत्या केल्याचे दिसून आले.

महेशचा मृतदेह शाळेतील स्टोअर रुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. या घटनेनंतर तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तपास सुरु करताच त्याच्याच वर्गातील २ मुले शाळेत हजर नसल्याचे निदर्शनासआले. पोलिसांनी या दोन विद्यर्थ्यांचा तपास सुरु केला असता ते पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

महेशची त्याच शाळेत दहावीत शिकणाऱ्या गावातीलच दोन विद्यार्थ्यांबरोबर जीवलग मैत्री होती. ही घटना घडल्यानंतर ते दोघेही मित्र परीक्षेला बसले नसल्याचे शिक्षकांना आढळून आले आहे. यामुळे त्यांच्यावरच संशय निर्माण झाला. मात्र, बंद असलेल्या शाळेच्या खोलीत हे शस्त्रधारी विद्यार्थी आले कुठून, महेशला कोणी बोलावले आणि एवढी भयानक घटना घडेपर्यंत शिक्षकांना काहीच कसे माहीत नसावे, यावर ग्रामस्थांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

आज सकाळी १०.३० नंतर घडलेली घटना शिक्षकांना कळायला तासाचा कालावधी गेला. तर, पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला दोन तास लागले .

दरम्यान, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर महेशचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी नातेपूते येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला.

या प्रकरणात कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईतील व्यापाऱ्याला कोल्हापुरात लुटले

$
0
0

कोल्हापूर:

मुंबईच्या व्यापाऱ्याला कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून, तसेच मारहाण करून हल्लेखोरांनी त्याच्याकडील एक किलो सोन्याचे दागिने लुटल्याने खळबळ उडाली आहे. गुजरीतील महादेव मंदिराजवळ आज सकाळी ही घटना घडली.

व्यापारी कांतीलाल जसवंत राज मेहता (वय ५३) यांच्यावर आज सकाळी गुजरी येथील महादेव मंदिराजवळ पाच लुटारूंनी हल्ला केला. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्याकडील १ किलो सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला. त्याची अंदाजे किंमत १ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. मारुधर भवन येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. गुजरी कॉर्नर ते रंकाळ स्टँड या मार्गावर या आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. लुटारूंचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात पथके रवाना झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>