Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नंदीध्वजांची सोलापुरात लक्षवेधी मिरवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
श्री सिद्धेश्वर महाराजांचा अखंड जयघोष, सनई चौघड्यांचा मंजुळ आवाज, बँजोवरील भक्तिगीते आणि हलग्यांच्या कडकडाटात तसेच पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला तैलाभिषेकाने (यन्नीमज्जन) शुक्रवारपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
सोलापूरच्या पंचक्रोशीत श्री सिद्धरामेश्वरांनी केलेल्या ६८ लिंगाना नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात आला. पांढऱ्या रंगाच्या बाराबंदीच्या पोशाखातील हजारो सिद्धेश्वर भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. नंदीध्वजाच्या लक्षवेधी मिरवणुकीने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तैलाभिषेकासाठी गुरुवारी मध्यरात्रीच मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाला साज चढविण्यात आला होता. उत्तर कसब्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठात सकाळी मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांची मानकरी शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख यांच्यासह पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्वलाताई शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, स्मृती शिंदे, सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी, यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
नंदीध्वजाचे दर्शन घेण्यासाठी व बोललेले नवस फेडण्यासाठी मिरवणूक मार्गावर भक्तांची दुतर्फा झाली होती, तसेच नंदीध्वजाला खोबऱ्याचा हार व बाशिंग बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. दिवसभरात ६८ लिंगाना तैलाभिषेक केल्यानंतर रात्री नंदीध्वज उत्तर कसब्यातील हिरेहब्बू मठात विसावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीत अपघातात पाच पैलवानांचा मृत्यू

$
0
0

सांगली:

कडेगाव तालुक्यातील वांगी येथे ट्रॅक्टर आणि क्रूझरची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच पैलवानांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात पैलवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातं.

शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. क्रांती कुस्ती संकुलातील १० ते १२ पैलवान साताऱ्यातील औंध येथे कुस्ती खेळण्यासाठी गेले होते. तिथून कुंडलला येत असताना वांगी येथील शिरगाव फाट्यावर ऊसाचा ट्रॅक्टर आणि क्रूझरदरम्यान जोरदार धडक झाली. ऊसाच्या ट्रॅक्टरने कार जवळ येताच हेड बाहेर काढले आणि क्रूझर ट्रॅक्टरमध्ये घुसली. ट्रॅक्टरचे चाक फुटून दोन नंबर ट्रॉलीचे कमान पाटे सुद्धा मोडले. हा अपघात इतका भीषण होता की क्रुझरचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यामुळे क्रुझरमध्ये बसलेल्या पाच पैलवानांचा जागीच तर एकाचा मिरज येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर गंभीर जखमी झालेल्या पैलवानांचे हातपाय मोडले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे.


आकाश देसाई,विजय पाटील, सौरभ माने, अविनाश गायकवाड आणि शुभम घारगे अशी या मृत पैलवानांची नावं आहेत. तर रणजीत धनवडे असं या अपघातात ठार झालेल्या चालकाचं नाव आहे. ही घटना घडली तेव्हा जवळपास कोणीच नव्हतं. त्यामुळे या पैलवानांना तात्काळ उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं एका जखमी पैलवानानं सांगितलं.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औताडेंनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागलसारख्या राजकीय घडामोडींमध्ये राहून अडचणीतील साखर धंद्यातून विजय औताडे यांनी यशस्वी मार्ग काढला. ते केवळ शाहू कारखान्याचे नाही तर संपूर्ण शाहू समुहाचे कार्यकारी संचालक होते. यापुढेही ते मार्गदर्शक म्हणून नव्हे तर सहकारी म्हणूनच सूचना देत रहातील, असे प्रतिपादन ‘शाहू’ ग्रुप चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
‘शाहू’ ग्रुपच्यावतीने औताडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी सुहासिनीदेवी घाटगे, नवोदिता घाटगे, सुनीता औताडे प्रमुख उपस्थित होते.
विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर औताडे यांनी मला वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवायला लावून पुढे पाऊल टाकायला लावले. राजकीय घडामोडीत लोकांच्या अपेक्षा वाढल्या असतानाही औताडे यांनी शॉर्ट आणि लाँग टर्म निर्णय घ्यायला लावले. एवढेच नव्हे तर आपल्या पश्चात आपल्या कार्यप्रणालीची जाण असणारा आपल्यातलाच कार्यकारी संचालक त्यांनी तरबेज केला.
सत्काराला उत्तर देताना औताडे म्हणाले, ‘मी एक सामान्य व्यक्तिमत्व असून दिवंगत विक्रम‌सिंह घाटगे यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीच्या सानिध्यात आल्यानेच विश्वासाने माणसे जोडू शकलो. माझ्या आयुष्यातील ५० टक्क्यांहून अधिक काम शाहू ग्रुपमध्येच झाले. हा माझ्यासाठी सुवर्णकाळ होता. त्यामुळे ‘शाहू’ च्या ऋणातच उर्वरित आयुष्य व्यतित करायला मला आवडेल. राजेंची दूरदृष्टी आणि अगाध ज्ञान यामुळेच अनेक स्थित्यंतरानंतरही कार्यप्रणालीमुळे ‘शाहू’ प्रथम क्रमांकावर राहिला. पारदर्शकता, गुणवत्ता आणि आर्थिक शिस्त मी पाळली त्यामुळेच माझ्यासारख्या व्यक्ती आल्या- गेल्या तरी संस्था चिरकाळ उच्चपद लौकिक कायम ठेवून टिकणार यावर माझा विश्वास आहे. संस्थाहित जोपासताना कुणाचे मन दुखावले असले तरी ते मला समजून घेतील.’

राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. जी. मेढे म्हणाले, ‘साखर कारखानदारीतील काही गुंतागुंतीचे प्रश्न केवळ औतांडे यांच्यामुळेच सुटले. त्यांच्यासारखी बोटावर मोजण्याइतपतच मंडळी जीव ओतून काम करतात.’

यावेळी निवृत्त पोलिस उपअधीक्षक सुरेश पवार, युनियन अध्यक्ष बाळासाहेब तिवारी, प्रा.सुनील मगदूम आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे घाटगे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, शाहू संचालक डी. एस. पाटील, पी. डी. चौगुले, टी. ए. कांबळे, सचिव एस. ए. कांबळे, बॉबी माने, भूपाल पाटील, कर्नल दिलीप मंडलिक, आनंदराव हिलगे आदी प्रमुख उपस्थित होते. बाजीराव पाटील यांनी आभार मानले.

रिफाईन साखर द्यावी लागेल

मागील २० वर्षांपासून आणि भविष्यातल्या साखर धंद्याकडे लक्ष वेधून विजय औताडे म्हणाले, ‘येत्या काळात ग्राहकाला विदाऊट सल्फर (रिफाईन साखर) द्यावी लागेल. साखर मागणी वाढणार आहे परंतु ती स्वत: जागापोहोच द्यावी लागेल. क्रेडिट देणे-घेणे महगात पडणार असून आता ‘लॉजेस्टिक’ मॅनेजमेंट करावे लागेल. कारण उत्तरप्रदेशच्या ज्यादा साखरेचेही आपल्यासमोर आव्हान आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माफी मागा अन्यथा दावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल
दारिद्रय रेषेखाली नावही नाही व कोणतेही फायदे घेतलेले नाहीत, सरळ सरळ पुरावा द्यावा अन्यथ: जाहीर माफी मागा. माफी न मागितल्यास समरजितसिंह घाटगे यांच्यावर दोन कोटी रुपयांचा बदनामीचा फौजदारी दावा दाखल करू, असा इशारा प्रताप माने आणि प्रकाश गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कागल तालुक्यातील गलगले येथील एका कार्यक्रमात अतिदारिद्र्य रेषेखाली असणारे प्रताप माने, प्रकाश गाडेकर, दिनकर कोतेकर, युवराज पाटील यांनी कोट्यावधी रुपयांची कर्जे थकवून बँकांना अडचणीत आणले, असे वक्तव्य घाटगे यांनी केले होते. या वक्तव्याची दखल घेत कागल नगरपालिकेत आयोजित पत्रकार बैठकीत माने आणि गाडेकर यांनी आव्हान दिले.
कोणत्याही दारिद्रय रेषेच्या यादीत आम्हा चौघांची नावे नाहीत. एका पैशाचीही कर्जमाफी आम्ही घेतलेली नाही. समरजितसिंह घाटगेंनी केलेले वक्तव्य म्हणजे आमचा अपमान आहे. असे सांगत माने पुढे म्हणाले, ‘समरजित घाटगेंना चुकीची माहिती देण्याची सवय आहे. हे खोटारडेपणाचे लक्षण आहे. ते सातत्याने जनतेची दिशाभूल करतात. युवराज पाटील हे शेतकरी आहेत, त्यांना कोणतीही कर्जमाफी झालेली नाही. याबाबत माजी मंत्री जयंत पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. एखाद्या शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नसताना त्याचा अपमान करणे कितपत योग्य आहे. राजे गटात कर्जमाफीबद्दल चर्चेचा विषय ठरलेले अनेक कर्जदार आहेत. आमची जात शेतकऱ्याची असल्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. आम्ही बहुजन समाजाचे कार्यकर्ते आहोत. जरूर सामान्य असू परंतू आमची प्रतिमा आम्ही कष्टकरून मिळविली आहे. आम्हा कोणासही पुर्वजांच्या कृपेने संपत्ती मिळालेली नाही. त्यामुळे कोणीही उठावे आणि आमच्या चारित्र्यावर आघात करावा हे कदापि सहन करणार नाही.
यावेळी बोलताना प्रकाश गाडेकर म्हणाले, ‘शाहू दूध संघ प्रचंड तोट्यात आहे. साखर कारखान्याची संपूर्ण यंत्रणा वापरूनही दूध संघाचा तोटा कमी झालेला नाही हे खरे आहे का? कागल बँकेकडून अडीच कोटींपासून पाच कोटींपर्यंत दूध संघास कर्ज घेतले आहे का? सदरचे कर्ज सेकंड मॉर्गेज करून घेतले आहे का? विक्रमसिंह घाटगे यांनी अंदाजे शंभर कोटी रुपये खर्चाचा गाळप विस्तार केला होता. त्यांच्या पश्चात कारखाना व्यवस्थित चालवून आपली कार्यक्षमता सिद्ध करून न दाखवता राजेंच्या निधनानंतर दोनच वर्षात दीडशे कोटी रूपये खर्च करून पुन्हा गाळप विस्तार का केला? कागल बँकेचे नामकरण करून ‘कागल’ शब्द वगळला हा अपमान नाही का? जयसिंगराव पार्क, श्रमिक वसाहत याठिकाणी कारखान्याच्या चिमणीतून काजळी पडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अजून कितीदिवस नागरिकांचा अंत पाहाणार आहात? कारखान्यातून बाहेर पडणारे दुर्गंधियुक्त दुषित काळे पाणी दररोज दूधगंगा नदीत मिसळते हे कधी थांबणार? असे प्रश्न यापुर्वीही विचारले होते, त्याचे अद्याप उत्तरे अद्याप समरजित घाटगे यांनी दिलेली नाहीत.

दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना सातत्याने जाणीवपुर्वक बदनाम करणे, त्यांची उणे-दुणे काढणे बंद करावे. आम्ही शाहूंच्या विचारांच्या वारसा जपणारे कार्यकर्ते आहोत. आम्हास बदनाम करू नये. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची अब्रू वेशीवर टांगण्याचा घाटगे यांनी प्रयत्न करू नये. वेळीच ते करीत असलेली बदनामी थांबवावी. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पुरावे द्यावेत. अन्यथ: माफी मागावी. पर्यायाने न्यायालयाचे दार ठोठावून दोन कोटी रुपयांचा बदनामीचा फौजदारी दावा दाखल करावा लागेल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष नितिन दिंडे, शिक्षण मंडळ सभापती अलका मर्दाने, शोभा लाड, रमेश माळी, पक्षप्रतोद प्रवीण काळबर, सौरभ पाटील, सतीश गाडीवड्ड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलींमागे हिंदुत्ववादी संघटना: आंबेडकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यास आलेल्या भीमसैनिकांना हिंदुत्ववादी संघटनांच्या वर्चस्ववादातून मारहाण झाली असल्याची टीका भारतीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केला. अभिवादन व त्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये झालेली जाळपोळ मराठा-दलित समाजाने केली नसून, देशाचे राजकारण ताब्यात ठेवण्यासाठी अनियंत्रित आणि नियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांनी केली असल्याचाही गंभीर आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला.

कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर तीन जानेवारी रोजी झालेल्या घटनेनंतर प्रथमच अॅड. आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. दौऱ्यात ते सिद्धार्थ नगर येथे भेट देणार होते, पण पोलिसांच्या विनंतीवरून जिल्ह्यातील नागरिकांची गाऱ्हाणे समजून घेवून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अॅड. आंबेडकर म्हणाले, ‘कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी पुणे, चाकण व शिरूर असे तीन मार्ग आहेत. त्यापैकी पुणे वगळता चाकण व शिरूर मार्गावरून येणाऱ्या भीमसैनिकांना मारहाण केली. तत्पूर्वी गोविंद गायकवाड यांच्या समाधीवरून वाद निर्माण होत होता. त्यावेळी ३९ जणांवर गुन्हा दाखल करून नऊ जणांना सोडून दिले. पण मारहाण झालेल्या घटनेची पोलिसांनी नोंदही करून घेतली नाही. याविरोधात दोन जानेवारी रोजी गावा-गावातून समाज बाहेर पडला. तीन जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला काहीठिकाणी हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी संघटनांनी हे जाणीवपूर्वक केले, असून याची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोग स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.’

‘महाराष्ट्र बंद दरम्यान काही कार्यकर्त्यांवर दरोड्याचे व ३०७ कलम लावले. पोलिसांचा हा अाततायीपणा असून, यातून कार्यकर्त्यांची निश्चित सोडवणूक केली जाईल. यासाठी सरकारलाही लक्ष घालावे लागेल. भारतात पाकिस्तानप्रमाणे अंतर्गत यादवी निर्माण होऊ नये, यासाठी हिंदुत्ववादी संघटनातील वर्चस्ववातून निर्माण होणाऱ्या हफीज सय्यद यांना पायबंद घालवा, अन्यथा आम्ही त्याचा बंदोबस्त करू, असा इशाराही दिला. देशासमोर आज मोठे संकट असून यातून यादवी होण्याची शक्यता आहे. यातून एक जानेवारीची हिंसकघटना घडली. अशा घटनामध्ये आततायीपणा केला, तर निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता असल्याने नियंत्रित हिंदुत्ववादी संघटना आपला अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोपही अॅड. आंबेडकर यांनी केला.

‘आठवले पेपर टायगर’

कोरगोव भीमा घटनेच्या माध्यमातून आपण नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे, का, या विषयी बोलताना प्रसार माध्यमांनी तयार केलेले पेपर टायगर माझ्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. मी कालही राजा होतो, आजही राजा आहे, आणि उद्याही राजा राहणार आहे, असे सांगत केंद्रीय समाजीक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता अॅड. आंबेडकर यांनी टोला लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजचे साहित्यिक ठोस भूमिका घेत नाहीतः राज

$
0
0

सांगली

महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत प्रत्येक टप्प्यावर साहित्यिक ठाम भूमिका घेताना दिसत होते, परंतु आजचे साहित्यिक सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज साहित्य संमेलनात केली. पद्मश्री कवी सुधांशू अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी साहित्यिकांची चांगलीच कानउघडणी केली.

महाराष्ट्राचा लढा, आणीबाणीचा काळ आणि केरळमधील साहित्य चळवळीचा दाखला देत राज्यातील साहित्यविश्वाला राज यांनी चागंलेच फटकारले. आज गप्प बसलात तर भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल. समाजाची मशागत करणे हे साहित्यिकांचे काम आहे. लोकांना वर्तमानातील घडामोडी समजावून सांगणे ही तुमची जबाबदारी आहे. ती साहित्यिक पार पाडताना दिसत नाही. त्यामुळे आतातरी महाराष्ट्रातील सद्याच्या परिस्थितीविषयी बोलायला हवे, त्याबद्दल लिहायला हवे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या जे घडत आहेत, त्यावर लिहिण्याचे लेखक धाडस करत नाहीत. जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यातली सामाजिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे या सगळ्या जातीय भिंती पाडा, आणि महाराष्ट्रवर जी संकटे येत आहेत, त्याला सामोरे जाण्यास तयार राहा. कमला मिल्सच्या आगीनंतर पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटसचाही राज यांनी समाचार घेतला. आगीत मृत्युमुखी पडलेले फक्त गुजराती समाजाचे होते म्हणूनच पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी ट्वीट करुन शोक व्यक्त केला, असा आरोप राज यांनी केला. पंतप्रधान हे केवळ गुजरातचे नाही तर ते संपूर्ण देशाचे आहेत, असा टोलाही राज यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यिकांनो, गप्प बसू नका!: राज ठाकरे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
‘समाजाची मशागत करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. सध्या साहित्यिक ती जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. महाराष्ट्रात जे घडतेय ते बोला, तेच लिहा. आज गप्प बसलात तर नंतर तुम्हालाच पश्चातापाची वेळ येईल. आता सर्व राजकीय, जातीय भिंती पाडल्या पाहिजेत. महाराष्ट्रावर जे संकट येत आहे. त्याला सर्वांनी सामोरे जाऊ या,’ असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले. औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, ‘साहित्यिकांनी वाचावे ते समजावून घ्यावे, असे सर्वांना वाटत असते. साहित्यिकांकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. कोणत्याही गोष्टी राजकारणविरहित होऊ शकत नाहीत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. हे भिजत घोंगडे केंद्राकडून ठेवले गेले आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आता महाराष्ट्रात आपण बेसावध झालो आहोत. त्यामुळे महाराष्ट्र पोखरत चालला आहे. मुंबईसारख्या शहरात आज मराठी माणूस पाहिजे आहे. परंतु, तो संपत चालला आहे. त्यासाठी शहरांचे महत्त्व अबाधित ठेवले पाहिजे. भाषा तर टिकली पाहिजेच; त्याआधी मराठी माणूस टिकवला पाहिजे. माझ्या महाराष्ट्राच्या विरोधात जे घडेल त्याच्या विरोधात मी बोलणारही व कृतीही करणार.’
जातीच्या राजकारणावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, ‘राज्यात जातीचे राजकारण वाढू लागले आहे. आडनावावरून जातीची परीक्षा होते. हे चुकीचे आहे. इतर राज्ये आपल्या माणसासाठी एकवटतात. मग हे महाराष्ट्रात का घडत नाही? तेराव्या शतकात देवगिरीचा राजा रामदेवराय बेसावध होता. त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीने त्याचा पराभव केला. पुन्हा मराठी राज्य येण्यासाठी सतराव्या शतकाची वाट पहावी लागली. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्या वेळी आपण एकत्र आलो. पुन्हा आता विखुरले गेलो आहोत.’
महाराष्ट्र परप्रांतीयांच्या हातात
राज ठाकरे म्हणाले, ‘साहित्यिकांनी महाराष्ट्रातील सद्यपरिस्थिती मांडावी. महाराष्ट्र आता परप्रांतीयांच्या हातात चालला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची स्थिती मोठ्या शहरांत अवघड होत आहे. शेतकरी, नोकरदार, महिला यांची स्थिती महाराष्ट्रात बिकट होत चालली आहे. विरोधासाठी विरोध मी करीत नाही. केवळ साहित्य संमेलने आयोजित करून काहीही होणार नाही. त्यासाठी पूर्वीच्या साहित्यिकांचे साहित्य वाचले पाहिजे. इतिहासातून बोध घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र घडवला पाहिजे. त्यासाठी आता साहित्यिकांबरोबर सर्वांनी भूमिका वठवली पाहिजे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगळ्या शिक्षण पद्धतीची देशाला गरज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘नोकऱ्यांमध्ये आरक्षण मागत असताना या समस्येचे मूळ शिक्षणात आहे, हे विसरुन चालणार नाही. आज घडीला ७५ टक्के अभियंते बिनकामी बसून आहेत. ९० टक्के पदवीधर नोकरी लायक नाहीत. ९५ टक्के पीएचडीधारक निरुपयोगी आहेत, असे अहवाल सांगतात असतील त्याचा अर्थ कधीतरी तपासला पाहिजे. अशा चुकीच्या शिक्षण पद्धतीचा कुठेच, काहीच उपयोग होत नसेल तर आता वेगळी शिक्षण पद्धती आणावी लागेल,’ असे स्पष्ट मत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
नवभारत शिक्षण मंडळ, शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार आणि प्राचार्य पी. बी. पाटील सोशल फोरमच्या वतीने कर्मयोगी पुरस्कार रविवारी रयत शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. फोरमचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, आमदार सुमन पाटील, नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, संचालक गौतम पाटील, वैभव नायकवडी आदी या वेळी उपस्थितीत होते.
डॉ. पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनीही शिक्षण व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले. डॉ. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. १७० जाती जमातींच्या साडेचार लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेला ९८ वर्षे पूर्ण झाली असून, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्कारातून संस्थेला मोठी स्फूर्ती मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कर्मवीर अण्णा आणि प्राचार्य पी. बी. पाटील या दोघांनाही यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, जे. पी. नाईक, अशा मोठ्या माणसांचे सहकार्य मिळाल्यामुळे कमवा व शिका योजनेतून त्यांना हजारो माणसे उभे करणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग व्यवसायिकांना आपल्या फायद्यातील १० टक्के वाटा शिक्षणासाठी ठेवलाच पाहिजे, असे कर्मवीर अण्णांनी १९२०मध्ये सांगितले होते. एक विद्यार्थी आणि ३० रुपयांच्या बजेटवर अण्णांनी जेव्हा रयत शिक्षण संस्था सुरू केली तेव्हा अनेक अडचणींमध्ये केवळ वहिनींच्या योगदानामुळे संस्था टिकून राहिली. महात्मा गांधी यांनी त्यावेळी ५०० रुपयांची देणगी संस्थेला दिली होती. गोर-गरीब बहुजन समाज आणि संस्थानिकही त्यांच्यामागे उभे राहिले. तब्बल ३३ हार्ट अ‍ॅटॅक येऊनही केवळ प्रचंड मानसिक ताकदीच्या जोरावर अण्णांनी शिक्षणाचे कार्य तडीला नेले. आजही रयत सेवक आणि लोकसहभागामुळेच रयतची वाटचाल जोमाने सुरू असल्याची त्यांनी सांगितले. गुगलवरही दिसणार नाहीत अशा दुर्गम भागामध्ये रयत शाळा सुरू ठेवल्या आहेत. जलयुक्त बंधारे उभे केले आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ४१ मुलांना रयतने दत्तक घेतले आहे, असेही डॉ. अनिल पाटील म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी केले. या वेळी शामराव जगताप व टी. डी. पाटील यांना माई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. हणमंत साळे यांनाही सन्मानित करण्यात आले. थोरात अ‍ॅकॅडमीच्या इनचार्ज समिता पाटील व मंजुश्री पवार यांच्या हस्ते अनुराधा मोरे यांचा सत्कार करण्यात आला. रंगावलीकार संतोष ढेरे यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अक्षता सोहळ्याच्या मुर्हूतावरदोन्ही देशमुखांचे मनोमिलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
बाजरीची कडक भाकरी, गरगट्ट्याची भाजी आणि हुग्गी, शेंगाची पोळी, असा झकास बेत. पंगत वाढण्यास महापौर आणि शहराध्यक्ष आणि सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याचा मुहूर्त, अशा त्रिवेणी संगम साधत भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यामध्ये शनिवारी मनोमिलन झाले. पालकमंत्र्यांना सोबत घेऊन सर्वच बाबतीत सोलापूर समृद्ध करणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले. या वेळी लोकमंगलच्या वतीने काढण्यात आलेल्या पर्यटन विषयक पुस्तकाचे प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून महापालिकेत गटबाजीचे राजकारण सुरू आहे. सुमारे दहा महिन्यांनतर या गटबाजीमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनाच लक्ष घालावे लागले. मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांसबोत महापौर, शहराध्यक्ष नगरसेवक या सगळ्यांनाच झापले. एकत्र व्हा अन्यथा महापालिका बरखास्त करू, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर अखेर पालकमंत्री देशमुख आणि सहकारमंत्री देशमुख यांचे तसेच त्यांच्या सर्व नगरसेवकांचे शनिवारी अक्षता सोहळ्याच्या मुर्हूतावर मनोमिलन झाले.
शनिवारी सकाळी भाजपच्या दोन्ही गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी महापालिकेत एकत्र जमले. सहकारमंत्री देशमुख महापालिकेत आले. त्यांच्या उपस्थितीत चहापान झाल्यानंतर सर्वजण अक्षता सोहळ्यासाठी गेले. तेथे पालकमंत्री आणि त्यांचे सहकारी अधीच पोहचले होते. अक्षता सोहळा झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या वतीने सारस्वत मंगल कार्यालयात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी पालकमंत्री अक्षता पडल्यानंतर लगेच गेले. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी सारस्वत मंगल कार्यालयात हजेरी लावली. पहिल्या पंगतीनंतर सर्व महिला नगरसेविकांचे आगमन झाले. पालकमंत्र्यांनी सर्वांना आग्रह करून भोजनाचा आस्वाद घेण्यास सांगत होते. त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे आगमन झाले. तोपर्यंत पालकमंत्री देशमुख जेवणासाठी सहकारमंत्र्यांची वाट पहात बसले होते. तिघांनीही भोजनाचा एकत्र आस्वाद घेतला. महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी पालकमंत्री आणि सहकारमंत्र्यांना जेवण वाढले. हे दृश्य टिपण्यासाठी कॅमेरामन तथा भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवकांची एकच गर्दी झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशमुखांमध्ये असलेले मनभेद सध्या तरी मिटल्याचा आनंद या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जाणवत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत सद्भावना रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सद्भभावनेने रविवारी रस्त्यावर उतरलेल्या सांगलीकरांच्या गर्दीने रॅली मार्ग फुलून गेला. सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी आणि शांततेचे आवाहन करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून शाळा, महाविद्यालये, संस्था, आजी-माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, विविध संघटनांचे जथ्थे, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष कर्मवीर भाऊराव पाटील चौकाच्या दिशेने येत राहिले. विविध रंगी गणवेशांच्या गर्दीने व्यापलेल्या चौकात तिरंगी फुग्यांचा भला मोठा गुच्छ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हातून आकाशात स्वच्छंदपणे झेपावला. दिव्यांग विद्यार्थींनीने हिरवा झेंडा दाखविला आणि रॅलीचा मार्ग ओसांडून वाहू लागला.

जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाला समाजाच्या सर्वच घटकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारचा हक्काच्या सुट्टीचा दिवस असतानाही सरकारी, निमसरकारी, सहकार, खासगी संस्था, संघटना आणि सर्व राजकीय पक्ष सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून हातातहात घालून रॅलीच्या मार्गावर स्वार झाल्याने ही रॅली लक्षवेधी ठरली.

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तिरंगा ध्वज उंचावत रॅली मार्गावर पाऊल टाकले आणि गर्दीने रस्ते व्यापले. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार अमर साबळे, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सुरेश खाडे, सुमन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, विशाल पाटील, विश्वजित कदम, महापौर हारुण शिकलगार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, बापूसाहेब पुजारी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उपमहापौर विजय घाडगे, महापौर गटाचे नेते शेखर माने, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार दिनकर पाटील आदींसह सर्वपक्षीय कृती समितीने रॅलीचा मार्ग धरला.

कर्मवीर भाऊराव पाटील चौक, राम मंदिर, पंचमुखी मारुती रोड, गरवारे महाविद्यालय, महापालिका, राजवाडा चौक, स्टेशन चौक या मार्गे रॅली छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर आली. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाज सुधारकांच्या भूमिकेत रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देशभक्तीपर गाणी आणि तुताऱ्यांचा आवाज घुमत राहिला. पोलिस बॅण्ड, शाळांचे विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी आणि नागरिक अशा क्रमाने रॅली शिस्तबद्धपणे सुमारे ३ किलोमीटरचे अंतर पार करताना सामाजिक एकतेच्या घोषणांनी सांगली शहर दुमदूमून सोडले. व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान नव्हते, पण त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
सांगली जिल्हा प्रशासनाने सामाजिक सद्भावना रॅली यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या वतीने अभिनंदन करून महसूल मंत्री पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण पक्की आहे. मात्र, त्याला गेल्या काही दिवसामध्ये ज्या विविध घटना घडल्या, त्यातून थोडासा धक्का बसला. त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने सामाजिक सद्भावना रॅली आयोजित करून विद्यार्थ्यांबरोबर सर्व जाती धर्माच्या नागरिकांमध्ये जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. आम्ही सर्व एक आहोत, ही भावना घट्ट करण्याचा प्रयत्न केला. हे राज्यासाठी आदर्श ठरेल, असे सांगली मॉडेल सर्वांपुढे ठेवले आहे.’

दरम्यान, छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर सद्भावनेसाठी अवतरलेल्या विराट जनसमुदायाच्या साक्षीने मिले सूर हमारा तुम्हारा या गाण्याने रॅलीचा समारोप झाला.
पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी आभार मानले. या वेळी सर्वांनी स्तब्ध उभे राहून शहिदांप्रती आदरांजली व्यक्त केली. ही रॅली यशस्वी करण्यासाठी गेले आठवडाभर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगर पालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपायुक्त सुनील पवार, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, मिरजचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार आणि सर्व विभागांचे विभाग प्रमुख, तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अशी होती सुरक्षा व्यवस्था
रॅलीवर महानगरपालिकेच्या वतीने एकूण १७, पोलिस विभागाच्या वतीने २० आणि दोन ड्रोन कॅमेऱ्यांची नजर होती. रॅली मार्गामध्ये संदेशवहनासाठी वॉकी-टॉकीचा वापर करण्यात आला. तसेच, स्वयंसेवकांनीही स्वयंस्फूर्तीने मदत केली. महानगरपालिकेच्या वतीने रॅलीमार्गावर ११ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ८ ठिकाणी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती. ११ अग्निशमन वाहने आणि ३ रुग्णवाहिकांचीही व्यवस्था, वैद्यकीय पथकेही ठेवण्यात आली होती रॅलीसाठी ५०० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही रॅली यशस्वी करून सांगलीकरांनी सामाजिक समता, एकता, अखंडतेचा संदेश सर्वदूर पोहोचविला आहे.

रॅली मागील उद्देश

नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशीच्या कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्याने काहींशी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अफवांचे पीक फोफावत राहिल्याने जातीय पातळीवर येऊ घातलेला तणाव वेळीच रोखला गेला तरी अंतर्गत खदखद अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर आमच्यात फूट पाडू नका, अन्यथा तुमचे नामोनिशान राहणार नाही, आम्हाला आपसात नाही तर देशासाठी लढायचे आहे, तिरंगा हाच आमचा धर्म आहे, असा इशारा संधीसाधूना आणि समाजाला एकतेचा संदेश देण्यासाठी सांगलीत रविवारी मकर संक्रातीचा योग साधून जिल्हा प्रशासनाने सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीला आलेल्या विद्यार्थ्यांनीचा मृत्यू

प्रशासकीय सद्भावना रॅली संपल्यानंतर शिक्षकांबरोबर घरी निघालेल्या ऐश्वर्या शशिकांत कांबळे (वय १४) या विद्यार्थीनीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. चक्कर येत असल्याचे सांगत तिने आपल्या वडिलांना बोलावून घेण्यास शिक्षकांना सांगितले. त्यानंतर काही वेळातच ती बेशुद्ध पडली. त्यावेळी तेथूनच जात असलेल्या राज ठाकरे यांच्या वाहन ताफ्यांत शेवटी असलेल्या रुग्णवाहिकेतून ऐश्वर्याला त्वरीत सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, तिचे प्राण वाचविण्यात यश आले नाही. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून संबधित मुलीच्या पालकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती गाडगीळ यांनी पत्रकारांना दिली.

जिल्हा प्रशासनाच्या सद्भावना एकता रॅलीत सहभागी होऊन घरी परतणारी शालेय विद्यार्थींनी मृत्यूमूखी पडल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, जिल्हा आरोग्याधिकारी यांच्यासह अनेकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ऐश्वर्या कांबळे (वय १४, ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला) ही तिच्या शाळेतील शिक्षिका आणि अन्य विद्यार्थिनींबरोबर सहभागी झाली होती. ती घरी परतत असताना तिला एसएफसी मॉलसमोर अचानक त्रास झाला. पालक धावत आले. संपूर्ण यंत्रणा मदतीला धावली परंतु, तिचे प्राण वाचविण्यात यश आले नाही. तिची आजी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असल्याने त्यांचे कुटुंब राजवाड्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानात रहात होते. वडील खासगी रखवालदार म्हणून काम करतात.

अत्यंत दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागल्याने शोकाकुल झालेल्या ऐश्वार्याच्या वडिलांची संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ती किरकोळ आजारी होती. शनिवारी डॉक्टरांना दाखविले होते, काही चाचण्या रविवारी करायच्या होत्या. तिला रॅलीला जाऊ नको, असे सांगत होतो. पण तिने माझ्या मैत्रिणी जाणार असल्याने मी ही जाणार असल्याचे सांगून ती बाहेर पडली होती. तिच्या मृत्यू बाबत तक्रार करणार नाही. रॅलीचा उद्देश चांगला होता. तक्रार देऊन काही आमची मुलगी परत येणार नाही.’
या बाबत जिल्हा प्रशासनानेही खुलासा केला आहे. ऐश्वर्या शशिकांत कांबळे आजारी होती. तरीही ती रॅलीत सहभागी झाली. मात्र, तिचा मृत्यू रॅली दरम्यान किंवा स्टेडियमवर झालेला नसून, ती रॅली संपवून घरी परतत असताना रस्त्यात चक्कर येऊन झाला आहे. जवळच उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून तिला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. तिचे शवविच्छेदन सुरू आहे. विद्यार्थिनीचा मृत्यू रॅलीमध्ये झाला नसला तरी, ही घटना दुर्दैवी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तिच्या कुटुंबीयाला आर्थिक मदतीचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. या बाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ऐश्वर्याचा आकस्मिक मृत्यू असल्याने पोलिस त्याची चौकशी करीत आहेत, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, ऐश्वर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेतील सरकारी रूग्णालयात आणला. तिच्या प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त निधी मिळवून देऊ असे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सद्भावना रॅलीतून परतताना विद्यार्थिनीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

प्रशासकीय सद्‍‍भावना रॅली संपल्यानंतर शिक्षकांबरोबर घरी निघालेल्या ऐश्वर्या शशिकांत कांबळे (वय १४) या विद्यार्थिनीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. चक्कर येत असल्याचे सांगत तिने आपल्या वडिलांना बोलावून घेण्यास शिक्षकांना सांगितले. त्यानंतर काही वेळातच ती बेशुद्ध पडली. त्यावेळी तेथूनच जात असलेल्या राज ठाकरे यांच्या वाहन ताफ्यांत शेवटी असलेल्या रुग्णवाहिकेतून ऐश्वर्याला त्वरीत सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, तिचे प्राण वाचविण्यात यश आले नाही. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून संबधित मुलीच्या पालकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती गाडगीळ यांनी पत्रकारांना दिली.

जिल्हा प्रशासनाच्या सद्‍‍भावना एकता रॅलीत सहभागी होऊन घरी परतणारी शालेय विद्यार्थींनी मृत्यूमूखी पडल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, जिल्हा आरोग्याधिकारी यांच्यासह अनेकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ऐश्वर्या कांबळे (वय १४, ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला) ही तिच्या शाळेतील शिक्षिका आणि अन्य विद्यार्थिनींबरोबर सहभागी झाली होती. ती घरी परतत असताना तिला एसएफसी मॉलसमोर अचानक त्रास झाला. पालक धावत आले. संपूर्ण यंत्रणा मदतीला धावली परंतु, तिचे प्राण वाचविण्यात यश आले नाही. तिची आजी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असल्याने त्यांचे कुटुंब राजवाड्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानात रहात होते. वडील खासगी रखवालदार म्हणून काम करतात.

अत्यंत दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागल्याने शोकाकुल झालेल्या ऐश्वार्याच्या वडिलांची संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ती किरकोळ आजारी होती. शनिवारी डॉक्टरांना दाखविले होते, काही चाचण्या रविवारी करायच्या होत्या. तिला रॅलीला जाऊ नको, असे सांगत होतो. पण तिने माझ्या मैत्रिणी जाणार असल्याने मी ही जाणार असल्याचे सांगून ती बाहेर पडली होती. तिच्या मृत्यू बाबत तक्रार करणार नाही. रॅलीचा उद्देश चांगला होता. तक्रार देऊन आमची मुलगी परत येणार नाही.’

ऐश्वर्या शशिकांत कांबळे आजारी होती. तरीही ती रॅलीत सहभागी झाली. मात्र, तिचा मृत्यू रॅली दरम्यान किंवा स्टेडियमवर झालेला नसून, ती रॅली संपवून घरी परतत असताना रस्त्यात चक्कर येऊन झाला आहे. जवळच उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून तिला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. तिचे शवविच्छेदन सुरू आहे. विद्यार्थिनीचा मृत्यू रॅलीमध्ये झाला नसला तरी, ही घटना दुर्दैवी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तिच्या कुटुंबीयाला आर्थिक मदतीचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. या बाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ऐश्वर्याचा आकस्मिक मृत्यू असल्याने पोलिस त्याची चौकशी करीत आहेत, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान, ऐश्वर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेतील सरकारी रूग्णालयात आणला. तिच्या प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त निधी मिळवून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमीभावापेक्षा कमी दरानेखरेदी केल्यास शिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
‘केंद्र वा राज्य सरकारने निश्चित केलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना शिक्षेची तरतूद करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. त्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील,’ अशी माहिती सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
राज्य कृषी पणन मंडळ आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शेतीमाल तारण कर्ज योजनेची माहिती देण्याबाबत आणि सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
देशमुख म्हणाले, ‘हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा आतापर्यंत परवाना रद्द केला जात होता. पण, आता हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास शिक्षा केली जावी, असे सरकारचे मत आहे. त्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील.’
शेतमाल कर्ज तारण योजना नीटपणे राबवल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळच येणार नाही, ही योजना अनेक वर्षे सुरू आहे. पण, तिची अंमलबजावणी प्रभावीपणाने झालेली नाही. या योजनेची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ज्या बाजार समित्या या योजना राबवणार नाहीत त्या समित्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्मा दिनी निपाणीत बंद

$
0
0

निपाणी :
हुतात्मा दिनी बुधवारी, १७ रोजी निपाणी शहर परिसरात बंद पाळला जाणार आहे. बंदमध्ये शहर परिसरातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बंद यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती व समितीचे निपाणी भाग अध्यक्ष जयराम मिरजकर यांच्यासह मराठी भाषिकांनी केले आहे.
मिरजकर म्हणाले, ‘१९५६मध्ये भाषावार प्रांत रचनेनंतर झालेल्या पोलिस गोळीबारात निपाणीतील कमळाबाई मोहिते व बारवाडमधील गोपाळ चौगुले हुतात्मा झाले होते. त्यांच्यासह अन्य हुतात्म्यांच्या स्मृती जागवून सीमालढ्याला बळ आणण्यासाठी हुतात्मा दिनी बंद पाळला जातो. दर वर्षी हुतात्मा दिनी कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून मूक मोर्चा काढण्याची परंपरा आहे.
बुधवारी सकाळी अकरा वाजता बेळगाव नाक्यावरील बॅरिस्टर नाथ पै चौकात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नाथ पै यांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. तेथून मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चा नगरपालिका, जुना पी बी रोडमार्गे साखरवाडीतील हुतात्मा कमळाबाई मोहिते यांच्या स्मृतीस अभिवादनास जाईल. उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहाजी कांबळे, गडहिंग्लज शिवसनेचे सुनील शिंत्रे उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेचे आवाहन
हुतात्मा दिनी सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना निपाणी शाखेतर्फे आयोजित बैठकीत केले आहे. बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुडणाऱ्या महिलेसह वाचव‌िणाऱ्याचाही मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

करवीर तालुक्यातील खुपिरे येथे सोमवारी शेतातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या सावित्री बळवंत बंगे (वय ४२) या महिलेचा पाय घसरून पडल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी सरदार महादेव पाटील (वय ४७) यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली.

नागरिका स्पिनिंग मिल जवळ असणाऱ्या ‘बंगे नाळवा’ नावाच्या आपल्या शेतात सावित्री बंगे काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करत असताना त्या मारुती श्रीपती बंगे यांच्या मालकीच्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेल्या असता अचानक पाय घसरून विहिरीत पडल्या. स्वतः ला वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरडा सुरू केला . याच वेळी शेजारच्या शेतात काम करणारे सरदार पाटील यांनी ओरडण्याचा आवाज ऐकून विहिरीकडे धाव घेतली.

पाण्यात बुडणाऱ्या सावित्री यांना वाचवण्यासाठी त्यांनी विहिरीत उडी मारली. मात्र भितीने सावित्री यांनी सरदार यांना घट्ट पकडल्यामुळे सरदार यांनाही पोहता येईना. दरम्यान, सावित्री यांचे दीर कृष्णात केशव बंगे हे देखील तेथे दाखल झाले. तेव्हा दोघेही बुडत आहेत हे लक्षात येताच दोघांना वाचविण्यासाठी त्यांनीही विहिरीत उडी घेतली. पण सावित्री व सरदार यांना वाचविण्यात त्यांना अपयश आले. घडलेला प्रकार कृष्णातने नातेवाईकांना सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीत शोधाशोध केली. पोलिस पाटील सविता गुरव यांनी करवीर पोलिसांत याबाबत वर्दी दिली.

घटनास्थळी करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले. सावित्री यांच्या पश्चात पती, एक मुलगा व मुलगी तर सरदार यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर प्राधिकरण २६ रोजी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरासह आसपासच्या ४२ गावांच्या विकासाचे महाद्वार ठरणाऱ्या कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणची अंमलबजावणीला २६ जानेवारीपासून होणार आहे. प्राधिकरणच्या कामकाजासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून कार्यालयापर्यंतच्या बाबींची पूर्तता केल्याची माहिती प्राधिकरणचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.

दरम्यान, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीच्या कक्षेत आहे. यासंदर्भात २९ जानेवारीला मुंबईत अंतिम बैठक होणार आहे. बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यासमोर सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली की आराखड्याच्या कार्यवाहीला सुरूवात होईल, असेही पाटील यांनी यांनी विश्रामगृह येथे स्पष्ट केले.

अंबाबाई मंदिराचे मोठे उत्पन्न लक्षात घेता या मंदिरापुरता स्वतंत्र पगारी पुजारी कायदा लागू करण्याबाबत येत्या मार्चपूर्वी अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्राधिकरणच्या माध्यमातून शहर आणि आसपासच्या खेड्यांच्या विकासाचा समान अजेंडा अंमलात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधिकरणचे कार्यालय सुरु होण्याची शक्यता आहे. पालकमंत्र्यांनी प्राधिकरणच्या अंमलबजावणीची घोषणा केल्यामुळे आठवडाभरात सीइओ दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक होणार आहे. प्राधिकरण कार्यकक्षेत कोल्हापूर शहर व समाविष्ट ४२ गावांसाठी प्रादेशिक नियोजनाचा विकास आराखडा तयार करणे, महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी, त्यासाठी अर्थसाह्य अशा बाबींचा समावेश आहे. रस्ते विकास, सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि संबंधित गावांत शाश्वत विकासाच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणार आहे.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी ७८ कोटींचा आराखडा तयार केला आहे. मंजुरीचा अंतिम टप्पा ओलांडून हा प्रस्ताव सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वाक्षरीसाठी गेला आहे. या आराखड्यामुळे भाविकांना सुविधा मिळण्यासोबत मंदिर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही मिटणार आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी २९ रोजी मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक निर्णायक ठरणार आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. उद्या, बुधवारी ही​ बैठक होणार होती, पण त्या दिवशी मुख्यमंत्री परदेशात जाणार असल्याने बैठक लांबणीवर टाकली आहे.

पगारी पुजारी कायद्याबाबत मार्चमध्ये अध्यादेश
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा करण्यात आला आहे. मात्र त्यात असलेल्या तांत्रिक अडचणींचा अभ्यास करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान देवस्थानच्या जमिनींचा खंड आणि देवस्थानच्या अखत्यारितील साडेतीन हजार मंदिरांतही पगारी पुजारी कायदा लागू करण्याचा निर्णय प्रलंबित आहे. परिणामी अंबाबाई मंदिराचे मोठे उत्पन्न लक्षात घेता या मंदिरापुरता स्वतंत्र पगारी पुजारी कायदा लागू करण्याबाबत येत्या मार्चपूर्वी अध्यादेश काढण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बापू बिरू वाटेगावकर यांचं निधन

$
0
0

सांगली :

अन्यायाविरोधात पेटून उठून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले आणि गरिबांच्या मदतीला धावून येणारे बापू बिरू वाटेगावकर यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९६ वर्षाचे होते.

बापू बिरू वाटेगावकर वयोमानामुळे थकले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृतीही ढासळली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वाटेगावकर यांनी कृष्णा खोर्‍यात गोरगरिबांवर अन्याय करणारे खासगी सावकार आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांविरोधात आवाज उठवला होता. बोरगाव रेठरे हरणाक्ष, मसुचीवडी, ताकारी परिसरात त्यांची दहशत होती. बापू बिरू वाटेगावकर सुमारे २० ते २५ वर्षे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. २५ वर्षे सह्याद्रीच्या डोंगर रांगामंध्ये राहून त्यांनी गरीबांना मदत केली. या गुन्ह्यांसाठी त्यांनी शिक्षाही भोगली. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. गरिबांविषयी बापूंना विलक्षण कळवळा होता. वाळवा तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. या गावातील रंगा शिंदे हा गोर-गरिबांना त्रास देत असे. गावातील स्त्रियांची छेड काढत असे. बापू बिरू वाटेगावकरांनी त्याला संपवले. रंगाच्या भावानेही असाच उच्छाद मांडला होता तेव्हा त्याचाही खून त्यांनी केला. गरीबांना न्याय मिळवून देताना बापू बिरूंच्या हातून १२ खून झाले. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले पण ते हाती आले नाहीत. मग पोलिसांनी वाटेगावकरांच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली. गरीबांनी मला कायम आधार दिला असे बापू वाटेगावकर नेहेमी सांगायचे. दरोडेखोर असले तरी गरिबांचा कैवारी आणि बोरगावचा ढाण्या वाघ म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या जीवानावर आधारित 'बापू बिरू' नावाने सिनेमाही प्रदर्शित झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेंभू योजनाआजपासून सुरूकारखान्यांनी संकलित केले दहा कोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
टेंभू योजनेच्या एकवीस कोटींच्या थकबाकीपैकी पावणे दहा कोटी रुपये विविध कारखान्यांकडून संकलित करण्यात आले आहेत. त्यामुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योजनेसाठी हिरवा कंदिल दर्शविला आहे. टेंभू योजना आज, बुधवारपासून सुरू होईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.
देशमुख म्हणाले, ‘ताकारी योजनेसाठी सर्व राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने मार्ग निघाला. टेंभूची २१ कोटींची थकबाकी होती. त्यामुळे योजनेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या बाबत सुरुवातीला महावितरणने पन्नास टक्के तरी रक्कम जमा करावी लागेल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यावेळी त्यांनी एकूण परिस्थितीचा विचार करून किमान साडे नऊ कोटी रुपये तरी भरावेत, अशी सूचना दिली होती. त्यानुसार आम्ही कारखानदारांनी एकत्र येऊन तयारी सुरू केली. टंचाई निधीतून सहा कोटी रुपये मिळाले आहेत. त्यात केन अ‍ॅग्रोने २ कोटी, ग्रीन पॉवरने ७५ लाख, सोनहिरा कारखान्याने ५० लाख आणि ५० लाख रुपये टेंभू योजनेचे पाटबंधारे कार्यालयाकडील शिल्लक रक्कम होती. अशी जवळपास पावणे दहा कोटी रुपयांची तयारी झाली आहे. उदगिरी कारखान्याकडून ५० लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ही रक्कम सव्वा दहा कोटींच्या घरात जाते. बावनकुळे यांना रकमेबाबतची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी महावितरणला योजना सुरू करण्याबाबतच्या सूचना देण्यात येतील, असे सांगितले आहे. त्यामुळे बुधवारपासून टेंभू योजनेला सुरुवात होईल. कडेगाव आणि सांगोला येथील पाणीपट्टी वसुली सर्वाधिक चांगली आहे. भविष्यात लाभक्षेत्रातील वसुली शंभर टक्के होण्याकरीता प्रयत्न राहतील.’
नेत्यांनी म्हैसाळसाठी एकत्र यावे
टेंभू आणि ताकारी योजना मार्गी लागल्या असल्या तरी अद्याप म्हैसाळचा प्रश्न सुटलेला नाही. ताकारी आणि टेंभूप्रमाणे म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राजकीय मतभेद विसरून पाण्यासाठी एकत्र आले पाहिजे. आम्ही पाण्यात कोणतेही राजकारण आणले नाही. तशीच पद्धत सर्वत्र हवी, असे झाले तर म्हैसाळचा प्रश्नही सहजासहजी सुटू शकतो, असे देशमुख म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोभेच्या दारुकामातस्फोट; १४ जण जखमी

$
0
0

सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे श्री मळसिद्ध यात्रेनिमित्त सोमवारी रात्री शोभेचे दारुकाम सुरू असताना अचानक स्फोट झाला. त्यात अंदाजे ३० ते ३५ जण जखमी झाले. त्यापैकी १४ जण गंभीर जखमी असून, एका महिलेच्या डोळ्याला गंभीर इजा पोहोचली आहे.
जखमींना सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मंद्रुप येथे मळसिद्ध देवस्थानची यात्रा होती. यात्रेनिमित्त देवस्थान परिसरात शोभेचे दारुकाम सुरू होते. गावातील नागरिकांची दारुकाम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रात्री अकराच्या दरम्यान दारुकाम संपण्याच्या स्थितीत असताना अचानक स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये पळापळ सुरू झाली. कस्तुराबाई सोमलिंग हेळकर, कृष्णा रेवणसिद्ध कुमठेकर, रेश्मा मल्लिनाथ म्हेत्रे, अश्पाक बागवान, गायत्री दयानंद घाळे, राजश्री नागनाथ घाळे, कस्तुरा सोमनिंग हेळकर, रोहिणी बजरंग मरीआईवाले, राधाबाई बजरंग मरीआईवाले, विमल श्रीशैल शिंगडगाव, सुंदराबाई नंदुरे या जखमींवर उपचार सुरु आहेत.
​​​​​​​शोभेच्या दारुकामाने
सिद्धेश्वर यात्रेची सांगता
आकाशात बुलंद आवाजात सप्तरंगांची चमचमती पखरण करणारे आउट गोळे, निसर्गाच्या वैविध्यपूर्ण रंगांचे पाट, जमिनीवर सोडणारे धबधबे, मौत का कुवॉँ, जमिनीवर जणू चांदण्याच पसरविणारे चक्र, अशा अतिशय नयनरम्य सादरीकरणाने सिद्धेश्वर यात्रेतील शोभेचे दारूकाम आनंददायी आणि मनोरंजक ठरले. स्मार्ट सोलापूरचा संदेश आणि ‘चीन हो या पाक है भारत तय्यार’ हे एम. ए. पटेल यांचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.
होम मैदानावर उत्तरेकडील पटांगणात रात्री साडेआठच्या सुमारास शोभेच्या दारुकामाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी पाच वाजता नंदीध्वजांची मिरवणूक बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यापासून निघाली. विद्युत रोषणाईने सजविलेले नंदीध्वज अतिशय डौलदार दिसत होते. मिरवणूक पाहण्यासाठी मार्गाच्या दुतर्फा गर्दी झाली होती. हिरेहब्बू वाड्यापासून निघालेली मिरवणूक दाते गणपती मंदिर परिसर, राजवाडे चौक, दत्त चौक, सोन्या मारुती, जुनी फौजदार चावडी, माणिक चौक, पंचकट्टामार्गे होम मैदानावर आली. त्यानंतर पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते शोभेच्या दारूकामाचे औपचारिक उद्घाटन झाले.
पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथील शिकलगार फायर वर्क्सने सप्तरंगी उधळणाचा प्रारंभ केला. त्यांनी उडविलेल्या स्काय बॉल आउट गोळ्यांनी परिसर दणादणून सोडला. फॅन्सी कलर आउट गोळे आकाशात जात असताना दर्शक सिद्धरामेश्वरांचा जयजयकार करीत होते. त्यांनी सादर केलेल्या एकवीस फुटी नागाला दाद मिळाली. म्हैसूर कारंजा, नर्गिस झाड, कमान चक्र आणि स्टार चक्राने प्रत्येकाला प्रसन्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या विमानसेवेला पुन्हा ‘खो’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेचा मुहूर्त अनेकदा चुकला असतानाच आता दुसऱ्या टप्प्याची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूरच्या विकासाच्यादृष्टीने गरजेच्या मुंबई सेवेचा पत्ता नसताना आता हैद्राबाद, तिरूपती विमानसेवेची चर्चा ‘हवेत’ रंगली आहे. उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कोल्हापूर, जळगाव आणि सोलापूरची विमानसेवा सुरु झालेली नाही. काही तांत्रिक कारणांसह संबंधित विमान कंपनी तयार नसल्याने कोल्हापूरची विमानसेवा लांबणीवर पडली आहे.

केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयाच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या यादीत कोल्हापूर विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. डेक्कन चार्टर, एअर इंडिया आणि आता नव्याने इंडिगो कंपनीकडून सेवा दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यात १९ मार्गावर नव्याने विमानसेवा आणि विमान कंपनीकडून प्रस्ताव मागितल्याने कोल्हापूरची विमानसेवा पुन्हा लांबणीवर गेली आहे. ‘उडान’च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत १४१ मार्गांवर सेवेसाठी विमान कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. त्यात राज्यातील १९ विमानतळांचा समावेश आहे. यामध्ये काही मार्ग अन्य राज्यातील विमानतळांना जोडणारे आहेत. पहिल्या टप्प्यातील विमानसेवा रखडलेली असताना नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दुसऱ्या टप्प्यासाठी २४ ऑगस्टला प्रस्ताव मागितले. चार महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मुदत वाढीनंतरही नव्याने प्रक्रिया राबवून डिसेंबर अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल, असे मंत्रालयाला अपेक्षित होते. मात्र १४१ मार्गाबाबत निर्णय प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यातील विमानसेवा सुरु होण्यापूर्वीच दुसऱ्या टप्प्याची चर्चा सुरु झाली आहे. नव्या निर्णयामुळे कोल्हापूरच्या विमानसेवेला खो बसला आहे. विमानमार्गाच्या नव्या प्रस्तावावरील निर्णय आणि मार्गाचे भवितव्य निश्चित होण्यासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात विमानसेवेच्या निश्चित ‘टेकऑफ’ची प्रतीक्षा आहे.

मुंबई सेवा सुरू होत नसताना आता नव्या सेवेचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे. यामुळे मूळ मुंबई सेवेला खो बसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूरहून तिरुपती, बेंगळुरू आणि हैदराबाद या मार्गांसह राज्यात १९ मार्गांवर नव्याने विमान सेवा प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १९ विमानतळाचा समावेश आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील कोल्हापूर, जळगाव, सोलापूरची विमानसेवा अद्याप सुरु झालेली नाही. नांदेड, नाशिक आणि शिर्डी या पहिल्या टप्प्यातील विमानसेवा सुरु झाल्या आहेत.

राज्य सरकारने कोल्हापूर ते मुंबई मार्गावर २५ डिसेंबर, २०१७ मध्ये ही सेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १८ सीटर विमान मंगळवार, बुधवार आणि रविवारी टेक ऑफ करेल, असा आशावाद नव्या वर्षात व्यक्त होत होता. मात्र अद्याप विमानसेवा सुरु झालेली नाही. एअर डेक्कनच्या व्यवस्थापनाने आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्याची मागणी मान्य केली. त्यासोबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीके कंपनीनेही टाइम स्लॉट देण्यास होकार दिला. मात्र कोणतीही विमान कंपनी सेवा देण्यासाठी पुढे आलेली नाही. पहिल्या टप्प्यातील उडान योजनेत कोल्हापूर विमानतळाचा समावेश केला होता. मात्र विमानोड्डाणाचा परवाना, भौतिक सुविधा, विमान कंपनी, मुंबईत टाइम स्लॉट मिळत नसल्याच्या कारणावरुन गेले तीन वर्ष विमानतळाच्या घोषणा हवेतच आहेत. शेवटच्या टप्प्यात केवळ विमान कंपनी निश्चित झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिनी सिनेटोन हेरिटेजमध्ये

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या महिनाभरापासून बहुचर्चित असलेल्या शालिनी सिनेटोनसाठी ठेवण्यात आलेल्या दोन भूखंडासह अॅमिनिटी स्पेस क्षेत्राचा परिसर ऐतिहासिक म्हणून महापालिकेच्या हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीने ऐति​हासिक वारसा स्थळाच्या यादीत ग्रेड तीनमध्ये समावेश करण्याची मंजुरी दिली आहे. याबाबत आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी जाहीर सूचना प्रसिद्ध केली. या निर्णयाबाबत हरकती व सूचना मागवल्या असून महापालिका समितीच्या निर्णयाला मंजुरी घेण्यासाठी राज्य सरकारकडे पाठवणार आहे. या प्रक्रियेमुळे सिनेटोनची जागा व्यावसायिक व रहिवाशी वापरासाठीच्या प्रयत्नांना खीळ बसण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, १९ जानेवारी रोजी होणाऱ्या सभेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या पुरवणी विषय​पत्रिकेत आरक्षणाबाबतचा फेरप्रस्तावाचा विषय नसल्याने तो प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये म्हणून यासाठी आयुक्तांवर मोठा दबाव आणला असल्याची चर्चा महापालिकेत होती. मात्र परिसराचा समावेश वारसा स्थळाच्या यादीत केल्यानंतर त्या जागेवर आरक्षण टाकण्याची गरज आहे का याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाच्या सचिवांशी चर्चा करुन सल्ला घेणार आहे, असे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सिनेटोनच्या जागेवरील आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यानंतर नगरसेवकांनी स्वाक्षरींची मोहीम राबवून आरक्षण ठेवण्यासाठी फेरप्रस्ताव सादर करण्याचे पत्र आयुक्तांना दिले होते. या दरम्यान, या जागेबाबत यापूर्वी हायकोर्टात दाखल झालेल्या या​चिकेच्या सुनावणीवेळी वारसा स्थळाच्या यादीत या जागेचा समावेश नसल्याबाबत विचारणा झाली होती. त्यामुळे ती जागा वारसास्थळाच्या यादीत नसेल तर त्या जागेवर बांधकामास बंधन घालण्याबाबतचाही प्रश्न उपस्थित झाला होता.

महापालिकेच्या हेरिटेज कॉन्झर्व्हेशन समितीच्या गेल्यावर्षी तसेच यावर्षीच्या जूनमध्ये झालेल्या बैठकीत हा परिसर वारसास्थळाच्या यादीत समावेश करावा, असा निर्णय घेतला होता. नवीन ड वर्ग विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावलीतील तरतुदीनुसार कॉन्झर्व्हेशन समितीच्या सल्ल्याने वारसास्थळाच्या यादीत वाढ किंवा सुधारणा करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. समितीची ९ जानेवारी रोजी बैठक होऊन हा परिसर वारसा स्थळाच्या यादीत ग्रेड तीनमध्ये समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी आयुक्तांनी याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध केली. तीस दिवसाच्या आत हरकती व सूचना मागवल्या असून नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांच्या कार्यालयात त्या सादर करायच्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्सचे सर्वप्रथम वृत्त

गेल्या महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरक्षणाचा विषय नामंजूर करण्यात आल्यानंतर ही जागा बिल्डरला देण्यासाठी हा प्रस्ताव नामंजूर केल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने १४ ​डिसेंबरच्या अंकात दिले होते. त्यानंतर नगरसेवकांनी कारभाऱ्यांविरोधात रान उठवून याबाबतचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिले होते. यामुळे सिनेटोनची जागा पुन्हा वारसास्थळाच्या यादीत समाविष्ट झाली.

......

समितीने घेतलेल्या निर्णयामुळे ही जागा ऐतिहासिक असल्याचे सांगण्यास महापालिकेला मोठा आधार मिळाला आहे. हरकती आणि सूचना मागवण्याची प्रक्रिया पूर्ण करुन समितीचा हा निर्णय मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images