Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नकारात्मकतेने कामे खोळंबली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एखादे काम करण्याची मनोमनी इच्छा नसल्यास त्याच्या प्रस्तावातच घोळ घालायचा. नंतर त्याचा बागलबुवा करुन नंतर हात झटकून रिकामे व्हायचे, अशी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांची प्रवृत्ती शहरातील अनेक कामे रखडवण्यास कारणीभूत आहे. अधिका ऱ्यांच्या या नकारात्मक मानसिकतेने शहरातील अनेक कामे खोळंबली आहेत. याचा फटका शहराला बसत आहे.

महानगरपालिकेत अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याचे सांगत ‘कुठे कुठे पहायचे’ अशी नकारात्मक भावना वाढीस लागल्याने एखादे काम गळ्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत तिकडे पहायचे नाही या प्रवृत्तीतही वाढली आहे. या प्रकारांमुळे अनेक कामांची नीट पाहणी होत नाही. पाहणी होत नसल्याने अडचणी सोडवल्या जात नाहीत त्यामुळे कामाचा वेग मंदावत आहे.

प्रशासनातील बारकावे, विविध कामाचे प्रस्ताव, त्याच्या मंजुरीच्या पद्धती हे सारे माहिती असलेल्या अ​धिकाऱ्यांची ख्याती माहितगार अधिकारी अशी आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींबरोबर वरिष्ठांकडे त्यांना नेहमीच बोलवणे असते. कामाचा योग्य प्रकारे प्रस्ताव तयार करुन घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली असते. त्यांचा इतर अधिकारी योग्य तो वापर करून आपली इच्छा पुर्ण करत असतात. त्यांना योग्य तो ‘मान’ देत काम पुढे सरकावण्याचा प्रयत्न झाला, इच्छा नसताना एखाद्या विभागात काम करण्याची जबाबदारी सोपवली तर तेथील काम कसे रखडेल, असा विचार त्या अधिकाऱ्यांकडून केला जातो. अनेकवेळा लोकप्रतिनिधी वा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एखाद्या कामाची अपेक्षा असताना अशा ‘नाराज’ अधिकाऱ्यांकडून ती वेळ साधली जाते. सातत्याने पाठपुरावा करुनही वेळेत काम पुर्ण न केल्याने नगरसेवकांकडून वरिष्ठांना टार्गेट केले जाण्याचे प्रकार महापालिकेत होत आहेत.

काही अधिकाऱ्यांना तर अनेक कार्यभार देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून त्या विभागातील कामाला गती देण्याची अपेक्षा असते. पण महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून ‘कोणत्या विभागाचे काम करायचे’, ‘वरिष्ठांकडून दखल घेतली जात नाही’ अशा प्रकारचे नाराजीचे सूर आळवले जात असल्याने अधिकाऱ्यांमध्ये एकप्रकारची नकारात्मकता भरली आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. यातूनच नगरसेवक वा वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत पाठपुरावा करत नाहीत तोपर्यंत त्या कामाकडे लक्षच द्यायचे नाही, असे प्रकार होत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्या प्रकल्पांची वाटचाल सुरळीत ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांचे निरीक्षण आवश्यक असते. अधिकाऱ्यांकडून पाहणी होत नसल्याने कंत्राटदारांनाही वेळेत काम पुर्ण करण्याचे बंधन रहात नाही. त्याची नगरोत्थान योजनेतील रस्ते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्ट्रॉम वॉटर योजना, कचरा प्रक्रियेचा प्रकल्प, थेट पाइपलाइन योजना अशी काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. काही अधिकारी तर महापालिकेची नोकरी म्हणजे टाइमपास आल्यासारखी वागतात.

कारवाई कधी?

‘बघुया, करूया’ अशा भूमिकेमुळे त्यांच्या कार्यालयातील फाइल्सचा निपटाराच होत नाही. अनेक अधिकाऱ्यांना प्रकल्पाची, प्रस्तावाची नीट माहितीही होत नाही. त्याचा राग कनिष्ठ अधिकाऱ्यांवर काढत असतात. त्यामुळे एखादा कनिष्ठ अधिकारी काही सांगण्याचा प्रयत्न करू लागल्यास त्याला शहाणपणाचे बोल सुनावण्यात हेच अधिकारी पुढे असतात. अशा अधिकाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून आयुक्त योग्य तो ​इशारा देत होते. पण अधिकाऱ्यांमध्ये वाढीस लागलेल्या ज्या त्या वेळी पाहू या मानसिकतेमुळे कारवाई होण्यापर्यंतची वेळ आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पतीच्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनैतिक संबधाचा संशयावरुन पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. ज्योती सागर गोरे (वय ३०,रा. विचारे माळ) असे जखमी महिलेचे नाव आहे. कसबा बावडा येथील कचरा प्रकल्पाजवळ जखमी अवस्थेतील ज्योतीला अग्निशमन दलाच्या जवानांनी सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ज्योती व सागरचा विवाह आठ वर्षापूर्वी झाला असून त्यांना चार वर्षाची ​दीपा नावाची मुलगी आहे. सागर हा सेंट्रीग व भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतो. ज्योती व सागर यांनी खासगी सावकार व बचत गटाकडून कर्ज घेतले होते. त्यांच्याकडून कर्जासाठी तगादा लावल्याने चार महिन्यापूर्वी ज्योती व सागर बिद्री कारखाना परिसरात वास्तव्य करत होते. अधूनमधून ते विचार माळ येथे येत होते. रविवारी सागर पत्नी ज्योतीला घेऊन विचारेमाळ येथे आईकडे आला होता. जेवण करुन दोघे कचरा प्रकल्पात भंगार गोळा करण्यासाठी गेले. त्यांच्यासमवेत मुलगी दीपाही होती. गेले काही दिवस सागर ज्योतीवर अनैतिक संबधाचा संशय घेत होता. त्यातून दोघांचा वाद झाला. सागरने ज्योतीला बांबूने डोक्यावर मारहाण केली. ज्योती खाली पडल्यावर तिच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत ज्योतीला टाकून सागर मुलगी दीपासह पळून गेला. दरम्यान याच काळात कचरा प्रकल्पात आग लागली होती. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाने धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ज्योती निदर्शनास आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ताबडतोब ज्योतीला सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी ज्योतीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. ज्योतीवर उपचार सुरू असून पोलिस सागर व त्याच्या मुलीचा शोध घेत आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजचे काम अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​जयंती नाल्यातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइन दुरुस्तीचे काम शेवटच्या टप्प्यात पोहचले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरच विभागीय आयुक्तांनीही १० जानेवारीपर्यंतची डेडलाइन दिली असल्याने कंत्राटदाराला रात्रंदिवस काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या बुधवारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पुर्ण होईल, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात येत आहे.

१४ ​सप्टेंबर रोजी पावसामुळे जयंती नाल्यातील पाइपलाइन फुटली. त्यामुळे मैलायुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये वाहत जात आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या. तसेच महापालिकेची वीज तोडण्याची कारवाईही करण्यात आली. यानंतर विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतलेल्या बैठकीत १० जानेवारीपर्यंत काम पुर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या कामामध्ये दिरंगाई होत असल्याने महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त व जलअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

यामुळे अधिकाऱ्यांच्यावतीने कंत्राटदाराकडून दररोजचा अहवाल घेण्याबरोबरच कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या जात आहेत. नाल्यामध्ये तीन पिलर उभे करायचे होते. त्यातील दोन पुर्ण होऊन त्यावर पाइपलाइनही टाकण्यात आली आहे. उर्वरित तिसऱ्या पिलरचे काम होत आले आहे. दोन दिवसात त्या पिलरवर पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. दहा तारखेला कोणत्याही परिस्थिती काम पुर्ण करुन अकरा जानेवारीपासून त्या पाइपमधून उपसा सुरू करण्यात येणार असल्याचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रयोग केल्यानेच काम लांबले

जयंती नाल्यातील पाइपलाइन दुरुस्तीसाठी प्रथम पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा केली. त्यानंतर नाल्यामध्ये खोदाईसाठी प्रथम सांडपाणी अडवून ते खोदाई करण्यात येणाऱ्या ठिकाणापुढे पाइपलाइन टाकून सोडण्यात येणार होते. त्यासाठी जवळपास २० दिवस वाया गेले. या पाइपलाइने काही उपायोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर परंपरागत पद्धतीने एका बाजूला कॉपर डॅम बांधून पिलरचे बांधकाम करण्यासाठी खोदाई करण्यात आली. यानंतर कामाला वेग आला. हेच काम जर पहिल्याच टप्प्यात झाले असते तर काम पुर्ण झाले असते. या लांबलेल्या कामामुळे तिसऱ्या पिलरचे काम अजूनही सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच कारणीभूत ठरले. जर यापूर्वीच अधिकाऱ्यांनी सातत्याने पाहणी करुन कामाची प्रगती विचारली असती तर इतका वेळ लागला नसता हे स्पष्ट होत आहे. पण कंत्राट न देता विशेष बाब म्हणून काम करुन घेत असल्याचे दडपण घेऊनच अधिकाऱ्यांनी त्या कंत्राटदारावर दबाव टाकला नाही. शेवटी हेच प्रकरण अधिकाऱ्यांच्या अंगलट आल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला रात्रंदिवस काम करुन डेडलाइनमध्ये काम संपवण्याचे आदेश दिले. हीच बाब गेल्या महिन्यात केली असती तर कदाचित आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता. या कामानंतर कंत्राटदाराला पुलाच्या कठड्याचेही काम करायचे आहे. त्यालाही आता सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे कदाचित हे कामही महिनाभर चालण्याची शक्यता आहे.

फौजदारी कारवाईची टांगती तलवार

प्रदूषण रोखण्यास अयशस्वी झाल्याने महापालिकेची वीज तोडण्याची प्रतिकात्मक कारवाई करण्यात आली. पण ठराविक वेळेत काम झाले नाही तर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होण्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आले होते. यापूर्वीही अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने काम वेळेत पुर्ण करण्याचा दबाव आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरेगाव भीमाची घटना पूर्वनियोजित : पवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

कोरेगाव भीमाची घटना पूर्वनियोजित होती. या प्रकरणातील दोन्ही बाजूच्या लोकांची भेट झाली आहे. या दंगलीत बाहेरचे लोक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता या मागचे आरोपी सरकारने शोधून काढावेत, अशी मागणीही पवारांनी केली. नागपूर अधिवेशनानंतर दोन्ही काँग्रेस एकत्रित आले असून, आता या सरकारच्या विरोधात एकत्रित काम करण्याची भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची असल्याचे पवार म्हणाले.

राष्ट्रीयकृत बँकांना केंद्राने ८० हजार कोटी कसे दिले?

‘महाराष्ट्रातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्यावर काही मंडळींच्या पोटात दुखतंय, पण गेल्या १५ दिवसांत राष्ट्रीयकृत बँकेचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तिजोरीतून ८० हजार कोटी रुपये कसे दिले,’ असा सवाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

अकलूज येथे महिला वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी आलेले पवार पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, असे म्हणणाऱ्या सरकारकडे बँकांची तूट भरून काढायला पैसे कोठून आले. कोणाच्या कितीही पोटात दुखले तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, त्याच्या डोक्यावरचे ओझे उतरवून त्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आरपीआयचा मोर्चा शांततेतआदोलकांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनची नजर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
कोरेगाव भीमा येथे दंगलीत दलित समाजातील निरपराधांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि दंगलीची निश्चित काल मर्यादा ठरवून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांबरोबरच सीबीआयमार्फत चौकशी करावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आरपीआय आठवले गटाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा शांततेत पार पडला. कुठेही अप्रिय घटना घडली नाही. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चाला अल्प प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी अत्यंत कडक सुरक्षा तैनात केली होती. मोर्चात घडणाऱ्या घटनांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनची नजर होती. संपूर्ण मोर्चाचे व्हिडिओ शुटिंगही करण्यात आले.
कोरेगाव भीमा येथे दंगलीत दलित समाजातील निरपराधांवर हल्ले करण्यात आले आहेत. आतापर्यंत आमच्या अनेक पिढ्यांनी अन्याय सहन केला आहे. मात्र, यापुढे हे होणार नाही. दंगलीस कारणीभूत असणाऱ्या मुख्य सुत्रधारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून मोर्चास प्रारंभ झाला. या पूर्वी सांगलीत झालेल्या मोर्चातील तोडफोड लक्षात घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अकरा वाजता काढण्यात येणारा मोर्चा दुपारी दोन वाजता सुरू झाला. प्रारंभी व शेवटी मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच मोर्चा निघाल्यावर त्यावर पहिल्यांदाच ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात आले होते. परिसरातील इमारतींवर देखील खासगी कॅमेऱ्यातून कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली होती.
कार्यकर्त्यांच्या हातात निळे झेंडे होते. तसेच जय भीमच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चाचे नेतृत्व विवेक कांबळे, जगन्नाथ ठोकळे, आशिष गाडे, अपर्णा वाघमारे, बापूसाहेब सोनवणे आदींनी केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर विवेक कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विवेक कांबळे म्हणाले, ‘मोर्चाचे नेतृत्व माजी महापौर विवेक कांबळे यांनी केले. कांबळे म्हणाले, ‘पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात काही वर्षांत मनुवादी विचारांचा अडथळा निर्माण झाला आहे. अशा विचारांना जागेवर ठेचण्याची गरज आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्र राज्यात जातीय दंगली होतात हे दुर्देवी आहे. डॉ. आंबेकरांनी घटनेच्या माध्यमातून लढाई लढण्याकरिता भीम सैनिक सज्ज आहे. दलित संघटना या तोडफोड करण्यासाठी, लुटालुट करण्यासाठी आंदोलन करतात हा चुकीचा संदेश जात आहे. मात्र, दलित समाज हा नुकसान करण्यासाठी कधीही दगड हातात घेणार नाही.’
आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांना निवेदन दिले. जाती-जातीत विषमतेचे बीज पेरून दंगलीला प्रोत्साहन देण्याच्या शक्ती ठेचून काढण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे दाखविण्याची वेळ आली आहे. अन्यायाच्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवर जाणीवपूर्वक कायदेशीर कारवाई सुरू असून, ती तातडीने थांबवावी. काही कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. ते मागे घ्यावेत आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आपल्या भावना व मागण्या तत्काळ सरकारपर्यंत पोहचवू, असे ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

घटना बदलास विरोध करू

‘आम्हाला कोणतीही अशांतता नको आहे. मागील काही दिवसांपासून घटना बदलण्याची भाषा सतत कानावर पडत आहे. मात्र, असा प्रयत्न झाल्यास भीमसैनिक शांत बसणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे. दगड मारण्यापेक्षा सत्ताधारी जमात बनण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असेही कांबळे म्हणाले. जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
आरपीआयच्या मागण्या
दंगलीत झालेली नुकसानीची पूर्ण भरपाई मुख्य सुत्रधारांकडून वसूल करावी.
जातीय तेढ निर्माण करून अशांततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या संघटनांवर बंदी घालावी
भीमसैनिकांवरील कारवाया तातडीने थांबवाव्यात,
काही कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घ्यावेत
सांगली बंदची क्षणचित्रे
पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोर्चाला अल्प प्रतिसाद
अकरा वाजताचा मोर्चा दोन वाजता सुरू झाला
साडेपाचशे पोलिस, वीसहून अधिक सीसीटीव्ही कॅमरे, व्हिडिओ शुटिंग, ड्रोन कॅमेऱ्यांची नजर
पोलिसांचे विश्रामबाग चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उंच इमारतीवरून व्हिडिओ चित्रण
गेस्ट हाउसच्या पुढे व मिरजेकडून न्यायालय इमारतीच्या पुढे वाहनांना बंदी
मोर्चा पूर्णपणे शांततेत, कोठेही गालबोट नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिक्कोडीत कडकडीत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी
कोरेगाव भीमा येथे दलितांवर झालेल्या अन्यायाचे पडसाद सोमवारी चिकोडी शहरात उमटले. या अन्यायाविरोधात येथील विविध दलित संघटनांनी पुकारलेल्या चिकोडी बंदला नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद यशस्वी केला. शहरात संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळून निषेध रॅलीही काढण्यात आली.
सकाळपासूनच शहरातील दुकाने, सरकारी, सहकारी कार्यालये, शाळा महाविद्यालये, बस वाहतूक बंद होती. बंदच्या काळात प्रथमच दुचाकी व चारचाकी या खासगी वाहनांनाही प्रवेश निषिद्ध होता. शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर दलित कार्यकर्ते शहरात येत असलेल्या वाहनांना परत पाठवित होते. भीमनगरपासून शहरातील विविध मार्गावरुन दलित कार्यकर्त्यांनी निषेध रॅली काढली. बसवेश्वर सर्कलमध्ये मानवी साखळी करून तेथे चार चाकी वाहनांच्या टायरी पेटविण्यात आल्या. संपूर्ण बसवेश्वर सर्कल दलित कार्यकर्त्यांनी व्यापले होते. त्यांच्या हाती निळे झेंडे तर त्यांना साथ देण्यास आलेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते.
बस वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने शहरापासून दूरवरच्या अंतरावर प्रवासी उतरत होते. तेथून शहरात येण्यासाठी प्रवाशांना अनेक किलोमीटरचे अंतर पायीच चालावे लागले. महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. बसवेश्वर सर्कलमध्ये झालेल्या सभेत बी. आर. संगाप्पगोळ, महावीर मोहिते, माजी नगराध्यक्ष रामा माने, शेखर प्रभात, बसवराज ढाके आदींनी मनोगत व्यक्त केले.
खडकलाट गावात बंदचे अवाहन करण्यात आले होते. हा बंद शांततेत पार पडला. घोषणा फलक, निषेधाच्या घोषणा व महापुरूषांच्या विजयाच्या घोषणेद्वारे मोर्चा काढून येथील गावकामगार तलाठ्यांना दलित समाज व संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. येथील डॉ. आंबेडकर चौकात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास येथील ग्राम पंचायत अध्यक्ष राजू हेग्गाणा यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र बंदची पोस्टव्हायरल करणारा अटक

$
0
0

सोलापूर
सकल मराठा समाजाच्या वतीने दहा जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद करण्यात आल्याची पोस्ट फेसबुकवर टाकणाऱ्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. सदर बझार पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केले आहे. विशाल प्रकाश सातपुते (वय २१, रा. पाटकूल, ता. मोहोळ, जि. सोलापूर सध्या शिरगिरे बिल्डिंग, डफरीन चौक, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
या बाबत पोलिस आयुक्तालयाच्या सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षक मधुरा भास्कर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
फेसबुकवर कोरेगाव भीमा या ठिकाणी निर्माण झालेल्या दंगलीत मराठा समाज बांधवांवर प्राणघातक हल्ले झाले. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी १० जानेवारी २०१८ रोजी सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. फेसबुकवरील ही पोस्ट कोठून व कोणी टाकली याचा सायबर सेलकडून शोध घेतला असता ती पोस्ट विशाल सातपुते याने प्रसिद्ध केल्याचे दिसून आले. त्यामुळे सायबर सेल विभागाच्या वतीने सातपुते यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने ही पोस्ट काढून टाकल्याचे सांगितले. त्यामुळे सातपुते याने जनतेमध्ये भीती निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सातपुते यास अटक करण्यात आली आहे. या बाबत महिला पोलिस उपनिरीक्षक भास्कर अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालरंगकर्मींच्या उर्जेने सळसळले नाट्यगृह

$
0
0

टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शौर्याचा इतिहास सांगणारे ऐतिहासिक सादरीकरण, पर्यावरण संवर्धनाची हाक देणारे विषय, मोठ्यांच्या खटकणाऱ्या गोष्टींविषयी बालमनातील अनेक भाष्य यासह विविध विषयांनी पंधराव्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेचा मंच गेल्या दोन दिवसांपासून गाजत आहे. तिसरी घंटा वाजण्यापूर्वीची उत्सुकता आणि हुरहूर बालरंगकर्मींच्या चेहऱ्यावर दिसत होती. मंचावर अभिनायतून कथा सकसपणे मांडणारे बालअभिनेते आणि समोर संवादाला, प्रवेशाला दिलखुलास दाद देणारे बालरसिक अशी गट्टी या बालनाट्यस्पर्धेच्यानिमित्ताने केशवराव भोसले नाट्यगृहात जमली आहे.

ऐतिहासिकता, नाविन्यता, वर्तमानातील जागरुकता, बालमनातील सजगता आपल्या अस्सल अभिनयातून दाखवत बालमित्रांनी ‘सिंहगडाला जेव्हा जाग येते’, ‘गांधी व्हायचय मला’, ‘ये रे ये रे पावसा’ या नाटकांमधून आपली प्रतिभा सादर केली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सुरु असलेल्या १५ व्या राज्य बाल नाट्य स्पर्धांच्या तिसऱ्या दिवशीही व्यासपीठ गाजले. विविध ज्वलंत विषयांवर या नाटकांमधून भाष्य करण्यात आले. या नाटकांना रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. मुलांचा रंगमंचावरील सहज वावर, त्या-त्या स्थळकाळचे नेपथ्य, दिग्दर्शकीय सूचनांचा प्रसंगानुरुप केलेला वापर, संगीत, प्रकाशयोजना या सर्वाची मांडणी यथायोग्यपणे करणाऱ्या बालमित्रांना मिळणारी दाद प्रोत्साहनाचे टॉनिक ठरत आहे.

लहान वयातही त्या त्या वेळची परिस्थिती समजून अभिनयात दाखवलेला कमालीचा समंजसपणा मुलांच्या अभिनयातील सक्षमतेची जाणीव करुन देत होता.सोमवारी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीच्या स्पर्धेत विश्वयोग्य अध्यात्मिक संस्थेच्या वतीने ‘सिंहगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक सादर केले. तर पटवर्धन हायस्कूलने ‘कोरफड’ नावाचे एक नवेकोरे नाटक सादर केले. सिटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी कलाकारांनी ‘निशांत’ या नाटकातून आपली अभिनय प्रतिभा दाखवून दिली. तर सिटी हायस्कूल सांगलीच्या विद्यार्थ्यांनी ‘येरे येरे पावसा’ मधून दिग्दर्शकीय ताकद दाखवली. कोल्हापूरच्या प्रज्ञान कला अकादमीच्यावतीने ‘अटक मटक चवळी चटक’ तर परिवर्तन कला फाउंडेशनच्यावतीने ‘गांधी व्हायचय मला’ ही नाटके सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ई वॉर्डातील पाणीपुरवठा होणार सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ई वॉर्डसाठी स्वतंत्रपणे टाकण्यात आलेल्या पाइपलाइनमधून प्रायोगिक पातळीवर पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. कळंबा फिल्टर हाऊसजवळील व्हॉल्व दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याने हे काम पुर्ण झाल्यानंतर या पाइपलाइनमधून पुर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे रात्री एक ते सकाळी सहा वाजेपर्यंत या पाइपलाइनमधून ई वॉर्डला पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे.

सध्या थेट पाइपलाइनचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वितरण वाहिन्या बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. यापूर्वी ई वॉर्डसाठी शिंगणापूर योजना तयार करण्यात आली. पण योजनेतून उचलण्यात येणारे पाणी ई वॉर्डला पुर्ण क्षमतेने मिळालेच नाही. परिणामी शेवटच्या काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या कायम तक्रार होत राहिल्या. शेवटी शिंगणापूर योजनेतील पाणी ई वॉर्डपर्यंत पोहचवण्यासाठी शेंडा पार्ककडून स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात आली. अडीच कोटी रुपयांचा खर्च झालेली ही लाइन गेल्यावर्षीपासून कार्यान्वित करण्यात आली नव्हती.

या शनिवारपासून मात्र या लाइनवरुन पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. सध्या प्रायोगिक पातळीवर वितरण केले जात असून कळंबा फिल्टर हाऊसजवळ व्हॉल्व दुरुस्त झाल्यानंतर पुर्ण क्षमतेने पाणी वितरण करण्यात येणार आहे. शिंगणापूर योजनेतील पाणी ई वॉर्डसाठी रात्री एक ते सकाळी सहा वाजेपर्यंत देण्याचे नियोजन आहे. पण या कालावधीत कळंबा फिल्टर परिसरातील इतर ठिकाणीही पाणी सोडले जात असल्याने ई वॉर्डला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यासाठी शेंडा पार्कजवळून नवीन पाइप टाकण्यात आली आहे. यावर कोणतेही अन्य कनेक्शन दिलेल नाही. त्यामुळे पाच तासात केवळ ई वॉर्डसाठी पाणी जाईल, असे नियोजन आहे.

कळंबा फिल्टर हाऊसजवळ असलेल्या व्हॉल्वमुळे या योजनेतील पाणी इतर ठिकाणी वळवले जात असल्याच्या तक्रारी ई वॉर्डमधील नगरसेवकांकडून होत होत्या. तसेच अनेक पाणी टाकी पुर्ण क्षमतेने भरल्या जात नसल्याने पुर्ण दाबाने पाणी पुरवठा होत नाही, असाही आरोप आहे. त्यामुळेच नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलोख्यासाठी संक्रांतीचा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘बंददरम्यान दोन समाजात झालेल्या संघर्षामुळे फेब्रुवारी महिन्यातील शिवजयंती आणि एप्रिलमध्ये साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सलोखा समित्यांची पुनर्रचना केली जाणार आहे. संक्रांतीच्या मुहूर्तावर सलोखा बैठकांचे काम सुरू होईल. वादाला कारणीभूत ठरणारे परिक्षेत्रातील सर्व विनापरवाना फलक, विविध रंगांचे ध्वज आणि डिजिटल बॅनर हटवले जाणार आहेत,’ अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बधवारी बंददरम्यान शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. या घटनांमुळे दोन समाजातील संघर्ष तीव्र झाला असून, असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यातील पहिला टप्पा म्हणून सलोखा समित्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ‘बहुतांश सलोखा समित्यांमधील सदस्य कार्यरत नाहीत. जे कार्यरत आहेत त्यांचे कोणी ऐकत नाही. पोलिसांसोबत त्यांची नियमित बैठक होत नाही, त्यामुळे सलोखा समित्यांची पुनर्रचना केली जाणार आहे. आठवड्याभरात नव्या सलोखा समित्या तयार करून १४ जानेवारीपासून संक्रांतीच्या मुहूर्तावर या समित्यांचे काम सुरू होईल. दोन्ही समाजात निर्माण झालेली तेढ कमी करणे, पोलिसांच्या कारवाईबद्दल नागरिकांना माहिती देणे, गुन्हे दाखल झाल्याने होणारे नुकसान याबद्दल जागृती निर्माण करण्याचे काम सलोखा समित्या करणार आहेत,’ असे आयजी नांगरे-पाटील यांनी सांगितले.

फेब्रुवारी महिन्यात शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. बंददरम्यान झालेल्या तोडफोडीमुळे दोन्ही समाजात संघर्ष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रपुरुषांची जयंती शांततेत पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे, अशी कबुली खुद्द आयजी नांगरे-पाटील यांनीच दिली आहे. वादाला कारणीभूत ठरणारे विनापरवानगी शुभेच्छा फलक, जयंती, पुण्यतीथींचे फलक, डिजिटल बोर्ड, विविध रंगांचे ध्वज काढून टाकण्याचे आदेश आयजी नांगरे-पाटील यांनी पाचही जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. शहरात अनेक ठिकाणी असे फलक आणि ध्वज आहेत.

फलक फाडल्याने घडली रुकडीची दंगल

रुकडी येथे पोलिसांची परवानगी न घेताच काही मंडळांनी फलक लावले होते. बंददरम्यान यातील एक फलक अज्ञातांनी फाडल्याने वादाला सुरुवात झाली. हा वाद दोन गटात पसरल्याने त्याला जातीय रंग मिळाला. यातच सोशल मीडियातील अफवांची भर पडल्याने दोन समाजात तेढ निर्माण झाली. केवळ एका फलकामुळे सुरू झालेला वाद संपूर्ण गावभर पसरला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. विनापरवानगी फलक आणि ध्वज वादाला कारणीभूत ठरत असल्याने असे फलक आणि ध्वज लावणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तोडफोडीमागे नक्षलवादी?

बंददरम्यान तोडफोड करणाऱ्यांमध्ये आंबेडकरवादी संघटनांचे कार्यकर्ते नव्हते, असा खुलासा आंबेडकरवादी संघटनांच्या नेत्यांनी वारंवार केला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनीही याला दुजोरा देत तोडफोडीमागे तिसरी शक्ती असल्याची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापुरातील तोडफोडीमागे नक्षलवादी विचारांच्या काही संघटना कार्यरत होत्या, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात नक्षलवाद पाय पसरत असल्याची माहिती समोर येत असल्याने तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भू-विकास बँकांची विक्री लटकली

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : राज्यातील २० राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकांसह (भू-विकास) शिखर बँक अवसायनात काढल्यानंतर सहाकर व पणन विभागाने बँकांची विक्री करून कर्मचाऱ्यांची देणी भागवण्याचा निर्णय घेतला. पण कोल्हापूर व नाशिक वगळता राज्यातील कोणत्याही बँकेच्या विक्रीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने संपूर्ण राज्यातील बँकांची विक्री प्रक्रिया ठप्प झाली आहे. कोल्हापूर व नाशिक बँकेच्या निविदेला प्रतिसाद मिळाला असला, तरी तांत्रिक कारणामुळे येथेही विक्रीची प्रक्रिया थांबली आहे. बँकांची विक्री प्रक्रिया थांबलेल्यी असल्यामुळे कर्मचाऱ्यांची देणी मात्र अद्यापही प्रलंबित राहिली आहेत.

थकीत कर्जांमुळे राज्यातील भू-विकास बँका अडचणीत आल्यानंतर २०१५ मध्ये सर्व बँका अवसायानात काढण्यात आल्या. बँकांकडील थकीत कर्जवसुलीसाठी ओटीएस (एकरकमी परतफेड) योजना राबवली. त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांची ग्रच्युईटी, रजा, पगार आणि नुकसान भरपाई आदी देणी प्रलंबित राहिली. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यासाठी बँकांच्या विक्रीसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले.

कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे ऑक्टोबरमध्ये २०१६ मध्ये बँकांची विक्री करुन कर्मचाऱ्यांची देणी भागवण्याचा आदेश काढला. त्यानंतर राज्यातील सात बँका वगळता १३ बँकांच्या विक्रीसाठी अपसेट प्राइस (सरकारी बोलीची किंमत) निश्चित करून निविदा प्रसिद्ध केली. या निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने या बँकांची विक्रीची प्रक्रियाच ठप्प झाली आहे.

जागा कवडीमोलाने घेण्याचा प्रयत्न

राज्यातील भू- विकास बँकांचा विक्री प्रतिसाद मिळत नसल्याने या बँकांची अपसेट प्राइस कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील सर्वच बँकांच्या इमारती अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असूनही बँकांची अपसेट प्राइस कमी असताना पुन्हा ही प्राइस कमी करण्याचा खटाटोप सुरू झाला आहे. यातून मोक्याच्या जागा कवडीमोल दरांने पदरात पाडून घेण्यासाठी उखळ पांढरे करुन घेण्यासाठी यंत्रणा कार्यन्वित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दृष्ट‌िक्षेपात कोल्हापूर भू-विकास बँक

९,५०० स्क्वेअर फूट

जागा आकार

११ कोटी ८० लाख

अपसेट प्राइज

१२ कोटी

कर्मचारी देणी

दहा लाख

बयाणा रक्कम

२०८

एकूण कर्मचारी

आज नव्याने निविदा प्रसिद्ध

कोल्हापूर भू-विकास बँकेची प्रथम १४ नोव्हेंबर रोजी विक्रीची निविदा प्रसिद्ध केली. पण निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे पुन्हा मुदतवाढ दिली. मुदतवाढीमध्येही बयाणा रक्कम भरुन ऑनलाइन निविदा दाखल केली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची देणी रखडली असल्याने पुन्हा बुधवारी (ता. १०) बँकेच्या विक्रीची प्रक्रिया राबवण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. पूर्वीच्या रकमेला निविदा दाखल झालेल्या नसल्याने पुन्हा अपसेट प्राइस कमी करण्यासाठी सरकारबरोबर सहकार विभाग पत्रव्यवहार करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वमालकीचे क्रिकेट मैदान उभारणार

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com
Tweet:@satishgMT

कोल्हापूर : सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेने महाराष्ट्र रणजी आणि भारतीय संघात जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंची निवड व्हावी यासाठी ज्युनिअर क्रिकेटकडे लक्ष दिले. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राच्या विविध गटाच्या संघात १४ खेळाडूंची निवड झाली आहे. कोल्हापुरच्या अनुजा पाटीलची तर थेट भारतीय ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. महिला क्रिकेटला उर्जितावस्था देण्यासाठी संघटनेचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित स्वःमालकीचे मैदान आणि अद्यायवत ट्रेनिंग स्कूल उभारण्याचा संकल्प संघटनेने आखला आहे.
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सुवर्णमहोत्सवास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गेल्या ५० वर्षांतील खेळाडूंचा गौरव, चर्चासत्र, प्रदर्शन आदी कार्यक्रम सुरू आहेत. कोल्हापूरचे खेळाडू फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय संघात खेळले पाहिजेत हे ध्येय ठेऊन पायाभूत सुविधा निर्माण करून देताना संघटनेचे स्वतःचे मैदान असावे, वर्षभर सुरू राहणारे क्रिकेट ट्रेनिंग स्कूल तेथे उभारले जावे असा निर्धार करण्यात आला आहे.
१९६८ मध्ये एसटीतील निवृत्त अधिकारी गोपाळराव घोरपडे यांनी जिल्हा क्रिकेट संघटनेची स्थापना केली. तत्कालिन नगराध्यक्ष तात्यासाहेब पाटणे हे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. जिल्हा क्रिकेट संघटना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेशी (एसीए) संलग्न होती. सखारामबापू खराडे, बाळासाहेब खराडे, जयसिंगराव कुसाळे, रणजितसिंह महागावकर यांनी संघटनेचा विस्तार केला. कोल्हापूरच्या खेळाडूंना महाराष्ट्र रणजी संघात निवडीसाठी पुण्यात जावे लागायचे. सोमवार ते शुक्रवारी कोल्हापुरात सराव आणि नंतर शनिवार, रविवार असे दोन दिवस पुण्यात सामने असा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या जिद्दी खेळाडूंनी महाराष्ट्र संघात स्थान पक्के केले. पांडुरंग साळगावकर, रमेश कदम, रमेश हजारे, उमेश गोटखिंडीकर यांनी महाराष्ट्र संघाकडून दमदार खेळ करत कोल्हापूरचे नाव गाजवले.
‘एमसीए’वर पुण्याचे वर्चस्व असले तरी खऱ्या अर्थाने २००५ नंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे तत्कालिन अध्यक्ष अजय शिर्के यांनी कोल्हापूरसह २२ जिल्ह्यांना एमसीएमध्ये प्राधान्य दिले. त्यानंतर पुण्याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांतील खेळाडू महाराष्ट्र संघात दिसू लागले. आज जिल्ह्यातील १२ ते १४ खेळाडू महाराष्ट्राच्या विविध वयोगटाच्या संघात प्रतिनिधीत्व करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी संघटनेने प्रसिद्ध प्रशिक्षक प्रमोद इंगळे यांच्या मार्गर्शनाखाली १४ वयोगटाचा जिल्हा क्रिकेट संघ तयार केला. संघाने सर्व जिल्ह्यांना पराभूत करत कोल्हापूरला विजेतेपद पटकावून दिले. गेल्यावर्षी, २०१७ मध्ये १६ वयोगटाखालील संघानेही अजिंक्यपद पटकावले.
जिल्हा संघ तयार करताना सर्वांना १४ आणि १६ या दोन्ही वयोगटांची बांधणी करण्यास सांगण्यात आले आहे. आज दोनशेहून अधिक खेळाडू सराव करत आहेत. तर ४० खेळाडू कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील संघांकडून प्रतिनिधीत्व करत आहेत. अनुजा पाटील कोल्हापूरची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील एकदिवशी सामन्यांसाठी अनुजा सज्ज झाली आहे. अनुजापाठोपाठ कोल्हापूरमधील अन्य मुलीही महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधीत्व करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

००००
आम्ही धोरण निश्चिती करून ज्युनिअर क्रिकेटवर भर दिला. त्यासाठी प्रदीप इंगळे हे तज्ज्ञ प्रशिक्षक गेली दोन वर्षे, संघटनेला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभही संघटनेला झाला. गेल्या दोन वर्षांत १४ आणि १६ वयोगटातील संघांनी एमसीए निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. क्रिकेटचा प्रसार वेगाने करण्यासाठी यापुढे स्वमालकीचे मैदान व ट्रेनिंग सेंटर उभारणीवर भर देणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आजी-माजी खेळाडूंचा सत्कार, चर्चासत्रे, क्रिकेट साहित्याचे प्रदर्शन या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र ज्युनिअर क्रिकेट अधिकाधिक बलवान करणे हे आमचे टार्गेट असेल. त्यासाठीच स्व मालकीचे मैदान आणि ट्रेनिंग सेंटर सु हे मुख्य ध्येय ठेवले आहे.
- बाळ पाटणकर, अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटना
००
ग्रामिण क्रिकेट मूळ धरतेय
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत, तालुकास्तरीय क्रिकेट संघटना कार्यरत आहेत. यापैकी करवीर, शिरोळ आणि गडहिंग्लज या तालुक्यांत क्रिकेटने चांगले मूळ धरले आहे. आज जिल्हा महिला क्रिकेट संघाच्या निवड चाचणीत गडहिंग्लजसारख्या ठिकाणाहून १२ मुली येतात, सहभागी होतात ही बाब महिला क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय आशादायक आहे. करवीर आणि शिरोळ या दोन तालुक्यांतही संघ तयार होत आहेत. कागल आणि इचलकरंजी या शहरांतील क्रिकेटची मैदानेही तयार झाली आहेत.
- चेतन चौगुले, उपाध्यक्ष जिल्हा क्रिकेट संघ

गुणवत्तेमुळे मागणी वाढली
गेल्या चार वर्षांत संघटनेने ज्युनिअर क्रिकेटकडे अधिक लक्ष दिले. या वयोगटातील मुले अधिक सक्षम कशी होतील यावर भर दिला. प्रसिद्ध प्रशिक्षक प्रमोद इंगळे यांच्या मार्गर्शनाखाली २००हून अधिक खेळाडू कोल्हापुरात सराव करीत आहेत. कोल्हापूरच्या ४०पैकी २० खेळाडू कोल्हापूरकडून आणि अन्य २० दर्जेदार खेळाडू पुण्यातील विविध क्लबकडून प्रतिनिधीत्व करत आहेत. पुण्यातील क्लबकडून कोल्हापूरच्या खेळाडूंना मागणी वाढली आहे. येथील खेळाडूंच्या गुणवत्तेची ही पोहोचपावती आहे.
- रमेश कदम, सचिव, जिल्हा क्रिकेट संघ

प्रायोजक, दानशूर मंडळींचा आधार
शहरातील संस्था आणि दानशूर मंडळींच्या मदतीवर कोल्हापूरच्या क्रिकेटचा विकास सुरू आहे. सद्यस्थितीत काटकसर करुन कोल्हापूर जिल्हा संघटना काम करत आहे. संघटनेकडे स्वतःचे मैदान नसतानाही शाहूपुरी जिमखाना, शास्त्रीनगर मैदान, राजाराम कॉलेजचे मैदान, पोलिस मैदान, डी. वाय. पाटील मैदान, शिवाजी स्टेडियम, इचलकरंजी आणि कागल या मैदानांवर वर्षभर १४ स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यातून कोल्हापूरच्या क्रिकेटला अधिक गती मिळत आहे. आजच्या घडीला वेगवेगान खेळाला प्राधान्य आहे. तशी तयारी सुरू आहे.
- बापू मिठारी, खजानिस जिल्हा क्रिकेट संघटना

ट्रेनिंग स्कूलची उभारणी करणार
कोल्हापूर शहरातील सर्व मैदाने सखल भागात आहेत. त्यामुळे दरवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापुरातील क्रिकेटचा सराव बंद असतो. या ऑफ सिझनमध्ये खेळाडू क्रिकेटपासून, सरावापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे आम्ही मे महिन्यातच ज्युनिअर खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करतो. खेळाडूंच्या कपॅसिटी बिल्डिंगसाठी नव्या, अत्याधुनिक तंत्राचा अवंलब केला जात आहे. भविष्यात जिल्हा क्रिकेट संघटनेच्यावतीने ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये तीन इनडोअर विकेट, पाच आउडडोअर विकेट्स, थीम मॅचेस यांचा समावेश केला जाणार आहे. नव्या तंत्राचा अवलंब करून क्रिकेटचा प्रसार व्हावा यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
- ऋतुराज इंगळे, माजी अध्यक्ष जिल्हा संघटना

दरवर्षी १४ स्पर्धाचे नियोजन
दरवर्षी विविध वयोगट, आंतरशालेय, आंतर महाविद्यालयीन अशा १४ स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन करणारी एकमेव कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटना आहे. आगामी कालावधीत महिला क्रिकेट वाढावे यासाठी, मुलींसाठी भाऊसाहेब निंबाळकर स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील संघांना आमंत्रित केले जाणार आहे.
- केदार गयावळ, सह सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरविकासाला येणार गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राथमिक सर्व्हेक्षण व नकाशा तयार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नकाशे तयार झाल्यानंतर नुकतीच मंजूर झालेली प्रादेशिक योजना व प्राधिकरण या दोन्हींची सांगड घालून विकास आराखडा (डीपी) तयार करण्यात येणार आहे. सहा महिन्याच्या कालावधीत सर्व्हेक्षण करावे लागणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

नवीन शहर विकास आराखड्याचा २०२० पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी किमान तीन वर्षे अगोदर प्रक्रिया सुरू करावी लागते. त्यानुसार महापालिकेने आराखड्याच्या कार्यवाही करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार प्रथम शहरातील जागेचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून त्यानंतर त्याचे नकाशे बनवण्यात येणार आहेत. या नकाशांनुसार जागेचा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात येईल. सर्व्हेक्षण व नकाशे उपग्रहाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्यात यासाठी एजन्सी नेमण्यात येणार आहे. या एजन्सीसाठी टेंडर मागवण्यात येणार आहे.

सध्याच्या जागेचा नकाशा तयार झाल्यानंतर कोणत्या कारणांसाठी जागा राखीव ठेवायची याचा प्रस्तावित आराखडा केला जाणार आहे. हे काम महत्त्वाचे असून त्यासाठी प्रादेशिक योजना व प्राधिकरणची कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे. शहरागतच्या गावांसाठी प्रादेशिक आराखडा मंजूर झाला आहे. ट्रक ​टर्मिनस, पब्लिक, सेमी पब्लिक, रहिवास, शेती, इंडस्ट्री अशा विविध कारणांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यानुसार शहर विकास प्राधिकरणामधून विकासकामे सुचविण्यात येऊ शकतात. शहरालगत असलेल्या या गावांमधील राखीव जागा व तिथे प्राधिकरणच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकासाचा विचार करून शहरातील नवीन विकास आराखड्याचे नियोजन केले जाणार आहे.

एखाद्या गावात ट्रक टर्मिनससारख्या प्रकल्पासाठी जागा आरक्षित असेल तर त्यालगत येणाऱ्या शहराच्या हद्दीत पुन्हा ट्रक ट​र्मिनससाठी आरक्षण ठेवल्यास त्याचा उपयोग होणार नाही. तसेच जिथे इंडस्ट्री अथवा पब्लिक अशा कारणांसाठी जागा राखीव असेल तर त्याअनुषंगाने शहरात ​पुन्हा आरक्षण ठेवायचे असल्यास त्याचा सांगोपांग विचार करावा लागणार आहे. यामध्ये शहरात येणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून आराखडा बनवावा लागणार आहे. शहर व शहरालगतच्या गावांमध्ये आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी कोणत्या आरक्षणांची आवश्यकता आहे, याचा विचार करावा लागेल. यानुसार प्रस्तावित केलेल्या आराखड्याला सभागृहासमोर ठेवून त्याची मंजुरी घेण्यात येईल. या सभागृहातील नगरसेवक आगामी विकासाचा हा आराखडा मंजूर करणार आहेत. त्यामुळे या सभागृहावर शहराच्या भावी विकासाचे नियोजन करण्याची जबाबदारी आहे.



शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी अगदी वेळेवर कार्यवाहीला सुरुवात केली आहे. त्यासाठीची प्रक्रिया राबवण्यात येणार असून सहा महिन्याच्या आत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. सध्या प्रादेशिक आराखडा व प्राधिकरणाचा निर्णय झाला आहे. त्यामुळे विकास आराखडा तयार करण्यासाठी त्यांची सांगड घातली जाईल.

धनंजय खोत, सहाय्यक संचालक, नगररचना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे दीडहजारांवर,अटकेत ५६

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बुधवारी बंददरम्यान झालेल्या तोडफोडीच्या घटनांनंतर शहरात पोलिसांनी सुमारे दीड हजार संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या सहा दिवसांत यातील केवळ ५६ संशयितांवर अटकेची कारवाई झाली आहे. निरपराध नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान करणारे हुल्लडबाज अद्यापही मोकाट फिरत आहेत, त्यामुळे मोकाट हुल्लडबाजांवर कारवाई कधी होणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला आंबेडकरवादी सघटनांच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ बुधवारी (ता. ३) राज्यव्यापी बंदचे आवाहन केले होते. या बंददरम्यान कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. शहरात सहाशेहून अधिक वाहनांचे नुकसान झाले, तर दुकानांसह घरांवरही दगडफेक झाली. आंबेडकरवादी सघटनांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनाही रस्त्यावर उतरल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लाठीमारासह अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.

जमावबंदीचा आदेश झुगारून आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या दीड हजारहून अधिक संशयितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. वाहनांची तोडफोड करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, तोडफोडीसाठी चिथावणी देणे, दुकाने आणि वाहनांमधील वस्तुंची लूट करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. हुल्लडबाजांनी शाहूपुरी, स्टेशन रोड, शिवाजी रोड आणि गुजरी परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात तोडफोड करून दहशत माजवली होती. याबाबत नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हे दाखल केले. काही नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे दिले आहे. यानुसार पोलिसांनी संशयितांवर गुन्हे दाखल करून अटकसत्र सुरू केले. दगड मारताना आणि वाहने फोडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्वच संशयितांना अटक होणे गरजेचे आहे, मात्र गेल्या सहा दिवसांत शहरात केवळ ५६ संशयितांवरच अटकेची कारवाई केली आहे. अनेक संशयित अद्यापही मोकाट फिरत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शाहूपुरी परिसरातील स्टेशन रोड आणि पहिल्या तीन गल्ल्यांमध्ये सकाळी सहा ते दुपारी अडीचच्या दरम्यान तीनवेळा दगडफेकीच्या घटना घडल्या. यात सुमारे दोनशे वाहने आणि तितक्याच इमारतींचे नुकसान झाले आहे. बंदला पाठिंबा देऊनही हुल्लडबाज आंदोलकांनी वाहनांचे नुकसान केल्याने नागरिक संतापले आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्यात ६०० ते ७०० संशयितांवर तीन गुन्हे दाखल आहेत. यातील १५ संशयित अटकेत आहेत. लक्ष्मीपुरीत ५०० ते ६०० संशयितांवर गुन्हे दाखल आहेत. यातील केवळ नऊ अटकेत आहेत. राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात प्रत्येकी ५० ते ६० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल आहेत. यातील प्रत्येकी १० आणि १३ संशयित अटकेत आहेत. उर्वरित हुल्लडबाज मोकाट फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

नुकसानभरपाई वसूल करा

बंददरम्यान मोकाट सुटलेल्या हुल्लडबाजांनी घराबाहेर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक केली. दुकानांमध्ये घुसून वस्तूंची लूटही केली. विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजवली. तीन ते चार तासात हुल्लडबाजांनी नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. याची भरपाई आंदोलकांकडून करावी, असा आग्रह नागरिकांनी केला आहे. याबाबत पोलिसांनी कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पोलिस ठाणे दाखल गुन्हे संशयित अटक

शाहूपुरी ६०० ते ७०० १५

राजारामपुरी ५० ते ६० १९

जुना राजवाडा ४० ते ५० १३

लक्ष्मीपुरी ६०० ते ७०० ९

एकूण १४०० ते १५०० ५६

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दगडफेक करणाऱ्या संशयितांची नावे निष्पन्न केली जात आहेत. कारवाईच्या भीतीपोटी यातील अनेक संशयितांनी शहरातून पळ काढला आहे. ठोस पुरावे हातात घेऊनच अटकेची कारवाई जाते आहे. कोर्टात खटले दाखल केल्यानंतर बाजू भक्कमपणे मांडता यावी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जि.प’तील पदोन्नत्या ‘अवघडल्या’

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet :@bhimgondaMT

कोल्हापूर : जिल्हा परिषद, बारा पंचायत समित्यांमधील सर्व कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक असे एकूण १३ हजार ८८७ कर्मचारी आहेत. सर्व संवर्गाच्या पदोन्नती, बढती, बदली प्रत्येक वर्षी होणे आवश्यक ‌आहे. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या नि‌ष्क्रिय, ढपलाबाज कामगिरीमुळे बढत्या, बदल्या वेळेत झालोल्या नाहीत. गेले वर्षभर बढत्या लटकल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोष आहे. संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, ‘लालफिती’चा अनुभव त्यांनाही येत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील ‌शिपायांपासून वर्ग दोनपर्यंतच्या सर्व संवर्गाच्या बढत्या (पदोन्नती) आणि बदल्या वेळेत झाल्या नसल्याने कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. सरकारी काम, सहा महिने थांब या लालफितीचा सामान्य लोकांप्रमाणे बढती, बदलीस पात्र कर्मचाऱ्यांना अनुभव येत आहे. यामुळे झिरो पेंन्डसी, गतिमान प्रशासन या योजनांचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसते. बढती, बदलीची जबाबदारी असलेला सामान्य प्रशासन विभाग सुस्तावला आहे.

केंद्र, राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती प्रशासन करते. त्यामुळे मिनी विधानसभा म्हणून जि.प.ची ओळख आहे. एकेकाळी उत्कृष्ट कामगिरीने जि.प.चा गौरव राज्य, देशपातळीवर झाला. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून प्रशासनाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. नागरिकांना वेळेत न्याय मिळण्याऐवजी वारंवार हेलपाटे माराव्या लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यापूर्वी लाचखोरीत सापडलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जबाबात लाच ‘प्रोटोकॉल’ असल्याचे पुढे आले. त्याचा फटका नागरिकांप्रमाणे प्रामाणिक कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही बसत आहे. पात्र असूनही केवळ चिरीमिरी दिली नाही म्हणून बढत्या नाकारणे, बदली रेंगाळत टाकणे अशा तक्रारी आहेत.

दरम्यान, करवीर पंचायत समिती कर्मचारी आत्महत्याचे निमित्ताने तत्कालीन सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यावर बदलीची नामुष्की ओढवली. त्यांच्या काळातील अनेक बढत्या, बदल्या वादग्रस्त ठरल्या. कर्मचाऱ्यांना अरेरावी, वरिष्ठाची दिशाभूल असे आरोपही त्यांच्यावर झाले. त्यांच्या बदलीनंतर सामान्य प्रशासनाला अतिरिक्त कार्यभार ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्याकडे आहे. मात्र, त्यांच्या सोयीच्या कामकाजामुळे दोन्ही विभागांचा कारभार रामभरोसे बनला आहे.

अधिकारी घेतात ‘रायगड’चा सल्ला

पूर्वीच्या सामान्य प्रशासनच्या अधिकाऱ्याची बदली रायगड जिल्हा परिषदेत झाली आहे. तरीही येथील काही फायली निर्गतीकरण करताना, निर्णय घेताना त्यांचा सल्ला घेतला जात असल्याची चर्चा प्रशासनात आहे. तसे असेल तर येथील अधिकारी अकार्यक्षम, नाकर्ते आहेत का? असा सवाल उपस्थित होतो. यावरून कर्मचारी, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, प्रशासकीय कामकाजात सुधारणा करणे, सामान्य लोकांना प्रशासनाचा सुखद अनुभव देण्यात सामान्य प्रशासन अपयशी ठरल्यावरही शिक्कामोर्तब होते.



पदोन्नतीमधील आरक्षण ही बाब न्यायप्रविष्ट झाली होती. त्यामुळे पदोन्नती रखडल्या होत्या. माझ्याकडे कार्यभार नसलेल्या कालावधीतील माहिती घ्यावी लागेल.

- राजेंद्र भालेराव, प्रभारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परतफेडीसाठी घर तारण

$
0
0


कोल्हापूर ः केवळ सहाशे रूपयात तीन हजाराची वस्तू देण्याचे आमिष दाखवून हजारो महिलांना एका कंपनीने गंडा घातला आहे. या कंपनीचे चालक फरार झाले, पण एजंट म्हणून काम केलेल्या सामान्य महिला अडचणीत आल्या आहेत. ज्यांनी सहाशे रूपये दिले, त्यांनी परतफेडीसाठी या महिलांकडे तगादा लावला आहे. यामुळे घर तारण ठेवत कर्ज काढण्याची वेळ एका एजंट महिलेवर आली आहे.

महालक्ष्मी एंटरप्रायझेस नावाने काढण्यात आलेल्या कंपनीने गोकुळ शिरगावचा पत्ता दिला होता. केवळ सहाशेमध्ये तीन हजाराची वस्तू मिळवा, अशी आकर्षक जाहिरात करण्यात आली. जिल्ह्यातील हजारो महिलांनी त्यात पैसे गुंतवले. टीव्ही, फ्रीज, फॅन, शेगडी अशा वस्तूंबरोबरच सोन्याचे दागिने देण्यात येणार असल्याने या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला, पण काही दिवसातच कंपनीने गाशा गुंडाळला. वस्तू घरपोच येणार होती. पैसे भरलेल्यांची प्रतीक्षा सुरू झाली. अनेक महिने उलटले तरी वस्तू येईना, त्यामुळे त्यांनी एजंटाकडे तगादा लावायला सुरूवात केली.

आकर्षक कमिशनाच्या लोभामुळे अनेक सामान्य महिला एजंट म्हणून काम करत होत्या. त्यांनी रक्कम गोळा केल्याने वस्तू द्या, नाही तर पैसे तरी परत द्या, असा तगादा त्यांच्याकडे सुरू केला. शहरात दोन महिला यामध्ये मुख्य एजंट होत्या. सामान्य महिला एजंटांनी त्यांच्याकडे विचारणा सुरू केली, पण प्रतिसाद देत नसल्याने या महिलांचे धाबे दणाणले. मंगळवार पेठेत एक महिला आहे. तिने साधारण दोन हजारावर लोकांकडून प्रत्येकी सहाशे याप्रमाणे बारा ते तेरा लाख जमा केले, एवढी रक्कम परत देण्याची त्या महिलेची क्षमता नव्हती. त्यामुळे घर तारण ठेवून कर्ज काढण्याची वेळ तिच्यावर आली.

कंपनीने फसवणूक केल्याबद्दलचा विषय पोलिस ठाण्यात गेला आहे. शाहूपुरीनंतर हा विषय जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र कंपनीवर गुन्हा नोंद न करता पोलिस तडजोडीचा प्रयत्न करत आहेत. केवळ दोन महिलांकडे ३८ लाखावर रक्कम अडकली आहे. या महिलांच्या मार्गदर्शनाखाली २२ महिला एजंट म्हणून काम करत होत्या. त्या सर्वांनी हजारो लोकांकडून रक्कम जमा केली, पण वस्तूच न मिळाल्याने हे सारे महिलांच्या घरात हेलपाटे मारत आहेत. रोज उठून या लोकांच्या शिव्या खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्पर अधीक्षकपदी तिरुपती काकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या सव्वा महिन्यांपासून रिक्त असलेल्या अपर पोलिस अधीक्षकपदी अखेर नवीन अधिकारी मिळाले आहेत. तिरुपती काकडे यांची कोल्हापूर अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रभारी अप्पर अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची कोल्हापुरात सीआयडी अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. शिवाय गडहिंग्लज अप्पर पोलिस अधीक्षकपदी श्रीनिवास घाडगे यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी (ता. ९) गृह विभागातून बदल्यांचे आदेश मिळाले. अप्पर अधीक्षकपदी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने कॉम्रेड पानसरे हत्या तपासाला गती येण्याची शक्यता आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची २३ नोव्हेंबरला सांगली अधीक्षकपदी बदली झाल्यानंतर पदाचा प्रभारी कार्यभार गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांच्याकडे सोपवला होता. अप्पर पोलिस अधीक्षक हे कॉम्रेड पानसरे हत्येच्या विशेष तपास पथकाचे अधिकारी आहेत. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने पानसरे हत्या प्रकरणाच्या तपास थंडावला होता. याबाबत पानसरे कुटुंबीयांसह विविध पुरोगामी संघटनांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सोमवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध करून महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीत चालढकल झाल्याचे समोर आणले होते. राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन मंगळवारी तीन अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले.

काकडे हे नाशिकच्या पोलिस अकादमीत अप्पर पोलिस अधीक्षकपदावर कार्यरत होते. प्रभारी अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची नियुक्ती कोल्हापुरातील सीआयडीच्या अधीक्षकपदी झाली आहे. बारी यांच्या बदलीने रिक्त असलेल्या गडहिंग्लज विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी श्रीनिवास घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली. घाडगे हे नाशिक येथे प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य पदावर कार्यरत होते. गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालक आला नाही तर वाहकही गैरहजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, को‍‍ल्हापूर

केएमटीमधील चालक व वाहक यांना वेगवेगळी नियमावली लावून मानसिक खच्चीकरण केले जात आहे. तसेच आर्थिक नुकसानही होत असल्याचे पत्रक कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी युनियनने प्रसिद्धीस दिले आहे. सध्या पगार दोन महिने होत नसल्याने केएमटीतील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना या प्रकाराने त्रास होत असल्याने कामावर परिणाम होण्याची शक्यताही संघटनेने व्यक्त केली आहे.

एखाद्या बससाठी वाहक कामावर आला असला मात्र, चालक जर आला नाही तर चालक नाही म्हणून वाहकाला सक्तीने रजा घेऊन घरी पाठवले जाते. चालक नाही म्हणून रजेचा अर्ज दिल्यानंतर गैर टाकून समज दिली जाते. चालक नसेल तर वाहक त्याच्या नियोजित ड्युटीवर हजर असल्यास त्याच्या रजेचा अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. मात्र त्याऐवजी बिनपगारी रजा टाकून कर्मचाऱ्यांचे नुकसान केले जात आहे. दोन महिने उशिरा पगार होत असल्याने कर्मचारी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत या प्रकारामुळे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप युनियनने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखमोलाच्या पदोन्नतीनंतर ‘ब्रेक’

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : पदोन्नतीसाठी २२ जण पात्र असताना ‘लाख’मोलाचे ‘पाकीट’ पोहोच केलेल्या सात शिपायांना थेट अधिकारीपदावर विराजमान केल्याचा आरोप चव्हाट्यावर आला. करवीर पंचायत समितीमधील कर्मचारी आत्महत्येनंतर झालेल्या कर्मचारी आंदोलनात यासंबंधी आरोप थेट आरोप झाले. पाच ते दहा वर्षे नोकरी केलेले कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत तर एक-दोन वर्षे नोकरी केलेले साहेबांच्या जवळे शिपाई मात्र अधिकारी झाले. परिणामी, हे प्रकरण वादग्रस्त बनले. तब्बल दीड वर्षे शिपाई संवर्गातील पदोन्नतीला ब्रेक लागला.

रोष्टर, आस्थापना पॅटर्न बदलल्याने सर्वच संवर्गांची पदोन्नतीची प्रक्रिया रेंगाळली. सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी याची जबाबदारी घेण्याऐवजी बेजबाबदार, दिशाभूल करणारी उत्तरे देत राहिले. अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेतली. त्यांना अडचणी सांगितल्या. तरीही प्रश्न मार्गी लागत नसल्याने संबंधीत कर्मचाऱ्यांसमोर आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न उभा आहे.

सरकारने मे २०१६ मध्ये पदोन्नतीसंबंधी नवा आदेश काढला. त्यानुसार एकूण जागांपैकी ५० टक्के नियुक्त्या सरळसेवा आणि पन्नास टक्के नियुक्त्या पदोन्नतीने करणे बंधनकारक आहे. मात्र, सरकारचे आदेश गुंडाळून ठेवत सोयीनुसार नियमाचा अर्थ काढत जून २०१६ मध्ये शिपाईपदी कार्यरत सात जणांना पदोन्नती देण्यात आली. त्यावेळी २२ जण पात्र असताना ७ जणांनाच पदोन्नती मिळाल्याचे ‘आर्थिक रहस्य’ फार काळ लपून राहिले नाही. जाहीर चर्चा झाल्याने वृत्तपत्रांतून बातम्याही झळकल्या. झालेली चूक दुरूस्त करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच अधिकाऱ्यांकडून टार्गेट करण्याचा प्रकार घडला.

वृत्तपत्रांत माहिती दिल्याचा समज करून घेत सामांन्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी ‌परिचर (शिपाई) संघटनेच्या अध्यक्षांना बोलवून ‘दम’ दिला. ‘मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत कसे प्रमोशन मिळते बघतो’, अशी धमकीही दिल्याची तक्रारही सीईओ डॉ. खेमनार यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी केली होती. त्याचे इतिवृत्तही ‌आहे. मात्र पुढे कार्यवाही झाली नाही. पदोन्नतीच्या रांगेतील उच्च‌शिक्षिताची निम्मी सेवा संपत आली आहे. पदोन्नती न मिळाल्याने त्यांना दरमहा पगारात आर्थिक फटका बसत आहे. वय निघून जात आहे. सर्वच संवर्गांत कमी-अधिक प्रमाणात वशिलेबाजी, पक्षपातीपणा झाल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.


‘सेवा जेष्ठता’ लपवण्याची नामुष्की

पदोन्नतीमधील घोळ झाल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार ‌विस्तार अधिकाऱ्यांना देण्याच्या प्रकरणाची तक्रार आमदार डॉ. सुजीत मिरणचेकर यांनी विधानसभेत केली होती. सरकारने त्यासंबंधी प्रशासनाकडून अहवाल घेतला. त्यामध्ये ‘क्लिनचीट’ दिल्याचा अहवाल दिला गेला. अशाप्रकारे पदोन्नतीमध्ये घोळ झाला. परिणामी प्रशासनावर सेवाजेष्ठता यादी लपवण्याची नामुष्की ओढवली. गेले अनेक महिने ही यादी ऑनलाइन दिसतच नव्हती.


पदोन्नतीची प्रक्रिया वेळच्यावेळी राबवावी, अशा मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र अधिकारी प्रत्येकवेळी विविध कारणे सांगतात. पदोन्नतीमध्ये दिरंगाई झाल्याने कर्मचाऱ्यांत असंतोष आहे. शिपाई संवर्गावर सर्वाधिक अन्याय झाला आहे.

सचिन पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती शाहू टर्मिनन्सचा हायटेक लूक

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर :

गेल्या दहा वर्षांत कोल्हापूर रेल्वेस्थानकाचा विकासाचा वेग वाढला आहे. मात्र येत्या काही दिवसांत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सचा लूक बदलत आहे. आगामी काही दिवसांत लवकरच रेल्वेस्थानकात वाय-फाय, रेल्वे प्रवाशांना राजारामपुरीकडे जाण्यासाठी सरकता जिना, अपंगासाठी रॅम्प या सुविधा उपलब्ध होत आहेत. व्हीआयपी प्रवाशांना आरामदायी प्रतीक्षा रुमसह जनरल वेटिंगरुमचा लूक बदलला आहे. प्रवाशांना मोबाइल चार्जिंगच्या सुविधेसह जनरल तिकीट एक मिनिटांत देण्यास रेल्वेस्थानकात सुरुवात झाली आहे.

सीबीएस परिसरात जेम्सस्टोन व्यापारी संकुलासमोरून राजारामपुरीकडे जाण्यासाठी सध्या रेल्वे रुळ ओलांडून जावे लागते. रेल्वे प्रशासनाने भिंत घालून ही वाट बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यासाठी रेल्वे आणि महापालिका या संयुक्त विद्यमाने फ्लायओव्हर ब्रीजसाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी २० लाखांचा निधी मिळाला आहे. रेल्वेच्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरुन राजारामपुरीकडे जाण्यासाठी सरकता जिना तयार होत आहे. या जिन्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी अपंगासाठी रॅम्प केला आहे. एक्सलव्हेटर आणि पायऱ्या असे दोन्ही पर्याय ठेवले आहे. तिकिटासाठी स्थानकाच्या मुख्य इमारतीकडे न जाण्याऐवजी थेट प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी येथेही तिकीट काउंटर उघडले जात आहे. राजारामपुरीकडून येणारे प्रवासी थेट प्लॅटफॉर्मवर उतरू शकणार आहेत. रेल्वे स्थानकात व्यवस्थापकांच्या कार्यालयाशेजारी व्हीआयपी प्रवासी, रेल्वेचे अधिकाऱ्यांसाठी आरामदायी प्रतीक्षा रुम केली आहे. तर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी येथे रेस्ट हाउस आहे आणि रिझर्वेशन केलेल्या प्रवाशांसाठी जनरल प्रतीक्षा रुमची व्यवस्था केली आहे.

सध्या रेल्वेस्थानकात तीन प्लॅटफॉर्म आहेत. इंजिनसाठी स्वतंत्र लाइन टाकली आहे. त्यासह रेल्वे फाटक क्रमांक एक ते गुडस् मार्केट यार्डाच्या मार्गावर नवीन रेल्वेलाइन टाकण्यात येणार आहे. प्रवाशांना मोफत वायफायची सुविधा १३ जानेवारीपासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. काही प्रवाशांनी स्थानकातून धावणारी रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात जीव गमाविला होता. रेल्वे डब्याची पायरी आणि प्लॅटफॉर्म यामध्ये यापूर्वी सुमारे एक फुटाचे अंतर होते. हे अंतर कमी करुन डब्यातून सुरक्षित उतरता येईल, असे प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले. यापूर्वीची प्लॅटफॉर्मची लांबी २१ डबे थांबण्यासाठीची होती. ही लांबी २४ डबे थांबतील इतकी वाढविली आहे. पर्यायाने दोन जादा डबे प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते तीनपर्यंत सुमारे ७५० मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे.


>>एफओबीसाठी १ कोटी २० लाखांचा निधी

श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरील फ्लायओव्हर ब्रीजसाठी (एफओबी) १ कोटी २० लाखाच्या निधीला जिल्हा नियोजन मंडळाने मंजुरी दिली. हा निधी मंजूर झाल्याने रेल्वेस्थानकावरील पादचारी पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. उर्वरित २५ टक्के निधी महापालिकेने देण्याचे तयारी दर्शविली आहे. गेली सहा वर्षे हा पादचारी पुलाचा प्रश्न रखडला होता. महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून हा पुल बांधला जाईल. रेल्वेकडून तीस दिवसांच्या आत यासाठी मंजुरी घेतली जाणार आहे. हा पूल झाल्यास सध्या रेल्वे फाटक क्रमांक एकमधून धोकादायक पद्धतीने ओलांडला जाणार रुळावरील गर्दी थांबणार आहे. सुमारे १ कोटी ८६ लाखांचा हा निधी या पुलासाठी खर्ची टाकला जात आहेत.


>>वैभववाडी रेल्वे मार्ग

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे या प्रकल्पाचे भूमिपूजनाचे उदघाटन करण्यात आले. यातील कोल्हापूर-वैभववाडी या १०७ किलोमीटर मार्गाला अंतिम मंजुरी मिळाली. रेल्वेमंत्रालयाने या प्रकल्पासह राज्यातील विविध प्रकल्पांसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. कामासाठी जॉईंट व्हेंचरने कंपनी स्थापना केली आहे. या मार्गाचे काम सुरु झाल्याने कोल्हापूर थेट कोकणशी जोडले जाणार आहे. प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीला याचा मोठा फायदा होणार आहे. कोकणाला जोडणाऱ्या या रेल्वेमार्गामुळे भविष्यात रो-रो सेवाही सुरु करण्यात येणार आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गासह हातकणंगले-इचलकरंजी या मार्गाची पाहणी सुरु झाली आहे. त्यासह फलटण-पंढरपूर मार्गांचा समावेश आहे.


>>रेल्वे स्थानकाचे उदघाटन

कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे उदघाटन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते ३ मे १८८८ रोजी झाले होते. कोल्हापूर ते मिरज या मार्गावर पहिली रेल्वे धावली आणि रेल्वे व कोल्हापूरचे नाते अतूट बनले. अन्य प्रवासी वाहतूक सेवेच्या तुलनेत रेल्वेतून हजारो प्रवाशांचा अल्प दरात प्रवास सुरू आहे. कोल्हापूरच्या दळणवळणात रेल्वेसेवा महत्वाची भूमिका बजावित आहे. कोल्हापुरातून गूळ, साखर आणि अन्यधान्याची निर्यात सुरु झाली. प्रवासी वाहतुकीसह रेल्वे गुड्स मार्केटयार्ड स्थापन झाले. आजघडीला दररोज कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकातून ५० हजारांहून अधिक प्रवासी सेवेचा लाभ घेतात.


>>सध्या मिळणाऱ्या सेवा (एक्स्प्रेस)

कोल्हापूर ते हैदराबाद
कोल्हापूर ते मुंबई (कोयना)
कोल्हापूर ते दिल्ली (निजामुद्दीन)- दर मंगळवारी
कोल्हापूर ते नागपूर - सोमवार ते शुक्रवार
कोल्हापूर ते बेंगळूरु (राणीचन्नम्मा)- दररोज
कोल्हापूर ते गोंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस)- दररोज
कोल्हापूर ते अहमदाबाद - दर शनिवारी
कोल्हापूर ते मुंबई (महालक्ष्मी, सह्याद्री)
कोल्हापूर ते धनबाद- दर गुरुवारी
कोल्हापूर ते सोलापूर -दररोज रात्री

>> रेल्वेस्थानकात स्वच्छता आणि प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य दिले जात आहे. पुणे विभागीय कार्यालयाकडून कोल्हापूरचे रेल्वे स्थानक मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. रेल्वेस्थानकाचा लूक बदलला आहे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. गुड्स मार्केट यार्डसह रेल्वे स्थानकासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीतून विकासाची कामे सुरू आहेत.
- शिवनाथ बियाणी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images