Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भिडे गुरुजींच्या समर्थनात सांगलीत रॅली

$
0
0

सांगलीः

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या समर्थनात सांगतील आज रॅली काढण्यात आली. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेशी भिडे गुरुजींचा काहीही संबंध नाही. भिडे गुरुजींवर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा. खोटे आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची चौकशी करावी. तसंच महाराष्ट्र बंदमध्ये तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशा मागण्या या रॅलीतून करण्यात आल्या.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे (गुरुजी) आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या घटनेमागे संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभाजी भिडे यांच्यासह हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची मागणीही आंबेडकर यांनी केली आहे. तसंच आंबेडकरांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद यशस्वी ठरल्याने भिडेंविरोधात कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हुल्लडबाजांची धरपकड सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बुधवारी महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने कोल्हापुरात रस्त्यावर उतरलेल्या हुल्लडबाजांनी प्रचंड प्रमाणात तोडफोड करून दहशत निर्माण केली. या हुल्लडबाजांना अद्दल घडवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात आंबेडकरवादी संघटनांचे प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. दरम्यान, दगडफेकीत जखमी आंदोलक आणि पोलिसांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. १५ जखमींवर सीपीआरसह खासगी रुग्णालयांत उपचार सरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीपीआरमध्ये जखमींची विचारपूस केली.

बंददरम्यान जमावबंदीचा आदेश झुगारून दुकानांसह वाहनांवर दगडफेक करणाऱ्या हुल्लडबाजांची धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्रीपर्यंत शहर-जिल्ह्यातील ५० संशयितांना अटक केली. यात आंबेडकरवादी सघटनांसह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

दरम्यान, गुरुवारी रुकडी आणि हेर्ले येथे पुन्हा आंदोलनाला हिंसक वळण लावले. यात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. सुभाष नामदेव कुरणे (वय ५०) आणि विशाल रघुनाथ जंगले (२४, दोघेही रा. रुकडी) अशी जखमींची नावे आहेत. बुधवारी रात्री झालेल्या दगडफेकीत अविनाश सखाराम कांबळे (२८), अभिजित सुरेश कांबळे (२३), रंगराव आण्णा कांबळे (६०), लक्ष्मण शंकर जाधव (३४, सर्व रा. रुकडी), वैभव हरी पाटील (२२, रा. खोतवाडी), प्रकाश तुकाराम कांबळे (२४, रा. कोतोली, ता. पन्हाळा) या जखमींना समावेश आहे. बुधवारी दाखल केलेल्या जखमींची प्रकृती सुधारली असून, गुरुवारी दुपारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

गुन्हे दाखल झालेल्यांची नावे

सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पोलिसांनी केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या पुराव्यांनुसार रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे (रा. कोल्हापूर), जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (रा. कागल), अनिल म्हमाणे (रा. उमा टॉकीज), दत्ता मिसाळ (रा. वाशी), बाजीराव नाईक (शिवाजी पेठ), शेखर सनदी (सदर बझार), सुभाष देसाई, विश्वासराव देशमुख (दोघे रा. कोल्हापूर), अविनाश शिंदे (रा. गडमुडशिंगी), सोमनाथ घोडेरा, गुणवंत नागटिळे, सुखदेव बुध्दीहाळकर (तिघे रा. राजेंद्रनगर), सखाराम कामत (रा. शिये, ता. करवीर), दगडू भास्कर (रा. कुडित्रे, ता. करवीर), सुशील कोल्हटकर, सुरक्षा सोहणी, वसंत लिंगनुरकर, अमित शिर्के (तिघे रा. सिध्दार्थनगर), बाळासाहेब भोसले (रा. राजारामपुरी), नीलेश बनसोडे, मोहन सनदे (दोघे, रा. विचारेमाळ), वर्षा संजय कांबळे (रा. कसबा बावडा), विकी कांबळे (सुभाषरोड), बबन सावंत (कनाननगर), जितू कांबळे (गडमुडशिंगी), श्रीमंत कांबळे, सागर कांबळे, सद्दाम रज्जाक महाराज, लखन कांबळे (सर्व. रा. गांधीनगर), सतीश माळगे (रा. उचगाव), अंकुश वराळे (रा. वळीवडे), नितीन पोवार, अक्षय चव्हाण, विनायक कुंभार, शुभम माजगावकर, सतीश माजगावकर, प्रतीक वाडेकर, युवराज गवई, सुमित ब्रम्हपुरे, आकाश माजगावकर, सागर ब्रम्हपुरे, सुरक्षा सोहनी यांच्यासह १५०० कार्यकर्त्यांवर दरोडा (तलम ३९५), बेकायदा जमाव (१४३), घातक हत्यार घेऊन फिरणे (१४७-१४८), विनापरवानगी रस्ता अडवणे (३४१), तोडफोड (४२७), जमाबबंदी आदेशाचा भंग करणे (१३५), सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे (१८४) आदी गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत.

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल

बिंदू चौकात दुचाकींची तोडफोड करणे आणि सिध्दार्थनगर कमानीजवळ एकत्र येऊन गोंधळ घालत दगडफेक केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल केले आहेत. तानाजी पाटील, अमर झाड, विजय करजगार, शिवानंद स्वामी, गणेश देसाई, सुमित चौगुले, केदार भुर्के, सागर साळोखे, शरद माळी यांच्यासह पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आदी गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिस ठाणेनिहाय

दाखल गुन्हे



शाहूपुरी



लक्ष्मीपुरी



जुना राजवाडा



राजारामपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाच्या निष्क्रियतेनेच तोडफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

‘शहरात मोठ्या संख्येने मोर्चा निघणार असताना प्रशासनाने खबरदारी म्हणून काहीच उपाययोजना केली नाही. प्रशासनाच्या निष्क्रीयपणा, निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली’, असा आरोप शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. कालच्या बंद आंदोलनावेळी आंबेडकरी संघटनांनी काढलेला मोर्चा, त्यानंतरच्या दगडफेकीच्या प्रकारात शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले. नुकसान झालेल्या ​भागात आमदार क्षीरसागर यांनी गुरुवारी सकाळी भेट दिली. त्यानंतर सायंकाळी त्यांची पत्रकार परिषद झाला. यावेळी ‘सरकारने मदतीची केवळ घोषणा करण्यापेक्षा तातडीने पंचनामा करून आठ दिवसांत मदतीचे चेक दिले पाहिजेत’, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘शहरात मोर्चा काढल्यानंतर जे मोडतोडीचे, दगडफेकीचे प्रकार झाले, त्यामध्ये स्थानिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी नव्हते. एखाद्या संघटनेचा कार्यकर्ता असल्यास नेत्यांनी थांबण्यास सांगितल्यानंतर पुढे जाणार नाहीत. त्यामुळे दोन समाजात वितुष्ट आणण्यासाठी समाजकंटकांनीच फोडाफोडी केली. या दहशतीला चाप बसवण्यासाठी व शहरवासियांचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. लोकप्रतिनिधी म्हणून शहरवासियांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य समजतो. सामान्यांचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांना आवरण्यासाठी व नागरिकांना धीर देण्यासाठी शहरातून रॅली काढली. ही रॅली कोणाच्या समाजाच्या विरोधात नव्हती तर समाजकंटकांकडून सुरू असलेली दहशत थांबवण्यासाठी होती. कोणत्याही एका पक्षाची, संघटनेची ही रॅली नव्हती. ज्यांचे नुकसान झाले ते सर्व शहरवासिय रॅलीत सहभागी झाले होते.’

‘अंधाधुंदपणे फोडाफोडी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा. निष्क्रिय प्रशासनासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा. तसेच नुकसान भरपाई तातडीने द्यावी’, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत असे सांगून आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘जातीय सलोखा टिकवण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शाहू महाराजांच्या नगरीचा इतिहास पाहता मनामध्ये अढी न ठेवता सर्वांनी मिळून एकत्रित वाटचाल करावी. प्रशासनानेही अपप्रवृत्तींना वेळीच लगाम घालण्यासाठी कार्यपद्धती सुधारावी.’

यावेळी रवीकिरण इंगवले, उदय पोवार, किशोर घाटगे, उदय भोसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजारावर गुन्हे दाखल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंबेडकरवादी संघटनांच्या बंददरम्यान बुधवारी जिल्ह्यात दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या दोन्ही बाजूच्या दोन हजारांवर हुल्लडबाजांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातील ५० संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांची धरपकड सुरू आहे. दरम्यान, रुकडीत दुसऱ्या दिवशीही दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना सुरू राहिल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

बुधवारी बंददरम्यान शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको, दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केल्यानंतरही जमाव एकत्र करून दहशत माजवण्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही हुल्लडबाजांनी दगडफेक कली. यातील नुकसानीला जबाबदार धरून पोलिसांनी हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यात ५०० हून अधिक हुल्लडबाजांवर दंगल माजवणे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. यात आंबेकरवादी संघटनांसह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अटक केलेल्या हुल्लडबाजांमध्ये रुकडीतील ३५ संशयितांचा समावेश आहे. शहरात शाहूपुरी पोलिसांनी ५ संशयितांना अटक केली आहे. गुरुवारी रात्रीपासून शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे.

बंददरम्यान पोलिसांनी आंदोलकांचे चित्रीकरण केले आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज घेतले जात आहे. त्याची तपासणी करून संशयितांची ओळख पटवणे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटकेची प्रक्रिया सुरू आहे. हुल्लडबाजांची गय केली जाणार नाही. दगडफेक करणाऱ्या सर्व संशयितांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. नागरिकांकडे दगडफेक आणि जाळपोळीचे चित्रीकरण असेल तर त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना चित्रीकरण देऊन मदत करावी. सर्व हुल्लडबाजांवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

दरम्यान, रुकडी येथे सलग दुसऱ्या दिवशी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. बुधवारी रात्री पोलिसांनी दोन्ही गटाच्या प्रमुखांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. बंदोबस्तातही वाढ केली होती. मात्र आवाहन झुगारून गुरुवारी पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आल्याने जाळपोळीच्या घटना घडल्या. यात दोन्ही गटातील दहाहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांपैकी आठ जणांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. रुकडीत पोलिसांसह एसआरपीच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. शिवाय हेर्ले गावातही दगडफेक झाल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.


रुकडीत संचारबंदी लागू

बुधवारी दुपारपासूनच रुकडी येथे तणाव होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास दोन गट आमनेसामने आले. जोरदार दगडफेक आणि जाळपोळीने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला. मात्र संतप्त जमाव पुन्हा एकवटला. पोलिसांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी जाळपोळ सुरू केली. गुरुवारी सकाळी पुन्हा दगडफेक आणि जाळपोळ झाली. त्यामुळे पोलिस अधीक्षक संजय माहिते यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने रुकडीत संचारबंदी लागू केली. उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी गुरुवारी रात्रीपर्यंत ३५ हुल्लडबाजांना अटक केली होती. रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरकरांच्या दातृत्वाने ‘ती’ भारावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

जेव्हा माणुसकीवर हल्ला होतो, तेव्हा समाजाच्या चांगुलपणाच्या आधारावर अनेक मोडलेली माणसे पुन्हा उभी राहतात. कितीही अनिष्ट प्रवृत्तींचा दबदबा असला तरी समाजातील अनेकजण माणूसपण जपत असल्याने संतुलन टिकून असते. अशाच दातृत्वाच्या अनुभवाने शोभा गायकवाड या महिलेचा मोडलेला संसार पुन्हा उभा राहिला.

कोरेगाव भीमा प्रकरणी झालेल्या आंदोलनाचा तीव्र फटका कोल्हापूर शहराला बसला. दिवसभर दंगलसदृष्य वातावरण असल्याने भीतीची छाया पसरली होती. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर काही समाजकंटकांनी रस्त्यावर दिसेल त्या प्रत्येक वस्तूंची तोडफोड सुरु केली. यात रस्त्यालगत उभा केलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. काही ठिकाणी घरांच्या, हॉस्पिटल्सच्या, बंद दुकाने, शोरुम्सच्या काचांवर दगडफेक करण्यात आली. यातच रेल्वे स्थानक परिसरात शोभा गायकवाड यांची असलेली अंडाभुर्जीची गाडी आंदोलकांनी उलथून टाकली. यात त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या गाडीच्या आणि छोट्या पानटपरीच्या जीवावर त्यांचा संसारगाडा चालत असल्याने त्या हतबल झाल्या. नवऱ्याचा अकाली झालेला मृत्यू आणि पदरात असलेली दोन मुले यांची जबाबदारी शोभा यांच्यावरच आहे. कोल्हापूर बंद असल्याने त्यांनी टपरी न उघडण्याचा निर्णय घेतला होता. पण व्यवसायासाठी आणलेली अंडी मात्र त्यांनी गाड्यातच ठेवली होती. समाजकंटकांनी उलटवलेल्या गाडीखाली त्यांनी खरेदी केलेली अंडी, चहाचे ग्लास, कपबशी, गॅस सिलेंडर आणि नव्या बॅटरीचे नुकसान झाले.

अत्यंत विमनस्क परिस्थितीत मोडतोड झालेल्या गाड्याशेजारी डोक्याला हात लावून बसलेले गायकवाड कुटुंबियाचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाल्यावर त्यांना मदत करायला अनेक हात पुढे सरसावले. ठाण्यातील महेश जाधव यांनी श्रीमती गायकवाड यांना रोख ५ हजार रुपये देत पुन्हा उभा राहण्याची उमेद दिली. युवा सेनेच्या गणी आजरेकर, हर्षल सुर्वे, स्वप्नील पार्टे, अश्पाक आजरेकर, महेश उरसाल, बंडा साळोखे, अजिंक्य पाटील, शाकीर शेख यांनी मोडतोड झालेले सर्व साहित्य देत त्यांचा गाडा पुन्हा उभा केला. अशा प्रकारे नुकसान झालेल्यांनी संपर्क करण्याचे आवाहन युवा सेनेकडून करण्यात आले आहे.

मदतीसाठी मुस्लिम बोर्डिंग दसरा चौक, शिवसेना कार्यालय शनिवार पेठ, अजिंक्यतारा कार्यालय ताराबाई पार्क, बजरंग दल शाखा, युनिक मेडिकल महाद्वार रोड, कोल्हापूर प्रेस क्लब दसरा चौक येथे मदत केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

नुसते लढ म्हणा...

कसुमाग्रजांनी लिहीलेल्या 'कणा' या कवितेतल्या, ‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा’ या ओळी अशा कठीण प्रसंगात आठवत राहतात. संसारगाडा पुन्हा उभा राहिल्याने श्रीमती गायकवाड यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण हास्य होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदमुंळे सहा कोटींचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्याने शहराला मोठी किंमत मोजावी लागली. बुधवारी दिवसभर शहरातील सर्वच बाजापरेठा बंद होत्या. याशिवाय सहाशेहून अधिक वाहने आणि इमारतींवर झालेल्या दगडफेकीत सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. अजून दोन दिवस हे काम सुरू राहण्याची शक्यता आहे, मात्र पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार बंदमुळे शहराला अंदाजे सहा कोटींचा फटका बसला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दूचाकी आणि चारचाकींची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाल्याने त्याचाही फटका बसला आहे.
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी सघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरातील विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता. बुधवारी सकाळपासूनच प्रमुख बाजारपेठातील दुकाने बंद होती. नागरिक घरांमध्ये थांबले होते. आंदोलकांनी मात्र बंद दुकानांसह रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांना लक्ष्य केले. अर्वाच्च्य शिवीगाळ करीत नागरिकांना त्रास दिल्याने याचा थेट फटका सर्वामान्यांना बसला. गुरुवारी दिवसभर पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार देण्यासाठी नागरिकांची वर्दळ सुरू होती. विशेषतः जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात मोठ्या संखेने फिर्यादी दाखल झाल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. आणखी दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे. आंदोलकांनी काही बंद दुकानांमध्ये जबरदस्तीने घुसून लूट केली. घराच्या पार्किंगमधील वाहनेही फोडली आहेत. याशिवाय बंदमुळे शहरातील रिक्षा वाहतूक, भाजी मंडई, सर्व हॉटेल्स, मॉल्स, व्यापारी संकुलही ठप्प राहिले. यात हातावरील पोट असलेल्या नागरिकांचे मोठे हाल झाले.

वाहनांचा चक्काचूर
हौशी कोल्हापूरकरांना वाहनांचे वेड आहे. प्रत्येकाच्या दारात एक, दोन वाहन उभे असतेच. रस्त्याकडेलाही वाहनांच्या रांगा असतात. अभिमानाने मिरवली जाणारी वाहनेच बंदमध्ये आंदोलकांच्या रडारवर होती. शिवाजी रोड, गुजरी, स्टेशन रोड आणि शाहूपुरीत दिसणारे प्रत्येक वाहन आंदोलकांनी फोडले. झेंड्याच्या काठ्या आणि हाताला लागतील ते दगड वाहनांवर फेकले. सर्व काचा फोडून हुल्लडबाज आंदोलक सैरावैरा पळत होते. संभाजीनगर चौक आणि शेंडापार्क परिसरातही अशीच स्थिती होती. यात सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काचा फुटलेल्या इमारतींचा बेसूर चेहरा
शहरात प्रमुख मार्गांवर फेरफटका मारल्यास बंदमुळे झालेल्या नुकसानीचा सहज अंदाज येतो. बहुतांश काचेच्या इमारतींवर दगड पडले आहेत. स्टेशन रोडवर लिशा हॉटेल चौकापासून सुरू झालेले तोडफोडीचे सत्र सीपीआर चौकापर्यंत कायम होते. नुकतेच नुतणीकरण केलेली गोकुळ हॉटेलची इमारत, व्हिनस कॉर्नरच्या मोठ्या शोरुम्स, यासह हॉटेल्स आणि किरकोळ विक्रेत्यांची दुकानेही सुटलेली नाहीत. पद्मा चौक ते बिंदू चौक मार्गावरील एसएस कम्युनिकेशनच्या इमारतीवर बंदचे मोठे फलक लावले आहेत, तरीही आंदोलकांनी इमारतीच्या काचा फोडून लाखो रुपयांचे नुकसान केले. प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक इमारतीखाली काचांचा खच पडला आहे. शिवाजी रोड परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अपवादालाही काचा फुटलेली इमारत शिल्लक राहिलेली नाही. काही बंद दुकानांच्या शटरवरही दगडफेक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान केले. यात सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बाजारपेठेची उलाढाल ठप्प
बंदमुळे शहरातील सर्व दुकाने दिवसभरात उघडलीच नाहीत. गुजरी, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, उद्यमनगर यासह गांधीनगरची व्यापारपेठही बंद होती. सर्वच हॉटेल्स बंद राहिली. रात्रीपर्यंत शहरात रिक्षा आणि वडापच्या जीपही सुरू नव्हत्या. नागरिकांना पायपीट करत जावे लागले. दगडफेकीच्या भीतीने रुग्णालये, मेडिकल अशा अत्यावश्यक सुविधाही बंद होत्या. शहरातील एकाही मंडईत व्यवहार सुरू नव्हते. काही ठिकाणी अर्धवट उघडलेल्या दुकानांमध्ये आंदोलकांनी लूटमार केली. हिंसक बंदमुळे पर्यटकांनीही बाहेरूनच पुढे जाणे पसंत केले. हजारो पर्यटकांना शहरात येताच आले नाही, त्यामुळे हॉटेल्स, लॉजिंगवरही याचा मोठा परिणाम झाला. सुमारे चार कोटींहून अधिक उलाढाल ठप्प झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय दगडफेकीत जखमी झालेल्या नागरिकांनाही खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

सार्वजनिक वाहनांनाही केले लक्ष्य
केएमटीच्या बसेस दसरा चौकात लावल्या होत्या. याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही काही एसटी थांबवल्या होत्या. आंदोलकांनी दहशत माजवण्यासाठी जाणीवपूर्वक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर हल्लाबोल केला. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या घटनांमध्ये एसटीचे सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले आहे, तर केएमटीचे केवळ तोडफोडीमुळेच २५ लाखांचे नुकसान झाले. याशिवाय वाहतूक बंद असल्याने १० लाखांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. घरातून बाहेर पडण्यासही लोक घाबरत आहेत. ही धास्ती कोल्हापूरच्या प्रतिमेला आणि सामाजिक स्वास्थ्याला बाधक ठरणारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा पक्ष्यांसाठी हॉटस्पॉटच

$
0
0


mahesh.patil@timesgroup.com

Tweet@:MaheshpMT

कोल्हापूर ः समस्त कोल्हापूरवासीयांच्या जिव्हाळ्याचा ऐतिहासिक आणि कोल्हापूरचे वैभव म्हणून ओळखला जाणारा रंकाळा तलाव पक्षीप्रेमींसाठी नंदनवनच आहे. पक्षी आणि जैवविविधतेचे हे वैभव टिकून असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून हौशी पक्षी निरीक्षकांनी केलेल्या निरीक्षणात रंकाळ्यावर १०५ प्रजातींचे पक्षी नोंदवले गेले आहेत. त्यापैकी २७ पक्षी विदेशाहून येणारे पाहुणे पक्षी आहेत. लेखक आणि हौशी पक्षी निरीक्षक हिमांशू स्मार्त आणि सतपाल गंगलमाले यांनी केलेल्या निरीक्षणातून नेहमी आढळणाऱ्या पक्ष्यांबरोबरच ‘आयएनसीएन’ने नष्ट होण्याच्या मार्गावर म्हणून नोंदविलेला ‘सर्पमुखी’ या पक्ष्याचीही नोंद येथे झाली आहे.

कोल्हापूर हे एकेकाळी तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जायचे. कोल्हापुरात लहान-मोठी २४ तळी होती. वाढत्या नागरीकरणात बरेच तलाव काळाच्या ओघात लुप्त झाले. आजघडीला रंकाळा, कळंबा, राजाराम, कोटीतीर्थ असे मोजकेच तलाव शिल्लक आहेत. त्यापैकी रंकाळा पक्ष्यांसाठी अद्याप हॉटस्पॉटच असल्याचे दिसून आले आहे. जैवविविधतेने समृद्ध रंकाळा तलाव म्हणजे आनंदाचा ठेवा आहे. तलावावर स्थानिक, स्थलांतरित व आंतरराष्ट्रीय स्थलांतर करून अनेक पक्षी येतात. वाढत्या प्रदूषणामुळे तलावातील जैवविविधतेवर परिणामही झाला आहे. तरीही तलावाने समृद्धी जपली आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात स्थलांतरित पक्ष्यांचा येथे वावर असतो.

येथील रंगकर्मी, लेखक प्रा. हिमांशू स्मार्त आणि त्यांचे सहकारी सतपाल गंगलमाले यांनी गेल्या तीन वर्षांपासून तलाव परिसरातील पक्षीवैभवाच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यांनी तलाव परिसरात १०५ प्रजातींचे पक्षी नोंदवले आहेत. त्यापैकी २७ पक्षी विदेशातून येणारे स्थलांतरित पक्षी आहेत. त्यामध्ये कॉमन पोचार्ड, नकटा बदक, मोठा रंगीत पाणलाव, थापट्या बदक, गढवाल बदक, भुवई बदक, बेल्लॉनची फटाकडी यांचा समावेश आहे. तलावावर विणीच्या काळात विलक्षण बदलणारा गळाबंद पाणलाव (Ruff) हाही दिसून आला. सोनपंखी कमळपक्षी बराच काळ रंकाळ्यावर दिसतो. कैकर (Osprey) आणि दलदल हरीण (Eastern Mars Harrier) हे मोठे शिकारी पक्षीही सध्या रंकाळ्यावर आले आहेत, असे निरीक्षण प्रा. स्मार्त यांनी नोंदवले आहे.

याशिवाय गेल्या दोन वर्षांपासून रंकाळा तलावावर चक्रवाक पक्षीही दिसत आहेत. परताळा परिसरात लाल तापसाचे निवासस्थान आहे. तिथे Changable Hawk Eagle दिसतो. गोल्डन ओरीऑल, शिक्रा, पावशा, शिपाई बुलबुल, सोनपंखी कमळपक्षी, मोर शराटी, युरेशियन चमचे, रंगीत करकोचा, स्वरल हे नेहमी आढळणारे काही पक्षीही दिसतात. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) सर्पमुखी अर्थात Oriental darter या पक्ष्याची नोंद नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांच्या यादीत केली आहे. हा पक्षीही गेल्यावर्षी रंकाळ्यावर नोंदवला गेला. शिवाय, शेकाट्या, वारकरी, पाणडुबी, जांभळी पाणकोंबडी, काळी पाणकोंबडी, टिटवी, आदी अनेक पक्षी तलावावर वीण करतात याची नोंद अभ्यासात झाली आहे. हे पक्षीवैभव जपण्याची गरज असल्याचे स्मार्त यांनी सांगितले.

पक्ष्यांची चोरटी शिकार

बांधकाम व अन्य कामांसाठी येणारे मजूर अंघोळ आणि विश्रांती यासाठी रंकाळा तलावाचा आसरा घेतात. मात्र, अनेकदा त्यांच्याकडून पक्ष्यांची शिकार केली जात असल्याचे आढळून आले आहे असे हौशी पक्षी अभ्यासक सतपाल गंगलमाले यांनी सांगितले. विणीच्या हंगामात अनेकदा पक्ष्यांच्या अंड्यांची नासधूसही केली जाते. यावर आळा घालण्याची गरज असल्याचे गंगलमाले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ सांगलीत मोर्चा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

कोरेगाव भीमा येथील घटनेशी संभाजी भिडे यांचा दुरान्वयेही संबंध नाही. कुणीतरी जाणीवपूर्वक तेढ निर्माण करुन पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकाश आंबेडकर कोणत्याही पुराव्यांशिवाय भिडे यांच्यावर आरोप करत सुटले आहेत. भिडेंवरील गुन्हा मागे घ्यावा आणि सांगली बंद काळात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करुन झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करावी, दंगलीमागील सूत्रधार भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड यांसारख्या संघटनांची चौकशी करावी, अशी मागणी करत शिवप्रतिष्ठानच्यावतीने गुरुवारी सांगलीत मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मोर्चाच्यावतीने प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांच्याकडून निवेदन स्वीकारले.

कोरेगाव भीमा येथील घटनेशी भिडे यांचा संबंध नाही. त्यांचे नाव नाहक गोवले जात आहे. काही देशविघातक आणि जातीयवादी शक्तींनी भिडे यांना त्यात गोवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप निवेदनात केला आहे.

बंदकाळात हुल्लडबाजांनी प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे या षड्‍यंत्राची सखोल चौकशी करावी, हुल्लडबाजांवर कारवाई करावी. या सर्व घडामोडींमागचे सूत्रधार भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, कबीर कलामंच, बामसेफ आदींसह यामध्ये सहभागी संघटनांची सखोल चौकशी करुन कडक कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर भिडे त्या ठिकाणी आले. यावेळी जिल्हाधिकारी विजय काळम यांनी वस्तूस्थिती आम्ही समोर आणू, असे सांगितले तर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी ज्यांनी काही ठिकाणी दंगलीचे स्वरुप आणून मालमत्तेचे नुकसान केले आहे. त्यांपैकी काही गुन्हे दाखल झाले आहेत. कुणाचीही गय केली जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. ही समिती योग्य ती चौकशी करून कारवाईची शिफारस करेल, असे स्पष्ट केले.

आरोप निराधार ः भिडे

दरम्यान, प्रत्येकाने भारतमातेचे ऋण फेडण्याचे कर्तव्य बजावावे, यासाठी राष्ट्रजागृती करणारे आम्ही लोक आहोत. प्रकाश आंबेडकरांनी अत्यंत निराधार आरोप करुन माझ्या अटकेची मागणी केली आहे, असे पत्रक शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. मला याकूब मेमनची वाट दाखवावी, अशी आंबेडकर यांची मागणी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या घटनेची म्हणजेच बनावाची खोलात जाऊन चौकशी करावी, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही भिडे यांनी पत्रकात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांधीनगरात २९ दुकाने लुटली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कसबा बावडा

गांधीनगरातील लोहिया मार्केटमध्ये गुरुवारी पहाटे चार ते सात चोरट्यांनी २९ दुकाने फोडून धुमाकूळ घातला. त्यातील सतरा दुकानांतील दहा लाखांची रोकड लंपास केली. बारा दुकानांचे शटर उचकटले. तेथील वॉचमनला मारहाण करुन चोरी करण्यात आली. चोरीचा प्रकार समजताच र पोलिस घटनास्थळी आले. मात्र चोरट्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली आणि ते पळून गेले. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या लुटीमुळे गांधीनगरातील व्यापाऱ्यांत घबराट पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी मार्केटमध्ये प्रवेश केला. तेथील वॉचमन महेश ठाकूर ( रा. सध्या गांधीनगर, मूळ गाव नेपाळ ) याला दोघा चोरट्यांनी पकडून काठीने मारहाण केली. त्याला धमकावत चोरट्यांच्या टोळीने एकापाठोपाठ २९ दुकानांची शटर उचकटून लाखोंची रोकड लांबवली. मेन रोडवरील एका दुकानाचे शटर उचकटल्याचे एका व्यक्तीस आढळून आल्यानंतर त्यांनी एसएच फॅशनच्या मालकास फोन करून माहिती दिली. साधारण पावणेचारच्या सुमारास ते दुकानात आले. त्यांनी लगेच गांधीनगर पोलिसांना कळवले.

पोलिस उपनिरीक्षक अंजली फाळके, हवालदार एस. टी. खंदाळे, बालाजी हांगे, डी. एम. माळवी घटनास्थळी पोहचले. त्यांनी फॅशन दुकानाची पाहणी केली. त्यावेळी पलिकडील बाजूस आणखी शटर उचकटल्याचा आवाज येताच ते मेन रोडवरून पलीकडे गेले. चोरट्यांना ही चाहूल लागताच त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरवात केली. परिसरात अंधार असल्यामुळे पोलिस रोडवरच थांबले. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी रेल्वेलाइनच्या बाजूने पलायन केले. सुरेश जीवनलाल टेहल्याणी यांनी लोहिया मार्केटमध्ये २९ दुकानांत चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे.

आमदार अमल महाडिक, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार, अकोलकर फरार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल असलेले संशयित विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) आणि सारंग दिलीप अकोलकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी गुरुवारी (ता. ४) फरार घोषित केले. सरकारी वकिलांनी संशयितांना फरार घोषित करण्याची मागणी केली होती. न्यायालयीन कोठडीतील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडेच्या जामीन अर्जावर १९ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

कॉ. पानसरे हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी पवार आणि अकोलकर यांना अजामीनपात्र वॉरंट लागू केले आहे. अटक टाळण्यासाठी ते पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या दोघांना फरार उद्घोषित करावे, तसेच हे दोघे पोलिसांत हजर न झाल्यास त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळावी, अशीही विनंती सरकार पक्षातर्फे केली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांनी संशयित पवार व अकोलकर यांना फरार घोषित करीत त्यांची छायाचित्रे भित्तीपत्रकावर प्रसिद्ध करण्यास मंजुरी दिली.

दरम्यान, सीआयडी अटकेतील डॉ. वीरेंद्रसिंह तावडेच्या जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजीराव राणे यांनी म्हणणे सादर केले. पानसरे यांच्या हत्येमध्ये या पवार, अकोलकर या दोघांसह समीर गायकवाड व डॉ. वीरेंद्र तावडे यांचा मुख्य सहभाग आहे. याचे सबळ पुरावे पोलिसांनी पुरवणी दोषारोपपत्राद्वारे कोर्टात सादर केले आहेत. त्यामुळे तावडेचा जामीन फेटाळावा, अशी विनंती त्यांनी केली.

दोन्ही वकिलांचे म्हणणे ऐकून न्यायाधीश बिले यांनी पुढील सुनावणी १९ जानेवारीला होईल असे सांगितले. आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी उमा पानसरे, मेघा पानसरे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करणारा अर्ज सादर केला आहे. त्यावर म्हणणे सादर करताना अॅड. राणे म्हणाले, ‘मालमत्तेची चौकशी हा तपासाचा भाग नाही. पोलिसांनी कशा पध्दतीने तपास करावा हे आरोपीला सांगण्याचा अधिकारही नाही. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास केला आहे. तो न्यायालयात सादरही केला आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळून लावावा,’ अशी विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरात पाकीटमारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या खिशातील एक लाख सहा हजार रुपये असलेले पाकीट अज्ञात चोरट्याने लंपास केले. सोमवारी (ता. १) रात्री हा प्रकार घडला. अरुण सुखदेव मुदगुलकर (वय ३७, रा. आंबाजोगाई, जि. बीड) यांनी याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अंबाबाईचे दर्शन घेऊन पितळी उंबऱ्याच्या बाहेर येण्यापूर्वीच मुदगुलकर यांच्या खिशातील पाकीट गायब झाले. गाभाऱ्यात पोलिस असतानाही चोरीचे प्रकार घडत असल्याने भाविकांनी चिंता व्यक्त केली आहे.
आंबाजोगाई येथील अरुण मुदगुलकर हे सोमवारी कुटुंबासह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ते मंदिरात गेले. पावणेदहाला ते गाभाऱ्यात पोहोचले. दर्शन घेताना त्यांनी पँटच्या खिशातील पाकीट काढून त्यातील दोनशे रुपये देवीला अर्पण केले. यानंतर पुन्हा पाकीट पँटच्या खिशात ठेवून ते गाभाऱ्यातून बाहेर येत होते. पितळी उंबऱ्याजवळ येताच त्यांना खिशात पाकीट नसल्याचे लक्षात आले. पाकीट खिशात नसल्याची खात्री होताच त्यांनी शोधाशोध सुरू केली, मात्र पाकीट सापडले नाही. त्यांनी आसपासच्या भाविकांकडेही विचारणा केली. यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयात जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र गर्दीत चोरटे लक्षात आले नाहीत.
चोरट्यांनी मुदगुलकर यांच्या पाकीटातील १ लाख ६ हजार रुपये अवघ्या एका मिनिटात लंपास केले. यात २ हजार रुपयांच्या ४९ नोटा आणि ५०० रुपयांच्या १६ नोटा होत्या. मुदगुलकर यांनी याबाबत बुधवारी रात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मंदिराच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू केली आहे.
वाढत्या चोऱ्यांमुळे भाविक हैराण
अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या संखेने वाढली आहे. वाढत्या गर्दीचा गैरफायदा चोरटे घेत आहेत. महिलांची पर्स, भाविकांचे पाकीट क्षणात गायब केले जाते. विशेष म्हणजे गाभाऱ्यासह मंदिर परिसरातही सीसीटीव्ही आहे. गाभाऱ्यात सतत पोलिस बंदोबस्त तैनात असतो. देवस्थान समितीचे खासगी सुरक्षा रक्षकही गाभाऱ्यात आहेत. सुरक्षा व्यवस्था भक्कम असूनही चोरटे हातोहात किमती ऐवज लंपास करतात, त्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा कधी? एअर डेक्कनला अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या विमानसेवा सुरू करण्यासाठी नव्या वर्षातही अद्याप मुहूर्त ठरलेला नाही. एअर डेक्कनने कंपनीने विमानसेवा सुरू करण्यासाठी कालमर्यांदा द्यावी. अन्यथा अन्य विमानकंपनीला सेवा करण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू झाला आहे. दरम्यान कोल्हापूरसह जळगाव येथील विमानसेवा एअर इंडिया कंपनीसोबत चर्चा सुरू केली आहे. येत्या आठवडाभरात एअर डेक्कनला अल्टिमेटम देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोल्हापुरातून एअर डेक्कन कंपनीचे १८ सीटर विमान मंगळवारी, बुधवारी आणि रविवारी टेक ऑफ करणार असल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेतून ही सेवा सुरू होणार आहे. राज्य सरकारने कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा २५ डिसेंबरला सुरू होईल, अशी घोषणा केली होती. मात्र नव्या वर्षाची सुरुवात होऊनही विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात ठोस निर्णय झालेला नाही. पहिल्या टप्प्यात विमानसेवा देणाऱ्या एअर डेक्कनच्या व्यवस्थापनाने आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्याची मागणी केली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सहा दिवसांचा टाइम स्लॉट देण्याच्या मागणीला होकारही दर्शविला आहे. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीके कंपनीनेही टाइम स्लॉट देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र अद्याप विमान कंपनी आणि विमानसेवा यासंदर्भात ठोस निर्णय झालेला नाही.

या संदर्भात एअर डेक्कन कंपनीने विमानसेवा सुरू करण्यासाठी डिपॉझिट भरले आहे. मात्र विमानाचे इंधन भरण्यासाठी फ्युअर टँकसह १८ सीटर विमाने उपलब्ध नसल्याचे समजते. त्यामुळे प्रत्यक्षात विमानसेवा सुरु करता येणे शक्य नाही. या संदर्भात या विमान कंपनीला अल्टिमेटम दिला जाणार आहे. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या कालावधीत विमानसेवा सुरू झाली नसल्यास कारणे दाखवा नोटीस बजावून ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. चोबे यांनी एअर इंडिया कंपनीसोबत चर्चा सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि विकृतीला बसला चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अटकाव करण्यास कुणी नेता नाही, पोलिसांचीही सावध भूमिका यामुळे बंदचे आवाहन करत फिरणाऱ्या आंदोलकांना मोकळे रानच मिळाले होते. बेभान झालेल्या जमावाकडून विकृतपणाचा कळस गाठला गेला होता. या जमावाला कुणी रोखण्यास पुढे आलेच नव्हते. त्यामुळे वाहनांच्या नुकसानीबरोबर आणखी वेगळाच विकृतपणा केला जाण्याचा धोका दिसू लागल्यानंतरच शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर तसेच इतर हिंदुत्ववादी नेते रस्त्यावर उतरले. हुल्लडबाजांसाठी इशारा दिल्यानंतर मुख्यत्वे शाहूपुरी परिसरात सुरू असलेला आंदोलकांचा नंगानाच थांबला. आणखी काही वेळ गेला असता तर शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहूपुरीत नामुष्कीजनक इतिहास घडला असता.
सकाळी बंदचे आवाहन करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीनंतर आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे गट अनेक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर पडले. दसरा चौक परिसरातील व कावळा नाका परिसरातून येणाऱ्या जमावाने स्टेशन रोड व शाहूपुरी टार्गेट केले होते. रस्त्यावर उभ्या केलेली जी काही दुचाकी व चारचाकी वाहने होती, त्यांना रस्त्यावर आडवे करून दगडाने ठेचल्यासारखा प्रकार केला जात होता. यातून विकृत आनंद आंदोलकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांच्यातील काही नेते दगड मारु नका, असे सांगण्यास पुढे जात होते, पण त्यांचे कोणीही ऐकत नव्हते. यातूनही आंदोलकांच्या या कृत्याला पाठिंबा आहे की काय असेच सूचित होत होते. यामुळे अक्षरश‍ः आंदोलक मोकाट सुटले होते. आंदोलकांच्या या प्रकाराने शाहूपुरीत धुडगूस घालण्यास सुरुवात केला होता. काही युवक बंद असलेल्या दुकानांवर दगडफेक करत होते. तर काही हॉटेल व शोरुम्समध्ये जाऊन तेथील कर्मचारी, नागरिकांना धक्काबुक्की करत होते. शाहूपुरीत अनेक बँक व दुकाने आहेत. तिथे मोठ्या प्रमाणावर नागरिक आले होते. त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर होती. तर काहींच्या घरांच्या दारात वाहने उभी करून ठेवली होती. त्यांच्यावर दगडफेक करुन विकृतपणाचा कळस केला.
यापुढे जाऊन अनेक दुकानांमध्ये घुसण्याचा प्रकार होऊ लागल्यानंतर काही नागरिक, स्थानिक नगरसेवक राहुल चव्हाण यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना संपर्क साधला. त्यानंतर आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी एकवटले. शिवाजी चौकातून बिंदू चौकात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी हुल्लडबाज आंदोलकांना इशारा देण्यासाठी बिंदू चौकातील वाहनांची मोडतोड करण्यास सुरुवात केली. त्याला आमदार क्षीरसागर व इतर कार्यकर्त्यांनी अटकाव केला. केवळ हुल्लडबाज आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी व निषेध करण्यासाठी ही रॅली काढली जात असल्याचे सांगून नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आमदार क्षीरसागर रस्त्यावर उतरल्यानंतर व्यापरी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले. नासधूस थांबवण्यास कुणी तरी येत आहे ही भावनाच गुजरी, शिवाजी रोड, व्हीनस कॉर्नर परिसर, शाहूपुरी या भागातील नागरिकही यात सहभागी झाले. आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकही रस्त्यावर उतरल्यानंतर हुल्लडबाज पळून गेले. अनेक कार्यकर्ते झेंडे खिशात घालून पळून गेले.

विचारसरणी कुठे गेली?
शाहू महाराजांनी मागास समाजाला जशी उभारी देण्यासाठी प्रयत्न केले. तसेच शहराच्या विकासातील व्यापार हे एक अंग असून शहराला व्यापाराचे केंद्र बनवण्यासाठीही प्रयत्न केले. त्यातूनच गुळाची बाजारपेठ उभी करण्यासाठी शाहूपुरी स्थापन केली. या शाहूपुरीत अनेक व्यापाऱ्यांना संधी दिली. शाहू महाराजांच्या प्रयत्नातून उभ्या केलेल्या शाहूपुरीतच आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून घातला गेलेला नंगानाच पाहता नेमक्या कोणत्या विचारसरणीचा अवलंब केला जात होता की विचारसरणी खुंटीला टांगून ठेवली गेली आहे हे आता नेत्यांनी तपासण्याची गरज आहे. ज्या शाहू महाराजांचे नाव घेऊन त्यांच्या समतेच्या शिकवणीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या मार्गावर हा प्रकार बसूच शकत नाही. मग ज्यांनी हे प्रकार केले, त्यांना एकतर या शिकवणीशी देणेघेणे नाही किंवा या शिकवणीचे बाळकडू नेत्यांकडूनच दिले जात नाही, असे दोनच अर्थ लावले जाऊ शकतात. सीपीआर चौकाकडून सिद्धार्थनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहू महाराजांच्या समाधीसमोरच दोन गटात मोठी धुमश्चक्री झाली.

महिला तरुणींना शिविगाळ
बंदचे आवाहन करणाऱ्या तरुणांनी महिला, तरुणींनी अर्वाच्य शिविगाळ केली. महाद्वार रोडवर दर्शनासाठी आलेल्या पर्यटक महिलांना मारहाण केल्याचे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. संभाजीनगरजवळ दोन तरुणींना शिविगाळ होत असताना काही तरुणांनी त्यांना सुरक्षित जागी नेऊन सोडले. ज्या महापुरुषांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी आयुष्य खर्ची घातले, त्यांच्या विचारांनाच हारताळ फासल्याचे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हीच्या माध्यमातून हुल्ल्डबाज शोधणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेफ सिटीच्या माध्यमातून शहरातील चौकाचौकात लावलेल्या सीसीटीव्हीमधील फुटेजवरुन पोलिस हल्लेखोरांचा शोध घेणार आहेत. तसेच विविध संस्था, व्यापारी संस्था आणि सोशल मीडियावर मिळालेल्या व्हिडिओ क्लिप्सही तपासल्या जाणार आहेत. कोल्हापुरात सेफ सिटीच्या माध्यमातून महानगरपालिकेने ६५ ठिकाणी १६५ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यांचा वापर हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी होणार आहे.

शहरातील बिंदू चौक, भवानी मंडप, महाद्वार रोड, कावळा नाका, राजारामपुरी, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस टॉकीज, उमा टॉकीज, मिरजकर तिकटी, रंकाळा तलाव परिसरासह महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्हींचा नियंत्रण कक्ष पोलिस मुख्यालयात आहे. बुधवारी कोल्हापुरात उसळलेल्या हिंसक घटनेची दृष्ये थेट सीसीटीव्हीमधील नियंत्रण कक्षात दिसत होती. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हिंसक घटनांवेळी बंदमधील आंदोलकांतील काहीजणांकडून हुल्लडबाजी, त्यांची दगडफेक रेकॉर्ड झाली आहे. वाहनांची तोडफाड, कार्यकर्त्यांना मारहाण, दगडफेक, शिविगाळ, आक्षेपार्ह घोषणा देणारी दृष्ये सीसीटीव्हीत आढळून आली आहेत. तसेच व्यापारी वस्तीतील लुटालुटीचे प्रसंगही टिपले गेले आहेत. सीपीआर चौकात पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सुरवातीला अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असला तरी सीसीटीव्हीची मदत घेऊन हुल्लडबाजांना शोधण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

शहरातील सीपीआर चौक, बिंदू चौक, शाहूपुरी, स्टेशन रोड, मिरजकर तिकटी, शिवाजी चौक, गुजरी आणि महानगरपालिका या ठिकाणी झालेल्या दंग्याच्या घटनांकडे पोलिसांनी लक्ष दिले आहेत. गुजरीत सीसीटीव्ही यंत्रणा नसली तरी अनेक दुकानांत सीसीटीव्ही बसवले गेले आहेत. त्यांचे फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गुजरी आणि शिवाजी रोडवरील दुकानदार, व्यापाऱ्यांनी पोलिसांना सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. सीपीआर चौकात धुमश्चक्री उडाल्याने सेफसिटीतील कॅमेरे आणि हॉस्पिटलमधील कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. शाहूपुरीतील व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज देण्याची तयारी दर्शवली आहे. बिंदू चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या काहींनी मोबाईलवर शूटिंग करून ते व्हायरल केले. अशा व्हायरल झालेल्या ​क्लिप जमवण्यात येत आहेत. सीसीटीव्हीवरील प्रत्येक चित्रणाची योग्य छाननी करुन हल्लेखोर, हुल्लडबाजांची यादी बनवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

६५ ठिकाणी १६५ कॅमेरे

सेफ सिटीअंतर्गत शहरात सध्या ६५ महत्त्वाच्या ठिकाणी १६५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यातील ११६ कॅमेरे स्थिर आहेत. ३२ कॅमेरे १८० अंशात फिरणारे, तर १७ कॅमेरे ३६० अंशात फिरणारे आहेत. या कॅमेऱ्यांमुळे बिंदू चौक, भवानी मंडप, महाद्वार रोड, कावळा नाका, राजारामपुरी, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, उमा टॉकीज चौक, मिरजकर तिकटी, रंकाळा आदी महत्त्वाच्या परिसरावर २४ तास नजर आहे.

मोबाईल इंटरनेट बंदचा फज्जा

जिल्हा प्रशासनाने तीन जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत मोबाइल इंटरनेटवर बंदी घातली होती. पण या बंदीचा फज्जा उडाला. गुरुवारी दिवसभर मोबाइलवर इंटरनेट सुरू होते. दुपारनंतर काही काळच मोबाइलवरील इंटरनेट बंद राहिले. दुपारी एक ते चार याकाळात काही कंपन्यांनी इंटरनेट बंद केले. त्यामुळे जिल्हा प्रशासन अशा मोबाइल कंपन्यांवर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.


पोलिस हुल्लडबाज आणि दंगेखोरांचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेत आहेत. ज्या व्यक्तींचे नुकसान झाले, त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडियावरील शूटिंग असेल तर त्यांनी ते संबधित पोलिस ठाण्याला द्यावे. त्यामुळे खऱ्या संशयितांपर्यंत पोहोचता येईल. तसेच पुरावा म्हणून त्याचा उपयोग होईल.

डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उप अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगल घडविणाऱ्यांचा पर्दाफाश करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘समाजकंटकांनी राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत जे काही केले, ते चिंतानजक आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशा प्रकारांतून समाजात विद्वेष पसरवणाऱ्यांना सोडणार नाही. दंगल करणाऱ्यांना ज्यांनी पैसा, काठ्या, दगड, पेट्रोल पुरवले, त्यांचा पर्दापाश केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी निवडणुकांमध्ये लढावे’, असे जाहीर आव्हान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले. याचवेळी ‘सीसीटीव्ही आणि मोबाईलमधील फुटेजमध्ये जे जे दोषी आढळतील, त्यांच्यावर खटले दाखल करून अटकेची कारवाई होईल. पोलिस कोठडी आणि नुकसानभरपाई वसूल करण्याची कारवाई केली जाईल. ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकारकडून नुकसानभरपाई देऊ. त्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत’ असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

बुधवारी शहरातील बंदला लागलेल्या हिंसक वळणानंतर नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी ​पोलिस मुख्यालयात चर्चा करुन आढावा घेतला. त्यानंतर पाटील यांची पत्रकार परिषद झाली.

पालकमंत्री म्हणाले, ‘सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त ज्या नागरिकांनी मोबाइल वा अन्य माध्यमांतून हिंसक घटनांचे ​चित्रीकरण केले आहे, त्यांचे फुटेजही पोलिस मिळवत आहेत. नागरिकांनी फुटेज पोलिस मुख्यालयात एका अधिकाऱ्याकडे सोपवावे. त्याची गोपनीयता राखली जाईल. हे सर्व पाहून जे दोषी असतील, ते कोणत्याही राजकीय पक्षाचे, संघटनांचे असले तरी त्वरीत खटले दाखल करण्यात येतील. दंगेखोरांना अटक होईल, पोलिस कोठडीत रवानगी गेली जाईल. त्यांनी जे नुकसान केले आहे, त्याची भरपाई त्यांच्याकडून करुन घेतली जाईल. ही प्रक्रिया सुरू असताना अनेक सामान्य नागरिकांचे मदतीअभावी हाल होऊ नयेत यासाठी सरकारकडून पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रक्रिया राबवण्याचेही आदेश दिले आहेत. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांना भरपाई मिळेल. कुणीही वगळले जाणार नाही.’

जखमींनाही मदत देणार

‘बंदच्या कालावधीत झालेल्या हिंसक प्रकारांमुळे जे जखमी झाले आहेत. त्यांनाही सरकारच्यावतीने मदत केली जाणार आहे’, असे सांगत पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘पोलिसांबरोबर नागरिकही जखमी आहेत. त्यांच्या उपचारांचा खर्च सरकार करणार आहे. जर काहींवर मुंबईत उपचार करावे लागले तर तेही करू.

खपवून घेणार नाही

‘शाहू महाराजांनी कोल्हापूला दोन्ही हातांनी द्यायला शिकवले आहे. त्यानुसार सर्वांना मदत केली जाणार आहे. जिल्ह्याच्या इतिहासात कधीही जातीय, धार्मिक तेढ निर्माण झाली नाही. या संघटनांनी पुकारलेल्या बंदला कुणाचाच विरोध नव्हता. मात्र, समाजकंटकांनी त्यात हात धुवून घेतले’ असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘बंद दुकाने, वाहने फोडली. शाहू महाराजांच्या नगरीत राजकीय स्वार्थासाठी झालेली घटना दुखदायक आहे. प्रतिमोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी कमी कुमक असताना शांततेने परिस्थिती हाताळली. संख्या कमी असताना पोलिसांना कारवाई करणे शक्य नव्हते. त्यामुळे कुमक मिळाल्यानंतर त्यांनी सर्वांना हटवले. कुणीही कायदा हातात घ्यावा, हे खपवून घेतले जाणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोरेगाव भीमा हिंसेचे आरोप निराधार: भिडे

$
0
0

सांगली:
कोरेगाव भीमा येथे दंगल, हिंसाचार घडवल्याचा करण्यात आलेला आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी फेटाळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या बीजमंत्रांच्या आधारावर आम्ही राष्ट्रजागृतीचे काम करतो. हिंसाचाराच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव भीमा हिंसाचार भडकावल्याचा आरोप संभाजी भिडेंवर करण्यात येत आहे. त्यांच्यावर औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेची काहीही माझा संबंध नाही, असे भिडे यांनी पत्रक काढून स्पष्ट केले आहे. ''कोरेगाव भीमामधील हिंसाचाराला मी कारणीभूत आहे, असा आरोप करत आंबेडकरांनी माझ्या अटकेची मागणी केली आहे. पण त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुकडीत तीन दिवस संचारबंदी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी, हुपरी

कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर रुकडी (ता. हातकणंगले) येथे दोन गटात तेढ निर्माण होऊन जोरदार दगडफेक व जाळपोळीचे प्रकार घडले. गुरुवारी पोलिसांनी दोन्ही गटात समझोता घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरु केली. यामध्ये पोलिस निरिक्षकासह चार पोलिस जखमी झाले. परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने दुपारी एक वाजता तीन दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली. जलद कृती दलासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने रुकडीला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिनेश बारी रुकडीत तळ ठोकून आहेत. सायंकाळनंतर धरपकड करत पोलिसांनी दोन्ही गटातील ३६ जणांना ताब्यात घेतले आहे.

कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एक जानेवारी रोजी अलोट गर्दी झाली होती. या कार्यक्रमानंतर सणसवाडी परिसरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक व जाळपोळ झाली. दगडफेकीत जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतरत्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे बुधवारी रात्री दोत गटात धुमश्चक्री उडाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने वादाला तोंड फुटले. यावेळी पंचगंगा चौकातील डिजीटल फलक फाडण्यात आले. त्यानंतर मोठी दंगल उसळून एका जमावाने छत्रपती शिवाजी चौकातील काही दुकानांवर दगडफेक करुन तोडफोड सुरु केली. तसेच काही दुकानांना आगी लावण्यात आल्या. वाहनांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करुन नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची कुमक रुकडीत दाखल झाली. पोलिसांनी दोन्ही जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. जमाव नियंत्रणात येत नसल्याने अखेर सौम्य लाठीमार करण्यात आला. रात्रभर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. रात्री जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, अप्पर पोलिस अधिकारी डॉ दिनेश बारी रुकडीस भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

गुरुवारी सकाळी दोन्ही गटात समझोता घडवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक बारी यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या. गंजीमाळ याठिकाणी गावातील प्रमुख व्यक्तींची बैठक घेतली. त्यानंतर दलित समाजाची समाज मंदिरात बैठक घेतली. यामध्ये पोलिसांनी दोन्ही गटांना केलेल्या शांततेचे आवाहनला प्रतिसाद मिळाला असताना पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आल्याने वादाची ठिणगी पडली. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरु असतानाच अचानकपणे दगडफेक सुरु झाली. यामध्ये वडगांवचे पोलिस निरिक्षक यशवंत गवारे यांच्यासह प्रकाश कांबळे, आनंदा कदम, वैभव पाटील, महादेव रसाळ हे पोलिस कर्मचारी जखमी झाले. संतप्त जमावाकडून घरांसह दवाखाने, वाहनांसह अन्य ठिकाणी जोरदार दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणाखाली येत नसल्याने अखेर तीन दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करत सायंकाळपर्यंत दोन्ही गटातील ३६ जणांना ताब्यात घेतले. दुपारनंतर जलद कृतीदलासह राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली. संपूर्ण गावाला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले असून संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने कोणीही घरातून बाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलिस वाहने भागाभागात फिरत होती. संचारबंदीमुळे पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवता आले. दंगल घडविणार्यांचा पोलिसांची पथके शोध घेत असून अन्य काहीजणांना रात्री उशीरापर्यंत ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

अत्यावश्यक सेवा ठप्प

रुकडी येथे संचारबंदी लागू करण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दूध, औषधे आदींसह जीवनावश्यक वस्तूंसह अत्यावश्यक सेवा ठप्प झाली आहे. शेतीच्या कामासाठी घराबाहेर पडलेल्यांना संचारबंदीची माहिती नसल्याने घरी परतत असताना त्रास सोसावा लागला. तर पोलिसांनीही माहिती नसलेल्या नागरिकांना संचारबंदी विषयक सांगत घरी जाण्याचा सल्ला दिला. ही संचारबंदी आणखी दोन दिवस राहणार असल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

जिल्ह्यात दुसऱ्यांदा संचारबंदी

सन २००९ मध्ये मिरज येथे झालेल्या जातीय दंगलीचे मोठे पडसाद इचलकरंजीत उमटले होते. मोठ्या प्रमाणात जाळपोळ, लुटालूट आदीसह परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू लागल्याने पोलिस प्रशासनाने इचलकरंजीत ११ दिवसांची संचारबंदी लागू केली होती. इचलकरंजीपाठोपाठ ९ वर्षानंतर रुकडी येथे संचारबंदी लागू करण्यात आली. ही कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ हिंसाचारामागे सत्तेचे भुकेलेशिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा आरोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘कोरेगाव भीमा येथील हिंसाचारामागे सर्व पक्षातील सत्तेचे भुकेले आहेत. सीबीआयच काय यम अध्यक्ष असलेल्या समितीसमोर चौकशी करावी. दोषी असल्यास मला देहान्ताची शिक्षा द्यावी,’ अशी प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी येथे केली.
कोरेगाव भीमा येथील हिंसाचारामागे भिडे आणि मिलिंद एकबोटे असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भिडे यांनी येथे भूमिका मांडली.
भिडे म्हणाले, ‘साडेतीन वर्षांत मी कोरेगाव भीमाला गेलो नाही. तेथे भाषण केले नाही. असे असताना मला हिंसाचारासाठी दोषी ठरविणे म्हणजे न जन्मलेल्या बाळाच्या बारशाची तयारी करण्यासारखे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरज आहे. वढू बुद्रुक येथे संभाजी भिडे यांचे भाषण होणार, अशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर झाली होती. ती कोणी शेअर केली, याचा तपास झाला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचा बोलविता धनी कोण आहे. त्यांना भिडे, एकबोटे ही नावे कोणी सांगितली, याची चौकशी झाली पाहिजे. कोणी खगोलशास्त्रज्ञ अमावस्येच्या मध्यरात्री बारा वाजता मी पूर्वेला सूर्य पाहिला, असे सांगत असेल आणि ते सत्य असेल तर तितकेच सत्य माझ्यावरील आरोपात असेल.’
‘तीन वर्षांत वढू परिसरात मी फिरकलो नसतानाही फिर्यादी साबळे वहिनी भिडे गुरुजींना दगड मारताना पाहिले असल्याचे सांगत असतील तर तेथील सीसीटीव्ही तपासावेत. अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर सुरू आहे. एका विशिष्ट गटाला अ‍ॅट्रॉसिटीचा अधिकार देऊन लोकशाही आणि घटनेचा अवमान केला आहे,’ अशी टीकाही भिडे यांनी केली.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी केलेल्या पाठराखणीबाबत भिडे म्हणाले, ‘उदयनराजेंच्या धमन्यांत वाहणारे रक्त शिवाजी, संभाजी महाराजांचे आहे, याचा पुन्हा पुरावा म्हणजे माझी केलेली पाठराखण.’
भिडे म्हणाले, सत्ता गेल्याने दुःखी झालेल्यांनी माझ्याविरोधात रचलेले हे कारस्थान आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन त्यांनीच पेटवले. मराठ्यांनाही आरक्षण द्या, पण त्यासाठी उद्रेक होऊन सत्तेवर बसलेल्यांनी सिंहासन सोडावे, असे म्हणण्यामागे सत्तेची पिसाट भूकच आहे. लिंगायत हा स्वतंत्र धर्म ही टूमही त्याचाच भाग आहे. हिंदू धर्माचे तुकडे करून सत्ता बळकावण्याचा त्यांचा कावा आहे. या सगळ्यामागे सत्तापिपासूंची कौरवबुद्धी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निपाणीत कडकडीत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी
कोरेगाव भीमा येथील घटनेचा तीव्र निषेध निपाणीवासीयांनी नोंदवला. सर्वांनी आपले व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय जनतेने रस्त्यावर उतरुन मोर्चाद्वारे सरकारला निवेदन सादर करून दोषींवर कारवाईची मागणी केली.
कोरेगाव भीमा येथे काही समाजकंटकानी जातीय दंगल घडवून आणली. या घटनेचा महाराष्ट्रात तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी निपाणी बंदची हाक देण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिक्षाचालक, व्यावसायिकांसह सर्वांनीच आपले व्यवहार आणि व्यवसाय बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नेते, कार्यकर्ते आणि नागरींकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लोकमान्य टिळक उद्यानासमोरील सरकारी विश्रामगृहामध्ये मोर्चाने येत आंदोलकांनी अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, पंकज पाटील, लक्ष्मण चिंगळे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, दंगल, जाळपोळ, मारहाण असे चुकीचे मार्ग न अवलंबता निपाणीवासीयांनी अत्यंत शांततेत बंद पाळला. निपाणी आगाराची वाहतूक ठप्प होती. आगाराते सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी भिडे समर्थकांचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कोरेगाव भीमा प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्त येथील संभाजी भिडे समर्थकांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर केले.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रणेते संभाजी भिडे यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप धादांत खोटे आहेत. महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांमध्ये चालू असणारे शिवप्रतिष्ठानचे उदात्त कार्य खंडित करून संघटनेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा संबंधितांचा कुटील डाव असल्याचा आरोप करीत या प्रकरणाबाबत तीव्र निषेध नोंदवण्यासाठी भिडे समर्थकांनी मोर्चा काढला. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवप्रतिष्ठानच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमले होते. त्यानंतर दत्त चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत निषेध पदयात्रा काढून निवेदन देण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी निवेदन स्वीकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images