Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापूर बसस्थानकातूनएसटीची १५ लाखांची रोकड लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर एसटी बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटीमधून बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन चाललेल्या १४ लाख ७६ हजार ११६ रुपयांची रोख रक्कम असलेली पेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही रक्कम एसटीचीच होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एसटी बसस्थानकात दुसऱ्या मजल्यावर कॅशियर रूम आहे. शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जमा झालेली १४ लाख ७६ हजार ११६ रुपयांची रक्कम पेटीमध्ये घेऊन कॅशियर विवेक भास्कर देशपांडे जिन्यावरून खाली उतरले आणि त्यांनी बसस्थानकात उभ्या असलेल्या एम एच ४० एन ९५००, या रिकाम्या बसमध्ये पैशाची पेटी ठेऊन ते बसस्थानकात एंट्री करायला गेलेल्या गाडीचे चालक अजमोद्दीन तालिकोटी याची वाट पाहत उभे होते. ही रक्कम देशपांडे बाळीवेस येथील स्टेट बँकेत जमा करण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी कॅशियर देशपांडे यांची नजर चुकवून ड्रायव्हरच्या केबिनमधून १४ लाख ७६ हजार ११६ रुपयांची रक्कम असलेली पेटी घेऊन पोबारा केला.
दरम्यान, एसटीमध्ये पैश्याची पेटी नसल्याचे लक्षात येताच देशपांडे यांनी धावपळ सुरू केली. मात्र, चोरटा कोठेही दिसून आला नाही. तातडीने आगार व्यवस्थापकांनी ही घटना फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना सांगितली. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले आणि उपायुक्त अपर्णा गीते घटनास्थळावर दाखल झाले. एसटीचे चालक तालिकोटी आणि कॅशियर देशपांडे यांच्याकडून घटनेची माहिती घेऊन पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर
दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटले
सोलापूर -हातामध्ये धारधार शस्त्रे घेऊन आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दहशत निर्माण करून वाहनातून लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून नेले. वाहनातील प्रवाशांना मारहाण करून लुटल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांची ही टोळी हातात शस्त्रे घेऊन थांबली होती. रात्री बारानंतर टोळीने वाहने अडवून, प्रवाशांना मारहाण करून रोख रक्कम, दागिने, मोबाइल हिसकावून घेतले. दरोडेखोरांनी मारहाण करताना लहान मुलांनाही सोडले नाही. यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. स्कार्पिओ, इनोव्हा, अल्टो या वाहनांबरोबरच दोन लक्झरी बसेसची या दरोडेखोरांनी अडवून लुटल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी प्रवाशांनी कुर्डुवाडी पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली.
कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर रिधोरे गावानजीक आरडा पूल आहे. या पुलावर गतिरोधक असून, येथे वाहनांचा वेग कमी होतो. याची संधी साधत दरोडेखोरांनी लूटमार केली. या घटनेबाबत प्रवाशांनी फिर्यादी दिल्या आहेत. पोलिस निरीक्षक आय. डी. ओमासे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निविदेसाठी बनावट कागदपत्रे

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

जयसिंगपूर शहरातील भुयारी गटार योजनेची निविदा मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी बेंगळूरु येथील केबीआर इन्फ्राटेक कंपनीसह ११ जणांविरोधात पालिकेचे नगर अभियंता नंदकुमार पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमध्ये प्रामुख्याने भाजपचे जयसिंगपूर शहराध्यक्ष मिलिंद भिडे, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे राज्याध्यक्ष फारुख पठाण, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमित ऊर्फ बंटी शहा यांचा समावेश आहे.

वरील तिघांसह केबीआर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कोंडरू बाबू राजू, संचालक कोंडुरू राजेश्वरी, राजू मडीराजू सुंदर (तिघेही रा. बेंगळूरु), संचालक नरसा रेड्डी, दोंती रेड्डी (दोघे रा. हैद्राबाद), राजू मुल्ला (रा. दिल्ली), शकील दस्तगीर गैबान, विजय राऊत (सर्व रा. जयसिंगपूर), तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोल्हापूर व इचलकरंजी या कार्यालयातील गोपनीय कागदपत्रे हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांतून मिळाल्या माहितीनुसार, जयसिंगपूर पालिकेने महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजनेसाठी या वर्षीच्या सुरुवातीलाच निविदा मागविल्या होत्या. बेंगळूरु येथील केबीआर इन्फ्राटेकच्या सहाजणांनी ही निविदा मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. शासकीय कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून प्रमाणकात बदल केला व बनावट दस्तऐवज तयार केले. मूळ नोटरीवर शकील गैबान व राजू मुल्ला यांनी कंपनीच्यावतीने खोटी सही करून त्या नोटरीत बदल केला. त्यांनी ही नोटरी निविदेच्या संकेतस्थळावर अपलोड केली.

निविदा प्रक्रियेत एकाही मक्तेदाराविरुद्ध कोणाचीही तक्रार पालिकेकडे नव्हती. कागदपत्रांच्या तपासणीकरिता पालिकेने ती कोल्हापूर, सांगली व इचलकरंजी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयांकडे पाठविली. यानंतर सर्व गोपनीय कागदपत्रे हस्तगत करून मिलिंद भिडे, विजय राऊत, अमित शहा, फारुख पठाण यांनी फेरनिविदा काढावी, तांत्रिक मूल्यांकन करावे यासाठी पत्रव्यवहार केला. विजय राऊत, मिलिंद भिडे यांनी निविदेमधील प्राप्त गोपनीय कागदपत्रांच्या संदर्भात तक्रार केली. त्यामुळे त्यांनी शासकीय गोपनीय कागदपत्रे हस्तगत केल्याचे निदर्शनास येते. शासकीय कागदपत्रांची गोपनीयता भंग करणे, गोपनीय कागदपत्रे प्राप्त करून त्या आधारे तक्रारी अर्ज देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नगर अभियंता नंदकुमार पवार यांनी फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणि पोलिसांनी दिली नुकसानभरपाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल
कोगनोळी नाका ओलांडून वाहनधारक आले की त्यांना अडवायचे आणि कागदपत्रांची मागणी करून तर कधी किरकोळ त्रुटी काढून दंड वसूल करण्याचे काम सध्या हाय वे पोलिस प्रामाणिकपणे करत आहेत. या प्रामाणिक वाहनतपासणीचा आणखी एक नमुना गेल्या आठ दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. वाहनांच्या तपासणीमुळे हायवेवर वाहनांची रांग लागत असून आठ दिवसांपुर्वी कर्नाटकची बस वाहतूक कोंडीमुळे थांबली असता एक कार येवून धडकली. कारचालक आणि बसचालकाने पोलिसांना धारेवर धरले असता पोलिसांनी बसचालकाची समजूत काढली तर कारचालकाला नुकसानभरपाई करून देण्याचे आश्वासन दिले. पोलिसांच्या या प्रामाणिकपणांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. पण, त्यासाठी पैसे कुठून आणणार हे मात्र पोलिसांनी उघड केले नाही.
बेंगळुरू-पुणे महामार्गावर कोगनोळी टोलनाका ओलांडला की चारचाकी वाहनधारकांना सात ते आठ हायवे पोलिस लाल रंगाचे जाकिट घालून उभे असलेले दिसतात. एका ओळीने वाहनधारकांना उभे करून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली जाते. जोपर्यंत वाहनांची तपासणी सुरू असते तोपर्यंत वाहने ये जा करत असतात. तपासणी झाली की पुन्हा दुसरा ताफा थांबविला जातो. अशी ही कसून तपासणी केली जाते. एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी कंबर कसली असून यामुळे हायवेवरील अपघातांचे प्रमाण, बेदरकारपणे वाहन चा‌लविण्याचे प्रमाण, वाहतूक कोंडीचे प्रमाण घटल्याचा साक्षात्कार या महामार्गावरून महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना होत आहे.
आठ दिवसांपुर्वी या वाहनतपासणीमुळे कर्नाटक बस थांबली असता पाठीमागून आलेल्या आलिशान कारने जोराची धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे संतप्त झालेल्या कारचालक आणि बसचालकाने पोलिसांना धारेवर धरत अपघाताला जबाबदार धरले. कायद्याची भाषा बोलल्यानंतर पोलिसांनी बसचालकाला कसेबसे मार्गस्थ केले. तर कारचे मोठे नुकसान झाल्यामुळे कारचालक नुकसानभरपाईसाठी आग्रही होता. अखेर पोलिसांनी या कारचालकाला बाजूला घेऊन नुकसानभरपाई देण्याचे कबूल केले. वाटाघाटी केल्यानंतर कारचालक मार्गस्थ झाला. पण कारचालकाला दिलेली नुकसानभरपाई कोणत्या ‘हेड’खाली दिली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. या अपघाताची आणि नंतरच्या वाटाघाटींची सध्या चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजी पालिका पाळणार गायी

$
0
0

म. टा. वृतसेवा, इचलकरंजी

शहरात मोकाट गायींचा प्रश्न गंभीर होत असल्याने इचलकरंजी नगरपालिकेने या गायींचे संगोपन करण्याचा निर्णय शनिवारच्या सर्वसाधारण सभेत घेतला. सभागृहात हा विषय चर्चेला आल्यानंतर काही नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेत गायींचे मालक असताना नगरपालिकेवर भुर्दंड का? असा सवाल केला. मात्र, सत्ताधारी गटाने बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर करून घेतला. अतिक्रमण करुन व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवर केल्या जाणाऱ्या दंडात्मक कारवाईवरुन नगरपालिकेच्या सर्वसाधारणसभेत अधिकारी व नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.

विविध २१ विषय व ऐनवेळचे पाच अशा एकूण २६ विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या प्रारंभी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी विषयपत्रिकेवर इतिवृत्त कायम केल्याचा विषय घेतला नसल्यामुळे आजची सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. गेल्या वर्षभरात आठ ते १० सभेचे इतिवृत्त मंजूर केले नसून मंजूर केलेल्या विषयांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे का? असा सवाल उपस्थित केला. यावर संतप्त झालेल्या सभाध्यक्षा स्वामी यांनी सर्व ठराव पूर्ण लिहून ठेवले आहे. त्यामध्ये काहीच अपूर्ण नसल्याने बदल्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे स्पष्ट करुन पुढील सभेवेळी इतिवृत्त कायम करण्याचा विषय घेतला जाईल. असे स्पष्ट केले.

दिवसेदिवस गंभीर होत चालल्याने मोकाट गायींचा प्रश्न सभागृतहा उपस्थित झाल्यानंतर त्यावर चर्चा करण्यत आली. पालिकेमार्फत गाईचे संगोपन करण्याचा विषय चर्चेला आल्यानंतर शशांक बावचकर, विठ्ठल चोपडे यांनी मोकाट गाईचे मालक असून त्यावर पालिकेने अनावश्यक खर्च करू नये, अशी मागणी करून शहरात मोकाट फिरणाऱ्या गाईची संख्या २०० पर्यंत आहे. एका गायीला वर्षाला ७० हजार खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे २०० गायींना एक कोटी ४० लाख रूपये खर्च करावे लागणार असल्याने अन्य बाबींचा विचार करावा, अशी मागणी केली. चर्चेअंती पालिकेमार्फत शेड बांधून गाईचे संगोपन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. चर्चेत तानाजी पोवार,अजित जाधव,मदन झोरे,रवींद्र माने,नितीन जांभळे तर विरोधी नगरसेवक संजय कांबळे,काँग्रेस पक्षप्रतोद सुनील पाटील, उदयसिंग पाटील आदींनी भाग घेतला.

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवर आक्षेप

अतिक्रमण विरोधात करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाई विरोधात भाजपाचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी आक्षेप घेत सभागृहात केलेल्या ठरावाचा चुकीचा अर्थ लावून छोट्या-छोट्या व्यावसायिकाकडून १५०० रूपये दंड वसूल करीत आहे. त्यामुळे गरीब कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे वर्गवारी करून दंडाची कारवाई करावी, यावर शशांक बावचकर, विठ्ठल चोपडे, राजू बोंद्रे आदींनी अतिक्रमण कारवाईबाबत अधिकाऱ्याना चांगलेच धारेवर धरत बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांना पाठीशी का घालत आहे, असा सवाल उपस्थित केला.

तर विविध कामांच्या निविदा २०११ ते २०१५ या कालावधीतील दोन कोटी ४६ लाख ९६ हजार ८०८ रूपयांची बिले अदा करणे, नगराध्यक्षांनी दिलेल्या आदेशांना कार्योत्तर मंजुरी देणे आदी विषयावर सत्तारुढ व विरोधी नगरसेवकांमध्ये चांगलीच वादळी चर्चा झाली. अखेर या विषयांवर मतदान करून सत्तारूढ गटाने बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. चिमण लोकूरयांचे निधन

$
0
0

मिरज :
समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रसिद्ध वकील अॅड. परसराम राघवेंद्र उर्फ चिमण लोकूर (वय ८२) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी ते निगडीत होते. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचे नेत्रदान व देहदान करण्यात आले. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबीयानी मिरज सरकारी हॉस्पिटलमध्ये नेत्रदान व देहदान केले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
अॅड. चिमण लोकूर मुळचे कुरुंदवाड येथील. त्यांचे वडील राघवेंद्र लोकूर कुरुंदवाड संस्थानात इन्स्पेक्टर होते. चिमण लोकूर लहानपणापासून राष्ट्रसेवा दलाशी निगडीत होते. आपले सारे आयुष्य त्यांनी कष्टकरी, कामगारांच्या चळवळी, पुरोगामी चळवळीसाठी वाहून घेतले होते. खादीचे कपडे हाच त्यांचा पेहराव असे. मिरज आणि सांगलीतील नागरी प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा पुढाकार असे. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते सहभागी झाले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला होता.
मिरज रेल्वे जंक्शन, सरकारी रुग्णालयात, एस. टी. डेपो यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी आमदार डॉ. एन. आर. पाठक यांच्या बरोबर सहभाग घेतला. जनता दलाचे ते अनेक वर्षे पदाधिकारी होते. अंबाबाई तालिम संस्था, मिरज विद्यार्थी संघ, रोटरी क्लब, यशवंत शिक्षण संस्था, वकील संघटना, अशा अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था व संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. लोकूर ट्रस्टची स्थापना करून त्यामाध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी त्यांनी वकिली केली. अखेरपर्यंत त्यांचा पुरोगामी चळवळीशी संबंध होता. या वेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील, हाफीज धत्तुरे, मकरंद देशपांडे, सुभाष कुलकर्णी, सदाशिव मगदूम, अॅड. अमित शिंदे दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, स्वातंत्र सैनिक माधवराव माने, डॉ. बाबुराव गुरव , शिवाजीराव पाटील यांनीही श्रद्धांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कर्मयोगी पुरस्कार’‘रयत’ला जाहीर

$
0
0

सांगली :
समाजाच्या विविध क्षेत्रात अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या आणि समाज परिवर्तनाच्या लढाईत मोलाच्या योगदानाबद्दल प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्या वतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी पुरस्कार’ यंदा शिक्षण क्षेत्रात लाखमोलाचे योगदान असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला जाहीर झाला आहे.
१४ जानेवारी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव बी. आर. थोर यांनी दिली. एक लाख रूपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासोबत फोरमच्या वतीने संस्थेतील आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ‘माई’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी शिक्षक संवर्गातून बिसूर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तानाजी दत्तात्रय पाटील यांची तर शिक्षकेत्तर संवर्गातून कलाविश्व महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वरीष्ठ लिपिक शामराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल अप्पासाहेब पाटील पुरस्कार स्वीकारणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताकारी, टेंभू, म्हैसाळचीथकीत पाणीपट्टी १३० कोटींवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी तब्बल १३० कोटींवर गेली आहे. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वेळोवेळी भरली जात नसल्याने ६६ कोटींचे वीजबील थकित असल्याने योजना बंद आहेत. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी नियमित भरली पाहिजे, जे भरणार नाहीत, त्यांच्या सात-बारावर बोजा चढविला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी विजय काळम यांनी नुकताच दिला आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर पाणी योजनांसाठी ५ जानेवारीपर्यंत स्वतंत्र बैठक घेणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या थकबाकीमुळे पाणी योजना बंद आहेत. चांगला पाऊस होत असल्याने टंचाई दूर झाली आहे. या शिवाय पाणी उपलब्ध झाले आहे. गतवर्षी सरकार आणि पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांनाही पाणी वेळेत मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन पाणीपट्टी भरण्यास सहमती दर्शविली होती. परंतु, शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी भरली जात नसल्याने वीजबील भरणे अशक्य होत आहे. थकबाकी भरल्याशिवाय वीज मिळणार नसल्याचा पवित्रा महावितरण कंपनीने घेतला आहे. आता शेतकऱ्यांनी तत्काळ पाणीपट्टी भरण्याची आवश्यकता आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंडारा-खोबऱ्याची पालीत उधळण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
येळकोट…येळकोट…जय मल्हार.., सदानंदाचा येळकोट, खंडोबाच्या नावानं चांगभलं, चा जयघोष आणि भंडारा खोबऱ्याच्या अक्षतांसह वेद-मंत्रांच्या जयघोषात व सुमारे सात ते आठ लाख भाविकांच्या साक्षीने रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोरज मुहूर्तावर, मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात राज्यसह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (पाल, ता. कराड) येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा पार पडला.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मुख्य मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या मुख्य चौकानजीक सर्व बाजूंनी बॅरिकेटस् लावल्याने मुख्य चौकात मिरवणुकीवेळी भाविकांची होणारी गर्दी आटोक्यात आणण्यात पोलिस प्रशासनाला यश आले तर तारळी नदीपात्रातील दक्षिण बाजू भंडारा, खोबरे उधळण्यासाठी भाविकांनी खचाखच भरले होते. पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने पिवळा धमक झाला होता. प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे यंदा सुमारे सात ते आठ लाख भाविकांच्या अथांग जनसागरात कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा सुरळीत पार पडली.
खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काट्या, पालखीसह देवस्थानच्या आकर्षक रथातून मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. दुपारी तीनच्या सुमारास खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मानकरी देवराज पाटील देवाचे मुखवटे पोटावरती बांधून अंधार दरवाजाजवळ आले. या ठिकाणी ते रथात विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणुकीस सुरूवात झाली.
मानकऱ्यांच्या फुलांनी सजवलेल्या अबदागिरी, चोपदाराचा घोडा, सासन काठ्या, पालखी, मानाचे गाडे या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया व म्हाळसा यांना रथातून घेऊन निघालेले मानकरी, अशी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबऱ्यांची उधळण करीत सदानंदाचा येळकोट.., घे येळकोट येळकोट.., जय मल्हार,चा जयघोष करीत देवाचे दर्शन घेतले.
तारळी नदीच्या तीरावर लाखो भाविकांनी गर्दी केली होती तर पाल नगरीचे आसमंत भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने पिवळा धमक झाले होते. मंदिर परिसर, वाळवंटीतून ही शाही मिरवणूक हळू हळू पुढे सरकत मारुती मंदिरमार्गे सायंकाळी सहाच्या सुमारास बोहल्याजवळ आली. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले व देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले व पारंपारीक पद्ध्तीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पाडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणीस पळवून नेऊन विहिरीत ढकलले

$
0
0

सोलापूर
अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन अज्ञात तरुणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी पंढरपूरमध्ये घडली.
पीडित तरुणीचा दोन २० ते २२ वर्षांचे अज्ञात तरुण तीन महिन्यांपासून पाठलाग करीत होते. परंतु, तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी केबीपी कॉलेजजवळील चौकातून जात असताना या तरुणांनी तिला जबरदस्तीने तोंड दाबून टमटममध्ये बसविले. या तरुणांनी तिला शिवीगाळ करून शिंदे मळ्यातील विहिरीवर घेऊन गेले. यापैकी एका तरुणाने तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला प्रतिसाद का देत नाहीस, असे म्हणून मारहाण केली. तसेच तिला पोहता येत नसतानाही विहिरीमध्ये ढकलून दिले. सुदैवाने यामध्ये ती बचावली आहे. या प्रकरणी त्या पीडितेने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थाट नववर्षाच्या स्वागताचा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहर, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे रविवारी हाऊसफुल्ल झाली. निसर्गाच्या सानिध्यात, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अनेकांनी कुटुंबांसह हजेरी लावली. तेथे मोठ्या जल्लोषात हॅपी न्यू इअर साजरा केला. परिणामी सर्वच पर्यटनस्थळांना रात्री उशिरापर्यंत यात्रेचे स्वरूप आले होते. रविवार शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील पर्यटकांनी शहर फुल्ल झाले.

३१ डिसेंबर रविवारी आला असल्याने शनिवारी रजा घेऊन अनेकांनी मुंबई, पुणे, कोकणातील पर्यटनस्थळे गाठणे पसंत केले. यासाठी अनेकजण कोल्हापुरात दाखल झाले. सरत्या वर्षाला निरोप तर नविन वर्षाचे स्वागत पर्यटन, धार्मिक स्थळी करण्याकडे अधिक कल राहिला.

बाहेरच्या पर्यटकांनी शहर, जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स फुल्ल झाली. शहरातील करवीर निवासिनी अंबाबाई, रंकाळा, न्यू पॅलेस, टाऊन हॉल, साठमारी, भवानी माता, पन्हाळा, रांगणा किल्ला, सामानगड (गडहिंग्लज), पारगड (चंदगड), राधानगरी धरण, पाटगाव, दाजीपूर अभयारण्यच्या ठिकाणी तोबा गर्दी राहिली. पंचगंगा काठ, प्रयाग चिखलीतील संगमावर पर्यटकांनी सफर केली.

पर्यटनस्थळीच जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी झाली होती. त्यासाठी शहरातील हॉटेलमधून जेवण घेऊन गडकोटवर जाणे पसंद केले. काहीजण तेथेच तीन दगडांची चूल मांडून जेवण बनवताना दिसत होते. शहर परिसरातील पर्यटकांना खेचण्यासाठी हॉटेल, बार, रेस्टॉरंट, लॉज, भक्त निवासांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तांबडा, पांढऱ्या रश्यासह शाकाहारी जेवणाची ऑर्डर सकाळपासून घेतली जात होती. पर्यटकांची गर्दी राहिल्याने रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू राहिली. रेल्वे, बसमधून आलेल्या पर्यटकांच्या सेवेसाठी बसस्थानक परिसरात कार, टॅक्सी, मिनी टॅव्हल्स तैनात होत्या. प्रत्येक किलोमीटर आणि दिवसभराचे पॅकेज ठरवून पर्यटकांनी वाहनांचे बुकिंग केले. पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन परिसरात नव्याने स्टॉल्स उभारण्यात आले. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर गर्दी अधिक होती. पर्यटकांना खेचण्यासाठी वेगवेगळी पॅकेज सज्ज होती.


पोलिस बंदोबस्त

नववर्षाच्या स्वागतावेळी काही अतिउत्साही पर्यटकांकडून हुल्लडबाजी होण्याची शक्यता गृहीत धरून महत्वाच्या पर्यटनस्थळांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दुपारनंतर किल्ले आणि इतर पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या संशयित वाहनांची पोलिस तपासणी करीत होते. मद्याच्या आहारी गेलेल्यांकडून कायदा, सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, यासाठी पोलिस सतर्क राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पाच हॉटेल्सना महापालिकेची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

मुंबईतील कमला कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महापालिकेनेही बडी हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपाहरगृहे, लॉजिंग,बोर्डिंग आणि यात्री निवासाची पाहणी सुरु केली आहे. न्यू इयर सेलिब्रेशन करणाऱ्या पाच बड्या हॉटेलमधील फायर ऑडीटमधील त्रुटी लक्षात घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे .

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी शहरातील अनेक बड्या हॉटेलनी न्यू इयर पार्टीचे आयोजन केले आहे. शुक्रवारी अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील हॉटेल, पब, बिअर बारची तपासणी सुरु केली आहे. रविवारीही ही तपासणी केली जाणार आहे.

ज्या हॉटेलमध्ये न्यू इयर पार्टी सेलिब्रेशन आहे अशा हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती बस स्थानक, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, नागाळा पार्क आणि स्टेशन रोड परिसरातील हॉटेलची तपासणी करण्यात आली. बहुतांशी हॉटेल्सनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना केल्या असल्या तरी पथकाला काही त्रुटी आढळल्याने मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील पाच हॉटेलना नोटीस बजावल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत जी नवीन हॉटेल सुरु झाली आहेत त्या ठिकाणी फायर ऑडिटच्या निकषानुसार बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. हॉटेलमधील येण्याचे जाण्याचे मार्ग, संकटसमयी बाहेर पडण्याच्या मार्गाची तपासणी करण्यात आली आहे. चायनीज माळा व विजेचे साहित्य टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. पथकाने हॉटेलमधील किचनची पाहणी करुन उघड्यावर तंदूर भट्टी पेटवण्यास बंदी घातली आहे. हॉटेलचालकांना ओव्हन वापरण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान महापालिकेच्यावतीने हॉटेल, बार, पब, लॉजिंग बोर्डिंग, यात्री निवासांचे फायर ऑडिट करण्यासंदर्भात तपासणी केली जाते. दोन महिन्यांपूर्वी हे ऑडिट पूर्ण झाले आहे. तरीही शहरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग, यात्रा निवासाची रविवारी कसून तपासणी करण्यात येणार आहे.

०००००

गेले दोन दिवस शहरातील प्रमुख मोठ्या हॉटेलची तपासणी करण्यात आली. न्यू इयर पार्टी आयोजित करणाऱ्या पाच हॉटेल्समध्ये काही त्रुटी आढळल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

रणजित चिले, अग्निशामक विभाग प्रमुख

००००

शिवसेनेची फायर ऑडिटची मागणी

महापालिकेने नोटिसांचे कागदी घोडे नाचवू नये. सर्व बार, पब्ज, हॉटेल्स, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, मंगल कार्यालये, व्यापारी व रहिवाशी संकुले, हॉस्पिटल, सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट १५ दिवसांत करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी पत्रकाव्दारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरची कनेक्टिव्हीटी वाढली

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com
Tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर : शिक्षण, नोकरी, पर्यटन, उपचार, नातेवाईकांच्या भेटी, कार्पोरेट बैठका यांसाठी कोल्हापूरकरांची परदेशवारी वाढली आहे. कोल्हापूरची जगाशी कनेक्टिव्हीटी वाढल्याचे सरत्या वर्षात दिसून आले. कोल्हापूरची विमानसेवा सुरू झाल्यास पर्यटनाचा टक्का आणखी वाढणार आहे. उद्योग, व्यापार, धार्मिक पर्यटनासह स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोल्हापूर महत्वाचे डेस्टिनेशन ठरत असल्याने देशांतर्गत विमानसेवेतही कोल्हापूरला अधिक पसंती दिली जात आहे.

दरवर्षी शिक्षणासाठी कोल्हापुरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोनशेहून अधिक आहे. त्यासह कोल्हापुरातून परदेशी जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या पुणे, मुंबई विमानतळावरून परदेशावारीसाठी प्रयाण होत आहे. त्यासाठी कोल्हापूरमध्ये नव्याने सुरू झालेले पासपोर्ट सेवा केंद्र हे महत्त्वाचे ठरत आहे. कोल्हापूरचे केंद्र पासपोर्ट वितरणात राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ५९ केंद्रांपैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहरांपैकी कोल्हापूर प्रथम क्रमाकांचे शहर ठरले आहे. कोल्हापूरच्या पासपोर्ट सेवा केंद्रातून २७ हजार ३५ पासपोर्टचे वितरण झाले. विमानप्रवासाचा टक्का वाढल्याने कोल्हापूरमधून पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. विमान कंपन्यांनी तिकिट खरेदीसाठी विविध ऑफर जाहीर केल्या. त्याचा फायदा कोल्हापुरातील मध्यमवर्गीयांना होत आहे. गरजेनुसार उपलब्ध होणाऱ्या सहली, टूर ऑपरेटर्सची विश्वासार्हता, कॉस्ट सेव्हर टूर्स आदी पर्याय उपलब्ध होऊ लागल्यामुळे परदेशवारीचा टक्का वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हलगर्जी करणारेअधिकारी निलंबित होणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
राज्य व केंद्र सरकारच्या जनहिताच्या योजना कोणत्याही परिस्थितीत समाजातील अखेरच्या घटकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. यामध्ये हयगय होता कामा नये. जिल्हा नियोजनच्या सभेत काही अधिकाऱ्यांचा हलगर्जी समोर आली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापुढील काळातही कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आहे. दरम्यान, अखर्चित निधी मार्चअखेर खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
देशमुख म्हणाले, सहकार क्षेत्राचे बळकटीकरण करणे गरजेचे असल्यामुळेच विविध कार्यकारी सेवा संस्थांचे महत्व अबाधित ठेवले जात आहे. विविध सेवांकरता त्यांना सरकारतर्फे आर्थिक सहाय्य पुरविण्यात आले आहे. आतापर्यंत आठशेहून अधिक संस्थांनी याकरिता पुढाकार घेतला असून, यंदाच्या वर्षी पाच हजार संस्थांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. अशा संस्था जो माल उत्पादित करणार आहेत, त्यांची चांगल्या ठिकाणी विक्री व्हावी या करिता सरकार प्रयत्नशील आहे. उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा, हा उत्पादित शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, असे धोरण निश्चित करून सरकारची वाटचाल सुरू आहे. उत्पादित माल घेण्याकरिता काही कार्पोरेट कंपन्यांनी देखील पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास अटल महा पणन विकास अभियानांतर्गत आजअखेर ३३ विकास संस्थामार्फत विविध व्यवसायांना सुरूवात करण्यात आली आहे.
सांगलीत १६८ कोटींची कर्जमाफी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातून एकूण १ लाख ८६ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे १ लाख ९ हजार सभासदांची ग्रीन यादी आली आहे. त्यापैकी ७८ हजार ५४० लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर १६८ कोटी १८ लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
१६१ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन
सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. वांग मराठवाडी ११६ प्रकल्पग्रस्तांना आणि कोयना अभयारण्य ४५ प्रकल्पग्रस्तांना अशा एकूण १६१ प्रकल्पग्रस्तांना १४ हेक्टर १८ आर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन कार्यालयाने उत्तम काम केल्याचे देशमुख म्हणाले. वांग मराठवाडी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यातील खानापूर व कडेगाव तालुक्यात करण्यात आले आहे.
दुष्काळी तालुक्यांसाठी निधी
कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेसाठी जत, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांकरिता २५० कोटी रुपये तर टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी तासगाव, आटपाडी, खानापूर या तालुक्यांसाठी १७० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७मध्ये एकूण १४० गावांमध्ये ४ हजार ३८४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर सन २०१७-१८साठी ७ हजार ९५१ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यातील १४१ कामे पूर्ण झाली आहेत. सांगलीचा १२० कोटींचा
वार्षिक आराखडा मंजूर
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी सन २०१८-१९चा सुमारे २१२ कोटी ६४ लाख रुपये निधीच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सन २०१७-१८साठी कपातीनंतरच्या सुधारित १६५ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी १६२ कोटी ५८ लाख रुपये रकमेच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. सर्व विभागांना ११२ कोटी ४२ लाख रुपये निधी वितरीत केला असून, त्यांनी मार्चपूर्वी १०० टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हा नियोजन समिती सभागृहात नियोजन समितीची सभा सोमवारी झाली. जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेयुक्त रस्त्यांना मंत्री, खासदारांची नावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सर्वदूर पोहचलेल्या सांगली आणि परिसरातील रस्त्यांवरील खड्यांची चर्चा काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. खड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेल्या सांगली-पेठ रस्ता पंतप्रधानांच्या नावाने ओळखावा, अशी सर्वपक्षीय कृती समितीने रस्ता नामकरणांची लढविलेली शक्कल कामी आली आणि थेट निधी येवून कामाला सुरुवात झाली. त्याप्रमाणेच सोमवारी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी समितीने रस्ते खड्डेमुक्त करण्याची मुदत देऊनही जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने कार्यवाही न केल्याचा निषेध करीत खड्डेमय रस्त्यांना केंद्रीय मंत्र्यांपासून महापौर, विरोधी पक्षनेत्यांपर्यंतची नावे देवून अनोखे आंदोलन सांगलीत करण्यात आले.
सांगली काही वर्षांपूर्वी खोक्यांचे शहर म्हणून सर्वपरिचित होती. परंतु, तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेला सांगली दौरा कारणीभूत ठरला आणि खोक्यांनी वेढलेले मुख्य रस्ते खोकीमुक्त झाले. चौकाचा पसारा वाढला. आयलँड उभारले गेले. या पार्श्वभूमीवर सांगलीतील रस्ते सुधारायचे असतील, खड्डेमुक्त करायचे असतील तर राष्ट्रीय पातळीवर महत्व असलेल्या व्यक्तींचा दौराच होण्याची प्रशासन वाट तर बघत नाही ना?, असा सवाल उपस्थित होत होता. नेमके काय झालेतर खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांची सुटका होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी विचारणा होत होत असतानाच वारंवार आंदोलन करून, खड्ड्यात मेनबत्त्या लावून, वृक्षारोपण करून, रांगोळी काढून आंदोलन करणारेही वैतागले होते. या आंदोलकांच्या मदतीला एक नवीन संकल्पना धावून आली. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच सांगलीतील खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांचे नामकरण करण्यात आले आहे.
समितीचे नेते नगरसेवक गौतम पवार, सतिश साखळकर, महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी सांगलीत आठ ठिकाणी अनोखे आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीने रस्त्यांबाबतीत ३१ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेट दिला होता. तरीही प्रशासनाने याकडे डोळेझाक करीत फाईलींचा खेळ करण्यातच स्वतःला कर्तव्यदक्ष समजले. सांगलीकरांना यातना भोगायला लागत आहेत, याचा कोणी विचारच करीत नसल्याचा निषेध करीत सोमवारी आंदोलकांनी खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांना मंत्री, आमदार, खासदारांची नावे देऊन कारभाराच्या चिंध्या केल्या. या आंदोलनाने महापालिकेतील काँग्रेस सत्ताधारी गट आणि सांगलीची आमदारकी असलेल्या भाजप नेत्यांच्या कारभाराची लक्तरेही वेशीवर टांगली गेली.
असे झाले रस्त्यांने नामंकरण
विश्रामबागमधील वालचंद कॉलेज-स्फूर्ती चौक रस्ता- आमदार सुधीर गाडगीळ मार्ग.
कोल्हापूर रोड-शंभर फुटी रस्ता- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मार्ग.
शामरावनगर चौकातील रस्ता- मुख्यमंत्री फडणवीस मार्ग.
टिळक चौका लगतचा रस्ता- आमदार पतंगराव कदम मार्ग.
त्रिमुर्ती चित्रमंदिरनजीकचा रस्ता- बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील मार्ग.
स्टेशन चौकातील रस्ता- उपमहापौर विजय घाडगे मार्ग.
शिवेच्छा हॉटेलनजीकचा रस्ता- खासदार संजय पाटील मार्ग.
महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालयालगतचा रस्ता- विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते मार्ग.
मिरजेतील दिंडी वेस रस्ता- आमदार सुरेश खाडे मार्ग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायालयीन प्रक्रियाव्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे

$
0
0

सांगली : अनिकेत कोथळे प्रकरणी न्यायालयीन कोठडीत कळंबा कारागृहात असलेल्या संशयितांसंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे पार पाडण्यास न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. कोथळे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने संशयितांची न्यायालयात ने-आण करीत असताना सुरक्षा यंत्रणेवर ताण येत असल्याने सरकारी पक्षाने व्हीसीबाबत लेखी अर्ज केला होता. या अर्जावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांनी सोमवारी निर्णय दिला.
दरम्यान, सोमवारी सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत १४ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्याने सरकारी वकील ए. एस. पटेल यांनी सांगितले.
अनिकेत कोथळे प्रकरणाचा तपास सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. दरम्यानच्या कालावधित संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले आदी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना प्रत्येक पंधरा दिवसांनी न्यायालयासमोर हजर करून न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवून घ्यावी लागते. यासाठी त्यांना कळंबा कारागृहातून सांगलीत आणून पुन्हा सुखरुपपणे कारागृहात सोडेपर्यंत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असते. संशयितांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईकही धावपळ करीत असतात. न्यायालयाच्या आवारातही जमाव एकत्रित आलेला असतो. त्यामुळे संशयितांच्या बाबतीतली न्याय प्रक्रिया व्हीसीद्वारे पार पाडण्यास न्यायालयाने परवानगी दिली तर पोलिस यंत्रणेवरचा ताण कमी होणार असल्याचे सरकारी पक्षाने लेखी दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रजनीकांत यांचासर्वाधिक फायदा काँग्रेसला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
‘तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता रजनीकांत यांनी प्रवेश केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ काँग्रेस पक्षाला होईल,’ असे मत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात व्यक्त केले.
रजनीकांत यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा या घोषणेशी निकटचा संबंध असून, त्यांच्या सल्ल्यानेच रजनीकांत यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही राजकीय वतुर्ळात सुरू आहे, याकडे सुशीलकुमार शिंदे यांचे लक्ष्य वेधले असता ते म्हणाले, ‘रजनीकांतच्या राजकारण प्रवेशामागे कोणीही असले तरी त्याचा फायदा सद्य परिस्थितीत काँग्रेसला अधिक होईल.’ मात्र या बाबत अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.
शिंदे सोलापूर दौऱ्यावर आहेत. आठ दिवसांचा त्यांचा नियोजित दौरा होता. मात्र, बुधवारी सायंकाळी दिल्लीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी तातडीची बैठक बोलावली असल्याने दौरा आटोपता घेत बुधवारी सकाळी ते दिल्लीला जाणार आहेत. तामिळनाडूच्या राजकीय घडामोडीवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.
तमिळ चित्रपट अभिनेता रजनीकांत यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय भूमिका रविवारी जाहीर केली. गेली अनेक वर्षे त्यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जर्मनी गँगवर मोकाची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इचलकरंजी परिसरात गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या जर्मनी गँगवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या कारवाईमुळे कुख्यात जर्मनी गँगच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसणार आहे. गँगमधील सात गुंडांवर ही कारवाई केली आहे. यातील सहा गुंड अटकेत आहेत, तर एक अल्पवयीन फरार आहे.

अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी (रा. दत्तनगर, लिगडे मळा, कबनूर) हा गेल्या दोन वर्षांपासून इचलकरंजी परिसरात गुन्हेगारी कृत्ये करीत आहे. जबरदस्तीने खंडणी वसूल करणे, मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण असे गंभीर गुन्हे अविनाश जर्मनी याच्यावर दाखल आहेत. त्याच्या गँगमध्ये आकाश आण्णाप्पा भिलुगडे, नईम हसन कुकुटनूर, बजरंग अरुण फातले उर्फ बाचके, मनोज वामन शिंगारे (सर्व रा. लिगाडे मळा, इचलकरंजी), प्रशांत विनायक काजवे (रा. जवाहरनगर, इचलकरंजी) याच्यासह एका अल्पवयीन गुंडाचाही समावेश आहे. या सात जणांवर शिवाजीनगर, शहापूर, कुरुंदवाड आणि पेठवडगाव पोलिस ठाण्यात ३१ गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक गुन्हे अल्वयीन गुंडावर दाखल आहेत.

जर्मनी गँगने चार नोव्हेंबरला रात्री इचलकरंजीतील एका हॉटेलमध्ये खंडणी वसुलीसाठी तोडफोड करून हॉटेल मालकाला गंभीर जखमी केले होते. हॉटेल मालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जर्मनी गँगचा म्होरक्या अविनाश जर्मनी याच्यासह सहा जणांना पाच नोव्हेंबरला अटक केली. या गँगमधील अल्पवयीन अद्याप पसार आहे. जर्मन गँगवर गंभीर गुन्हे दाखल असून, वारंवार त्यांच्याकडून असे गुन्हे घडत आहेत, त्यामुळे या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई व्हावी, असा प्रस्ताव पोलिसांनी विशेष पोलिस माहनिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला होता. आयजी नांगरे-पाटील यांनी मोकाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या कारवाईमुळे इचलकरंजी परिसरातील गुन्हेगारी कृत्यांना आळा बसेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. याशिवाय कोल्हापूर आणि इचलकरंजीतील आणखी दोन टोळ्यांवर मोकाची कारवाई होणार आहे. कारवाईचे प्रस्ताव आयजींकडे पाठवले आहेत. लवकरच या प्रस्तावांना मंजुरी मिळेल, असे मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती नालाप्रकरणी दोघा अधिकाऱ्यांना नोटिसा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शंभर दिवस झाले तरी जयंती नाल्यातील सांडपाणी पाइपलाइन दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. कामात दिरंगाई केल्याबद्दल आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर व प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना सोमवारी फैलावर घेत कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याचवेळी यांत्रिकी विभागाच्या सहाय्यक अभियंता रावसाहेब चव्हाण यांच्याकडून वाहने पासिंग करण्याच्या कामात होत असलेल्या विलंबाबाबत पाच हजार रुपयांचा दंड केला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आयुक्तांनी कारवाई करण्याच्या घेतलेल्या पवित्र्याने महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

जोरदार पावसाने वाढलेल्या पाण्यामुळे जयंती नाल्यातील सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन तुटली होती. त्यामुळे जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याने नदीकाठावरील शिरोळपर्यंतच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर मासे मरण्याचे प्रकार झाले. शंभर दिवस होऊनही काम पुर्ण न झाल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेची वीज तोडण्याची प्रतिकात्मक कारवाई केली. या प्रकाराचे पडसाद सोमवारी आयुक्तांनी महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत उमटले.

पाइपलाइनची दुरुस्ती करण्यासाठी टेंडर न काढता तातडीचे काम म्हणून मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी तीन महिने होऊन गेले तरी अजूनही काम पूर्ण झालेले नाही. याबाबत आयुक्तांनी कडक भूमिका घेतली असून अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना दर पाच दिवसांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन अहवाल देण्यास सांगितले होते, पण पाटणकर यांनी काही अहवाल दिले नव्हते. प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनाही काम गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांच्याकडूनही समाधानकारक दिसून आले नव्हते. सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी या प्रकरणाबाबत दोन्ही अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.

सातत्याने सूचना देऊनही काम होत नसल्याबाबत आयुक्तांनी पाटणकर यांना चांगलेच फैलावर घेतले. त्याचवेळी पाच दिवसाला अहवाल दिला नसल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तर जलअभियंता कुलकर्णी यांनाही या कामातील दिरंगाईला जबाबदार धरत कारणे दाखवा नोटीस बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा शाळांत हायटेक प्रयोगशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनतर्गंत अटल टिंकरिंग लॅबसाठी (प्रयोगशाळा) जिल्ह्यातील दहा शाळांची निवड झाली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेने ही निवड झाल्याने शिक्षण विभाग याबद्दल अनभिज्ञ आहे. मात्र, लॅबमध्ये उद्योगांसह विविध ‌क्षेत्रातील नवनिर्मिती, संशोधनला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

शालेय वयात विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना असतात. त्यांना आकार देणे, कौशल्ये विकसित करणे, नव संशोधनाला चालना देण्यासाठी लॅबचा उपयोग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना कार्यान्वीत केली आहे. गेल्यावर्षापासून त्याची अंमलबजावणी देशपातळीवर केली जात आहे. पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील ११ शाळांचा सामावेश झाला आहे. दुसऱ्या टप्यात राज्यातील ११६ तर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा शाळांची निवड झाली आहे.

निवडलेल्या शाळांतील प्रयोगशाळेत विविध वस्तूपासून नवनिर्मिती करणे, जन्मजात कौशल्याचा वापर करीत नादुरूस्त वस्तू दुरूस्त करणे, तांत्रिकदृष्या स्वयंपूर्ण केले जाणार आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्योजक बनण्यासाठीची प्रा‌थमिक तयारी करून घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा चांगला फायदा होणार आहे. प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी सरकारकडून किती पैसे मिळणार यासंबंधी शिक्षण प्रशासन अंधारात आहे. अंमलबजावणीच्या मार्गदर्शक सूचनाही नसल्याने प्रयोगशाळा कधीपासून सुरू होणार यासंबंधीची नेमकी माहितीही उपलब्ध नाही. दरम्यान, शाळांच्या स्तरावरून मिळालेल्या माहितीवरून लॅबसाठी सरकारकडून २० लाखांचा निधी दिला जाणार आहे. त्यातून अत्याधुनिक लॅब तयार करण्यात येणार आहे.

टिंकरिंग लॅबसाठी निवडलेल्या शाळा

पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, राधाबाई शिंदे इंग्लिश मिडियम स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, व्ही. एस. खांडेकर प्रशाला, न्यू हॉरीझन स्कूल (कोल्हापूर), शिक्षण समिती हायस्कूल अॅन्ड छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज (नेसरी, ता. गडहिंग्लज), धनंजय विद्यालय नागनवाडी (ता. चंदगड), महात्मा गांधी विद्यालय, रूकडी (ता. हातकणंगले), सांगरूळ हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, काडसिध्देश्वर हायस्कूल (कणेरी, ता. करवीर).


न्यू टिंकरिंग लॅबसाठी जिल्ह्यातील दहा शाळांची निवड झाली आहे. लॅबसाठी किती निधी मिळणार, यासंबंधीची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. सरकारकडून आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपास अधिकाऱ्यांची बदली नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांना बेपत्ता केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करू नये, त्याचबरोबर तपास पथकातील यापूर्वीच्या अधिकारी पोलिस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची पुन्हा नियुक्ती करावी, अशी मागणी बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी केली आहे. या मागणीचा ई मेल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला पाठविला आहे. बेपत्ता अश्विनी बिद्रे-गोरे यांचे पती राजू गोरे यांनी ही माहिती दिली.

अश्विनी बिद्रे-गोरे या बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी नवीन मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी गुन्ह्याचा योग्य पद्धतीने तपास केला, मात्र संशयितांच्या अटेकसाठी त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. याशिवाय काही काळातच त्यांची बदलीही करण्यात आली. अल्फान्सो यांनी गुन्ह्याचा महत्त्वाचा तपास केला आहे, त्यामुळे अल्फान्सो यांचा तातडीने तपास पथकात समावेश करावा, अशी मागणी बेपत्ता अश्विनी यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिद्रे यांनी केली आहे. मागणीचा मेल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पाठवला.

पोलिसांच्या तपासाबद्दल नाराजी व्यक्त करून बिद्रे-गोरे कुटंबीयांनी हायकोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने एसीपी प्रकाश निलेवाड यांनी तपासाची सूत्रे स्वीकारली. निलेवाड यांनी गांभीर्याने तपास करून तत्कालीन पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर त्यांनी कुरुंदकर आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील या दोघांना अटक केली. या कारवाईनंतर तपास अधिकारी निलेवाड यांच्यावरही दबाव येण्याची शक्यता आहे. त्यांच्या बदलीचीही शक्यता नाकारता येत नाही. निलेवाड यांची बदली होऊ नये, अशी मागणी बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी मेलद्वारे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images