Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बाळासाहेब कांबळेला न्यायालयीन कोठडी

$
0
0

सांगली :
अनिकेत कोथळे प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बाळासाहेब आप्पा कांबळे (वय ४८) याला कोर्टाने सोमवारी पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातील प्रमुख संशयित आणि बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्याशी मामे सासऱ्याचे नाते असलेल्या कांबळेला सीआयडीने तपासा दरम्यान अटक केली आहे. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर कामटेने कांबळेला बोलावून घेतले होते. कांबळेकडे झालेल्या तपासाबाबत मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही.
अनिकेत कोथळे प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्याकडे निघाला असून, कॉल डिटेल्सचा आधार घेत तपास अधिकारी उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी घटनेच्या दरम्यान संशयितांनी संपर्क साधलेल्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. संशयितांनी पलायन केल्याचा गुन्ह्याचाही सीआयडीच तपास करीत असून, पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी या तपासावर लक्ष केंद्रीत केले आहे. अनिकेत प्रकरणी गुन्हा दाखल होताच पाच पोलिसांसह सहा जणांना अटक केली. त्यानंतर तपासादरम्यान बाळासाहेब कांबळेचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. या कांबळेकडेच कामटे वापरत असलेले वाहन ठेवल्याचेही समोर आले आहे. या शिवाय अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर कामटेने फोन करुन कांबळेला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर अनिकेतचा मृतदेह घेऊन संशयित विश्रामबागमधील खासगी हॉस्पिटलमध्ये गेले होते, त्याही ठिकाणी कांबळे वावरत असल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आले आहे. कांबळेच्या अटकेमुळे संशयितांची संख्या सातवर गेली असून, संशयितांची संख्या वाढणार असल्याचे सुतोवाच सीआयडीने केले आहे. त्यामुळे आणखी कोण कोण गजाआड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रकाश शेंडगेंचे आरोप दिशाभूल करणारे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथील शेळी-मेंढी विकास महामंडळाची जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप करणारे या घडीला अडगळीत पडलेले नेते आहेत. ते अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करणारे आरोप करून राजकीय दुकानदारी चालवता येईल का?, याचा प्रयत्न करीत असावेत,’ असा टोला खासदार संजय पाटील यांनी सोमवारी माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश शेंडगे यांचे नाव न घेता लगावला.
रांजणी येथील अहिल्यादेवी शेळी मेंढी पालन महामंडळाची जागा ड्रायपोर्टच्या नावाखाली हडपण्याचा डाव असल्याचा आरोप शेंडगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला होता. महामंडळाची जागा घेऊ देणार नाही, सरकारने परस्पर जागा दिली तर धनगर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या आरोपाचा समाचार घेताना खासदार पाटील म्हणाले, ‘अडगळीत पडलेल्या नेत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. रांजणीत महामंडळाची १७०० तर ५०० एकर ग्रामपंचायतीचे गायरान आहे. आगामी ३५ ते ३० वर्षांतील जिल्ह्याच्या प्रगतीचा दृष्टीकोन ठेवून ड्रायपोर्ट उभारले जाणार आहे. याचा प्रकल्पआराखडा करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली आहे. सुमारे २०० एकर जागा लागेल. त्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष डिग्गीकर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संबधित जागेची पाहणी करणार आहेत. शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या कार्यप्रणालीला आमचा कोणताही विरोध नाही. विकासाचा दृष्टीकोन ठेवून काम करताना त्यात जात-पात येता कामा नये, अशी आपली भूमिका आहे. परंतु आरोप करणाऱ्या महाभागांना आपली भूमिका अवगत नसावी. सरकारच्या जागेत ड्रायपोर्ट आणि फूडपार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी नेमकी किती जागा लागेल हे पोर्ट ट्रस्टच्या पाहणीनंतर ठरविण्यात येईल. कोणाच्या जागेवर गंडांतर आणले जाणार नाही. नेते गिरीवर डोळा ठेवून आरोप करणाऱ्यांनी दिशाभूल करू नये. भावनिक आवाहन करून ते एकदा निवडून आले. परंतु, पुन्हा त्या ठिकाणी ते किती दिवसांनी जात होते, हे सर्वांना माहित आहे. त्यांनी जतमधील काम सांगावे. ड्रायपोर्टमुळे फळे, भाजीपाला निर्यातीची संधी परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. परिसराचा विकास होणार आहे. त्यासाठी कोणाची जागा काढून घेणार नाही. मात्र, विकासाच्या आड कोणी येण्याचा प्रयत्न करू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेंभू’साठी बाराशे कोटी मंजूरखासदार संजय पाटील यांची माहिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेसाठी १२०० कोटी रुपयांच्या सुधारीत अंदाजपत्रकास केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नातून मंजुरी मिळवण्यात सततच्या पाठपुराव्याने यश आहे,’ अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
खासदार म्हणाले, ‘दुष्काळी भागातील पाणी योजनांसाठी ३ हजार ७०० कोटी रुपये आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी ६ हजार ५०० कोटी रुपये देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारची बैठक चार महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानंतर केंद्रात खातेबदल होऊन नितीन गडकरी यांच्याकडे दीड महिन्यांपूर्वी जलसंसाधन खात्याची जबाबदारी आली. त्यांनी पुन्हा निधी मंजुरीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे दुष्काळी भागातील पाणी योजनांसाठी ८ हजार कोटी रुपये आणि आत्महत्याग्रस्त भागासाठी ११ हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. टेंभू योजनेच्या निधीत आता ६०० कोटी रुपयांवरून १२०० कोटी रुपयांपर्यंतच्या वाढीव अंदाजपत्रकाला केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे मंजुरी मिळाली. यासाठी नाबार्डकडून राज्य सरकारला कर्ज दिले जाणार आहे. केंद्राने व राज्याने त्याची जबाबदारी घेतली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत खर्च होईल तसा टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध केला जाणार आहे. ताकारी-म्हैसाळ योजना १६ ते १८ महिन्यांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाळू उपशाला बंदी असल्यामुळे योजनेची कामे रखडली आहेत. सरकारने जप्त केलेली वाळू ठेकेदारांना उपलब्ध करून द्यावी, यासाठी प्रस्ताव दिला आहे. दोन दिवसांत यावर मार्ग निघेल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी बस दरीतकोसळून वीस जण जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
अजिंक्यतारा पाहण्यासाठी आलेल्या मुंबईच्या एका ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस ब्रेक फेल झाल्याने दरीत कोसळली. या घटनेत 20 पर्यटक जखमी झाल्याची घटना सोमवारी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. दरम्यान, चालकाने दाखवलेल्या प्रसांगावधानाने जीवितहानी टळली. येथील धर्मवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तातडीने केलेल्या मदतीमुळे बसमधील प्रवाशांना दिलासा मिळाला.
वसई येथील एकाच कुटुंबातील सर्व नातेवाईक महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरण्यासाठी एका खासगी कंपनीच्या बसमधून सोमवारी दुपारी अजिंक्यताऱ्यावर आली होती. सुमारे तीन वाजता बसमधील प्रवासी उतरुन सर्वांनी एकत्रित किल्ल्यावरील प्रेक्षणीयस्थळे पाहिली. त्यानंतर किल्ल्याच्या शेवटच्या मोठ्या वळणावर पार्किंग केलेल्या बसमध्ये सर्वजण बसले. पहिल्याच वळणावर रस्त्यावर पडलेल्या एका मोठ्या दगडाला धडकल्याने चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, असता त्याला बसचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत बसने चांगलाच वेग घेतला होता. पहिल्या वळणानंतर हा रस्ता अतीअरुंद व तीव्र उताराचा असल्याने बस चालकाने बस थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र, रस्त्याच्या तीव्र उताराने त्याचीही मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, बसमधील प्रवाशांनाही बसचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्याने सर्वांनी एकच गोंधळ करण्यास सुरुवात केली. बसमध्ये वृद्धांसह लहान बालके असल्याने सर्वांचीच पाचावर धारण बसली. या परिस्थितीतही बसचालकाने अत्यंत संयम दाखवत गाडीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे पडत आहे, असे वाटल्याने त्याने दरीकडील बाजूकडे न जाता बस किल्ल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात बस पहिल्यांदा एका वीजेच्या खांबावर धडकली. खांबावर धडकल्याने बसचा वेग काहीसा कमी झाला मात्र, किल्ल्याकडील डोंगराला घासत बस पुन्हा दरीच्या बाजुला वळली काही समजण्याचा आतच रस्त्याकडेच्या दगडांवरुन बस थेट दरीत कोसळली. सुदैवाने या दरीत असलेल्या दोन मोठ्या दगडांना धडकल्याने बस जागेवरच थांबली मात्र, तोपर्यंत बसची पुढील काच फुटली होती, पुढील दोन्ही चाकेही मोडली होती. या गोंधळात बसमधील सर्व वस्तू, प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडल्याने जोरदार गोंधळ उडाला. बसमधील बहुतेक सर्वजण किरकोळ जखमी झाले.

बसमधील प्रवाशांच्या सुदैवाने याचवेळी धर्मवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तातडीने दाखल झाल्याने त्यांनी तातडीने गाडीमधील प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही वेळ या परिसरात जोरदार गोंधळ उडाला होता. या गोंधळातच सर्व जखमींना बाहेर काढण्यात आले. काही वेळातच जिल्हा रुग्णालयाची अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली. या सर्व जखमींना तातडीने सातारा जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.

दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच खासदार उदयनराजे भोसले यांनी घटनास्थळाला तातडीने भेट देत पोलिसांना सूचना दिल्या. दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्यासाठी सायंकाळी उशीरापर्यंत घटनास्थळी क्रेन दाखल झालेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा संवर्धनाची परिक्रमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘रंकाळा आमचा मान कोल्हापूरची शान’, ‘श्वास रंकाळा ध्यास रंकाळा’, ‘स्वच्छ रंकाळा, सुंदर रंकाळा’ अशा घोषणा देत रंकाळा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी सोमवारी रंकाळा परिक्रमा करण्यात आली. सोमवारी रंकाळा दिनानिमित्त रंकाळा संवर्धन, संरक्षण समिती व रंकाळा प्रेमींच्यावतीने या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी नवनाथ मंदिरापासून परिक्रमेस सुरुवात झाली. चौपाटी, रंकाळा टॉवर ,संध्यामठ, इराणी खण, खणेश्वर मार्गे पदपथ उद्यानात परिक्रमेचा समारोप झाला. यावेळी दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी रंकाळा संवर्धनाची शपथ दिली. तर रंकाळा समितीचे राजेंद्र पाटील कापशीकर यांनी स्वागत केले. तसेच नागरिकांचा ताण तणाव नाहीसा होऊन शरीराबरोबर मनाचीही गुंतवणूक रंकाळयासोबत झाली आहे. रंकाळा लोकांचा श्वास बनला असल्याने पुनर्वैभव मिळविण्यासाठी रंकाळा विकास आराखडा तातडीने राबवण्याची मागणीही केली.

विकास जाधव म्हणाले, ‘पर्यावरणीय समतोल सांभाळणारा रंकाळा तलावाचा सर्वंकष विकास होण्याची आवश्यकता आहे.’ मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ‘आजपर्यंत लोक जागरूक असल्यानेच रंकाळयाचे अस्तित्व टिकले आहे.’ अॅड. अजित चव्हाण, धोंडिराम चोपडे, अजित मोरे, सुधा सरनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. रंकाळा समितीचे विजय सावंत, अभिजित चौगले, संजय मांगलेकर, राजेंद्र पाटील, विकास जाधव, यशवंत पाटील यांनी परिक्रमेचे नियोजन केले. यामध्ये डॉ. अमर आडके, अशोक देसाई, चंद्रकांत वडगावकर, भरत गांधी, संपतराव पाटील, सुभाष हराळे, चंद्रकांत पाटील, सुनील चिले, धर्माजी सायनेकर, नीता साळोखे, डॉ. रुपाली दळवी, मीनल भालेकर, सरिता सासने, सुवर्णा मिठारी, शीतल येळावकर, सुनील जाधव, आनंदराव चिखलीकर आदी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर परीट समाज व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगे महाराजांची ६१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

शहरातील भाऊसिंगजी रोड, गुजरी, महाव्दार रोड, जोतिबा रोड, घाटी दरवाजा या मार्गे पालखी मिरवणूक निघाली. तत्पूर्वी समाजाचे अध्यक्ष दिपक लिंगम यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे व पालखीचे पूजन करण्यात आले. कागल येथील सिद्धार्थ नागरत्न यांचे ‘श्री संत गाडगेबाबा आणि त्यांचे जीवन कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी नगरसेविका सविता भालकर, मडिलगेच्या सरपंच शुभांगी परीट, कांचनवाडीच्या सरपंच सुवर्णा परीट, खेळाडू आदित्य किशोर खडके यांचा सत्कार झाला. यादव महाराज भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.

दरम्यान, आमदार क्षीरसागर यांनी येत्या वर्षात गाडगेबाबा यांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण व शहरात धोबी घाट उभारणार असल्याचे सांगितले. यावेळी शशिकांत भालकर, वसंतराव वठारकर, संदीप भालकर, राजेंद्र यादव, दशरथ लोखंडे, श्रीकांत शिंदे, रंजना भोसले, किर्ती शिंदे आदी उपस्थित होते. अॅड. प्रसन्न मालेकर व उमेश बुधले यांनी सूत्रसंचालन केले. महिला मंडळाच्या शहराध्यक्षा सीमा लिंगम यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलने, भ्रष्टाचाराने ‘वाट’च

$
0
0

Udaysing.patil@timesgroup.com

कोल्हापूर : काँग्रेस व भाजप आघाडींमधील कुरघोड्यांचे राजकारण, स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी रंगलेला घोडेबाजार, ऐच्छिक निधी मिळत नसल्याबरोबरच विकास कामांना होत असलेल्या विलंबामुळे प्रशासनाला धारेवर धरणारे नगरसेवक, महापौर हसीना फरास व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यातील शीतयुद्ध, थेट पाइपलाइन योजनेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, त्यातून आंदोलन करुन काम बंद पाडण्याचे प्रकार, अतिक्रमण निर्मूलनासाठी राबवलेली मोहीम, त्याला होणारा विरोध, दिव्यांगांची आंदोलने, २० नगरसेवकांवर जातीच्या दाखल्याबाबतच्या कारवाईची टांगती तलवार, दारुबंदी हटवण्यासाठी व शालिनी सिनेटोनच्या जागेवरील आरक्षण हटवण्याचे ठराव अशा घटनांनी महापालिकेची वर्षभरातील वाटचाल खडतरच राहिली. त्याचवेळी शहरवासियांच्यादृष्टीने अत्यावश्यक असलेल्या ड्रेनेज लाइन व पिण्याच्या पाण्याच्या लाइनसाठी ‘अमृत’ योजनेमधून मिळालेला निधी, बांधकामांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना, शाहू समाधीस्थळाचे अंतिम टप्प्यात पोहचलेले काम, पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्यांना घरफाळ्यातील सवलतींमुळे काही आशेचे किरण दिसू लागले आहेत.

आघाड्यांचे कुरघोड्यांचे राजकारण

महापालिकेतील सत्ता मिळाली नसली तरी सत्ताधारी काँग्रेस आघाडीच्या कारभारावर कायम अंकुश ठेवण्याच्या भाजप आघाडीच्या रणनीतीमुळे महापालिकेतील सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा असो आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी कायम झडत आहेत. काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकीला भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवकांना आमंत्रण नाही व भाजप आघाडीच्या बैठकीला सत्ताधाऱ्यांना आमंत्रण नसल्याचे प्रकार होत आहेत. सुरुवातीच्या काळात तर सत्तारुढांना त्रास देण्यासाठी भाजपकडून प्रत्येक ठरावाला केल्या जाणाऱ्या विरोधामुळे शहराच्या विकासाचा गाडा कसा हाकला जाणार हा प्रश्न पडला होता. पण वर्ष संपत असताना दोन्ही आघाड्यांचे काही विषयांवर एकमत होऊ लागले आहे, ही शहरवासियांच्यादृष्टीने समाधानाची बाब समजली जात आहे. स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी दोन्ही आघाड्यांचे संख्याबळ समान असल्याने फोडाफोडीचे राजकारण वेगावले होते. त्यातून घोडेबाजार झाल्याचे आरोप करण्यात आले. तसेच एका सदस्याला सभेसाठी उपस्थित ठेवण्यात येऊ नये यासाठीही मोठा प्रयत्न झाला. यामुळे दोन्ही आघाड्यांचे राजकारण सध्या थंड वाटत असले तरी पुढील वर्षात जोरात पेटण्याची शक्यता आहे.

निधीअभावी नगरसेवक संतप्त

पी. शिवशंकर यांच्या बदलीनंतर आलेले आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व सभागृहाचे अजूनपर्यंत सूर जमलेले नाहीत. आयुक्तांनी विकास कामातील बोगसगिरी थांबवण्यासाठी घेतलेला जिओ टॅगचा निर्णय, बांधकाम मंजुरीसाठी होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक खिडकी योजना, अतिक्रमण निर्मूलनासाठी घेतलेली कडक भूमिका असे निर्णय घेतले. त्याचबरोबर विकास कामांच्या मंजुरीच्या अडवल्या जाणाऱ्या फाइल्स, ऐच्छिक निधी देण्यास होणारी टाळाटाळ अशा पद्धतीमुळे नगरसेवक वैतागले. यामुळेच प्रत्येक सभेमध्ये प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नगरसेवक तुटून पडत होते. नगरसेवकांकडून नेहमीच प्रशासनावर हल्लाबोल सुरू केला आहे. दुसरीकडे कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने प्रभागांमध्ये सुविधांचा उडालेल्या बोजवाऱ्यावरुनही कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार झाले. यामुळे प्रशासनाची कामकाजावरील पकड ढिली होत असल्याचे दिसून येत आहे.

पाइपलाइन योजनेत भ्रष्टाचार

शहरासाठी महत्वाकांक्षी योजना असलेल्या थेट पाइपलाइन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आघाडीने केला. ठिकपुर्ली येथील पुलाचा खर्च २५ लाखाचा असताना त्यासाठी अडीच कोटी रुपयांची बिले दिल्याच्या प्रकारातून भ्रष्टाचार झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे या योजनेच्या कामकाजावर भाजप व शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. निकृष्ट काम होत असल्याचे सांगत शिवसेनेने काम बंद पाडले. तर अनेक गावांमधून पाइपलाइन टाकण्यात येणार असल्याने खोदाई करताना घरांना धोका निर्माण होत असल्याने काही ग्रामस्थांनीही काम बंद पाडले. येत्या मे महिन्यापर्यंत काम पुर्ण करण्याची मुदत आहे. पण अजून जॅकवेलचे काम नसल्याने काम पुर्ण होण्यास किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत.

महापौर - आयुक्त शीतयुद्ध

माजी महापौर हसीना फरास यांना अपेक्षित असलेल्या कामांना आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने दोघांमध्ये पेटलेले शीतयुद्ध शहरवासियांना पहायला मिळाले. जिथे संधी मिळेल तिथे विविध प्रकारच्या बैठक घेऊन आयुक्तांना बेजार करण्याचे धोरण फरास यांनी अवलंबले होते. तर आयुक्तांनी जे योग्य असेल तेच काम केले जाईल, असा ठेका धरला होता. त्याचा भडका महापौर केसरी कुस्तीच्या बक्षिस वितरणानंतर उडाला. महापौरपुत्र आदिल फरास यांनी आयुक्तांना सर्वांसमोर विचारलेला जाब व दिलेला दम महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहायला मिळाला. या प्रकारामुळे पदाधिकारी व आयुक्तांमधील वातावरण कमालीचे ताणले होते.

अतिक्रमण निर्मूलन

शहरामध्ये जिथे जागा मिळेल तिथे एका रात्रीत केबिन आणून ठेवण्याचे प्रकार सुरू झाले होते. यामुळे केबिनचे शहर बनते की काय अशी भीती होती. यासाठी एप्रिल महिन्यात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. तर नोव्हेंबरच्या अखेरपासून अनाधिकृत केबिन्सवर कारवाई सुरू केली. बऱ्याच वर्षानंतर सुरू झालेल्या कारवाईमुळे शहरातील अनेक रस्त्यांवरील काही अनाधिकृत ​केबिन्स स्वतःहून काढून घेतल्याचे पहायला मिळाले. काही ठिकाणी या मोहिमेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यातून मोठा तणाव होण्याचे प्रकार घडले.

योजनांची अंमलबजावणी संथ

आयुक्तांनी या वर्षभरात बांधकाम परवानगीसाठी एक खिडकी योजना, पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्यांना घरफाळ्यात सवलत, कामाच्या ठिकाणचा जिओ टॅग अशा योजना राबवल्या. पण एक खिडकी योजनेसाठी नगररचना विभागाकडे दिलेल्या अनेक फाइल्स सापडत नसल्याने नागरिकांचा त्रास वाढला असल्याचे दिसून आले. याबाबत महापालिकेच्या सभेत वादळी चर्चा होऊन विभागीय कार्यालयातील फाइल्स अजूनही पोत्यांमध्ये बंद असल्याचे आरोप करण्यात आले. अनेक फाइल्स मंजूर झालेल्या नसल्याची प​रिस्थिती आहे. हीच अवस्था जिओ टॅगची आहे. बोगस कामे रोखण्यासाठी टॅग योजना राबवली. पण टॅगचे फोटो देऊनही आयुक्त कामांना मंजुरी देत नसल्याने कशाला हवा टॅग असा सूर नगरसेवकांमधून उमटत आहे. यामुळे कामे रखडली आहेत. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत सर्व्हे करण्यात आला आहे. पण आता नवीन समिती तयार करण्यात येणार असल्याने पुन्हा सर्व्हे करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे वर्षभरात फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत फार आशादायक चित्र नाही.

प्रदूषणाचे प्रश्न जैसे थे

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया केल्या जाणाऱ्या प्रकल्पाची वर्ष संपत आले तरी अजूनही उभारणी पुर्ण झालेली नाही. त्यामुळे झूमवरील कचऱ्यातून निर्माण होणारे प्रश्न जैसे थे आहेत. तो कचरा उचलून अन्य ठिकाणी टाकण्याचे नियोजन केले होते. त्यामध्येही समाधानकारक काम झालेले नाही. टाकाळा येथील लँडफिल साइट विकसीत करण्याचा प्रकल्पही रखडला आहे. पावसाने जयंती नाल्यातील सांडपाणी वाहून नेणारी पाइप फुटल्याने शहरातील मैलामिश्रित सांडपाणी नदीमध्ये मिसळत आहे. त्यासाठी तातडीने काम करण्याचे आश्वासन देऊनही अजूनही जवळपास महिनाभर काम चालण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शहरातील उर्वरित भागासाठी ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी व पाणी वितरण नलिका टाकण्यासाठी ‘अमृत’ योजनेतून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

दाखल्यांची टांगती तलवार

माजी महापौर अश्विनी रामाणे, हसीना फरास यांच्यासह दोन्ही आघाडीमधील १९ नगरसेवकांवर जातीच्या दाखल्याबाबतची टांगती तलवार कायम आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून राज्य सरकारकडून त्याबाबतचे मत मांडण्यात येणार आहे. या नगरसेवकांवर जर अपात्रततेची तलवार कोसळली तर महापालिकेची मिनी निवडणूक होऊ शकते. याबाबत नगरसेवक फार काळजीपूर्वक निर्णय घेत असून नव्या वर्षात काय घडणार हे सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे.

समाधीस्थळ पूर्णत्वाकडे

कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नर्सरी बागेत समाधीस्थळ उभारण्याचे मोठे काम महापालिकेने पुर्णत्वाकडे नेले आहे. मेघडंबरीचे काम अंतिम टप्यात पोहचले असून संरक्षक भिंतीसाठीही निधी ​उपलब्ध करुन दिला आहे. एक कोटी रुपयाहून अ​धिक निधी या प्रकल्पाला देण्यात आला असून त्यापुढील इतर कामांसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. समाधीस्थळाचे लोकार्पण झाल्यानंतर संग्रहालय व अन्य सुविधा देण्याचे काम करण्यात येणार आहे.

‘त्या’ ठरावांची चर्चा

महापालिकेत ज्या ठरावातून ‘आंबा’ पाडता येतो, तो मोठा व महत्वाचा ठराव ठरतो. या वर्षभरात अशा प्रकारच्या दारु बंदीबाबत व ​शालिनी सिनेटोन या दोन ठरावांची चर्चा झाली. दारुबंदीच्या ठरावासाठी मोठी फिल्डींग लावण्यात आली होती. दोन वर्षात जे झाले नाही, ते या ठरावातून होईल, अशी आशा होती. पण शहरातील रस्त्यांबाबत निर्णय झाल्याने ठरावाची गरज भासली नाही. परिणामी नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली. पण शेवटच्या महिन्यात कारभाऱ्यांनी इतरांना काही थांगपत्ता लागू न देता शालिनी सिनेटोनच्या जागेवरील आरक्षण उठवण्याचा ठराव केला. त्यातून मोठा आंबा पाडल्याची चर्चा असल्याने आता सत्ताधारी व विरोधी आघाडीतील नगरसेवक विरोधासाठी उभे ठाकले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात फेब्रुवारीत जागतिक कला महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कोल्हापूरच्या पर्यटन जगताचे नाव पोहचले पोहचले पाहिजे यासाठी फेब्रुवारी महिन्यात कोल्हापुरात तीन दिवसीय जागतिक कला महोत्सव आयोजित करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते येथील पोलिस मुख्यालयासमोरील पोलिस उद्यानात कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचे रविवारी उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. नऊ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या कला महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

‘जगामध्ये जे जे उत्तम आहे, ते कोल्हापुरात आले पाहिजे अशी माझी भावना आहे’ असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या पर्यटन वाढीसाठी अभिनव योजना राबविल्या जात आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसांचा जागतिक कला महोत्सव आयोजित करण्यात येईल. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीचे कलाकार सहभागी होतील. दररोज ५० हजार लोक कलामहोत्सव पाहतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात येईल. कला महोत्सव नागरिकांसाठी मोफत असेल. महोत्सवच्या तयारीसंदर्भात विविध घटकांना सूचना केल्या आहेत.’

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘राज्यातील दहा प्रमुख पर्यटन व धार्मिक स्थळांत कोल्हापूरचा समावेश होतो. जिल्ह्यात निसर्गाची मुक्त हस्ते उधळण आहे. पर्यटनवाढीसाठी गेल्या तीन वर्षांपासून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. नवऊर्जा उत्सव, फ्लॉवर फेस्टिव्हल यांसारख्या अभिनव संकल्पना राबविल्या. एप्रिल आणि मे महिन्यात ‘कोल्हापूर दर्शन’ या थीमवर ​जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर सहलींचे आयोजन केले जाईल. दोन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी दोन दिवसांच्या ४० ते ५० सहली असतील. जिल्ह्यातील अपरिचित, वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांना यात प्राधान्य असेल. या पर्यटन सहलीसाठी बुकिंग करावे लागेल. शाळकरी विद्यार्थी, कॉलेजला जाणारे युवक, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनाच पर्यटन सहलींत प्राधान्य देण्यात येईल. दोन दिवसिय सहलींसाठी शुल्क घेतले जाणार नाही. दोन दिवस मोफत बसप्रवास, नाष्टा, भोजन, एका दिवसाच्या निवासाची सोय केली जाईल. या सहलींचा लाभ बाहेरील पर्यटकांनाही मिळावा यासाठी नियोजन केले जाईल. या सहलींत खिद्रापूर, मसाई पठार, नेसरी येथे शिवकालीन रणसंग्राम, विशाळगड अशा वैशिष्ट्यपूर्ण स्थळांचा समावेश असेल.

फ्लॉवर फेस्टिव्हलने फुलले उद्यान

कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या (केएसबीपी) पुढाकारातून कोल्हापुरात पहिल्यांदाच फ्लॉवर फेस्टिव्हल आयोजित केला आहे. फुलांच्या विश्वात सैर करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे पोलिस उद्यान नागरिकांच्या गर्दीनेही फुलले. २८ डिसेंबरपर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. फ्लॉवर फेस्टीव्हलचे उद्घाटन करण्या अगोदर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिस उद्यानाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर पॅक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांचा लाभ उठवत मोठ्या संख्येने कोल्हापूर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे शहर अक्षरशः पॅक झाले आहे. पर्यटनाचा आनंद घेत असतानाच करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली, तर अनेकजण बोचऱ्या थंडीमध्ये रंकाळ्यावर पक्षी निरीक्षणामध्ये गुंग झाले. अंबाबाई दर्शनानंतर अस्सल कोल्हापुरी पदार्थांचा आस्वाद घेत खरेदीचा आनंदही लुटला. दिवसभर प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्यानंतर अनेकांनी सायंकाळनंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

चौथा शनिवार, रविवारसह नाताळच्या सुटीची पर्वणी साधत पर्यटकांनी शनिवारपासून कोल्हापुरात हजेरी लावण्यास सुरुवात केली. कुटुंबांसह पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी करवीर निवासिनी अंबाबाई आणि भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर अनेक ऐतिहासिक स्थळांनी भेटी दिल्या. पन्हाळा, रांगणा किल्ल्यांसह जोतिबा, खिद्रापूर, नृसिंहवाडी, मसाई पठारांवर पर्यटकांची तोबा गर्दी दिसत होती. राधानगरी धरण, पाटगाव, रंकाळा, कळंबा तलावासह प्रयाग चिखली येथील संगमावर पर्यटकांनी गर्दी केली होती. तर काही पर्यटकांनी दाजीपूर अभयारण्याची सफरही केली. तर काहींनी रंकाळा तलावार बोचऱ्या थंडीत पक्षी निरीक्षणाची पर्वणी साधली.

अंबाबाई दर्शनासाठी तर भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. अंबाबाई मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडप, पिण्यासाठी पाणी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. भाविकांना लाडूचा प्रसाद मिळण्यासाठी अतिरिक्त लाडूही तयार करण्यात आले होते. देवीच्या दर्शनानंतर पर्यटकांची पावले गुजरी आणि चप्पल लाइनकडे वळत होती. कोल्हापुरी साज आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीनंतर कोल्हापुरी खासीयत असलेल्या पदार्थ आणि वस्तूची खरेदी करत होते. पर्यटकांच्या गर्दीमुळे शहरातील सर्वच खाऊगल्लीसह पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटवर गर्दी करत होते. यामुळे सर्वत्र गर्दीच गर्दी दिसत होती.

दोन-तीन दिवसांच्या पर्यटनानंतर अनेकांनी कोकण, गोव्यासाठी सायंकाळनंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. काही पर्यटक बाहेर जात असताना तितक्याच प्रमाणात नवीन पर्यटक कोल्हापुरात दाखल होत होते. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वर्षाखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या शहर गजबजून गेल्याने शहरात कोट्यवधींची उलाढाल झाली.


दिशादर्शक फलकांनी केली वाट सोपी वाट

गेल्यावर्षी शहरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, रंकाळा, न्यू पॅलेस, टाउन हॉल किंवा साठमारीकडे जाणारा मार्गच पर्यटकांना सापडत नव्हता. त्यामुळे पर्यटकांना इच्छीतस्थळी पोहोचण्यासाठी चांगलाच फेरफटका मारावा लागत होता. जानेवारीमध्ये मात्र अनेक स्वयंसेवी संस्थांसह महापालिकेने ठिकठिकाणी पर्यटनस्थळांकडे किंवा अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक फलक अंतरासह लावले. त्याचा उपयोग बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना होत आहे.

पार्किंगमध्ये गर्दी

वर्षाखेर आणि ख्रिसमसमुळे अनेकांनी पर्यटनाचा बेत आखला आहे. काहीजण थेट तिरुपती दर्शनानंतर करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येतात. पण मंदिराजवळ पार्किंगची प्रशस्त जागा नसल्याने नेमके वाहन कोठे पार्किंग करायचे असा प्रश्न पर्यटकांना पडला. काहींनी रस्त्याच्या बाजूलाच पार्किंग करतात, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनेकदा वाहने टोइंग व्हॅन किंवा जॅमर लावला जात असल्याने वादाचे प्रसंगही निर्माण होत आहेत.

हॉटेल्स हाउसफुल्ल

चौथा शनिवार, रविवार आणि नाताळच्या सुट्ट्या मिळाल्यांमुळे पर्यटकांनी कोल्हापूरला पसंती दिली आहे. कोल्हापुरातील पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर जवळच कोकण आणि गोवा असल्याने किमान एक दिवस तरी पर्यटक कोल्हापुरात मुक्काम करत आहेत, पण वाढलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे शहरातील सर्वच हॉटेल्स हाउसफुल्ल झाली आहेत. अनेक हॉटेल्समध्ये पर्यटकांना रुम मिळत नसल्याने आपल्या नातेवाईक अथवा ओळखीद्वारे रुमस् मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वीजनिर्मिती प्रकल्पाचा भुसा जळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
मिरज तालुक्यातील तुंगनजीकच्या साईन यू बायोमास पॉवर प्लँट, या खासगी वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पावरील पामकेशर (भूसा) साठ्याला मंगळवारी दुपारी आग लागली. सुमारे २५ ते ३० ट्रक भूसा जळून खाक झाला. सांगली, कुपवाड, आष्टा, इस्लामपूर येथील अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी धाव घेऊन सायंकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले.
मुंबईतील काही उद्योजकांनी एकत्रित येऊन तुंग गावच्या हद्दीत सुमारे ११ एकर परिसरात खासगी वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. कडबाकुटी, ऊसाचा पाला, पामचा भुसा याचा वापर करून सुमारे दहा मेगावॉट वीजेची निर्मिती केली जाते. मंगळवारी दुपारी पामचा भुसा असलेल्या ठिकाणी आग लागली. पाम भुशामध्ये धग निर्माण होत असते. त्या धगीमुळेच आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आग धुमसत असून, धूर येत असल्याचे दिसताच संबधितांनी जेसीबीच्या सहाय्याने त्या परिसरातील इतर साठा वेगळा करायला सुरुवात केली. सांगलीच्या दोन, कुपवाडच्या दोन आणि आष्टा, इस्लामपूरमधून प्रत्येकी एक, असे सहा अग्नीशमन दलाचे बंब धावत आले. त्यांनी एकसारखा पाण्याचा मारा करून सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सातशे एकरांवर आग; सत्तर लाखांचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
वाडीभागाई (ता. शिराळा) येथील डोंगरात गवताला शॉर्ट सर्किटने सोमवारी दुपारी आग लागली. सुमारे ७७० एकरमधील उभे गवत, कापलेले गवत तसेच वनसंपदा, लहान-मोठे प्राणी आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे अंदाजे ७० लाखांचे नुकसान झाले आहे.
या परिसरात गेल्या आठ-नऊ वर्षांपासून अशा घटना वांरवार घडत आहेत. २०१५च्या उन्हाळ्यात घडलेल्या जळीत घटनेत यशवंत खोत व बाळाबाई खोत या वयस्कर दाम्पत्याचा आगीत होरपाळून मृत्यू झाला होता. अशा घटना घडूनही वीज मंडळाकडून या बाबत अद्याप कोणत्याही प्रकारची दक्षता किवा खबरदारीचा उपाय केलेला नाही. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. सोमवारी घडलेल्या घटनेनंतरही या परिसरातील शेतकरी आक्रमक आहेत. या परिसरातून ३३ केव्हीच्या विद्युत तारा गेल्या आहेत. या ताराचे शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी गवतावर पडताच आगीने रुद्ररूप धारण केले. वाळलेले गवत व वारा यामुळे आगीचा जोरात भडका उडाला. ही माहिती कळताच वाडीभागाई, कणदूर, पुनवत, नाटोली, अस्वलवाडी, पावलेवाडीचे नागरिक आणि वन विभागाचे कर्मचारी अशा पाचशेहून अधिक लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशीरापर्यंत प्रयत्न केले. विश्वास सहकारी साखर कारखान्याची अग्नीशामन गाडी बोलावली होती. पण, डोंगरात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गाडी परत नेण्यात आली. सोमवारी घटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, विराज नाईक, वीज वितरणाचे सहायक अभियंता बुचडे यांनी भेट देऊन पाहणी केली. काही लोकांनी मागील काही दिवसापांसून गवत काढणीस सुरुवात केली आहे. पण, जवळपास ९९ टक्के क्षेत्रावरील गवत कापलेले नसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
वीज वितरणच्या हलगर्जीमुळे मोठे नुकसान
अशा घटना वारंवार घडूनही याचे गांभीर्य वीज वितरण कंपनीस नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. वीज वितरण कंपनी २०१३च्या घटनेची शेतकऱ्यांना नोटीसा काढून पुरावे देण्याचे सांगत आहे. हे जबाबदारी टाळण्याचे काम आहे. मात्र, या वेळेला वीज कंपनी तसेच महसूल विभाग यांनी सर्व पुरावे स्वतः नागरीकांचे सहकार्य घेवून गोळा करावेत. या बाबत तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या ऊर्जामित्र बैठकीत या बाबत आपण टोकाची भूमिका घेऊ. या आगीच्या घटनेत शेतकऱ्यांचे जवळपास ६० ते ७० लाखांवर नुकसान झाले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. हे फक्त वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे घडले आहे. याची सर्वस्वी जबाबदारी वीज कंपनीने स्वीकारून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांनी आंदोलन करून काही बरे-वाईट घटना घडल्यास त्यांची सर्व जबाबदारी वीज वितरण कंपनी व इतर संबधित विभागाची राहील, असा इशारा आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिला आहे.
‘मडल अधिकारी, तलाठ्यांना संबधित शेतकऱ्यांचे सात-बारा, खाते-उतारा व पंचनामा करण्यासाठी लागणारी इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. वीज वितरण कंपनीचे अभियंता एस. ए. कोळी यांनी या जळीत घटनेचा सविस्तर अहवाल १५ जानेवारीपर्यंत देऊ.​ ’ असे
तहसीलदार ​ दीपक शिंदे म्हणाले,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वाळव्यात १२० एकर ऊस जळाला

$
0
0

इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील नवेखेड येथील सुमारे एकशे वीस एकर क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. परिसरात ऊस तोडणी सुरू असल्याने हा प्रकार लक्षात आला. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ऊस तोडणी मजुरांच्या दोन बैलगाड्या जळाल्या. रात्री उशिरापर्यंत आगीचे लोळ दिसत होते. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सुमारे सत्तरहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
नवेखेड येथील बारा व आठ बिगा परिसरातील जाधव मळ्यातील शिवारात दुपारी ऊसतोडणी सुरू होती. या दरम्यान परिसरातील ऊसाला आग लागल्याचे मजुरांच्या व काही शेतकऱ्यांच्या लक्षात आले. थोडक्यात असणारी आग वाऱ्याने वेगाने वाढली. आग आटोक्यात आणण्यासाठी हुतात्मा साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. मात्र, आग वाढतच गेली. घटनास्थळी शेती विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच शेतकऱ्यांनी गर्दी केली.
आगीत निवास ज्ञानदेव जाधव, शंकर दादू जाधव, शिवाजी दादू जाधव, बाबुराव आनंदा जाधव, युवराज शामराव जाधव, अशोकराव सदाशिव जाधव, हौसेराव महादेव जाधव, विलास रामचंद्र जाधव, वसंत रामचंद्र जाधव, सर्जेराव रामचंद्र जाधव, बाबुराव पाडुरंग जाधव, पोपट पाडुरंग जाधव, सयाजी कदम, संपत कदम, शिवाजी कृष्णा कदम, रामचंद्र आत्माराम जाधव, सुनील संभाजी जाधव, सुबराव आत्माराम जाधव, राजाराम सदाशिव जाधव, भास्कर महादेव जाधव, मारूती महादेव जाधव, विजय बाजीराव जाधव ( सर्व रा. नवेखेड) युवराज शंकर तांदळे, दीपक बाळकृष्ण सूर्यवंशी, प्रमोद रामचंद्र खंडागळे, सुभाष विष्णू ताटे, सचिन महावीर हिंगणे, रामचंद्र कोरे, विशाल शिंदे, मनोहर नायकवडी, संभाजी माने, रामचंद्र माने, सोनाबाई महाजन (सर्व रा. वाळवा)
या शेतकऱ्यांचे एकूण सुमारे १२० एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
राजारामबापू व हुतात्मा साखर कारखान्याच्या नोंदी असणारे हे ऊस क्षेत्र आहे. आग नेमकी कशाने लागली या बाबत अनभिज्ञता आहे. पण, शॉर्ट सर्किटने प्रकार घडल्याची घटनास्थळी चर्चा होती. हुतात्मा साखर कारखान्याच्या दोन अग्निशामन गाड्या दाखल झाले होत्या. आग मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे आग आटोक्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस, दुधाच्या हमीभावासाठीबळीराजाचा कराडमधून एल्गार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कर्जमाफीची प्रक्रिया गतीमान करण्यासह ऊस, दुधासह सर्वच शेती उत्पादनांना किमान हमीभाव मिळण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारी कराडमधून झाली. शेतकऱ्यांनी जनावरांसह मोर्चा काढला.
बळीराजा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून, निर्णायक व शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असे हटके आंदोलन आजपासून सुरू केले आहे. या आंदोलनात राज्यातील शेतकरी आपापल्या तहसीलदार कार्यालयावर जनावरांसह मोर्चे काढत आपल्या मागण्यासाठी सरकारला जागे करणार आहेत. कराड तहसीलदार कार्यालयावर मंगळवारी दुपारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकऱ्याचे नेते पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना सादर केले. हा मोर्चा दुपारी बारा वाजता येथील कोल्हापूर नाका परिसरातून सुरू झाला.कराड शहर पोलीस ठाणे मार्गे दत्त चौक,मार्केट यार्ड चौक असा पुढे तहसील कार्यालयाकडे गेला. त्याठिकाणी प्रमुख मान्यवरांनी मोर्चेकर्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिले.
कर्जमाफीची घोषणा होऊन सहा महिने होऊनही अनेकांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. यासाठी ही प्रक्रिया अधिक गतीमान करावी, दुधाला उत्पादन खर्चावर आधारीत कायद्याने हमीभाव मिळावा, दूध उत्पादकाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान मिळून ते थेट त्याच्या बँक खात्यात जमा करणयात यावे, म्हैशीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ५० तर गायीच्या दुधाला ३५ रुपये दर मिळावा आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
मोर्चात कराडसह परिसरातील शेकडो शेतकरी आपल्या जनावरांसह सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील आणि संस्थापक बी. जी. पाटील यांनी केले. मोर्चात संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष साजिद मुल्ला, दूध उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन इंद्रजित जाधव, जिल्हा युवा अध्यक्ष विश्वासराव जाधव आदी सहभागी झाले होते. या मागण्यासांठी शेतकऱ्यांचे आंदोलन राज्यभर सुरू राहणार असून, याची सुरुवात कराडमधील मोर्चाने झाली असल्याचे पंजाबराव पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासवडे टोलनाक्यातघुसला कंटेनर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे (ता. कराड) येथील टोलनाक्यावरील बुथमध्ये कंटेनर घुसला. या घटनेत मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
कंटेनर (आर जे ०६ जी सी ०१६८ हा पुण्याच्या दिशेने निघाला होता. तो तासवडे टोल नाक्यावर आला असता कंटेनर चालकाचा ताबा सुटून कंटेनर थेट टोल बुथवर जावून थडकला. या धक्कयाने टोलचा एक बुथ जमीनदोस्त झाला. कंटेनरच्या धक्क्याने टोलच्या बुथसह टोल प्रणालीचा संगणक, सीसीटीव्ही व इतर आधुनिक यंत्रणेचे सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. अपघातानंतर वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांचा इएसआयवर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

औद्योगिक कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नियोजित आराखडा तयार करण्याचा निर्णय ईएसआयचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत झाला. येत्या पाच जानेवारीला ईएसआय मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या सोबत ईएसआय अधिकारी आणि संघटना समितीची बैठक घेण्याचे ठरले. ईएसआय रुग्णालय तातडीने सुरू करावे, यासह अन्य मागण्यांसाठी औद्योगिक कामगारांनी ईएसआयसी रुग्णालयावर मंगळवारी मोर्चा काढला. घोषणाबाजी, लाल झेंडे आणि फलकांनी मोर्चाचे लक्ष वेधले.

रुग्णांना येणाऱ्या अडचणी, रक्तदाब, मधुमेह आदी औषधे नियमित द्यावीत. सेवा व्यवस्थित देण्याच्या डॉक्टरांना सूचना द्याव्यात, एक एप्रिलपासून स्पेशल ओपीडी सुरू करून त्याची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांवर सोपविण्यात येईल. लॅब आणि कॅज्युअल्टी विभाग सुरू करावा, ईएसआय रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी दिल्ली आणि मुंबई येथे संपर्क करून त्याचा १६ जानेवारीपर्यंत आराखडा निश्चित करावा, महाराष्ट्रात काम करणाऱ्या आणि कर्नाटकात राहणाऱ्या कामगारांना निपाणी येथे सेवा मिळावी. त्यासाठी पुणे कार्यालय बेंगळुरू कार्यालयाशी पत्रव्यवहार करून सेवा उपलब्ध करुन देईल, असे निर्णय बैठकीत घेण्यात आले. पुणे येथील इएसआयचे अतिरिक्त आयुक्त गुणशेखरन, वैद्यकीय अधीक्षक आणि कोल्हापूरचे प्रभारी डॉ. सुनील झोंडे, सहायक निदेशक विलास वाघमारे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

विक्रम हायस्कूल येथून मोर्चाची सुरुवात झाली. सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे म्हणाले, राज्य कामगार विमा योजना राज्यात अनेक भागात लागू करण्यात आली. मात्र कोल्हापुरात रुग्णालय सुरू झालेली नाही. इएसआयकडे येणाऱ्या निधीत वाढ झाली आहे. मात्र त्या प्रमाणात सुविधा दिलेल्या नाहीत.

सुरेश पाटील म्हणाले, ‘औद्योगिक कामगारांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. कामगारांच्या वेतनातून ईएसआय कपात केली जाते. त्याचा फायदा मिळत नाही. रुग्णालय सुरू झाल्यास उपचार होण्यासाठी कामगारांच्या कुटुंबियांनी सोयीचे ठरणार आहे. ईएसआय रुग्णालय तातडीने सुरू करावे. गावागांवत ईएसआय डॉक्टरांची नियुक्ती करावी. मधुमेह, रक्तदाब आदींसाठी औषधांचा साठा वाढवावा. इएसआयसाठी मेडिकल स्टोअर असावे. रुग्णालयाचा लाभ घेण्यासाठी असलेली वेतन मर्यांदा काढून टाकावी. सर्व इपीएस पेन्शनरांना मोफत औषधोपचार उपलब्ध करुन द्यावे, आदी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. विक्रमनगर येथील मेनन कंपनीचे सुरेश पाटील, मार्वलस मेटल्स (इंटक) चे सुरेश पाटील, संजय गावडे, बाळकृष्ण करले, राजकुमार जाधव आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. मोर्चात शिरोली, गोकुळशिरगाव, कागल एमआयडीसी, विक्रमनगर, आष्टा येथील कामगार, मेकॅनिकल, मेनन अॅण्ड मेनन कामगार कर्मचारी संघटना सहभागी झाल्या. एस. टी. चे खासगीकरण रद्द करावे, या मागणीसाठी एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुधाळीत कामगार गुदमरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिकेच्या दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रंगकाम करताना सात कामगार गुदमरले. केमिकलच्या वासाने एक कामगार बेशुद्ध पडला होता. मुकादमाने तातडीने अग्निशामक दलास कळवल्याने अत्यवस्थ कामगारांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी (ता. २६) चारच्या सुमारास ही घटना घडली. सायबा हंसदा (वय २७), गारलाई हेमरण (३०), रुपाई मुरमू (२८), गोपाल हंसदा (३०), राजू तुडू (२५), उदय वीर (२७) आणि सोनाराम हंसदा (२८, सर्व रा. बंगाल) अशी अत्यवस्थ कामगारांची नावे आहेत.

दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम सुरू आहे. या केंद्रातील पाणी साठवण्याच्या टाकीचे आतील बाजुचे रंगकाम सुरू आहे. लक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्टर कंपनीने हे काम पुण्यातील गीता सरफेस कोटिंग कंपनीकडे दिले आहे. कंपनीचे कर्मचारी गेल्या आठवड्यापासून रंगकाम करीत आहेत. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पाच कर्मचारी ४० फूट खोल ३० फूट रुंद टाकीत उतरले. दोन कर्मचारी टाकीच्या वरच्या जागेत थांबले होते. टाकीत उतरलेल्या कामगारांनी रंगाचे मिश्रण करून काम सुरू केले. कामगारांचा आवाज न आल्याने उदय वीर या कामगाराने टाकीत जाऊन पाहिले असता, एक कर्मचारी बेशुद्ध अवस्थेत पडला होता, तर इतर चौघे बेशुद्ध अवस्थेतील कामगाराला उठवण्याचा प्रयत्न करीत होते. टाकीतील उग्र वासानेच कामगार अत्यवस्थ झाल्याचे लक्षात येताच वीर याने मुकादम संजय कदम यांना घटनेची माहिती दिली. कदम यांनी तातडीने अग्निशामक दलास वर्दी दिली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या मदतीने टाकीतील कामगारांना बाहेर काढून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. यावेळी सायबा हंसदा हा कर्मचारी बेशुद्धावस्थेत होता, तर इतर चौघे अत्यवस्थ होते. उपचारानंतर सर्व कामगारांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. रंग, पाणी आणि टाकीतील केमिकलच्या मिश्रणामुळे टाकीत विषारी वायुची निर्मिती झाली, अशी माहिती मुकादन कदम यांनी दिली. टाकीतील कामगारांचा आवाजही बाहेर येत नव्हता. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. कामादरम्यान पाण्याच्या टाकीत ऑक्सिजन सिलिंडर आणि एक्झॉस्ट फॅनची सोय उपलब्ध केली नसल्याने कामगारांना धोका निर्माण झाला, असे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले. यावेळी महापालिकेतील इंजिनीअर सूर्यकांत कोळेकर, फिरोज अन्सारी, आदी सीपीआरमध्ये उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८ टोळ्यांतील गुंडांची संपत्ती सील होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोल्हापूर परिक्षेत्रात संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी ३८ टोळ्यांतील तीनशेहून अधिक गुंडांवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. हे गुंड पुन्हा गुन्हेगारी कृत्यांकडे वळू नयेत, यासाठी त्यांची संपत्ती सील करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. कोर्टाच्या परवानगीने लवकरच सर्व गुंडांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. परिक्षेत्रात पहिल्यांदाच ही कारवाई होत आहे,’ अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये संघटित गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. खासगी सावकारी, खंडणी वसुली, टोळी युद्ध, मटका, जुगार आणि मद्य तस्करी असे अवैध धंदे बोकाळले होते. बेकायदेशीर व्यवसायांमधून पैसा मिळवून गुन्हेगारी कृत्यांच्या माध्यमातून दहशत माजवण्याचे प्रकार वाढले होते. याला आळा घालण्यासाठी परिक्षेत्रातील पोलिसांनी ३८ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळ्यांमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील तीनशेहून अधिक सराईत गुंडांचा समावेश आहे. या गुंडांचे कारनामे पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जाणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात पहिल्यांदाच गुंडांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. संपत्ती जप्त करून सराईत गुंडांची नाकेबंदी केली जाणार आहे, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली.

मोक्का कारवाई झालेल्या टोळ्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक टोळ्यांचा समावेश आहे. यात भूखंड माफिया, खंडणीखोर, झोपडपट्टीदादा, खासगी सावकार यांचा समावेश आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील खंडणीखोरांचाही यात समावेश आहे. या सर्व गुंडांची संपत्ती सील करण्याचा प्रस्ताव तयार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार लवकरच पुढील कारवाई होणार आहे. या कारवाईमुळे गुंडांची आर्थिक रसद ठप्प होईल. यातून त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंद बसेल, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैयक्तिक स्वच्छता महत्वाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मासिक पाळी ही स्त्रिला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. त्या काळात स्वच्छता ठेवल्यास आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पारंपरिक गैरसमजांपासून दूर रहात शालेय मुलींनी मासिक पाळी दरम्यान वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर द्यावा’, असे आवाहन शारीरबोध संस्थेच्या अध्यक्षा राजश्री साकळे यांनी मंगळवारी केले. लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. साकळे यांनी कार्यक्रमात ओघवत्या शैलीत ‌किशोरवयीन मुलींना समजेल अशा भाषेत त्यांनी मार्गदर्शन केले.

राजश्री साकळे म्हणाल्या, ‘मासिक पाळी सुरू होणे हा मुलींच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. गर्भाशयातील निरूपयोगी रक्ताचे अस्तर दर महिन्याला बाहेर येते. त्यास मासिक पाळी म्हटले जाते. या विषयावर चर्चा करणे टाळले जाते. संकोच केला जातो. मात्र, प्रत्येक मुलीने मासिक पाळी, स्त्री-पुरूषाची शरीर रचना समजून घेणे महत्वाचे आहे. त्या कालावधीत स्वच्छता न ठेवल्यास गर्भाशयासंबंधीचे आजार होण्याची शक्यता असते. गर्भाशयाची पिशवी काढण्यास मासिक पाळीवेळी स्वच्छता न ठेवणे हे महत्वाचे कारण आहे. परंतु, अजूनही कुटुंबातील आईसुध्दा आपल्या मुलीस पाळीसंबंधी सखोल माहिती देत नाही. त्यामुळे मासिक पाळी आल्यानंतर मंदिरात जायचे नाही, विटाळाचे जगणे अशा चुकीच्या समजुतींचा प्रभाव मुलींवर होतो.’

राजश्री साकळे म्हणाल्या, ‘मासिक पाळीच्या काळात अनेक मुलींना त्रास होतो. जास्त त्रास जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून औषधे घ्यावीत. किरकोळ त्रास असल्यास लक्ष न देता अभ्यासावर व दैनंदिन कामावर लक्ष केंद्रीत करावे. कापडाऐवजी सॅनिटरी नॅपकीनचा वापर करावा. प्रत्येक सहा तासांनी नॅपक‌ीन बदलावे. कापड वापरत असल्यास अधिक स्वच्छता ठेवणे आवश्यक ठरते. वापरलेले कापड स्वच्छ धुऊन वाळत घातल्यास जंतूसंसर्ग होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे.’

यावेळी मुख्याध्यापिका भुपाली शिंदे, शिक्षिका संगीता सातपुते, स्मिता पाटील यांच्यासह शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

छेडछाडीविरोधात सतर्क रहा

‘मुलींनी नेहमी सतर्क राहावे. कुठेही छेडछाडीचा प्रकार घडल्यास घरी, शाळेतील शिक्षकांना त्वरित माहिती सांगावी. कधीही परक्या महिलेवर आणि पुरूषांवर विश्वास ठेऊ नये. पोटभर सकस आहार घ्यावा. स्पर्धांमध्ये भाग घेणे, भाषणे ऐकणे, टीव्हीच्या आहारी न जाणे, ध्येय ठरवत व्यक्तिमत्वाचा विकास साधणे या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा’ असे आवाहन राजश्री साकळे यांनी केले.

आईनेही सांगितले नव्हते

कार्यक्रमात साकळे यांनी, मासिक पाळी, गर्भाधारणा, स्त्री, पुरूष शरीर रचना, लैंगिक शोषणाला बळी न पडण्याबाबतची सतर्कता याची सविस्तर माहिती दिली. त्यांचे मार्गदर्शन संपल्यानंतर मुलींनी ‘साकळे मॅडमनी सांगितलेली माहिती आमच्या आईनेही सांगितली नव्हती’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुलींचा गराडा

मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपल्यानंतर शंका, अडचणी आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुलींनी साकळे यांच्याशी संवाद साधला. साकळे यांनी मुलींच्या शंकांचे निरसन केली. महत्वाचा विषय किशोरवयीन मुलींपर्यंत पोहचवण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे राबविला जात असलेला ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ हा उपक्रम चांगला असल्याची प्रति‌क्रियाही मुलींनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाविकांचे प्राण वाचवल्याचे समाधान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘अचानक झालेला अंदाधुद गोळीबार, यात्रेकरुंचा आरडाओरडा, अरुंद रस्ता आणि काळोखातून भरधाव वेगाने सुमारे ५० किलोमीटर बस चालवून अमरनाथ यात्रेकरुंचे प्राण वाचविल्याचे भाग्य मिळाले. मिलटरी कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर हे समाधान अधिक आनंददायी होते. मात्र, गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने माझ्या शौर्याची दखल अद्याप घेतली नाही’ अशी खंत सलीम गफूर शेख यांनी केली. अतिरेक्यांच्या हल्ल्यांतून अमरनाथ यात्रेकरुंचे प्राण वाचवलेल्या सध्या व्यवसायानिमित्त गुजरात येथे वास्तवास असलेल्या आणि मुळचा जळगावच्या सलीम शेख यांचा मुस्लिम बोर्डिंगच्यावतीने मंगळवारी वार्तालाप झाला. यावेळी शेख यांनी चित्तथरारक प्रसंगाच्या आठवणी जागवल्या.

सलीम शेख म्हणाले, ‘हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा ही सर्वात मोठी आणि प्राचीन यात्रा आहे. यात्रेला महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यांतून भाविक येतात. १७ जुलै रोजी यात्रा फार पडली. दर्शनसोहळा पार पडल्यानंतर ६२ प्रवासी घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. अनंतनाग येथे आल्यानंतर बसचे चाक पंक्चर झाल्यामुळे चाक बदलण्यासाठी रस्त्याकडेला बस घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबारात स्वत:चा बचाव केला, पण सहाय्यक चालकास दोन गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. बसवर गोळीबार झाल्याचे लक्षात येताच आहे त्या स्थितीत बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. काळोख्या रात्रीत नेमका कोणत्या बाजुने गोळीबार सुरू आहे हे लक्षात येत नव्हते. बेछुट गोळीबारात सात भाविकांना प्राण गमवावे लागले. आठजण गंभीर जखमी झाले. मात्र इतरांना वाचविण्याचा प्रयत्न केला.’

सलीम शेख म्हणाले, ‘गोळीबार सुरू असताना प्रवासी प्रचंड बस थांबवण्यासाठी आरडाओरड करत होते. गाडीचा अधिक वेग वाढवत मिलटरी कँपकडे जाण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. सुमारे ७० किलोमीटर प्रतितासच्या वेगाने दोन किलोमीटर अंतर पार पडले. त्यानंतर मिलटरी कँपवर दाखल झालो. गोळीबाराची माहिती दिली. तत्काळ सैनिकांनी यात्रेंकरुंवर झालेल्या गोळीबाराचा संदेश इतर विभागांना देऊन दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली. भारतीय जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, याची माहिती नंतर मिळाली. त्यामुळे अतिशय आनंद झाला.’

शेख म्हणाले ‘बसचा चालक असल्याने मला प्रवासांची सुरक्षितता महत्त्वाची वाटली. सुरक्षिततेसाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भाविकांना सुखरुप आणणे एवढेच माझे कर्तव्य होते. हे कर्तव्य पार पाडण्यास यश आले, याचे समाधान आहे. यानंतर गुजरात सरकारने शौर्यपदकांसाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली, तर काश्मिरमधील सरकारने बक्षीस जाहीर केले. ते अद्याप मिळालेले नाही. महाराष्ट्र सरकारने नुसताच गौरव केला’ असे शेख यांनी सांगितले.

यावेळी गणी आजरेकर, अशोक रोकडे, विनोद कांबोज, कादर मलबारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक आराखड्याचे काय झाले?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे शहराची कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिस आणि महापालिकेच्या वतीने वाहतूक आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्याचे नेमके काय झाले?’ असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. शहरातील वाहतूक कोंडीबाबत मंगळवारी (ता. २६) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक संजय माहिते यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.

सलग सुट्यांमुळे पर्यटकांनी कोल्हापूरला पसंती दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून रोज लाखो पर्यटक शहरात हजेरी लावत आहेत. परिणामी वाहतुकीचा मोठा ताण शहरातील रस्त्यांवर पडत आहे. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि महापालिकेकडून वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, मात्र याला अपेक्षित गती नाही, त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि विजय देवणे यांनी मंगळवारी शिष्टमंडळासह पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन शहरातील वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली. त्याचबरोबर वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी काही उपायही सुचवले.

‘गर्दीच्या मार्गांवर सम-विषम तारखांना पार्किंग करावे. मिरजकर तिकटी ते नंगीवली तालीम चौक मार्गावर एकेरी वाहतूक करावी. लक्ष्मीपुरीतील जुना लोखंड बाजार पांजरपोळ परिसरातील औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित करावा. अवजड वाहनांना सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत शहरात प्रवेशबंदी करावी. मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर खासगी बसेसना थांबण्यास परवानगी देऊ नये. बेवारस वाहने हटवावित. धान्य लाइन विक्रमनगर येथे स्थलांतरित करावी. नवीन इमारतींना बांधकाम परवाना देताना पार्किंगसाठी जागा राखीव ठेवणे बंधनकारक करावे,’ अशा मागण्या निवेदनातून केल्या आहेत. अधीक्षक मोहिते यांनी निवेदन स्वीकारले. ‘वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिस विशेष लक्ष देत आहेत. यासाठी महापालिकेसह नागरिकांनीही सहकार्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, शशी बिडकर, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, अजिंक्य पाटील, आदी उपस्थित होत. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ हेदेखील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images