Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तांदूळ साठ्यांची चौकशी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालेय पोषण आहारातील तांदूळ, धान्यादी वस्तूतील मापात माप प्रकरणावर आठवड्यापूर्वी महाराष्ट्र टाइम्सने वृत्तमालिका प्रसिद्ध करून प्रकाशझोत टाकला. त्यानंतर शिक्षण प्रशासन हडबडून जागे होऊन या प्रकरणाची चौकशी गतिमान केली आहे. येथील मार्केट यार्ड परिसरातील खासगी गोडाऊनमध्ये सापडलेल्या शालेय पोषण आहाराच्या तांदूळ पोत्यांचा हिशोब घेण्याचे काम सुरू आहे. ‌पोत्यांच्या हिशोबात तफावत आढळत असल्यामुळे मापातील पापाचे प्रकरण व्यापक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

करवीर तालुक्यातील‌ शिंगणापूर विद्यामंदिर शाळेत पोषण आहाराचे धान्य पोहच करताना ग्रामस्थांनी ठेकेदाराचे मापातील पाप उघडकीस आणले. याप्रकरणी ठेकेदार एम. पी. भुतडा यांच्यासह मुख्याध्यापक, महिला बचत गट अध्यक्षांना नोटीस दिली. दरम्यान, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जात मार्केट यार्ड परिसरातील गोडाऊनमधील पोषण आहाराचा साठा उघड केला.

पोषण आहारात मोठा घोटाळा असून सखोल चौकशी करावी, अशी मागणी देसाई यांनी जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. यासंपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्तमालिका प्रसिद्ध झाली. त्याची दखल प्रशासनास घ्यावी लागली. गोडाऊनमध्ये सापडलेले तांदूळ व इतर धान्यादी पोती कोणत्या महिन्यांचे आहेत. मागणी केल्याप्रमाणे धान्य आले असेल तर शिल्लक कसे राहिले, त्याची माहिती प्रशासन ठेकेदार भुतडा यांच्याकडे मागितली आहे. त्यांनी दिलेली माहिती बरोबर आहे ‌किंवा नाही हे तपासण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पोषण आहाराचा सविस्तर तपशील घेतला जात आहे. ठेकेदार, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडील अहवालानंतर गोडाऊनमध्ये धान्यांचा साठा का आणि कसा शिल्लक राहिला हे समोर येणार आहे.

कारवाई टाळण्यासाठी फिल्डिंग

शिंगणापूर शाळेतील आहारातील वजनातील तपावतीच्या प्रकरणात ठेकेदार भूतडा यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तो अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे पाठवण्यात आला. ठेकेदार वरिष्ठ पातळीवर दबाव तंत्राचा वापर करीत कारवाई टाळण्यासाठी फिल्डिंग लावली असल्याचे माहिती मिळत आहे. यामुळेच चौकशी अहवालात ठेकेदाराकडे प्रमाणित वजन काटा नसल्याचे स्पष्ट नमूद असतानाही पुन्हा तो काटा वैधमापन विभागाकडे तपासणीसाठी पाठवले आहे. यामुळे ठेकेदार भुतडा यांच्यावर कारवाइ होणार की ‌क्लिनचीट मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बाजार समितीच्या आवारातील गोडाऊनमध्ये शिल्लक शालेय पोषण आहाराच्या धान्याची चौकशी सुरू आहे. धान्य साठा कोणत्या महिन्याचा आहे त्याचा तपशील घेतला जात आहे.

सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केएमटीचे करवीरदर्शन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना विविध ठिकाणी असणारी पर्यटनस्थळे एकत्र पाहण्यासाठी केएमटीच्यावतीने मंगळवारपासून (१२ डिसेंबर) ‘करवीर दर्शन’ ही विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३२ आसन क्षमतेची आकर्षक बस तयार करण्यात आली आहे. आठ तासांत १३ पर्यटन स्थळांना भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन सभापती नियाज खान यांनी दिली.

या बससाठी सध्या हॉटेल असोसिएशनच्या माध्यमातून बुकींग केली जाणार असून लवकरच वेबसाइटवरुन तसेच थेट केएमटी कार्यालयात फोनवरुन बुकिंग करता येणार आहे. या बससाठी एका व्यक्तीस १७५ रुपये तर बारा वर्षाखालील मुलांना ९० रुपये दर ठेवण्यात आला आहे. पर्यटनस्थळावरील प्रवेश शुल्क संबंधित पर्यटकांनी भरायचे आहे, असेही खान यांनी सांगितले. शिवाजी चौकामध्ये सकाळी साडेअकरा वाजता बसचे उद्‍घाटन महापौर हसीना फरास यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती देताना खान म्हणाले, कोल्हापूरला ऐतिहासिक तसेच धार्मिक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. स्वतःच्या वाहनातून फिरणे किंवा रिक्षा, चारचाकी वाहने बुकींग करुन परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी द्याव्या लागतात. त्यामुळे अनेक पर्यटनस्थळे पाहता येत नाहीत. पर्यटकांच्या सोईसाठी केएमटीच्यावतीने करवीर दर्शन ही बससेवा सुरू करण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता दसरा चौकातून बस सोडण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता रंकाळा येथे फेरी संपणार आहे. रंकाळा पाहून तिथून करवीर दर्शनच्या पासवर केएमटीच्या अन्य बसमधून जाता येणार आहे.

अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले म्हणाले, पर्यटन स्थळे व त्यांना पाहण्यासाठी लागणारा वेळ पाहता ही फेरी आठ तासांची असेल. ४५ किलोमीटरचा प्रवास होणार आहे. बसच्या दराव्यतिरिक्त विविध ठिकाणी असणारे प्रवेश शुल्क पाहता प्रौढास २९३ रुपये तर बारा वर्षाखालील मुलांना ७६ रुपये खर्च येणार आहे. हा खर्च प्रवाशांनी द्यायचा आहे. आकर्षक रंगसंगती व सजावटीची बस तयार करण्यासाठी अनंत खासबारदार यांनी सहकार्य केले आहे. या बसला मिळणारा प्रतिसाद पाहून आणखी बस वाढवता येऊ शकतील. स्टँड, रेल्वे स्टेशन तसेच अंबाबाई मंदिरातील पर्यटन माहिती केंद्राच्या ठिकाणी बसची माहिती देण्यात येणार आहे. याप्रसंगी शेखर कुसाळे, विजयसिंह खाडे, चंद्रकांत सूर्यवंशी, सयाजी आळवेकर, उमा बनछोडे उपस्थित होते.

या ठिकाणी फिरणार बस

चिमासाहेब चौक, दसरा चौकातील बोर्डिंग, टाऊन हॉल संग्रहालय, न्यू पॅलेस संग्रहालय, शाहू महाराज जन्मस्थळ, शिवाजी विद्यापीठ, कणेरी मठ, खासबाग मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, गंगावेश तालीम व दूध कट्टा, पोलिस उद्यान, रंकाळा

आणखी रखडू नये म्हणून...

मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी काही काम शिल्लक होते, त्यामुळे त्यावेळी उद्‍घाटन होऊ शकले नाही. त्यानंतर बस तयार होती. आता महापौर फरास यांचा मंगळवारी राजीनामा होणार आहे. नवीन महापौर येण्यास महिना जाईल. त्यामुळे तयार असलेली बस आणखी थांबून राहू नये, यासाठी मंगळवारी उद्‍घाटनाचा कार्यक्रम घेतल्याचे परिवहन सभापती खान यांनी सांगितले. याशिवाय अन्य कोणताही उद्देश नसल्याचे खान यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीलम माणगावे यांच्या कथासंग्रहाला राज्यपुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठी भाषा विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६’ची घोषणा सोमवारी झाली. शिक्षण व भाषामंत्री विनोद तावडे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. जयसिंगपूर येथील लेखिका नीलम माणगावे यांच्या ‘निर्भया लढते आहे’ या कथासंग्रहाला प्रौढ वाङ्मय लघुकथा प्रकारात ‘दिवाकर कृष्ण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. एक लाख, स्मृतिच‌िन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

दरम्यान सृजन प्रकाशन सांगलीतर्फे प्रकाशित सोनाली गावडे यांच्या ‘माझी दैनंदिनी’ या बाल वाङ्मय संकीर्णला व अस्मिता प्रकाशनतर्फे प्रकाशित प्रा. डॉ. जे. एन. गायकवाड यांच्या ‘कथा एका महामानवाची’ या कादंबरीला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला.

माणगावे यांची ५९ पुस्तके प्रकाशित आहेत. कथा, कविता, कादंबरी, ललित, बालवाङ्मय अशा विविध प्रकारात लेखन केले. ‘जसं घडलं तसं’ हे आत्मकथन प्रकाशित आहे. मुंबई विद्यापीठाच्या बीएभाग दोनच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश झाला आहे. ‘निर्भया लढते आहे’ हा कथासंग्रह २०१६ मध्ये प्रकाशित झाला. बलात्कारासारख्या सामाजिक प्रश्नांचा वेध घेत त्यामागील कारणांचा यात शोध घेतला आहे.


स्त्र‌ियांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या, अतिशय लाजिरवाण्या घटना समाजात घडतात. बलात्कारी कधी सापडतात, कधी सापडत नाहीत याची एक चीड स्त्री म्हणून सतावते. त्याला कथांच्या माध्यमातून मोकळी वाट करुन सामाजिक प्रश्न समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

नीलम माणगावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य कर्मचाऱ्यांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आश्वासन देऊनही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यासाठी निदर्शने, काम बंद आंदोलनाद्वारे गेले वर्षभर राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ जानेवारी आणि सात जुलै रोजी वर्षा बंगल्यावर मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली होती. पण सरकारने मागण्याबाबत दुर्लक्ष केल्याने सोमवारी निदर्शने करण्यात आली.

संघटनेच्यावतीने आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठवण्यात आले आहे. निवेदनात असले म्हणले आहे की, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी २०१६पासून लागू करण्यात येतील, अशी घोषणा करत बक्षी समितीची स्थापना केली होती. पण बक्षी समितीने अद्यापही राज्य सरकारकडे अहवाल सादर केलेला नाही याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करण्याबाबत सरकारची भूमिका नकारात्मक आहे. एक जानेवारी २०१७ चा महागाई भत्ता ऑगस्ट २०१७ पासून रोखीने देण्यात आला. पण सात महिन्याची थकबाकी अद्याप ​देण्यात आलेली नाही. निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा देण्यात यावी, विनाअट अनुकंपा भरती करावी, या मागण्याही प्रलंबित आहेत. पाच दिवसाचा आठवडा करावा, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

निदर्शनाचे नेतृत्व मध्यवर्ती संघटनेचे सहसचिव अनिल लवेकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, कार्याध्यक्ष सुनील देसाई, उपाध्यक्ष के. एम. बागवान, विलास कुरणे, संजीवनी दळवी, बी. एस. खोत, नितिन कांबळे, प्रकाश पाटील, विनायक लुगडे, उदय लांबोरे, सतीश ढेकळे अदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजीनाम्यापुर्वी उद्‍घाटनांचा धडाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नेत्यांनी महापौर म्हणून काम करण्यासाठी वर्षभराचा कालावधी दिल्याने समाधानी असल्याचे सांगणाऱ्या महापौर हसीना फरास यांच्या हस्ते राजीनाम्याच्या सभेपूर्वी मंगळवारी (१२ डिसेंबर) तासभरात तीन कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या दिव्यांगांना केबिन वाटपाबरोबरच गंगाराम कांबळे स्मृतिस्तंभाचे सुशोभीकरण व केएमटीच्या करवीर दर्शन बससेवेच्या उद्‍घाटनाचा समावेश आहे. वर्षभर महापौरपद भुषवल्यानंतर राजीनामा देण्याच्या सभेपूर्वीपर्यंत नवीन कामांचे उद्‍घाटन करण्याच्या या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे वर्षभरासाठी महापौरपद असताना सहा महिन्यांचे दोन महापौर होतील, अशी चर्चा होती. पण नेत्यांनी फरास यांना वर्षभराचा कालावधी देण्यात आला असल्याचे सांगितले. त्यानुसार वर्षभरात त्यांनी विविध विकास कामांसाठी प्रयत्न चालवले. त्यातील काही कामे मार्गी लागली. काही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये शाहू समाधीस्थळाच्या कामासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. महापौरपदाच्या कालावधीत समाधीस्थळ लोकार्पण करण्याचा त्यांचा विचार होता. त्यांनी या समाधीस्थळाभोवतीच्या संरक्षक भिंतीचे काम मार्गी लावले होते. पण मेघडंबरीचे काम अपुर्ण राहिले. त्यामुळे महापौरपदाच्या कालावधीत त्यांना लोकार्पण कार्यक्रम करता आला नाही.

राजर्षी शाहू महाराजांनी भाऊसिंगजी रोडवर गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून देण्याच्या घटनेला या महिन्यात शताब्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर फरास यांनी स्मृतीस्तंभाच्या नुतनीकरणाचे नियोजन केले होते. त्यासाठी पाहणी केली. त्यानंतर सुशोभिकरणात स्तंभाचे ग्रेनाईट बदलणे, एलईडी लाइट इफेक्ट देणे, लॅन्डस्केपींग करणे, स्तंभाच्या दोन्ही बाजूस दहा फूट सुशोभीकरण करणे, स्तंभापुढे सहा फूट ग्रेनाईट कट्टा करणे, शाहू महाराज व गंगाराम कांबळे यांचा इतिहास पर्यटकांना माहिती व्हावा यासाठी माहिती फलक तैलचित्रासह लावण्याच्या सूचना केल्या होत्या. या सुशोभिकरण कामाचे भू​मीपूजन महापौर फरास यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता ​पदाधिकारी व नगरसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

त्याबरोबर दिव्यांगांसाठी केबिन व पेन्शनच्या योजनेची संकल्पना त्यांची होती. त्यासाठी प्रशासनाकडून त्यांनी टेंडर करून घेऊन केबिन तयार करून घेतल्या. शहरातील विविध ठिकाणी त्या केबिन ठेवण्यात आल्या आहेत. पण त्यांना कोणत्या रस्त्यावर जागा द्यायची व कोणत्या ठिकाणी द्यायची नाही यावरुन या केबिन्सचे वाटप झालेले नाही. अजूनपर्यंत त्यांना हा तिढा सोडवता आला नाही. अपंग कल्याण कृती आराखडा तयार करून १७३ दिव्यांगांना केबिन देण्यात येणार आहेत. सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये सभेपूर्वी केबिन्सच्या किल्ल्या प्रदान करण्यात येणार आहेत. केएमटीच्यावतीने करवीर दर्शन ही बससेवाही सकाळी साडेअकरा वाजता महापौरांच्या हस्ते सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर शाहू समाधीस्थळाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन महापौर फरास या सर्वसाधारण सभेला येणार आहेत.


मुदत संपताना प्रशासनाशी वाद

वर्षभराचा कालावधी असताना राजीनाम्याच्या सभेपर्यंत विकास कामांची उद्‍घाटन करण्याच्या प्रकारामुळे महापालिकेत जोरदार चर्चा सुरू होती. महापौरांना शाहू समाधीस्थळाच्या लोकार्पणाबरोबर कोल्हापूर महोत्सव घेण्याचा विचार होता. त्यासाठी आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी भागातील विहिरींवरुन पाणी उपसा करुन त्याचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण आयुक्तांनी त्याला मंजुरी दिली नाही. त्याचा व अन्य कामांना मंजुरी न देण्याच्या पवित्र्यामुळे शुक्रवारी महापौर फरास, त्यांचे पुत्र आदिल फरास यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना व्यासपीठावर अडवून जाब विचारला. तसेच आदिल फरास यांनी नागरिकांच्या कामासाठी मोर्चे काढण्याबरोबर हुकुमशाही चालणार नाही, असा दम भरला होता. प्रशासनाकडून काम करुन घेण्यासाठी फरास यांनी अवलंबलेल्या स्टाइलमुळे काही कामे रखडली तर काही कामांना मंजुरी मिळाली नाही. आयुक्त डॉ. चौधरी यांनीही आदिल फरास यांच्या या पावित्र्याला शांतपणे उत्तर देत आपली ताकद दाखवून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावात भरदिवसा दरोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचगाव येथील जगतापनगरमध्ये लीला शिवलिंग खतकल्ले (वय ६० रा. ओंकार ग्रुपजवळ) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. चोरट्यांनी खतकल्ले दाम्पत्याला खोलीत कोंडून रोख ८० हजार रुपयांसह सोने आणि चांदीचे दागिने असा सुमारे सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास केला. ४ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. घाबरलेले खतकल्ले दाम्पत्य पोलिसांकडे गेले नाही. मात्र, त्यानंतर रविवारी (ता. १०) चोरट्यांनी पुन्हा फोन करून तीस लाखांच्या खंडणीसाठी त्यांनी धमकावले. त्यानंतर या दाम्पत्याने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.

करवीर पोलिसांनी सांगितले की, शिवलिंग आणि लीला खतकल्ले हे दाम्पत्य गेल्या दहा वर्षांपासून पाचगावातील जगतापनगरात बंगल्यात राहतात. त्यांचा भागीदारीत होलसेल साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन्ही मुलींचा विवाह झाला आहे. नातेवाईकांचा एक मुलगा कोल्हापुरात खासगी कंपनीत नोकरीला असल्याने तो यांच्यासोबत राहतो. सोमवारी तो गावी गेला होता. रात्री दाम्पत्य घरी होते. साडेदहाच्या सुमारास घराची बेल वाजल्याने लीला यांनी दरवाजा उघडला. अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील दोन तरुण जबरदस्तीने घरात शिरले. एकाने चाकूचा धाक दाखवत, ‘घरातील सर्व पैसे, दागिने द्या, नाहीतर तुम्हाला मारून टाकतो,’ असे धमकावले. चोरट्यांनी दोघांनाही बेडरुममध्ये कोंडून ठेवले. जीवाच्या भीतीने दाम्पत्याने आरडाओरडा केला नाही.

चोरट्यांनी कपाटातील रोख ८० हजार रुपये, चार अंगठ्या, ब्रेसलेट, नेकलेस घेतला. बाहेर पडताना चोरट्यांनी लीला यांच्या अंगावरील मंगळसूत्रही जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी त्यांनी खतकल्ले यांच्याकडे तीस लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. घाबरलेल्या दाम्पत्याने नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. मात्र पोलिसात तक्रार दिल्यास चोरटे पुन्हा जिवाचे बरेवाईट करतील या भीतीने त्यांनी फिर्याद दिली नाही.

कॉइन बॉक्सवरून

खंडणीसाठी धमकी

रविवारी सकाळी पुन्हा दोनदा रकमेसाठी धमकीचा फोन आला. यानंतर दाम्पत्याने नातेवाईकांशी चर्चा करून सोमवारी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून धमकीच्या मोबाइल कॉल्सचे डिटेल्स काढले. दोन्ही फोन गोखले कॉलेज परिसर आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील कॉइन बॉक्सवरून आल्याचे तपासात स्पष्ट झाले. माहितगार व्यक्तीनेच दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांना आहे. दोन पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत. सायबर पोलिसांचीही मदत घेतली जात आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली. या घटनेने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीसह २ मुलींची हत्या करून स्वतःलाही संपवले

$
0
0

पंढरपूर:
पत्नीच्या संशयी स्वभावाला वैतागून पतीनं तिच्यासह दोन मुलींची हत्या केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथे घडली. येथील घाटात या चौघांचेही मृतदेह सापडले.

पोलिसांच्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील उंबरे येथे सुभाष अनुसे हा पत्नी आणि मुलींसह राहत होता. सुभाष आणि पत्नी स्वाती हे दोघेही शेती करत होते, तर ऋतुजा आणि प्रणिता या दोन मुली श्रीपूर येथील प्राथमिक शाळेत शिकत होत्या. स्वाती त्याच्यावर नेहमी संशय घेत असे. यातून दोघांमध्ये भांडणे होत होती. काल दुपारी पत्नी आणि मुलींना घेऊन अकलूज येथे रुग्णालयात जातो, असे सांगून सुभाष घराबाहेर पडला. मात्र, ते चौघेही रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. ते चौघे हरवल्याची तक्रार सुभाषच्या भावाने अकलूज पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. सुळेवाडी घाटात त्यांचे मृतदेह सापडले. पत्नी स्वातीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. तर ऋतुजा, प्रणिता आणि सुभाष यांचे मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर चौघांचे मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची दोन मुलांसह आत्महत्या

$
0
0

मिरज :
लिंगनूर (ता. मिरज) येथील लक्ष्मीबाई मारुती नाईक (वय ३०) या महिलेने तिच्या पाच महिने आणि चार वर्षे वयाच्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. गावातील बसरकुडी परिसरातील महिला आणि तिच्या दोघा मुलांचे मृतदेह मंगळवारी दुपारी विहिरीत आढळून आले. या बाबत माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत लक्ष्मीबाई नाईक या कुटुंबासह लिंगनूर येथील बसरकुडी परिसरात राहण्यास होत्या. पती मारुती नाईक ऊस तोडणीचे मजुरीचे काम करतात. मंगळवारी दुपारी येथील एका विहिरीत लक्ष्मीबाई नाईक व त्यांची मुले सोहम आणि लक्ष्मण यांचे मृतदेह आढळून आले. ग्रामस्थांनी या बाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. मृत लक्ष्मीबाई नाईक यांचे निपाणी माहेर आहे. माहेरच्या नातेवाईकांना घटनेबाबत कळाल्यानंतर ते मिरज येथे येण्यासाठी निघाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नव्हते. दोन लहान मुलांसह महिलेने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फसवणूक झालेल्यातरुणांना मलेशियात कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
नोकरीच्या अमिषाने फसवणूक झालेले आणि सध्या मलेशिया पोलिसांच्या कोठडीत असलेल्या चार तरुणांना मलेशिया न्यायालयाने मंगळवारी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. भारतीय दुतावासाने पुढाकार घेत भारतीय तरुणांना मदत केली असती तर त्यांची सुटका होऊ शकली असती. परंतु, भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी फोनवरुन चर्चा करण्यापलिकडे काहीच केले नसल्याचा आरोप संबधित तरुणांच्या नातेवाईकांनी केला आहे.
पोलिस पुत्र कौस्तुब सदानंद पवार आणि धीरज पाटील या दोघांनी मलेशियात हॉटेल मॅनेजरची नोकरी देण्याचे अमिष दाखवून व्हिसा खर्च म्हणून प्रत्येक तरुणांकडून दीड लाखांची रक्कम घेतली होती. परंतु, प्रत्यक्षात पंधरा दिवसांचा पर्यटक व्हिसा संबधित तरुणांच्या हाती ठेऊन त्यांना मलेशियाला धाडले. त्या ठिकाणी मॅनेजरची नव्हेतर वेटरची नोकरी करावी लागली. नंतर पुढील दोन वर्षांचा व्हिसा पाठविण्यात येणार असल्याचे या दोघांनी सांगितले होते. परंतु, तोही व्हिसा बनावट दिल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मलेशियन पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करीत असल्याचा आरोप ठेवून चौघांना अटक केली. यामध्ये गुरुनाथ कुंभार (पेठ, इस्लामपूर), मोहन अशोक शिंदे (बेलवंडी, कर्जत) दीपक लिंबाजी माने ( हुन्नूर, ता. मंगळवेढा) आणि सदानंद धनगर (जळगाव) आदींचा समावेश आहे. यांच्या प्रमाणेच फसगत झालेल्या काही तरुणांनी तत्काळ भारतीय दुतावासाला शरण जाणे पसंत केल्याने ते अटकेपासून बचावले तर काही जण अद्यापही काही भारतीय तरुणांच्या मदतीने लपून बसले आहेत. या एकूण प्रकराबाबत गुरुनाथ कुंभार यांचे नातेवाईक नामदेव कुंभार यांनी सांगलीच्या शहर पोलिसात कौस्तुब पवार आणि धीरज पाटील या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. परंतु, अद्याप पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेतलेला नाही.
मलेशियन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भारतीय तरुणांना वकील मिळवून देण्याचे काम मूळचे कागलचे आणि सध्या मलेशियात मुख्य कार्यकारी पदावर रुजू असलेले प्रवीण नाईक यांनी केले. दुतावासांच्या अधिकाऱ्यांनी नाईक यांच्याकडून माहिती घेण्यापलिकडे काहीच केले नाही, असा दावा नामदेव कुंभार यांनी केला आहे. मंगळवारी त्या चौघांना तेथील न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्या चौघांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. आतापर्यंत त्यांचा एक महिना कोठडीत गेला असल्याने यापुढे त्यांना आणखी दोन महिने तुरुंगात काढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेब कांबळेंना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
अनिकेत कोथळे प्रकरणी सीआयडीने अटक केलेला सातवा संशयित बाळासाहेब आप्पा कांबळे (वय ४८, खणभाग, सांगली) याला कोर्टाने मंगळवारी १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडीत अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर संशयित युवराज कामटेच्या सांगण्यावरुन कांबळे हा पोलिस ठाण्यात आला होता. त्यानंतर अनिकेतचा मृतदेह एका खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला. त्याही वेळी तो संशयीतांबरोबर होता. त्यामुळे या गुन्ह्यात संशयिताना सहकार्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सीआयडीच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
शहर पोलिस ठाण्याच्या समोरच बाळासाहेब कांबळे याचे बॅगचे दुकान आहे. तो कोथळे प्रकरणातील संशयित युवराज कामटेचा नातेवाईक असल्याने कामटेची त्या दुकानात बस उठ होती, शिवाय कामटेची चार चाकी गाडीही कांबळेकडेच असायची, अशी माहिती पुढे आली आहे. सोमवारी रात्री सीआयडीने कांबळे याला घरातून अटक केली. मंगळवारी दुपारी त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांच्यासमोर हजर केले. अनिकेत कोथळे प्रकरणात गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी संशयिताला कांबळेने सहकार्य केले आहे. घटनेच्या रात्री अमोल भंडारे याला नदीकाठी धरून बसलेल्या दोघांचा शोध घ्यायचा आहे. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली एक दूचाकी जप्त करायची असल्याचा युक्तीवाद सीआयडीने कोर्टासमोर मांडला. त्यानंतर कोर्टाने बाळासाहेब कांबळे याला चौदा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दोन महिन्यांनंतर कुटुंबीयांना
मिळणार अनिकेतचा मृतदेह
अनिकेतचे कुटुंबीय अद्यापही अनिकेतचा उरला सुरला मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असल्याने पोलिसांनी अनिकेतचा उर्वरित मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास असमर्थता दर्शविली आहे. आंबोलीतून ताब्यात घेण्यात आलेल्या केवळ अस्थी घेण्यास कुटुंबीय तयार नाहीत. तपास पूर्ण होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर उर्वरित मृतदेह आणि अस्थी असे एकाच वेळी आम्ही ताब्यात घेणार असल्याचे अनिकेतचा भाऊ अशिष कोथळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर शिवसेनेत बंड?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
‘साहेब, सोलापुरातून खासदारकीला तुम्हीच उभारा,’ असे साकडे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मंगळवारी घातल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हाप्रमुख महेश कोठे यांना डीवचण्यासाठी बरडे यांनी ही खेळी केल्याची जोरदार चर्चा आहे.
‘आगामी लोकसभा निवडणूक मी लढविणार नाही,’ संकेत सुशीलकुमार शिंदे यांनी महिन्यापूर्वी दिले होते. त्यानंतर ‘शिंदे हेच माझे प्रतिस्पर्धी असतील,’ असा दावा भाजपचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी केला होता. त्या भर म्हणून बरडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी शिंदे यांची त्यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी भेट घेऊन लोकसभा लढविण्याची मागणी केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
‘साहेब शिवसेनेचे, मी साहेबाचा..., अशी सुरूवात करून बरडे यांनी साहेब तुम्हीच लोकसभेसाठी उभे रहा. आमच्यासाठी तुम्हीच युवा उमेदवार आहात, असे साकडे घातले. त्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत शिंदे व बरडे यांच्यात गुप्तगूही झाले. या चर्चेत नेमके काय ठरले, हे मात्र समजू शकले नाही.
कोठेंच्या नियुक्तीमुळे बरडेंचे बंड
शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी महेश कोठे यांची नियुक्ती केल्यापासून बरडे नाराज आहेत. त्यातच कोठे यांनी ऐनवेळी उमेदवारी कापल्याने महिला आघाडीच्या प्रमुख अस्मिता गायकवाड नाराज आहेत. या दोन्ही नाराजांनी शिंदे यांच्याशी संपर्क वाढवला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सोलापुरातील राजकारणाची गणिते बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवाय स्व‍कीयांच्या बंडामुळे महेश कोठे यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकारणापासून कर्मचारी अलिप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दूध दरकपातीवरुन सुरू असलेल्या मोर्चा आणि प्रतिमोर्चातून सुरू असलेल्या राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. कर्मचारी संघटनेची रविवारी पन्हाळा येथे बैठक झाळी. बैठकीमध्ये संघटनेच्या परवानगीशिवाय निषेध मोर्चात सहभागी झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

गोकुळच्या वार्षिक सभेनंतर निर्माण झालेला वाद दूध दर कपातीच्या निर्णयामुळे अधिकच उफाळून आला. यातून गेल्या दोन महिन्यांपासून संघाचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम संघातील कर्मचाऱ्यांवर होत आहे. दोन्ही राजकीय नेत्यांच्या वादात कर्मचारी भरडले जात असल्याने रविवारी कर्मचारी संघटनेची बैठक झाली.

संघ कर्मचारी व उत्पादकांसाठी असल्याने अशा राजकीय वादापासून दूर राहण्यावर एकमत झाले. संघात राजकारणाचा शिरकाव झाल्याने राज्यातील अनेक दूध संघ बंद पडल्याने संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. मोर्चा आणि पत्रकार परिषदेत संघटनेचे उपाध्यक्ष संजय सावंत यांनी संघटनेच्या परवानगीशिवाय केलेल्या भाषणावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दूध उत्पादकांना जादा दर मिळावा यासाठी मोर्चा काढला, पण दुर्दैवाने मोर्चात याबाबत कोणीही बोलले नाही, त्यामुळे हा राजकीय मोर्चा असल्याने यातून बोध घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष एस. बी. पाटील, संजय सदलगेकर, सदाशिव निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गांधीनगर’ बांधकामांचा घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तावडे हॉटेल ते गांधीनगर रोडवरील महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर गांधीनगरच्या व्यापाऱ्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावरुन सर्वसाधारण सभेत संतप्त पडसाद उमटले. हायकोर्टाने २०१५ मध्ये आरक्षित जागेवरील बांधकामप्रश्नी ‘जैसे थे’चा आदेश दिला असताना गेल्या दोन वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे झाली. या कालावधीत प्रशासन झोपी गेले होते का ? की गांधीनगरच्या व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे हात बांधलेत? अशा शब्दात नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

महापालिका अधिकाऱ्यांचे धनदांडग्याच्या बेकायदेशीर बांधकामांना पाठबळ आहे. अगोदर गांधीनगरच्या व्यावसायिकांची बेकायदेशीर बांधकाम हटवा, अन्यथा शहरातील अतिक्रमण कारवाई थांबवा असा इशारा दिला. आक्रमक पवित्रा सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतला. सभागृह आक्रमक झाल्यानंतर येत्या आठ दिवसात नोटीसा काढून बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली जाईल, प्रसंगी संबंधितांवर फौजदारी दाखल करु असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. महापौर हसीना फरास सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

महापालिकेने ट्रक टर्मिनस व कचरा डेपोसाठी आरक्षण टाकलेल्या जागेच्या मालकीवरुन महापालिका व उचगाव ग्रामपंचायतीत वाद आहे. नगरविकास विभागाने ही जागा महापालिकेच्या मालकीचा असल्याचा निर्वाळा दिला आहे. महापालिकेने २०१४-१५ मध्ये येथे अतिक्रमण विरोधी मोहीम राबविल्यानंतर गांधीनगरच्या व्यावसायिकांनी कोर्टात जाऊन कारवाईला स्थगिती मिळवली आहे. दरम्यान ‘कोर्टाचा पुढील निर्णय होईपर्यत ‘जैसे थे’चा आदेश असताना गेल्या दोन वर्षात याठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम झाल्याचे परिवहन समिती सभापती नियाज खान यांनी निदर्शनास आणले. तसेच त्यांनी बेकायदेशीर बांधकाम संदर्भातील कागदपत्रे आणि मोबाइल चित्रीकरणही महापौर व अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना दाखवले.

‘जैसे थे’च्या आदेशानंतरही व्यावसायिकांनी बांधकाम करुन कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही अशा शब्दांत उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, मुरलीधर जाधव यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. नगरसेवक भूपाल शेटे यांनी प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्या जागेचा व्यापाऱ्यांना टीडीआर कसा दिला? अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले. प्रा. जयंत पाटील यांनी, ‘तावडे हॉटेल ते निगडे मळापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण, पत्र्याचा शेड, बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. प्रशासनाने कसलेच नियोजन केलेले नाही. शहरातील अतिक्रमणांबाबत एक न्याय आणि गांधीनगरच्या व्यावसायिकांना दुसरा न्याय ही कुठली पद्धत? अधिकाऱ्यांनी कोर्टात नीट बाजू मांडली नसल्यामुळे निकाल उलटे लागले. कारवाईबाबत वॉर्ड ऑफीस आणि नगररचना विभागावर जबाबदारी निश्चित करावी’ अशी मागणी त्यांनी केली. नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत व उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी कारवाईवरुन एकमेकांकडे बोट दाखविल्याने अखेर वकिलांचा अभिप्राय घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त पाटणकर व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी कायदेशीर बाबी तपासून येत्या आठ दिवसांत कारवाई करू असे सभागृहाला सांगितले.

नगरसेवकांच्या घरातच

डेंगीचे रुग्ण

डेंगीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आल्याचे नगरसेवक किरण नकाते यांनी सांगितले. नगरसेविका दीपा मगदूम यांनी याकडे लक्ष वेधताना, आपला पुतण्या डेंगीचा रुग्ण असल्याचे सांगितले. महापौर फरास यांनी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी सूचना करत आपल्या घरातही डेंगीचे रुग्ण असल्याचे सांगितले. प्रशासनाला आरोग्य सुविधांकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरासांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये हालचाली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर हसीना फरास यांनी अपेक्षेप्रमाणे मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौरपदाचा राजीनामा सादर केला. सर्वसाधारण सभेने त्यांचा राजीनामा मंजूर केल्यामुळे महापालिकेत नव्या महापौर निवडीसाठी हालचाली वेगावल्या. शिवाय महापालिका प्रशासनानेही तत्काळ नव्या महापौर व उपमहापौर निवडीच्या कार्यक्रमासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले. आता काँग्रेसच्या वाट्याला महापौरपद आले असून नगरसेविका उमा बनछोडे, स्वाती यवलुजे आणि दीपा मगदूम यांची नावे चर्चेत आहेत.

फरास यांच्या महापौरपदाचा कालावधीला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याकडे लक्ष लागून होते. शिवाय दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी फरास या राजीनामा सादर करतील असे सांगितले होते. त्यामुळे मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत त्या राजीनामा सादर करणार हे स्पष्ट झाले होते. महापौरपदाच्या शेवटाच्या दिवशी फरास यांनी विकास कामांच्या कार्यक्रमाचा धडाका लावला. गंगाराम कांबळे स्मारकाच्या कामाचे उद्घाटन, करवीर दर्शन बस सेवा, दिव्यांगांना केबिन वाटप कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी दोन नंतर सर्वसाधारण सभा सुरु झाली. प्रश्नोत्तरे आणि कार्यपत्रिकेतील विषयावर चर्चा झाल्यानंतर सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांनी सभेपुढे राजीनामा सादर केला. तत्पूर्वी काँग्रेसचे उपमहापौर अर्जुन माने यांनी व्यक्तिगत कारणास्तव पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत महापौरांकडे तो सादर केला.

आयुक्त, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे नाव टाळले

महापौर म्हणून वर्षभराच्या कालावधीत शहराच्या विविध विकास कामांसाठी योगदान ​दिले. शाहू समाधीस्थळाच्या कामाला चालना, दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी केबिन वाटपाचा निर्णय, थेट पाइपलाइन योजनेसाठी पाठपुरावा, विविध क्रीडा स्पर्धा व लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी केल्याचे समाधान असल्याचे महापौर फरास यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी महापौर आर.के. पोवार, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, विरोधी आघाडीचे गटनेते विजय सुर्यवंशी, सत्यजित देशमुख यांच्यापासून महापालिकेतील विविध अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी आयुक्त अभिजित चौधरी व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांच्या नावाचा उल्लेख टाळला. आयुक्त आ​णि फरास यांच्यातील वाद आणि आदिल फरास व राजू लाटकर यांच्यातील युवक राष्ट्रवादीच्या निवडीवरुन झालेला संघर्ष ताजा आहे.

नामकरणाचे ठराव मंजूर, शालिनी सिनेटोचा ठराव नामंजूर

ए वॉर्ड रिसनं ११०४ पैकी भूखंडप क्रमांक पाच व सहा हे शालिनी सिनेटोनच्या वापरासाठी आरक्षित करण्याचा ऑफिस प्रस्ताव नामंजूर झाला. रंकाळा बसस्थानकाजवळच्या चौकाला साई चौक तर वायपी पोवारनगर, राजर्षी शाहू वसाहत, उद्यमनगर आणि गोखले कॉलेजकडून येणारा रस्ता मिळून तयार झालेल्या चौकास कै. शिवाजीराव चव्हाण चौक नामकरणाचा ठराव मंजूर झाला. तसेच वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीतही मोफत अंत्यविधी करण्याची सवलत मिळावी असा सदस्य ठराव मंजूर झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर्ववैमनस्यातून तरुणांच्या दोन गटांत झालेल्या वादात तरुणाचा चाकूने भोसकून खून झाला. प्रणव सुभाष बिंद (वय १७, रा. खंडोबा तालमीजवळ, शिवाजीपेठ, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. हल्लेखोर तुषार जयसिंग रसाळे (२३, रा. नाथागोळे तालीम परिसर) आणि वैभव विनायक राऊत (२३, रा. मरगाई तालमीजवळ) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (ता. १२) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गांधी मैदान येथे ही घटना घडली. या घटनेमुळे सीपीआर परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव होता.

प्रणव बिंद हा शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात आई आणि लहान भावासह राहत होता. तो दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शिवाजी पेठेतील दत्त जयंतीला पालखी सोहळ्यात त्याचा मरगाई गल्लीतील वैभव विनायक राऊत याच्याशी वाद झाला होता. तो वाद मित्रांनी त्याचवेळी मिटवला होता. मात्र वैभव आणि प्रणव या दोघांमध्ये वाद धुमसत होता. मंगळवारी प्रणव काही मित्रांसह गांधी मैदान येथे फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. याचवेळी वैभव राऊत आणि तुषार रसाळे हेही फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात आले होते. यावेळी एकमेकांकडे पाहण्यावरून प्रणव आणि वैभव या दोघांमध्ये वाद झाला. यांनी एकमेकांना शिवीगाळ करून धक्काबुक्कीही केली. काही वेळाने वैभव राऊत मित्रांना घेऊन गांधी मैदानात आला. चार ते पाच तरुणांनी प्रणवला बॅटने बेदम मारहाण केली. यानंतर तुषारने प्रणवला चाकूने भोसकले. छातीत वर्मी घाव लागताच प्रणव कोसळला. प्रणव गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच मारहाण करणाऱ्या तरुणांनी पळ काढला, तर तुषार रसाळे आणि वैभव राऊत हे दोघे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात प्रणवविरोधात फिर्याद देण्यासाठी गेले होते.

दरम्यान, गांधी मैदानातील काही तरुणांनी जखमी प्रणवला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रणवचा मृत्यू झाल्याचे समजताच जुना राजवाडा पोलिसांनी रसाळे आणि राऊत या दोघांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योजकावर गोळीबाराचा प्रयत्न; बोंद्रे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाईच्या दर्शनासाठी कर्नाटकातून कोल्हापुरात आलेल्या उद्योजकावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १२) पहाटे ताराबाई पार्कातील वृषाली हॉटेलजवळ घडली. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मानसिंग विजयराव बोंद्रे (वय ३०, रा. रंकाळा परिसर) याने गोळीबार केला असून, पोलिसांनी त्याला अटक केले. याबाबत अनंत प्रेमनाथ शेट्टी (वय ४३, रा. दिव्यश्री अपार्टमेंट, बिजय कापीकाड, मेंगलोर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेंगलोर येथील उद्योजक अनंत शेट्टी हे सोमवारी देवदर्शनासाठी महाराष्ट्रात आले होते. त्यांच्यासोबत बहीण आरती जयदीप रुई, सुरक्षा रक्षक हरिशा बाबू कुलाल, कारचालक नवीन शेट्टी हे होते. शनिशिंगणापूर येथील देवदर्शन आटोपून ते मंगळवारी पहाटे कोल्हापुरात पोहोचले. सकाळी ते अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जाणार होते. ताराबाई पार्कातील हॉटेल वृषाली येथे त्यांनी बुकिंग केले होते. पहाटे सव्वाचारच्या सुमारास हॉटेलच्या बाहेर कार थांबवून त्यांचे सुरक्षा रक्षक बुकिंगची चौकशी करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी सदर बाजार चौकाच्या दिशेने आलेली एक एलिशान कार (एम. एच. ०९ इ. के. १११) शेट्टी यांच्या कारजवळ येऊन थांबली. कारमधील चालकाने तातडीने शेट्टी यांची कार हॉटेलमध्ये घेण्यास सांगितले. कार बाजुला घेण्यास चालकाला उशिर झाल्याने अलिशान कारमधील तरुणाने थेट कमरेचे पिस्तूल काढून अनंत शेट्टी यांच्यावर रोखून शिवीगाळ केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने शेट्टी यांच्यासह त्यांच्या कारचे चालकही घाबरले. प्रसंगावधान राखत चालकाने कार हॉटेलच्या गेटमधून आत घेतली. यानंतर काही अंतर पुढे जाऊन कारमधील तरुणाने हवेत गोळीबार केला.

या प्रकारानंतर शेट्टी यांनी मंगळवारी सकाळी कुटुंबासह अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर ते शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचले. घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी पोलिसांना देताच संपूर्ण पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. या घटनेचा तपास करून संशयितांना अटक करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्याने शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी तातडीने वृषाली हॉटेल परिसरात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयिताची ओळख पटवली असता, तो शहरातील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा चेअरमन असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. अमृतकर यांनी फौजफाट्यासह रंकाळा परिसरातील मानसिंग बोंद्रे यांच्या घरात जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची कारही ताब्यात घेतली आहे. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून, पोलिसांनी मानसिंग बोंद्रे याच्यासह चौघांवर दहशत माजवण्याचा आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. या घटनेने शहरात खळबळ निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी मास्टर प्लॅन हवा

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

‘कोल्हापूरची विमानसेवा, नवे रेल्वे टर्मिनस, नवा उद्योग, जीएसटीतील फेररचनेसह कोल्हापूर व्हिजनसाठी सरकारने तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘मेक इन कोल्हापूर’ अशी अनेक उत्पादने आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करा. पर्यटन, आयटी, उद्योग, व्यापारी, कोल्हापूर ब्रॅण्डला संधी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ अशी अपेक्षा उद्योजक, व्यापाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली. ‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज (वेसमॅक) आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे निर्यात वृद्धीस प्रोत्साहन देण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवनात मंगळवारी आयोजित विशेष परिसंवादात या अपेक्षा व्यक्त झाल्या.

कोल्हापूरचा विकास हा राजकीय उदासीनता आणि नेतृत्वाअभावी रखडला आहे. विमानसेवा, नवे रेल्वेस्थानक, सुपर फास्ट रेल्वे, मोठा उद्योग येण्याची गरज आहे. मात्र गेली अनेक वर्षे केवळ आश्वासनांशिवाय दिली जात आहेत. वाहतूक व्यवस्था भक्कम नसल्याने निर्यातीवर मोठा परिणाम होत आहे. कोल्हापूरची उत्पादने जगभर प्रसिद्ध आहेत. मात्र ती इच्छितस्थळी वेळेवर पोहोचविण्यासाठीची जलद आणि सक्षम वाहतूक व्यवस्था नाही. प्राथमिक सुविधेत विमानसेवा सुरु करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर कार्गो विमानसेवा दिली जाऊ शकते. रेल्वेकडून रो-रो सेवा दिल्यास निर्यातीला पोषक वातावरण निर्मिती होईल. स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनाला बळ दिले जात नाहीत. स्थानिक ब्रॅण्डला जागतिक स्तरावर स्थान उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. केंद्र सरकारतर्फे उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी लागू केलेल्या विविध योजनांची माहिती सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचा सूर परिसंवाद उमटला.

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, ‘विमानतळाचा प्रश्न कायम आहे. खासदार आणि आमदारांसह हवाई उड्डाणमंत्री अशोक राजू यांच्याकडून विमानसेवा सुरू होण्यासाठी तारखांची आश्वासने दिली जात आहेत. १५ डिसेंबरपर्यंत विमानसेवा सुरू न झाल्यास उद्योजक आणि व्यापारी विमानतळावर आंदोलन करतील. औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रातील अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता झाली पाहिजे.

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते मनोरमा इन्फोसोलुशनच्या सीइओ आश्विनी दानिगोंड यांचा सत्कार झाला. त्यांना ब्रिटन संसदेत आयोजित केलेल्या भारताच्या ‘टेक समिती २०१७ च्या इंडिया टेक्नॉलॉजी मन्थ,’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. ब्रॅण्ड कोल्हापूर पोर्टल आणि अॅपचे सादरीकरण करण्यात आले. आयएमसीच्या सहायक व्यवस्थापिका ख्याती नरवणे, चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे महाव्यवस्थापक अरविंद प्रधान यांनी निर्यातदारांना विविधी संधीची माहिती सांगितली. स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, गोशिमाचे अध्यक्ष सूरजितसिंग पवार, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, उद्योगपती सचिन मेनन, चेंबरचे माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, चंद्रकांत जाधव, जयेश ओसवाल, धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, आदी उपस्थित होते. जयेश ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले. चेंबरचे उपाध्यक्ष संजय शेटे यांनी आभार मानले.

विविध योजनांची माहिती

जाणून घ्या ः चतुर्वेदी

इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक) चे मुख्य व्यवस्थापक समर्थ चतुर्वेदी म्हणाले, ‘केंद्र सरकारतर्फे निर्यातीसाठी लागू केलेल्या अनेक प्रोत्साहनपर योजना आहे. मात्र अनेक योजनांची माहिती उद्योजक आणि व्यापाऱ्यांना नाही. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना निर्यातीची बाजारपेठ मिळण्यासाठी निर्यातदारांना प्रोत्साहन दिले जात आहे. युवकांसाठी काही विशेष योजना आहेत. भारतीय निर्यातदारांना दोन वेर्ष कर्ज परतफेडीचा कालावधी परदेशी बँकाकडून दिला जात होता. एक्झिम बँकेकडून पाच ते सहा वर्षांचा परतफेडीचा कालावधी दिला जात आहे. अन्य कोणत्याही बँकाकडून दिले जाणार कर्ज एक्झिम बँककडे वर्ग केले जाते. कोल्हापुरातील टेक्सटाइल, लेदर आणि स्पोटर्स शूजसाठी कर्ज दिले जात आहे. फार्मा, आयटीसह नवीन संशोधनासह परदेशात कंपनी स्थापन करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. क्लस्टर फायनान्स केले जात आहे. त्याचा लाभ घेतला पाहिजे.


निर्यातदारांना चांगली संधी ः अंबस्था

एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक सृष्टीराज अंबस्था यांनी ‘संधी आणि व्यवस्थापनातील धोके,’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘काही उद्योजक, निर्यातदारांना कर्ज देताना त्यांचा बँकिंगमधील पूर्वेइतिहास आणि आर्थिक स्थिती पाहिली जाते. मात्र निर्यातदारांना नव्या निर्णयानुसार चांगली संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोणत्याही कागदपत्रांसाठी निर्यातदारांना त्रास दिला जात नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील निर्यातदाराना मोठी संधी उपलब्ध आहे. अर्थसहाय्य नसल्यामुळे अनेकदा निर्यातीता टक्का घसरतो. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील निर्यातदारांना चांगली संधी उपलब्ध आहे. त्या संधीचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे.


उद्योगविकासाला कोल्हापूर पोषक ः कनोडिया

इंडियन मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष आणि आयटी उद्योजक डॉ. ललित कनोडिया ‘छोट्या शहरात आयटी उद्योग विस्ताराच्या संधी’ विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘मुंबई, पुण्यानंतर कोल्हापूर हे महत्त्वाचे डेस्टिनेशन आहे. कोल्हापूरचे वातावरण उद्योगवाढीसाठी पोषक आहे. अनेक नवे उद्योग या ठिकाणी येऊ शकतात. विशेष म्हणजे कोकण आणि कर्नाटकला जोडणारे हे महत्त्वाचे शहर आहे. येथील उद्योग, व्यापार, इंजिनीअरिंग, आयटी, कृषी, वस्त्रोद्योग, आभूषण क्षेत्रात अग्रेसर आहे. या क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने या निर्यातदार आणि व्यापाऱ्यांसाठी विशेष योजना तयार केल्या आहेत. मात्र अंमलबजावणी केली जात नाही. उद्योग उभारणीसाठी प्राथमिक सुविधा तातडीने उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्यासाठी इंडियन मर्चंटस् चेंबर प्रयत्नशील आहे. पुण्यानंतर कोल्हापूर आयटी हब होऊ शकते. अनेक मोठ्या कंपनींची कामे कोल्हापुरातील आयटीला सहाय्यभूत ठरणाऱ्या घटकांकडून होऊ शकतात.’


कोल्हापूरचे व्हिजन द्या ः संभाजीराजे

परिसंवादाचे उद‍्घाटक, खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘कोल्हापूरपेक्षा औरंगाबाद, नागपूर या शहरांचा औद्योगिक आणि व्यापारी दृष्ट्या झपाट्याने विकास झाला. त्या तुलनेत कोल्हापूरची का पिछेहाट झाली याचे चिंतन करण्याची गरज आहे. कल्याणी, टाटा, बिर्ला, होंडासारखे मोठे उद्योग कोल्हापुरात येत नाहीत. येथे प्राथमिक सुविधा, वातावरण अनुकूल असतानाही उद्योग येण्यासाठी धाडस करीत नाहीत. इचलकरंजीत ५ हजार टेक्स्टाइल, एक लाख पॉवरलूम आणि दररोज ५० कोटींचा टर्नओव्हर असलेले शहर आहे. मात्र कोल्हापूरच्या व्हिजनमध्ये त्याचा कधीही उल्लेख होत नाही. स्थानिक उद्योजक, कारागीरांत मोठे टॅलेंट आहे. मात्र पुरेसे पाठबळ मिळत नाही. पर्यटनक्षेत्रातही कोल्हापूर मागे आहे. औद्योगिक आणि व्यापाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत. त्यासाठी समिती स्थापन करावी. ही समिती कोल्हापूरचे व्हिजन तयार करेल. त्यामध्ये महत्त्वाच्या मागण्यांच्या समावेश करावा. त्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू.’


विमानसेवा सुरू करा, अन्यथा हिसका दाखवू

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापूरची विमानसेवा सहा वर्षे बंद आहे. केंद्र सरकारने १५ डिसेंबरपर्यंत विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. ती सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. त्या वेळी खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘आंदोलन करणारी समिती आणि माणसे वेगळी आहेत. उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी आंदोलनात अमूल्य वेळ घालवू नये. विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. एअर डेक्कनची विमाने १५ डिसेंबरपर्यंत येणार आहेत. येत्या २२ किंवा २३ डिसेंबरपर्यंत विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या वर्षात विमानसेवा सुरु न झाल्यास कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला. रेल्वेस्थानकाचाही विकास केला जाणार आहे. मुख्य हेरिटेज इमारत सोडून स्थानकावर सॅटेलाइट टर्मिनल उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-मुंबई मार्गावर सुपरफास्ट सेवा देण्यासाठी विचार सुरु आहे. त्या संदर्भात चर्चा सुरु आहे. त्यासह नवे उद्योग येताना टेंडर पास करा, कार्यकर्त्यांना नोकऱ्या लावा, असा सल्ला कोणताही पुढारी देत असल्यास यापुढे त्यांची गय केली जाणार नाही. चेंबरने अशा पुढाऱ्यांची नावे सांगावीत, त्याचा बंदोबस्त केला जाईल,’ असेही त्यांनी बजाविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ वाद बेतला तरुणाच्या जिवावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पेठेतील दत्त जयंतीच्या पालखी सोहळ्यात झालेला किरकोळ वाद प्रणव बिंदच्या जिवावर मंगळवारी बेतला. आई आणि लाहन भावासह शिवाजी पेठेत राहणाऱ्या प्रणवची आई खेळणी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. प्रणव हा मोठा मुलगा होता. प्रणवचे वडील चार वर्षांपूर्वीच गुजरात येथील मूळ गावी गेले असल्याने त्याच्या आईला प्रणवचाच आधार होता. किरकोळ वादाने प्रणव जिवाला मुकला. घटनेचा त्याच्या आईला मोठा धक्का बसला आहे.

दहा वर्षांपूर्वी प्रणवचे वडील कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी कोल्हापुरात आले होते. चार वर्षांपूर्वी सुभाष बिंद हे पुन्हा गुजरात येथील गावी गेले आहेत, त्यामुळे प्रणव त्याची आई आणि लाहन भाऊ असे तिघेच शिवाजी पेठेतील खंडोबा तालमीजवळ राहत होते. प्रणव दहावीच्या वर्गात शिकत होता. गेल्या चार महिन्यांपासून तो शाळेत गेला नाही. खेळणी विकण्याच्या कामात तो आईला मदत करीत होता, अशी माहिती परिसरातील तरुणांनी दिली. दत्त जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या पालखी सोहळ्यात प्रणवचा वैभव राऊत या तरुणाशी वाद झाला होता. हा किरकोळ वादच प्रणवच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.

मंगळवारी गांधी मैदानात फुटबॉल खेळण्यासाठी गेल्यानंतर प्रणव आणि वैभव हे दोघे पुन्हा आमने-सामने आले. एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. शिवीगाळ आणि धक्काबुक्कीनंतर वैभव राऊत आणि तुषार रसाळे या दोघांनी मित्रांसह प्रणवला बेदम मारहाण केली. याचवेळी तुषार रसाळे याने चाकूने प्रणवच्या छातीत वार केला. सीपीआरमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सीपीआर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाजी पेठेतील दोन गटात वाद झाल्याच्या अफवाही सोशल मीडियातून शहरात पसरल्या होत्या. पोलिसांनी शिवाजी पेठेसह सीपीआर परिसरातही बंदोबस्त तैनात केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस घेणार शनिवारी मुलाखती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हसीना फरास यांच्या राजीनाम्यानंतर नूतन महापौरपदाच्या हालचाली वेगावल्या आहेत. काँग्रेसकडे महापौरपद येणार असल्याने स्वाती यवलुजे, उमा बनछोडे, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने नागपूर येथे असलेले आमदार सतेज पाटील शनिवारी कोल्हापुरात येणार आहेत. यादिवशी काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती होतील. त्याचदिवशी महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे. तर भाजप ताराराणी आघाडीकडूनही उमेदवार उभा केला जाणार असल्याने महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे.

दरम्यान, नगरसचिव विभागाकडून नवीन महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यासाठी तारीख व वेळ मिळावी म्हणून विभागीय आयुक्तांकडे पत्र पाठवले आहे. त्याबाबत बुधवारी तारीख निश्चिती होईल. त्यामुळे २० तारखेला निवडीची सभा होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर फरास व उपमहापौर माने यांनी राजीनामा दिला. ओबीसी महिला महापौरांसाठी पुढील सहा महिन्याचा कालावधी आहे. राजलक्ष्मीनगरमधील दीपा मगदूम, कसबा बावड्यातील पोलिस लाइन प्रभागातील स्वाती यवलुजे आणि बाजार गेट प्रभागातील उमा बनछोडे, कॉमर्स कॉलेज प्रभागातील निलोफर आजरेकर या इच्छुक आहेत. शनिवारी या इच्छुकांच्या मुलाखती होतील.


संधी ‘उत्तर’ की ‘दक्षिण’ला?

काँग्रेसच्यावतीने या सभागृहातील पहिल्या महापौर या दक्षिण विधानसभा मतदार संघातील अश्विनी रामाणे यांना केले होते. आता उत्तर विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यवलुजे, बनछोडे, आजरेकर या उत्तरमधील तर मगदूम या दक्षिण विधानसभा मतदार संघातील आहेत. त्यांच्याबरोबर भाजप ताराराणी आघाडीकडूनही उमेदवाराची तयारी सुरू केली​ आहे. त्यामुळे महापौरपदासाठी काँग्रेस​ विरोधात भाजपचा की ताराराणी पक्षाचा उमेदवार राहणार हे लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. उपमहापौरपदाचाही राजीनामा झाला असल्याने या पदासाठीही निवडणूक होणार आहे. काँग्रेस आघाडी​त उपमहापौरपद हे राष्ट्रवादीकडे जाणार आहे. त्यासाठी गटनेता सुनिल पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरी नगरपरिषदेसाठी आज मतदान

$
0
0

हुपरी

नवनिर्मित हुपरी नगरपरिषदेच्या बुधवारी (ता.१३) होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तानाजी नरळे, तहसीलदार वैशाली राजमाने यांनी मंगळवारी दुपारी २७ मतदान केंद्रांवरील सर्व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे ताब्यात देऊन रवाना केले. नगरपरिषदेसाठी होणारे हे पहिलेच मतदान असल्याने हुपरीकरांत प्रचंड उत्सुकता आहे. शहरात सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, गेले पंधरा दिवस धुमधडाक्यात चाललेला प्रचार मंगळवारी (ता.१२) रात्री दहा वाजता थंडावला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत गुप्त प्रचार सुरू राहिला.

हुपरी ग्रामपंचायतीमधून रुपांतर होऊन नगरपरिषदेची निवडणूक प्रथमच होत असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. मंगळवारी सकाळी सर्व कर्मचारी हुतात्मा स्मारक येथील क्रिडा संकुल मध्ये जमा झाले. एकूण २७ मतदान केंद्रांवर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई, एक पोलिस असा कर्मचारी वर्ग नेमणूक केला असून प्रत्येक केंद्रावर एक कंट्रोल युनिट आणि दोन बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे ताब्यात देण्यात आली. या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त ठवण्यात आला असून एक पोलिस उपाधिक्षक, १२ पोलिस अधिकारी व १०० पोलिस कर्मचारी तसेच विशेष कृती दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. बुधवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी (ता.१४) शहरातील यशवंत मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे,तहसीलदार वैशाली राजमाने, मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी नरळे,विजय राजापुरे आदींनी यंत्रणा कार्यरत केली आहे.

-----------

हुपरी नगरपरिषदेची स्थिती -

शहराचे क्षेत्रफळ - २५ चौरस किलोमीटर

लोकसंख्या - २८ हजार ९५३

शहरातील प्रभाग -०९

एकूण नगरसेवक -१८

एका प्रभागातील मतदार संख्या -२५०० ते ३०००

एकूण मतदार संख्या -२१७७०

एकूण पुरुष मतदार संख्या - ११२४४

एकूण महिला मतदार संख्या -१०५२६

नगराध्यक्षपदाचे आरक्षण - सर्वसाधारण महिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images