Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

​ पात्र २६ हजार शेतकरी पुन्हा अपात्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची नवी यादी बुधवारी आली आहे. त्यामध्ये ८० हजार ८९ शेतकऱ्यांना एकूण २८४ कोटी ६६ लाख ४७ हजार २१८ रुपयांचा लाभ मिळणार होता. परंतु गुरुवारी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असलेल्या २६ हजार १९३ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आल्याने सुमारे ४६ कोटी ५० लाखांच्या अनुदानाला कात्री लागणार असल्याचे समोर आले. बुधवारी आलेल्या यादीपैकी ३,०३६ शेतकऱ्यांची १० कोटी ९४ लाख ७९ हजार २१० रुपयांची संपूर्ण कर्जमाफी झाली आहे.

हिवाळी अधिवेशन जवळ येवू लागल्याने कर्जमाफीच्या यादी येण्याची गती वाढली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देत कर्जमाफीचे काम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस एक केला जात असल्याचे समोर येत आहे. सरकारने बुधवारी ६ डिसेंबरला शेतकरी कर्जमाफीची पुन्हा एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. १० कोटी ९४ लाखांचे संपूर्ण कर्ज माफ झाले आहे. दीड लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत असणाऱ्या मात्र दीड लाखांच्या वरील रक्कम भरण्याची तयारी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दीड लाखांचे कर्ज माफ होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ११ हजार ५०८ शेतकरी पात्र आहेत. त्यांनी उर्ववरीत रक्कम भरली तर या सर्वांना मिळून १७२ कोटी ६२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. बुधवारच्या यादीत नियमित कर्जदारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी ६५ हजार ५४५ शेतकरी पात्र झाले आहेत. या शेतकऱ्यांना १०१ कोटी ९ लाख ६८ हजार २०८ रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे समोर आले होते. परंतु गुरुवारी यादीत बदल झाला. अशा अनुदानाच्या यादीतून २६ हजार १९३ शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याचे सरकारकडून घोषित करण्यात आले.

पडताळणीत संबधितांपैकी काहींच्या खात्यावर चालू गळीत हंगामातील ऊसाचे बील जमा झाल्याचेही कारण पुढे करण्यात येत आहे. अन्यही काही कारणे असल्याने संबधितांना अपात्र ठरविण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीच्या २० हजार पात्र शेतकऱ्यांच्या यादीतून प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरविण्यात आलेल्या २ हजार ४६ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. परंतु, पुन्हा त्यांना पात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे नव्या यादीवरील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोतया पोलिस गजांआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
पोलिस अधिकारी असल्याचे सांगून मल्हारपेठ येथे बुधवारी तोतया पोलिस अधिकारी व पत्रकाराने एका व्यावसायिकाच्या घराची झाडाझडती घेतली. मात्र, संशय आल्याने व्यावसायिकाने पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना बुधवारी रात्री उशीरा अटक केली. त्यांच्यावर मल्हारपेठ पोलिसात गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून जिप्सी गाडीसह पावती पुस्तके व १६ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, संशयित पाच जणांना गुरुवारी पाटण न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिवाजी मारुती पवार (वय ४१), अमोल जयसिंग गायकवाड (३३), तुषार विठ्ठल सनस (२१), ओंकार बळीराम गायकवाड (२३, सर्व रा. आसनगाव, सातारा) व रणजित नवथान कसबे (रा. संगमनगर, सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या बाबत शाहूल तानाजी भिसे (वय ३२, मल्हारपेठ, ता. पाटण) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, या तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी नागठाणे, अतित, काशिळ, उंब्रज व विहे परिसरातही अवैध धंद्यांवर धाडी टाकून पैसे उकळल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी चालकांविरोधात गुन्हेयाचिकाकर्ते गोरख घाडगेंना धमक्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
चार वर्षांपूर्वी राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळात सरकारच्या वतीने सुरू केलेल्या चारा छावण्यात झालेल्या घोटाळ्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने संबधित छावणीचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या गोरख घाडगे यांना धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत. सोलापूर, सांगली, सातारा, नगर आणि बीड या पाच जिल्ह्यांत हे गुन्हे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
२०१२-१३ आणि १३-१४ या दोन वर्षांत पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये सरकारने या पाच जिल्ह्यांत १२७३ छावण्या सुरू केल्या होत्या. यातील जवळपास ११५० छावण्यात अनियमितता आढळल्याने त्यांच्याकडून ७ कोटी ९२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. या छावण्यांच्या विरोधात त्यावेळी आलेल्या तक्रारीनंतर सरकारच्या वतीने अचानक तपासण्या केल्या असता जनावरांना बारकोडिंग टॅग न लावणे, छावणीला कुंपण, जनावरांना निवारा व गव्हाण न करणे यासह जनावरांच्या संख्येत तफावत आढळण्याचे प्रकार उघड झाल्याने या छावणी चालकांवर कारवाई करण्यासंदर्भात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणीच्या वेळी सरकारने या अनियमितता आढळलेल्या छावणी चालकांवर कारवाईचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर आता या पाचही जिल्ह्यात या छावणी चालकांवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या प्रकरणातील याचिकाकर्ते गोरख घाडगे यांना धमकीचे फोन येण्यास सुरुवात झाले आहे. त्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. छावणीतील घोटाळे मी बाहेर काढल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.
दोनशे छावणी चालकांवर गुन्हे
सोलापूर जिल्ह्यातील दोनशे छावणी चालकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झाले आहे. एका सांगोल्यात शंभर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बाबत महसूल व वन विभागाच्या उपसचिवांनी या पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना छावणी चालकांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आदेश दिल्याने इतर जिल्ह्यातही गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील हा प्रकार असून, त्यावेळी तत्कालीन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रान उठवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चेपासून पळ का काढता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळचा कारभार पारदर्शी आहे. त्याबाबत आमदार सतेज पाटील यांना चर्चेसाठी खुले निमंत्रण दिले आहे. मात्र ते व्यासपीठावर येत नाहीत. त्यांनी आधी आपल्या संस्था नीट चालवाव्यात, असे आव्हान गोकुळच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात विविध वक्त्यांनी दिले. गोकुळला संपविण्यासाठी आलेला बोका, कोल्हा आणि राक्षस अशी टीका संचालकांनी पाटील यांच्यावर केली.

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, ‘आमदार सतेज पाटील यांना चर्चेला खुले निमंत्रण दिले आहे. मात्र केवळ लेखापरीक्षणाच्या कागदापत्रावर खोटा आरोप केला जात आहे. भविष्यात संघाची बदनामी केल्यास उद्रेक होईल.’

गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई म्हणाले, ‘गोकुळच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना गोळा करून मोर्चा काढला. बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा त्यांच्या मौनी विद्यापीठात १९७५ पासून एकदाही सर्वसाधारण सभा झाली नाही. त्याचे उत्तर द्यावे. सभासदांचा एवढा कळवळा होता तर मग गोकुळच्या सभेला राहिला नाही. तुम्हाला सभेपेक्षा परदेश दौरा महत्त्वाचा वाटला. अशा बोक्यांपासून दूध उत्पादकांनी सावध रहावे.’

रणजित पाटील म्हणाले, ‘मयूर दूध संघ, महालक्ष्मी दूघ संघाचे काय झाले? याचा विचार प्रथम आमदार पाटील यांनी करावा. ब्रिदी सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल ३१०० रुपये जाहीर केली आहे. मात्र डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने २९०० रुपये दर जाहीर केला आहे. त्यांनी दर कमी का दिला, याचेही उत्तर द्यावे. त्यांच्या मंत्र‌िपदाच्या काळात गोकुळचे वाहन फिरत होते. त्यावेळी गोकुळ संघ फार चांगला असे वाटत होता. संधीसाधू पाटील यांना गोकुळवर बोलण्याचा अधिकार नाही.’

धनश्री पाटील, सुजाता जरग, के. डी. पाटील, एन. एन. पाटील, गोकुळ कर्मचारी संघाचे संजय सावंत, संघाचे सचिव सदाशिव निकम, वंदना भोसले, भगवान लोंढे आदीनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आमदार सुरेश हाळणवकर, सत्यज‌ित पाटील माजी आमदार संजय घाटगे, बजरंग देसाई, संचालक अंबरिश घाटगे, रामराजे कुपेकर, भरमू सुबराव पाटील, अनुराधा पाटील, विश्वास जाधव, बाबा देसाई, रवींद्र आपटे, पी. डी. धुंदरे, सदस्य अरुण इंगवले, रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.


मोर्चातील मागण्या

देशातील अन्य राज्यांप्रमाणे सरकारने गाय दूध खरेदीस प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या खात्यावर जमा करावेत. दूध संघाकडे उत्पादित होणारी दूध पावडर, लोणी उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर सात रुपये संघाला अनुदान मिळावे. सरकारने संघाकडे उत्पादित होणारी दूध पावडर, लोणी योग्य दराने खरेदी करून बफर स्टॉक करुन संघाला मदत करावी. सरकारी गोदामातील अयोग्य धान्य कोटा पद्धतीने सहकारी दूध संघ, पशुखाद्य कारखान्याला द्यावे. शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देण्यासाठी संघाकडील उत्पादित दूध पावडर सरकारने योग्य दरात खरेदी करावी.

अंबरिश घाटगे व्यासपीठावर

गोकुळच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत सतेज पाटील गटाचे दोन संचालक विजयी झाले होते. संजय घाटगे यांचे पुत्र अंबरिश यांना उमेदवारी नाकारल्याने ते पाटील यांच्या पॅनेलमध्ये गेले. चंद्रकांत बोंद्रे आणि अंबरिश घाटगे यांनी विजय मिळवित सत्ताधारी गटाला आव्हान दिले. मात्र, आजच्या सभेत अंबरिश घाटगे सत्ताधारी गटाच्या मांडीला मांडी लावून बसले होते. घाटगे यांच्या उपस्थितीवरून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉन्स्टेबलसह चौघांना पोलिस कोठडी

$
0
0

जयसिंगपूर

राजाराम महादेव माने यांच्या आत्महत्येप्रकरणी शिरोळ पोलिसांनी कॉन्स्टेबल भुजंग रामचंद्र कांबळे (वय ३४) याच्यासह निखिल उर्फ भाऊ बाबूराव खाडे (वय २९), शशिकांत संभाजी साळुंखे (वय ३६, दोघेही रा. घालवाड) तसेच स्वाती दशरथ माने (वय २४, रा. म्हसोबा गल्ली, जवाहरनगर इचलकरंजी) या चौघांना अटक केली आहे. गुरूवारी दुपारी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले.

राजाराम माने यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यासह पाच संशयितांना अटक करावी या मागणीसाठी मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी शिरोळ पोलिस ठाण्यावर बुधवारी मोर्चा काढला होता. आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी निखील खाडे, शशिकांत साळुंखे यांच्यासह महिलेवर गुन्हा दाखल केला होता. मात्र ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिस कर्मचारी भुजंग कांबळे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर चौघानांही अटक करण्यात आली.

गुरूवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास संशयितांना जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयासमोर सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकिल सुर्यकांत मिरजे यांनी मांडली. सबंधित गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कट करून हा गुन्हा केला आहे. या कटाबाबत संशयितांकडून सखोल तपास करायचा आहे. मृत राजाराम माने याने संशयितांना एक लाख ७५ हजार रूपये रोख रक्कम दिलेली आहे, ही रक्कम हस्तगत करायची आहे. गुन्ह्यात वापरलेले मोबाइल क्रमांक निष्पन्न करून मोबाइल जप्त करायचा आहे. संशयितांनी कट करून आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्याकडे सखोल तपास करण्याची गरज आहे. याचबरोबर संशयितांकडे पोलिस कर्मचारी शिंदे यांच्याबाबत तपास करायचा असल्याचे सरकारी वकिल सुर्यकांत मिरजे यांनी न्यायालयास सांगितले. यानंतर न्यायालयाने संशयितांना सात दिवस पोलिस कोठडी सुनावली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिम्मत असेल तर नवा संघ काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आमदार सतेज पाटील यांचा ‘गोकुळ’मध्ये राजकारण आणून आंबा पाडण्याचा डाव आहे. कोल्हापूरच्या जनतेनेच त्यांना सूर्यांजी पिसाळाची पदवी यापुर्वी दिली आहे. लोकांमध्ये गैरसमज, भांडण लावून सत्ता मिळविण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत, राजकारणासाठी गोकुळचा वापर न करता हिम्मत असेल तर नवा संघ काढा. ज्यांनी दूध संघ बंद पाडले, सभासदांचे कोट्यवधी रूपये बुडवले, तेथे मोर्चा काढा असे आव्हान खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात दिले. निषेध मोर्चात त्यांनी ‘स्वार्थी राजकारणासाठी पाच लाख शेतकरी कुटुंबांच्या चुलीत पाणी ओतू नका,’ असे आवाहनही त्यांनी केले.

खासदार महाडिक यांनी या सभेत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘गोकुळ दूध संघ देशात टॉपचा आहे. तरीही दोन ​महिने सतत संघावर टीका करत आहात. ‘गोकुळ’ वाचवण्यासाठी धडपड सुरू असल्याचा कांगावा करत आहात, तो वाचवायला कधी बंद पडलाय, कुणाचे पैसे तटवलेत का? उलट तुमच्यासारख्या करंट्यांच्या मागे असलेल्यांनी दूध संघ बंद पाडले, त्याबद्दल तुम्ही बोलत नाही, तेथे मोर्चा काढत नाही. तुम्हाला ‘गोकुळ’ची माहिती हवी आहे ना, ते मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग आहेत. मोर्चा काढून स्वार्थासाठी बदनामी कशाला करत आहात, आंबा पाडण्यासाठीच तुम्ही हे सारे करत आहात. ज्यांची लायकी नाही, ऐपत नाही, ज्यांचा दूध व्यवसायाशी संबंध नाही, अशा लोकांना व्यासपीठावर आणून टीका करायला लावता, असे सांगून ते म्हणाले, राजकारणात आपले वैर आहे. त्यामध्ये ‘गोकुळ’ला बदनाम करून राजकारण करण्याची गरज नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे जरा सबुरीने घ्यावे. त्यांच्याकडे ऐश्वर्य, श्रीमंती आहे, मात्र ते असे का वागतात, याचा उलगडा झालेला नाही. ऊठसूट महाडिक घराणे आणि गोकुळवर बोलण्याचे आमदार सतेज पाटील यांनी थांबवावे. गोकुळ वाचविण्यासाठी आमदार पाटील प्रयत्न करीत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र गोकुळवर झालेले सर्व आरोप खोटे आहेत. पाटील यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. गोकुळ संस्था व्यापाऱ्यांची नाही. शेतकरी आणि उत्पादकांच्या श्रमातून निर्माण झालेला हा संघ आहे. काटकसर करत असल्यानेच व्यवस्थापन खर्च केवळ १८ टक्के आहे. स्कार्पिओ गाडीतून संचालक फिरतात, डॉक्टरांनीही या वाहनांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. मग जनावरांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर एसटीने जाईपर्यंत मुक्या जनावरांचा जीव राहील का? असा सवाल करून ते म्हणाले, या सर्व वाहनांवर व्यवस्थापनात एकूण खर्चाच्या पाव पैसा खर्च येतो. सत्तेच्या काळात आमदार सतेज पाटील यांच्या कामासाठी गोकुळची वाहने २५ वेळा मुंबईला गेली. त्याचा हिशोब का सांगितला जात नाही?’

...तर सहन होणार नाही

ऐश्वर्य, संपत्ती असलेल्या मोठ्या घराण्यात जन्मलेल्या आमदार सतेज पाटील सतत महादेवराव महाडिक यांच्यावर टीका करू नये, असा इशारा देत ते म्हणाले, ‘वडिलधाऱ्यावर बोलण्याची आमची संस्कृती नाही, वैयक्तिक बदनामाही सहन केली जाणार नाही, तुमच्या वडिलांवर बोललो तर सहन होणार नाही, त्यामुळे भविष्यात गोकुळ अथवा वैयक्त‌िक बदनामी खपवून घेणार नाही. पैशाच्या मस्तीवर हे करत असाल तर जशास तसे उत्तर देवू.’

‘तर सगळे सुपरवायझर बावड्याचे’

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘५० वेळा तीच तीच कॅसेट वाजवून लोकांसमोर गैरसमज निर्माण केला जात आहे. गोकुळ संघ आमदार सतेज पाटील यांच्या ताब्यात गेला असता तर कसबा बावड्याचे सुपरवायझर नेमले असते. सर्वच कर्मचाऱ्यांना त्यांच्या तालावर नाचायला लागले असते. मग पंचायत समिती, ग्रामपंचायत, सोसायटीची निवडणूक लढवायची नाही.’ असे चित्र गोकुळमध्ये निर्माण केले असते.

महाडिकांचा एकही टँकर नाही

गोकुळमध्ये एकही टँकर किंवा गाडी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची नाही, त्यांची ट्रान्स्पोर्ट कंपनी आहे, त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचे टँकर आहेत, असा खुलासा करताना खासदार महाडिक म्हणाले, ‘ वस्तुस्थिती वेगळी असताना त्यांच्या पोटात पोटशूळ का उठतो, असा प्रश्न आहे. त्यांनी तोंड उघडले की आरोप आणि वाईट विचारच बाहेर पडतात. कधी तरी चांगलं बोला, असे आवाहन करून ते म्हणाले, खोटं बोलायची तरी किती? खोट बोल पण रेटून बोल अस त्यांचे झाले आहे. गोकुळमध्ये चहाच्या बिलाची नोंदही केली जाते. सर्व कामकाजाचा अहवाल पारदर्शी आहे. गोकुळवर आरोप करणाऱ्यांना जिल्ह्यात काहीच हाती लागले नसल्याने केवळ आंबा पाडण्याचा डाव आहे. त्यासाठी गटबांधणी आणि लोकांना भडकविण्याचे काम सुरु आहे.


दरवाढीचा विषय अधिवेशनात मांडणार

मला जत्रेतील ट्रॅक्टर म्हणून टीका केली. संसदरत्न पुरस्कार मिळवलेला मी खासदार आहे. मी दूध दरवाढीच्या विरोधात असल्याची खोटी टीका केली जात आहे. पण दरासाठी मीच आवाज उठवणार आहे. १५ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होत आहे. अधिवेशनात पहिला प्रश्न हा गाय दूध खरेदीस पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करणार आहे.

‘आम्हाला तुम्ही शिकवू नका’

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, ‘गोकुळ संस्था हकनाक बदनाम होईल, अशी कोणतीही टीका आमदार सतेज पाटील यांनी करू नये. राजकारणासाठी गोकुळचा वापर करू नये. अनेक संस्था उभारुन बंद पाडण्याचे काम जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे गोकुळचा कारभाराविषयी आरोप करणाऱ्यांनी शिकविण्याची गरज नाही. दूध संघ काढणाऱ्याची वाईट परिस्थिती झाली आहे. दूध उत्पादकांना फसविण्याचे काम कोणीही करू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळमध्ये कडकडीत बंद

$
0
0

जयसिंगपूर

राजाराम महादेव माने यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या कॉन्स्टेबल भुजंग कांबळे याच्यासह पाचजणांना अटक करावी, भुजंग कांबळे याला पाठीशी घालणारे पोलिस उपअधिक्षक रमेश सरवदे यांची तत्काळ बदली करावी, या मागणीसाठी शिरोळ ग्रामस्थांनी गुरूवारी कडकडीत बंद पाळला. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला.

राजाराम माने यांचे एका महिलेशी दूरध्वनीवरून संभाषण झाले होते. यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी वारंवार पैसे घेण्यात आले. आणखी पैशासाठी तगादा लावल्यानेच त्रासास कंटाळून राजाराम यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची तक्रार चुलत भाऊ अमरसिंह माने यांनी दिली होती. याप्रकरणी महिलेसह निखिल उर्फ भाऊ बाबूराव खाडे, शशिकांत संभाजी साळुंखे, कॉन्स्टेबल भुजंग कांबळे व शिंदे नामक पोलिस कर्मचाऱ्यास अटक करावी अशी मागणी केली होती. दरम्यान, कॉन्स्टेबल भुजंग कांबळे याला पाठीशी घालून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिस उपअधिक्षक रमेश सरवदे टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. यामुळे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी व उपअधिक्षक सरवदे यांची बदली करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी शिरोळ बंदची हाक दिली होती.

गाव बंदच्या आवाहनास प्रतिसाद देत शिरोळमध्ये सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. यामुळे मुख्य शिवाजी चौकात शुकशुकाट जाणवत होता. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी संघटना, वडाप संघटना, हातगाडी चालक, छोटे व्यावसायीक बंदमध्ये सहभागी झाले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, सकाळी पंचगंगा नदीकाठी वैकुंठधाम स्मशानभुमीत मृत राजाराम माने यांचे रक्षाविसर्जन करण्यात आले. यावेळी प्रभारी डीवायएसपी सुरज गुरव यांनी या प्रकरणातील पोलिस कर्मचारी भुजंग कांबळे याच्यासह चार संशयितांना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले. याप्रसंगी पोलिस निरिक्षक उदय डुबल उपस्थित होते. या प्रकरणातील शिंदे नामक पोलिस कर्मचाऱ्यास का अटक केली नाही असा सवाल ग्रामस्थांनी केला. यावेळी गुरव यांनी शिंदेचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीतील चांदी उद्योजकांना संरक्षण देणार

$
0
0

हुपरी

‘हुपरी शहरासाठी नगरपरिषद मंजूर करण्याचे काम भाजपने केले आहे. शहरातील विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्यासाठी भाजप जनसुराज्य युतीचे उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे. चांदी व्यवसायानिमित्त देशात फिरणाऱ्या चांदी उद्योजकांवर कोठेही गुन्हे दाखल झाले तर तो गुन्हा हुपरीत वर्ग करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करुन उद्योजकांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

हुपरी (ता.हातकणंगले) नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी भाजप, जनसुराज्य,रिपाईं युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री गाट व अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत पालकमंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश हाळवणकर होते. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री गाट, महावीर गाट, आण्णासाहेब शेंडूरे, माजी आमदार राजीव आवळे, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, हिंदूराव शेळके,जि.प.सदस्या स्मिताताई शेंडूरे, बाबा देसाई, अशोक स्वामी आदी प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘हुपरी शहरासाठी नगरपरिषद मंजूर झाल्यानंतर राज्य सरकारकडून चौदा कोटींचा निधी तत्काळ मंजूर झाला आहे. भाजप आघाडीला एकहाती सत्ता दिल्यास शहरामध्ये विकासासाची गंगा येईल. कोल्हापूरची अंबाबाई, जोतिबा यानंतर हुपरीच्या अंबाबाई मंदिर तिर्थक्षेत्राला 'अ'वर्ग दर्जा देण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार आहे. देशात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने चौफेर विकास झाला आहे. हुपरीतील झोपडपट्टीमुक्ती करुन चांगले रस्ते, गटारींसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी बांधिल राहू’

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यावर जोरदार टीका करताना पाटील म्हणाले, ‘सहकारी संस्थेवर हात मारुन पैसे घराकडे नेणाऱ्या आवाडेंनी आमदार हाळवणकरांवर बोलू नये अन्यथा त्यांना उघडे केल्याशिवाय राहणार नाही. येत्या १४ डिसेंबर रोजी विजयाची सभा घेण्यासाठी मी स्वतः येणार असल्याने यासाठी मोठे मैदान ठरवा.’

आमदार हाळवणकर म्हणाले, ‘हुपरी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याने प्रकाश आवाडे यांना पोटशूळ उठला आहे. येत्या काळात हुपरीसाठी भरीव निधी मिळण्यासाठी भाजपचे सर्व उमेदवार निवडून द्या.’

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री गाट म्हणाल्या, ‘राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर प्रथमच हुपरीची निवडणूक होत आहे. देशात व राज्यात भाजप आघाडीचे सरकार आहे. भाजप आघडीच्या उमेदवारांना निवडून देऊन शहराचा विकास साधावा.’ माजी आमदार राजीव आवळे यांनी भाजपचे उमेदवार निवडून आले तरच शहराचा विकास होणार असल्याचे सांगितले. यावेळी दिनकर ससे, सुभाष माळी, देवाप्पा मुधाळे, वीरकुमार शेंडूरे, राजेश राठोड, कल्लाप्पाण्णा गाट, संजयकुमार गाट आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत सुदर्शन खाडे यांनी केले. आभार राजेश राठोड यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राप्त‌िकरकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राप्त‌िकर विभागाकडून शहरातील चार डॉक्टरांसह त्यांच्या हॉस्पिटलवर टाकलेली छाप्यांची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. गुरुवारी प्राप्त‌िकरच्या पथकांनी हॉस्पिटल्समधील कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत कारवाईचा तपशील बाहेर आला नाही, मात्र चारही हॉस्पिटल्समधील कारभारासह डॉक्टरांनी केलेल्या गुंतवणुकीचीही कसून चौकशी सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरू राहिल्याने शहरातील इतर बडे डॉक्टर धास्तावले आहेत.

बुधवारी पहाटेच कोल्हापुरात दाखल झालेल्या प्राप्त‌िकर विभागाच्या पथकांनी चार बड्या डॉक्टरांच्या निवासस्थानांसह हॉस्पिटल्सवर एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत पथकांनी हॉस्पिटल्समधील कागदपत्रे, बिलांच्या पावत्या, सरकारी वैद्यकीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती, लाभार्थींची संख्या, औषध विक्रीची बिले यासह डॉक्टरांच्या घरातील बँकांचे पासबुक, गुंतवणुकीच्या पावत्या, दागिने, इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी याची सविस्तर माहिती घेतली होती. बुधवारी रात्रीपर्यंत कागदपत्रांची जमवाजमव करण्याचेच काम सुरू होते. गुरुवारी सकाळपासून कागदपत्रांच्या पडताळणीचे काम सुरू आहे. हॉस्पिटल प्रशासनाने मंजुरी घेतल्याप्रमाणे बेडची संख्या, उपचाराचे दर, वर्षभरातील नफा, सरकारकडे जमा केलेले विविध प्रकारचे कर याची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. सरकारी पंचांसमक्ष पडताळणीचे काम सुरू आहे.

कारवाई सुरू असलेल्या हॉस्पिटल्समध्ये बसंत बहार रोड, मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी आणि क्रशर चौकातील हॉस्पिटलचा समावेश आहे. गुरुवारी दिवसभर या हॉस्पिटल्ससमोर पोलिस बंदोबस्त तैनात होता. प्राप्त‌िकरच्या अधिकाऱ्यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने कारवाई सुरू ठेवली आहे. गुरुवारी पथकांमध्ये बदल केला होता. बेळगाव जिल्ह्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. काही डॉक्टरांनी कारवाईदरम्यान विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्राप्त‌िकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आक्रमकता दाखवताच डॉक्टरांचा विरोध मावळला. सलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरू राहिल्याने शहरातील मोठ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान, गुरुवारी शहरातील आणखी एका बड्या डॉक्टरच्या हॉस्पिटलवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. शाहूपुरी परिसरातील हॉस्पिटलमध्ये ही कारवाई केली असून, रात्री उशिरापर्यंत प्राप्त‌िकर विभागाच्या पथकाने या हॉस्पिटलमध्ये तळ ठोकला होता. याबाबत अधिकृत माहिती देणे मात्र अधिकाऱ्यांनी टाळले.

माहिती जाहीर होणार का?

प्राप्त‌िकर विभागाकडून डॉक्टर, बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकल्यानंतर कारवाईचा तपशील जाहीर केला जात नाही. या तुलनेत पोलिस, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या कारवायांची माहिती जाहीर केली जाते. प्राप्त‌िकर विभागाने गेली दोन दिवस शहरात केलेल्या कारवायांची माहिती जाहीर होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बावड्यात अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खानविलकर पंपाशेजारी खासगी जागेत पण परवानगी न घेता उभारण्यात आलेले हॉटेल व कार दुरुस्तीची मोठी दोन शेड गुरुवारी महापालिकेने जमीनदोस्त केली. खासगी जागेत कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. तर नुकतीच पंपाजवळ ठेवण्यात आलेल्या चार केबीन्सही हटवण्यात आल्या. यामुळे जयंती नाला ते पंपाजवळील चौकापर्यंतचा परिसर सायंकाळी मोकळा झाला होता. खासगी जागेतील कारवाईला व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण अतिक्रमण निर्मूलन विरोधी पथकाच्या कडक भूमिकेमुळे मोठी शेड पाडण्यात आली. दिवसभरात कसबा बावड्यापर्यंत १०२ अतिक्रमणे हटवण्यात आली. बावड्यातील फायर स्टेशनजवळील अतिक्रमण निर्मूलना​वेळीही व्यावसायिकांनी वाद घातला.

ताराराणी विभागीय कार्यालयाच्यावतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. यामध्ये अनाधिकृत ८२ केबीन, आठ शेड, हातगाडया, १२ विनापरवाना डिज‌िटल बोर्ड व रस्त्यावर आलेल्या दुकानाच्या छपऱ्या हटवण्यात आल्या. खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज, रमणमळा मुख्य पोस्ट ऑफ‌िस चौक, भगवा चौक व कसबा बावडा फायर स्टेशन समोरील श्रीराम उद्यानलगतच्या रस्त्यावरील, फुटपाथवरील व खुल्या जागेवरील विनापरवाना शेड काढण्यात आली.

शहराच्या उत्तर भागात प्रथमच मोहीम राबवण्यात आली. खानविलकर पंप ते कसबा बावडा हा रस्ता निवडण्यात आला होता. जयंती पुलाजवळ गेल्या काही दिवसांपासून खासगी जागेत रस्त्याशेजारील फुटपाथजवळ मोठ्या केबीन्स ठेवण्यात येत होत्या. पंपाजवळ तर एका मोठ्या शेडमध्ये स्वराज्य नावाचे हॉटेल चालवण्यात येत होते. त्याच्याशेजारीच कार दुरुस्तीचे शेड होते. या दोन्ही शेडमध्ये येणाऱ्या नागरिकांची वाहने या गजबजलेल्या चौकात उभी असायची. हॉटेलमध्ये सायंकाळनंतर होणारी गर्दी रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरत होती. तर जयंती नाल्याच्या पुलानंतर असलेल्या जागेत एक एक करत चार केबिन्स बसवण्यात आली होती. त्यातील अनेक केबीन्समध्ये काँक्रीटीकरण करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी दोन जेसीबीच्या माध्यमातून प्रथम ती केबीन्समधील काँक्रीट फोडण्यात आले. तसेच ती उचलून नेण्यात येत होती. पण व्यावसायिकांनी स्वतःहून काढून घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे तिथेच ठेवण्यात आली. पण सायंकाळपर्यंत तेथील केबीन्स हलवण्यात आल्या होत्या.

त्यानंतर मोठी कारवाई तेथील दोन शेडवर करण्यात आली. पत्र्याच्या दोन शेडमध्ये कार दुरुस्तीचा व हॉटेलचा व्यवसाय सुरू होता. या व्यावसायिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला. ही खासगी जागा असून महापालिकेने पिवळ्या पट्टा करण्याची प्रक्रिया राबवली असल्याचे सांगण्यात आले. पण त्याबाबतची कागदपत्रे दाखवली नसल्याने उपशहर अभियंता हर्षज‌ित घाटगे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. प्रथम गॅसकटरने काही लोखंडी खांब कापण्यात आले. पण नंतर सर्व शेड जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकण्यात आले. शेजारील हॉटेल व्यावसायिक शेवटच्या टप्प्यापर्यंत विरोध करत होता. पण अधिकारी ऐकत नसल्याचे पाहून नंतर सर्व साहित्य शेवटच्या क्षणी हलवले.

रमण मळा चौकातील चहा, वडा पावच्या, किरकोळ साहित्य विक्रीच्या केबीन्स जेसीबीच्या सहाय्याने हटवल्या. पोस्ट ऑफिसच्या भिंतीलगत व समोरील रस्त्यावर असलेल्या केबीन्स काढण्यात आल्या. तर महावीर कॉलेजसमोरील फुटपाथवर असलेल्या अनेक गाड्या व्यावसायिकांनी स्वतःहून हटवल्या. कसबा बावड्यातील भगवा चौकात तसेच फायर स्टेशनजवळीलही केबीन्स हटवण्यात आल्या. यावेळी काही व्यावसायिकांनी कारवाईस विरोध करण्याचा प्रयत्न केला. नुकसान होऊ नये यासाठी केबीन्स स्वतः काढून घेतो, असे काहींनी सांगितले होते. या कारवाईत उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, अतिक्रमण विभाग प्रमुख पंड‌ित पोवार, कनिष्ठ अभियंता बाबूराव दबडे, महादेव फुलारी, मिरा नगीमे, अनिरुध्द कोरडे सहभागी होते. मोहिमेसाठी ७० कर्मचारी, दोन ट्रॅक्टर ट्रॉली, तीन डंपर, लाइट बुम, कटर वेल्डींग ट्रॉली अशी यंत्रणा कार्यरत होती. कारवाईवेळी शाहूपुरी पोलिस स्टेशनकडील पोलिस व अग्निशमन दलाकडील जवान यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तिथे उद्धवस्त व इथे कटिंग

यापूर्वी नवीन वाशी नाका, कळंबा, रामानंदनगर येथे कारवाई केली जात असताना छोट्या केबीन्सधारकांकडून काही विरोध केला जात नसल्याचे लक्षात येताच महापालिकेच्या यंत्रणेने अशांना वेळ न देता त्या केबीन्स उचकटून नुकसान करण्याचे धोरण अवलंबले. पण खानविलकर पंपाशेजारी असणाऱ्या दोन मोठ्या शेड काढताना केबीन्सधारकांच्यावतीने थोडा दबाव आणल्यानंतर महापालिकेची यंत्रणा नुकसान न करता लोखंडी खांब कटींग करुन काढण्याचा प्रयत्न करत होती. या माध्यमातून कारवाईत दुजाभाव दिसत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला धडा शिकवला पाह‌िजे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे गायीच्या दुधाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोबत घेऊन त्यांच्यामार्फत हे प्रश्न सोडवले पाहिजेत, अन्यथा या सरकारलाही धडा शिकवला पाहीजे, असा इशारा अरूण नरके यांनी आपल्या गुरुवारी जागृती मोर्चादरम्यान दिला. व्यासपीठावर भाजपचे आमदार आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह अनेकजण उपस्थित असताना नरके यांनी ही टीका केली.

नरके म्हणाले, ‘गायीच्या अतिरिक्त दुधाचे संकट जगभर आहे, दूध पावडरचे दर प्रती किलो ११६ रूपयांपर्यंत खाली आले. अशा परिस्थितीत एक व दोन गाय किंवा म्हशीवर संसाराचा गाडा चालवणाऱ्या देशातील ९५ टक्के उत्पादकांचे भवितव्य महत्त्वाचे आहे. दुग्धविकास मंत्र्यांनी दोन रूपये वाढ करण्याचा निर्णय घेतला, नंतर तो मागे घेतला, पण या काळात गोकुळला २५ कोटींचा फटका बसला. दरासाठी आमदार पाटील यांनी मोर्चा काढला. त्यांनी उठसूठ पेपरबाजी करण्यापेक्षा त्यांनी चर्चेला कधीही यावे, पण त्यांचे यायचे धाडस नाही कारण संघाचा कारभार कसा चालतो हे त्यांना माहित आहे.

चांगल्या संघाला बाधा नको

राज्यातील आणि देशातही चांगला कारभार असलेल्या ‘गोकुळ’ चा वापर राजकारणासाठी करू नका, चांगल्या पद्धतीने चाललेल्या संघाच्या कारभाराला बाधा येईल, असे वर्तन आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी करू नये, असा सल्ला माजी आमदार पी. एन. पाटील यांनी दिला.

ते म्हणाले, राज्यातील इतर संघ गायीच्या दुधाला २१ रूपये देतात. गोकुळ मात्र त्यापेक्षा जादा म्हणजे २५ रूपये आहे. संघाकडे एकूण दुधाच्या ६० टक्के दूध गायीचे येते, त्याला मागणी नाही पण संघाने ते कधी नाकारले नाही, शिवाय दर कमी केलेला नाही. काँग्रेस आणि भाजप सरकारने कोट्यावधी रूपयांचे अनुदान सरकारने या संघाला दिले, अशा संघाची सुरू असलेली बदनामी बरोबर नाही असे सांगत महाडिक व पाटील या दोघांनाही त्यांनी राजकारण न करण्याचा सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

या राजकारणात कुणालातरी संपावे लागेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘सत्तेच्या राजकारणात कोणीतरी एक संपल्याशिवाय राजकारण थांबणार नाही. गोकुळवर शितोंडे उडविणाऱ्यांचा एक ना एक दिवस पापाचा घडा भरणार आहे. शाहूपुरीत माझ्या गाडीचा दरवाजा उघडायला येणाऱ्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. तुमचे धंदे सगळ्या कोल्हापूरला माहीत आहेत, उगाच सतत आमच्यावर टीका करू नका, नाहीत तर तुम्हालाच धडा शिकवू,’ असा जाहीर इशारा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना सभेत दिले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (गोकुळ) बदनाम करणाऱ्या विकृत प्रवत्तीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दूध उत्पादक, शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मोर्चात सुमारे वीस हजारांहून अधिक जण सहभागी झाले. मोर्चाच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात जोरदार शक्तीप्र्रदर्शन करण्यात आले.

गेले काही दिवस गोकुळवर आमदार सतेज पाटील यांनी टीका करत आहेत. त्यांनी मोर्चाही काढला. याला उत्तर देण्यासाठी काढलेल्या मोर्चात बोलताना माजी आमदार महाडिक म्हणाले, ‘वॉटर पार्कची जागाही माझ्या पाया पडून घेतली आहे, हे आमदारांनी विसरू नये. स्वार्थी, ढोंगी, सत्तापिपासू आणि उठ सूठ महाडिक घराण्यावर बोलणाऱ्यांना सरकारी जमिनी लाटून समाजसेवा करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी राजकारण शिकविण्याची गरज नाही. गरीब लोकांच्या जमिनी लुबाडल्याचे काम त्यांनी केले. गरिबांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करुन शिक्षण संस्थेसाठी धनगर समाजाची सुमारे १० एकर जागा हडपली. या धक्क्याने एका धनगर समाजातील व्यक्तीने आत्महत्या केली. त्यांच्या मंत्र‌िपदाच्या काळात सरकारी ईएसआय हॉस्पिटलचे अनुदान परत पाठविले. चांगले सरकारी रुग्णालय सुरू करण्याऐवजी स्वतःची ताकद वापरून कदमवाडी येथे रुग्णालय उभारले. हा कृतघ्नपणा आहे. या हॉस्प‌िटलमध्ये भाडोत्री माणस झोपवून सरकारी अनुदान लाटले जाते. शांतिनिकेतनच्या शाळेसाठीही महापालिकेची जागा लुबाडली. टोल प्रकरणामध्ये काय हेराफेरी केली त्याच्या कॅसेट उपलब्ध आहे. थेट पाइपलाइनच्या कामाच्या गाजावाजा केला, मात्र साधा जॅकवेलही बांधलेला नाही. शहरवासियांनी पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे.’

पी. एन. पाटील यांनाही ‘त्यांचा’ त्रास

दूध संघाचे खरे मालक उत्पादक आहेत असे स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘गोकुळकडे काही वाईट प्रवृत्ती वेगळ्या नजरेने पाहतात. जे पाहतात त्यांनी गोकुळसाठी काय केले, हे तपासावे. गरीब दूध उत्पादकांचा तळतळाट घेऊ नये. त्यांनी गोकुळची काळजी करण्याची गरज नाही. महाडिक कुटुंब एकही चुकीची गोष्ट करत नाही, असे सांगून ते म्हणाले, दारू आणि मटकेवाल्याकडून हप्ता घेणारा हा माणूस आहे, त्यांच्याकडून कुणाची कधीच चांगले झाले नाही. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यासोबतही त्यांनी वाईट व्यवहार केला आहे. त्यांनाही राजकारणात सातत्याने पायी तुडविण्याचे काम केले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीमध्येही अतिक्रमण हटाओ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

वाढत्या अतिक्रमण विरोधात सुरु असलेली मोहिम तिसऱ्या दिवशी विकली मार्केट व गांधी पुतळा परिसरात राबविण्यात आली. या ठिकाणची अतिक्रमणे दूर करण्यास वाहतुकीसाठी योग्य नियोजन करतानाच विक्रेत्यांना बसण्यासाठी व्यवस्था करुन देण्यात आली. तीन दिवसांपासून शहरातील वाढत्या अतिक्रमण विरोधात इचलकरंजी नगरपरिषद, पोलिस व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोहिम उघडली आहे.

गुरुवारी गांधी पुतळा परिसरात रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने बसणाऱ्या विक्रेत्यांना योग्य ती जागा ठरवून देत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. त्याचबरोबर उत्तम-प्रकाश चित्रमंदिरसमोरील विकली मार्केटमध्ये असलेल्या शेडमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांना हटविण्यात आले. त्याठिकाणी योग्य ती जागा आखून देत विक्रेत्यांना बसण्याची सोय केली.

शेडमध्ये काही विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आठवडा बाजारदिवशी अनेक विक्रेत्यांना मार्केटमध्ये बसण्यासाठी जागा नसल्याने भाजीपाला विक्रीसाठी रस्त्यावर बसावे लागत होते. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. मार्केटच्या बाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांना मार्केटमधील शेडमध्ये बसूनच व्यापार करण्यासाठी शुक्रवारपासून मोहिम हाती घेणार आहे. यासाठी सर्वच विभागांनी तयार रहावे असा सूचना देण्यात आल्या आहेत. व्यापक स्वरुपात कारवाई करून अतिक्रमणे हटविण्याच्या या मोहिमेला गती येईल असे सुत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नवी मुंबई

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील कळंबोली पोलिस ठाण्यात दीड वर्षापूर्वी बदली होऊन आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे (बिद्रे) यांच्या बेपत्ता प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात ठाणे ग्रामीणमध्ये विशेष शाखेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी येत्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे हे प्रकरण मांडण्यात आल्यामुळे आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

अश्विनीच्या कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता होण्यामागे घातपाताचा संशय व्यक्त करत यामागे पोलिस अधिकारी कुरुंदकरचा हात असल्याचा आरोप फेब्रुवारी २०१७ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. त्या अनुषंगाने कळंबोली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. अखेर पोलिसांनी प्राप्त झालेल्या पुराव्याअंती आरोपी कुरुंदकर यांना गुरुवारी सायंकाळी अटक केली असल्याची माहिती या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दिली.

मूळच्या कोल्हापूर जिह्यातील असलेल्या महिला पोलिस अधिकारी अश्विनी राजू गोरे (मूळ रा. आळते, ता. हातकणंगले) या गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता आहेत. त्यांची बदली कळंबोली पोलिस ठाण्यात झाली असली तरी त्या ठिकाणी रुजू झाल्या नव्हत्या. कळंबोली पोलिस ठाण्यात बदली झाल्यानंतर अश्विनी यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी अखेर ऑक्टोबर २०१६ मध्ये हायकोर्टात धाव घेतली. राजू गोरे यांनी अश्विनी आणि संशयित कुरुंदकर यांच्यातील मोबाइलवरील संवादाचे पुरावेही कोर्टात सादर केले. कुरुंदकरने मोबाइलवरून अनेकदा अश्विनी यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती, असा गोरे कुटुंबीयांचा आरोप आहे.

अखेर उच्च न्यायालयात फेब्रुवारी २०१७ मध्ये धाव घेतल्यानंतर याप्रकरणी संशयित पोलिस अधिकारी अभय कुरुंदकरविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गेल्या नऊ महिन्यात याप्रकरणी कुरुंदकर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारीच त्यांचा बचाव करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा गंभीर आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांकडून होऊ लागला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’मध्ये महाडिक यांचे २२ टँकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘गोकुळकडील टँकरसंबंधी लेखा परीक्षकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे स्पष्टकरण न देता सत्तारूढ मंडळी मोर्चातील भाषणात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अमल महादेवराव महाडिक, स्वरूप महादेवराव महाडिक यांच्या नावे प्रत्येकी एक आणि महादेवराव रामचंद्र महाडिक, मंगला रामचंद्र महाडिक, राजन हिंदुराव शिंदे यांच्या ‘कोल्हापूर आईस अॅण्ड स्टोअरेज कंपनी’च्या नावे २० टॅकर आहेत. हे सर्व टँकर ‘गोकुळ’कडे आहेत. त्यांना वारणा दूध संघाच्या तुलनेत प्रती किलोमीटर ५६ पैसे जादा दराने भाडे मिळते,’ असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘गोकुळ’ कारभाराच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चावेळी सत्ताधाऱ्यांकडून केलेल्या आरोपास उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ‘खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळमध्ये कार्यकर्त्यांचे टँकर आहेत, असे मोर्चातील भाषणात सांगितले. ४५ ते ५० लाखांचा टँकर घेणारा कार्यकर्ता कोण हे त्यांनी जाहीर करावे. वारणा दूध संघ प्रती किलोमीटर १ रुपये ९ पैसे टॅकरला भाडे देते. गोकुळ मात्र १ रुपये ६५ पैसे प्रती किलोमीटर देते. टँकरची निविदा काढताना महाडिक यांचेच टँकर पात्र होतील, अशा अटी आहेत. गाय दूध दरास जादा दर देण्यासाठी टँकरवरील खर्च कमी करा, अशी मागणी मागणी होती. मात्र मह‌ाडिक यांचेच २२ टँकर गोकुळला असल्यामुळे या मागणीकडे सत्तारूढ मंडळींनी दुर्लक्ष केले.

गाय दूध उत्पादकांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दोन रुपये जादा दर मिळावा, यासाठी आमचा लढा आहे. संघ वाचावा, अशी भ‌ूमिका आहे. आमचा विरोध ‘गोकुळ’मधील अपप्रवृत्तीला आहे. सरकारने गाय दूध दरास २ रुपये देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. सरकारने उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी निर्णय घेतल्याचा आरोप नरके यांनी केला. त्याचा खुलासा व्यासपीठावरील भाजपच्या आमदारांनी करणे गरजेचे आहे.’

दूध दराची तुलना गोकुळ ५० हजार ते एक लाख दूध संकलन करणाऱ्या संघाशी करीत आहेत. अमूल व इतर संस्थांशी ते करीत नाहीत. अमूल गाय दूधास प्रतीलिटर २६ रुपये १४ पैसे देते. तुलनेत लहान असलेले वारणा, राजारामबापू, हुतात्मा दूध संघ गोकुळच्या बरोबरीने दर देतात. गोकुळने संचालक वापरत असलेल्या स्का‌र्पिओ गाड्या, टँकर व इतर व्यवस्थापनावरील अवाढव्य खर्च कमी केल्यास दूध उत्पादकांना चांगला भाव देणे शक्य आहे असेही ते म्हणाले. यावेळी बाळ कुपेकर, अंजना रेडेकर आदी उपस्थित होते.

मोर्चासाठी सव्वा कोटी खर्च

मोर्चा काढण्यासाठी दहा दिवसांपासून गोकुळची सर्व यंत्रणा लावली. मोर्चात सहभागी होण्यासाठी भाड्यापोटी एक हजार आणि चहापाण्यासाठी ५०० रुपये दिले. मोर्चासाठी सव्वा कोटींचा खर्च केला आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. स्कार्पिओचा वापर गोकुळचे डॉक्टर करतात, असे खोटे सांगितले आहे. स्कार्पिओत डॉक्टर दाखवा आणि माझ्याकडून बक्षीस घेऊन जा,’ असे आव्हानही त्यांनी दिले.



कदाचित पी. एन. पाटील यांचे मत बदलेल

गोकुळच्या कारभारासंबंधी पी. एन. पाटील यांच्यापर्यंत चुकीची माहिती कुणीतरी पोहचवली असावी. यामुळेच ते कारभार चांगला सुरू असल्याचे सांगत आहे. कारभारासंबंधीत लेखा परीक्षकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा अहवाल त्यांना मी पाठवणार आहे. तो अहवाल वाचल्यानंतर ते माझ्या मताशी सहमत होतील, असे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिरोळचा कॉन्स्टेबल कांबळे निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोळ येथील राजेंद्र उर्फ राजाराम महादेव माने (वय ३६) या तरुणाला धमकावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिरोळ पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल भुजंगा कांबळे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निरीक्षक उदय डुबल यांची कंट्रोल रुमला बदली, तर उपअधीक्षक रमेश सरवदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ही कारवाई केली. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कुरुंदवाड पोलिसांकडे सोपवला आहे. मोबाइलवरून महिलेशी अश्लील संभाषण केल्याचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे देण्याची भीती दाखवून घालवाड (ता. शिरोळ) येथील निखिल खाडे आणि शशिकांत साळुंखे या दोघांनी राजेंद्र माने याच्याकडून पैसे उकळले होते. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने राजेंद्र माने याने सोमवारी (ता. ३) विषप्राशन करून आत्महत्या केली. खाडे आणि साळुंखे यांना शिरोळ पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल भुजंगा कांबळे याने मदत केल्याचा आरोप मृत माने याच्या नातेवाईकांनी केला होता. यानुसार कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी त्याच्यावर अटकेची कारवाई झाली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी तातडीने कॉन्स्टेबल कांबळे याला निलंबित केल्याचा आदेश जारी केला. अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्याकडून कांबळे याची चौकशी होणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवरही शेकले आहे. शिरोळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक उदय डुबल यांची तातडीने मुख्यालयातील कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आली आहे. उपविभागीय उपअधीक्षक रमेश सरवदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या गुन्ह्याचा तपासही शिरोळ पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कुरुंदवाड पोलिसांकडे सोपवला आहे, अशी माहिती अधीक्षक मोहिते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ उत्पादकांची धडक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकार तत्त्वावर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाला राजकारणापासून वा‌चवण्याची हाक देत गुरुवारी हजारोंच्या संख्येने दूध उत्पादक रस्त्यावर उतरले. ‘मी गोकुळचा, गोकुळ माझं’, ‘राजकारणातील बोक्याला रोखा,’ ‘ढोंगी राजकारण्याला रोखा,’ अशा घोषणा देत हजारो उत्पादकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. मोर्चात आमदार सतेज पाटील यांनाच लक्ष्य करण्यात आले. गोकुळची बदनामी सहन करणार नाही, असा इशारा देतानाच संचालक आणि उत्पादकांनी या मोर्चाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. दरम्यान, गायीच्या दुधाला सरकारने प्रतिलिटर पाच रूपये अनुदान द्यावे, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली.

गोकुळ दूध संघाने लिटरला दोन रूपये दर कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता. याला प्रत्युत्तर देण्याबरोबरच गोकुळची बदनामी करणाऱ्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांच्यासह माजी आमदार पी. एन. पाटील, दूध संघाचे माजी अध्यक्ष अरूण नरके, अरूण डोंगळे, रणजितसिंह पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. हिम्मत असेल तर नवीन दूध संघ काढा, असे आव्हानही यावेळी देण्यात आले. मोर्चासाठी मोठ्या संख्येने आलेल्या उत्पादकांची गर्दी आणि वाहनांमुळे अनेक भागांत वाहतूक विस्कळीत होत होती. मोर्चा दूधदरासाठी असला तरी आमदार सतेज पाटील यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले.

दसरा चौकात सकाळी दहापासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून खास वाहनातून दूध उत्पादक येत होते. वाहनावर तालुक्याच्या नावाचा फलक होता तर काही ठिकाणी संचालकांचा उल्लेख होता. झांज पथक आणि हलगी घुमक्याच्या निनादात मोर्चात चैतन्य आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. हाफ पँट, शर्ट घातलेल्या उत्पादकाबरोबर स्टार्चचा पांढरा शर्ट, जीन्स पँट आणि गॉगल घातलेले दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते तर मोर्चात होतेच. ‌शिवाय महिलांची संख्याही लक्षणीय होती. गोकुळच्यावतीने मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक उत्पादकाला गांधी टोपी देण्यात आली होती. टोपीवरील ‘मी गोकुळचा, गोकुळ माझं,’ ही अक्षरे लक्ष वेधून घेत होती. आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करणारे फलक आणि जॅकेटही यावेळी वाटण्यात आली.

दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा सुरू झाला. मोर्चात व्हीनस टॉकीज, बसंत बहार टॉकीज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र दूध उत्पादक दिसत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर जाहीर सभेत रुपांतर झाले. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन.पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

======

महाभारताप्रमाणे आता इथेही कुणीतरी एक संपल्याशिवाय हे राजकारण थांबणार नाही. मात्र महाभारतातही शेवटी नैतिकतेचाच विजय झाला आहे, हे लक्षात घ्या.

महादेवराव महाडीक, माजी आमदार

======

मोर्चाला गर्दी करण्यासाठी संचालकांनी गोकुळचे सव्वा कोटी रूपये खर्च केले. प्रत्येक गाडीला हजार रूपये आणि चहापाण्यासाठी पैसे देण्यात आले. हा भुर्दंड उत्पादकांवर कशासाठी?

सतेज पाटील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीचा फैलाव हटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिकेने शहरात राबवण्यात आलेल्या डेंगी सर्व्हेक्षण धडक मोहिमेत गुरुवारी अजूनही तापरुग्ण आढळून येत असून १०४ कंटेनगरमध्ये डेंगीच्या अळ्या आढळून आल्या. खासगी दवाखान्यांकडून येणाऱ्या अहवालानुसार गुरुवारी पाच डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. तर मोहिमेत सात डेंगीसदृश्य तापाचे संशयित रुग्ण आढळले.

मंगळवार पेठ, रविवार पेठ, खासबाग मैदान परिसर, जरगनगर, शुक्रवार पेठ परिसर, जुना बुधवार पेठ, विचारेमाळ, सहयाद्री हौसींग सोसायटी, पाटील गल्ली कदमवाडी, कनाननगर, राजारामपुरी, फिरंगाई, सोमवार पेठ, शनिवार पेठ या परिसरात सर्व्हे करण्यात आला. यामध्ये २०१३ घरांची तपासणी करण्यात आली असून ११७१८ इतक्या लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १४ तापाचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १३ जणांचे रक्त तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. सात रुग्ण डेंगीसदृश्य तापाचे आढळले आहेत. तसेच ४०२३ पाण्याचे साठे, कंटेनर साठे तपासले. यामध्ये १०४ कंटेनरमध्ये अळ्या सापडल्या. यावेळी नागरिकांना आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन पत्रके वाटण्यात आली.

सातत्याने तपासणी व पाण्याची भांडी कोरडी करण्यात येऊनही अजूनही तापाचे रुग्ण तसेच डेंगीच्या अळ्या सापडत आहेत. पण राबवण्यात येत असलेल्या मोहिमेमुळे डेंगीचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनी सांगितले. नियंत्रण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका, किटकनाशक विभागाकडील कर्मचारी तसेच आरोग्य स्वच्छता विभागाकडील कर्मचारी यांचा मोहिमेत समावेश होता.

रुग्ण सापडलेल्या भागातील प्रत्येक घरात जाऊन तिथे सध्या कुणी रुग्ण आहेत का?, विविध कंटेनरमध्ये अळ्या सापडतात का?, याची पाहणी करण्यात येत आहे. तसेच धूर फवारणी कर्मचाऱ्यांकडून धूर फवारणी व औषधाची फवारणीही केली जात आहे. गटारी तुंबलेल्या ठिकाणी सफाई कर्मचारी स्वच्छता करत आहेत.

घर, सोसायट्यांपासून ते रस्त्यापर्यंत आणि घराभोवतीच्या बागांपासून ते कचरा, भंगार साहित्याच्या ठिकाणापर्यंत पाणी साचल्यास डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक आहे. डेंगीचे डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात. त्यामुळे साठलेल्या पाण्यातच या डासांची पैदास होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दक्ष असणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिम्मतबहाद्दर परिसरात घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
ताराबाई पार्क येथील हिम्मतबहाद्दर परिसरातील मित्रनगरी अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडला. बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. या धाडसी चोरीत चोरट्यांनी फ्लॅटमधील सोने, चांदीचे दागिने आणि चांदीच्या मूर्ती असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सेवानिवृत्त अधिकारी परमेश्वराप्पा मुदाप्पा जवळी (वय ७९) यांनी गुरुवारी (ता. ७) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त परमेश्वराप्पा जवळी हे पत्नीसह मित्रनगरी अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर १० मध्ये राहतात. त्यांची मुलगी अभिनेत्री चट्टरीकी हिचे सासर कर्नाटकातील कोट्टूर (जि. बेल्लारी) येथे आहे. कार्तिक उत्सव असल्याने तीन डिसेंबरला सकाळी परमेश्वराप्पा जवळी व त्यांची पत्नी हे दोघे फ्लॅट बंद करून मुलीकडे कर्नाटकात गेले होते. बुधवारी (ता. ६) ते कोल्हापुरात आले.

त्यांना घराचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. आत जाऊन खात्री केली असता, बेडरुममच्या कपाटातील साहित्य विस्कटले होते. यावरून त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी मोबाइलवरून याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी जवळी यांच्या घरी जाऊन पंचनामा केला.

चोरट्यांनी घरातील सोन्याची कर्णफुले, हिरेजडीत अंगठ्या, पुजेसाठी वापरली जाणारी सोन्याची फुले, पाने, चांदीचे ताट, वाटी, ग्लास, अंबाबाई, महादेव, सरस्वती देवीची चांदीची मूर्ती, पैंजण व रोख रक्कम असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ठसे तज्ज्ञांनी घरातील कपाटांवरील ठसे घेतले आहेत. श्वान पथकासही पाचारण केले होते. जवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरीची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत विसरली साडेपाच लाखांची बॅग

$
0
0

कोल्हापूर

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये रेल्वे पोलिसांना बेवारस बॅग सापडली. या बॅगेत साडेपाच लाख रुपयांची रोकड,चांदीची जपमाळ आणि काही पुस्तके होती. बॅगेत मिळालेल्या पावतीबुकावरील मोबाइल नंबरवरून ही बॅग जबलपूर (मध्यप्रदेश) येथील सुरेंद्रकुमार जैन (वय ४८, रा. जबलपूर) यांची असल्याचे लक्षात आले. रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे साडेपाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग जैन यांना सुखरूप मिळाली. शुक्रवारी (ता. ८) सकाळी हा प्रकार घडला.

सुरेंद्रकुमार जैन हे मध्यप्रदेशातील जबलपूर येथील श्री वणी दिगंबर जैन गुरुकुलमध्ये राहतात. हातकणंगले तालुक्यातील कुंथुगिरी येथील मठात जाण्यासाठी गुरुवारी रात्री ते मुंबईतून महालक्ष्मी एक्सप्रेसला बसले. पहाटे साडेपाचच्या सुमारास रेल्वे हातकणंगले स्टेशनला पोहोचल्यानंतर ते सोबतचे साहित्य घेऊन रेल्वेतून खाली उतरले. यावेळी त्यांच्याकडील लाल रंगाची हँडबॅग मात्र रेल्वेत सिटवरच राहिली होती. काही वेळाने रेल्वेतील गार्ड विशाल माने यांना प्रवाशाची बॅग विसरल्याचे लक्षात आले. माने यांनी याची माहिती मिरजेतील वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकारी ए. के. मिश्रा यांना दिली. मिश्रा यांनी कोल्हापुरात येऊन बॅगची तपासणी केली. बॅगेत साडेपाच लाख रुपये, ३० ग्रॅम वजनाची चांदीची जपमाळ, काही पुस्तके, ट्रस्टचे पावतीबुक आणि डायरी होती. पोलिसांनी ट्रस्टच्या पावतीबुकातील नंबरवरून मुंबईतील कार्यालयात फोन लावला. यानंतर मुंबईतील कार्यालयाने सुरेंद्रकुमार जैन यांना बॅग विसरल्याचे कळवले.

सकाळी साडेनऊच्या सुमारास जैन हे सहकाऱ्यासह कोल्हापूर रेल्वे स्थानकात पोहोचले. ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी जैन यांच्याकडे बॅग सोपवली. आश्रमाच्या कामासाठी आणलेली रक्कम सुखरुप परत मिळाल्याने जैन यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>