Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राष्ट्रवादी कॉँग्रेसचा हल्लाबोल

$
0
0

सांगली :
केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितविरोधी धोरणांचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट जवळ रोखण्यात आल्यानंतर आंदोलकांनी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापालिकेतील विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी केले. विविध क्षेत्रातील मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सोमवारी दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांपासून सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. पोकळ आश्वासने देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केलेली आहे. सर्वच समाज घटकांतील नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. राज्यहिताच्या विषयांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग अशा विषयांची चर्चा सुरू आहे. नागरिकांना जगणे अवघड झालेले आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. फसव्या आणि खोट्या जाहीरांतीवर अनावश्यक खर्च होणारा पैसा रोखावा, राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, शेतकऱ्यांना २४ तास शेतीसाठी वीज उपलब्ध करुन द्यावी, कृषीपंपाचे वीज बील माफ करावे, नागरी परिसराची अस्वच्छता तातडीने दूर करावी, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती सरकारने करावी यासह अन्य मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आलेला आहे. मोर्चात महिलांची संख्या लक्षवेधी होती. या वेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, पद्माकर जगदाळे, योंगेंद्र थोरात, राहुल पवार, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, शेरुभाई सौदागार, अंजना कुंडले, आयेशा शेख, छाया जाधव, राधिका हारगे, स्नेहल रोकडे, वंदना चंदनशिवे, अनिता पांगम , राणी कदम,ममता शेख, साजिद पठाण, समीर कुपवाडे आदी उपस्थित होते.
बारा डिसेंबरला
विधानसभेवर हल्लाबोल
इस्लामपूर
‘शेतकरी व सामान्य माणसाच्या विरोधी राज्य सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार व्यक्त करून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने एक डिसेंबरला यवतमाळ येथून दिंडी आंदोलन छेडणार आहे. बारा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर हल्लाबोल मोर्चाने धडक देणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील हल्लाबोल मोर्चासमोर बोलताना दिली.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘पवारसाहेबांनी आम्हाला शिकवू नये’, या विधानाचा खरपूस समाचार घेताना पाटील म्हणाले, ‘मग पवारसाहेबांच्या घरी आपण कशासाठी जाता? आणि तुम्ही भाजपाची साथ सोडल्यावर तेथे कोण बसणार? याची चिंता तुम्ही कशाला करता? असले पाप आम्ही करणार नाही.’
इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयावर वाळवा तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री अण्णसाहेब डांगे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसिलदार नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
‘म्हैसाळ’ची थकबाकी
सातबाऱ्यावरून कमी करा
मिरज
मिरज पूर्व भागाला वरदान ठरलेली म्हैसाळ योजना थकबाकीमुळे बंद आहे. योजनेच्या थकीत पाणीपट्टीचा बोजा शेतकऱ्यांच्या ७/१२ वर चढविलेला आहे. योजनेची देय असलेली सर्व बिले सरकारने भरवित; पाणीपट्टी माफ करून शेतकऱ्यांच्या ७/१२ वरील बोजा तत्काळ कमी करावा यासह विविध मागण्यांसाठी मिरज तालुका राष्ट्रवादीने राज्य सरकारविरुद्ध हल्लाबोल केला. पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार शरद पाटील यांना निवेदन दिले.
वाकुर्डे योजनेचे काम पूर्ण करा
शिराळा
केंद्रातील व राज्यातील सरकारचा अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून हल्लाबोल करीत शिराळा तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेच्या वतीने माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृतवाखाली मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार के. जी. नाईक यांना निवेदन देण्यात आले.
शिराळा तालुक्यात आघाडी सरकारच्या काळात गती घेतलेली वाकुर्डे योजनेची व गिरजवडे एमआय टँकची कामे निधी अभावी बंद पडले आहे. या योजनांची कामे तातडीने करावीत, अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ दोन शेतकऱ्यांच्याखात्यात सरकारने पुन्हा भरले पैसे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
कोकण विदर्भ ग्रामीण बँकेच्या पंढरपूर तालुक्यातील गादेगाव शाखेत कर्जखाते असलेल्या देवानंद जगदाळे आणि अर्जुन कदम या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली कर्जमाफीची रक्कम माघारी गेल्याची बातमी ‘मटा’ने प्रसिद्ध केली होती. बातमीनंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारने त्या दोन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात पुन्हा पैसे जमा केले आहेत.
कर्जमाफीचे पैसे माघारी गेल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर तातडीने हालचाली होऊन कर्जमाफीची पैसे परत घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने पुन्हा पैसे भरून त्यांना कर्जमुक्त केले आहे. या सुखद धक्क्यानंतर हादरून गेलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कर्जमाफीची हसू फुलले आहे.
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील कोकण विदर्भ ग्रामीण बँकेतील देवानंद जगदाळे आणि अर्जुन कदम या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ ऑक्टोंबर रोजी माफ होऊन त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. यानंतर अचानक १३ नोव्हेंबर रोजी त्यांचे पैसे सरकारने पुन्हा काढून घेतल्याने हे दोन्ही कुटुंबे हादरून गेली होती. सोमवारी पुन्हा देवानंद जगदाळे यांच्या खात्यात पुन्हा ६४४०३ रुपये तर अर्जुन कदम यांच्या खात्यात ५६५१६ रुपये जमा झाल्याने या दोन्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक शिवाजी रायभान यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साकारणार ४२४ घरकुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेने प्रकल्प अहवालात ४२४ घरकुलाचा आराखडा ‘म्हाडा’कडे सादर केला आहे. ‘म्हाडा’च्या मान्यतेनंतर या योजनेसाठी राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान मंजूर होणार आहे. त्यामध्ये केंद्राचा हिस्सा दीड लाख तर राज्य सरकारचा वाटा एक लाख रुपयांचा आहे. परवडणाऱ्या घरासाठी लाभार्थ्यांना ठराविक रक्कम गुंतवावी लागणार आहे.

महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून हा प्रकल्प अहवाल २४ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्य अभियंता-२, महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणकडे सादर केला आहे. प्रकल्प दोनमध्ये खासगी भागीदारीमध्ये परवडणाऱ्या घरांची नि​र्मिती करण्यात येणार आहे. त्यामध्ये कदमवाडी कपूर वसाहत झोपडपट्टी, बोंद्रेनगर झोपडपट्टी येथील घोषित झोपडपट्टीच्या ठिकाणी पक्की घरे बांधणी प्रस्तावित आहे. तर कामगार चाळ येथही ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पने अंतर्गत घरांची बांधणी होणार आहे. कदमवाडी कपूर वसाहत झोपडपट्टी येथे ११७ घरे, बोंद्रेनगर झोपडपट्टी येथे २५ घरे आणि कामगार चाळ येथे २८२ घरे प्रस्तावित आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करताना महापालिकेने शहरातील ४३ झोपडपट्ट्यांचे सर्व्हेक्षण केले आहे. या योजनेत चार घटकांचा समावेश आहे. महापालिकेच्या क्षेत्रातील घोषित झोपडपट्टीमध्ये परवडणाऱ्या दरात पक्की घरे बांधण्याची योजना आहे. यामध्ये संबंधित लाभार्थ्यालाही रक्कम भरावी लागते. दुसरी महापालिका खासगी विकसकासोबत करार करुन जागा विकसित करु शकते. तिसऱ्या घटकात नागरिकांनी घर बांधणीसाठी कर्ज घेतले असल्यास, शिवाय लाभार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ठ असेल तर अडीच लाख रुपयांचे अर्थसहाय मिळू शकते. शहरात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी चार एप्रिल २०१६ ते एक जून २०१६ या कालावधीत ४७३८ अर्ज दाखल झाले. महापालिकेच्या प्रकल्प विभागाने मागणी सर्व्हेक्षणाच्या आधारे कृती आराखडा व वार्षिक अंमलबजावणी आराखडा तयार केला. म्हाडाला सादर केलेल्या प्रस्तावात कदमवाडी, बोंद्रेनगर आणि कामगार चाळ येथील प्रकल्प आराखड्याचा समावेश आहे. म्हाडाकडून हा अहवाल राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सादर होईल. त्यानंतर अनुदानाची रक्कम उपलब्ध होणार आहे.


प्रधानमंत्री आवास योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र कुटुंबांना स्वतःच्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधणे अथवा राहत्या घराची वाढ करण्यासाठी सरकारकडून अडीच लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध होणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याचे काम महापालिकेमार्फत सुरु आहे. दरम्यान अनेक अर्जदारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. अर्जदारांनी महापालिकेशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करावी. यामुळे शहरातील जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

प्रज्ञा गायकवाड, कनिष्ठ अभियंता महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पादकांची ‘गोकुळ’वर धडक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदीदरात दोन रुपयांची अन्यायी कपात केल्याच्या निषेधार्थ उत्पादकांनी सोमवारी भव्य मोर्चा काढला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आलेल्या दूध उत्पादकांनी गोकुळ कार्यालयावर धडक देऊन दर कपात मागे घेण्याची मागणी केली. भर उन्हात उत्पादकांनी मोर्चाला उत्स्फूर्त हजेरी लावली. लक्षवेधी फलक आणि दर कपातविरोधी घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला होता.

राज्य सरकारने दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गाय दूध खरेदीदर २७ रुपये झाला. त्यानंतरच तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडचे दर कोसळले. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा मुद्दा उपस्थित करत गोकुळने गाय दूध खरेदी दर दोन रुपयांनी कमी केला. या निर्णयाविरोधात निवेदनही देण्यात आले, पण गोकुळ आपला निर्णय कायम ठेवल्याने आमदार पाटील यांनी मोर्चाची हाक दिली होती.

मोर्चाच्या अग्रभागी असेला नंदीबैल मोर्चाचे आकर्षण ठरला. नंदीबैलावर ‘शेतकरी राजानं राब राब राबायचं…संचालकांनी मातुर स्कॉर्पिओतून फिरायचं,’ हा लक्षवेधी फलक होता. मोर्चाला सासने ग्राउंड येथून सुरूवात झाल्यानंतर मोर्चा आदित्य कॉर्नर, सिंचन भवनमार्गे पितळी गणपती चौकात आला. ‘हक्काचं दाम मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा आणि संघाच्या भ्रष्ट कारभारावर आसूड ओढत आलेल्या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासो देवकर यांनी दोन गायीच्या दराचा वार्षिक जमाखर्चाचा मांडला. उत्पादकांना दरवर्षी ३८ हजारांचा तोटा होत असताना संघ मात्र अन्यायी दरकपात करत असल्याचा आरोप केला. ज्येष्ठ कार्यकर्ते मारुतराव जाधव यांनी लेखापरीक्षण अहवालाचा आधार घेत संघाच्या कारभारावर ताशेरे ओढले. जाधव म्हणाले, ‘संघाची वार्षिक उलाढाल १५ हजार कोटी असून उत्पादकांना जादाचे ३८ कोटी देण्यास काय अडचण आहे? मुंबईला दूध वाहतुकीसाठी गोकुळ एक रुपये ६५ पैसे तर वारणा एक रुपये नऊ पैसे देते. वाढीव ५६ पैशामुळे संघाला १२ कोटींचा तोटा होत असून, वाहतूक भाडे कुणाच्या टँकरला देता? असे प्रश्न उपस्थित केले.

मोर्चास मधुकर देसाई, सदाशिव चरापले, अशोकराव पवार-पाटील, विद्याधर गोरंबे, विजयसिंह मोरे, प्रा. निवासराव पाटील, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, शशिकांत खोत, भगवान पाटील, किरणसिंह पाटील आदी उत्पादक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीखोर कॉन्स्टेबल निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन यंत्रमाग कामगाराकडे खंडणी मागणारा शहापूर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग जाधवर याच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. खंडणी प्रकरणाची झळ शहापूरचे सहायक निरीक्षक सीताराम डुबल यांनाही बसली असून, त्यांची पोलिस मुख्यालयात नियंत्रण कक्षात बदली झाली. डुबल यांच्या जागी एपीआय संजीव झाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ही माहिती दिली.

महिन्यापूर्वी राहुल सुरवसे या यंत्रमाग कामगाराचा खून झाला होता. खुनातील संशयित अंकुश उर्फ अनिकेत अरुण चव्हाण सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शहापूर पोलिसांनी मृत सुरवसेच्या सोलापुरातील मित्राला चौकशीसाठी बोलवले होते. त्याला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी कॉन्स्टेबल जाधवरने दिली होती. यातून बाहेर काढण्यासाठी त्याने मोठ्या रकमेची खंडणी मागितली होती. हे संभाषण मोबाइलवर रेकॉर्ड झाले होते. संभाषणाची क्लीप वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती लागताच कॉन्स्टेबल जाधवरची बदली पोलिस मुख्यालयात करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी मोबाइलवरील संभाषणासह जाधवरचीही चौकशी केली. यानंतर सोमवारी जाधवरच्या निलंबनाचे आदेश काढले. जाधवर याचे मोबाइलवरील २० मिनिटांचे संभाषण मिळाले आहे.

कॉन्स्टेबल जाधवरच्या खंडणीप्रकरणात शहापूर ठाण्यातील अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा सुरू होती. पोलिस अधीक्षक मोहिते यांनी शहापूरचे सहायक निरीक्षक सीताराम डुबल यांची तडकाफडकी मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली केली. डुबल यांच्या जागी संजीव झाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झाडे हे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत होते.

झाडेंचा तपासात हातखंडा

संजीव दत्तात्रय झाडे मूळचे नांदेड येथील आहेत. नागपूर, सोलापूर येथे काम केल्यानंतर जून २०१७ मध्ये त्यांची बदली कोल्हापुरात झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत काम करताना त्यांनी सोनतळी येथील चंदनचोरी, उचगाव दरोडा, शिरोळ दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला. उस्मानाबाद जिल्ह्यातील सराईत चोरट्यांची टोळी पकडण्याचे काम त्यांनी केले. तपासात हातखंडा असलेल्या झाडेंना शहापूर परिसरातील अवैध धंदे आणि खंडणीखोरांचे आव्हान असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिपदाला फाटा, शिवसेना नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी विधानसभा निवडणुकीत कमळ फुलवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. याला रोखण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर हे आतापासूनच नियोजन करत आहेत. यासाठी त्यांना मंत्रिपदाची ताकद हवी होती. त्यासाठीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पण ठाकरे यांनी चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील सभेत ‘कोल्हापूर जिल्हा भगवा करा. मग कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपद देऊ’ असे जाहीर करत मंत्रिपदाला फाटा दिल्याने आमदार समर्थकांत नाराजी निर्माण झाली आहे.

काँग्रेसचे तत्कालीन आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा अपवाद वगळता गेल्या पंचवीस वर्षात शिवसेनेने शहरातील गड कायम राखला. दिलीप देसाईंनी​ सुरू केलेली विजयी घौडदौड सुरेश साळोखेंनी कायम ठेवली. त्यांच्या पराभवनानंतर राजेश क्षीरसागर यांनी दोन वेळा कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून विजय मिळवला. आता मात्र भाजपने शहरात ताकद निर्माण केल्याने आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपूर्वीची निवडणूक वगळता आतापर्यंतच्या सेनेच्या विजयात भाजपच्या विशिष्ट मतांचा वाटा मोठा होता. पण आता भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढणार आहे. भाजपची पूर्वीची ताकद आणि आताची ताकद यामध्ये बराच फरक पडला आहे. यामुळे सेनेने आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा हा त्याचाच एक भाग होता.

आमदार क्षीरसागर यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अनेकदा आरोप केले. या दोघांतील वाद सतत गाजत आहे. या वादाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत नक्कीच उमटणार आहेत. त्यामुळेच ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्व होते. कारण ठाकरेदेखील अधुनमधून मंत्री पाटील यांच्यावर टीका करत असतात. यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात क्षीरसागर यांना रोखण्याचे नियोजन जोरात सुरू आहे. यासाठी मधुरिमाराजे यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वेळ पडल्यास मंत्री पाटील हेदेखील येथून रिंगणात उतरू शकतात, याची जाणीव असल्यानेच क्षीरसागर यांनी यंदा प्रचंड शक्तीप्रदर्शन केले.

ठाकरे यांच्या उपस्थितीत हे शक्तीप्रदर्शन करण्यात मंत्रिपदाची अपेक्षा देखील होती. मंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर होते. पण ठाकरे यांनी जिल्ह्याला मंत्रिपद न देण्याचे संकेत आपल्या दौऱ्यात दिले. यामुळे शक्तीप्रदर्शन वाया गेल्याची चर्चा ​शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यामधून सुरू झाली आहे.

महाडिक गट भाजपकडे

भाजपच्या पाठिशी सध्या महाडिक गटाची ताकद आहे. शहरातून लढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह मधुरिमाराजे इच्छूक आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांना यारपैकी एकाशी लढायचे आहे. भाजपच्या पाठिशी मंत्रीपदाची ताकद आहे, जी सेनेकडे नाही. यामुळेच मंत्रिपदासाठी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ठाकरे यांच्या दौऱ्यात आपली ताकद दाखवण्यात ते यशस्वीदेखील झाले. पुढील राजकारणात त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेदखल तक्रारी थेट एसपींकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कागदोपत्री कमी दिसावी यासाठी बहुतांश पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ होते. त्यामुळे काही तक्रारदार थेट पोलिस अधीक्षकांसह विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे जाऊन तक्रारी देत आहेत. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने जागे झालेले पोलिस तक्रारदारांची दखल घेत असल्याचे चित्र आहे. अवैध व्यावसायिक आणि गुंडांच्या विरोधातील तक्रारींसह आता पोलिसांविरोधातील तक्रारीही थेट एसपी ऑफिसमध्ये देण्याचे आवाहन अधीक्षक संजय मोहिते यांनी केले आहे.

पोलिस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ शक्यतो येऊ नये, अशीच भावना सर्वसामान्य नागरिकांची असते. सहकार्य करण्यापेक्षा पोलिस उलट तपासणीच घेतात असे चित्र आहे. फिर्यादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. फिर्याद नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. कच्ची नोंद घेऊन पुन्हा येण्यास सांगितले जाते. पोलिस ठाण्याबाहेरच सेटलमेंट करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो. अनेकदा तक्रार दाखल झाल्यानंतरही तपासात दिरंगाई होते. पोलिसांनी दिलेल्या वागणुकीला कंटाळून बरेच तक्रारदार पुन्हा पोलिस ठाण्याकडे फिरकतच नाहीत.

‘यातील काही तक्रारदार मात्र थेट एसपी आणि आयजी ऑफिसमध्ये जाऊन तक्रार अर्ज देतात. या तक्रारदारांची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी थेट संबंधित ठाण्यातील अधिकाऱ्यांना फोन करतात. नंतर पोलिसांना जाग येते. गेल्या दोन महिन्यांत अशा तक्रारींचे प्रमाण वाढले आहे’, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

दरम्यान, थेट एसपींकडे पोहोचणाऱ्या तक्रारींमुळे काही गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तरुणाच्या खुनाचा तपास करताना पोलिस कॉन्स्टेबल पांडुंरग जाधवर याने गुन्ह्याशी संबधित नसलेल्या व्यक्तीला खोटा गुन्हादाखल करण्याची धमकी दिली होती. धमकावून त्याने खंडणी उकळण्याचाही प्रयत्न केला होता. तक्रारदाराने थेट आयजी नांगरे-पाटील यांच्याकडे धाव घेतली. नांगरे-पाटील यांनी तक्रारदाराला पोलिस अधीक्षकांकडे पाठवले. अधीक्षक मोहिते यांनी तक्रारदाराशी स्वतंत्र चर्चा केली. यातून शहापूर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलचा खंडणीचा प्रकार उघडकीस आला. अधीक्षक मोहिते यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन खंडणीखोर कॉन्स्टेबल जाधवर याला निलंबित केले. पोलिसांच्या विरोधातील अशा तक्रारी वाढत आहेत.

अवैध व्यावसायिक, झोपडपट्टीदादा, खंडणीखोरांविरोधात थेट पोलिस ठाण्यात तक्रारी देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी यापूर्वीच केले होते. या आवाहनानंतर खंडणीखोरांविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. यानंतर शहरासह इचलकरंजीतील सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचेही प्रस्ताव पोलिसांनी तयार केले. यातील काही गुंडांवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. तर शंभराहून प्रस्ताव तयार होत आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल होण्यासह गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे पोलिस अधीक्षक मोहिते यांनी सांगितले.

खंडणीखोर पोलिसांवर नजर

अवैध व्यावसायिकांशी सलगी करणारे, त्यांना अभय देणारे आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उखळणाऱ्या पोलिसांच्या विरोधात थेट तक्रारी करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले आहे. पोलिस तक्रारी दाखल करून घेत नाहीत, असा नागरिकांचा सूर आहे. यापूर्वी गुंडांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन मोहिते यांनी केले होते. गुंडांनंतर आता खाकीतील गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांवर कारवाई सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमा, अस्थम्याचे वाढले रुग्ण

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com
Tweet:@satishgMT

कोल्हापूर : हवा प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका कोल्हापुरातील दमा आणि अस्थम्याच्या रुग्णांना बसू लागला आहे. कोल्हापूर शहरात मोठ्या संख्येने असलेल्या वाहनांच्या धुरातून बाहेर पडणाऱ्या घातक घटकांमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय प्रदषण नियंत्रण मंडळाने हवा प्रदूषण करणाऱ्या महाराष्ट्रातील १७ शहराची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात कोल्हापूरचा समावेश आहे. हवेमध्ये नायट्रोजनडायऑक्साइड, धुलीकणांचे प्रमाण मानकांपेक्षा जास्त आढळले आहे. या वाढत्या हवा प्रदूषणाचा थेट फटका मानवी आरोग्यावर होणार आहे.

कोल्हापूर शहर सधन असल्याने गेल्या वीस वर्षात वाहनांची संख्या वाढली. शहरात दुचाकीबरोबर चारचाकी वाहनांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात १२ लाखांच्या आसपास वाहनांची संख्या आहे. लगतच्या राज्य व राष्ट्रीय महामार्गामुळे प्रवासी, अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. कोल्हापूर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने नोकरी, व्यवसाय, सरकारी कामानिमित्त रोज शहरात अडीच लाखांहून अधिक वाहनांची ये-जा होते. त्यामुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे. शहरातील रस्ते दुभाजकांकडे जरी पाहिले तरी धुराच्या काजळीने दुभाजकांवरील पिवळ्या-काळ्या पट्ट्यांवर काजळीचा काळा थर चढल्याचे दिसते. त्यावरून हवा प्रदूषणाची तीव्रता दिसून येते. मुख्य रस्ते, चौकांत वाहतुकीच्या कोंडीमुळे धूर जास्त बाहेर पडतो. त्याचा फटका सर्वांना बसत आहे.

कोल्हापूरची हवा ही मुंबई, कोकणाच्या तुलनेत थंड असल्याने जिल्ह्यात दमा, अस्थमाने आजारी रुग्णांची संख्या मोठी आहे. हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे त्याचा फटका या रुग्णांना बसणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी संशोधनाची गरज असल्याचे मत अनेक डॉक्टरांनी व्यक्त केले. वातावरणातील बदल, ऊन पावसाचा खेळ यामुळे सर्दी-पडशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्दी-पडसे जास्त बळावल्याने न्यूमोनियाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण न्यूमोनियाचे रुग्ण हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत. हवेतील धुलीकण, वाहनांचा धूर याचा फटका न्यूमोनियाच्या रुग्णांना बसत आहे. हवा प्रदूषणामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत असे डॉक्टरांनी सांगितले.

हवा प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्ष लागवड हा सर्वात महत्त्वाचा, दीर्घकालीन उपाय असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. कोल्हापुरात यापूर्वी झाडांची संख्या मोठी होती. पण सध्या सिमेंटच्या जंगलामुळे झाडी कमी झाली आहे. वृक्षारोपणाला प्राधान्य दिले तर प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.


हवेच्या प्रदूषणाचा बचाव करण्यासाठी स्कार्फ बांधला जातो. पण स्कार्फ बांधल्याने धुळीपासून बचाव होऊ शकतो. पण स्कार्फ बांधला तरी हवेतील घातक घटक श्वसनावाटे शरीरात जातात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रदूषित हवेचा धोका टाळण्यासाठी बाजारात चांगल्या दर्जाचे मास्क मिळतात. पण त्यापासूनही शंभर टक्के शुद्ध हवा मिळू शकतो याची हमी कोणीही देऊ शकत नसल्याने डॉक्टरांचे म्हणणे आहे.


कोल्हापुरात दमा व अस्थम्याचे रुग्ण आहेत. हवा प्रदूषणाचा फटका या रुग्णांना बसण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभागाने संयुक्त अभ्यास करायला हवा.

डॉ. अनिया सैब्बनावर, सीपीआर हॉस्पिटल


दमा, अस्थम्याच्या रुग्णांना हवा प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका बसतो. कोल्हापुरात हवेचे प्रदूषण वाढत असल्याने भविष्यात शहराच्या आरोग्य व्यवस्थेला याचा मोठा धोका आहे. या प्रदूषणामुळे रक्तदाब, फुफ्फुसाचा कॅन्सर हे आजार होऊ शकतात. त्यासाठी आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यात वृक्षलागवड, वृक्षसंगोपन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हवा प्रदूषणाची मात्रा कमी होऊ शकते. पेट्रोल-डिझेलच्या वाहनांऐवजी नव्याने बाजारात दाखल होणारी इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर भविष्यात वाढवावा लागेल.

डॉ. संदीप देसाई, एमडी, मेडिसिन


सिगारेट ओढणे व दूषित हवा शरीरात घेणे या प्रक्रिया समान आहेत. हवेतील दूषित घटक फुफ्फुसात चिकटून राहिले तर कॅन्सरची लागण होण्याची दाट शक्यता असते. फुफ्फुसे निकामी होतात. दरवर्षी ८० हजार नवीन फुफ्फुसाच्या कॅन्सरचे रुग्ण निर्माण होतात. सिगारेटमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असले तरी भविष्यात प्रदूषित हवेमुळेही फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकेल.

डॉ. सूरज पवार, कॅन्सर तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने सोमवारपासून सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमध्ये पहिल्या दिवशी फुलेवाडी जकात नाका ते रंकाळा टॉवरपर्यंतच्या रस्त्यावरील अनधिकृत केबीन, शेड, होर्डिंग्ज आणि बॅनर अशी ६० अतिक्रमणे हटवण्यात आली. शहरातील प्रवेशाच्या रस्त्यावरुन मध्यवस्तीपर्यंत ही कारवाई केली जाणार असून मंगळवारपासून कारवाई आणखी तीव्र करण्याचे आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.

रंकाळा टॉवरपर्यंत उभारण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनरही काढण्यात आले. या कारवाईमध्ये महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सक्रीय झाले नसल्याने कारवाईला वेळ लागत होता. अनेक विक्रेते जेसीबीच्या चालकाला कारवाई थांबवण्याचे आदेश देत होते. तर कर्मचाऱ्यांना ‘थोडा वेळ थांबा, आम्ही काढून घेतो,’ असे सांगून वेळकाढूपणा करत होते. तिथे या विक्रेत्यांना बोलण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नसल्याने कर्मचारी दबावात येत असल्याचे दिसत होते. यामुळे महापालिकेने मोहीम सुरू केली असली तरी त्याला ताकद आली नव्हती. तसेच पोलिस बंदोबस्तही तुटपुंजा होता.

फुलेवाडी फायर स्टेशनजवळील ​खुल्या जागेत अनधिकृत केबीन्सबरोबर मटक्याचे अड्डे, अनेक केबीन्सची पाणी कनेक्शन होती. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनातील काही अधिकारी व पोलिसांची या साऱ्या कारभाराला साथ असल्याचेच स्पष्ट झाले. फुटपाथवर मोजक्याच केबीन दिसत असल्या तरी मागील जागेत तब्बल २२ अतिक्रमणे होती. त्यात साहित्य ठेवण्यासाठी, वडा भजी तयार करण्यासाठी, मटका व्यवसायासाठी केबीन व शेड उभारल्या होत्या. यासह फुलेवाडी जकात नाक्याजवळील आठ केबीन व दोन शेड काढण्यात आली. या दोन्ही ठिकाणी केबीनधारकांबरोबर स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या आठ दिवसांपासून सूचना दिल्या असल्याने आता मोहीम थांबणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सुनावले. या कारवाईत १२५ कर्मचारी, दोन जेसीबी, बुम, कटर ट्रॉली, ट्रॅक्टर, तीन डंपर, अग्निशमन गाडी अशी यंत्रणा कार्यरत होती.

विभागप्रमुख पोवार कोसळल्याने धावपळ

दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख पंडित पोवार यांना कारवाई करत असताना

अचानक चक्कर आली. त्यामुळे ते जाग्यावर पडल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार करुन प्रकृतीत सुधारणा झाल्यावर ते परत कारवाईच्या ठिकाणी हजर झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ पोलिसांना नोटिसा;आयोजकांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मुंबई हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित अर्धमॅरेथॉन स्पर्धेवेळी डॉल्बीच्या तालावर झिंगाट डान्स करणाऱ्या आठ पोलिस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतर जिल्हा पोलिसप्रमुखांकडून कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, नियम व अटींचा भंग करुन डॉल्बीचा दणदणाट केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले असून डॉल्बी जप्त केला आहे. त्यामध्ये आय एम फीट क्लबचे अध्यक्ष महेश बाबुराव शेळके व साऊंड सिस्टीम चालक प्रशांत बाळासो होगाडे यांचा समावेश आहे.

आय एम फिट संस्था व कोल्हापूर पोलिस यांच्यावतीने २६/११ चे औचित्य साधत अर्धमॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा संपल्यानंतर पारितोषिक वितरणप्रसंगी संयोजकांसह पोलिसांनीही डॉल्बीच्या तालावर झिंगाट डान्स करून शहिदांचा अवमान केल्याने शहरात खळबळ माजून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली असून गावभाग पोलिसांत कार्यक्रमाचे संयोजक आय एम फीट संस्थेचे अध्यक्ष आणि साऊंड सिस्टिम चालक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार डॉल्बीवर बंदी आहे. त्यामुळे गणेशोत्सवासह विविध कार्यक्रमात पोलिसांच्या आवाहनानुसार डॉल्बीला फाटा देण्यात आला. पण त्याच आवाहनाला पोलिसांनीच हरताळ फासत डॉल्बी लावण्यास कशी परवानगी दिली, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते यांच्या आदेशानुसार डॉल्बीच्या तालावर ठेका धरणाऱ्या आठ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांकडून तत्काळ खुलासा मागविण्यात आला असून तो प्राप्त होताच त्याचा अहवाल पोलिसप्रमुखांना सोपविला जाईल. त्यानंतरच पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.

दरम्यान, नागरिकांच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी धावण्यापेक्षा दोन अश्रू पुरे होते. पण पोलिसांनीच आयोजित कार्यक्रमात डॉल्बीच्या तालावर झिंगाट होऊन नाचणाऱ्या पोलिसांचा कोणता आदर्श घ्यायचा, याचा खुलासा आता पोलिसांनीच जनतेसमोर करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया बजरंग दलाच्यावतीने करण्यात आली आहे. संयोजकांसह सर्वांना अटक करून झिंगाट डॉल्बी ताब्यात घ्यावा. तसेच आयोजकांनी जमवलेल्या लाखो रुपयांचा हिशोब जनतेसमोर मांडावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यतेलाचे डबे चोरणाऱ्या महिला अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोणार वसाहतीमधील वैष्णवी ऑइल मिलचे शटर उचकटून चोरट्यांनी खाद्यतेलाचे डबे आणि धातूच्या पट्ट्या असा सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या तीन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. तायडी जोतिराम रणदिवे (वय २४), सीमा सुरेश पांडागळे (२८) आणि राजश्री दत्ता नाईक (२८, तिघी राहणार राजेंद्रनगगर झोपडपट्टी) अशी अटकेतील महिलांची नावे आहेत. पोलिसांनी या महिलांकडून ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त हस्तगत केला.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास सुरेश बनछोडे (वय २८, रा. बाजार गेट, कोल्हापूर) यांच्या लोणार वसाहतीतील वैष्णवी ऑइल मिलमध्ये २१ नोव्हेंबरला चोरीचा प्रकार घडला होता. चोरट्यांनी मिलमधील ५० हजारांचे खाद्यतेलाचे डबे आणि १७ हजार रुपये किमतीच्या धातूच्या पट्ट्या लंपास केल्या होत्या. फिर्याद दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी रेकॉर्डवरील संशयित चोरट्यांकडे चौकशी सुरू केली होती. दरम्यान, कावळा नाका परिसरात खाद्यतेलाचे डबे विक्रीसाठी घेऊन फिरणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. अधिक चौकशीमध्ये तायडी रणदिवे, सीमा पांडागळे आणि राजश्री नाईक या तिघींनी वैष्णवी ऑइल मिलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून खाद्यतेलाच्या १५ डब्यांसह सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या महिला पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरट्या आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी वर्तवली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बलुतं’मुळे स्त्री संघर्षाला सलाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पतीच्या निधनानंतर त्याचा नाभिक व्यवसाय सुरू करताना समाजाचा विरोध सहन करणारी, तरीही धीटाईने हातात वस्तरा घेत बलुतेदारीचा अध्याय सुरू ठेवणाऱ्या हासूरवाडीच्या शांताबाईंच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘बलुतं’ या लघुपटामुळे स्त्री संघर्षाला जागतिक पातळीवर सलाम मिळाला. या लघुपटाला जगभरातून मिळालेले २९ पुरस्कार आणि गोव्यातील ‘इफ्फी’मध्ये मिळालेले स्थान नक्कीच प्रोत्साहन देणारे आहे’ अशा शब्दांत या लघुपटाच्या निर्मात्या कविता चुरी यांनी यशाबाबत संवाद साधला.

चुरी म्हणाल्या, ‘के. सी. प्रॉडक्शनतर्फे ‘बलुतं’ आणि ‘सावट’ या दोन लघुपटांची निर्मिती केली. या दोन्ही लघुपटांचा धागा स्त्री आणि तिचे आयुष्य हा आहे. आज स्त्रीच्या सुरक्षेचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. सावटमध्ये एका मुलीच्या सुर​​क्षिततेसाठी धडपडणारा बाप पहायला मिळतो. कथा जरी बापावर बेतलेली असली तरी दिवसभर घरी न आलेल्या मुलीचा शोध घेणारा वडील आणि समाजात मुलीच्या सुरक्षितेबाबत असलेले प्रश्नचिन्ह या लघुपटात अधोरेखित करण्यात आले. ‘बलुतं’ हा लघुपट शांताबाई यांच्या वास्तव जीवनावर आधारीत आहे. एका स्त्रीने ठरवलं तर ती समाजाशी ताकदीने लढू शकते हा संदेश हा लघुपट देतो. पतीच्या निधनानंतर चार मुलींसह उघड्यावर पडलेलं आयुष्य सावरण्यासाठी शांताबाईंनी पुरूषांची हजामत करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या वाटेवर समाज काय म्हणेल हा विचार त्यांनी केला नाही. अखेर हाच व्यवसाय सन्मानाने करत त्यांनी मुलींचा सांभाळ केला. स्त्रीचा संघर्ष किती सोशिक असतो याची ही कथा जागतिक स्तरावर गौरवली गेली. या दोन्ही लघुपटांमुळे भारतीय स्त्री आणि तिचे आयुष्य याची वेगळ्या अर्थाने सांगड घातली आहे.’ बलुतं ला मिळालेले यश हे भारतीय स्त्रीच्या कर्तृत्वाला मिळालेली पावती आहे असेही चुरी यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला ‘बलुतं’ लघुपटाचे दिग्दर्शक अजय कुरणे यांच्यासह कलाकार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळवर सामूहिक दरोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘टँकर वाहतूक, बल्क कुलरमधील चुकीची गुंतवणूक, उपपदार्थ विक्रीतून केलेली कमाई आणि जाहिरातीवरील अनावश्यक खर्च यांमाधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची सामूहिक लूट कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातून (गोकुळ) होत आहे. आमच्या घामाचे भागभांडवल असताना पर जिल्ह्यातील व्यापारी खासगी संघाप्रमाणे निर्णय घेत आहेत. संघाच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढल्यानंतर व्यापारी माझ्यावर टीका करतो, आणि दूध संस्थांचे वासाचे दूध बाजुला काढण्याची धमकी देतो. पण या धमकीला न घाबरता उत्पादकांच्या हितासाठी आरपारची लढाई लढण्यास सज्ज आहे,’ असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी दिली. गायीच्या दूध खरेदीदरात कपात केल्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चानंतर पितळी गणपती चौकात झालेल्या सभेत ते सोमवारी बोलत होते.

आमदार पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता गोकुळच्या कारभारांवरुन महाडिक यांच्यासह संचालक मंडळावर टिकेची झोड उठविली. आमदार पाटील म्हणाले, ‘गोकुळच्या दैनंदिन कामकाजात अनावश्यक खर्च दाखवून कोट्यवधीची माया एक व्यापारी गोळा करत आहे. दरकपातीला संचालकांचा विरोध असताना केवळ व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून दरकपात करण्याचा निर्णय घेतला. संघात ‘व्यापारी बोले, संचालक डोले’ अशी स्थिती आहे. गोकुळचा भ्रष्ट कारभाराची चिरफाड करताना गोकुळ मोडत असल्याची टीका केली जाते, पण मी गोकुळ मोडायला नाही, तर वाचवायला आलो असून सहकाराच्या नावावर व्यापाऱ्याच्या घर भरण्याला माझा विरोध आहे. लेखापरीक्षण अहवालामध्येही अनेक ताशेरे ओढले आहेत. सरकारने जाहीर केलेला २७ रुपये दरही उत्पादकांना कमी असून २७ रुपये अधिक तीन रुपये सरकारने अनुदान द्यावे’

‘गोकुळचे कोल्हापूरात एक लाख २० हजार तर मुंबईत चार लाख ५० हजार लिटर दुधाची विक्री होते. मुंबईत दूध वितरणासाठी केवळ ४० वितरक नेमले आहेत. भ्रष्टाचाराचा वाटा अधिक विभागू नये, यासाठीच जादा वितरकांची नेमणूक केली नाही, असा आरोप करत गेल्या वीस वर्षांत उपपदार्थांची विक्री केवळ पाचजण का करतात?’ असा प्रश्नही आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

शिवाजीराव परुळेकर यांनीही संचालक आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर जोरदार टीका केली. ‘सर्वपक्षीय मोर्चामुळे गोकुळ मोडायला निघालेला नेता नरमला आहे. अमूल विरोधात बोलल्यास घरावर छापे पडतील या भीतीने संचालक सरकारविरोधात बोलत नाहीत. सर्वसाधारण सभा गैरमार्गाने झालेली असताना खोटे इतिवृत्त लिहले असून प्रशासक नेमण्यास भाग पाडू. संचालकांचे २५ कोटींचे बंगले आले कोठून’ असाही प्रश्न उपस्थित केला.

संचालकांची अशीही धडपड

दूध दरकपात मागे घेण्यासाठी निवेदन देण्यास गेल्यानंतर अनेक संचालक आपल्या नेत्याला मला कशी उत्तरे दिली याचे प्रदर्शन करण्यासाठी धडपड करत होते, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला. अनेक संचालकांना चेअरमनपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यांना उत्पादकांपेक्षा स्वहिताचा जास्त विचार होता. त्याचवेळी एका संचालकांने म्हशीच्या दुधात गायीच्या दुधाची भेसळ होते, पण ते सांगायचे नसते, असे म्हटल्याचेही पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

पोलिसांच्या थर्ड डिग्री मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत कोथळेच्या मृत्यू प्रकरणी सुरू असलेल्या तपासातून काहीच निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आशिष कोथळे आणि अमित कोथळे दोन्ही भावांनी रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव निर्माण झाला आहे.

अनिकेत कोथळेला एका चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान, त्याच्यावर थर्ड डिग्रीचा वापर केला. यात त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून पोलिसांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी केलेले कृत्य समोर आल्यानंतर सांगलीत याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. अनिकेतच्या मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर, तत्कालीन पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांची बदली करण्यात आली. तर, १२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन अनिकेतच्या कुटुंबीयांना देण्यात आले होते. अनिकेतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. मात्र, अद्याप सीआयडी तपासातून काहीच निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेतच्या दोन्ही भावांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनिकेतची आई आणि पत्नीदेखील आक्रोश करत होत्या. आत्महत्या करणाऱ्या दोन्ही भावांना पोलिसांनी अटकाव करत ताब्यात घेतले. पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकान्त बोराटे, पोलीस रविंद्र शेळके सध्या पोलीस ठाणे आवारात असून अनिकेतच्या कुटुंबीयांची त्यांनी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली जिल्ह्यात ४० हजार लाभार्थी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
अनेक दिवसांपासून रखडलेली कर्जमाफी योजना आता गतीमान होत आहे. अधिवेशनात विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी का असेना मात्र कर्जमाफी प्रत्यक्षात उतरत आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १९ हजार ७७४ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. कर्जदारांची खाती बंद करण्यासाठी ७२ कोटी रुपये सोसायट्यांना वर्ग करण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर अनुदानापोटी २१०८५ शेतकऱ्यांना ३६ कोटींची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
सोसायट्यांकडून रक्कम कर्जखात्याला जमा होईल. जो शेतकरी कर्जमुक्त झाला आहे, त्या शेतकऱ्यांना दोन दिवसांत मोबाइलवर एसएमएस येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले. कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाची रक्कम अजूनही दोन टप्प्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे ज्या कर्जदाराला लाभ मिळालेला नाही, त्यांना पुढील टप्प्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेर्तंगत गत आठवड्यापासून कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा होऊ लागली आहे. राज्य सरकारने थकीत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. त्यासाठी अटी लागू केल्या. यामुळे कर्जमाफीच्या निकषामुळे कर्जमाफीतील लाभार्थी निश्चित करण्यास विलंब लागला. जिल्ह्यासाठी १९ हजार ७७४ शेतकऱ्यांना ७२ कोटी कर्जमाफी मिळाली आहे. जिल्हा बँकेने विकास सोसायट्यांच्या आणि सोसायट्यांनी सबंधित कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जमा करण्याचे काम सुरू होते. सोसायट्यांच्या खात्यावरील रक्कम कर्जदारांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कर्जमुक्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसने कळविले जाणार आहे. जे शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत, त्यांना दोन दिवसांत एसएमएस येणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
कर्जमाफीच्या चौथ्या यादीपर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ८५९ शेतकऱ्यांना १०८ कोटी ४२ लाख ९८ हजार ४४८ रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या तीन यादीतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा-खर्च करण्यात आला आहे. पहिली यादी ३५ शेतकऱ्यांची दुसरी यादी १३४६ शेतकऱ्यांची, तिसऱ्या यादीत २१ हजार ८५ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी रक्कम जाहीर केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर २८ जून २०१७ पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारणे, पडताळणी, संगणकातील डाटा करप्ट होणे, पुन्हा माहिती भरणे, चावडी वाचन, याद्यांची पडताळणी, असे सोपस्कार सुरू होते. यामुळे प्रत्यक्षात कर्ज माफीचा लाभ मिळणाण्यास विलंब लागला.
कर्जमाफीचे तालुकानिहाय लाभार्थी
तालुका शेतकरी कर्जमाफी (कोटीत)
आटपाडी २०४३ ५.५९
जत ६८९५ २३.७९
क.महांकाळ २४९१ ५.९५
कडेगाव २४४१ ५.९२
खानापूर १५३२ ४.१५
मिरज ४४०० १२.६१
पलूस ३४९३ ८.३१
शिराळा २८५५ ५.२५
तासगाव ६११४ २०.९८
वाळवा ८६९५ १५.८३
एकूण ४०८५९ १०८.४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खुल्या नाट्यगृहाचामिरजेत बेकायदा वापरआयुक्तांचे कारवाईचे आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
गाडवे कॉलनीत असलेल्या खुल्या नाट्यगृहाचा विनापरवाना व बेकायदा वापर सुरू असल्याचा प्रकार मनपा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या निदर्शनास आल्याने महापालिकेच्या कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला आहे.
सोमवारी रात्री आठच्या सुमारास मनपा आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि उपायुक्त स्मृती पाटील यांनी या खुल्या नाट्यगृहात प्रत्यक्ष जाऊन हा प्रकार डोळ्यांनी समक्ष बघितल्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त स्मृती पाटील यांना दिले.
शहरातील गाडवे कॉलनीमध्यें मनपाचे खुले नाट्यगृह गेली चार वर्षे वापराविना पडून आहे. व्यवस्थित आणि योग्य नियोजन केले तर या खुल्या नाट्यगृहाचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येणे शक्य आहे. त्यातून मनपाला चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळू शकेल. मात्र, त्यासाठी सकारात्मक मानसिकतेचा अधिकारी व स्वच्छ कारभारी असण्याची आवश्यकता आहे. या खुल्या नाट्यगृहाच्या परिसरात आसपास गवत उगवले आहे. आतील कट्ट्याची मोडतोड झाली आहे. दोन हॉल्सचे दरवाजे व खिडक्या मोडले आहेत तसेच रंगरंगोटी नाही व संडास-बाथरूमची मोडतोड झाली आहे. पाणी कनेक्शन बंद आहे. या नाट्यगृहाला दोन्ही बाजूस रस्ता असून, दोन्हीकडे मोठी गेट आहेत, हे गंजून मोडले आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी पूर्ण अंधार असतो व आसपास जास्त वर्दळ नसल्याने महिला व मुलींसाठी असुरक्षित वातावरण आहे.
सोमवारी रात्री आठचे सुमारास आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांनी या खुल्या नाट्यगृहाची पाहणी केली असता हॉलमध्ये काही शाळकरी मुले-मुली तायक्वांदोचा सराव करीत असल्याचे दिसले. साधारण २०-२५ मुले-मुली दररोज हा सर्व करतात, अशी माहिती मिळाली. मात्र, या ठिकाणी जबाबदार व्यक्ती कोणीही उपस्थित नव्हती. प्रत्येक मुलाकडून दरमहा २०० रुपये फी घेतली जात असल्याची माहिती मुलांनीच आयुक्तांना दिली. महापालिकेला अंधारात ठेवून, बेकायदेशीरपणे मनपा इमारतीत प्रवेश करून खुलेआम सुरू असलेला हा व्यवसाय पाहून आयुक्त खेबुडकर संतप्त झाले. हे प्रशिक्षण देणाऱ्यांना त्यांनी तातडीने बोलावून घेतले व त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच संबंधित प्रकारची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांना दिले.
आयुक्त म्हणाले, कायदेशीर मागणी केली असती तर शाळकरी मुलांना खेळण्यासाठी हा हॉल मनपाने नाममात्र भाड्याने दिला असता. उपक्रम चांगला आहे, परंतु विनापरवाना, बेकायदा मनपा जागेचा ताबा घेणे चुकीचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिन्यांततीस चोऱ्यानिपाणीत चोरांचा सुळसुळाट; पोलिसांना तपासात अपयश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी
घरफोडी, चेन स्नॅचिंग, बाजारात मोबाइल चोरी, दुचाकीची चोरी, दुकानांवर डल्ला अशा घटनांनी निपाणीकरांची गेल्या दोन महिन्यांपासून झोप उडवली आहे. निपाणीत चोरांचा धुमाकुळ सुरू असून, गेल्या दोन महिन्यांत ३० चोरीच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांनी चोरांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे. कारण एक संशयित अल्पवयीन वगळता पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही.
शनिवारी रात्री बिरदेव नगरात पाच ठिकाणच्या चोरीत दोन दुचाकी, आठ ते नऊ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एकूण सहा लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुमारे अडीच लाखाच्या रोकडीचाही समावेश आहे. शिक्षक असणाऱ्या आण्णासो बाबासो पाटील परगावी गेल्याची संधी साधत पाटील यांच्या घरात चोरी करून १ लाख ९५ हजार रुपये रोख, चांदीची ५ नाणी, असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबवला. ही रोकड आण्णासो पाटील यांचे नातेवाईक एस. एस. जेनर (रा. अन्निगेरी, हुबळी) यांनी चारचाकी गाडीच्या व्यवहारासाठी ठेवली होती. पाटील यांच्या घराशेजारी लावलेल्या दोन दुचाकींचीही चोरी झाल्याचे उघड झाले. चोरट्यांनी पाटील यांच्या घरात लाडू, चिवडा, केळींवरही ताव मारला.
संकेश्वर आगारात तांत्रिक विभागात कार्यरत असणारे टी. एम. आगद (मूळ गाव बेळगाव) बिरदेव नगरात भाडोत्री म्हणून राहतात. घरी कोणी नसल्याची संधी साधून तिजोरीतील पाच तोळ्याचे गंठण, देवाच्या मूर्तीसह एकूण आठ तोळ्यांचा ऐवज व रोख ३५ हजार रुपये लंपास झाल्याचे दिसून आले. याच दरम्यान शेजारील सुनील पट्टणशेट्टी शुक्रवारी पुण्याला गेले होते. चोरट्यांनी त्यांच्याही घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून चोरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो अपयशी ठरला. पोलिसांना मंगळवारपर्यंत चोरीच्या तपासकार्यात यश आले नाही.
२७ रोजी पहाटे अकोळ येथील बाजारपेठेत राहणाऱ्या उमेश स्वामी यांचे घर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. संगीता स्वामी यांच्यावर काठीने जीवघेणा हल्ला करीत चाकूच्या सहाय्याने मंगळसूत्र तोडून चौघा चोरट्यांनी पलायन केले. या घटनेमुळे अकोळमध्येही खळबळ उडाली आहे. या ही प्रकरणाचा तपास अजून सुरूच आहे.
गस्त घालण्याचे फार्मान
चोरींच्या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर निपाणी पोलिसांनी आता नागरीकांनाच तुम्ही गस्त घाला, असे फर्मान काढले आहे. चोरटे पकडण्यासाठी निपाणी पोलिसांना आलेले अपयश लपवण्यासाठीच हे फर्मान काढल्याचा नागरीकांचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्याचा हृदयविकारानेमृत्यू; साथीदार पसार

$
0
0

चोरट्याचा हृदयविकाराने
मृत्यू; साथीदार पसार
म. टा. वृत्तसेवा, कराड
कराड-विटा रस्त्याकडेला असलेल्या गजानन हाउसिंग सोसायटीमधील एका बंगल्यामध्ये चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली.
हृदयविकाराचा झटका आलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह सोडून त्याचे साथीदार पसार झाल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
येथील कराड-ओगलेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या गजानन हाउसिंग सोसायटीमध्ये जयराम जोशी यांचा बंगला आहे. जोशी पॉलिश पेपरचे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य वितरक असून, बंगल्यातच त्यांनी गोडाऊन व कार्यालय सुरू केले आहे. मात्र, या बंगल्यात कोणीही वास्तव्यास राहत नाही. सोमवारी रात्री जोशी यांनी आपले गोडाऊन व कार्यालय बंद केले. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जोशी यांनी आपल्या बंगल्यात असलेले गोडाऊन व कार्यालय उघडण्यास आले असता त्यांना बंगल्याचा मुख्य दरवाजा कटावणीने उचटकल्याचे दिसून आले. व्हरांड्यात कोणीतरी अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता संबंधिताचा मृत्यू झाला असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे जोशी यांनी या बाबतची माहिती येथील शहर पोलिसाना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जोशी यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाज्यासह पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचा दरवाजाही कटावणीने उचकटण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, बंगल्याची पोलिसांनी पाहणी केली असता बंगल्याच्या पोर्चमध्ये मृतावस्थेत पडलेल्या व्यक्तीसह अन्य काही चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज व्यक्त केला. तसेच या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृताची ओळख पटलेली नसल्याने पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडचा वैधमापन निरीक्षक अँटीकरप्शनच्या जाळ्यात

$
0
0

कराड :
इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांचे पासिंग व स्टॅम्पिंग करून प्रमाणपत्र देण्यासाठी वजनकाटे दुरुस्ती परवानाधारकाकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना येथील वजने, मापे व वैधमापन-शास्त्र कराड विभाग एक कार्यालयातील वैधमापन निरीक्षक रवींद्र भगवान आदाटे (वय ५२, रा. विश्वास अपार्टमेंट, ई वॉर्ड, न्यू शाहूपुरी ट्रेड सेंटर, कोल्हापूर, मूळ रा. माधवनगर, सांगली) याला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी पकडून रात्री उशीरा अटक केली. तत्पूर्वी त्याच्यावर येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारमान्य वजनकाटे दुरुस्ती परवानाधारकाकडे काही ग्राहकांनी आपल्या इलेट्रॉनिक्स वजन काट्यांचे पासिंग व स्टॅम्पिंग करून प्रमाणपत्र देण्यासाठी मागणी केली होती. त्यासाठी निरीक्षक रवींद्र आदाटे लाचेची मागणी करीत होता. यातील एका तक्रारदाराकडे त्याने तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तक्रारदाराने ती देण्यास नकार दर्शवित या बाबत तक्रारदाराने येथील लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी कराड कार्यालयात सापळा रचून त्याला अटक केली. या प्रकरणी कराड शहर पोलिसांत सायंकाळी उशीरा आदाटेच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशीरा आदाटेला अटक करण्यात आली. मंगळवारी दुपारी आदाटे याला येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी पतीसहपाच जणांना जन्मठेप

$
0
0


सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप परिसरात राहणाऱ्या महिलेचा तिचा पती आणि सासरच्या लोकांनी छळ करून खून केला होता. या प्रकरणी कोर्टाने पतीसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावला.
अश्विनी बरगालसिद्ध पडवळे (वय १९, रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. हिचा विवाह बरगालसिद्ध धर्मण्णा पडवळे याच्याशी २९ मे २०१३ रोजी झाला होता. विवाहाच्या काही दिवसानंतरपासून अश्विनी घरातील काम व्यवस्थीत करीत नाही, शेतात मजुरीला जात नाही आणि बरगालसिद्ध याला टमटम घेण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही, असे म्हणून पती बरगालसिद्ध पडवळे, सासू सुगलाबाई, सासरे धर्मण्णा, दीर शिवाजी आणि अश्विनीच्या पतीची आजी कुशालाबाई कोरे हे सर्वजण अश्विनीचा मानसिक व शारीरीक छळ करीत होते. या बाबत अश्विनी हिने तिच्या आई वडिलांना सांगितले होते. त्यावरून तिचे आई वडील, चुलते अमोगी देशमुख, लिंबाजी देशमुख यांनी अश्विनीच्या सासरी जावून तिच्या सासरच्या लोकांना समजावून सांगण्यास गेल्यावर अश्विनीचा पती बरगालसिद्ध याने तुम्ही टमटम घेऊन देत नाही, तुमच्या मुलीला सोडणार नाही. तिला जीवे मारून जेलमध्ये जातो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर ५ जून २०१४ रोजी अश्विनी तिच्या सासरच्या घरात अर्धवट अवस्थेत जळालेल्या स्थितीत आढळून आली होती. याबाबत अश्विनीच्या आईने फिर्याद दिली होती. हुंड्यासाठी छळ आणि जाळून खून, असा गुन्हा अश्विनीच्या पतीसह पाच जणांविरूद्ध दाखल करण्यात आला होता. कोर्टाने साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे ग्राह्य धरून अश्विनीचा जाळून खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. सावंत वाघुले यांनी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images