Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राज्यात २० कॅन्सर केंद्रांची गरज

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कॅन्सरच्या प्रादुर्भावात देशात उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅन्सरवर अचूक उपचारासाठी अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित झाले आहे. अशा सुविधा देणाऱ्या इन्स्टिट्यूटची संख्या राज्यात वाढण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. कदमवाडी येथील अॅपल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत शाहू महाराज, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महापौर हसीना फरास प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘एकेकाळी कॅन्सरवरील उपचार पद्धती प्रचंड वेदनादायी होती. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांवर उपचार करणे सुसह्य झाले आहे. वाढत्या कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र, आजारावरील उपचार महागडे आहेत. सामान्य, गरिबांना ते परवडत नाही. सरकारने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अमलात आणली. त्यातून कॅन्सरसह दुर्धर आजारांवर मोफत उपचार केले जातात. कोणत्याही योजनेत न बसल्यास उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत केली जाते. या निधीतून आतापर्यंत २८ हजार रुग्णांना मदत केली. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूटमध्ये कॅन्सरवर अत्याधुनिक तंत्राद्वारे उपचार केले जातात. मात्र, तेथे देशभरातील रूग्ण येतात. त्यांच्या नातेवाइकांची हेळसांड होते. अॅपलप्रमाणे राज्यात २० ठिकाणी कॅन्सरवर उपचार करणारी केंद्रे सुरू व्हावीत.’

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘२००७ मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून पक्षाकडून उमेदवारी मिळाली. तेव्हा प्रचारावेळी चष्मा बदलण्यासाठी एका नेत्रतज्ज्ञाकडे गेलो असता तपासणी केल्यानंतर त्यांनी डाव्या डोळ्यास कॅन्सर झाल्याचे सांगितले. तातडीने बेंगळुरूला जाऊन उपचार घेतले. कॅन्सर बरा झाला. कॅन्सर बरा होण्यासाठी अत्याधुनिक उपचारपद्धती विकसित झाली आहे. त्याचा लाभ संबंधित रुग्णांनी घ्यावा.’

अॅपल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. अशोक भूपाळी यांनी प्रास्ताविक केले. खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका म‌हाडिक, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आदी उपस्थित होते.

..अन् आमदार पाटील गेले

व्यासपीठावरील प्रत्येक खुर्चीवर उपस्थित मान्यवरांना बसण्यासाठी त्यांची नावे चिकटवली होती. कार्यक्रम सुरू होण्याआधी आमदार सतेज पाटील व्यासपीठावर आले. त्यांनी पहिल्या रांगेत आपल्या नावाची खुर्ची आहे का, याची पा‌हणी केली. नाव नसल्याने ते नाराज झाले. आमदार असूनही व्यासपीठावरून आपल्यासाठी खुर्ची नसल्याचे दिसताच ते खाली उतरून निघून गेले.

नजरा नजरही नाही...

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर खासदार राजू शेट्टी व्यासपीठावर आले. त्यांना खासदार महाडिक, आमदार महाडिक यांनी उठून जागा करून दिली. खुर्चीवर बसण्याआधी शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री पाटील यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर मंत्री खोत यांच्याजवळील एक खुर्ची सोडून ते बसले. कार्यक्रम संपेपर्यंत मंत्री खोत, खासदार शेट्टी यांनी एकमेकांकडे साधी नजरा नजरही करणे टाळले.

रुग्णांना फटका

मुख्यमंत्री फडणवीस येणार असल्याने हॉस्पिटल परिसरात सायंकाळी चारपासूनच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती. त्याचा त्रास रुग्ण व नातेवाइकांना सहन करावा लागला. कार्यक्रम संपल्यानंतर विविध संघटनांच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, त्यांनी निवेदन स्वीकारले नाही. पोलिसांनी शिष्टमंडळातील कार्यकर्ते, पद‌ाधिकाऱ्यांना ढकलून बाजूला काढले. त्यातून महिलाही सुटल्या नाहीत. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरीविरोधी सरकार नालायक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा होत्या, त्या सरकार बदलल्यानंतर आजही जशाच्या तशा आहेत. अशा अंधाऱ्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकाला जर हमीभाव मिळत नसेल तर हे सरकार नालायक आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचवेळी कर्जमुक्ती योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असल्याने सरकारकडून जी आकडेवारी पूर्वी दिली असली तरी अजूनही कर्जमुक्ती योजनेला लाभ मिळालेला शेतकरी दिसलेला नाही. त्यामुळे या योजनेत घोटाळा होऊ नये, अशी मनोमनी इच्छा असल्याचा टोला त्यांनी लगावला.

करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील कुंभी साखर कारखान्याजवळ आयोजित केलेल्या जाहीर सभेसाठी ठाकरे सायंकाळी आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ठाकरे म्हणाले, ‘शेतकऱ्याला आठ तासही वीज मिळत नाही, मिळते ती रात्री मिळते. मिणमिणत्या प्रकाशात सर्पदंश, जनावरांचे हल्ले सारे सहन करत शेतकरी जे पिकाच्या रुपातून सोने पिकवत असतो. त्याला जर हमीभाव ​दिला जात नसेल तर या सरकारला नालायक आहे. टीका करणे हा माझा उद्देश नसून सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पुर्ण होतात की नाहीत, जनता सरकारबाबत काय म्हणते हे पाहत आहे. सरकारला तीन वर्षे झाली आहेत. सरकारकडून केवळ घोषणा केल्या जात आहेत. त्या घोषणांचा उद्देश खरोखर जनतेपर्यंत पोहचतो की नाही हे जनतेत जाऊन पहात आहे.’

कर्जमुक्तीबाबत ते म्हणाले, ‘कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला शेतकरी अजूनही दिसलेला नाही. या योजनेचा ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार, ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत माध्यमातून आलेल्या माहितीच्या आधारे केवळ चार हजारच शेतकऱ्यांना लाभ मिळाले असे समजते. सारी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर इतक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळाला असेल तर ४० लाख हा आकडा कधी गाठणार? १३ लाख शेतकऱ्यांची खाती गायब असल्याचेही समजते. ३४ हजार कोटीची कर्जमुक्ती होईल, असेही वाटत नाही. खोटे बोलता कामा नये. हा प्रकार पाहिल्यानंतर छत्रपतींच्या नावाने असलेल्या व गरीब शेतकऱ्यांचे आयुष्य निगडीत असल्याने या योजनेत घोटाळा होऊ नये असे वाटते.’

सांगली पोलिसांकडून घडलेल्या प्रकरणाबाबत ते म्हणाले, ‘पोलिसांना बदनाम करणारी जी त्यांच्याच खात्यात असलेली प्रवृत्ती वेळीच आवरली पाहिजे. मंजू शेटे, सांगली, भाजपच्या आमदाराचे प्रकरण याबाबत गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून वेळीच आवरले नाही तर अशा लोकांची दरोडेखोरी सुरू होईल व त्यातून प्रामाणिकपणे काम करणारे पोलिस बदनाम होतील. मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा आरक्षण मिळणारच असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले असल्याने ते चिरकाल रहावेत, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या पायावर गोळ्या झाडा असे सांगणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लाज कशी वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राणेंच्या प्रश्नाला बगल

नारायण राणे यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा हा प्रश्न मोठा नाही, असे सांगत बगल दिली. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असेल तर ते पाहून घेतील, असेही स्पष्ट केले. संसदेच्या अधिवेशनाबाबत बोलताना ट्रिपल तलाकवर विधेयक आणले जाईल. मग समान नागरी कायदा, ३७० कलम, राम मंदिराचे विधेयक आणणार का? असा सवाल उपस्थित केला. यावेळी खासदार विनायक राऊत, खासदार गजानन किर्तीकर, मंत्री विजय शिवतारे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यज‌ित पाटील, आमदार सुज‌ित मिणचेकर, आमदार प्रकाश आब‌िटकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे उपस्थित होते.

जनता लाभार्थी नव्हे हक्कदार

सरकारकडून केल्या जात असलेल्या योजनांच्या जाहिरातीबाबत त्यांनी कानपिचक्या दिल्या. सरकार जनतेसाठी आहे. मी जनतेसोबत आहे. ज्या सरकारच्या जाहिराती सुरु आहेत, त्यामधील ‘लाभार्थी’ या शब्दाला माझा आक्षेप आहे. जनतेने आशीर्वाद दिल्याने या खुर्च्या मिळाल्या आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला निवडले आहे. एखादी योजना केली म्हणून उपकार केले असे समजू नका. जनता लाभार्थी असू शकत नाही तर तो जनतेचा हक्क आहे. सरकार त्यांचे सेवेकरी आहे. जाहिराती एकदिवस बऱ्या वाटतात. पण लोकांचा अनुभव जाहिरातींपेक्षा बोलका असतो, असा टोला त्यांनी लगावला.

पालकमंत्र‌िपदाचा उपयोग काय?

इतके मोठे पालकमंत्र‌िपद दिले असतानाही जिल्ह्यावर अन्याय होत असेल वाटत असेल तर त्या मंत्र‌िपदाचा उपयोग काय? असा टोला ठाकरे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. त्याचवेळी त्यांनी पालकमंत्र्यांच्या मांडीवर सारेच बसू शकतात, असे सांगून जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्र‌िपद देण्याबाबतच्या विषयाला बगल दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा १५ डिसेंबरपासून

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते मुंबई विमानप्रवास येत्या १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी स्पष्ट केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ही माहिती दिली. खासदार संभाजीराजे यांनी त्यांची दिल्ली येथे भेट घेतली आणि कोल्हापूरची विमानसेवा तातडीने सुरू करण्याची विनंती केली. विमानसेवेअभावी कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यावर राजू म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या उडान योजनेत कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश आहे. मुंबई विमानतळावर वेळेचा स्लॉट मिळाला आहे. वाहतूक परवान्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. २५ आणि २६ ऑक्टोबरला भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालयाच्या संयुक्त पथकाने कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली आहे. त्या पाहणीचा अहवालही सादर केला आहे. त्यानुसार डीसीजीएने कोल्हापूर विमानतळाला प्रवासी वाहतुकीचा परवाना दिला आहे. त्यामुळे १५ डिसेंबरला कोल्हापूरची विमानसेवा सुरू होणार आहे.’

कोल्हापूरची विमानसेवा आणि विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी यापूर्वी वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तांत्रिक अडचणी सोडवून तातडीने विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मिळाले होते. त्यानुसार गेले सहा वर्षे बंद असलेली विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. त्याचा फायदा कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी होणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठलमूर्तीवर पुन्हा प्रक्रिया

0
0

विठ्ठलमूर्तीवर पुन्हा प्रक्रिया
म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
अवघ्या विश्वाचा परमात्मा असलेल्या विठुरायाच्या मूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपन करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून, पुरातत्त्व विभागाशी यासाठी संपर्क साधण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिली. विठ्ठलाची ही स्वयंभू मूर्ती वालुकाश्म असून अनेक वर्षांपासून मूर्तीवर झालेल्या महापूजांमुळे रासायनिक क्रियेने मूर्तीची झीज झपाट्याने होत गेली. २०१० पासून या महापूजा बंद करण्यात आल्या. मात्र त्यामुळे अलीकडच्या काळात १९ फेब्रुवारी १९८८ साली मूर्तीवर पहिल्यांदा इपॉक्सीचा लेप देण्यात आला होता. यानंतर २४ मार्च २००५ आणि शेवटची प्रक्रिया १८ ते २० मार्च २०१२ मध्ये करण्यात आली होती. शेवटच्या दोन प्रक्रियांच्यावेळी सिलिकॉन (वॉकर बी एस २९०) या रसायनाचा लेप देण्यात आला असला तरी दर पाच वर्षांनंतर मूर्तीवर आता ही प्रक्रिया सातत्याने करावी लागणार आहे.
वर्षभरात विठुरायाच्या दर्शनासाठी सव्वा ते दीड कोटी भाविक येतात आणि त्याच्या चरणांवर मस्तक ठेवून दर्शन घेतात त्यामुळे मूर्तीच्या पायांची सर्वांत जास्त झीज होते. याला पर्याय नसला तरी गाभाऱ्यातील नंतरच्या काळात भिंतीवर बसवलेल्या संगमरवरी फरशा हटवण्याबाबत पुरातत्त्व विभागाने अनेक वेळा सूचना देऊनही या हटवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गाभाऱ्यातील उष्णता वाढून मूर्तीला धोका निर्माण होत आहे. प्रत्येक वज्रलेपावेळी यावर नुसती चर्चा होते मात्र मार्बल हटवण्याचे काम होत नसल्याने दिवसेंदिवस मूर्तीला धोका वाढत आहे. गेल्या वेळी लेपनाची प्रक्रिया तीन दिवस करावी लागली होती. पहिल्या दिवशी मूर्तीची रासायनिक पदार्थाने स्वच्छता करून घेऊन दुसऱ्या दिवशी मूर्तीवरील लहान भेगा भरून घेण्यात आल्या होत्या. तिसऱ्या दिवशी संपूर्ण मूर्तीवर सिलिकॉनचा लेप दिल्यावर ही प्रक्रिया पूर्ण झाली होती. हे तीन दिवस देवाचे दुरून दर्शन घ्यावे लागले होते. या प्रक्रियेवेळी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी मंदिरात उपस्थित राहिले होते. आता पुन्हा पाच वर्षानंतर हीच लेपन प्रक्रिया करावी लागणार असून मंदिर समितीने बैठकीत यास मान्यता देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपींनी १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
0

आरोपींनी १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
म. टा. वृत्तसेवा, सांगली
पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणातील सहा आरोपींना कोर्टाने गुरुवारी १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्या सर्वांना कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात धाडण्यात आले. दरम्यान, आरोपींनी आपल्या रक्ताचे, नखांचे, अक्षरांचे आणि लघवीचे नमुने देण्यास नकार दिल्याने याबाबत कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपींचे म्हणणे फेटाळले. त्यामुळे सीआयडीला आरोपींकडून आवश्यक ते नमुने घेण्यातला अडसर दूर झाला आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्त, आरोपींना पाहण्यासाठी झालेली गर्दीतूनच वाट काढत गुरुवारी अनिकेत कोथळे खून प्रकरणातील सहा आरोपींना घेऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा कोर्टात दाखल झाला. आरोपींना कोर्टात हजर करताना बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. मुख्य न्याय दंडाधिकारी पी. पी. खापे यांच्यासमोर आरोपींना हजर करण्यात आले. सरकारी वकील जे. एस. डाके यांनी सीआयडीच्या वतीने युक्तिवाद केला. त्यानंतर आरोपींनी आपल्या रक्ताचे, नखांचे आणि अक्षरांचे नमुने देण्यास नकार दिला. तपासादरम्यान आम्ही काही केले नाही, आम्हाला काही माहीत नाही, या भूमिकेत असलेल्या आरोपींनी आवश्यक ते नमुने देण्यासही नकार दिल्याने यावर कोर्टात सुनावणी झाली. आरोपींचे वकीलपत्र घेण्यास कोणीही वकील पुढे न आल्याने सरकारच्या विधी व सेवा प्राधिकरणानेच त्यांना वकील दिला आहे. ते वकील आर. पी. पाटील यांनी आरोपींची बाजू मांडली. दोन्ही बाजू समोर आल्यानंतर कोर्टाने आरोपींचे म्हणणे फेटाळून लावले. अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटक झालेले बडतर्फ पोलिस उप निरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, हवालदार अरुण टोणे, शिपाई नसरुद्दीन मुल्ला, चालक शिपाई राहुल शिंगटे आणि झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना पहिल्या टप्प्यात १३ आणि दुसऱ्या टप्प्यात दोन दिवसांची अशी एकूण १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी सीआयडीने आणखी पोलिस कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. दरम्यान, सांगलीच्या कारागृहात कैद्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर अनिकेत कोथळे प्रकरणातील साक्षीदार अमोल भंडारे आणि या पूर्वी युवराज कामटे याने तपास केलेल्या गुन्ह्यांतील संशयितही याच कारागृहात आहेत, त्यामुळे या आरोपींची अन्य ठिकाणच्या कारागृहात व्यवस्था करावी, अशी विनंती सांगली कारागृहाचे अधीक्षक सुशील कुंभार यांनी कोर्टाला केली होती. या पार्श्वभूमीवर कोर्टाने सहाही आरोपींना कोल्हापूरातील कळंबा कारागृहात हलवण्याचे आदेश दिले. न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्यानंतर आरोपींची गाडी काही वेळ सीआयडीच्या तपास कम्प परिसरात थांबवून ठेवली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून चोख पोलिस बंदोबस्तात त्यांची रवानगी कोल्हापूरकडे करण्यात आली. या वेळी कामटेसह इतर आरोपींच्या नातेवाईकांनीही आरोपींच्या गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण चोख बंदोबस्तांमुळे कोणालाही पुढे जाता आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावली’चे कार्य दिशादर्शक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माणसातील माणूसपण जपणाऱ्या सावली केअर सेंटरला राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल. भारतीय संस्कृतीची अंमलबजावणी आणि विधायक समाज निर्मितीसाठी सेंटर दिशादर्शक आहे. सावली हे वृद्धाश्रम नसून कुटुंब आहे. वंचिताना आपुलकीचा हक्काचा परिवार देण्याचे मोठे काम सेंटर करीत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. पीरवाडी (ता. करवीर) येथील सावली केअर सेंटरचे शुक्रवारी दिलेल्या सदिच्छा भेटप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, महापौर हसीना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी ईश्वर हा मंदिरात शोधू नका, गरीबात शोधा, असा उपदेश केला होता. त्या उपदेशाचे पालन सावली केअर सेंटर करीत आहे. अनेक कुटुंबातून आजारी, विकलांग आणि वयोवृद्धांना मरणयातना भोगण्यासाठी सोडून दिले जाते. ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. शक्ती असणारा जगू शकतो, असे पाश्चात्य संस्कृती सांगते. त्याऊलट जन्माला येणाऱ्याला जगण्याची प्रेरणा आणि जगण्याची व्यवस्था भारतीय संस्कृतीत शिकविली जाते. हीच संस्कृती सावली केअर सेंटरने सुरू ठेवली आहे. सेंटरने अनेक लोकांसाठी मायेचा आणि आपुलकीचा परिवार निर्माण केला आहे.’

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सावली केअर सेंटर लोकाश्रयावर उभारले आहे. सावलीच्या संचालकांनी स्वतः ची जागा सेंटरसाठी दिली. सामान्य नागरिकांनी रद्दी विकून आलेल्या पैशातून विटा दिल्या. फिनोलॅक्स कंपनीने ३५ लाख रुपये दिले. त्यासह ९१४० देणगीदारांनी सेंटरसाठी देणगी दिली आहे. प्रत्येक शहरात गरीबी आहे. ही गरिबी दूर करण्यासाठी प्रत्येकाने सहृदयता दाखविण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थाना पैशाची कधीही कमतरता भासणार नाही.’ सावलीचे प्रकल्प संचालक किशोर देशपांडे म्हणाले, ‘सावलीत येणाऱ्या प्रत्येकाला आपुलकी, माणूसपण जपण्याचे काम केले आहे. अनेकांनी ६५ व्या वर्षी पहिलाच वाढदिवस साजरा केला आहे. पैशाअभावी या ठिकाणी कोणावरही उपचार थांबविले जाणार नाहीत.’

या वेळी कोल्हापुरी गूळ देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. सावलीचे शिवपाल बनछोडे यांच्या हस्ते फिनोलेक्सचे संजय मठ यांचा सत्कार झाला. सावलीच्या देणगीदारांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार अमल महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भावेश पटेल, भाजपचे महानगराध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, प्रकाश मेहता, सुहास बांदल, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके आदी उपस्थित होते. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अमित हुक्केरीकर यांनी आभार मानले.


कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

कर्जमाफीत फसवणूक केल्याबद्दल शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आपटेनगर-राधानगरी रोडवरील श्री लॉन येथे काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत होते. सुमारे शंभराहून अधिक कार्यकर्ते सायंकाळी चार वाजता या ठिकाणी थांबून होते. काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती पोलिसांना कळताच राज्य राखीव दलाची तुकडीसह पोलिस मोठ्या प्रमाणात दाखल झाले. काळे झेंडे दाखविण्याच्या अगोदरच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकारानंतर आपटेनगरपासून ते पीरवाडी येथील सावली केअर सेंटर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासनिधीला कात्री नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोणत्याही परिस्थितीत विकासनिधीला कात्री लावणार नाही. केवळ निधी नाही म्हणून रस्त्यांची कामे रेंगाळू नयेत याची काळजी घेण्यात येईल. त्यासाठी नियोजन मंडळाने रस्त्यासाठी मागितलेल्या निधी देण्यात येईल. शिवाय विशेष निधीचा प्रस्ताव पाठवा, त्यालाही मंजुरी देण्यात येईल,’ अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. दरम्यान, तीर्थक्षेत्र आराखड्याला गती देण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात दाखल झाले. विमानतळावरून ते थेट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या न्यू मोरे कॉलनीतील निवासस्थानी पोहचले. सव्वाचार वाजता मुख्यमंत्र्यांचा ताफा मोरे कॉलनीत पोहचला. पाटील यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री पहिल्यांदाच येणार असल्याने जय्यत तयारी करण्यात आली होती. स्पेशल दडपे पोह्याचा बेत आखण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याचा भरपूर आस्वाद घेतला.

चहापानादरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेकडील रस्त्यांची संख्या जास्त आहे. मात्र निधी कमी मिळत असल्याने कामे करण्यात अडचणी येतात, असे निदर्शनास आणून दिले. शिवाय या निधीपैकी तीस टक्के निधीलाही कात्री लावण्याचा निर्णय झाल्याने रस्त्यांची कामे करणार कशी? असा सवाल केला. त्यावेळी नियोजन मंडळातून रस्ते करण्याचा सल्ला देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि या निधीला कात्रीही लावणार नाही अशी ग्वाही देत रस्त्यासाठी विशेष निधी देण्याचेही मान्य केले.

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम निधीअभावी रखडल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी हे काम तातडीने सुरू होण्यासाठी येत्या नागपूर अधिवेशनात संयुक्त बैठक घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. आमदार सुरेश हाळवणकर व अमल महाडिक यांनी जिल्ह्यात टेक्सस्टाइल मिल सुरू करण्याची मागणी केली.

चहापानानंतर मुख्यमंत्र्यांनी शेजारीच असलेल्या सावली केअर सेंटरला सदिच्छा भेट दिली. तेथे उपस्थित असलेल्या काही व्यक्तीं​शी संवाद साधला. यावेळी ‘सावली’च्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदतनिधीस दिला. याबाबतचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महापौर हसीना फरास, किशोर देशपांडे, गौरी देशपांडे, प्रभावती गायकवाड, बाबा देसाई, संदीप देसाई यांच्यासह आदी उपस्थित होते.

०००


खंडपीठाबाबत बैठक

खंडपीठाबाबत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. शहरात एलइडी लाइट प्रकल्पासाठी निधी नसल्याने हे काम रखडले आहे. यासाठी निधी देण्याची मागणी महाडिक यांनी केल्यानंतर याबाबत ‌निश्चितपणे सकारात्मक विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडू नका’

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

‘नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी तर देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारच्या फसव्या कर्जमाफी योजनेमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे. सरकारच्या या चुकीच्या निर्णयाविरोधात व धोरणाविरोधात शिवसेनेने प्रत्येक वेळी आवाज उठविला आहे.चुकीची धोरणे बदलली पाहिजेत, अन्यथा शिवसेना टोकाचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही’ ,असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले येथे दिला.

समाजातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, व्यथा जाणून घेण्यासाठी ‘जनता संवाद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ठाकरे बोलत होते. उद्धव पुढे म्हणाले, ‘सरकारच्या चुकीच्या व जनताविरोधी धोरणाला विरोध करण्याची ताकद व नीतीमत्ता कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाही. त्यामुळेच या सरकारच्या विरोधातील प्रत्येक चुकीच्या निर्णयाला व धोरणाला शिवसेना सदैव विधिमंडळ सभागृहात व रस्त्यावर उतरून कडाडून विरोध करत असून तो प्रामाणिकपणे करत राहू. ‘जीएसटीची रचना करताना अनेकांनी कर न वाढविण्याची मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत ‘मन की बात’ करून अवाढव्य कर लादला. जीएसटीला विरोध होऊ लागल्यानंतर गुजरात निवडणुकीपूर्वी कर कमी करण्याचा निर्णय घेतला; पण निवडणुकीनंतर यामध्ये पुन्हा वाढ होणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनता नव्हे सत्ताधारी लाभार्थी

0
0

गडहिंग्लज

‘शिवसेनेने आघाडी सरकारच्या काळापासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठविला आहे. आज सत्तेत असतानाही आमची तीच भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव व कर्जमुक्ती ही झालीच पाहिजे. म्हणूनच शेतकरी रस्त्यावर उतरला आणि शिवसेना त्याच्या सोबत राहिली. मुख्यमंत्र्यांनी निकष लावून कर्जमाफी दिली व योग्य शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल असे सांगितले. येथे तर कुणालाच मिळाली नाही. मग महाराष्ट्रातील शेतकरी अयोग्य आहे का? योजनेला छत्रपती शिवरायांचे नाव दिले आहे तर तुम्हाला कर्जमाफी द्यावीच लागेल. शिवसैनिक आपल्या दैवताच्या नावाची थट्टा खपवून घेणार नाही,’ असा दम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. जनता नव्हे तर सत्ताधारी खरे लाभार्थी असल्याची टीका त्यांनी केली.

नेसरी (ता.गडहिंग्लज) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार सुनील शिंदे, प्रकाश आबिटकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, प्रा.संजय मांडलिक, माजी आमदार संजय घाटगे आदींसह मान्यवर उपस्थित होते. शेतीचा प्रतिक असलेला नांगर देऊन ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.

ठाकरे म्हणाले, ‘मला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीची स्वप्ने अजिबात पडत नाहीत. पण माझी राज्यातील जनता तडफडते आहे, सीमाभागातील जनता आक्रोश करते आहे. त्या आक्रोशाकडे माझे लक्ष नसेल तर राजकारणात असून उपयोग काय? शिवसेनेकडे सत्ता आहे पण उपयोग होतो का? त्यामुळेच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी आलो आहे. सरकारमध्ये राहून जनतेला न्याय देऊ शकत नसू तर प्रसंगी अशा सत्तेला लाथ मारू. सरकारला तीन वर्षे झाली. आता त्यांची जाहिरातबाजी सुरु झाली आहे. ‘मी लाभार्थी हे माझे सरकार’ असे सांगत आहेत. जनता लाभार्थी नाही, ती अन्नदाता आहे. त्यांचे काम करण्यासाठीच तुम्हाला निवडून दिले आहे. सरकारला आपल्या कामाची जाहिरात करायला लागूच नये. जनतेने स्वतः ‘होय हे माझे सरकार’ असे म्हटले पाहिजे. जनता नव्हे तर सत्ताधारी लाभार्थी आहेत. फक्त जाहिरातीसाठी अकराशे कोटी रुपये खर्च केले. हाच पैसा जलसिंचनासाठी वापरला असता तर आज आमचा शेतकरी जगला असता. हा पैसे जनतेच्या विकासासाठी वापरा तुम्हाला जाहिरात करावी लागणारच नाही. मी सरकारवर बोलत राहणारच. जनतेवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध शिवसेनेची तोफ यापुढील काळातही धडाडणारच. ’

सीमाप्रश्नी बोलताना ठाकरे यांनी बेळगाव कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात आणणारच असा निश्चय व्यक्त केला. ते पुढे म्हणाले,‘कर्नाटकचे मुख्यमंत्री कानडी भाषेवर ठाम राहतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र मूग गिळून गप्प बसतात. सीमाभागातील जनता आकांत करते आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात शिवसेनेव्यतिरिक्त एकाही मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली नाही. पक्ष कोणताही असो मराठी भाषिकांवर अन्याय करणे हा एककलमी कार्यक्रम राज्यकर्त्यांनी आखला आहे. म्हणूनच ठाम भूमिका मांडणारा मुख्यमंत्री मला हवा आहे. त्यासाठी शिवसेना आपली ताकद नक्कीच उभी करेल.’

याप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय देवणे, संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, सहसंपर्क प्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, संघटक संग्राम कुपेकर, शेतकरी प्रतिनिधी आनंदराव मटकर यांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, माजी आमदार दगडू सकपाळ, संज्योती मळवीकर, श्रद्धा शिंत्रे, शांता जाधव, राजेखान जमादार, संभाजी पाटील, माजी महापौर महाडेश्वर आदींसह हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दिलीप माने यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

.......................

चौकट

... तोपर्यंत कोल्हापूरला मंत्रीपद नाही

ठाकरे म्हणाले,‘ मागील निवडणुकीत चंदगडचा ‘गड’ थोडक्यात हुकला. पण आता हा संपूर्ण गड भगवा झाल्याची मला खात्री आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाला चांगले यश मिळाले आहे. पण संपूर्ण जिल्हा भगवा झाल्याशिवाय कोल्हापूरला मंत्रीपद नाही हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र निवडणुकांची वाट पाहतो आहे. मला खात्री आहे आता संपूर्ण महाराष्ट्र भगवा झाल्याशिवाय राहणार नाही. पण यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. ज्या दिवशी तुमच्या हक्काचा शिवसेनेचा मुख्यमंत्री द्याल, त्यावेळी कोणतीही गोष्ट तुम्हाला मागावी लागणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गगनबावड्याजवळ बसला आग, दोघांचा मृत्यू

0
0


म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला गगनबावडा मार्गावरील लोंघे येथे शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दोघा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. विकी मदन भट (वय २४) व बंटीराज भट (२४, दोघे रा. रोषणपुरा, भोपाळ, मध्य प्रदेश, सध्या रा. हडपसर, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. बसला अचानक लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. या प्रसंगातही अन्य प्रवाशांनी एकमेकांना धीर देत अन्य सहकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले.

आत्माराम ट्रॅव्हल्सची (यूपी ६२ एटी ६३६२) क्रमांकाची ही बस १८ प्रवाशी घेऊन गोव्याहून मुंबईकडे गगनबावडामार्गे निघाली होती. या बसमधील सहा प्रवाशी बँड पथकातील कलाकार होते. गोव्यातील लग्न समारंभ आटोपून ते कोल्हापूरमार्गे मुंबईला परतत होते. पहाटे तीनच्या सुमारास बस लोंघे येथे आली असता या पाठीमागे अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली. तोपर्यंत आग भडकली. त्यामुळे बाहेर पडण्यासाठी प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. मागील सीटवर बसलेले विकी भट व बंटीराज भट हे दोघे बसमध्येच अडकले. त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. बाकीच्या १६ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

या घटनेची माहिती समजताच कोल्हापूर अग्निशमन दलाचे जवान आणि बालिंगा येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. आग झपाट्याने वाढल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.


दोघेही मद्यधुंद अवस्थेत

बँड पथकातील सहा प्रवाशांनी मद्यप्राशन करून गाडीत दंगा सुरू केला होता. त्यामुळे बसचालक शहाबाज रखांगी याने बांदा पोलिस चौकीजवळ गाडी थांबवून या प्रवाशांना खाली उतरले होते. तेव्हा त्यांनी दंगा करणार नसल्याचे सांगिततले. या सर्वांना पुन्हा समज देऊन गाडीत घेतले. मात्र त्यांनी पुन्हा दंगा सुरू केला. त्यात मद्यप्रशान केलेले दोघेजण बेधुंद होऊन झोपी गेले होते. अशा अवस्थेतच गाडीला आग लागली. मात्र या दोघांना बाहेर येण्याचेही सूचले नसल्याचे शहाबाजने पोलिसांना सांगितले. या घटनेची नोंद कळे व गगनबावडा पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबतचा तपास गगनबावड्याचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी सत्तेलाही लाथ मारू

0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

‘आम्ही सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. शेतकरी सुखी असेल तर राज्य सुखी. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या विधानसभेत मांडणार आहे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास सत्तेलाही लाथ मारुन सरकारविरोधात उभे राहू,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिनोळी (ता. चंदगड) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.

मोदींनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देऊ असे सांगून सत्ता काबीज केली. पण तीन वर्षे उलटली तरी त्यावर काहीही बोलत नाहीत, असे सांगून ठाकरे म्हणाले, ‘शेतकरी जाहीरातीवर चालत नाही. भाजप हा जाहिरातीचा पक्ष आहे. गेले दोन दिवस आम्ही राज्याच्या दौऱ्यावर आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या, अडीअडचणी यासाठी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आम्ही संवाद साधला. शेतकऱ्यांच्या या समस्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहोत.’

शेतकऱ्यांशी संवाद साधताना ठाकरे यांनी तालुक्यातील पिकांची माहीती घेतली. भात, नाचणी, रताळी, काजू आणि बटाटा या पिकांना हमीभाव मिळावा, उत्पन्नावर आधारित किंमत मिळावी, असे सांगितले. चंदगड तालुका डोंगराळ भाग असून, या ठिकाणी वन्यप्राण्यांचा मोठा धोका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असतो. त्यामुळे नुकसानीची पीक आणि खर्चावर आधारभूत किंमत मिळावी. शेतकऱ्यांना नियमीत वीज मिळावी, अशी मागणी केली. उप जिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी प्रास्ताविक केले.

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अनिल देसाई, खासदार गजानन किर्तीकर, बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, सरपंच नम्रता पाटील, उपसरपंच गुंडूराव करटे, अॅड. संतोष मळवीकर आदी उपस्थित होते.


क्रिकेटचा प्रश्न मोठा !

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना त्यावर कोणतेच भाष्य न करता शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस मात्र क्रिकेटवर बंद खोलीत भाष्य करत आहेत. शेतकरी आत्महत्येपेक्षा क्रिकेटचा प्रश्न त्यांना मोठा वाटू लागला आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.


बेळगाव महाराष्ट्रात आणणारच

या कार्यक्रमाला सीमाभागातील बांधवांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. ‘बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशा घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला. ‘सीमा या देशाच्या असतात, राज्याला कुणीही, कोठेही रोखू शकत नाही. मराठी बांधवाच्या भावनांचा विचार करुन बेळगाव महाराष्ट्रात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

या वर्षातला हा सर्वात मोठा विनोद: शरद पवार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कराड

महाराष्ट्राचं सध्याचं सरकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीनंच कारभार करत असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. 'फडणवीस यांनी केलेला हा वर्षातला सर्वात मोठा विनोद आहे,' असं पवारांनी म्हटलंय.

यशवंतराव चव्हाण यांच्या ३३व्या पुण्यतिथीनिमित्त आज राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी कराड इथल्या 'प्रीतीसंगम' या समाधीस्थळी जाऊन यशवंतरावांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यशवंतरावांच्या प्रीतीसंगमावर पुष्पचक्र वाहिलं. त्यावेळी बोलताना, राज्यातील सध्याचं सरकार यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. यशवंतरावांसारखं सुसंस्कृत राजकारण करत सर्वसामान्यांसाठी काम करण्याची प्रेरणा मी येथून नेत आहे,' असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबद्दल शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं. 'मुख्यमंत्री ज्या विचारधारेतून आले आहेत, त्या विचारधारेच्या जवळपाससुद्धा जाण्याचा विचार चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यात कधी केला नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचं आजचं वक्तव्य हा मोठा विरोधाभास आहे. अर्थात, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते यशवंतरावांना अभिवादन करायला येतात, याचा आनंदच आहे. परंतु, चव्हाण साहेबांना अभिप्रेत अशा विचारांवर सध्याचं सरकार चाललंय, हा त्यांनी केलेला या वर्षातला सर्वात मोठा विनोद आहे. यापेक्षा दुसरं काही म्हणता येणार नाही,' असं पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे फेव्हिकॉलला चिकटलेत!

सत्तेत राहून भाजपच्या विरोधात रान उठवणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही पवार यांनी टीका केली. 'उद्धव ठाकरेंचा पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये गुंतलाय, तो बाहेर निघू शकत नाही,' असं ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीआय चौकशीची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘हप्तेखोरीचे कुरण ठरत असलेल्या पोलिस दलाची प्रतिमा मिस्टरक्लीन मुख्यमंत्र्यांनी बदलावी. पोलिसांच्या बदलीच्या नावाखाली खंडण्या घेणाऱ्या राजकारण्यांचा बंदोबस्त करावा,’ अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगलीत केली.
अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा. कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत समावून घ्यावे, या मागण्यांसाठी शनिवारी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. खासदार शेट्टी, माकपचे राज्य सचिव अजित अभ्यंकर, नगरसेवक गौतम पवार, पृथ्वीराज पवार, सतिश साखळकर आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगलीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा निघू नये. यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील होते. परंतु, सर्वपक्षीय कृती समितीने जिल्हा पोलिस अधीक्षकांची, उपअधीक्षकांच्या बदलीच्या अगोदरच मोर्चा जाहीर केला होता. त्यामुळे समिती मोर्चावर ठाम राहिली. विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. अनिकेत कोथळे प्रकरणाने सांगली पोलिसांची राज्यात नाचक्की झाली. पोलिसांच्या या कारनाम्याच्या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीने कोथळे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. जनरेट्यामुळेच जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपअधीक्षक दिपाली काळे यांची बदली करण्यात आली. केवळ बदलीच्या कारवाईवर समाधानी नसलेल्या समितीने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करीत मोर्चा काढला. कोथळे कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
माकपचे नेते अजित अभ्यंकर यांनी या प्रकरणात दिशाभूल करणारी वक्तव्ये करणाऱ्या अधीक्षक आणि उपअधीक्षकांना सहआरोपी करण्याची मागणी केली.
निलंबित पोलिसांची पुन्हा चौकशी
अनिकेत कोथळे खून प्रकरणी निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. घटनेच्या दिवशी पोलिस ठाण्याचा पदभार असलेले पोलिस उपनिरीक्षक समीर चव्हाण तसेच सोमवारी दिवसभर ड्युटीवर असणारांचीही चौकशी केली जाणार असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संशयितांच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स सीआयडीच्या हाती आले असून, त्यातील एकापेक्षा जास्तवेळा संपर्क झालेल्यांचे क्रमांक शोधण्याचे काम सुरू झाले असल्याचे तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी शनिवारी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठीत खंजीर खुपसून सत्ता बळकावलीउद्धव ठाकरेंची शरद पवारांवर टीका

0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
‘आम्ही किमान मित्र पक्षावर तरी टीका करतो आणि त्यामागेही जनतेच्या प्रश्नासाठी लढण्याचे कारण असते. मात्र, तुम्ही स्वतःच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता बळकावली, हे अवघ्या जनतेने पाहिले आहे. असा माणूस अवघ्या भारताने आजवर पाहिलेला नाही,’ असा टोला ठाकरे यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला. न्यू इंग्लिश स्कुलच्या मैदानावर झालेल्या या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी मंत्री दीपक केसरकर, विजय शिवतारे, दादासाहेब भुसे, माजी आमदार गजानन कीर्तिकर, माजी आमदार दगडू सपकाळ, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील आदी उपस्थित होते.
शरद पवारांवर टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘सोनिया गांधींनी पक्षातून हाकलून लावले तरीही अपमान सहन करून पुन्हा १५ वर्षे त्यांची गुलामगिरी केली. जे काम पवारसाहेबांनी करायला पाहिजे होते, ते त्यांना जमले नाही म्हणून अखेर शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनतेला भूलथापा देऊन सत्ता बळकावली आहे. आता मी लाभार्थीच्या फसव्या जाहिराती सुरू आहेत. मात्र, या सरकारचे खरे लाभार्थी सत्ताधारीच असून, सर्वसामान्य जनता देशोधडीला लागली आहे. राज्यात शिवशाही आली, तरच शेतकरी सुखी होईल व यासाठी शिवसेनेच्या पाठीशी शेतकऱ्यांनी ठामपणे उभे रहावे. शेतकऱ्यांना कर्जमाफी सुरू केली आहे, त्या योजनेस छत्रपती शिवरायांचे नाव दिले आहे. कागदावर कोट्यवधींचे आकडे दाखविले जात आहेत. मात्र, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीही जमा होत नाही. सरकारने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे. शिवरायांच्या नावावर सुरू असलेली ही फसवणूक शिवसेना कदापि सहन करणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याना केवळ गुजराथच्या निवडणुकीची काळजी लागली आहे असे सांगून ठाकरे म्हणाले कि, जनता " अच्छे दिन " येण्याची वाट पाहत आहे , मात्र अजूनही हे " आयेंगे - आयेंगे " अशीच भलावणी करताना दिसत आहेत. वीज नाही, पाणी नाही, उद्योगधंदे नाहीत, व्यापार नाही, वाढती बेकारी अशा परिस्थितीत जनता भरडली जात असताना विकासाच्या खोट्या जाहिराती मोदी सरकार दाखवत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. नोटबंदी करून मोदींनी नेमके काय साधले हे आजवर कोणालाही समजलेले नाही असे सांगून त्यांनी या निर्णयाची खिल्ली उडवली.
सांगलीत घडलेल्या अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्यूबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, या घटनेस जबाबदार कोण ? एव्हढी गंभीर घटना घडूनही मुख्यमंत्री तिकडे फिरकले नाहीत हि खेदाची बाब आहे. गृहखात्याच्या चांगल्या कारभाराची " मी लाभार्थी आहे " असे आता कोथाळेच्या पत्नीने म्हणावे का ? असा उपरोधिक प्रश्न ठाकरे यांनी यावेळी विचारला.
सांगलीतील रस्ते, शिक्षण, वीज, व्यापार, पाणी आणि अन्य असुविधा याबाबत बोलताना ठाकरे यांनी सांगली महापालिकेची सत्ता चुकीच्या लोकांच्या हाती दिल्याने हे घडत असल्याचे सांगितले. येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या हाती सत्ता आली, तर सांगलीचा विकास नक्कीच करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सांगली व परिसरात साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट असताना या भागाची झालेली केविलवाणी अवस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. व यापुढे तरी जनतेने विचार करून मतदान करावे असे आवाहन केले.
तत्पूर्वी स्वागत संजय विभुते व प्रास्ताविक नितीन बानुगडे पाटील यांनी केले. शेतकरी सुभाष पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी तत्पूर्वी आपली मनोगते व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळव्यात फडणवीसांचे बेरजेचे राजकारणवैभव नायकवडींना भाजप प्रवेशाची ऑफर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘आघाडी सरकारने पतंगराव कदम यांचा सल्ला घेतला असता तर हुतात्माच्या इथेनॉल प्रकल्पाला दिलेली परवानगी रद्द करण्याचे पाप घडले नसते. ज्यांनी हे पाप केले, त्यांना त्याची किमत चुकवावी लागेल,’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाव न घेता राष्ट्रवादी कॉँग्रेसवर टिका केली. ‘तुम्ही आमच्या सोबत आलात किंवा नाही आलात तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी वैभव नायकवडी यांना देत, भाजप प्रवेशाची ऑफर दिली.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हुतात्मा किसन अहिर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन केले. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा ध्वज फडकावून ज्योत प्रज्वलीत केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक करताना हुतात्मा उद्योग समुहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पाला मंजुरी आणि क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात सहकार विषयक कार्यशाळा उभारणीसाठी भरीव निधी आणि मागासवर्गीय सुतगिरणीसाठी परवानगी देण्याची मागणी केली.
दरम्यान, शनिवारच्या हुतात्मा संकुलातील इथेनॉल प्रकल्पाच्या आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाला निमंत्रण देवूनही राष्ट्रवादीचे कोणीच कार्यक्रमाकडे फिरकले नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. पालकमंत्री, महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री या तिघांनाच भाषणाची संधी मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पतंगराव कदम यांचा एकमेव कुलपती, असा चिमटा काढला तरी पतंगरावांना जोरदार फटकेबाजी करण्याची संधी नसल्याने गप्प बसावे लागले. कार्यक्रमाला पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, खासदार संजय पाटील आदी उपस्थित होते.
अण्णांच्या स्मारकासाठी १६ कोटींचा निधी
मुख्यमंत्री म्हणाले, ‘क्रांतीभूमीत येवून नागनाथ अण्णा सारख्या क्रांतिवीरांच्या स्मारकाला अभिवादन करण्याची संधी वैभव नायकवडी यांच्यामुळे मिळाली. वंचितांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. अण्णांनी मुल्याधिष्ठीत समाजकाम उभा केले. त्यांचा वारसा वैभवकाकांनी भक्कमपणे चालविला आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही जेवढे प्रकल्प काढाल तेवढ्यांना आमचा पाठिंबा असेल. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याला ४ कोटी दिले होते. आता दुसऱ्या टप्प्यासाठी १६ कोटींचा निधी दिला जाईल. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्यामुळेच ७०-३० फॉर्म्युला उभ्या देशात केवळ महाराष्ट्राने स्वीकारला आहे. साखर कारखान्यांच्याही पाठिशी सरकार आहे. सर्वांनी हुतात्मा पॅटर्नचा अवलंब करून शेतकऱ्यांना सुखी करावे.’
वैभवकाकांना आम्ही आमच्यातलेच समजतो : पाटील
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्री हुतात्मास्थळावर कसे काय?, वैभव नायकवडी प्रवेश करतात की काय?, असा प्रश्न काहींना पडला असेल. पण, भाजपचा रंगच इतका गडद आहे की, ते आमच्या सोबत बसल्याने आम्हाला आमच्यातलेच वाटत आहेत. त्यांनी या घडीला तयारी दाखविली तर मुख्यमंत्री त्वरीत त्यांच्या गळ्यात हार घालतील. परंतु, ते सर्वकाही सांभाळून करतात. आता ते दुर्बिण लावून प्रवेश करून की, नको याचा अंदाज घेत असतील. पण, ज्यावेळी ते निर्णय घेतील त्यावेळी हे मैदान अपुरे पडेल आणि दुसरेही मैदान घ्यावे लागेल. पण, त्यांना भाजप प्रवेशाची अट घालण्याइतके छोट्या मनाचे नाही.’ भाषणाच्या शेवटी वैभव नायकवडी यांना भाजप प्रवेशाची ऑफरही पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयंत पाटील विरोधातनिशिकांत पाटलांना बळ

0
0



म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
‘नगराध्यक्ष निशिकांत पाटील तुम्ही तयारीला लागा, आपल्याला मैदान मारायचे आहे,’ असा आदेश शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्षांना दिल्यामुळे इस्लामपूर विधान सभामतदार संघात आमदार जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील, अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. फडणवीस यांनी सर्वोदय प्रश्नी माजी आमदार संभाजी पवार यांच्याशी बंद खोलीत पंधरा मिनिटे चर्चा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी तब्बल एक तासाचा वेळ इस्लामपूर शहरासाठी दिला. मुख्यमंत्र्‍यांनी वाळवा तालुक्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सभापती, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
इस्लामपूर येथील निशिकांत पाटील यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी गोपनीयपणे प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. भाजपचा अजेंडा प्रभावीपणे राबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रीय व्हावे, असे आदेश त्यांनी दिले. इस्लामपूर विधान सभामतदार संघातील आमदार आणि राज्यातील प्रभावी नेते जयंत पाटील यांच्या विरोधात शक्य होईल तितके विरोधकांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाऊले उचलल्याचे आज स्पष्ट झाले. माजी आमदार संभाजी पवार यांना जाणीवपूर्वक दूरध्वनी करून त्यांनी भेटीसाठी बोलावले होते. संभाजी पवार त्यांची दोन्ही मुले आणि पत्नी अशा सर्वांशी त्यांनी बंद खोलीत पंधरा मिनिटांहून अधिककाळ चर्चा केली. जयंत पाटील आणि संभाजी पवार यांच्यात सुरू असलेला वाद राज्याला परिचित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सर्वोदयचा तिढा सोडवून संभाजी पवारांना पाठबळ देणार का? या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यकर्त्यांच्या बैठकीपूर्वी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘निशिकांत पाटील तुम्ही तयारीला लागा आपल्याला मैदान मारायचे आहे,’ अशा शब्दात त्यांनी नगराध्यक्ष पाटील यांना निवडणुकीच्या तयारीचा इशारा दिला. येत्या विधानसभेला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील या गुरू शिष्यात लढत होईल, हे आज स्पष्ट झाले. इस्लामपूर शहरासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. चोवीस बाय सात पाणी योजना, भुयारी गटार योजना यासह शहराला जोडणारे सर्व प्रमुख मार्ग चौपदरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी विविध मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्ध महाराष्ट्राचेयशवंतरावांचे स्वप्न अपूर्णचमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खंत

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
‘आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी मोलाचा वाटा उचलला. पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला आकार देण्याचे काम त्यांनी केले. मात्र, समृद्ध आणि विकासनशील महाराष्ट्राचे त्यांनी पाहिलेले स्वप्न आजही सत्यात उतरले नाही,’ अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या ३३व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री कराडमध्ये आले होते. भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती अभिवादन रॅलीत फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्र कसा असला पाहिजे, त्याचा कसा विकास झाला पाहिजे, या संदर्भात स्व. यशवंतराव चव्हाण यांची काही स्वप्न होती. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर त्यांनी पाहिलेले समृद्ध, विकसनशील महाराष्ट्राचे, शेतकऱ्यांच्या विकासाचे स्वप्न, आजही सत्यात उतरले नाही. राज्य सरकारने वेळोवेळी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगितला. मात्र, प्रत्यक्ष कृतीमध्ये तो उतरला नाही. महाराष्ट्रातील शेतकरी, सामान्यांच्या हिताला प्राधान्य देऊन यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीला आकार दिला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील आहे. त्यांचे विचार आणि स्मृती जागृत करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. देशात सकारात्मक विचाराने काम करणारे भाजपचे सरकार आहे. सामान्य शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी, वंचित या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्याची प्रेरणा घेण्यासाठी मी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलो आहे. सर्व मंत्रिमंडळ माझ्या सोबत आहे, ही प्रेरणा घेऊन आम्ही काम करीत राहू.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कर्जमाफी, जीएसटीमुळेसरकार गोंधळलेल्या अवस्थेत’

0
0


कराड
‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील अनागोंदी कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पाहिलेला नाही. कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारी व युवकही आत्महत्या करू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांचे बिलकुल नियंत्रण नाही. त्यामुळे एकजुटीने या सरकारला खाली खेचल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही,’ असे परखड मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
यशंवतरावांना अभिवादन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची आठवण व्हावी, अशी संकटाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आज सबंध महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल आहे. उद्योगाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. युवकांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. रोजगार नाहीत, नवीन उद्योग न निघाल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे. व्यापारी जीएसटीच्या आघातामुळे अजूनही सावरले नाहीत. नोटबंदीतून सावरत नाही, तोच सरकारने जीएसटी लादून दुसरा हल्ला केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पाहिलेला नाही.’
विधान परिषदेच्या
जागेसाठी काँग्रेसला पाठींबा ः अजित पवार
‘कोकणातील विधान परिषदेची जागा काँग्रेसची आहे. ते जे उमेदवार देतील, त्याला पाठींबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. समविचारी पक्षाच्या मताची विभागनी होऊ नये, त्याचा फायदा भाजपासारख्या जातीयवादी पक्षाला होऊ नये,’ असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
यशवंतरावांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, ‘सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकारण कसे करायचे याचे धडे यशवंतराव चव्हाण यांनी दिले आहेत. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर जाण्याऐवजी भाजपचे सरकार पूर्णपणे भरकटले आहे. गेल्या तीन वर्षांत या सरकारला कोणाला समाधानी करता आले नाही. सातारा जिल्ह्याला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असणाऱ्या देवराष्ट्रात काही कामे आम्ही सुचविली होती. पण, ती कामे परत जाण्याची वेळ आली आहे.’ राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन सुरू
‘स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेबांच्या स्मृतीदिनापासून २९ तारखेपर्यंत आम्ही हल्लाबोल आंदोलन करणार आहे. या आंदोलनात सर्व स्तरांतील लोक सहभागी होत आहेत. आता व्यापारीही आंदोलनात सहभागी होत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गुंतवणूक करायला व्यापारी तयार नाहीत. व्यापारी हवालदिल आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत,’ असे असताना सरकार लक्ष देत नसल्याने हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे,’ असे अजित पवार म्हणाले.
यांनी वाहिली यशवंतरावांना आदरांजली
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील, शशिकांत पाटील, डॉ. अतुल भोसले, आमदार मोहनराव कदम, कल्लाप्पाअण्णा आवाडे आदींनी यशवंतरावांना आदरांजली


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील विकास प्रकल्पांवर ‘नजर’

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या निधीतून शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा त्रयस्थ यंत्रणेकडून लेखाजोखा मांडण्यात येईल. विकास प्रकल्पाची सद्यस्थिती, कामाची प्रगती, गुणवत्ता या बाबी या यंत्रणेकडून तपासल्या जातील. यात थेट पाइपलाइन योजना, अमृत योजना, अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगगा घाट विकास या विकासकामांचा समावेश असणार आहे. शिवाय महापालिकेने विकास प्रकल्प नियोजित वेळेतच पूर्ण करा, प्रकल्प अर्धवट ठेवून नागरिकांना त्रास देऊ नका, अशा सक्त सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत आढावा बैठक झाली. आमदार अमल महाडिक, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विकासकामांचे मॉनेटरिंग करताना संबंधित यंत्रणेने अहवाल रोज द्यायचा आहे. ही यंत्रणा सरकारनियुक्त असेल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांनी रखडलेल्या कामावरुन कानपिचक्याही दिल्या. आयुक्त अभिजित चौधरी यांनी पाइपलाइन योजना, अमृत योजनेची माहिती दिली.

मंदिर विकासकामे लवकरच सुरू

अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी ७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पहिल्या टप्प्यात २५ कोटींच्या विकासकामांना सुरुवात होईल. मुख्यमंत्र्यांसमोर लवकरच सादरीकरण होणार आहे. यांसह थेट पाइपलाइन योजनेतील सर्व अडथळे दूर झाले आहेत. बहुतांश काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विकास योजनेंसंदर्भात पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होईल.

बैठकीला विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक सुनील कदम, ईश्वर परमार, रा​जसिंह शेळके, किरण नकाते, रुपाराणी निकम, जयश्री जाधव, सविता भालकर, कविता माने, संतोष गायकवाड, आशीष ढवळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीत दहा अर्ज अपात्र

0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

नवनिर्मित हुपरी नगरपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्षपदाचा एक आणि नगरसेवकपदाचे नऊ अर्ज अप‌ात्र ठरविले. प्रभाग क्रमांक तीनमधील कोल्हापूर ताराराणी आघाडीचे उमेदवार तात्यासाहेब बाबूराव हांडे यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधी उमेदवार आण्णासाहेब शेंडूरे यांनी आक्षेप घेतल्याने सुमारे पाच तास चाललेल्या मॅरेथॉन सुनावणीत अखेर हांडे यांचा अर्ज अपात्र करण्यात आला. छाननीनंतर आता लक्ष माघारीकडे लागले आहे.

हुपरी नगरपरिषद निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी आठ जणांनी १० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नगरसेवक पदासाठी ११४ जणांनी १२० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शनिवारच्या छाननी प्रक्रियेसाठी हुतात्मा स्मारक क्रीडा संकुल येथे सकाळी ११ वाजता निवडणूक अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने, सहाय्यक निवडणूक अधिकारी तानाजी नरळे यांनी सुरुवात केली. भाजप, कोल्हापूर ताराराणी आघाडीच्या उमेदवारांनी वकिलासह हजेरी लावली होती.

नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दीपाली बाळासाहेब शिंदे यांच्या तीन उमेदवारी अर्जावर सुचक सारखेच असल्याने अपात्र करण्यात आले परंतु चर्चा करून पात्र करण्यात आला. तसेच नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्यावतीने उमेदवारी दाखल केलेल्या सुजाता अनिल गाट यांचा डमी अर्ज एबी फॉर्म नसल्याने अपात्र ठरवण्यात आला. प्रभाग एकमधील सीमा पाटील व रेवती पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली परंतु दोघांचे अर्ज पात्र करण्यात आले. प्रभाग क्रमांक आठमधील भारती मुधाळे यांनी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप पक्षाचे नाव दिले पण उमेदवारी अर्जात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडल्याने त्यांना अपात्र करण्यात आले.

प्रभाग क्रमांक तीनमधील कोल्हापूर ताराराणी आघाडीचे उमेदवार तात्यासाहेब ऊर्फ लक्ष्मी हांडे यांचा उमेदवारी अर्जावर पाच तास सुनावणी झाली. भाजपचे उमेदवार आण्णासाहेब शेंडूरे यांनी हांडे यांचे मतदार यादीत नाव असून आधार कार्डावर लक्ष्मी ताताबो हांडे असा नावाचा उल्लेख असल्याने अर्ज अपात्र करण्याची मागणी केली. याबाबत दोन्ही बाजूनी सुनावणी घेण्यात आली. हांडे यांची वकिलांनी बाजू मांडत ही निवडणूक विभागाची चूक असून दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच आहेत, असे सांगितले. निवडणूक अधिकारी समीर शिंगटे यांनी तब्बल पाच तासाने सायंकाळी साडे सात वाजता लक्ष्मी ऊर्फ तातोबा हांडे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images