Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बलात्कारप्रकरणी एकास जन्मठेप

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गतिमंद आणि अपंग तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी विठ्ठल राघू कांबळे (वय ३९, रा. नंद्याळ, ता. कागल) याला कोर्टाने जन्मठेपेसह सात वर्षांची सक्तमजुरी आणि दोन हजार रुपयांची शिक्षा सुनावली. कांबळे याने २७ एप्रिल २०१५ मध्ये नंद्याळ येथील गतिमंद आणि अंपग तरुणीवर बलात्कार केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश - २ ए. यू. कदम यांनी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिला.

याबाबत अधिक माहिती अशी, पीडित गतिमंद आणि अपंग तरुणी नंद्याळ येथे कुटुंबासह राहते. २७ एप्रिल, २०१५ मध्ये तिचे वडील जनावरांना घेऊन शेताकडे गेले होते. आई शेतमजुरीसाठी गेली होती, तर आजी आठवडी बाजार आणण्यासाठी कापशी येथे गेली होती. तरुणी घरात एकटीच असताना दुपारी अडीचच्या सुमारास विठ्ठल कांबळे घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेची आजी आल्याची चाहूल लागताच त्याने घरातून पळ काढला. यानंतर आजीने घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन संध्याकाळी पीडितेच्या आईला सांगितले. पीडितेच्या आईने मुरगूड पोलिस ठाण्यात जाऊन विठ्ठल कांबळे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक एस. के. कोटे यांनी तपास करून कांबळे याच्याविरोधात कोर्टात खटला दाखल केला.

सरकार पक्षामार्फत कोर्टात १० साक्षीदार तपासण्यात आले. पीडित तरुणीने हातवारे करून दिलेली साक्ष, साक्षीचे भाषांतर करणारे मदतनीस, पीडितेची आजी यांच्यासह वैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला. सरकारी पक्षातर्फे अॅड. सुजाता इंगळे यांनी केलेला युक्त‌िवाद आणि साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीश ए. यू. कदम यांनी आरोपी विठ्ठल कांबळे याला दोषी ठरवले. कलम ३७६ अन्वये जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद, तसेच ४५२ अन्वये सात वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तपास अधिकारी एस. के. कोटे, पोलिस हावलदार एच के. पाटील, आय. एम. शेख यांनी गुन्ह्याचा तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांना लुटल्यामुळेचआता दबावगटाचे राजकारण

0
0

अजय जाधव,जयसिंगपूर

‘शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, शेतीप्रधान देशातच शेतकरी लुटला जात आहे. तो आत्महत्या करीत आहे. सरकारकडून कोणतेही शेतकरी हिताचे धोरण राबविले जात नाही, यामुळेच आता रस्त्यावर उतरलो असून देशव्यापी आंदोलन छेडण्यात येत आहे. यापुढे आता शेतकरी हितासाठी दबावगट निर्माण करून प्रश्न सोडविणार आहोत,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.

देशभरातील शेतकऱ्यांना मका, उडीद, सोयाबीन, कापूस, सुर्यफूल तसेच अन्य धान्यास हमीभावाएवढीही रक्कम मिळत नसल्याचे नमूद करून खासदार शेट्टी म्हणाले, ‘गेल्या तीस वर्षात देशात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते. यामुळे सरकार स्थापन करताना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागत होती. शेतकऱ्यांमुळेच भाजपला २८० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. केंद्रात व राज्यात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर खूप मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकरी हिताची धोरणे राबविली जातील अन् अच्छे दिन येतील असे वाटत होते, मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. सरकारने अन्नधान्याची आयात पाचपटीने वाढविली, त्याचबरोबर निर्यातशुल्कही वाढविले. परिणामी देशभरातील बाजारपेठेत अन्नधान्याचे दर गडगडले, याचा फटका शेतकऱ्यांना बसला. दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे उत्पादन घेताना बियाणे, खते, किटकनाशके, मशागतीवरील खर्च वाढला. शेतकर्यांना जीएसटीचाही फटका बसला. अशा परिस्थितीत शेती कशी करायची असा प्रश्न बळीराजासमोर निर्माण झाला आहे.’

ते पुढे म्हणाले,‘ केवळ दहा-वीस हजार रूपयांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. गेल्या साडेतीन वर्षात शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज ९ लाख कोटीवरून साडेचौदा कोटींवर पोहोचले आहे. उत्पन्न कमी अन् खर्च जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे, यामुळेच आता सरकारविरोधात बंड करण्याशिवाय पर्याय उरला नाही. किसान यात्रेव्दारे २२ राज्यात शेतकऱ्यांची जागृती केली. वेगवेगळी विचारधारा असली तरी शेतकरी हितासाठी देशातील १८० हून अधिक शेतकरी संघटना एकवटल्या. शेतकऱ्यांचा एक दबावगट निर्माण झाला आहे. संसद हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. मात्र येथेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गांभिर्याने दखल घेतली गेली नाही. यामुळे आता दिल्लीत शेतकर्यांची संसद भरविणार असून येथे मांडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर राज्यकर्त्यांना व देशाला द्यावे लागेल. आज देशातील चतुर्थ श्रेणी कर्मचारीही गलेलठ्ठ पगार घेत आहेत तर दुसरीकडे दहा-वीस हजारांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यामुळे आमचे काय चुकले? अच्छे दिन येतील असे वाटत असताना आमच्या वाट्याला हे काय? असा प्रश्न आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व कुटूंबिय दिल्लीतील बळीराजाच्या संसदेत उपस्थित करतील, आपली कैफियत मांडतील. याचे उत्तरही राज्यकर्त्यांना द्यावे लागेल. देशात शेतकऱ्यांचीही एक व्होट बँक आहे याची सरकारने जाणिव ठेवावी.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुर्ण वर्कऑर्डरबाबत हरित लवादाचे ताशेरे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात राबवण्यात येणाऱ्या अमृत योजनेच्या ५९ कोटी रुपयांच्या कामाची वर्कऑर्डर मोघम व अपुर्ण दिली असल्याबाबत महापालिकेवर ताशेरे ओढत राष्ट्रीय हरित लवादाने २१ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त आयुक्त व जलअभियंत्यांना हजर राहण्याचे आदेश दिले. लवादाने आदेश दिल्यानंतर महापालिकेने वर्कऑर्डर काढली असून तीही परिपूर्ण नसल्याबाबत लवादाने नाराजीही व्यक्त केली आहे.

रंकाळा तलावातील प्रदूषणाबाबत लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याबाबत यू. डी. साळवी व नंदा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. लवादाने गेल्या सुनावणीवेळी महापालिकेला पुढील सुनावणीला येताना ‘अमृत’ योजनेच्या कामाची वर्कऑर्डरसह कंत्राटदाराला हजर राहण्याचे आदेश दिले होते. कंत्राटदाराकडून ३० महिन्यात काम पूर्ण करण्याबाबतची स्पष्टता करण्यासाठी हे आदेश दिले होते. त्याप्रमाणे महापालिकेने कंत्राटदाराला वर्कऑर्डर ​दिली. शुक्रवारी लवादाची सुनावणी झाली. या टेंडरमध्ये ७.९० टक्के जादा दराचे टेंडर आल्याने जादा खर्च होणार आहे. तसेच ही वर्कऑर्डर प्रतिज्ञापत्रावर नाही, नाले वळवण्याबाबतचा उल्लेखही मोघमपणे केला आहे. या साऱ्यांमुळे वर्कऑर्डर परिपूर्ण नसल्याचा ताशेरा लवादाने महापालिकेवर ओढला. ५९ कोटी रुपयांच्या कामात ११२ किलोमीटरची ड्रेनेज लाइन टाकणे, दोन एसटीपी बांधणे व बावडा नाला अडवून लाइन बाजारला जोडणे अशी कामे आहेत.

याबाबतची परिपूर्ण वर्कऑर्डर काढण्यात यावी. तसेच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पुढील तारखेला या वर्कऑर्डरसह उपस्थित रहावे, असे आदेश लवादाने दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्याकडे उपायुक्तपदाचा कार्यभार असल्याने त्यांना व जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना पुढील तारखेस उपस्थित रहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १११ जणांवर हद्दपारीची कारवाई

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह जिल्ह्यातील अवैध व्यावसायिक, रेकॉर्डवरील चोरटे आणि फाळकूट दादांवर पोलिसांनी गेल्या वर्षभरात हद्दपारीच्या कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. प्रांताधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांनी १११ जणांना कलम ५५, ५६ आणि ५७ नुसार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. यात गुंड स्वप्निल तहसीलदार, मटकाचालक विजय पाटील, बबन कवाळे, सुमित रावलदास वासदानी यांच्यासह काही महिलांचाही समावेश आहे.

शहरासह जिल्ह्यातील चोऱ्या, दोन गटातील वाद, मारामारी, मद्य तस्करी, मटका, जुगार असे अवैध धंदे बंद राहावेत यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीच्या कारवाया केल्या आहेत. कलम ५५, ५६ आणि ५७ नुसार संशयितांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे प्रस्ताव संबंधित तालुक्यांचे प्रांताधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे पाठवले होते. यातील काही संशयितांना कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातूनही हद्दपार केले आहे. या कारवाईत शहरातील गुंड तहसीलदार याच्यासह त्याच्या टोळीतील गुंडांचाही समावेश आहे. राजारामपुरी परिसरातील बबन लाला कवाळे, मोहन मधुकर दाभाडे, स्वप्निल बाळासो कवाळे यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे कारवाईत महिलांचाही समावेश आहे. संगीता ऊर्फ ताई वाल्मिकी फुलोरे, बायडी सागर रसाळ, अश्विनी दत्ता नाईक, पूजा शिवाजी माळी, सुरेखा राजू नरदे (सर्व रा. टेंबलाई रेल्वे फाटक) या महिला चोरीच्या घटनांमधील आहेत. गांधीनगरातील अमित वासदानी आणि कैलास सुंदराणी या लुटारुंच्या टोळीचाही कारवाईत समावेश आहे. हद्दपारीच्या कारवाईत मटका आणि जुगार अड्डे चालवणाऱ्या बुकींचाही समावेश आहे. मटका किंग विजय पाटील, मकरंद मुदगल, अजित बागल, आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय पोषण’च्या तांदळावर डल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

शालेय पोषण आहार योजनेतील तांदळावर पुरवठादार ठेकेदारांकडून डल्ला मारला जात असल्याचे प्रकरण प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी शुक्रवारी उघडकीस आणले. मार्केट यार्ड येथील ठेकेदाराच्या गोडाऊनवर धडक मारून खुल्या बाजारात विक्रीसाठी तयार असलेली ६२ पोती निदर्शनास आणली.

शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पुरवल्या जाणाऱ्या तांदळात एक किलोपासून दहा किलोपर्यंत घट आली होती. दोन आठवड्यांपुर्वी हे प्रकरण उघडकीस आले होते. ठेकेदारांनेही तांदूळ कमी असल्याचे मान्य केले होते. दरम्यान तांदळाच्या ‘मापातील पाप’ प्रकरणाचा प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी पाठपुरावा केला. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांनी मार्केट यार्ड जुना टेंबे रोड येथील तांदूळ वाटप करणारा ठेकेदार एम. बी. मुथडा यांच्या गोडावूनवर धडक मारली. तत्पुर्वी त्यांनी ईमेलवरुन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षण विभागाचे लिपिक पी. के. बोरकर आणि शालेय पोषण आहार विभागाच्या भारती कोळी यांना देसाई यांच्यासोबत पाठवले. दिलीप देसाई यांनी गोडाऊनच्या आवारात आल्यावर ठेकेदार मुथडा यांना प्रश्न विचारले असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ठेकेदार मुथडा यांनी एफसीआय (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कडून आलेला तांदूळ दाखवला. नोव्हेंबर महिन्यातील तांदूळ शाळांना पोचवला असताना गोडावूनमध्ये पोती शिल्लक असल्याबद्दल देसाई यांनी ठेकेदाराचे लक्ष वेधले. तसेच काही पोत्यातील तांदूळ कमी होता. एफसीआयच्या पोत्यातील तांदूळ काढून ठेकेदारांने एफसीआयचा शिक्का नसलेल्या पोत्यात भरला होता. पोषण आहाराच्या तांदळाची २३९ पोती घटनास्थळी मिळून आली तर मोकळी व फाटकी १२५ पोती होती. तसेच खुल्या बाजारात विक्रीसाठी शालेय पोषण आहाराची ६२ पोती गोडावूनमध्ये होती. दिलीप देसाई यांनी शिक्षण विभागाचे लिपिक बोरकर यांना पंचनामा करायला सांगितला. यावेळी जिल्हा परिषदेचा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गोपनीयचे ​कर्मचारी उपस्थित होते.

शालेय पोषण आहारातील तांदूळावर डल्ला मारला जात असून विद्यार्थ्यांच्या पोटाला लागणारा तांदूळ काढून घेतला जात आहे. ही घटना उघडकीस आणतानाही एकही सरकारी वरिष्ठ अधिकारी हजर नव्हता. तांदूळ ठेवण्यासाठी ठेकेदारांकडे रीतसर जिल्हा पुरवठा कार्यालयाचा परवाना नाही. सरकारी अधिकारी व ठेकेदार हे एकत्र येऊन तांदळावर डल्ला मारत आहेत. जिल्हा परिषदेने दोषी अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्याकडे तक्रार करणार आहे.

दिलीप देसाई, अध्यक्ष प्रजासत्ताक सामाजिक संस्था

आमच्याकडे तांदूळ पुरवण्याचे काम आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील तांदूळ असून नोव्हेंबरअखेर तांदूळ पुरवायचा असल्याने गोदामात तांदूळ शिल्लक आहे. तसेच शाळांच्या मागणीनुसार तांदूळ द्यावा लागत असल्याने काहीवेळा तांदळाची पोती फोडून तांदूळ द्यावा लागत असल्याने रिकामी पोती आहेत. तसेच एफसीआयकडून मोकळी पोती मिळत नसल्याने आम्हाला बाजारातून पोती विकत घ्यावी लागतात.

एम.बी. मुथडा, ठेकेदार

ऑक्टोबर महिन्यासाठी आलेला तांदूळ असा

पहिली ते पाचवी, १०६२ टन

सहावी ते आठवी, १०६५.५५ टन

अशी आहे तांदूळ वाटपाची प्रक्रिया

विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार तांदळाचे वाटप केले जाते. जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी व तांदूळ पुरवठादार यांच्यात करार करण्यात आला आहे. एफसीआयकडून आलेला तांदूळ जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यंत ठेकेदारांने पोचवायचा असतो. ठेकेदाराला तांदूळ पुरवल्याबद्दल जिल्हा परिषदेकडून वाहतुकीचे बिल दिले जाते. तसेच ठेकेदाराने दोन प्रकारच्या डाळी, दोन प्रकारची कडधान्ये, तेल, मीठ, हळद, मोहरी, जिरे पोचवायचे असते. त्याचे बिलही जिल्हा परिषद ठेकेदाराला देते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसपी ऑफिससमोर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सासरे आणि दीर यांच्यासह पाचजण वारंवार त्रास देत असल्याने शफिका समीर शिकलगार (वय ३५, रा. पुजारी मळा, एएससी कॉलेजमागे, इचलकरंजी) या महिलेने शुक्रवारी (ता. १७) पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पती आणि दोन मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच शिकलगार कुटुंबीयांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या प्रकाराने काही काळ पोलिसांची तारांबळ उडाली. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शिकलगार कुटुंबाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शफिका शिकलगार दोन मुली आणि मुलासह पुजारी मळा येथील घरात राहतात. शफिका यांचे पती समीर नोकरीनिमित्त दुबईत असतात. गेल्या पंधरा दिवसांपासून ते सुट्टी घेऊन घरी आले आहेत. शेजारीच सासरे अमीरहमजा म्हमुलाल शिकलगार (वय ६८), दीर नियाज (३८), जाऊ तबस्सूम राहतात. या तिघांसह जावेचे आई-वडील हे वारंवार वाद घालून शारीरिक आणि मानसिक त्रास देतात, अशी शफिका यांची तक्रार आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र तक्रार दिल्याचे समजताच सासरे आणि दिराने शफिका यांच्या घराचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडल्याचा आरोप केला आहे. सासरे आणि दिर रात्री दारुच्या नशेत अश्लील वर्तन करतात, असाही उल्लेख शफिका यांनी तक्रार अर्जात केला आहे.

शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शफिका पती समीर आणि दोन मुलांसह पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आल्या. दोन कॅनमधून आणलेले रॉकेल त्यांनी स्वतःच्या आणि मुलांच्या अंगावर ओतून घेतले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी धावत जाऊन शिकलगार कुटंबीयांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील काडीपेटी आणि रॉकेलचे कॅनही काढून घेतले. अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या कार्यालयात घेऊन पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक शर्मा, इचलकरंजीचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी शिकलगार कुटुंबीयांची तक्रार जाणून घेतली. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी शिकलगार कुटुंबीयांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायकोर्टाच्या आदेशानंतरही तपास बेदखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिला पोलिस अधिकारी अश्विनी राजू गोरे (वय ३७, रा. हातकणंगले) या बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली. कळंबोली पोलिस ठाण्यात फिर्याद दखल केली. हायकोर्टात याचिक दाखल करून तपासाची मागणी केली. हायकोर्टाच्या आदेशानंतरही पोलिस यंत्रणेने बेपत्ता अश्विनी गोरे यांचा शोध घेतला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावानेच तपास बेदखल केल्याचा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे.

१५ एप्रिल, २०१६ पासून अश्विनी यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. विपश्यना करण्यासाठी त्या उत्तर भारतात गेल्या असतील असे समजून कुटंबीयांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. कळंबोली पोलिस ठाण्यातून सहकाऱ्यांनी १० मे, २०१६ मध्ये अश्विनी यांच्या वडिलांना फोन करून त्या महिन्याभरापासून पोलिस ठाण्यात येत नसल्याचे सांगितल्याने वडिलांनी मुलासह जावयाला कळवले. यानंतर बेपत्ता अश्विनी यांच्या शोधाची मोहीम सुरू झाली. अश्विनी यांचा भाऊ आनंद आणि पती राजू यांनी कळंबोली पोलिस ठाण्यात धाव घेऊन चौकशी केली. मित्र-मैत्रिणींकडेही चौकशी केली, मात्र काहीच थांगपत्ता न लागल्याने १४ जुलै, २०१६ मध्ये कळंबोली पोलिस ठाण्यात अश्विनी बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच लग्नाचे आमिष दाखवून अश्विनीचे अपहरण केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे.

अश्विनी यांनी कळंबोलीत फ्लॅट भाड्याने घेतला होता. नातेवईकांनी फ्लॅटची पाहणी केल्यानंतर लॅपटॉप मिळाला. लॅपटॉपमध्ये कुरुंदकर आणि अश्विनी यांच्यातील संभाषणासह दोघांच्या काही व्हिडिओ क्लीपही मिळाल्या आहेत. या पुराव्यांच्या आधारावर नातेवाईकांनी पोलिस महासंचालक सतीश माथूर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. माथूर यांनी भेट घेण्याचे टाळून नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना भेटण्याचा सल्ला दिला. ३१ ऑगस्ट, २०१६ मध्ये पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतरही तपास पुढे सरकला नाही. अखेर १० ऑक्टोबरला हायकोर्टात धाव घेऊन अश्विनी यांच्या नातेवाईकांनी याचिका दाखल केली. हायकोर्टाने १६ नोव्हेंबरला नवी मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले. विशेष म्हणजे हायकोर्टाच्या आदेशानंतरही तपासाला गती मिळालेली नाही, असा नातेवाईकांचा आरोप आहे.

एसीपी निलेवाड यांच्याकडे गुन्ह्याचा तपास आहे. निलेवाड यांनी काही पुरावे गोळा केल्यानेत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तरीही संशयित आरोपी मिळून येत नाही, अशी कारणे देऊन तपासात चालढकल केल्याचा आरोप राजू गोरे यांनी केला आहे. याबाबत शुक्रवारी एसीपी निलेवाड यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी हायकोर्टात असल्याचे सांगून माहिती देणे टाळले. हायकोर्टाच्या आदेशानंतरही तपास बेदखल होत असल्याने अश्विनी गोरे यांचे कुटुंबीय अस्वस्थ झाले आहेत.

कुरुंदकरला अटक का नाही?

कुरुंदकर याच्याविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो दीर्घ रजेवर गेला. आठ महिन्यांनंतर १५ दिवसांपूर्वी तो पुन्हा रुजू झाला आहे. गुन्हा दाखल असूनही पोलिस त्याला अटक करीत नाहीत. त्याला चौकशीसाठी बोलवत नाहीत. याउलट त्याला वाचवण्याचाच प्रयत्न होत असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. कुरुंदकर याला राजकीय पाठबळ असल्यानेच तो गुन्हा करूनही खुले आम वावरत असल्याची तक्रार नातेवाईकांची आहे.

घटनाक्रम

१५ एप्रिल २०१६ अश्विनी गोरे बेपत्ता

१४ जुलै २०१६ कळंबोली पोलिस ठाण्यात अश्विनी बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल (गुन्हा क्रमांक ४५/२०१६)

१८ ऑगस्ट २०१६ अश्विनी यांचा लॅपटॉप मिळाला

३१ ऑगस्ट २०१६ पोलिस आयुक्तांच्या भेटीचा नातेवाईकांचा प्रयत्न

१६ सप्टेंबर २०१६ मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अर्ज

१० ऑक्टोबर २०१६ हायकोर्टात याचिका दाखल

१६ नोव्हेंबर २०१६ हायकोर्टाचे तपासाचे आदेश

पोलिस खात्यातील महिला अधिकारी बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांची तक्रार नोंदवून घेण्यासही टाळाटाळ केली जाते. खुद्द वरिष्ठ पोलिस अधिकारीच दोषी अधिकारी आणि पोलिसांना पाठीशी घालत आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतरही तपास होत नाही हे दुर्दैवी आहे.

राजू गोरे, अश्विनी यांचे पती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार फोडण्यासाठी कोट्यवधी आले कुठून?

0
0


म. टा. वृतसेवा, सांगली

‘मनसेचे राज ठाकरे पाच पाच कोटी देऊन आपले नगरसेवक पळविल्याचे सांगत आहेत, तर खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपकडून सुरू असलेला घोडेबाजार चव्हाट्यावर आणला आहे. आमदारांना पाच पाच कोटी देऊन पक्षात घेण्यासाठी भाजपकडे कुठून पैसे आले?’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केला.

पोलिस मारहाणीत मृत्यू पावलेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पवार येथे आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. केवळ पक्ष बळकट करण्यासाठी सरकार सत्तेचा वापर भाजप करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांच्या छातीवर नको तर पायावर गोळ्या घालण्याचा सल्ला देत आहेत, असे बोलण्याचे त्यांचे धाडसच कसे झाले? असा सवाल करून ते म्हणाले, ‘सरकारची कर्जमाफीची योजना म्हणजे धांदात फसवणूक आहे. ऐन दिवाळीत गावचावडीवर वाचन करुन शेतकऱ्यांचे वाभाडे कशाला काढता? तुमच्या हातात यंत्रणा आहे, तो निकषात बसत नसेल किंवा तुम्हाला त्याला पैसे द्यायचे नसतील तर नका देऊ, पण त्यांची भरचौकात निंदानालस्ती करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?’

पवार म्हणाले, ‘सरकारच्या वारेमाप घोषणा आणि कृतिशून्य कारभार सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील खड्डे पडलेत, आभाळ फाटेलेले नाही. निम्मे पैसे डांबराला आणि निम्मे पैसे मीडियाला मॅनेज करायला वापरण्याचा सल्ला देत असतील तर राज्याचे अवघड आहे. लाज नसलेले मंत्री कारखान्याची दारू खपत नसेल तर त्या दारुला महिलांचे नाव देण्याचे सल्ले भर सभेत देत आहेत. खुद्द मुख्यमंत्री नाभिक समाजाबाबत अपशब्द वापरत आहेत. हे त्यांना शोभत नाही. त्यांना जनता म्हणजे किडा-मुंगी वाटते काय? शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे सरकार जनतेच्या मागण्यांकडे पहिल्यांदा दुर्लक्ष करुन नंतर त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत बेजबाबदारपणे वागत आहे. सरकार प्रशासनावरची पकड घालवून बसले आहे. पोलिसाची पत्नीच दरोडेखोरांच्या टोळीची मुकादम असल्याचे उघड झाले आहे. सापडेल त्याला पोलिस मारत सुटले आहेत, अशा प्रकारे त्यांना कायदा हातात घेता येणार नाही, हे सकारने लक्षात घ्यावे.’

विरोधकांनी सकारवर वचक ठेवायचा म्हणजे प्रत्येकवेळी त्यांची गच्चोटीच धरायची का? असा सवाल करुन पवार म्हणाले, ‘सुरुवातीला नवखे आहेत, अनुभव नाही, असे समजून आम्ही एक दोन वर्षे गप्प बसलो. नंतर सभागृहात आक्रमक होताच त्यांनी बहुमताच्या जोरावर आमचा आवाज दाबला. त्यामुळे आम्ही जनतेमध्ये गेलो आहोत. आता संपूर्ण महाराष्ट्र संतापून उसळत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनतेने त्यांना सत्ता देऊन तीन वर्षे लोटली तरी त्यांच्या चौकशा, समित्या आणि अभ्यासच सुरू आहे. सरकारचे हे वागणे महाराष्ट्राला मागे नेणारे आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एफआरपी देणे अशक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखरेच्या मागणी झालेली घट आणि बाजारातील साखरेचा उठाव नसल्याने किरकोळ बाजारात साखरेचे दर क्विंटलमागे ३४५० तर रेल्वे वॅगनमध्ये ३४०० रुपये झाला आहे. कमी झालेल्या दरांमुळे राज्य बँकेने केलेल्या साखरेच्या मूल्यांकनानुसार पहिल्या उचलीतून एफआरपी देणे अशक्य आहे. साखरेचे दर असेच कमी होत राहिल्यास जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एफआरपी देणे अशक्य होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. केंद्र सरकारने साखर दर नियंत्रणात राहण्यासाठी निर्याद बंदी आणि कारखानदार, व्यापाऱ्यांना साखर साठ्यावर आणलेले निर्बंध साखरदर कमी होण्यास कारणीभूत असल्याचेही सांगितले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘एक नोव्हेंबरपासून गळीत हंगामास सुरुवात झालेली असली, तरी आठ दिवसांपासून गळीत हंगाम वेग पकडू लागला आहे. मात्र आठ दिवसांत साखरेच्या प्रतिक्विंटलमागे ५० रुपयांनी दर कमी झाला. केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी साखरेचे दर ३५०० रुपयांवर स्थिर राहण्यासाठी निर्याद बंदी, कारखानदार व व्यापाऱ्यांना साखर साठ्यावर निर्बंध आणले. याची माहिती स्वत: मंत्री पासवान ट्विटवरुन देत होते. पण गेल्या आठ दिवसांपासून साखरेच्या दरात झालेली घसरणीबाबत काहीही बोलत नाहीत. हंगामाचा शेवट होऊपर्यंत घसरणाऱ्या दरांमुळे कारखानदारी प्रचंड अडचणीत येणार आहे.’

यावर्षी एफआरपीमध्ये ३५० रुपयांची वाढ झाली. राज्य बँकेने १२ टक्के उतारा गृहीत धरून प्रतिक्विंटल ३५०० रुपये दरांनुसार ८५ टक्के प्रमाणे ३५७० रुपये उचल दिली आहे. मधून टॅगिंग व प्रक्रिया खर्च वजा जाता २८२० रुपये प्रतिटन शिल्लक राहणार आहेत. या रकमेतून एफआरपी देणे उत्पादकांना शक्य होणार नाही. हंगामाच्या सुरुवास सरासरी दहा ते १०.५० टक्के साखर उतारा असतो. त्यामुळे या रकमेमध्ये अधिकच घट होणार आहे. दोन वर्षांपुर्वी एफआरपीसाठी केंद्र सरकारने दिलेल्या कर्जाचे हप्ते आणि अबकारी करापोटी प्रतिटन ३०० रुपये द्यावे लागणार असल्याने कारखानदारांच्या अडचणीत अधिकच भर पडणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.

शेतकरी संघटनांनी लक्ष घालावे

कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील एफआरपीबाबत आग्रही होते. हंगाम सुरू होताच साखरेच्या दरात क्विंटलमागे झालेली घट संघटनेच्या लोकांनी गांभीर्यांने घेवून दर अधिक ढासळणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. खासदार शेट्टी यांचे सोमवारी (ता.२०) दिल्लीत आंदोलन होणार असल्याने आंदोलनात साखरेच्या दरात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आमदार मुश्रीफ यांनी केली.

प्रत्येक कारखान्याची २५ टक्के मजुरांनी मारली टांग

गेल्या काही वर्षांपासून ऊस तोडणी मजुरांकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मोठ्याप्रमाणात फसवणूक केली जात आहे. दरवर्षी होणाऱ्या फसवणुकीमुळे वाहनधारक अक्षरश: रस्त्यावर आले आहेत. यावर्षीही अशाच प्रकारची फसवणूक झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कारखाने २५ टक्के मजूर ऊस तोडणीसाठी आलेले नाहीत. त्याचा परिणाम वाहनधारक व कारखान्यावर झाला आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी ऊस तोडणी मशिनशिवाय पर्याय राहिलेला नाही.

राज्य बँकेने साखर दरांनुसास होणारे मूल्यांकन

मुल्यांकन दर सरासरी उतारा उचल खर्च वजा एफआरपी

३५०० १२ ३५७० २८२०

३४५० १२ ३५१९ २७६९

३४०० १२ ३४६८ २७१८

३३०० १२ ३३६६ २६१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात १११ जण हद्दपार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मटका, जुगार, मद्य तस्करांसह फाळकूट दादा, चोरटे आणि सराईत गुंडांना हद्दपार करण्याची धडक मोहीम पोलिसांनी वर्षभर राबवली. गेल्या वर्षभरात पोलिसांनी जिल्ह्यातील विविध टोळ्यांमधील गुंडांसह १११ अवैध व्यावसायिकांवर हद्दपारीची कारवाई केली. प्रांत कार्यालयांसह पोलिस अधीक्षकांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. शहरातील स्वप्नील तहसीलदार, मटका किंग विजय पाटील, बबन कवाळे यांच्यासह कुख्यात टोळ्या आणि चोरीच्या घटनांमधील महिलांचाही समावेश आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५, ५६ व ५७ मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली. राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बबन लाला कवाळे, मोहन मधुकर दाभाडे, स्वप्नील बाळासो कवाळे (सर्व, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी), बबन ईश्वरा निपाणीकर (राजारामपुरी दहावी गल्ली), संभाजी नागोजी पोवार (रा. शाहूनगर), अमित लक्ष्मणदास वसदानी, सुमित रावलदास वसदानी, कैलास नारायणदास सुंदराणी, सनी श्रीचंद नारंग (सर्व रा. गांधीनगर), अन्नू विकास देवकर, संगीता ऊर्फ ताई वाल्मिकी फुलोरे, बायडी सागर रसाळ, अश्विनी दत्ता नाईक, पूजा शिवाजी माळी, सुरेख राजू नरंदे (सर्व रा. टेंबलाई रेल्वे फाटक, राजेंद्रनगर), सलीम यासीन मुल्ला, संजय रामचंद्र देसाई, संदीप किसन सातपुते (सर्व रा. यादवनगर) दस्तगीर आप्पालाल बोरगावे, दगडू पांडुरंग निकम (दोघे रा. विक्रमनगर), पुंडलिक तानाजी सांगावकर (रा. शाहूनगर), शंकर शामराव भास्कर, विशाल नरसिंग शेरखाने, लक्ष्मण ऊर्फ लखन जितेंद्र अभंगे, अविनाश शांताराम कोकाटे, ब्रह्मानंद विलास बागडे, संदीप बुद्धीसिंग मिनेकर, मंगेश अमृत ठाकरे (सर्व रा. मोतीनगर-राजेंद्रनगर) यांचा समावेश आहे.

शाहूपुरी हद्दीतील एस. टी गॅँगचा प्रमुख स्वप्नील संजय तहसीलदार (रुईकर कॉलनी), विठ्ठल काशिनाथ सुतार, तुषार शिवाजी डवरी, संजय ऊर्फ माया महावीर किरणगे (सर्व रा. विक्रमनगर), राकेश किरण कारंडे (रा. शास्त्रीनगर), रामचंद्र विलास सावरे (शिंगणापूर, ता. करवीर). आयुब खुदबुद्दीन जमादार, (रा. बागल चौक, संजय रामचंद्र देसाई (रा. जवाहरनगर), दत्तात्रय शंकर माळी (रा. शिरोळ), कयुम इमात शेख (सम्राट कॉलनी, विक्रमनगर), सहदेव शिवा दाभाडे (कोतोली, ता. पन्हाळा), नितीन चंद्रकांत कांबळे (रा. विचारेमाळ), श्रीकांत शंकर पाटील (रा. कागल), युनूस लियाकत पठाण (विचारेमाळ), दिनकर सदाशिव पाटील (कदमवाडी), मनोज हिरालाल मनसुखानी (रा. वळीवडे, ता. करवीर), मनोहर अर्जुना कांबळे (रा. प्रयाग चिखली, ता. करवीर), गंगाराम ऊर्फ राजाराम कोयाप्पा येडगे (रा. कनाननगर), गणेश विष्णू शिंगे (रा. पन्हाळकर गल्ली, विचारेमाळ), शशिकांत श्रीधर शिंदे (रा. एकसंबा, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव), फिरोज हमीद सय्यद (रा. संभाजीनगर), बजरंग बापूसो घुणकीकर (रा. कनाननगर), रणजित बाळासो कारंडे (लोणार वसाहत), प्रकाश बाजीराव निकम (कसबा बावडा), कानिफनाथ गणपतराव पाटील (सदर बझार), जयदीप नामदेव उलपे (कसबा बावडा) आदी.

जुना राजवाडा पोलिसांनी विजय लहू पाटील, मकरंद मारुती मुदगल, (दोघे, रा. देवकर पाणंद), अजित संपतराव बागल, गणपती प्रकाश शिंदे, (मंगळवार पेठ), समीर सुरेश नायर (रा. न्यू शाहूपुरी), चंद्रकांत तुळशीदास माने (रा. वाशी नाका), योगेश आनंदराव पावले (कळंबा रिंगरोड), हेमंत बाबूराव घोरपडे (शाहू मिल कॉलनी), किशोर बाजीराव माळी (कदमवाडी), अनिल आनंदा बावचकर (रा. गोगवे, ता. शाहूवाडी), मुन्ना बाबू हुक्केरी (आर. के. नगर), कपिल दीपक जगताप, सतीश जयवंत माने, उदय राधाकृष्ण बागल (रा. फुलेवाडी), रणजित रामचंद्र मोहिते (रा. राजोपाध्येनगर), अजिंक्य बाबूराव चव्हाण (गणेश कॉलनी, संभाजीनगर), सर्वेश मनोहर यादव (जवाहरनगर), अर्शद इम्तियाज मोमीन (करवीरनगर वाचनालय जवळ), प्रमोद आनंदा हेगडे (रेसकोर्स नाका), फिरोज खलील मुजावर (रा. यादवनगर) यांच्यासह जिल्ह्यातील १११ गुन्हेगारांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ महिलेचा खून चुलत दिराकडून

0
0

कागल

कागल जवळच्या लक्ष्मी टेकडीवर झालेला विवाहित महिलेचा खून तिच्या चुलत दिरानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मृताची ओळख पटल्यानंतर केवळ बारा तासांत पोलिसांनी आरोपीला गजाआड केले. राजाराम दगडू कागले (वय ४२, रा. बिरदेववाडी, पोस्ट आळते, ता. हातकणंगले) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी इचलकरंजी येथे प्रोसेंसिंगमध्ये काम करतो. त्यानेच शरीरसंबंधास नकार दिला म्हणून अनिता कागले (वय ३२) या आपल्या वहीनीचा दगडाने ठेचून खून केल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात कबूल केले असल्याची माहीती करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, अनिता कागले ही महिला मजुरी करीत होती. तिला प्रणव (वय ६), श्रावणी (वय ८) अशी दोन मुले आहेत. पतीचा अपघात झाल्याने तो घरीच असतो. याचा गैरफायदा घेत चुलत दीर राजाराम कागले याने तिच्याशी जवळीक साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. तो तिला जाणीवपूर्वक वारंवार भेटत असे व शरीरसंबंधाची मागणी करीत असे. मात्र या गोष्टीला अनिताचा विरोध होता. आपल्या दिराला समजावण्याच्या हेतूने मयत अनिता ही ११ नोव्हेंबर रोजी कागलला बहिणीकडे जातो म्हणून सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडली. (प्रत्यक्षात बहीण कर्नाटकातील विजयवाडा येथे राहते.) रस्त्यात भेटलेल्या राजाराम यास हुपरी बस स्टॅण्डवर येण्यास सांगितले. मोटर सायकलवरून तो तिथे आला. तेथून अनिताला गाडीवर घेऊन कागलच्या लक्ष्मी टेकडीवर पोहचला. रस्त्यात कुणीतरी बघेल आणि संशयास जागा नको म्हणून दोघेही हायवेवरुन वरच्या बाजूस घनदाट झाडीत गप्पा मारीत बसले. त्याने बोलता -बोलता तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र तिने आपण नात्याने दीर -भावजय आहोत असे समजावून सांगत नकार दिला. नकार देताच तो तिच्यावर संतापला. तुला माझ्याशी जवळीक करायची नव्हती, तर मला हुपरी स्टॅण्डवर का बोलावलेस असे म्हणून भांडण काढले. ती वारंवार त्यास समजावून सांगत होती. मात्र रागाने बेभान झालेल्या राजारामने तिच्यावर बळबजरी करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत राजारामला लागले. रागाच्या भरात जवळचा दगड घेऊन त्याने तिच्या डोक्यात घातला. त्यात ती बेशुद्ध झाली. ती संपली असे समजून तो थोड्या अंतरावर गेला. हाता-पायांची हालचाल दिसताच पुन्हा परत येऊन तोच दगड पुन्हा तिच्या डोक्यात घातला. गतप्राण होऊन ती निपचिप पडली. तेथून तो घरी गेला.

दरम्यान, वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे तिची बहीण विजयवाडा येथून कागलला आली आणि ओळख पटली. सायबर सेल, करवीर पोलिस ठाण्याचे डी.बी.पथक, कागल व हातकणंगले पोलिस ठाण्याचे कर्मचारी असा एकूण ५० जणांचा फौजफाटा तपास करीत होते. आरोपी आपण जणू काही केलेच नाही, अशा अविर्भावात वावरत होता. मृतदेह दहन करताना तो तेथेच होता, मात्र पोलिसांसमोर तोंड लपविण्याचा प्रयत्न करीत होता. गुरूवारी (ता.१६) इचलकरंजी येथील एका बँकेत पैसे काढण्यासाठी तो गेला असता पोलिसांनी त्याला पकडले. पुढील तपास पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा वसुली केल्यास हॉटेलांवर कारवाई: बापट

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

हॉटेल आणि मॉल्समधील खाण्याच्या पदार्थांवरील जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल आणि मॉल चालकांनी हॉटेलमध्ये त्वरीत नवीन दरपत्रक लावावेत. जुन्या दरपत्रकानुसार ग्राहकांकडून जादा वसुली केल्यास हॉटेल आणि मॉल चालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिला.

पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश बापट यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले,'एसी-नॉन एसी हॉटेलातील खाण्यावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आली आहे. हे नवे दरही लागू झाले आहेत. मात्र हे नवे दर लागू न करता ग्राहकांची लूट केल्यास हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात येईल.'

'नवी दरपत्रक लवकरात लवकर तयार करणं शक्य नसल्यास हॉटेल मालकांनी नवं दरपत्रक येईपर्यंत हॉटेलच्या फलकावर नवीन दर लावण्यात यावेत,' अशा सुचनाही त्यांनी केल्या. मात्र नवीन दरपत्रक बनविले नाही तर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, एमआरपीवर कोणताही कर आकारला जात नाही. जर दुकानदार किंवा मेडिकलवाले एमआरपी पेक्षा अधिक दर वसूल करत असतील तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारही कारवाईच्या तयारीत

राज्यसरकार पाठोपाठ केंद्र सरकारनेही ग्राहकांकडून जादा वसुली करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. नफेखोरी विरोधी कायद्यांतर्गत हॉटेलमालकांवर कारवाई करण्याचा केंद्र सरकारनं विचार सुरू केला आहे. खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळेच कठोर कारवाईचं पाऊल उचलण्यात येणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने 'टाइम्स ऑफ इंडियाला' सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: मंदिरात ‌छिन्नविच्छिन्न मृतदेह

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

शिराळा तालुक्यातील शिरसी येथील चक्रभैरव मंदिरात एकाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला. चक्रभैरव मूर्तीसमोरच हा मृतदेह आढळून आला असून, या मृतदेहाजवळून रक्ताचा पाट वाहिल्याचे अत्यंत भयावह चित्र दिसून आले. त्यामुळे हा प्रकार नरबळीचाच असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

अंदाजे ४० ते ४२ वर्षे वयाच्या पुरुषाचा हा मृतदेह आहे. शिराळा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौर्याची परिसिमा, माणुसकीला काळिमा हे शब्दही अपुरे पडतील, अशा पद्धतीने या व्यक्तीचा खून करण्यात आला असून मंदिरात रक्ताचा पाट वाहिल्याचे चित्र दिसून आहे. शिरसी -शिवरवाडी सीमेवरील मंदिरात हा प्रकार घडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस यंत्रणाही हडबडून गेली आहे.

शिरसीच्या पूर्वेला आणि शिवरवाडीच्या पश्चिमेला अगदी दोन्ही गावच्या सीमेवर श्री चक्रभैरवनाथाचे मंदिर आहे. डोंगरमाथ्याच्या ठिकाणचा हा परिसर निर्जन असतो. त्यामुळे मंदिर थोडे दुर्लक्षितच आहे. अजूनही या मंदिराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. याच ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंदिराचे व्यवस्थापन चक्रभैरव विश्वस्त मंडळाकडून चालते. सध्या मंदिराच्या गाभाऱ्याचे व सभामंडपाचे काम सुरू आहे. या ठिकाणी बांधकाम मजूर शुक्रवारी ५ वाजता काम संपवून घरी गेले. दुसऱ्या दिवशी (शनिवार) सकाळी ७.३०च्या दरम्यान हे कामगार परत कामासाठी मंदिरात आले. काम सुरू करण्यापूर्वी देवाचे दर्शन घ्यावे म्हणून ते गाभाऱ्यात गेले असता मूर्तीच्या समोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसला. मृतदेहाच्या डोक्यावर आणि कानशिलावर जबर जखमा आहेत. घटनास्थळी मृतदेहाचा अर्धा चेहरा रक्ताने माखलेल्या अवस्थेत होता. शेजारी टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ आणि हळदकुंकू असे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. हा प्रकार पाहून घाबरलेल्या कामगारांनी तो आजूबाजूच्या लोकांना सांगितला. त्यानंतर शिरसीच्या पोलिस पाटील जयश्री जाधव यांनी घटनेची वर्दी शिराळा पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी मृतदेह आणि विस्कटलेल्या साहित्यांची पाहणी केली. मृतदेहाच्या खिशात पाचवा मैल ते अंकलखोपपर्यंतचे बस तिकीट सापडले आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार तो खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मंदिरात घडलेल्या या घटनेमुळे शिराळा तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवार-शनिवारी अमावस्या होती. त्यातच हळदीकुंकू, लिंबू, टाचण्या आणि मूर्तीसमोरच केलेला खून यामुळे तो नरबळीच, असावा अशा चर्चेला ऊत आला आहे
------------------
सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरू आहे. सध्या मृतदेहाची ओळख पटवणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक अंदाजावरून अज्ञाताने दगडविटांचा वापर करून हा खून केला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे - किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’ची विक्री होणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

न्युट्रियन्स अॅग्रो फुड कंपनीने दौलत कारखाना चालवण्यास घेतला, पण गतवर्षीच्या हंगामातील ऊस, कामगार बिले दिलेली नसल्याने आणि यावर्षीच्या हंगामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. हंगामाच सुरू न झाल्यास मार्च २०१८ पर्यंत कंपनीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दहा कोटी रुपये जमा न केल्यास कारखान्याच्या विक्रीची निविदा निघणार आहे. कारखाना चालवण्यास देऊनही यामध्ये यश येत नसल्याने जमीन, मशिनरीवर असलेल्या तारण कर्जमामुळे दौलत विक्रीशिवाय पर्याय जिल्हा बँकेकडे पर्यायच राहणार नाही.

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखन्यावर विविध बँकांचे ११० कोटींचे सुरक्षित कर्ज आहे. त्याचबरोबर कामगार पगार व इतर स्वरुपाचेही कर्ज आहे. कारखानेचे ६५ कोटी कर्जामुळे जिल्हा बँक अडचणीत सापडली होती. त्यामुळे कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला. त्यानुसार बँकेने नऊ वेळ निविदा प्रसिद्ध केली. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एकमेव न्युट्रियन्स कंपनीने निविदेतील अटी पूर्ण केल्याने कंपनीला कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला.

कंपनीबरोबर करार झाल्यानंतर १७ कोटी व मार्च २०१७ मध्ये १७ कोटी असे ३४ कोटी बँकेत जमा केले. अद्याप कंपनीकडे ३३ कोटीची बाकी आहे. यातील दहा कोटी मार्च २०१८ पर्यंत बँकेला द्यावे लागणार आहेत. पण यावर्षीच्या गळीत हंगामाला कंपनीने सुरुवातच केलेली नसल्याने आणि कंपनी कारखान्याकडे फिरकलीच नसल्याने हळीत हंगाम सुरू होणाच्या आशा मावळत चालल्या आहेत. तसेच कंपनीने २०१६-१७ मध्ये गळीत केलेल्या उसाची बिले व कामगारांचा थकीत पगार दिलेला नसल्याने कंपनी मार्चपर्यंत दहा कोटीचे कर्ज भरले याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भविष्यात बँकेला कारखाना भाडेतत्त्वावर देण्यापेक्षा विक्री करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानी’ची दिल्लीकडे कूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘एकच गट्टी, राजू शेट्टी’ अशा गगनभेदी घोषणा, उसाच्या मोळ्या व फुलांनी सजविलेल्या बोग्या अशा उत्साही वातावरणात सोमवारी (ता. २०) दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी आंदोलनासाठी कार्यकर्ते शनिवारी सकाळी रवाना झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ध्वज हातात घेऊन छातीवरील बिल्ला अभिमाने दाखवत केलेल्या घोषणांनी रेल्वेस्थानक दुमदुमून गेले. कोल्हापूर, सांगली, जिल्ह्यासह सीमाभागातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होता. खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी रेल्वेचे सारथ्य करुन आंदोलकांमध्ये चेतना निर्माण केली.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, संपूर्ण कर्जमाफी द्या व उत्पादन खर्चापेक्षा दीडपट भाव द्या, आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने सोमवारी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. एक महिन्यापासून समन्वय समितीच्या माध्यमातून देशभर जनजागृती करण्यात आली. आंदोलनात सुमारे देशभरातील शंभर शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याने प्रत्येक जिल्ह्यातून कार्यकर्ते रवाना होणार आहेत. दिल्लीकडे जाण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्ते सकाळी शाहू महाराज टर्मिनस येथे सकाळपासून जमा झाले होते. खासदार शेट्टी यांचे आगमन होताच शेतकरी, कार्यकर्त्यांना विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

‘स्वाभिमानी किसान एक्स्प्रेस’ नावाने स्वतंत्र बुकिंग केलेल्या रेल्वेचे खासदार शेट्टी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना झाली. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल मदनाइक, चंदगडचे राजेंद्र गड्ड्यान्नावर, सागर शंभूशेटे, राम शिंदे आदी उपस्थित होते.

लोकवर्गणीतून रेल्वे बुकिंग

दिल्ली येथील आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. लोकवर्गणीतून आरक्षण करण्याचे नियोजन सुरू होते. एखाद्या आंदोलनासाठी लोकवर्गणीतून एवढ्या मोठ्या संख्येने रेल्वे बुकिंग केल्याची इतिहासातील पहिलीच घटना मानावी लागेल. कोल्हापूर येथून गेलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या निवासाछी व्यवस्था आंबेडकर भवन, राणी झाशी रोड, पहागंज नवी दिल्ली येथे केली आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, स्वाम‌िनाथन आयोगाच्या शिफारसी, हमीभावापेक्षा दीडपट भाव आदी आश्वासने दिली. गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांना विसर पडला. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून याचा जाब विचारण्यासाठी देशभरातील शेतकरी सोमवारी एकत्र येणार आहे.

खासदार राजू शेट्टी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिराळ्यात नरबळी

0
0



म. टा. वृत्तसेवा, शिराळा

शिराळा तालुक्यातील शिरसी येथील चक्रभैरव मंदिरात एकाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला. चक्रभैरव मूर्तीसमोरच हा मृतदेह आढळून आला असून, या मृतदेहाजवळून रक्ताचा पाट वाहिल्याचे अत्यंत भयावह चित्र दिसून आले. त्यामुळे हा प्रकार नरबळीचाच असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

अंदाजे ४० ते ४२ वर्षे वयाच्या पुरुषाचा हा मृतदेह आहे. शिराळा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौर्याची परिसिमा, माणुसकीला काळिमा हे शब्दही अपुरे पडतील, अशा पद्धतीने या व्यक्तीचा खून करण्यात आला असून मंदिरात रक्ताचा पाट वाहिल्याचे चित्र दिसून आहे. शिरसी -शिवरवाडी सीमेवरील मंदिरात हा प्रकार घडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस यंत्रणाही हडबडून गेली आहे.

शिरसीच्या पूर्वेला आणि शिवरवाडीच्या पश्चिमेला अगदी दोन्ही गावच्या सीमेवर श्री चक्रभैरवनाथाचे मंदिर आहे. डोंगरमाथ्याच्या ठिकाणचा हा परिसर निर्जन असतो. त्यामुळे मंदिर थोडे दुर्लक्षितच आहे. अजूनही या मंदिराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. याच ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंदिराचे व्यवस्थापन चक्रभैरव विश्वस्त मंडळाकडून चालते. सध्या मंदिराच्या गाभाऱ्याचे व सभामंडपाचे काम सुरू आहे. या ठिकाणी बांधकाम मजूर शुक्रवारी ५ वाजता काम संपवून घरी गेले. दुसऱ्या दिवशी (शनिवार) सकाळी ७.३०च्या दरम्यान हे कामगार परत कामासाठी मंदिरात आले. काम सुरू करण्यापूर्वी देवाचे दर्शन घ्यावे म्हणून ते गाभाऱ्यात गेले असता मूर्तीच्या समोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसला. मृतदेहाच्या डोक्यावर आणि कानशिलावर जबर जखमा आहेत. घटनास्थळी मृतदेहाचा अर्धा चेहरा रक्ताने माखलेल्या अवस्थेत होता. शेजारी टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ आणि हळदकुंकू असे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.

हा प्रकार पाहून घाबरलेल्या कामगारांनी तो आजूबाजूच्या लोकांना सांगितला. त्यानंतर शिरसीच्या पोलिस पाटील जयश्री जाधव यांनी घटनेची वर्दी शिराळा पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी मृतदेह आणि विस्कटलेल्या साहित्यांची पाहणी केली. मृतदेहाच्या खिशात पाचवा मैल ते अंकलखोपपर्यंतचे बस तिकीट सापडले आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार तो खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मंदिरात घडलेल्या या घटनेमुळे शिराळा तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवार-शनिवारी अमावस्या होती. त्यातच हळदीकुंकू, लिंबू, टाचण्या आणि मूर्तीसमोरच केलेला खून यामुळे तो नरबळीच, असावा अशा चर्चेला ऊत आला आहे.

००००००००००

सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरू आहे. सध्या मृतदेहाची ओळख पटवणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक अंदाजावरून अज्ञाताने दगडविटांचा वापर करून हा खून केला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

किशोर काळे, उपअधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली एसपींवर कारवाई अटळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संवेदनशील असूनही सांगली शहर पोलिस ठाण्याचा कारभार पोलिस निरीक्षकाऐजी उपनिरीक्षकाकडेच सोपवण्याचा प्रकार सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना नडण्याची चिन्हे आहेत. या गंभीर चुकीवर कारवाई म्हणून त्यांची तातडीने बदली होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

शहर पोलिस ठाण्याचा इनचार्ज युवराज कामटे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. अटकेती संशयित अनिकेत कोथळेचा खून करून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रकार कामटेसह पाच पोलिसांनी केल्यानंतर सांगली पोलिसांविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पोलिस ठाण्यात त्यावेळी कार्यरत असलेल्या अन्य पोलिसांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यातच आता वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात पोलिस अधीक्षक शिंदे यांच्यापासून होणार आहे.

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या रजाकाळात उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांच्याकडे कार्यभार सोपवला होता. पोलिस ठाण्यास सक्षम अधिकारी न दिल्याचा ठपका अधीक्षक शिंदे आणि पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांच्यावर यापूर्वीच ठेवला आहे. याबाबत ठेवून विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांना नोटिसा पाठवल्या आहे. या दोघांनी कामात हलगर्जीपणा आणि कुचराई केल्यामुळेच ठाण्यात हा गंभीर प्रकार घडला,’ असा ठपका नांगरे-पाटील यांनी ठेवला आहे. यामुळे या पुढची कारवाई शिंदे यांच्यावरच होण्याची दाट शक्यता आहे.

दीपाली काळे यांची चौकशी

दरम्यान, राज्य गुन्हे अन्वेषणच्या पुणे विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांच्या समोर पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची चौकशी सुरू झाली. दोन टप्प्यात दिवसभर काळे यांची चौकशी सुरू होती. दरम्यान, अधीक्षक शिंदे हेही काही वेळ ये‌थे येऊन गेले. दरम्यान, शनिवारी सीआयडीच्या पथकांनी या गुन्ह्यातील संशयितांच्या घरांची झडती घ्यायला सुरुवात केली.

सीआयडीने या काळे आणि शिंदे या दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशीबाबत पूर्वकल्पना दिलीली होती. त्यांच्या चौकशीसाठी सांगलीत आलेले सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी शनिवारी दुपारी डॉ. काळे यांच्यापासून चौकशीला सुरुवात केली. शहर पोलिस ठाण्यात ही चौकशी सुरू असून, पहिल्या टप्प्यात सुमारे अडीच तास डॉ. काळे यांची चौकशी झाली, त्यानंतर दुपारच्या टप्प्यात पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

कामटेच्या घरावर छापा

कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला आणि सध्या बडतर्फ असलेला उपनिरीक्षक युवराज कामटे याच्या घरावर सीआयडी पथकाने शनिवारी छापा घातला. विश्रामबागमधील स्फूर्ती चौकातील अपार्टमेंटमध्ये त्याचा फ्लॅट आहे. सीआयडीने अन्य चारही बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरांची झडती घेण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

बँकेतील बंद झालेले खाते सुरू करण्याचे पत्र देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना घुणकी (ता. हातकणंगले) येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत शंकर शिर्के यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. शनिवारी सकाळी हायस्कूलच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

घुणकी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये तक्रारदार सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. ही शाळा जिल्हा परिषदेअंतर्गत येत असून या ठिकाणी मुख्याध्यापक चंद्रकांत शिर्के हे कार्यरत आहेत. सरकारने जून २०१७ मध्ये वेतनात सात टक्के केलेल्या महागाई भत्यातील वाढीचा फरक रक्कम व चार महिन्याचे वेतन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाठार शाखेत तक्रारदाराच्या खात्यावर जमा झालेले आहे. परंतु मुख्याध्यापक चंद्रकांत शिर्के यांनी तक्रारदाराच्या वेतनातील महागाई भत्यातील वाढीचा फरक रक्कम व चार महिन्याचे वेतन काढण्यासाठी अडीच टक्के रक्कम कमिशन पोटी मिळावे यासाठी बँकेला पत्र देऊन खाते सील करण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने सील केलेले बँक खाते चालू करण्यासाठी मुख्याध्यापक शिर्के यांना विनंती केली असता त्यांनी अडीच टक्याप्रमाणे २२ हजार ७५० रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास खाते चालू करण्यासाठी पत्र देणार नसल्याचे सांगितले. याबाबत तक्रारदाराने मुख्याध्यापक शिर्के यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १७ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. लाचलुचपत विभागाने दोन साक्षीदारांच्या समवेत पडताळणी केली असता लाचेची रक्कम कागदावर लिहून दिल्याचे निष्पन्न झाले.

शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सापळा लावण्यात आला होता. यावेळी मुख्याध्यापक शिर्के यांना तक्रारदार यांच्याकडून पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलिस अधीक्षक हसबणीस, पोलिस उपाधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील वायदंडे, सहाय्यक फौजदार श्यामसुंदर बुचडे पोलिस नाईक आबासाहेब गुंडणके, संदीप पावलेकर, नवनाथ कदम, सहाय्यक फौजदार सर्जेराव पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या आत्महत्येने वाहनांची मोडतोड, दगडफेक

0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टेंबलाईवाडी परिसरातील संग्राम चंद्रकांत देसाई (वय २०, मूळ रा. लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी, सध्या रा. उचगाव) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर १५ ते २० जणांनी शेजारच्या घरावर दगडफेक केली. यात रिक्षा, दुचाकीसह घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याने तणाव निवळला.

संग्राम देसाई हा आईवडिलांसह उचगाव येथील भाड्याच्या घरात राहत होता. तो खासगी नोकरी करीत होता. सहा महिन्यांपूर्वी लक्ष्मी कॉलनीतील शेजारी राहणारे अक्कलकोटे कुटुंबीयांशी त्याचा किरकोळ वाद झाला होता. यानंतर शेजाऱ्यांकडून वारंवार त्रास होत असल्याने तो आईवडिलांसह उचगाव येथे घर भाड्याने घेऊन राहत होता. शुक्रवारी मध्यरात्री त्याने उचगाव येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने संग्रामच्या आईवडिलांना धक्का बसला. गांधीनगर पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला होता. दरम्यान, संग्रामच्या आत्महत्येस टेंबलाईवाडीतील शेजारी जबाबदार असल्याचा आरोप करीत १५ ते २० जणांच्या जमावाने वहिदा अक्कलकोटे यांच्या घरावर दगडफेक केली. यात एक रिक्षा, दुचाकीची मोडतोड केली. फ्रिज, कपाटांसह खिडक्यांचा काचाही फोडल्या होत्या. हल्लेखोरांनी घरातील प्रापंचिक साहित्याचेही मोठे नुकसान केले. यात सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

चहाची तलफ लागल्याने चहा पिण्यासाठी बाइकवरून जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा रस्ते अपघतात मृत्यू झाला. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हे तिन्ही विद्यार्थी ठार झाले. आज पहाटे ही दुर्देवी घटना घडली.

संगमेश माळगे, दीपक घुमडेल आणि अक्षय आसबे अशी या तिन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही सोलापूरजवळील तळे हिप्परगाजवळ आर्किड महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेत होते. ते तिघेही शनिवारी रात्री ग्रंथालयात अभ्यासासाठी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास चहा पिण्यासाठी ते तळे हिप्परगा येतील कँटीनवर आले होते. यादरम्यान रस्त्यावरून जाणार्‍या ट्रकने तिघांना उडविले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. पोलीस तसेच ग्रामस्थांनी या तिघांना जखमी अवस्थेत सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघातात ठार झालेला दीपक हा सोलापूरच्या रेमंड शोरुमच्या मालकाचा मुलगा आहे. तर अक्षय आसबे हा पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील रहिवाशी आहे. अपघाताचे वृत्त समजताच रुग्णालयात नातेवाईक तसेच त्याच्या मित्रांनी गर्दी केली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही रुग्णालयात भेट देवून पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images