Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कणेरकरनगरात जबरी चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कणेरकरनगर परिसरात मंगळवारी (ता. ३१) पहाटे चोरट्याने निखिल वेळापूरकर (वय ४०, रा. कणेरकरनगर) यांच्या घरात जबरी चोरी केली. चोरट्याचा सुगावा लागताच जागे झालेल्या वेळापूरकर यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी वेळापूरकर आणि शेजारी विनायक मांगलेकर हे किरकोळ जखमी झाले. चोरट्याने वेळापूरकर यांच्या घरातून रोख १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. याबाबत मंगळवारी संध्याकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कणेरकर नगरातील पितृऋण या दुमजली बंगल्यात निखिल वेळापूरकर पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. सोमवारी रात्री ते वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये झोपले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांच्या पत्नीला स्वयंपाक घरातील बल्ब सुरू असल्याचे लक्षात आले. हॉलमधून आवाज येत असल्याने त्यांनी पती निखिल यांना उठवले. निखिल हे गॅलरीतून शेजारचे विनायक मांगलेकर यांच्या जिन्यातून खाली गेले. विनायक यांना उठवून त्यांनी स्वतःच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. कॉलनीतील लोकांना त्यांनी उठवताच चोरट्याला सुगावा लागला, मात्र दरवाजा बंद असल्याने तो आतच अडकला होता. नागरिकांनी दरवाजा उघडताच दबा धरून बसलेल्या चोरट्याने पळ काढला. चोरट्याला पकडण्यासाठी पाठीमागे लागलेले निखिल वेळापूरकर यांनी त्याला पकडलेही होते, मात्र चोरट्याने हुलकावणी दिल्याने ते जमिनीवर पडल्याने जखमी झाले. पाठीमागून पळत आलेले विनायक मांगलेकर हे पाय घसरून पडल्याने त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. दरम्यान, हातातून निसटलेल्या चोरट्याने पळ काढला. चोरट्याने वेळापूरकर यांच्या घरातून कपाटातील रोख दहा हजार रुपये लंपास केले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मंगळवारी सकाळी जबरी चोरीची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञांनी वस्तुंवरील ठसे घेतले आहेत, तर श्वान पथकानेही चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजारच्या मोकळ्या मैदानापर्यंतच श्वानाने माग काढला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

चोरट्याने केला फराळ

चोरटा सुमारे पंधरा मिनिटे वेळापूरकर यांच्या घरात होता. स्वयंपाक घरातील किचन कट्ट्यावर ठेवलेले दिवाळीचे खाद्यपदार्थही त्याने खाल्ले. लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्याने आतील साहित्य विस्कटले होते. घरमालक निखिल वेळापूरकर जागे झाल्यानंतर त्याने दरवाजातून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा बाहेरून बंद असल्याने तो अडकला होता. दरवाजा उघडताच तो पळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठेकेदाराला ऑनलाइन गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टाकाळा परिसरातील राजू बाबूलाल सुतार (वय २८, रा. मामा चव्हाण रेसिडेन्सी, फ्लॅट क्रमांक ३, माली कॉलनी) यांच्या बँक खात्यातील एक लाख रुपये अज्ञाताने ऑनलाइन लंपास केले. शुक्रवारी (ता. २७) रात्री हा प्रकार उघडकीस आला. सुतार यांनी बँकेत जाऊन खात्री केल्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

याबाबत अधिक माहती अशी की, माळी कॉलनीत राहणारे राजू सुतार हे ठेकेदार आहेत. बँक ऑफ बडोदा या बँकेत त्यांचे खाते आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास ते मोबाइलवर आलेले मेसेज पाहत होते. बँक ऑफ बडोदाकडून आलेल्या दोन मेसेजमध्ये प्रत्येकी ५० हजार रुपयांची रक्कम कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणतीही ऑनलाइन खरेदी किंवा अन्य खात्यावर रक्कम वळवली नसतानाही एक लाख रुपये खात्यातून गायब झाले होते. हे मेसेज पाहताच त्यांना धक्का बसला. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस बँकेला सुटी असल्याने सोमवारी सकाळी बँकेत जाऊन त्यांनी खात्री केली. बँक खात्यातून एक लाख रुपये कमी झाल्याने त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ऑनलाइन गंडा घालणाऱ्या चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओपन बारवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील सार्वजनिक ठिकाणी तळीरामांचे अड्डे वाढल्याने मंदिर, स्मारके, उद्याने, क्रीडांगणांसह शाळांच्या मैदानांवरही ओपन बार तयार झाले आहेत. तळीरामांकडून उद्यानांतील स्मारके आणि वास्तूंची विटंबना होत असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन पोलिसांनी शहरातील २२ ओपन बारची यादी तयार केली आहे. सोमवारी रात्रीपासून तळीरामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. १२ तळीरामांवर गुन्हे दाखल केले असून, ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.

शहरात अनेक राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे आणि स्मारक आहेत. याशिवाय शाळांची मैदाने, उद्याने, नदीघाट आणि क्रीडांगणे शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. शहराची ओळख असलेल्या या ठिकाणांवर तळीरामांचे अतिक्रमण सुरू आहे. कोणताही विधिनिषेध न बाळगता तळीराम थेट शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरही मद्याचे प्याले रिचवत आहेत. रिकाम्या बाटल्या आणि ग्लासचा कचरा समाधीस्थळीच फेकला जातो हे महाराष्ट्र टाइम्सने दाखवून दिले होते. पोलिस प्रशासनासह महापालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी शहरातील महत्त्वाच्या सात ठिकाणांची यादी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे देऊन सात ठिकाणांना रात्रीच्या वेळी पोलिस संरक्षण मिळावे, असे आवाहन केले आहे. पोलिसांनी याहीपुढे जाऊन २२ ठिकाणांची यादी काढली आहे. सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यप्राशन करणाऱ्या तळीरामांवर सोमवारपासून ठोस कारवाईला सुरुवात केली आहे.

शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री शहरातील तीन ठिकाणी अचानक छापे टाकून कारवाई केली. गांधीनगर, दुधाळी आणि आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात कारवाई करून पोलिसांनी १२ तळीरामांना ताब्यात घेतले. मुंबई दारुबंदी अधिनियम कायद्यानुसार या तळीरामांवर गुन्हे दाखल केले आहेत. खटले दाखल करून कोर्टात सादर केले जाणार आहेत, त्यामुळे लवकरच तळीरामांना कोर्टाकडून नोटिसा येणार आहेत. तळीरामांवर दंडात्मक कारवाई किंवा सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृकर यांनी दिली आहे.

शहरात सध्या हॉकी स्टेडियम, पंचगंगा नदी घाट, पिकनिक पॉइन्ट, स्मशान घाट, दसरा चौक, कसबा बावडा पॅव्हेलियन, तावडे हॉटेल परिसर, राजाराम कॉलेज ते कृषी महाविद्यालयाच्या समोरचे फूटपाथ, शेंडा पार्क, रिंग रोड फूटपाथ, पुईखडी, टेंबलाई टेकडी आदी ठिकाणे पोलिसांच्या रडारवर आहेत.

१२ तळीरामांवर गुन्हे

गांधी मैदानात मद्यप्राशन करणारे दीपक दिलीप बेडगे (वय २१), इब्राहीम बाळासो शिकलगार (३२), अजिंक्य अशोक साळुंखे (२३, सर्व रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), आशिष शिवाजी पोवार (१९, उत्तरेश्वर पेठ) यासह एका अल्पवयीनावर गुन्हे दाखल केले आहेत. दुधाळी पॅव्हेलियन येथे मद्यप्राशन करणारे सत्यजित सर्जेराव पाटील (४०), अन्सार युसूफ जमादार (४२, दोघेही रा. फुलेवाडी, दत्तमंदिराजवळ), नीलेश आनंदराव चव्हाण (३२, रा. दुधाळी, कोल्हापूर) आणि अमोल दशरथ देशमुख (३४, रा. राजोपाध्येनगर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, तर आयसोलेशन हॉस्पिटलच्या परिसरात राजाराम कृष्णात ठाकूर (६५, रा. अतिवडे, ता. भुदरगड), विजय नारायण पाटील (५३, रा. कडगाव, ता. भुदरगड), धनंजय शिवाजी खामकर(३२, रा. सानेगुरुजी वसाहत) यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर डॉक्टरना कोटींचा गंडा

$
0
0


कोल्हापूर ः जादा रिटर्न देण्याच्या आमिषाने जिल्ह्यातील शंभर नामांकित डॉक्टरांना शेअर बाजारातील गुंतवणुकीत सुमारे चार कोटींना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. ‘गुंतवणूकदार देवदूत,’ मानणाऱ्या एका कंपनीच्या सबब्रोकरनेच हा गंडा घातला आहे. शेअर बाजारात घातक मानल्या जाणाऱ्या फ्युचर इन ऑप्शन (एफएनओ) या सट्ट्याने अनेकांचे फ्युचरच बिघडवले आहे. पहिल्या टप्प्यात शंभर डॉक्टरांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुंतवणूदारांना म्युच्युअल फंडासह दर महिन्याला १५ ते २० टक्के रिटर्न देणाऱ्या कंपनींचा शेअर्स घेतल्याचे भासवून प्रत्यक्ष ‘एफएनओ’मध्ये संबंधिताने स्वतःच्याच नावार ही रक्कम गुंतवली होती.

‘कमी पैशात झटपट श्रीमंत होण्या’चा असा सल्ला देणाऱ्या मुंबईतील एका कंपनीची कोल्हापुरात उपशाखा आहे. या शाखेच्या सबब्रोकरने शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिकाधिक रिटर्न मिळतील, असा सल्ला संबंधित डॉक्टरना दिला. सुरूवातीला दहा डॉक्टरांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. या सबब्रोकरने गुंतवणुकीनंतर चार महिने तीस ते साठ हजारांचा निव्वळ नफा झाल्याचे बोगस कागदपत्रांद्वारे दाखवले. त्यामुळे आणखी काही डॉक्टर त्याच्या जाळ्यात ओढले गेले. बाजारातील ‘फ्यूचर इन ऑप्शन,’ प्रकारात २० ते ३० टक्के रिटर्न असल्याचे भासविले. सतत घाईगडबडीत असलेल्या डॉक्टरांकडून धनादेश आणले. प्रत्येकवेळी एक, दोन आणि तीन लाखांचे धनादेश गोळा केले. त्यानंतर बाजारातून १५ ते २० टक्के नफा झाल्याची कम्प्युटराइज्ड प्रिंटही दिली. केलेल्या गुंतवणूकीतून वर्षाकाठी एक लाखाचा नफा झाल्याचेही भासविले. प्रत्येक डॉक्टरचे चार्टर्ड अकाउंटंट वेगळे आहेत. त्यांच्याकडे वार्षिक उत्पन्नाबरोबरच झालेल्या फायद्याचा ताळेबंद बांधून अनेकांनी उत्पन्नावरील टॅक्सही भरला आहे. मात्र प्रत्यक्षात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या गुंतवणूकदार डॉक्टरांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

संबंधित सबब्रोकरने गुंतवणूकदारांना झालेल्या फायद्यांचे धनादेशही दुसऱ्याकडून घेतल्याची माहिती उघड होत आहे. आर्थिक घोटाळ्यासह फसवणूक करणाऱ्याला ब्रोकरेजही मिळाले असून गुंतवणूकदार मात्र हवालदिल झाले आहेत.

०००

अशी झाली फसवणूक

गुंतवणूकदारांनी सबब्रोकरकडून ताळेबंद अहवाल, केलेली गुंतवणूक आणि निव्वळ नफ्याबाबतची माहिती मागितली. तेव्हा त्याने कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. डॉक्टरांनी शेअर बाजारासंबंधी पुण्यातील काही तज्ज्ञांनी संपर्क साधला. कोणत्याही कंपनीत गुंतवलेली रक्कम, त्यातून मिळणारा फायदा आणि ताळेबंदचा अहवाल सरकारच्या नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि स्टेट डिपॉझिटरी सिक्युरिटी लिमिटेड (सीडीएसएल) वरुन डिमॅट अकाउंटवेळी दिलेल्या रजिस्टर्ड वैयक्तिक इ-मेलवर मिळते. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी सरकारच्या संकेतस्थळावरुन जाऊन क्लिक केल्यानंतर डिमॅट खात्यावर रक्कम शून्य असल्याचे लक्षात आले आणि त्यांचा रक्तदाब वाढला. या शंभर डॉक्टरांनी सेबीकडे धाव घेतली आहे.

००००००००००

काय आहे फ्युचर ऑप्शन?

शेअर बाजारातील फ्युचर इन ऑप्शन प्रकारात किमान दहा दिवस पैसे ठेवून अंदाज बांधायचा असतो. घेतलेले शेअर्स ब्लॉक केल्यानंतर शेअर्सची विक्री केली जाते. सुमारे दोन लाख गुंतविल्यास फायदा झाल्यास चार ते पाच लाखांचा नफा होऊ शकतो. बाजारातील या सट्ट्यावर संबंधित सबब्रोकरने पैसे गुंतविले. संबंधित गुंतवणूदारांना मात्र म्युच्युअल फंडासह दर महिन्याला १५ ते २० टक्के रिटर्न देणाऱ्या कंपनीचा शेअर्स घेतल्याचे भासविले.

००००००००००

गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर कागदपत्रांची पाहणी सुरु केली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांचा ताळेबंद मागविला आहे. फसवणूकदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

नरेंद्र मेहता, सेक्रेटरी ऑफ इन्व्हेस्टर्स ग्रेव्हॅन्सीस फोरम, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरची बलेरोला धडक;दोन ठार, दोन जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
कोल्हापूरहून बार्शीकडे निघालेल्या बलेरो पीकअप गाडीला मिरजेकडे येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन जण ठार तर, दोन जण जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर बराच वेळ वहातूक विस्कळीत झाली होती.
मंगळवारी संध्याकाळी बलेरो पिकअप (एम. एच. २५ पी ५८१७ ) या गाडीतून पांढरी (ता. बार्शी) येथून सिताफळे घेऊन काहीजण व्यापारासाठी कोल्हापूरला आले होते. बुधवारी कोल्हापूरहून दुपारी परत बार्शीकडे निघाले असता पंढरपूर रस्त्यावरील भोसे फाट्याजवळ दुपारी अडीचच्या सुमारास मिरजेकडे येणाऱ्या कंटेनरने (एच. आर. ५५ एपी २९०४) जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नभी मौला शेख (वय ४० रा. पांढरी ता. बार्शी) जिल्हा सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला. खंडू चंद्रकांत चांदणे (वय ३० रा. पांगरी ता. बार्शी, जिल्हा सोलापूर) याचा मिरजेतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दस्तगीर याकूब शेख (वय ४७) आणि राजू चॉद शेख (वय ४०) हे दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिकअपचा ड्रायव्हर महिबूब शेख (रा. पांगरी ता. बार्शी जिल्हा सोलापूर) हा स्वतः मालक असून, तोही जखमी झाला आहे. सुदैवाने इतर तीन जण अपघातातून बचावले. दरम्यान, कंटेनरच्या ड्रायव्हरने पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरदुपारी बँक ऑफ महाराष्ट्रचे ७० लाख लुटले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पंढरपूर

'बँक ऑफ महाराष्ट्र'ची ७० लाखांची रोकड घेऊन निघालेली आय ट्वेंटी गाडी अडवून दरोडेखोरांनी लुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून संपूर्ण जिल्ह्यात दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीचा पाठलाग करत चार दरोडेखोरांनी आपली बोलेरो गाडी आडवी लावत ही गाडी अडवली. त्यानंतर बँकेच्या आय ट्वेंटी गाडीतील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात या दरोडेखोरांनी तिखट फेकत गाडीची काच फोडली आणि रक्कम घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे ही रक्कम नेत असताना बँकेच्या गाडीसोबत सुरक्षारक्षक नव्हते. बँकेची एवढी मोठी रक्कम खासगी वाहनातून सुरक्षारक्षकांशिवाय कशी नेली जात होती याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस याचाही तपास करत आहेत.



बँकेची रक्कम घेऊन जाणारी आय ट्वेंटी ही गाडी (MH-45-N 5831) बँकेचे सांगोला शाखेचे मॅनेजर अमोल भोसले यांचीच होती. ते स्वत: आपल्या कारमधून ही रक्कम घेऊन पंढरपूरकडे निघाले होते. या गाडीसोबत सुरक्षारक्षक नाही याची माहिती दरोडेखोरांना असावा असा अंदाज बांधला जात आहे. हे दरोडेखोर सांगोला-पंढरपूर रस्त्यावर जगताप मळ्याजवळ दबा धरून बसले होते. गाडी टप्प्यात येताच त्यांनी गाडीचा पाठलाग करत आपली बोलेनो गाडी बँकेच्या गाडीला ओव्हरटेक करत अडवली आणि तिखट फेकत आपले काम फत्ते केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसंतदादा’चे धुराडे पेटलेशेतकरी संघटनांनी बंद पाडल्या ऊसतोडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
दत्त इंडिया कंपनीने भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचा गाळप हंगाम बुधवारी सुरू झाला. ऊसाने भरलेल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर ट्रॉल्यांची वर्दळ सांगली परिसरात दिसू लागली आहे. पुन्हा एकदा कारखान्याने राखेचे प्रदूषण रोखण्यासाठी उभारलेली उंच चिमणी धूर ओकू लागल्याने कारखाना सुरू झाल्याचे संकेत दूरवर पोहचले आहेत. दरम्यान, शेतकरी संघटनांनी दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडणी करायची नाही, असे सांगून काही ठिकाणी उसतोडणी रोखण्याचे, ऊस वाहतूकीच्या वाहनांची हवा सोडण्याचे आंदोलन सुरू केल्याने कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही.
वसंतदादा कारखाना भाड्याने घेऊन सुरू करणाऱ्या दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्यूंजय शिंदे म्हणाले, कारखान्याचे गाळप सुरू केलेले आहे. पहिल्या दिवशी दोन हजार टन उसाची आवक झाली आहे. संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून काही ठिकाणी वाहनांची हवा सोडली जात आहे, तर काही ठिकाणी वाहने रोखली जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी स्वतः आणखी दोन दिवस दराची वाट पाहू या, असे सांगत आहेत. परंतु, आपण त्या सर्वांना विनंती करून ऊस देण्याचे आवाहन करीत आहे. बंद असलेला वसंतदादा कारखाना सुरू करण्यात आल्याने पहिले काही दिवस ट्रायलसारखेच गाळप करून पुढे जावे लागणार आहे. दराच्या बाबतीत हात आखडता घेणार नाही. चांगला दर देणाऱ्या कारखान्यांबरोबर आणि आठवड्याला बील देण्याची आमची तयारी आहे. पहिल्या दिवसाचा माहोल चांगला आहे. अनेक जण कारखान्याकडे धुराड्याकडे कौतुकाने पहात आहेत.
अंकलखोप परिसरात तोडी बंद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे म्हणाले, दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोडणीला गती येऊ देणार नाही. वसंतदादा कारखान्याच्या तोडी धामणी, नांद्रे, अंकलखोप या ठिकाणी बंद पाडल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहने रोखून आंदोलन करताना शेतकऱ्यांनाही आमची भूमिका पटवून दिली आहे. सध्या कारखाने सुरू असले तरी कमी क्षमतेने गाळप सुरू आहे. दर जाहीर करा आणि तोडणीला हात घाला, यावर संघटना ठाम आहे.
हे कारखाने झाले सुरू
यंदाच्या हंगामासाठी सांगली जिल्ह्यातील सर्वच कारखाने सज्ज झाले आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला वसंतदादा कारखान्याबरोबरच हुतात्मा, वाळवा, सोनहिरा, वांगी, उदगीरचा खासगी, शिराळ्याचा शिवाजी केन आणि विश्वासराव नाईक हे कारखाने सुरू झाले आहेत. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे साखराळे आणि वाटेगाव युनिट गुरुवारी सुरू होत आहे. सर्वोदय, कारंदवाडी युनिट शुक्रवारी सुरू होत असल्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी सांगितले. क्रांती सहकारी साखर कारखानाही गुरुवारी सुरू होणार आहे. सदाभाऊंच्या ‘रयत’ने
तोडी रोखल्या
इस्लामपूर
‘रयत क्रांती संघटनेने एफआरपी अधिक तीनशे रुपये पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी केली आहे. कारखानदारांनी तसे जाहीर केल्याशिवाय ऊस तोड होऊ द्यायची नाही, असा संघटनेचा पवित्रा आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी आणि वाहतूकदारांचे प्रबोधन करून ऊस तोडी रोखण्यावर भर दिला आहे,’ अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर कदम यांनी दिली.
कदम म्हणाले, ‘आम्ही संवादा करून संघर्षाकडे जाणार आहे. पहिल्यांदा संघर्ष टाळण्याचा आमचा प्रयत्न असेल. केंद्र सरकारने मागील वर्षांच्या रिकव्हरीवर ९.५ रिकव्हरीला २५५० रुपये व त्यापुढील प्रत्येक पॉईटला २६५ रुपये एफआरपी निश्चित केली आहे. प्रत्येक कारखान्याने रिकव्हरीनुसार बसणारा दर अधिक ३०० रुपये असा पहिला हप्ता द्यावा ही आमच्या संघटनेची आग्रही मागणी आहे. आज, गुरुवारी पुणे येथील साखर संघाच्या कार्यालयात राज्यातील साखर कारखानदार, सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व सरकारच्या प्रतिनिधींची बैठक आयोजत केली आहे. या बैठकीत तोडगा निघाला तर ठीक, नाहीतर आमची संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवेल. संघटनेचे संस्थापक कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सरकारमध्ये असल्याने शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. त्यातूनही तोडगा नाही निघाला तर आम्ही रस्त्यावरील लढाईला तयारच आहोत.’
वाळव्यात शांतता
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी ऊसतोडी रोखल्या. उसाला पहिली उचल ३४०० रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. बुधवारी मिरज तालुक्यातील दुधगाव, सावळवाडी, समडोळी, माळवाडी या गावातील हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडी रोखल्या. वाळवा तालुक्यात सर्वत्र शांतता होती. ऊसतोडीच्या हालचाली कुठेही दिसल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र बॅँकेचे ७० लाख लुटलेपंढरपूर-सांगोला रस्त्यावर चोरट्यांचा दरोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
सांगोल्याहून पंढरपूरकडे बॅँक ऑफ महाराष्ट्रची सत्तर लाख रुपये घेऊन निघालेल्या आय ट्वेंटी गाडीला बुधवारी चार चोरट्यांनी बलेरो गाडी आडवी लावली. बॅँकेच्या गाडीतील दोघांच्या डोळ्यात चटणी टाकून गाडीची काच फोडून चोरट्यानी पोबारा केला. बॅँकेची एवढी मोठी रक्कम खासगी वाहनातून सुरक्षारक्षकाशिवाय कशी नेली जात होती, हा मोठा प्रश्न असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, घटनेनंतर पोलिसानी जिल्ह्यातील रस्त्यांची नाकेबंदी केली आहे. संपूर्ण जिल्हाभर तपास सुरू केला आहे. बॅँक ऑफ महाराष्ट्र सांगोला शाखेचे व्यवस्थापक अमोल भोसले आपल्या खासगी गाडीतून रोख ७० लाख रुपये घेऊन पंढरपूरकडे निघाले होते. या वाहनाबरोबर एक ही सुरक्षारक्षक नव्हता. याची माहिती चोरट्याना असावी यामुळेच चोरटे सांगोला-पंढरपूर रस्त्यावर जगताप मळ्यानजीक दबा धरून बसले होते. बॅँकेच्या वाहनाला चोरट्यांनी पाठीमागून धडक दिली आणि लोकांच्या डोळ्यात चटणी टाकून ही धाडसी चोरी केली. बलेरो गाडीतून चार चोरट्यांनी ७० लाख रुपये घेऊन पोबारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हुतात्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
कुमठे (ता. तासगाव) येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान शशिकांत शिवाजी पाटील (वय ४४) यांचा मंगळवारी (दि. ३१) पहाटे जम्मू-काश्मीरमध्ये अकस्मित मृत्यू झाला. बुधवारी सकाळी शोकाकूल वातावरणात कुमठे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आमदार सुमन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
शशिकांत पाटील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ५४व्या बटालियनमध्ये सेवेत होते. मंगळवारी दुपारी पाटील यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर कुमठे गावावर शोककळा पसरली. गावातील सर्व दुकाने, सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. शशिकांत पाटील यांचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते. मंगळवारी रात्रभर त्यांच्या कुंटुंबीयांचा हंबरडा ऐकू येत होता. पार्थिवाची वाट बघत ग्रामस्थही अखंड रात्र जागेच होते.
बुधवारी पहाटे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अधिकारी के. गिरीशन व केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान शशिकांत पाटील यांचे पार्थिव घेऊन गावात दाखल झाले. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये पार्थिव ठेवण्यात आले. कुमठे गावातील प्रमुख रस्ते आणि चौकातून पाटील यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळीने वीर जवान तुझे सलाम, असे संदेश लिहिले होते. ग्रामस्थ शशिकांत पाटील अमर रहे, अशा घोषणा देत होते. ग्रामपंचायत चौकात ग्रामस्थ व जिल्ह्यातून आलेल्या लोकांनी शशिकांत पाटील यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. यानंतर पाटील यांचे पार्थिव गावच्या पूर्वेस असलेल्या शेतात नेण्यात आले. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान आणि राज्य पोलिस दलाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर सरकारी इतमामात पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठ-सांगली रस्त्यासाठी नागरिकांचं आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
पेठ-सांगली रस्त्यावरील खड्ड्यांना त्रासून गेलेल्या नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांच्या गैरकारभाराविरुद्ध संतापून तीव्र जनआंदोलन उभारले आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा, प्रत्यक्ष रस्त्यावर दर्जेदार कामाचा आग्रह आणि गावनिहाय रस्त साक्षरतेची प्रबोधन मोहिम सुरू करण्यात आली आहे. खड्डा न् खड्डा भरून दे, चांगला रस्ता करून दे.., घोषणेने जोर धरला आहे. रविवारी, पाच नोव्हेंबरला इस्लामपूर-तुंग रस्त्यावर मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.
दिवाळीच्या कालावधीत इस्लामपुरातील आंबेडकर नाका परिसरात रस्त्यातील खड्ड्यांत दिवे लावून शंभराहून अधिक नागरीकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत दैनंदिन अहवाल, कामाचा दर्जा, कामाची गती वाढवण्याचे ठरले. प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता कृती समितीचे सदस्य आणि नागरीक कामावर देखरेख करीत आहेत. पेठ-सांगली रस्त्यावर खड्ड्यांमुळे वर्षभरात तेरा बळी गेले आहेत. त्यामुळे आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. रस्ता कृती समितीने वातावरण निर्मितीसाठी तुजारपूर, गाताडवाडी, अहिरवाडी या गावांत जाणीव जागृतीसाठी बैठका झाल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्ग होणार
पेठ-मिरज हा ५५ किलोमीटर लांबीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याचे केंद्र सरकारने घोषीत केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. पण, अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.
चांगला रस्ता आमचा अधिकार- कृती समिती
सर्वसामान्य नागरीक सरकारला कर भरीत असल्यामुळे चांगला व दर्जेदार रस्ता हा समान्य माणसाचा हक्क आहे, या भूमिकेतून कृती समिती लढा देत आहे. कृती समितीत सर्वपक्षीय नागरीक सहभागी आहेत. कृती समितीने पत्रक काढून रस्त्यांबद्दल जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. रस्ते साक्षरता मोहिमेला सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त मिळत आहे. अनेक ठिकाणी सामान्य नागरीक स्वताःहून खड्डे मुजवण्याच्या कामावर देखरेख करीत आहेत. ‘खड्डा खड्डा भरुन दे... चांगला रस्ता करून दे...’ या घोषणेने जनमानसावर पकड निर्माण केली आहे.
अशी आहे कृती समिती
निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या अध्यक्षतेखाली शहाजी पाटील, उमेश कुरळपकर, दीपक कोठावळे, मिलिंद थोरात, सतिश चौगले, बी. जी. पाटील, धनाजी गुरव, डॉ. संजय थोरात, शाकीर तांबोळी आदी कार्यकर्ते प्रबोधन मोहिम व मोटार सायकल रॅलीचे नियोजन करीत आहेत.
कृती समितीच्या नागरिकांसाठी सूचना...
खड्डा चौकोणी करून घेणे
खड्डयाचा तळ दिसेपर्यंत स्वच्छ करून घेणे
कॉम्प्रेसरच्या मदतीने धुळ व माती काढून टाकणे
सिलकोटचा थर देऊन अर्धा-पाउण इंची खडी भरणे
डांबर टाकून रोलिंग करणे, रोलिंगनंतर पुन्हा डांबर टाकूण, बारीक खडी चक्री पद्धतीने टाकणे
भरलेले खड्डे फुगीर असणे असावेत
नागरिकांनी खड्डे भरण्याचे काम बंद न पाडता काम नियमानुसार होण्यासाठी आग्रह धरावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर पुन्हा चक्का जाम आंदोलन करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संप काळातील वेतनकपातीचा निर्णय तूर्त मागे घेतल्याने एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र वेतन निश्चिती करण्यासाठी नेमलेल्या समितीने समाधानकारक वेतनवाढ केली नसल्यास जानेवारी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस, इंटक आणि अन्य संघटना प्रतिनिधीच्या बैठकीत देण्यात आला. एसटीच्या विभागीय कार्यशाळेत ही बैठक झाली.

एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, ‘ऐन दिवाळीत संप पुकारलेल्या एसटी कामगार संघटनेच्या विरोधात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संपात सहभागी झालेल्या ५५०० हजार कर्मचाऱ्यांची पगार कपातीचे धोरण तूर्त मागे घेतले आहे. त्यामुळे त्या विरोधात केले जाणार आंदोलन मागे घेतले आहे. कर्मचाऱ्यांना कमी पगार असतानाही कपातीचा निर्णय अनेक कुटुंबाना उद्धवस्त करणारा ठरणार आहे. मात्र वेतन वाढीसाठी स्थापन केलेली समिती येत्या १५ नोव्हेंबरपर्यत अहवाल देणार आहे. २१ नोव्हेंबरला अंतरिम वेतनवाढ निश्चिती केली जाईल. समितीने केलेली वेतनवाढ समाधानकारक नसल्यास पुन्हा जानेवारीत आंदोलन केले जाणार आहे.’

यावेळी संघटनेचे सचिव वसंत पाटील, इंटकचे आप्पा साळोखे, दादू गोसावी, हेमंत काशीद आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीख पुलाखाली वाहनधारक बेजार

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील रहदारीचा मार्ग असलेल्या आणि मध्यवर्ती बसस्थानकांशी जोडणाऱ्या परीख पुलाखालील रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. पुलाकडील दोन्ही बाजूच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त बनले आहेत. शिवाय पुलाखालील दोन्ही बाजूच्या वळणावर वाहने घसरून किरकोळ अपघात घडत आहेत. शिवाय पुलाखालील ड्रेनेज लाइनही तुंबली आहे. जाळीखालील गटारीची साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याने दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे.

परीख पुलाखालील मार्गावरुन मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. मध्यवर्ती बस स्थानक परिसराला जोडणारा हा रस्ता आहे. साईक्स एक्स्टेंशन,शाहूपुरी, राजारामपुरीकडे जाणारी वाहतूक येथून होते. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, व्यापारी संकुल, भाजी मंडई असल्याने रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. रेल्वेलाइन परिसरातील हा रस्ता महापालिकेच्या दोन विभागीय कार्यालयात विभागला आहे. मध्यवर्ती बसस्थानककडील रस्ता छत्रपती ताराराणी विभागीय मार्केटच्या अखत्यारित तर परीख पुलाखालून शाहूपुरीकडे येणारा रस्ता हा राजारामपुरी मार्केट विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित आहे. दोन विभाग कार्यालयाच्या हद्दीत रस्ता विभागल्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. मात्र त्याचा फटका वाहनधारकांना बसत असल्याचे चित्र आहे. परीख पुलाखालील सांडपाण्याची निर्गत व्यवस्थित होत नाही. शिवाय पुलाखालील रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचत असल्याने सातत्याने रस्ता खराब होतो. परीख पुलाखालील दोन्ही बाजूचा रस्ता उखडलेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

महापालिकेने काही ठिकाणी खडी टाकत तात्पुरत्या स्वरुपात पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. पुलाखालील ड्रेनेजची साफसफाई झाली नसल्याने लाइन तुंबली आहे. ड्रेनेजलाइन तुंबल्याने शाहूपुरीकडून पुलाखालून जाणाऱ्या मार्गावर सांडपाणी पसरत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. जेट मशिनचा अवलंब करुन ड्रेनेज लाइनजी दुरुस्ती झाली तर सांडपाण्याचा निचरा होईल. पण आरोग्य विभागाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. दोन्ही बाजूकडील जाळीखालील गटारीची साफसफाई केली नाही. महापालिकेने रस्त्यांची तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी न करता डांबरीकरण करावे यासाठी नागरिकांनी विभागीय कार्यालयाकडे निवेदने दिली आहेत. नगरसेवकांचेही लक्ष वेधले आहे.

परीख पुलाखालून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. दिवसभर हा रस्ता वर्दळीचा आहे. शिवाय रेल्वेचे आगमन व सुटताना मोठ्या संख्येने वाहनधारक प्रवास करत असताना हा रस्ता सुस्थितीत ठेवण्याचे प्रशासनाला सुचत नाही. पुलाखालील दोन्ही बाजूच्या वळणावर खड्डे असल्याने किरकोळ अपघात घडतात. नागरिकांनी तक्रार करुनही रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. गटारीची साफसफाई गरजेची आहे.

संदीप पाटील, वाहनधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओपन बारवर बडगा

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील उद्याने, शाळांची मैदाने, क्रीडांगणे आणि रिंगरोडचे फूटपाथही रात्रीच्या अंधारात तळीरामांच्या ताब्यात असतात. मोकळ्या हवेत मद्यप्राशन करण्याची कथित फॅशन सध्या शहरात रुजली आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी ओपन बार तयार झाले आहेत. ज्यांच्या नावाने शहराची जगभर ओळख आहे त्या राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचीही मद्यपींकडून विटंबना होते हे धक्कादायक आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शहरातील ओपन बारची वस्तुस्थिती दाखवल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिस यंत्रणेने ओपन बारवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई सातत्याने सुरू राहिल्यास ओपन बार मोडीत निघणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यास कायदेशीर मनाई आहे. याकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपींनी आक्रमण केले आहे. कोणताही विधिनिषेध न बाळगता शाळा आणि मंदिरांच्या परिसरातही तळीरामांचे अड्डे तयार झाले आहेत. फूटपाथवर रिकाम्या बाटल्या आणि ग्लासचा खच पडलेला असतो. राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांचीही तळीरामांनी विटंबना केली आहे. स्मारक परिसरात हमखास मद्याच्या रिकाम्या बाटल्या सापडतात. मैदानांवर रात्री उशिरापर्यंत तळीरामांच्या पार्ट्या सुरू असतात. काचेच्या बाटल्या मैदानातच फोडून टाकल्याने खेळाडूंना खेळणेही धोकादायक बनले आहे. खेळाडू जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शहरातील काही उद्यानांवरही तळीरामांनी आक्रमण केले आहे. रंकाळा उद्यानात रात्रीच्या पार्ट्या रंगतात. शिवाय पंचगंगा नदीघाट, पिकनिक पॉइंट हे तळीरामांचे नेहमीचे अड्डे आहेत. या प्रकारांमुळे अलिकडे ओपन बार संस्कृती वाढली आहे. महाराष्ट्र टाइम्सने ओपन बारची वस्तुस्थिती दाखवल्यानंतर पोलिसांकडून यावर कारवाईला सुरुवात झाली आहे.

महापालिका प्रशासनाने ओपन बार वाढलेल्या ठिकाणांची यादी पोलिसांकडे देऊन कारवाईची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी शहरातील २२ ठिकाणांची यादी तयार केली आहे. सोमवारपासून ओपन बारवर कारवाईचे सत्र सरू झाले आहे. पहिल्या दोन दिवसांत पोलिसांनी गांधी मैदान, दुधाळी मैदान, आयसोलेशन हॉस्पिटल परिसर आणि पंचगंगा नदीवरील पिकनिक पॉइंट या ठिकाणांवर कारवाई केली आहे. यात पोलिसांनी तीसहून अधिक तळीरामांवर कारवाई केली आहे. कोर्टात खटले दाखल करून त्यांना कोर्टामार्फत नोटीस पाठवली जाणार आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे, मात्र केवळ दोन-चार दिवस कारवाईचा फार्स करून पोलिसांनी थांबू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवले तरच तळीरामांना धाक बसणार आहे. अन्यथा ‘येरे माझ्या मागल्या’, या म्हणीप्रमाणे कारवाई थांबताच पुन्हा सार्वजनिक ठिकाणांवर तळीरामांचे आक्रमण वाढणार आहे.


कळंब्यात म्हशींच्या गोठ्यात तळीरामांचा अड्डा

कळंबा तलावात म्हशी धुऊन पाण्याचे प्रदूषण होऊ नये, यासाठी काही अंतरावर पत्र्याचे मोठे शेड तयार केले आहे. या शेडमध्ये म्हशी धुण्याची व्यवस्था केली आहे, पण यात कधीच म्हशी धुतल्या जात नाहीत. तळीरामांनी शेडचा ताबा घेतला असून, रोज रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी तळीरामांच्या पार्ट्या रंगतात. परिसरात मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि ग्लासचा कचरा वाढत आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही यावर कारवाई झालेली नाही.

येथे चालतात ओपन बार

पंचगंगा नदीघाट, स्माशन घाट, पिकनिक पॉइंट, दसरा चौक, कसबा बावडा पॅव्हेलियन, राजाराम बंधारा, तावडे हॉटेल परिसर, टेंबलाई टेकडी, कृषी महाविद्यालयाच्या समोरचे फुटपाथ, राजाराम तलाव परिसर, शेंडा पार्क, हॉकी स्टेडियम, आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, एनसीसी ऑफिस ते संभाजीनगर रिंगरोड, तपोवन मैदान, गिरगाव घाट, चित्रनगरी, पुईखडी, आदी परिसरात ओपन बार सुरू असतात.

दोषी आढळल्यास कठोर शिक्षा

सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यप्राशन करणे आणि सोबत मद्य बळगणे कायद्याने गुन्हा आहे. असे कृत्य करताना पोलिसांना सापडल्यास दोषींवर मुंबई दारुबंदी अधिनियमानुसार कारवाई केली जात आहे. या गुन्ह्यात दोषींना ३ ते ५ वर्षे कारावास आणि किमान ५ हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ केएमटी चालक बडतर्फ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलेल्या चालकांमुळे दुपारनंतर केएमटीच्या ४० बसेस बंद राहिल्याने प्रशासनाने कायम, रोजंदारी, ठोक मानधनावरील तब्बल ९५ चालकांवर बुधवारी कारवाई केली. त्यामध्ये २५ ठोक मानधनावरील चालकांना थेट काढून टाकण्यात आले असून १५ चालकांना महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तर दहा कायमस्वरुपी चालकांचे पाच दिवसांचे आणि ४५ रोजंदारी चालकांचे तीन दिवसांचे वेतन कापण्यात आले आहे. केएमटीच्या ​इतिहासात प्रथमच इतक्या चालकांवर अशी कारवाई करण्यात आली आ‌हे.

गेल्या महिन्यात केएमटीच्या झालेल्या अपघातानंतर केएमटी प्रशासनाने कारभारात सुधारणा करण्यासाठी कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. चालक तसेच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून यामध्ये चालकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. त्याचबरोबर सध्या उत्पन्न मिळवण्याचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त बस मार्गावर धावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ही परिस्थिती असताना बुधवारी ९५ चालक पूर्वसूचना न देता गैरहजर राहिले. या गैरहजेरीमुळे दुपारनंतरच्या सत्रातील ४० बसेस ठिकठिकाणच्या नियंत्रण केंद्रावर थांबून राहिल्या. यामुळे बससेवा विस्कळीत झाली. त्याचा उत्पन्नावरही परिणाम झाला.

हा प्रकार केएमटी प्रशासनाने गांभीर्याने घेऊन अशा चालकांची सायंकाळी यादी निश्चित करुन कडक कारवाई केली. त्यात दहा कायमस्वरुपी चालकांचे पाच दिवसांचे वेतन कापून घेण्याचे आदेश दिले आहेत. ४५ रोजंदारी तत्त्वावरील चालकांचे तीन दिवसांचे वेतन कापण्यात आले आहे. कायम आणि रोजंदारी अशा ५५ चालकांवर कारवाई झाल्याने कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली. ठोक मानधनावरील चालक तर त्यांना वेळ मिळेल तेव्हा येत असल्याची परिस्थिती आहे. त्यांना शिस्त लावण्यासाठी ४० चालकांवर कारवाई केली. २५ चालकांना यादीवरुनच काढून टाकले आहे. त्यामुळे भविष्यात त्यांनी पुन्हा केएमटीत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अटकाव केला जाणार असल्याचे समजते. ठोक मानधनावरील १५ चालकांना वर्तन सुधारण्यासाठी महिन्याचा अवधी दिला आहे. अन्यथा त्यांचीही नावे यादीतून काढून टाकली जाणार आहेत. या सर्व कारवाईचे आदेश तातडीने लागू केले असून कारवाई केलेल्या चालकांची यादी नियंत्रण कक्षात लावली आहे.

००००००००००००००००००००


केएमटी प्रशासनाने गुरुवारपासूनचे वेळापत्रकाचे नियोजन केले आहे. ठोक मानधनावरील चालकांना काढून टाकल्यानंतर ​केएमटीची गरज पूर्ण होण्यासाठी त्यांच्या जागी नवीन चालक नेमण्यात येतील, पण शिस्त बिघडण्याचे प्रकार बंद केले जातील.

संजय भोसले, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक

......

६० दिवसांत दहा दिवसांचीच हजेरी

ठोक मानधनावरील चालक म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. हे चालक मनमानी पद्धतीने कामावर येत असतात. ते गैरहजर राहिल्याने वेळापत्रक कोलमडून अनेकदा बसेस बंद ठेवण्याची नामुष्की केएमटीवर येत असते. सध्या काढून टाकलेल्या २५ चालकांनी ६० दिवसांत केवळ दहा दिवसांची हजेरी भरली आहे. त्यामुळे केएमटीला कडक कारवाई करणे भाग पडले आहे. ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक चालक ऊसाच्या वाहनांवर जात असतात. हंगाम संपल्यानंतर परत केएमटीकडे येतात. ही पद्धत बंद करण्यासाठी कारवाई केली आहे.

....

चालकांची संख्या

कायमस्वरुपी २०८

रोजंदारी ७९

ठोक मानधन ७३

०००००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीची व्याप्ती वाढली, डॉक्टर्स दोन दिवसांत तक्रार दाखल करणार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जादा रिटर्न देण्याच्या आमिषाने जिल्ह्यातील शंभर डॉक्टरांना शेअर बाजारातील गुंतवणुकीत सुमारे चार कोटींना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याच्या वृत्ताने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. फसवणूक झालेले डॉक्टर एकत्रित आले असून, दोन दिवसांत त्यासंदर्भात पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे लेखी तक्रार देणार असल्याचे सांगण्यात आले. जादा पैशाच्या आमिषाने डॉक्टरांसह वीस वकील आणि इंजिनीअर्सचही फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्या डॉक्टरांनी स्थापन केलेल्या समिती समन्वयकांकडे तक्रारी एकत्र करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

‘गुंतवणूकदार देवदूत,’ मानणाऱ्या एका कंपनीच्या सबब्रोकरनेच अनेकांना हा गंडा घातला आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये या फसवणुकीचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाल्यानंतर फसवणूक झालेल्या डॉक्टरांनी एकत्रित बैठक घेतली. सबब्रोकरने केलेल्या फसवणुकीचा पाढाच अनेकांनी या बैठकीत वाचला. त्यासह पन्हाळा तालुक्यातील सुमारे वीस वकिलांचीही या सबब्रोकरने फसवणूक केली आहे. मंगळवार पेठेतील एका कुटुंबाची सुमारे वीस लाखांची फसवणूक केली आहे. या कुटुंबीयांनी डॉक्टरांनी एकत्रित केलेल्या समितीच्या समन्वयकांशी संपर्क साधला. डॉक्टरांसह फसवणूक झालेले गुंतवणूकदार येत्या दोन दिवसांत पोलिसांची भेट घेणार आहेत. त्यासह सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) काही अधिकाऱ्यांना दिवसभरात संपर्क साधण्यात आला. मुंबईच्या इन्व्हेस्टर्स ग्रेव्हॅन्सीस फोरमकडे काही गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गायीच्या दूध दरकपातीस विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) गायीच्या दूध खरेदीदरात कपात करू नये अशी मागणी शुक्रवारी (ता. ३ नोव्हेंबर) दुपारी ११ वाजता गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्याकडे निवेदनाने करण्यात येणार आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या आदेशानुसार खरेदीदरात केलेली वाढ पुन्हा कमी करु नये, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. दरम्यान, गोकुळच्या सभेबाबत विभागीय उपनिबंधकांनी दिलेल्या अहवालाविरोधात पुढील

आठवड्यात सहकार व हायकोर्टात दाद मागण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी संपानंतर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गाय व म्हैस खरेदी दूधदरात अनुक्रमे दोन व तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या निर्णयानंतर दोन आठवड्यांनी संघांनी याची अंमलबजावणी केली. निर्णयानुसार उत्पादकांना जेमतेम दोन महिने वाढीव दर मिळाला. मात्र बुधवारपासून गोकुळने गायीच्या खरेदीदरात पुन्हा दोन रुपयाने कपातीचा निर्णय घेतला. या निर्णयाने उत्पादकांचे नुकसान होणार असल्याने दर कपातीचा निर्णय मागे घ्यावा या मागणीचे निवेदन शुक्रवारी काँग्रेसचे आमदार पाटील शिष्टमंडळाच्यावतीने दिले जाणार आहे. निवेदन स्वीकारण्यास चेअरमन पाटील यांनी स्वत: उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, गोकुळच्या सभेबाबत विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिलेला अहवाल माहिती अधिकार प्राप्त केला असून अहवाल आणि गोकुळ सभा बेकायदेशीर ठरवून संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी पुढील आठवड्यात सहकार व हाय कोर्टात जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र बॅँकेचे ७० लाख लुटले

$
0
0

पंढरपूर ः सांगोल्याहून पंढरपूरकडे बॅँक ऑफ महाराष्ट्रचे सत्तर लाख रुपये घेऊन निघालेली गाडी बुधवारी चार चोरट्यांनी लुटली. या गाडीसमोर चोरट्यांनी आणखी एक गाडी आडवी लावली. बँकेच्या गाडीची काच फोडली. गाडीतील दोघांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि रक्कम लंपास केली. घटनेनंतर पोलिसांनी जिल्ह्यात नाकेबंदी केली आहे. संपूर्ण जिल्हाभर तपास सुरू केला आहे. बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या सांगोला शाखेचे व्यवस्थापक अमोल भोसले आपल्या खासगी गाडीतून रोख ७० लाख रुपये घेऊन पंढरपूरकडे निघाले असता ही घटना घडली. या वाहनाबरोबर एकही सुरक्षारक्षक नव्हता. याची माहिती चोरट्यांना असावी, यामुळेच चोरटे सांगोला-पंढरपूर रस्त्यावर दबा धरून बसले होते. गाडीतील लोकांच्या डोळ्यात चटणी टाकून ही धाडसी चोरी करून वाहनातून या चोरट्यांनी ७० लाख रुपये घेऊन पोबारा केला. बॅँकेची एवढी मोठी रक्कम खासगी वाहनातून सुरक्षारक्षकाशिवाय कशी नेली जात होती, असा प्रश्न या घटनेने उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसदरप्रश्नी आज मुंबईत बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एफआरपीवरून शेतकरी संघटना आणि कारखानदारांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी (ता.२) मुंबईत बैठक बोलवली आहे. दुपारी १२ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. बैठकीला राज्य साखर संघ, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. त्यामुळे या बैठकीकडे ऊस उत्पादक व कारखानदारांचेही लक्ष लागले आहे.

राज्यात बुधवारपासून गळीत हंगामाला सुरुवात झाली. मात्र पहिल्या उचलीवरुन शेतकरी संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक ठिकाणी ऊस तोडणी बंद पाडण्यात आल्या. तसेच ऊस वाहतुकीची वाहनेही रोखण्यात आली. तसेच काही ठिकाणी आक्रमक आंदोलनेही होत आहेत. पुन्हा तोड आणि वाहतूक केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे संघटनांचे प्रतिनिधी आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाला आहे. राज्यमंत्री खोत यांच्या संघटनेने एफआरपी अधिक ३०० रुपये तर खासदार शेट्टी यांच्या संघटनेने टनाला पहिली उचल ३४०० रुपये देण्याची मागणी केली आहे. मात्र बाजारातील साखरेचे दर कायम राहतीलच, अशी हमी नसल्याने कारखानदारांनी केवळ एफआरपी देण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

राज्य सरकारने एफआरपीमध्ये ३०० रुपयांची वाढ केलेली असल्यामुळे आंदोलनाची आवश्यकता नसल्याचे सुरुवातीला स्पष्ट केले होते, पण एफआरपीवरुन संघटना व कारखानदारांत संघर्ष निर्माण झाल्याने अखेर सरकारला तोडगा काढण्यासाठी बैठक बोलवावी लागली. बैठकीला सहकार सचिव, साखर आयुक्तही उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासिंगसाठी कराडला हेलपाटे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अवजड वाहनांच्या ब्रेक टेस्टसाठी ट्रॅकच उपलब्ध नसल्याने दोन्ही जिल्ह्यांतील वाहनधारकांना कराड येथे हेलपाटे मारावे लागणार आहेत. परिवहन वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र सरकारी मालकीच्या जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घ्यावी. कोणत्याही खाजगी जागेत किंवा सार्वजनिक रस्त्यांवर घेण्यास मनाईचा आदेश परिवहन आयुक्तांनी काढला आहे. असा ट्रॅकच कोल्हापुरात उपलब्ध नाही. त्यामुळे ट्रॅक तयार होईपर्यत किमान आठवडाभर वाहनधारकांना साठ किलोमीटर लांब कराडची वारी करावी लागणार आहे.

परिवहन वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठीची ब्रेक टेस्ट सरकारी मालकीच्या जमिनीवरील ट्रॅकवर घ्यावी. कोणत्याही खाजगी जागेत किंवा सार्वजनिक रस्त्यांवर घेण्यास मनाई आहे, असा आदेश परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालयांना काढला. यात कोल्हापूर आणि सांगलीत परिवहन विभागात सरकारी मालकीचा ट्रॅकच उपलब्ध नाही. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अवजड वाहनांची संख्या एक लाख आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात ४० हजारांवर वाहने आहेत. आरटीओ कार्यालयाने १ नोव्हेंबरपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पासिंग होणार नसल्याचे जाहीर केले. त्याचा मोठा फटका वाहनधारकांना बसणार आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत वाहनांचे पासिंग आणि फिटनेस सर्टिफिकेट मिळणार नाही. त्यामुळे वाहनधारकांना कराड येथील पाटण रोडवरील आरटीओ कार्यालय गाठावे लागणार आहे. तेथे परिवहन संवर्गातील वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणी कराड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत होईल.

दरम्यान कराड यएथे योग्यता प्रमाणपत्र तपासणीच्या कामाची सुरुवात २ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ४ आणि ५ नोव्हेंबर या सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरु राहणार आहे. जिल्ह्यातील सुमारे वीसहून अधिक वाहनधारकांनी आठवडाभरापूर्वी योग्यता प्रमाणपत्रासाठी तपासणीची तारीख घेतली आहे. या वाहनधारकांना तपासणीसाठी कराड येथे हेलपाटा मारावा लागणार आहे. कराड येथे तपासणीसाठी कोल्हापुरातील मोटार वाहन निरीक्षकाची नेमणूक करावी लागणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील मोटार वाहन निरीक्षकांचे कामकाजही कोलमडणार आहे.


पासिंगची तातडीने व्यवस्था करा

कोल्हापुरात ब्रेक टेस्टिंग ट्रॅक नसल्याने चारचाकी ट्रक, टेम्पो, लॉरी, टँकर, बसेस, प्रवासी वाहनांचे पासिंग रखडले आहे. बुधवारपासूनच पासिंग बंद केल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. मुदत देऊनही या कार्यालयाने ब्रेक टेस्टिंग ट्रॅक उपलब्ध करुन दिलेला नाही. मोरेवाडी येथील १५ गुंठे जागेत ट्रॅक करणे अपेक्षित होते. पासिंग न झालेल्या वाहनाचा अपघात झाल्यास विम्याची रक्कमही मिळणार नाही. कराड येथे जाऊन पासिंग करणे अशक्य आहे. खर्चिक आणि मानसिक त्रास देण्याचा हा प्रकार आहे, या आशयाचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने आरटीओला दिले. शिष्टमंडळात सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, गिरीश फोंडे, दिलदार मुजावर, प्रशांत आंबी, कृष्णा पानसे, विशाल जाधव आदींचा समावेश होता.


पासिंगसाठी हेलपाटे

दरम्यान कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील वाहनांचे पासिंग कल्याण, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, मालेगाव, नंदूरबार, सोलापूर, बुलढाणा, नांदेड, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर (ग्रामीण), अकोला व यवतमाळ या ठिकाणी घेऊन जावीत, असा आदेश दिला आहे.मात्र कोल्हापूरला कराड सोयीचे ठरेल, असे आरटीओ कार्यालयाने सांगितले.

कराड येथे जाण्यासाठी वाहनधारकांना नोंदणीची व्यवस्था कोल्हापुरात केली आहे. या ठिकाणाहून पासिंगसाठी जादा मोटार निरीक्षक पाठविले जाणार आहेत. फिटनेससाठी वाहनधारकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. आठवडाभरात मोरेवाडीसह, संभाजीनगर बसस्थानक, कागल येथील नवीन चेकपोस्ट नाका येथे ब्रेक टेस्ट ट्रॅकची मागणी केली आहे.

- डॉ. डी. टी. पवार, आरटीओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस असल्याचे भासवून महिलेचे दागिने लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सानेगुरुजी वसाहत परिसरात मुख्य रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या महिलेस पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी लुबाडले. संध्या साताप्पा चौगुले (वय ४०, रा. सानेगुरुजी वसाहत) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, दोन अज्ञात चोरट्यांनी चौगुले यांच्याकडील साडेसहा तोळ्यांच्या पाटल्या आणि बिलवर लंपास केले. मंगळवारी (ता. ३१) एकाच दिवसात शहरात दोन ठिकाणी लुटीची घटना घडल्याने चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

पोलिसांनी सांगितले की, संध्या चौगुले या सानेगुरुजी वसाहत परिसरात राहतात. याच परिसरात त्यांचे माहेर आहे. मंगळवारी दुपारी त्या माहेरी गेल्या होत्या. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्या राधानगरी रोडवरून पायी घरी निघाल्या होत्या. केदारलिंग बेकरीसमोर पोहोचल्या असता, रस्त्याकडेला उभा असलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवले. ‘मी साध्या वेशातील पोलिस आहे. अंगावर दागिने घालून कशाला फिरता? समोर आमचे साहेब तपासणी करीत आहेत. अंगावरचे दागिने काढून हातात घ्या,’ असे सांगितले. चौगुले यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून दोन्ही हातातील पाटल्या आणि बिलवर काढून उजव्या हातात घेतले. त्यावेळी पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तरुणाने चौगुले यांच्या हातातील दागिने हिसडा मारून काढून घेतले. दोन्ही तरुणांनी दुचाकीवरून राधानगरीच्या दिशेने पलायन केले. चौगुले यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी पळ काढला होता. चोरट्यांनी चौगुले यांच्याकडील दीड लाख रुपये किमतीचे साडेसहा तोळे दागिने लंपास केले. याबाबत बुधवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मंगळवारी शहरातील प्रतिभानगर परिसरात दोन तरुणांनी पोलिस असल्याची बतावणी करून एका वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास केले होते. काही वेळातच सानेगुरुजी परिसरात अशाच प्रकारे पोलिस असल्याचे भासवून चोरीचा प्रकार घडल्याने या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images