Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

किडनी दान करून बहिणीला जीवदान

$
0
0



प्रकाश कारंडे, कागल

बहीण-भावाच्या अतूट नात्याच्या कथा आपण खूप ऐकत असतो. हे नाते घट्ट करणारी आणखी एक घटना या दिवाळीच्या अगदी काही दिवस आधीच घडली. दोन्ही किडनी निकामी झालेल्या बहिणीला किडनी देऊन त्याने भाऊबीजेला आयुष्याची ओवाळणीच दिली. भडगाव (ता. कागल) येथील विक्रमसिंह पांडुरंग पाटील हे बहिणीसाठी देवदूतच म्हणूनच पुढे आले आणि अवयवदानाच्या चळवळीला कृतीतून पाठबळ देत बहीण-भावाच्या नात्याची वीण अधिकच घट्ट केली.

विक्रमसिंह यांच्या बहीण वैशाली आनंदा पाटील यांचा सरवडे (ता. राधानगरी) येथील आनंदा पाटील यांच्याशी विवाह झाला. वैशाली यांना मुलगा आणि मुलगी आहे. आनंदा यांना मुंबईतील खासगी दवाखान्यात पर्चेस मॅनेजर आहेत. दीड वर्षांपूर्वी वैशाली यांच्या प्रकृतीत सतत बिघाड होत गेल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या दोन्ही किडनी ५० टक्के निकामी झाल्याचे निदान झाले. आठवड्यातून तीन वेळा याप्रमाणे वर्षभर वैशाली यांना डायलेसिसवर रहावे लागले. गेल्या पाच महिन्यांपासून तर त्यांना दिवसाआड डायलेसिस करावे लागत असे. त्यातच वैशाली यांच्या जिविताला धोका वाढला. अशा कठीण परिस्थितीत भडगावच्या या पाटील कुटुंबीयांनी आपल्याच कुटुंबातील किडनी देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वैशाली यांची आई हिराबाई (वय-६२) व वडील पांडुरंग (वय-६७) यांच्या चाचण्या घेण्यात आल्या, परंतु त्यातील काही चाचण्या निगेटिव्ह आल्या.

त्यामुळे तीन बहिणीत एकटाच आणि कुटुंबातही एकच कर्ता असलेल्या विक्रमसिंह यांनी किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पत्नी वर्षा यांची साथही मोलाची ठरली. त्यामुळेच विक्रमसिंह यांचा निर्धार पक्का झाला. सर्व चाचण्या व प्रश्नांच्या अनेक फेरीनंतर डॉक्टरांनी किडनीरोपण करण्यास अनुकूलता दर्शवली. विशेष म्हणजे बहीणभावाचा रक्तगट एकच आला आणि तीन आठवड्यांपूर्वीच मुंबईत किडनीरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे वैशालीचा जीव वाचला. आता त्या सुखरुप आहेत. शिवाय किडनीदान करणाऱ्या विक्रमसिंह यांना फराळे कारखान्यातील फिल्डमनची नोकरी, घरची शेती आणि घरातील सर्वच कामे विनाअडचण व्यवस्थित करता येतील, असा विश्वास डॉक्टरांनी दिला. एका भावाने आपल्या बहिणीच्या जीवनात किडनी दान करुन आपले कर्तव्य कृतीतून बजावले आणि बहिणीचे आयुष्य वाढविले.

०००००००००००

बहिणीसाठी किडनी दान करताना किडनी निकामी झालेल्यांना भेटून प्रथम माहिती घेतली. माझ्या किडनीमुळे बहिणीचा जीव वाचला. यासारखे दुसरे समाधान नाही. किमान आपल्या रक्ताच्या नात्यात तरी कठीण प्रसंगात प्रत्येकाने पुढे आले पाहिजे.

विक्रमसिंह पाटील, भडगाव

००००००००००


आजच्या युगात मायेचा ओलावा कृत्रिम झाला असताना माझ्या भावाने किडनी देवून दिलेले जीवदानाचे ऋण कधीच फिटणार नाहीत. मला भाऊबीजेची मिळालेली ही ओवाळणीच आहे. भावाच्या रुपाने मला देवदूतच भेटला.

वैशाली पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस मुख्यालयात ओपन जिम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पोलिसांचे मनोबल आणि शारीरिक तंदुरुस्ती कायम राहणे आवश्यक आहे, यासाठी पोलिस मुख्यालयातील ओपन जिम उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय पोलिसांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून नोकरीच्या संधी साधता येतील,’ असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पोलिस मुख्यालयातील ओपन जिम आणि स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २०) पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, ‘कोणत्याही चांगल्या कामासाठी निधी कमी पडणार नाही. स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील पुस्तकांसाठी जिल्हा सर्वसाधारण योजनेतून साडेतीन लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. ज्यांच्या जिवावर समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित असते ते पोलिस व त्यांचे कुटुंबीय यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पोलिसांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या योजनांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘पोलिसांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला. लवकरच पोलिसांच्या मुलांसाठी सीबीएससी स्कूल आणि दोन पेट्रोल पंप सुरू होतील. यातून पोलिस वेलफेअरचे काम अधिक चांगल्या प्रकारे होईल.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते, उपअधीक्षक सतीश माने (गृह) उपस्थित होते. शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, केएसबीपीचे सुजय पित्रे, गांधीनगर पेालिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, आरएसपीचे राजू शिंदे यांचा पोलिस कल्याण निधीतून दर्जेदार कामे केल्याबद्दल पालकमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

======

१५ लाखांची ओपन जिम

पोलिस उद्यानाजवळच ओपन जिम तयार केली आहे. १५ लाख रुपये खर्च करून जिममध्ये अद्ययावत साधने उपलब्ध केली आहेत. शिवाय योगासाठी स्वतंत्र योगा लॉनही तयार केले आहे. अभ्यासिकेसाठी साडेसात लाखांचा निधी खर्च केला असून, स्वतंत्र लेक्चर्स हॉलचीही सुविधा केली आहे. तज्ज्ञांकडून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्या ५० हजारांची पुस्तके अभ्यासिकेत आहेत, तर जिल्हा सर्वसाधारण योजनेतून साडेतीन लाखांची पुस्तके लवकरच मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मणेराजुरीजवळ ट्रक उलटून १० ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

फरशीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात कर्नाटका‌तील दहा मजुरांचा फरशीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. अपघातात २२ जण जखमी झाले आहेत. एसटीचा संप असल्याने हे सर्वजण विजापूरहून फरशी घेऊन येणाऱ्या ट्रकमधून प्रवास करत होते. तासगाव तालुक्यातील मणेराजुरीजवळ शनिवारी पहाटे ही दुर्घटना घडली. भाऊबीजेच्या पहाटेच या मजुरांच्या कुटुंबीयांवर आघात झाला. अपघाताची नोंद तासगाव पोलिसांत झाली आहे.
श्रीमंतगौडा गोलालप्पा बिराजदार (वय ५५, रा. कमतेश्वर, ता. जेउरगी), संगव्वा सिध्द्दाप्पा कोगणूर (७०, मंगरूळ, ता. सिंदगी), निसारसाब बाशासाब अंकलगी (३७), चांदबी निसारसाब अंकलगी (१४, कम्मरुनबी निसारसाब अंकलगी (वय ३५, तिघेही रा. शानकुंडगी, ता. सिंदगी), सुरेश उर्फ बशीर राय्याप्पा राठोड (५०,रा. हत्तरगी, ता. इंडी), भिमशा संगाप्पा मनोर (५५), अण्णाप्पा भिमशा मनोर (३०), अक्काबाई भिमशा मनोर (५०, तिघेही रा. चांदकोळी, ता. सिंदगी), इराम्मा महादेव दंडगुले (वय ४०, रामतीर्थवाडी, जिल्हा बिदर) अशी मृतांची नावे आहेत.

२२ जखमींपैकी ११ जण गंभीर आहेत. त्यांना मिरजेच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ११ जखमींवर तासगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघात इतका भीषण होता की, फरशीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व मजूर दिवाळीनिमित्त कर्नाटकातील मूळ गावी गेले होते. ते कराड परिसरातील वीटभट्ट्यांवर काम करत. कर्नाटकातील सिंदगीसह जेटगी, मोटगी आणि विजापूर अशा चार ठिकाणचे हे मजूर आहेत. महाराष्ट्रात एसटीचा संप असल्याने या मजुरांनी फरशी घेऊन निघालेल्या ट्रकला हात केला. ट्रकचालक श्रीमंत सुभाषचंद्र तळवार (कुरनाली, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा) ने ट्रक फरशीने भरल्याचे कारण पुढे करत नकार दिला. परंतु मजुरांच्या विनंतीमुळे त्याने या सर्वांना घेतले.

काहींना केबीनमध्ये जागा मिळाली होती. विजापूरहून निघालेला हा ट्रक (एमएच ५०-४०१६) तासगावमार्गे कराडला जात होता. पहाटे दोनच्या सुमारास दाट धुक्यांमुळे योगेवाडी-मणेराजुरी दरम्यानच्या वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक उलटला. त्यामुळे फरशीवर बसलेले सर्व मजूर खाली कोसळले. त्यांच्यावर फरशांचा ढीग कोसळला. त्यात दहाहीजण चिरडून ठार झाले. जखमींमध्ये इंदुबाई शामराव निंबाळकर (३०, शहाबाद जि. गुलबर्गा), परशुराम यल्लप्पा पुजारी (२५, ताळेकुटी, जि. विजापूर), बसम्मा यलाप्पा पुजारी (४५, रा. पेरापूर, जि. बेळगाव), रुपेश शिवाजी राठोड ( २७, रा. मुनकोळ, जि. गुलबर्गा), संतोष महादेव मंजुळे (रा. शहाबाद, जि. गुलबर्गा), अशोक रेवाप्पा बिरादार (५०), लक्ष्मीबाई लक्ष्मण मादार (३०, रा. सिंदगी), लक्ष्मण प्रभू मादार (वय ४०, सिंदगी), बेबी समीरहुसेन शेख (४५, शहापूर), साहेबअण्णा महादप्पा ज्ञानमंत (६५ रा. अंकलबा, जि. गुलबर्गा), नागाप्पा शामराव निंबाळकर (८, शहाबाद ) आदींचा समावेश आहे. त्यांना मिरजेच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाडवा खरेदीला कोटीचे तेज

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत शुक्रवार हा दिवस कोल्हापुरातील बाजारपेठेत खरेदीची पर्वणी देणारा ठरला. दुचाकी, चारचाकी वाहनांसह सोने, इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तू, गॅझेट्स आणि ​​​रिअल इस्टेट मार्केटमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानलेल्या या शुभदिवशी गॅस शेगडीपासून ते आलिशान गाड्यांपर्यंतची खरेदी झाली. सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीची पर्वणी सुरू होती. शहरातील डीलर्सकडूनही ग्राहकांसाठी खास आकषक सवलतींसह विविध एक्सेंज ऑफर्स देण्यात आल्यामुळे खरेदीला उधाण आले. पाडव्यानिमित्त खरेदीला कोट्यवधींच्या उलाढालीचे तेज आले.

स्पोर्टस बाइक, बुलेटला पसंती

स्पोर्टस बाइक, बुलेट खरेदीतही दिवाळी पाडव्याच्या मुहूर्ताने कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. पाडव्यादिवशी दुचाकींची विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. सहा हजारांहून अधिक दुचाकींची विक्री झाली असून यामध्ये बाइक, मोपेड आणि स्पोर्टस बाइकच्या खरेदीला जास्त मागणी होती. तरूणाईची मागणी बुलेट आणि स्पोर्टस बाइकला असून, दीडशे सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाइक खरेदी करण्याकडेही तरुणाईचाच कल होता. दसऱ्यानंतर बाइकच्या बुकिंगसाठी गर्दी वाढली होती. पाडव्याच्या निमित्ताने बुकिंगची डिलिव्हरी घेण्यासाठी सकाळपासूनच शोरूम्सचा आवार गजबजून गेला होता. लोन सुविधेसाठी अनेक शोरूम्समध्ये ग्राहकांसाठी खास कक्ष ठेवण्यात आला होता. तसेच पाडव्यानिमित्त एक्सेंज ऑफरसह कमीत कमी डाउनपेमेंट या सुविधेला ग्राहकांकडून अधिकाधिक प्रतिसाद मिळाल्यामुळे दुचाकी मार्केटमध्ये खरेदीचा पाडवा साजरा झाला. नोकरदार महिला, युवती आणि गृहिणींनीही यावर्षी मोपेड खरेदीसाठी दुचाकी मार्केटकडे मोर्चा वळवल्याचे चित्र होते.

सोने खरेदीने गुजरी लखलखली

पाडव्यादिवशी गुंजभर सोन्यापासून ते वजनदार दागिन्यांच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीने शहरातील गुजरीसह सराफ बाजारपेठ फुलून गेली. लग्नाच्या दा​गिन्यांच्या खरेदीलाही अनेकांनी पाडव्याच्या मुहूर्तालाच पसंती दिल्यामुळे गुजरी सोने खरेदीने लखलखली. दोन लाखांपर्यंत रोख व्यवहार करण्यासाठी परवानगी असल्यामुळे सोने खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली. पंधरा दिवसांपूर्वीच दसऱ्याचा मुहूर्त साधत झालेल्या खरेदीच्या उत्साहाचे पुढचे पर्व दिवाळीच्या पाडव्यानिमित्ताने दिसून आले. चांदीच्या वस्तूंचीही खरेदी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात झाली.

साडेसातशे कारचे बुकिंग

कोल्हापुरात दिवाळी पाडव्यासाठी जवळपास सातशे ते साडेसातशे ग्राहकांनी कार बुकिंग केले होते. पाडव्यादिवशी कार घरी नेण्यासाठी ग्राहकांनी शोरूममध्ये गर्दी केली. कागदपत्रांची पूर्तता करून पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांच्या दारात गाडी आणण्याचे स्वप्न साकार झाले. यामध्ये अडीच ते तीन लाख रुपये किमतीच्या कार लोनसुविधेवर खरेदी झाल्या असून, पाच ते आठ लाख आ​णि त्याहून जास्त किमतीच्या कार मात्र रोख खरेदी करण्यात आल्या आहेत. यूथमध्ये असलेली स्पोर्टस कारची क्रेझ दिवाळी पाडव्यादिवशी खरेदीच्या माध्यमातून दिसून आली. तसेच चारचाकीमध्ये सेकंड हँड कार व मोटरचीही पाडव्यानिमित्ताने चांगली विक्री झाली. प्री ओन कार खरेदी मार्केटमध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाली.

इलेक्ट्रॉनक मार्केट गजबजले

दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सणांच्या ​गिफ्ट खरेदीसाठी शहरातील स्मार्ट इलेक्ट्रॉनिक मार्केट गर्दीने गजबजले. स्मार्टफोन खरेदीमध्ये दसऱ्यात झालेल्या खरेदीपेक्षा चाळीस टक्के वाढ झाल्याचे काही वितरकांनी सांगितले. बाजारपेठेत स्मार्टफोन खरेदीकडेच ग्राहकांचा ओढा असल्याचे दिसून आला. आय फोन्ससह स्मार्ट फोनची नवी रेंजही बाजारपेठेत आली असून, ऑनलाइन मार्केटच्या स्पर्धेला इलेक्ट्रॉनिक डीलर्सनी जोरदार टक्कर दिली. अगदी २२५० पासून ७४ हजारांपर्यंतचे हँडसेट बाजारात मोठ्या प्रमाणात विकले गेले. बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून अर्थपुरवठा होत असल्याने महागातील महाग मोबाइलही खरेदी करण्याची संधी सामान्य ग्राहकांना पाडव्यादिवशी घेता आली. लॅपटॉप, कम्प्युटर, टॅब, पॉवर बँक, होम थिएटर, एलइडी टीव्ही या वस्तूंच्या खरेदीला अधिक मागणी असल्याचे दिसून आले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये सर्वाधिक मागणी होती ती एलइडी स्क्रीन टीव्हीला. इलेक्ट्रॉनिक मॉल्सच्या दारात मांडव घालूनच ही विक्री सुरू होती. गेल्या आठवड्यापासून वस्तू पाहण्यासाठी ग्राहकांची रीघ लागली होती. विशेषतः एक्सेंज ऑफरला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद असल्यामुळे ग्राहकांकडून येणाऱ्या जुन्या वस्तू ठेवण्यासाठी डीलर्सनी वेगळी व्यवस्था केली होती.

यंदा ग्राहक अपग्रेड झाला असून, फोर-जी सपोर्टेड डिव्हाइसला यंदा खूप मागणी होती. तसेच आयफोन आणि अधिकाधिक फीचर्स असलेल्या फोनला मागणी वाढली आहे. टॅबचीही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली असून जास्त किमतीचे फोन घेण्यासाठी असलेल्या इएमआय सुविधेचा लाभ ग्राहकांनी घेतला.

विशाल रेवणेकर, मोबाईल डिलर

साडेतीन मुहूर्तांपैकी दिवाळी पाडवा एक असल्याने किमान एखादे सोन्याचे नाणे, वळे किंवा बिस्कीट खरेदी करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यासाठी सोमवारी शहरातील सर्वच सराफी पेढ्यांमध्ये गर्दी होती. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सोने खरेदीला चांगला प्रतिसाद होता. लग्नसराईच्या सोने-चांदी खरेदीचाही मुहूर्त अनेकांना पाडव्यादिवशी साधला.

अमित पावसकर, सराफ व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहिदांच्या कुटुंबीयांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अभिनयातील खिलाडी अक्षयकुमार याच्या खिलाडूवृत्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. अक्षयकुमारने १०३ शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी २५ हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश आणि मिठाई दिली. दिवाळीत हा मदतीचा हात मिळाल्याने शहीद पोलिस कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलिस प्रशासनाने परिक्षेत्रातील ३९ कुटुंबीयांना धनादेशांचे वाटप केले.

कायदा-सुव्यवस्थेसाठी ऑनड्युटी २४ तास कार्यरत राहणाऱ्या पोलिसांना अनेकदा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. कर्तव्य बजावताना पोलिसांना वीरमरण आल्याने कोणाचा पिता जातो, कोणाचा भाऊ जातो, तर कोणाचा पती जातो. व्यक्ती गेल्याचे दुःख कशानेच भरून निघत नाही; पण हे दुःख हलके करण्याचा प्रयत्न अभिनेता अक्षयकुमारने केला आहे. गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी ऑनड्युटी वीरमरण आलेल्या पोलिसांच्या मुलांना शिक्षणासाठी रोख रक्कम देण्याची कल्पना त्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे व्यक्त केली होती. यानुसार संपूर्ण राज्यातील १०३ पोलिसांची यादी मिळाल्यानंतर या सर्वच कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा निर्णय अक्षयकुमारने घेतला. शहीद पोलिसांच्या कुटुंबाला २५ हजार रुपये देण्याचे अक्षयकुमारने ठरवले. यासोबत त्याने स्वतःच्या सहीने एक भावनिक पत्रही पोलिसांच्या कुटुंबीयांना दिले आहे. या पत्राद्वारे त्याने शहीद पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्रातील ३९ शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना हा मदतीचा हात मिळाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयजी नांगरे-पाटील आणि पोलिस अधीक्षक मोहिते यांच्या उपस्थितीत शहीद पोलिसांच्या घरी जाऊन प्रातिनिधिक धनादेशांचे वाटप केले. कसबा बावडा येथील करवीर पोलिस ठाण्यातील दिलीप संकपाळ (वय ४९) यांचे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले होते. त्यांच्या घरी जाऊन पालकमंत्र्यांनी अक्षयकुमारने पाठविलेला धनादेश आणि मिठाई कुटुंबीयांना दिली. यावेळी दिलीप संकपाळ यांच्या पत्नी सुभद्रा, आई इंदुबाई, मुलगी श्वेता, आदी उपस्थित होते. कसबा बावड्यातील लाइन बाजार येथील सुरेश विठ्ठल जाधव (४४) यांचा कर्तव्यावर असताना अपघात झाला होता. उपचारादरम्यान हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याही घरी भेट देऊन पालकमंत्र्यांनी अक्षयकुमारकडून आलेला धनादेश व मिठाई दिली आणि त्याचे पत्रही वाचून दाखविले. यावेळी स्नेहल जाधव यांच्याशी अक्षयकुमारने स्वत: दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही कुटुंबीयांना यावेळी आपल्या भावना अनावर झाल्या होत्या.

अक्षयकुमारचे पत्र

आपल्या घरातील शूर शहीद वीराने देशासाठी दिलेले बलिदान सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपुत्राचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की, या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांचे सान्निध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल. आपल्यावर कोसळलेले दु:ख अपार आणि कठोर आहे. मात्र, यातून आपण सावरून धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई व त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, ही माझी नम्र विनंती. सदैव आपल्या ऋणात असणारा आपला अक्षयकुमार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाई संपतपराव पाटीलयांचे निधन

$
0
0

सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील अभ्यासू नेतृत्व, माजी आमदार, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई संपतराव मारुती ऊर्फ एस. एम. पाटील यांचे रविवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर किडनीच्या आजारावर पिंपरी-चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले, सुना नातवंडे, असा परिवार आहे. सायंकाळी माढा तालुक्यातील वरवडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाटील १९६७-७२ दरम्यान माढा येथून विधानसभेवर निवडून गेले होते. सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते. रयतच्या मध्य विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. एसटी महामंजळाचेही ते संचालक होते. त्यांनी १९४२च्या चलेजाव आंदोलनातही सहभाग घेतला होता. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर ते शेतकरी कामगार पक्षाकडे ओढले गेले अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षात सक्रिय राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकाऱ्यांकडून नगरसोविकांना नोटिसा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
नगरपालिकेतील नगरसेविकांचे नातेवाईक पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वाढता दबाव टाकून त्यांच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत. सदर बाब गंभीर असून, या बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधितांनी दबाव आणण्याचे त्वरित न थांबवल्यास त्या नगरसेविकांच्या अपात्रतेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येतील, अशा नोटिसाच मुख्याधिकारी यशवंत डांगे पालिकेतील महिला सदस्यांना बजावल्याने येथील शहरासह पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पालिकेतील नगरसेवकांच्या मनमानीला लगाम घालण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या अनेक मुख्याधिकार्यांनी केला. मात्र, नगरसेवकांनी आपल्या वर्तनात बदल न करता आपल्या राजकीय दबावाचा वापर करीत मुख्याधिकाऱ्यांचीच कशी उचलबांगडी करता येईल व आपली मनमानी अबाधित ठेवता येईल, यातच धन्यता मानली. या पूर्वीचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याबाबतही हाच प्रकार होवून त्यांची बदली करण्यात नगरसेवकांना यश आले होते. आता त्यानंतर आलेले मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनीही नगरसेवकांच्या मनमानीला लगाम लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. नगरसेविकांना पाठविलेल्या नोटिशीने ठिणगी पडली आहे. यापूर्वी तीन मुख्याधिकाऱ्यांशी नगरसेवकांचे पटत नव्हते, म्हणून त्यांच्या बदलीचे ठराव करून त्यांची राजकीय वजन वापरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता डांगेही नगरसेवकांच्या टार्गेटवर येण्याची चिन्हे आहेत. येथून बदली झालेले मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यानंतर आलेल्या यशवंत डांगे यांनीही नगरसेवकांच्या महत्वाच्या मुद्याला हात घालून थेट अपात्रततेचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा इशारा नोटीसांद्वारे दिला आहे. त्यामुळे पदाधिकारी विरूद्ध मुख्याधिकारी यांच्यात पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

पालिकेतील महिला सदस्यांचे नातेवाईक पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप करतात. त्यांच्यावर दबाव आणून कामे करुन घेतात. काही नातेवाईक, पदाधिकारी त्यांच्या दालनात बेकायदा बैठका घेत आहेत. या बाबतच्या तक्रारी यशवंत डांगे यांच्याकडे आल्या आहेत. त्यानुसार त्यांनी वरील नोटिसा काढल्या आहेत. यामध्ये नातेवाईकांचा हस्तक्षेप व दालनात बेकायदा बैठका घेतल्या जात आहेत, त्या बैठका घेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहेत, असा स्पष्ट उल्लेख केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदोलीतील पर्यटन सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

पर्यटकांसाठी एक जूनपासून बंद असणारे शिराळा तालुक्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यान १७ आक्टोंबरपासून सुरू करण्यात आले. सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या शिराळा पश्‍चिम विभागातील चांदोली अभयारण्याचे क्षेत्रफळ ३६७.१७ चौरस किलोमीटरचे आहे. अभयारण्यातील पर्यटन झोनमध्ये असणारे झोळंबीचे पठार झोळंबीचा सडा म्हणून ओळखले जाते. सध्या हा सडा निसर्गनिर्मित सोनकी, गवरी, स्मीतीया, गेंद, पांढरा गेंद (धनगरी फेटा), सिटीना, मंजिरी, निलीमा, कारवी, कुडरू, जेमसेन यासारख्या विविध जातींच्या फुलांनी बहरून गेला आहे.
निर्मनुष्य असणाऱ्या या अभयारण्यात दुर्मिळ औषधी वनस्पती, प्राणी, पक्षी, ऐतिहासिक ठिकाणे पाहावयास मिळतात. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या हिरव्यागर्द वनराईमुळे येथील निसर्गसौंदर्य अधिकच खुलून दिसते. पावसाळ्यात येथे पर्यटकांना पर्वणीच असते. डोंगररांगांतून धो-धो कोसळणारे धबधबे, हिरव्यागर्द वनराईने नटलेले डोंगर, दऱ्या व त्यातून कोसळणाऱ्या जलधारा अंगावर झेलण्याची मौजच न्यारी असते. धुवाँधार पाऊस अंगावर झेलून न्हाऊन गेलेली सृष्टी, श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ, मध्येच फुललेला कारवीचा ताटवा, विविध पशु-पक्षांचे आवाज व तनाळी, कंधारसारखे मोठमोठे धबधबे सुखद आनंद देतात.
परिसरात अनेक ऐतिहासिक व दुर्मिळ असणारी ठिकाणे आहेत. स्वच्छ हवामान, दुर्मिळ ऐतिहासिक ठिकाणे, भुरळ घालणारा निसर्ग, चांदोली धरणाचा प्रचंड जलाशय परिसर आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानातील डोंगराळ व खडकाळ रानात विविध जातींच्या फुलांच्या बहराने चांदोली राष्ट्रीय उद्यान अधिकच खुलून दिसत आहे.
वारणा पॉईंट, झोळंबीचा सडा, कंधारचा धबधबा, पाथरपुंज, माकड चौक, कोकणदर्शन, प्रचितगड, भैरवगड, कलावंतीणीची विहीर, अशी अनेक ऐतिहासिक व दुर्मिळ ठिकाणे परिसरात आहेत.
असे आहेत शुल्क
अभयारण्यात चारचाकी वाहनास १५0 रूपये प्रवेश शुल्क आहे. पुरुष व स्त्रियांसाठी ३0 रुपये, शालेय मुलांसाठी १0 रुपये, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २0 रुपये शुल्क, या शिवाय मार्गदर्शकासाठी ३00 रुपये शुल्काची आकारणी केली जाते. चांदोली धरणाजवळच्या वारणावती येथील कार्यालयातून प्रवेश पास घेऊन जाता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

ऐन दिवाळीत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्या असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या सुरू आहेत. शनिवारी मध्यरात्री राधानगरी तालुक्यातील आणाजे,आकनूरसह कौलव आणि भोगावती साखर कारखाना परिसरात चोरट्यानी दुकांनाची शटर उचकटून साहित्य लंपास केले. भोगावती परिसरातील चार ते पाच गावात दुकाने आणि दूध संस्थांच्या इमारतींतील रोख रक्कम आणि किमती ऐवज लंपास केला. या चोऱ्यांत दोन लाख रुपये रोख आणि किमती वस्तू अशी सुमारे तीन लाखांचे साहित्य लंपास केले. दरम्यान, हुपरीतील शांतीनगर परिसरातील कुंतीनाथ महावीर चंदान यांच्या घरी चोरट्यांनी साडेआठ तोळ्यांचे दागिने आणि रोख एक लाख १० हजार असा ऐवज लंपास केला.

भोगावती साखर कारखान्याच्या नव्या बाजारपेठेतील दुकान गळ्यातील अभिषेक इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून रोख रक्कम साठ हजार रुपये आणि दुकानातील किमती ऐवज लंपास केला. याच परिसरातील लुक्स गारमेंटचे शटर उचकटून दहा हजार रुपये आणि नव्या कापडाचे गठ्ठे पळविले. तर महालक्ष्मी टायरच्या शोरूमचे दरवाजे उघडून टायर पळवण्याचा प्रयत्न केला. शिवशंभो वॉच कंपनीतील सुमारे पाच हजार रुपये किमतीची घड्याळे चोरली. तर भोगावती कारखान्याच्या गाडी अड्ड्यासमोरील समृद्धी शॉपी फोडून रोख पंधरा हजार रुपये लंपास केले.

तसेच कौलव येथील विठ्ठलाई दूध संस्थेच्या इमारतीमधील रोकड लंपास केली. तर सदाशिव लोहार यांच्या गिरणीच्या शटरची मोडतोड केली. राधानगरी मार्गावरील आणाजे येथील कामधेनू दूध संस्था, महिला दूध संस्थांमधील पंचवीस हजारावरही चोरट्यांनी हात मारला. आकनूर येथील हनुमान दूध संस्था,चाळकेश्वर दूध संस्थांच्या इमारतीचे शटर उचकटून तेथे हाताला लागेल ‌तेवढी रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केला आहे. आकनूरमधील वैशाली पाटील यांच्या घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पाच हजार रुपये लंपास केले. सिरसेतील पवार दूध संस्थेच्या दहा हजारांवर हात मारला आहे. एकाच रात्रीत दहा पंधरा ठिकाणी चोरी केल्याने चोरट्यांची टोळी असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे

.........

एकच पद्धत ...

चोरांनी शनिवारी मध्यरात्री भोगावती परिसरात केलेल्या चोरीत प्रत्येक दुकान फोडण्याची एकच पद्धत वापरली आहे. शटरच्या मधल्या हूकला रोप बांधून तो चारचाकी गाडीने बाहेरील बाजूला ओढला आहे. यामुळे शटर बाहेरील बाजूला आलेले आहे. शटरची कुलपे तोडून प्रवेश करण्यापेक्षा ही पद्धत वापरून शटर उघडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश मिळवला आहे. रस्त्याशेजारील बहुतेक दुकान गाळे लक्ष्य केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातबारा सरकारनेच कोरा करावा

$
0
0

चंदगड

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी असल्याने जयसिंगपूरच्या ऊस परिषदेनंतर २० नोव्हेंबरला देशातील लाखो शेतकऱ्यांना

घेवून दिल्लीवर चाल करुन सरकारला जागे करणार आहे’, असे प्रतिपादन स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले. कुदनूर (ता. चंदगड) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शालन कांबळे होत्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर व जालंदर पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्रा. दिपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. खासदार शेट्टी म्हणाले, ‘ सरकारच्या शेतीक्षेत्रातील चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे देशभर कर्जमुक्ती यात्रा काढावी लागली.निवडणुकीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे मान्य केले होते. मात्र हा शब्द त्यांनी पाळला नाही. चौदा राज्यांचा दौरा करुन देशातील १८० संघटना एकत्र केल्याने शेतकऱ्यांची ताकद वाढली आहे. जयसिंगरपूरच्या ऊस परिषदेनंतर पुन्हा ओरिसा,

प. बंगाल व आसाम राज्याचे दौरे करुन शेतकऱ्यांना एकत्र करणार आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांच्यावर कर्ज वाढत गेले, सरकारनेच ते कमी करावे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर मोदींना लाल किल्यावर भाषण करु देणार नाही.’

जालंदर पाटील म्हणाले,‘ उसाचा बुडका हातात घेवून महाराष्ट्रातील शेतकरी एकत्र झाल्याने साखर कारखानदार जागे झाले आहेत. ऊसदराची मागणी केल्याशिवाय

कारखानदार दर देणार नाहीत.’ यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नूतन सरपंच, सदस्य यांचा सत्कार खासदार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती जगन्नाथ हुलजी, तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, शंकर आंबेवाडकर, राजु रेडेकर, विश्वनाथ पाटील, सरपंच राजू पाटील, तुकाराम ओऊळकर उपस्थित होते. नवनीत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

..............

चौकट

शेती कार्यालयाला टाळे ठोकणार

‘चंदगड तालुक्यातील हेमरस, इको केन व दौलत साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आहे. या कारखान्यांकडून ३०० रुपयांचा दुसरा हप्ता घेण्यासाठी लवकरच आंदोलन करु. मंगळवारी (ता.२४) कोवाड येथील हेमरसच्या शेती कार्यालयाला टाळे ठोकून त्याची सुरवात करणार

असल्याचे संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्याण्णावर यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्याविरोधातगुन्हे दाखल करणार

$
0
0

कोल्हापूर

‘सरसकट शेतकरी कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफीच फसवी असल्याचे पुढे आले आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सर्व जिल्हयात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील’, असे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यंदाच्या उसाला प्रतीटन साडेतीन हजार रुपये दर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पाटील म्हणाले, ‘सरकार कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केली. नियम, अटी लावून कमीत, कमी शेतकऱ्यांना लाभ मिळेल, याकडे लक्ष दिले आहे. गावागावांतील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात विविध संघटनांतर्फे गुन्हे दाखल करण्यात येईल. आमदार बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करून या फसव्या कर्जमाफी विरोधात तीव्र आंदोलनही छेडण्यात येणार आहे.ऊस उत्पादनाच्या खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांना यावर्षी साडेतीन हजार रुपये दर द्यावा लागेल. सध्याच्या साखरेच्या दरानुसार कारखान्यांना हा दर देणे शक्य आहे. ३० ऑक्टोबर रोजी पुणे येथील साखर आयुक्तालयावर सर्व संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यावेळी पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाकविरोधी कायदा करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मुस्लिम समाजातील महिलांना अन्यायकारक ठरणाऱ्या तोंडी तलाकला सुप्रीम कोर्टाने बंदी करण्याचा आदेश ऑगस्ट २०१७ मध्ये दिला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून याबाबत कठोर कायदा करून त्याची सक्षमपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा,’ अशी अपेक्षा इंडियन मुस्लिम फॉर सेक्युलर डेमॉक्रसी संस्थेचे अन्वर राजन यांनी व्यक्त केली.

मुस्लिम समाजप्रबोधन व शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पुरोगामी कार्यकर्ते हुसेन जमादार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘शहाबानो ते शायराबानो...तलाकचा निकाल : पुढे काय?’ या विषयावर आयोजित व्याख्यानात राजन बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य अल्पसंख्याक विकास विभागाचे माजी सहसचिव ऐनुल अत्तार होते.

राजन म्हणाले की, मुस्लिम समाजात तोंडी तलाक देण्याला मान्यता आहे. धर्मातील या निकषानुसार अनेक मुस्लिम महिलांना केवळ तीन वेळा तलाक हा शब्द उच्चारून घटस्फोट दिला जातो. आजपर्यंत अनेक मुस्लिम महिलांचे वैवाहिक आयुष्य यामुळे निराधार झाले आहे. अशाप्रकारे देण्यात येणारा घटस्फोट अन्यायकारक आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने ​दिलेला निर्णय मुस्लिम समाजातील महिलांना सन्मानाचे स्थान देणारा आहे. मात्र आता कायदा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. न्यायालयाने याबाबत निर्णय देताना सरकारला येत्या सहा महिन्यात कायदा करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यापैकी तीन महिने संपले असून उर्वरित तीन महिन्यात कायदा करण्याची कार्यवाही सुरू झाली पाहिजे.

शायरा बानो यांचा संदर्भ देत राजन म्हणाले की, मुस्लिम महिलांना देण्यात येणारा तोंडी तलाक घटनबाह्य आहे. यामुळे पुरूषी मानसिकता आणि त्यात महिलांची होणारी घुसमट दिसून येते. शायरा बानो या मुस्लिम महिलेने या प्रथेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने निर्णयही दिला आहे. त्यामुळे आता कायदा केला तरच भविष्यात मुस्लिम महिलांना न्याय मिळू शकेल.

प्रास्ताविक व स्वागत आय. एन. बेग यांनी केले. वशीर तांबोळी यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, सुचेता कोरगावकर, एम. बी. शेख, आयेशा जमादार, सुहेल जमादार, एम. ए. नाईक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील धरणे तुडूंब

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

Twitt:@satishgMT

कोल्हापूर : पर्जन्यछायेतील तालुके म्हणून ओळख असलेल्या शिरोळ, कागल तालुक्याला परतीच्या पावसाने अतिवृष्टी व ढगफुटीने दणका दिल्याने दोन्ही तालुक्यात सरासरीपेक्षा १६० टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर दुसरीकडे भरपूर पाऊस म्हणून ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के तर गगनबावडा तालुक्यात ४२ टक्के पाऊस कमी पडला आहे. जिल्ह्यात सरासरी ७८ टक्के पाऊस पडला असून चिकोत्रा वगळता जिल्ह्यातील १७ धरणे भरली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी सर्वात जास्त ५६२९.४० मिली मीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात पडतो. तर त्याच्या खालोखाल राधानगरी तालुक्यात ३५०१.६० मिली मीटर पावसाची नोंद अपेक्षित असते. जिल्ह्यात सर्वात कमी ३८५.३० मिली मीटर पाऊस शिरोळ तालुक्यात तर कागल तालुक्यात ६४९.६० मिली मीटर पाऊस पडतो. शिरोळच्या १४ पट पाऊस गगनबावडा तालुक्यात पडतो.

मान्सून यंदा सुरुवातील हुलकावणी दिली होती. पण परतीच्या पावसाने मात्र जिल्ह्याला झोडपले. एक ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात १५४५ मिली मीटर पाऊस पडला. त्यामध्ये सर्वात जास्त २४७ मिली मीटर पाऊस शिरोळ तालुक्यात पडला आहे. कागल तालुक्यात १४५ मिलीमीटर तर गगनबावडा तालुक्यात १८२ मिलीमीटर पाऊस पडला. परतीच्या पावसामुळे शिरोळ तालुक्यात सरासरी १६६.६६ टक्के जादा पावसाची नोंद झाली आहे. ६४२.१३ मिली मीटर पावसाची नोंद शिरोळ तालुक्यात झाली. अनेक गावात ढगफुटीसदृश पाऊस झाला. कागल तालुक्यात सरासरी ६४९.६० टक्के पावसाची नोंद अपेक्षित असते. पण यावेळी परतीच्या पावसामुळे १०६८ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसामुळे शिरोळ तालुक्यात भुईमूग, सोयाबीन पिकाला फटका बसला असला तरी हा पाऊस उसाला पोषक आहे. अतिवृष्टीमुळे आडसाली उसाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे ऊस भूईसपाट झाला आहे.

पावसामुळे आडसाली उसाच्या लावणीचे नुकसान झाले असून पुन्हा नव्याने लावण करावी लागणार आहे. गतवर्षी लावण केलेला ऊस जमिनीवर पडला आहे. माळावरच्या उसाला थोडा फायदा झाला असला तरी ९० टक्के ऊस पिकाला तोटा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेटीविना सेविकांची भाऊबीज

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर: अंगणवाडी सेविका, मदतनीसना सरकारकडून ‌दिवाळीत भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जाते. मात्र ‌यंदाची ‌भाऊ‌बीज या सेविकांना या ‌भेटीविनाच साजरी करावी लागली. परिणामी अंगणवाडी सेविकांची निराशा झाली. त्यामुळे दिवाळीत नाही तर आता शिमग्याला ही भाऊबीज भेट देणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

शहर, उपनगर, झोपडपट्टी, ग्रामीण भागातील गावे, वाड्या वस्त्यांवरील बालकांमधील कुपोषण कमी करणे, गरोदर, स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम अंणवाडी सेविका, मदतनीस करतात. अंगणवाड्यांतून हे काम चालते. त्या अंगणवाड्यांमध्ये दर्जेदार सेवा, सुविधा मिळाव्यात, मानधन वाढ मिळावी, इतर भत्ते मिळावी, यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस संघटनेच्या माध्यमातून दशकभरापासून प्रयत्न करीत आहे. अर्ज, निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आंदोलनाचे हत्यार उपसत राहिल्या. यामुळे काही प्रमाणात का असेना मागण्या सोडवून घेण्यात त्यांना यश आले.

दहा वर्षापूर्वी त्यांना बोनस ऐवजी दिवाळीत भाऊबीज भेट म्हणून एक हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. सुरुवातीच्या टप्यात दिवाळीच्या आधी भेटीची रक्कम मिळायची. मात्र अलिकडे ती वेळत मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात पगार, भाऊबीज भेटीच्या रकमेत वाढ करावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सेविकांनी एक आठवडा काम बंद आंदोलन केले. राज्यपातळीवर आंदोलन केल्याने सरकारने मानधनात आणि भाऊबीज भेटीत एक हजांची वाढ केली. त्यामुळे पूर्वीच्या भाऊबीज भेटीची एक हजारात आणखी एक हजारांची भर पडली. यावेळी दोन हजारांची भेट मिळणार, भाऊबीज गोड होणार या आनंदात सेविका होत्या.

दिवाळीच्या आधी त्या बँकेच्या आपल्या खात्यावर भेट जमा होईल, याची प्रतिक्षा आतुरतेने करीत होत्या. मात्र ‌भाऊबीज संपली तरी भेट खात्यावर जमा झाली नाही. निराश होत त्यांनी भाऊबीज साजरी केली. पुढे कधीपर्यंत भेट मिळणार याची नेमकी माहिती स्थानिक महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांकडे मिळत नाही. यामुळे सेविका, मदतनीस संभ्रमावस्थेत आहेत. पुढील आठवडाभरात भेट न मिळाल्यास राज्य अंगणवाडी सेविका संघटनेतर्फे पुन्हा निवेदन, निदर्शने, मोर्चा काढण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.


शहरात २०० सेविका

दिवाळीत भाऊबीज न मिळालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीसची संख्या तालुकानिहाय अशी : कोल्हापूर शहर: २००, करवीर: ४२०, हातकणंगले : ४०२, शिरोळ : ४१७, गगनबावडा : ६४, आजरा : २०७, भुदरगड: २३५, चंदगड :२५०, गडहिंग्लज : २७९, कागल : २९६, पन्हाळा: ३०५, राधानगरी: २८३, शाहूवाडी : २८३, कोल्हापूर ग्रामीण : २३८.


सरकारकडून ‌अंगणवाडी सेविकांना दिवाळीत भाऊबीज भेट दिली जाते. यंदा एक हजाराची वाढ केल्याने ती दोन हजार झाली आहे. दिवाळी झाली तरी ती भेट मिळाली नाही. पुढील आठवडाभरात भेटीच्या रक्कम जमा न झाल्यास निवेदन देणार आहे. दखल न घेतल्यास नाईलाजास्तव आंदोलन करावे लागेल.

सुवर्णा तळेकर, जनरल सेक्रेटरी, जिल्हा अंगणवाडी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत पाटलांच्या संपत्तीची चौकशी करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील राज्याचे ट्रस्टी आहेत हे विसरले आहेत. राज्याचे मालक असल्यासारखे ते गणेशोत्सवात वागले. पालकमंत्र्यांनी याकाळात पैशाचा पाऊस पाडला. त्यांच्या २०१४ पूर्वीच्या व आत्ताच्या आर्थिक परिस्थितीत जमीन-आस्मानचा फरक पडला. निवडणूक आली की लाखो रुपये वाटले जातात. वाटले जाणारे हे लाखो रुपये येतात कुठून? असा सवाल करत आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाटील यांच्या संपत्तीसह त्यांच्याकडे असलेल्या महसूल, बांधकाम खात्याची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रविवारी केली. शिवसेनेच्यावतीने कै. डॉ. विश्वनाथ गायकवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महिलांना हेल्मेट वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

आमदार क्षीरसागर यांनी भाषणात पालकमंत्र्यांवर चौफेर ‌टीका केली. ते म्हणाले, ‘ गणेशोत्सव काळात डॉल्बी प्रकरणावरून पालकमंत्री पाटील कोल्हापूरचे आणि राज्याचे मालक असल्यासारखे वागत होते. या काळात त्यांनी अक्षरश: पैशाचा पाऊस पाडला. पाटील यांची मंत्री होण्याआधीची आणि आत्ताची आर्थिक परिस्थिती पाहिली तर त्यात प्रचंड फरक आहे. ही संपत्ती आली कुठून? त्याच्याकडे असलेल्या संपत्तीसह महसूल आणि बांधकाम खात्याची ईडीमार्फत चौकशी व्हायला हवी. कोल्हापुरात अनेकांनी पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकायचा प्रयत्न केला. त्यामुळे पैशाच्या जीवावर निवडणुका लढविणाऱ्या पालकमंत्र्यांचा पुढील निवडणुकीत घोसाळकर झाल्याशिवाय राहणार नाही, अशी मला खात्री आहे. कोल्हापुरात कदापि दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हेल्मेट सक्तीतील त्रुटींमुळे जनतेचा प्रचंड विरोध होता. त्यामुळे प्रशासनाने जबरदस्ती करू नये, जनजागृती करावी, असे आमचे मत होते. हेल्मेट वितरणाच्या माध्यमातून मीही जागृती करत आहे. सामाजिक बांधिलकी जपत काम मी हे काम करत असून महिलांना हेल्मेट वाटप हा सामाजिक उपक्रम म्हणून राबवला आहे. यापुढील काळात देखली हेल्मेट सक्ती झाली तर रस्त्यावर येऊ.’

संपर्क नेते खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले, ‘जिल्ह्यात शिवसेनेचे सध्या सहा आमदार आहेत. पुढील निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेचे दहा आमदार करण्याचा संकल्प आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात २८ आमदारांपैकी किमान १८ आमदार शिवसेनेचे असतील.’

संपर्क प्रमुख अरुण दुधडकर म्हणाले, ‘महिलांसाठी ही भाऊबीज वेगळी आहे. या उपक्रमामुळे आमदार क्षीरसागर यांना महिला धन्यवाद देतील. खराब रस्त्यामुळे अपघात होऊन जीव गमवावा लागतो. शहरातील रस्ते खराब असताना पालकमंत्री मात्र, घरटी पदे वाटत फिरत आहते. रस्त्यांच्या दुरवस्थेला सरकार जबाबदार आहे.

यावेळी महापौर हसीना फरास, शिवसेना संपर्कनेते खासदार गजानन कीर्तिकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर, युवा सेनेचे राज्य उपाध्यक्ष पवन जाधव, देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते महिलांना हेल्मेट वितरित करण्यात आले.

पावसाळ्यातील पूरस्थितीमध्ये श्रीमती यशोदा कांबळे व संदीप घाटगे यांचे नुकसान झाले होते. त्यांना आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्यावतीने दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्याचबरोबर पहिल्या महिला ढोल ताशे व लेझीम पथकाच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाओ आंदोलन करणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रमुख महिलांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव,मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड,जनता बझारचे चेअरमन उदय पोवार, परिवहन सभापती नियाज खान,माजी महापौर मारुतराव कातवरे, नगरसेवक राहुल चव्हाण,नगरसेविका प्रतीज्ञा उतुरे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे,नंदकुमार मोरे, चंद्रकांत साळोखे, रवी इंगवले, उद्योगपती जितेंद्र गायकवाड, ऋतुराज क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटन बहरले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दिवाळी सुट्टीसाठी कोल्हापूर शहर आणि परिसरातील पर्यटनाची ठिकाणे हाउसफुल झाली आहेत. एमटीडीसी, पंचतारांरित हॉटेल्स, थ्री आणि टू स्टार हॉटेल्स दिवाळीसह नाताळच्या सुट्टीसाठी ऑनलाइन बुक झाली आहेत. नोटबंदी, जीएसटीसह अधून-मधून पावसाचा फटका असला तरीही पर्यटकांचा ओघ कोल्हापूर जिल्ह्याकडे वाढला आहे. श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाउसफुल झाली आहेत. पर्यटनामुळे सेवा उद्योगासह अन्य व्यवसायालाही चालना मिळाली आहे. पर्यटनामुळे लाखोंची आर्थिक उलाढाल होत आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या पूरक व्यवसायाला यानिमित्ताने बूस्ट मिळाला आहे.

दिवाळीची सुट्टी आणि हिवाळ्याची चाहूल भटकंतीसाठी सुखकर असते. पर्यटकांनी अभयारण्य, धार्मिक स्थळे, समुद्रकिनारा या ठिकाणी पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी झाली आहे. मुलांच्या सुट्टींचे नियोजन करुन महिनाभर अगोदरच पर्यटनाचे ठिकाण, हॉटेल आणि वाहनांची नोंदणी केली. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून कोल्हापूर पर्यटकांच्या गर्दीने हाउसफुल झाले आहे. १६ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत एक लाखांहून अधिक पर्यटकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. विशेषतः पुणे-मुंबईसह नागपूर, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, गुजरात राज्यातून पर्यटकांची गर्दी आहे. कोकणात जाण्यासाठी सर्वच पर्यटक कोल्हापूर करून मगच पुढे जाण्याला पसंती देतात. श्री अंबाबाईचे दर्शन, न्यू पॅलेस, रंकाळा, जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूर ही पर्यटनस्थळे पाहून आजरामार्गे आंबोलीतून कोकणाकडे जातात. पुण्या-मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांना राष्ट्रीय महामार्गावरुन हा मार्ग सोयीचा असल्याने या मार्गावरील असलेली पर्यटन आणि धार्मिक स्थळे गर्दीने फुल्ल झाल्याचे चित्र आहे. कोकणसाठी आजऱ्याहून आंबोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा दिसत आहेत. पर्यायाने या मार्गावरील हॉटेल्सना चांगला व्यवसाय मिळत आहे. या परिसरातील उद्योगांनाही चालना मिळाली आहे.

पर्यटकांना स्थानिक वस्तू खरेदी करता येण्यासाठी या मार्गावर काहींनी रस्त्याजवळ स्टॉल उभे केले आहे. गूळ, काकवी, भाजीपाला, लाकडी खेळणी, स्थानिक उत्पादकांनी बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर भाजी, भाकरी, ताक, खर्ड्यासह शाकाहारी, मांसाहारी भोजनासाठी गर्दी झाली आहे. पर्यटकांची आर्थिक लूट न करता हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंटमध्ये भोजनाची व्यवस्था करू लागल्याने पर्यटकांचा ओघ अधिक वाढला आहे.

बाहेरच्या ठिकाणांनाही पसंती

छोट्या सुट्यांसाठी कोकणातील समुद्रकिनारे, महाबळेश्वर, गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. आठवडाभराच्या पर्यटनासाठी राजस्थान, केरळ, मध्यप्रदेश, तिरुपती बालाजी, शिर्डी, गुजरात, अंदमानसाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. परदेशी पर्यटनासाठी कंपन्यांनी आकर्षक ऑफर घेऊन काहींनी परदरेशात दिवाळी साजरी केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे (एमटीडीसी) कोल्हापुरातील नोंदणी कार्यालय श्री अंबाबाई मंदिरासमोरील विद्यापीठ हायस्कूलसमोर आहे. देवीचे दर्शन घेतल्यानंतर पर्यटकांची या ठिकाणी नोंदणी आणि माहितीसाठी गर्दी होत आहे. ऑनलाइन नोंदणी एमटीडीसीच्या गणपतीपुळे, तारकर्ली, महाबळेश्वर, वेळणेश्वर, कुणकेश्वर, पानशेत, कार्ला या ठिकाणी महिन्याभरापूर्वीच झाली आहे.

हॉटेल्सकडूनही सवलती

हॉटेलमधील एसीसाठी १६ टक्क्यांवरून १२ टक्के जीएसटीचा झाल्याचा अद्याप अध्यादेश आलेला नाही. त्यामुळे एक हजार रुपयांपुढील बिलांवर जीएसटी आकारला जात आहे. पर्यटकांचा ओघ वाढल्याने काहींनी नॉन एसी, एसी रुम्स, भोजन व्यवस्थेच्या पॅकेजमध्ये भरघोस सवलत दिली आहे. बहुतांशी हॉटेल व्यावसायिकांनी जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूरसह कोल्हापूर परिसरातील ५० ते १०० किलोमीटर परिसरातील पर्यटनासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रेल्वे आणि एसटीने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना या पॅकेज आणि सुविधेचा फायदा होत आहे. खासगी हॉटेल, यात्री निवास हाउसफुल्ल झाल्याचे फलकही झळकत आहेत.

कोल्हापूरहून तिरुपती, शिर्डी, श्री क्षेत्र अक्कलकोट, तुळजापूरला धार्मिक पर्यटनासाठी पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यासह कोकणातील तारकर्ली, वेंगुर्ला, देवबाग, अलिबाग, हरिहरेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, दिवेआगर, गुहागर या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी, दाजीपूर, नृसिंहवाडी, खिद्रापूर, कणेरी मठ, जोतिबा, पन्हाळा, आंबा, आंबोली, गगनबावडा, रामलिंग, बाहुबली या ठिकाणी पर्यटनाला पसंती आहे. महाबळेश्वर, भंडारदरा, आंबोली, माथेरान येथे ऑनलाइन बुकिंग सुरु झाले आहे. बहुतांश कंपन्यांना दिवाळीत तीन ते चार दिवस सुट्ट्या असल्याने छोट्या सहलीचा टक्का वाढला आहे. वन्यजीवांबद्दल वाढलेल्या आकर्षणामुळे जंगल सफारीसाठी पर्यटक बाहेर पडले आहेत. देशभरातील अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प एक ऑक्टोबरपासून खुली झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टस्करचे पेरणोली-साळगावात नुकसानसत्र

$
0
0

आजरा

गेले काही दिवस आजरा तालुक्याच्या मसोली, वेळवट्टी व गवसे परिसरातील नुकसानीचे सत्र थांबवून आता टस्करने आपला मोर्चा पेरणोली व साळगाव परिसरात वळविला आहे. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या या पीकनुकसानीमुळे या परिसरातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. यामुळे यावर्षीच्या दिवाळी दरम्यान येथील शेतकाऱ्यांवर ‘दीन’ होण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे.

हाळोली, मसोली व गवसेकर ग्रामस्थ मेटाकुटीस येऊन विविध प्रकारे हत्तीमुक्त परिसरासाठी प्रयत्न करताना या पेरणोली व साळगाव विभागात हत्ती येईल असे न वाटलेले शेतकरी आता चिंताग्रस्त झाले आहेत. टस्करने हिरण्यकेशी नदीपात्र ओलांडून गेल्या आठवड्यातच या विभागात प्रवेश केला आहे. या आधी रानडुक्करे व अन्य वन्य प्राण्यांच्या नुकसानीने त्रस्त असलेल्या या विभागाच्या नशिबात आता हत्ती संकट आले आहे. हत्तीने आपला मोर्चा साळगांवकडे वळवित शुक्रवारपासून रात्रीच्या सुमारास ऊस, भात, नाचणा, भुईमूग सारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान सुरू केले आहे. पांडूरंग कांबळे, सुर्यकांत केसरकर यांच्या ऊस शेतीचे, अशोक कांबळे यांच्या नाचणा पिकाचे, गोपाळ नातलेकर यांच्या भाताचे हत्तीकडून नुकसान करण्यात आले आहे. शनिवारी रात्री तर चक्क आजरा पेरणोली मार्गावरील साळगाव नजीक दत्तू कांबळे यांच्या घराजवळच्या उसामध्ये धुडगूस घालून त्यानंतर नजिकच्या पोल्ट्री शेडजवळही नुकसान केले. यामुळे टस्करने आता या परिसरातील मानवी वसाहतीनजिक वावर सुरू केला असल्याचे ठळक झाले आहे. नुकसानीनंतर हत्तीने पेरणोली व साळगाव दरम्यानच्या जंगलात पळ काढला आहे. वेळवट्टी, हाळोली, देवर्डे, मसोली या परिसरात तळ ठोकलेल्या या हत्तीने आता पेरणोली व सोहाळे गावच्या जंगलाकडे कूच केली असल्याने परिसर भयग्रस्त झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे वनाविभागाने केले आहेत. पण, अन्य वन्यप्राण्यांसह आता हत्तीचाही प्राधान्याने बंदोबस्त व्हावा, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पात्र शेतकऱ्यांनाकर्जमाफी मिळणारचसहकार मंत्री सुभाष देशमुख यांची ग्वाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘राज्यात पूर्वीच्या सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेचा अनुभव लक्षात घेऊन पात्र नसलेल्यांच्या खात्यात रक्कम जाऊ नये, म्हणून काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्षात मिळायला काहीसा वेळ होतो आहे. तरीही कर्जमाफीच्या निकषात बसणाऱ्या सर्व थकबाकीदारांना याचा लाभ निश्चित मिळणार आहे,’ अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. पहिल्या यादीतील ८ लाख ४० हजार शेतकऱ्यांच्या यादीवर आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्जमाफी सन्मान योजनेसाठी ७९ लाख शेतकरी अर्ज दाखल करतील, अशी अपेक्षा होती परंतु, प्रत्यक्षात ७७ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. कर्जमाफीचा लाभ तत्काळ मिळावा, यासाठी विरोधकांसह सर्वस्तरातून दबाव होता. कुणी म्हणाले, कर्जमाफी फसवी, मिळण्याबाबत साशंकता, दिवाळी गोड होणार की नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आगोदरच्या कर्जमाफीत तब्बल १५८ कोटींचा लाभ अपात्र कर्जदारांना दिला गेला होता. तशी चूक आता होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. पारदर्शीपणे योजना राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे सरकारी कामेही थांबली होती. मात्र आज, सोमवारपासून पहिल्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. कर्जमाफीसाठी दुसऱ्या यादीची छानणी करण्यात येत आहे, काहीसा वेळ लागेल, मात्र कुणावर अन्याय होणार नाही. जिल्हा बँकेकडे कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे बँकाचे २००९पासून थकीत असलेले कर्ज वसूल होण्याची संधी बँकांना मिळाली आहे. त्यामुळे बँकांनी अधिक न तानता सरकारकडून पैसे यायला एखाद्या दिवासाचा उशीर झाला म्हणून त्यावरील व्याजाची चिंता करू नये, असे आवाहनही देशमुख यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वसंतदादांच्या संस्थांचे पुनरुज्जीवन कराराज्यपाल श्रीनिवास पाटील यांची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली :
सहकाराचे माहेरघर असलेल्या सांगली जिल्ह्यातील वसंतदादा पाटील यांच्या काळात उभारलेल्या अनेक संस्था आज घडीला डबघाईला आल्या आहेत, ही शोकांतिका आहे. कोणी चुका केल्या, भ्रष्टाचार कसा झाला, अशा चुका उगाळत बसण्यापेक्षा चुका पोटात घेऊन संबधित संस्था सरकारने ओट्यात घ्याव्यात. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षात डबघाईला आलेल्या संस्था पुनर्जिवीत करण्याचे ‘सांगली मॉडेल’ राज्यसमोर ठेवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सोमवारी सांगलीत केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील उत्कृष्ट विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, सचिव, जिल्हा बँक शाखा, अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपाल पाटील यांच्या हस्ते सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विष्णूदास भावे नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले तर प्रास्ताविक करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीचा आणि बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लवकरच हे जिल्हास्तरीय पातळीवरचे पुरस्कार राज्यस्तरीय पातळीवर नेले जाणार असल्याची घोषणा केली. सहकार मंत्री सुभाष देशमुख अध्यक्षस्थांनी होते. या वेळी आमदार जयंत पाटील, आमदार मोहनराव कदम, बँकेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
राज्यपाल पाटील म्हणाले, ‘राजा ते प्रजा म्हणजे लोकशाही. सहकाराच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब विखे- पाटील, वसंतदादा पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून राजारामबापू पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी काम केले. जिल्हा बँकेतील गुलाबराव पाटील यांनी पाया घातला. त्यावरच आजही कामकाज सुरू आहे.’
आमदार जयंत पाटील यांनी कर्जमाफीची केवळ प्रमाणपत्रे मिळाली आहेत. माफीची रक्कम प्रत्यक्ष खात्यावर जमा झाल्याशिवाय पुढचे बोलणे बरोबर नाही. आमच्या दबावाने का असेना पण, कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असल्याने त्याचे श्रेय त्यांनीच घ्यावे, असा टोला लगावला. कर्जमाफी दिली.
इतिहासाची उजळणी करावी
सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, ‘सांगली जिल्ह्याचे दैवत असलेल्या वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात जिल्ह्यातील डबघाईला आलेल्या संस्थाच्या पुनरुज्जीवनासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घ्यावा. सरकारकडून अपेक्षा न ठेवता अडचणीतील सहकाराला सहकारी संस्थांनीच वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा. या करीता संपूर्ण राज्याला मार्गदर्शक ठरेल असे एक सांगलीचे मॉडेल तयार करावे. सांगलीने केले की, राज्यभर त्याचे अनुकरण केले जाते, या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळेल. विकास सोसायट्यांनीही गावपातळीवर ठेवी घ्यायला सुरुवात करून गावातला पैसा गावातल्याचे गरजूंना व्यवसाय, उद्योगासाठी मिळाला तर रोजगार उपलब्ध होईल. त्याचबरोबर सोसायट्यांनी एक तरी व्यवसाय सुरू करावा. म्हणजे सर्वच गोष्टींचा ताण जिल्हा बँकावर पडणार नाही.’
दिलीप पाटील यांची जोरदार टोलेबाजी
बँकेला नोटबंदीचा मोठा फटका बसला. १०० कोटींच्या घरात जाणारा नफा ५२ कोटींवर आला. नोट बंदीवर जिल्हा बँकांवरच फार अविश्वास दाखवण्यात आला. मात्र, सांगली बँकेने सतत या कर्जमाफी योजनेस सरकारला मदतच केली. अगदी कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमही जिल्हा बँकेच्या पुढाकारानेच झाला. केवळ सहकार मंत्र्यांच्या शब्दाखातर बँक सर्व मदत करीत आहे, सहकार मंत्र्यांनीही आता सोलापूर विसरून सांगलीकडे अधिक लक्ष द्यावे. आता सरकार म्हणत आहे शेतकऱ्यांना कर्ज माफीचे पैसे वर्ग करा. पण, जिल्हा बँका अडचणीत येऊ नयेत याची काळजी घ्या. सरकारने पैसे क्रेडीट केल्यावरच शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग करू, अन्यथा बँकेला रोज दहा लाखांचे नुकसान सहन करावे लागेल. मोहनशेठ कदम यांनी भाषणाल उठण्यापूर्वी फार बोलू नका, असे सांगितल्याचे सांगत बँकेत आता आपण मोहनशेठ कदम यांचेच जास्त ऐकतो, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका प्रशासनाचे वाभाडेनोकरभरती, खड्डे, अनुशेष भरतीवरून नगरसेवक आक्रमक

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली
नोकरभरती, लाड शिफारशीच्या लांबलेल्या नियुक्त्या, अनुशेष भरतीच्या जागेवरुन सदस्यांनी सोमवारी सांगली महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराच्या अक्षरशः चिंध्या केल्या. प्रशासनाच्या आडवणुकीमुळेच स्वच्छतेपासून ते विकास कामांपर्यंच्या शहरातील अनेक समस्यांची भर पडत आहे. कर्मचारी भरती न केल्यास आयुक्तांवर अ‍ॅट्रासिटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे यांनी भर महासभेत दिला. यावर महापौर शिकलगार यांनी वाट कशाची बघता असे सांगत आयुक्तांवरचा आपला राग व्यक्त केला. धनपाल खोत यांनीही सभेत महापौरांचे निर्णय प्रशासन ऐकत नाही, सदस्यांची कामे अधिकारी करीत नाहीत, यापेक्षा महापालिकाच बरखास्त करण्याची मागणी केली.
महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महासभा झाली. या सभेत आयुक्तांच्या अनुपस्थितीत आयुक्तांवर आगपाखड करण्याचा प्रयत्न ही फसला. सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले, मात्र प्रशासनाच्यावतीने प्रभारी आयुक्त सुनील पवार यांनी समाधानकारक उत्तरे दिल्याने सदस्य शांत झाले. मात्र नोकरभरती, अनुशेष यावर आयुक्तांविना निर्णय होऊ शकत नाही, हे समोर आले.
शेखर माने म्हणाले, महापालिकाच मानधनावर चालते आहे. महापौर, आयुक्त हे सतत कर्मचारी भरती करतो, अशा घोषणा करीत आहेत. दहा वर्षांत एकही खुल्या वर्गातील पद भरलेले नाही. रिक्त पदे केव्हा भरणार? तुम्ही घोषणा करता, प्रशासन काहीच हालचाल करताना दिसत नाही. यावर प्रभारी आयुक्त सुनील पवार म्हणाले, नोकरभरतीत सुटसुटीतपणा आणला आहे. सरकारने सेवानिवृत्त अथवा मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सहा महिन्यात नोकरी मिळावी, असे आदेश आहेत, शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे वेळेत येत नाहीत, यामुळे विलंब होत आहे, असल्याचे सांगितले.
डॉ. कवठेकरांचा पगार रोखला.
कुष्ठरोग रुग्णांच्या पेन्शन प्रक्रियेत दिरंगाई आणि शौचालय सबसिडीबाबत शेखर माने, युवराज गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला. कुष्ठरोग्यांना एक हजार रुपये पेन्शन द्यावी, असा ठराव महासभेने तीन महिन्यांपूर्वी केला होता. आयुक्तांनी तो ५०० रुपये केला. याचीही अमंलबजावणी झाली नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांना काम करायचे नसेल तर त्याची स्वेच्छा निवृत्ती घेऊन घरी बसावे. शौचालयांसाठी अनुदानातही अशीच दिरंगाई झाली आहे. पंधरा महिन्यांपासून महापौरांच्या आदेशांना प्रशासनातील अधिकारी केराची टोपली दाखवत असतील तर उपयोग काय? यावर उत्तर देताना महापौरांनी आरोग्याधिकारी डॉ. कवठेकर यांचा पगार रोखण्याचे आदेश दिले.
खड्ड्यांवरून प्रशासन पुन्हा लक्ष्य
सांगलीतील रस्त्यांची वाट लागली आहे. नागरिक खड्ड्यांमध्ये दिवे लावून नगरसेवकांविरोधात आंदोलन करत आहेत. आयुक्त निवडणुकीच्या तोंडावर कामे अडवून नगरसेवकांना बदनाम करण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप नगरसेवकांनी या सभेत केला. खड्ड्यांमध्ये नागरिकांचा जीव गेल्यास महापालिका महापौर व प्रशासन जबाबदार राहतील, असा इशारा देखील नगरसेविका प्रियांका बंडगर यांनी दिला. जीएसटीमुळे ठेकेदार हॉटमिक्सची कामेच करीत नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या. सभेत शहरातील खड्डेमय रस्त्यांचा विषय चांगलाच गाजला.
युवराज गायकवाड यांची गांधीगिरी
विश्रामबाग-स्फूर्ती चौक या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची फाइल जुलै महिन्यापासून आयुक्तांकडे प्रलंबित आहे. तरी देखील फाइलीला मान्यता मिळत नाही. प्रशासन व नगरसेवकांच्या विरोधात शनिवारी आंदोलनही झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ नगरसेवक युवराज गायकवाड यांनी महासभा सुरू झाल्यानंतर प्रभारी आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील यांना पुष्पगुच्छ देत गांधीगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images